#
कोजागरी पौर्णिमा आपण आज साजरी करतोय. चांदण्यांच्या प्रकाशात आकाशाच्या घुमटाखाली आटीव मसाला दुधाचं प्राशन करत जागरण करत एकत्रीकरण, ही त्यामागची सुंदर संकल्पना आहे. आमच्या सोसायटीत ’कोणाला बोलवायचं, कोणाला नाही, दुधाआधी बटाटेवडे ठेवायचे की पावभाजी’ वगैरे अत्यंत महत्वाच्या विषयावर घनघोर चर्चा झडतायत. त्यातही एक मजा आहे पण यापलीकडची लहानपणची कोजागरी आठवते. चांदणं पडलं की आई दादाचं औक्षण करी. चांदण्यांचा स्वच्छ दुधी प्रकाश आणि निरांजनाच्या ज्योतीचा सोनेरी प्रकाश मिसळून एक छानसा बिलोरी रंग पसरे. मग आई काहीतरी छोटीशी भेटवस्तू देई. साधारणपणे लहान म्हणून घरोघरी शेंडेफळाचंच कौतुक होतं. ज्येष्ठांचं ((घरातल्या ज्येष्ठ मुलाचं किंवा मुलीचं) कौतुक करणारी ही अश्विन पौर्णिमेची खास पद्धत. अश्विन आणि कार्तिक हे दोन महिने मिळून शरद ऋतू होतो. त्यामुळे ही कोजागरी पौर्णिमा म्हणजेच "शरद पौर्णिमा". कुणी याला कौमुदी पौर्णिमा सुद्धा म्हणतात तर या पौर्णिमेला माणिकेथारी (मोती तयार करणारी) असेही म्हटलं जाते.काही भागात याला "नवान्न पौर्णिमा" असेही म्हणतात. आपल्या कृषी संस्कृतीमध्ये हा दिवस विशेष महत्वाचा आहे. शेतकरी वर्गाला निसर्गाबद्दल वाटणारी कृतज्ञता यानिमित्ताने व्यक्त केली जाते. शेतीची कामे अर्धी किंवा अधिक झालेली असता. शेतातील पिके तयार होत आलेली असतात. पावसाळा संपून काही काही पिके हाताशी आलेली असतात. घर धान्याने भरु लागते. या नव्या धान्याचे स्वागत, एकप्रकारे पूजा करण्याचा दिवस म्हणजे नवान्न पौर्णिमा. आता या वेगवेगळ्या नावांनी आणि पद्धतींनी साजर्या होणार्या पौर्णिमेचा दूध पिण्याशी नेमका काय संबंध!
या सुमारास सूर्याचे दक्षिणायन सुरू असते. शरद ऋतूमध्ये हवामानात बदल घडत असतात. वातावरणातील उन्हाची तीव्रता हळूहळू कमी होते तरीही दिवसभर उन्हाचा ताप आणि रात्री थोडीशी थंडी असे मिश्र वातावरण असते. शरद ऋतूमध्ये वाढणाऱ्या पित्ताने शरीराला त्रास होऊ नये म्हणून दूध पिण्याचा रिवाज सुरु झाला असावा. या दिवशी सुकामेवा, चारोळी, जायफळ आणि अर्थात साखर घालून दूध सुगंध पसरेतो आटवले जाते. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडली की मग ते दूध प्राशन केले जाते. दूध आणणे, तापवणे, आटवणे, ते आस्वाद घेत पिणे हा एकत्रित अनुभव त्या दुधाची गोडी अजूनच वाढवतो. या दिवशी पांढर्या रंगाचे विशेष मह्त्व आहे असे म्हणतात कारण हा त्या दिवशीचा निसर्गाचाच ’कलर कोड’ असतो. पांढरी फुलेही या कौमुदी उत्सवाचाच एक भाग होतात.
कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र संपूर्ण १६ कलांमध्ये असतो. या दिवशी तो पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असतो. नेहमीपेक्षा मोठा गरगरीत दिसतो. कोजागरीचं शीतल चांदणं अनुभवलं की शांत वाटू लागतं. सर्वत्र पसरलेली चंद्रकिरणं मनाला तृप्तीची अनुभूती देतात. मनातला उन्हाळा, तगमग त्या किरणांच्या उर्जादायी स्पर्शाने निवते. तसा आताशा आपला चांदण्याशी संबंध येतोच कुठे. मिलेनियलपूर्व पिढीने गच्चीवर झोपण्याची मजा अनुभवलीय. चांदण्यांनी खच्चून भरलेलं मखमली आकाश मूकपणे बघता बघता झोपेची दुलई हलकेच पांघरली जाई. आताच्या धावपळीच्या आयुष्य़ात हा निवांत प्रकार बंदच झाला. अशा वेळी ’जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या सिनेमातला प्रसंग आठवतो. कॉर्पोरेट विश्वातल्या धावपळीत गढून गेलेल्या नायकाला निसर्गाशी आणि त्यायोगे स्वत:शी संवाद साधण्याची कधी उसंतच मिळालेली नसते. या ताणांमुळे आधुनिक घरांमधल्या आकर्षक छताकडे टक्क पाहत जागा राहण्यापेक्षा ’मध्यरात्री नभ घुमटाखाली शांत शिरी तम चवर्या ढाळी’ ची अनुभूती काही वेगळीच असल्याची जाणीव नायिका त्याला करुन देते. जमिनीला पाठ टेकून तो पहुडतो आणि स्वछंदपणे आकाशाकडे पाहतो. चांदण्यांनी लगडलेल्या काळ्याभोर आकाशाकडे पाहताना त्याला आपल्या जगण्यातल्या हरवलेला सूर गवसतो. असे क्षण आपल्या आयुष्यात आणण्याचा एक ’बहाना’ म्हणजे कोजागरी.
भारतीय बौद्ध धर्म संस्कृतीत या दिवसाला विशेष मान्यता आणि मह्त्व आहे तर हिंदू धारणेनुसार या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवर उतरते. मध्यरात्री म्हणजे चंद्र आपल्या सौम्य प्रकाशात पृथ्वीला न्हाऊ घालत असताना त्या प्रकाशात "अमृतकलश' घेऊन 'को जागर्ति' (म्हणजे 'कोण जागते आहे') असे म्हणत पृथ्वीतलावर संचार करीत असते. ’कोण जागे आहे’ याचा मथितार्थ आहे कोण सजग आहे, कोण ’भानावर’ आहे, कोण ज्ञानासाठी आतुर आहे. तिच्या हाकेला प्रतिसाद देण्यासाठी सगळे जागे राहतात. या जागे असलेल्या मंडळींना ती आशीर्वाद रुपाने "अमृत' म्हणजेच धनधान्य, सुखसमृद्धी देते. इथे सजग असण्याचा अर्थ ’न झोपलेला’ असा अर्थातच अभिप्रेत नाही. जो प्रयत्नवादी आहे, कष्टाळू आहे, ज्ञानार्थी आहे, जो स्वत:ला समष्टीशी म्हणजे चराचरातील समृद्धीशी जोडून घेऊ इच्छितो अशा व्यक्तीलाच यश आणि वैभव लाभतं असा येथे लाक्षणिक अर्थ आहे.
कोजागर साजरी करणे आणि जागरण या गोष्टी अभिन्न आहेत. मनोरंजनासाठी या जागरणात खेळ, गाणी इ. साधनांचा समावेश अवश्य असावा पण संवादही असावा. आजच्या रात्री लक्ष्मी प्रसन्न व्हावी म्हणजेच आपण श्रीमंत व्हावे असे ज्याला ज्याला वाटते त्याला कायम सजगतेचे व्रत घ्यायला हवे. ही श्रीमंती फक्त आर्थिक अपेक्षित असेल तर ती अपुरी आहे. मनाची आणि बुद्धीची श्रीमंतीही जोडीला हवी. माणसाने माणसाला प्रेमाने भेटणं, माणसाने माणसांच्या आणि जगण्याच्या भाऊगर्दीत स्वत:ला शोधणं, माणसाने आपल्यापेक्षा वेगळ्या माणसांना सामावून घेत आपलं वर्तुळ विस्तारणं हेच बहुतेक प्रथांचं मुलभूत उद्दिष्ट्य आहे. ते साध्य होत असेल तर ’को जागर्ति’ या प्रश्नाला आपण दुधाच्या पेल्यांनी ’चीअर्स’ म्हणत निस्संदिग्धपणे ’मी’ असं उत्तर देऊ शकू.
#kojagari
पूर्वप्रसिद्धी- दिव्य मराठी ऑक्टोबर २०२१

No comments:
Post a Comment