देणेघेणे टाळून साधेपणाने लग्न करण्याची अट आम्ही मोडकांना पत्रातून कळवली होती. ती मान्य करताना भावी सुनेनंही नवं घर ’आपलं’ म्हणून स्वीकारताना कसा विचार करावा आणि कुटुंब म्हणजे काय याविषयी भाऊंनी अतिशय संयत आणि नेमक्या शब्दात पत्रोत्तर दिलं होतं. ते विचार फक्त पत्रातून छाप पाडायला नव्हते तर ते त्यांच्या जगण्याचा भाग आहेत याचा प्रत्यय मी (आणि मानसीही) सून म्हणून घेत आलो आहोत. एकंदरीत ते फक्त सासरे म्हणून नव्हे तर माणूस म्हणूनच अतिशय कूल आहेत.
Friday, May 31, 2024
सहजीवन ६०
Tuesday, March 1, 2022
'भारतीय स्त्रीत्वाचे तेजाळ दर्शन’ - 'पुत्र ज्ञानदेवतेचा' या गौरवग्रंथातील लेख
महामहोपाध्याय बाळशास्त्री हरदास - 'पुत्र ज्ञानदेवतेचा' या गौरवग्रंथातील माझा लेख
Tuesday, January 5, 2021
हाँ तो मै कहाँ थी...
धावतपळत मी जस्ट सुटलेली झेलम एक्सप्रेस पकडली. नोकरी करत असतानाचे अपडाऊनचे दिवस. नेहमी स्टेशनवर किंवा माझ्याच गाडीत किंवा परतीची गाडी पकडण्य़ासाठी बस स्टँडपासून स्टेशनकडे धावणार्या आम्हा सर्वांबरोबर दिसणार्या त्या टपोर्या डोळ्यांच्या ख्रिश्चन मुलीने मला शाहरुख स्टाईल हात देऊन आत ओढलं. आम्ही एकमेकींना छान स्माईल दिलं. मग चेहर्यावर करुण भाव आणून नेहमीची आयडिया करुन एक बरी फॅमिली पाहून मी बसायला जागा पटकावली. तिलाही बोलावलं. शेजारी बसल्याने आमच्या गप्पा सुरु झाल्या. ती माझ्याच शाळेत मला दोन वर्ष सिनीयर होती हे कळलं. मग जुन्या शिक्षक-शिक्षिकांचे, इतरही बरेच विषय निघाले. तिलाही माझ्याबद्दल खूप उत्सुकता होती. आपण तिला सुझी म्हणूया. बॉयकट, सावळा वर्ण, स्कर्ट किंवा मॉडर्न पद्धतीचा पंजाबी ड्रॆस घालणार्या आणि लालचुटुक्क लिपस्टीक लावणार्या या गोड गोबर्या, सुझीची आणि माझी त्या प्रवासात जी भयंकर गट्टी जमली ती आजतागायत तश्शीच टिकून आहे.
आता सकाळी स्टॆशनवर निघताना ती मला हाक मारायची. माझी कायम धांदल असायची. त्यात माझी शिस्तप्रिय आई, ’मोहिनी मागे फिर, तुझा चमचा विसळायचा राहिला आहे’ असं काहीतरी प्रचंड घाईत असताना सांगायची. ’अग माझे आई, माझी गाडी चुकेल, हाफ डे लागेल नं’ म्हटलं तरी, ’चुकू दे, त्याशिवाय तुला सवय लागणार नाही’ असं शांतपणे म्हणायची. सुझी फाटकात उभी राहून आमचे हे संवाद ऐकत हसत असायची. ’तेरेको ये लिपस्टिक वगैरे लगानेको टाईम कैसे मिलता रे’, असं मग मी रस्त्याने धावता धावता तिला विचारायचे. तिची इंग्लीशमिश्रित बंबईया हिंदी खासच असायची. उदा: ’रास्ते मे ये गायलोगको कही भी कायको बैठने देते रे, आय गेट फ्रायटन्ड इसलिए मै गाडीच नई चलाती’.
तिला झोपेची देणगी आहे. ’मेरेको जहाँ कही भी होरिझॉंटल किया, वही मै सो जाती’ असा तिचा प्रकार होता. गाडीत, वेटिंग रुममध्ये ती अशीच पटकन जरा तिरकी झाली की झोपून जायची त्यामुळे ती कायम फ्रेश असे. आमची कंपनी वेगवेगळी असल्याने आणि कामाच्या लोडप्रमाणे आमच्या परतण्याच्या वेळा कधी कधी जुळत नसत. मग दुसर्या दिवशी सांगायला आमच्याकडे, काल काय झाले, पवन भोत लेट आई, कर्नाटक कैसे अचानक रुक गयी, बोगी मे क्या गडबड हुई, वो मनमाडका मुछ्छड टीसी फिरसे मेरेको बोला की ये पास इदर नही चलेगा, वगैरे ढीगभर किस्से असत. तिला सविस्तर आणि संगतवार सांगायला आवडे. उदा: - ५.१२ को मैने कॉम्प्युटर शटडाऊन किया और बस पर्स हाथ मे ली तो ये साला डेरिक आके बोलता है, इतना पेज अर्जंट बनानेका है. इधर नवजीवन का टाईम होयेला. मैने फटाफट बनाया. ५.१७ को उसको दिया तो उसको उसमे एक गलती मिला. उसको क्या रे, घर जाके पैर दीवाल को लगाके टीव्ही देखनेका रहता खाली, बीबी बनाती होगी खाना. बच्चो की पढाई पक्का वो ही लेती. हाँ, तो मै कहाँ थी!’ मी- ’डेरिक के पास’. मग ५.४५ पर्यंतचे नवजीवन चुकली, मुश्कील से कुर्ला मिली, वो मोटे अंकल कैसे गिर गये जीनेपे, वगैरे वगैरे धावते समालोचन ऐकवायची.
मी कंटाळून मध्येच काही पुढचे विचारले की ते तिला आवडत नसे. ’रुक तू, हाँ, तो मै कहाँ थी!’, ’वो आर्थर हॅले के बाजू मे’. (एक अपडाऊनवाला मुलगा आम्हाला कव्हर दिसेल अशी मुद्दाम धरुन जाड जाड इंग्लीश पुस्तके वाचायचा. त्याला आम्ही आर्थर हॅले म्हणत असू. ’समझता भी है के खाली स्टाईल मारता है’ अशी तिला शंका होती.)
रोज नवी गाडी, नवे प्रवासी, नवे अनुभव, धमाल यायची. तिच्या बॉयकट आणि शर्ट ट्राऊजर मुळे मागून तिला पुरुष समजून एकदा ट्रॆनच्या दुसर्या बाजूने चढणार्या एका बाईने तिला ’भैया जरा हाथ देना तो’ असे म्हणून एक गाठोडे हिच्या डोक्यावरच ठेवून दिले होते. पास संपलेला आहे याची ट्यूब पेटली आणि तेव्हाच नेमका टीसी आला तर आम्ही क्लुप्त्या लढवत असू पण तेव्हा खिदकन हसून सुझी आम्हाला तोंडघशी पाडत असे. दरम्यान आम्हा दोघींना माझी आणखी एक जवळची मैत्रिण जॉइन झाली होती. एव्हाना आम्हाला एकमेकींच्या घरची, कंपन्यांची, त्यातल्या आमच्या डिपार्ट्मेंटच्या लोकांची इतकेच नव्हे तर त्यांच्या खानदानाची सुद्धा इत्यंभूत माहिती झाली होती’.
रविवारी सुझी लवकर उठून लालचुटुक्क लिपस्टिक लावून संडॆ मासला न चुकता जात असे. येताना भाजी घेऊन, मला भेटून घरी जात असे. मग चिकन खानेका आणि सोनेका असा तिचा सोपा कार्यक्रम असायचा. प्रवासात सोबत नसेल तेव्हा वाचन बरं म्हणून मी जवळ कायम पुस्तक ठेवायचे, क्या करती तू इतना पढके, आजूबाजू देखकेही तो कितना पढनेको मिलता है, असं तिचं सोपं प्रिन्सिपल. पुरणपोळी तिला खूप आवडायची म्हणून घरी केली की तिच्यासाठी मी डबा न्यायचे. माझं ख्रिस्मस लंच इतर ख्रिश्चन मैत्रिणींसह तिच्याकडे असायचं. तिची आई अप्रतिम डोनट्स बनवायची. जेवण मग थोडं म्युझिक, डान्स वगैरे. मजा यायची. ख्रिश्चन लग्नाच्या रिसेप्शनला ती सोबत असली तरच मी जायचे. भेटवस्तू देताना नवरा-नवरीला हलका किस करण्य़ाची त्यांची पद्धत मला झेपायची नाही मग मी तिच्या मागे लपून लांब हात करून भेट देऊन सटकायचे. गावात धर्मांतरित ख्रिशचन भरपूर. एक कॉलोनी अँग्लोइंडियन्सची. यांची चर्चेस वेगळी. त्यातून मराठी ख्रिशचन्सची चर्चेस अजून वेगळी. त्यांचं सर्कल वेगळं. जो भेद नको म्हणून धर्मांतर झालेलं तो भेद शेवटी तसाच. सुझीचं कुटुंब कॅथोलिक. प्रेयरशिवाय जेवण नाही. अगदी कट्टर धार्मिक, वडील नव्हते. मोठी बहिण त्यांच्या जागेवर नोकरीला लागली होती. धाकटी बहिण एक जुजबी नोकरी करत होती. धाकटा भाऊ शिकत होता. तशातच तिच्या धाकट्या बहिणीने एका मूळ यूपीतल्या हिंदू मुलाशी पळून जाऊन लग्न केले. त्यांना तो मोठा धक्का होता. पांढर्या सॅटीनच्या झालरवाल्या गाऊन मधल्या, हातात गुलाबांचा बुके घेतलेल्या ब्राईड ऐवजी त्यांना लालजर्द शालू, सोनेरी ओढणी, हातात चुडा, भांगात सिंदूर, हातभर मेहंदी, मोठठं कुंकू अशा वेशातल्या वधूच्या रुपात बहिणीला बघवेना. सुझी रडली, संतापली, वो सुखी नही रहेगी म्हणाली. हळूहळू ते निवळलं. (आता त्या बहिणीचं कुटुंब हिंदूच असलं तरी ख्रिश्चनांच्या वरताण त्यांच्यामध्ये मिसळून गेलंय)
आपल्याकडे ख्रिश्चन लोक सैल चारित्र्याचे असतात असा फार गैरसमज आहे. एकदा स्टुडिओत लग्नासाठी फोटो काढायला गेली असताना फोटोग्राफरने तिला निगरगट्टपणॆ ’आप लोगोमे इतना चलता है’ म्हणत काही ऑड पोझेस द्यायला सुचवल्या. तिने खिन्न होऊन मला हे सांगितल्रं तेव्हा मला अतिशय वाईट वाटलं. मी तर तिला घेऊन त्याच्याशी भांडायलाच निघाले पण ’वो सॉरी बोल भी दिया तो तु उसको अंदरसे बदल सकेगी क्या’ असा मला निरूत्तर करणारा प्रश्न टाकून तिने तो विषय संपवला. सुझीला जी स्थळं यायची त्यात शिकलेली फार कमी. ख्रिश्चनांमध्ये उच्चशिक्षित (तेव्हा) फार कमी, दारु पिणे नॉर्मल. इंग्लीशच्या जोरावर नोकर्या मिळून जात. चंकीफंकी हेअर स्टाईल, हातात गिटार असे ’मुलांचे फोटो’ पाहून ती वैतागायची. ’इन मिथुन चक्रवर्तीयोंमेसेही कोई सिलेक्ट करना पडेगा क्योंकी किसिको पटाना अपने बस की बात नही’ असं म्हणायची. मग तिला एक चांगलं मुंबईचं स्थळ आलं. मुलाला जssरा टक्कल होतं पण शिक्षण, नोकरी उत्तम. बाकी माहिती काढली, ते ही उत्तम. ’ये कितना टकला है मॅन ..कैसा लगेगा जोडा रिसेप्शन के फोटोमे’ अशी तिला काळजी पडली. मी तिची बरीच समजूत घातली की ’शादी के बाद घने बालोवाला भी टकला हुआ तो तू क्या उसे छोड देगी! शादी क्या सिर्फ रिसेप्शनके फोटो अच्छे आने के लिए करते है क्या’ वगैरे. अखेर तिने त्याला होकार दिला. तिची निवड सार्थ ठरली. माझं लग्न ठरलं तेव्हा महेश टकला नसल्याचं तिला हायसं वाटलं.
आता सगळे फोनवर. व्हॉट्सअॅप वर संपर्कात असतोच. एकदोनदा ठरवून आणि एकदा योगायोगाने आम्ही भेटलो. एकमेकींच्या घरी मात्र अजून जाणं झालं नाही पण तिचा फोन आला नाही असा माझाच काय , मुलांचा वाढदिवसही जात नाही. फोन उचलला की सुझी सुरु होते, "कैसी है रे! मै तो बस दिनभर जॉब, बॉस, टार्गेट, सब्जी, बच्चे.. खाली सोने के लिए घर आती रे, इस्से अच्छा ऑफीसमे ही सो जानेका! कल की बात, ५.१५ को मै उठी, हजबंड के लिए चाय बनाई, वो भी बनाता रे मेरे लिए लेकिन इतनी टेरिबल बनाता की कोरोनाका काडा भी उससे अच्छा. पीही नही सकते. फिर बोलता आज मेरा ऑफ है, पहले बोलता तो मै आधा घंटा जादा नही सोती थी क्या, सोना तो मेरी जान है. बॉंबेमे इन्सान को कहाँ सोनेको मिलता रे, अपना अपडाऊन बहोत आसान था, ऐ अब तेरी साँस मम्मी के जैसा टॊकती क्या रे, मोहिनी मागे फिर !!" मग खिदळत पुन्हा विचारते , ’हाँ तो मै कहाँ थी..!!!.’
Monday, April 20, 2020
पिंकीपॉलिसी
Friday, January 31, 2020
विद्याताई
जनसंवाद, पुणे आयोजित एका निबंधस्पर्धेच्या बक्षीस समारंभाला उपस्थित राहू शकले नव्हते. नंतर पुण्याला गेले तेव्हा आयोजक तपस्वी सरांना भेटले. ते म्हणाले, ’आली असतीस तर हे बक्षीस विद्याताईंच्या हस्ते मिळालं असतं”. मला थोडं वाईट वाटलं. अचानक ते म्हणाले, ’वेळ असेल तर आपण जाऊया का त्यांच्या घरी!’. पूर्वपरवानगी घेऊन आम्ही गेलो. विद्याताईंना प्रत्यक्ष, टीव्हीवर, ऐकलेलं, पाहिलेलं, वाचलेलं पण ते सगळं वन वे. त्यांच्या हस्ते त्यांच्याच घरात बक्षीस स्वीकारताना खूप भारी वाटलं. साधं, शांत, नेटकं घर. विद्याताईंचा प्रसन्न वावर. आमच्याशी बोलताना त्या मध्येच बशीत काही खायला ठेवून कपडे वाळत घालायला गेल्या, एकीकडे गप्पा सुरु. म्हणजे त्यांच्या आणि तपस्वी सरांच्या. मी हो, नाही पलिकडे फार काही बोलल्याचं आठवत नाही. त्यांचं मृदु बोलणं, निर्व्याज हसणं, टीपॉय वरच्या ढिगातून चटकन एखादं पुस्तक काढून त्याचा संदर्भ देत काही सांगणं, सगळं मी गप्प बसून पाहत होते.
डावी असो वा उजवी, या स्तरावर पोचलेली फार कमी माणसं इतकी साधी, समंजस, दुसर्याचं शांतपणे ऐकून घेणारी आणि ठाम तरीही ऋजु असतात. समाजात बदल व्हावा असं ज्यांना मनापासून वाटतं त्यापैकी अनेकांचा स्वर आक्रस्ताळा, उर्मट आहे असं जाणवतं. त्यांनी विद्याताईंकडून एवढं उचललं तरी खूप फरक पडेल. आपलं मत तर्कसंगत, मुद्देसूद, स्निग्ध शब्दात आणि संयतपणे मांडलं तर ते स्वीकारलं जातं, किमान त्यावर निकोप चर्चा होऊ शकते, नाहीच पटलं/ मान्य केलं तरी दोन्ही बाजूंनी निदान विचार केला जातो मग वाचक/ श्रोते/ प्रेक्षक कोणत्याही विचारसरणीचे असोत. विद्याताईंनी विचार मांडण्याची ही जी पद्धत वापरली (ते त्यांच्या व्यक्तिमत्वाचं स्वाभाविक अंग होतं) त्यामुळे विरोधकही त्यांचा नकळत आदर करत असं मला वाटतं.
Friday, June 15, 2018
शशिकाका
प्रशांतचा अचानक "बाबा गेले" असा फोन आला तेव्हा मला काय बोलावे तेच सुचेना, मग त्याने काकूंना फोन दिला. त्या खूप शांतपणे काय घडलं, कसं घडलं सगळं बोलल्या. शशिकांतकाकांचं हे अचानक जाणं त्यांच्या आखीवरेखीव आयुष्य़ाला शोभेल असच होतं. ते अंथरूणावर खितपत पडून आहेत हे त्यांनाही आवडलं नसतं. तरीही आता ते या जगात नाहीत, आपल्यावर मनापासून माया करणारी , आपल्या लहानमोठ्य़ा कोणत्याही यशाचं भरभरून कौतुक करणारी व्यक्ती आपल्याला कायमची दुरावली याची खंत कायम राहील. ’कौन रोता है किसी और के खातिर.. सबको अपनीही किसी बात पे रोना आया..’ हेच कदाचित सत्य आहे.
काका गेले ते त्यांच्या नाशिकच्या फ्लॅट मधे. गेली बरीच वर्ष त्यांचं वास्तव्य तिथेच होतं पण माझ्या त्यांच्याशी निगडीत बहुतेक आठवणी .. खानदेशच्या, आठवले वाडयामधल्या. ८ ते १६ वर्ष वया दरम्यानच्या. आमच्या बाजूचच तिसरं घर कुलकर्णी काकांचं. फक्त एक खोली, त्यातच पार्टीशन घालून केलेली स्वैपाक खोली आणि जिन्याखालचं न्हाणीघर म्हणजे त्यांचं घर. खरं तर त्यांची रेल्वेमधली नोकरी अगदी चांगल्या दर्जाची पण तेव्हा ’राहते घर’ हे त्याचे निदर्शक नसे. पुढे त्यांनी गच्चीवर चांगला मोठा हॉल बांधला. तिथे आम्ही प्रचंड पत्ते खेळायचो आणि खेळताना खाणाखुणा केल्या म्हणून जोरजोराने भांडायचो. आवाज फारच वाढला की काका वर येत आणि चुटक्या वाजवत ’च्यला पॉत्ते बॉंद’ एवढच शांतपणे म्हणून आम्हाला रवाना करत. तोंडात तंबाखूचा बार असल्याने याहून अधिक बोलणं त्यांना शक्य होत नसावं. आम्ही दुसर्या दिवशी पुन्हा काल जणू काही घडलच नाही या अविर्भावात नव्याने खेळ (आणि भांडण) सुरू करत असू.
८० ते ९० च्या दशकातल्या त्या वाडा संस्कृतीतलं काकांचं व्यक्तिमत्व खूपच असामान्य आणि म्हणूनच मला त्यांच्याबद्दल विशेष आदर वाटत असावा. त्यांचं वेगळेपण त्यांच्या घरापासून सुरू होई. बाहेरच्या खोलीत एक लोखंडी कॉट, त्यावर एकावर एक पसरलेला गाद्यांचा ढीग, एखादं स्टूल आणि घडीची पत्र्याची खुर्ची इतपत ’फर्निचर’ आणि ’पिवळे बल्ब’ असलेली बहुतेक घरं. त्यात त्यांचं छोटसंच पण अतिशय नीटनेटकं घर अगदी उठून दिसायचं. ’महाराष्ट्र टाईम्स’ची रद्दी अगदी काटकोनात रचलेली, गादीवरची चादर स्वच्छ आणि ताठ खोचलेली. खिडकीत चकचकीत पाण्य़ाचं तांब्याभांडं भरून ठेवलेलं, खिडकीला साडीचेच पण सुरेख रंगसंगती असलेले पडदे आणि त्याकाळी दुर्मिळ असलेला पुस्तकांनी खच्चून भरलेला भिंतीतला कप्पा. त्यातली पुस्तकं अर्थातच अगदी शिस्तबद्ध लावलेली. रेडिओवर किंवा नंतर टेपवर सतत छानशी भावगीतं, सिनेगीतं, नाट्यगीतं कायम सुरू असायची. या सगळ्य़ामुळे त्या घरात सतत एक प्रसन्नतेची झुळूक वावरत असायची. काकांना गाण्याची उत्तम समज होती, काकू देखील छान गात. विशेषत: आशाचे ’जीवलगा’ गावे तर त्यांनीच. त्यांचे माहेर पुण्याचे, शिक्षण ’स.प. महाविद्यालयातले’ त्या काळचे इंटर, त्यांची बहीण आक्का मराठी चित्रपटात काही सात्विक भूमिका केलेली. त्या ’स्त्री सखी’ मंडळात जात. इतर बायका ’शेवया करूया, पाटल्या नव्या केल्या का, ह्यांची महिनाभर ४-१२ च सुरू आहे’ वगैरे आपसात बोलायच्या, त्यापेक्षा काकूंच्या गप्पांचे विषय वैविध्यपूर्ण असत. प्रशांत देखील हरहुन्नरी आणि ’व्हॉईस ऑफ किशोरकुमार’ होता. हरितालिकेला किंवा कोणत्याही एकत्रीकरणात त्या दोघांची गाणी ऐकायची हे ठरलेलं. या संगीतमय वातावरणाचे श्रेय मात्र काकांचे. ते घरी असले की बहुतेक वेळा चष्मा लावून खिडकीशी सतत वाचताना दिसत किंवा गुणगुणत असत. सर्वसाधारण उंची, देशस्थी सावळा रंग, थोडेसे विरळ होत गेलेले मागे वळवलेले कुरळे केस, तोंडात तंबाखूचा बार त्यामुळे मुखरस सांभाळत मिश्कील बोलणारे, टापटीप परीटघडीच्या कपडयातले, हसरा चेहरा आणि रसिक वृत्तीमुळे कायम सतेज दिसणारे काका शेवटपर्यंत तसेच दिसायचे.
पहिलीत मी पहिले भाषण लो. टिळकांवर केले आणि मला बक्षीस मिळाले. घरी येताच मी आधी धावत जाऊन त्यांचे घर गाठले आणि त्यांच्या पायरीवर ’सावधान’ पोझ मधे उभे राहून अख्खे भाषण खाडखाड म्हणून दाखवले. ही आठवण तेच मला नेहमी हसत हसत सांगत. पाचवी की सहावीत ’भुताळी जहाज’ हे भा.रा.भागवतांचे पुस्तक मी त्यांच्या कप्प्यातून काढून वाचायला मागितले आणि एका रात्रीत वाचून परत केले. यावर खूष होऊन त्यांनी त्यांचा पुस्तकांचा कप्पा मला खुला केला आणि माझं वाचन अधिक उत्साहाने सुरू झालं. सार्वजनिक वाचनालयात काकांनी काढलेलं गदिमांच अप्रतिम चित्र लावलेलं होतं, अजूनही असावं. काकांचा कुसुमाग्रज, ना.धों महानोर अशा कितीतरी मोठ्य़ा साहित्यिकांशी परिचय तसच वैयक्तिक पत्रव्यवहार होता. मला हे कळले तेव्हा ते सारे फार अद्भुत वाटले, आपल्याला शाळेत ज्यांचे धडे, कविता आहेत त्यांच्याशी काका प्रत्यक्ष बोलतात, पत्र पाठवतात म्हणजे किती ग्रेट! मग मी पण गिरीजा कीर यांना पत्र लिहून माझ्या तेव्हाच्या अकलेनुसार काही प्रश्न विचारले, आणि त्यांचे मोत्यासारख्या वळणदार अक्षरात मला चक्क उत्तर आले ते मी धावत जाऊन आधी काकांना दाखवले. त्यांनी मला खाऊसह शाबासकी दिली हे अजूनही आठवतं.
रेल्वेचा दुर्गोत्सव तिथे मोठ्य़ा प्रमाणावर होत असे. काकांचा त्यात सक्रीय सहभाग असायचा. निवेदन, कार्यक्रमाची आखणी, उत्तमोत्तम कलाकारांचे आगतस्वागत ही सगळी जबाबदारी ते सहज पार पाडायचे. अशा मंडळींशी संवाद साधायला जी सांस्कृतिक उमज असायला हवी त्यासाठी काकांसारखी दुसरी योग्य व्यक्ती नसावी. त्यांचे त्या कार्यक्रमातले, नाटकात काम केल्याचे बरेच फोटॊ पाहिल्याचे मला आठवते. तेव्हाची आजूबाजूची इतर ’वडील’ मंडळी ही फारच रूक्ष आणि साचेबद्ध. रेल्वेतल्या त्रासदायक नोकरीने सतत कावलेली असायची. ’काही अप काही डाऊन’ अशीच आर्थिक स्थिती आणि बोलण्य़ात फक्त ’रेल्वेचे विषय’. या सर्वांचे स्वभावाने रागीट असणे, मुले चुकून समोर आलीच तर त्यांच्यावर ’अभ्यासाला बस’ म्हणून डाफरणे आणि बायकोशी फक्त ’वाढ’ म्हणण्य़ापुरता संवाद (!) असणे हे अगदी सार्वत्रिक वैशिष्ट्य़ होते. या पार्श्वभूमीवर काका मला खूप वेगळे वाटत. त्यांची विनोदबुद्धी उत्तम आणि अंगात अभिनय असल्याने त्यांच्याकडून घेतलेली उधारी चुकावणारे, आजूबाजूचे काही नमुने यांच्या ते झकास नकला करत. प्रशांतसोबत काही ना काही हस्तकला करताना, काकूंशी त्यांना चक्क ’गप्पा’ मारताना पाहून आम्हाला आश्चर्य वाटे. फिरायला किंवा बाहेर जाताना ते दोघे मागे पुढे न चालता सोबत जात असत. महालक्ष्म्यांची त्यांनी केलेली सजावट पाहण्य़ासारखी असे. इतर बायका ऐपत असली तरी ’करायच्या काय’ म्हणून लग्नात ’आलेल्या’ वायलच्या साड्या नेसत पण काकूंच्या साड्या मात्र सुंदर लेस लावलेल्या, प्लेन टवटवीत रंगांच्या आणि मऊ पोताच्या असत. त्यातलीच एक मागे भिंतीवर सोडून घरातलेच साहित्य वापरून काका नेत्रसुखद रचना करायचे. गणपतीतही काका सुरेख मखर करायचे. त्यांच्या घरची प्रसादाची खमंग वाटली डाळ आणि सढळ हस्ते तूप घातलेल्या बेसनाच्या लाडूची चव चाखण्य़ासाठी त्यांची विसर्जनाची वेळ गाठण्याची आमची कोण लगबग असायची. दिवाळीचे अभ्यंगस्नान झाले की आधी मी नवा ड्रॆस काका-काकूंना दाखवायला जायचे. मी नव्या फ्रॉकच्या घेराची दोन्ही टोके हातात धरून गिरकी मारायची आणि त्यांनी ’कंपलसरी’ माझे कौतुक करायचे असा आमचा रिवाजच होता.
केव्हाही उठून त्यांच्या घरी जाणे आणि काका असले तर त्यांच्याशी काहीतरी हटकून बोलणे ही तशी साधी घटना असली तरी मुलांशी इतर काका मंडळी फारशी बोलत नसल्याने मला तिथे जायला विशेष आवडायचे. काकांचे बालपण अतिशय कष्टात गेले असे काकू नेहमी सांगायच्या पण भूतकाळाचे सावट त्यांच्या ’आज’ वर कधीच जाणवायचे नाही. सामाईक गोष्टींवरून वाड्य़ात जी अपरिहार्य भांडणे होत त्यात काकांचा स्वर कधी टीपेला गेल्याचे किंवा त्यांनी अर्वाच्य भाषा वापरल्याचे मला आठवत नाही. त्यांच्या बाजूचे म्हणजे ४ थे घर विचित्र वृत्तीचे, एका पाठॊपाठ एक अशा सात मुली झाल्याने वैफल्यग्रस्त झालेले, सदा कलकलाट करणारे. त्या गृहस्थांचे पिऊन येणे आणि कुरापती काढून काकांना भांडायला सतत आमंत्रण देणॆ कधी थांबले नाही. या कटकटीला वैतागुन कुणीही चवताळून एकदा तरी त्यांच्यावर धावून गेला असता. ’मग आमच्यात फरक तो काय उरला’ असं म्हणणार्या काकांच्या समंजस, सुसंस्कृत, नीटनेटक्या व्यक्तित्वाची त्या वयात माझ्यावर छाप पडली ती कायमचीच.
मी शिकायला बाहेर पडल्यावर आमचा संपर्क काहीसा कमी झाला आणि तोवर काकांची नासिकला बदली झाली. सामाईक ओळखीचे कुणी भेटले तर एकमेकांच्या चौकशीपुरताच संबंध राहिला. पण अनेक वेळा त्या त्या सणाला, तशा घटनांच्या प्रसंगी काका-काकूंची आठवण यायची. १० वर्षांपूर्वी जीएसइ निमित्त्याने नासिकला जाणे झाले. फोन करून काकांकडे गेले, इतक्या वर्षांच्या साठलेल्या गप्पा झाल्या. प्रशांतचे जवळच घर होते, त्याच्या बायकोमुलीची ओळख झाली. बाहेर एकत्र जाणं झालं. काका स्वत: मला इंटरव्ह्यू च्या जागी पोचवायला आले आणि माझी निवड झाली हे कळताच त्यांना अतिशय आनंद झाला. माझे तिकीट रद्द करणे, दुसरे काढणे, मला स्टॆशनवर पोचवणे सगळं ते उत्साहाने, काळजीने, प्रेमाने करत होते. आमचा संपर्क पुन्हा पूर्ववत सुरू झाला. बहुतेक वेळा फोनवरच. दिवाळी, नव वर्ष अशा निमित्ताने मी फोन करायचे तर माझे लेख वाचल्यावर अधूनमधून त्यांचा फोन येई. त्यांची साहित्यिक आस्वादकता खूपच उत्तम, माझा लेख त्या दर्जाचा नसला तरी त्यात कौतुकाचा भागच सर्वाधिक असायचा याची मला जाणीव असायची.. एव्हाना त्यांचा पुस्तक संग्रह प्रचंड वाढला होता. वाचन अव्याहत सुरू असायचे. एकदा सहपरिवार त्यांच्याकडे जाऊन आले, तेव्हा त्यांनी नवर्याशी अवांतर बोलण्यापेक्षा बहुतेक वेळ माझे लहानपणापासूनचे किस्से सांगत नवरा वैतागेल इतके कौतुक केले. नंतर कामानिमित्ताने नासिकला एक दिवसाच्या धावपळीच्या ट्रीप्स झाल्या पण मुलांसाठी लगेच परतायच्या घाईत काकांना घरी भेटण्य़ाइतकी सवड मिळू शकली नाही.
गेल्या नासिक भेटीत ठरवले, की पुढच्या वेळेस कसेही करून भेटायला जायचे. बालपणीची उर्जादायी प्रतिमा मनात ठसल्याने काका, काकू आता थकले आहेत हे कदाचित लक्षातच आले नाही. ते गेल्याचा प्रशांतचा फोन आला तेव्हा हतबल वाटलं.. पोरकं झाल्यासारखं खोल काहीतरी कापत गेलं, आणि जाणवलं, देअर इज नॉट ऑलवेज अ टुमारो.
Wednesday, October 11, 2017
Big B
आंबा आणि आईस्क्रीम न आवडणारे काही लोक या भूतलावर आहेत, पण अमिताभ आवडत नाही असं म्हणणारं कुणी माझ्या तरी ऐकण्या-पाहाण्यात नाही. (असल्यास ईश्वर त्यांना माफ करो :-) ) अप्रतिम अभिनय, जबरदस्त संवादफेक, उत्तम विनोदबुद्धी, देखणी देहबोली, काळजात रुतणारा आवाज, वेधक ड्रेस सेन्स, भाषेची अचूक जाण, पडदा भारून टाकण्याची क्षमता या सगळ्यासाठी अमिताभ एक कलाकार म्हणून आवडतोच, पण त्याहीपेक्षा पडत्या काळात आरोप, टीका होत असताना- आर्थिक तणावातही परिपक्वतेने वागणं, पुन्हा यशाच्या शिखरावर पोचल्यावर माज न करणं, या गुणांमुळे विशेष आवडतो.
सिनेमा ही फक्त गोष्ट सांगण्याची कला आहे. अमिताभने फक्त ’मासेस’वर नाही तर ’क्लासेस’वरही राज्य केलं. व्यावसायिक सिनेमाबरोबरच अमिताभचे काही पठडीबाहेरचे सिनेमे आणि अलिकडच्या काळात केलेले भूमिकांचे कमाल प्रयोग मला थक्क करतात. कलात्मकतेच्या नावाखाली प्रेक्षकांना पडद्यावरच्या अंधाराकडे डोळे फाडून बघायला लावणार्या सिनेमांच्या तुलनेत अमिताभचे सिनेमे हटके असत. व्यावसायिकता आणि कला याचा त्याने नेहमीच सुरेख मेळ घातला. हॉलीवूडची भ्रष्ट नक्कल करणारा बॉलीवूड हा शब्द वापरणं बंद केलं, उलट देशी सिनेमालाच ग्लोबल केलं. मुलभूत सुविधांच्या अभावामुळे वैतागलेल्या सामान्य ’जन्ते’ला आणि संध्याकाळच्या भाकरीची खात्री नसलेल्या पिटातल्या पब्लीकला अपार आनंदाचे कितीतरी क्षण दिले. त्यांच्या मनातल्या खदखदीला ’अॅंग्री यंग मॅन’च्या भूमिकेतून आऊटलेट दिलं. काळाची पावलं ओळखून बदलत्या जगाशी कनेक्ट राखत पुढे चाललेला हा टेक्नोसॅव्ही ’बडी’ समाजमाध्यमांवरचा सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता न होता तरच नवल. कित्येक समीक्षक त्याला चांगला अभिनेता देखील मानत नाहीत पण याचा अर्थ ’मला अजून चांगलं काम करायला हवंय’ असं नम्रतेने म्हणायला जे विशाल मन हवं त्याचंही प्रत्यंतर अमिताभने अनेकदा दिलंय.
काही लोकांना त्यांचे सगळेच सिनेमे आवडले नसतील. खरंय, शोले, डॉन, दीवार ज्यांनी डोळे भरून पाहिला, त्यांना ’लाल बादशाह’ वगैरे कसा बघवणार पण दुसर्या इनिंगमध्ये पुन्हा उत्तम भूमिका करत त्याने अस्वस्थ झालेल्या रसिकांना नि:शंक केलं. त्याचे काही राजकीय लागेबांधे अनेकांना खटकले परंतु राजकीय चिखलफेकीत तो कधीच उतरला नाही. परिस्थिती पालटल्यावर मात्र त्याने स्वत:चंच एका ’प्रॉडक्ट’ मध्ये रुपांतर केलं. ’कुछ दिन तो गुजारिएँ गुजरात में’ पासून ’नवरत्न तेल’ पर्यंत यत्र तत्र सर्वत्र अमिताभ. काही जाहिराती बघताना आता त्याने थांबावं असंही वाटतं तोच त्या जाहिरातीची पंचलाईन तो अशी काही उच्चारतो की आपल्या चेहर्यावर पुन्हा स्मित येतंच.
कलाकार हा एक चांगला माणूस असला पाहिजे अशी अपेक्षा असली तरी ती काही अट नाही. अमिताभ माणूस म्हणून अनेक मूल्यांचा नुसता विचार करत नाही तर ते कृतीतही आणतो.
’केबीसी’ मध्ये हॉट सीटवर बसलेल्या रिक्षावाल्यापासून सेलेब्रिटी पर्यंत कुणालाही अवघडल्यासारखं वाटणार नाही असं त्याचं ’स्क्रिप्ट’च्या बाहेरचं सुसंस्कृत वागणं पाहिलं की इतरांना त्याची ’उंची’ का गाठता येत नाही ते सहज लक्षात येतं. रेखाविषयी कधीही जाहीर वाच्यता न करणं त्याच्या ’तहजीब’ला शोभतं. सार्वजनिक कार्यक्रमात दोघांची उपस्थिती असताना त्यांच्यावर फ्लॅश होणार्या कॅमेर्यांच्या सूचक नजरांनाही त्याने कधी खाद्य पुरवलं नाही. आई तेजी बच्चन यांच्यावर लिहीलेला ब्लॉग आणि नात काव्या नंदा हिला लिहिलेलं पत्रं हा माणूस स्त्रियांकडे कसं बघतो याची झलक दाखवतात. ते पत्र ’पिंक’ या सिनेमाच्या प्रमोशनचा भाग होता असंही म्हटलं जातं. असेना का, पण त्यातला आशय तर त्याच्या विचारांचाच आरसा आहे. त्याच्या ब्लॉगवरचे इतर लेख वाचले की हा आशय केवळ त्याच्या लेखणीतून उतरला आहे त्यासाठी त्याला भाडोत्री लेखणीची गरज नाही हे नक्कीच लक्षात येईल. या कवीपुत्रावर शब्द किती प्रसन्न आहेत याची त्या ब्लॉगवर, तो हरिवंशराय यांच्या कविता ज्या ताकदीने सादर करतो तेव्हा, कोणत्याही व्यासपीठावर चार शब्द बोलतो तेव्हा.. पदोपदी साक्ष पटते.
काही वेळेस सामाजिक प्रश्नांवर तो सावध भूमिका घेतो असाही आरोप होतो, तेव्हा गाढव- बाप- मुलगा ही गोष्ट आठवते. प्रसिद्धीबरोबरच टीका पचवण्याची ताकद त्याने कमावली आहे.
रूबाबदारपणे संयत वागणं हा तर त्याचा यूएसपी आहे. प्रेक्षकांच्या आयुष्यात केवळ आनंद पेरणार्या या महानायकाला ७५ व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. :-)
#HappyBirthDayBigB
Tuesday, June 6, 2017
बापू
आम्ही घाबरुन- ’कुणाची?’
’आपले नाना ओ.. गंगाजल गंगाजल.. तुळशी.. घाला म्हटलं’
आम्ही -’कोणाला?’
’नानाच्या भावाला हो.. मुंबई मुंबई.. काय गर्दी ..जेमतेम भेट.. अॅ बापरे’
आम्ही अर्थ लावून घेतला. कोणतेतरी नाना शेवटचे श्वास घेत असून त्यांचा भाऊ मुंबईहून गाडीला भयंकर गर्दी असूनही कसाबसा पोचला आणि त्याची आणि नानांची भेट होताच नानांनी श्वास सोडला.
आम्ही असे अर्थ लावून घेत घेत या इसमाशी म्हणजे बापूंशी गेली अनेक वर्ष संवाद साधत आहोत. बापू घराजवळच राहतात. ते स्वत:वर फिदा असलेल्या जमातीतले आहेत. आयटीआय मध्ये शिक्षक होते, केव्हाच निवृत्त झाले आहेत. ’ड्रिल ड्रिल, कोपर्यात ए.. अस्सं, वायर वायर, अॅ बापरे’ असं करत त्यांनी कसं काय शिकवलं असेल आणि त्यातून विद्यार्थ्यांना काय कळलं असेल हे एक आम्हाला कोडंच आहे.
एकदा ते ओरडतच घरात आले. ’हत्ती हत्ती ...पोसा.. पांढरा'
आम्ही गोंधळलेल्या अवस्थेत..'मुलांना काय.. नुसती चक्कर.. इंजिन.. इंजिन बंद. अॅ बापरे त्यापेक्षा भाड्याने.. भाड्याने मस्त..’
याचा अर्थ ’मुलगा कार घ्या म्हणतो आहे, त्याचे काय जाते, काम नसले तर कारचे इंजिन खराब होते म्हणून उगाच फिरवावी लागते. म्हणजे हे पांढरा हत्ती पोसणे आहे. त्यापेक्षा लागेल तेव्हा मस्तपैकी भाडयाने गाडी घेऊन फिरावे’ हुश्श.
बापू आता समाजसेवा करतात, म्हणजे असं त्यांना वाटतं. पत्नी निवृत्त शिक्षिका. साध्या, नीटनेटक्या. चारही मुलींची लग्नं आणि मुलाचा प्रेमविवाह झालेला. इकडे ही जोडी टुकीने राहते आहे.
बापू डाय करत नाहीत. ’वय वय ..तसंच मस्त.. डाय अॅलर्जी.. नस्ता ताप..अॅ बापरे’
त्यांच्या अंगावर भरघोस शुभ्र केस आहेत. कानातूनही डॊकावत असतात, तोंडात अधूनमधून तंबाखूचा बार असतो. सावळा चेहरा, खुरटी पांढरी दाढी, मध्यम बांधा. अंगावर पांढरट किंवा पिवळा बुशकोट, तपकिरी किंवा काळी पँट. तब्येत टकाटक कारण ’रोज फिरायला.. लांब.. फ्रेश फ्रेश दिवस.. तुम्ही दिसला नाही.. उशीर उशीर.. अॅ बापरे’
फिरणं झालं की चहा घेत त्यांचं पेपरवाचन असतं. ते फक्त स्थानिक राजकारणाच्या बातम्या वाचतात. तो त्यांचा ऑक्सीजन आहे. काहीच बातमी नसेल तर ते अस्वस्थ होतात की आता एवढया मोठया दिवसाचं करायचं काय. त्यांचा स्थानिक लाडका दलबदलू नेता ज्या पार्टीत, ती त्यांची पार्टी त्यामुळे त्यांचा ह.मु बदलत असतो. त्यांना स्वत:चे मत नाही, विचार नाही. बिनबुडाच्या गडूसारखे कधी ते घड्य़ाळाकडून, कधी इंजिनाकडून ,कधी धनुष्याकडून तर कधी पंजाकडून बोलतात. त्या नेत्याच्या वाढदिवसाला वृक्षारोपण, फळवाटप वगैरे करणारी जी मंडळी असते त्यात हे आघाडीवर असतात.
’पेशंट पेशंट, केळी.. सगळ्य़ांना केळी, सपरचंद काय महाग .. रुपया पडला म्हणे ..अॅ बापरे’
वास्तविक रुपया पडला म्हणजे नेमकं काय झालं हे पोटापुरती पुरेशी पेन्शन मिळवणार्या बापूंच्या गावी नसते. लोक म्हणतात ते आपणही म्हणायचे.
सामूहिक विवाह टाईप कार्यक्रम तर त्यांचा फेवरेट. त्याच्या आयोजन मिटींगला ते जातात. सोहळ्य़ाहून आल्यावर अशीच अगम्य वर्णनं करतात. त्यातून कुणीतरी भांडी, मंगळसूत्र आणि सफारी सूट मिळतो म्हणून कसं डबल लग्नाला उभे राहिले, यांनी त्यांना कसं शिताफीने पकडलं, मंत्री कसे लेट आले, प्रत्यक्ष जोड्या किती- दाखवल्या किती, वगैरे बहुमोल माहिती तुकड्यातुकड्यातून कळते.
’समाजसेवा.. या माध्यमातून.. आपलं काय. राहिले ४ ,६ वर्ष ...भजना पेक्षा कार्य कार्य.. काय? ..अॅ बापरे’
’बेटी बचाओ’ टाईप कार्यक्रम असेल तर ते भाषण वगैरे पण देतात. झाशीची राणी, सावित्रीबाई फुले आणि इंदिरा गांधी या तिघींची नावे घेऊन झाली की
’आज या समाजात.. मुलं फारेन.. आयटी का फायटी.. अग्नीला पोचतो का..मग जवाई मुल्गाच दुसरा.. कुस्ती...पोलीस.. रनिंगमध्ये मेडल पोरीलाच. ती आपली ही जिंकली नं..कप कप.. शिकवा खूप.. अॅ बापरे’
त्यांना मेडलवाल्या पोरी, स्पर्धेचं नाव, क्रीडाप्रकार वगैरे लक्षात असणं अशक्यच. इंग्लीशशी तर ३६ चा आकडा. स्वत:च्या पोरींना मात्र यांनी जेमतेम बारावी आटोपून उजवलेलं. मुलींना साध्या शाळेत आणि मुलाला खास कॉन्व्हेंटला शिकवलेलं. वंशाचा दिवा म्हणून फक्त मुलासाठी डिंकाचे लाडू करणारं यांच घर. तरी पोरी सुस्थळी नांदत पुढे शिकल्या आणि बापूंची छाती फुगायला कारण झाल्या.
तर अशा सगळ्या इव्हेंटचे फोटो काढून घेऊन ते छापून आणणे, मग तो पेपर काखोटीला मारुन चार घरी तो फोटो दाखवणे आणि कृतकृत्य होणे हा त्यांचा एक छंद आहे. कुणी कौतुक केले की
’ख्या ख्या.. उगीच आपलं हो.. समाजाच्या माध्यमातून.. प्रेम प्रेम ..लोकांच प्रेम इतकं...अॅ बापरे’.
आता इतके भरीव कार्य करणार्याच्या वाढदिवसाला चार लोक ’हारार्पण’ करायला येणारच. त्यादिवशी बापू गुळगुळीत दाढी करुन, करकरीत कुर्ता घालून लोडाला टेकून बसतात. एखाद दुसरा गडी बुके घेऊन येतोच कारण चहानास्ता भरपूर उपलब्ध असतो. बुके घेतानाचा फोटॊ महत्वाचा.
’घ्या खा खा.. निमित्त निमित्तमात्र.. हॅ हॅ..बुके कशाला कशाला.. मिठाई पण.. अॅ बापरे’
मुलामुलींनी त्यांची सत्तरी जोरदार केली. भरपूर पाहुणॆ, हॉल, रोषणाई. जेवणाआधी भाषणं. त्यांचा जन्म ऑगस्टमधला म्हणून एका मित्राने त्यांना थेट क्रांतीसूर्य हे महान बिरुदच बहाल करुन टाकलं. मोठा केक त्यावर ७० मेणबत्त्या आणि मोठी सुरी. बर्थडे सॉंग वाजू लागले. बापू नाचू लागले. नातवंड ओरडली ’केक केक’. बापूंनी करवतीसारखी सुरी दोन्ही हातात धरुन केक कापायला सुरुवात केली. तोच मुली ओरडल्या, पप्पा फुंका. ५,७ मेणबत्त्या फुंकेतो बिचार्यांना धाप लागली. मग बाकी काम इतरांनी केले. बापूंनी भाषण केले. एरवी ते काय बोलतात हे बहुतेकांना कळत नाही त्यात भरुन आलेले डोळे आणि मन, धाप लागल्याने वेगाने घेतलेला श्वास यामुळे ते काय बोलतायत ते अजिबातच कळेना.
’जीवनाची जाणीव, उणीव की जाणीवेतलं जीवन.. बास बास.. इतिकर्तता.. शंभर वर्ष.. नको नको..अॅ बापरे’ इतकच कळलं. इतिकर्तता म्हणजे इतिकर्तव्यता असे असावे.
कोणत्यातरी सरकारी योजनेच्या अंतर्गत घराशेजारच्या खोलीत २ शिवणयंत्रे ठेवून त्यांनी २ गरजू बायकांना कामाला लावले. पुढे त्या बायका कंटाळून सोडून गेल्या तरी त्या रिकाम्या खोलीत सगळया शासकीय जयंत्या मयंत्या साजरा झाल्याच्या बातम्या बापू बिनदिक्कत छापायला पाठवून देत. त्यात कोणी भाषणात काय म्हटले याचे अजब वर्णन असे. नातलग बायकांची नावे ते अमकीने प्रस्तावना केली, तमकीने आभार मानले म्हणत छापत त्यामुळे पेपरात नाव आल्याच्या आनंदापोटी कुणी आक्षेपही घेत नसे. या बातम्यांच्या बळावर त्यांनी एक दोन पुरस्कारदेखील पदरात पाडून घेतले.
इतके सगळे करुनही समाजात आपल्याला हवे तसे स्थान अद्याप मिळाले नाही. मोठॆ मंत्री संत्री आले की आपल्याला शेवटच्या रांगेत बसावे लागते याची बापूंना रुखरुख असावी. शेतकर्यांसाठी काही तरी केल्याशिवाय हे घडणार नाही या भावनेतून ते एखाद्या मधल्या फळीतल्या स्वघोषित नेत्याला पकडून ते लगतच्या खेड्यात जाऊन शेळीपालनावर अगम्य भाषेत भाषणे देऊ लागले. मग त्यांनी एक लेख लिहिला आणि तो कसा लिहिलाय हे पाहा म्हणाले. त्यात शेळीपालनाचे फायदे १) शेती व्यत्रिक्त भरपूर कमाई २) पैसा खेळतो ३) मुलीचे लग्न ४) दारात गाडी
असे लिहिले होते. नशीब लेखात ’अॅ बापरे’ नसते. शेळीपालनामुळे मुलीचे लग्न कसे जमेल असे विचारायचे नाही. बापूंचे लॉजिकच खतरनाक. तो लेख अर्थात सर्व पेपरनी नाकारला. बापू खट्टू झाले पण तोवर त्यांना म्हशीचे दुधाचे उत्पादन वाढवणारी भुकटी विकणारा एक विक्रेता भेटल्याने ते आता त्या ’प्रकल्पा’त व्यस्त आहेत. ते ही जमले नाही तर आता निवडणुका येतीलच मग ’कार्यकर्ता.. प्रचार.. वेळ.. वेळ कुठे.. अॅ बापरे’
आयुष्यात धड कोणतीच क्रिया न केल्याने क्रियापदं त्यांच्यावर रुसली असावीत. त्यामुळे त्यांच्या बोलण्यातून ती गायब असतात.
असे असले तरी बापू मनाने सरळ आहेत. आयुष्यात कुणी दिशा न दिल्याने वेळ घालवायची साधनं शोधतायत. लोकेषणेत मन रमवतायत. एके काळी मुलींवर अन्याय केला असला तरी सुनेला मात्र लेकीसारखे वागवतात. कुणाचे भले केले नाही तरी कुणाचे कधी वाईट करत नाही. म्हणून त्यांनी ’गाळलेल्या जागा’ भरत का होईना बापूंशी संबंध आणि संवाद टिकवून ठेवासा वाटतो.




