Saturday, April 2, 2011

रंग


रं

सतरंग शोभे इंद्रधनुवर
तनामनावर रंगधुंदी
रंग नेत्र संवेदना मात्र 
की प्रकाशाची नजरबंदी ! ॥ 


रौद्र शौर्य रक्त रंग लाल
आरक्तसे गाल प्रेमरंगी
पीत केशरी वैराग्य विरक्ती 
जीव़न निस्संगी त्यक्त त्यागी ॥

हरित सृजनाची हाक गतीची 
निसर्ग साद पानोपानी
नभानीलिमा निळाच सागर
मनातला मोर नीलवर्णी ॥

शांत पारवा शीतल श्वेत
सदा शुचिर्भूत धवलता
फुले अबोली, कळी गुलबक्षी
कुसुंबी जांभळी कोमलता ॥

वसंत पालवी वेल पोपटी 
शेंदरी झळाळी ग्रीष्मरती
चिंब वर्षा रंगवी मेहंदी
शुभ्र कौमुदी शारदराती ॥

शिशीरगात्री पानगळ पीत 
हेमंत नव्हाळी रोमरोमी
उत्सवऋतु होलिका बहुरंगी
अवघा रंग एकच, कोण मी! ॥

शैशवरंग नितळसे पाणी
मन आरस्पानी खुललेले
तारूण्य लखलखे सोनेरी 
वार्धक्य चंदेरी पिकलेले ॥

करडा अंधार अशुभ चाहुल
काळी बाहुली कवाडावर
काळ्यातच रंग सामावता 
तीळ काळा खुले गालावर ॥

उगवता सूर्य बदलती संग
सरडयाचे रंग माणसाचे
नसे बहिरंग नसे सोयरे
तरी गोड गरे फणसाचे ॥

आत्मरंग लोप जिथे वर्णभेद
माणूस लेक काळ्या आईचा
कर्पूरगौर राधा कृष्ण निळा
विठ्ठलही सावळा जनाईचा ॥

सप्तरंग सप्तसूर एकरूप
विश्व रंगरूप विविधांगी
ईश्वरी कुंचला, रंग सृष्टी 
मी रंगांधळा अंतरंगी ॥

पूर्वप्रकाशित - म. टा. विदर्भ विशेष दिवाळी अंक 

6 comments:

  1. एकदम कविता का बुवा ?
    ही तुझ्या शैलीतील वाटत नाही.

    ReplyDelete
  2. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  3. भाग्यश्री, शैली बिईली कसली आलीय गं, कवितेच्या प्रांतात उगाच जरा खुडबूड करतेय.

    ReplyDelete
  4. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete