Friday, December 29, 2017

ब्लॉग -’ती’ चं हक्काचं व्यासपीठ

हा स्तंभ सरत्या वर्षाबरोबर तुमचा निरोप घेतो आहे, असं वाक्य स्तंभाच्या शेवटच्या लेखात सुरुवातीला वापरण्याचा प्रघात आहे. या स्तंभातून तुम्हाला भेटलेल्या महिला-ब्लॉगर्सनी मात्र ’ती’ने काय-कशाबद्दल लिहावं याचे प्रघात सहजपणे मोडले आहेत. स्वत: निवडलेल्या विषयांवर ब्लॉगवर व्यक्त होत त्या त्यांचं म्हणणं जगाशी बिनधास्त शेअर करतायत. ’ती’ च्या जगण्यातली आव्हानं, समस्या संपलेल्या नाहीत, काळाबरोबर बदलल्या असतील इतकच पण या त्यात कण्हत, कुथत, गुंतून पडलेल्या नाहीत. प्रसंगी त्याबद्दल त्या स्पष्ट भूमिका घेतात पण त्याला आयुष्याचं केंद्र मानत नाहीत. उलट त्या अडचणींवर ठाम उभं राहून आपली उंची वाढवण्याची धमक त्यांच्यामध्ये आहे.


ब्लॉगींग या क्षेत्रात ’ती’ सध्या काय करते, याचा धांडोळा घेणं हे या स्तंभाचं उद्दिष्ट्यं होतं. जगभरात आज लाखो महिला ब्लॉगर्स आहेत. आपल्या देशातच वैविध्यपूर्ण विषयांवर सकस लेखन करणार्‍या अनेक जणी आहेत. स्तंभासाठी निवड करताना आलेल्या भाषेच्या आणि माझ्या आकलनाच्या मर्यादांची मला जाणीव आहे. मराठी, हिंदी आणि इंग्लीश ब्लॉगर्स व्यतिरिक्त इतर भारतीय भाषांमधून दर्जेदार लिहिणार्‍या महिला ब्लॉगर्स पर्यंत मला पोचता आलं नाही. ब्लॉग लिहिण्यासाठी निवडलेल्या विषयाची खोलवर जाण, लेखनकौशल्य याबरोबरच इंटरनेट तंत्रज्ञानाची मुलभूत माहिती आणि इंटरनेटची उपलब्धता आवश्यक असते. साहजिक या माध्यमावर सुशिक्षित, शहरी स्त्रियांचे प्रमाण सर्वाधिक आहे. शेतकरी, कामकरी स्त्रियांचं जगणं, संस्कृतीच्या चौकटीबाहेर स्वेच्छेने जगणार्‍या किंवा जगावं लागणार्‍या स्त्रियांच्या भावना इथे उमटल्याच नाहीत असं नाही, पण ते ’इंडियन वुमन’ सारख्या ब्लॉग्स वर कुणाकडून तरी शब्दांकित होऊन, त्याला अस्सलतेचा गंध नाही. ही या माध्यमाची एक मर्यादा आहे.

अर्थात आपल्या जगण्याकडे आरपार बघता बघता केलेलं प्रामाणिक कथन एक अंगभूत ताकद घेऊन येतं मग ते अनुभव कोणत्याही सामाजिक वर्गाचे असोत. ती ताकद ज्यांनी ओळखली त्यांचे ब्लॉग वाचकांना भिडतात. हे अनुभव पूर्वी डायरीत, स्वांतसुखाय लिहिले जात. आज वेब-लॉग म्हणजेच ब्लॉगच्या माध्यमातून ते इंटरनेट या जागतिक चावडीवर आले आहेत. जगाच्या कोणत्याही कोपर्‍यातून, कोणत्याही वेळी ते वाचता, ऐकता, पाहता येत आहेत. वर्डप्रेस किंवा ब्लॉगर.कॉम सारख्या साईटच्या मदतीने कुणालाही विनामूल्य ब्लॉग तयार करता येतात. परंतु गुणवत्ता, आवाका, शब्दांवर हुकूमत आणि सातत्य नसेल तर वाचक फार काळ त्या ब्लॉगशी जोडलेले राहत नाहीत. ज्या ब्लॉग्स मध्ये हे चारही पैलू ठळकपणे दिसून आले त्यांचा समावेश या स्तंभात आवर्जून केला. तरीही अनेक उत्तम महिला ब्लॉगर्सना स्तंभ संपवत असल्याने त्यात सामावून घेता आलेलं नाही.

भारतीय महिला ब्लॉगर्सच्या विषयांचे वैविध्य थक्क करणारे आहे. फावल्या वेळात पाककृती लिहिण्यापलीकडे एक फूड ब्लॉगर काय कमाल करू शकते हे ’लाईटबाईट’च्या फूड फोटोग्राफर संजीताच्या ब्लॉगवरुन कळतं. ’चित्रपट परिक्षण’ हया महिलांची फारशी वर्दळ नसलेल्या प्रांतात, हिंदी-इंग्लीश चित्रपटांचं अभ्यासपूर्ण परिक्षण धमाल नर्मविनोदी शैलीतही लिहिता येतं हे मनीषा लाखे यांचा ब्लॉग दाखवून देतो. आता त्यांचं परिक्षण वाचून मगच चित्रपट पाहायचा की नाही याचा निर्णय़ घेतो असं काही वाचकांनी कळवलं.
जलविश्वात विहरणार्‍या परीणीता दांडेकरची ललितलेखन आणि वास्तवाची सांगड घालणारी अफलातून शैली तिच्या ब्लॉगवाचकांना भुरळ घालून जाते. जिप्सी वृतीच्या सुलक्षणा व-हाडकर यांचा ब्लॉग आजच्या भारतीय पण ग्लोबल नागरिकाच्या भावविश्वात डोकावण्य़ाची संधी देतो.
वेशसंकल्पन या विषयावर प्रभुत्व असणार्‍या नीरजा पटवर्धन यांच्या ब्लॉगमुळे ’ते म्हणजेच फॅशन डिझाईनींग’ हा गैरसमज दूर होतो, त्यातल्या खाचाखोचा कळतात.
मेघना भुस्कुटेच्या ब्लॉगमुळे जगण्य़ात खोलवर डोकावून पाहणं म्हणजे काय हे कळतं.
पत्रकारितेतले फिक्सर सारखे अनोखे अनुभव मांडणार्‍या मृण्मयी रानडे, रोखठोक लिहिणारी मुक्ता चैतन्य, सामाजिक आणि राजकीय विषयांवर घणाघाती लिहिणार्‍या शेफाली वैद्य यांचे ब्लॉग वाचकांना प्रेरित करुन जातात.
’स्पृहाच्या कानगोष्टी’ एका संवेदनशील अभिनेत्रीमधल्या लेखनकौशल्याची चुणूक दाखवून जातात तर ट्वींकल खन्नाचा ’मिसेस फनीबोन्स’ हा मिश्कील ब्लॉग स्त्रियांच्या विनोदबुद्धीवरचं प्रश्नचिन्ह स्माईलीमध्ये बदलवून जातो. ’साडी आणि बरच काही’ फेम सायली राजाध्यक्ष यांचा ब्लॉग वाचून, ’मी साडी या वस्त्रप्रकारावर चक्क प्रेम करायला लागले’ असं काही मैत्रिणींनी कळवलं.
 ’मिनिमलिझम’ ही संकल्पना नेमकेपणाने पोचवणार्‍या शर्मिला फडके यांच्या ब्लॉगने भारावून जाऊन ते शक्य तितकं कृतीत आणायचा प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया बर्‍याच जणांनी नोंदवली.
आजच्या तरुणाईची स्पंदनं टिपणारी दिशा महाजन आणि ताकदीने ब्लॉग हे माध्यम हाताळणार्‍या प्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांच्या एबीपी माझा वर गाजणार्‍या ब्लॉग्सच्या ची नोंद घेतल्याविना तर हा स्तंभ अपुरा वाटला असता.

ग्रुप ब्लॉग ही देखील एक सुंदर संकल्पना आहे. ’अलोन आय कॅन स्माईल टूगेदर वी कॅन लाफ’ याचा प्रत्यय यातून येतो. सामाजिक भान जागवणारा मेधाताई कुलकर्णी प्रणित  ’नवी उमेद’, समविचारी सख्यांचा ’इंद्रधनु’, स्त्रियांची तगमग खणखणीतपणे मांडणारा, रोकडे सवाल करणारा ’चोखेर बाली’ ही या स्तंभात समावेश झालेल्या ग्रुप ब्लॉगची काही उदाहरणं. ’पर्सनल इज पॉलिटिकल’ याचा अनुभव इथे देता-घेता येतो.

मुळात ब्लॉग कशाला लिहायचा, याचं उत्तर हौस, उर्मी किंवा सामाजिक कामाला बळ मिळावं हे असू शकतं तसच त्या मागे स्वच्छ व्यावसायिक हेतू देखील असू शकतो. या स्तंभात समावेश झालेल्या, करियर म्हणून ब्लॉगींग कडे पाहणार्‍या व्ही-लॉगर परिमा शर्मा, आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर, विश्वभ्रमंती करणारी शिव्व्या नाथ, युअर स्टोरी या करियर विषयक समूहब्लॉगची प्रणेती श्वेता शर्मा या खर्‍या अर्थाने यूथ आयकॉन आहेत.
लग्नानंतर किंवा प्रापंचिक अडचणींमुळे नोकरीतून ब्रेक घेतलेल्या दक्षिण भारतातल्या अनेक उच्चशिक्षित मुलींचा ’तंत्रज्ञान विषयक ब्लॉगिंग’ हा व्यवसाय आहे. थोडक्यात त्या दिग्दर्शक-लेखक कुंडलकर म्हणतात त्यापैकी ’दुपारच्या वेळी फेसबुक वर काहीतरी खरडणार्‍या रिकामटेकड्या गृहिणी’ नसून व्यवसायाच्या बदलत्या ट्रेंड्सचं भान असेलल्या, आधुनिक प्रकारचा ’गृहोद्योग’ करणार्‍या स्वयंपूर्ण स्त्रिया आहेत.
ब्लॉगचे चाहते वाढवून जाहिरातींद्वारे कमाई व्हावी म्हणून किंवा अ‍ॅफिलिएट मार्केटर बनून किंवा वेबसाईट गुगल शोधयादीत शिरोभागी यावी म्हणून या ब्लॉगर्स काम करतात. ’कॉंटेंट इज द किंग’ हे सूत्र समजलेल्या किती तरी जणी आपल्या नव्या उपक्रमांना निधी, उत्पादनांना-उपहारगृहांना ग्राहक, पुस्तकांना वाचक किंवा कलाकृतीला प्रेक्षक मिळवण्यासाठीही ब्लॉगचा वापर  करतात. अशा हेतूने ब्लॉगकडे पाहणार्‍यांमध्ये मराठी महिला ब्लॉगर्सचे प्रमाण तुलनेने अतिशय कमी आहे.

सोशल मिडीया आज प्रचंड लोकप्रिय आहे. तिथेही लेखन करता येतं, लहान आकारातील लेखांमुळे त्याला मायक्रोब्लॉगींग म्हटलं जातं. उदा: फेसबुक, मग आता ब्लॉगची गरज काय? असा प्रश्न काही वाचकांनी विचारला. माझ्या मते फेसबुक किंवा एकूणच समाजमाध्यमांवर वाचक कमी आणि ’स्क्रोलप्रेमी’ जास्त असतात, त्यामुळे चांगल्या वाचकांसाठी तिथे लेखाचा अंश लिहून उर्वरित भाग ब्लॉगवर जाऊन वाचण्यासाठी लिंक देणं हा सोपा मार्ग. त्यामुळे ब्लॉगची पोचही आपोआप वाढते. सोशल मिडीयावरची दुसरी अडचण म्हणजे पोस्ट्सच्या ढिगात तुमचा लेख हरवून जातो. ब्लॉगवर तुमचं लेखन एका जागी तारीखवार लावून ठेवलं जातं. सहज शोधता, वाचता येतं. अनेक महिला पत्रकार, विशेषत: इंग्लीश माध्यमातल्या, आज ब्लॉगर आहेत. वृत्तपत्रीय धोरणाची बंधनं, संपादकीय कात्री, ब्लॉगवर आड येत नाही. अनेक ब्लॉग्स पुस्तकरुपात प्रकाशित झाले आहेत. ’ज्युली अँड ज्युलिया’ हा हॉलीवूड चित्रपट तर पूर्णपणे ज्युली पॉवेलच्या ब्लॉगवर आधारित आहे. आपल्याकडे ’तुम्हारी अमृता’ सारखे वाचनाचे प्रयोग किंवा पुस्तकांच्या अभिवाचनाचे प्रयोग होतात. त्यास्वरुपाच्या सादरीकरणासाठी येत्या काळात ब्लॉगचा विचार व्हायला हरकत नाही.

व्यावसायिक दृष्टिकोन असो वा व्यक्त होण्य़ाची गरज, एखादा विषय पोटतिडकीने जगासमोर आणण्याची आस असो वा स्वत:च्या मनाचे कंगोरे निरखण्य़ातलं मुग्ध समाधान, हेतू काहीही असो, आजच्या तंत्रज्ञानाच्या झंझावातात ब्लॉगचं भक्कम व्यासपीठ ’ती’ च्या सह प्रत्येकाला उपलब्ध आहे. तरीही यापलीकडे जाऊन ’ब्लॉग का लिहावा’ किंवा ’ब्लॉग का वाचावा’ या दोन्हीचं उत्तर मला पद्मा गोळे या कवयित्रीच्या ’मुठभर हृदया’ कवितेतल्या या शब्दात सापडतं...
’वादळे यासाठीच वापरायची असतात..
आपण काय आहोत
हे तपासण्यासाठी नव्हे,
आपण काय होऊ शकतो,
हे आजमावण्यासाठी.... ’

Friday, December 22, 2017

’ब्लॉग ’ती’ चा’ - वेगळ्या जागेवरून पाहताना

पूर्वी किंवा अगदी आतापर्यंत मराठी साहित्य रसिकांचे-वाचकांचे ढोबळ गट करायचे झाले तर ते ’पुलंचं लेखन आवडणारे आणि न आवडणारे’ असे करता येत. आज मराठी इ-वाचकांमध्ये असे गट करायचे झाले तर ते ’कविता महाजन यांचं लेखन आवडणारे आणि न आवडणारे’ असे होऊ शकतात. वाचनाच्या एका टप्प्यावर ’कोसला’ कंपलसरी वाचले जाते तसे ’ब्र’ किंवा ’भिन्न’ या कविता महाजनांच्या कादंबर्‍यांबाबत म्हणता येईल. 

गोळीबंद शब्दयोजना, अस्वीकार्य गोष्टींना- दडपणांना चिरून टाकणारी धारदार भाषा आणि भारतीय स्त्रीजीवनाचा सखोल अभ्यास ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्यं. त्या म्हणतात "मराठी स्त्री-साहित्यात काही विषयांवर बायका लिहीतच नाहीत, काहींवर धूसर लिहितात. लोकसाहित्यात कुणा एका बार्इचं नाव येण्याचं कारण नसतं. त्यामुळे तिथं मात्र मोकळेपणानं अनुभवांची, विचारांची मांडणी झालेली दिसते." आज हे करु धजावणार्‍या मोजक्या लेखिकांमध्ये त्या आहेत. समाजाची पुरुषप्रधान मानसिकता अधोरेखित करताना अनेकदा त्यांचं नकारात्मकतेकडे झुकणारं, स्त्रीच्या लैंगिक जाणीवा थेटपणे, बोल्ड पद्धतीने मांडणारं लेखन, त्यातला गूढभाव हे सारं शहारे आणतं, कधी एकांगी वाटतं. त्याच वेळेस त्यांचं इतर लेखन माणसातल्या विकृती बरोबरच प्रकृती आणि संस्कृतीबद्दलही सांगत असतं, वाचकांवर शब्दांचं गारुड करत असतं. कधी त्यात ’कुहू’ सारखे काळाच्या पुढे जाणारे तर कधी ’समुद्रच आहे एक विशाल जाळं’या दीर्घकवितेसारखे प्रयोग होतात. ’मी स्त्रीवादाचा टप्पा केव्हाच ओलांडून पुढे गेले आहे’ हे त्यांनी स्पष्ट करुनही त्यांच्यावरचा ’बंडखोर स्त्रीवादी लेखिका’ हा शिक्का मात्र तसाच आहे.

दुसर्‍या बाजूला त्यांच्या सातत्यपूर्ण, दर्जेदार इ-लेखनाकडे बहुसंख्य इ-वाचकवर्ग आकृष्ट होतो आहे. सोशल मिडीयावर व्यक्त होणं असो वा ब्लॉगिंग, दोन्ही लेखनप्रकार तंत्रमैत्रीमुळे आणि ताकदीने हाताळणार्‍या मराठीतल्या त्या मह्त्वाच्या लेखिका आहेत. ’पांडित्य आणि काठिण्य या दोन्ही गोष्टी कायम एकमेकांशी जोडून ठेवण्याची गरज नाही’ असं म्हणत त्या सोप्या पद्धतीने लिहितात. ’चालू वर्तमानकाळ’ हा सभोवताली घडणार्‍या घटनांचे परखड विश्लेषण करणारा त्यांचा ब्लॉग http://abpmajha.abplive.in/blog  गाजतो आहे. फेकन्यूज, 'न्यूड' चित्रपट, समाजाची दांभिकता, बाल लैंगिक अत्याचार अशा विषयांची त्यातली त्यांची प्रखर मांडणी सुन्न करून जाते. "जग तुझ्या बापाचं आहे की माझ्या बापाचं, हा मुद्दा फारच घिसापीटा झाला. ते माझ्या आईचं किंवा तुझ्या आईचंही असू शकतं… असतं अनेकदा… हे कधी कळणार रे?" असा परखड सवाल करणार्‍या कविता महाजन, त्यांच्यावरच्या शिक्क्यापलिकडे जाऊन समजून घ्यायच्या असतील तर मात्र त्यांच्या आणखी २ ब्लॉग्ज बद्दल बोलायला हवं. एखादा कातळ फोडावा आणि त्याखाली झुळझुळ वाहणारं पाणी आढळावं तसं हे ब्लॉग्ज वाचताना वाटतं.

त्यापैकी एक आहे, लाखाहून अधिक हिट्स असलेला https://kavitamahajan.wordpress.com  यामागची भूमिका त्यांच्याच शब्दात सांगायची तर "माझ्यात कधी आत्मचरित्र लिहिण्याचं बळ येईल असं मला वाटत नाही; पण आता हे अशा अनुभवांचे काही तुकडे लिहून काढावेत असं मात्र वाटतं आहे. हे सारे व्यक्तिगतच आहेत असं नाही, त्यांना सामाजिक संदर्भ आहेत". 
या ब्लॉगवर काय नाही, कथा, ललितलेखन, वाचकाला नि:शब्द करणार्‍या विविध भाषेतल्या भारतीय लेखिकांच्या पुस्तकांबद्दलचं मनोगत आणि खुसखुशीत भाषेतली बदलापूरची बखरही. त्या स्वत: चित्रकार असल्याने केलेलं चित्रकलेबाबतचं साक्षेपी लेखन आहे. प्रभावीपणे अनुवाद केलेल्या बहुतेक कविता अर्थातच त्यांच्या राजकीय भूमिकेला अनुकूल आहेत. वृत्तपत्रीय धोरणांच्या बंधनांच्या पलीकडे जाण्य़ाची इथे मुभा असतेच. यातला ’स-अवकाश लेखन’ हा विभाग तर प्रत्येक नव्या लेखकाने, नवकवीने आणि ’मी ना हल्ली फेसबुकवर लिहिते/लिहितो’ गटातल्या मंडळींनीं आवर्जून वाचावा असा. ब्लॉगवरचं मृत्युविषयक चिंतन, मुक्तचिंतन वाचताना त्यामागचं जीवनशोधाचं प्रयोजन उलगडत जातं. इथल्याच एका अंतर्मुख करणार्‍या कवितेत त्या लिहितात,
नाटक संपलंय..
पडदा टाक... मी खुणावलं
तर त्या जख्ख हातांना
खेचता येत नव्हता.. पडद्याचा दोर
मग भूमिका टाकून.. मी गेले
त्याला हात द्यायला..

त्यांचा तिसरा (सचित्र) ब्लॉग म्हणजे ’एबीपी माझा’ वरचाच ’घुमक्कडी’. गोष्टीवेल्हाळ कविता महाजन याच्या प्रस्तावनेत म्हणतात, "न आखलेले, परतीचं तिकीट न काढता केलेले प्रवास मला फार आवडतात. अनावश्यक माहिती मेंदूत भरून त्याला बधिर करून ठेवलं जातंय. त्या भंगारातून वाट काढत, गोष्टींचे थांबे घेत. अनुभवलेल्या, ऐकलेल्या, वाचलेल्या, सुचलेल्या गोष्टींचा हा प्रवास. " या ब्लॉगवरच्या ’वेगळ्या जागेवरून पाहताना’ या लेखात ’फाईंडिंग निमो’ या चित्रपटाचा उल्लेख आहे. त्यात दोन कॅमेरा अँगल आहेत. एक -मोठ्या समुद्रात पळून गेलेल्या निमो नावाच्या माशाच्या पिल्लाकडे पाहणारा आणि दुसरा ,निमो जेव्हा जाळ्य़ात पकडला जाऊन एका अ‍ॅक्वेरियम मध्ये बंदिस्त होतो तेव्हा निमोच्या नजरेतून काचेबाहेरच्या जगाकडे म्हणजे आपल्याकडे पाहणारा. सर्वसामान्य नजरेला न जाणवणारे अनेक विरोधाभास, अनेक भोंगळ व्याख्या याला छेद देणारी कविता महाजन यांची भाषा, त्यांचं द्र्ष्टेपण, त्यांची साहित्यिक समज वाचकाला जगाकडे आणि जगाच्या नजरेतून स्वत:कडे पाहण्य़ाची एक नवी दृष्टी देतात.

कविता महाजन यांची कन्या दिशा महाजन नव्या पिढीची ब्लॉगर आहे. तिचा https://dishascaravan.wordpress.com 
 हा ब्लॉग वाचताना पुन्हा मला ’निमो’ आठवला. दिशाला दिसणारं जग आणि तिच्या आईला दिसणारं जग, त्या ’वेगळ्या जागेवरुन’ जगाकडे पाहत असल्याने भिन्न आहेत, त्यांचे विषय, भाषा भिन्न आहेत. दिशाच्या अनुभवांचा पोतही वेगळा आहे. सकस ब्लॉगलेखन एकाच वेळी करणारी अशी मायलेकींची जोडी दुर्मिळ आहे. आजच्या मध्यमवर्गीय शहरी तरुणाईचं दर्शन दिशाच्या ब्लॉगमधून घडतं. साहजिक तिच्या शब्दांमध्ये चैतन्य आणि ताजेपणा आहे. पर्यटन आणि माध्यम या विषयातलं तिचं शिक्षण लक्षात घेता ब्लॉगचं नाव चपखल आहे. आईच्या लेखिका म्हणून असलेल्या स्थानाचं कोणतही दडपण तिच्या लेखनावर दिसत नाही. ब्लॉगच्या केंद्रस्थानी पर्यटन, मनोरंजन माध्यमं आणि आजची जीवनशैली आहे. तुरळक लेख मराठीत आणि बहुतेक लेख इंग्लीश मध्ये आहेत.
नोकरीसाठी मुंबईला गेलेल्या आजच्या तरुणीमधले अंतस्थ बदल टिपणारी डायरी ’मृगजळ’ तसच ’मृत्युपत्र’ हे यातले विभाग फारशी पकड घेत नाहीत. पुस्तक परिक्षण विभागात द्रौपदीचं वेगळं रुप दाखवणार्‍या ’द पॅलेस ऑफ इल्यूजन्स’ या पुस्तकाचा दिशाने अतिशय नेटका परिचय करुन दिला आहे. सिडने शेल्ड्न च्या कादंबरीतल्या कथानकाऐवजीपेक्षा ती त्यातले उत्कट प्रणयप्रसंग आणि नेटवर सहज उपलब्ध असलेलं बीभत्स पॉर्न यातला नेमका फरक धीटपणे सांगते. केवळ त्यामुळेच शेल्डन गेली ४ दशकं वाचकांच्या मनावर राज्य करत असल्याचा तिचा निष्कर्ष मात्र पटत नाही. तिचे पर्यटन आणि विशेषत: मनोरंजन-माध्यम विभागातले लेख अतिशय वाचनीय आहेत. ’फ्रेंड्स’ या गाजलेल्या मालिकेवरचे लेख असो वा चित्रपट परिक्षण, ती समीक्षकाच्या पुस्तकी शब्दात नव्हे तर सर्वसामान्य प्रेक्षकाच्या भूमिकेतून सहजपणे लिहिते. जर या देशावरचा आणि इथल्या व्यवस्थेवरचा तुमचा विश्वास डळमळीत झाला असेल तर ’अ बिलियन कलर स्टोरी’ सिनेमा तुम्ही पाहायलाच हवा, असं ती त्यावरच्या पोस्ट मध्ये नमूद करते तेव्हा त्याचे लेखक-दिग्दर्शक पद्मकुमार नरसिंहमुर्ती सुद्धा तिच्या रिव्ह्यूला दाद देतात.


’फ्रॉम गीत टू शायरा’..हा तिचा लेख अप्रतिम. १४ व्या वर्षी ’जब वी मेट’ मधील दिलखुलास, पारदर्शक वृत्तीची, बिनधास्त निर्णय घेणारी कलरफुल गीत ही तिची रोल मॉडेल, लवकरच तिला कळून चुकतं की गीतचं मनस्वीपण समजून घेणारा आदित्य फक्त पडद्यावरच असतो. आज ९ वर्षांनंतर तिची रोल मॉडेल आहे ’बेफिक्रे’ मधली शायरा ..वडिलांच्या रेस्तरॉं मध्ये काम करण्यात कमीपणा न मानणारी, पुढॆ पॅरिस मध्ये अपार्ट्मेंट घेणं परवडेल इतका उत्तम जॉब धडाडीने मिळवणारी, निराशेच्या क्षणी खचून न जाणारी, स्पष्टवक्ती, बोल्ड पण मित्र आणि प्रियकर यातला फरक परिपक्वतेने समजून घेणारी. ’गीत चूक होती असं नव्हे पण ती माझा इतिहास आहे तर शायरा माझं वर्तमान’ असं म्हणणार्‍या दिशाच्या, स्वत:च स्वत:चे रोलमॉडेल बनण्याच्या प्रवासाला तिचा ब्लॉग साक्ष असेल. मायलेकींच्या ब्लॉगकडे पाहण्य़ाच्या दृष्टीकोनाबाबत साम्य शोधायचं तर कविता महाजन यांच्याच एका कवितेततल्या ओळी इथे लागू होतील...
सगळया जगापासून तुटून
स्वत:च्या नाळेशी जोडली जाते मी इथं ! 

Friday, December 15, 2017

’ब्लॉग ’ती’ चा’ - जपत किनारा शीड सोडणे नामंजूर

’जिंदगी ना मिलेगी दोबारा’ हा सिनेमा आठवतोय? आपल्या अस्तित्वाचा अर्थ उमगल्याने पाणावलेल्या डोळ्य़ांनी पाण्य़ाबाहेर येत भवतालच्या अफाट निसर्गाकडे नि:शब्द होत पाहत राहणारा हृतिक रोशन... भौतिक सुखांमागे धावणार्‍या माणसाला खरा आनंद कुठे आणि कसा गवसतो हे सांगणारं ते झकास दृष्य! अर्थात हे सिनेमात ठीकय, एरवी असं मनात येईल तेव्हा भटकायला पैसे कोण देईल? मात्र ’वसुधैव कुटुम्बकम्’ चा अर्थ थेट जगण्य़ात उतरवणारी शिव्व्या नाथ ही ट्रॅव्हल ब्लॉगर तरुणी गेल्या ७ वर्षांपासून असं आयुष्य भरभरुन जगतेय. वयाच्या २३व्या वर्षी तिने सिंगापूर टुरिझम मधली नोकरी सोडली, असेल नसेल ते चक्क विकून टाकलं आणि जगभ्रमंतीचं स्वप्नं पाठीवरच्या पिशवीत घेऊन ती निघाली. ती म्हणते, "आता माझं घर म्हणजे माझी ब्लॉग-साईट कारण तिथे तुम्हाला माझा ठावाठिकाणा नक्की सापडेल. मित्रांनो, आपल्या उबदार कोषाच्या बाहेर पडून एक स्वच्छंदी आयुष्य जगून तर पाहा, याल माझ्याबरोबर पुढच्या प्रवासाला?" जर तुम्हाला खरच तिच्यासह प्रवास करायची, तिला जाणून घ्यायची इच्छा असेल तर गाठा तिला https://the-shooting-star.com/
 वर जिथे ती म्हणते, "तुम्ही कविता लिहू शकत नसाल पण तुमच्या जगणच एक कविता असेल तर !"


य़ा क्षणी शिव्व्या मालदीव मध्ये आहे, मग ती ओमान ला जाणार आहे. आतापर्यंत तिने भारतासह आफ्रिका, युरोप, आशिया, मध्य पूर्व, लॅटिन अमेरिका आणि कॉकेशस प्रदेश पालथे घातले आहेत. यासाठी लागणारे पैसे? ते ती तिच्या ’ट्रॅव्हल ब्लॉगींग’ द्वारे कमावते. असे पैसे कुणीही कमावू शकतं? नाही, त्यासाठी झपाटलेपण हवं. २०१३ ची ती सर्वोत्तम भारतीय ट्रॅव्हल ब्लॉगर असून नंतरही अनेक सन्मान तिने प्राप्त केले आहेत. airbnb सह जगभरातल्या नामवंत प्रवासी कंपन्या, देशांचे पर्यटन विभाग तिचे प्रायोजकत्व स्वीकारतात. हटके प्रवास, अनोखे अनुभव आणि ते ओघवत्या इंग्लीशमधून मांडण्य़ाची भन्नाट शैली या त्रिचक्रीवर शिव्व्या विहरते आहे. बीबीसी ट्रॅव्हल्स, नॅशनल जिओग्राफिक्स, टाईम्स ऑफ इंडिया, द हिंदू, TEDx सारख्या माध्यमांवर तिच्या प्रवासगाथा झळकत असतात. मुळात ती हे पैशासाठी करत नाही कारण पैसा तिला तिच्या नोकरीत मिळतच होता. ती निरर्थक खरेदीत वेळ आणि पैसा घालवत नाही. आगामी महत्वाकांक्षी प्रकल्पांसाठी पैसे जमवते कारण प्रायोजक ताबडतोब मिळतातच असे नाही. त्यामुळे ’प्रवासात पैसे कसे वाचवावेत’, ’प्रवास करता करता पैसे कसे कमवावेत’, ’गाठीशी पैसे नसतानाही प्रवासाची स्वप्नं पाहावीत काय’, असे तिचे रोचक आणि प्रॅक्टिकल लेख या ब्लॉगवर आहेत.
डेहराडून मधल्या मध्यमवर्गीय घरात जन्मलेल्या शिव्व्याला तिथल्या पर्वतराजी कायम साद घालत. आज ती अवघं विश्व कवेत घेते आहे. काहीही अडचण नसली तरी चांगल्या पदवीधर बायकोला माहेरुन ’घ्यायला’ जाणारे नवरे किंवा बहिणीला सासरी ’पोचवणारे’ भाऊ किंवा ’सातच्या आत घरात’ टाईप मंडळी हे शिव्व्या नावाचं रसायन कदाचित पचवू शकणार नाहीत. शिव्व्या ’रमता जोगी’ आहे. तिला पर्यटकांच्या कलकलाटात हरवलेली प्रसिद्ध स्थळं टाळून नवनव्या जागा हुडकायला आवडतं, मिळेल त्या वाहतुकीच्या साधनांनी ती प्रवास करते. मिनरल वॉटर ऐवजी तिथलच पाणी पिते. तिथलंच अन्न खाते. (गेल्या काही वर्षांपासून ती व्हेगन- प्राणीजन्य पदार्थ न खाणारी, आहे) शक्य तिथे हॉटेल्स ऐवजी ती स्थानिक घरात राहून तिथली संस्कृती समजवून घेण्याचा प्रयत्न करते. ब्लॉगवरच्या तिच्या लेखांची नावंच तिची रेंज दाखवतात. उदा: मॉरीशसचा नीलमण्य़ासारखा लकाकणारा समुद्र, एका कोळ्य़ाचं धाडसी समुद्री जीवन, सेशेल्स बेटांचं पहिलं दर्शन, साऊथ आफ्रिकेतल्या मामेलोडी वसाहतीतली नवलाई, इंडोनेशियामधल्या निकोई बेटावरची धमाल, मलेशियातलं गिरिभ्रमण, फिलिपाईन्स मधल्या टेगेटे शहरातला फेरफटका, सिंगापूरमध्ये अनुभवलेला चिनी लग्नसोहळा, बंगी जंपींगचा थरार, श्रीलंका कसा पहावा, पुन्हा एकदा थायलंड, इस्तंबूलमधला रोमांचक दिवस, तुर्कस्तानच्या काळ्य़ा समुद्राच्या सोबतीने घालवलेले क्षण, व्हिएतनाममधे निवासस्थान शोधण्य़ाचा किस्सा, युरोपातली अपरिचित खेडी, क्रोएशिया भेटीनंतर माझ्या ब्लॉगींगमध्ये झालेला बदल, स्पेनमधल्या ग्रामीण निसर्गसौंदर्याच्या प्रेमात, इटलीत कलाकारांसह घालवलेले दिवस, फ्रान्समधलं तळ्य़ांचं शहर, फ्रँकफर्ट कसं बघावं, जर्मनीतला नाताळ बाजार, कोस्टारिकातली चॉकोलेट कथा, इक्वाडोरमध्ये मला गवसलेली मी, मेक्सिकोतल्या क्रेटर लेक वरचं सायकलिंग, निकाराग्वातले अनाम रस्ते.’
प्रत्येक लेख, त्यातलं वैचित्र्य, ताजेपणा आणि त्यातील सुरेख फोटो वाचकाला एका नव्या दुनियेत घेऊन जातात. ब्लॉग आणि त्याची सोशल माध्यमाद्वारे लिंक शेअर केल्याने तिचे थक्क करणारे अनुभव वाचकांपर्यंत पोहोचतात आणि त्या त्या विभागाच्या पर्यटन-व्यवसायाला चालना मिळते. सिनेमातील चित्रिकरणामुळे युरोपला जाणार्‍या भारतीय पर्यटकांमध्ये वाढ झालीय तसेच काहीसे. फरक हा की पर्य़टन आणि प्रवास या वेगळ्या गोष्टी. ज्याला ’ऑफबीट’ म्हटलं जात अशाच स्थानांबद्दल शिव्व्या ब्लॉगवर लिहिते आणि त्या स्थानांबद्दल निर्माण झालेली उत्सुकता भटक्यांना तिथवर खेचून नेते. उदा: #NotJustBeer- ’मला जर्मनीला पुन्हा पुन्हा का जावंसं वाटतं’ या लेखात तिने केलेल्या -हाईन व्हॅलीतल्या ’द्राक्ष-संस्कृती’च्या वर्णनामुळे तिथलं पर्यटन वाढलं आहे.

’रूद्राक्ष संस्कृती’ ची तिला तितकीच ओढ आहे. ’गंगेशी माझं नातं, दार्जिलिंगची चढण, शाही हिमालय, दारंग-चहाच्या कपात सामावलेलं जीवन, लडाखी नन च्या नजरेतून, कूर्ग मधलं कॉफी आणि बरच काही, देवभूमी केरळ, प्राचीन प्रेमनगरी-खजुराहो, कान्हा-कथा, ताडोबा सफर, गुजरात विशेष, पंजाबी सरसों के खेत, राजस्थानातला नजारा, या गंगटोकला, गोव्यावरचा- सप्टेंबर संपला की मला जागं करा’ हे भारतावरचे लेख तर खिळवून ठेवतात. ती निवांतपणे प्रवास करते. मन रमतय तोवर राहते, मग पुढे निघते. अमुक वाजता सनसेट पॉईंट पाहून तमुक वाजता जेवण अशा प्रवासी कंपन्यांच्या वेळापत्रकाच्या ती पलिकडे आहे. ’जसा गंध निघतो हवेच्या प्रवासा.. न कुठले नकाशे न अनुमान काही’ या खरेंच्या ओळींसारखं भटकता भटकता अचानक वाट बदलून रुमानियातली उत्तरेकडची खेडी तिने पालथी घातलीयत, ग्वाटेमालामधल्या मेयन समुदायासमवेत मुक्काम केला आहे, कॅनडाजवळच्या विस्तीर्ण वाळवंटाच्या कडेने रेल्वेप्रवास केला आहे, मलेशियाच्या पूर्व किनार्‍यानजीक शार्क असतानाही पोहण्यातला चित्तथरारक अनुभव घेतला आहे.

बहुतेक प्रवास ती एकटयाने, क्वचित मित्रांबरोबर करते. ती म्हणते, "आपल्या भारतात सुद्धा एकटं फिरणं तितकंसं अवघड नाही. आतून एक बारका घाबरा आवाज ओरडत असतो, अगं तू वेडी आहेस का.. त्याच्याकडे दुर्लक्ष करुन मी झेप घेते, सहप्रवाशांशी मैत्री करते, स्थानिक सवंगडी मिळवते, सोशल मिडीया आहेच, शिवाय माझी सर्वात जवळची मैत्रिण मी स्वत:च आहे, स्वसंवादाची धुंदी काही और असते, तो सूर सच्चा असतो, स्वत:ची जबाबदारी घेत स्वातंत्र्य उपभोगण्याची, स्वत:च्या अटींवर जगण्याची एक आगळीच मजा असते, मग एकटं वाटण्याचा प्रश्न येतोच कुठे!" ’एकट्याने प्रवास करताना आलेले धमाल अनुभव’, ’एकट्याने प्रवास करायचा असेल तर पालकांना कसे समजवावे’,’प्रवासातल्या एकटेपणावर मात करण्याचे ८ झकास उपाय’ हे या ब्लॉगवरचे तिचे लेखही मस्त आहेत. अवघ्या जगण्याचाच प्रवास एकट्याने करणार्‍यांनी तर ते आवर्जून वाचावेत. ती म्हणते, "या प्रवासाने मला खूप काही शिकवलं, बदलवलं, समृद्ध केलं, मी खूप लांबचा पल्ला गाठला पण त्यातून रुजलेली शहाणीव माझे पाय कायम जमिनीवर ठेवते."

देशांमधल्या सीमारेषा तिने कधीच ओलांडल्यात, काही वर्षांनी भटकंती कमी करुन ती स्थिरावेलही पण तोवर तिची वैश्विक नजर ज्या उंचीवर पोचेल तिथून तिला माणसांमधल्या भिंतीसुद्धा दिसेनाशा झालेल्या असतील.

Friday, December 8, 2017

ब्लॉग ’ती’ चा - वेटलॉस तमाशा


पांढर्‍याशुभ्र लुसलुशीत वाफाळत्या उकडीच्या मोदकावर किंवा गरम खरपूस पुरणपोळीवर ताज्या कढवलेल्या साजूक तुपाची धार धरली आणि डोळे मिटून त्याचा घास घेतला की जे काही वाटतं त्याला ब्रह्मानंदी टाळी लागणं म्हणतात. ’ऋणं कृत्वा घृतं पिबेत्.. यावत् जिवेत सुखम् जिवेत’ असं चार्वाकाचं वचन आहेच. कर्ज काढा पण तूप खा, थोडक्यात जीओ जी भरके. हं, मात्र दुसर्‍याच घासाला कोलेस्ट्रॉल, सॅच्युरेटेड फॅट्स सारखे भयंकर शब्द, जिमची भरलेली फी वगैरे आठवू लागतं. परंतु ’साजूक तूप अवश्य खावं’ असं चक्क भारतातली एक प्रसिद्ध आहारतज्ज्ञ सांगत असेल तर! 
’५-१० वर्षांनी पाश्चात्य देशांनी साजूक तुपाचं महत्व मान्य केलं की मगच तुम्हाला हे पटणार आहे का? पचनशक्ती चांगली राखण्य़ासाठी, शरीराचं वंगण म्हणून, तुकतुकीत कांतीसाठी, कित्येक विकारांवर गुणकारी असलेलं साजूक तूप दररोज खायला हवं.’ ४ लाखांहून अधिक चाहते असणारी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर #RujutaDiwekar सोशल माध्यमांवर आणि तिच्या http://rujutadiwekar.blogspot.in
 (Rutuja's gyan) या ब्लॉगवर हे आवर्जून सांगते. विमेन अॅण्ड वेटलॉस तमाशा, डोंट लूज योर माइंड लूज युवर वेट यासारखी आहारशास्त्रावरची विक्रमी खपाची पुस्तकं तिच्या नावावर आहेत.

ऋजुता अनेक उच्चपदस्थ व्यक्तींची आहारविषयक सल्लागार, वेलनेस प्रशिक्षक असली तरी ती चर्चेचा विषय झाली ते करिना कपूरच्या ’साईझ झीरो’ #SizeZero प्रकरणापासून. परंतु या ब्लॉगवर ऋजुता लिहिते, "करिना साईझ झीरो झाली नव्हतीच, माझा आहारविषयक सल्ला मनापासून अमलात आणल्यामुळे आधीपेक्षा खुटखुटीत, चपळ झाली इतकच. शिवाय त्या चित्रपटाची, तिची, ती व्यावसायिक गरज होती. अमेरिकन व्याख्येनुसार साईझ झीरो म्हणजे 5’4” हून कमी उंचीची 32-24-32 मापातली स्त्री. शरीरसौष्ठवाच्या परकीय कल्पना भारतीय स्त्रीच्या शरीरयष्टीला मानवणार्‍या नाहीत तरीही त्यापायी प्रसंगी उपासमार सोसून साईझ झीरोच्या मागे लागणार्‍या मुलींना म्हणावे तरी काय!" ’वजन कमी करणं आणि ते आटोक्यात ठेवणं ही माझ्या आयुष्यात सर्वात महत्वाची गोष्ट आहे’ असं एखादी तरुण, उच्चशिक्षित, सक्षम स्त्री सांगते तेव्हा ऋजुताला अतिशय वाईट वाटतं. सगळं जगणं व्यापून टाकण्य़ाइतकं हे महत्वाचं आहे का! वजन नियंत्रणात असायलाच हवं पण ते आरोग्यासाठी, चांगल्या दर्जाचं आयुष्य जगता यावं म्हणून परंतु बहुतेक मुलींना वजन कमी करायचं असतं ते केवळ सुंदर दिसण्यासाठी.

ऋजुता सोशल मिडीयावर/ ब्लॉगवरच्या लेखातून तिच्या मनातली ही खंत मांडते," एकीकडे या मूर्ख मुली तर दुसरीकडे स्त्रियांना दुय्यम लेखण्याच्या मानसिकतेच्या बळी ठरलेल्या दुर्दैवी स्त्रिया. मुला-मुलींना घरी जशी वागणूक दिली जाते त्यानुसार त्यांची मानसिक घडण होते. मुलांमधली स्वामित्वाची आणि मुलींमधली दुय्यमत्वाची भावना प्रबळ होत जाते. याची परिणती ’मी नवर्‍याचं जेवण झाल्याशिवाय कशी जेवू’ या वरवर प्रेमळ भासणार्‍या विचारापासून ’रात्रीबेरात्री प्रवास करणारी मुलगी स्वत:हून अत्याचाराला निमंत्रण देते, त्यात मुलांचा काय दोष’ अशा विकृत टोकापर्यंत होऊ शकते. या मानसिकतेचा संबंध शारीरिक पोषणाशी आणि सुदृढ जीवनशैलीशी आहे. मुलींना ती नाकारली गेली आहे. खरं तर आपल्याला त्यांच्या ’साईझ झीरो’ची काळजी करायला हवी आहे. त्यांच्या निकोप वाढीसाठी शिक्षणाबरोबरच मुलभूत सुविधा द्यायला हव्यात. कोवळ्या वयात होणारी लग्नं आणि पाठोपाठ येणारं गरोदरपण रोखायला हवं. मन:शक्ती वाढवण्याबरोबरच त्यांना पुरेसं आणि सकस अन्न वेळेवर मिळतय का याकडे लक्ष द्यायला हवं."

आहारनियमनाच्या खुळचट कल्पनांबद्दल एका लेखात ऋजुता लिहिते," सूप सलाड खाऊन जीवाच्या आकांताने वजन कमी करणारे कायम जगावर वैतागलेले असतात त्यापेक्षा जे आवडतं तेच पण योग्य प्रमाणात खा. ’तांदुळाच्या नियमित सेवनामुळे तामिळनाडूत मधुमेही रुग्णांच्या प्रमाणात वाढ ?’ अशी काहीतरी बातमी वाचनात येते. ती पूर्ण न वाचताच, मधुमेहींनी किंबहुना सर्वांनीच भात खाणे अयोग्य हे गणित आपण डोक्यात पक्के करतो. खरं तर वरण/सार/आमटी/दही-भात, खिचडी हा अस्सल देशी पदार्थ आहे. आपल्या खाद्यजीवनातलं हे पहिलं प्रेम असतं. चार दिवस परदेशी फिरुन या, कधी एकदा तूप घालून लिंबू पिळून घरचा मस्त गरमागरम वरण-भात खातोय असं होतं पण आपण हा साधा सोपा रुचकर आणि पौष्टिक पदार्थ डाएटिंगच्या फॅड मुळे अकारण नाकारतो आणि सुखाचा जीव दु:खात घालतो." (खिचडी हा आपला राष्ट्रीय पदार्थ म्हणून घोषित झाल्याची मध्यंतरी चर्चा होती, असो वा नसो, खाद्यदिनाला खिचडी पकलीच. ऋजुता म्हणते म्हणून तरी तो खायला सरकारविरोधकांची हरकत नसावी )

मध्यंतरी एका गाजलेल्या टीव्ही मालिकेत पंजाबी ’प्राठा’प्रेमी लठ्ठ नायकाची काळजी घेणारी सालस बायको त्याचं वजन नियंत्रणात राहावं म्हणून त्याला पालकाचं सूप, फळांच्या फोडी असा डबा पाठवायला सुरूवात करते. यावर ऋजुता ’टीव्ही डाएट’ या लेखात तिला विचारते," फळं-भाज्यांचा सरफेस एरिया वाढला (फळ कापणं किंवा रस काढणं) की त्यातली पोषणमूल्य हरवतात हे तू शाळेत कधी शिकली नाहीस काय गो!" गोठवलेले हवाबंद डब्यातले पदार्थ, कॉर्नफ्लेक्स खाणं हे उच्च दर्जाच्या जीवनशैलीचं उदाहरण म्हणून जाहिरातींमधून भाबड्य़ा प्रेक्षकांच्या मनावर बिंबवलं जातं. बहुतेक व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यामध्ये तर एकाच वेळी तत्त्वचिंतक, इतिहासतज्ज्ञ आणि एक आहारतज्ज्ञ दडलेला असतो. जे या तज्ज्ञांमध्ये मोडत नाहीत त्यांची भलतीच पंचाईत होते. आहाराचा रोजच्या जगण्याशी संबंध असल्याने त्याविषयी परस्परविरोधी पोस्ट्स वाचून ते बिचारे गोंधळून जातात. उदा: ’पोळी नको भाकरी खा’, ही पोस्ट वाचून होत नाही तोच ’अंकुरित गव्हाचे फायदे’ नावाची पोस्ट येऊन पडते. गंमत म्हणजे बरेचदा ’सुख दु:खे समे कृत्वा..’ वृत्तीची एकच व्यक्ती या दोन्ही पोस्ट्स पाठवते. हे वाचल्यावर आणि जाहिरातीतून दिसणारे ओट्स, टोफू, ऑलिव्ह ऑईल, ब्रोकोली, किवी असले पदार्थ, भाज्या जर त्यांना सहज उपलब्ध होत नसतील तर आपण पालक म्हणून भलतेच बॅकवर्ड आहोत काय, आपल्या मुलांना चांगला आहार देत नाही की काय, या गंडाने ते पछाडले जातात....

अशा वेळी काय करावं! ऋजुताचा ब्लॉग किंवा सोशल लिंक्स उघडाव्या. त्यावरच्या या टिप्स मनातल्या बहुतेक प्रश्नांची नेमकी उत्तरं देतात. "ओट्स सारखे पदार्थ आपल्या मातीतले नाहीत, शिवाय ते बेचव आहेत. भारतीय हवामानाला ते पूरक नाहीत. केवळ फॅशन म्हणून खाद्यसंस्कृती का बदलायची? बदल म्हणून एखादेवेळी ठीक आहे एरवी पोळी, भाजी, भात, आमटी, कोशिंबीर हा भारतीय चौरस आहार सर्वात उत्तम. शुगरफ्री पेक्षा प्रमाणात साखर खाणे योग्य. सणासुदीला थोडेफार जिभेचे चोचले पुरवायला काहीच हरकत नाही. डाएट करणे म्हणजे दुधी- कारल्याचा रस पिणे, काहीतरी नीरस, बेचव खाणे हा विचार डोकयातून काढा. दर दोन तासांनी थोडं थोडं खा. कमी खाण्यापेक्षा योग्य आहार घेणं महत्वाचं. राजासारखी न्याहारी, राणीसारखं भोजन आणि चाकरासारखं रात्रीचं जेवण म्हणजेच आदर्श आहारपद्धत असं नाही. आहार ज्याच्यात्याच्या शरीर प्रकृतीनुसार असावा. ऋतुमानानुसार तो बदला. सलग एका जागी ३० मि. हून अधिक बसणं टाळा. आठवड्यातून किमान १५० मिनिट व्यायाम करा."

असं म्हणतात आपण जे खातो, तेच आपल्या चेहऱ्यावर दिसतं. काय खावं काय टाळावं याचा संबंध जितका आहारशास्त्राशी आहे तितकाच ’कॉमन सेन्स’ शी आहे. ऋजुता म्हणते तसं, वजनाचा काटा विकत घेण्यापेक्षा स्वत:च्या आहार-विहाराबद्दल स्वत:ला प्रामाणिकपणे प्रश्न विचारा. वाढत्या ताणाचा वजनावर परिणाम होतो. फर्गेट, फर्गिव्ह आणि फॉरवर्ड (पोस्ट्स नव्हे ) ही त्रिसूत्री वापरली तर बरेचसे ताण कमी होतील. सर्वात महत्वाचं म्हणजे स्वत:च्या शरीरासकट स्वत:चा मनापासून स्वीकार करा... (आणि हे सारं हलक्याफुलक्या शैलीत सांगणार्‍या ऋजुताचा इंग्लीश-हिंग्लीश ब्लॉग/पोस्ट्स खिचडीवर थोडी लसणीची चरचरीत फोडणी घालून (लसणाने चरबी कमी होते), कुरकुरीत पापडासह खात खात अवश्य वाचत राहा)

Saturday, December 2, 2017

ब्लॉग 'ती' चा - परिमाचा ब्लॉग ..नव्हे व्ही-लॉग



पावसाळा आला की नवकवींची संख्या वाढते तसेच सुट्यांच्या काळात आणि जानेवारी महिन्यात (संकल्पबिंकल्प करण्याचा झटका आल्याने) ब्लॉग लिहिणार्‍यांची संख्या वाढते. अनेक ब्लॉगर्स दोनचार पोस्टस नंतर ढेपाळतात. फार थोडे सातत्याने आणि त्यातलेही फार थोडे उत्तम लेखन करत राहतात. एकूणच ब्लॉगकडे छंद, ऊत किंवा खाज म्हणून पाहिलं जाऊ शकतं. परिमा शर्मा ही तरुणी मात्र व्यावसायिक ब्लॉगर, खरं तर व्ही-लॉगर आहे. भटकंती आणि खवैय्येगिरीच्या छंदाचंच तिने व्यवसायात रूपांतर केलंय. http://parimasharma.com/ वर ती फक्त ब्लॉगच नाही तर व्ही-लॉग (प्रामुख्याने व्हिडीओंचा समावेश असलेले ब्लॉग) पोस्ट करते. मनोरंजन वाहिन्या कार्यक्रम दाखवतात, टीआरपी वाढला की जाहिरातीतून कमाई करतात तसेच या व्ही-लॉग चे स्वरूप आहे.
परिमाने लेबर लॉ मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलय. दिल्लीला तिची प्लेसमेंट कंपनी आहे. एक यशस्वी उद्योजक असूनही ती स्वत:ला escapist म्हणते ते पलायनवादी या अर्थाने नाही, तर तिला कायम जगण्याची चाकोरी सोडून डोंगर-दर्‍या, समुद्रकिनारे, किल्ले, जंगलं असं कुठेतरी पळून जावंसं वाटतं. वेगवेगळ्य़ा प्रांतातले, दिल्लीतल्या नवनवीन रेस्तरॉंमधले विविध खाद्यप्रकार चोखंदळपणे निवडून-शोधून चाखून पाहावेसे वाटतात. नर्मविनोदी इंग्लीश भाषा, वाचकाच्या मनात सहज येणार्‍या प्रश्नांची लेखात आवर्जून दिलेली उत्तरं आणि सोबत खास टिप्स हे तिचे वैशिष्ट्य.
हल्लीच्या पिढीला लांबलचक पोस्ट्स वाचायला वेळ नाही किंवा त्यात रस नाही त्यामुळे पॉडकास्टला (ऑडीओ ब्लॉग) सुरुवात झाली. ब्लॉग ’ऐकण्याची’ सोय झाली. कमला भट्ट ही पहिली भारतीय पॉडकास्टर. एखाद्या वाहनचालकापासून सिनेतार्‍यांपर्यंत आणि शेफ पासून उद्योगपतींपर्यंत अनेकांच्या मुलाखती तिने ’कमला भट्ट शो’ यावर पॉडकास्टच्या माध्यमातून प्रसारित केल्या. त्यानंतर आरुषी तलवार खून खटल्याचे क्रमश: पॉडकास्ट सादर करणारी पत्रकार निशिता झा किंवा हिंदी सिनेतारे-तारकांच्या मुलाखती पॉडकास्टच्या माध्यमातून सादर करता करता आज missmalini.com मुळे गाजणारी मालिनी अग्रवाल अशा कित्येक जणींनी या माध्यमाचा चपखल वापर केला.
आता ऐकण्यापेक्षा’ ’पाहण्याला’ प्राधान्य दिलं जाऊ लागलय हे ओळखून या पॉडकास्टर्स ’व्ही-लॉग’ कडे वळल्या आहेत. त्यासाठी दर्जेदार स्क्रिप्ट लिहिणं, ती उत्तमरित्या सादर करणं, नयनरम्य व्हिडिओचित्रण करणं आणि ते एडिट करुन पोस्ट करण्याचं तांत्रिक कसब हवं. हे व्यावसायिक ब्लॉगर प्रेक्षक-वाचकांची नस ओळखून विषयांची निवड करतात. प्रवास आणि खाणे हे तर तरुणाईचे वीकपॉइंट्स. फूड पॉर्नचं आकर्षण वाढतय. तयार अन्नपदार्थांची आकर्षक सजावट करुन त्याचं किंवा एखाद्या रेस्तराँ मधल्या खास डिशचं सचित्र वर्णन किंवा व्हिडीओ पोस्ट केला जातो. हे अशा कौशल्याने केलं जात की पाहताच तोंडाला पाणी सुटलं पाहिजे. हे सगळं प्रकरण म्हणजेच फूड पॉर्न. साहजिक इतर कोणत्याही विषयापेक्षा यांना पटकन लाईक्स आणि चाहते मिळतात.
परिमा फूड-क्रिटिक म्हणून ही क्लृप्ती वापरतेच शिवाय त्या जागेचं वर्णन, तिथलं वातावरण, सेवेचा आणि पदार्थाचा दर्जा तसच पदार्थांचे दर, इतकच नव्हे पदार्थांचा रंग, गंध, स्पर्श याबद्दल ती लिहिते, त्याला व्हिडिओ किंवा फोटोची जोड असल्याने ती सांगते ते चाखता येत नसलं तरी अनुभवता येतं. त्यात भारतीय-प्रांतीय, तिबेटियन, कॉंन्टिनेंटल त-हत-हेच्या पदार्थांचा समावेश असतो, त्यामुळे दिल्लीतलं नवीन रेस्तरॉं ’ट्राय’ करण्यापूर्वी किंवा चांगले रेस्तरॉं माहीत करुन घेण्य़ासाठी परिमाचा ब्लॉग वाचायला हवा. दिल्लीकडे ’रामलीला’ या प्रकाराला प्रचंड सांस्कृतिक महत्व आहे. परिमा सारखे कित्येक जण तिथे जातात ते मात्र समोर लागलेल्या गाड्यांवरच्या खाद्यपदार्थ्यांचा आस्वाद घेण्यासाठी, तेही हायजिन बियजिन खुंटीवर टांगून. परिमाच्या ब्लॉगवरुन आपणही रामलीला मैदानावर तिच्यासह फेरफटका मारून येतो. तिथे मिळणारे दाल-चिल्ले, फ्रूट चाट सारखे नाना प्रकारचे पदार्थ चाखत, सचित्र पाहत अखेर बाबू राम गुप्ताच्या कुल्फीने या खादययात्रेची सांगता होते.

परिमाच्या बहुतेक ब्लॉग्जच्या केंद्रस्थानी दिल्ली आहे मग विषय कोणताही असो. त्यामुळे तिच्या ब्लॉगच्या चाहत्यांमध्ये दिल्लीकर मोठ्या संख्येने असणारच पण त्यातले प्रवासाचे अनुभव हे सगळ्य़ा भारतीय ’भटक्यां’ना आपले वाटतील असेच आहेत. उदा: तिचा ’गुच्चू पानी’ या देहरादून नजीकच्या पर्यटनस्थळाचा व्हि-लॉग. देहरा म्हणजे निवास, डेरा आणि दून म्हणजे द्रोण किंवा दरी. यात परिमा मसुरी ते देहरादून प्रवासाचा साद्यंत वृत्तांत सांगते. त्यात आजूबाजूचा निसर्ग, गाडी चालवायला लागणारा साधारण वेळ, अंतर, वाटेतले टप्पे ही माहिती ओघाने येते. वाटेतलं प्रकाशेश्वराचं मंदीर देणग्या स्वीकारत नाही हे ती आवर्जून नमूद करते. तिथल्या स्वच्छ शिवलिंगावर वाहिलेलं दूध वाया न घालवता चहासाठी वापरतात हे तिला कसं भारी वाटलं हे सांगते. गुच्चू पानीला तिला तिच्या मैत्रिणीने सांगितलेला पाणसापांचा अनुभव आठवल्याने साध्या वाळक्या पानाच्या स्पर्शानेही ती दचकते. जगण्याच्या कोलाहलापासून दूर जावसं वाटत असेल तर इथली नीरव शांतता अनुभवा असं म्हणणारी परिमा फक्त आपल्याशीच गप्पा मारते आहे असं वाटावं अशी सहजता तिच्या बोलण्य़ात आणि लिहिण्यात आहे.
मसूरीजवळच्या केंप्टी धबधब्याचं वर्णन करताना ती उत्तराखंड पर्य़टन विभागाने त्याखाली तयार केलेल्या कृत्रिम तलावाबद्दल नाराजी व्यक्त करते. तिथल्या उसळत्या गारेगार पाण्य़ाचं शिरशिरी आणणारं वर्णन करते, त्यात सूर मारल्याशिवाय तिला राहवत नाही. हे सारं वाचताना तो धबधबा डोळ्यासमोर उभं करण्य़ाची गरजच नाही कारण पाठोपाठ परिमा आपल्याशी व्हिडिओतून बोलू लागते. दिल्ली ते गोवा स्वत: गाडी चालवत केलेली चार दिवसांची ४४१३ कि.मी ची ट्रीप, गाडी चालवताना वाटेत अनेकदा थबकून मनसोक्त अनुभवलेलं निसर्गसौंदर्य, मग गोव्यातल्या प्रत्येक दिवशी काय काय पाहिलं, काय केलं, या सगळ्य़ाबरोबरच तिची जिप्सी वृत्ती गोवा- डायरीतून आपल्या समोर उलगडत जाते. तिचं भारतीय स्त्री असणं यात कुठेही आड आल्याचा उल्लेख येत नाही.
आज तब्बल १८ कोटी भारतीय यू-ट्यूब वापरतायत त्यामुळे येत्या काळात बहुतेक ब्लॉगर्स आपल्या लेखनाला व्हिडिओ ब्लॉगची जोड देतील यात शंका नाही. व्ही-लॉग मध्ये मनोरंजन होते, माहिती मिळते पण वाचकाची कल्पनाशक्ती पंख मिटून मुकाट बसून राहते. व्ही-लॉग चे व्यावसायिक गणित नीट उमगलेल्या परिमाचा एक प्रवास व्हिडिओ मध्ये बघताना जाणवले लेखकाच्या शब्दसामर्थ्याने त्याचा प्रवास, ती जागा नजरेसमोर उभा राहण्यातला आनंद एक वाचक म्हणून आपण गमावत आहोत का!
पुलंनी एका लेखात इटलीतल्या ’ब्लू ग्रोटो’ म्हणजेच नीलकुहरबद्दल लिहिलय," निळाईची ही परमसुंदर गर्भकुडी होती. गाभाऱ्यात धूप कोंदावा तसा तिथे निळा प्रकाश कोंदला होता. समाधिसुख भोगणाऱयांना शेवटी मिटल्या डोळ्यांपुढे प्रकाश दिसतो असे म्हणतात , त्या प्रकाशाची कोवळी झळाळी मला याचि देहीं याची डोळां अनुभवायला मिळाली. आता माथ्यावरच्या निळ्या आकाशाला मी मोठ्या अभिमानाने सांगतो की, तुझ्या निळाईचा अर्थ सांगणाऱ्या त्या नीलकुहरातल्या पाण्याला मी भेटून आलो आहे !"
हे वाचताना ’निळाईत माझी भिजे पापणी’ ची जी अनुभूती येते ती व्ही-लॉग मधून थेट दिसणारं ब्लू ग्रोटो पाहून येईल का !

Friday, November 24, 2017

’ब्लॉग ’ती’ चा - यूथ करी

हा ब्लॉग आणि पुढे तिचं एकूणच लेखन तरूणाई डोक्यावर घेईल असं तिला अजिबात वाटलं नव्हतं. ’ब्लॉग सुरू केलाय- कसा वाटला ते सांगा’, असं तिने फक्त दोन जिवलग मैत्रिणींना सांगितलं होतं. अर्थात ’मी जे काही करते ते अगदी प्राणपणाने’ असं ती म्हणते. ’ती’ म्हणजे ’स्टे हंगरी स्टे फूलीश’ #StayHungryStayFoolish या ३ लाखांहून अधिक प्रतींचा खप असलेल्या, ८ भारतीय भाषांमधून अनुवाद झालेल्या प्रसिद्ध पुस्तकाची लेखिका रश्मी बंसल. IIM अहमदाबाद मधून एमबीए झालेल्या २५ जणांनी गलेलठ्ठ पगाराच्या नोकर्‍या सोडून देऊन उद्योजक होण्याचा ध्यास घेतला. त्यांचा खाचखळग्यांनी भरलेला पण अद्भुत प्रवास मांडणारं हे पुस्तक. यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्यातली ज्ञानपिपासा कायम प्रज्वलित असायला हवी, हा या पुस्तकातला मूलमंत्र. तरुणांच्या गळ्यातला ताईत असलेली रश्मी स्वत: देखील IIM ची एमबीए आहे. सोशल मिडीया आणि http://youthcurry.blogspot.in/
या ब्लॉगच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी जुळलेली आहे. युवाविश्वाला आपली वाटेल अशी उत्फुल्ल आणि चुरचुरीत हिंग्लीश भाषा, चपखल केस स्टडीज आणि उद्योग जगताची खोलवर जाण या त्रिसूत्रीवर तिचं लेखन बहरतय. ब्लॉगलेखन हा आता केवळ तिचा छंद राहिलेला नाही. जुन्या वाचकांना गुंतवून ठेवण्याची आणि वाचक नसलेल्यांना तिच्या लेखनाकडे आकर्षित करण्य़ाची ती एक डिजिटल मार्केटिंगची #DigitalMarketing क्लृप्ती आहे.


आपण आवडीचं काम करताना, स्वैपाक करताना किंवा स्नान करताना गुणगुणतो ते काही कुणी आपला म्युझिक अल्बम काढणारेय म्हणून नाही. तुम्ही जे काही करता ते इतकं मनापासून असेल, त्यातला आनंद तुम्हाला गवसला असेल तर पुढचं सगळं आपोआप घडतं. ’द इंडिपेंडंट’ आणि टाईम्स मध्ये पत्रकारिता केलेल्या रश्मीने लेखन हीच आपली पॅशन असल्याचं ओळखलं. ’गॉड्स ओन किचन’ या ताज्या पुस्तकासह तिच्या इतर ६ पुस्तकांचा खप देखील तडाखेबंद आहे. JAM – #JustAnotherMagazine या प्रसिद्ध नियतकालिकाची ती प्रणेती आहे. या सार्‍यात ब्लॉगवरील ताज्या लेखांची संख्या रोडावत चालली असली तरी एकूण ब्लॉग्जची संख्या आणि गुणवत्ता जबरदस्त आहे.

एका उद्योजक स्त्रीच्या वाटेत येणारे काचेरी अडसर केव्हाच भेदून पलीकडे गेलेल्या रश्मीची ब्लॉगवरच्या विषयांची निवड तिचा प्रचंड आवाका दाखवणारी आणि अवाक करणारी आहे. उद्योगक्षेत्रातल्या चालू घडामोडींवर दृष्टीक्षेप आहे. करियरबद्दल टिप्स आहेत. पालकत्व आणि सामाजिक प्रश्नांवर भाष्य़ आहे. प्रवासवर्णनं आहेत. लोकप्रिय परदेशी आणि देशी टीव्ही शो, नामांकित हिंदी-इंग्लीश चित्रपट, गाजलेली पुस्तकं या सार्‍यांचं परिक्षण यात आहे. बहुतेक लेख आटोपशीर, मोबाईलच्या एका स्क्रीनवर मावणारे कारण रश्मीचं कॉर्पोरेट गणित अगदी पक्कं आहे.
इंजिनीयर झालेल्या वा होऊ घातलेल्या तमाम मुलींनी ’बन्नो तेरा बी-टेक लागे सेक्सी’ हा रश्मीचा लेख अवश्य वाचावा. एनआरआय मुलगा पटकवायला सोपं जावं म्हणून, समाजात पत वाढविण्यासाठी, केवळ करियर करण्य़ासाठी की इतर पदवीधरांपेक्षा वेगळी तांत्रिक समज आणि उंची गाठावी म्हणून! नक्की कशासाठी आपण ही पदवी घेत आहोत याचं आत्मपरिक्षण केलं तरच करिअरच्या गगनाला गवसणी घालता येते हे रश्मी या लेखात सडेतोड पण खुसखुशीत शब्दात सांगते.

बर्‍याच लेखातून तिचे बी-स्कूल चे अनुभव समोर येतात. केबीसी शो मागचं अर्थकारण ती मांडते. पदव्या खिरापतीसारख्या वाटणार्‍या शिक्षण पद्धतीवर ताशेरे ओढताना ती पदवीपलीकडच्या जीवनशिक्षणावर भर देत लिहिते, "कायम पहिलं येणं म्हणजेच यश नव्हे. दुसरं येणं ही त्याआधीची महत्वाची पायरी आहे हे समजून घेऊन पुढच्या संधीसाठी तुम्ही स्वत:ला अधिक सक्षम करणार की नाही!". मास्टरशेफ या मूळ ऑस्ट्रेलियन टीव्ही कार्यक्रमाचं उदाहरण या संदर्भात देत ती लिहिते," सामान्यांना त्यांच्यातलं असामान्यत्व शोधायला उद्युक्त करणं हे या शो चं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य. मर्यादित साधनांमध्ये, ठराविक वेळेत ध्येय गाठण्यासाठी ज्या विजीगिषु पद्धतीने स्पर्धक आव्हान स्वीकारतात, चुकतात, थकतात, पुन्हा प्रयत्न करतात, धडपडतात आणि अंतिमत: खोलवर लपलेला आत्मविश्वास खेचून बाहेर काढतात तो आत्मशोधाचा क्षण म्हणजेच परिपूर्ती नाही का! मग तुम्ही ती स्पर्धा जिंकता की नाही हे तितकसं महत्वाचं नाही. तुम्ही जिंकलेलेच असता. यशस्वी व्हायचं तर पदव्या आणि प्रमाणपत्राच्या पलीकडे जाऊन आयुष्यात काय काय करायला लागतं त्याची ही एक सुरेख झलक आहे."

फ्लिपकार्ट #Flipkart आणि मैंत्रा या कंपन्या मर्ज झाल्या. दोन्ही कंपन्यांचे मालक बंसलच. या पार्श्वभूमीवर आऊटलुकसाठी लिहिलेला ’बी फॉर बफे, बी फॉर बंसल’ हा तिचा लेख धमाल आहे. विशेषत: नवलेखकांनी तिच्या पुस्तकांच्या जन्मकथा वाचायलाच हव्यात. तिची पुस्तक परिक्षणे म्हणजे ’व्यामिश्र अनुभूती’ टाईप शब्दातली समीक्षा नसून गप्पाटप्पा आहेत. ती ओड टू इंडिया हे विडंबन काव्य लिहिते. नेमक्या शब्दात प्रवासाबद्दल लिहिते. उदा: केरळ काय चीज आहे हे तिच्या या ४ ओळीतून कळतं. "इतकं सुंदर आणि स्वच्छ बॅकवॉटर, मग स्थानिक लोक त्यांचा कचरा कुठे बरं टाकत असावेत. आपण उर्वरित प्लास्टिकबॅग प्रेमी भारतीय चार बर्‍या गोष्टी केरळकडून आजवर का शिकलो नाही?, केळं वाफवून, काचर्‍या तळून किंवा परतून कसंही खा. उत्तम लागतं, केरळ म्हणजे सोनं, सोनं, आणखी सोनं, केरळमधल्या बसेसना काचेच्या खिडक्या नाहीत! सदानकदा आंदोलन करणार्‍यांनी त्या शिल्लक ठेवल्या नसाव्यात."
एनसीपीए ला पाहिलेल्या वुडहाऊसच्या पात्रांवरचं नाटक, लिलेट दुबे, नसीरुद्दीन शाह सारख्यांची चर्चेतली नाटकं याबरोबरच स्पॉटलाईट, लिंकन, शेफ असे बरेच हॉलिवूड सिनेमे किंवा दंगल, भाग मिल्खा भाग या सारखे भारतीय मातीतले चित्रपट, अशा कितीतरी कलाकृतींवर इथे झकास लेख आहेत. रश्मी म्हणते, "भारतीय प्रेक्षकांना स्वयंप्रकाशी काजव्यासारख्या सत्यापेक्षा त्याचं भव्यदिव्य सादरीकरण जास्त भावतं. ’कहानी मे ट्विस्ट’ तर असलाच पाहिजे. मग मुळात अंतिम शर्यतीत कधीही मागे वळून बिळून न पाहिलेल्या मिल्खा सिंगला त्याची हार सुद्धा ’हटके’ वाटावी म्हणून पडद्यावर तसं करावं लागतं. मेरी कोमच्या बॉक्सींग विश्वस्पर्धेच्या वेळी प्रत्यक्षात घराच्या अंगणात मजेत बागडणार्‍या तिच्या मुलाला, पडद्यावर मात्र त्याची आई जगज्जेतेपदासाठी झुंज देत असताना कंपल्सरी गंभीर आजारी पडून प्राणांशी झुंज द्यावी लागते. काय सांगता यापेक्षा कसं सांगता हेच मह्त्वाचे." पुढे रश्मी मिस्कीलपणे लिहिते," मलाही कधी कधी माझ्या पुस्तकातल्या लहान मोठ्य़ा उद्योजकांना थेट सुपरमॅन बनवून टाकावसं वाटतं. पण मंडळी कल्पनाराज्यातला विहार अल्पजीवी असतो. स्वत:ची जमीन निर्माण करून त्यावर स्वत:ची मोहोर उमटवण्यातलं थ्रील उमगणं हे खरं जगणं."

रश्मी मोकळेपणाने सांगते," मी मध्यमवर्गातून आले आहे. मध्यमवर्ग म्हणजे मूल्य जपणं, चौकटीत जगणं आणि जपून खर्च. आज माझी राहणी तितकीशी साधी नाही. जीवनमान बदललय. मला भरपूर पैसा हवा आहे पण तो योग्य तिथेच खर्च व्हावा याचं भान मला आहे कारण मूल्यबैठक तीच आहे. मी आता एका नव्या मध्यमवर्गाची प्रतिनीधी आहे याचा मला अभिमान वाटतो."
रश्मी यशस्वी लोकांची उदाहरणं खूप देते पण उद्योगविश्वातल्या, आस्थापनेपासून उत्पादन निर्मितीपर्यंत आणि दर्जा तपासणीपासून विपणनापर्यंतच्या प्रवासात येणार्‍या दैनंदिन समस्या कशा पद्धतीने सोडवायला हव्यात याबद्दल रश्मीच्या लेखनातून फार काही हाती लागत नाही असा आक्षेप तिचे टीकाकार घेतात. रश्मी त्यावर म्हणते, "हे अडथळे स्थळ-काळ-व्यक्तीपरत्वे बदलतात. तेव्हा दृष्टीकोन बदला. सकारात्मक व्हा. फक्त उद्याच्या वर्तमानपत्रातल्या मुख्य बातमीत नाव झळकावं म्हणून धडपडण्यापेक्षा असं काही तरी करा की इतिहासातलं एक तरी पान तुमच्या नावे लिहिलं जाईल."

Friday, November 17, 2017

ब्लॉग ’ती’ चा - मेघनाचा एको पॉईंट

‘रस्त्यावरून मिरवणूक जरी गेली ना, तरी उघडू नये दार. पण सामीलच व्हावे वाटले मिरवणुकीत तर जमावाच्या हाकेची वाटही पाहू नये’, असं ‘चर्चबेल’मधील एका लेखात ग्रेस म्हणतात. एकाच वेळी इतक्या आत्ममग्नतेने आणि बेधडकपणे जगण्याकडे खरच पाहता येतं का! येतं, http://meghanabhuskute.blogspot.in/ हा ’मित्रांना’ उद्देशून लिहिलेला ब्लॉग वाचताना हे अद्भुत रसायन अनुभवता येतं. 
आपण प्रचंड ’रसिक, सुजाण’ वगैरे आहोत, 'संस्कृतीच्या जपणुकीची धुरा आपल्यालाच वाहायची आहे', अशी चौकटीत जगणार्‍या वर्गाची ठाम समजूत असते. मेघना भुस्कुटेचा ब्लॉग वाचताना अशा बर्‍याच इमल्यांना धक्के बसतात, कधी थेट भगदाडं पडतात. मेघना मात्र तिच्या ब्लॉगलेखनाकडे ’जगातलं शक्य तितकं शोषून-चाखून बघण्याच्या माझ्या शैलीत मांडलेले, वागताना होत जाणारे आपले असंख्य प्रामाणिक तुकडे’ या नजरेने पाहते. माध्यमांच्या आणि एकूणच आयुष्य़ाच्या गदारोळातही तिच्या लेखनात ब्लॉगपूर्व काळातला ’धीमेपणा, अखंडपणा, शांतता’ आहे. यात स्वगतं, स्वसंवाद आहे. विलक्षण शब्दकळेमुळे जखडून ठेवणार्‍या कविता आहेत, अनेक विषयांवरची निर्भिड, विचारात पाडणारी, कधी दचकवणारी, तर कधी मनात रुंजी घालणारी मनोगतं आहेत, मौज-साधना सारख्या दिवाळी अंकांची, उत्तम पुस्तकांची खिळवून ठेवणारी परिक्षणं आहेत.
भाषेवर तिचं नितांत प्रेम असेल हे ओघाने आलंच. परंतु (10 वर्षांपासून) ’हाडाची ब्लॉगर’, जर्मन भाषांतरकार मेघना यातल्या एका भाषाविषयक लेखात स्वच्छपणे म्हणते, "प्रेमबिम बाजूला ठेवू या. मला हीच भाषा येते. बस. याच भाषेतून मला जोरकस शिव्या देता येतात आणि मनःपूत प्रेम करता येतं. घरात हक्कानं पाय पसरून बसल्यासारखं वाटतं. मनातले सैरावैरा बेशिस्त विचार नीट ओळीत लावताना, ही भाषा माझ्या मेंदूशी नीट जुळवून घेते. म्हणून हे प्रमाण-अप्रमाण भाषेबद्दलचे नि नियमांबद्दलचे वाद घालणं, कोश हुडकणं, ते अद्ययावत व्हावेत म्हणून खटपटणं. पाण्यानं उताराकडे धाव घ्यावी तसं आपोआप गोष्टी भोगणं, शोषणं, अनुभवणं, मांडणं... प्रश्न प्रेमाचा नाही, अस्तित्वाचाच आहे." मेघना reshakashare.com नामक अनियतकालिकही चालवते. पुस्तकं, चित्रपट, नाटक, प्रमाणलेखन, मुद्रितशोधन आणि संपादन हे तिचे काही रसविषय.
"काहीतरी मोठ्ठं-भव्य-दिव्य कर ग..." असं कळवळून सांगणार्‍या मित्राला मेघना ब्लॉगवर सवाल करते, " म्हणजे नक्की काय रे? अमुक इतक्या माणसांवर सत्ता गाजवू शकलो आपण किंवा अमुक इतके पैसे कमवले किंवा जगातल्या अमुक इतक्या लोकांना माहीत झालो, म्हणजे मोठ्ठं? परदेशात काम करण्याची संधी मिळाली म्हणजे मोठ्ठं? खरं सांगू? मला चढणारी झिंग, माझं समाधान, माझ्या जिवाला लाभणारी स्वस्थता हे खरे निकष. मग जगातली कितीही मोठ्ठी गोष्ट माझ्यासाठी फडतूस आणि जगाच्या लेखी क्षुद्र असलेली गोष्ट माझ्यासाठी स्वप्नवत ठरू शकते. माझा जीव किती तीव्रतेने, खोलवर गुंततो आहे... It matters..या व्याख्या आपल्या आपण ठरवायच्या. आपला एको पॉईंट आपला आपणच शोधायचा."
’कष्टानं उभी केलीय सगळी तटबंदी. आता कुणाला इतक्या सहज सुरुंग नाही लावू देणार’ असं म्हणत अलिप्त राहू पाहणारी मेघना माणसांमध्ये कमी रमते. काही जणांबाबत तिच्या शब्दात सांगायचं तर ’एखाद्याच्यात डोकावून पाहण्याची नवथर, तांबूस-कोवळी, लवलवती उत्सुकता’ उरतेच. तरीही माणसांपेक्षा मेघना पुस्तकांमध्ये जास्त गुंतते. त्यांच्या सगुण आणि निर्गुण दोन्ही स्वरूपांवर तिचं अंतर्बाह्य प्रेम आहे. एखाद्या पुस्तकाच्या उल्लेखाने पिसं लागून ते पुस्तक मिळवायचा आटापिटा करण्यातली नशा तिला मोह घालते. एखाद्या साहित्यकृतीचा आस्वाद घेताना त्याच्याशी एकरूप होण्याचं वरदान तिला लाभलं आहे. त्या तादात्म्यभावाला ती ’त्यातून माझ्याही आयुष्यात उद्दाम प्रदीर्घ बहरत गेलेली सूर्यफुलांची शेतं’ म्हणते. ज्यातून तिच्या कविता उमटतात. परिक्षणं लिहिली जातात.

यात नसीरुद्दीन शाहचे आत्मचरित्र, विजया मेहतांवरचं ’बाई’ इ. पुस्तकांची पठडी सोडून लिहिलेली परिक्षणं आहेत. वेडगळ प्रयोगाची गोष्ट सांगू पाहणारं पुस्तक, म्हणून बहुतेक मी ’खेळघर’ वाचलं असणार असं ती स्पष्टपणे म्हणते. शुभांगी गोखलेंचं ’रावा’ तिला ’जगावेगळं, जगात बदल घडवून आणायला निघालेलं, मैलाचा दगडबिगड ठरेलसं नव्हे पण फार जवळचं, आत्मीय’ वाटतं. हॅरी पॉटर कथा-मालिकेच्या अतिसामान्य शेवटाबद्दल लिहिते," छडीसारख्या निर्जीव गोष्टीला बहाल केलेला जिवंतपणा आणि स्वतंत्र व्यक्तिमत्त्व दिसलं आणि बाईंबद्दल आदर वाटला. बालवाङ्मयाची काळी-पांढरी सरहद्द संपते आणि त्यांची अनाकलनीय सरमिसळ असलेला राखाडी प्रदेश सुरू होतो, तिकडे चाललं होतं सारं. अखेर हॅरीला पूर्ण भाग गेलाच. फक्त हॅरीच नाही. अशी अपेक्षाभंग करणारी अनेक पुस्तकं असतात. माणसंही असतात - ज्यांचा थांग लागतो आपल्याला सहज. आणि सगळं इतकं सहज-प्राप्य-खुजं-नीटनेटकं असल्याबद्दल एक रानवट संताप येतो."
इंग्रज लोक ’नेटीव्हां’कडे पाहत तसं बहुतेक नास्तिक लोक आस्तिकांकडे पाहतात. कर्मकांडांना स्वत:पुरता ठाम नकार देत मेघना म्हणते," श्राद्ध ! जाणाऱ्याच्या अभावानं उभी राहिलेली राक्षसी पोकळी कशी स्वीकारायची त्यांनी? कुठल्या ठाम दगडावर टाच रोवून स्थिर करायचे कापणारे पाय? म्हणूनच असत असली पाहिजेत कर्मकांडं. दु:खाची कधीही न पुसता येणारी लाखबंद मोहर कपाळी उमटवण्यासाठी." तर एका लेखात सहजपणे म्हणते, "कितीतरी वेळा तर देवावर विश्वास नसलेले लोकही आपला अविश्वास असाच वारसाहक्कानं, विचार न करता कंटिन्यू करत असल्याचं दिसलं. तेव्हा ’आईनं सांगितलं म्हणून मी करते मनोभावे’ या साच्यातला गुरुवारचा उपास आणि असला देवावरचा अविश्वास यांत काय फरक, असं वाटून गंमत वाटली."
मेघना तिच्या लेखांमधून अनेक मुद्दे खणखणीतपणे मांडते. "बायका फक्त बायका आहेत म्हणून त्या करतील ते ते आपोआपच महान, प्रगतिशील ठरतं; या गृहितकाची जिम्मा मी तरी अल्पसंख्याकांचं नेहमीच बरोबर आणि ते कायमच सहानुभूतीस लायक, दलित साहित्य चाकोरीबाहेरचं असल्यामुळे थोर, योनी या निषिद्ध शब्दाभोवती फिरणारं नाटक केलं म्हणून ते आपोआपच चांगलं - असल्या समीकरणांमधेच करते. मग महिलादिनाचं आणि ’त्या होत्या म्हणून आम्ही आहोत’चं प्रयोजन काय?"
परंतु याच धर्तीवर असं म्हणावसं वाटतं, केवळ सांस्कृतिक धक्के देतो म्हणून मेघनाने लिहिलेला ’फॅनफिक्शन, स्लॅश-पॉर्न आणि मी (!)’ हा सचित्र लेख महान ठरत नाही. जे जे अनावश्यक, ते ते अश्लील, असं तेंडुलकरांनी म्हटल्याचा दाखला यात मेघना देते. हे खरय की माणसाच्या काही आदिम अंत:प्रेरणा या लेखातून मुक्तपणे व्यक्त होतात परंतु गूढ अंतर्विश्वात त्याला खेचून नेणारा, अतिशय अभ्यासपूर्ण लेख असूनही तो ’अनावश्यक’ जस्टीफिकेशन देत पुढे जातोय असे वाटत राहते. तिच्या शब्दात सांगायचं तर तिचं ’कोस्टल-एलिमेंटीय-एकारान्तत्व’ तिने कितीही झुगारून दिलं असलं तरी त्याचा सूक्ष्म ताण आल्याने असेल, इतर लेखनकृतींमध्ये घेते तशी ठाम भूमिका मेघना इथे घेऊ शकत नाही. तिचा ’पॉर्न ओके प्लीज’ विशेषांकासाठी लिहिलेला, ’लावणीचं होऊ घातलेलं पॉर्नीकरण टाळायचं असेल, तर जनांनाच मार्मिक व्हावं लागेल..’ हे आवाहन करणारा लेख मात्र तिच्या साक्षेपी लेखनाचा उत्तम नमुना आहे.
"कोर्‌या कॅनव्हाससमोर उभ्या राहिलेल्या चित्रकाराला किंवा सोत्कंठ प्रेक्षागारासमोर उभ्या ठाकलेल्या एकाकी नटाला नेमकं काय वाटत असेल याचा शतांशानं का होईना, पण अनुभव देऊन जातो हा कोरा कागद..” एखाद्या लेखाला सुरूवात करताना काय वाटतं हे असं मेघनाइतकं नेमकेपणाने कुणी सांगितलेलं नाही. तिच्या आणि आपल्या जिवात नेमकं काय चाललं आहे याचा सोलीव अनुभव देणार्‍या तिच्या कवितांबद्दल खरं तर लिहूच नये, त्या अनुभवाव्यात. वाचनात कधीतरी तिच्या एका कवितेचा हा तुकडा आला आणि हे भन्नाट रसायन काय आहे ते समजून घेण्याची अनिवार इच्छा झाली.
"टोक काढल्या जाणार्‍या पेन्सिलीसारखे स्वतःला तासत
आपण येऊन पोचतो एका टोकावर....
फार काही नको,
दोन बिंदू नि त्यांना जोडणारी एक रेघ काढता यावी,
पेन्सिल संपून जाण्याअगोदर... "

Friday, November 10, 2017

ब्लॉग ’ती’ चा - इंद्रधनु


समविचारी सख्यांचा समूहब्लॉग- इंद्रधनु

'सुखदुःखांचे, हळवे, कातर, हसरे, दुखरे, क्षण जपलेले.
श्रावणातले जलबिंदू हे तया छेदिती प्रकाशकिरणे.
प्रकाशकिरणांचे अंतर्मन नभी उमटवी इंद्रधनु.
त्या रंगांचा गोफ साजिरा या गं सयांनो मिळुनि विणू...'
असं म्हणत एकत्र आलेल्या मैत्रिणींना समूह-ब्लॉग लिहावासा वाटणं आणि ’स्त्री’ म्हणून आपल्या जाणीव-नेणीवांचे पदर उलगडत तो तब्बल ८ वर्ष लिहिता-वाहता ठेवणं हे मला विशेष महत्वाचं वाटतं. स्त्रीवादी पवित्रा न घेताही स्वत:चा शोध घेणारा हा ब्लॉग आजच्या सुशिक्षित मध्यमवयीन शहरी स्त्रीच्या मनोव्यापारांची नोंद घेतो. विद्या कुळकर्णी, अश्विनी केळकर, दीपश्री मुद्गल, वैशाली भिडे, स्मिता पाटकर, आशा कुलकर्णी, आणि वाचक यांचा मिळून हा ’ब्लॉग माझा २०१२’ पुरस्कारप्राप्त ब्लॉग ’इंद्रधनु’ http://asvvad.blogspot.in/ 
 या लिंकवर उपलब्ध आहे.

या पुण्यात राहणार्‍या मैत्रिणी सुखवस्तू आणि उच्चशिक्षित आहेत. अशा स्थानावरून कुणी स्त्री व्यक्त होत असेल तर त्याकडे ’काही नाही, सुख दुखतय यांना’ असं पाहणारे असले तरी त्या ’लोकेशन’पलिकडे जाऊन माणूस म्हणून तिला संवेदनशीलपणे समजून घेणारेही असतात. या ब्लॉगवर सर्वाधिक लेख लिहिणारी विद्या म्हणते," माझं लेखन हे माझं वय, माझं घडणं, माझी जात- वर्ग- वर्ण, मी ज्याचा भाग आहे तो आजूबाजूचा समाज, त्यातलं माझं स्थान, तिथून मला दिसणारं जग, याला तोडून नसणार आहे. माझ्या बिंदूवरून शक्यतो सगळीकडे पाहायचा प्रयत्न करीत मी लिहिते आहे. बाईला आत्मसन्मानाने जगायला मिळणं ही माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे."
या ’ब्लॉगवर अनेक स्त्रीकेंद्री विषयांचा परामर्ष घेतलेला आढळतो. ’सांभाळण्यासाठी मने, माझे गिळावे मीपण.. ’ अशी इंदिरा संतांच्या शब्दातली खंत इथे नाही. पुरूषविरोधी सूर कुठेही नाही. ’दरवेळी भाजतंच असं नाही..पण धग असतेच आसपास’ हा कल्पना दुधाळ यांच्या शब्दातला वास्तवाचा स्वीकार मात्र आहे. तरीही ’मी पण’ अबाधित राखून या आजच्या स्त्रिया स्वत:कडे, नातेसंबंधांकडे आणि एकूणच भवतालाकडे नव्या स्वतंत्र दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करतायत. हे सारं अतिशय मृदुपणे, कटूता टाळून, अनलंकृत शब्दातून, संवादी पद्धतीने समोर येतं.
काही लेखांमधून या मैत्रिणी बघण्य़ात आलेले हटके सिनेमे, नाटक यातलं वेगळेपण मांडतात, आपली सौंदर्याची तसच स्वातंत्र्याची व्याख्या तपासतात. आशा लिहिते, "प्रत्येक स्त्रीलाच ‘झाशीची राणी’ किंवा ‘किरण बेदी’ बनणे कदाचित आवडणारही नाही. काही स्त्रिया आवडीने आपल्या कर्तृत्वासाठी पारंपारिक क्षेत्रच निवडतील/निवडतात. पण निवडीचे स्वातंत्र्य/आधिकार स्त्री ला हवा हे महत्त्वाचे!" अर्थात आपण एखाद्या स्त्रीचं तिच्या आयुष्याबाबतचं स्वातंत्र्य मान्य करतो का हा प्रश्न ’लंच बॉक्स’ या चित्रपटाबद्दल दीपश्रीने लिहिलेल्या लेखातून उपस्थित होतो. ती लिहिते, "गृहिणी म्हणून समाजाच्या असलेल्या मर्यादा संभाळणा-या, जोडीदाराकडून अपेक्षित असणा-या भावनिक समाधान देणा-या गोष्टी दुस-या कोणा पुरुषाकडून मिळवणा-या, अश्या अनेक स्त्रिया आपल्या आजूबाजूला आहेत. त्यांचं प्रतिनिधित्व इला ही व्यक्तिरेखा करते. सिनेमाची कथा म्हणून आपल्याला हे पटेलही, आवडेल सुद्धा. पण प्रत्यक्षात एखादी स्त्री आपल्या अवतीभोवती अशी असेल तर याकडे आपण कसे बघतो ते महत्वाचे. नाही का ?"
घरातल्या भांड्यांकुंड्यांवर सुद्धा कायम घरातल्या कर्त्या पुरूषाचच नाव घालायच्या प्रथेत आता होऊ लागलेला बदल वैशालीने एका लेखात टिपला आहे. अंगात येणं, देवधर्म-व्रत वैकल्य यावर या ब्लॉगवर स्पष्टपणे मत मांडलेली आहेत. वैशाली लिहिते, "एखाद्या बाईच्या अंगात येणं म्हणजे जेव्हा संधी मिळेल, मुभा मिळेल तेव्हा आपला विरोध, संताप, दु:ख व्यक्त करण्याचा तो एक माफक प्रयत्नच." विद्या लिहिते, "आपण आपल्या सणवाराच्या, साजरं करण्याच्या रिती बदलायला हव्यात. त्यात गंमत, मजा ही तर हवीच पण हे सारं समतेच्या पायावर उभं असायला हवं. परंतु आपल्या समाजातील समता कशी आहे? बायका पौरोहित्य करायला लागल्या. त्याने समाज पुढे गेला का? नाही. आपण काही नव्या पोथ्या काढल्या नाहीत. जुनी व्यवस्था नव्या पद्धतीने पक्की होत आहे. बाईला जी स्वप्रतिमा हवी आहे त्यासाठी आदर्श बदलले पाहिजेत."
स्वयंपाक, स्त्री चं कमावणं, जगण्याच्या प्रवासात लक्षात राहिलेल्या बायका याविषयीची मनोगतंही या ब्लॉगवर लिहिलेली आहेत. एखाद्या लेखात स्वत:चा मन:पूत स्वीकार करायला शिकवणार्‍या आणि जगण्य़ातलं शहाणपण ओंजळीत टाकणार्‍या, ’यू कॅन हील युवर लाईफ’ ची लेखिका लुईस बद्दल विद्या कृतज्ञभावाने लिहिते. स्त्री-पुरूष मैत्रीबाबत आणखी एका लेखात मत मांडते, "जिवलग मित्र असण्याचा एक फायदा आहे की नवर्‍याला किंवा इतर पुरूषांना समजून घेण्यासाठी त्याची मदत होऊ शकते. अनुभवाचं वर्तूळ वाढवता येऊ शकतं. परंतु आपल्याकडे स्त्री-पुरूष मैत्रीचा काय इतिहास आहे? कृष्ण-द्रौपदी वगळता मला अशी मैत्री दिसत नाही."
दैनंदिन जीवनाशी निगडीत विषयांपासून बलात्काराची भीती, बाल-लैंगिक अत्याचारापर्यंत, मनाच्या तळाशी गाडलेले अनेक ’का?’ इथे खुलेपणाने चर्चिले जातात. बालपणी जाणवले, साहिले त्यावर या माध्यमातून व्यक्त होऊन या सख्या मोकळा श्वास घेतात. अश्विनी तिच्या ताज्या लेखात दक्षिण गोव्यातल्या अनवट प्रदेशातल्या एका रेसॉर्ट वर भेटलेल्या परदेशी तरुणीबद्दल लिहिते. दिवसभर निवांतपणे भटकून रात्री काळोखात निर्भयपणे परत येणारी ही एकटी तरुणी पाहून अश्विनी विचार करतेय.. "असं खुल्या दिलानं, आजुबाजूच्या जगावर विश्वास टाकून, मोकळं होऊन एकटं हिंडणं आपल्याला यापुढेतरी कधी जमेल?"

स्मिताच्या लेखातून अंतर्मुख करणारा प्रश्न विचारला जातो, "आजच्या आपल्या पिढीत पूर्वीपेक्षा बाईपणाची ओझी बरीच कमी झाली आहेत. आपली ती झुगारून द्यायची क्षमता पण वाढली आहे. पण त्यामुळे नवी ओझी तर निर्माण होत नाही आहेत ना? साधं मासिक पाळीचं उदाहरण घेऊ या, ५०% समाजाची ही दर महिन्याची शारीरिक अवस्था आहे तर त्यात काहीतरी लपवण्यासारखं आहे असं आपण का वागतो?"
विद्या लिहिते," विवाहितेपेक्षा प्रौढ कुमारीकांना, परित्यक्तांना, विधवांना आपण स्वच्छ चारित्र्याचे आहोत हे दाखवत बसण्याचं ओझं जास्त असतं. कायम शरीराचं भान ठेवायचं, आपण एकातरी मुलाला जन्म दिला पाहिजे याचं, अगदी वॉशरूमला जाऊन येण्याचा कार्यक्रम बाहेर कसा पार पाडायचा याचं बायकांना ओझं असतं. कधी माझ्यावर बलात्कार तर होणार नाही ना या खोलवरच्या भीतीचं एक ओझं घेऊन बायकांना जगायला लागतं."
परंतु पुरूष म्हणूनही जगतानाही अनेक ओझी वाहावी लागतात याची जाण त्यांना आहे. या ब्लॉगचा वाचक सचिन लिहितो, शालेय जीवनात मी पुरूष आहे; किंबहूना मी ‘बायल्या‘ नाही, हे सिद्ध करण्याचं खूप मोठे ओझे घेऊन मी जगलो, अजून एक ओझं ‘कर्ता‘ असण्याचं."
नीरज लिहितो, "पुरुषासारखा पुरुष, आणि घाबरतोस काय" हे ही नक्कीच एक ओझं आहे. तर मिलिंद लिहितो, मी माझ्या ओझ्यांबद्दल काही तक्रार करणं म्हणजे खरोखरीच जे शोषित/वंचित आहेत त्यांच्या ओझ्यांची चेष्टा केल्यासारखं आहे."
एकूणच ही चर्चा म्हणजे सर्वंकष विचार कसा करावा याचा सुरेख नमुना आहे.
अर्थात या ब्लॉगवर अनेक महत्वाचे विषय अद्याप यायला हवे आहेत, स्वानुभवाचं सच्चेपण असलं तरी ती अनेकदा लेखाची मर्यादा ठरते. नवरात्रात नऊ रंग वापरण्य़ाच्या नव्या प्रथेवरची टीका किंवा काही आक्षेप वाचताना प्रत्येक कृती व्यक्तीस्वातंत्र्याच्या तागडीत घालून मोजण्याने त्यातला निखळ आनंद गमावला जात नाही का असंही वाटतं. त्याचबरोबर विद्या म्हणते तसं, विचारांच्या गाभ्याशी स्वातंत्र्य असल्याशिवाय ते बाहेर कसं येणार याचं नेमकं भान हा ब्लॉग देतो. यावर उद्धृत केलेल्या जावेद अख्तर यांच्या कवितेतून आपली जगण्याविषयीची समजूतही वाढवतो.
" हे जग पुरूषांचं नाही की बाईचं नाही,
दोघांचं मिळून आहे...
हे जाणणार्‍या पुरूषा.......
तू खरा मर्द आहेस!"

Friday, November 3, 2017

’ब्लॉग ’ती’ चा’ - मीच माझा मोर

’ब्लॉग ’ती’ चा’ #HerBlog या माझ्या तरुण भारत- आकांक्षा मधील स्तंभातला आजचा लेख
गोव्यातल्या कुंकळ्ळीसारख्या छोट्या गावातून आलेल्या शेफाली वैद्य आज स्टार ब्लॉगर आहेत. दूरचित्रवाणी, सोशल मिडिया, डॉक्युमेंटरी आणि आंतरजालावरच्या विविध क्षेत्रांत त्या काम करतायत.
हजारो चाहत्यांना भावणारा, त्यांचा आत्मविश्वास जागवणारा शेफाली यांचा लेखनप्रवास विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देत जोमाने आणि डौलात सुरू आहे. त्यातल्या वाटा, वळणांचा वेध घेणार्‍या त्यांच्या ब्लॉगबद्दल....
मीच माझा मोर - शेफाली वैद्य #ShefaliVaidya
समस्त भारतीय मूढ असून त्यांच्या उद्धाराची जबाबदारी आपल्याच शिरावर असल्याच्या भ्रमात असलेल्या दोन्ही टोकाच्या मंडळींमध्ये एक सरळमार्गी गट समाजात मोठय़ा प्रमाणावर असतो. जगातल्या इतर देशांप्रमाणे भारतातही प्रचंड चांगल्या- वाईट उलथापालथी होत आहेत. परंतु फक्त नकारात्मक घटनांना अधोरेखित करून इतकी अस्वस्थता पसरवली जातेय की आपण भारतीय आहोत याचा त्याला न्यूनगंडच वाटू लागतो. अशा वेळी शेफाली वैद्य यांच्या http://mahamtb.com/authors/shefali_vaidya.html
 या ब्लॉगवरचा एखादा सणसणीत, चैतन्यदायी लेख ’तू चाल पुढं.. तुला रं गड्या भीती कुणाची’ म्हणत समोर येतो आणि कोणत्याही एका ध्रुवाला शरण न जाताही त्याला मोकळा श्वास घेता येतो.

जुन्यातलं कालबाह्य ते त्यागून, नव्यातलं योग्य ते निवडून आणि दोहोंचा समन्वय साधून आनंदाने जगता येऊ शकतं हा विश्वास देणार्‍या आणि कदाचित त्यामुळेच सोशल माध्यमांवर तब्बल ऐशी ते नव्वदहजार फॉलोअर्स (ज्यात पंतप्रधान मोदींचाही समावेश आहे) असलेल्या स्टार ब्लॉगर, पुण्याच्या शेफाली वैद्य. संज्ञापनशास्त्र आणि पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या शेफाली मराठी, इंग्लीश आणि कोंकणीतूनही तितक्याच सफाईने रंजक पण परखड लेखन करतात. राजकीय, सामाजिक विषयांबरोबरच पालकत्व, प्रवास, शिल्पकला आणि साडी या त्यांच्या आवडत्या वस्त्रप्रकाराबद्दल त्या सातत्याने उत्तम लिहितात. तरीही भारतीय अस्मिता जागृत ठेवणारं प्रखर लिखाण ही त्यांची खरी ओळख आहे.
पुरोगामी म्हणजे समाजाचं भलं चिंतणारा सुधारणावादी. परंतु या बिरूदाखाली केवळ द्वेषाचं राजकारण करणार्‍या अनेक स्वघोषित विचारवंतांचा समाचार घेत शेफाली घणाघाती लेखन करतात," 'मंगळसूत्र घालणं ही मानसिक गुलामगिरी आहे' म्हणणारे हेच लोक 'बुरखा घालणं हा मुसलमान स्त्रीचा वैयक्तिक प्रश्न आहे' हे ही तितक्याच जोरकसपणे सांगत असतात. दिवाळीला इतका खर्च करण्य़ाची गरज काय हा सामाजिक प्रबोधनपर संदेश स्वत: सीसीडीत अडीचशे रुपयांची कॉफी पीत आपल्या आय-फोनवरून टाईप करत असतात हे विशेष. काही प्रथांमध्ये अनावश्यक फाफटपसारा आलाय हे खरय. त्यामुळे तुमच्या वैयक्तिक मूल्यपद्धतीप्रमाणे सण साजरे करायची पद्धत जरूर बदला पण सण साजरे करूच नका कारण ते वाईट आहेत असं जर कुणी तुम्हाला सांगितलं तर ते मुळीच ऐकून घेऊ नका."
तथाकथित पुरोगामींना 'लव्ह जिहाद' ही संकल्पनाच अमान्य आहे तर अंध प्रतिगामींना प्रत्येक हिंदू-मुसलमान विवाह हा 'लव्ह जिहाद' वाटतो. शेफाली वैद्य यांचे या विषयावरील संतुलित आणि अभ्यासपूर्ण लिखाण या ब्लॉगवर आहे. त्या लिहितात, "भारतीय घटनेनुसार दोन भिन्नधर्मीय व्यक्तींना आपापले धर्म न बदलता स्पेशल मॅरेज एक्टखाली विवाह करता येतो. असा विवाह करणाऱ्या स्त्रीचा कुठलाही कायदेशीर हक्क हिरावून घेतला जात नाही. ही पद्धत टाळून बिगरमुस्लिम मुलींना पद्धतशीरपणे प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे धर्मांतर करणे म्हणजे 'लव्ह जिहाद'. खुद्द सर्वोच्च न्यायालयाने देखील केरळमध्ये 'लव्ह जिहाद' अस्तित्वात आहे हा राष्ट्रीय तपास यंत्रणेचा युक्तिवाद ग्राह्य धरूनच एनआयएला चौकशीचा आदेश दिला आहे. घटनेनुसार आपला जोडीदार निवडायचा अधिकार कुठल्याही सज्ञान भारतीय नागरिकाला असायलाच हवा, पण धर्मांतर म्हणजे काय ह्याची पूर्ण कल्पना धर्मांतर करणाऱ्या मुलींना आहे का? अश्या विवाहांमध्ये पैशाची मोठ्या प्रमाणात देवाण घेवाण होते आहे का? तलाक देऊन हाकलून दिले तर तिच्यापुढे नक्की कुठला मार्ग असतो? असे विवाह करणाऱ्या लोकांशी कडव्या इस्लामी संघटनांचा नक्की काय संबंध असतो ह्या सगळ्या गोष्टींची चौकशी करणं देशाच्या सुरक्षिततेसाठी महत्वाचं आहे. म्हणूनच 'लव्ह जिहाद' हे प्रकरण केवळ दोन भिन्नधर्मीय व्यक्तींपुरतेच मर्यादित राहात नाही."
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे माध्यमं. परंतु समर्थन किंवा विरोध हे एखाद्या व्यक्तीवर नव्हे तर मुद्द्यावर अवलंबून असावे हे भान विसरलेल्या बहुसंख्य माध्यमांचंही आज ध्रुवीकरण झालेलं दिसतय. अशा वेळेस तुम्हाला मिळणारी बातमी ही त्या त्या माध्यमाच्या धोरणानुसार ’मोल्ड’ होऊन आलेली असते. नुकतीच मुंबईत रेल्वेपुलावर चेंगराचेंगरीची भीषण दुर्घटना घडली. पुलाच्या बाहेर उभा असलेला एक पुरुष आत अडकलेल्या एका बाईला बाहेर खेचण्याचा प्रयत्न करताना दिसत होता, या पाच सेकंदांच्या क्लिपच्या आधारावर काहीही शहानिशा न करता 'मरणाच्या दारात असलेल्या बाईचाही मुंबईत विनयभंग होतो' अशा स्वरूपाची सनसनाटी बातमी प्रतिष्ठित वृत्तपत्र म्हणवणाऱ्या मीडिया कंपनीने प्रसिद्ध केली. "भारत हा देश स्त्रियांसाठी सुरक्षित नाही असे चित्र जगभरात पसरवणे हे असल्या कुटिरोद्योगाशी संबंधित असलेल्या लोकांचे प्रमुख काम. तो पुरूष त्या बाईला वाचवण्याचा प्रयत्न करत होता हे उघड झाल्यावर ती बातमी मागे घेण्याची नामुष्की त्या वृत्तपत्रावर ओढवली." अशा सडेतोड शब्दात टीआरपीच्या हव्यासापोटी केलेला उद्योग शेफाली सप्रमाण उघड करतात. भारताबाबत खोटी बढाई मारणार्‍या माध्यमांचे तसेच प्रतिगाम्यांचे कान धरताना मात्र त्या फारशा आढळत नाहीत. तसे घडल्यास उलट त्यांच्या लोकप्रिय लिखाणाची विश्वासार्हता अधिक वाढेल.
गुरमेहेरचं काय करायचं?, गोरक्षक, सत्य आणि मीडियाचा विपर्यास, उरी बसलेला घाव, शहाबुद्दीन के शोले, स्वतःची शोभा करून घेणारी डे- अशा अनेक खणखणीत लेखांतून शेफाली यांची लेखणी तळपली आहे. वर्मावर बोट ठेवल्याने दुखावलेल्या विरोधकांनी शेफाली या मोदीसरकारच्या ट्रोल आहेत असा आरोप करत दुसर्‍या बाजूला स्वत: शेफालीविरोधातही ट्रोलिंगच केले आहे. त्यामुळे असेल, किंवा स्वत:चे आनंदनिधान असणार्‍या क्षेत्रांशी वाचकांचा परिचय करुन देण्य़ासाठी असेल, शेफाली इतर विषयातील लेखनातही अधिक रस घेऊ लागल्याचे जाणवते.
’एक धागा सुखाचा’ या सदरात त्या लिहितात, "काही माणसं कशी जुनी नाणी जमवतात, पेंटिंग्स, मूर्ती, शिल्पांचा संग्रह करतात, तशी मी साड्या जमवते. माझ्या लहानपणीची खास आठवण...आईने तिचं कपाट उघडलं की जुन्या रंगीबेरंगी रेशमी साड्यांचा, वाळ्याचा, कापराचा सुंदर, संमिश्र दरवळ खोलीभर पसरायचा. तिच्या आयुष्यातल्या सगळ्या प्रेयस नात्यांचे ताणेबाणे मला तिच्या साड्यांमधून उकलले." या सदरातील इतर लेखांतून त्या लिनन, मुगा सिल्क, शिबोरी अशा विविध साड्यांमधली कलाकारी, त्या साड्या परिधान केलेल्या स्वत:च्या देखण्या फोटोंसह विस्ताराने उलगडतात. शिल्पकथा सदरात त्या ’मध्य प्रदेशातल्या उदयगिरी गुंफांमध्ये कोरलेल्या गजाननाच्या मूर्ती पासून कांचिपुरमचे किरातार्जुनीयम, उदयगिरीचा शेषशायी नारायण, देवीची विविध शिल्प याबाबत सचित्र माहिती देत साद्यंत वर्णन करतात.
श्रीदेवीचे पुनरागमन असलेल्या 'इंग्लिश विंग्लिश' या चित्रपटात तिने चाळीशीतली, घरातल्या सगळ्यांनी गृहीत धरलेली मध्यमवर्गीय गृहिणी, लाडू करण्याचा घरगुती उद्योग चालवणारी छोटी उद्योजिका रंगवली आहे. ’आत्मभान’ या लेखात शेफाली लिहितात, "एकजण म्हणाली- त्या सिनेमासारखा माझ्या आयुष्यात थोडाच कुणी देखणा, समजूतदार फ्रेंच माणूस येणार आहे आता, जो मला आत्मभान मिळवून द्यायला मदत करेल? मी हसले, म्हटलं, 'तूच बन की तो फ्रेंच माणूस’". पु. शि. रेगेंच्या सावित्री ह्या पुस्तकातली राजम्मा एक गोष्ट सांगते. त्यातल्या छोट्या लच्छीला मोर सतत आपल्या अंगणात नाचावा असं वाटत असतं. पण मोर स्वच्छंदी असतो. तो अट घालतो की त्यासाठी लच्छीने स्वतः आधी आनंदाने नाचायला हवं. शेवटी मोराची वाट बघणं हे कारणच गळून पडतं आणि लच्छी स्वतःच मोर बनून आनंदविभोर होते." तारणहाराची वाट पाहण्यापेक्षा ’मीच माझा मोर’ हे शेफाली यांचं लेखन वाचत गेलं की नीटच कळतं.

Friday, October 27, 2017

ब्लॉग ’ती’ चा- मिसेस फनीबोन्स

मिसेस फनीबोन्स - ब्लॉग ट्विंकल खन्नाचा

"अभिनय क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर तुमची नजर आणि कान तीक्ष्ण हवेत. दृकश्राव्य माध्यमातून तुम्ही जे टिपता ते आत झिरपतं आणि उमटतं. माझ्या बाबतीत मात्र पाहिलेलं वा ऐकलेलं काही क्वचितच माझ्या मनावर कोरलं जातं, पण जे मी वाचते ते मात्र कायमचं मनात रुतून राहतं. कदाचित यामुळे मी लेखिका म्हणून यशस्वी परंतु अभिनेत्री म्हणून अयशस्वी ठरले. पण मला त्याची खंत वाटत नाही कारण त्या क्षेत्रात काही काळ का होईना, वावरल्यामुळेच माझ्या अनुभवांची व्याप्ती वाढली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मला माझा आयुष्य़ाचा जोडीदार (अक्षयकुमार) मिळाला". माजी सिनेअभिनेत्री ट्विंकल खन्ना फर्स्टपोस्ट या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत अशी प्रांजळ कबुली देते. डिझाईनिंग बरोबरच इंग्रजी लेखनाच्या क्षेत्रात जिचं नाव झळकतंय अशी ही ’मिसेस फनीबोन्स’. मला स्वत:ला शोधता आलं. विवंचना विसरता आल्या, ते केवळ मी लेखनात रमल्यामुळेच, असं म्हणणारी ट्विंकल तिच्या ट्वीट्स बरोबरच (https://blogs.timesofindia.indiatimes.com/mrsfunnybones या लिंकवर) ब्लॉगलेखिका म्हणूनही गाजते आहे.

काही दमदार अभिनेत्रींचा अपवाद वगळता व्यावसायिक हिंदी सिनेमातल्या नायिका म्हणजे सुंदर, कचकड्य़ाच्या बाहुल्या, त्यांना मेंदू नावाचा अवयवच नसतो असा सार्वत्रिक समज आहे. साहजिकच ही माजी अभिनेत्री जेव्हा ब्लॉगर- लेखिका म्हणून प्रसिद्ध होऊ लागली तेव्हा लिहिता हात दुसर्‍याच कुणाचा असावा असा संशय व्यक्त केला जाऊ लागला. परंतु ती घोस्ट रायटर वापरत नाही हे लवकरच सिद्ध झालं. ती फार तर सिने-गॉसीप्स लिहू शकेल हा कयास देखील तिने अनेक विषय लीलया हाताळून खोटा ठरवला. ती म्हणते," मी वर्गातली सर्वात लठ्ठ मुलगी होते. ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार कवितेवरून ’लाईक अ ’टी पॉट’ इन द स्काय’ अशी माझी कुचेष्टा होत असे. त्या न्यूनगंडातून बाहेर पडायला मला पुस्तकांनी मदत केली, आधार दिला." माणसातल्या गुणदोषांचं आणि वास्तवाचं दर्शन निखळ विनोदातून घडविणारे पी.जी वुडहाउस हे तिचे सर्वात आवडते लेखक. त्यांच्या प्रभावामुळे असेल, हलक्याफुलक्या शब्दातली तर्कशुद्ध आणि वस्तुनिष्ठ मांडणी हे तिच्या लेखनाचं वैशिष्ट्य ठरलं.

कलकत्त्याच्या एका नामांकित संस्थेने प्रसिद्ध ब्लॉगर-लेखिका म्हणून एका कार्यक्रमात ट्विंकलला आमंत्रित केले होते. तिच्या खुसखुशीत शैलीबाबत बोलताना ती म्हणाली," विनोद हा अत्तरासारखा असतो. माणसाच्या जीवनात सर्वात निर्मळ आणि नितळ गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे हास्य." साहजिक तिच्या प्रत्येक लेखाचा विषय गंभीर असला तरी ती तो खोचक पण खेळकर पद्धतीने मांडते. उदा: एखाद्या लेखात पंतप्रधानांच्या आश्वासनांच्या खैरातीकडे लक्ष वेधत ती त्यांना सांताक्लॉजची उपमा देते तर दुसर्‍या लेखात तृतीयपानी चमको स्त्रियांना it is books over botox अशा कानपिचक्या देते. आपण आहोत तिथेच (तसेच) राहण्यासाठी घाम गाळत वेगाने पण जागीच सायकल चालवतो या विसंगतीवर लिहिते तर कधी राम रहीम सारख्या लोकात आपण सूर्य शोधतो आणि फसतो, ही आपलीच चूक असल्याचं ती लिहिते. स्त्रियांच्या मासिकधर्माबद्दलचे गैरसमज, पूर्वग्रह लयाला जावेत आणि त्याबाबत मोकळा संवाद सुरू व्हावा असं ती कळकळीने लिहिते.  ’Two-legged animals on the loose’ हा स्वच्छता अभियानाची ऐशीतैशी करणार्‍या जनतेच्या मानसिकतेबाबत लिहिलेला लेख असो किंवा दर वर्षाच्या जानेवारी महिन्यात उत्साहाने संकल्प करणार्‍या, स्वत:सकट समस्त आरंभशूर व्यक्तींची खिल्ली उडवणारा Ze way I learn ow to speak French हा लेख असो, तिची लेखणी वाचकांना गुंतवून ठॆवते.

भारताने ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकण्यासाठी अवश्य करावे असे काही ’जुगाड’ ती एका विडंबनपर लेखात सांगते. थाळीफेक ऐवजी मुखरसाची लांबवर पिचकारी टाकण्याची स्पर्धा घ्यावी. ट्रॅकवर धावण्य़ाच्या स्पर्धेपेक्षा भरपूर खड्डे असलेल्या रस्त्यांवर अडथळ्याची शर्यत ठेवावी. बालपणापासून ही कौशल्ये अंगी बाणवलेले भारतीय अशा स्पर्धा नक्कीच जिंकतील- अशा उपहासगर्भ शब्दात ती वस्तुस्थिती मांडते. अथेन्स ऑलिंपिक मधल्या कास्यपदक विजेत्या सीता साहूला जर आज पाणीपुरी विकून गुजराण करण्याची वेळ येत असेल तर कोणते पालक स्वेच्छेने आपल्या मुलांना क्रीडाक्षेत्रात ’ढकलतील’, असा परखड सवाल ती या लेखात करते. एकाच कालखंडात अमेरिकेने पटकावलेल्या ९७६ सुवर्णपदकांची भारताने मिळवलेल्या हाताच्या बोटावर मोजण्य़ाइतक्या सुवर्णपदकांशी तुलना करत ती खेळाकडे पाहण्याच्या भारतीय आणि सरकारी मानसिकतेवर नर्मविनोदी भाष्य़ करते.

ट्विंकल एक सजग आणि संवेदनशील आई आहे. ब्लु व्हेल गेम चे परिणाम पाहून इतर कोणत्याही पालकांसारखी ती ही धास्तावलेली आहे. त्यावर तिने लिहिलेला मुलाशी झालेल्या संवादावर आधारित विनोदी तरीही कातर करणारा लेख आजच्या शहरी टीनएजर मुलांची विचारपद्धती आणि पालकांचा भाबडेपणा यातल्या विरोधाभासाकडे निर्देश करतो. मुलीशी सापशिडीचा खेळ खेळताना मुलांच्या आयुष्य़ातल्या चढउतारांबद्दल, आणि एकूणच पालकत्वाबाबत तिने व्यक्त केलेले परिपक्व विचार या लेखात मुळातून वाचायला हवेत.

विवाहानंतर बहुतेक स्त्रिया नव्या आडनावाने नव्या जगण्य़ाला सुरूवात करतात. ट्विंकल मात्र अक्षयकुमारच्या भाटिया या आडनावाऐवजी खन्ना हे माहेरचेच आडनाव वापरते. या संदर्भात तिला अनेकांनी टोकलं. प्रत्युत्तरादाखल लिहिलेल्या #MarriedNotBranded हे तिच्या लेखाचं शीर्षकच खरं तर या मंडळींना उत्तर द्यायला पुरेसं आहे. यात ती लिहिते, शहरं, रस्ते यांच्यासारखं स्त्रियांचंही नामांतर होतं. त्या आपलं पुर्वायुष्य़, आपली ओळख जणू पुसून टाकतात. हरकत नाही पण हा निर्णय़ त्या स्त्रीचा असावा. तिच्यावर थोपवलेला नसावा. माझी लेक सध्या आईवडिलांची अशी दोन्ही आडनावं लावते. जाणती झाल्यावर तिने ठरवावं यापैकी कुठलं आडनाव लावायचं, दोन्ही लावायची, इतर कुठलं लावायचं की कोणतच लावायचं नाही.

मध्यंतरी आपल्या देशात पॉर्न संकेतस्थळांवर बंदी घालण्यात आली होती. या प्रकरणावर ’पिंग पॉर्न पाँग’ या लेखात तिने अनेक अर्धवटरावांची रेवडी उडवली आहे. पॉर्नकडे बघण्याचा काही भारतीयांचा गोंधळलेला तर बहुसंख्य जनतेचा दुटप्पी दृष्टीकोन ट्विंकल धमाल शब्दांमधून मांडते. हेतू योग्य असला तरी बंदीबाबतच्या तांत्रिक मर्यादांचे भान आल्यावर यातला फोलपणा शासनाच्या लक्षात आला असावा. ती लिहिते," ही बंदी घोषित झाली आणि देशात हाहा:कार माजला. सुमारे साडेबारा कोटी पुरूष आणि पन्नास एक स्त्रिया किंचाळत, विव्हळत निराशेच्या गर्तेत कोसळल्या. परंतु लवकरच ही बंदी मागे घेण्यात आली आणि कुणाला आजवर फारशा माहित नसलेल्या ८५७ तथाकथित पॉर्न कम इनोदी, बंदी फेम वेबसाईट्स उलट अधिकच प्रसिद्ध झाल्या."

मात्र ट्विंकलच्या लेखांमध्ये विनोदाच्या आवरणाखाली बरेचदा नकारात्मकता लपलेली आढळते. एखाद्या गुंतागुंतीच्या प्रकल्पावर टीका करण्यापूर्वी त्याचा सखोल अभ्यास न करता एकांगी मतप्रदर्शन केले जाते. ग्रामीण भागातील ऐकीव समस्यांबद्दल तिला आस्था आहे पण तिथल्या उमेद वाढवणार्‍या विकासकामांबद्दल ती लिहित नाही. एकंदर ’जीपीएस’च्या कक्षेत येतील त्याच विषयांबद्दल ती लिहू शकते अशी टीकाही तिच्या काही चाहत्यांनी तिच्याच शैलीत केली आहे. The fascination of shooting as a sport depends almost wholly on whether you are at the right or wrong end of the gun हे ट्विंकलच्या लाडक्या वुडहाऊस यांचं मार्मिक विधान. तिने वाचकानुनय करावा असं नव्हे पण जगण्य़ातली विसंगती अधोरेखित करणं आणि आत्मपरिक्षण करायला वाचकाला भाग पाडणं हे जर तिच्या लेखनाचं उद्दिष्ट्य असेल तर हे विधान तिने लक्षात घ्यावं आणि एकूण प्रतिक्रियांकडे गांभीर्याने पाहावं. सामाजिक विसंगतीवरचे विनोद आणि त्याविषयी काळजातून उठणारी वेदना सारख्याच सामर्थ्याने व्यक्त करता आली तरच ते लेखन करमणुकी पलिकडे जातं आणि वाचकांना भिडतं. तसं झालं तर आपल्या ’फनीबोन’ला स्पर्श करणारं ’मिसेस फनीबोन्स’चं क्रिस्पी, दिलखुलास लिखाण आपल्या हृदयालाही नक्कीच स्पर्शून जाईल.