Showing posts with label चित्रपट. Show all posts
Showing posts with label चित्रपट. Show all posts

Monday, June 30, 2025

’मिसेस’ आणि गरम गरम फुलके

’मिसेस’ हा आरती कादव दिग्दर्शित हिंदी चित्रपट ’झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर या वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित झाला. २०२१ मध्ये ’अ‍ॅमेझॉन प्राईम’ वर प्रदर्शित झालेल्या जिओ बेबी दिग्दर्शित मल्याळी चित्रपट ’द ग्रेट इंडियन किचन’ चा ’मिसेस’ हा रिमेक आहे. मूळ सिनेमा हिंदी व काही दाक्षिणात्य भाषांमध्ये डब झाला असला तरी उत्तरेतील प्रेक्षकांपर्यंत फारसा पोचला नव्हता. ती उणीव ’मिसेस’ने भरून काढली.  

मूळ सिनेमातल्या निमिशा सजायन आणि सूरज वेंजारमुडू या मुख्य पात्रांइतकाच जिवंत अभिनय ’मिसेस’ मध्ये सान्या मल्होत्रा आणि निशांत दहियाने केला आहे. कंवलजीत सिंगने त्यांना उत्तम साथ दिली आहे. रिमेक म्हटल्यावर तुलना आलीच. दाक्षिणात्य सिनेमा्ला उत्तर भारतीय रूपडं देताना काही सांस्कृतिक संदर्भ बदलणं आलं. यात ’मिसेस’ पूर्ण यशस्वी झाला आहे पण ’द ग्रेट इंडियन किचन’ मध्ये मुलभूत प्रश्न ज्या धारदार पद्धतीने दाखवण्यात आला आहे त्याची धार ’मिसेस’ मध्ये काहीशी बोथट झाली आहे. मूळ सिनेमातला प्रश्न वैश्विक असला तरी ग्रामीण पार्श्वभूमीमुळे व प्रत्ययकारी चित्रणामुळे त्या प्रश्नाची तीव्रता अधिक जाणवते. तुलनेने शहरी स्त्रीला त्या प्रश्नावर उत्तर शोधणं किंबहुना हा प्रश्न उद्भवण्यापूर्वी त्यावर विचार करणं शक्य असूनही हिंदीतली आधुनिक नायिका मल्याळी ग्रामीण सिनेमातल्या नायिकेसारखीच वागते हे पचवणं जरा कठीण गेलं. ’हे जग आता बदललं आहे’ असं भासणार्‍या प्रत्येकाला  ’मिसेस’ भानावर आणतो. 

मुळात, काय आहे यात मांडलेला प्रश्न ! साधी सरळ आनंदी स्वभावाची नायिका लग्नानंतर एका सुखवस्तू कुटुंबात, उराशी स्वप्नं कवटाळून प्रवेश करते. सासूला बाहेरगावी जावे लागल्याने घराची जबाबदारी नायिकेवर येते. नवरा आणि सासर्‍यांना सगळं काही हातात मिळण्याची सवय आहे. मासिक धर्माच्या काळात मात्र यातून सुटका आहे. ती ही बाईला विश्रांती मिळावी या हेतूने नव्हे तर घर विटाळू नये या भावनेतून. ताटाभोवतीचं खरकटंही तसंच टाकून घरातले पुरुष दररोज निवांत जेवून उठून जातात. ’आपल्याच घरातलं काम आहे- त्यात काय इतकं’ म्हणून गृहित धरलं जातं. नवर्‍याचा संबंध शेजे आणि पेजेच्या गरजेपुरताच. नोकरीच्या इच्छेला घरच्या पुरुषांनी गोड शब्दात दिलेला नकार,माहेरच्यांची तिने सासरी जुळवून घ्यावं अशी सूचना. एका क्षणी तिच्या भावनांचा उद्रेक होतो. त्याची परिणती कशात होते, ती काय निर्णय घेते, त्याने कसा आणि किती फरक पडतो हे सिनेमात पुढे पाहता येईल. तिला ती गवसते हा सिनेमाचा उत्कर्षबिंदू महत्वाचा. 

आता या कथानकातून ध्वनीत होणार्‍या आशयाकडे वेगवेगळे लोक वेगवेगळ्या दृष्टीकोनातून पाहतात. "घरातल्या बाईने गरमागरम फुलके (किंवा दोसे) करून वाढावेत या भारतीय पुरूषांच्या अपेक्षेमुळे भारतीय स्त्रीची ’उर्जा’ त्यातच खर्च होते त्यामुळे तिची उत्पादकता व इतर क्षेत्रात काही करू पाहण्याची क्षमता कमी होत जाते”, अशा अर्थाचं विधान एका राजकीय नेत्याने मध्यंतरी केलं. ते वाचून त्यांच्या स्त्रियांच्या आकांक्षांचा विचार करण्याचं कौतुक वाटू लागणार तोच पुढे वाचलं, "त्यापेक्षा पुरूषांनी पोळ्या (रोटी) खाव्यात." पोळ्या एकदम करून ठेवता येतात आणि सतत स्वयंपाकघरात जावं लागत नाही. पण म्हणजे फुलके,पोळ्या, दोसे जे काय करायचं ते शेवटी करायचं बाईनेच आहे. किरण बेदींना एका मुलाखतीत विचारण्यात आलं , "रिकामा वेळ मिळाला तर कोणती डिश करायला तुम्हाला आवडतं?" त्या म्हणाल्या "पुरूष अधिकार्‍याला ’रिकामा वेळ मिळाला तर त्यात काय करता’ असं तुम्ही विचारलं असतं. डिश बनवणं हे इथे माझ्याबाबतीत गृहित का धरलं आहे ?"   

महानगरी गगनचुंबी इमारतींपासून पाड्यावरच्या झोपड्यांपर्यंत पसरलेल्या आपल्या महाकाय देशातल्या बहुसंख्य घरात गृहित धरलेल्या स्त्रिया सापडतील. काही लोकांचं म्हणणं. या सिनेमातला नायक पण काम करतोच आहे नं. मल्याळी सिनेमात तो शिक्षक तर हिंदी आवृत्तीत तो प्रथितयश डॉक्टर आहे. पुरूषाने बाहेर आणि स्त्रीने घरात राबावं या श्रमविभागणीत गैर काय आहे? घरची आर्थिक आघाडी सांभाळणार्‍या पुरुषांना असाच कंटाळा, थकवा येत नसेल का! नक्कीच, परंतु ते काम कधीतरी संपवून स्वत:च्या अवकाशात, आवडीनुसार वेळ घालवण्याची संधी त्यांना परंपरेने उपलब्ध करुन दिली आहे. 

हे अमान्य असलेले काही स्वघोषित संस्कृतीरक्षक सिनेमा प्रदर्शित होताच पुढे सरसावले. त्यांच्या म्हणण्यानुसार या सिनेमातले पुरूष काही दारूडे वगैरे नाहीत. बायकोला मारझोड करणारे नाहीत. सभ्य आहेत. घरात सुबत्ता आहे. बाईकडून फक्त घर नीट सांभाळण्याची अपेक्षा आहे. बाई तर गृहलक्ष्मी असते. हे असलं भलतं काहीतरी बायकांच्या डोक्यात भरवण्याची परदेशी खूळं आणि स्त्रीमुक्तीच्या फालतू कल्पनांना विरोध केलाच पाहिजे. असले सिनेमे म्हणजे आपल्या महन्मंगल संस्कृतीविरोधातली षडयंत्र आहेत.”-असा त्यांचा दावा. 

वरपांगी ’फक्त घर नीट सांभाळण्याची अपेक्षा’ योग्यच आहे पण इमोशनल अ‍ॅब्युज किंवा भावनिक छळ हा या मंडळींच्या गावीही नाही. आवडो की नावडो स्वयंपाक, घरकामात आपलं ध्येय, महत्वाकांक्षा, करियर-व्यवसायाचा विचार दाबून ठेवून आणि हे करायची ’परवानगी’ मिळालीच तर घर नीट सांभाळण्याची कसरत करताना बायका झिजून पिचून जाताना दिसतात. कित्येक उत्तम खेळाडू महिला लग्नानन्तर ’गरम फुलक्यां’च्या गडबडीत सरावाला वेळ न मिळू शकल्याने करियर सोडून देतात. काही जणी मुलांसाठी नोकरी सोडतात. वर्गातल्या मुलांना वर वर जाताना मुक्याने पाहतात. हुशार असूनही संशोधनासारख्या वेळखाऊ प्रांतात किंवा डिमांडिंग स्वरूपाच्या उच्चपदाच्या नोकर्‍या न करता जमेल तेवढंच करियर करतात. त्यातूनही परिचयातील गृहिणींच्या तुलनेत आपण घरी कमी वेळ देतो हा अपराधीभाव उरात घेऊन जगतात. 

अशा स्त्रियांची मनोव्यथा व्यक्त करण्यासाठी ,पुरुषांनी घरकाम /स्वयंपाक करण्यात विनोद आहे असं वाटणार्‍यांसाठ हा सिनेमा निर्मिलेला आहे. ’वेडिंग’ नामक भपकेबाज समारंभात आपले कपडे, दागिने, मेकअप कसा असावा याचा मुली जितका विचार करतात त्याच्या निम्मा जरी विचार त्यांनी ’मॅरेज’ म्हणजे ’सहजीवना’विषयी केला, त्याविषयी भावी जोडीदाराशी चर्चा केली तरच लग्नसंस्था सशक्त होण्याची आणि समाजाला स्त्रियांनाही ’समान संधी’ मिळायला हव्यात याचे भान येण्याची शक्यता आहे. ’मिसेस’ सिनेमा अशा सगळ्या तरूणींसाठी आणि त्यांचीही काही स्वप्न असतात हे समजू न शकणार्‍या तरूणांसाठी आहे. 

हा सिनेमा एवढंच सांगू पाहतो - आयते पानात पडणारे गरम गरम फुलके पुरूषांइतकेच बायकांनाही आवडतात. 😉


Wednesday, October 30, 2024

पाकिस्तानी मालिकांमध्ये असं आहे तरी काय !

भारतीय एकतर्फी गंगाजमनी तहजीब सांभाळत आले आहेत. इतक्यातलं उदाहरण म्हणजे तबलापटू झाकीर हुसैन यांना अवघ्या भारताने भावनाविवश होऊन श्रद्धांजली वाहिली. पाकिस्तानने मात्र एखाद्या गैरमुस्लीम भारतीयावर असं भरभरून प्रेम केल्याचं आठवत नाही. पाकिस्तानने भारताला कायम छळलं आहे, युद्ध लादलं आहे, कुरापती तर चालूच आहेत. कलेला जात, धर्म नसला तरी काचणारे संबंध वेळीच संपवावे लागतात हे लक्षात घेऊन भारताने आपले दरवाजे पाकिस्तानी कलाकारांसाठी बंद केले आहेत.
या पार्श्वभूमीवर हम, एआरवाय इ. पाकिस्तानी मनोरंजन वाहिन्यांवरील मालिकांच्या भारतात वाढत चाललेल्या लोकप्रियतेने
 मला बुचकळ्यात टाकलं. गल्फ आणि परदेशातल्या पाकिस्तानी डाएस्पोरा समाजात ’घरकी याद’ दिलानेवाल्या या मालिका लोकप्रिय असण्यात नवल नाही परंतु गैरमुस्लीम भारतीय जेनझी वापरकर्त्यांच्या कॉमेंट्स, व्ह्यूज, लाईक्स या गर्दीत मोठ्या प्रमाणावर दिसतात. नमुन्यादाखल काही कॉमेंट्स- ’अब एक हफ्ता वेट करना पडेगा’, ’लव्ह फ्रॉम इंडिया’, ’This pakistani drama really touched my heart’. 
अलिया भट , विद्या बालन, आर. माधवन, किरण खेरपासून अमिताभ बच्चनपर्यंत अनेक कलाकारांनी या मालिकांचं, त्यातील कलाकारांचं Exceptional, Unparalleled, Phenomenal म्हणत भरभरून कौतुक केलं आहे. 

इंडिया टूडेमध्ये या संबंधातील एका लेखात एका पाकिस्तानी कलाकाराच्या मताचा उल्लेख आहे. तो म्हणतो. "बॉलीवूड सिनेमांसारख्या आमच्या मालिका गोळीबंद आणि प्रभावी असतात. भारतीय मालिकांसारख्या त्या प्रेक्षकांच्या सहनशीलतेचा अंत पाहत नाहीत. त्यांच्यासारख्या नकली, लुटूपुटीच्या वाटत नाहीत तर जिवंत, रसरशीत असतात." 
मुळात आंतरजाल (इंटरनेट) हे विश्वस्तरावर पसरलेलं असं माध्यम आहे ज्याला दरवाजा नाही. एक खिडकी बंद झाली / केली तर दुसर्‍या खिडकीतून कॉंटेंट आपली वाट काढत जातात. ते सुमार असले तर वाटेतच मरून जातात. आयएमडीबी संकेतस्थळाने बहुतेक पाकिस्तानी मालिकांना १० पैकी किमान ८ ते ९.५ गुण दिलेले पाहून एवढं गारूड करावं, असं या मालिकांमध्ये आहे तरी काय याचं मला कुतूहल वाटलं. हे कुतूहल शमविण्यासाठी मी निवडक मालिकांचे काही भाग तुकड्यात पाहिले तर काही मालिका स्क्रोल केल्या आणि माझ्या ’ओटीटी कट्टा’ सदरासाठी यावरच लिहायचं ठरवलं.
सगळ्याच मालिका काही महान नव्हत्या. काही तर सध्याच्या भारतीय मालिकांपेक्षा टाकाऊ आणि टुकार होत्या परंतु बर्‍याच मालिका खरोखर दर्जेदार तर काही  उत्तम होत्या. या मालिका भारतीय प्रेक्षकांच्या मनात इतकी घुसखोरी करू लागल्या असतील तर त्यांना नेमकं काय हवं आहे हे समजून घेण्यासाठी या मालिकांची दखल घ्यायला हवी. 

पाक मालिकांचा प्रेक्षकवर्ग भारतात निर्माण होण्याची सुरूवात २०१४ मध्ये झी च्या ’जिंदगी’ वाहिनीवरून झाली. लखनौ, पंजाब, काश्मीरमध्ये मुस्लीमबहुल भागात त्याची क्रेझ होती. आता ते लोण सर्वत्र पसरू लागलं आहे. सर्वसामान्य पाकिस्तानी स्त्रियांची स्थिती ’रांगेतलं शेवटचं माणूस’ अशी नसून ’रांगेत उभंच नसलेलं बाईमाणूस’ या प्रज्ञा पवारांच्या कवितेतल्या ओळीसारखी आहे असं आपल्यापर्यंत पोचणार्‍या बातम्यांवरून वाटतं. त्यामुळे काही सर्वाधिक लोकप्रिय मालिका पाकिस्तानी लेखिकांनी लिहिल्या आहेत याचं कौतुक वाटलं. या लेखिका जगण्यातले बारकावे तळाशी जाऊन असे काही  टिपतात की प्रेक्षक मालिकेत पार गुंतून जावेत.
मेरे हमसफर’ मालिकेची लेखिका होती सायरा रझा. ऐ इश्क ए जुनून.. लिहिलं सादिया अख्तरने आणि ’कभी मै कभी तुम’ ची लेखिका होती फरहत इश्तिआक. तिन्ही मालिकांचे विषय भन्नाट होते. मानवी नात्यांमधली गुंतागुंत मात्र सामाईक होती. हिंसा, अश्लीलता त्यात नावालाही नव्हती.


कभी मै कभी तुम’ ही मालिका नोव्हेंबर २०२४ मध्ये संपली. ती इतकी गाजली होती की तिचा अंतिम भाग पाकिस्तानी थिएटर्समध्ये तिकीट विक्री करून प्रसारित करण्यात आला. या मालिकेने पाकिस्तानची सीमा ओलांडून युरोपातील मुस्लीमबहुल राष्ट्रात, बांग्लादेशात लोकप्रियता मिळवलीच पण भारतीय प्रेक्षकांच्या प्रतिक्रियाही या मालिकेच्या YouTube व्हिडिओंखाली ओसंडून वाहत होत्या. 
 
भारतीय सिनेमाच्या भव्यतेपुढे आणि दर्जापुढे पाकिस्तानी सिनेमाचा जीव आणि प्रेक्षकवर्ग मात्र अतिशय केविलवाणा आहे. भारतीय सिनेमाचं,  विशेषत: शाहरूख खानचं तिथल्या कलाकारांना प्रचंड आकर्षण आहे. लांबसडक केसांसाठी विख्यात असलेली व ’रूबाब’ च्या भूमिकेत गाजलेली नईमा बट कोणत्याही भूमिकेसाठी केसांना कात्री लावू देत नाही. शाहरूखसह काम करायला मिळालं तर मात्र मी भूमिकेनुसार केस सुद्धा कापायला तयार आहे, असं ती सांगते. बॉलीवूडमध्ये संधी मिळणं हे तिथल्या अनेक कलाकारांचं सुप्त स्वप्न आहे. ’तेरा चेहरा’ फेम अदनान सामीचा मुलगा म्हणतो "इंडियाने माझ्या वडिलांना खूप प्रेम दिलं असलं तरी मी देशप्रेमी असल्याने मला तिकडे (इंडियात) काम करायचं नाही’. असलं तरी ते आता शक्य नाही. फवाद खान, माहिरा खानला मध्यंतरी संधी मिळाली पण आता पाकिस्तानशी विकोपाला गेलेल्या संबंधांचे पडसाद कलाक्षेत्रावर उमटणं स्वाभाविक असल्याने ते मुश्कीलही नही नामुमकीन आहे. 
’कभी मै कभी तुम’ मधल्या ’शर्जीना’च्या भूमिकेमुळे गाजलेली हानिया आमीर दिलजित दोसांझच्या लंडन मधल्या कार्यक्रमाला गेली असताना दिलजीतने तिला सन्मानाने मंचावर बोलावलं होतं. तिथे उपस्थित तिचेही चाहते जल्लोष करु लागले. दिलजीतने आपल्या पंजाबी सिनेमात तिला मुख्य भूमिका देताच भारतीयांनी मात्र त्या सिनेमाकडे पाठ फिरवली. असं असूनही भारतीय सिनेक्षेत्रातल्या कलाकारांइतकी लोकप्रियता, टीव्ही वाहिन्यांवर काम करणार्‍या अनेक भारतीय कलाकारांना स्वप्नवत वाटणारं यश  Pak Drama मधून काम करणार्‍या पाकिस्तानी कलाकारांना का मिळतं आहे त्यामागची अन्य कारणंही यामुळे शोधावीशी वाटली. 

याचं बरंचसं श्रेय जातं ते (अपवाद वगळता) भारतीय हिंदी व प्रादेशिक मालिकांच्या सुमारपणाला. त्याचबरोबर उत्तम मांडणी असूनही (अपवाद वगळता) हिंसक आणि लैंगिक दृश्यांनी खचाखच भरलेल्या शिवराळ भाषेतल्या बहुसंख्य  वेब सीरीजना. 
’दुश्मनों से पशेमान होना पड़ा है
दोस्तों का ख़ुलूस आज़माने के बाद’ अशी आपली गत या मालिकांच्या बाबतीत झालेली आहे.
हिंदी व प्रादेशिक मालिका इतक्या संथ गतीने सुरु असतात की महिन्यातून एकच भाग पाहिला तरी त वरून ताकभात कळतो. ’क्यूँ की सास भी कभी बहू थी’ या हिंदी मालिकेचा नवा सीझन सुरू झाला आहे म्हणे. पहिल्या सीझनचे १००८ एपिसोड झाले होते. मराठीत ’चार दिवस सासूचे’ म्हणत चाराचे किती झाले हे गुगलून पाहिलं तर ३१४७. ’आई कुठे काय करते’.. पाच एक वर्ष सुरु होती. 
कितीही प्रतिभासंपन्न लेखक आणले तरी त्यांचे पेन, कीबोर्ड, मेंदू, अगदी जनरेटीव्ह ए-आय सुद्धा इतके एपिसोड पाडल्यावर (कागदावर किंवा स्क्रीनवर..) झिजणार नाही तर काय ? 
एखाद्या क्षुल्लक घटनेनंतर समजा आश्चर्य दाखवायचं असेल तर घरात जितकी पात्र त्यात आहेत ती सगळी क्रमाने "काय" म्हणतात. ’मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचंय’ असं म्हणत अनेक भाग आणि शेकडो प्रेक्षक घनघोर कंटाळा येऊन खर्ची पडतात.
याउलट पाकिस्तानी मालिका.. २०/ ३० फार तर ५० भागात खेल खतम. 
लोकांना हवीहवीशी वाटत असतानाच मालिका संपवण्याची धमक या मनोरंजन नगरीत आहे. वेगवान पटकथेची आणि दिग्दर्शनाची घट्ट बांधणी प्रेक्षकांना खिळवून ठेवते. पाकिस्तानी मालिकांना कुठे थांबायचं हे अचूक कळतं. 

अर्थात लांबी हे काही गुणवत्तेचे परिमाण किंवा एकमेव निकष नाही पण मग आणखी काय कारणं असावीत ! 
आपल्या मालिकांची साचेबद्ध बिनडोक कथानकं. अखंड सौभाग्यवती वज्रचुडेमंडित रडकी नायिका, इस्टेटीची भानगड ,बटबटीत नटलेली खलनायिका आणि पुरुष मेषपात्रं ! त्यांच्याऐवजी पुतळे उभे केले तरी चालतील. तसंही त्यांना फक्त ’हे बघ, आधी तू जरा शांत हो’ एवढाच संवाद अधूनमधून म्हणायचा असतो. 
’लग्न’ या एकाच शब्दाभोवती या मालिका महाएपिसोड करत महिना महिना फिरत असतात. एकदाचं ते झालं की नायिकेचा काटा काढण्यासाठी दुधात विष घालणं, ती गर्भवती असल्यास तिला तुम ता ना ना ना पार्श्वसंगीतासह जिन्यावरून पाडणं, नायकाच्या गाडीचे ब्रेक फेल करून ठेवणं, नायिकेला काळी म्हणून टोमणे मारणं यात शे-दोनशे भाग संपतात. नायकाच्या धक्क्याने कुंकवाचं तबक हवेत उडून कुंकू नेम धरून अविवाहीत नायिकेच्या भांगात उडी मारतं किंवा विवाहित असेल नायिका तर कुंकवाच्या दिव्य शक्तीमुळे किंवा एखाद्या देवीच्या आशीर्वादाने संकटातून बचावत राहते. 
याशिवाय नायिकेला नायकाच्या शर्ट्चं तुट्लेलं बटण शिवणं, त्या एपिसोडच्या सुमारास वटसावित्री/ करवा चौथ /मंगळागौर, होळी, गणपती, पाडवा वगैरे जे कुठले सणवार येतील ते आधीच जुजबी असलेल्या कथानकाला टाईम प्लीज करून बाजूला टांगून साजरे करणं इ. कामं करावी लागतात. 
लेखकाला यापुढे सुचेनासं झालं की ते एकता कपूरचे जुनाट प्रयोग नव्याने ट्राय करून दोन तीन मालिकातली पात्र एकत्र आणतात. लॉजिक सोडून काय वाट्टेल ते करतात.
हिंदी मालिकांमध्ये हेच सगळं आणखी झकपक स्वरूपात असतं. वरून या गुंताड्याला ’कला’ वगैरे म्हणावं अशीही संबंधितांची अपेक्षा असते. 
जग मंगळावर चाललं आहे, आपण अश्मयुगीन काळाकडे चाललो आहोत या सत्याशी या मालिकांना देणंघेणं नाही. लोकांना जे हवं तेच आम्ही दाखवतो आहोत असं निर्माता, दिग्दर्शकांचं म्हणणं असतं. हे कमी की काय म्हणून सर्वोत्तम सासू, सर्वोत्कृष्ट सून असली बक्षिसे देणारे आणि मधल्या गॅप हिंदी सिनेमातील आयटम सॉंगवर मालिकेतील दिग्गज कलाकारांनी व्यावसायिक तडजोड म्हणून केलेल्या करूण नाचाने भरून काढणारे दिव्य सोहळेही टीव्हीवर सुरु असतात. 
अन्य भाषेत रमू न शकणारे वयस्कर व निवृत्त लोक, काही भाबड्या गृहिणी यांच्या जीवावर रटाळ मालिका सवंग मनोरंजनाचा रतीब घालत राहतात. खरं तर सकस कथानकांवर आधारित निर्मिती करणं आणि लोकांच्या अभिरुचीला वळण लावणं अशक्य नाही हे दूरदर्शनच्या काळातल्या अनेक मालिकांनी सिद्ध केलं आहे आणि वर्तमानात काही पाकिस्तानी मालिकांनीही.

पाश्चात्य मनोरंजन विश्वात डार्क कॉमेडी  किंवा भव्य बिगबजेट ऐतिहासिक मालिकांचा  (उदा: द क्राउन) आवाका वैश्विक आहे. राजकारणासारख्या संवेदनशील विषयांचंही बेधडकपणे रोखठोक चित्रण करणार्‍या मालिका तिथे प्रसारित होतात. पाकिस्तानातली राजकीय स्थिती बघता हे कधीही शक्य नाही. त्यामुळे भारतीय मालिकांप्रमाणेच बहुतेक पाकिस्तानी मालिका कुटुंबकेंद्री आहेत. मात्र या मालिकांमध्ये प्राण आहे तो आणखी काही कारणांमुळे...

कथाबीजाशी प्रामाणिक असलेलं कथानक आणि दाद घेणारे संवाद 
किचन पॉलीटीक्सच्या पलीकडे एक भलंमोठं जग आहे आणि बायका शालू नेसून पालक निवडत नसतात एवढी बेसिक समज यांना असल्याने कथानक सशक्त, एखाद्या समांतर सिनेमाइतकं वास्तवाधारित असतं.  उदा: ’मेरे हमसफर’ या मालिकेत पिचलेल्या बायकोमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारा ,आवश्यक तिथे नाही म्हणायला शिकवणारा नवरा आणि त्या दोघांमधले सहजीवनावर भाष्य करणारे सुंदर प्रसंग मालिकेला उंचीवर घेऊन गेले. बहुतेक मालिकांमधला एकही संवाद अनैसर्गिक आणि अकारण वाटत नाही. इतके ते कथेशी एकरूप झालेले असतात. 
’मै मंटो नही हूँ’ मध्ये साधाभोळा अविवाहित प्राध्यापक, सह-प्राध्यापिका, यांची विद्यार्थिनी असलेली एका डॉनची मुलगी, गँगवॉर, कुटुंबांची ओढाताण, प्रेमत्रिकोण या कथानकात सगळ्या पात्रांचे संवाद काळजातून आल्यासारखे वाटावेत इतके सहज आणि दमदार आहेत. सदात हसन मंटो निडर पाकिस्तानी लेखक होते. नावाचा मंटो असलेला घाबरट प्राध्यापक वेळ येताच आपण लेखक मंटोच्याच जातकुळीतले असल्याचं दाखवून देतो. यातलं मानवी मनोव्यापाराचं विश्लेषण आणि सगळ्या पात्रांचे एखाद्या मुक्त काव्यासारखे संवाद लक्षात राहणारे आहेत. अर्थात प्राध्यापक-विद्यार्थिनीमध्ये प्रेमसंबंध दाखवण्यावरून तिकडे अनेकांच्या भावना दुखावल्या.    

तपशीलवार पात्रनिर्मिती
आपल्या मालिकांमध्ये एक सासू झाका आणि दुसरीला काढा. मेकअप थापून सोफे उबवणारं हे पात्र मुळातच तकलादू असतं. पाक मालिकांमध्ये जास्त फूटेज नसलेल्या पात्राच्या व्यक्तिमत्वाचं सुद्धा सूक्ष्म चित्रण केलं जातं. जुजबी भूमिकेमध्ये एखादा वकील दाखवला तर तो रोजाने आणलेला ’ओव्हरअ‍ॅक्टींगके पचास रुपये काट’ वाला न वाटता 'वकील' वाटतो. या कंगोर्‍यांमुळे पात्रांची ओळख निर्माण होते आणि ते कथानकाला सहजगत्या पुढे घेऊन जातात. 
आपल्याकडे खरं तर थिएटरची पार्श्वभूमी किंवा अनुभव असलेले उत्तमोत्तम कलाकार आहेत, परंतु प्रेक्षकांना बुद्ध्यांकच नाही असं मानणार्‍या मालिकांमध्ये ते बिचारे अभिनय करणार तरी केव्हा !

उच्च निर्मिती मूल्य 
या मालिका अतिशय नेत्रसुखद , ’क्लासी’ वाटतात आणि खर्‍या देखील.  उदा" ’ऐ इश्क ए जुनून’ या मालिकेतला नायक पंचतारांकित हॉटेल्सच्या साखळीचा मालक आहे. महत्वाचे प्रसंग थेट पंचतारांकित हॉटेलमध्येच चित्रीत केले आहेत. कारची निवड, क्रॉकरी, सजावटीच्या वस्तू प्रत्येक गोष्टीचा तडजोड न करता विचार केल्याचं दिसतं. ड्रोन शॉट, लॉंग शॉट असो की जवळून प्रत्येक फ्रेम श्रीमंत वाटते. आपल्याकडे ऐतिहासिक मालिकांत हे बर्‍यापैकी साध्य केलं असलं तरी एरवी श्रेयस तळपदे सारखा प्रख्यात देखणा अभिनेता उद्योगपती नायक म्हणून एंट्रीपुरता हेलीकॉप्टरने येतो. नंतरच्या भागात त्याला पुठ्ठ्याच्या विमानाच्या सेटवर बसवलेलं पाहून प्रेक्षकांनाही हसू आवरत नाही. 
३०० करोडची उलाढाल करणार्‍या राधिका मसालेची गुप्त फॅक्टरी असते तसं इथे नाही. फॅक्टरीचा उल्लेख असेल तर एखाद्या फॅक्टरीत प्रत्यक्ष शूट केलं जातं. आपल्या अवतीभोवती हे सारं घडत असल्यासारखं वाटून आपण कथेशी अधिक कनेक्ट होतो. ’कन्व्हिक्शन’चं मर्म त्यांना गवसलं आहे.

सामाजिक समस्यांची समंजस हाताळणी 
पाकिस्तानात पुराणमतवाद्यांचं आणि कट्टरपंथीयांचं वर्चस्व आहे. तरीही मालिकांमधून घरात होणारे हिंसाचार, मानसिक आरोग्य, लैंगिक असमानता यासारख्या ज्वलंत विषयांना केंद्रस्थानी ठेवताना निर्माते घाबरत नाहीत. उदा: ’केस नं ९’ मालिकेमध्ये करियरिस्ट नायिकेवर बलात्कार करणार्‍या उद्योगपती मालकाच्या विरोधात ती हिंमतीने लढा देते. अशा केसच्या कायदेशीर खाचाखोचा, गुन्हेगाराने विकत घेतलेली भ्रष्ट यंत्रणा, अशा घटनांच्या सामाजिक प्रतिक्रिया बीभत्स न  होऊ देता प्रश्नाची दाहकता जाणवत राहील अशा प्रभावीपणे चित्रित केल्या आहेत. पटकथेवर घेतलेली मेहनत स्पष्ट दिसते. आपल्याकडे कित्येक हिंदी मालिका अजूनही काली जादू, नागीन, मणी, खजाना, पुरखोंकी हवेली, डायन अशा वेडपट गोष्टींमध्ये अडकून पडल्या आहेत. 

परिचित संस्कृती व भाषा 
एके काळी आपल्याच देशाचा भाग असलेल्या प्रदेशाबद्द्ल भारतीयांना वाटणारं एक अनामिक औत्स्युक्य हे पाकिस्तानी मालिकांना/ त्यावर आधारित सोशल मिडिया रील्सना मिळणार्‍या प्रतिसादाचं कारण असावं. 
पाश्चात्य मालिकांच्या तुलनेने या मालिकांमधली ’ब्राऊन’ माणसं, परंपरा, ते जग रिलेटेबल  वाटतं असं जेन झीचं म्हणणं आहे. 

यातल्या स्त्री पात्रांचे (पुरूषांचे देखील) कपडे, पात्र अत्याधुनिक असलं तरीही अंगभर असतात. आखूड कपडे घालणं म्हणजे जीवाला धोका त्यामुळे त्या धजावतही नसाव्यात. कपडेपट उत्तम पण वास्तववादी असतो. 
ग्रामीण पद्धतीची श्रीमंती दाखवायची म्हणून भुवनेश्वरीसारखं एकाचवेळी ८, १० सोनेरी पॉलीशच्या माळा घालून नटून बसलेलं अतार्किक पात्र मला त्यांच्या ब दर्जाच्या मालिकांमध्येही दिसलं नाही. काही बायका भुवनेश्वरीच्या साड्यांसाठी मालिका बघत म्हणे. पाक मालिका उत्तर भारतीय स्त्रियांमध्ये विशेष लोकप्रिय असल्याच हे ही कारण नाकारता येत नाही कारण पिंटरेस्टवर मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी सूट्स म्हणजे सलवार कमीज सर्च केले जातात. 

हिंदी सिनेमांच्या वेडामुळे भारतीयांना फारसी, उर्दू मिश्रीत हिंदी सहज कळते. अ‍ॅक्सेंटशी झटापट करायची किंवा सबटायटल वाचत वरच्या स्क्रीनकडे पाहायची कसरत करावी लागत नाही. ’चश्मदीद गवाहोंके बयानात को मद्दे नजर रखते हुए अदालत इस नतीजे पर पहुंची है की ...’ असले भरभक्कम संवाद आपल्याला लहानपणी सुद्धा समजत. भारतात केबीसी लोकप्रिय असण्याचं श्रेय अमिताभ बच्चन यांच्या वलयाइतकंच त्यांच्या उत्तम भाषेलाही जातं. भारतीय मालिकांमधली भाषा मात्र फारच साधारण असते. 
आपल्याकडॆ बातम्यांचे निवेदक वापरत असलेल्या ’विरोधक गये बौखला’ किंवा ’निश्चितच..आज या ठिकाणी पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणावर साचलेलं आहे’ अशा किंवा मराठी मालिकांमधल्या ’काय तुला जेवण बनवता येतं?’ या भाषेच्या तुलनेने  पाक मालिकांमधली आदबशीर उत्तम भाषा ऐकायला भारदस्त आणि गोड वाटते. त्या पात्रांच्या तोंडून, ’अब दिल्ली दूर  नही’ सारखे वाक्प्रचार ऐकताना गंमत वाटते. 
मराठी मालिका चांगल्या, वाईट कशाही असल्या तरी त्यांची शीर्षकगीतं नेहमीच सुरेल असतात. पाकिस्तानी मालिकांचीही शीर्षकगीतं किंवा थीमसॉंग म्हणता येईल, श्रवणीयच नव्हे अर्थपूर्ण असतात. गंधाळला, गहिवरला, मंद, धुंद, नक्षी, पक्षी, चिंब ,बिंब ... या पलीकडे जाणारं चांगलं काव्य त्याच्या गाभ्यात असतं. त्यामुळे नुसत्या शीर्षकगीतांच्या व्हिडिओंनाही लाखो लाईक्स मिळालेले दिसतात. 

याचा अर्थ पाकिस्तानी मालिकांमध्ये उणीवा, विरोधाभास नाही असं मुळीच नाही.  
भारतातल्या केंद्रविरोधकांना ’हिजाब’ हा वैयक्तिक निर्णय असल्याचा शोध लागला आहे. पाकिस्तानी मालिकांमधल्या नायिका मात्र बुरख्यात नसतात. 
आई, आजीच्या भूमिका करणार्‍या स्त्रिया मध्यमवर्गीय दाखवलेल्या असल्या तरच बाहेर पडताना चादर/ बुरखा घालताना दिसतात. काही व्हिडिओंवरून बहुतांश पाकिस्तानी स्त्रिया किमान डोक्यावरून ओढणी, स्कार्फ घेताना दिसतात. खरं तर तिथल्या बहुसंख्य स्त्रियांना शिक्षण, आरोग्य, निर्णयस्वातंत्र्याच्या हक्कासाठी लढावं लागतं आहे, काहींना तर लढायचं असतं हे ही माहीत नाही. मालिकांमध्ये तसं क्वचित दिसतं. त्यांना नायिका हटके स्वरूपात दाखवायच्या आहेत हे लक्षात येतं.
अर्थात नायिका कितीही आधुनिक, स्वतंत्र बाण्याची असली तरी ’तलाक’ प्रकरणाची तिला भयंकर धास्ती दिसते. एकूण बहुपत्नीत्व मालिकेतल्या स्त्री-पात्रांना सपशेल अमान्य आहे. 
स्मिता पाटील एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या," सिनेमा संपल्यावर बायका रडत, डोळे पुसत बाहेर पडल्या तर तो सिनेमा हमखास यशस्वी होणार अशी सिनेमाक्षेत्रातल्यांची धारणा असते". हे मराठी, अन्य प्रादेशिक भाषेतल्या आणि हिंदी मालिकांइतकंच काही क दर्जाच्या पाकिस्तानी मालिकांनाही लागू पडतं. फरक एवढाच की मंगळसूत्र हातात धरून ’तुला याची ताकद माहीत नाही’ वगैरे इमोशनल डायलॉग पाकिस्तानी नायिका मारत नाहीत. त्या बिचार्‍याही राहत नाहीत. त्या लढा देतात, सूड घेतात किंवा प्रश्नावर पाय देऊन पुढे जातात. 

भारतीय मालिकांमध्ये बंगाली, मराठी, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय अशी वेगवेगळी पार्श्वभूमी असते. त्यानुसार प्रथा, वेशभूषा, भाषा, पदार्थ यातला फरक स्पष्टपणे दिसतो तसं पाकिस्तानी मालिकांमध्ये भौगोलिक वैविध्य अजिबात दिसत नाही. एकच बिर्याणी वेगवेगळ्या डिशमधून वाढल्यासारखं वाटतं. 
दोनच शहरं दिसतात किंवा भासतात. इस्लामाबाद आणि मुख्यत: कराची. 
बाकीचा पाकिस्तान मालिकांच्या खिजगणतीत नाही. पाकिस्तान जणू दुबई असल्यागत यातल्या पात्रांची जीवनशैली दिसते. इनडोअर सीन चकचकीत तर आउटडोअर सीनमध्ये बकालपणा दिसतो त्यामुळे आउटडोअर सीन अगदी कमी असतात. 
खेड्यातली कथानकं जवळपास नाहीतच. याचा अर्थ खेड्यातल्या वास्तवाचं चित्रण तिथल्या प्रेक्षकांना आवडत नसावं. तुलनेने हिंदी, मराठी मालिकात खेड्यांची पार्श्वभूमी बर्‍याचदा यशस्वीरित्या वापरलेली दिसते. 
या मालिकांमध्ये काही वेळा दिसणारी, जगातील बहुतेक संस्कृतींनी निषिद्ध मानलेली नाती जसं चुलतभावंडांनी एकमेकांवर प्रेम करणं, लग्न करणं वगैरे आपण तटस्थपणे पाहिली तरी आपल्याला असह्य वाटतात. अशी कथानकं भारतात व अन्य संस्कृतींमध्ये तग धरू शकणार नाहीत. 

यातली नायिका कंपलसरी पिट्ट गोरी असते. मराठी मालिकेत खोट्या काळ्या केलेल्या नायिका दाखवायची टूम आली आहे त्याच्या उलट. सर्वसामान्य पाकिस्तानी स्त्री निमगोरी असते. अशा वर्णाच्या अभिनेत्रींना कायम दुय्यम भूमिकाच कराव्या लागतात अशी खंत त्या बोलून दाखवतात. यांचा मेकअप मात्र कथानकानुरूप ,अतिशय नैसर्गिक वाटतो. 
यातली सगळी श्रीमंत पात्र महागड्या परदेशी काळ्या गाड्यांमधून फिरतात. त्यांच्या मागे पुढे कायम बंदूकधारी खाजगी सुरक्षारक्षकांच्या ओपन जीप असतात. हे दृश्य इतकं कॉमन आहे की त्यावरून तिथल्या प्रतिष्ठेच्या कल्पनांचा आणि विदारक सामाजिक स्थितीचा अंदाज येतो.  
 ’केस नं ९’ मधल्या एका जोडप्याचं नाव ’रोहित-मनीषा’ आहे. हा एकमेव अपवाद मला आढळला. कॉमेंटमध्ये अनेक मुस्लीम नावाच्या व्यक्तींनी त्यावर प्रश्न उपस्थित केलेला दिसला. 

मी या लेखासाठी जेवढ्या मालिका स्क्रोल केल्या किंवा त्यातली निवडक दृश्य पाहिली त्यात भारतीय संदर्भ मला तरी सापडले नाहीत. आपल्याकडे भारत-पाकिस्तान संबंधांवर अनेक चित्रपट येऊन गेले असले तरी दूरदर्शन काळातली ’तमस’, बुनियाद वगळता मालिकांमध्ये पाकिस्तानचा उल्लेख, संदर्भ नसतो. 
फाळणीपासून ते पहलगाम घटनेपर्यंत भारताला अत्यंत तापदायक ठरलेला पाकिस्तान, समन्वयाचे फोल ठरलेले प्रयत्न, पाकिस्तानाला ग्रासून टाकणारे लष्कराचे, जिहादींचे वर्चस्व, धर्मांधता, आर्थिक अडचणींनी अर्धमेला झालेला पाकिस्तान. यातले काही चुकूनही या वास्तववादी म्हणवणार्‍या मालिकांमधून डोकावत नाही. त्याअर्थाने या मालिकांना पलायनवादी म्हणता येईल. उलट या ताणातून ब्रेक मिळावा म्हणून पाकिस्तानी जनता या मालिकांमध्ये विरंगुळा शोधत असावी. 
मालिकांमध्ये यूकेचा/इंग्लंडचा उल्लेख हमखास असतो. एक तरी पात्र तिथे राहत असतं. भारताचा उल्लेख नसतो हे एका अर्थी बरंच म्हणता येईल कारण या माध्यमातून जर भारतविरोधी आशय भारतीय जेनझी पर्यंत या मालिकांनी पोचवायला सुरूवात केली तर भारताच्या शिरावर त्याचा बीमोड करण्याचं नवं ओझं येऊन बसेल. 

बदलत्या जगाची नोंद पाकिस्तानी मालिकांनी घेतली नाही तर आज लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या या मालिका तुम ता ना ना ना करत जिन्यावरून गडगडत सुमार हिंदी-मराठी मालिकांच्या रांगेत येऊन बसतील ही शक्यता मात्र नाकारता येत नाही.
उत्तम कलाकृतीचा उद्देश असतो माणसाची आयुष्याविषयीची समजूत वाढवणं. भारतीय मालिका जगताला हे उद्दिष्ट गाठता गाठता क्रिकेटप्रमाणे त्यांना याही क्षेत्रात नमवायचं असेल तर त्यांना कमी न लेखता आपली रेष मोठी आणि सर्जनशीलतेचं आकाश अधिक उत्तुंग करावं लागेल. गुणवत्तेशी स्पर्धा फक्त गुणवत्तेनेच करता येते. 
----------- 
#pakdrama 
 (पूर्वप्रकाशित -दौत लेखणी त्रैमासिक) 

Thursday, August 1, 2024

पंचायत - निखळ देशी करमणूक

तांत्रिक सफाई असलेले सुस्पष्ट पण बटबटीत चित्रण, खणखणीत अभिनय पण वास्तव दाखविण्याच्या नावाखाली शिव्या पेरलेले रासवट संवाद, उत्तम कथानक पण त्यात कामुक दृश्यांचा भडिमार. हा आहे हल्लीच्या ओटीटीवरील वेबमालिकांचा ल.सा.वि. 
"पोहण्याच्या तलावावर बिकीनी नाही घालायची तर काय साडी नेसायची का?" असा अगदी तर्कसंगत प्रश्न विचारणार्‍या तथाकथित बोल्ड नायिका त्या प्रसंगात पोहण्याचा तलाव मुदलात आवश्यक होता का हे मात्र विचारत नाहीत. ’मागणी तसा पुरवठा’ म्हणत भारतीय प्रेक्षकांची अभिरूची अधिक सुमार करण्याला ही सगळी मंडळी हातभार लावत आहेत. स्वघोषित पुरोगामी मंडळी ’वास्तव बिस्तव- कला बिला- अभिव्यक्ती-फलाणा’ वगैरे झेंडे घेऊन याची भलावण करत आहेत.

या सार्‍यांना सणसणीत चपराक लगावली आहे ती ’पंचायत’ या अमेझॉन प्राईमवरील वेबमालिकेने. वरच्या यादीतील कोणतेही मसाले नसूनही अतिशय रूचकर लागणार्‍या या पाककृतीला ओटीटीवरील सर्व स्तरातल्या प्रेक्षकांनी एकमुखाने पसंतीची पावती दिली आहे. काय वेगळेपण आहे या मालिकेचं! यात कोणत्याही चुकीच्या गोष्टीचं उदात्तीकरण नाही, चुकीला चूक म्हणण्याची हिंमत आहे. कोणताही चकचकाट, अश्लीलतेचा आधार न घेताही नर्मविनोदी संवाद, बांधीव पटकथा, समयोचित पार्श्वसंगीत, पारदर्शक पात्रं आणि मातीचा गंध असलेला अस्सल उत्तर भारतीय  ग्रामीण जीवनाचा पट म्हणजे ही मालिका. सतत काहीतरी हॅपनींग पाहण्याची, ट्वीस्ट आणि धक्के बसायला हवेत अशी अपेक्षा असणार्‍या बेचैन वृत्तीच्या प्रेक्षकांनी मात्र या मालिकेच्या वाटेला जाऊ नये. पडद्यावरचा सुकून अनुभवायला तो आधी मनातही हवा तरच या मालिकेशी तार जुळते.

उपदेशाचा कोणताही आव न आणता प्रेक्षकाला मूक करण्याची, आत्मपरिक्षण करायला भाग पाडणारी अनोखी दिग्दर्शकीय शैली हे ’टीव्हीएफ’चं वैशिष्ट्य इथेही आहे. या मालिकेचे तीनही सीझन लोकप्रिय ठरले आहेत. कुटुंबासह बसून मजेत पाहू शकू असं काही ओटीटीवर दुर्मिळ होत असताना "पंचायत" किंवा "गुल्लक" सारख्या मालिका सुखद झुळूक होऊन येतात. 

’पंचायत’ ची कथा अभिषेक त्रिपाठी (जितेंद्रकुमार) नावाच्या शहरी तरूणाभोवती फिरत असली तरी तो नायक नाही. यातील इतर पात्रं कथेत तितक्याच ताकदीने उभी आहेत. 

अभिषेकला अभियंता झाल्यावर अपेक्षित पॅकेजची नोकरी मिळत नाही. चांगल्या कॉलेजमधून एम.बी.ए करून मनासारखी नोकरी मिळवायची हे त्याचं स्वप्न असतं. प्रवेशपरिक्षेचा अभ्यास करताना रिकामं बसण्यापेक्षा हातात आलेली ग्रामपंचायत सचिवाची जेमतेम वीस हजाराची नोकरी स्वीकारून अभिषेक ’फुलेरा’ या खेडेगावात येतो. नाईलाजाने पदरी पडलेला तो गाव, तिथला हातपंप, पाण्याची टाकी, तिथले लोकांचे नमुने हळूहळू त्याला आपले वाटू लागतात.

गावची प्रधान मंजुदेवी (नीना गुप्ता), प्रत्यक्षात तिच्या ऐवजी कारभार सांभाळणारा तिचा प्रधानजी नवरा (रघुबीर यादव), उपप्रधान प्रल्हाद (फैसल मलिक), सहसचिव (चंदन रॉय) व  विधायक (पंकज झा) सारख्या दमदार कलाकारांनी आपापल्या भूमिकेत बहार उडवून दिली आहे. स्टँड-अप कॉमेडीने हल्ली बोचरा विनोद लोकप्रिय केला आहे पण यातला अंगभूत विनोद गावकर्‍यांसारखाच निर्मळ आहे. पिझ्झा टॉपींगसारखा पेरलेला नाही. काही समीक्षक त्याला "डंब अँड डंबर" ची सौम्य किंवा वास्तववादी आवृत्ती म्हणतात. "पंचायत" हा लाइफ कॉमेडीचा एक भाग आहे, उत्तर प्रदेशात (खरं तर मध्यप्रदेश, बिहार, किंवा उत्तर भारतात कुठेही आणि स्वभाववैशिष्ट्यांचा विचार केला तर अख्ख्या भारतात कुठेही) जशी माणसं खऱ्या आयुष्यात भेटली असती तशीच आपल्याला ‘पंचायत’ मालिकेतही भेटतात. काही सरळ आहेत तर काही बेरकी पण ती सच्ची आहेत. त्यांच्यात काहीही टोकाचे किंवा वाईट घडत नाही. नाही म्हणायला सीझन ३ च्या शेवटी काही डोकी फुटतात, परंतु ते देखील ’चला, आता तुफान हाणामारी दाखवू’ या अभिनिवेशाने नाही तर कथेचा सहज भाग म्हणून. 

अनेक हलकेफुलके पण गाभ्याशी गंभीर असलेले प्रसंग यात खुबीने दर्शवले आहेत. उदा: झपाटलेल्या झाडाची कथा पहिल्या सीझन मध्ये आहे. झपाटलेले झाड ही फक्त अंधश्रद्धा आहे हे सिद्ध करायला सचिव विकासला भर रात्री डबलसीट घेऊन जातो. सहसचिव विकास घाबरून बायकोला सांगून जातो, "खुसबू... जर आम्ही परतलो नाही तर दुसरं लग्न कर. आपला सहवास एवढाच लिहिलेला होता. वरच्या खोलीत बाबांच्या डब्यात त्यांनी दिलेली चांदीची काही नाणी ठेवली आहेत. त्यात तीन ते चार महिन्यांचा खर्च भागेल." घटना, नातेसंबंध, खटकेबाज संवाद आणि त्यातून पात्रनिर्मिती ही पंचायतची खास शैली. गावात एखाद्या मुलीचं लग्न ठरतं तेव्हा सारं गाव मिळून भावी जावयाचे नखरे कसं सहन करतं हा भागही मार्मिक. पंचायत कचेरीतून कॉम्प्युटर मॉनिटर चोरीला गेल्याची घटनाही धमाल आहे. शेवटी चोर तो मॉनीटर दाराशी आणून ठेवून देतात. तिथे एक चिठ्ठी ठेवलेली असते. त्यात लिहिलेलं असतं "आम्हाला वाटलं की तो टीव्ही आहे, कृपया माफ करा." मॉनीटरचा उपयोग करण्याचीही क्षमता नसलेलं किंवा उपयोग माहित नसलेलं चिमुकलं साधं गाव, हे आहे खेडोपाडी विस्तारलेल्या भारताचं वास्तव. ते कळायला शहरी भारतीयांना ’ओटीटी’चं माध्यम लागतं इतकंच. आपल्या मातीतल्या गमती विनासायास बघताना परदेशस्थ भारतीय प्रेक्षकही रंगून जातो आहे.

एका प्रसंगात सचिव(जी)अभिषेकचा मित्र प्रतीक, दोन्ही हातात शॉपिंग बॅग घेऊन चकाचक मॉलमध्ये एस्केलेटरवरून उतरताना अभिषेकला साध्या जीवनाचे महत्व सांगतो. बर्‍याच शहरी लोकांना ग्रामीण जीवनात डोकावून आपल्या ’रूट्स’ चा परिचय मुलाबाळांना करून देण्याची एक फॅशनेबल ओढ असते. एवढे उरकले की ते आपल्या अत्याधुनिक जगात परतायला मोकळे होतात. प्रतीक यांचा प्रतिनीधी. तो अभिषेकला न उपभोगता येणार्‍या शहरी जीवनशैलीच्या बदल्यात किती गुणवत्तापूर्ण अनुभव मिळतायत हे सांगून मित्राचं सांत्वन करतो. "तुला स्वदेसमधला मोहन भार्गव बनण्याची संधी मिळते आहे. मातीचा गंध सोडून माझ्यासारख्या कॉर्पोरेट उंदरांच्या शर्यतीत तुला का अडकायचे आहे?" वगैरे ऐकल्यावर अभिषेकचाही सल जरा कमी होतो. प्रधान की बेटी रिंकी (सान्विका) भेटते तेव्हा त्याला गावात राहणं जरा आवडू लागतं. रिंकीला अचानक कचेरीकडे येताना पाहून सचिवजींची तारांबळ उडण्याचा प्रसंग चुरचुरीत झाला आहे. तालुक्याच्या गावच्या मोहन भांडारचे समोसे खाणं ही त्यांच्या ’एंजॉयमेंट’ची एक भाबडी पद्धत आहे. रिंकी आणि सचिवजी यांच्यात फुलत गेलेलं अदमुरं रोमँटिक नातं साधं, प्रांजळ पण फार गोड आहे. त्यांचे अनेक रील्स आज व्हायरल आहेत.

ज्या कच्च्या रस्त्यावर धडपडत बाईक चालवत त्याने पहिल्या सीझनच्या पहिल्या पर्वात फुलेरा गाठलेलं असतं तो रस्ता सीझन ३ मध्ये मोठा प्रश्न होऊन पुढे आलेला दिसतो. खंतावलेल्या मनाने या रस्त्याने गावात दाखल झालेला सचिव मात्र त्याच्या ग्रामीण मित्रांच्या सहजीवनात त्याच्याही नकळत विरघळून जातो. सुरुवातीला पंचायत कचेरीत पाऊल न टाकणारी मंजुदेवी आता राजकारणात बिनधास्तपणे उतरते. हा बदलही सचिवामुळे होतो. भूषणने (दुर्गेश कुमार) आपल्या पत्नीला (सुनीता राजवार) मंजुदेवीसमोर प्रबळ विरोधी उमेदवार म्हणून आणलं आहे. 

नसलेले प्रश्न वाढवण्यात किरकिरा भूषण हुशार आहे. ’किजिए मिटिंग मिटिंग, खेलिए मिटींग मिटींग’, ’देख रहा है बिनोद’ यासारखे भूषणचे संवाद लोकप्रिय झाले आहेत. प्रधान पती तर फारच निरागस माणूस आहे. पद हातून निसटू नये या नादात कधी चुका करतो त्यामुळे कधी अस्वस्थ होतो तर कधी खमकेपणे योग्य बाजूने उभा असतो. शहरी सुविधांऐवजी अभावात जगत तडजोड करणार्‍या सचिवाबद्दल याच्या मनात कळवळा आहे आणि त्यातून फुललेली मैत्री तर धमाल आहे. एका ’हाय’ या व्हॉट्सअ‍ॅप मेसेज वर ही मंडळी बियर प्यायला एकत्र जमतात, सुखदु:ख वाटून घेतात, हसतात, रागावतात, एकमेकांची टर उडवतात आणि पाठीशीही उभी राहतात. यात बियर हे केवळ माध्यम आहे, गंतव्य नाही म्हणूनच कदाचित इथे ’दारू पिणे स्वास्थ्यासाठी अहितकारक’ असल्याचा संदेश किंवा मालिकेला दिलेलं १६ + वयाचं प्रमाणपत्र अनावश्यक वाटतं.

प्रधानमंत्री गरीब आवास किंवा हर घर शौचालय योजनेपासून विधायकाच्या बेमुर्वतखोरपणापर्यंत ग्रामीण जीवनाचे अनेक पैलू इथे आरशात प्रतिबिंब दिसावं तसे उमटतात. विधायकाचं गावाकडे ’गर्दी म्हणजे ताकद’ या भूमिकेतून पाहणं, कोणतीही पातळी गाठणं,सगळं कसं आपल्या भारतीयांच्या अगदी परिचयाचं. पार्श्वभूमीवर अत्यंत लोकप्रिय झालेलं ’राजाजी ’ गाणं तर भारतीय राजकारणाला चांगले चिमटे काढत रंगत जातं. ४ थ्या सीझनची वाट पाहायला भाग पाडतं. 

अनेक जीवनविषयक सूत्र या बहुअस्तरी मालिकेच्या आत दडलेली आहेत. ती शोधावी लागत नाहीत, गवसत जातात, खिन्न करतात, गालात हसवतात, स्वत:लाच प्रश्न विचारायला लावतात. ३ रा सीझन कथानकात जरा गंडला आहे, काही ठिकाणी जास्तच संथ झाला आहे पण त्याची भरपाई संवाद, अभिनयातून पुरेपूर झाली आहे. 

भारतीय ओटीटी प्रेक्षकाला पुन्हा एकदा निखळ आणि अस्सल देशी मनोरंजनाकडे वळवणार्‍या ’टीव्हीएफ’चे आणि दिग्दर्शक दीपककुमार मिश्रांचे आभारच मानायला हवेत. पंचायत गाजू लागल्यावर दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले होते," दरअसल मुझे सबकुछ बीस चाहिए, कही भी उन्नीस नही चलता " 

 #पंचायत - निखळ देशी करमणूक Published in ओटीटी कट्टा (#daut_lekhani)  


Sunday, March 31, 2024

प्रोजेक्शन रुम आणि सिनेमा

 ज्येष्ठ मंडळींना जिना चढायचा त्रास नको म्हणून बर्याच दिवसांनी जवळच्या जुन्या सिनेमाहॉलला गेलो होतो. आधीचा शो संपायला जरा वेळ होता. सोबत आलेले वझेकाका म्हणाले ’आपण प्रोजेक्शन रुम पाहायची का!'

एके काळी भुसावळकर असल्याने आणि सिनेमाच्या रीळांच्या पेट्या गावोगावी जात तेव्हा #भुसावळ हे प्रमुख वितरण केंद्र असल्याने लागेल तो प्रत्येक #सिनेमा पाहायचा जणू दंडक होता.
ब दर्जा सोडला तर मासेस, क्लासेस, समांतर, मसाला असा कोणताही भेदभाव न करता आम्ही सगळे सिनेमे सारख्याच उत्साहाने आणि मनोभावे पाहत असू. सर्व वडिल मंडळींनी रेल्वेत नोकरी करणे (व मुलांनी सिनेमे पाहाणे) हा गावचा शिरस्ता होता.
तेव्हापासून या प्रोजेक्शन रूम बद्दल आणि तिथून येणार्या झोतातून पडद्यावर जादुई जग निर्माण करणार्या तंत्राबद्द्ल कुतूहल होते.

तिथल्या दादांनी परवानगी तर दिलीच , फोटोही काढू दिले. रीळ/रील लावायची मशीन बाजूला अँटिक पीस सारखी मुकाट्याने उभी होती. मशीनचे सगळे भाग, त्यावर रील कशी चढवली जाई, आवाज कसा नियंत्रित केला जाई याचीही त्यांनी माहिती दिली. चाळीस वर्षांपासून ते प्रोजेक्शन रुम सांभाळतअसल्याने त्यांच्याकडे सगळी उत्तरे तयार होती.


Old Projector
Latest Projector
सध्या वापरात असलेले आधुनिक वेब app, त्याची लायसन्स पद्धत, त्याचे बॅटरी बॅकअप याबद्दलही त्यांनी तितकीच सविस्तर माहिती दिली. (Photos attached) या तंत्रामुळे रील तुटणे, पडद्यावर चांदण्या चमकणे, मध्येच म्यूट होणे (मग आवाssज म्हणून प्रेक्षकांनी ओरडणे), रीलचा नंबर चुकणे (त्यामुळे भलताच सीन सुरु होणे) वगैरे गमतीला आपण मुकलो.
रीलचे जुने प्रोजेक्टर बघताना भुसावळच्या म्युनिसिपल पार्कची आठवण आली. तिथल्या प्रत्येक गल्लीत एकेका सिनेमा कंपनीचे ऑफीस असे. प्रिमियरच्या आधी दोन्ही बाजूंनी सिनेमाचे पोस्टर चिकटवलेल्या त्रिकोणी ढकलगाडीची बँडवाजा व गॅसबत्तीसह वरात निघे. पुढे एक जण हँडबिल फेकत चालत असे. पोस्टरवरचे नट नट्यांचे चेहरे गुबगुबीत असत आणि ते एकाच गुलाबी रंगात रंगवलेले असत. शिवाय दररोज सिनेमाच्या जाहिरातीची रेकॉर्ड वाजवत सायकलरिक्षा फिरत असे. त्यात आधी सिनेमातले काही डायलॉग असत. मग सिनेमातल्या एखाद्या गाण्याचा तुकडा. शेवटी स्थानिक, गरिबांच्या अमीन सयानीच्या आवाजात ’तो बहना भाईयो देखना ना भूलिए, अपने पूss रे परिवार के साथ, रोजाना चाssर खेलो में ,भुसावल के अलिशाssss न शिरि मामाजी टाकीज के इर्रुपेरी परदेपर.... पुढे सिनेमाचे नाव इको इफेक्ट देऊन तीन वेळा’.
हे ऐकताच सिनेमा पाहायचा दिवस , शो आणि कंपनी ठरवणे, परवानगी मिळावी म्हणून घरात विशेष चांगले वागणे, ठरल्या दिवशी गर्दीत घुसून तिकिटे काढणे आणि आधीचा शो संपताच मुंबईच्या लोकलमध्ये ज्या वेगाने शिरावे लागते तशी आत मुसंडी मारून धावत पंख्याखालची जागा पकडणे यात आम्ही तरबेज असू.
हा आहे रामू, याला आहेत नऊ मुलं.. मग रामूचे आयुष्य कसे दु:खी , त्यानंतर श्यामू येई त्याला दोनच मुले असल्याने तो कसा सुखी.. ही जाहिरात येई, मग पडद्यावर थरथरणारी तुटत जुळत कशीबशी दिसणारी इंदिरा गांधी किंवा बापूंची छोटी लपलपती डॉक्य़ुमेंटरी (ती मध्येच फास्ट फॉरवर्ड होई त्यामुळे बापूंची दांडीयात्रा चार्ली चॅप्लिनच्या वेगाने सुरू होई), एक तितली अनेक्क तितलियाँ वगैरे. विको, निरमा आणि लिरिलच्या जाहिरातीने सांगता आणि मग सेन्सॉर बोर्डाचे सर्टिफिकेट एकदाचे दिसले की सगळ्या मेहनतीचे चीज होई.
नंतर अद्याप तो सिनेमा न बघितलेल्या मैत्रिणीला त्याची स्टोरी सांगितल्याशिवाय हे प्रकरण सुफळ संपूर्ण होत नसे. या सगळ्या planning to narration स्किलचा पुढे फार उपयोग झाला 🙂
तूर्त प्रोजेक्टर दादांना धन्यवाद. त्या गूढ खोलीबद्दलचे कुतूहल शमविल्याबद्दल आणि नॉस्टेल्जिक केल्याबद्दल. तुमच्या काय आहेत पूर्वीच्या सिनेमाविषयीच्या आठवणी !

Saturday, October 28, 2023

’ओटीटी’ ची दुसरी बाजू

 ’कभी कभी लगता है साला अपुनीच भगवान है’ ,’ रिस्क है तो इश्क है’, ’जेब मे मनी हो तो कुंडली मे शनी होनेसे कोई फर्क नही पडता’", काही गाजलेल्या वेब सिरिज मधले हे प्रसिद्ध डायलॉग. ’कितने आदमी थे’, मोगॅम्बो खुश हुआ’ वगैरे हिंदी सिनेमातले डायलॉग पोरकट वाटावे इतके रियलॅस्टिक चित्रण ही वेब सीरीजची जमेची बाजू. त्यातले वैविध्यपूर्ण कंटेंट कल्पनेपलीकडचं जग अशा काही ताकदीने प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर उलगडत असतात की त्याने प्रेक्षक अक्षरश: भारून जातात. माध्यमांचा प्रभाव नेहमीच तरूण वर्गावर सर्वाधिक पडतो पण ओटीटी (ओव्हर द टॉप) प्लॅटफॉर्मची अफाट पोच आणि प्रभाव आजच्या तरुण प्रेक्षकांच्या वर्तनावर आणि मूल्यधारणांवर लक्षणीय परिणाम करतो आहे.  इथल्या अनियंत्रित आणि आकर्षक कंटेंटमुळे कोवळे तरुण इकडे सहज आकर्षिले जातात. 

अपवाद वगळता शिवराळ भाषा, हिंसा, कामुक दृश्यांचा प्रचंड वापर इथल्या बहुतेक सादरीकरणात प्रामुख्याने केलेला दिसतो. स्री व पुरूष यांच्यातील संबंध अनैसर्गिक वाटावे इतक्या मोठ्या प्रमाणावर इथे विविध  लैंगिक भावांच्या कल्लोळाला फूटेज दिलेले दिसते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आपल्या राजकीय आणि सैद्धांतिक भूमिकेला सोयीची कथानके रचून नवे नॅरेटीव्ह रचण्याचे प्रकारही इथे वाढू लागले आहेत. भूमिकेची गरज या वेष्टनाखाली ड्र्ग्ज, ड्रिंक्स, सिगारेट्सचे सेवन इथे जेवण करण्याइतके सहजपणे घडत असते. जगात काहीच नॉर्मल घडत नाही की काय असे वाटावे इतकी काही कथानके सातत्याने येथे बीभत्स रस आळवताना दिसतात. 

पॉर्न तर पूर्वीपासूनच नव्हे जगाच्या उत्पत्तीपासून उपलब्ध होते मग ओटीटीवर याच्या प्रसाराचा  आरोप का असे इथले निर्माते प्रत्युत्तरादाखल विचारतात. याचे उत्तर सोपे आहे. क दर्जाच्या स्वस्तातील पॉर्न कलाकारांपेक्षा अ दर्जाच्या कलाकारांद्वारे उपलब्ध होणारे उच्चभ्रू पॉर्न इथल्या प्रेक्षकांना भुरळ घालते आहे असे चित्र दिसते. आम्ही वास्तव दाखवतो वास्तव दाखवतो म्हणत ज्या गोष्टी सूचकतेने दाखवणे शक्य आहे त्या टीआरपीचे गणित डोक्यात ठेवून नको इतक्या उघडपणे दाखवल्या जात आहेत. तथाकथित आधुनिक लोक याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कौतुक करतात तेव्हा याच्या सामाजिक परिणामांबद्दल बोलायचे मात्र सोयीस्करपणे टाळतात. इंटरनेटने एका क्लिकवर आणून ठेवलेले पॉर्न चोरून पाहिले जात असल्याने त्याला काही टक्के निर्बंध लागू होत होते. ओटीटीने हे पॉर्न शर्करावगुंठित करून लोकांच्या दिवाणखान्यात आणून ठेवले आहे. त्याला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे. त्यातील पॉर्न कॉंटेंटला किती महत्व द्यायचे याची जाण मात्र प्रेक्षकांमध्ये वाढलेली नाही. हे पाहून चळलेले काही विकृत मानसिकतेचे लोक हाती लागेल त्या लहान मुलांना आणि स्त्रियांना लक्ष्य करू लागले आहेत. बलात्कार व बालकांच्या लैंगिक शोषणाच्या वाढत्या घटनांमागे पॉर्नचे ओटीटीने केलेले नॉर्मलायझेशन काही अंशी निश्चितपणे जबाबदार आहे. 

एकूण अशा सवंग कंटेंटला लाल गालिचा अंथरण्याच्या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या बाजारशरण धोरणामुळे युवा वर्गात असंवेदनशीलता वाढते आहे.  वास्तवाविषयीची त्यांची  धारणा  विकृतीकडे झुकते आहे. यात शेवटी सामाजिक मूल्यांची झीज होते आहे. अनैतिकता समाजात काही प्रमाणात असतेच हे सत्य मान्य केले आणि समाज कधीच काळा किंवा पांढरा नसून करडा असतो हे स्वीकारले तरीही अनैतिकतेचे  उदात्तीकरण करणारे कंटेंट पाहणारे ,त्याच विचारसरणीसह मोठे होणारे तरुण उद्याचे नागरिक म्हणून देशासाठी धोक्याचे ठरले तर याला जबाबदार कोण!  यशस्वी, सशक्त आणि चांगल्या समाजाचे स्वप्न यामुळे धुळीस मिळण्याची शक्यता आहे. वेळीच याला लगाम घातला नाही तर संभाव्य परिणामांसाठी आपल्याला तयार राहावे लागेल. 

 या माध्यमाने प्रेक्षकांच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे केवळ उल्लंघनच केलेले  नाही तर मिळवलेल्या माहितीचा गैरवापर होण्याची भीती इथे आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म मोठ्या प्रमाणात वापरकर्त्यांचा डेटा गोळा करतात. त्याच्या कंटेंटविषयक सवयी, प्राधान्यक्रम आणि त्याची वैयक्तिक माहिती यात समाविष्ट असते.  जरी हा डेटा वापरकर्त्याला आवडीनुसार कंटेंट उपलब्ध करून देण्याचा नावाखाली गोळा केला जात असला तरी यातून वापरकर्त्याच्या डेटा सुरक्षा आणि संरक्षणाबाबत प्रश्न निर्माण होतात.

ओटीटीला प्रेक्षक म्हणून भौगोलिक मर्यादा नाहीत. त्याची पोच जागतिक पातळीपर्यंत असल्याने नकळत स्थानिक घटकांना इथे दुय्यम स्थान मिळते.  या प्लॅटफॉर्मवर आंतरराष्ट्रीय उत्पादनांचे वर्चस्व वाढत असल्याने, स्थानिक आणि प्रादेशिक उत्पादनांना आव्हान निर्माण झाले आहे. 

बिंज वॉचींग म्हणजेच सलग एखाद्या मालिकेचे सगळे भाग पाह्त सुटणे. रात्र रात्र जागून केलेले बिंज वॉचींग हे एक नवे व्यसन ठरले आहे. या व्यसनामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात. जास्त वेळ स्क्रीन पाहत राहिल्याने व बैठया जीवनशैलीमुळे तरूण धड झोप घेत नाहीत. त्यांचा सामाजिक संवाद कमी झाल्याने एकटेपणा आणि एकाकीपणाची भावना त्यांच्यात वाढते आहे.  माणूस हा सामाजिक प्राणी आहे. एकटेपणाचा त्याच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. मानसिक आरोग्याशी संबंधित आजार आणि आत्महत्यांच्या घटनांमध्ये अलीकडच्या काळात वाढ झाली आहे.

या प्लॅटफॉर्मचे सभासदत्व घेण्यासाठी काही वार्षिक शुल्क द्यावे लागते. ते टाळण्यासाठी इथले कंटेंट चोरून प्रसारित करण्याचे प्रमाण वाढले आहे. नकळतपणे कॉपीराइट उल्लंघन आणि पायरसीमध्ये वाढ झाली आहे.  याचा तोटा केवळ कंटेंट तयार करणारे, निर्माते आणि वितरक यांनाच होतो असे नाही. बौद्धिक संपदा अधिकाराविषयीचे नवे प्रश्न या चोरीतून उभे राहत आहेत. 

ओटीटी प्लॅटफॉर्मने मनोरंजन उद्योगात क्रांती घडवून आणली आहे आणि प्रेक्षकांना अभूतपूर्व सोयी आणि निवडीचा हक्क दिला आहे.  परंतु त्याची अतिरेकी पोच आणि तुलनेने शिथिल नियमन कायदयाला आव्हान देते आहे. यावर गांभीर्याने विचार आणि संवाद आवश्यक आहे. ओटीटीने स्वत:चा विकास साधताना  नैतिक आणि सामाजिक मूल्यांचा बळी देता कामा नये एवढी अपेक्षा पूर्ण होत नसल्याने सुजाण नागरिकांनी व देशाच्या माहिती व प्रसारण खात्याने या मुद्द्याकडे गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे.  

Monday, November 21, 2022

ज्यूस

 

’ज्यूस’ हा २०१७ मध्ये यूट्यूबवर प्रदर्शित झालेला फिल्मफेअर विजेता लघुपट तुम्ही पाहिला आहे का! 

एका मध्यमवर्गीय स्त्रीची तेरा मिनीटात सांगितलेली ही अंतर्मुख करणारी कथा आहे. एका संध्याकाळी एका घरी मित्रपरिवार सहकुटुंब जमलेला आहे. सगळे पुरुष मित्र बाहेरच्या खोलीत कुलर लावून ड्रिंक्स घेत, स्टार्टर्स खात, गप्पा मारत ऐसपैस बसले आहेत. मुलं बेडरुममध्ये खेळत आहेत.आहेत. मित्रांच्या बायका मंजू (शेफाली छाया) म्हणजेच यजमानीण बाईला हातभार लावायला म्हणून तिच्या काहीशा कोंदट स्वयंपाकघरात जमल्या आहेत. कामाच्या धांदलीमुळे, गॅसवर सतत पदार्थ शिजत असल्यामुळे आणि ४,५ बायकांची गर्दी झाल्याने आत प्रचंड उकडते आहे.

काम सुसह्य व्हावे म्हणून मंजूने माळ्यावरून काढलेला टेबलफॅन जेमतेम सुरु होऊन बंद पडला आहे. बायका हवालदिल झाल्या आहेत. मंजू बाहेर येऊन "पंखा सुरू होत नाहीये, जरा बघता का" असं नवर्‍याला हलक्या आवाजात सांगते. तो ’हो’ म्हणून पुन्हा गप्पांमध्ये दंग होतो. यांच्या गप्पांचे विषय म्हणजे ऑफीसमधल्या सह्कारी महिलेबद्द्ल गॉसीप, पाचकळ विनोद, आंतरराष्ट्रीय राजकारणाची आपल्याला खूप समज असल्याचे भासवणार्‍या चर्चा तर आत बायकांचे गप्पांचे विषय म्हणजे घर, स्वयंपाक, मूल झाल्यावर नोकरी सोडणे योग्य आहे की नाही वगैरे. विषयांमधला फरक नोंद घेण्यासारखा आहे.

इकडे आतला उकाडा वाढत चालला आहे. स्वैपाक होत आल्यावर यातली एक बाई बेडरूममध्ये डोकावून आपल्या लहान मुलीला "आता खेळ पुरे, आधी तुझ्या भावांना वाढ" असं जरबेच्या आवाजात सांगते. हे ऐकून मंजूच्या डोक्यात तिडिक गेलेली आहे. बाहेरून नवर्‍याच्या "मंजू, आता जेवायचं बघ जरा" अशा हाका सुरु आहेत. आतल्या बायकांपैकी एक तरुण बाई गर्भवती आहे. तिने नोकरी सोडली नाही तर तिच्या बाळाकडे कोण बघणार हा विषय सुरु आहे. आपण नाही का मुलांसाठी नोकरी सोडली, असं एक बाई म्हणताच मंजू उद्वेगाने विचारते, "जे आपण केलं ते हिनेही केलंच पाहिजे का?" मंजू पुढे उपहासाने म्हणते " अर्थात डायपर तर आईनेच बदलला पाहिजे, वडील हातातला रिमोट सोडून ते काम कसे करतील!" 


हा तिचा तिसरा आणि शेवटचा संवाद आहे. बाकी सगळं तिची नजर बोलते. आधी थंड, मग असहाय्य, मग क्रुद्ध. आता तिला हे सगळं असह्य झालेलं आहे. ही एक घटना नव्हे, पुरुषसत्ताक पद्धतीत घुसमटलेलं अवघं जगणंच. मंजू खाटकन गॅस बंद करते. फ्रीजमधला ज्यूसचा जार घेऊन बाहेर येते. कुलरच्या झोतात एका खुर्चीवर पुरुषांमध्ये येऊन बसते. तिच्या अचानक येण्याने ते अस्वस्थ झाले आहेत. नवरा आश्चर्याने व काहीशा रागाने तिच्याकडे बघतो आहे. ग्लासमध्ये ज्यूस ओतून भरल्या डोळ्यांनी एक तीव्र आणि अर्थपूर्ण कटाक्ष ती नवर्‍याकडे टाकते आणि डोळे मिटून जगाची पर्वा न करता शांतपणे थंडगार ज्यूसचा एक एक घोट घेऊ लागते. इथे लघुपट संपतो. मंजू भांडत नाही, ओरडत नाही, कुणाला काहीही ऐकवत नाही. तिला काय म्हणायचं आहे हे तिच्या नजरेवरुन नवर्‍याला कळतंच पण आपल्यालाही त्या मूक स्फोटामागची धग, तडफड आतपर्यंत जाणवते. 

हा लघुपट फक्त स्क्रीनवर नाही तर थोड्या फार फरकाने बहुसंख्य मध्यमवर्गीय घरात घडत असतो. आर्थिक स्थितीनुसार जागा, सोयी कमी जास्त असतात पण आत बायका राबतायत आणि पुरुष एकत्रीकरणाचा आनंद घेत आहेत हे चित्र सर्वत्र दिसते. अर्थात याला अपवाद असू शकतात आणि यावर आक्षेपही. 

शहरी सुशिक्षित घरातल्या  लहान कुटुंबात हल्ली पुरुष मदत करताना दिसतात, काही पुरुष भाजी, किराणा, खाद्यपदार्थ किंवा आवश्यक वस्तू आणून देणे किंवा ऑनलाईन मागवणे या स्वरुपाची मदत करताना दिसतात. क्वचित एखादा विशेष पदार्थ करतात. बायकोला यापेक्षा जास्त मदत केली तर लोक नावं ठेवतीला अशी भीती काही पुरुषांना वाटते. न पेक्षा या सकारात्मक बदलाचं निश्चितच स्वागत करायला हवं परंतु माझा नवरा, भाऊ किंवा वडील मदत करतात म्हणजे आता सगळंच बदललं आहे असा निष्कर्ष काढणं बालीशपणाचं ठरेल. 

मुळात ’मदत’ या शब्दातच गोम आहे. आपण एखाद्याला मदत करतो म्हणजे ते काम ज्याचे आहे त्याचा भार हलका करतो. इथे आपली भूमिका संपते. परंतु त्या कामाची जबाबदारी त्या व्यक्तीवरच असते. जोवर जबाबदारीचा निम्मा वाटा उचलला जात नाही तोवर त्याला न्याय्य श्रमविभागणी म्हणता येणार नाही. 

मुख्य आक्षेप हा असतो की पुरुषांनाही बाहेर राबावंच लागतं न! त्यांना पण त्यांचं काम करताना कंटाळा, थकवा येत नसेल का! नक्कीच, परंतु ते काम कधीतरी संपवून ’ज्यूस’ मध्ये दाखवलंय तसं स्वत:च्या अवकाशात, आवडीनुसार वेळ घालवण्याची संधी त्यांना परंपरेने उपलब्ध करुन दिली आहे. निम्न व मध्यमवर्गीय स्त्रियांना मात्र अव्याहत चालणार्‍या कामातून उसंत मिळत नाही. त्यांच्या कामाला सुट्टी अशी नाहीच. सगळी कामे इतरांवर ढकलून स्वत: काहीही न करणार्‍या आयतोबा स्त्रियाही असतात. पण त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. मध्यमवर्गात मुलींचं शिक्षण घेण्याचं प्रमाण वाढल्याने त्यांना त्याचा उपयोग कमावण्यासाठी, स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी करावासा वाटतो. त्यासाठी सासरचे ’परवानगी’ तर देतात पण तळाशी बारीक अक्षरात ’अटी लागू’ लिहिलेलं असतं. "तू ’घर सांभाळून’ हवं ते कर, तुला सगळं स्वातंत्र्य ’दिलं’ आहे" असं अजब औंदार्य त्यात असतं. या दडपणामुळे सवड काढून त्या कुठे गेल्याच तर राहिलेली कामं त्यांच्या डोळयासमोर नाचू लागतात. थोडक्यात हे तुझंच काम म्हणून लादलं जातं, ते करण्यावाचून पर्याय नसतो, त्यात एकसुरीपणा येतो तेव्हा घर व नोकरी/व्यवसाय अशी दुहेरी कसरत करणार्‍या बायकांबरोबर गृहिणींनाही त्याचा प्रचंड वैताग येऊ शकतो. 

याउलट घरकाम, स्वैपाक हे बाईचंच काम असल्याचं पुरुषांबरोबरच कित्येक बायकांच्याही मनात इतकं खोलवर रुजलेलं आहे की त्यांनी ’राबणं’ हे आपलं प्राक्तन म्हणून स्वीकारलेलं असतं. खेड्यात नवर्‍याच्या बरोबरीने शेतात काम करून दमून आलेली स्त्री घरी परतल्यावर लगबगीने भाकरी थापायला घेते. ऑफीसमधून येताना भाजी ,वस्तू घेत थकून आलेली मध्यमवर्गीय स्त्री  कुकर लावायला घेते एवढाच काय तो फरक. तिच्या दिमतीला मिक्सर, मायक्रोवेव्ह सारख्या सुविधा आल्याने ’तिला असतंच काय काम! ’ असा अनेकांचा ग्रह असतो. गृहिणी असेल तर मग तिच्याकडे काय, वेळच वेळ असतो असा सार्वत्रिक समज असतो. प्रत्यक्ष कामाच्या श्रमापेक्षाही अशा पद्धतीने गृहित धरण्याचा तिला अधिक त्रास होतो. कधीतरी तिचा ’मंजू’चा झाला तसा उद्रेक होतो. त्याचे दूरगामी परिणाम मुलांवर, घरावर, नातेसंबंधांवर आणि अखेर समाजावर होताना दिसू लागले आहेत. 

नुकतेच गौरी-गणपती पार पडले. एक मध्यमवयीन मैत्रिण म्हणाली ,"माझ्याच्याने आता ही दगदग सहन होत नाही पण घरी इतक्या वर्षांची प्रथा आहे ती मोडणं मनाला बरं वाटत नाही. इतर नातलग बायका ’मदत’  करतात, तरीही सगळी तयारी करणं, इतक्या जणांची सोय करणं, नैवेद्यासह सगळं यथासांग पार पांडणं याने मी इतकी थकून जाते की मला वैद्यकीय उपचार घ्यायची वेळ येते. त्यामुळे सणवार जवळ आले की माझ्या पोटात खड्डाच पडतो." काही सुपरवुमन व्हायच्या आकांक्षेने पछाडलेल्या स्त्रियांचा अपवाद वगळला तर हे प्रातिनिधीक चित्र म्हणता येईल. सुजाण स्त्रिया यावर जमतील तसे उपाय शोधतात. अनावश्यक कर्मकांडाला परिस्थितीनुसार फाटा देतात, काही गोष्टी विकत आणण्यात कमीपणा मानत नाहीत. एखादी गोष्ट राहिली, पर्फेक्ट झाली नाही तरी त्रास करून घेत नाहीत, आपल्यावाचून घराचं अडत नाही याची खंत न करता मुलांना स्वावलंबी बनवतात. पण अशा स्त्रियांचे प्रमाण समाजात अद्याप कमी आहे. शिवाय त्यांना बेजबाबदार, आळशी वगैरे विशेषणं स्वीकारण्याची तयारी ठेवावी लागते. 

बहुतेक पुरुष मात्र यावर उपाय शोधण्याऐवजी ’तू दुर्गा तू अन्नपूर्णा, तू अमुक ..... तुला वंदन’ असे मढवलेले मेसेज सोशल मिडीयावर पाठवले की आपण स्त्रियांना आणि त्यांच्या कष्टांना पुरेसा आदर दर्शवला आहे असे मानून निश्चिंत होतात. (काही भाबड्या बायका पण खूष होतात आणि आणखी चार डबे घासायला काढतात.) 

हे कमी की काय म्हणून परवा एक मेसेजमध्ये वाचलं ’जाहिरातीत दागिने ल्यालेल्या, हसर्‍या, सुंदर स्त्रिया दाखवतात पण घरात दिवाळीची साफसफाई, फराळाची तयारी करताना घामेजलेली, केस विस्कटलेली स्त्री कुणीच दाखवत नाही’. इथपर्यंत तो मेसेज स्त्रियांच्या श्रमाकडे लक्ष वेधतोय असं वाटलं. पुढे लिहिलं होतं "नकोय त्यांना तुमची मदत, फक्त त्या जे करतात त्याची जाणीव ठेवा. एखादं ग्रिटींग, चॉकलेट त्यांच्यासाठी राखून ठेवा मग बघा दिवाळी कशी झक्कास जाते ते". 

धन्य आहे! तुम्ही कोण ठरवणारे की यांना मदत नकोय. नुसत्या शाब्दिक जाणीवेचं काय लोणचं घालणार! या ग्रिटींग, चॉकलेटच्या कौतुकाने बाईचा थकवा गायब होणार आहे का! आवडीनुसार काही वेगळं करायला तिला सवड मिळणार आहे का! निम्मी जबाबदारी घ्यायला हवी खरं तर तुम्ही. घरी केलेलेच लाडू आवडतात तर एकदा स्वत: अर्धा तास गॅसपाशी उभं राहून तूप सुटेस्तो पीठ भाजून पाहा. कामं ,फराळ करून दमलेल्या बायकांना त्या रात्रीचा स्वैपाक करून गरम, आयतं जेवायला वाढा. एका खोलीची पूर्ण सफाई करा. ती असेल खरी जाणीव. सुरुवात तर करा. (जे करतात त्या मूठभर मंडळींनी यातून स्वत:ला वगळावं) 

घरोघरच्या मंजूंना व्हॉट्सअ‍ॅपवरचे हारतुरे, कौतुकाचे भारे नको आहेत. प्रत्यक्ष साथ हवी आहे. कृतीतून सन्मान हवा आहे. घर सगळ्यांचं असेल तर कामंही सगळ्यांची असायला हवी इतका हा सोपा नियम आहे. आपली आवड, कौशल्य, वेळ, गरज याचा समन्वय साधून कामं वाटून घेतली तर घराघरातल्या मंजूलाही बाहेरच्या खोलीतल्या जगाकडे उघडणार्‍या खिडकीत बसून गप्पा मारता येतील. सर्वांबरोबर बसून 'ज्यूस' किंवा फराळाचा आस्वाद घेता येईल. अशी समाधानी मंजू जाहिरातीतल्या स्त्रीपेक्षा सुंदर दिसेल. 

published in Madhurima Divya Marathi November 2022

Friday, July 9, 2021

आनंदाचा शोध -The pursuit of Happyness

 

धावतपळत आल्याने घामेजलेला चेहरा, घरगुती कपडे, त्यावर कसंबसं अडकवलेलं जॅकेट, त्यावर रंगाचे शिंतोडे, अशा काहीशाe विचित्र अवतारातला एक तरुण. मुलाखतीसाठी त्याला कॅबीनमध्ये बोलावलं जातं. मनातली अस्वस्थता लपवत तो हसतमुखाने सर्वांना अभिवादन करतो. त्याच्याकडे पाहून कुणी काही विचारायच्या आत तो स्वत:च स्पष्ट सांगतो. "माझ्या या अवतारामागचं कारण तुम्हाला पटावं अशी कोणती कथा रचून सांगावी याचा मी बाहेर बसून विचार करत होतो पण त्यापेक्षा खरं तेच सांगतो. पार्किंगच्या चुकीचा दंड भरला नाही म्हणून मी रात्रभर तुरुंगात होतो. तिथून सुटका होताच धावत मी थेट इथे आलो आहे." अधिकारी क्षणभर अवाक् होतात. नंतर ते त्याची शैक्षणिक प्रगती, कामातली हुशारी, जिद्द याबद्दल प्रश्न विचारतात. अखेर प्रश्नांच्या फैरीला थांबवत तो म्हणतो, "एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर वेळ मारुन नेण्यापेक्षा ’मला माहित नाही’ असं मी मोकळेपणे सांगेन पण त्याचवेळी ते उत्तर कसं, कुठे सापडू शकेल याचा विचार माझ्या डोक्यात सुरु झालेला असतो आणि मग मी ते शोधल्याशिवाय राहत नाही." एव्हाना पॅनेल त्याच्या बोलण्याने प्रभावित झालेलं असतं. एक अधिकारी आता शेवटचा प्रश्न विचारतात," अंगावर धड formal शर्टही न घालता मुलाखतीला आलेल्या माणसाची मी नेमणूक केली तर त्यावर तू काय म्हणशील?" हा तरुण उत्तरतो, "त्याची पँट नक्कीच झकास असेल." इतक्या चमत्कारिक परिस्थितीतही त्याने दिलेल्या या खेळकर आणि मार्मिक उत्तरावर सगळे अधिकारी खळखळून हसतात. प्रचंड धडपडीनंतर अखेर इंटर्न म्हणून नामांकित ब्रोकर फर्ममध्ये त्याचा प्रवेश झालेला असतो. 

हे यश फार भव्यदिव्य आहे का! नसेलही, पण ते आपसूक ओंजळीत पडलेलं नाही. त्याच्या निरलस परिश्रमाचं ते सार्थक आहे त्यामुळे त्याचं मोल होऊ शकत नाही. प्रेक्षकांना हसू आणि आसू अशा संमिश्र मनोवस्थेत घेऊन जाणार्‍या The pursuit of Happyness या चित्रपटातले असे अनेक प्रसंग अभिनेता विल स्मिथने अक्षरश: जिवंत केले आहेत. प्रसिद्ध अमेरिकन व्यावसायिक ख्रिस गार्डनर यांच्या आयुष्यातल्या सुरुवातीच्या संघर्षकाळावर बेतलेला हा नितांतसुंदर चित्रपट. 

या कष्टाळू, हरहुन्नरी, प्रांजळ माणसाचं यशाच्या अथक पाठलागातही तग धरुन राहिलेलं पारदर्शी, उमदं व्यक्तिमत्व अक्षरश: काळजाला भिडतं. चित्रपटाच्या नावाचा संबंध, ’सुखाकांक्षेच्या पूर्तीचा अधिकार प्रत्येक माणसाला आहे, त्याने तो वापरावा’ हे सांगणार्‍या अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याशी आहे. ख्रिसच्या मुलाच्या पाळणाघराबाहेर चितारलेल्या म्युरलमधल्या स्पेलिंगमधली गडबड तशीच ठेवून चित्रपटाच्या नावात Happiness (स्थिती) ऐवजी Happyness चा (वृत्ती या अर्थाने) जाणीवपूर्वक वापर करण्यात आला आहे.

सेल्समन म्हणून काम करताना सातत्याने आलेलं अपयश, परिस्थितीशी झगडताना कंटाळून बायकोने हात सोडलेला, त्यातच चिमुकल्या मुलाची स्वेच्छेने घेतलेली जबाबदारी. पण हताश न होता मुलाच्या निष्पाप, बोलक्या डोळ्यात लुकलुकणार्‍या चांदण्यांच्या प्रकाशात जिद्दीने पुढे जात राहणार्‍या प्रयत्नवादी आणि स्वाभिमानी तरुणाची ही कहाणी. ख्रिस गार्डनर यांच्या पुढील यशस्वी व्यावसायिक जीवनात याहून अधिक रोमहर्षक घटना नक्कीच घडल्या असतील तरीही ह्याच भागाची निवड चित्रपटासाठी करावी असं गॅब्रिएल म्युकिनो ह्या इटालीयन दिग्दर्शकाला का वाटलं असावं! ’माझ्या आजच्या स्थानावरुन माझी योग्यता ठरवू नका, मी इथवर कसा आणि कुठून पोचलो यावरुन ठरवा’ हेच कदाचित दिग्दर्शकाला ख्रिसच्या वतीने सांगायचं असावं. कथानक पुढे सरकत जातं तसा हा चित्रपट आपल्या डोक्यात एका वैश्विक प्रश्नाचा भुंगा सोडून देतो, ’माणूस जगतो कशासाठी!’ आणि तो संपतो तेव्हा आपल्याला जे उत्तर सापडतं ते म्हणजे- ’आनंदाचा शोध घेण्यासाठी.’ 

अर्थात यातला ख्रिस स्वप्नाळूपणे सुखी होण्याकडे डोळे लावून बसत नाही तर आपल्या बछड्याला कवटाळून विजिगिषु मानसिकतेने आयुष्याशी दोन हात करत राहतो. पडतो. पुन्हा उभा राहतो. आपणही केव्हाच त्या बेघर बापलेकांच्या मायेच्या धाग्याने गुंफलेल्या भावविश्वाचा भाग होऊन गेलेलो असतो. मिळेल त्या निवार्‍यात त्यांनी वेचलेले आनंदाचे इवले, गोड क्षण बघताना आपल्या मनातल्या आनंदाच्या व्याख्या आपण नकळत तपासून पाहतो. 
आनंद म्हणजे स्थैर्य, समृद्धी, प्रतिष्ठा, साफल्य!! की आनंद म्हणजे स्वप्नपूर्ती, सन्मानपूर्वक जगणं, जीवलगांच्या सान्निध्यात असणं की आनंद म्हणजे काही वेगळंच!! सुजाण ख्रिस आणि त्याच्या अजाण मुलाच्या आनंदाच्या व्याख्या काही जगावेगळ्या नाहीत किंबहुना त्या अमेरिकन धाटणीच्याच आहेत पण ते दोघं मात्र जगावेगळे आहेत. कुणीही मनाने कोलमडून जाईल अशा स्थितीत देखील हा बाप ठाम उभा असतो. बापमाणूस हा शब्द आपण जितक्या अर्थच्छटांनी वापरतो त्या सगळ्य़ा लागू व्हाव्यात असा यातला बाप ’विल स्मिथ’ जगला आहे. 'The wound is the place where the light enters you' हे रुमीचं वाक्य त्याला बघताना आठवत राहतं. हट्ट करण्याच्या वयातलं त्याचं समजूतदार लेकरु आपले कोवळे हात बापाच्या मानेभोवती गुंफून तो त्याच्यासाठी या जगातला सगळ्यात खास माणूस असल्याची ग्वाही देत राहतं. विल स्मिथचा रिअल मुलगा जेडन हाच रील मध्ये आहे, कदाचित त्यामुळे त्यांच्यातला बंध अजूनच अस्सल वाटतो. त्या दोघांमधले हलकेफुलके पण डोळे पाणावणारे संवाद हे या चित्रपटाचं बलस्थान आहे. ममता हा शब्दच नव्हे, कृतीही ’स्त्री’शी जोडली गेलेली आहे. या चित्रपटात दिसणारी स्त्रीपात्रं मात्र कोरडी, व्यवहारी आहेत. ती तशी का आहेत याची कारणमीमांसा कथेत आली आहे. इथे ममतेचं दुसरं नाव बाप आहे.ख्रिस आहे. 

चित्रपट २००६ सालचा आहे. माणसाचा आनंदाचा शोध , आनंद मिळवण्याची धडपड संपलेली नाही. कधी संपणारही नाही त्यामुळे हा चित्रपट कालातीत आहे. आनंद कुठेतरी पोचण्यात नसतो, तो त्या शोधाच्या प्रवासातच दडलेला असतो हे सांगणारा हा चित्रपट म्हणजे एक समृद्ध अनुभव आहे. त्यात उमेदीच्या प्रत्येक क्षणाला पियानोचे सूर ऐकू येतात. आनंदाला स्वर असता तर तो असाच असता असं वाटणारे सूर. बापाचं बोट धरुन रोज नव्या उत्साहाने, आशेने त्याच्याबरोबर बागडत, चिवचिवत जाणारा निरागस लेक चित्रपटातल्या अनेक दृश्यांमध्ये दिसतो. ते खरं तर माणसाने धरून ठेवलेलं, मधूनच सुटून जाणारं, पुन्हा मुठीत येणारं आनंदाचं बोट असावं. 


- मोहिनी मोडक

-------------------------------------

प्रसिद्ध अमेरिकन व्यावसायिक ख्रिस गार्डनर यांच्या आयुष्यातल्या सुरुवातीच्या संघर्षकाळावर बेतलेला नितांतसुंदर चित्रपट म्हणजे The pursuit of Happyness. होय, Happiness नव्हे Happyness. प्रेक्षकांना हसू आणि आसू अशा संमिश्र मनोवस्थेत घेऊन जाणार्‍या या चित्रपटातल्या बापमाणसाची भूमिका अभिनेता ’विल स्मिथ’ अक्षरश: जगला आहे. कुणीही मनाने कोलमडून जाईल अशा स्थितीत देखील हा ठाम उभा असलेला बाप आणि आपले कोवळे हात त्याच्या मानेभोवती गुंफून तो त्याच्यासाठी जगातला सगळ्यात खास माणूस असल्याची ग्वाही देत राहणारं त्याचं समजूतदार लेकरु यांचं भावविश्व प्रत्यक्ष अनुभवायला हवं. या बापलेकांच्या सुखाच्या शोधाची कहाणी सांगणारा  ब्लॉग मी Swayam साठी गेस्ट ब्लॉगर म्हणून लिहिला आहे. 

https://swayamtalks.org/blog-the-pursuit-of-happyness/

Saturday, May 15, 2021

पुस्तक ते पडदा - प्रवास ’परिणीता’चा


लाईट- साउंड -कॅमेरा- अ‍ॅक्शन... आणि आपण एका दुसर्‍याच जगात प्रवेश केलेला असतो. अर्थात सिनेमा या कलाप्रकाराचे दर्शनी रुप ही चतु:सूत्री ठरवत असली तरी सिनेमाचा आत्मा असतो त्याचा आशय, त्याची पटकथा. ती जर सशक्त असेल तर त्यावर उभा राहणारा सिनेमा एखाद्या मनोर्‍यासारखा लक्षवेधी असतो, पिढ्यानपिढ्या चर्चेत राहतो नाहीतर भुईसपाट होतो. साहित्य शब्दांच्या माध्यमातून अविष्कृत होते तर सिनेमा बोलतो ते कॅमेर्‍याच्या माध्यमातून. गाजलेल्या साहित्यावर आधारित सिनेमे म्हणजे दोन लोकप्रिय कलाप्रकारांचे मीलन. यामुळे अभिजन वर्गापर्यंत मर्यादित राहिलेले साहित्य  जनसामान्यांपर्यंत पोचणे सोपे होते. वाचक आणि प्रेक्षक या दोघांचे रुपांतर ’रसिका’मध्ये होते. सिनेमा हा जणू धर्म असलेल्या आपल्या भारतीयांसाठी साहित्य आणि सिनेमा यांचे दृढ नाते परिचयाचे आहे ते अगदी 
दादासाहेब फाळके यांच्या 'राजा हरिश्चंद्र’ या पहिल्या भारतीय सिनेमापासून. 

भारतीय कलाविश्वात दोन वैचारिक परंपरा मानल्या जातात. रामायण परंपरेत मांगल्य, सौंदर्य, आदर्शवादाचे चित्रण केले जाते तर महाभारत परंपरेत मानवी विकार, लालसा, क्रौर्य, हिंसा, विकृती, विखार यांचे चित्रण परखडपणे केले जाते. ओटीटी वाहिन्यांचे प्राबल्य असलेल्या आजच्या काळात प्रेक्षकांचा कल पाहून बहुसंख्य नव्या सिनेमांनी किंवा वेबमालिकांनी आपला मोहरा महाभारत परंपरेकडे वळवल्याचे दिसून येते. याउलट रामायण परंपरेचे पाईक म्हणता येतील असे सिद्धहस्त लेखक शरच्चंद्र चटोपाध्याय यांच्या ’परिणीता’ या साहित्यकृतीवर आधारित याच नावाचा हिंदी सिनेमा ओटीटी वाहिन्यांच्या प्रेक्षकांसाठीही आकर्षणाचा विषय ठरतो आहे हे विशेष. प्रदीप सरकार दिग्दर्शित हा ’परिणीता’ सिनेमा २००५ सालचा. त्या आधी १९५३ मध्ये याच कादंबरीवर आधारित बिमल रॉय दिग्दर्शित हिंदी आणि १९६९ मध्ये अजॉय कर दिग्दर्शित बंगाली ’परिणीता’ येऊन गेला असला तरी कथेच्या आशयघनतेमुळे ही कलाकृती कालातीत ठरते. मूळ कादंबरी १९१४ मध्ये म्हणजे अगदी पहिल्या महायुद्धाच्या पूर्वी लिहिली गेली असली तरी त्यातली प्रेमाची अभिव्यक्ती आधुनिकच नव्हे तर काळाच्या कितीतरी पुढची आहे. कदाचित त्यामुळेच आज शतक उलटले तरी ’परिणीता’ची जादू कायम आहे. 


'परिणीता' ही एक प्रेमकथा आहे त्याचबरोबर सामाजिक चालीरिती आणि त्यांचे उतरंडीच्या रचनेनुसार होणारे परिणाम यात भरडलेल्या जीवांची ही कहाणी आहे. नायक, नायिका आणि प्रेमाचा त्रिकोण देखील यात आहे परंतु या कादंबरीतले प्रेम पठडीतले नाही. ते अपारंपारिक आहे, तो भावनांचा अनेकपदरी गोफ आहे. ललिता ही 13 वर्षाची सालस आणि गुणी मुलगी. आपल्या मात्यापित्यांना गमावल्यामुळे ती आपल्या मामाकडे राहत असते. तिचे मामा गुरुचरण हे बँकेत लिपीक असतात. त्यांना पाचवी मुलगी झाल्याची वार्ता कळते तेव्हा ते खचून जातात. मोठ्या मुलीच्या लग्नासाठी त्यांनी अगोदरच वडिलोपार्जित घर गहाण ठेवलेले असते. परिस्थितीची जाणीव असलेली ललिता मूकपणे मामा मामीला हातभार लावत असते. मामाच्या शेजारी राहणार्‍या धनाढ्य नवीनचंद्र राय यांचा मुलगा शेखर म्हणजे ललिताचा बालमित्र. ती आठ वर्षांची असल्यापासून या शेखरभैय्याकडे येत असते. तो तिला लिहावाचायला शिकवे, ललिताही त्याची लहानमोठी कामे आपुलकीने करी. शेखरला विचारल्याशिवाय ललिता काहीही करत नसे. अधूनमधून हातखर्चासाठी थेट त्याच्या कपाटातून पैसे घेण्याचीही तिला मुभा असे.  


जाणत्या वयात या लोभस मैत्रीचे रुपांतर नकळत अव्यक्त प्रीतीमध्ये होऊ लागते. वडील आपल्या लग्नाला संमती देणार नाहीत याची शेखरला खात्री असते. यामुळे तिचे इतरत्र लग्न होईल याची त्याला भीती वाटू लागते. एके दिवशी ललिता सहज गमतीने अभावितपणे त्याच्या गळ्यात माळ घालते. शेखर मात्र तिच्यावरील गाढ प्रेम उमजून तीच माळ तिच्या गळ्यात घालतो. अचानक घडलेल्या या परिणय सोहळ्याला साक्षी असते ते फक्त त्या दोघांमधले मुग्ध प्रेम आणि योगायोगाने याचवेळी शेजारच्या घरी सुरु असलेल्या लग्नसोहळ्यातले मंत्रोच्चार. दरम्यान पाहुणे म्हणून आलेले शेजारच्या चारुबालाचे मामा गिरिंद्र ललिताकडे आकर्षित होऊ लागतात. तिच्या कुटुंबियांना मदत म्हणून ते गुरुचरण यांना कर्जमुक्त करतात इतकेच नव्हे तर ते आजारी पडल्यावर हवापालटासाठी त्यांना स्वत:च्या घरी घेऊन जातात. दुर्दैवाने गुरुचरण तिथेच शेवटचा श्वास घेतात. शेखर-ललिताच्या नात्याबद्दल अनभिज्ञ असलेले गुरुचरण ललिताची जबाबदारी आणि हात गिरींद्रच्या हाती सोपवून इहलोकाचा निरोप घेतात. शेखरला पती म्हणून मनानेच नव्हे तर कृतीनेही वरणारी आणि त्यामुळे स्वत:ला परिणीता मानणारी ललिता स्वत:ऐवजी आपल्या धाकट्या मामेबहिणीशी गिरींद्रचा विवाह घडवून आणते. गिरिंद्रचे देखणे रुप, श्रीमंती आणि एक सुरक्षित भविष्य यातले काहीही ललिताच्या पतीनिष्ठेच्या आड येत नाही. तिच्या अंतर्मनातील या उत्कट भावनेचे कादंबरीतले स्थान कृष्णासाठी मोरपिसाचे असावे तसे अलौकिक आहे. ललिताच्या दृष्टीने आपल्या दोघातील बंधन अतूट आहे, जणू विवाह-संस्काराच्या दर्जाचे आहे हे शेखरला अंत:करणातून जाणवते. ललिता आणि गिरींद्रबाबत झालेला त्याचा गैरसमज दूर होतो आणि दुसर्‍याच मुलीशी होऊ घातलेल्या लग्नाची तयारी शेखर थांबवतो. ललितावर नेहमीच माया करणारी शेखरची आई भुवनेश्वरी ललिताचा सून म्हणून अत्यानंदाने स्वीकार करते. अनुरक्तीच्या पल्याड जाऊन सर्वस्व झोकून देणार्‍या प्रेमाची ही हृद्य कहाणी, ती ही शरदबाबूंच्या प्रतिभ लेखणीतून उतरलेली.

एखाद्या प्रसिद्ध साहित्यकृतीवर सिनेमा बेतला असेल तर तो यशस्वी होण्याची शक्यता वाढते. त्यातून प्रेक्षकाला खिळवून ठेवण्यासाठी कथेत जे जे हवे ते सारे या कथानकात आहे त्यामुळे ’परिणीता’ची निवड या सिनेमांच्या निर्मात्या-दिग्दर्शकांनी केली असावी. शरच्चंद्रांच्या १५-२० साहित्यकृतींवर हिंदी चित्रपट निघाले आहेत. ‘अपने-पराए’, ‘छोटी बहू’, ‘खुशबू’,‘स्वामी’ हे त्यातील काही मह्त्वाचे. त्यांच्या ‘देवदास’ची मोहिनी तर अजूनही उतरलेली नाही. सैगल, दिलीप कुमार, शाहरुख खानच्या कादंबरीशी बर्‍यापैकी प्रामाणिक असणार्‍या ’देवदास’पासून अभय देओलच्या देव-डी मधल्या आधुनिक देवदासपर्यंत याची अनेक रुपे सिनेसृष्टीत गाजली. शब्दातून निर्मिलेली कथा पडद्यावर यावी आणि प्रत्येक पिढीतील रसिक त्या साहित्यकृतीचा आस्वाद घेत राहावे हे भाग्य अशा काही मोजक्याच साहित्यिकांना लाभते. विश्वस्तरावर प्रख्यात असलेल्या बंगाली साहित्यिकांचे उदाहरण द्यायचे झाले तर रवींद्रनाथ टागोर (‘चोखेर बाली’, ‘काबुलीवाला’, ‘तीन कन्या’, ‘उपहार’,’चारुलता’ इ.), विभूतिभूषण बंदोपाध्याय, सत्यजित रे ही नावे अग्रक्रमाने घ्यायला हवी. सत्यजित रे हे स्वत: जागतिक कीर्तिचे दिग्दर्शक असल्याने आपल्या किंवा इतरांच्या साहित्याला पडद्यावर अचूक साकारत. त्यांचे प्रेमचंद यांच्या कथेवर आधारित ’शतरंज के खिलाडी’चे व्यावहारिक गणित मात्र जमून आले नाही. कथेचा किंवा कवितेचा जीव लहान असल्याने ती फुलवणे कठीण होत असावे. मराठीतल्या महानोरांच्या ’अजिंठा’लाही ते आव्हान पेलले नाही. एकंदर सिनेमा निर्मितीसाठी कादंबरीला प्राधान्य मिळण्यामागे हेच कारण असावे.  

निर्माते - दिग्दर्शकांसाठी दर्जाशी तडजोड न करता साहित्यावर आधारित सिनेमा तयार करणे हे कायम एक आव्हान राहिले आहे. माध्यमांतर करताना बदल करणे अपरिहार्य असते. साहित्य हे बहुतेक वेळा आत्मविष्कारातून मिळणार्‍या आनंदासाठी निर्माण केले जाते. सिनेमाच्या बाबतीत मात्र अर्थकारण विसरुन चालत नाही. या ताणाचा परिणाम सिनेमावर होतो. अनेकदा तो कथेशी प्रतारणा करत रसिकानुययी होतो तर कधी भरकटतो. उदा: भंसालींच्या ’देवदास’मधल्या भपकेबाज आणि अतिविशाल सेट्च्या आवाक्यासमोर मूळ कथेतील प्रेमाची भव्यता खुजी ठरली. अशा अनुभवांमुळे जातीचे साहित्यप्रेमी सिनेमाला दुय्यम लेखतात. चिंतन, तत्त्वज्ञानाशी संबंध नसलेला सवंग कलाप्रकार मानतात. सिनेमाकडे प्रेक्षकाऐवजी कायम ’टीका’काराच्या भूमिकेतून पाहतात. त्यांचे समाधान करण्याची जबाबदारी देखील दिग्दर्शकावर असते. परिणीताच्या बाबतीत दिग्दर्शकांनी दोन्हीचे उत्तम संतुलन साधले आहे.  

प्रदीप सरकार यांनी मूळ कादंबरीत केवळ करडी छटा असलेल्या नवीनचंद्र राय (शेखरचे वडील ) यांच्या पात्राला पूर्ण काळ्या रंगात रंगवले आहे. ललिताच्या मामांच्या वाड्याचा ताबा मिळवून त्यांना बेघर करुन त्या वाड्याचे तारांकित हॉटेलमध्ये रुपांतर करण्याचा त्यांचा मनसुबा ललिता ओळखते. गिरिंद्रने (इथे गिरिश) वेळीच केलेल्या आर्थिक मदतीमुळे तो धुळीला मिळतो. यामुळे संतापलेले नवीनचंद्र, शेखरच्या अनुपस्थितीत ललिताचा अपमान करुन तिला नोकरीवरून काढून टाकतात. दोन्ही घरांमध्ये रातोरात भिंत उभी करतात. तिने शेखरचा हवा तेव्हा वापर करुन घेतला आणि आता गिरिशला स्वत:ला विकले आहे असा ते शेखरचा समज करुन देतात. २००५ च्या काळात अपेक्षित असलेले धारदार नाट्य मूळ कादंबरीत नाही असे वाटल्याने त्यांनी हे बदल केले असावे. चोखंदळ प्रेक्षकांना ते कदाचित खटकतील परंतु सर्वसामान्य भावनाप्रधान भारतीय प्रेक्षकाला त्याच्या जातकुळीची वेदना, त्याचं शोषण पडद्यावर दिसल्याने तो सिनेमाशी घट्ट जोडला जातो आणि कादंबरीतून साकारलेली ’परिणीता’ सिनेमातूनही तितक्याच ताकदीने समोर येते. ललिताच्या मुख्य भूमिकेतील मीनाकुमारी (१९५३) आणि विद्या बालन (२००५) यांच्या सोज्ज्वळ सौंदर्य आणि परिणामकारक अभिनयाला यशाचे बरेचसे श्रेय जाते. मीनाकुमारी तर कसलेली कलावंत होती पण विद्द्याचा हा पहिलाच चित्रपट असल्याचे कुठेही जाणवत नाही. 

माध्यमांतर होताना कितीही काळजी घेतली तरी काही गोंधळ होतात. विद्या बालन, सैफ अलीखान, संजय दत्त अभिनीत ’परिणीता’ मधला एक प्रसंग. त्यात काळ दाखवला आहे १९६० चा. तपशीलातील बारकाव्यांमुळे वाफेच्या इंजिनांपासून व्हिंटेज कारपर्यंत यातली प्रत्येक गोष्ट नेमकी. प्रेक्षकाला त्या काळात घेऊन जाणारी. त्यातले एक स्त्रीपात्रं शिवणमशीनवर काम करताना दाखवले आहे. ते आधुनिक ’उषा’मशीन मात्र तोवर बाजारात आलेच नव्हते. अर्थात अशा चिमुकल्या गडबडीमुळे सिनेमाचा दर्जा कुठेही उणावत नाही पण माध्यमांतर करून एखाद्या साहित्यकृतीला पड्द्यावर दाखवण्याचे शिवधनुष्य़ पेलणे हे केवढे अवघड काम आहे याची कल्पना त्यावरून येते. ’परिणीता’च्या बाबतीत लेखक आणि सगळे दिग्दर्शक बंगाली असल्याने हे अधिक सहजपणे होऊ शकले असावे. साड्या नेसण्याच्या बंगाली पद्धतीपासून दुर्गापूजेपर्यंत बंगाली संस्कृतीचे असंख्य ताणेबाणे सिनेमाच्या दृक्श्राव्य अनुभवाला एक नवे परिमाण देतात.


समाजात काळानुसार घडणार्‍या सांस्कृतिक, नैतिक उलथापालथींचा विचारही सिनेमा सादर करताना करावा लागतो. कादंबरी प्रकाशित झाली त्या काळात म्हणजे ऐन इंग्रजी राजवटीत, १९१४ मध्ये भारतीय स्त्री-पुरुषाची मैत्री ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती. १९५३ च्या काळातील स्वतंत्र भारतात बदलाचे वारे वाहू लागले असले तरीही भारतीय आचारविचार कायम होते. त्यामुळे तेव्हाच्या पडद्यावरच्या ’परिणीता’मध्ये एकमेकांना केवळ हार घातल्याने, तो ही काहीशा गमतीच्या नादात, कुणी कुणाला थेट आयुष्याचा जोडीदार मानावे हे पचणारे होते. त्यातली नायिका खालमानेने बोलते, या मानलेल्या पतीला वाकून नमस्कार करते, नायक-नायिका एकमेकांना स्पर्शही करत नाहीत. ती अंतर्मनाने त्याची होते. २००५ च्या ’परिणीता’मध्ये एकमेकांना आधी थट्टेत मग गंभीरपणे माळा घातल्यानंतर भावनिक आवेगात ते शरीराने एकरुप होतात. मूळ कादंबरीत असे काही घडते तर कदाचित कादंबरीवर बहिष्कार टाकला गेला असता. २००५ च्या सादरीकरणात तिने अंतर्बाह्य त्याची होणे, असे न घडते तर त्यांच्या प्रेमाची उत्कटता आणि नात्याचे गांभीर्य कदाचित प्रेक्षकांपर्यंत पोचले नसते. दोन्ही सिनेमात सामाईक गोष्ट म्हणजे या प्रसंगी ऐकू येणारे शेजारघरच्या लग्नातले मंत्रोच्चार आणि त्यामुळे या गुप्त नात्याला नकळत लाभलेले धार्मिक अधिष्ठान. त्यामुळे सामाजिक चौकटी मान्य असणार्‍या सर्वसामान्य प्रेक्षकाच्या मनातून या नात्यावर आपसूक नैतिकतेची मोहोर उमटवली जाते. जागतिकीकरणानंतरच्या लिव्ह-इनच्या दिशेने पावले टाकणार्‍या पिढीला अशी अपघाताने घडलेली कृती म्हणजे जन्मभराचे लग्नबंधन ही गोष्ट स्वीकारार्ह वाटते किंवा पटू शकते ते केवळ एकाच कारणाने, कथेचा प्राण ज्याभोवती गुंफला आहे ते अलांच्छित, निरपेक्ष आणि नि:शंक प्रेम. पिढ्या बदलल्या, परिणयाच्या आणि सहजीवनाच्या संकल्पना बदलल्या तरी असे प्रेम जीवनाच्या गाभ्याशी होते, आहे आणि राहील. ते प्रेम जोवर तितक्याच आर्ततेने पडद्यावर साकारले जाते आहे तोवर ते प्रेक्षकांच्या मनात झिरपत, काळजात उतरत राहील आणि ’परिणीता’ एक सिनेमा म्हणूनही त्या त्या आवृत्तीत यशस्वी होत राहील.

कादंबरीचे यश हे लेखकाचे एकट्याचे असते. (हल्ली ते बरेचसे विपणन कौशल्यावरही अवलंबून असते हा भाग अलाहिदा) परंतु सिनेमाचे यश हे नेहमीच सांघिक कौशल्यावर अवलंबून असते. नाही म्हणायला विशाल भारद्वाजसारखे कसलेले दिग्दर्शक पटकथेपासून संगीतसंयोजनापर्यंत बहुतेक कामांचा भार एकट्याच्या शिरावर घेऊन थेट शेक्सपियरच्या कलाकृतींचे देखणे माध्यमांतर करून दाखवतात. (ऑथेल्लोवरुन ओंकारा, हॅम्लेटवरुन हैदर, मॅकबेथवरुन मकबूल इ.) त्यांनी तर ही कथानकं भारतीय मातीत अशी काही घोळवली आहेत की ते परकीय साहित्यावर बेतल्याचे प्रेक्षक पार विसरुन जातो. साहित्य असो वा सिनेमा दोन्हीचा ’रंजकपणे कथा सांगणे’ हाच मुख्य उद्देश असतो. सादरीकरणाच्या पद्धती आणि साधनं काळानुरुप बदलत जातात पण त्या कथेद्वारे वाचक/ प्रेक्षकांना एका उत्तम कलाप्रकाराचा आस्वाद घेता यावा आणि त्यांचे बौद्धिक उन्नयन व्हावे हा हेतू बदलत नाही. ‘उत्तम कलाकृती त्याला म्हणतात जी आपली आयुष्यविषयक जाण वाढवते.’ कोणत्याही कलाकृतीच्या गुणवत्तेच्या मापनाचा विजय तेंडुलकरांनी सांगितलेला हा चपखल निकष. ’परिणीता’बाबत बोलायचे तर स्थळ, काळ, दृश्य, ध्वनी आणि अभिव्यक्ती या सगळ्या कसोटींवर बंगालीसह दोन्ही हिंदी चित्रपट चोख ठरले आहेत. शरच्चंद्रांसारख्या प्रतिभावंताच्या कथेमुळे आशयाबद्द्ल बोलायलाच नको. याशिवाय कलाकारांचा दर्जेदार अभिनय, कथेला पुढे नेणारी श्रवणीय, अर्थपूर्ण, सुरेल गाणी, सिनेमाच्या तरलतेला पोषक संगीत, कॅमेर्‍याने दिलेली नेमकी नजर आणि दिग्दर्शकाला सापडलेली प्रेक्षकांची नस या सर्व घटकांच्या बळावर शरच्चंद्रांच्या ’परिणीता’ला सिनेमातूनही न्याय मिळाला आहे असे नक्कीच म्हणता येईल. 

(Published in Dault-Lekhani magazine - Cinema and Literature special edition)

Saturday, April 10, 2021

The Great Indian Kitchen च्या निमित्ताने

"माझी बायको जेव्हा किचनमध्ये काम करते ना, ते तिच्यासाठी एक प्रकारचं मेडिटेशन असतं." आमचे एक स्नेही परवा कौतुकाने सांगत होते. ते आणि त्यांची बायको प्रथितयश डॉक्टर. कामाच्या व्यग्रतेमुळे रोजचा स्वैपाक, सगळं घरकाम करायला मदतनीस आहेत. कधीतरी बदल, छंद, मुलांची एखादी फर्माईश पुरी करायला म्हणून ती तिच्या अद्द्यावत किचनमध्ये जाते तेव्हा तिचं आनंदात असणं अगदी स्वाभाविक आहे. अशा वेळी मेनू ठरवणं, निगुतीने पूर्वतयारी करणं, मन लावून पदार्थ रांधणं, आपल्या माणसांना आग्रह करून प्रेमाने खाऊ घालणं यातला आनंद अगदी अपूर्व असतो.
एखाद्या पुरुषासाठीही असा बदल म्हणजे मेडिटेशन असू शकतं. परंतु या कामाची जोडी बाईशी लावायचं इतकं कंडिशनिंग झालंय की आपल्या नात्यातल्या स्त्रियांबद्दलच्या आपल्या आठवणी सुद्धा बहुतेक वेळा त्यांची खासियत असलेल्या विशिष्ट पदार्थांशी निगडीत असतात. जुन्या हिंदी सिनेमातल्या आयांना तर आपण कायम, अपने हाथोंसे बनाया हुआ गाजर का हलवा किंवा मूली के पराठे त्यांच्या मुलांना खाऊ घालताना पाहत आलो आहोत.
प्रत्यक्षात जेव्हा हे काम तुझंच म्हणून लादलं जातं, ते करण्यावाचून पर्याय नसतो आणि त्यात एकसुरीपणा येतो तेव्हा घर व नोकरी/व्यवसाय अशी दुहेरी कसरत करणार्या बायकांबरोबर गृहिणींनाही त्याचा प्रचंड कंटाळा येऊ शकतो.

घरची आर्थिक आघाडी सांभाळणार्या पुरुषांना त्यांचे काम करताना असाच कंटाळा, थकवा येत नसेल का! नक्कीच, परंतु ते काम कधीतरी संपवून स्वत:च्या अवकाशात, आवडीनुसार वेळ घालवण्याची संधी त्यांना परंपरेने उपलब्ध करुन दिली आहे. अपवाद वगळता बहुतेक पुरुष या संधीचा मनापासून लाभ घेतात.
A woman must have money and a room of her own if she is to write fiction या व्हर्जिनिया वुल्फच्या वाक्याकडे, हक्काचा अवकाश मिळाल्याशिवाय स्त्रियांना आवडीच्या क्षेत्रात आपल्या क्षमतेचा संपूर्ण वापर करता येत नाही, अशाही अर्थाने पाहता येईल. अशी मुभा स्त्रियांना क्वचित मिळते. मिळाली तरी तळाशी बारीक अक्षरात ’अटी लागू’ लिहिलेलं असतं. "तू ’घर सांभाळून’ हवं ते कर, आम्ही तुला सगळं स्वातंत्र्य ’दिलं’ आहे" असं अजब औंदार्य त्यात असतं. घरकामाच्या बाबतीत ’आता कुठे राहिलंय असं काही, उलट शेफ म्हणून पुरुषच जास्त दिसतात, आमचा मुलगा करतो सुनेला ’मदत’, शिवाय आता हवं ते विकत मिळतं, यंत्र असतातच हाताशी’ असं वाटणार्या मंडळींनी आपल्या पांढरपेशा खिडकीतून गगनचुंबी इमारतींपासून खेडोपाडी पसरलेल्या आपल्या महाकाय देशात कृपया नीट डोकावून पाहावं.
शेतावर मजुरी करुन खोपट्यात थकून परतलेले अशिक्षीत जोडपे असो किंवा आपापल्या ऑफीसमधून दमून घरी पोचलेले सुक्षिक्षित जोडपे, रात्रीच्या जेवणाचे आणि उद्याच्या डब्याचे काय करायचे याची चिंता आणि तजवीज करण्याची जबाबदारी आजही प्रामुख्याने बाईवर असते. बाईला बरेचदा वैताग येतो तो प्रत्यक्ष कामाच्या श्रमापेक्षाही अशा पद्धतीने तिला गृहित धरण्याचा. तिला तिचा अवकाश न मिळण्याचा. हे गृहित धरणं नंतर फक्त स्वैपाक किंवा घरकामापुरतं मर्यादित राहत नाही. याच वेदनेकडे Jeo Baby या दिग्दर्शकाला प्रेक्षकांचं लक्ष वेधायचं आहे.

ॅमेझॉन प्राईमवरील त्यांचा The great Indian kitchen हा मल्याळम सिनेमा व्यवस्थेपुढे मान तुकवू न शकणार्या एका संवेदनशील भारतीय स्त्रीची व्यथा उघड करुन दाखवतो. पार्श्वभूमी केरळची असल्याने यात सातत्याने दिसणारा आणि मग बोचणारा स्वैपाक, भवताल, केरळी पद्धतीचा असला तरी तपशीलात माफक बदल करुन ही कथा भारतातल्या कोणत्याही प्रांताला लागू होऊ शकते. त्यामुळे यातल्या नायिकेलाच काय कोणत्याही पात्राला नाव नाही. केरळी कुटुंबातली नवविवाहित स्त्री, तिचा नवरा, सासूसासरे यांच्याबरोबरच स्वयंपाक किंवा एकूणच घरकाम हे ही या सिनेमातलं एक महत्वाचं पात्र. ते पात्र चिरणे, कापणे, खवणे, सोलणे, तळणे, झाडणे, आवरणे, विसळणे, धुणे, पुसणे अशा न संपणार्या कृतींच्या त-हत-हेच्या आवाजातून सिनेमाभर सतत बोलत राहतं. या पात्राला सिनेमात इतकं फूटेज आहे की एका टप्प्यावर या अंतहीन कामामुळे त्या सुनेच्या दिनचर्येचा भाग असलेला वैताग आणि कंटाळा आपणही अनुभवायला लागतो. तरीही आपण तिची कथा खिळून पाहत राहतो कारण त्या क्षणापासून दिग्दर्शकाचा सिनेमा आपला सिनेमा झालेला असतो. त्याच्या कॅमेर्याची आणि आपली वेव्हलेंग्थ जुळलेली असते.

एक साधी सुशिक्षित नृत्यशिक्षिका तरुणी एका लहान गावातल्या शिक्षकाशी विधीवत लग्न करुन त्याच्या मोठ्या, सुखवस्तू पण जुन्या पद्धतीची रचना असलेल्या घरात येते. स्वयंपाक, घरकाम इतकंच नव्हे तर नवर्याला प्रत्येक गोष्ट हातात नेऊन देणं, हे बाईचं प्राक्तन म्हणून स्वीकारलेल्या द्विपदवीधर सासूची तिला नव्या संसारात सुरुवातीला मदत होते. मुलीची प्रसूती जवळ आल्याने नाईलाजाने सासूला घराचा रामरगाडा नायिकेवर सोपवून जावं लागतं. तिची मुलगी (नायिकेची नणंद) निर्णय घेण्याचा हक्क असलेल्या मोजक्या स्त्रियांपैकी एक असल्याचे केवळ एका संवादातून, तिच्या देहबोलीतून सहज लक्षात येतं.
नायिकेच्या कामाला खंड नसतो. तिला बदली मदतनीस उपलब्ध असते ती केवळ ’त्या’ दिवसात. ती ही अर्थातच स्त्री. अंगण झाडले जाते, पडवी नियमित पुसली जाते, दिवे सवयीने घासले, पेटवले जातात, तव्यावर एकामागोमाग दोसे पसरवले जातात, सांबाराला फोडण्या दिल्या जातात, भात वैरला जातो, भाज्या चिरल्या जातात, बादली कचर्याने भरत जाते आणि कुपात रिकामी होत राहते. आपलं ताट उचलणं तर राहोच पण ताटाभोवतीचं खरकटंही तसंच टाकून घरातले पुरुष दररोज निवांत जेवून उठून जातात. चहा, नाश्ता, दुपारचं, रात्रीचं जेवण, पैपाहुणे... स्वैपाक तिन्हीत्रिकाळ शिजत राहतो आणि मूक होत गेलेल्या नायिकेला ’च’ पीडत राहतो. असे ’च’ घरोघरी असतात. कपडे हाताने धुणंच योग्य नाहीतर मशीनमुळे ते लवकर विरतात, आपल्याकडे सांबार आणि चटणी दोन्हीही लागतंच, ह्यांना चटणी पाट्यावरच वाटलेली आवडते, भात कुकरपेक्षा चुलीवरचाच चांगला लागतो. आणि हे सगळं असंच्च. रोज. अव्याहत.

हल्ली चुलीवरच्या स्मोकी चवीच्या स्वैपाकाचं अप्रूप आहे. चवीने जेवणार्याला वैविध्य हवंच असतं पण ही हौस पुरवायला चुलीपासून सुटका झालेल्या बायकांना पुन्हा चुलीकडेच जावं लागतं. जात्यावरच्या ओव्यांचं कौतुक करणं वेगळं आणि स्वत: जातं ओढणं वेगळं. आजही आपल्याकडे एखाद्या बाईच्या वाट्याला येणारं घरच्यांचं कौतुक हे तिच्या इतर क्षेत्रातल्या कर्तृत्वापेक्षा बहुतांशी तिच्या स्वयंपाक व घरकामाच्या गुणवत्तेवर जास्त अवलंबून असतं.. स्त्रीच्या अन्नपूर्णा या रुपाचं असं सोयीनुसार उदात्तीकरण केलं जातं. याविषयी एका लेखकाचा भावनाबंबाळ लेख समाजमाध्यमावर मध्यंतरी बराच फिरत होता.
ह्या लेखकाला त्यांच्या एका चाहत्या जोडप्याने घरी जेवायला बोलावले. त्यांचे उत्तम आदरातिथ्य झाले. जेवणाचे बहुतेक पदार्थ दर्जेदार उपाहारगृहातून मागवण्यात आले होते. त्यांचा आस्वाद घेत जोडप्याने त्यांच्याशी अनेक विषयांवर मनापासून गप्पा मारल्या. लेखकरावांना असे तयार पदार्थ मागवणे अजिबात रुचले नाही. ही कसली संस्कृती, त्याऐवजी घरी केलेली साधी मुगाची खिचडी जरी खाऊ घातली असती तरी मला बरे वाटले असते अशी त्यांनी टिप्पणी केली. आता अशा मानसिकतेचे काय करावे! एक तर पाहुण्यांना बोलावले की कुणी फक्त मुगाची खिचडी करणार नाही. केलीच तर ती कुणी करायची अर्थात घरच्या बाईने. या बाईंना अन्नपूर्णेची नेहमीची भूमिका करण्याऐवजी आवर्जून आमंत्रित केलेल्या लेखकाबरोबर चर्चा करण्यात जास्त स्वारस्य होते हे स्वीकारणं लेखकाला एवढे अवघड का वाटावं! हळव्या, विचारी म्हणवणार्या सुबुद्ध लोकांच्या बायकांकडून इतक्या पठडीतल्या अपेक्षा असतील तर सर्वसामान्यांबद्दल काय बोलावं!

तर या सगळ्या ’च’ मुळे येणारा ताण, ’आपल्याच घरातलं काम आहे- त्यात काय इतकं’ म्हणून गृहित धरलं जाणं नायिकेच्या आत कुठेतरी धुमसू लागतं. नवर्याच्या दृष्टीने तुंबलेलं, गळणारं सिंक म्हणजे स्वैपाकघरातला अगदी क्षुल्लक प्रश्न. पण त्या सांडपाण्याच्या वासातून तिच्या मनाची सुटका होणं अवघड होतं. नवर्याबरोबर एकांतातही तो वास.. घरकाम नावाचं अदृश्य पात्र, तिच्या मेंदूत दबा धरून बसलेलं असतं. नुसत्या यांत्रिक क्रियेचा तिटकारा आल्याने त्याने आपल्या थकल्या जीवाला आधी किमान खुलवावं ही साधी अपेक्षा ती व्यक्त करते. ती पूर्ण होणं तर दूरच त्याला तिच्यात शेजे आणि पेजेच्या गरजेपलिकडे काही रस नाही हे तो स्पष्टपणे सांगतो. नायिका दुखावते. तिची घुसमट इथे थांबत नाही.
तिच्या नोकरीच्या इच्छेला घरच्या पुरुषांनी गोड शब्दात दिलेला ठाम नकार, त्यातच मासिक पाळीचं स्तोम, शबरीमाला पार्श्वभूमीवर तिने फेसबुकवर टाकलेली पोस्ट डिलिट करण्याचा नवर्याचा आदेश, व्यवस्थेला शरण गेलेल्या तिच्या आईचीही तिने सासरी जुळवून घ्यावं अशी सूचना. एकामागोमाग घडणार्या अशा घटनांमुळे तिच्या मनात धुमसणार्या ठिणग्या पेट घेऊ लागतात आणि एका क्षणी याचा उद्रेक होतो. त्याची परिणती कशात होते, ती काय निर्णय घेते, त्याने कसा आणि किती फरक पडतो हे सिनेमात पुढे पाहता येईल. तिला ती गवसते हा सिनेमाचा उत्कर्षबिंदू महत्वाचा. तिथे आपण श्वास रोखून धरतो. सिनेमा फार ग्रेट नाही पण तो थेट भिडतो. Nimisha Sajayan आणि Suraj Venjaramoodu या मुख्य पात्रांचा जिवंत अभिनय, प्रत्ययकारी चित्रण, बांधीव पटकथा यामुळे तो आणखी प्रभावी ठरतो.

सिनेमा बघताना वाचल्याचं आठवलं, गेल्या पिढीचे लेखक जयवंत दळवी यांनी आपल्या आईचं अवघं आयुष्य काळोख्या स्वैपाकघरात राब राब राबण्यात करपून गेल्याची कबुली एका लेखात दिली होती. हे गेल्या पिढीचे प्रातिनिधिक उदाहरण असले आणि आता परिस्थिती काही अंशी बदलली असली तरी या कामावरची ’दुय्यम’ आणि ’बायकी’ ही लेबल्स पुसली गेलेली नाहीत. "निवडणुकीच्या प्रचारातून वेळ मिळाला तर चेल्सीसाठी कुकीज बनवायला मला सर्वात जास्त आवडतं" हे हिलरी क्लिंटन यांचं वाक्य तेव्हाच्या काही अमेरिकन माध्यमांनी ’तर’च्या पुढच्या वाक्याची हेडलाईन करुन बाई शेवटी स्वैपाकघरातच रमू शकते, अशा पद्धतीने सादर केलं होतं. भारतीय समाजाला तर हे मनातून मान्यच आहे. ’किचन पॉलीटिक्स’ या एकमेव विषयाभोवती घुटमळणार्या सुमार मालिकांना मिळणारी अफाट लोकप्रियता त्याचे निदर्शक आहे.
काही उदार मंडळींची प्रगती ’बायको गेली माहेरी काम करी पीतांबरी’ या धर्तीवर ’अडायला नको म्हणून मुलाला जुजबी स्वैपाक आला पाहिजे’ इथपर्यंत झाली आहे. पण मुलीच्या जातीला मात्र तो व्यवस्थित आला’च’ पाहिजे याबाबत त्यांचे दुमत नाही.

मुळात स्वैपाक किंवा घरकाम हे केवळ जीवनावश्यक कर्तव्य नाही तर आयुष्याला ज्या छोट्या छोट्या गोष्टीतून सौंदर्य आणि अर्थ प्राप्त होतो त्यापैकी ती एक महत्वाची कृती आहे. उपलब्ध वेळ, आवड, कौशल्य आणि गरज याचा समन्वय साधून एकमेकांना हातभार लावत ती करणं ही घरातल्या प्रत्येक सदस्याची जबाबदारी आहे. लॉकडाऊनमध्ये अचानक याची जाणीव झाल्याने जबाबदारी वगैरे म्हणणं जरा जास्त होईल, पण अनेक पुरुषांनी आपल्या घरातील स्त्रियांना स्वैपाकात, घरकामात ’मदत’ केली. काहींनी त्यावरून विनोद व्हायरल केले. बायकांना विनोदाचं वावडं नसतं पण पुरुषांनी हे काम करण्यात विनोद आहे असं अजूनही समाजाला वाटणं हाच मुळात एक विनोद आहे.
सामाजिक संस्थांच्या पाहणीनुसार अनलॉकबरोबर यातील बहुतेकांचा उत्साह मावळला आणि ’द ग्रेट इंडियन किचन’ मध्ये कामाची व श्रमाची असमान विभागणी पूर्ववत झाली. या सिनेमाच्या नावात ’किचन’ असलं तरी सिनेमा सांगू पाहतोय ते व्यवस्थेबद्दल.
अशा मानसिकतेबद्दल. घरोघरच्या मातीच्या चुलींबद्दल. सिनेमापुरतं बोलायचं तर नायिकेने अमुक स्टँड घ्यायला हवा होता, तमुक करायला हवं होतं अशा प्रतिक्रिया येत राहतील. आपण काय करायला हवं याचा विचार करायला मात्र हा सिनेमा आपल्याला भाग पाडतो.

published in Media Watch portal