Showing posts with label अनुवाद-साहित्य. Show all posts
Showing posts with label अनुवाद-साहित्य. Show all posts

Thursday, January 1, 2026

मुलाखत - मा. तारा भवाळकर


९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सातारा येथे सुरु आहे. या पार्श्वभूमीवर प्रख्यात त्रैमासिक ’दौत लेखणी’ साठी मी घेतलेली , ज्येष्ठ सहित्यिक डॉ. तारा भवाळकर यांची मुलाखत. 

( डॉ. तारा भवाळकर या ९८ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या लोकसंस्कृती, संत साहित्याच्या अभ्यासक, संशोधक. त्यांनी नाट्यविषयक संशोधन, लेखन तसंच स्त्री जाणिवांचा वेध घेणारंही विपुल लेखन केलं आहे. अध्ययन, अध्यापन, संशोधन आणि लेखन हा त्यांचा ध्यास आहे. मराठी विश्वकोश, मराठी वाङ्मयकोश तसंच मराठी ग्रंथकोश या कार्यात त्यांचं विशेष योगदान आहे. )
पूर्वअनुमती घेऊन ताराताईंशी मोबाईलद्वारे संवाद साधला. त्यांनी मोकळेपणाने सर्व प्रश्नांना उत्तरं दिली.

------------------------------------------ 

प्रश्न : अ.भा.साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाची निवड बहुतेक वेळी वादग्रस्त ठरते. सोशल मिडियावर त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया येत असतात. तुम्ही लोकसाहित्याच्या गाढ्या अभ्यासक आहात. बहुविध क्षेत्रात तुम्ही मौलिक संशोधन आणि लेखन कार्य केलेलं आहे. साहित्यक्षेत्रात तुम्हाला सन्मानाचं स्थान आहे. या पातळीवरून बघताना साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष निवडण्याच्या प्रक्रियेबाबत तुम्हाला काय वाटतं ? 

मा. तारा भवाळकर : पूर्वी संमेलनाध्यक्ष ठरवण्यासाठी निवडणूक पद्धत होती. इच्छुक लोकांनी अर्ज करायचे आणि मग साहित्य महामंडळाचे पदाधिकारी ज्याला अधिक मतं मिळतील त्यांना अध्यक्ष म्हणून घोषित करत. नंतर अशी राजकीय पद्धतीने निवडणूक घेण्याऐवजी अध्यक्षांची निवड सन्मानाने व्हावी व जाणकार लोकांनी ती करावी हा विचार पुढे आला. साहित्य महामंडळाने, महाराष्ट्रातल्या आणि बृहन्महाराष्ट्रातल्या साहित्य संस्थांनी एकत्र येऊन अध्यक्ष निश्चित करायचा अशी पद्धत गेल्या काही वर्षांपासून सुरू झाली आहे. माझ्या मते ही पद्धत जास्त योग्य आहे. इंग्रजीत सांगायचे तर ’इलेक्शन पेक्षा सिलेक्शन’ किंवा ’निवडणुकीपेक्षा निवड’ ही अधिक सन्मानाची आहे कारण मागून मिळवणं हे कलावंत किंवा साहित्यिकाच्या दृष्टीने फारसं स्पृहणीय नाही. 

तशी प्रक्रिया सुरू झाली म्हणून मी अध्यक्ष होऊ शकले. निवडणुकीला उभं राहून मत मागायची पद्धत असती तर मी या जन्मी अध्यक्ष झाले नसते कारण साहित्यिकांनी /कलावंतांनी अर्ज करून काही मिळवणं, याच्या मी विरोधात आहे. 

माझी निवड झाल्यानंतर विरोधाचे सूर माझ्यापर्यंत तरी पोचलेले नाहीत. साहित्य महामंडळासह, महाराष्ट्रातल्या आणि बृहन्महाराष्ट्रातल्या साहित्य संस्थांच्या पाठिंब्याने माझी एकमताने निवड झाली , त्यांच्या अध्यक्षांची मला रीतसर पत्र आली त्यामुळे मी ते अध्यक्षपद स्वीकारलं. माझ्यासाठी हा आयुष्याच्या उत्तरायणाच्या टोकावरचा एक अपघात होता. 😊

मला हे अनपेक्षित होतं कारण मी कोणत्याही गटातटात नव्हते. ती माझी प्रवृत्ती नाही आणि मला तेवढी उसंतही मिळाली नाही. अध्यक्षपद मिळाल्याने अगदी आनंदाने उड्या माराव्या असं  वाटलं नाही पण खोटं का बोला, आयुष्याच्या या टोकाला आल्यावर एवढे लोक आपल्याला लक्षात ठेवतायत याचं मला समाधान नक्कीच वाटलं. त्याबद्दल मी या क्षेत्राची कृतज्ञ आहे.  

-------------------------------------------

प्रश्न :  अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या आजवरच्या इतिहासात तुमच्यासह अवघ्या सहा लेखिकांना संमेलनाध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला आहे. त्यामागे काय कारण असावं? ताकदीने लिहिणार्‍या लेखिका कमी आहेत की हा भेदभाव आहे की हे नकळतपणे, निर्हेतुकपणे घडलं असावं ! 

मा. तारा भवाळकर : 

आपली सगळी व्यवस्था पुरूषप्रधान आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत ’मेल डॉमीनेटींग सोसायटी’ आहे. स्त्रियांचं साहित्यक्षेत्रातलं काम मुळीच कमी नाही , मी तर म्हणेन अगदी लोकपरंपरेतल्या स्त्रिया सुद्धा अधिक सकस साहित्य निर्मिती करणाऱ्या होत्या, आहेत आणि त्याच्याबद्दल मी पुष्कळदा बोलले आहे, लिहिलं आहे. त्यामुळे स्त्रिया कमी पडतात असं नाही, त्यांच्याकडे कमी लक्ष दिलं जातं. साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदच काय, मला कोणत्याही गावातून एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमाची पत्रिका आली की त्यात हेच दिसतं म्हणजे अगदी स्त्रियांच्याच संस्था वगळल्या तर एकूणच औषधाला आपली एखादी स्त्री असते. ते ही नाव सगळ्यात शेवटी, प्रतिनिधी म्हणून. कुटुंबव्यवस्थेत सुद्धा स्त्रियांचा निर्मितीत मोठा सहभाग असतो पण त्यांना पदं देताना ही प्रवृत्ती दिसते. बायका शिकल्या सवरल्यात त्यामुळे एखादं तरी नाव असायला हवं म्हणून असतं, फारतर सल्लागार समितीत एखाददुसरं नाव असतं. स्त्रियांकडे गौणत्वाने पाहाणं इतकं नेहमीचं आहे. त्या काही बरं करू शकतात हे स्वीकारणं अवघड असल्याने अध्यक्षपदीही स्त्रियांची नावं कमीच दिसतात. बायका आपल्या नावाचा आपणहून आग्रह धरत नाहीत.

आता इंदिरा संतांचंच उदाहरण घ्या. त्यावेळी निवडणूक पद्धत होती. त्या काही स्वत: अर्ज भरणार्‍यांपैकी नव्हत्या. लोकांच्या आग्रहास्तव त्यांनी अर्ज भरला पण ऐनवेळी त्यांना डावललं गेलं. बोलेल त्यांचे चणे विकले जातात, न बोलणार्‍याचं सोनंही विकलं जात नाही. स्वत:हून पुढे येऊन एकतर स्त्रिया बोलत नाहीत आणि बोलल्याच तरी त्यांची बर्‍याचदा उपेक्षा केली जाते. 

प्रश्न : मग आता लायक लेखिकांना हक्काचं व्यासपीठ मिळावं म्हणून त्यांच्यासाठी वेगळी अ.भा. संमेलनं असावीत का? किंवा काय पर्याय असावा? 

मा. तारा भवाळकर : 

वेगळी संमेलनं तर मला अजिबात मान्य नाहीत. अशा संमेलनांना मी हळदीकुंकवाचे कार्यक्रम म्हणते. राजकीय पक्षांच्या स्त्री संघटनांचे कार्यक्रम म्हणजे साड्या वाटणं, पैसे वाटणं, ते संमेलन नाही. अर्थात स्त्रियांची स्वत:ची भगिनी मंडळं, महिला मंडळं साहित्यविषयक असे काही कार्यक्रम घेत असत ,घेतात पण अ. भा. स्तरावर महिलांची वेगळी आघाडी असावी हे मला मान्य नाही. आपला समाज जर लोकशाहीवादी असेल तर त्यात प्रत्येक व्यक्तीला त्याचं स्वतंत्र स्थान आणि अधिकार आहे, त्यासाठी स्त्री ही व्यक्ती आहे हे आधी मान्य केलं पाहिजे. सरस नीरस ठरवण्याच्या स्पर्धेत तिला स्थान असावं पण राखीव जागा नको. अर्थात हे माझं मत आणि माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. इतर कुणाचं मत वेगळं असूच शकतं.

--------------------------------------

प्रश्न : तुम्ही अध्यक्षपदी असलेल्या साहित्य संमेलनाच्या तुमच्या उद्घाटनपर भाषणात पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांचा नामोल्लेख नव्हता यावर काहींनी टीका केली. भाषणातल्या काही मुद्द्यांची  प्रशंसा झाली. — या दोन्ही बाजूच्या प्रतिक्रियांकडे तुम्ही कसं पाहाता? 

मा. तारा भवाळकर : 

तटस्थपणे, कारण समाजामध्ये सर्व गोष्टी सर्वांना कायम मान्य होतातच असं नाही. मी कुणाचाही अवमान केला नाही. त्यांच्या पदांचा आदरपूर्वक उल्लेख केला आहे. भारताचे सन्माननीय पंतप्रधान /राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री असं म्हटलं आहे. माझं भाषण माझ्या शब्दात यूट्यूब वर पण आहे आणि लिखित स्वरूपात संमेलनात ते प्रसिद्ध झालं आले तेव्हा कोणीही हे शब्द तिथे बघू शकतात. राज्याचे सांकृतिक प्रतिनीधी म्हणून आलेल्या पूर्वपरिचयातील शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख केल्यामुळे ही टीका झाली असावी. लोकभाषेत सांगायचं तर लोक रस्त्याच्या मधून चाललं तरी नावं ठेवतात आणि कडेकडेने चाललं तरी नाव ठेवतात. सरळ चाललं तर धट, वाकडं चाललं तर अवलक्षण. मी सरळ चालणारी आहे. शिवाय तिथे भाषण करायचंय याची मला कल्पना नव्हती, ८७ वर्षाच्या बाईकडून जो उल्लेख झाला ,खरं तर सन्मानपूर्वकच, कारण जाणीवपूर्वक नावाचा उल्लेख करणं किंवा न करणं हे मनातही नव्हतं, हे लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. तरीही समाजात सर्व प्रकारची माणसं असतात, कुणाला काही गोष्टी पटल्या असतील कुणाला नसतील, त्यांचं ते स्वातंत्र्य मी मान्य केलंय. प्रशंसेबद्दल स्वाभाविकपणे आनंद वाटला. समाधान वाटलं. 

----------------------------

प्रश्न : साहित्य संमेलनाध्यक्षाची भूमिका तुमच्या मते नेमकी काय असते? त्यांच्याकडून साहित्यक्षेत्रातून सर्जनशील नेतृत्वाचीही अपेक्षा असते का? हे पद फक्त अडीच दिवसाचं उत्सवमूर्तीपद म्हणजेच औपचारिक प्रतिष्ठेचं आहे की त्यात खऱ्या अर्थाने काही बदल घडवण्याची क्षमता असते?

मा. तारा भवाळकर : 

साहित्य संमेलनाध्यक्षाला कुठलेही वैधानिक म्हणजे कायदेशीर अधिकार नाहीत. साहित्य संमेलनात कार्यक्रम काय ठेवावे, समजा एखादा परिसंवाद ठेवायचा झाला तर कुठल्या विषयावर ठेवावा,  कुठल्या वक्त्यांना ,कवींना बोलवावं हे अधिकार अध्यक्षाला नाहीत. आता हे ही अधिकार नसतील तर एका वर्षाच्या कारकीर्दीत तो काय काय करणार ! बरं, यासाठी कोणतंही बजेट किंवा अर्थसाहाय्य नसतं. अर्थात संमेलनासाठी त्यांनी माझी व्यवस्था केली, अगदी सन्मानाने केली. मुळात साहित्यक्षेत्रात पन्नास साठ वर्ष घालवलेल्या माणसाने त्या एका वर्षात काय करावं ! 

परंतु साहित्यविषयक आस्था निर्माण होईल असं वातावरण त्या काळामध्ये नक्कीच निर्माण होतं. चार माणसांच्या गाठीभेटी होतात. भाषणं होतात, मुलाखती होतात. यानिमित्ताने माझी भूमिका मला मांडता आली. वयोमान आणि प्रकृतीमुळे माझ्याच्याने प्रवास फार झाला नाही पण ज्यांना आस्था वाटली ते लोक माझ्या घरी आले, माध्यमांनी मुलाखती घेतल्या, विविध संस्थांनी भाई वैद्य, विखे पाटील असे मोठमोठे पुरस्कार घरी येऊन दिले. हा सन्मान मराठी साहित्य विश्वाने मला दिला. चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य माणसांनी दिला. याबद्दल कृतज्ञ आहे. 

आमच्या भागातील सर्व, अगदी सर्व, राजकीय, सामाजिक विचारधारांची मंडळी माझ्या घरी येऊन आदरपूर्वक भेटून गेली. समाजाच्या सर्व स्तरांमधल्या मंडळींनी, आमच्याकडच्या शेतकरी आणि कामगार संघटना, रोटरी सारख्या संस्था, वाचनालयं, प्रशासकीय संस्था, स्वच्छता कामगारांपासून कलेक्टर आणि आमचे पालकमंत्री सगळ्यांनी येऊन भेट घेतली. आत्ताच अबुधाबीच्या लोकांनी माझा व्हिडिओ केला कारण राज्यातच नव्हे देशविदेशात माझं भाषण पोचलं आहे. लंडनहून माझ्यासाठी एक काम आलं आहे, अमेरिकेहून फोन येऊन गेला. माध्यमांमुळे जगाच्या पाठीवर पोचता आलं. 

मी प्राथमिक स्तरापासून परदेशी विद्यापीठापर्यंत शिकवण्याचं काम केलेली एक शिक्षिका आहे. नोकरीच्या काळात पदं येतात आणि जातात पण मुळात मी मास्तर आहे, आता तुझ्यासमोरही मी मास्तरकीच करतेय 😊 

अनेक लायक व्यक्ती आहेत, होऊन गेल्यात याची जाणीव आहे. मी ज्यांना मानते ते लक्ष्मणशास्त्री जोशी. तेव्हा आजची माध्यमं नव्हती पण त्यांच्या ग्रंथांमधून ती माणसं आजही मार्गदर्शन करत असतात. 

-----------------------

प्रश्न - अ. भा. मराठी साहित्य संमेलन २०२५ च्या अध्यक्ष म्हणून संमेलनाचं सूप वाजल्यापासूनचा प्रवास तुम्ही सांगितलात. याशिवाय एकूण प्रवास कसा होता !

मा. तारा भवाळकर : 

मी आयुष्यात काहीही ठरवून केलं नाही. किंवा तो आळस असेल. आयुष्याला प्रामाणिकपणे सामोरी गेले, अध्यक्षपदाला सुद्धा. लेखनही मी ठरवून केलं नाही. त्या त्या वेळेला लेखनात काही विषयात रमले, जेव्हा रमावंसं वाटलं नाही तेव्हा सोडून दिलं, मग मागे वळून पाहिलं नाही. उदा: लोकांनी मला लोकसाहित्याच्या गाठोड्यात बांधलं आहे पण माझा प्रेमाचा ,आस्थेचा विषय आहे नाटक. नाट्यविषयक वाचन, नाटक शिकवणं, १४ वर्ष अभिनय केला, पुरस्कार मिळवले, नाट्यसंस्था स्थापली, नाटकं बसवली, चर्चा केल्या, नाट्यलेखन केलं, नाट्यस्पर्धा घेतल्या. भालबा केळकरांच्या पीडीए च्या चालीवर सांगलीला एडीए स्थापन केली.अजूनही कार्यकर्ते त्याचं काम करतात. त्यात मी कृतीशील कार्य केलं, सर्व स्तरांवर. तेव्हा मी प्राध्यापक होते, प्राध्यापकाच्या आयुष्यात पीएचडी नावाचं प्रकरण येतं. सांगलीत होते. त्यानिमित्ताने विष्णुदास भावे पहिले नाटककार, त्यांनी नाटक केलं म्हणजे काय केलं या कुतूहलातून मी वाचत गेले. लोकांशी बोलत गेले. तेव्हा यांच्या नाटकांवर बरेच आक्षेप होते, ते यक्षगानातून आलं, गोव्यातून आलं इ..... शोधत गेले. 

७५ मध्ये अभिनयाचं रौप्यपदक मिळाल्यावर मी नाटक सोडलं, सूत्र सोपवली. कार्यकर्ते आजही संपर्कात आहेत पण त्यांच्यात ढवळाढवळ करत नाही. सहसा खुर्च्या सोडवत नाहीत पण मला खुर्चीत बसायला आवडत नाही. शिकवणं ..खडू, फळा, विद्यार्थी हा माझा आनंदाचा भाग होता. पदाची अपेक्षा नव्हती. म्हणून प्राचार्यपद नाकारलं. आता पाठ दुखते म्हणून खुर्ची लागते 😊

सुरूवातीला लागले ती शारीरिक शिक्षणाची शिक्षिका म्हणून. हा कोर्स केला होता त्यामुळे हल्लीच्या भाषेत पीटी टीचर म्हणून नोकरी करत करत बहिस्थ विद्यार्थीनी म्हणून महाविद्यालयाच्या परीक्षा देत होते. पदव्या बदलत गेल्या त्यानुसार नोकरी बदलत गेली. त्यामुळे शब्दश: ग्राऊंड लेव्हलपासून एम ए पीएचडी मार्गदर्शक पदापर्यंत सर्व स्तरावर शिकवत गेले. एरिझोना स्टेट विद्यापीठातही गेस्ट लेक्चरर म्हणून शिकवलं. या सगळ्याची अपूर्वाई न वाटता कर्तव्याचा भाग वाटला. 

विष्णुदासांच्या, संशोधनाच्या निमित्ताने बराच प्रवास केला, दक्षिण हिंडले. कोकणात दशावतार, कर्नाटकात यक्षगान, भोसल्यांची नाटकं... उसना बॉक्स कॅमेरा घेऊन तिकीट काढून हिंडत दक्षिणेत सर्व लोककलांचा अभ्यास केला. आताच्या भाषेत प्रयोगसिद्ध लोककलेचा. त्यातून अभिजात नाटक घडत गेलं आहे. माझा जन्म ऐशी वर्षापूर्वीच्या शेतकरी कुटुंबात, खेडयातल्या एकत्र कुटुंबात त्यामुळे ग्रामीण संस्कृती,दळण, कांडण, गाणी हे लोकजीवन जवळून पाहिलं. यातून मी घडत आले. 

मोठेपणी आपण सैद्धांतिक अभ्यास करतो तेव्हा ही जी सामग्री जमा झालेली असते त्याचे अर्थ लागतात. प्रॅक्टीकल आधी मग थेअरी. नाटकाच्या उगमाची मीमांसा हा माझ्या प्रबंधाचा विषय, त्याला मिळालेला पुरस्कार, माझं संशोधन हे सगळं नाटकाशी संबंधित आहे. नाट्य हा संस्कृतीचा मोठा भाग आहे, लोकसंकृती ही काही वेगळी आहे असं मला वाटत नाही, नाटकातून मी त्याचा सैद्धांतिक अभ्यास केला. त्यासाठी चांगलं अनौपचारिक मार्गदर्शक मिळत गेलं.

--------------------------------

प्रश्न : संमेलनाध्यक्षपदावरून तुम्ही साहित्यिक स्वायत्तता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक जबाबदारी याकडे कसं पाहता ? साहित्यामध्ये समाजकारण असतंच. साहित्यात राजकारण असावं का? 

मा. तारा भवाळकर : 

समाजात अनेक विचारधारांची माणसं, संघटना असतात. एखाद्या संघटनेला वाटेल हे पूरक आहे,  एखाद्या संघटनेला वाटेल हे विरोधी आहे. हे कायम होत असतं. राजकारणाशी साहित्यिकाचा संबंध असू नये असं मी म्हणणार नाही पण माणूस म्हटल्यावर त्याच्याकडे विचार करण्याची शक्ती असते. माणूस ज्या परिसरात, वातावरणात वाढला असेल त्या आचार विचारांचे संस्कार त्याच्यावर घडत जातात. त्यातून ती व्यक्ती लिहीत जाते, वाचत जाते. त्यामुळे साहित्यिकांच्यामध्ये राजकीय विचारधारा असू शकते. प्रश्न असा आहे, त्याच्या साहित्यामध्ये आणि साहित्यिक आचरणामध्ये तिने ढवळाढवळ करावी की नाही. 

साहित्यात राजकारण करू नये असं मला वाटतं, कारण तो एक संस्कृतीचा भाग आहे.  संस्कृतीचं लक्षण सर्वसमावेशकता आणि समाजाला उन्नतीकडे नेणं आहे, अवनतीकडे नेणं नाही. जसा कला हा संस्कृतीचा भाग आहे तसा भाषा हा संस्कृतीचा फार मोठा भाग आहे. भाषेमुळॆ संस्कृतीचा विकास होतो किंवा ती टिकते आहे. साहित्य हा संस्कृतीचाच भाग आहे त्यामुळे साहित्यक्षेत्र निर्लेप असावं असं मला वाटतं.

-----------------------

प्रश्न : भाषेचा उल्लेख तुम्ही केलात. मध्यंतरी महाराष्ट्रात हिंदी भाषा पहिलीपासून शिकवण्याच्या निर्णयावरून गदारोळ झाला.  शासनाला आपला निर्णय स्थगित करावा लागला. कोवळ्या वयात मुलं अनेक भाषा व्याकरणाशिवाय सहज शिकू शकतात असं समर्थकांचं मत होतं तर काहींना ते मुलांवरचं ओझं वाटलं. याविषयी तुमची भूमिका काय आहे?  

मा. तारा भवाळकर : 

एक मास्तर म्हणून आणि प्राथमिक स्तरावरही मी शिकवलेलं असल्याने मला वाटतं इतक्या लहान वयात ही सक्ती मुळीच नसावी. पहिलीतलं मूल पाच-सहा वर्षाचं असतं. त्याला ४/५ तास एका जागी मुळात बसवून ठेवणं, त्याचं अवधान केंद्रित करणं, त्याची शारीरिक,मानसिक,बौद्धिक वाढ करणं हे सोपं आहे का! शाळा, दप्तर, पुस्तक, पेन्सील या सगळ्या गोष्टी त्याला नव्या असताना त्याच्यावर भाषा लादणं हा शिक्षणशास्त्राच्या दृष्टीने त्याच्यावर अत्याचार आहे. मूल दहा वर्षाचं होईतो मातृभाषेशिवाय कुठल्याही भाषेतून संवादही होऊ नये.  

लहान वयात मुलं भाषा शिकू/ बोलू शकतात म्हणजे काय तर त्यांना व्यवहारातली जुजबी भाषा बोलता येते, मुलभूत असं काहीही त्यांना कळण्यासाठी मातृभाषेचा पाया पक्का असावा लागतो. पाचवीनंतर त्यांना इंग्रजी, हिंदी किंवा अन्य भारतीय भाषा शिकवाव्या. शिवाय शिकवायच्याच असल्या तर त्यांना शेजारभाषा का शिकवू नये !

सांगली मिरजकडची माणसं दोन्ही भाषा बोलतात. नागपूरचे लोक कितीतरी हिंदी शब्द वापरतात. दोन प्रदेशांच्या सीमारेषेवरचा भाग हा द्वैभाषिक असतो. अधिकृतपणे आहे. अनेक ठिकाणी म्हणजे कर्नाटक,. महाराष्ट्रात आहे, बडोद्याला आहे म्हणजे तिथे मराठी माध्यमाचीही शाळा आहे आणि गुजराथी आहे. कर्नाटकामध्ये आमच्या बेळगाव धारवाड या भागांमध्ये , सांगलीमध्ये कन्नड मिडीयमच्या शाळा होत्या आजही एखादी आहे. 

आपण मध्यमवर्गीय चिमटीएवढे लोक आपल्या दृष्टीने विचार करतो पण समाज निरनिराळ्या स्तरात विभागलेला आहे. व्यापाराच्या निमित्ताने ,कामासाठी माणसं स्थलांतरित होत असतात. श्रमकरी माणसं, बांधकाम करणारी माणसं यांच्या पोरांनी काय करायचं ! दहा-बारा वर्षापर्यंत कन्नड मध्ये बोलणारी मुलं महाराष्ट्रात आली तर त्यांनी मराठी भाषा कशी शिकायची. शेजारभाषेचा मुद्दा उचलला गेला होता पण अडचण कुठे येते तर शिक्षक नेमणं, त्यांचं पगारपाणी याची. तो मोठा मुद्दा आहे.

दुसरी गोष्ट, ज्यांना ठराविक भाषा शिकायची आहे त्यांच्यासाठी ती ती भाषा शिकवणार्‍या संस्था आहेत. भाषाच काय, टिळक महाराष्ट्र विद्यापीठात गणिताच्या परीक्षा देता येतात. सगळ्या पोरांवर सब घोडे बारा टक्के म्हणत सगळं न लादता त्यांना निवडीची संधी द्यावी. या भाषांचे स्वतंत्र वर्ग असतात, पुस्तकं असतात, परीक्षाप्रणाली असते. मी हिंदी प्रबोध, प्रवीण, पंडीत, अनुवाद पंडीत सगळ्या परिक्षा दिल्या. त्यातून हरिवंशराय बच्चन यांच्या ’मधुशाला’चं भाषांतर मी केलं. बिहारमधल्या एखादया कलेक्टरची महाराष्ट्रात नेमणूक झाली तर त्याला मराठी अभ्यासक्रम शिकावा लागतो. महाराष्ट्रातल्या माणसाला जर प्रशासकीय पदावर बंगालमध्ये जायचे असेल तर त्याला बंगालीचा अभ्यासक्रम करावा लागतो. 

तेव्हा अभ्यासक्रमाच्या मुक्त व्यवस्था असलेल्या संस्थांना आधी सहकार्य करा मग वरच्या स्तरावर जा. 

उलट काय होतंय , मराठी शाळा बंद करायच्या, शाळांच्या इमारती पाडून संकुलं करायची, मास्तरांचे पगार वेळेवर होत नाहीत, अनुदान नाहीत, ६६ हजार मराठी शाळा गेल्या पाच वर्षात बंद झाल्या, यातून विकास होतो का? अभिजात वगैरे दर्जा मिळाला हे सगळं ठीक आहे पण निष्पन्न काय ! 

------------------

प्रश्न : यातून निष्पन्न काय हा विचार करताना भाषेपासून काहीसा दुरावलेला आजचा युवक डोळ्यासमोर येतो आहे. तो फारसा वाचत नाही असं दिसतं किंवा मी म्हणीन तो प्राधान्याने बरंच (पॉडकास्ट) ऐकतो आणि (व्हिडिओ) बघतो. वेगवेगळे विचारप्रवाह याच पद्धतीने त्याच्यापर्यंत पोचतात. हे त्याच्या व्यक्तिमत्व विकासासाठी योग्य, पुरेसं  आहे की काळाबरोबर होणारे अपरिहार्य बदल म्हणून ते स्वीकारावं की त्याने पुन्हा वाचनाकडे वळावं म्हणून प्रयत्न, प्रयोग करायला हवेत ?

मा. तारा भवाळकर : 

वाचन कशासाठी करायचं? काहीतरी नवीन माहिती व्हावी म्हणून किंवा ज्ञान व्हावं म्हणून. माहिती म्हणजे ज्ञान नव्हे. ज्ञान केव्हा होतं, त्या माहितीवर स्वतंत्र विचार केला तर. हे एकदा लक्षात आलं की मुलं ते करतात. माझ्या संपर्कात जी तरूण मुलं आहेत ती तंत्रज्ञान वापरून ऐकतात, बघतात पण त्यांना स्वत:ला तिथे काही सादर करावंसं वाटतं. माझा विभाग (अकाउंट) तिथे असावा, असं त्यांना वाटतं. मग त्याचा त्यांना अभ्यास करावा लागतो. बोलावं लागतं. आता बोलताना ते कुठली भाषा वापरणार तर ते खिचडी भाषा वापरतात. मग माझ्यासारखा मास्तर त्याला म्हणतो की ही कोणती भाषा आहे. तर तो म्हणतो, ही आमच्या जनरेशनची भाषा आहे. मग त्याला मी म्हणते की तुझ्या जनरेशनला आता तूच शिकव की चांगली भाषा कशी हवी. तुला इंग्रजीत बोलायचंय का, मग त्यावर प्रभुत्व हवं, मराठी असेल तर त्यावर. माझ्या कक्षेतल्या मुलांना हे पटतंय आणि ती मुलं हे करतायत. 

शेवटी हे आपणच त्यांना सांगितलं पाहिजे. ते ब्लॉग लिहीतात, पॉडकास्ट करतात. माध्यमं बदलत राहतात. राहणार. केवळ पाठांतर हेच माध्यम होतं एके काळी. लिपी नंतर आली, सगळ्यांना ती लिपी शिकायची सोय केव्हा उपलब्ध झाली? शाई-कागद केव्हा उपलब्ध झाले?  ज्ञानेश्वरांच्या काळात कागद दुर्मिळ होता. इसवीसनाच्या सहाव्या शतकात हॅन्डमेड पेपर म्हणजे हाताने तयार करायचा जाड  कागद उपलब्ध झाला. मुद्रणकला किती उशीरा आली. साहेब आल्यावर ! पोर्तुगीज आल्यावर! नुसतं लेखन वाचन आपण म्हटलं तरी त्यासाठी लागणार्‍या साहित्याचा आपण विचार करतो का! मुद्रणसाहित्यानंतर दृकश्राव्य साधनं आली. एकूण लिहिण्यावाचण्याची माध्यमं बदलत राहणार. 

माणूस हा आळशी प्राणी आहे 😊 आता हातात पुस्तक घेऊन वाचण्यापेक्षा त्याला ऐकणं बरं वाटतं. 

------------------

प्रश्न : पुन्हा एकदा साहित्य संमेलनाकडे वळते. याचा एक आराखडा असतो, त्यात कोणते नवे प्रवाह यावेत असं तुम्हाला वाटतं?  तुमच्या कार्यकाळात तुम्हाला कार्यक्रमांविषयी विचारणा झाली नाही असं तुम्ही म्हणालात सुरूवातीलाच पण विचारलं असतं तर तुम्ही कोणते विषय निवडले असते ? आगामी संमेलनातील विषयांबाबत तुम्हाला काही विचारणा झाली आहे का ?

मा. तारा भवाळकर : 

नाही, यंत्रणा ऐकत नाहीत असा अनुभव आहे. शिवाय विषय, गरजा काळानुसार बदलत असतात. संयोजकांना जेव्हा वाटेल की काही नवीन द्यावं तेव्हा ते देतील  नवे विषय, लोकांनी सुचवायला हवं ते. नुसता अध्यक्ष फार काही करू शकत नाही. माझ्याच काळात मला विषय विचारण्यात आले नव्हते तर आता पुढच्या काळात कसे विचारतील! 😊

------------------------------

प्रश्न : तुम्ही ठरवून काही करत नसलात तरी तुमची चाळीसहून जास्त पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. आपण मुलाखत निश्चित करत असताना तुमची व्यग्रता लक्षात आली. आजवर इतक्या उर्जेने काम करत आलात ,तुम्हाला हे सगळं कसं शक्य होतं?  सध्या काही नवे लेखनप्रकल्प सुरु आहेत का? 

मा. तारा भवाळकर : 

नवे प्रकल्प करण्याइतकी ताकद आता माझ्यात नाही. मी मघाशी सांगितलं तसं आयुष्याच्या उत्तरायणाच्या टोकावर मला हे अध्यक्षपद मिळालं आहे. साहित्यक्षेत्रात बरीच वर्ष काम केलं आहे. या वर्षभर मला सगळ्यांनी इतकं गुंतवून ठेवलंय की आता मी सर्व पातळ्यांवर थकले आहे 😊

शेवटी एकच सांगते, आता माझ्याकडून किंवा आमच्या पिढीकडून अपेक्षा करू नका, तुम्ही तरूण मंडळी काहीतरी नवीन निर्माण करा. 

------------------

मुलाखतकार - मोहिनी महेश मोडक


Wednesday, June 25, 2025

कथा

 प्रसिद्ध कथालेखिका नीलिमा बोरवणकर, व्यासंगी लेखक नारायण कुलकर्णी-कवठेकर यांच्याशी झालेल्या चर्चा, प्रख्यात लेखिका कविता महाजन यांची लेखनविषयक मते, वाचलेल्या काही दर्जेदार कथा आणि त्या संग्रहांच्या प्रस्तावना या सगळ्य़ातून मला जेवढे कळले त्याचे सार मी ’कथा कशी असावी’ या संदर्भात लिहिते आहे. मी यातील तज्ज्ञ वगैरे अजिबात नाही, केवळ अभ्यासक म्हणून लिहिते आहे.

१) कथा आणि गोष्ट यात फरक असतो. ’आटपाट नगर होतं. तिथे एक अमुकतमुक राहत होता... ,किंवा ’एक होता राजा, एक होती राणी, एकदा काय झालं... आणि ते सुखाने नांदू लागले’ ही झाली गोष्ट. केवळ घटनांची मालिका. कथा नव्हे. आज बहुतेक जण याच पद्धतीने पात्रांची, फार तर ते राहत असलेल्या गावाची ओळख करुन देऊन, एकामागे एक प्रसंग रचून, सुखांत किंवा दु:खांत करुन त्या पुरचुंडीला कथा समजताना दिसतात. कथेच्या आत अर्थातच गोष्ट असते पण तो केवळ कथेचा कच्चा माल असतो. 

२) कथा लेखनाचा असा एखादा साचेबद्ध आराखडा नसतो. ती कुठेही उगम पावून कुठेही लुप्त होऊ शकते. उदा: ’शेवग्याच्या शेंगा’ कथेची सुरुवात ’वडिलांच्या अस्थी आळंदीला पोचवून श्रीनिवास आताच आला होता’ अशी आहे. इथे अगोदरच काय घडले आहे ते एका वाक्यातून वाचकाला कळते.  

’देवगडच्या दुसर्‍या अंगाला माणसाचा हात न फिरलेला समुद्र अस्ताव्यस्त पसरलेला आहे’ ही कमल देसाईंच्या ’प्लॅस्टिकचे विश्व’ या कथेची सुरुवात वाचकाला थेट त्या निर्मनुष्य किनार्‍यापाशी घेऊन जाते. 

जी. एंच्या ’राधी’ या कथेची सुरुवात अशी आहे ’महादेव गल्ली ही वीतभर रुंद. घरे अमोरासमोर इतकी जवळ होती की...’ वाचकाला ती गल्ली ’दिसते’. अशी सुरुवात वाचकाला त्या पात्रापाशी , त्या जागेपाशी घेऊन जाते मग तो कथेत गुंतत जातो.

पुढे लेखकाच्या कुवत आणि शैलीनुसार कथा वेगवेगळ्य़ा पद्धतीने पुढे सरकत जाते. तिचा गाभा, आशय वाचकाला भिडतो का, हे सर्वात महत्वाचे. 

३) कथेचे साधारणपणे चार घटक असतात अ) कथाबीज - कथेचा आत्मा . जे लेखकाला सांगायचंच. एका वाक्यात. ते त्याच्या मनाशी स्पष्ट हवं. उदा: पुलंच्या ’म्हैस’ कथेला मानवी स्वभावाचे नमुने आणि प्रतिक्रियांवर कोणताही आव न आणता भाष्य करायचे आहे. पुलंच्या असामान्य शैलीमुळे ते नमुने लख्ख दिसतात. कथेला असलेली कोकणाची पार्श्वभूमी परप्रांतीयांनाही अनुभवता येते. प्रसंगवर्णनातली खोच, गंमत रुक्ष स्वभावाच्या वाचकालाही हसायला भाग पाडते.

ब) पात्रे - हे कथाबीज ज्यांच्याद्वारे उलगडणार आहे ती पात्र. त्यांचे वर्णन इतके सक्षम हवे की ती डोळ्य़ासमोर त्यांचे सगळे रंग लेवून उभी राहिली पाहिजेत. उदा: मिरासदार ’नव्याण्णवबादची सफर’ या कथेतल्या नाना घोडके या पात्राबद्दल लिहितात ’माणगावात नाना घोडके नावाचा अप्रतिम इसम राहत असे. हा अगदीच बोंबिलभिक्या असून दिसावयासही बेंगरुळ असे. वाळलेल्या चिपाडाच्या अंगात एक सदरा घातला, धितर अडकवले तर ते जसे सुरेख दिसेल, तसा हा दिसत असे. त्याच्या दोन्ही गालाची धीटपणॆ वर आलेली हाडे इतकी ठसठशीत दिसत होती की त्याच्या तोंडामध्ये एक लहानशी काठी या गालापासून त्या गालापर्यंत आडवी करुन घातली आहे, असे वाटावे.’ थोडक्यात ते पात्र वाचकाला स्वच्छ दिसले पाहिजे. शिवाय पात्रांना नावे देताना काळजी घ्यायला हवी. ते ते नाव त्या त्या पात्राच्या व्यक्तिमत्वाला, त्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक पार्श्वभूमीला साजेसे असायला हवे. तरचे ते पात्र ’दिसेल’.

क) घटना/ प्रसंग - त्या पात्रांचे वर्तन, स्वभावातील कंगोरे, विचारपद्धती दाखवणार्‍या घटना किंवा प्रसंग वाचकाला त्यात गुंतवून ठॆवायला हव्यात. दि.बा.मोकाशींच्या ’आता आमोदे सुनासि आले’ कथेत एकुलत्या मुलाच्या मृत्युचे दु:ख गिळून शिवाच्या अडलेल्या गायीला सोडवायला जाणारा रामजी, ती पावसाळी रात्र, जीवाच्य आकांताने वेणा देणारी गाय आणि रामजीचे प्रयास वाचकाला एकाच वेळी श्वास रोखून धरायला लावतात, दग्ध करतात, जगण्यामरण्याच्या सीमेवर नेऊन अंतर्मुख करतात. 

ड) संवाद - खर्‍या अर्थाने कथेचा वेग अवलंबून असतो तो संवादांवर. ’भुजंग’ या शंकर पाटील यांच्या कथेचे बलस्थान आहे ते ग्रामीण बोलीतले आर्त आणि सहज संवाद. या संवादांची भाषा पात्रांनुसार अचूक असायला हवी. केवळ आनीपानी लिहिल्याने ती बोलीभाषा होत नाही, किंवा जड शब्द वापरल्याने ती शहरी होत नाही. त्याला प्रादेशिक गंध असायला हवा. ते संवाद कथेच्या ओघात यावेत आणि कथेचा ओघ पुढे घेऊन जाणारे असावेत.

कथा जिथे घडते ते स्थळ, काळ, घटनांमधले अंतर, पात्रांच्या वयातील अंतर यात तर्कदृष्ट्या गोंधळ नसावा. एका नाटकात सिद्धहस्त लेखिकेने ज्या देशात, ज्या काळात नाट्य घडवले तिथल्या चलनाऐवजी चुकीचा उल्लेख केल्याने तिला टीकेला सामोरे जावे लागले. हाच नियम कथेलाही लागू होतो. कथा घडते त्या काळाचा अभ्यास, संदर्भ शोधून त्यावर सर्व बाजूंनी विचार करुन मगच कथा लिहायला हवी. 

कथालेखकाची स्वत:ची अनोखी शैली हा कथेचा यूएसपी/ सर्वात मह्त्वाचे वैशिष्ट्य असते. मतकरींच्या गूढकथेत दोनचार वाक्यातच ते जबरदस्त वातावरण निर्मिती करत. मंगला गोडबोले एखाद्याच मिश्कील, मार्मिक वाक्यातून संस्कार आणि आधुनिकतेच्या कात्रीत सापडलेल्या मध्यमवर्गी पात्रांच्या जगण्यातला गोंधळ अचूक मांडतात. बाबुराव बागुलांच्या ’मरण स्वस्त होत आहे’ मधल्या मोजक्या प्रसंगांमधून मुंबईचं बकालपण थेट अंगावर येतं. ठराविक असा आराखडा अपेक्षित नसला तरी गुंतागुंत-उकल, कलाटणी, स्वभावाचे कंगोरे, निसर्गचित्रण, भौगोलिक संदर्भ, प्रादेशिक रंग, जगण्य़ाचे सूक्ष्म चित्रण, त्यातले नाट्य, एखादी भावस्थिती यातलं आवश्यक ते योग्य जागी आढळलं नाही तर ती कथा अपुरी वाटते. फसते. 'वाचनीयता' हा गुण त्यात असलाच पाहिजे. अजून किती पानं आहेत असं वाचकाला वाटलं तर कथा फसली. कविता महाजन म्हणत ’फुटकळ लिहिण्याच्या धोक्यातून वेळीच सावध करणारे आणि सतत ताळ्यावर आणणारे माजगावकरांच्या सारखे प्रकाशक मला मिळाले’. प्रत्येकाला असा गुरु मिळत नाही तेव्हा लेखक म्हणून आत्मपरिक्षण करणे हाच सर्वात सोपा मार्ग होय.

उत्तम कथेचे असे काही सूत्र नसते. तो दरवेळी एक वेगळा प्रयोग असतो. पण वाचकाच्या काळजात तो प्रयोग रुतायला हवा. सिनेमा फक्त पटकथेतून, संवादातून पुढे जात नाही तर तिथे कॅमेरासुद्धा एका अर्थी बोलत असतो. त्यामुळे कथेकडे पाहण्य़ाची लेखकाची नजर सर्वात महत्वाची. सॉमरसेट मॉम बद्दल वाचनात आलेल्या आख्यायिकेनुसार एका व्याख्यानात तो म्हणाला की कथेमध्ये चार गोष्टी हव्यात. - दर्जा/ खानदानीपणा, अध्यात्म/ ईश्वरी विचार, लैंगिकता/ मानवी भाव आणि रहस्य. तेव्हा एक मुलगी उठून म्हणाली की हे चारही पैलू तिच्या कथेत आहेत. सगळ्यांना उत्सुकता वाटल्यामुळे तिने ती कथा वाचून दाखवली. ती अशी - 

एकदा एक राजकन्या (खानदानीपणा) देवाला म्हणाली, " देवा, (अध्यात्म) मी गरोदर आहे" (लैंगिकता) पण मला होणार्‍या बाळाच्या वडिलांचं नाव माहीत नाही (रहस्य) आता ही कथा आहे का! त्यामुळे उत्तम कथेचे घटक वगैरे शब्दांकडे केवळ वाचकांपर्यंत कथा प्रभावीपणे पोचवण्याचे माध्यम म्हणून पाहायला हवे. ते काही गणिती सूत्र नव्हे. 

कथेबरोबर त्या वेळचा समाज, समाजजीवन हे नाटकातल्या नेपथ्यासारखे सोबत आले पाहिजे. निव्वळ रंजकतेपलिकडे वाचकाला त्या कथेतून काही मिळाले,  ती कथा पंचेंद्रियांनी अनुभवता आली तरच कथा यशस्वी झाली. 


Tuesday, May 20, 2025

इकिगाई

 

हेक्टर गार्सिया, फ्रान्सिस मिरेलस

निरोगी, आनंदी आणि कार्यक्षम दीर्घायुष्याचं जपानी रहस्य

जपानी लोक असं मानतात की, प्रत्येक माणसाचा इकिगाई असतोच. या पुस्तकासाठी इकिगाई या संकल्पनेची माहिती गोळा करत असताना लेखकाने शतायुषी लोकांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांच्या दीर्घायुष्याचं खरं रहस्य जाणलं. ते त्यांनी या पुस्तकामधून आपल्यासमोर मांडलं आहे. या पुस्तकामुळे आपल्यालाही आपला इकिगाई सापडायला नक्कीच मदत होईल.

* शारीरिक स्वास्थ्यासाठी ८० टक्क्यांचं रहस्य.

* उत्साही शरीर, उत्साही मन.

* तणावाचा फायदा घेण्याची कला.

* स्टीव्ह जॉब्ज यांचे जपानी संस्कृतीवरील प्रेम.

* लोगोथेरेपी आणि मोरिता थेरेपी.

* तंत्रज्ञान आणि संस्कृतीचा संगम.

--------------

रोज सकाळी उठल्यावर तुम्ही स्वत:ला  ’आला बॉ अजून एक दिवस अंगावर’ असं म्हणता की ’अहा, सुरु झाला एक नवा कोरा दिवस’ असं म्हणता. तुमचं उत्तर दुसरं असेल तर तुम्हाला तुमची इकिगाई बहुतेक गवसली आहे. ती अधिक अचूक उमजावी म्हणून हे पुस्तक तुम्ही वाचायला हवं, तुमचं उत्तर जर पहिलं असेल तर मग हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे. 

जिंदगी लंबी नही बडी होनी चाहिएँ, असं आपण म्हणतो. बहुसंख्य जपानी लोकांची जिंदगी मात्र लंबी आणि बडी दोन्ही असते, जपानमध्ये समाधानी, कार्यक्षम आणि दीर्घायुषी लोकांचे प्रमाण जगाच्या तुलनेने जास्त आढळून येते. ओकिनावा भागात शतायुषी लोक मोठ्या प्रमाणात आहेत. यामागे इकिगाई म्हणजेच जगण्याची सकारात्मक प्रेरणा आहे हे लक्षात आल्यावर लेखकद्वयीने अनेक शतायुषी जपानी लोकांच्या मुलाखती घेतल्या, चर्चा केली आणि त्यातून हे पुस्तक साकार झालं. यातली इकिगाईची जादू अनेकांना भावली आणि पुस्तकाचा जगभरात अनेक भाषातून अनुवाद होत गेला.

माणसाची सगळी धडपड अमरत्वाकडे पोचण्य़ासाठी असते. ययातिची प्रातिनिधीक कथा आपल्याला माहित आहे. तंत्रज्ञान आणि वैद्यकशास्त्र वेगाने अत्याधुनिक होत चालले आहे त्यामुळे आपली जिंदगी गेल्या पिढीच्या तुलनेने ’लंबी’ होत चालली आहे. रे कर्झवेल या संशोधकाच्या मते काही दशकात आपण खरोखरच हवे तितके जगू शकू पण बहुसंख्य जीवशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की कितीही प्रगती केली तरी आपल्या नव्या पेशी तयार होण्याची प्रक्रिया १२० वर्षांनी थांबतेच त्यामुळे त्यापुढे जगणे शक्य नाही. 

मन, मेंदू आणि शरीर 

जपानबरोबरच जगात काही बेटांवरदेखील सुखी दीर्घायू माणसं आढळतात. संशोधनाअंती असा निष्कर्ष निघतो की यांच्या जिवलग मित्र-मैत्रिणींचा घट्ट ग्रुप, उत्तम कौटुंबिक नातेसंबंध ,आहारात भाज्यांचं पुरेसं प्रमाण पुरेसं, भरपूर चालणं, तणावमुक्त जीवनशैली.

शरीर- 

प्रत्येक वेळी ८०% पोट भरेल इतकाच आहार घ्या. पोटभर जेवणे, आग्रह करकरुन वाढणे हे आपल्या भारतीय संस्कृतीत फार महत्वाचे मानले जात असले तरी शरीराला हानीकारक आहे. स्क्रीनटाईम शक्य तितका कमी करा, भरपूर चाला. लवकर निजा लवकर उठा. पुरेशी झोप घ्या. आपली दिनचर्या तपासा. शरीर उत्साही असेल तरच आपलं मन टवटवीत राहील. 

मेंदू- 

मन:शांती ही शरीरस्वास्थ्याइतकीच मेंदूच्या कार्यक्षमतेवर अवलंबून आहे. चाकोरीत फिरणार्‍या मेंदूवर गंज चढतो आणि त्या व्यक्तीला हळूहळू जगण्याचा कंटाळा येऊ लागतो. मेंदू कार्यक्षम राखण्यासाठी नवीन विषयांचे वाचन, प्रशिक्षण, त्यावर चर्चा, बौद्धिक खेळ, नवनव्या लोकांना भेटणे, नवीन कौशल्ये आत्मसात करणे इ. आवश्यक आहे. मेंदूची कवाडे जगाकडे उघडणे गरजेचे आहे. त्याने जगण्यात चैतन्य येते, उत्साह येतो. 

मन- 

मोई म्हणजे जिवलगांचा कंपू. समान आवडीच्या, एकाच ध्येयासाठी काम करणार्‍या गटासह आपले जवळचे नाते आपल्याला जीवनाशीही नकळत बांधून ठेवते. मोई हा काहीसा आपल्या बीसीसारखा प्रकार आहे. मोईतले सदस्य दर भेटीत ठराविक पैसे जमा करतात आणि गरजेनुसार ते परतफेडीच्या अपेक्षेसह एखाद्या सहकार्‍याला देतात. यातून त्याला आर्थिक आणि मानसिक दिलासा मिळतो.

आपल्या मनावर वेगवेगळे ताण असतात. हे ताण नीट हाताळू न शकणारे लोक अकाली प्रौढ दिसू लागतात. त्यातले काही ताण जगताना भेडसावणार्‍या गंभीर समस्या, अभाव, अडचणी, क्लेशदायक घटना, असुरक्षिततेची भावना, नात्यातला दुरावा, वियोग, पराजय इ. मुळे उद्भवतात. तर काही ताण आपल्यातले चिंतातूर जंतू स्वत:च निर्माण करतात. उदा: सोशल मिडियावर कमी लाईक्स आले म्हणून खंतावणे, इतरांशी सतत स्पर्धा करणे इ. 

मानसशास्त्रज्ञांच्या मते ’माईंडफुलनेस’ हा यावर उपाय आहे. प्रत्येक क्षणाचा समरसून आनंद घेण्याची क्षमता आपण जितकी वाढवू शकू तितकी आपण तणावावर आधिकाधिक मात करु शकू. हातून गेलेल्या गतकालाबद्दल हळहळ आणि हातात नसलेल्या भविष्याबद्दल हुरहूर वाटत राहिल्याने आजचा, आत्ताचा क्षण निसटून तर जात नाहीये ना याबाबत आपण सजग राहिलो ताण निश्चित कमी होईल. अर्थात हे प्रयत्नपूर्वक साध्य करावे लागेल पण याची परिणीती एका निरामय आणि दीर्घायू जीवनात होईल हे नक्की. 

लोगोथेरपी ते इकिगाई

सिग्मंड फ्रॉइड एकदा म्हणाले होते ,"भिन्न स्वभावाच्या/विचारांच्या काही माणसांना उपोषणाला बसवा. भुकेच्या तीव्रतेबरोबर आतला खरा माणूस बाहेर पडू लागेल. सगळी प्रचंड भुकेली माणसं शेवटी एकाच पातळीवर येतील.’ परंतु हिटलरच्या क्रूर छळछावणीतील वेगवेगळ्या अनुभवांमुळे माणसाची एखाद्या घटनेला प्रतिसाद देण्याची पद्धत त्याच्या आत्मबलावर अवलंबून असते हे व्हिक्टर फ्रँकलने स्वत: अनुभवले, पाहिले होते त्यामुळे त्यांना हे पटले नाही. आत्मबल वाढवणारी लोगोथेरेपी त्यांनी विकसित केली. लोगो म्हणजे ग्रीकमध्ये अर्थ. लोगोथेरपी म्हणजे जीवनाचे उद्दिष्ट्य, जीवनाचा अर्थ शोधणे. या थेरपीचे तीन टप्पे सांगितले जातात. 

पहिला टप्पा- कोणत्याही परिस्थितीत कार्यमग्न राहून अर्थपूर्ण काम करत राहणे. 

दुसरा टप्पा- यशाचे परिमाण आपले आपण ठरवणे. 

तिसरा टप्पा- परिस्थिती आपल्या हातात नसली तरी तिला कसा प्रतिसाद द्यायचा हे सर्वस्वी आपल्या हातात असते हे समजून घेणे. 

इकिगाई हे लोगोथेरपीच्या मार्गावरचे अंतिम ध्येय आहे. इकिगाई मन आणि मेंदूबरोबरच शरीरस्वास्थ्याचाही विचार करते. 

सापेक्षतावाद आपल्याला माहित आहे. तापलेल्या वस्तूला एक मिनिट स्पर्श करा. ते मिनिट युगांचं वाटेल. आपल्या प्रिय व्यक्तीसोबत एक तास घालवला तर तो तास एका मिनीटातच संपल्यासारखा वाटेल. आपण कशात जास्त रमतो? आपण वेळेकडे कसे पाहतो, त्या त्या वेळेत कोणते काम निवडतो, ते किती कौशल्यपूर्ण त-हेने करतो, किती लक्षपूर्वक करतो, त्यात कसा आनंद मिळवतो याचा शोध घेतला तर आपल्याला आपली इकिगाई सापडणे सोपे होईल. एकदा एखादे कौशल्य आत्मसात झाले तर पुढचे ध्येय निश्चित करुन आपल्या ठराविक साच्यापलिकडचे एखादे कौशल्य शिकण्याचा प्रयत्न करावा. एकाच वेळी अनेक कामे करणे हे खरे तर कसब नव्हे. मुळात आपण एकावेळी अनेक कामे केल्याने आपली कार्यक्षमता उलट कमी होते. एका वेळी एकाच कामावर लक्ष केंदित करुन मन विचलित होऊ न देता ते पूर्ण केले तर अधिक चांगले परिणाम दिसून येतात. आपण इकिगाईच्या अधिक जवळ पोचतो.


Thursday, August 15, 2024

गाव कारागीर

 ’खेडय़ास देव निर्मि, नगरास निर्मि मनुज’ - शहर आणि गावे यांच्यातला फरक आचार्य विनोबा भावे यांनी अशा नेमक्या शब्दात सांगितला आहे.  याच्या गर्भितार्थाकडे पाहिले तर खेड्यातील एकेकाळची नैसर्गिक, परस्परावलंबी जीवनशैली आणि शहरातील कृत्रिम, यंत्राधारित जीवनशैली यातला फरक स्पष्ट होईल.  बलुतेदारी हा खेड्यातील अर्थव्यवस्थेचा व बर्‍याच अंशी स्वयंपूर्णतेचा कणा होता. कृषीसंस्कृतीच्या आसावरचे वेगवेगळे गाव-कारागीर म्हणजे खरे तर व्यावसायिक होते. दुर्दैवाने त्यातून जाती निर्माण झाल्या. समाजात भिनत गेलेला जातीभेद आणि बदलत्या काळाशी जुळवून घ्यायला आवश्यक असलेल्या सक्षमतेचा अभाव यामुळे बलुतेदारीला घरघर लागली. 

या पार्श्वभूमीवर गाव-कारागीरांची सद्यस्थिती, कामाचे स्वरुप, परंपरा, कालच्या-आजच्या पिढ्यांमधील विचारांचा फरक असे विविध कंगोरे घेऊन आकाराला आलेले मह्त्वाचे पुस्तक म्हणजे सीमा शेटे-रोठे लिखित ’गाव कारागीर’. कुंभार, चांभार, लोहार, सोनार, सूप -टोपल्या तयार करणारे बुरुड , सुतार, कातडं कमावून वाद्य तयार करणारे, रंगारी, धोबी, नाभिक, पाथरवट आणि कासार हे ते कारागीर.

लेखिकेचा लहान वयापासून ग्रामीण व कृषीसंस्कृतीशी निकटचा संबंध असल्याने या पुस्तकाला एखाद्या रुक्ष वृत्तपटाचे स्वरुप न येता आस्थेचे अस्तर लाभले आहे. गाव- कारागीरांशी नागरी व्यक्तीचा थेट संबंध फारसा येत नाही.  घरी मंगलकार्य ठरल्यास त्यासाठी लागणार्‍या सुपापासून जोडयांपर्यंत आणि ब्रँडेड दागिन्यांपासून आधुनिक फर्निचरपर्यंत सगळे काही ऑनलाईन विकत घेणार्‍यांचा तर नाहीच नाही. अशा मंडळींना अज्ञात असलेल्या एका श्रमिक जगताचा या पुस्तकाच्या माध्यमातून लेखिकेने सहजपणे वेध घेतला आहे.  प्रत्येक कारागीरीवर एक स्वतंत्र लेख असल्याने जिज्ञासू वाचकाला बरीच नवीन माहिती त्यातून मिळू शकेल. यातील काही लेखांमध्ये शेवटी केलेली टिप्पणी अंतर्मुख करते. या मिडिया वॉच’ प्रकाशित पुस्तकाला डॉ. श्रीकांत तिडके यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली आहे. गजानन घोंगडे यांचे सूचक मुखपृष्ठ वाचकाला आशयापर्यंत पोचवण्याचे लेखिकेचे काम सोपे करते. 

आकाशवाणीवर उद्घोषिका म्हणून काम केल्याचा तसेच विविध प्रकारच्या लेखनाचा अनुभव सीमा शेटे- रोठे यांच्या गाठीशी असल्याने पुस्तक संवादी व प्रभावी झाले आहे. ग्रामीण किंवा निमशहरी जीवनाबद्द्ल बर्‍याच शहरी मंडळींच्या हिरव्या- हळव्या- स्वप्नाळू कल्पना असतात. लेखिकेने रेखाटलेले कारागीरांचे शब्द- जीवन चित्र भाबडे, काव्यमय, काल्पनिक किंवा केवळ स्वत:च्या आकलनापुरते मर्यादित नाही.  ते कारागीरांच्या थेट मुलाखतीच्या स्वरुपात म्हणजे ’फ्रॉम द हॉर्सेस माऊथ’ असल्याने वास्तवतेच्या पायावर उभे आहे. हे या पुस्तकाचे बलस्थान आहे. 

’ग्रामोद्धारा’चा विचार मांडताना विनोबांनी एक वस्तुनिष्ठ प्रश्न मांडला होता. तो म्हणजे -खेड्य़ातली लक्ष्मी जाते कुठे! ते म्हणत, " त्या वाटा बंद करा म्हणजे ती खेडयात राहील. ती बाहेर जाते ते या ५ मार्गांनी - बाजार, लग्न व्यवहार, सावकार, सरकार आणि व्यसने. मीठ मसाले रॉकेल सारख्या दोन चार गोष्टी सोडल्या तर सारे काही गावात तयार करता आले पाहिजे. परस्पर व्यवहार सुरू झाला तर ’महाग’ हा शब्द ही हद्दपार होईल." या संकल्पनेची व्यवहार्यता कदाचित अर्थतज्ज्ञच सांगू शकतील परंतु या ५ कारणांचा कारागीरांच्या जीवनावर काय परिणाम झाला आहे याचे दाखले या पुस्तकातील लेखांमध्ये ठायी ठायी विखुरले आहेत. 

 ’पांढरीवर घर नाही आणि काळीवर वावर नाही’ म्हणजेच हक्काचे घर किंवा जमीन नाही, अशा शब्दातून या कारागीरांचा सल लेखिका उघड करते.  ’छिलताना हाताले लागते. बिबा लावायचा बस्स. दवाखाने आम्हाला परवडत नाही, पैसाबी नाही’ म्हणणारा बुरुड समाजाचा कारागीर यात आहे. सोनार, लोहार, सुतार, तांबट आणि शिल्पकार ही विश्वकर्म्याची पाच मुले आहेत, असा उल्लेख विश्वकर्मा ग्रंथात असल्याची मान्यता पाथरवट समाजात आहे. ’शासनाच्या योजना काही असतील तर  त्या आम्हाले माहित नाही’ ही या विश्वकर्म्त्याच्या लेकराची व्यथा आहे. त्याचे स्वत:चे लेकरु "दोन दोन किमी चालत शाळेला जाते, एकटं हायवेने जाते, ते घरी येईपर्यंत जीव धाकधुक करते" म्हणणार्‍या पाथरवट कारागीराची तगमगही या पुस्तकात व्यक्त होते.  

अशा रखरखीत परिस्थितीतही हे कारागीर आपल्या जीवावर सावली धरू शकतात ते प्रथा-परंपरा-रिवाजांच्या आधाराने.  त्यातूनच विश्वकर्मापूजन करुन कामाला लागण्याची कुंभारांची प्रथा या पुस्तकातून माहित होते. चर्मकार समाजात हुंडा दिला घेतला जात नाही, उलट नवरीला देता येईल तितकं देण्याचा प्रयत्न सासरची मंडळी करतात हे वाचून नवल वाटतं. लोहार समाजात तर म्हणे वधूला  मोरपीस देऊन ’अशा सुंदर सुंदर जागी मी तुला घेऊन जाईन’ असे वचन वर देत असतो. समाजाची खूण म्हणून जन्मानंतर २१ व्या दिवशी बाळाच्या पाठीवर लोखंडाच्या छडीचा डाग देण्याची अजब प्रथाही काही लोहार पाळतात. गावात काही कार्य असले की ’चुलीला’ म्हणजे घरातील सर्वांना आमंत्रण देण्याची जबाबदारी नाभिकाची असे हे बहुतेकांना माहित असते. पूर्वी कोकणात घरोघरच्या कर्त्या पुरुषाला ओवाळणं हा कोकणातील परीट स्त्रियांचा मान असे तर विदर्भात लग्नकार्यात कंकण बांधण्याचा. बलुतेदारीने अशी व्यवहाराच्या पलीकडे जाऊन घातलेली नातेसंबंधांची आगळीवेगळी वीण या पुस्तकातून कळते तसेच ती विसविशीत होत चालल्याची कारागीरांना वाटणारी खंतही. 

कारागीरांच्या कामाशी संबंधित असलेले पण आपल्या नेहमीच्या बोलण्यातून अस्तंगत होत चाललेले कितीतरी शब्द या पुस्तकातून नव्याने भेटतात. उदाहरण द्यायचे तर लाकडी चाकाला आतून लोखंडी वाट आवश्यक असते. अरे हो, तिला ’धाव’ म्हणतात हे लोहारांविषयी वाचताना लक्षात येते. त्यांच्याशी संबंधित भट्टी, ऐरण, भाता, जंतरपट्टी , पकड यांसारखे शब्द किंवा चर्मकाराची रापी, आरी, सस्ती यासारखी आयुधं, बुरुडकामातून तयार होणारी रोजच्या वापरातली दवडी, लक्ष्मीपूजनाला मानाचा समजला जणारा फडा अशा कितीतरी शब्दांची लेखिकेने पुनर्भेट घडवली आहे. प्रत्येक कारागीर समाजात एक आराध्यदैवत असते. मग ते सोनार समाजाचे नरहरी सोनार असतील किंवा नाभिकांचे सेना महाराज.  विहित कर्माची सांगड आध्यात्माशी घालणारा सेना महाराजांचा साधासा अभंगही या पुस्तकात अवचित भेटतो.

आपल्या वाडवडिलांकडून आलेला कलेचा, कृतीपद्धतीचा वारसा सांभाळताना  तर दुसरीकडे नवनव्या आव्हानांना सामोरे जाताना होणारी गाव-कारागीरांची परवड संवेदनशील वाचकाला या पुस्तकाच्या माध्यमातून एका वेगळ्या जगाचे दर्शन घडवते.  बलुतेदारीच्या काही अज्ञात पैलूंचे दर्शन होते.  जेवताना पानात काही टाकले तर त्यामुळे शेतकर्‍याच्या बैलापासून पाकसिद्धी करणार्‍या आईपर्यंत अनेकांची मेहनत आपण बुडवतो आहोत असा त्याचा अर्थ होतो, असे विनोबा का म्हणत त्याचा आपसूक खुलासा होतो. या दिवाळीत पणत्या, केरसुणी (फडा), सुपली इ. वस्तू रापलेल्या हातांकडून विकत घेताना हे पुस्तक आठवेल आणि  घासाघीस करावीशी वाटणार नाही हे निश्चित.  


Friday, October 6, 2023

याचना

 याचना

रखरखत्या रवीगोलास

इवलीशी विचारे मुंगी

जरी देशी दाह जगाला 

लाही न माझिया अंगी

◽️

किती जीव जन्मती जगती

मग कशास क्षणभर तंटा 

हे रौद्र अदित सम्राटा 

अम्ही क्षुल्लक तू वरवंटा

◽️

तू भले सोड त्या ज्वाळा

कापेल त्राहीं ही धरिणी

व्याघ्राची भीती लांघुनिया

चरण्यासी निघेल हरिणी

◽️

विश्वाच्या विशाल उदरी 

बहू कृमी, जंत अन पाणी

दीप्तीने तुझ्याच उजळोनी 

झाडांस बिलगतील गाणी 

◽️

दूरवरुनी फुलव निखारे

वा अवचित दे जलधारा 

सुक्ष्मात जवळ घे वसुधा

बघ वारुळ विभ्रम सारा  

◽️

तू अजस्र खग किरणांनी

घे उचल पृथ्वीचा मोहर

मग टिपेल चंद्र बिलोरी

वैशाखी तमस मनोहर  

◽️

तू अधिपती सृष्टी दिठीचा

मी क्षुद्र टिंब सरपटते 

नमनासी वाहुनी साखर

प्रार्थनी क्षेम पुटपुटते…

◽️

- श्रीपाद अपराजित

Monday, September 5, 2022

बिझनेस नेटवर्किंग

 ’हाऊ टू...’ प्रकारची अनेक पुस्तकं इंग्लीशमध्ये उपलब्ध आहेत. व्यवसायवृद्धी, व्यक्तिमत्व विकास किंवा व्यवस्थापनशास्त्र हे त्यातले लोकप्रिय विषय. त्यापैकी बर्‍याच प्रसिद्ध पुस्तकांचे मराठी अनुवाद देखील केले गेले आहेत. परंतु या सगळ्या पुस्तकातला ’you' आणि त्यातले संदर्भ हे अभारतीय आणि अर्थातच अमराठी असतात. नवोदित महाराष्ट्रीय उद्योजकाच्या मुलभूत समस्या समजून घेऊन त्यांची उकल करणारी पुस्तकं मराठीत फारशी नाहीत. 

श्री. विनीत बनसोडे हे ग्राफोलॉजिस्ट आणि नामवंत उद्योजकांचे मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. व्यावसायिकांच्या शेकडो कार्यशाळा घेत असताना तसेच सॅटर्डे क्लबच्या विविध शाखांमधील सदस्यांना याबाबत प्रशिक्षण देत असताना *’*बिझनेस नेटवर्किंग’* चे महत्व आणि सोप्या मराठीत या विषयावरील पुस्तकाची गरज त्यांना प्रकर्षाने जाणवली. त्यातून त्यांचे ’बिझनेस नेटवर्किंग’ हे पुस्तक साकार झाले. कष्टाळू मधमाशांचे पोळे दर्शवणारे बोलके आणि आकर्षक मुखपृष्ठ लेखकाची नेटवर्किंगची व्याख्या अधिक स्पष्ट करते. (प्रकाशक- सुमंगल बुक कॉर्पोरेशन)

व्यावसायिकांना भेडसावणारे बरेचसे प्रश्न समान असले तरी आयात केलेल्या परदेशी पुस्तकातली पार्श्वभूमी, विचारसरणी, संस्कृती तसेच मानसिकता ’आपली’ वाटत नाही त्यामुळे तिथे दिलेली उत्तरे किंवा पर्याय प्रत्यक्षात फारसे लागू पडत नाहीत. भारतीय व्यवसायात मानवी भावना, परस्पर संबंध, विश्वास या गोष्टी अतिशय महत्वाच्या तर पाश्चात्य देशात व्यवहार आणि व्यावसायिक वृत्ती म्हणजे सब कुछ. महाराष्ट्रात पहिल्या पिढीचे अनेक उद्योजक तयार होत आहेत. त्यांचे पालक बहुतांशी नोकरी करणारे असल्याने व्यवसायातील संभाव्य अडचणींबद्दल अनभिज्ञ असतात. व्यवसायाला अनुकूल वातावरण घरात नसते. योग्य मार्गदर्शनाअभावी अनेक नवउद्योजक निराश होऊन व्यवसाय सोडून देतात किंवा मोठी स्वप्ने बाजूला ठेवून पराभूत मनोवृत्तीने आपल्या लहानशा वर्तुळात रुटूखूटू व्यवसाय करत राहतात. 

यावर उपाय म्हणजे बिझनेस नेटवर्किंगचे कौशल्य शिकून आपला व्यावसायिक उत्कर्ष साधत राहणे. ’उत्तम व्यवसायासाठी नेटवर्किंग कसे करावे’ याचे अभ्यासक तसेच प्रशिक्षक असलेल्या बनसोडे यांनी आपल्या पुस्तकातून याविषयाचे अनेक पैलू उलगडले आहेत. हे पुस्तक नवोदितांना केवळ मदत करत नाही तर एक व्यावसायिक म्हणून आत्मपरिक्षण करायला भाग पाडते. 

बिझनेस नेटवर्किंग म्हणजे जास्तीत जास्त लोकांना भेटून उत्पादनाची विक्री करणे असा अनेकांचा गैरसमज असतो. यशस्वी होण्याची पहिली पायरी आहे व्यवसायाचा प्रचार आणि प्रसार. त्या दृष्टीने व्यवसायाच्या विविध क्षेत्रातील अनुभवी तसेच यशस्वी लोकांना भेटत राहणे आणि त्यांच्याशी दृढ संबंध निर्माण करणे म्हणजे बिझनेस नेटवर्किंग. या हक्काच्या व्यक्ति तुमचे नाव जेव्हा कुणाला व्यावसायिक कारणासाठी सुचवतात तेव्हा तुमचे नेटवर्किंग योग्य दिशेने सुरू आहे असे समजायला हरकत नाही. याचबरोबर तुम्हाला इतरांनाही अशी मदत करायला हवी याचे भान असायला हवे. 

नेटवर्किंगसाठी जाताना तुम्हाला लगेच ग्राहक मिळणार आहे असे गृहीत धरू नये. तुमच्या व्हेंडर्सकडून तुम्ही ज्या अपेक्षा करता त्याच अपेक्षा तुमच्याकडून तुमचा ग्राहक करत असतो. अशा अनेक उपयुक्त सूचना या पुस्तकात स्पष्टीकरणासह दिलेल्या आहेत. ’पी हळद आणि हो गोरी’ या उक्तीनुसार पदार्पणातच उत्तुंग व्यावसायिक यशाची स्वप्ने पाहणार्‍या मुंगेरीलाल मंडळींना वास्तवाचे भान देणारी आणि संयम तसेच चिकाटीचे महत्व सांगणारी यातली चिनी बांबू संकल्पना  मुळातून वाचायला हवी. संपर्कक्षेत्र वाढवायचे असेल तर जगातल्या अर्ध्या व्यावसायिकांपर्यंत तुम्ही जास्तीत जास्त सहा टप्प्यात पोचू शकता. हे सहा दरवाजे एकामागोमाग एक उघडणारी किल्ली कुठे दडली असते, ती कशी वापरावी हे यात रंजक पद्धतीने सांगितले आहे. व्यावहारिक नफ्यापलिकडे विचार करता बिझनेस नेटवर्किंगचे इतर फायदेही यात सविस्तर मांडले आहेत

नेटवर्किंग संघटनेत तुमचा वावर कसा असावा, तुमची विश्वासार्हता कशी वाढवावी, अल्प काळासाठी भेटलेल्या व्यक्तिच्या कायम स्मरणात राहील असा स्वत:चा तसेच व्यवसायाचा परिचय प्रभावीपणे कसा करून द्यावा, आपली लहानशी यशोगाथा सुद्धा आत्मविश्वासाने कशी सादर करावी, आपलं वैशिष्ट्य म्हणजेच यूएसपी कसा ओळखावा, त्याचा वापर कुठे, कसा, करावा, उत्तम प्रतिमानिर्मिती कशी करावी, नेटवर्किंगमुळे दाट परिचय झालेल्या दिग्गज उद्योजकांनी किंवा तुमच्या ग्राहकांनी तुमच्या सेवा, उत्पादनाबाबत दिलेल्या सकारात्मक प्रतिक्रियांचे व्यावसायिक महत्व काय, त्याचा वापर कसा केला जाऊ शकतो, चांगल्या नेटवर्किंगमधून जॉईंट व्हेंचर्स कसे निर्माण होतात, त्याचे फायदे काय अशा विविध विषयांसंबंधी अनेक उपयुक्त कानमंत्र हे पुस्तक तुम्हाला देतं. 

या पुस्तकाचे वेगळेपण आहे ते तुम्हाला आरसा दाखवणार्‍या, प्रत्येक मुद्द्यावर आधारित प्रश्नावलीत. उदा: मॉलमध्ये साधारणपणे लोणच्याच्या कप्प्याजवळच पापड ठेवले जातात. मग व्यवसाय करताना तुम्ही तुमच्याशी संलग्न क्षेत्रातील व्यावसायिकांशी संबंध वाढवता आहात का? ते कसे वाढवावेत? अशी क्षेत्रे कोणती? प्रचंड स्पर्धा असलेल्या ठिकाणी (रेड मार्केट) टिकून राहण्यासाठी हातपाय मारत बसण्यापेक्षा तुमचा स्पर्धक अद्याप न पोचलेल्या जागी (ब्ल्यू मार्केट) आधी पोचण्याचा विचार तुम्ही करता का? अशा जागा कोणत्या? त्यासाठी स्वत:मध्ये कोणते बदल करावे लागतील? तुमचा मित्रपरिवार कसा आहे? तुम्ही तुमच्यापेक्षा कमी कुवतीच्या लोकांशी संबंध वाढवता की तुमच्यापेक्षा यशस्वी लोकांशी? तुम्हाला तुमचे मूल्य माहीत आहे का? ते वाढवण्य़ासाठी तुम्ही प्रयत्न करता का? ’सिर्फ नाम ही काफी है’ असा एखादा तरी ग्राहक तुम्ही मिळवू शकला आहात का? असल्यास तुम्ही त्याबद्दल कसे बोलता? या स्वरूपाची रोखठोक प्रश्नावली सोडवताना स्वत:ला परखड प्रश्न विचारण्याची तयारी हवी. तुमच्या यशाचे गमक तुम्हाला तुमच्याच प्रामाणिक उत्तरात निश्चित गवसेल.

श्री. बनसोडे यांचा व्यवसाय क्षेत्रातील प्रदीर्घ व आंतरराष्ट्रीय अनुभव लक्षात घेता या पुस्तकात प्रत्यक्ष केस-स्टडीजचा अंतर्भाव करणे त्यांना सहज शक्य होते. ही उणीव त्यांनी चपखल उदाहरणांनी काही अंशी भरून काढली आहे. एकूण महाराष्ट्रीय उद्योजकाच्या मनातला न्यूनगंड काढून त्याच्या व्यवसायाचे तारू भरकटू न देता प्रगतीची नवनवी क्षितिजे पादाक्रांत करण्यासाठी त्याला हे पुस्तक नक्की उद्युक्त करेल. सहज-सुगम भाषेतले हे पुस्तक उद्यमशील वृत्तीच्या व्यक्तिंसह प्रत्येक मराठी व्यावसायिकाच्या संग्रही असायला हवे. 

©मोहिनी मोडक


Friday, July 15, 2022

Time

Time

It's in a haste.. always

It does wish to halt for a moment though..

to feel it's own existence


Then it hurriedly hides itself in the clouds

but gets restless n wanders desperately...

It dives deep in the sea

and the next moment 

emerges on it's surface as an impulsive tidal wave...


It settles on a lush green leaf 

as a dew drop...

then the bubble bursts

With the blink of an eye


It starves for ages in despair in an empty bowl..

The careless time...Tramples a kitten rudely on the

crowdy streets 

When it's giant wheel rotates

anonymous lives get literally ragged into pieces


It's aloof, neutral.. endears none

Where does it head to !

It doesn't wait for breastfeeded lips 

nor does it wait to pass over the skin ,over the hair

even over the heart..callously


It travels on and on and never returns

Does it really exist ?


Time.. everlasting ..Full of life...

When it's all over for one

It's just a beginning for the other...

When it pauses for us 

Is that a termination ! 

It's not...

We keep flowing 

With the wind 

with the dust 

with the light...


Then what does time mean to us ?

Just a little span of our existence...

Which ends 

With our senses 

with us.


(काळ या कवितेचा अनुवाद)

- Mohini Limaye Modak

----------------------------

 काळ?

अखंड सुरू असते त्याची लगबग

त्यालाही थांबायच असतं क्षणभर खरंतर

अनुभवायचं असतं त्याचं असलेपण


मग तो ढगात लपतो,पण भांबावून सैरैवैरा होतो.

समुद्राच्या खोल तळाशी जातो तर

उद्वीग्न लाट होउन आदळत येतो

बसतो हिरव्यागार पानावर

टप्पोरा थेंब होऊन कधीतरी थांबतो

तर त्याचा बुडबुडा फुटतो


भुकेल्या कटो-यात तडफडून अर्धमेला होतो

बेफिकीरीने कधी 

भररस्त्यात मांजरीच्या पिल्लाला तुडवून जातो

कधी फिरतात अफाट त्याची चाकं

आणि भरगर्दीत कुणी चिंध्या चिंध्या होतं


तो अलिप्त, तो तटस्थ, त्याला कुठलाच मोह नसतो

कुठे पोहचायचय त्याला?

थांबत नाही तो, दुधकोवळ्या ओठांसाठी

तो जातो त्वचेवरुन... केसांवरून....

ह्रदयावरून सुद्धा?

जातो फक्त! येत का नाही?.


काळ खरच असतो?

काळ अखंड जिवंत!  तरूण!

एकासाठी संपलेला असतांना

दुस-यासाठी दौडत असतो !

तो आपल्यासाठी थांबतो

म्हणजे का नष्ट होतो आपण?

आपण तर वहात राहतो

वा-याबरोबर ,धुळीत, प्रकाशात अखंड...


मग काळ खरच कोण असतो ?

की आपण आपल्यापुरता एक काळ असतो?

जो आपल्या सोबत संपतो.


- ऍड. मंदाकिनी पाटील


–--------


Wednesday, April 20, 2022

व्याकुळ कोंब

How quickly you finish

everything served on the plate

with restraint 

like a conquering emperor


Couldn't  you inhale

the aroma of the delicacies..

Couldn't  you savour them 

in delight !


Couldn't you acknowledge earnestly !

if not with words

with a gratifying glance at least !


Instead

you get up with a belch

wiping your mouth 

and 

the anguished tender sprout 

of my hunger

withers and dies within...


Translated by Mohini



 व्याकुळ कोंब


किती पटापट संपवलं

ताटातलं सगळं

निग्रहानं विजय मिळवणाऱ्या 

एखाद्या सम्राटासारखं 


साठवून घेता आला असता 

पुढ्यातल्या पदार्थांचा दरवळ

अन् लज्जतही अनुभवता आली असती खरंतर


देता आली असती

उत्स्फूर्त दाद

फक्त एका कृतार्थ नजरेने


तू तोंड पुसून उठतो

ढेकर देऊन तेव्हा

कोमेजून, मृतप्राय होतो 

जेमतेम उगवू पाहणारा

माझ्या भूकेचा व्याकूळ कोंब!


संघमित्रा खंडारे



Tuesday, March 1, 2022

'भारतीय स्त्रीत्वाचे तेजाळ दर्शन’ - 'पुत्र ज्ञानदेवतेचा' या गौरवग्रंथातील लेख


महामहोपाध्याय बाळशास्त्री हरदास - 'पुत्र ज्ञानदेवतेचा' या गौरवग्रंथातील माझा लेख

महामहोपाध्याय बाळशास्त्री हरदास म्हणजे गेल्या शतकातलं महाराष्ट्रातलं व्युत्पन्न चतुरस्र व्यक्तिमत्त्व. ’चालतेबोलते विद्यापीठ’ असा त्यांचा उल्लेख बापूजी अणे करत. नवीन पिढीलाच काय आपल्या पिढीलाही त्यांची विद्वत्ता, व्यासंग, पांडित्यपूर्ण साहित्यनिर्मिती, ओजस्वी वक्तृत्व, मूलगामी राष्ट्रचिंतन, सांस्कृतिक-प्रबोधनाचं अतुलनीय कार्य याची फारशी माहिती नाही.
जन्मशताब्दी निमित्ताने महामहोपाध्याय बाळशास्त्रींच्या साहित्याचा परिचय नव्या पिढीला करून देणार्या 'पुत्र ज्ञानदेवतेचा' या गौरवग्रंथाचं लोकार्पण मुंबई इथे मराठी भाषा गौरव दिनाच्या शासकीय कार्यक्रमात झालं. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने हा ग्रंथ प्रकाशित केला आहे.
प्रख्यात वक्ते, अग्रणी लेखक श्री.आशुतोष अडोणी हे या ग्रंथाचे संपादक. बाळशास्त्रींनी ’भारतीय जीवनादर्श’च्या माध्यमातून रामायण व महाभारतातील व्यक्तिरेखांचे चरित्रचित्रण करून वाचकांना एक नवी दृष्टी प्राप्त करून दिली आहे. यातल्या स्त्री व्यक्तिरेखांबद्दलचं माझं आकलन मी लेखातून मांडलं आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
जाज्ज्वल्य देशाभिमानी आणि वक्तादशसहस्रेषु म्हणून प्रसिद्ध असलेल्या बाळशास्त्री हरदास यांना महामहोपाध्याय, वेदान्ततीर्थ, काव्यतीर्थ, साहित्याचार्य अशा अनेक उपाध्यांनी का ओळखले जात असावे याची चुणूक दाखवणार्‍या त्यांच्या अनेक वाड्मयीन शिल्पांमध्ये ’भारतीय जीवनादर्श माला’चा समावेश होतो. बाळशास्त्रींनी यात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीने प्राचीन वाड्मयातील विशेषत: महाभारतकालीन व्यक्तिरेखांचे चरित्रचित्रण करून वाचकांना एक नवी दृष्टी प्राप्त करून दिली आहे. श्रीमन्महाभारतावरील व्याख्यानांच्या सत्रात त्यांनी महाभारतीय स्वभावचित्रे उलगडताना गांधारी, कुंती व द्रौपदी अशा तीन स्त्रीरेखा चित्रित केल्या होत्या. पुढे त्याच मालिकेत सावित्री, कुंती यांचा त्यांनी समावेश केला. त्यांच्या रामायणावरील ग्रंथात ’एक स्वर्गीय पुष्प’ या शीर्षकांतर्गत सीतेचे स्वभावचित्र आलेले आहे. १९७५ हे स्त्रीवर्ष म्हणून घोषित करण्य़ात आले होते. त्याचे औचित्य साधून या सर्व स्त्रीस्वभावरेखांचा संग्रह ’भारतीय जीवनादर्श’ (भाग १) या नावाने प्रसिद्धीस आला. बाळशास्त्रींच्या सुविद्य पत्नी वीणाताई या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हणतात, "महाभारत हा इतिहास आहे की केवळ एक काव्य, त्यातील घटना खर्‍या आहेत की काल्पनिक याचा आपल्याशी संबंध येत नाही. जीवनाचा श्रेष्ठ ध्येयवाद निश्चित करणारा तो ग्रंथ आहे. महर्षी व्यासांच्या दिव्य प्रतिभेतून ज्या अनेक व्यक्ती चित्रीत झाल्या त्यातील काही प्रमुख शास्त्रीबुवांच्या लेखणीनं रेखाटल्या आहेत. त्या आजही आपल्याला पथदर्शक ठरतील अशी त्यांची धारणा आहे." दुर्गुणांचा अतिरेक झाला तर विनाश अटळ असतोच पण सद्गुणांचा अतिरेक झाला तरीही कार्य नासतं हेच व्यासमहर्षींनी महाभारतातल्या विविध व्यक्तिरेखांच्या माध्यमातून सिद्ध केलं आहे. या मुद्द्याचा विचार करता प्रस्तुत पुस्तकातील स्त्रीव्यक्तिरेखांमधील बहुतेक व्यक्तिरेखा धर्मकार्पण्य़ाच्या बळी ठरलेल्या दिसतात. धर्म आणि तत्त्वज्ञान यांनी सामर्थ्याला नियंत्रित करण्य़ाऐवजी सामर्थ्यच त्यांना नियंत्रित करू लागले. अधर्माचे तम दाटले आणि दिशा अंधारल्या. या पार्श्वभूमीवर बाळशास्त्रींच्या या स्त्रीव्यक्तिरेखा एखाद्या विद्द्युल्लतेप्रमाणे भासतात. प्रथदर्शनी त्या हतबल वाटतात परंतु लेखकाचे अभ्यासपूर्ण विवेचन समजून घेत गेले की या स्त्रियांनी अधर्मशरणता ठामपणे नाकारत आपल्या धर्मशील आचरणाच्या तेजाने आपले केवळ व्यक्तिमत्वच नव्हे तर समाजमनदेखील झळाळून टाकलेले दिसते. स्त्री आणि भूमी ही नवनिर्मितीची केंद्रे आहेत. त्यातूनच विश्वनिर्मितीमागचे जे अदितत्त्व आहे तेही स्त्रीरूप आहे या धारणेतून देवतांचा उगम झाला. ’यत्र नार्यस्तु पूज्यन्ते ,रमन्ते तत्र देवत:’ हे आपले सांस्कृतिक गृहीतक मानले गेले. असे असले तरी प्रत्यक्षात वैर्‍यालाही देऊ नये अशी वागणूक या स्त्रियांना केवळ आप्तस्वकीयांनीच नव्हे तर त्या ज्यांना परमेश्वरस्वरूप मानत, ज्यांच्याशी या स्त्रियांचे आयुष्य गुंफले गेले होते अशा पतीनेही दिल्याचे चरित्रवर्णनात दिसून येते. अशा प्रसंगांच्या अग्नीपरिक्षेतून जाताना या स्त्रीव्यक्तिरेखांनी आपले स्त्रीत्व मात्र होरपळू दिले नाही हे बाळशास्त्रींच्या विवेचनातून प्रत्ययास येते. असामान्य गुणांच्या या शलाका त्यात लीलया उत्तीर्ण तर झाल्याच उलट त्यांच्या दिव्यत्वापुढे परिक्षा घेणारे खुजे ठरले. या स्त्रियांनी आपले स्त्रीत्व अशा उंचीवर नेऊन ठेवले जिथे नजर उचलून पाहणे सर्वसामान्यांना अशक्य व्हावे. ’महासती गांधारी’ या लेखातले बाळशास्त्रींचे सुरूवातीचेच वाक्य आपल्याला गांधारीकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन देते. ते लिहितात, ’दुर्योधनासारख्या कलिपुरूषाची माता आणि राजा धृतराष्ट्रासारख्या पाताळयंत्री खलपुरुषाची पत्नी होण्याचे दुर्दैव जिच्या वाट्याला आले ती महासती गांधारी भारतातील स्त्रीरत्नांच्या अग्रभागी शोभण्याच्या योग्यतेची आहे.’ श्रीशंकराची आराधना करून शतपुत्रप्राप्तीचा वर मिळवणारी गांधारी, ज्या अर्थी आपला पती सृष्टीच्या दर्शनसुखाला आचवला आहे त्याअर्थी त्याच्या सुखदु:खाशी एकरूप होणे हेच खरे विवाहबंधन मानून त्यासाठी आपले नेत्र कापडाने सदाचे झाकून घेणारी आणि त्याच्यासह आपला देह वनातील वणव्याच्या अग्नीत समर्पण करणारी दृढनिश्चयी आणि पतीपरायण गांधारी आपल्याला परिचित असते. परंतु आपल्या दिव्यदर्शी न्यायप्रियतेने वात्सल्याच्या स्वाभाविक मोहपाशावर मात करणा‍र्‍या गांधारीशी बाळशास्त्री आपला परिचय करू देतात. युद्धानंतर मृतावस्थेत धुळीत पडलेल्या दुर्योधनाकडे पाहून विलाप करणारी, ज्यांना धर्माचे आधारस्तंभ मानावे अशा पांडवांनी आपल्या पुत्रांना अधर्माने मारले हे पाहून चवताळून उठलेली, कुरूकुलनाशाला श्रीकृष्णाला जबाबदार संबोधून ’तुझ्या स्त्रियाही अशाच हतपुत्र व निहतबांधव अवस्थेत विलाप करतील’ असा घोर शाप देणारी विकलहृदयी माता हे गांधारीचं एक सर्वसामान्य रूप किंवा स्त्रीस्वभावाचे स्वाभाविक वैशिष्ट्य. राजसभेत संधीच्या वाटाघाटी चालू असताना न्याय व धर्म यांच्या नियमाप्रमाणे अर्ध्याच नव्हे तर सर्वच राज्याचे अधिपती पांडव असल्याचे- त्यांची मागणी न्याय्य असल्याचे दुर्योधनाच्या तोंडावर राजसभेला सुनावणारी गांधारी, युद्धाला प्रयाण करण्यापूर्वी दुर्योधन तिचा आशीर्वाद घ्यायला आला तेव्हा ’जिकडे धर्म त्या पक्षाचाच जय होईल’ असे तटास्थपणे ऐकवणारी गांधारी, ’काम-क्रोध जिंकील तोच पृथ्वी जिंकील आणि तोच राजधर्म आहे’ असा दुर्योधनाला भर सभेत उपदेश करणारी गांधारी, ही तिची असामान्य रूपे. तिला महाभारतात महाप्राज्ञा व दीर्घदर्शिनी अशी विशेषणे जोडलेली का आढळतात हे बाळशास्त्रींच्या लेखातून सप्रमाण स्पष्ट होते. ’राजमाता कुंती’ हा या पुस्तकातील दुसरा सविस्तर लेख. निर्जीव धनाप्रमाणे तिच्या पित्याने तिला कुंतिभोजाला देऊन टाकले. लहानपणी पित्याने व मोठेपणी श्वशुराने तिची वंचना केली. दुर्वासांनी तिला दिलेल्या वरदानामुळे औत्स्युक्यापोटी ज्यांना आवाहन केले ते सूर्यनारायण उपस्थित झाले आणि ’देवाचे दर्शन व्यर्थ न व्हावे’ या त्यांच्या आग्रहातून तिला तेजस्वी, कवचकुंडलमंडित कर्ण या पुत्राची प्राप्ती झाली. नकळत घडलेल्या या अपकृत्यामुळे लज्जित होऊन तिने त्या पुत्राचा त्याग केला. अर्जुनाने कर्णाला पहिल्या शस्त्रपरिक्षेत आव्हान दिले तेव्हा तिने कर्णाला ओळखले. त्याला भेटून तिने ’तू सूतपुत्र नाहीस, माझा पुत्र आहेस, कौन्तेय आहेस, तेव्हा तुझ्या बंधूंना संरक्षण दे’ अशा शब्दात त्याचा अनुनय केला. त्याच्या वधानंतर तरी त्याला सद्गती लाभावी यासाठी तिचे मातृहृदय तळमळत होते. कुंतीची ही कथा सर्वश्रुत आहे. बाळशास्त्री या राजमातेचे त्या पलिकडचे पैलू अधोरेखित करतात. अंत:करणात किंचितही सापत्नभाव न ठेवता माद्री या सवतीशी प्रेममय संबंध निर्माण करणारी कुंती, ’स्त्रीसंग केल्यास मरण ओढवेल’ या शापवाणीमुळे राजभोगाचा मोह सोडून पती पांडूला तपस्यामय जीवनात बरोबर राहू द्या म्हणून विनवणी करणारी कुंती, निपुत्रिकपणाच्या दुर्गतीतून पतीला वाचवण्यासाठी नियोग पद्धतीने तीन पुत्रांना जन्म देणारी व पतीनिधनानंतर माद्रीच्या दोन पुत्रांसह पांडवांचा ममत्वाने सांभाळ करणारी वत्सल विशालहृदयी कुंती बाळशास्त्रींनी या लेखातून चितारली आहे. ज्येष्ठ पुत्राच्या द्यूतप्रियतेमुळे राज्य गमावण्यापासून द्रौपदी वस्त्रहरणापर्यंत झालेली अवहेलना पाहून तिचे अंत:करण शतश: विदीर्ण होऊन गेले परंतु त्याही स्थितीत तिने विजनवासात निघालेल्या द्रौपदीला खंबीर राहण्य़ाचे आवाहन करून धैर्याने निरोप दिला. तेरा वर्षे पुत्रवियोगाचे दु:ख भोगल्यावर अपमानाचा सूड घेऊन आपले पुत्र राज्य परत मिळवतील ही तिची रास्त अपेक्षा होती परंतु ते तर राहोच, आपले पुत्र केवळ पाच गावे मागून संधी करत आहेत हे कळताच प्रदीप्त होऊन उठलेली कुंती आणि तिचे ऐहिकापेक्षा पारलौकिकाचे आकर्षण बाळशास्त्रींनी अगदी नेमकेपणे मांडले आहे. आपल्या पुत्रांच्या हातून धर्म घडावा म्हणून शत्रूंनी केलेल्या उपहासाची, नालस्तीची आणि त्या विटंबनेचा सूड घेण्य़ाच्या कर्तव्याची त्यांना जाणीव करून दे, असा तेजोगर्भ निरोप श्रीकृष्णाला देणार्‍या कुंतीच्या वक्तव्यात पतित राष्ट्राचे उत्थापन घडवून आणण्याचे सामर्थ्य आहे असे बाळशास्त्री प्रतिपादित करतात. तरीही तिचे खरे वैशिष्ट्य त्यांना आढळते ते तिच्या अपूर्व त्यागात. वीरमाता म्हणून कर्तव्यपूर्ती करून युद्धात विजयी झाल्यानंतरही राजोपभोग घेण्याऐवजी पुढील कर्तव्य म्हणून कुंती, गांधारी व धृतराष्ट्र यांच्या शुश्रुषेत निमग्न राहिली. त्यांच्याचबरोबर तिने आपले शरीर वनातील वणव्यात समर्पित केले. कुंतीच्या जीवनप्रवासाच्या नंदादीपाच्या प्रकाशात खर्‍या आर्यस्त्रीजीवनाची प्रचिती येते हे बाळशास्त्रींच्या वाक्यावाक्यातून प्रत्ययाला येते. आर्य स्त्रीच्या तेजस्वितेचा कुंती हा देदिप्यमान आणि दाहक असा अविष्कार त्यांनी प्रस्तुत केला आहे. युधिष्ठीराच्या धर्मकार्पण्याचे कुंतीहून अधिक करूणास्पद बलिदान म्हणजे द्रौपदी. अग्नीपासून उत्पन्न झालेल्या तेजस्विनी द्रौपदीच्या व्यक्तिवैशिष्ट्याची बीजे बाळशास्त्रींना तिच्या वैचित्र्यपूर्ण जन्मकथेत तर पुढील महाभारताची बीजे तिने तिच्या स्वयंवरात लक्ष्यवेधाचे आव्हान स्वीकारणार्‍या कर्णाला सूतपुत्र म्हणून रोखताना केलेल्या वक्तव्यात आढळतात. द्यूतात पराजय झाल्यानंतर रजस्वला स्थितीतील द्रौपदीची झालेली घोर विटंबना, तिचा करूण विलाप आणि पतींसह सर्व आप्तस्वकीय खाली माना घालून बसलेले असताना श्रीकृष्णानी केलेले तिचे लज्जारक्षण, विराटपर्वातील कीचकवध हा महाभारतातील भाग सर्वपरिचीत आहे. यापलिकडची ओजस्वी, क्षत्राणी द्रौपदी बाळशास्त्री रेखाटतात. या घटनांनंतर युधिष्ठीर आणि भीमाला अग्नीज्वालेसमान प्रखर वृत्तीच्या द्रौपदीने त्यांचे अंत:करण जळेल, त्यांच्या अस्मितेला चेतवेल असे स्फुल्लिंगासारखे तप्त, खडे बोल सुनावून निरूत्तर केले. गांधारीने तिला वर मागावयास सांगितला तेव्हा तिने युधिष्ठीराला दास्यातून मुक्त करण्याचा वर मागितला, धृतराष्ट्राने दुसरा वर माग म्हटले तेव्हा बाकी ४ पांडवांचे शस्त्रास्त्रांसहित स्वातंत्र्य मागितले आणि तिसरा वर माग म्हटल्यावर त्या महामानिनीने ’लोभ धर्माचा नाश करतो, स्वतंत्र झाल्यावर माझे पती स्वकर्तृत्वाने गेलेले वैभव परत मिळवतील’ असे क्षात्रधर्माला शोभणारे उत्तर दिले. द्रौपदीची व्यक्तिगत जीवनातली गृहकृत्यदक्ष वागणूक आणि तिचे सहजीवनासंबंधीचे विचार या लेखात तिच्या आणि सत्यभामेच्या संवादातून समोर येतात. तत्कालानुसार पती हाच परमेश्वर हे केंद्रस्थानी ठेवून या विचारांची मांडणी केलेली असली तरी त्या संवादातून झळकणारे तिचे अष्टपैलूत्व आणि आत्यंतिक परिपक्वता आपल्याला नतमस्तक करते. समकालीन गृहकलहांमधील अनेक प्रश्नांची उत्तरे द्रौपदीच्या प्रगल्भ विचारपद्धतीतून सहज मिळू शकतात. तिच्या व्यक्तिमत्वाचे हे असामान्यत्व बाळशास्त्री उलगडतात तेव्हा तिचा समावेश बाळशास्त्रींनी भारतीय जीवनादर्श मालिकेत का केला असावा याचे उत्तर मिळते. सीता व द्रौपदीची तुलना करताना बाळशास्त्रींनी म्हटले आहे," सीतेचे महनीय सद्गुण महासती द्रौपदीइतकेच उज्ज्वल आहेत, दोघीही अयोनिजा आहेत, परंतु त्यांच्या भाग्यरेषेत मात्र भिन्नता आहे. सीतेची दु:खे श्रीरामचंद्रांच्या दिव्य कर्तव्यनिष्ठेतून उद्भवली आहेत त्यामुळे दु:खाग्नीत देखील कर्तव्यपूर्तीसाठी बलिदान घडत असल्याचे समाधान सीतेला लाभले." सीता आणि रामचंद्रांचा देह जरी वेगळा असला तरी त्यांची हृदये एकरूप होती. त्यांचे रम्य दंपतीजीवन बाळशास्त्रींनी वर्णिले आहे. कैकेयीच्या वरानुसार भरताला राज्य मिळावे म्हणून श्रीरामचंद्रांना वनवास पत्करावा लागला तेव्हा तिच्या आदर्श वर्तनाने आणि चारित्र्याच्या दिव्यतेने जगाला भारले, प्रत्येकाच्या अंत:करणात तिच्याविषयी आदराची भावना उत्पन्न झाली. तिच्या वादकौशल्याचे, बुद्धीमत्तेचे आणि धर्मशास्त्रातील पांडित्याचे यथोचित वर्णन बाळशास्त्रींनी केले आहे. लोकापवाद टाळण्य़ासाठी व राजसिंहासनाची इभ्रत राखण्यासाठी श्रीरामाने गरोदर स्थितीतील सीतेचा जेव्हा परित्याग केला तेव्हा त्यांच्या कर्तव्यपालनामागील अगतिकत्व समजून घेण्याइतकी तिच्या हृदयातील विशालता बाळशास्त्रींच्या वर्णनातून अनुभूत होते. लवकुशांच्या जन्मानंतर तिचा स्वीकार करण्यापूर्वी अग्नीदिव्य करण्याची अट तिला श्रीराम निरुपायाने घालतात तेव्हा मात्र आपले निष्कलंकत्व पटवून देतानाच ती देवी वसुंधरेला आपल्या उदरात आश्रय देण्याचे स्वाभिमानी आवाह्न करते. देवी सीतेच्या दैवी चारित्र्याचा तितकाच भव्यदिव्य अविष्कार बाळशास्त्रींच्या लेखणीने घडवला आहे. या वर्णनांमधील अनेक स्तिमित करणार्‍या घटना या दंतकथा असू शकतात. मूळ कथानकावर थर पडत गेलेले असू शकतात. उदा: ज्ञात स्त्रोतांनुसार भारतात लोखंडी उपकरणे इ.स.पू. चौथ्या शतकापासून आढळतात पण प्रगत लोखंडाचा प्रभाव गुप्तकालीन म्हणजे इ.सनाच्या चौथ्या-पाचव्या शतकातला ठरतो. परंतु या स्त्रियांच्या संबंधित कथानकांमध्ये विशिष्ट धनुष्याचे उल्लेख येतात. त्यामुळे याकडे रुपक अर्थाने पाहणे तर्कसंगत ठरते. आचार्य विनोबा भावे यांनीही महाभारतातील गीतेला केवळ धार्मिक ग्रंथ न मानता कौरव आणि पांडवांमधील द्वंद्व म्हणजे आपल्याच मनातील सद्भावना आणि असद्भावना यांच्यातील द्वंद्वाचं एक कविकल्पित रूपक मानलं आहे. बाळशास्त्रींच्या स्त्रीव्यक्तिरेखांच्या आयुष्यात देखील माणूस आणि मूल्य यांच्यामधला चिरंतन लढा सातत्याने दिसून येतो. या लढ्यात आपल्या मूल्यांशी सदैव प्रामाणिक राहून आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणार्‍य़ा या स्त्रिया विलक्षण ठरतात. त्यासाठी त्यांनी जे सोसले, जो त्याग केला त्याचे वर्णन बाळशास्त्रींनी अत्यंत उत्कटपणे केले आहे. या स्त्रियांना आपल्या कर्तव्याचे भान आहे तितकीच हक्कांची जाण आहे. जीवनाची ओढ आहे तितकीच विवेक आणि मूल्यांच्या बदल्यात मिळणार्‍या अशाश्वत सुखसमृद्धीबद्दल अनासक्ती आहे. त्यांचे पती अनेकदा हे भान विसरले परंतु या तेजस्वी स्त्रियांनी आपले पाय सत्याच्या भूमीवर कायम स्थिरपणे रोवून ठेवले. प्रसंगी त्यांनी जगण्याच्या पारंपरिक मर्यादा अमान्य केल्या आहेत. स्वत:चे नवे क्षितिज निर्माण केले आहे. जसजशी यातील एक एक स्त्री आपल्या समोर बाळशास्त्रींच्या लेखणीतून तळपत सामोरी येते तसतसे तिच्या प्रतिभ दर्शनाने आपण दिपून जातो. पुस्तकातील इतर लेख तुलनेने लहान पण तितकेच अर्थगर्भ आहेत. सावित्री उपाख्यानाच्या कविला सर्वश्रेष्ठ महाकवि मानणार्‍या डॉ. विंटरनिट्झ यांच्या विचारांचे दाखले बाळशास्त्रींनी वेळोवेळी काही लेखात दिले आहेत. जडवादी पाश्चात्य मनावर ज्या भारतीय विचारांनी मोहिनी घातली आहे त्यात सावित्रीचा आदर्श सर्वोच्च आहे असे बाळशास्त्री म्हणतात. मद्रदेशाची राजकन्या असूनही ऐश्वर्यशील जीवनाचा मोह तिच्या अंत:करणात उत्पन्न झाला नाही तसेच मृत्युसारखी भयानक गोष्ट देखील तिच्या विलक्षण चारित्र्याच्या ध्येयवादाला बाधा उत्पन्न करू शकली नाही. बाळशास्त्रींच्या शब्दात सांगायचे तर, ’जीवनाचे चंदन जितके उगाळले जाईल तितका त्याचा परिमल अधिक दरवळेल हाच भारतीय स्त्रीजीवनाच्या व्रताचा विषय असलेल्या सावित्रीच्या जीवनाचा अर्थ आहे.’ पती सत्यवानावर मृत्युदेवतेने आपले पाश फेकल्यानंतर ऋजुता, बुद्धीचातुर्य, वाक्पटुत्व आणि दिव्यतेने तिने प्रत्यक्ष मृत्युला जिंकले. आपल्या कृतीने सावित्री भारतीय स्त्रियांच्या पूजास्थानी पोचली. सावित्रीची आत्मसाधना अलौकिक आहे. सावित्रीचे उपनिषद हे ज्ञानोपनिषद आहे त्याचबरोबर यावरील लेखातील बाळशास्त्री लिखित संवाद स्त्रीत्वाच्या केवळ पतीपरायणतेचा नव्हे तर तिच्या चातुर्याचा तसेच पतीपत्नीतील अनुबंधाच्या मांगल्याचा साक्षात्कार घडवणारे आहेत. उदा: द्यायचे झाले तर, तिला ’पतीच्या जीवनाव्यतिरिक्त हवा तो वर माग’ असे सांगणार्‍या मृत्युशक्तीच्या अधिष्ठात्याला सावित्री उत्तर देते, "मातृभावना ही स्त्रीजीवनाचे सांदीकोपरे व्यापून राहणारी भावना आहे. क्षत्रियाच्या कुळाला योग्य असे बलवान आणि पराक्रमी पुत्र मला असते तर मला समाधान लाभले असते." म्रुत्युदेवतेने तसा आशीर्वाद देताच तिला पेचात पकडत सावित्री विचारते," आपण मला शतपुत्रांची माता होशील असा वर दिला परंतु पतीचे जीवित देण्य़ास मात्र आपण सिद्ध नाही. आर्यधर्मानुसार माझ्या पात्तिव्रत्याला कलंक लागणार नाही असे मातृत्व मला मिळण्याची शक्यता कशी आहे?" या शब्दांनी भानावर आलेल्या देवाधिदेवांना मग मृत्युच्या पाशातून सत्यवानाची मुक्तता करणे भाग पडते. . नलदमयंतीआख्यानातील लावण्यवती विदर्भकन्या दमयंती तसेच शाकुंतलोपाख्यानातील दुष्यंताच्या प्रतारणेने घायाळ झालेली मानिनी शकुंतला, पुत्राला रणोत्साही करणारी महाभारतातील माता विदुला, या तिघींबाबत मात्र बाळशास्त्रींनी विवेचनाऐवजी रंजनवादी कथाकाराची भूमिका घेतल्याचे दिसते त्यामुळे कुंती, सीता, गांधारी, सावित्री आणि द्रौपदीइतके त्यांचे दिव्यत्व मनावर ठसत नाही. तरीही अंतिमत: बाळशास्त्रींच्या लेखणीने (होमरच्या ’इलियड आणि ओडिसी’ या ग्रीक महाकाव्यांपेक्षा सात पटीने) मोठ्या अवकाशाच्या- महाभारताच्या पार्श्वभूमीवरील या स्त्रियांच्या जीवनाचे आदर्शत्व ज्या अंगभूत प्रतिभेने अधोरेखित केले आहे त्यातून, मानवी जीवनाचे असे एकही अंग नाही ज्याला व्यास कवेत घेत नाहीत अर्थात, ”व्यासोत्छिष्टं जगत्सर्वं’ या उक्तीचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. आपल्या साहित्यात रामायण (आदर्शवादी) आणि महाभारत (वस्तुनिष्ठ) असे दोन साहित्यप्रवाह मानले जातात. बाळशास्त्रींनी या दोन्ही प्रवाहांच्या अंतर्गत गोफाची अतिशय व्यासंगी नजरेने नोंद घेतलेली दिसते. त्या ताण्याबाण्यात विणल्या गेलेलं भारतीय स्त्रीजीवनातील आदर्शांची संयमी तरीही परखडपणे केलेली मांडणी एक समाजशास्त्रीय, मनोवैज्ञानिक घटित असल्यामुळे अभ्यासनीय ठरते. विचारातील निस्संदिग्धतेमुळे मुख्य व्यक्तिरेखेबाबतचे समकालीन वास्तव मांडताना तसेच त्यांचे आदर्शत्व अधोरेखित करताना संस्कृती जतन- संवर्धनाच्या नावाखाली तत्कालिन परिस्थितीचे किंवा कोणत्याही व्यक्तिरेखांचे अकारण समर्थन किंवा उदात्तीकरण बाळशास्त्रींनी केलेले नाही. आदर्श व्यक्तिकडूनही मानव्याचा अनुस्यूत भाग असलेले काही अपराध होतात त्याला या स्त्रिया अपवाद नाहीत परंतु कसोटीच्या क्षणी त्यांचे असामान्य वर्तन त्यांना जीवनादर्शाच्या पातळीवर घेऊन जाताना दिसते. पौराणिक संदर्भात लिहिताना ललित शैलीचा अतिरेक, त्यामुळे होणारा सत्याचा अपलाप, भारतीय इतिहासातले-संस्कृतीतले सारे कसे महन्मंगल असे मानण्यातला बाळबोधपणा यापासून त्यांची विद्वतापूर्ण शैली दूर राहिली आहे. त्यांच्या प्रतिपादनांना व्यासंगाची, ज्ञानाची आभा आहे. ’साहित्यिक’ हा शब्द वाटेल तसा वापरला जाण्य़ाचा आजचा काळ. त्याचा बावनकशी अर्थ समजून घ्यायचा तर हे पुस्तक वाचायलाच हवं. बाळशास्त्रींची शैली हा तर स्वतंत्र लेखाचा विषय आहे. त्यांचा लेखनकाळ लक्षात घेता आजच्या सोशल मिडीयावरील मिंग्लीशच्या तुलनेत त्याची भाषा एखाद्या घरंदाज, भारदस्त व्यक्तिमत्वासारखी संस्कृतप्रचुर क्वचित दुर्बोध तरीही अतिशय आकर्षक वाटते. उदा: निषधाधिपती नलाबद्दल ते लिहितात,’ब्रह्मण्य, वेदवेत्ता, महान धनुर्धर, विजितेंद्रिय व सत्यवादी अशा या राजाची शाश्वत कीर्ती प्राचीन भारताच्या इतिहासात स्थिरपद झालेली असून पुण्यश्लोक पुरुषश्रेष्ठांच्या प्रात:स्मरणीय मालिकेत त्याला पहिले स्थान लाभले आहे.’ त्यांची एकेक विशेषणे कलदार नाण्य़ासारखी खणखणीत नाद करतात. श्रीराम-सीतेचे वनवासातील सुरुवातीचे रम्य सहजीवन बाळशास्त्रींनी अतिशय अलवारपणे रेखाटले आहे. श्रीराम सीतेला सभोवतालची माहिती देत आहेत, आपल्या पराक्रमांबद्दल सांगत आहेत आणि सीता आपल्या प्राणसख्याचे शब्द मनोभावे श्रवण करित आहे हा प्रसंग सांगताना सीतेच्या मुखावरील भावाचे वर्णन बाळशास्त्री त्यांच्या मोहक शैलीत असे करतात,’ सर्वांगाचे कान करुन आपल्या हृदयसंपुटात श्रीरामांचा प्रत्येक शब्द जपून साठवीत असताना अभिमानाच्या नव्या नव्या लहरींनी जगातल्या सर्वश्रेष्ठ पुरुषाची सहधर्मिणी म्हणवण्य़ाचे भाग्य लाभलेल्या त्या स्त्रीच्या चेहर्‍यावर तांडव चालवले आहे हे दृश्यच किती हृदयंगम व अविस्मरणीय आहे.’ भरसभेत ओढून आणलेल्या द्रौपदीचा आक्रोश बाळशास्त्रींच्या लेखणीतून प्रकट होतो तेव्हा कारुण्यरसाबरोबरच तिचे शुचित्व आणि तिच्या धर्मविषयक संकल्पना अवघ्या काही शब्दांच्या योजनेतून ते लीलया साकार करतात, ’युधिष्ठीर धर्मबंधनाने बांधलेले आहेत. धर्म अत्यंत सूक्ष्म असून त्याचे रहस्य विचक्षणांनाही कळत नाही. या स्थितीतदेखील माझ्या पतींचे गुण सोडून त्यांच्या परमाणूएवढ्या सूक्ष्म दोषांचे अविष्करण करण्य़ाची माझी इच्छा नाही.’ परंतु बाळशास्त्री शैलीच्या मोहात गुरफटलेले नाहीत. लेखाच्या मुळात हिर्‍यासारख्या तेजस्वी गाभ्याला त्यांची शैली पैलू पाडते इतकेच. दुर्गाबाईंच्या शब्दात सांगायचं तर बासरी वाजवणारा बासरीत आपला श्वास ओततो तेवढ्याच आत्मीयतेने बाळशास्त्री हरदासांनी या स्त्रीव्यक्तिरेखा चितारल्या आहेत. महासती गांधारी, राजमाता कुंती, द्रौपदी, सावित्री, विदर्भकन्या दमयंती, विदुला, सीता आणि मनिनी शकुंतला या आदर्शवत् स्त्रियांच्या व्यक्तिमत्वाचे विविध कंगोरे बाळशास्त्रींच्या सिद्धहस्त लेखणीतून उजागर होतात. या स्त्रियांचे थोरपण हे त्यांच्या सम्राज्ञीपदात नसून जीवन ही केवळ आत्म्याची गतिमानता आहे हे जाणून घेऊन त्यातील आव्हानांना सामोरे जाऊन त्यातही अनंताचे दर्शन घेण्यात आहे, हे बाळशास्त्री दाखवून देतात. स्त्रीजातीचे सनातन तेज आणि विवशता टिपताना तत्कालिन राजकीय, आर्थिक, धार्मिक अंगांचा शोध बाळशास्त्री घेतात. त्यातून त्या समाजाची विकासप्रक्रिया, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, कायदेव्यवस्था असे कित्येक पैलू समोर येतात. अर्वाचीन समाजाचा एक घटक आणि एक वाचक म्हणून आपण समृद्ध होत जातो.
---------------------------



Thursday, July 22, 2021

बाकीबाब


एखाद्या कवीची एखादी कविता आवडते. एखाद्या कवीच्या कवितेतला एखादा चमकदार शब्द आवडतो पण एखादा कवी अख्खाच्या अख्खा आवडतो. त्या कवीची प्रत्येक कविता आणि त्यातला प्रत्येक शब्द झपाटून टाकतो, असं तुमचं कुणाच्या बाबतीत होतं का? माझं असं #बाकीबाब म्हणजे बा.भ.बोरकरांच्या बाबतीत होतं. त्यांच्या कविता आरपार शिरतात. अर्थाचे कंगोरे वगैरे शोधत बसायचं दडपण नसल्याने, कवीला नेमकं काय म्हणायचंय बॉ! असले प्रश्न पडत नसल्याने, त्यांची कविता शब्दश: भेटते. ती वाचायची चीज नसून जगायची, भोगायची, अनुभवायची चीज आहे हे लख्ख कळतं. 

’माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे..  

कड्या कपारीमधूनी घट फुटती दुधाचे’ 

वाचलं तेव्हा गोव्याला जाण्याआधीच मी गोवा ’पाहिला होता. त्यामुळे प्रत्यक्ष गेले तेव्हा बहुतेक अनुभव म्हणजे ’देजावू’ मोमेंट होते. आधीच कुठेतरी ’पाहिलेले’.

’कुठे तुटल्या लाल कड्यावर चपळ धीट बकरीची पोरे.. 

एक त्यातले लुचे आईला सटीक कांती गोरे गोरे’ 

असं काही चित्रवाही ते कवितेतून रेखाटतात तेव्हा त्या कड्यावर चढून बकरीच्या शुभ्र गोजिरवाण्या पिलाच्या मऊशार अंगाला आपण केव्हाच स्पर्श केलेला असतो.  

इकडे कुणाला कोसळत्या, खळाळत्या पावसाचा अनुभव नाही, पण 

’लक्ष आचळांनी दुभे निळी आकाशाची गाय

थिजल्या तृप्तीवरी दाटे संतोषाची साय’ 

असा निळाईत रंगलेला पाऊस त्यांच्या नुसत्या शब्दांमधून चिंब करतो.

सौंदर्यपूजक, प्रकाशपूजक बोरकर तमाचे स्त्रोत्र लिहितानाही सृजनाशी नातं जोडतात.  

’घटका घटका काळोखातच बसून असतो असा

उरातला गोंजारत नवख्या शब्दांचा कवडसा’ 

त्यांच्या या ओळी वाचाव्यात आणि स्वत:सह स्तब्ध बसून राहावं.

’मध्यरात्री नभघुमटाखाली शांतीशिरी तम चवर्‍या ढाळी

त्यक्त बहिष्कृत मी ज्या काळी, एकांती डोळे भरती..’ 

असं काही वाचल्यावर यावर काही लिहू नये, त्याने मनावर पाण्यावरच्या तरंगासारखा उमटलेला अलवार भाव डहुळेल, त्यावर ओरखडे पडतील असं वाटतं.

स्त्री-सौंदर्याची आसक्ती जेव्हा त्यांच्या शब्दातून ओसंडून वाहते तेव्हा आपण त्यातल्या प्रियकराचे डोळे झालेलो असतो. इतका हळूवार रोमँटिक, चितारी मराठीत दुसरा नसावा.

’पाठमोरी मूर्ती तुझी पाहिली मी कौतुके.. 

वाटले त्वत्कुंतली गे गुंतली सारी सुखे’ 

किंवा

’नको घुसळू पाण्यात खडीसाखरेचे पाय 

नको गोठवू ओठात दाट अमृताची साय’ 

किंवा 

’तव नयनांचे दल हलले गं

 पानावरच्या जलबिंदूंपरी 

त्रिभुवन हे डळमळले गं’ (थेट त्रिभुवन, अधलं-मधलं काहीच नाही !!) 

किंवा

’केशी तुझिया फुले उगवतील.. तुला कशाला वेणी’ किंवा... पुरे.

बोरकरांचे अर्थगर्भी शब्द नुसते वाचावे, रिचवावे, समीक्षा वगैरे करुन चावून चोथा करु नये. मग मिटल्या डोळयांना ’ती’ दिसते.

अनुरक्तीतल्या सौंदर्यात आणि विरक्तीतल्या देखणेपणात नेमका काय फरक असतो हे सुद्धा हा कवी काय ताकदीने दाखवतो!

’ओळखतील जे मला आणि मज दावितील मम यथार्थ ओळख, 

कणकण माझ्या देतील किंवा अवघ्या ब्रह्मांडाची पारख’ 

किंवा

’देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती 

वाळवंटातूनही जी स्वस्तिपद्मे रेखती’ 

असं अंतर्बाह्य देखणेपण जगाला लाभेल तेव्हा लाभो पण आपल्याला निदान ती नजर तरी लाभेल का! 

 

बोरकरांची कविता वैयक्तिक अनुभवापासून वैश्विक अनुभूतीपर्यंत कमाल वेगाने झेपावते. मूक करते.  

’या नदीच्या पार वेड्या यौवनाचे झाड आहे, 

अमृताचा चंद्र त्याच्या पालवीच्या आड आहे...

तेथ जाया वेग-वेडी पारजाची वाट आहे, 

शांतवाया ताप अंती गोकुळीचा माठ आहे.’ 

निर्व्याज भावनांच्या पखाली वाहणार्‍या या शब्दप्रभूला ’नाही पुण्य़ाची मोजणी नाही पापाची टोचणी’ म्हणत स्थितप्रज्ञ होणं सहजसाध्य असलं तरी ’अनंता तुला कोण पाहू शके’ अशी अमूर्ताची ओढ आहेच. 

जगण्यातले सगळे विभ्रम त्यांच्या उत्कट शब्दांच्या रुपातून असे आपल्या आत, बाहेर सगळीकडे विखुरलेले असताना, त्यांच्या कवितांचा ’दिडदा दिडदा’ नाद मनात सतत निनादत असताना त्यांच्या वेगळ्या स्मृती जागवायच्या तरी कशा!



Monday, November 30, 2020

न नुरलेले निर्विष देणे


विनोद निखळ आणि मार्मिक असेल तर तो हसवता हसवता अंतर्मुख करतो. वैचारिक खुजेपण दूर करण्यासाठी, समाजात हळू हळू का होईना, सकारात्मक बदल घडवण्यासाठी विनोदाइतके प्रभावी माध्यम दुसरे नाही. समाजाची विनोदबुद्धी आणि मनाचे उमदेपण बेताचे असेल तर मात्र ’ट्विट’मधला उपरोध लक्षात न आल्याने या वर्षाच्या सुरुवातीस मुंबई महापालिकेतून बदलीच्या कारवाईला सामोरे जावे लागणार्‍या निधी चौधरींसारखी परिस्थिती वाट्याला येते. या पार्श्वभूमीवर मराठी साहित्यातील विनोदाची गंगोत्री मानल्या जाणार्‍या श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या (जून २९, १८७१ - जून १,१९३४) निर्विष आणि सहज आकलन होणार्‍या विनोदाची प्रकर्षाने आठवण होते. नवल म्हणजे त्यांच्या खुसखुशीत लेखनातून अधोरेखित झालेल्या सामाजिक विसंगतींचे बरेच संदर्भ तब्बल एका शतकानंतर आजही तंतोतंत लागू पडतात. पु.लं. देशपांडे यांच्या ’गुळाचा गणपती’ या चित्रपटाचे ’सबकुछ पुलं’ असे कौतुक होत असताना पुलं गमतीने म्हणाले होते, "त्यामध्ये प्रेक्षक पण धरले नसावेत म्हणजे मिळवली." याच चालीवर कोल्हटकरांच्या विनोदाचा मासला द्यायचा झाला तर त्यांनी स्वत:च्या ’संगीत मूकनायक’ या नाटकाच्या १९०१ साली लिहिलेल्या प्रस्तावनेत मिश्कीलपणे नमूद केले आहे ,"प्रस्तुत नाटक १८९७ साली लिहिले गेले आहे. ते संपूर्ण झाल्यावर तीन वर्षे नायकाप्रमाणेच मूक होऊन बसले होते." नाटककार, विनोदकार आणि वाङ्‍मयसमीक्षक म्हणून एके काळी प्रचंड गाजलेल्या कोल्हटकरांचे आज विक्रीसाठी उपलब्ध असलेले एकमेव पुस्तक म्हणजे 'सुदाम्याचे पोहे'. ही वस्तुस्थिती बघता कोल्हटकरांचे साहित्यही आज जणू मूक होऊन बसले आहे. या वर्षी (२०२०) त्यांची दीडशेवी जयंती साजरी होत आहे, त्या निमित्ताने न. चिं. केळकरांनी ’मराठी साहित्यातील विनोदपीठाचे आद्य आचार्य’ अशा शब्दात गौरवलेल्या या वैदर्भीय सारस्वताच्या विचारांना उजाळा देण्यासाठी आणि विस्मृतीत जाऊ पाहणार्‍या साहित्यकृतींना बोलतं करण्यासाठी, हा लेखनप्रपंच. 


कोल्हटकरांनी विषयानुसार गंभीर किंवा विनोदी शैलीत, चिंतनाची डूब असलेले समीक्षालेख, पुस्तकपरीक्षणे, प्रस्तावना, साहित्य संमेलनांतील भाषणे, अभ्यासलेख आणि निबंध लिहिले. ’दुटप्पी की दुहेरी’ आणि ’श्यामसुंदर’ ह्या कादंबऱ्या लिहिल्या. गीतोपायन हा त्यांचा कवितासंग्रह. "बहु असोत सुंदर, संपन्न की महा" या प्रसिद्ध महाराष्ट्रगीताची रचना त्यांचीच. त्यांचे प्रभावी साहित्य तत्कालिन वाङ्‍मयव्यवहाराला दिशादर्शक ठरले. कोल्हटकर ही व्यक्ती न राहता जणू संस्था बनले असे म्हणूनच म्हटले जात असावे. त्यांच्या साहित्यसेवेचा सन्मान त्यांना १९२२ साली कविसंमेलनाचे (पुणे) अध्यक्षपद व १९२७ साली १३व्या साहित्यसंमेलनाचे (पुणे) अध्यक्षपद देऊन करण्यात आला. ’भारतीय ज्योतिर्गणित’ ह्या ग्रंथाद्वारे या विषयातल्या आपल्या व्यासंगाची प्रचिती देत सांगलीला भरलेल्या ज्योतिष संमेलनाचेही अध्यक्षपद त्यांनी भूषविले. त्यांचा जन्म आणि १० वी पर्यंतचे शिक्षण अकोला येथे तर उच्चशिक्षण पुणे व मुंबईत झाले. त्यांचे वडील अमरावती येथे शिक्षक होते. एल.एल.बी नंतर कोल्हटकरांनी अकोला, खामगाव येथे व्यवसाय केला आणि १९०१ साली ते बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे वास्तव्यास गेले.एकूण जन्मापासून ते कारकीर्दीच्या आणि वयाच्या उत्तरार्धापर्यंत त्यांचे जास्तीत जास्त वास्तव्य विदर्भातच होते. 

१९व्या शतकाच्या उत्तरार्धात ’काव्य स्वर्गीय असते तर विनोद हा प्रत्यक्ष जगण्याचा भाग (born on earth)’ असे म्हणणार्‍या मार्क ट्वेन यांनी विनोदाला प्रादेशिक गंध दिला तर ओ हेन्रींनी धक्कातंत्राचा उत्तम वापर करून आपल्या विनोदी व इतर कथा लिहिल्या. रशियन लेखक चेकोव्हनी कथालेखनाचा प्रारंभ विनोदी कथेनेच केला होता. कॅनडातील स्टीफन लीकॉक असतील किंवा इंग्लंडमधील पी. जी. वुडहाऊस, यांचे बोट धरूनच मराठीतील विनोदी साहित्याने आपली सुरुवातीची पाऊले टाकली आहेत. २० व्या शतकाच्या सुरुवातीला, व्हॉल्टेअर, स्टर्न, पास्कल, ट्वेन इ. पाश्चात्त्य लेखकांच्या विनोदनिर्मितीची तंत्रे अनुसरल्याचे खुलेपणाने मान्य करून कोल्हटकरांनी लेखन सुरु केले. त्याआधीच्या साहित्यात विनोद असलाच तर दुय्यम स्वरूपात किंवा तमाशासारख्या कलाप्रकारांपुरता मर्यादित होता.  ’सिगारेट सोडणं अत्यंत सोपं असतं, मी कित्येकदा सोडलीय’ किंवा ’अमेरिकेने भूगोल शिकावा म्हणूनच बहुधा परमेश्वर युद्ध घडवत असावा’ अशा सणसणीत कानपिचक्या देणार्‍या मार्क ट्वेन या आपल्या विनोद-बंधूप्रमाणे कोल्हटकरांचा विनोदही धारदार होता. अत्रे ज्यांना गुरुस्थानी मानत त्या राम गणेश गडकरी यांनी 'प्रेमसंन्यास' नाटकाच्या अर्पण पत्रिकेत लेखनगुरु कोल्हटकरांबद्दल लिहिले आहे," माझ्या लेखनातले जे चांगले असेल ते आपलेच आहे व जे वाईट आहे त्याचे क्षमापूर्ण उदारतेने कौतुक आपल्या इतके दुसरे कोण करणार." गडकऱ्यांच्या विनोदाला कारुण्याचा स्पर्श होता तर ’माय आईज हॅव कम’ लिहिणार्‍या चिं. विं. जोशींच्या विनोदाला चेष्टेची झालर. विषयाचा तिरस्कार न वाटता त्याबद्दल अंत:करणात जिव्हाळा निर्माण होणे, हे उत्तम विनोदाचे लक्षण असल्याचे ’मुद्दे आणि गुद्दे’ मध्ये आचार्य अत्रे म्हणतात. बौद्धिक मेजवानी देणार्‍या कोल्हटकरांच्या विनोदात हे लक्षण पुरेपूर आढळते. 

अत्यंत सुधारक विचारांच्या कोल्हटकरांनी त्र्यंबक शंकर शेजवलकर, र. धों कर्वे अशा कर्तृत्ववान पण समाजाने अव्हेरलेल्या व्यक्तींना कायम प्रोत्साहन दिले. 'समाजस्वास्थ्य' मध्ये आलेला एकमेव मृत्युलेख म्हणजे कोल्हटकरांवरचा! ’घंटानादाच्या कंपनांमधून निर्माण होणार्‍या उर्जेमुळे कोरोनाचे विषाणू मरून जाणार असल्याच्या’ अशास्त्रीय आणि विनोदी म्हणाव्या अशा पोस्ट्स आजही समूहमाध्यमांवर भाबडेपणाने व्हायरल होतात, राजकारण जातीभोवती घुटमळत राहते मग विसाव्या शतकाच्या सुरूवातीची सामाजिक स्थिती किती कठीण असेल! जातीभेदाच्या वेटोळ्यात पुरत्या अडकलेल्या समाजाबाबत कोल्हटकर लिहितात,‘‘आपला समाज व्यक्तींचा बनलेला नसून जातींचा व पोटजातींचा बनलेला आहे. अशा समाजांत ज्ञानाचा किंवा संयमनाचा प्रसार करणें अशक्य नसलें तरी अत्यंत दुर्घट असतें. सर्व जीवात्मे परमात्म्याचींच स्वरूपें आहेत या अभेदप्रतिपादक सिद्धांतास हिंदु धर्माच्या तात्त्विक अंगांत जरी महत्त्वाचें स्थान आहे तरी त्याच्या वर्णव्यवस्थारूप आचारात्मक अंगावर त्याचा थोडासुद्धां परिणाम झालेला दिसत नाहीं." कोल्हटकरांनी लिहिलेली शेकडो पत्रे आणि त्यातून हाताळलेले विषयवैविध्य पाहता ते त्या काळाचे एक रंजक भाषेतले सामाजिक दस्तावेजीकरण म्हणता येईल. मात्र या पत्रांमधील विषयांच्या केंद्रस्थानी त्यांचे माणूसपण आहे. 

कोल्हटकरांनी आपल्या वाङ्‍मयीन कारकीर्दीची सुरुवात ’संगीत विक्रम-शशिकला’ नाटकावरील टीकेने (१८९३) केली. न. चिं. केळकरांच्या ’तोतयाचे बंड’ या नाटकाच्या समीक्षेत त्यांनी नाट्यलेखनकले विषयी तर ’रागिणी’ या वामन मल्हार जोशी लिखित कादंबरीच्या समीक्षेत कादंबरीलेखनकले विषयी विवेचन केले आहे. त्यांची समीक्षा जडजंबाळ नसायची पण तर्कशुद्ध आणि सखोल असायची. मराठीतील स्त्री लिखित पहिले गद्य नाटक म्हणजे गिरीजाबाई केळकरांचे ‘पुरुषांचे बंड’. यालाही कोल्हटकरांची प्रस्तावना आहे. त्यांनी संगीत वीरतनय, मूकनायक, गुप्तमंजूष, मतिविकार, प्रेमशोधन, वधूपरीक्षा, सहचारिणी, जन्मरहस्य, परिवर्तन, शिवपावित्र्य, श्रमसाफल्य आणि मायाविवाह अशी पंचाक्षरी शीर्षकाची नाटके लिहिली. पैकी आठच रंगभूमीवर येऊ शकली. असे म्हणतात खुद्द कोल्हटकरांची सुद्धा खाडिलकर किंवा देवलांसारखी, रंगभूमी गाजवून टाकणारी एखादी तरी सांगितिका आपण लिहावी अशी मनीषा होती पण त्याच वेळेस ’सुदाम्याचे पोहे’ हा आपला हुकुमी एक्का असल्याचे ते जाणून होते. 


कोल्हटकरांनी १९०२ साली लिहिलेला 'साक्षीदार' हा आधुनिक मराठी वाङ्‌मयातला पहिला विनोदी निबंध मानला जातो. ’शपथेशिवाय तोंडून एकही शब्द न काढणारा’, काढलाच तर ’धादांत खोटे बोलणारा’, माणसाच्या पागोट्याचा रंग वगैरे बारीकसारीक तपशीलात कालापव्यय करणारा पण स्वत:चे नेमके वय सांगू न शकणारा, कायद्याला नाचवणारा, व्यावसायिक साक्षीदार त्यांनी खुबीने रंगवला. 
’जर्मनीच्या बादशहावर एक वर्षाने एक चमत्कारिक प्रसंग येणार आहे’, ’यंदा काही भागात पाऊस चांगला तर काही भागात कमी पडेल’ अशा ’धोरणी’ भविष्यकथनांची गमतीदार उदाहरणे देत स्वघोषित भविष्य़वेत्त्यांच्या लेखनातून टोप्या उडवल्या. 
त्यांचे ’कुलुपा’वरचे व संमेलनबाजीचे विडंबन असणारे ’चोरांच्या संमेलना’वरचे रुपक गाजले. ’गवई’ या लेखात गवयांच्या स्वभावातला विक्षिप्तपणा व गायनातील खोडींवरचे भाष्य, पोशाखी वृत्तीच्या गवयांना शाब्दिक चिमटे घेत ’जरीची टोपी व शालजोडी वापरावी म्हणजे गवयाचे तेज दुणावते. यजमानांशी शक्य तितके बेपर्वाईने वागावे. तबलजीस चुकवण्याचा प्रयत्न करावा व तो चुकत नसल्यास त्याच्याकडे धिक्काराने पाहावे.’ यासारखे दिलेले सल्ले, खास कोल्हटकरी शैलीचा नमुना म्हणता येतील. 
'म्हातारपणाचे फायदे' निबंधात म्हातारपणाकडे जितके खेळकरपणाने पाहता येईल तितके ते कमी क्लेशकारक वाटते हे जाणून ते म्हणतात, "ठेच लागून पडल्यास दात पडण्याची म्हाताऱ्यास मुळीच भीती नसते. त्याने सांगितलेली गप्प केवळ 'दंतकथा' आहे, असे त्याच्या तोंडावर कोणासही सांगता येत नाही. विस्मृतीमुळे पुष्कळदा आदल्या दिवशी वाचलेली गोष्ट दुसऱ्या लक्षात राहात नाही; त्यामुळे तेच ते पुस्तक त्याला दरखेपेस तितकेच मनोरंजक वाटू लागते व या रीतीने नवी नवी पुस्तके घेण्याचा उपद्व्याप व खर्च वाचतो. सर्वांत मोठा फायदा तो हा की, म्हाताऱ्यांशी तरुण मुली अगदी मोकळ्या व निष्कपट मनाने वागतात.'' अशा सर्व लेखमुष्टींची पुरचुंडी म्हणजेच ’सुदाम्याचे पोहे’.

कोल्हटकरांनी हिंदू धर्मातल्या अनेक अनिष्ट आणि खुळचट प्रथा नष्ट व्हाव्यात आणि विवेकी समाज निर्माण व्हावा म्हणून आपले विनोदाचे हत्यार प्रतिगामींच्या वर्तनातील विसंगतीवर चातुर्याने चालवले. कर्मकांडाच्या अतिरेकावर टीका करताना कोल्हटकरांनी म्हटले आहे," दुष्काळात गरिबांस पोटास पुरेसे अन्न व पाठीस पुरेसे वस्त्र मिळत नसताना बायकांच्या लक्ष वाती तुपात जळत असतात. परकीयांनी आमची संपत्ती लुटून न्यावी पण आमच्यामधील पराक्रमी पुरुषांस ती परत खेचून आणण्यासाठी देशाची मर्यादा ओलांडण्याची सक्त मनाई? कोणत्याही कार्यास यश येण्यासाठी त्याच्या साधनांचे पूर्ण ज्ञान व त्यावर विश्वास असावा लागतो पण आपण मात्र प्रत्येक कार्याचा संबंध दैव, कर्म, ग्रह, घुबडे, मांजर, पाली अशा असंबद्ध गोष्टींशी लावतो." 

आपण प्रथेच्या बाजूचे असल्याचे भासवून त्या प्रथेतला फोलपणा वक्रोक्तीचा वापर करून दाखवण्याची पद्धत कोल्हटकरांनी त्यांच्या बऱ्याच निबंधांमध्ये वापरली आहे. उदा: ’माझी भीष्मप्रतिज्ञा’ या निबंधात तत्कालिन लग्नपद्धतीवर कोरडे ओढताना प्रतिगामी ’उपवधू’ निवेदकाचे दिव्य विचार कोल्हटकर या शब्दात मांडतात, "मुलींना शिक्षण दिले म्हणजे त्यांना वल्लभास प्रणयपत्रिका पाठवता येऊन त्या वाममार्गास प्रवृत्त होतात अशी माझी पक्की समजूत असल्याने मी तिच्या बापास म्हटले, ती हे धडे विसरुन जाईल याची आपण काळजी घेऊ." आज ’मुली मोबाईलमुळे बिघडत असून त्यामुळे त्या पळून जाऊन लग्न करतात’ अशी मुक्ताफळे उधळणारे खासदार पाहिले की समाज आतून अजिबात बदललेला नाही फक्त साधने बदलली आहेत आणि कोल्हटकरांसारख्या लेखकाची अजूनही गरज नुरलेली नाही हेच ठळकपणे जाणवते. 

समाजसुधारणा करण्याची विलक्षण ताकद विनोदाच्या अंगी आहे, हे कोल्हटकरांनी ओळखलं. शिमग्यातील अश्लाध्य चालीरीतींवर त्यांनी उपहासाचा वापर करत यथेच्छ टीका केली. प्रवृतीपेक्षा निवृत्तीचे वर्चस्व वाढलेल्या समाजातल्या पापपुण्याच्या हास्यास्पद कल्पनांची ’चित्रगुप्ताचा जमाखर्च’ लेखातून रेवडी उडवली. ’उपासाच्या कच्च्या मालाचे पक्क्या मालात रुपांतर करायला’ पत्नीस सवडही न देणार्‍या पांडुतात्यांच्या तथाकथित निर्जळी एकादशीवर मिश्कील भाष्य़ करत तर कधी सनातनी आणि सुधारक अशी परस्पर विरोधी पात्रे उभी करून सनातनी समाजाच्या वर्तनातल्या विरोधाभासाचे आणि बेगडीपणाचे त्यांनी मनोज्ञ दर्शन घडवले. ’साहित्यपरिषदेची तयारी’ या निबंधात त्यांचा प्रतिगामी विचारांचा कथानायक लेखकराव होण्यासाठी परदेशातून कथावस्तू चोरतो. मूळ कथेनुसार शेवट करायचा तर सुधारकी जोडप्याला सुखात पडलेले दाखवण्याचे धर्मसंकट त्याच्यावर ओढवते. मग तो लेखक त्यांच्या गाडीचा अपघात करवतो आणि त्याच डब्यातील सनातन्यांच्या पुण्याईने ते जोडपे त्यातून वाचल्याचे दाखवून तो आपली कशी सुटका करवून घेतो या घटनाक्रमाचे खोचक पण मनोरंजक चित्रण कोल्हटकर लीलया करतात. 


"कोल्हटकरांच्या विनोदात्मक लेखनपद्धतीमध्ये व्यंगोक्ती, वक्रोक्ती, अतिशयोक्ती वगैरे मुख्य घटक असून हास्योत्पादन व तदद्वारा करमणूक व बोध हे तिचे परिणाम होत. कोल्ह्ट्करांच्या विनोदाचे हत्यार कल्पनेवर पडते. व्यक्तीवर ते उचललेही जात नाही." असे या पुस्तकाच्या प्रस्तावनेत न. चिं. केळकर लिहितात. "कवी हा संवादित्व शोधतो तर विनोदी लेखकाचे लक्ष विसंवादित्वावर असते." असा भेद केळकर त्यात स्पष्ट करतात पण कोल्हटकर जेव्हा याच विसंवादित्वाची मानसपुत्रांच्या माध्यमातून नेम साधून हजेरी घेतात तेव्हा "भाविक समाजाच्या दृष्टीने यातून काही भाग वगळले असते तर बरे झाले असते" असे केळकर सुचवतात. 
’विविध ज्ञानविस्तार’ मधील कोल्हटकरांच्या काही लेखांमुळे खवळलेल्या वर्गणीदारांनी संपादकांना धमक्या दिल्याची नोंद आहे. एकूण कुणी आपले दोष दाखवताच ’भावना दुखावणे’ हे आपल्या समाजाचे जुनेच दुखणे आहे. या संदर्भात कोल्हटकरांचे म्हणणे असे की ’आपली (आपल्या समाजाची) व्यंगे पाहून जसे अंत:करण तुटते तसे इतरांच्या व्यंगांनी तुटणे अशक्य आहे.’ 
’माझे टीकाकार’ या लेखात ’सुदामा’ या पात्रासंबंधी ते लिहितात, "माझ्या पुराणमताभिमानी वाचकांच्या शिव्याशापांचा उपसर्ग मला लागू नये म्हणून ’सुदामा’ नावाचा मानसपुत्र मी उत्पन्न केला आणि आपल्या काही वेडगळ चालींची उपयुक्तता सिद्ध करण्य़ाकरता भीरु लोक ज्या बालिश व हास्यास्पद कोट्यांचा अवलंब करतात त्या खुशाल सुदामाच्या तोंडी घालून दिल्या." समाजाची वाटचाल ही समाजातले सुबुद्ध लोक इष्ट-अनिष्ट गोष्टींबद्दल जो भाव बाळगतात त्यानुसार होते असे इमर्सनने म्हटले आहे. कोल्हटकरांनी बंडूनाना, पांडूतात्या या अजोड दुक्कलीचा प्रातिनिधीक वापर करत समाजाला विचार करायला भाग पाडले. सुदामा हा आपल्याला हिणवणारा हितशत्रू नसून आपली वैगुण्ये हसत हसत दाखवणारा आपला निस्सीम मित्र आहे, अशी वाचकाची अंतिमत: खात्री पटणे हेच ’सुदाम्याचे पोहे’ चे यश. 

प्रसिद्ध जर्मन कवी गटे याचे ब्रीदवाक्य ’सत्य, कर्तव्य व सौंदर्य’ असून त्यात मनुष्याच्या बौद्धिक, नैतिक व भावनात्मक ध्येयांचे सार आले आहे असे कोल्हटकर मानत. या तत्त्वांची कसोटी तत्कालिन समाजाला लावताना कोल्हटकरांना त्यात जे अंतर आढळले त्याचा आरसा समाजाला दाखवण्यासाठी त्यांनी विनोदाचा वापर केला. शाब्दिक कोट्यांचा आणि कल्पनाचमत्कृतीचा अतिरेक यामुळे क्वचित कोल्हटकरांचा विनोद काही ठिकाणी नीरस आणि कृत्रिम झाला आहे असे त्यांचे टीकाकार म्हणत. पुलं कालबाह्य झाले आहेत किंवा कसे, वगैरे वाद समूहमाध्यमांवर झडत असतात. तेव्हा पुलंच्याही बर्‍याच मागच्या पिढीतल्या कोल्हटकरांच्या विनोदाचा आस्वाद आजचा वाचक घेऊ शकेल का याबाबत शंका असू शकते पण त्यांच्या निर्विष विनोदाने मराठी माणसाला जीवनाकडे खेळकरपणे आणि विवेकाने पाहायला शिकवले हे निर्विवाद. 

- मोहिनी महेश मोडक

----------------------------------------------------------------------------------------------- -----------------------------

संदर्भ - 

http://lib.unipune.ac.in:8080/xmlui/bitstream/handle/123456789/7767/08_chapter%203.pdf?sequence=8&isAllowed=y

मराठी विनोदी कथा - संपादक डॉ. द. ता. भोसले 

सुदाम्याचे पोहे - श्री. कृ. कोल्हटकर

मराठी विश्वकोश

(Published in Maharashtra Times Diwali Ank 2020 )


 

Saturday, August 1, 2020

’गीतारहस्य’कार लो. टिळक

मंडालेच्या तुरुंगात असताना पत्नीच्या निधनाचे वृत्त कळले तेव्हा ८ जून १९१२ रोजी आपल्या भाच्याला लिहिलेल्या पत्रात लोकमान्य टिळक विकल होऊन म्हणतात, "माझ्या जीविताचा एक भाग समाप्त झाला". त्याच वेळी अशा दु:खद प्रसंगी आपण मुलांजवळ नाही हे जाणवून ते पुढे असेही लिहितात," मुलांना अवश्य सांगा की, या दु:खामुळे विद्द्येची हानी होऊ देऊ नका. दु:ख करीत बसून कोणीही कालाचा दुरुपयोग करु नये." देशभक्ताचे मन समस्थितीतच राहिले पाहिजे हे सांगणारे टिळक श्रीमद्भगवद्गीतेने सांगितलेला कर्मयोग शब्दश: जगले याचा हा जणू पुरावाच. त्यांची विलक्षण बुद्धीमत्ता, व्यासंग, तब्बल वीसहून अधिक वर्षे आत्म्यात मुरलेला चिंतनविषय आणि त्यांनी अंगीकृत केलेली समस्थिती याचा परिपाक म्हणजे त्यांनी मंडालेच्या कारावासात सिद्ध केलेला ’गीतारहस्य’ हा ग्रंथ. एकांतवासाला आणि प्रतिकूल हवामानाला त्रासून किंवा नैराश्याने ग्रासून जिथे सर्वसामान्य कैदी आयुष्य संपवण्याचा विचार करत अशा ठिकाणी या कर्मयोग्याने भारतालाच नव्हे तर शतकाला भूषण व्हावा असा हा अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिला. राजबंदी असले तरीही लेखनासाठी आवश्यक असलेले संदर्भग्रंथ सरकारी परवानगीचे सोपस्कार पार पाडून मागवणे, लेखनसामग्री उपलब्ध होईल तसतसे वाचन-मनन-चिंतन करुन व्यासंग व स्मरणशक्तीच्या बळावर, नुसत्या शिसपेन्सिलीने भव्यदिव्य स्वरुपाचे ग्रंथलेखन मधुमेहाच्या विकाराशी लढा देत करणे हे केवळ टिळकच करु जाणे.

कुमारवयापासून टिळकांनी भगवद्गीतेवरील अनेक भाष्ये वाचली होती. गीता पलायनवादाचा, संन्यासमार्गाचा पुरस्कार करीत नसून ’निष्काम भावनेने कर्म करा, आपले कर्तव्य पार पाडा, कर्ते व्हा’ हेच गीतेचे सार आहे, तेव्हा यावर भाष्य करावे अशी टिळकांची मनीषा होती. प्रत्येक संप्रदाय त्यांच्या विचारपद्धतीला अनुकूल असा गीतेचा अर्थ काढतो यावर टिळकांचा आक्षेप होता. टिळक भगवद्गीतेबद्दल असे म्हणतात की, ’गीतेमध्ये ज्ञानमूलक, भक्तिप्रधान निष्काम कर्मयोग सांगितलेला आहे’. फळाची आशा न ठेवता कर्म करायचे तरी कशाला या संसारी मनुष्याच्या प्रश्नाला टिळक उत्तर देतात की,”फलाशा ठेवायची नाही म्हणजे फळाचा त्याग करायचा असे अजिबात नाही परंतु फळ मिळावे अशी आसक्ती धरायची नाही. कारण या आसक्तीमध्येच सर्व दु:खाचे मूळ आहे.’
युद्ध करण्याबाबत द्विधा मनस्थितीत असलेल्या अर्जुनाच्या मनातील सर्व शंकांचे तर्कशुद्ध निरसन करुन भगवंत आपला गीतोपदेश संपवतात. ज्या भ्रान्त कल्पनेमुळे अर्जुन आपल्या क्षात्र धर्माविरुद्ध आचरण करण्यास तो निघाला होता, ती भ्रान्त कल्पना नष्ट होऊन स्वधर्माची व स्वकर्तव्याची त्याला जाणीव होते. तो संशयातीत होतो. ’तुझ्या सांगण्याप्रमाणे मी युद्धाला सिद्ध होतो’ अशी भगवंतांना कबुली देतो. गीतेच्या चिंतनाच्या पार्श्वभूमीवर ’द्विधा मनस्थिती ते नि:शंक समस्थिती हे दोन बिंदू सापडले की गणितशास्त्राच्या नियमाप्रमाणे मधली सरळ रेषा काढण्यास कठीण पडत नाही’ असे टिळकांनी नागपूर येथील मॉरीस महाविद्यालयात दिलेल्या व्याख्यानात म्हटले होते. 

गीतारहस्य हा व्यावहारिक नीतीशास्त्राचा अध्यात्मज्ञानावर आधारलेला ग्रंथ आहे असे प्रतिपादन टिळक लेखनपूर्तीनंतरच्या त्यांच्या पत्रात करतात. ‘भगवद्गीता’ हा भारतीय अध्यात्माचा पायाभूत ग्रंथ मानला जातो मात्र एकूणच आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास निवृत्तीनंतर करायचा असतो, इतकेच नव्हे तर गीता ही निवृत्तिमार्ग सांगणारी आहे, अशी समाजधारणा आहे. सांसारिक कर्मे गौण मानून त्याकडे पाठ फिरवणाराच खरा ज्ञानी अशा चुकीच्या दृष्टिकोनामुळे समाजाचे, भारतीय संस्कृतीचे नुकसान होते आहे हे लक्षात घेऊन अशा विचारांचे खंडन करण्यासाठी ’संसारशास्त्र’ आणि निष्काम कर्मयोग शिकविणारा, ’वागावे कसे’ याचे मार्गदर्शन करणारा ’गीतारहस्य’ किंवा ‘कर्मयोगशास्त्र’ हा ग्रंथ टिळकांनी लिहिला. संसारात राहूनच कौशल्यपूर्वक कर्मे कशी करावी याची शिकवण, हेच गीतेचे रहस्य व महात्म्य असल्याचे लो. टिळकांनी जगभरातील तत्त्वचिंतनाशी तुलना करुन सोदाहरण सिद्ध केले आहे. एका अर्थी त्यांनी पश्चिमी तत्त्वज्ञानाला या लेखनाद्वारे आव्हान दिले आहे. या ग्रंथाच्या प्रस्तावनेत टिळक लिहितात, "प्रत्येकाने सर्व मानवज्ञातीच्या हितार्थ झटणे हीच काय ती नीतीची पराकाष्ठा किंवा कसोटी असे जे मिल्ल,स्पेन्सर, काँट इ.अधिभौतिकवाद्यांचे म्हणणॆ, त्याचाही गीतेतील स्थितप्रज्ञाच्या बाह्यलक्षणात संग्रह झालेला असून गीतेत यापेक्षा काही जास्त नसते तरी ती सर्वमान्य झाली असती परंतु एवढ्यावरच न थांबता ज्ञान, संन्यास, कर्मव भक्ति यांच्या योग्य  मिलाफाने इहलोकी आयुष्यक्रमणाचा कोणता मार्ग मनुष्याने पत्करावा याचाही गीतेत निर्णय केला आहे." अनेक शास्त्रग्रंथांना कवेत घेणार्‍या या ग्रंथाचे परमोच्च वैशिष्ट्य म्हणजे त्याची पांडित्यपूर्ण, तर्कसंगत, सूक्ष्म आणि सखोल मांडणी. ’गीतारहस्य’ची अनुक्रमणिकाच ग्रंथाचा आवाका स्पष्ट करते. विषयप्रवेश, कर्मजिज्ञासा, कर्मयोगशास्त्र, अधिभौतिक सुखवाद, सुखदु:खविवेक, अधिदैवतपक्ष व क्षेत्रक्षेत्रज्ञविचार, कापिलसांख्यशास्त्र, विश्वाची उभारणी व संहारणी, अध्यात्म, कर्मविपाक व आत्मस्वातंत्र्य, संन्यास व कर्मयोग, सिद्धावस्था व व्यवहार, भक्तिमार्ग, गीताध्यायसंगति, उपसंहार अशी पंधरा प्रकरणे यात आहेत. त्यानंतरच्या परिशिष्टातून गीतेचे महाभारत, उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, भागवत धर्म, बौद्ध ग्रंथ व ख्रिस्ती बायबल इ. संदर्भातील विवेचन अशी या ग्रंथाची विशाल व्याप्ती आहे. 

गीतारहस्य या ग्रंथाला अद्वितीय मानले जाण्यामागे टिळकांची विद्वत्ता हे सर्वाधिक महत्वाचे कारण तर आहेच पण त्याचबरोबर त्यातील कर्मयोग टिळकांनी आचरणात आणला म्हणून त्याचे विवेचन अधिक अस्सल उतरले आहे असे म्हणता येईल. या संदर्भात एक उदाहरण लेखाच्या सुरुवातीसच दिले आहे. पुढील दोन उदाहरणे हेच अधोरेखित करतात. मंडाले येथे टिळकांना कुलकर्णी नावाचे बंदी स्वैपाकी म्हणून दिले गेले होते. त्यांना एकदा बराच ताप असताना ते त्याही अवस्थेत स्वैपाक करत होते. टिळकांनी त्यावेळी त्यांना आराम करण्यास सांगून स्वैपाकाची जबाबदारी घेतली तेव्हा ’तुमच्या लेखनात व्यत्यय येईल’, असे कुलकर्णी म्हणाले. त्यावर टिळक म्हणाले होते, " तुम्हाला आजारी स्थितीत सोडून मी लेखन केले तर भगवंतांनी अर्जुनाला गीता सांगण्याचा खटाटोप व्यर्थच केला असे म्हणावे लागेल." कुलकर्णी यांनी अशा काही आठवणी नोंदवून ठेवल्या आहेत. पुढे मंडालेहून अखेर सुटका झाली. पुण्यास येऊन अनेक दिवस उलटले तरीही हस्तलिखिताच्या वह्या इंग्रज सरकारकडून परत मिळण्याचे चिन्ह दिसेना. त्यावर टिळक म्हणाले होते, "वह्या सरकारच्या कब्ज्यात असल्या तरी ग्रंथ माझ्या डोक्यात आहे, मी तो जसाच्या तसा लिहून काढीन." प्रवृत्तिपर प्रयत्नवाद आणखी काय वेगळा असतो! समर्थांच्या शब्दात सांगायचे तर 
आधी ते करावे कर्म । कर्ममार्गे उपासना ॥ उपासका सापडे ज्ञान । ज्ञाने मोक्षची पावणे ॥

स्वातंत्र्यपूर्व काळात निद्रिस्त झालेल्या समाजाला दिशा देण्याचे काम या ग्रंथाने केले. आज कोविड प्रादुर्भावामुळे जगभरात आर्थिक, मानसिक, राजकीय, वैचारिक स्तरावर प्रचंड उलथापालथ झाली आहे. सैरभैर झालेल्या समाजाला स्थिरचित्त होण्यासाठी, निष्काम कर्मयोग आणि कर्तव्याभिमुख होण्याचे भान समाजात रुजवून नवचेतना देण्यासाठी ‘गीतारहस्य’ सारख्या ग्रंथाचीच आवश्यकता आहे.
कोणीतरी त्राता येईल आणि आपल्याला या संकटातून बाहेर काढेल अशा पिचलेल्या मनोवस्थेला समाज पोचतो आहे अशा वेळी त्याला ’गीतारहस्य’च तारु शकेल. या विद्वत्तापूर्ण ग्रंथाची अनेक भाषांतरे झाल्याने हा ज्ञानप्रवाह मराठी बरोबरच अन्य भाषकांनाही खुला झालेला आहे. मूळ ग्रंथ मराठीत का लिहिला याचे उत्तर देताना टिळक म्हणाले होते की, "मला गीतेचा कर्मयोग आधी माझ्या लोकांना शिकवायचा आहे. त्यांना कर्मयोगाचा विसर पडला आहे. त्याखेरीज उत्कर्ष होणे नाही, हेच मला त्यांना सांगायचे आहे."
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

#गीतारहस्य #लोकमान्यटिळक #मंडाले #कर्मयोग
#Geetarahasya #LokmanyaTilak #Karmayog
( संदर्भ -श्रीमद्भगवद्गीतारहस्य - बाळ गंगाधर टिळक, लो. टिळक दर्शन- भा.द.खेर ) 
Published in e-Vidarbha Hunkar dated 1/8/2020