संत साहित्य म्हणजे केवळ भक्ती किंवा अध्यात्म नव्हे. समाजप्रबोधन हा त्याचा गाभा असतो. ईश्वरापर्यंत जाण्याचा मार्ग माणसाच्या अंतरात्म्यापासून सुरू होतो हे महाराष्ट्रातली संतपरंपरा कायम सांगत आली आहे. तुकडोजी महाराज त्यापुढे जाऊन म्हणतात, ’कशास फिरतो व्यर्थ, तुझे गावच नव्हे का तीर्थ!’
गावाची उन्नती, गावकर्यांच कल्याण यातच त्यांचं आध्यात्म सामावलेलं होतं. ते राष्ट्रसंत ठरले कारण त्यांनी व्यक्ती पासून समष्टीपर्यंत जाताना गाव, समाज, राष्ट्र आणि माणूसपण अशा सर्व पातळ्यांवर विचार मांडला. त्यांच्या साहित्याने आणि वाणीने समाजाला सतत एक प्रश्न विचारला —आपण माणूस म्हणून, समाज म्हणून खरंच पुढे चाललो आहोत का?”** इथेच ते थांबले नाहीत तर त्यांनी समाजाला परिवर्तनाचा मार्गही दाखवला आहे.त्यांच्या प्रश्नाच्या केंद्रस्थानी एक महत्त्वाचा घटक आहे — **स्त्री** कारण समाजाचा तो जवळपास निम्मा भाग आहे. म्हणूनच तुकडोजी महाराज थेट म्हणतात -
महिलेविण विश्व न झाले, काय होते पुरुषाने केले
राष्ट्रसंतांना हे स्पष्ट दिसत होतं की, ज्या समाजात स्त्री दुर्लक्षित, अशिक्षित, परावलंबी आहे, तो समाज कितीही प्रगतीची भाषा बोलत असला तरी आतून पोकळ असतो. त्यासाठी त्यांनी आपल्या साहित्यातून महिलोन्नतीची वाट दाखवली. ग्रामगीतेत या नावाचा एक स्वतंत्र अध्याय लिहीला.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजवर स्त्रियांनी कसं वागावं हेच समाज सांगत आलेला आहे पण तुकडोजी महाराजांनी त्यांच्या साहित्यातून समाजपुरुषाला खणखणीत शब्दात सांगितलं आहे की स्त्रियांशी कसं वागावं, तिच्याविषयी नेमका काय विचार करायला हवा, तिला कसं वागवायला हवं. हेच त्यांच्या साहित्याचं वेगळेपण आहे.
-------------
१९७५ साल हे युनोने आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून जाहीर केलं. ८ मार्च हा महिला दिन निश्चित झाला आणि महिलांच्या प्रश्नांकडे जगाचं आणि आपल्या देशाचंही लक्ष वेधलं गेलं. मला नवल वाटतं की या घडामोडींच्या कितीतरी आधी १९६८ साली देह सोडून गेलेल्या तुकडोजी महाराजांनी आपल्या साहित्यातून हे प्रश्न मांडले होते आणि ते ही उत्तरांसकट. स्त्रीवाद, स्त्रीमुक्ती हे शब्द कुठेही न वापरता स्त्रीशक्ती काय आहे हे त्यांना कळलं होतं, तिचं सामर्थ्य आणि जगाला जन्माला घालणारा आणि त्याची जोपासना करणारा तिच्यातला मातृभाव कळला होता. इतक्या जवळून की तुकडोजी महाराजही भावनाविवश होऊन म्हणतात-
तिच्या भावना गंगेचे पवाडे, वर्णिले न जाती माझ्याने
आणि म्हणूनच या जगातलं मांगल्य, सौंदर्य जिच्या अस्तित्वामुळे आहे त्या स्त्रीची उन्नती म्हणजे समाजाची आणि पर्यायाने राष्ट्राची उन्नती असं मुलभूत चिंतन राष्ट्रसंतांनी मांडलं.
संती माऊलीचे रूप दिले , तरीच ते देवपणासी पावले .... पण माउली तिथेच राहिली .
स्त्री जर अज्ञानात, भीतीत आणि बंधनांत अडकलेली असेल, तर तिच्या हातून घडणारी पुढची पिढीही त्याच मर्यादांत अडकते. ते लिहितातम्हणतात
देवाने निर्मिली ही क्षिती, तिचे उदरी खाणी किती
परि माऊली जैसी प्रेमळ दीप्ती, कोठेच नाही
महाराज म्हणतात. ती घरातल्या संस्कारांची शिल्पकार आहे. गर्भापासून तिचे संस्कार, मातेच्या स्वभावे पुत्राची घडण. इथे पुत्रीची घडण लिहिलं नाहीये. पुत्राची. पुत्राला जर तिने चांगला पुरूष व्हायला शिकवलं तर समाजातल्या कितीतरी स्त्रीविषयक समस्या कमी होतील. आजच्या आत्मनिर्भर होऊ पाहणार्या स्त्रीशी कसं वागायचं हे पुरूषांना कळत नाही. एकमेकांना मदत करण्यात कमीपणा नाही, तिलाही तिचा अवकाश आणि पंख मिळाले पाहिजेत हे एका आईनेच आज मुलाला सांगणं आवश्यक आहे. मुळात बायकांमध्ये एक उपजत शहाणपण होतं. फक्त हे शहाणपण दाखवायला त्यांना बाहेर वाव मिळाला नाही. मिळाला तर एक स्त्री कमाल करू शकते हे त्यांनी जाणलं होतं.
प्रल्हादाची कयाधू , छत्रपती शिवरायांची चे जिजाई, श्रीरामांची कौसल्या, श्रीकृष्णाची देवकी यांनी अक्षरश: युगपुरूष घडवले आहेत ही एका स्त्रीची ताकद आहे. आजच्या सायबर पालकत्वाची आव्हानं पेलणं तिला सहज शक्य आहे.
------------
परंतु तिच्या ताकदीची जाणीव तिला स्वत:ला आणि समाजाला म्हणावी तशी नाही आणि म्हणून राष्ट्रसंतांनी स्त्री-शिक्षणाचा आग्रह धरला. शिक्षण म्हणजे केवळ अक्षरओळख नव्हे, त्या अर्थाने आज साक्षरता बरीच वाढली आहे पण शिक्षण म्हणजे विचारांची मशागत. माणसाची बुद्धी आणि आत्मा यांचा विकास म्हणजे शिक्षण अशी सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शिक्षणाची व्याख्या केली आहे. हाच विचार राष्ट्रसंत सोप्या भाषेत मांडताना म्हणतात - स्त्रीने शिकावं, विचार करावा, प्रश्न विचारावे, अंधपरंपरेला आव्हान द्यावे, त्याज्य गोष्टी नाकाराव्या, योग्य-अयोग्याचा विवेक ठेवावा
शिक्षणामुळे स्त्रीला —स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होते, आपले हक्क समजतात, आपल्यावर अन्याय झाला आहे, हे ओळखण्याची दृष्टी मिळते. अन्यथा वो जानतेही नही की वो जानते नही , और इस ना जानने को उम्रभर जिये जाते है
काही जणांना वाटतं की वैदिक काळात होत्याच की स्त्रिया उच्चशिक्षित. ते गार्गी मैत्रेयीचे दाखले देतात. हो नक्कीच होत्या पण इस. पाचशे ते हजार मध्ये भारतावर सातत्याने होणार्या बाह्यआक्रमणांमुळे तिचं विवाहाचं वय कमी झालं, शिक्षणाची दारं बंद झाली आणि स्त्री माजघराकडे वळली. सुरक्षेच्या आणि योनीशुचितेच्या काळजीपोटी तिच्यावर बंधनं आली. बाईच्या जातीने कसं वागावं याचे नियम समाजापुरूषाने ठरवले. म्हणूनच ’द सेकण्ड सेक्स’ या जगप्रसिद्ध पुस्तकात लेखिका सीमान द बोव्हा म्हणते स्त्री कधी जन्माला येत नाही ती स्त्री म्हणून घडवली जाते. अगदी घरातल्या आईचंही मुलगा कसा वाढतो आहे इकडे फार लक्ष नसतं पण मुलीच्या जातीने कसं वागलं पाहिजे यावर तिचा कटाक्ष असतो. परिणामी प्रश्न तसेच राहतात.
--------------------
आता कुठे राहिलंय तसं काही, केवळ विशीतली सहर शेख मोबाईल च्या स्क्रीनवर ’कैसा हराया’ म्हणताना दिसते. दुसरीकडे सर्वोच्च पदावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दिसतात. स्त्रिया सायकलपासून विमानच काय अगदी युद्धनौकाही चालवतात मग अजून काय समानता बाकी आहे , कोणती प्रगती शिल्लक आहे ?
याचंच उत्तर शोधण्यासाठी पेटीएम या कंपनीने मध्यंतरी एक प्रयोग केला होता.
एका मोठ्या खोलीत मध्यभागी एक रेषा आखून त्यावर तीस ते पन्नास वयोगटातल्या सुशिक्षित स्त्री-पुरुषांना त्यांनी उभं केलं. त्यांना सांगितलं तुम्हाला स्पीकरवर प्रश्न ऐकू येईल , उत्तर हो असेल तर एक पाऊल पुढे जायचं, नाही असेल तर एक पाऊल मागे जायचं. मग प्रश्न सुरू झाले आणि ते पुढे मागे जाऊ लागले. सुरूवातीचे प्रश्न साधारण असे होते - वयाच्या विसाव्या वर्षापूर्वी तुम्ही दुचाकी चालवायला शिकलात का, महाविद्यालयापर्यंत तुम्ही एक तरी खेळ नियमित खेळलात का , तुमचे कपडे तुम्हाला इस्त्री करता येतात का, घरातली बिलं तुम्ही भरता का, तुमचं स्वत:चं नेट्बँकिंग अकाऊंट आहे कां, सोन्याचा आजचा भाव तुम्हाला माहीत आहे का, तुम्हाला तुमचं पोट भरण्यापुरता स्वतःसाठी दोन वेळेचा स्वयंपाक करता येतो का ?
इथपर्यंत स्त्री-पुरूषांमध्ये फार अंतर नव्हतं मग पुढचे प्रश्न आले, तुमचं वाहून तुम्ही स्वतः खरेदी केलं आहे का, वेळ पडल्यास स्वत: दुरूस्त करता का? काही खरेदी करायचं असल्यास तुम्ही कधी एकट्याने निर्णय घेता का ? एकट्याने बाहेरगावी जाता का? स्वत: नियोजन करून तुमचे तिकीट तुम्ही काढता/मॅनेज करता का? तुमच्या घराच्या पाटीवर तुमचं नाव आहे का? इ. इ.
अंतर वाढलं असेल की कमी झालं असेल याचं उत्तर सहज लक्षात येईल. म्हणजेच मोठे बदल झाले असले तरी खूप लहान लहान मुलभूत बदल अजून बाकी आहेत.
---------------
आणखी एक मह्त्वाचा विचार राष्ट्रसंतांनी आपल्या साहित्यातून मांडला तो म्हणजे ग्रामजीवनात स्त्रीचा सक्रिय सहभाग. याचा अर्थ कागदावर महिला सरपंच आणि खुर्चीवर तिचा पती असा सहभाग नव्हे. ** राष्ट्रसंतांचं साहित्य हे केवळ वैचारिक नाही, तर अत्यंत कृतीशील आहे. त्यातून त्यांनी स्त्रियांना — ग्रामसभेत सहभागी होण्याचं , स्वच्छता, आरोग्य, शिक्षण यामध्ये पुढाकार घेण्याचं, स्वयंशिस्त आणि स्वावलंबन विकसित करण्याचं आवाहन केलं आहे. .त्यांच्या मते, स्त्रीला निर्णयप्रक्रियेपासून दूर ठेवून खरा ग्रामविकास होऊच शकत नाही.आज आपण पंचायतराज, महिला आरक्षण याबद्दल बोलतो; पण राष्ट्रसंतांनी हे बीज अनेक दशकांपूर्वी पेरलं होतं.
त्यांनी लिहिलं आहे, स्त्रियांच्या संघटना असाव्यात. तिळगुळ समारंभ, हळदी कुंकू, शारदोत्सव, संमेलन सभा कीर्तन कथा व्हाव्यात. हल्ली सामूहिक स्वरूपाचे असे काही कार्यक्रम राजकीय पक्ष किंवा मनोरंजन वाहिन्या घेतात. त्यात कुणी सेलेब्रिटी कलाकार असतात. त्यांनी येऊन नाचायचं, बायकांनी येऊन गाण्यांवर नाचायचं, आयोजकांनी त्यांना अत्यंत सुमार प्रश्न विचारायचे. अजूनही उखाणे स्पर्धा, थाळी सजवणे, मॅचिंग स्पर्धा यातून हे कार्यक्रम बाहेर न पडल्याने यातून कवडीचंही सक्षमीकरण होत नाही. यापेक्षा कलाधारित स्पर्धा, दर्जेदार सादरीकरण, बचतगटांचे स्टॉल्स, चांगली भाषणं यावर भर द्यावा.
याची कल्पना असल्यासारखं महाराजांनी पुढे लिहीलं आहे- स्त्रियांनी बाहेर पडावं, एकत्र यावं, आत्मभान वाढवावं, त्यासाठी वाचनालयात महिला विभाग सुरू व्हावेत.
राष्ट्रसंत तिला कधीच “बिचारी स्त्री” म्हणत नाहीत. ते म्हणतात —स्त्री सक्षम आहे, फक्त तिच्या क्षमतेवर समाजाने विश्वास ठेवायला हवा. सन्मान हा तिचा अधिकार आहे. सन्मान म्हणजे महिला दिनाला ;तू दुर्गा तू लक्ष्मी’ असल्या पोस्ट फॉरवर्ड करणे नव्हे , सन्मान म्हणजे — तिचं मत ऐकणं, तिच्या श्रमांना किंमत असणं, तिच्या निर्णयांना विचारात घेणं. परप्रकाशी चंद्रापेक्षा तिला स्वयंप्रकाशी काजवा होऊ देणं. तिला तिचा हक्काचा वाटा देणं.
शेतकरी नेते दिवंगत शरद जोशी आठवतात इथे. एका सभेत भेगाळलेल्या पायांच्या , रापलेल्या हातांच्या, डोळ्यात भीती आणि कुतूहल घेऊन बसलेल्या शेतकरी स्त्रियांना त्यांनी विचारलं, " बाईच्या जन्माला आलो याचा कधी आनंद झाला का ?" त्यावर एका बाईने अचानक एक ओळ म्हणून दाखवली "बाईच्या जल्मा नको घालू शिरीहारी , रात अन दिस परायाची ताबेदारी"
यावरूनच जोशींनी शेतकरी संघटनेच्या ’स्वातंत्र्याच्या कक्षा’ या संकल्पनेचा पाया घातला. त्यानंतरच्या चांदवड अधिवेशनानंतर स्त्रियांमध्ये इतकी उमेद आली की एकीनं आपला अनुभव सांगितला- मालक म्हनलं आंगुळीचं पानी काड. म्या म्हनलं तुमचं तुमी काडा , हातचं काम टाकून मी काय बी करनार न्हाई" यातून पुढचं पाऊल नव्वदच्या दशकातलं ’ लक्ष्मी मुक्ती ’ आंदोलन . यात दोन लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी जिचा एका चमच्यावरही अधिकार नव्हता त्या आपल्या पत्नीच्या नावे जमिनीचा सातबारा करून दिला.
-----------
अंधश्रद्धा आणि जुनाट रूढींचे स्त्रीच्या उन्नतीतील मोठे अडथळे दूर व्हावेत हे राष्ट्रसंतांनी ठामपणे मांडलं आहे. **त्यांना ठाऊक होतं की, स्त्रीच्या पायात बेड्या घालणारी वृत्ती बहुतेक वेळा धर्माच्या आडून येते, पण ती धर्म नसते — ती अज्ञान असते.ज्या रूढी — स्त्रीला दुय्यम वागणूक देतात, तिला पाप-पुण्याच्या भीती दाखवतात, तिच्या प्रश्नांना “मर्यादाभंग” ठरवतात त्यांना ते विरोध करतात. त्यांच्या लेखनात वारंवार जाणवतं जिथे जिथे धर्म काही रूढींमुळे माणसाला माणूस म्हणून जगू देत नसेल, तिथे तिथे त्यांची चिकित्सा आवश्यक आहे. स्त्रीच्या बाबतीत तर त्यांचा हा विचार आणि स्वर अधिक तीव्र होतो.
बहुतेक धर्मग्रंथात स्त्रीच्या दुय्यमत्वाचा कधी स्पष्ट तर कधी नकळत उल्लेख येतो.
अगदी राजकारणातही सर्वत्र "आम्ही बांगड्या भरल्या नाहीत". "मर्द असशील तर माझ्याशी लढ" अशी भाषा आपण ऐकतो. दुर्दैवाने बायका पण एखाद्याला निषेध म्हणून चोळी बांगडी पाठवतात तेव्हा त्यांना आपण आपलाच अपमान करतो आहोत हे ही कसं कळत नाही? लोक शिव्या देताना सर्रास आई बहिणीचा उद्धार करतात. सोशल मीडियावर एखाद्या प्रसिद्ध स्त्रीच्या, अभिनेत्रीच्या, स्त्री खेळाडूच्या किंवा राजकारणातील स्त्रीच्या पोस्ट खालच्या किंवा बातमी खालच्या कॉमेंटचा दर्जा पाहिला तर आपला सर्व साधारण समाज स्त्रियांकडे आजही कशा नजरेने पाहतो ते सहज कळेल. स्त्रियांनी काय घालावं हे समाजाने ठरवू नये तसंच आपल्या पोशाख आणि देहबोलीतून आपण काय संकेत देतो आहोत आणि त्या समूहाची वैचारिक इयत्ता काय आहे याचं भान स्त्रियांनी ठेवणं गरजेचं आहे. हे भान असलेल्या स्त्रियांनाही अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं त्यामुळे प्रत्येक मातेने आपल्या मुलाला स्त्री सन्मान शिकवला पाहिजे. त्याला स्त्रियांकडे पाहण्याची स्वच्छ नजर दिली पाहिजे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रसंतांचा महिलोन्नतीचा विचार दुर्दैवाने आजही तितकाच गरजेचा आहे. त्यांचं साहित्य आपल्याला जाणवून देतं की
* स्त्री उन्नती ही तात्पुरती योजना नाही, ती मानसिकता आहे जी मातांना आपल्या मुलांमध्ये पेरायची आहे.
* ती कायद्याने नाही, तर संस्कारांनी रुजते तसे संस्कार द्यायचे आहेत.
* ती केवळ भाषणांनी नाही, तर प्रत्यक्ष कृतीनेच साकार होऊ शकते, हे स्व:त:च्या वार्तनातून ठसवायचं आहे.
----------------
व्हाय शुड बॉईज हॅव ऑल द फन , असं हल्लीच्या आधुनिक मुली विचारतात. महाराजांनी तर हे त्याआधीच लिहून ठेवले आहे - "जे जे सुख असेल पुरुषांना महिलांचेही ते असावे अभिन्नपणे ". महाराज पुढे म्हणतात - रथाची दोन्ही चाके मजबूत करावी. माता अशा आदर्श असल्या तर त्यांच्या पोटी येणारे आदर्श संतान भारताचा वैकुंठ घडवतील....
शेवटी ते स्त्रीपासून स्त्रीतत्वापर्यंत जात हे ही सांगून जातात
जिकडे जातील तिकडे, स्त्रीच आहे मागेपुढे, अंतरी बाहेरी प्रकृतीचे वेढे, जिवापाडे पडले हे
पुरूष आणि प्रकृतीरूपी स्त्रीचं हे चिरंतन नातं समानतेचा नव्हे परस्परपूरकतेचा संदेश देतं आहे. हाच आभाळाएवढा संदेश राष्ट्रसंतांनी आपल्या साहित्यातून दिला, भजन कीर्तनातून त्याचा पुनरुचार केला. स्वत:चा उल्लेख करताना मात्र ते विनम्रतेने स्वत:विषयी लिहितात ’तुकड्या म्हणे’
----------------------------
परिसंवाद - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन, अकोला, जानेवारी २०२६

No comments:
Post a Comment