मूळ सिनेमातल्या निमिशा सजायन आणि सूरज वेंजारमुडू या मुख्य पात्रांइतकाच जिवंत अभिनय ’मिसेस’ मध्ये सान्या मल्होत्रा आणि निशांत दहियाने केला आहे. कंवलजीत सिंगने त्यांना उत्तम साथ दिली आहे. रिमेक म्हटल्यावर तुलना आलीच. दाक्षिणात्य सिनेमा्ला उत्तर भारतीय रूपडं देताना काही सांस्कृतिक संदर्भ बदलणं आलं. यात ’मिसेस’ पूर्ण यशस्वी झाला आहे पण ’द ग्रेट इंडियन किचन’ मध्ये मुलभूत प्रश्न ज्या धारदार पद्धतीने दाखवण्यात आला आहे त्याची धार ’मिसेस’ मध्ये काहीशी बोथट झाली आहे. मूळ सिनेमातला प्रश्न वैश्विक असला तरी ग्रामीण पार्श्वभूमीमुळे व प्रत्ययकारी चित्रणामुळे त्या प्रश्नाची तीव्रता अधिक जाणवते. तुलनेने शहरी स्त्रीला त्या प्रश्नावर उत्तर शोधणं किंबहुना हा प्रश्न उद्भवण्यापूर्वी त्यावर विचार करणं शक्य असूनही हिंदीतली आधुनिक नायिका मल्याळी ग्रामीण सिनेमातल्या नायिकेसारखीच वागते हे पचवणं जरा कठीण गेलं. ’हे जग आता बदललं आहे’ असं भासणार्या प्रत्येकाला ’मिसेस’ भानावर आणतो.
मुळात, काय आहे यात मांडलेला प्रश्न ! साधी सरळ आनंदी स्वभावाची नायिका लग्नानंतर एका सुखवस्तू कुटुंबात, उराशी स्वप्नं कवटाळून प्रवेश करते. सासूला बाहेरगावी जावे लागल्याने घराची जबाबदारी नायिकेवर येते. नवरा आणि सासर्यांना सगळं काही हातात मिळण्याची सवय आहे. मासिक धर्माच्या काळात मात्र यातून सुटका आहे. ती ही बाईला विश्रांती मिळावी या हेतूने नव्हे तर घर विटाळू नये या भावनेतून. ताटाभोवतीचं खरकटंही तसंच टाकून घरातले पुरुष दररोज निवांत जेवून उठून जातात. ’आपल्याच घरातलं काम आहे- त्यात काय इतकं’ म्हणून गृहित धरलं जातं. नवर्याचा संबंध शेजे आणि पेजेच्या गरजेपुरताच. नोकरीच्या इच्छेला घरच्या पुरुषांनी गोड शब्दात दिलेला नकार,माहेरच्यांची तिने सासरी जुळवून घ्यावं अशी सूचना. एका क्षणी तिच्या भावनांचा उद्रेक होतो. त्याची परिणती कशात होते, ती काय निर्णय घेते, त्याने कसा आणि किती फरक पडतो हे सिनेमात पुढे पाहता येईल. तिला ती गवसते हा सिनेमाचा उत्कर्षबिंदू महत्वाचा.
आता या कथानकातून ध्वनीत होणार्या आशयाकडे वेगवेगळे लोक वेगवेगळ्या दृष्टीकोनातून पाहतात. "घरातल्या बाईने गरमागरम फुलके (किंवा दोसे) करून वाढावेत या भारतीय पुरूषांच्या अपेक्षेमुळे भारतीय स्त्रीची ’उर्जा’ त्यातच खर्च होते त्यामुळे तिची उत्पादकता व इतर क्षेत्रात काही करू पाहण्याची क्षमता कमी होत जाते”, अशा अर्थाचं विधान एका राजकीय नेत्याने मध्यंतरी केलं. ते वाचून त्यांच्या स्त्रियांच्या आकांक्षांचा विचार करण्याचं कौतुक वाटू लागणार तोच पुढे वाचलं, "त्यापेक्षा पुरूषांनी पोळ्या (रोटी) खाव्यात." पोळ्या एकदम करून ठेवता येतात आणि सतत स्वयंपाकघरात जावं लागत नाही. पण म्हणजे फुलके,पोळ्या, दोसे जे काय करायचं ते शेवटी करायचं बाईनेच आहे. किरण बेदींना एका मुलाखतीत विचारण्यात आलं , "रिकामा वेळ मिळाला तर कोणती डिश करायला तुम्हाला आवडतं?" त्या म्हणाल्या "पुरूष अधिकार्याला ’रिकामा वेळ मिळाला तर त्यात काय करता’ असं तुम्ही विचारलं असतं. डिश बनवणं हे इथे माझ्याबाबतीत गृहित का धरलं आहे ?"
महानगरी गगनचुंबी इमारतींपासून पाड्यावरच्या झोपड्यांपर्यंत पसरलेल्या आपल्या महाकाय देशातल्या बहुसंख्य घरात गृहित धरलेल्या स्त्रिया सापडतील. काही लोकांचं म्हणणं. या सिनेमातला नायक पण काम करतोच आहे नं. मल्याळी सिनेमात तो शिक्षक तर हिंदी आवृत्तीत तो प्रथितयश डॉक्टर आहे. पुरूषाने बाहेर आणि स्त्रीने घरात राबावं या श्रमविभागणीत गैर काय आहे? घरची आर्थिक आघाडी सांभाळणार्या पुरुषांना असाच कंटाळा, थकवा येत नसेल का! नक्कीच, परंतु ते काम कधीतरी संपवून स्वत:च्या अवकाशात, आवडीनुसार वेळ घालवण्याची संधी त्यांना परंपरेने उपलब्ध करुन दिली आहे.
हे अमान्य असलेले काही स्वघोषित संस्कृतीरक्षक सिनेमा प्रदर्शित होताच पुढे सरसावले. त्यांच्या म्हणण्यानुसार या सिनेमातले पुरूष काही दारूडे वगैरे नाहीत. बायकोला मारझोड करणारे नाहीत. सभ्य आहेत. घरात सुबत्ता आहे. बाईकडून फक्त घर नीट सांभाळण्याची अपेक्षा आहे. बाई तर गृहलक्ष्मी असते. हे असलं भलतं काहीतरी बायकांच्या डोक्यात भरवण्याची परदेशी खूळं आणि स्त्रीमुक्तीच्या फालतू कल्पनांना विरोध केलाच पाहिजे. असले सिनेमे म्हणजे आपल्या महन्मंगल संस्कृतीविरोधातली षडयंत्र आहेत.”-असा त्यांचा दावा.
वरपांगी ’फक्त घर नीट सांभाळण्याची अपेक्षा’ योग्यच आहे पण इमोशनल अॅब्युज किंवा भावनिक छळ हा या मंडळींच्या गावीही नाही. आवडो की नावडो स्वयंपाक, घरकामात आपलं ध्येय, महत्वाकांक्षा, करियर-व्यवसायाचा विचार दाबून ठेवून आणि हे करायची ’परवानगी’ मिळालीच तर घर नीट सांभाळण्याची कसरत करताना बायका झिजून पिचून जाताना दिसतात. कित्येक उत्तम खेळाडू महिला लग्नानन्तर ’गरम फुलक्यां’च्या गडबडीत सरावाला वेळ न मिळू शकल्याने करियर सोडून देतात. काही जणी मुलांसाठी नोकरी सोडतात. वर्गातल्या मुलांना वर वर जाताना मुक्याने पाहतात. हुशार असूनही संशोधनासारख्या वेळखाऊ प्रांतात किंवा डिमांडिंग स्वरूपाच्या उच्चपदाच्या नोकर्या न करता जमेल तेवढंच करियर करतात. त्यातूनही परिचयातील गृहिणींच्या तुलनेत आपण घरी कमी वेळ देतो हा अपराधीभाव उरात घेऊन जगतात.
अशा स्त्रियांची मनोव्यथा व्यक्त करण्यासाठी ,पुरुषांनी घरकाम /स्वयंपाक करण्यात विनोद आहे असं वाटणार्यांसाठ हा सिनेमा निर्मिलेला आहे. ’वेडिंग’ नामक भपकेबाज समारंभात आपले कपडे, दागिने, मेकअप कसा असावा याचा मुली जितका विचार करतात त्याच्या निम्मा जरी विचार त्यांनी ’मॅरेज’ म्हणजे ’सहजीवना’विषयी केला, त्याविषयी भावी जोडीदाराशी चर्चा केली तरच लग्नसंस्था सशक्त होण्याची आणि समाजाला स्त्रियांनाही ’समान संधी’ मिळायला हव्यात याचे भान येण्याची शक्यता आहे. ’मिसेस’ सिनेमा अशा सगळ्या तरूणींसाठी आणि त्यांचीही काही स्वप्न असतात हे समजू न शकणार्या तरूणांसाठी आहे.
हा सिनेमा एवढंच सांगू पाहतो - आयते पानात पडणारे गरम गरम फुलके पुरूषांइतकेच बायकांनाही आवडतात. 😉















