Showing posts with label कोलाज. Show all posts
Showing posts with label कोलाज. Show all posts

Friday, August 9, 2024

वाचन -आनंदसोहळा

 चला, जरा आपल्या व्यक्तिमत्वाचा किनई विकास करूया, असं म्हणून कुणी वाचत नसतं. अपवाद म्हणून सुद्धा तशा उद्देशाने कुणी वाचत असेल तर तो सफल होणे नाही. तरीही तुमच्या आयुष्य़ातला टर्निंग पॉईंट कोणता असं कुणी विचारलं तर मी म्हणेन ’पुस्तक’ माझ्या अयुष्य़ात आलं तो. चांगली पुस्तक तुम्हाला सुखासुखी लाभत नाहीत, पण लाभली तर आपलं आयुष्य बदलू शकतं. म्हणजे अगदी काही भव्यदिव्य घडलं नाही तरी ते मस्त होतं.

मी पहिलं मोठठं पुस्तक वाचलं ते मॅक्झीम गॉर्कीच ’आई’, तेव्हा सहावी सातवीत असेन, बरचसं कळलं नाही पण एका वेगळ्याच रशियन पार्श्वभूमीच्या जगाची ओळख झाली आणि पुस्तकांशी मैत्र जुळलं ते कायमचं. मग नवे शब्द मनात रूंजी घालायला लागले. कवी लेखकांच्या प्रतिभेने थक्क व्हायला लागले. त्या वयात मला अतिशय अद्भुत वाटलेलं एक वाक्य आजही आठवतं, बहुधा ह.ना.आपट्यांच असावं. "चंद्र सूर्य यांच्या झांजा वाजवत काळ वेगाने पुढे सरकत होता" किती सुंदर प्रतिमा, चंद्र सूर्याच्या गोलाकाराला झांजेची उपमा, झांजेच्या दोन पाखी एकमेकाला चाटून जातात निनाद करतात, तसा दिवस आणि रात्रीचा सुरेल संबंध, जगाचं पुढे जाणं ..हे सगळं फक्त एका वाक्यात किती कौशल्याने गुंफता येतं. त्या वाक्यावर खिळून राहिल्याचं आठवतं. असं वाचता वाचता "हा मुग्ध सोहळा हिरवा, मौनाला अंकुर फुटले...." अशी आपली गत होते. कवयित्री अरूणा ढेरे या सृजनशीलतेची अचूक व्याख्या करतात. कवी किंवा लेखक आपल्या संजीवक प्रतिभेतून शब्दांवर अर्थाचं पाणी शिंपडून त्याला जिवंत करतात, हेच खरं सृजन. आपलं मन मोकळं करण्यासाठी आपल्याला नेमक्या शब्दांची आणि आंतरिक उर्मीची खूप गरज असते! या दोन्ही गोष्टी वाचनाने साध्य होतात. वाचन आणि रसग्रहण याचा अनुभव "अणूहुनिया तोकडा, तुका आकाशाएवढा ॥" असा असतो. 


जिव्होर्दानो ब्रुनो या विचारवंतांनी असं म्हटलंय की सुरुवातीचे वाचन हे बुशकोटाच्या पहिल्या बटणासारखे आहे. ते लावायला चुकले तर सगळा बुशकोटच वेडावाकडा दिसू लागतो. सुरुवातीला चुकीच्या सवयी लागल्या तर पुढचे सगळे वाचन आणि ज्ञानार्जन वेडेवाकडे होते. इथे पुलंचा अविस्मरणीय सखाराम गटणे आठवतो. जगणं आणि वाचणं याचा सुतराम संबंध नसेल तर गटणे सारखं भाबडं वाचन म्हणजे पुलंच्या भाषेत जीवनाच्या प्रवाहात अडकलेला साहित्याचा बोळा. आपली वाचनाची दिशा योग्य आहे की नाही हे एकदा समजून घेतलं तर आपली स्वयंनिर्णयाची शक्ती वाढून नवनव्या आशयाच्या आणि अभिव्यक्तीच्या वाङ्मयीन प्रयोगाला (बापरे!) आपण सामोरे जाऊ शकतो. पण मग उत्तम साहित्याची निवड करायची तरी कशी? याचं उत्तर नाटककार विजय तेंडुलकर देतात. आयुष्याबदलची आपली समजूत जे वाढवतं ते उत्तम साहित्य अशी नेमकी व्याख्या ते करतात. साहित्य एनरिचिंग असायला हवं. पहिल्या दोन-चार पानात ते जोखता येतं. 

बर्‍याच यशस्वी व्यक्तींमागे एखादं पुस्तक असतं. धीरूभाई अंबानी म्हणतात मी पुस्तके वाचली म्हणून माझे क्षितीज विस्तारले, मी मोठी स्वप्ने पाहू लागलो, मोठा विचार करू लागलो आणि म्हणून मी मोठा झालो. मायक्रोसोऑफ्टचे बिल गेट्स शाळेतून मधेच बाहेर पडलेले पण वाचन सोडले नाही, त्यांचे ’द रोड अहेड’ हे पुस्तक त्यांच्या प्रवासाची साक्ष देतं. विप्रोचे अझीम प्रेमजी म्हणतात नेतृत्व गुण वाढत राहण्यासाठी आणि आत्मचिंतनासाठी मी प्रवासात कायम वाचन करतो. अमिताभ बच्चनच्या अतिशय प्रभावी व्यक्तिमत्वाला उत्तम वाचनाचा भक्कम पाया आहे. हे तर सगळे सेलेब्रिटीज आहेत. अनेक चळवळीतील कार्यकर्ते मग ते समाजवादी असोत, संघाचे असोत, अंनिस चे असोत, कोणत्याही विचारधारेचे असोत पण त्यांच्यात एक समान धागा असतो, बहुतेक कार्यकर्ते म्हणतात वाचन माझा सोबती आहे. ते नसतं तर अशा काही वेळा होत्या, जेव्हा आम्ही जगावं की नाही, कशासाठी जगावं या द्वंद्वात होतो तेव्हा आमच्या जगण्याच्या अंधारवाटा या वाचनानं प्रकाशमान केल्यात. त्या सर्व ग्रंथांबद्दल, पुस्तकांबद्दल आम्ही कृतज्ञच रहायला पाहिजे. बहुसंख्य यशस्वी व्यक्तींच्या आयुष्यात पुस्तकांची भूमिका मह्त्त्वाची असली तरी वाचन हे जीवनात  यशस्वी होण्याचा हेतू समोर ठेवून करायची गरज नसते. यश हे दर्जेदार वाचनाचं बायप्रॉडक्ट आहे.


प्रेरणादायी पुस्तकं काय करू शकतात याचं एक उदाहरण म्हणजे लक्ष्मण गोळे. वयाच्या १६व्या वर्षी याने भांडणातून एकावर वस्त-याने वार केला, केस झाली, तो तुरुंगात गेला, घरच्यांनी त्याच्याबरोबरचे संबंध तोडले. इतर लहान सहान गुन्हे नावावर होतेच. नाशिकमधील तुरुंगात असताना 'माझे सत्याचे प्रयोग' हे महात्मा गांधींचं आत्मचरित्र त्याच्या वाचनात आलं. गांधींजींनीदेखील आयुष्यात चुका केल्या होत्या, मात्र त्यांनी त्या मोकळेपणी कबूल केल्या, हे त्याला त्यातून जाणवलं आणि त्यानेदेखील न्यायाधीशांना पत्र लिहून आपले गुन्हे कबूल केले. चांगल्या वर्तणूकीमुळे त्याला शिक्षेत सूट देण्यात आली. जेलमधून सुटल्यानंतर त्याने पूर्वी ज्या ज्या लोकांना त्रास दिला होता, त्या सर्वांची पत्र लिहून माफी मागितली. लहानमोठ्या नोकर्‍या केल्यावर आज तो मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून काम करतोय. त्याने लग्न केलं. मुलगी झाली. ही बातमी मटामअध्ये वाचल्याचं मला स्मरतंय. एकूण व्यक्तीला आमूलाग्र बदलवण्याचं सामर्थ्य पुस्तकांमधे आहे. 


माझे नेटवर्किंगचे विद्यार्थी म्हणत की आम्ही आपल्या क्षेत्रातलं वाचलं की पुरे ना, हे अवांतर बिवांतर वाचन हवंच कशाला? परंतु उत्तम करियर साठी तुमच्याकडे वैश्विक नजर व्हावी. शाम मनोहर या उत्सुकतेने झोपणार्‍या लेखकाचं लेखन फारसं झेपलं नसलं तरी त्यांचा ’वर्ल्ड व्ह्यू’ हा शब्द मला फार आवडतो. ही नजर पुस्तकच आपल्याला देतात. ज्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांमधे करियर करायचं आहे त्यांनी तर वेगवेगळ्या भाषांमधलं ,इंग्रजीतलं वाचन देखील वाढवायला हवं. पुस्तकांच्या साथीने चढलेल्या पायर्‍या मानसिक समृद्धीबरोबरच आर्थिक समृद्धीलाही जाऊन भिडतात. परंतु आजच्या मार्क्सवादी पिढीला हे पटवणं सोपं नाहीये. जागतिकीकरणाच्या लाटेनं आजच्या पिढीला या संतसाहित्यापासून दूर नेलं आहे. आपण कसे दिसतो त्याचा म्हणजे बहिरंगाचा विचार ही पिढी जास्त करते. सेलेब्रिटींचा आपल्यावर इतका प्रभाव आहे की स्वतःकडे पाहायचं ते इतरांच्याच डोळ्यांनी! त्यांना आपण कसे दिसतो ते महत्त्वाचं. आपण कधी आपल्या आत डोकावून पाहायचंच नाही. इथेच पुस्तकं मदतीला येतात. पुस्तकं आपल्याला जमिनीवर ठेवतात. हा दिखाऊपणा, उथळपणा आपण मुलांच्या माथी तर मारत नाही आहोत हे समजून घेण्यासाठी आधी आपण आतून विकसित व्हायला हवं. त्यासाठी वेगवेगळ्या विचारधारांबद्दल आपलं वाचन उत्तम असायला हवं. ललित साहित्य आयुष्याला पंख देतं तर वैचारिक साहित्य त्याला वास्तवाच्या जमिनीवर परत आणतं. ललित वाचक पटकन दुसर्‍याची बाजू समजून घेऊ शकतो. कारण वाचताना त्याला प्रत्येक पात्राची बाजू समजून घ्यायची सवय लागलेली असते. त्याला सहवेदना पटकन जाणवतात. एखादी कलाकृती वाचता-वाचता तो आतून बदलून गेलेला असतो. वैचारिक वाचनाच्या बाबतीत मी असं म्हणेन त्यातून व्यक्तिमत्वात ठामपणा येतो, प्रगल्भता येते. 


होरे ल्रुई बोऱ्हेसची एक कथा आहे. ‘बुक ऑफ सॅण्ड’ नावाच्या या कथेत लेखकाला दुर्मीळ बायबल मिळतं. त्या पुस्तकाला अनेक पानं असतात. त्याचं शेवटचं पान कधीच येत नाही. म्हणजे त्यातला ज्ञानाचा झरा कधीच आटत नाही. माझी मावशी अवांतर वाचन करतेच पण धार्मिक ग्रंथांचं पारायण करत असते.. मी तिला म्हणायचे की तेच ते वाचण्यापेक्षा त्या वेळात तू इतर काही उत्पादक काम का करत नाहीस, दुसरं काही का वाचत का नाहीस. तीच ज्ञानेश्वरी, दासबोध, रामायण, गीता तू कितीवेळा वाचशील आता. तिच्याशी बोललयानंतर नीटच कळलं की प्रत्येक वाचनात आकलनाचं नवं दार उघडलं जाण्याच्या शक्यता असतात. त्यातल्या नवनव्या मार्मिक ठिकाणांचा शोध लागतो. ठरावीक विचारांचं केंद्र बदललं की प्रश्न पडतात. उत्तरं मिळवण्याच्या प्रयत्नात नवं, स्वत:चं ‘चिंतन’ सुरू होतं आणि शेवटचं पान कधी येतच नाही. 


मी जरी तंत्रशाखेकडे वळले तरी वाचनाची साथ सुटली नाही. सुरूवातीला मला वाटायचं की जगातलं सार शहाणपण आहे ते फक्त पुस्तकात. हे वाचू की ते वाचू . मात्र बहिणाबाई वाचताना जाणवतं की आपल्या अवतीभवती असणारे अनेक साधे सरळ लोक आपल्यापेक्षा शहाणे आहेत, कारण  हे ‘शहाणपण’ त्यांच्या जगण्यामधून आलेलं असतं. जगण्याला भिडण्यासाठी साहित्यासारख्या मध्यस्थाची त्यांना गरज नसते. ते थेटपणे, निधड्या छातीने जगण्याला भिडतात आणि धडपडत नव्याने घडतात . किशोर शांताबाई काळ्यांचं कोल्हाट्याचं पोर, अशोक पवार सारख्या भटक्या माणसाचं जग, बलुतं, गोलपीठा, बालकांड सारखी आत्मचरित्र आपल्या काळजाला भिडतात याचं कारण ते लेखक जे ‘जगतात’ तेच लिहितात. अभिनेता भूमिका संपली की नामानिराळा होऊ शकतो पण लेखक/कवी आणि त्याचे साहित्यातून उमटणारे विचार हे कायम एकच असायला हवे ना. नाहीतर एखाद्या पर्यावरणवाद्याने स्वत:च पाण्याचा अपव्यय करावा तसं मला हे विसंगत वाटतं. 

समजा एखादा उत्तम वाचक ऑफीसमधली स्टेशनरी सर्रास घरी आणत असेल किंवा भाजीवालीने चुकून पाच रूपये कमी घेतले म्हणून खूश होत असेल तर माझ्या मते त्याचं वाचन हा निव्वळ टाईमपास आहे. चांगला वाचक नकळतपणे एक चांगला माणूस व्हायला हवा. जगण्याबद्द्लचा एकूणच विधीनिषेध वाचनातून आपल्या मनात रूजायलाच हवा .‘चांगला माणूस’ होण्यासाठी साहित्य आणि इतर सर्व कलांची काही एक ओळख, त्याचं भान असणं खूप गरजेचं आहे. सामाजिक विषयांवरची पुस्तकं यासाठी मदत करतात. मग ते राजेंद्र्सिंह यांच जोहड असो, अनील अवचटांची पुस्तकं असो, कोसला असो किंवा व्हिक्टर ह्यूगोचं ’ला मिझरेबल्स’.  


वाचनाची देणगी माणसाला लाभली नसती तर! दळवी, माडगूळकर, पाध्ये असे लेखक सांगतात की वाचनानं त्यांचं जगणं समूहलक्ष्यी बनवलं. जेवढं आत खळबळत असतं ते अभिव्यक्तीच्या पातळीवर उतरवायचं असेल तर त्याला लागणारा शब्दसाठा केवळ वाचनातून उपसता येतो. आपण जगताना वेगवेगळ्या पातळ्यांवर जगात असतो. हे उद्धृत कुठे वाचलं आठवत नाही पण त्याचं सार असं -भोवतीचं जगड्ब्याळ विश्व, असंख्य आकाशगंगा, सूर्य, चंद्र, तारे, डोंगर, नद्यानाले, झाडं, फुलं, फळं, पशुपक्षी, अफाट पसरलेला निसर्ग- आपल्याआधी अब्जावधी वर्षांपासून... आपल्यानंतरही असणारा, आपल्या आसपास वावरणारी, नात्यानी-बिननात्यांनी, रक्तानं-बिनारक्तानं, इच्छेनं-अनिच्छेनं, प्रसंग-घटनांनी, भावना-संवेदनांनी, व्यवहारांनी, सहेतुक-अहेतुक, जोडलेली-तोडलेली असंख्य माणसं.आणि आपल्या आत - स्वतःच्या आतलं एक अतिशय गूढ, अनाकलनीय, गुंतागुंतीचं असं आंतरिक विश्व ...या सगळ्यातलं अवाढव्यपण, विराटपण, विशालपण, औदार्य आणि संकुचितपण, अथांगता आणि उथळपण, सौंदर्य आणि कुरुपपण, भव्यदिव्यता आणि क्षूद्रपण, रौद्रभीषणता आणि नाजूकपण, क्रूरता आणि प्रसन्नपण, शांतता आणि कल्लोळ, नियमबद्धता आणि गोंधळ, सुसंगती आणि विसंगती, अर्थपूर्णता आणि निरर्थकत्व या सगळ्याशी आपण एकाचवेळी जोडले आणि जखडले जात असतो. हे जोडलेपण आपल्याला हवं असतं आणि नसतंही. या जखडण्यातून तर आपली सुटकाच नसते. या सगळ्या जोडण्या-जखडण्याच्या ताणतणावातून, संघर्षातून, अस्वस्थतेतून या सगळ्याचा अर्थ शोधण्याचा ध्यास आपल्याला लागतो. अच्युत गोडबोले म्हणतात तसं हे सारं आपल्याला कळलं पाहिजे असं वाटायला लागतं. वाचन नसले तर आपले अडत नाही पण ते नसले तर आपण सहजपणे घडतही नाही. जगण्याबद्दलच प्रचंड कुतूहल आपल्याला वाचनातून शमवता येतं. स्वान्त सुखाय वाचता येतं, समूहलक्ष्यी होण्यासाठी वाचता येतं, आणि जगणं सुंदर करण्यासाठी वाचता येत. 


त्यामुळे आमचा मुलगा वाचतच नाही हो, अशी तक्रार करणार्‍या पालकांनी स्वत:ला विचारावं ,आधी ते किती वाचतात? गांधीजींच्या आश्रमात एकदा एक बाई आपल्या अतिशय लठ्ठ मुलाला घेऊन गेली आणि त्यांना म्हणाली ’याला वजन कमी करण्यासाठी काहीतरी उपाय सांगा, तो तुमचं तरी नक्की ऐकेल’. गांधीजींनी तिला एक महिन्याने यायला सांगितले. ती १ महिन्याने पुन्हा गेली. गांधीजींनी त्या मुलाला ’बाळा, तू गोड खाणे बंद कर’ असे सांगितले. ती आई काहीशी वैतागून म्हणाली की मग हे तुम्ही महिन्याभरापूर्वीच का नाही सांगितले. त्यावर गांधीजी म्हणाले की ’मी स्वत: आधी गेला महिनाभर साखर सोडली, त्या मुलाला तसं कर म्हणून सांगण्याचा नैतिक हक्क मिळवला आणि आज मी त्याला हे ठामपणे सांगतो आहे’. आता हे खरंच घलं आहे का, मला माहीत नाही. ह्याचा मथितार्थ इतकाच की मुलांकडून काही अपेक्षा करण्यापूर्वी आपण स्वत: काय वाचतो आणि किती वाचतो ते तपासून पाहूया. आपलं वाचन whatsapp च्या मेसेज पुरतं मर्यादित आहे? पेपरमधल्या मुख्य बातम्यांपर्यंत मर्यादित आहे की ग्रंथालयापर्यंत पोचलय! 

माझ्या लहान भाचीला कुणी बसून आकडे म्हण असं शिकवलेलं नाही. मग लक्षात आलं की ‘एक दोन तीन चार - राने झाली हिरवीगार’ असं आकड्यांशी यमक जुळवलेलं एक गाणं तिची आजी तिला म्हणून दाखवते. शब्दांशी खेळायला जर आपण मुलांना शिकवलं तर  मुलांची आस्वादक्षमता वाढते, त्यांना कविता आवडायला लागतात. आपल्याकडे बालकवींपासून आजच्या संदीप खरेंपर्यंत उतामोत्तम कविता उपलब्ध आहेत. कमीत कमी शब्दात मोठा आशय सांगणार्‍या कविता त्यांच्यापर्यंत आपण पोचवायला हव्यात. हे कुतूहल वाढत गेलं तर मुलांना पर्यावरणासह आजूबाजूचं जग, वेगवेगळे देश जाणून घ्यावेसे वाटतात. काळ बदलला तरी देशोदेशीची माणसं आतून तशीच असतात हे सांगणारी पुलंची अपूर्वाई आणि पूर्वरंग त्यांच्या मदतीला येतील. संदर्भांच्या विपुलतेसह देशोदेशीचं पर्यटन घडवून आणणारी मीना प्रभूंची पुस्तकं इथे मदतीला येतील.

मुलं वाचतच नसतील तर या वेळात आपण त्यांना महत्वाच्या घडामोडी सांगू शकतो, पुस्तकाचा गोषवारा गोष्टीच्या रूपात सांगू शकतो. आपण त्यांना वेळ दिला नाही तर त्याची भरपाई करायला माध्यमं २४ तास उपलब्ध आहेत. मग उद्या मुलं आपल्याला म्हणतील, this मिडीया ie टीव्ही or कॉम्प्युटर, it has spent more time raising us than you have तेव्हा उशीर झालेला असेल. 


अशी वेळ निघून जाते आणि पालकांवर काय वेळ येते पाहा, "काल घरातली वीज गेली होती. कॉम्प्युटर ,टीव्ही सगळं बंद त्यामुळे मी माझ्या घरातल्या लोकांशी जरा गप्पा मारल्या आणि मला कळलं ...अरे वा...मस्त आहेत की ही माणसं !!! " एका टीनएजर मुलाची, आजच्या परिस्थितीवर नेमकं भाष्य करणारी ही प्रतिक्रिया बोचरा विनोद म्हणून सोशल नेटवर्किंग साईट्स वर फिरत असते. त्यामुळे पुस्तकांचा आजच्या घडीचा सर्वात मोठा शत्रू कोण असेल तर तंत्रज्ञान असं समाज म्हणतो ! आजच्या प्रत्येक पालकाची एक तक्रार आहे की मुलं सारखी मोबाईल, कॉम्प्युटर मधे मान खुपसून बसलेली बसतात मग ती वाचणार केव्हा. एक स्नेही म्हणाले, जे ’श्यामची आई’ वाचून मी घळाघळा रडलो, ते मुलाला वाचायला दिलं. चार पाच पानं वाचून होताच मुलगा म्हणाला ," यात काय इंटरेस्टींग आहे? यातलं लाईफ किती स्लो आहे." तेव्हा मला धक्का बसला आणि जाणवलं की आमच्या आस्वादक्षमतेत केवढी दरी निर्माण झालीय. यात चूक कुणाचीच नाही. बदललेला सभोवताल याला कारणीभूत आहे. त्या पुस्तकातल्या काळाशी, वातावरणाशी, भावनांशी हा  मुलगा आपली नाळ जुळवून घेऊन शकत नाहीये. हाच श्याम त्याला ऍनिमेशन रूपात भेटला तर तो त्याला कदाचित आवडेलही. त्यामुळे मुलं जर छापील पुस्तकं वाचत नसतील तर त्यांना ई-बुक्स बद्दल सांगायला हवं. तेवढही वाचण शक्य नसेल तर आता ऑडीओ बुक्स चा पर्यार सुद्धा उपलब्ध आहे. इंटरनेटवर कुमारवयातील मुलांना वाचनाला गोडी लावणार्‍या कितीतरी साईट्स उपलब्ध आहेत. http://www.awesomelibrary.org/Classroom/English/Literature/Elementary_Li... ह्या साईटवर रुडयार्ड किपलींगच्या 'जंगल बुक' पासून ते चार्ल डिकन्सच्या 'ए क्रिस्मस कॅरल' पर्यंत ऑनलाईन पुस्तके वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. http://www.pitara.com, पाच वर्षांपूर्वी अरविंद गुप्तांनी arvindguptatoys.com हे संकेतस्थळ चालू करून त्यावर डिजिटाईज केलेली पुस्तके ठेवायला सुरुवात केली. आणि आजमितीला एक हजारच्यावर दर्जेदार पुस्तके ह्या संकेतस्थळावर निःशुल्क उपलब्ध आहेत. शिक्षणशास्त्र, जागतिक शांतता, पर्यावरण, विज्ञान-गणितातले प्रयोग, उत्तम बालसाहित्य अशा अनेक विषयांवरची पुस्तके इथे आहेत. 

http://www.arvindguptatoys.com या साईट वर हिंदी, मराठी आणि इंग्रजी पुस्तकांचा खजिना आहे. ब्रिटीश काउंन्सीलच्या साईटवरचा बालविभाग http://www.britishcouncil.org/kids अत्यंत वाचनिय आणि माहितीपूर्ण आहे. थोडक्यात वाचनाची आवड निर्माण करणं आणि जोआपसणं हे कॉम्प्युटरच्या मदतीने सहज शक्य आहे. काळाबरोबर मनोरंजनाची माध्यमं बदलणार हे आपण स्वीकारतो मग वाचनाची माध्यमं पारंपरिकच हवी हा अट्टाहास का! 


अर्थात हे खरय की हातात पुस्तक घेऊन वाचणं आणि डिजीटल वाचन यात खूप फरक आहे. कॉम्प्युटर वर टाईप करण्यापेक्षा हातात लेखणी धरून लिहीणं हा एक उत्कट मानसशास्त्रीय अनुभव असतो. हेही खरं आहे की पुस्तकातले शब्द वाचून, त्याचं आकलन होऊन त्यातून ते चित्र, त्यातली पात्र आपल्या मनावर उमटून मग डोळ्यासमोर उभी राहणं, ती आपण अनुभवणं आणि वाचत जाताना स्वत:मधे वेगळ्या विचाराचं बीज रूजताना पाहाणं.. यातला आनंद, थरार आजची न वाचणारी किंवा जेमतेम वाचणारी पिढी समजू शकत नाही, आजच्या ’इन्स्टंट’ ज्ञान आणि मनोरंजनाच्या धबधब्याखाली यातलं काही अनुभवता येत नाही. नाही म्हणायला आता परीकथा, पौराणिक कथा, देशी-विदेशी लोककथा मल्टीमिडीया सीडीज, कार्टून नेटवर्क वर देखण्या रूपात मुलांसमोर अवतरतात. कदाचित त्या त्यांना अधिक छान समजतात. कमी वेळात खूप मोठा पट मुलांसमोर उलगडतो. पण त्यात दोन धोके आहेत, सगळं दृश्य समोर असल्याने मुलांच्या कल्पनाशक्तीला पुस्तकातून मिळतो तसा वाव न मिळणं आणि मुलांचं माध्यमांच्या आहारी जाणं. 

कवी गुलजार म्हणतात.. 

"जुबान पर जायका आता था जो सफहे पलटने का

अब उंगली क्लिक करने से बस इक झपकी गुजरती है

वो इल्म (ज्ञान) तो मिलता रहेगा आईंदा भी, लेकिन .....

किताबों से जो जाती राब्ता था ,कट गया है "

हे कटू सत्य स्वीकारतानाच वाचनाचं माध्यम बदलतं आहे याची आपण आता सकारात्मक नोंद घ्यायला हवी. 

भाषाविकास, मानसिक- वैचारिक विकास व्हावा, निरीक्षणशक्ती, आकलन आणि जगाबद्दलची-जीवनाबद्दलची समज वाढावी हा वाचनाचा हेतू तत्वत: असायला हवा पण निखळ आनंद मिळवणं हाच त्यामागचा खरा हेतू. मग ते छापील पुस्तक असो किंवा किंडल, इ बुक, ऑडीओ बुक,व्ह्लॉग सारखं डिजीटल माध्यम, छापील वर्तमानपत्र असो किंवा त्याची इंटरनेट आवृती, त्याच्या बाह्यस्वरूपापेक्षा महत्वाचा आहे त्यातला आशय. तो वाचकांपर्यंत पोचला म्हणजे झालं. वाचन हा स्वतःशीच साजरा केला जाणारा आनंदसोहळा आहे. त्या तरी कोणाशीही स्पर्धा संभवत नाही. स्वतःच्या साथीने गायला पाहिजे असा हा राग आहे. 


Wednesday, February 1, 2023

साहित्य संमेलन आणि तरूणाई

वर्धा येथे होत असलेल्या ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर प्रश्नसंच तयार करून मी काही स्थानिक, काही परिचयातील ,काही समाजमाध्यमातून ओळख झालेल्या तरुण तरूणींशी संवाद साधला. 

कला-वाणिज्य पदवी, एलएलबी, अभियांत्रिकी इ. शाखांचे हे विद्यार्थी आहेत. काही स्पर्धा परिक्षा देणारे, काही नोकरी करणारे आहेत. 

काही जणांना कसले तरी संमेलन वर्ध्याला होते आहे हे माहित होते तर काहींना याचा पत्ता नव्हता. स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांना या संमेलनाचे अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर आहेत  हे माहित होते तसेच त्यांच्याविषयी माहिती होती. एकदोघांना वर्धा संमेलनात पुस्तकांच्या स्टॉल्सला भेट द्यायची होती. एका यूट्यूबरने’तिथे व्हिडिओ करू दिला तर मी जाईन’, असे उत्तर दिले.

एकीने सांगितले, " मला एकदा कवीकट्ट्यावर संधी मिळाली होती. त्यात कवींची इतकी गर्दी होती की माझा नंबर कधी येईल या गडबडीत मी  इतर कार्यक्रम पाहू शकले नाही. "

एकाने त्याच्या गावातील संमेलनात एक कार्यशाळा केल्याची आठवण सांगितली. परिसंवादांबाबत बहुतेकांना फारशी माहिती किंवा रस नव्हता. 


यंदाचे संमेलन अगोदरच झाले असून त्याचे अध्यक्ष  नागराज मंजुळे होते व त्यात त्यांनी भाषेच्या शुद्धतेविषयी काहीतरी वादग्रस्त वक्तव्य केले असल्याचे एक जण म्हणाला. 

मंजुळ्यांचे ते वक्तव्य संमेलनातले नसून ‘मुंबई टाइम्स कार्निव्हल’ मधले होते असे मी सांगितले. 

एकीने विचारले ,"गेल्या महिन्यात मुंबईला झालं ते काय होतं मग?" ’ते राज्य सरकारने आयोजित केलेले ’विश्व मराठी संमेलन’ होते असे मी सांगितले. 

"मग वर्ध्याचे आयोजक कोण आहेत ?" यावर मी ’अखिल भारतीय साहित्य महामंडळ’ असे सांगितले. 

यावर काही जणांनी ’अशी एकूण किती संमेलने असतात’ असे विचारले.  

’विद्रोही संमेलने असतात. जाती धर्मनिहाय असतात. बाल, कुमार, युवा, शिक्षक, कामगार आणि स्त्रियांचीही असतात. बोलीभाषांची असतात. वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या स्तरावर अशी संमेलने आयोजित करत असतात. अ.भा.साहित्य महामंडळ ही महाराष्ट्रातील चार प्रादेशिक संस्थांची शिखरसंस्था आहे म्हणून या संस्थेच्या संमेलनाची अधिक चर्चा असते’, असे मी सांगितले.

प्रश्नसंच त्यांनी तयार केला असून उत्तरे मी देते आहे असे या संवादाचे स्वरूप उलट झाले होते.

हे तरूण समस्त मराठी युवा पिढीचे प्रतिनिधीत्व करतात असा माझा दावा नाही पण त्यांच्या प्रतिक्रिया चिंतनीय आहेत. प्रस्थापित साहित्य संमेलनांविषयी युवा पिढीला अनास्था वाटते,  हे सत्य त्यांच्या संमेलनातील जेमतेम उपस्थितीवरून सहज लक्षात येईल. संमेलने बहु झाली या स्थितीमुळे ते गोंधळले आहेत. या वेगळ्या चुली नसून हे साहित्याचेच उपप्रवाह आहेत, हे त्यांना समजावून सांगण्याचे आव्हान आणि जबाबदारी त्या त्या आयोजकांची आहे.  

तरूणांचा वरचा वर्ग इंग्लीश बेस्ट सेलर्स, गॉसिप मासिकं वाचतो. ती ही किंडलवर. संमेलन वगैरे त्यांच्या गावीही नाही. मध्यमवर्गी तरूण समाज माध्यमावर काय ते वाचतात, बघतात. वेब मालिका पाहतात. करियरचं दडपण त्यांना वाचनाकडे गांभीर्याने पाहू देत नाही. निमशहरी किंवा खेडेगावात पदवी घेत असलेल्यांना दर्जेदार शिक्षणाअभावी किंवा आर्थिक तणावामुळे सकस साहित्याची गोडी लागत नाही. लागली तरी पदरमोड करून संमेलनास जाणे त्यांना परवडत नाही.  

मग साहित्य संमेलनाला जाणारे लोक नेमके कोण असतात? 

पन्नाशीला पोचल्यावर स्थैर्य आलेले किंवा निवृत्त मध्यमवर्गीय पुस्तकप्रेमी, भाषाविषयाचे स्वयंसेवक विद्यार्थी, प्राध्यापक, समाज माध्यमावर लाईक मिळू लागल्याने आपल्या कविता, लेखनावर संमेलनाच्या मान्यतेची मोहोर लागावी अशी आकांक्षा असलेली मंडळी, उपस्थिती अनिवार्य असलेले आयोजक संस्थेशी संबंधित लोक, स्वागताध्यक्षांचे निकटवर्तीय आणि प्रतिकूल स्थितीतही साहित्यविश्वाच्या संपर्कात असलेले मूठभर तरूण. 

तरूणांशी बोलल्यावर जाणवले की साहित्य संमेलने युवकांना आपली वाटावी व सर्वसमावेशक व्हावी यासाठी प्रस्थापितांच्या विचार पद्धतीत बदल होणे आवश्यक आहे.

पहिला बदल म्हणजे कागदावर छापून येते तेच साहित्य नसते हे स्वीकारायला हवे. साहित्य म्हणजे भोवताल टिपणे. त्याचे स्वरूप छापील पुस्तकांव्यतिरीक्त  स्कीट्स, विविध सादरीकरणांची संहिता, समाज माध्यमावरील लेखन, ब्लॉग्ज, व्ही-लॉग्ज, मुलाखती किंवा मीम असेही असू शकते. 

चांगल्या साहित्यनिर्मितीसाठी संमेलनांतर्गत आयोजित पटकथा, गीत-गजल-ब्लॉग लेखन, डिजिटल पब्लीकेशन यासारख्या कार्यशाळांना अधिक प्रतिसाद मिळवण्यासाठी त्यांच्या प्रचारावर भर द्यावा.  संमेलनातील निरर्थक वादांपेक्षा वृत्तपतत्रातून या विषयीच्या बातम्या प्राधान्याने याव्यात. 

अगम्य विषयावरील परिसंवादात, हितसंबंध जपण्यासाठी अनेक वक्त्यांची वर्णी लावून श्रोत्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहिला जातो. अपवाद वगळता निवडीला गुणवत्तेचा निकष आहे की नाही अशी शंका यावी असे सुमार वक्ते, रटाळ कवी रसिकांच्या वेळेचा अपव्यय करताना दिसतात. यावर अंकुश यावा.

संमेलनपूर्व राजकीय कलगीतुरे हे देखील तरूणांनी संमेलनांकडे पाठ फिरवण्याचे मह्त्वाचे कारण आहे. राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित आणि साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा आता मागे घेतला असला तरी त्यांनी राजकीय हस्तक्षेपाविषयी स्पष्ट नाराजी व्यक्त केली होती. संमेलनासाठी निर्धारित सरकारी निधी वाढावा म्हणजे संमेलनाला राजकीय नेत्यांच्या अधीन राहावे लागणार नाही. राजकीय सहकार्य अवश्य असावे पण राजकीय विश्लेषक नसलेल्या साहित्यिकांनी व्यासपीठाचा वापर आपल्या राजकीय भूमिकेच्या प्रदर्शनासाठी करू नये. राजकीय हेव्यादाव्यांचा वीट आलेल्या तरूणाईला इथेही फक्त तेच ऐकवायचे असेल तर त्यांनी संमेलनाला का यावे ! 

या तरूणांशी बोलताना लक्षात आले की त्यांच्या विरोधातील आधीच निष्कर्ष ठरवलेले तथ्यहीन विषय संमेलनातील परिसंवादासाठी घेतले तर त्यांना ते आवडणार नाहीत. उदा:  समाजमाध्यमांचे नकारात्मक परिणाम वगैरे. त्यांचे म्हणणे, आम्हाला मोबाईलच्या अतिवापरावरून उपदेश करणारी मधली पिढी स्वत:च व्हॉट्सअ‍ॅपच्या आहारी गेली आहे तेव्हा त्यांनी दुटप्पी वागू नये. आमची पिढी ऐकणारी आणि (व्हिडीओ, रील्स) बघणारी पिढी आहे. वाचन म्हणजे हातात पुस्तक घेऊन वाचणे एवढेच नव्हे. जग पॉडकास्ट किंवा ऑडियोबुक्स आणि चॅट-जीपीटीपर्यंत पोचले असताना बहुसंख्य संमेलनांचे आयोजक एक तर ’स्वामी- मृत्युंजय, पुलं-वपु” मध्ये किंवा दुसरीकडे नकारात्मकतेत व अभिजन-बहुजन वादात अडकून पडलेले दिसतात. 

याचे प्रतिबिंब समाजमाध्यमावरही पडत असले तरी लोकल ते ग्लोबल असा त्याचा प्रचंड आवाका आहे. माहिती आणि ज्ञानाचे विकेंद्रीकरण करण्यात समाजमाध्यमाची भूमिका महत्त्वाची आहे. तिथे अनेक लेखनविषयक स्पर्धा होत असतात. तरूणांचे साहित्य कट्टे फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप वर आहेत. कला प्रदर्शनाचे कट्टे इन्स्टाग्राम व यूट्यूबवर आहेत. अधिक गंभीर चर्चा रेडीट व कोरावर घडत आहेत. इथे सुमार लिहिणारे अनेक असतील पण बोलीभाषेत उत्तम लिहिणारे निमशहरी लेखक इथे आहेत तसेच प्रमाण भाषेत सकस लिहीणारे शहरी तरूणही. त्यांची ताकद, त्यांची प्रतिमा त्यांना आलेल्या संमेलनाच्या आमंत्रणावर ठरत नसून त्यांची लेखणी ठरवते. इथे थेट प्रतिसाद मिळतो तशी टीकाही झेलावी लागते. संमेलनांनी आपल्या कक्षा रूंदावून या सार्‍याला सामावून घेतले तर तरूणांचाही संमेलनांकडे ओढा वाढेल. 

लोकशाही व्यवस्था बदलण्याचे आणि विचाराची पोच अमर्यादित स्तरावर नेण्याचे सामर्थ्य या माध्यमात असल्याने यावरील चांगल्या लेखनाला साहित्याचा दर्जा दिला जावा अन्यथा नुकत्याच लोकप्रिय होऊ लागलेल्या ताज्या टवटवीत सोशल मिडिया संमेलनांनाच काय ते भवितव्य उरेल व जुन्या पठडीतली संमेलने कालबाह्य ठरतील. 

वर्धा संमेलनातील कार्यक्रम बघता यातील बहुतेक अपेक्षांना न्याय देण्याचा आयोजकांनी मनापासून प्रयत्न केलेला दिसतो आहे. संमेलनाध्यक्षांच्या भाषणावर संमेलनात पहिल्यांदा चर्चा घडते आहे. मुद्रित माध्यमांच्या संपादकांनी समाजमाध्यमाबद्दल बोलणे, लेखकांनी थेट व्यक्त होणे, मुक्तसंवाद, परिसंवादात वंचित समाजाच्या साहित्यापासून ललितेतर साहित्यापर्यंत व प्रबोधन परंपरेपासून अनुवाद व स्त्री-पुरुष तुलनेपर्यंतचे  वैविध्य हे संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. चांगल्या साहित्यविषयक चळवळी हे समाजाच्या जिवंतपणाचेच नव्हे तर सक्रियतेचे लक्षण आहे. अशा उपक्रमांमधून समाजातले साचलेपण दूर होते. वैचारिक जळमटे दूर होऊन नव्या विचारांची वाट मोकळी होते. दक्षिण भारतीय , हिंदी व बंगाली साहित्यवर्तुळात हे घडताना दिसते आहे.

मराठी साहित्यक्षेत्रात देखील कोणत्याही संमेलनाचे मंडप काढल्यानंतर पुरस्कारांचा मोह, वैयक्तिक महत्वाकांक्षा, उत्सवप्रियता, लागेबांधे या सगळ्याच्या पलिकडे जाऊन जागल्याचं काम करणारे साहित्यिक आणि रसिकांचे निखळ साहित्यप्रेम तळाशी उरायला हवे. जागतिक बदलांचे वारे इथवर पोचायला हवे तरच तरुणांना साहित्य संमेलने हवीशी वाटतील आणि आणि ती त्यांच्यासाठी दिशादर्शक ठरतील.

https://www.evivek.com/Encyc/2023/2/1/Akhil-Bharatiya-Marathi-Sahitya-Sammelan-2023-and-youth.html?fbclid=IwAR15eOevuHKKYhrIyOtn04ZlhwM6qyrhDorFmn9-VUHyg8MxvM4pIP8kNag

साप्ताहिक विवेक - साहित्य संमेलन विशेष अंकातील ’युवाकट्टा’ या सदरातील लेख 

Saturday, November 12, 2022

पूर्ण स्वयंपाक मुलांनी करायचा

 

1st Attempt

होस्टेलमधून घरी आल्यावर प्रत्येक सुट्टी (अगदी प्रिपरेशन लीव्ह असली तरीही) संपायच्या आत एक दिवस (निदान) एक वेळचा #पूर्णस्वयंपाकमुलांनी_करायचा असा मी फतवा काढला. "ए जा बॉ आई, तू फारच सिरियसली घेतेस प्रत्येक गोष्ट. आम्ही जनरल हो म्हणालो होतो." म्हणत त्यांनी यंदाही कुरकूर केली. "ते जनरल बिनरल मला काही माहित नाही, उद्या सकाळी पोळ्यांच्या मावशी अनायासे येणार नाहीयेत तर उद्याचा सकाळचा स्वयंपाक तुम्ही करायचा आहे. शिवाय नुसती बटाट्याची भाजी आणि वरण भात चालणार नाही. ते करून झालंय मागच्या वेळेला. "असं मी ठणकावलं."पुढच्या सुट्टीत करू नं! परवा पावभाजीला सगळं मीच तर चिरुन दिलं होतं", "आणि बिर्याणी केलीस तेव्हा मी सगळी मदत केली होती त्याचं काय! हे पूर्ण स्वयंपाक करायचं काय काढलंय" वगैरे निषेधाचे सूर सुरु झाले होते.  

मग त्यांना सांगितलं की आपण मदत करण्याविषयी बोलत नसून संपूर्ण स्वयंपाक करण्याबद्दल बोलतोय. अगदी मेनू ठरवण्यापासून ते मागचं आवरण्यापर्यंत सगळं तुम्ही करायचं आहे. "अगं पण आता यू ट्यूबवर पाहून करता येतं सगळं वेळ आली तर""ते एडिटेड असतं, बारीक बारीक गोष्टी स्वत: केल्याशिवाय कळत नाहीत, यावर आता चर्चा बंद म्हणजे बंद"

आता ही बाई ऐकतच नाही हे पाहून त्यांनी बाबा, आजी, आजोबांचा आधार घेऊन पाहिला. त्या त्रयीने माझ्याकडे अलका कुबल टाईपचा भावपूर्ण कटाक्ष टाकला पण मी दुष्ट बाई होत म्हटलं ," इतकी हृदयात कालवाकालव होण्याइतकं स्वयंपाक करायला लावण्यात काहीही गंभीर नाहीये. आज मी तिकडे पाऊलही टाकणार नाहीये, हां, फक्त कन्सल्टन्ट म्हणून त्यांना मी उपलब्ध आहे"

इलाजच नाही म्हटल्यावर मुलांनी फ्रीजमध्ये डोकावून पाहिलं असावं. 

"यात फक्त तोंडली आहेत आपल्याला करणेबल"

" मॅड त्याला दोडकं म्हणतात" वगैरे तारे आपसात तोडले गेले. अखेर ’तोंडलं व दोडकं दोन्ही नसलेल्या गिलक्याची भाजी, पोळी, बीटाची कोशिंबीर, आमटी आणि भात’ असा त्यांचा मेनू ठरला. 

मी जवळच्या खोलीत जाऊन लॅपटॉप घेऊन एकीकडे कानोसा घेत कामाला सुरुवात केली. 

जगातली आय मीन घरातली बहुतेक भांडी ओट्यावर आली. टडाम टुडूम आवाज येत होते. अस्वस्थ होऊन आजी एक चक्कर मारून गेल्या असाव्यात कारण  मुलांनी बाणेदारपणे आजीला "आज्जी इकडे येऊ नकोस बरं" म्हणून बजावल्याचं ऐकलं. एक गिलकं चिरून मला अप्रूव्हलसाठी दाखवण्यात आलं.  माणशी २ पोळ्या धरल्या तर किती कणिक लागेल याची विचारणा झाली.  प्रत्येकी ३ पोळ्या करणं कंपलसरी केलं होतं. जरा दया आल्याने "बाकीच्या मी करीन" असा मी दिलासा दिला पण त्याला स्पष्ट नकार मिळाला.

 फोडणीसाठी गॅसवर ठेवलेलं तेल तापत आलं तरी भाजीला योग्य चमचा सापडत नसावा. "तापलं  तापलं, आता त्या बटाट्याच्या भाजीच्या सीक्वेन्सनेच सगळं टाकू का, आई, लवकर सांग हे फुटतंय" -लेक ओरडला." त्याला तडतडणं म्हणतात, आधी गॅस कमी कर , मोहरी जळेल"- बाहेर येत मी.

साधारण या चालीवर भाजी झाली. यात दाण्याचं कूट, डाळी काय काय घालता येऊ शकतं, त्याने चवीत काय फरक पडतो याची, दाल फ्राय येत असल्याने त्यात आणि आमटीत काय फरक असतो याचीही चर्चा झाली.कुकर आधी लावला असता तर एकीकडे भाजी आणि दुसरीकडे आमटी टाकता आली असती , कणिक मुरली असती अशी त्यांची ट्यूब पेटली. 

पहिल्या पोळीचा खाकरा झाला, दुसर्‍या पोळीने तवा सोडायला नकार दिला, तिसरी बरी झाली. चौथी फुगली याचा आनंद उड्या मारून साजरा करण्यात आला तेव्हा बाजूला भाजी शिजतेय तिकडे अधूनमधून पाहायचे असते याची मी ओरडून आठवण केली. भांड्यांच्या ढिगात चिमटा अदृश्य झाल्याने ’आई झाकण कसं काढू , झाकण लावतातच कशाला" प्रश्न आले. कपड्याने झाकण उचलताना हातावर थोडी वाफ आली म्हणून स्वत:भोवती गिरकी घेऊन एकाचा हाई हुई करत झुंबा करून झाला. हाताला लागू न देता बीट किसण्याचे प्रात्यक्षिक झाले. कोणत्या कोशिंबिरीत काय काय घालायचं यावर चाललेल्या बडबडीचे, मध्येच एकमेकांवर डाफरण्याचे , खी खी करण्याचे, झाकण, वाट्या टणटणत खाली पडण्याचे आवाज ऐकू येत होते. कोणत्या पदार्थासाठी कुकरच्या किती शिट्ट्या आणि नंतर गॅस बारीक करायचा का, असा मी बसलेल्या खोलीत डोकावून प्रश्न विचारण्यात आला. यावरची वैज्ञानिक खडाजंगी फेसबुकवर वाचा सांगितलं तर ’बरंय इन्स्टावर असलं काही नसतं’ असं उत्तर आलं.  

"ओट्यावरचा राडा आवरला का , ओला कचरा बिनमध्ये टाकला का"-यावर काहीच उत्तर आलं नाही.  

"चला लवकर सगळे, बनलं जेवण"  मुलांनी ऐटीत घोषणा केली.

"त्याला ’स्वयंपाक झाला किंवा केला’ असं म्हणतात. मग हे पदार्थ आपण खाल्ले की त्याला ’जेवण झालं’ असं म्हणतात"

 "बरं आता ग्रामर नको बॉ आई, कसा झालाय ’स्व  यं  पा  क’ ते सांग"

व्याकरण, स्वयंपाकाशी जुळलेली कितीतरी क्रियापदं- शब्द, पदार्थांची नावं, भाज्या डाळी ओळखता येणं, किती प्रमाण घ्यायचं त्याचा अंदाज येणं, केलेलं नीट वाढता येणं हे सगळं ते कधीतरी शिकतील, न शिकतील, पण त्याचा त्यांना आनंद घेता यायला हवा. नाही घ्यावासा वाटला तरी स्वयंपाक म्हणजे खायचं काम नाही हे तरी कळावं. मध्ये मी त्यांना एक व्हिडिओ फॉरवर्ड केला . भाकरी करून द्यायला आई-बाप जवळ नाही म्हणून शाळा सोडायची वेळ आलेली उसतोडणी कामगारांची मुलं होती त्यात. त्या लहानग्यांना भाकरी शिकवतानाचा व्हिडिओ पाहून भरून आलं. प्रत्येकाला आपल्यापुरती तरी भाकरी थापता आली पाहिजे हे खरंय. 

स्वयंपाक खरंच चांगला झाला होता. बाबा आणि आजी आजोबांनी अगदी बोटं चाटत प्र चं ड आणि मी थोडंफार कौतुक केलं. "संध्याकाळी तुम्ही म्हणाल ते करीन जेवायला" अशी मी रिटर्न गिफ्ट ऑफर केली. मुलांनी जेवताना कॅलेंडरकडे पाहिलं. पुढच्या सुट्टीला किती वेळ आहे ते पाहत असावेत. तेव्हा काय मेनू सांगावा ते विचारीन इकडे  😊

Wednesday, June 29, 2022

आयआयटी_बीआयटी : Book Review


 #पुस्तक_परिचय आयआयटी_बीआयटी #महाराष्ट्र_टाइम्स

IIT मधून इंजिनियर होणं काय असतं , मुळात इंजिनियर होणं म्हणजे काय याविषयीच्या संकल्पना स्पष्ट करणारं, IIT बॉम्बे (पवई) ची सहल घडवत तिथल्या अतरंगी प्रेरणादायी घडामोडींच वर्णन करणारं
सुकन्या पाटील या टॉपर IITean ने लिहिलेलं रंजक पुस्तक.

नंदन नीलकेणी, रोहिणी गोडबोले, सुधींद्र कुळकर्णी, अच्युत गोडबोले, ओला कॅब्जचे भाविश अग्रवाल तसेच दिवंगत नेते मनोहर पर्रीकर ही नावे आपल्या अगदी ओळखीची आहेत. आपापल्या कार्यक्षेत्रात या सगळ्यांनी उत्तुंग झेप घेतलेली आहे. या सगळ्यांमध्ये एक समान धागा आहे, तो म्हणजे ही व्यक्तिमत्वे घडली आहेत आयआयटी बॉम्बे (पवई) मधून. तांत्रिक शिक्षणासाठी आयआयटी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) राष्ट्रीय स्तरावरच नव्हे, जगभरात नावाजली गेलेली महत्त्वाची संस्था आहे हे विदित आहे. पण केवळ कुशल अभियंत्यांची फौज तयार करणे इतकेच या संस्थेचे संकुचित ध्येय नाही.
मग ’आयआयटी बॉम्बे’ हे प्रकरण नेमके आहे तरी काय !
तिथून बाहेर पडताना जग बदलून टाकण्याच्या आकांक्षेने झपाटलेल्या अभियंत्यांना अशी कोणती उर्जा ही संस्था देते, याचे उत्तर ’आयआयटी बीआयटी’ या पुस्तकात मिळते.
याच संस्थेच्या मुशीतून घडलेली, दोन सुवर्ण आणि एका रजतपदकासह आयआयटी बॉम्बेतील (पवई) सर्वोच्च मानाचे समजले जाणारे ’इन्स्टिट्यूट गोल्ड मेडल’ पटकावणारी जळगावची सुकन्या पाटील या पुस्तकाची लेखिका आहे.
सध्या ’मायक्रोसॉफ्ट’मध्ये उच्चपदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत असलेली सुकन्या ही ग्रामीण भागातून पुढे आलेली, मराठी माध्यमातून शिकलेली, बुद्धीमान, विचारी, निसर्गप्रेमी आणि मिनिमलिस्टीक तरुणी. साहजिकच ती पुस्तक लिहिते तेव्हा ते फक्त ’आयआयटी मध्ये प्रवेश कसा मिळवावा’ किंवा ’जेईईची तयारी कशी करावी’ हे सांगणारे गाईड नसते. आयआयटी म्हणजे ’ग्लोबल संधी’, आयआयटी म्हणजे गलेलठ्ठ पॅकेज, आयआयटी म्हणजे ’लाईफ बन गयी’ अशी प्रतिमा असल्याने तिथे प्रवेश मिळवणे ही अनेक भारतीय विद्यार्थ्यांची महत्वाकांक्षा असते. या ध्येयाने पछाडलेल्यांवर ’कोटा फॅक्टरी’ सारख्या वेबमालिका देखील तयार केल्या गेल्या आहेत.
प्रचंड प्रयत्न करूनही थोडक्यात संधी हुकली तर निराशेच्या गर्तेत जाणार्यांची संख्याही कमी नाही. मुळात प्रवेश परिक्षा देणार्यांपैकी किती मुले ’इंजिनीअर होणे’ म्हणजे काय हे आधी समजून घेतात!
सकारात्मक विचार करणारा माणूस म्हणतो - पेला अर्धा भरला आहे.
नकारात्मक विचार करणारा माणूस म्हणतो - पेला अर्धा सरला आहे.
हाडाचा इंजिनीयर म्हणतो - एकंदरीत पेला गरजेपेक्षा दुप्पट आकाराचा आहे.
लॅटिनमध्ये इंजिनिअम म्हणजे नैसर्गिक क्षमता, गुणवत्ता. नैसर्गिक संसाधनांचा आणि वैज्ञानिक संकल्पनांचा कल्पक वापर करून अवघड समस्या सोडवणे, अस्तित्वात नसलेल्या गोष्टी साकार करणे म्हणजे इंजिनीअरींग. अशी वस्तुनिष्ठ ’व्हिजन’ ठेवून ’इंजिनीअर’ होणे, त्यातूनही ’आयआयटी’ तून इंजिनीअर होणे याचे वेगळेपण सहजतेने सांगत होतकरुंना या क्षेत्राविषयी स्वच्छ नजर देणार्या वाटाड्याचे काम सुकन्याचे ’आयआयटी बीआयटी’ हे पुस्तक करते.
’थ्री इडिय़ट’ सारख्या चित्रपटातून नव्या पिढीच्या ’पॅशन’चे महत्व पालकांना समजावण्यात आले आहे. ’तुमची स्वप्ने मुलांवर लादू नका, त्यांना त्यांची स्वप्ने पाहू द्या’ वगैरे त्यांना हल्ली सतत सांगितले जाते आहे. प्रत्यक्षात पॅशनला स्मरणशक्ती, तर्कशक्ती, कल्पकता, सामान्य ज्ञान आणि विवेक यांची जोड असेल तरच ती परिपूर्ण बुद्धीमत्ता. अन्यथा नुसत्या स्वप्नांना अर्थ नसतो. इथे आयआयटी बॉम्बे सारखी संस्था मह्त्वाची ठरते कारण तिथे या सगळ्या पैलूंची मशागत होते. यासाठी आयआयटी उत्प्रेरकाचे काम कसे करते, तिथे शिक्षण घेण्य़ाकडे किती वेगवेगळ्या पद्धतींनी पाहिले जाते याची खुमासदार उदाहरणेही या पुस्तकात लेखिका देते.
’मला तिथे माझे स्वत्व गवसले’ असे लेखिका म्हणत असली तरी हे तिचे आत्मचरित्र वगैरे नाही. ती या पुस्तकातून ’आयआयटी बॉम्बे’ची सहल घडवून आणते. तिथला निसर्गरम्य परिसर, वैविध्यपूर्ण होस्टेल लाईफ, तिथल्या कला, क्रीडा, तांत्रिक, उद्योजकीय, सांस्कृतिक घडामोडी इ. विषयी सांगते. आत्मविश्वास वाढवणारा इंग्लीश लर्निंग प्रोग्राम, उद्यमशीलतेचे धडे देणारा ऑन्त्रप्रेन्युअर सेल, तंत्रक्षेत्राची क्षितीजे रुंदावणारा टेकफेस्ट, व्यवस्थापन कौशल्याची कार्यशाळा म्हणावा असा प्रसिद्ध ’मूड इंडिगो’ यांसारख्या भन्नाट उपक्रमांची माहिती देते. लॉजिकल रिझनिंग, स्ट्रक्चर्ड थिंकिंग ही कौशल्य इथे कशी विकसित होतात याविषयीही ती रंजक पद्धतीने सांगते.
एका बाजूला इंजिनिअर होण्याची आणि दुसर्या बाजूला माणूस म्हणून घडण्याची सर्वसमावेशक प्रक्रिया हे अंगभूत वैशिष्ट्य असलेल्या ’आयआयटी बॉम्बे’च्या पार्श्वभूमीवर लिहिलेले हे पुस्तक. ते विद्यार्थ्यांची जाण तर वाढवतेच पण आपल्या पाल्याच्या इंजिनियरिंगच्या पदवीच्या कागदाकडे डोळे लावून बसलेल्या पालकांना नवे भान देते.
मराठीत या स्वरुपाचे आणि अशा विषयावरचे हे बहुधा एकमेव पुस्तक आहे.
पूर्वप्रकाशित : #मटा नागपूर edition 29 जून

Monday, May 30, 2022

एका पुस्तक प्रकाशनाची गोष्ट

 मी कार्यक्रमाच्या हॉलमध्ये प्रवेश केला तेव्हा जिच्या हस्ते पुस्तक प्रकाशन होतं ती माझी आवडती लेखिका-कवयित्री मैत्रिण बोलायला नुकतीच उभी राहिली होती. चला, म्हणजे आधीचे सोपस्कार झाले असावेत. ज्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन होते त्या नवलेखकाच्या नातलगांनी आमचे मनापासून स्वागत केले. माझ्यासोबत माझी आणखी एक मैत्रिण होती. अशा कार्यक्रमात धीर द्यायला सोबत कुणी असलेले बरे असे आम्हा दोघींचेही मत होते. आम्ही तिथे (ठरवून) उशीरा टपकल्याने कसनुसं हसत चटकन मागच्या ओळीतली कोपर्यातली खुर्ची धरली. एव्हाना स्टेजवरच्या लेखिका मैत्रिणीने माझ्या अपेक्षेला न्याय देत छान छान मुद्दे मांडायला सुरुवात केली होती. सृजन म्हणजे काय, लिहिण्याची उर्मी हा काय नेमका प्रकार असतो, अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय, सद्यस्थितीत लेखकाने स्वत:ला कसं घडवावं वगैरे. लेखकाच्या पुस्तकातल्या मर्यादा आणि बलस्थानंही तिने ओघवत्या शैलीत सांगितली. बारकाईने ऐकल्यावर जे लक्षात आले ते असे - पुस्तक यथातथा किंवा बंडल आहे. इकडे लेखिका मैत्रिण आता भाषणात रंगली आणि पुढचा गिअर टाकून अनुभव, अनुभूती आणि त्याची परिष्कृती असं लईच उच्च उच्च बोलू लागली. लेखकाचं समाजाशी नातं, समष्टीशी नातं वगैरे. तिच्याच बोलण्यातून अंदाज आला होता की ’उतारवयातल्या पुरुषाला कोवळया वयात आवडलेली सुबक ठेंगणी वयाच्या या टप्प्यावर पुन्हा भेटते’ या एकमेव थीमभोवती कथा(!) रचलेल्या होत्या. कसलं सृजन, कसला समाज अन कसली समष्टी. पण ती बिचारी प्रमुख पाहुणी असल्याने स्तुती न करुन करते काय! तरी प्रसंगाचे औचित्य चतुराईने सांभाळून तिने नवलेखकांना पुढील लेखनासाठी शुभेच्छांसह काही रोखठोक सूचना दिल्या आणि बोलणे संपवले.

उपस्थितांमधल्या बहुतेक बायका, लेखकाच्या नात्यातल्या असाव्यात. त्या दिवशी काहीतरी सणवार असल्याने इकडून परस्पर हळदीकुंकवाला जाऊया, या हिशेबाने खच्चून नटून आल्या होत्या. त्या चुळबूळ करु लागल्या. बहुतेक पुरुष हे लेखकाचे मित्र, रविवारची दुपार जरा बरी गेल्याने तेवढाच एक दिवस कटला, या आनंदात ते ऐकण्यात रमले होते. दरम्यान नातलगांची लहान मुलं त्या छोटेखानी हॉलच्या एका कोपर्यात शिवाशिवी खेळू लागली. भरपूर मेकअप केलेली एक युवती त्यांना दटावू लागली. युवतीने एक लांबलचक बट केशरचनेच्या बाहेर काढून सेट केली होती, ती सेट आहे ना हे चाचपण्यात तिचं सगळं लक्षं लागलं होतं. निवेदकाने माईक ताब्यात घेऊन लेखिका-मैत्रिणीला धन्यवाद दिले व
’रंजक भाषण आपुले, कान अमुचे तृप्त जाहले..’
तत्सम काहीतरी यमक जुळवले. ’अतृप्तीच्या वाटेवर’ छाप नावांचे एक दोन कवितासंग्रह प्रकाशित झालेली मंडळी दिसतात तसे ते होते. त्यांनी आता मंचावरच्या मान्यवर डॉ. ना पाचारण केले.
’मला फक्त पेशंटशी बोलता येतं बुवा पण तरी मी आपले चिमखडे (!) बोल (हा, ते बालरोगतज्ज्ञ असल्यामुळे) सादर करतो’,
असे सांगून डॉ. नी आयक्यू आणि इक्यू यातला फरक सांगितला. ते पुढे म्हणाले,
’लेखक व्हायचं तर एकवेळ आयक्यू नसला तरी चालेल (बापरे!) पण तुमचा इक्यू चांगला हवा’.
मग निवेदकाने त्यांना, म्हणजे निवेदकाला फक्त आयक्यू असूनही (उत्सवमूर्ती लेखकांनी) नोकरीसाठी मदत केल्याबाबत आभार मानले व मंचावरील पोलिस अधिकारी म्याडमना बोलण्यासाठी पाचारण केलं.
म्याडम चांगल्या सणसणीत व्यक्तिमत्वाच्या होत्या. कुर्त्याच्या बाह्या दुमडत माईकपाशी येत एक कडक लुक देत त्या म्हणाल्या,
" मघाशी प्रकाशक म्हटले, आम्ही प्रोत्साह्न देतो नवीन लेखकांना तर आता मला पण माझे पोलिस विभागातले भन्नाट अनुभव लिहावेसे वाटून राहिले आहेत."
जर यांचं पुस्तक निघतं तर माझं तर निघूच शकतं, असा त्यांचा सूर होता. पुढे त्या म्हणाल्या ’यांचे (लेखक) गुण किती सांगावे (त्यांना आठवेना) तितके कमीच.’ लेखकाशी असलेल्या घरोब्याच्या संबंधांमुळे नाईलाजाने म्याडम या ठिकाणी उपस्थित झाल्या असाव्यात.
डॉक्टर, पोलिस या दोन असंबद्ध व्यक्तींनंतर आता सुसंबद्ध व्यक्तीला आमंत्रित करण्यात आलं. लेखकाच्या संस्थेतल्या साहित्याची आवड असलेल्या एक म्याडम. त्या स्टेजवर जायच्या कल्पनेने गांगरलेल्या दिसत होत्या. चुरगाळलेला कागद आणि रुमाल घेऊन माईकजवळ गेल्या, त्या घाबरलेल्या असल्यामुळे दोन्ही खाली पडलं, त्या भीतीवर मात करत कागद उचलून सरळ करत म्याडमनी एकदम तारस्वरात बोलायला सुरुवात केली. लेखकाच्या लेखन कारकीर्दी(!)ला शुभेच्छा देताना अधूनमधून त्यांनी स्वरचित कवितेच्या २-२ ओळी पेरल्या होत्या.
’व्हावे लेखन इतुके की आभाळाने यावे खाली.. (!)
नंतर काही तरी ’ही तर कथुली झाली’
असे यमक होते. शेवटची लाईन दोनदा म्हटली की ती कविता असते म्हणून आम्ही पण इतर श्रोत्यांबरोबर इमानेइतबारे टाळ्या वाजवल्या.
लेखिका मैत्रिण तिच्या मंचावरच्या स्थानाला साजेसा गंभीर चेहरा ठेवून बसली असली तरी माझ्याकडे लक्ष जाताच अवसान गळून तिला खुदकन हसू फुटे. या बिकट स्थितीवर उपाय म्हणून तिने हॉलमधील झुंबरावर नजर केंद्रित केली. ती बहुतेक त्याचे लोलक मोजत असणार.
आता संस्थाध्यक्ष उठले, त्यांना बोलावणं तर कंपलसरीच असणार. लेखकानी आपल्या कथांचे तुकडे स्फुरले तसतसे यांना ऐकवले असावे, त्याचा पुरेपूर सूड अध्यक्षांनी आपल्या भाषणात घेतला. आम्हाला कोण कोणास काय म्हणाले काहीही कळलं नाही.
निवेदकाने म्हटले, "यांच्या भाषणावरुन ते संस्थेत किती जबरदस्त इंटरव्ह्यू घेत असतील याची कल्पना तुम्हाला आलीच असेल." हे कौतुक होते की टोमणा या गोंधळात अध्यक्ष आणि श्रोते असतानाच त्यांनी ’आणखी कोणाला मनोगत व्यक्त करायचे असल्यास यावे’, असे म्हटले.
तोवर मागच्या काउंटर्सवर आगमन झालेल्या पावभाजीचा खमंग सुवास दरवळू लागल्याने आणि शिवाशिवी खेळणार्या मुलांचा सूर टीपेला पोचल्याने आता कुणीही बोलायला उठलं नाही.
लेखकांचे कुणी नातलग आभारप्रदर्शनाला उभे राहिले. कार्य चांगलं पार पडल्याचे कृतकृत्य भाव चेहर्यावर लेऊन ते उभे राहताच मी
’आभाराचा भार कशाला अन् शब्दांचे हार कशाला’
या आभारवाल्यांच्या अत्यंत आवडत्या ओळी मनात म्हणत त्याच पुन्हा ऐकायला कान टवकारले आणि माझा अजिबात अपेक्षाभंग न करता त्यांनी त्या ओळी म्हटल्याच.
या ओळी न म्हणणारा आभारवाला दाखवा अन हजार रुपये मिळवा. मग आभारयादीला संस्थाध्यक्षांपासून सुरुवात करुन लाईटिंगवाला आटोपेतो बहुतेक लोक पावभाजीच्या तर काही मोजके लोक बुके धरले अवघडलेले हात मोकळे करायला लेखकाच्या दिशेने धावले. आम्ही मैत्रिणीच्या दिशेने धावलो. हौशी लेखक आता आयेस्बीएनवाले ऑफिशीयल लेखकराव किंवा निवेदकाच्या भाषेत (डायरेक्ट) ’साहित्तिक’ झाले. प्रकाशन सोहळा समाप्त झाला.
---------
आता एवढ्या खर्चिक प्रकरणापेक्षा फ्री एफबी लाईव्ह येणं आणि तीन तास ते प्रकाशन प्रकरण अटेंड करण्यापेक्षा लाईव्ह कवितेला लाईक ठोकून पुढे स्क्रोल करणं यातलं दुसरं कित्तीतरी सोपं आहे. शिवाय सध्याच्या लॉकडाऊन क्र. य आणि भविष्यातील कोरोनोत्तर काळात प्रकाशनापासून बहुतेक सगळंच ऑनलाईन होण्याची शक्यता आहे. कवितावाले निदान ५-१० मिनीटात तुम्हाला मोकळं करतात. गद्यवाले एकदा आले की तास-तासभर सोडणार नाहीत (वि.सू :हाय, नमस्कार, वॉचींग असं लिहून नंतर पळून जाणार्यांना ते ओळखून असतात) त्यामुळे गद्य मंडळींची बाजू घेण्यात तसा काहीही अर्थ नाही. (हे वाचणारे तुम्ही बावनकशी कॅटेगरीवाले आहात, ’ते’ वेगळे आहेत तेव्हा मला उगाच अनफ्रेंड करु नये 🙂 ) तुम्ही पूर्ण पोस्ट वाचावी म्हणून हे कन्क्लुजन शेवटी लिहिलं. बाकी कै नै.

Wednesday, October 6, 2021

को जागर्ति

#

कोजागरी पौर्णिमा आपण आज साजरी करतोय. चांदण्यांच्या प्रकाशात आकाशाच्या घुमटाखाली आटीव मसाला दुधाचं प्राशन करत जागरण करत एकत्रीकरण, ही त्यामागची सुंदर संकल्पना आहे. आमच्या सोसायटीत ’कोणाला बोलवायचं, कोणाला नाही, दुधाआधी बटाटेवडे ठेवायचे की पावभाजी’ वगैरे अत्यंत महत्वाच्या विषयावर घनघोर चर्चा झडतायत. त्यातही एक मजा आहे पण यापलीकडची  लहानपणची कोजागरी आठवते. चांदणं पडलं की आई दादाचं औक्षण करी. चांदण्यांचा स्वच्छ दुधी प्रकाश आणि निरांजनाच्या ज्योतीचा सोनेरी प्रकाश मिसळून एक छानसा बिलोरी रंग पसरे. मग आई काहीतरी छोटीशी भेटवस्तू देई. साधारणपणे लहान म्हणून घरोघरी शेंडेफळाचंच कौतुक होतं. ज्येष्ठांचं ((घरातल्या ज्येष्ठ मुलाचं किंवा मुलीचं) कौतुक करणारी ही अश्विन पौर्णिमेची खास पद्धत. अश्विन आणि कार्तिक हे दोन महिने मिळून शरद ऋतू होतो. त्यामुळे ही कोजागरी पौर्णिमा म्हणजेच "शरद पौर्णिमा". कुणी याला कौमुदी पौर्णिमा सुद्धा म्हणतात तर या पौर्णिमेला माणिकेथारी (मोती तयार करणारी) असेही म्हटलं जाते.

काही भागात याला "नवान्न पौर्णिमा" असेही म्हणतात. आपल्या कृषी संस्कृतीमध्ये हा दिवस विशेष महत्वाचा आहे. शेतकरी वर्गाला निसर्गाबद्दल वाटणारी कृतज्ञता यानिमित्ताने व्यक्त केली जाते. शेतीची कामे अर्धी किंवा अधिक झालेली असता. शेतातील पिके तयार होत आलेली असतात. पावसाळा संपून काही काही पिके हाताशी आलेली असतात. घर धान्याने भरु लागते. या नव्या धान्याचे स्वागत, एकप्रकारे पूजा करण्याचा दिवस म्हणजे नवान्न पौर्णिमा. आता या वेगवेगळ्या नावांनी आणि पद्धतींनी साजर्‍या होणार्‍या पौर्णिमेचा दूध पिण्याशी नेमका काय संबंध! 

या सुमारास सूर्याचे दक्षिणायन सुरू असते. शरद ऋतूमध्ये हवामानात बदल घडत असतात. वातावरणातील उन्हाची तीव्रता हळूहळू कमी होते तरीही दिवसभर उन्हाचा ताप आणि रात्री थोडीशी थंडी असे मिश्र वातावरण असते. शरद ऋतूमध्ये वाढणाऱ्या पित्ताने शरीराला त्रास होऊ नये म्हणून दूध पिण्याचा रिवाज सुरु झाला असावा. या दिवशी सुकामेवा, चारोळी, जायफळ आणि अर्थात साखर घालून दूध सुगंध पसरेतो आटवले जाते. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडली की मग ते दूध प्राशन केले जाते. दूध आणणे, तापवणे, आटवणे, ते आस्वाद घेत पिणे हा एकत्रित अनुभव त्या दुधाची गोडी अजूनच वाढवतो. या दिवशी पांढर्‍या रंगाचे विशेष मह्त्व आहे असे म्हणतात कारण हा त्या दिवशीचा निसर्गाचाच ’कलर कोड’ असतो. पांढरी फुलेही या कौमुदी उत्सवाचाच एक भाग होतात.

कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र संपूर्ण १६ कलांमध्ये असतो. या दिवशी तो पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असतो. नेहमीपेक्षा मोठा गरगरीत दिसतो. कोजागरीचं शीतल चांदणं अनुभवलं की शांत वाटू लागतं. सर्वत्र पसरलेली चंद्रकिरणं मनाला तृप्तीची अनुभूती देतात. मनातला उन्हाळा, तगमग त्या किरणांच्या उर्जादायी स्पर्शाने निवते. तसा आताशा आपला चांदण्याशी संबंध येतोच कुठे. मिलेनियलपूर्व पिढीने गच्चीवर झोपण्याची मजा अनुभवलीय. चांदण्यांनी खच्चून भरलेलं मखमली आकाश मूकपणे बघता बघता झोपेची दुलई हलकेच पांघरली जाई. आताच्या धावपळीच्या आयुष्य़ात हा निवांत प्रकार बंदच झाला. अशा वेळी ’जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या सिनेमातला प्रसंग आठवतो. कॉर्पोरेट विश्वातल्या धावपळीत गढून गेलेल्या नायकाला निसर्गाशी आणि त्यायोगे स्वत:शी संवाद साधण्याची कधी उसंतच मिळालेली नसते. या ताणांमुळे आधुनिक घरांमधल्या आकर्षक छताकडे टक्क पाहत जागा राहण्यापेक्षा ’मध्यरात्री नभ घुमटाखाली शांत शिरी तम चवर्‍या ढाळी’ ची अनुभूती काही वेगळीच असल्याची जाणीव नायिका त्याला करुन देते. जमिनीला पाठ टेकून तो पहुडतो आणि स्वछंदपणे आकाशाकडे पाहतो. चांदण्यांनी लगडलेल्या काळ्याभोर आकाशाकडे पाहताना त्याला आपल्या जगण्यातल्या हरवलेला सूर गवसतो. असे क्षण आपल्या आयुष्यात आणण्याचा एक ’बहाना’ म्हणजे कोजागरी.

भारतीय बौद्ध धर्म संस्कृतीत या दिवसाला विशेष मान्यता आणि मह्त्व आहे तर हिंदू धारणेनुसार या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवर उतरते. मध्यरात्री म्हणजे चंद्र आपल्या सौम्य प्रकाशात पृथ्वीला न्हाऊ घालत असताना त्या प्रकाशात "अमृतकलश' घेऊन 'को जागर्ति' (म्हणजे 'कोण जागते आहे') असे म्हणत पृथ्वीतलावर संचार करीत असते. ’कोण जागे आहे’ याचा मथितार्थ आहे कोण सजग आहे, कोण ’भानावर’ आहे, कोण ज्ञानासाठी आतुर आहे. तिच्या हाकेला प्रतिसाद देण्यासाठी सगळे जागे राहतात. या जागे असलेल्या मंडळींना ती आशीर्वाद रुपाने "अमृत' म्हणजेच धनधान्य, सुखसमृद्धी देते. इथे सजग असण्याचा अर्थ ’न झोपलेला’ असा अर्थातच अभिप्रेत नाही. जो प्रयत्नवादी आहे, कष्टाळू आहे, ज्ञानार्थी आहे, जो स्वत:ला समष्टीशी म्हणजे चराचरातील समृद्धीशी जोडून घेऊ इच्छितो अशा व्यक्तीलाच यश आणि वैभव लाभतं असा येथे लाक्षणिक अर्थ आहे. 

कोजागर साजरी करणे आणि जागरण या गोष्टी अभिन्न आहेत. मनोरंजनासाठी या जागरणात खेळ, गाणी इ. साधनांचा समावेश अवश्य असावा पण संवादही असावा. आजच्या रात्री लक्ष्मी प्रसन्न व्हावी म्हणजेच आपण श्रीमंत व्हावे असे ज्याला ज्याला वाटते त्याला कायम सजगतेचे व्रत घ्यायला हवे. ही श्रीमंती फक्त आर्थिक अपेक्षित असेल तर ती अपुरी आहे. मनाची आणि बुद्धीची श्रीमंतीही जोडीला हवी. माणसाने माणसाला प्रेमाने भेटणं, माणसाने माणसांच्या आणि जगण्याच्या भाऊगर्दीत स्वत:ला शोधणं, माणसाने आपल्यापेक्षा वेगळ्या माणसांना सामावून घेत आपलं वर्तुळ विस्तारणं हेच बहुतेक प्रथांचं मुलभूत उद्दिष्ट्य आहे. ते साध्य होत असेल तर ’को जागर्ति’ या प्रश्नाला आपण दुधाच्या पेल्यांनी ’चीअर्स’ म्हणत निस्संदिग्धपणे ’मी’ असं उत्तर देऊ शकू.

#kojagari 

पूर्वप्रसिद्धी- दिव्य मराठी ऑक्टोबर २०२१

Saturday, June 20, 2020

स्क्रोल

मैत्रिणीने खपून केलेल्या एका नव्या, आकर्षक रेसिपीची पोस्ट दिसते. आपण कमेंट करतो- टेम्प्टिंग दिसतेय. कशी केलीस गं! ती सुखावून उत्तर देते - नक्की करुन पाहा. लिंक पाठवते. आपण स्क्रोल करतो. भूक असह्य होऊन थेट झाडाची पानं खायला सुरूवात केलेल्या एका विमनस्क, स्थलांतरित मजुराचा व्हिडिओ दिसतो. शूट करणारी बाई त्याला ’जेवण आणून देते, पानं नको खाऊस’ म्हणत असते. शहारा येतो. शब्द गोठतात. आपण कमेंट करण्याऐवजी नुसती सॅड इमोजी टाकतो. स्क्रोल करत जातो. एक मीम समोर झळकतं. त्यात सलीम अनारकलीला म्हणत असतो- उठ अनारकली, तुला आत्मनिर्भर व्हायचंय.आपण इमेज डाउनलोड करुन घेतो, आणखी कुणाला तरी पाठवून त्यांच्या चेहर्‍यावर हसू आणायला. आणखी स्क्रोल करतो. वीसवर नेमकी किती शून्य याचा हिशेब न येणार्‍यांच्या तावातावाने लिहिलेल्या पोस्ट वाचून हसतो. मित्रयादीतलं कुणीतरी फेसबुक लाईव्ह येऊन गेलेलं असतं. आपण थोडं पाहतो, पहिली कविता बरी, दुसरी रटाळ आणि अस्थानी वाटू लागते. काहीच कमेंट, प्रतिक्रिया न देता आपणपुढे स्क्रोल करतो. न्यूज चॅनेलच्या पेजवर बातमी दिसते- कोर्ट म्हणतंय- कुणी स्वत: येऊन रुळावर झोपलं तर संभाव्य अपघात टाळणं कोर्टाच्या हातात नाही. रक्तमाखल्या भाकर्‍या डोळ्य़ासमोर येतात. त्याखाली शिवराळ भाषेतल्या शिव्याशापांच्या, सरकारच्या समर्थनातल्या, विरोधातल्या कमेंट्सचा खच पडलेला असतो. ते नको होऊन आपण अजून स्क्रोल करतो. पाच महिन्याच्या कोरोना झालेल्या गोड बाळाला खुळखुळा दाखवणार्‍या पीपीई सूटमधल्या डॉक्टरचा फोटो दिसतो. नकळत आपण लाईक देतो. खालोखाल चार मोठ्या संस्थांच्या सर्वेक्षणानुसार याही परिस्थितीत भारतीय नागरिक जगात सर्वाधिक आशावादी असल्याची पोस्ट वाचून आपल्याला एकदम बरं वाटू लागतं. स्क्रोल करणं बंद करुन आपण मोबाईल बाजूला ठेवतो. कामाला लागतो. असं स्वीच ऑन- स्वीच ऑफ जमलंच पाहिजे असं स्वत:ला बजावतो. आपल्या मनातला स्क्रोल सुरुच राहतो. ऑनलाईन काम बरंच बाकी राहिलेलं असतं. ठरलेला वेबिनार पण अटेंड करायचा असतो. कपबशा सिंकमध्ये तशाच पडून असतात. बीप वाजतो.. व्हॉट्सअ‍ॅपवर मघाची रेसिपी मैत्रिणीने पाठवलेली असते. सोपी वाटते, नाहीतरी मुलांना सारखं काय खायला द्यावं प्रश्नच असतो. पण बेकिंग पावडर शिल्लक आहे ना घरात! भयंकर महत्वाचा प्रश्न पडतो. मनात बॅकस्क्रोल होतं. तो झाडाची पानं खाणारा मजूर दिसतो. अनवाणी चालणारे चिमुकले दिसतात. कुठे कुठे पुरे पडणार आपण ! ते ही इतक्या लांबून ! खूप अपुरी आहे आपण दिलेली मदत आपल्या अवाढव्य लोकसंख्येपुढे. त्यापेक्षा आपण काही दिवस बातम्यांपासून लांब राहायचं ठरवतो. This shall pass soon असे स्वत:ला पुन्हा एकदा सांगतो. मनोविश्लेषकांनी व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे, परिस्थिती हातात नसली तरी तिला प्रतिसाद कसा द्यायचा ते आपल्या हातात आहे, हे स्वत:ला आणखी एकदा समजावतो. Thank God.. बेकिंग पावडर थोडी का होईना शिल्लक असते. आपण नक्की कसे असतो ? निर्ढावलेले, हतबल की व्यवहारी ! मनातला स्क्रोल संपत नसतो.

Thursday, March 5, 2020

अ‍ॅक्वेरियम

इंडस्ट्री कशी चालते, टेलिकम्युनिकेशन मेंटेनन्स म्हणजे नेमकं काय, थिअरीपलिकडे फारसं कळत नव्हतं. वय २१. फायनल रिझल्ट नुकताच लागलेला. इंटरव्ह्यूतल्या एकाही टेक्नीकल प्रश्नाचं मला धड उत्तर देता आलं नव्हतं. निघताना अचानक मी त्यांना इतकच म्हटलं होतं,’ सर, तुम्ही पण करियरच्या सुरुवातीला या स्टेजमधून गेला असाल ना! मला एक संधी द्या. मी २ महिन्यात सगळं शिकून दाखवेन.’ ते संमिश्र अर्थाने हसले आणि आठवड्याभरात चक्क मला ’ट्रेनी इंजिनीयर’ म्हणून नेमणूक पत्र आलं.

कंपनीची अनेक चित्रविचित्र उत्पादनं. अमेरिकेत पोर्कसाठी डुकरांची वाढ जोमाने व्हावी म्हणून ज्याचं इंजेक्शन दिलं जातं ते ’पपेन’, इरिगेशनची उपकरणं, सोलर सिस्टीम्स, पाईप्स, परदेशात घरांच्या तावदानासाठी वापरल्या जाणार्‍या Polycarbonate  शीट्स, कांदा-लसूण आणि फळांच्या पावडरी वगैरे. हे सगळं तयार करणारे, एकमेकांपासून १०,१२ किमी अंतरावरचे ३ भलेमोठे प्लांट्स, आयटीआय ते आयआयटी रेंजमधले दोनेक हजार कर्मचारी, त्यांचे पर्सोनल, स्टोअर, प्रॉडक्शन, पॅकेजिंग, एक्स्पोर्ट, डिस्पॅच वगैरे अनेक विभाग. शिवाय राज्यातल्या महत्वाच्या शहरांमधली मार्केटिंग कार्यालयं. हे सगळं एकमेकांना जोडण्यासाठी वापरण्य़ात येणारे हजार एक इंटरकॉम्स, मिनी एक्स्चेंज, शे दोनशे टेलेक्स, फॅक्स, पेजर्स, अधिकार्‍यांच्या कारमधल्या वायरलेस यंत्रणा. या अवाढव्य जंजाळाचा मेंटेनन्स करणार्‍या डिपार्ट्मेंटला मी रुजू झाले. यातल्या काही गोष्टी मी जन्मात पाहिल्या नव्हत्या, हाताळणं तर दूरच. डिपार्ट्मेंटला मी एकटीच मुलगी. टेक्नीकल मेंटेनन्सला मुली निरुपयोगी असं सार्वत्रिक मत. अगदी पुण्य़ाच्या बजाज ऑटोनेही आमच्या वर्गातल्या ८ मुलांना निवडले तेव्हा ’लेडिज कँडिडेट्स डू नॉट अप्लाय’ अशी नोटीस लावली होती. या सहकार्‍यांनाही ’मुलगाच' हवा होता. माझी ब्याद लवकर टळावी म्हणून त्यांनी जणू असहकार पुकारला. एक प्रकारचे रॅगिंगच. कशाच्याही नीट नोंदी नसल्याने कसे काम करावे ते कळेना. दुसर्‍याच दिवशी त्यांनी २०० कनेक्शनच्या सर्किटचे टेस्टींग दिले. संदर्भ न सांगितल्याने गोंधळून जाऊन मी पूर्ण चुकवले. पुण्याच्या कॉलेजमध्ये इतकंही शिकवलं नाही वाटतं- या टाईपचे टोमणे जिव्हारी लागले. जेवायच्या सुट्टीत एकटीच कँटीन शोधत गेले. बरीच गर्दी होती पण मुलींची संख्या नगण्य त्यामुळे ’कौन नया पंछी आयेला है’ टाईप बोचणार्‍या नजरा. चुकलेले टेस्टींग. खाल्लेली बोलणी. कुणीही ओळखीचे नाही. त्यात अपडाउनचे दोन दिवसाचे विचित्र अनुभव. आदल्या दिवशी ट्रेन लेट झाल्याने घरी पोचायला झालेला उशीर. आज जेमतेम चहा घेऊन कशीबशी धावत पकडलेली गाडी. कसं होईल इथे आपलं! नोकरीची तर प्रचंड गरज होती. मला घास जाता जाईना.

तेवढ्यात समोर तिशीची एक स्मार्ट, सावळी बाई येऊन बसली. सरस्वती. माझा नवखा, रडवा चेहरा पाहून मला डबा ऑफर करत साउथ टोनमधल्या इंग्लीशमध्ये म्हणाली, ’नवीन आहेस ना! घाबरु नकोस. न लाजता, न चिडता, न रडता, काय ते निगरगट्टपणे विचारत जायचं. हिमतीने शिकत जायचं. सगळं जमतं.’ मग हसत हिंदीत म्हणाली, ’गब्बरसिंग क्या कह कर गया, जो डर गया..?’ ’वो मर गया’ असं म्हणताना मला खूप धीर आला आणि हसूही. आमची पुढे घट्ट मैत्री झाली. ती एमडींची सेक्रेटरी होती. कॉर्पोरेट जग कोळून प्यायली होती. मग असेच एक एक गुरु भेटत गेले.

कॉम्युटर मेंटेनन्स विभागातली, केसांच्या बटा मानेने उडवत, मनगटाभोवती बांधलेल्या रुमालात स्क्रू ड्रायव्हर खोचून तरातरा चालणारी रुबीना. वाटेत भेटणार्‍यांना ’क्या भिडू, काय मंता जोशीसाहेब, गुडमॉर्नींग सिन्हा सर’ असं व्यक्तीनुसार विश करत लीलया दुरुस्त्या करणारी. मला घेऊन सगळे प्लांट फिरुन आली. तिने तिच्या बोहरी हिंदीत कानमंत्र दिला, ’इथे मुलगी असण्याचं कौतुक करत बसशील तर आहे तिथेच राहशील. कोणी एक दिली तर आपण दोन द्यायच्या पण आवाज न करता. आवाज केला तर बाईलाच एक्स्प्लनेशन देत बसावं लागतं. वायर खाली घ्यायचीय तर प्रसंगी स्वत: शिडी चढायची, उई वुई करत इलेक्ट्रीशियनची वाट नाही पाहत बसायचं.’

माझ्या इंग्लीश मधल्या चुका काढणारे डायरेक्टर रामचंद्रन सर. परतीची बस चुकल्याने एकदा त्यांनी आम्हा तीन जणांना स्टेशनपर्यंत लिफ्ट दिली. दोघे पुरुष कारमध्ये मागे बसले, एवढ्य़ा सिनियर साहेबाच्या शेजारी कसं बसायचं म्हणून मी पण मागेच बसू लागले. ते डाफरले, ’मै क्या तुम्हारा ड्रायव्हर हूँ? कल कॅबीन मे आना, तुम्हारा एक एटिकेट्स ट्रेनिंग लेता हूँ।’ दुसर्‍या दिवशी त्यांनी खरंच फोन करुन बोलावलं. शिकवलं. कार मध्ये बसतानाच्या मॅनर्सपासून, मिटिंगमध्ये कसे बसावे, काटे-चमचे वापरायचे नियम.. इथपर्यंत. पुढे एकदा म्हणाले होते की त्यांची फॅमिली मद्रासला असते. माझ्याकडे पाहून त्यांना लेकीची आठवण येते. वर हसत म्हणाले होते, ’ती पण तुझ्यासारखीच धांदरट आहे.’

कंपनीच्या ’आयएसओ’ विभागात इंग्लीश कागदपत्रांचे अनुवाद कामगारांना समजेल अशा मराठीत करण्य़ाचं काम निवृत्त प्राध्यापक पाटीलसर करायचे. माझी वाचनाची आवड कळल्यावर, मेन बिल्डिंगच्या काचेतून माझ्या बिल्डिंगकडे जाताना मी त्यांना दिसले की ते काही शब्द काढून ठेवत. मी एमआयएसचा सर्व्हर चालू करुन पहिला फोन त्यांना करायचे. शब्द ऐकायचे आणि दिवसभरात आठवतील तेवढॆ प्रतिशब्द जिथे मेंटेनन्स सुरु असेल तिथून त्यांना फोनवर कळवायचे. आवडले तर ते वापरायचे नाहीतर अधिक चपखल शब्द सांगायचे.

वर्षभराने भेटलेली ब्रिटीश जोआन. नवर्‍याचा आमच्या कंपनीतला रिसर्च लांबला म्हणून लंडनमधली नोकरी सोडून त्याच्यासोबत येऊन राहिलेली. सकाळी शॉर्ट्स घालून गावभर सुळकन सायकलिंग करत फिरणारी, आवड म्हणून कॉर्पोरेट लेखनाचे प्रशिक्षण देणारी, सोनेरी केसांची अवखळ जोआन. एकमेकींचे अ‍ॅक्सेंट नीट कळत नसतानाही कशी कोण जाणे आमची मैत्री झाली. त्यामुळे केवळ ऑफीसर्ससाठी असलेल्या बॅचमध्ये ज्युनिअर असूनही शिकता आले. मेमो लिहिणे, निगोशिएशन स्किल्स वगैरे भानगडी तेव्हा प्रथमच ऐकल्या. थोड्याफार कळल्या.

दोनच वर्षात, कंपनीने विकत घेतलेल्या नव्या टेलीकॉम कंपनीत उत्तम पदावर इंटर्नल ट्रान्सफर मिळाली. भविष्य आमूलाग्र बदलून टाकणारी संधी होती. उत्साहात पेढे वाटप सुद्धा केलं. नव्या ट्रेनींचे इन्टरव्ह्यू घेण्याचा अनुभव मिळाला. उद्यापासून औपचारिकरित्या काम सुरु करायचे या आनंदात असतानाच कदाचित असूयेपोटी, मी पर्यायी व्यक्ती ट्रेन करेतो ही ट्रान्सफर स्थगित व्हावी असा मेल रातोरात एमडींना गेला. हा धक्का इंडस्ट्रीचा क्रूर चेहरा दाखवून गेला. इथल्या गळेकापू स्पर्धेत किती सावध राहावं लागतं याचा धडा शिकवून गेला. मी खर्‍या अर्थाने ’सज्ञान’ झाले.

’फाईंडिंग निमो’ मधला निमो दोन विश्वं अनुभवतो. एक अ‍ॅक्वेरियममधलं आणि एक विशाल समुद्रातलं. पुण्य़ाला शिकताना एकटीने केलेले प्रवास, होस्टेलचे खास अनुभव यामुळे आपल्याला खूपच जग कळलंय या भ्रमाचा भोपळा म्हणजेच माझ्या अ‍ॅक्वेरियमची काच या सगळ्या भल्याबुर्‍या गुरुंच्या कृपेने अखेर फुटली आणि धडपडत का होईना पण समुद्रात हात-पाय मारणं मला जमायला लागलं.

पावणेचार वर्षात कंपनीत शेकडो परिचय झाले. काही माणसं जवळची झाली. काही दुखावून गेली. त्यांना सरळ करायला, किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला एव्हाना मी शिकले होते पण त्यांचे प्रमाण फार कमी. मुळात माणसं पूर्ण चांगली किंवा पूर्ण वाईट नसतात. त्यांच्या वागण्य़ामागे परिस्थितीजन्य कारणं असतात. आपण तेवढ्याच अनुभवाच्या तुकड्यांवरुन मत बनवतो हे लक्षात आलं. बदली रोखणार्‍याला माफ केलं तेव्हा मलाच मोकळं वाटू लागलं. ज्यांनी सुरुवातीला सासुरवास केला होता त्यांच्याशी तर कौटुंबिक संबंध निर्माण झाले. माझ्यासह त्यांचेही डोळे सेंड ऑफ पार्टीमध्ये ओलावले होते. आता दोन दशकं उलटूनही बहुतेकांनी मैत्री जपली आहे. काहींशी मधल्या काळात तुटलेला संपर्क सोशल मिडीय़ामुळे पुन्हा जुळला. सिनियर मंडळी काळाच्या पडद्याआड गेलीच पण रुबीना सुद्धा अल्पशा आजाराचे निमित्त होऊन गेली. मला ’ती’ पहिली संधी देणारे सर म्हणजे श्रीराम पुढे माझा चांगला मित्र झाला. आता तो परदेशात असला तरी मैत्री टिकून आहे. मला आयुष्यात पाय रोवून उभं राहायला शिकवणारी सरस्वती मात्र कुठेतरी हरवलीय.

'अब के हम बिछडे तो शायद कभी ख्वाबोंमें मिलें

जिस तर सूखे हुऎँ फूल किताबों में मिलें ..'

पण मी तिला अजूनही शोधते आहे.

Sunday, December 15, 2019

नसतोस घरी तू जेव्हा..

सोमवारची धावपळीची सकाळ. रोजच्यासारखी पीकेव्ही मधून फिरुन आले. तिथे आज मस्त दाट धुकं होतं, परत येईतो त्यात उगवत्या सूर्याचा केशरट प्रकाश मिसळला होता, मुख्य चौकात दोन मैत्रिणी अचानक भेटल्या, एक मोर अगदी जवळून दिसला आणि तिथल्या पुलावरच्या भाजीवालीकडे ताजी कोथिंबीर फारच स्वस्त मिळाली, चला आता कोथिंबीर समोसे करता येतील, त्यामुळे दिल एकदम गार्डन गार्डन हो गया था. छान मूडमध्ये घरात शिरताना वळून फाटक बंद करायला गेले. समोर कुणीतरी नवीन भाडेकरु बाई राहायला आली आहे. तिने ’आली मोठी स्टाईलमारु, माझ्याकडे नसतो फिराबिरायला रिकामा वेळ पण घर पाहा माझं, चकाचक असतं’ असा मला लुक कम कॉम्प्लेक्स देऊन गॅलरीवर हातातल्या कापडाचे फटके मारणं सुरू ठेवलं. सायन्स के बोझ का मारा लेक एका क्लासहून आला होता आणि दुसर्‍या क्लासला जायच्या गडबडीत होता. आधी घाईने त्याला नाश्ता करुन दिला. तेवढ्या गोंधळात जोकरच्या जागी कोणता नवा कलाकार घेतलाय याचा व्हिडिओ त्याच्या फोनवर त्याच्या आग्रहास्तव हातातल्या चिमट्यात पातेलं तसंच पकडून पाहिला. त्याला बाय करून वाचायच्या राहिलेल्या कालच्या पुरवण्या जमा करुन ठेवल्या. आजच्या हेडलाईन्स पाहिल्या. समोरच्या बाईचा फटक्यांचा म्हणजे साफसफाईचा आवाज ऐकून अचानक आपले अंगण पाचोळ्याने भरल्याचे आठवले आणि तरातरा झाडायला गेले. अंगण चकाचक झाल्यावर तिच्या गॅलरीकडे हळूच एक कटाक्ष टाकला पण ते पाहायला ती एरवी गॅलरीतच पडीक असलेली बयाबाई नेमकी गॅलरीत थांबली नव्हती, जाऊदे. मग आजची कामं क्रमाने आठवत मस्तपैकी कॉफी करून घेतली आणि ’त्याची’ कडकडून आठवण आली....  म्हणजे मोबाईलची.

चार्जिंगला लावलेला नव्हता. उशीखाली राहिला का! नाही. लेकाच्या टेबलवर नव्हता. किचनमध्ये.. नाही. पेपरच्या ढिगाखाली! नाही. मी अंगण झाडलं तिथे कुठे.. कचर्‍याच्या डब्यात नाही ना टाकला पाचोळ्याबरोबर! ते पण उपसून पाहिलं.. नाही. हे पाहा, मी फिरुन येताना अशी गाडी आत आणली मग शूज काढले मग .. ज्या क्रमाने जे केलं तसा अ‍ॅक्शन रिप्ले केला. पण नाही. . ट्रॅक पँटच्या खिशात! नाही. वाटेत खिशातून नाही ना पडला. की फिरताना पीकेव्ही मध्ये कुठे पडला. पण पडला तरी आवाज न यायला तो काय रुमाल आहे का! कुणीतरी आवाज देऊन सांगितलं असतं की. आणि आज चालताना मी गाणी ऐकली नाहीत म्हणजे नेला होता की नाही मुळात?

तेवढ्यात सासूबाई गडबडीने माझ्याजवळ येत म्हणाल्या, ’आज मोबाईल डोक्याशी ठेवून झोपू नकोस, नासाने सांगितलंय, कॉसमॉस किरणं मध्यरात्री पृथ्वीवर येणार आहेत, (तुझ्या आधीच सरकलेल्या) मेंदूला चांगलं नाही म्हणे. हे बघ मला व्हॉट्सअ‍ॅपवर आलं आहे’. मी त्यांना २३५ व्यांदा शांतपणे सांगितलं की हे काही खरं नसतं.
’अगं पण नासाने का सांगितलं मग.’
’नासाबिसाने काही सांगितलेलं नसतं ओ, लोक नासा, नाना पाटेकर असली नावं टाकून काय वाटेल ते लिहितात.’
’पण लोक उगाच कशाला असं करतील!’
माझे म्हणणे फारसे न पटून त्या पुन्हा नासा किंवा नाना पाटेकरांनी आणखी काय काय म्हटलंय ते वाचण्यात गढून गेल्या. मी त्यांना थांबवून त्यांच्या फोनवरुन स्वत:ला फोन लावला आणि गुप्तहेरासारखी दबकी पावलं टाकत टवकारलेल्या कानांनी घरभर हिंडले. घरात कुठेही रिंग ऐकू येईना, वरुन हे ऐकू आलं ’इस समय आपको कोई उत्तर नही दे रहा है, कृपया थोडी देर बाद पुन: प्रयास करे’

चोर कशाला देणार म्हणा उत्तर. म्हणजे, अरे देवा! चोरीला गेला असेल की काय माझा मोबाईल! त्यातून नवा कोरा. जुना अगदीच हँग व्हायला लागला, इतका की लोक दयार्द्र नजरेने पाहू लागले म्हणून नुकताच घेतलेला. लेटेस्ट. चांगला ४८ एमपी कॅमेरा असलेला. नवर्‍याला ’भला इसकी रॅम मेरे रॅम से जादा कैसे’ असा हेवा वाटायला लावणारा.
काय काय महत्वाचं होतं त्यात, ते कुणाच्या हाती लागेल का! महत्वाचे आयडी पासवर्ड कोड भाषेत लिहुन स्वत:लाच मेल करुन ठेवलेत. पण इतके कोड भाषेत की मलाच आपण हे काय लिहिलंय ते काही वेळेला कळत नाही तर इतरांना काय कपाळ कळणार! (परवा नेटबँकिंगच्या पासवर्डचं असंच झालं, आठवेचना. सुरक्षिततेतची खबरदारी म्हणून पासवर्ड सेव्ह्ड ठेवला नव्हता. कोड भाषा कळेचना मग स्वत:शी क्वीझ खेळत बसण्यापेक्षा ’फर्गेट पासवर्ड?’ला शरण गेले. त्यात त्याने जो गुप्त प्रश्न विचारला त्याचंही उत्तर आठवेना, मेमरी आहे का खोकं असं झालं अगदी, शेवटी ओटीपी बीटीपी, दादा, पुता करून एकदाचा तो पासवर्ड नवा केला. आता पुन्हा तो लक्षात ठेवा. पासवर्ड कसा असावा यावर लेक्चर देणं सोपं, तो लक्षात ठेवणं महाकठीण.चला, निदान कॉंटँक्ट्सचं बॅकअप आहे. पण केव्हाचं तर १९४२ सालचं म्हणजे नंतर अ‍ॅड केलेलेल कॉंटँक्ट्स गेले की!! अ‍ॅप्स पण पुन्हा इन्स्टॉल करावे लागतील. करु काय ते पण आजच्या कामांचं कसं करायचं! आणि मेल ऑटोलॉगइन आहे. बापरे, असा कसा मॅडसारखा ऑटो मोड ठेवला मी, लोकांना सायबर सिक्युरिटीचं ब्रह्मज्ञान देता देता. पण ओके, त्याचा आधी पासवर्ड बदलते लॅपटॉपवरुन. चोर भी क्या याद करेगा! काही हाती नाही लागू देणार त्याच्या. अर्र पण इतर काही फ्री अ‍ॅप्सचे अ‍ॅक्सेस मिळतीलच आणि गॅलरीला पण लॉक नाही. फोटोचा गैरवापर केला तर! त्याला शिकवीन चांगलाच धडा. फिंगर लॉक आहे की, फिकर नॉट. बरं आत्ता फोन ब्लॉक करावा का! पोलीस कम्प्लेंट करावी तर काही तर आठवायला हवं नं! IMEI ट्रॅकर साठी तो पण आठवत नाहीये. डायरीत लिहिलाय वाटतं. नाही दिसतंय! अ‍ॅमॅझॉनच्या ऑर्डर इनव्हॉइस मध्ये मिळेल की. अरे वा अपना दिमाग भी चाचा चौधरी की तरह कंम्प्यूटरसे तेज चलता है. शंभर प्रश्न डोक्यात फिरु लागले.

मग आठवलं, नवरोबांचा फोन दसर्‍याच्या झेंडू खरेदीच्या गडबडीत कुणीतरी मारला तेव्हा त्यांनी पोलिस कम्प्लेंट केली होती. दुसर्‍या दिवशी ते अपेक्षेने पोलीस स्टॆशनला गेले तर डंग डंग आवाज करत फिरणार्‍या पंख्याखाली धूळभरल्या खुर्चीत बसलेल्या एका पोलिसाने त्यांनाच उलट विचारलं, लागला का काही तपास फोनचा. एकूण पोलिस फार काही करतील अशी आशा ठेवणं वेडेपणाचं होतं. चला पुन्हा रिंग करुन पाहू, न जाणो पीकेव्हीतल्या कुणी तरी स्वत:जवळ उचलून ठेवला असेल. जगात चांगले लोक नक्कीच जास्त आहेत. रिंग जात राहिली आणि चक्क... नवरोबांचं अगदी गोड, हळू आवाजात ’हॅलो’ ऐकू आलं. युरेका ! म्हणजे फोन या बुवाकडे आहे तर, चला. मी सुटकेचा निश्वास सोडला. पण अ‍ॅ, हं किंवा ’काय आणायचंय’ च्या ऐवजी हॅलो ! आणि इतका गोड आवाज!

’माझा फोन तुझ्याकडे कसा आणि मी इतक्या रिंग दिल्या तेव्हा का नाही उचललास?’
’कामात होतो, आत्ता व्हायब्रेट झाला तेव्हा लक्ष गेलं. ते मी सकाळी, हे ते .. तू आधीच उठलीस अलार्मच्या, तर अलार्म बंद करुन जाता जाता तुला आणून द्यायला फोन खिशात ठेवला आणि चुकून तो माझ्याबरोबर आला.’
’तो चुकून आला!’
’नाही म्हणजे मी चुकून आणला.’
’मग असं कर्तरी प्रयोगात बोल ना!’
पुन्हा गोड स्माईल (स्वत:ची चूक असल्यामुळे अतिदुर्मिळ योग)
एकूण माझा मोबाईल आता पन्नास किमी लांब गेलेला होता आणि दुपारी दोन शिवाय परत मिळणार नव्हता.
माझ्या बाजूने इतकी शांतता पाहून त्यांनी विचारलं, ’खूप महत्वाचं काम राहून जाईल का तुझं? तुझा दहा हजार करोडचा टर्नओव्हर एकद्म खालीबिली येईल का! तसं असेल तर मी करतो काहीतरी व्यवस्था अर्जंट पाठवायची’. मी बीपी न वाढू देता म्हटलं, ’मी करीन लॅपटॉपवरुन काम. जाऊ दे.’

मी कामाला लागले. नेहमीपेक्षा दुप्पट वेगात काम झालं कारण उगाच इकडे तिकडे मोबाईलमध्ये डोकावण्याचा वेळ वाचला. कामाव्यतिरिक्त थोडं लेखन झालं. घरातलं काम आटोपलं. कालचं राहिलेलं एक काम सुद्धा पूर्ण झालं. कालच्या बाकी राहिलेल्या पुरवण्यातले काही लेख वाचून झाले. वेळच होत नाही हे जे आपण म्हणतो ते केवळ या कर्णपिशाच्चामुळे हे अगदी पटलं. खूप महत्वाचं काम असेल तर मी ’रीड ओन्ली’ मोड वर असते पण आपण उत्तर दिलं नाही तरी कामाशिवाय नासा आणि नाना पाटेकर छाप निरर्थक पोस्ट स्क्रोल करण्यात वेळ जातोच नकळत. त्यात ’थंड केलेल्या लिंबाचे परिणाम’ छाप मंद पोस्ट किंवा ’बायकांनी बुरखा घालावा म्हणजे त्या सुरक्षित राहतील’ छापाच्या मूर्ख पोस्ट वाचून टाळकं सरकतं ते वेगळच. नेट ऑफ करणं किंवा सोशल मिडिया उपास बिपास असले उपाय माझ्या अजिबात कामाचे नाहीत कारण माझं काम ऑनलाईनच करावं लागतं, रोजचे टास्क पण व्हॉट्सअ‍ॅप वरच असतात आणि चेक करुन तिथेच पुढचं लिहिलं जातं. पण या निमित्ताने बॅकअपच्या बाबतीत आपण अजून काही गोष्टी (इतरांना नेह्मी मारे सांगतो त्याच) लक्षात घ्यायला हव्या आहेत हे जाणवलं. गुगल ड्राईव्हवर प्रत्येक मह्त्वाच्या गोष्टीची कॉपी ठेवलीय की नाही हे चेक करायला हवं आहे हे नीटच कळलं. (ठेवली आहे, पण अपडेट केलीय का!) मोबाईल मला कंट्रोल करायला लागलाय हे ही लक्षात आलं. मोबाईल स्वेच्छेने काही वेळ बाजूला ठेवणं वेगळं, ते मला बर्‍यापैकी जमायला लागलं असलं तरी ’मोबाईल नाहीच आहे’ अशा परिस्थितीतही काही वेळ जगता येणं मुश्कील है लेकिन नामुमकीन नही याची पण खात्री पटली. हे चुकून झालेलं मॉक ड्रील बरीच अक्कल शिकवून गेलं.

२ वाजले. मोबाईलसह त्याला ’चुकून घेऊन जाणारा बुवा’ घरी पोचला. आज दुधी भोपळ्याची भाजी असूनही त्याच्या चेहर्‍यावरचे स्मित हास्य लोप पावले नाही.
’काय मग कसा गेला अर्धा दिवस! तुझ्याशी संपर्क न झाल्याने शहा आणि मोदींचे काही निर्णय पेंडिंग तर नाही ना राहिले!’
मी ते काही मनावर न घेता.. ’छान गेला, भरपूर कामं झाली माझी. एकदोन कामं अडून राहिली खरी पण त्यामुळे काही प्रलय नाही आला. ती आता करता येतील.’
’अरेच्चा, मला वाटलं की तू आता तुझी किती अडचण झाली याचा नॉनस्टॉप पाढा वाचणार. इतकी कूल राहिलीस म्हणजे नवलच आहे.’
आता त्यांना कशाला सांगा की एक तर या मोबाईलविना जगण्याच्या शॉर्ट ट्रेलरबद्दल मला त्यांचे खरं तर आभारच मानायला हवेयत आणि दुसरं ,सर्वात महत्वाचं ,पुढे माझ्याकडून ’चुकून’ असं काही झालं तर तेव्हा वापरायला हे ’कार्ड’ राखून ठेवलेलं बरं ना! :-)

Thursday, August 15, 2019

श्रावण आणि जेवण

परवा श्रावणातल्या जिवतीचं म्हणून मैत्रिणीने जेवायला बोलावलं होतं. तिच्या हातची पुरणपोळी खास असते. कुणी कुमारिका पण यायची होती पण
शाळेच्या भानगडीत तिचं म्हणे जमलं नाही (मी जमवलंच. आयतं जेवण्याची मजा काही और असते हे तुम्हाला मी सांगायला नकोच.) तर इतकी रुचकर पुरणपोळी मिस करणार्या कुमारिकेवरुन आमच्या लहानपणीच्या बर्याच आठवणी निघाल्या.
तेव्हा कुमारिका म्हणून जेवायची बरीच आमंत्रणं येत. लहान असले तरी मी वाढणार्या बाईचं नीट निरिक्षण करत असे. त्या कर्तव्यभावनेने पदार्थ पानात पटकत असतील तर मी पुन्हा त्या घरी जात नसे. एका खास आजींकडे बोलावलं की मात्र धाराच्या जाहिरातीतला मुलगा त्याचे भोकराएवढे डोळे विस्फारून ’जलेबी!!!’ असं म्हणायचा तसं माझं व्हायचं. मग मी अगदी नवीन झगा वगैरे घालून, ’पानात काही टाकायचं नाही’ टाईप आईच्या सूचनांना हो हो करून धावत त्यांच्याकडे पोचत असे. जेमतेम दोन खोल्यांचं पण नेटकं घर. गोर्यापान, बेताच्या उंचीच्या, मोठं लालचुटूक कुंकू लावणार्या, फुलांचं सुरेख लुगडं नेसलेल्या त्या प्रसन्नवदना आजी कानडी हेल काढून ’आलीस! ये हो’ म्हणत माझं गोड हसून स्वागत करायच्या. लाकडी पाट, पाण्याचा पेला, सुबक रांगोळी अशी तयारी असायचीच. मी पाय धुवून येऊन बसले की त्या मला कुंकू लावून, दक्षिणा देऊन, बाकी पदार्थ वाढून गरम पुरणपोळ्या करायला बैठ्या ओट्यावर बसायच्या. एकीकडे त्या घोसाळ्याची गरमागरम, खुसखुशीत भजी तळायला घेत तर दुसरीकडे काठोकाठ पुरण भरलेली गोलमटोल पोळी मऊ हाताने सरसर लाटत आणि सोनेरी रंगावर टम्म भाजून तशीच माझ्या पानात ठेवून तीवर तुपाची धार धरत. मी त्यांच्या हालचाली पाहण्य़ातच दंग होऊन जाई. मग वाढता वाढता त्या माझी शाळेची बिळेची चौकशी करत, काय हवं नको विचारत. सट्ट जेवून मी अगदी खुशीत उड्या मारत घरी येत असे.
तेच आजीच्या दुसर्या एका मैत्रिणीकडे बोलावणं आलं की मी नाक उडवत असे. पण त्या आजी खूप गोड होत्या आणि माझा गालगुच्चा घेऊन त्या मला काहीतरी छान वस्तू देत असत त्यामुळे त्या मोहाने का होईना मी जायचे. त्यांचं घर मोठं आणि अगदी मोकळं होतं. त्यांची सून नोकरी करायची.स्वयंपाकाला बाई होती. तिने केव्हातरी केलेले अगोड श्रीखंड, वातड पुर्या आणि गोटा झालेली अळणी भजी एक वाजेतो गारढोण होत असत. या आजी काही लोड न घेता मी येईतो पेपर वाचत बसत. त्यांची नात अबोल होती. मी गेले की ती पलंगावर लांब बसून पाय हलवत माझं नुसतं निरिक्षण करायची, तिचे बाबा लंच ब्रेकमध्ये आलेले असले तर अतिशय शुष्क आवाजात ’काय म्हणते शाळा’ असा एक औपचारिक प्रश्न विचारून उत्तराची वाट न पाहता भिंतीकडे बघत मुकाट्याने जेवत राहायचे, मग कुणीच काही बोलायचे नाही, जुन्या पंख्याचा कंटाळवाणा आवाज येत राहायचा आणि डायनिंग टेबलवर आधीच झाकून ठेवलेल्या ताटात आजी त्या गार गार पदार्थांचा आग्रह करायच्या जे माझ्या घशाखाली उतरत नसत. पुढे पिना, बांगड्यांचे आकर्षण संपले तसं मी त्यांचं आमंत्रण टाळू लागले.
एक नातलग पण मला नेहमी बोलावत, रूचकर स्वैपाक करत आणि प्रेमाने गरम गरम वाढत सुद्धा परंतु त्यांचे मिस्टर म्हणजे आजोबा मला फार पीडत असत. म्हणजे तसं तर जगालाच पीडत असत. ते वयाच्या मानाने फारच खुटखुटीत होते आणि याचा त्यांना कोण अभिमान. मग ते सतत, माझं वय काय असेल सांग पाहू, दात बघ माझे, अजून अक्रोड फोडून खाऊ शकतो.. इ. बोलत असत. मी वय साठ म्हटले की खूश होऊन, ’हॅ, सत्तर पूर्ण. किती?’ मी- ’सत्तर’. ’वाटत नाही की नाही!’ मी-’अज्जिबात नाही’. पण दरवेळा हीच प्रश्नोत्तरं. मला वैतागून एकदातरी त्यांचे ’शंभर’ वय सांगावेसे वाटायचे पण मग आपले आमंत्रण बंद झाले तर काय घ्या म्हणून मी आपली माना डोलवत अक्रोडकथा ऐकत बसायचे.
लग्नानंतर जेवायची बरीच आमंत्रण यायला लागली. सुरूवातीला ओळख व्हावी म्हणून मी आपली सगळीकडे जात असे. नंतर (काही घरी) माझे जमेनासे झाले. का ते वाचा. एका घरी त्या बाईंना मला (एकदाचे) जेवू घालून ऑफिसची वेळ गाठायची असायची. त्या तशा चटपटीत आणि सुगरण होत्या पण कर्मकांडं आणि नोकरी या घोळात त्यांचा कल उरकण्याकडे जास्त असायचा. मी बरीच वेगाने जेवते तरीही मला त्यांची बॉडी लँग्वेज पाहून बकाबका जेवावे लागायचे. माझेही सकाळचे क्लासेस असायचे त्यामुळे मी म्हणून पाहिलं, की मी रविवारी येत जाईन तर त्या शुक्रवार आणि त्याच्याशी निगडीत पुण्यावर(!) ठाम होत्या. जरा तिखट लागले की भर्रकन पाणी देत, फटाफटा पाठ ठोकत, घड्याळाकडे एक डोळा ठेवून भराभरा वाढत. मला आपण पुण्य़ातल्या हॉटेलमध्ये जेवत असून आपल्या पाठीला वेटिंगवाल्यांचे डोळे टोचत असल्याचा किंवा कुणीतरी ’बापरे हिचा तर अजून भात खाऊन व्हायचाय, किती जेवते ही बया’ असं काही तरी पुटपुटत असल्याचा फील येई आणि घास घशात अडकत असे.
दुसर्या एका घरी त्या बाई फारच सुंदर स्वैपाक करत, निगुतीने वाढत. केळीच्या पानावर वाफवलेले शुभ्र कळीदार सुबक उकडीचे मोदक ही तर त्यांची खासीयत. त्या सासवासुनांचे आपसात मात्र अजिबातच पटत नसे. मग जेवणपूर्व काळात सासूबाई मला त्यांच्या खोलीत नेऊन सुनेच्या 'अजून हिला अंदाज म्हणून नाही...’ आणि जेवणोत्तर सूनबाई त्यांच्या खोलीत नेऊन सासूबाईंच्या ’आता शुगर असताना खायचं कशाला यांनी इतकं गोड’ टाईप तक्रारी कुजबुजत्या स्वरात ऐकवत. मला कोणतीच पार्टी निवडून चालणार नसल्याने मी गंभीर चेहर्याने दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेई पण मत मात्र मोदकांना देई. पुढे सासूबाई देवाघरी आणि सूनबाई त्यांच्या सुनेकडे पुण्याला गेल्या. आता पुढील एपिसोड पाहण्य़ासाठी त्यांच्याकडच्या पुण्याच्या आमंत्रणाची मला प्रतीक्षा आहे.
एका सुगरण बाईंनी मात्र मला चांगलंच जेरीस आणलं. त्यांना सार्या मुलुखाची घाई. माणसं उठून आन्हिक आवरतायत तोवर या बाई स्वैपाक करून नैवेद्य दाखवून मोकळ्या. मला मात्र वेळ द्यायच्या त्यांच्या नवर्याच्या सोयीनुसार म्हणजे एक वाजता. सोबत आणखी एखादे मेहूण असे. त्या सगळं छान गरम करून या मंडळींना वाढत असत आणि मला मानाचं म्हणून ते रामप्रहरी दाखवलेल्या नैवेद्याचं ताट समोर ठेवत. बरं, ते पण इतकं वाढलेलं की पुन्हा काही मागायची सोयच नाही. त्यातल्या पालेभाजीने गारगुट्ट होऊन पापुद्रा धरला असे. भाताची मूद कुडकुडीत झालेली असे. त्यावरचे वरण वाळून त्रिकोणी होत असे. कढीचे आळून पिठले झालेले असे. पापड कोशिंबीरीतून ओघळलेल्या पाण्य़ात भिजून मान टाकून निजलेला असे. त्या ऐवजी पोळीचाच पापड झालेला असे आणि कोरडा लाडू बोटाने सरकवला तरी ताटात डंगडंग करीत धावत असे. बाकी लोक मात्र वाफाळत्या भातात ताजे वडे कुस्करत, गरमागरम कढीचे भुरके मारत, लुसलुशीत लाडूंच्या आग्रहाला नको नको, पुरे पुरे करत माझ्या जखमेवर मीठ चोळत असत. शेवटी मी नाना हिकमती लढवून ते आमंत्रण कायमचे परतवून लावण्य़ात आता यशस्वी झालेय. हे सगळं लिहिल्यानंतर आता मला नवी आमंत्रणं येण्याची शक्यता तशीही फारच कमी. 😃
अर्थात मी कुणाला बोलावलं तर हे सगळं लक्षात ठेवून टाळते. वरच्या काही उदाहरणांच्या तुलनेने कर्मकांडाचा उगाच बाऊ न करता मोजका पण सुग्रास स्वैपाक करणार्या, या मैत्रिणीसारखं मायेने वाढणार्या किंवा त्या मऊ हातांच्या कानडी आजींसारख्या माऊलींच्या आठवणी तुलनेने खूप जास्त आहेत. (म्हणूनच तर जग सुंदर आहे) 🙂

Saturday, August 10, 2019

पीपल इन द शेड

परवा तब्बल पंधरा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले. नेहमीप्रमाणे वार्‍यावर विरून न जाता बरसूही लागले. पाऊस कोसळू लागायच्या आत आपण इच्छित स्थळी पोचू हा माझा अंदाज चुकला. रेनकोट वगैरे वापरणं हा इथल्या जेमतेम सडा घालून जाणार्‍या पावसाचा घोर अपमान मानला जातो त्यामुळे तो जवळ नव्हताच. पावसाचा जोर चक्क वाढतोय हे पाहून मी मेडिकल कॉलेजलगतच्या एका चहाच्या टपरीसमोर गाडी लावून तिथल्या इवल्याशा शेडखाली धावले. 

माझ्याहून चतुर लोकांची तिथे अगोदरच गर्दी झाली होती. कफनी आणि बर्‍याच रूद्राक्ष माळा घालून चहा घेत उकिडवा बसलेला एक बैरागी, बाजूच्या रूग्णालयातल्या आपल्या पेशंटसाठी चहा घेऊन जायला आलेले कुणी कुणी, ’ओह नो, ओ माय गॉड’ म्हणत पावसाकडे वैतागलेली नजर टाकत उभी असलेली एक जीन्सधारी कॉलेजकन्यका आणि एक जरा खेडवळ कपड्यातलं नवविवाहित जोडपं. म्हणजे माझा आपला तर्क, कारण जोराचा वारा येऊन शेड फडफडू लागताच त्याने तिला नीट धरून ठेवलं आणि अचानक तिच्या कानातल्या डुलाला झोका दिला. ती हळूच इकडेतिकडे बघत लाजली. मला त्यांच्यामुळे नीट उभं राहता येत नव्हतं पण काही वर्षांनी समजा अशाच परिस्थितीत ते सापडले तर तो खेकसून ’नीट उभी राह्य नं बह्यकाने’ असं तिला म्हणणारच आहे तेव्हा हा पाऊस तिला एंजॉय करू द्यावा अशा उदात्त विचाराने मी आपली अंग चोरून उभी राहिले. ती बाई माझ्याकडे पाहून गोड हसली. बैरागी बुवांना जगाशी काहीच सोयरसुतक नसल्याने ते हातात पार्लेजीचा पुडा घेऊन आकाशात किंवा शून्यात नजर लावून बसले होते. शेड पाणी साठून खाली झुकली होती. जोडप्यातल्या नवर्‍याने ऐटीत बायकोकडे पाहात चहावाल्याकडच्या बांबूने ते उंच केले पण जमा झालेले पाणी आमच्यापैकी बहुतेकांच्या अंगावर सांडले. त्यामुळे सगळ्य़ांनी नापसंतीचे उद्गार काढल्याने वरमलेला नवरा समाजसेवा सोडून मुकाट उभा राहिला. 

एव्हाना एका जागी उभं राहून कंटाळलेला शेडखालचा एक जण चहाचा ग्लास हातात हिंदकळवत भर पावसात वेगाने धावत रूग्णालयाच्या दिशेने गेला. त्याच्या बौद्धिक क्षमतेवर शंका घेऊन ’येडंच दिसतंय’ म्हणत उरलेले पावने पाऊस, कर्जमाफी, फडणवीस सरकार इ. एव्हरग्रीन विषयांवर आपसात चर्चा करू लागले. बाजूच्या टपरीतून चुर्रर्र आवाज आला, तिकडे भजी तळायला सुरूवात झाली होती. त्या वासाने आणि आवाजाने उल्हासित होऊन एक पावना मधल्या चिखलाच्या ओहोळातून लांब उडी खेळत त्या शेडखाली पोचला. बाकीच्या चर्चकांनी पावसाने आपली आज या ठिकाणी लई पंचाईत केली असली तरी ’कास्तकारांसाठी पाऊस तं पाईजेच नं राजेहो’ असा निष्कर्ष काढला. चहावाल्याने प्लास्टिकच्या टबात जवळपास चहाचा रंग ल्यालेल्या पाण्यात चुबूकडुबूक करून दोन ग्लास धुतल्यासारखे केले. ते ’अनहायजिन’ पाहून कॉलेजकन्यका शहारली आणि तिने चाळा म्हणून मोबाईल पर्सबाहेर काढला. बहुधा इन्स्टा उघडलं असावं. सेल्फीच्या प्रत्येक फ्रेममध्ये बैरागी बुवांचा मख्ख चेहरा बॅकग्राऊंडला येत असावा, कारण तिने त्रासिक चेहरा करून मोबाईल पुन्हा आत ठेवला. त्यामुळे ’फिलींग रोमँटिक इन द फर्स्ट रेन’ या पोस्ट्ला जग मुकलं.  

दरम्यान पावसाचा वेग ओसरला आणि भुरभुरत्या पावसात आमचा तात्पुरता पण रिअल, ’पीपल इन द शेड’ हा व्हॉट्सअप ग्रुप लेफ्ट केलेली मंडळी आपापल्या कामाच्या दिशेने पांगली. बरं मग? मग काही नाही, पाऊस एकच पण कुणाचं काय तर कुणाचं काय.

Friday, May 11, 2018

आंजर्ले

चोविशीपर्यंत माझा कोकणाशी अजिबातच संपर्क किंवा संबंध आलेला नव्हता. त्यामुळे कोकणविषयक माझ्या कल्पना अगदी पुस्तकी होत्या. लहानपणी त्या ’श्यामची आई’ पुस्तकात आलेल्या वर्णनावर आधारलेल्या होत्या. त्यात नंतर वाढत्या वयानुसार ’तुंबाडचे खोत’, गारंबीचा बापू', पुलंची ’म्हैस’ कथा आणि ’अंतू बर्वा’ या व्यक्तिचित्राची भर पडली. त्यामुळे कोकणात सगळी इरसाल माणसेच राहतात असे मनात पक्के बसलेले. प्रत्यक्ष पाहिल्यावर कळले की तो फक्त पुलंच्या शैलीचा प्रभाव होता. माणसे ही शेवटी सगळीकडे सारखीच असतात. निसर्गसुंदर परिसर, त्याचे वर्णन याबाबतीत मात्र  मनातले कोकण आणि नंतर प्रत्यक्ष पाहिलेले कोकण.. त्यात अर्थात नवर्‍याचे आजोळ, आंजर्लेही आलेच, यात अजिबात फरक नव्हता. विशेषत: उंचावरून दिसणारा आंजर्ल्याचा इंग्लीश C आकाराचा किनारा केवळ अद्भुत. आजच्या भाषेत, फेसबुकच्या कव्हर फोटोला शोभेल असा.


गावात मात्र आता थोडा फरक जाणवतो. तीन वर्षापूर्वीच्या आंजर्ले भेटीत वाढ्त्य़ा पर्यटनामुळे झालेले बदल प्रकर्षाने जाणवले. पहिल्या भेटीत अनुभवलेली दुपारची नीरव शांतता, इतकी नीरव की वाडीत एखादा नारळ पडला तरी आवाज यावा... आता गाड्यांच्या कचाकच दाबलेल्या ब्रेकच्या आवाजात नाहीशी झालेली होती. त्यातच शनिवार-रविवार जोडून आल्याने पर्यटकांची संख्या अजूनच जास्त असावी.

पहिल्यांदा आंजर्ल्याला आम्ही दोघच गेलो होतो. मामांचं टुमदार घर, लगतचं सुरेख प्रशस्त देवीचं देऊळ, आजूबाजूची गच्च झाडी हे सगळं पाहताना अप्रूप वाटलं. खान्देश आणि विदर्भात इतकी हिरवाई कधीच पाहायला मिळत नाही. कोकणी पदार्थांशी संबंध फक्त मिरगुंड आणि उकडीच्या मोदकांपुरता. त्यामुळे गुरगुट्या भात, त्यावर रवाळ तूप ,मेतकूट, पोह्याचा पापड अशी मामांच्या घरची पहिली कोकणी न्याहारी मला अजून आठवते. मी नवी सून असल्याने मामींवर छाप पाडण्य़ाच्या प्रयत्नात ’द्या, मी फणस चिरते’ म्हणाले खरी, पण ते चिकट खाजरे प्रकरण आपले काम नोहे हे मला लगेच लक्षात आलं. दुसरं काम खोबरे खवणे, तेही इवल्याशा विळीवर बसून सफाईने करणे मला जरा कठीणच वाटले. मामी मात्र हे अगदी सहज करत होत्या. खांदेशी तिखटाची जीभेला सवय, पण फारसे मसाले न वापरलेला त्यांचा कोकणी स्वैपाक अतिशय वेगळा पण रूचकर वाटला. डोंगरावरच्या आमराईतले आंबे, गरे, फणसपोळ्या, खांडवी यांच्या चवीबद्दल तर काय सांगाव!

मामांचं कौलारू घर, पडवीतला झोपाळा, माळा असलेली काहीशी अंधारी खोली, दोन पाख्यांची दारं.. सगळं पाहात मी कुतूहलाने वर चढून माळ्य़ावर डोकावून आले. प्रत्येक घराची स्वत:ची एक कहाणी असते.

आईंच्या तोंडून त्यांच्या आई, दादा, त्यांची आजी यांच्याबद्दल काही ना काही किस्से ऐकलेले.अतिशय कडक, संतापी स्वभावाचे दादा म्हणजे सासूबाईंचे वडील. मुलाबाळात राबून दमून गेलेली आणि घरच्या रामरगाडयात दुर्लक्ष झाल्याने डोळा गमावलेली त्यांची घाबर्‍याघुबर्‍या स्वभावाची आई. दूधदुभतं, पैपाहुणा बघणारी खमक्या स्वभावाची आजी  ही न पाहिलेली माणसे कशी असतील, ती तिथे कितीतरी वर्ष वावरली असतील असे काही काही विचार मनात आले.

सासर्‍यांनी दादांच्या आणि एकूणच जावई भूमिकेतून पाहिलेल्या आंजर्ल्याच्या जुन्या म्हणजे तब्बल ४०-४५ वर्षांपूर्वीच्या कितीतरी धमाल आठवणी सांगितलेल्या. त्या त्यांच्याच शब्दात.
--------------------------------------------------
"कडयावरच्या गणपतीचे दर्शन झाले. मुरडीच्या बनूआत्या पेंडसेंकडे जाऊन झाले की नंतर मात्र पुढे ओसरीत बाकड्य़ावर बसून झोपाळ्य़ावर झोके घेत सुपारी कातरत असलेल्या दादांशी गप्पा मारणॆ हाच एकमेव कार्यक्रम असे. त्यातही अधूनमधून बर्‍यापैकी मनोरंजन होत असे. समोरच्या रस्त्यावरून येणारा जाणारा फक्त ’दादा हो ssss ’ म्हणून आवाज देणार आणि दादा त्याला प्रतिसाद म्हणून ’हो sss ’ असा आवाज देणार ही सहज संपर्काची प्रथा मला फार आवडली.
मधेच काही लोक विशेषत: कोळी, दादांना भविष्य विचारावयास येत असत. त्यावेळची प्रश्नोत्तरे तर फारच गमतीदार असत. दादांच्या ज्योतिषशास्त्राच्या ज्ञानाला अजिबात चॅलेंज न करता त्यांची क्षमा मागून खाली काही मासलेवाईक प्रश्नोत्तरे देत आहे.
प्र. १ चेडवाचे (मुलीचे) लग्नाकरता गेल्या सालपासून प्रयत्न चालू आहेत, कधी हुईल?
उत्तर - या वर्षी पण अजून ग्रह बराबर नाहीत, तरी देवीला नवस बोला आणि मजबूत प्रयत्न करा, पुढल्या वर्षीपर्यंत नक्की होईल.
प्र. २ समुद्रात होडी कधी टाकू ?
उत्तर - (पंचांगात बघून) अजून ४ दिवस थांब, ५ व्या दिवशी टाक ( दादा दापोलीच्या दैनिकातील हवामानाचा अंदाज न चुकता वाचत असत)
प्र. ३  हर्णेला आपलं स्वत:चं घर आहे, ,मालकीची होडी आहे हे समजावून सांगितलं तरी पोरगा ऐकत नाही. नोकरीच करायची म्हणतो. २ दिवस झाले रागावून घरातून निघून गेला, कुठे शोधावा.
उत्तर -  (पंचांगात बघून) उत्तर दिशेला शोध घ्या. (कोकणातला कोळी तरूण रागावून नोकरी शोधायला मुंबई शिवाय कुठे जाणार..)

एकदा यात्रेच्या वेळी आंजर्ल्याला होतो. गाव जेवणाचा मुख्य दिवस होता. मी ओसरीवर बसलो होतो. इतक्यात भाऊसाहेब टिळक छाप पुणेरी पगडी,धोतर, पायात पुणेरी जोडा, हातात काठी अशा थाटात आतून आले व मला बरोबर घेऊन समोरच्या घरात जेथे जेवणावळीचा स्वैपाक सुरू होता तेथे पोचले. तिथे ८-१० जण आपल्या कामात मग्न होते. ’काय सगळे व्यवस्थित सुरू आहे ना?’ असा टिळकछाप आवाजात प्रश्न विचारून २-४ मि. तिथे थांबून आम्ही परत आलो. 
नंतर असे कळले की त्यावेळी तसा प्रश्न करण्य़ाचा मान काळे घराण्यातील पुरूषाला आहे. परंतु या प्रश्नाला उत्तर देण्य़ाचा किंवा प्रश्नकर्त्याकडे किमान पाहण्याचा मान तिथल्या कुणाला नसावा याची गंमत वाटली. यात्रेत असेच काही गमतीदार मान पाहवयास मिळाले. 

एका दिवाळीत दादांच्या एकसष्टीनिमित्त सगळी मुलं, सुना, लेकी, जावई एकत्र जमले होते. पहिल्याच दिवशी अभ्यंग स्नान, फराळ झाल्यानंतर आम्ही पाचही जावई व मेहुणे भाऊसाहेबासह वर्तमान तरी बंदरावर फिरावयास गेलो. तिथे सगळ्य़ांनी किमाम युक्त पान खाल्ले आणि ते भाऊ काळेंना इतके लागले की ते खोकून खोकून बेजार झाले. तशातच किमाम पानाची नशा चढल्याचे सोंग सगळ्य़ांनी करावयाचे ठरले. (चरस हेरॉइनच्या आताच्या जमान्यात किमामची नशा हा टिंगलीचा विषय व्हावा) 
ठरल्याप्रमाणॆ घरी येता येता सर्वांचा नाट्यप्रयोग सुरू झाला. भाऊसाहेबांना पानाचा खरोखर त्रास होतच होता त्यामुळॆ त्यांना अभिनयाची गरज नव्हती. बापू जोशी अतिउत्साहात अतिरंजित अभिनय करत होते. भाऊ ओक कसलेले नाट्यकलावंत त्यामुळे त्यांच्या अभिनयाविषयी बोलायलाच नको. अण्णा रानडे पूर्णपणे फितूर झाले होते. नशाखोरीचे नाटक ही त्यांना पापाची भावना वाटत होती. त्यामुळे ते हळूच त्यांच्या बायकोला खूण करून हे खोटे खोटे चालल्याचे दर्शवत होते. मी आणि पटवर्धन किमामच काय पण तंबाखूचे पान देखील अधूनमधून खात असू. त्यामुळे किमामच्या नशेचा नेमका काय अभिनय करावा अशा गोंधळलेल्या अवस्थेत जसे सुचेल तसे करत होतो. अशा रितीने काळ्यांच्या घरात काही वेळ का होईना पण नुसता गोंधळ उडाला होता. समस्त महिला वर्ग तर भयंकर संतापलेला होता. आपल्या माहेरी जावयांनी सगळी इज्जत घालवली या जाणीवेतून त्या नवर्‍याकडे खाऊ की गिळू अशा नजरेने पाहत होत्या. 
दादाही काही वेळ हा सर्व प्रकार बघून गोंधळले होते पण लवकरच खरे काय ते त्यांच्या लक्षात आले. त्यांनी सासूबाईंना आदेश दिला "सगळेजण उन्हातून आले आहेत, छानसे थंडगार लिंबू सरबत द्या सगळ्यांना" आम्हालाही हा ईलाज मनापासून आवडला. पुढील दहा मिनीटात सरबत पोटात जाताच पडत्या फळाची आज्ञा मानून आम्ही नाटक संपविले.
पण आमच्यापेक्षाही महिलावर्गाचे संतापण्य़ाचे नाटक जास्त चांगले झाले होते असे माझे आजही मत आहे. असो.

असाच स्मरणशक्तीला आणखी ताण दिल्यास अजून काही घटना आठवतीलही. पण सर्व आठवणी सांगायच्या नसतात. काही तर आवर्जून विसरायच्याच असतात. :-)
------------------------------------------------------------
हं, तर मी मामांच्या घराबद्दल सांगत होते. मामांच्या घरा समोरचं घर पण अतिशय देखणं.. ’कोकण’ हा शब्द उच्चारून डोळे मिटले, तर जसं घर डोळ्यासमोर उभं राहील, अगदी तसं. मला चित्रं बरी काढता येतात. मला या घराचं, रस्त्याचं चित्र काढायचंय म्हटल्यावर नवर्‍याने धावत जाऊन माझ्यासाठी ताबडतोब स्केच बुक, पेन्सील वगैरे आणून दिली होती. अर्थात ते सुरूवातीच्या दिवसातच वाट्य़ाला येणारं कौतुक होतं हे मला लवकरच कळून चुकलं. नंतरच्या आंजर्ले भेटीत जुळ्य़ांना सांभाळण्य़ाच्या गोंधळात निसर्गाबिसर्गाचे चित्रातून कौतुक करायच्या मनस्थितीत मी (आणि माझे कौतुक करायच्या मनस्थितीत नवरा) मुळीच नव्हते, असो.

घर बघून मग आम्ही मागच्या वाडीत गेलो. वाडी हे प्रकरण पण मी तेव्हा पहिल्यांदाच पाहिले. उंचच उंच नारळ सुपारीच्या झाडांमधून सोनेरी प्रकाशाच्या तिरीप येत होत्या. गच्च भरलेली अशी हिरवीगार वाडी, त्यात खेळवायच्या पाण्य़ाच्या पाईपची मोठी धार, अधूनमधून फुलझाडं ..बघावं तिथे हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्य़ा छटा.. मन ’निवणं’ म्हणजे काय हे तिथे कळले. वाडी संपते न संपते तोच समुद्राची गाज जोरात ऐकू यायला लागली. नजर जाईल तिथवर पसरलेला चंदेरी चमचमता समुद्र. चक्क घराला अटॅच्ड समुद्र !!! याहून वेगळं सुख ते काय! त्यानंतरची आंजर्ला भेट मुलांसह, तेव्हा सर्वात आवडलेले आणि नव्याने जाणवलेले दृश्य म्हणजे ’टेकडी गणपती’च्या स्पॉटवरून खाली दिसणारा निळाशार समुद्राचा तुकडा.. त्यातल्या नावा.. आणि तशाच छटांचं आभाळ. गाडीने तिथून खाली उतरताना निथळत्या पावसात पाहिलेली इरली घेतलेली तुरूतुरू चालणारी सडसडीत कामसू माणसं. दुसर्‍या दिवशी सकाळी मुलांना दचकून जाग आली ती देवीच्या देवळात वाजू लागलेल्या नगार्‍याने. हे सगळं त्यांच्यासाठी खूप वेगळं होतं. ’गणपतीचं पाऊल’ आणि त्यांच्या आजीची ’खांबेटे शाळा’ पाहताना मुलांना गंमत वाटली. रात्रीच्या वेळी काहीशी गूढ वाटणारी वाडी. ’रात्रीचं तिकडे जाऊ नका’ असं मामांनी बजावल्याने तरीकडच्या रस्त्यावर आम्ही जेवणं आटोपून टॉर्च घेऊन चक्कर मारायला गेलो, वीज गेली असावी. जनावराची थोडी भीती मनात होती. तेव्हा बाहेरून साधारण सारखीच दिसणारी माडात दडलेली कौलारू घरं, त्यात लुकलुकणारे कंदील आणि बहुतेक घरांच्या पडवीत बसलेली वयस्कर जोडपी. कोकणचं ते वास्तव.. आता पर्यटनामुळे वाढलेल्या संधी बघता थोडंफार बदलायला लागलंय.

शेवटची आंजर्ला भेट आठवते तेव्हा आम्ही शब्दश: तिन्हीत्रिकाळ समुद्रावर जात होतो. पहाटे लवकर उठून पाहिलेला कोवळ्य़ा किरणांमधला सतेज समुद्र, उन्ह वाढ्त गेल्यावरचा लखलखणारा, डोळे दिपवणारा समुद्र आणि मावळतीच्या वेळचा मंद चमकणारा समुद्र.. प्रत्येक वेळी निराळा भासणारा.  हर्णे वरून पुढे जाताना तो चमचमता समुद्र आणि कोळ्य़ांनी जमा केलेले माशांचे रूपेरी चकाकते ढीग आणि केळशीकडे जाताना गाडी बराच वेळ समुद्राला समांतर जात असते ते  दृश्य तर मला नेहमीच आठवतं.


 नवर्‍याचं आजोळ कोकणात नसतं तर कधीतरी फिरायला म्हणून कोकणात नक्की गेलो असतो पण त्या टूरीस्ट रिसॉर्टच्या आठवणींना नात्यांचा नैसर्गिक गंध लाभला नसता.