Showing posts with label चिमटे. Show all posts
Showing posts with label चिमटे. Show all posts

Monday, July 6, 2026

मराठी साहित्यातील विडंबनकाव्य : झेंडूची फुले ते तेंदूची पाने

अनुकरण किंवा नक्कल करणे ही माणसाची जन्मजात प्रवृत्ती आहे. मुलाला थोडेफार कळू लागताच त्याच्या ठायी या प्रवृत्तीची लक्षणे दिसायला लागतात. मूल बऱ्याच गोटी अनुकरणानेच शिकत असते. कधी मोठ्या मंडळींनी शिकविल्यामुळे तर कधी स्वयंस्फूर्तीनेही त्याची अनुकरणप्रवृत्ती वाढीस लागत असते. पक्षी आवाज कसे करतात, हम्मा कशी हंबरते, आजोबा कसे चालतात, बाबा कसे ओरडतात इ. मुले 3 ऱ्या 4 थ्या वर्षापासून हुबेहूब करून दाखवतात. विडंबनाचे मूळ या जन्मजात मानवी प्रवृत्तीत शोधता येण्यासारखे आहे. वेडावण्यामुळे एकीकडे जशी गंमत वाटते, तसेच आणखीही महत्त्वाचे कार्य साधते. वेडावणे ही सक्रिय टीका असते. ती दोषदिग्दर्शनही बिनतोडपणे करते. बेडावण्यामुळे मूळ व्यक्तीला आपल्यातील अतिरेकाची जाणीव होते. 

वाङ्मयीन क्षेत्रालाही हाच न्याय लागू होतो.  विडंबन हे वांग्मयीन वेडावणेच म्हणाना. तिथेही अती झाले की हसू येते नि नक्कल करण्याची उबळ येते .अनुकरण विनोदाच्या पातळीवर व बुद्धिनिष्ठ असत. चोखंदळ वाचकालाच ते आस्वाद्य होत. ज्याच विडंबन केल तो साहित्यिक खेळाडू वृत्तीचा असेल तर त्यालाही गंमत वाटते व तो आपले दोष सुधारतो अस रंजन करता करता डोळ्यात अंजन घालण्याची किमया विडंबन कलेत असते

विडंबन करणे सोपे नाही. त्याचा कान तयार असायला हवा नि साहित्यदृष्टी चांगलीच चोखंदळ हवी. आविष्कारपद्धतीचा थेट अनुकार करणे भाषाप्रभुत्वावाचून साधत नाही व आशयाचा नेमका वेध घेऊन त्याचा मर्मभेद करणे हे मूळ कर्त्याच्या समग्र व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास असल्यावाचून जमत नाही. काही नेहमीचे दाखले घेऊन हे अधिक स्पष्ट करता येईल. नाटकातली वेड्याची भूमिका कोणी वेडा वठवू शकणार नाही, तिथे वेडेपणाचा प्रतिभास (Illusion) निर्माण करणारा शहाणाच हवा. विडंबनकार मूळ कृतीचा प्रतिभासच उभा करीत असतो. वरवर पाहिल तर सर्कशीतला विदूषक वेड्यावाकड्या उड्या मारून हसवतो आहे अस वाटत; पण ती आपली विदूषकी वठविण्यासाठी तो चांगलाच कसरतपटू असावा लांगतो. इंग्रजीत Set a thief to catch a thief, असा वाक्प्रचार आहे. कारण चोरीच्या वाटा चोराला माहीत असतात. तद्वतच मूळ कर्त्याच्या वाटा विडंबनकाराला नेमक्या माहीत असाव्या लागतात.

ज्याला विडंबन काव्य म्हणतात अशी 20 तरी उदाहरणे एकनाथांच्या काव्यात मिळतील तरीसुद्धा हास्ययुक्त दोष दर्शन हा विडंबनाचा ठळक हेतू तेथे नाही. भारुड इ. लेखनाचे पर्यावसान विनोदात होत नसून वेदांत मांडण्यात म्हणजे गांभीर्यात होते त्यामुळे विडंबनाचा मागवा घेताना साधारणतः १९०० च्या पुढच्या काळाचा विचार करता येईल .त्यात कुलकर्णी लीलामृत हे एक ठळक विडंबन काव्य 1913 मध्ये आले पांडवप्रतापच्या धरतीवर शेटजी प्रताप म्हणून विडंबनात्मक ओवी ग्रंथ आलेला आहे .पण तो फारसा प्रसिद्ध झाला नाही मोरोपंती आर्यावर्तीचा थाट सही सही , गंगना मोगरे यांनी उपवास काव्यात आणलेला आहे. खाडीलकरांच्या विद्या हरण व मानापमान या नाटकातील पदे लोकप्रिय झाल्यानंतर त्यातील शब्दरचनेचा अप्रयोजकपणा व तानाबाजीचा अतिरेक माधवराव जोशी यांना खुपला. त्यांच्या थट्टेखोरपणाला जाग आली आणि त्यांनी विनोद या नाटकात खाडिलकारी पदांची विडंबनेच पदे म्हणून घातली. उदाहरणार्थ- ’माता दिसली समरी विहरत’ या सुप्रसिद्ध पदाचे”माता बसली स्वगृही रखडत,  घाशीत ताट तव्यासी पळशी’ हे त्यांचे विडंबन उत्कृष्ट उतरले आहे पण यात सर्वात खळबळ उडवून देणारी झेंडूची फुले उमलली आणि मग महाराष्ट्रात विडंबन गीतांचे पीकच आले अर्थात त्यातही दाण्यापेक्षा तणच उदंड होते.  

त्याच अस झाल : १९२० सालाच्या सुमारास काव्याकाशातले गोविंदाग्रज- बालकवींसारखे तेजस्वी तारे निखळून पडले. काही काळ अंधारल्यागत झाले, त्त्यातून काही रवि-किरण एकमेका साह्य करीत काव्याचा सुपंथ धरून पुढे सरसावले, मग काव्यक्षेत्रात सामुदायिक शेतीसारखा प्रयोग सुरू झाला. मराठीत खंडकाव्ये नाहीत ? लिहा खंडकाव्ये. गझला नाहीत ? लिहा गझला. सुनीते नाहीत ? खरडा सुनीते. बिलापिका नाहीत ? काढा गळे ! पुन्हा यांच्यातलेच टीकाकार या प्रयोगाची प्रशंसा करून पत-पुरवठा करीत होते. असा मोठा विचित्र फड सजला ! पण हे खुद्द आ० अत्र्यांनींच नेटके लिहून ठेवले आहे, ते त्यांच्याच शब्दांत देणे बरेः

"... काव्यांत क्रांति घडवून आणण्यासाठी महाराष्ट्रांत परस्पर-प्रशंसा-संघ स्थापन झाले. तेव्हां त्यांचे ते नियम, तीं ध्येयें, त्या मंडळाच्या साप्ताहिक बैठका, तो नावि- न्याचा व वैशिष्ट्टयाचा पुरस्कार…एकीकडे संस्कृतप्रचुर जडजंबाल शब्दालंकार घेऊन सोवळी मंडळी सिद्धः तर दुसरीकडे फारसी जडजवाहीर घेऊन ओवळी मंडळी सज्ज |

काव्यदेवतेची ही विचित्र कुचंबणा पाहून अत्र्यांची जन्मजात विनोदबुद्धी जागृत झाली आणि आपल्या काव्यदैवतांच्या अवमूल्यनाच्या चिडीतून त्यांची टीकाबुद्धी उफाळून आली. या दोहोंचा जोड जमून जी अजोड साहित्यकृती पैदा झाली, तीच 'झेंडूची फुले'!

एक उदाहरणपाहूया , काळ लक्षात घ्या १३ एप्रिल १९५२ ची ही कविता आहे. श्री. राजगोपालाचारियर मद्रासचे मुख्यप्रधान म्हणजे आताचे मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रतिक्रियेदाखल लिहिलेली ही कविता

म्हातारा इतुका न- अवघे पाऊणशे वयमान

म्हातारा इतुका न, परि हा बनला फिरुनि जवान,  दिल्ली सोडुनि गल्लीचा हा झाला पंतप्रधान !

चष्मा काळा शोभे डोळां डोइस टक्कल छान , हातीं सोटा पंडित मोठा बृहस्पतीवर ताण !

संन्यासाचें सत्रा वेळां आणी हा अवसान , वैराग्याची वस्त्रे हातीं, संसारावर ध्यान !

सीतेसाठीं जसा धांवला लंकेला हनुमान,  मद्रासेला तसा करी हा दिल्लीहुन उड्डाण !

गांधीजींचा व्याही होता जीनांचा मेहमान , सुपीक मेंदूतून निघालें ह्याच्या पाकिस्तान !

सत्य-अहिंसा-मंत्राने हा करितो कारस्थान ,ह्या चाणक्यापासुन राखीं भारतास भगवान्

विडंबनाचे शब्द कानी पडताच मूळ कृतीची स्मृती ताबडतोब मनात जागी होणे ही त्याच्या यशस्वितेची प्राथमिक कसोटी. अर्थात त्यासाठी मूळ कृतीही सर्वप्रसिद्ध असावी लागते. मूळ कविता आणि तिची अनुकृती यांतल्या ओळी समांतर रीतीने समोरासमोर उभ्या राहतात व तुलनेतून त्यांच्या आशयातली विसंगती जाणवून हसू येते. विडंबनाचे रोपटे असे परोपजीवी आहे. दुसऱ्या कोणत्या तरी कवितेवर कलम केल्यावाचून ते जीव धरीत नाही.

शां. शं. रेग्यांचा 'एक विडी आहे माझ्या खोल खिशात दडून' हा चरण ऐकला की 'एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून' हा मंगेश पाडगावकरांचा चरण जरूर आठवतो. केशवकुमारांची 'परिटा, येशिल कधी परतून ?' ही ओळ ऐकली की, रे. टिळकांची 'पांखरा, येशिल का परतून !' ही ओळ आठवते.  'पाखरा' कवितेचं विडंबन - 

परिटास-

परिटा येशिल कधी परतून ? 

कोट रेशमी लग्नामधला मानेवर उसवून ! उरल्या सुरल्या गुंड्यांचीही वासलात लावून !

बारिकसारिक हातरुमाला हातोहात उडवून ! सदऱ्यांची या इस्तरिनें तव चाळण पार करून !

खमिसांचीं हीं धिरडीं खरपुस भट्टिमधे परतून ! तिच्या भरजरी पैठणिची या मच्छरदाणि करून !

गांत्रांतिल कपड्यांची सगळ्या गल्लत छान करून ! रुमाल जरिचे आणि उपरणीं महिनाभर नेसून ! 

सणासुदीला मात्र वाढणें घेइ तुझें चोपून ! परिटा येशिल कधी परतून 

कवी थोडे, कवडे फार' हा प्रकार कोठल्याही काळी खराच असतो. त्यामुळे बांडगूळवजा निरर्थक संकेतांची भरमसाट वाढ होऊन मूळचा काव्यवृक्ष वthण्यासारखी परिस्थिती निर्माण होते. अशा रीतीने संकेता- तिरेक झाला की विडंबनकाराला खाद्य मिळते. साहित्यक्षेत्रातील प्रथितयश लेखक फाजील आत्मविश्वासामुळे किंवा दुर्लक्ष, घाई वा निष्काळजीपणा यांमुळे दोषास्पद बनतात, तर नवशिके अतिउत्साहीपणे नव्याचे भाट बनतात. या प्रतिगामी आणि पुरोगामी प्रवृत्तींना योग्यगामी वास्तवाची जाण विडंबनकार आणतो. 

केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले यांने लिहिलेली  ‘आम्ही कोण?’ ही कविता विख्यात आहे. यात त्यांनी स्वत:विषयी किंवा एकूणच कवीविषयीचा दृष्टिकोन केवढ्याआत्मविश्वासाने प्रकट केलाय पाहा. 

आम्ही कोण म्हणूनि काय पुससी? आम्ही असू लाडके ।

देवाचे, दिधले असे जग तये आम्हांस खेळावया ॥

विश्वी या प्रतिभाबले विचरतो चोहीकडे लीलया ।

दिक्कालातूनि आरपार अमुची दृष्टी पहाया शके

आम्ही कोण म्हणूनि काय पुससी? आम्ही असू लाडके ।

आता याचं तितक्याच ताकदीने अत्र्यांनी केलेंलं विडंबन पाहू. 'क-हेचे पाणी' या आत्मचरित्रात अत्रे म्हणतात, “आयुष्यात मी काय वाटेल ते केले असेल, पण ढोंग कधी केले नाही. समाजाच्या सर्व अंतरंगांमधून मी वावरलो आहे. मजुरापासून तो महाराजापर्यंत आणि कंगालापासून तो कुबेरापर्यंत मी अनिरुद्ध संचार केलेला आहे. आज जीवनाच्या सर्व क्षेत्रात दंभाचा आणि ढोंगाचा जो बुजबुजाट झालेला आहे त्याचे कारण सत्य काय आहे हे जाणण्याचे आणि सांगण्याचे फार थोड्या लोकांत धैर्य आहे. ते धैर्य दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे.” त्यातूनच झेंडूच्या फुलांची निर्मिती झाली आहे. 

आम्ही कोण  - या कवितेत केशवसुत प्रतिभावंत कवीबद्दल बोलतायत तर अत्रे  यमक्या कवीबद्दल बोलतायत. आजच्या फेसबुकवरच्या काही कुडमुड्या कवींनाही हे लागू होईल. 

आम्ही कोण? म्हणून काय पुसतां दांताड वेंगाडुनी? ।

फोटो, मासिक पुस्तकांत न तुम्ही का आमुचा पाहिला? ॥

किंवा गुच्छ तरंग अंजली कसा अद्यापि ना वाचिला? ।

चाले ज्यावरती अखंड स्तुतिचा वर्षाव पत्रांतुनी? ॥ १ ॥

ते आम्ही – परवाङ्मयातिल करूं चोरून भाषांतरे, ।

ते आम्ही – न कुणास देऊ अगदी याचा सुगावा परी! ॥

डोळ्यांदेखत घालुनी दरवडा आम्ही कुबेराघरी! ।

त्याचे वाग्धन वापरून लपवूं ही आमुची लक्तरे! ॥ २ ॥

---------------

केशवकुमारांनी म्हणजेच अत्र्यांनी 'रसिकांना चेतवणी' देताना, माझ्या फुलांचे काहीही करा; रागाने चुरगळलीत तरी हरकत नाही, पण 'तळींचे खोबरे' खायला मात्र विसरू नको, असे म्हटले आहे. 'हे तळीचे खोबरे' म्हणजे जन्मजात विनोदबुद्धीचा विलास. विनोदबुद्धीच्या विलासामुळेच 'झेंडूची फुलें' एकमेवा- द्वितीय ठरलेली आहेत. विडंबनाची निमित्ते कालांतराने विसरली जातात, ती आस्वाद्य राहात नाहीत; पण हे 'तळीचे खोबरे' म्हणजेच विनोदबुद्धी त्याला स्वतंत्र मूल्य प्राप्त करून देते. असं झेंडूची फुलेंच्या ४ ऑगस्ट १९७२ मध्ये लिहिलेल्या प्र्स्तावनेत स. गं. मालशे म्हणतात. अत्र्यांचे मन:पूत कौतुक केल्यावर ते हे ही म्हणतात की -

"नवलेखकांना दहशत वाटावी असा दरारा केशवकुमार म्हणजे अत्र्यानंतर कोणी निर्माण केला असेल तर पुलंनी-  आणखी एक रस, अंगु स्थान विद्यापीठ यासारख्या त्यांच्या लेखनात गद्यशैलीची अचूक अनुकरणे असून समीक्षेचा पडीकपणा आणि एकूण साहित्य क्षेत्रातील सांकेतिकतेत याचा मार्मिक उपहार केलेले आहे. पुलं हे कवी नव्हते याचं एकमेव कारण म्हणजे त्यांनी कविता लिहिली नाही पण विडंबन पाहता त्यांच्यातल्या काव्यप्रतिभेची चुणूक सहजपणे दिसते. "

एक भन्नाट उदाहरण म्हणजे कवी मंगेश पाडगांवकरांच्या एका कवितेचं पुलंनी केलेलं विडंबन. पाडगावकर बरीच वर्षं 'लिज्जत पापड' कंपनीच्या जाहिरातींसाठी कविता लिहीत असत. कवितांचा पापडांशी किंवा त्या कंपनीशी काही संबंध नसे, मात्र कवितेच्या निमित्तानी लोक जाहिरातही वाचतील, या अपेक्षेनी कंपनीनी हे धोरण राबवलं होतं.. तर, १९७८ सालच्या 'ललित' नियतकालिकाच्या जून महिन्याच्या अंकात "आनंदाचा घनू" ही त्यांची कविता छापून आली :

आनंदाचा घनू...

बरसला अंगावरी  आज आनंदाचा घनू...

आज मन गगनात आणि गगन मनात    माझे प्राण इंद्रधनू...

रंग श्रवणासि आले         सूर सुवासिक झाले    झाली बासरीच तनू...

नभ झाले मनभोर      मनभर निळे मोर        आणि आतुरल्या धेनू...

कोसळला प्राणभर     सावळा हा अनावर     जैसा देवकीनंदनू...

याचं पु.ल.देशपांडेंनी विडंबन केलं, ते 'ललित'च्याच जुलैच्या अंकात, ललितने मूळ कविता पान २८वर, अन् विडंबन पान २९वर छापलं..

"पाऊसू पापडू आणि एकू गीतू"

{कविवर्य श्री मंगेश पाडगावकर यांना त्याच्या 'लिज्जत' पुरस्कृत "आनंदाचा घनू" या वर्षा(सन) गीताला 'सलाम' करून}

भूमिका : चुलीवर भाजत टाकलेला पापड आणि वहीवर जुळवत टाकलेली कविता ह्या, महिला गृहउद्योग व काव्योपासना अशा द्वंद्वात सापडलेल्या स्त्रीच्या पापडाची आणि कवितेची अवस्था काय झाली, ते टिपण्याचा एक नम्र प्रयत्न.

येता आषाढू आषाढू लागे पावसाची झडू

आले माझिया मनात आपणही गीत पाडू !

साला बादचा शिरस्ता पाळतात कविजनू

येता पाऊस पिंजती छान कवितेचा धनू !

शब्द कापूस कापूस कसे काढती पिंजूनू...

- घनू, इंद्रधनू, प्राणू, मोरू, देवकीनंदनू,

मनू, गगनू, श्रवणू आणि बासरीची तनू

शब्द टप्पोरे टप्पोरे बोंडे कापसाची जणू !

पडो अथवा न पडो दारी पाण्याचा टिप्पूसू,

स्वस्थ बसवेल कसे येता आषाढाचा मासू?

घनू गरजो, बरसो, भरो विहिरी गटारू

दिसो घनघोर घटा, गळो छप्परू टप्परू !

हाती धरिताचि पेनू गळे शाईतुनी गीतू...

- गीतातल्या पावसाशी माझी जडलीसे प्रीतू !

झरे कवितेची ओळू, होते गीताचीच शाई !

- सॉरी, शाईचेच गीत - किंवा कशाचे काहीही !

हंबरत्या धेनूबिनू, पंख पिसारून मोरू

मेघूबिघू यथासांग, रांग धरूनिया तरू...

- आणि अचानक कैसा धूर कोंदला खोलीतू !

राही अधुरे अयाई माझे पावसाचे गीतू...

आली जाग एकाएकी नाकी शिरताचि घाणू -

करपली चुलीवरी तिथे पापडाची तनू !

कसा वाटोळा वाटोळा स्वर्णवर्णाचा लिज्जतू...

झाला कोळपून काळा, गेली इज्जतू इज्जतू !

- झड पावसाची आली, इथे गीतही भिज्जतू,

आता कुणासंगे घालू उगा हुज्जतू हुज्जतू ?

(कवयित्री - सौ.तरंगिणी ठिपके)

प्रिय संपादक महाराज,

अलीकडेच क-हाड - पुणे एष्टीत आम्हाला ही कविता लिहिलेला कागद सापडला. कवयित्रींच्या क-हाड कवयित्री संमेलनात पावसामुळे भिजलेल्या -आणि काव्यगायनाचा चान्स न मिळाल्यामुळे भाजलेल्याही- भावना ध्यानात घेऊन ही कविता आपल्या लोकप्रिय मासिकात छापावी अशी विनंती आहे. 

...आणखीही अश्या ब-याच कवितांचे कागद त्याच एष्टीत सापडले आहेत; पाठवू का ?

आपला नम्र

पु. ल. देशपांडे

-------------------------------------------

पण मंगेश पाडगावकरांनी स्वत:सुद्धा विडंबनं केली आहेत. 

१७ व्या शतकातले संत समर्थ रामदास यांचा दासबोध आपल्याला माहित आहेच. मंगेश पाडगावकरींनी त्या धर्तीवर म्हणजेच विडंबनरुपात लिहिलेल्या 'उदास'बोधात पाडगावकर काय म्हणतात पाहा.

आज हयात असते रामदास । तर भोवती बघुन हरामदास ।

अन्तरी जाले असते उदास । लागोन चिन्ता ॥ १ ॥

समर्थाचिया सेवका वक्र पाहे । ऐसा गल्लीगल्लीत गुन्ड आहे ।

त्यांचेवरी संरक्षण छत्र आहे । पोलीस पुढाऱ्यांचे ॥ २ ॥

या सत्याचा लागता शोध । कुठुन सुचता असता दासबोध ?

लिहिला असता उदासबोध । श्रीसमर्थांनी ॥ ३ ॥

-------------

वात्रटिका हा ही या जातकुळीचा काव्य प्रकार ,हे एखाद्या प्रसिद्ध कवितेचं विडंबन नसून एखाद्या घटनेवरचं उपरोधिक किंवा मार्मिक भाष्य़ असतं. तुम्हाला नक्कीच रामदास फुटाणे यांचं नाव आठवलं असेल. राजकीय उपहासपर असलेलं एकूणच काव्यलेखन फार सजगतेनं समजून घ्यावं लागतं. फ. मु. शिंदे त्यंच्याविषयी म्हणतात- आडात नुस्तं वाकून पाहिल्यानं फार तर पारवे उडतील; तळाचा ठाव लागणार नाही. तळात नेऊन सोडणं हे फुटाणे यांच्या विडंबनलेखनाचं ध्येय आहे. लोकजीवन रसातळाला नेणारं राजकारण 'पदोपदी' खेळलं जात आहे. तो 'खेळ' आणि त्यानं होणारा खेळखंडोबा दाखवण्यासाठी गारुड्याच्या भूमिकेनं डमरू वाजवावं लागतं. 

म्हणूनच फुटाणे यांची रचना प्रासंगिक अथवा तात्कालिक नसून ती वर्तमानाच्या विरूपाची लोकरचना आहे. वर्तमान सांगणं ही प्रेरणा मानली तर वर्तमानातलं सांगणं ही प्रतिज्ञा असते. फुटाणे यांची, त्या प्रतिज्ञेची लोकरचना आहे ! 

रामदास फुटाणे यांच्या लोकरचना विडंबनाच्या, विनोदाच्या, व्यंगाच्या अंगानं येणं स्वाभाविक आहे. कृतिविडंबन, रूपविडंबन तसंच शैलीविडंबन अशा त्रिधारा इथं एकाच प्रवाहानं खळाळताना दिसतील. 

महानोर यांच्या गीताच्या अंगानं त्यांनी एका घटनेचं फार चांगलं विडंबन साधलं आहे. शंकरराव चव्हाण हे मुख्यमंत्री असताना ट्रान्सपोर्टचा संप घडला. जकात रद्द करून संप संपवला. कधी रद्द केल्यानं तर कधी परस्पर फस्त केल्यानं ज'कात' नेहमीच गुप्त गळून पडत आलेली आहे.

शंकर बनात सचिवालयात प्रत्येकाची मान हलली 

म्युनिसिपालिटीची ही नार, डोळे मोडीत चालली 

"मी रात टाकली मी कात टाकली, मी लक्ष लक्ष रुपयांची जकात टाकली"

मूल्यांची पडझड तशी चालूच असते. तथापि 'चालू' गोष्ट मूल्यवान करण्याचं राजकारण घडू लागलं की विनोद आणि विचार एक होऊन, एकवटून दंभस्फोट घडवून आणतात. मर्मभेदाचं भाष्य त्यातून व्यक्त होत जातं. याचं उदाहरण आपल्याला 'वर्षा ' या  कवितेत दिसतं. 

एकमेकांना ढकलण्याची मनामनात ईर्षा आहे 

वर्षावर्षाला बदलतो म्हणून बंगला सुद्धा 'वर्षा' आहे !

रामदास फुटाणे यांच्या लोकप्रियतेचं रहस्य त्यांच्या साध्या आणि सुगम भाषेत आहे. फुटाणे यांची व्यंगभावाची कविता ही भाष्यकविता आहे. रयतेच्या अंगानं ते भाष्य कवी मांडत असतो म्हणून तो जनहितदक्ष असतो. प्रत्येक सरकारची काही तरी 'स्कीम' येते आणि जनताच 'स्लीम' होत जाते. गल्ल्यावरचे मात्र गल्लेलठ्ठ होतात हे भाकरीच्या पापडालाही कळतं !

"झुणका म्हणाला भाकरीला- "अॅरोबीक करतेस ? फारच स्लीम दिसतेस."

भाकरी म्हणाली- "महागाईचा तवा रोजच माझ्या उशाला, 

टी.बी. च्या पेशंटला अॅरोबीक कशाला ?"

समाज आणि राजकारण, राजकारण आणि सत्ता, सत्ता आणि नीती, नीती आणि विवेक, विवेक आणि विचार, विचार आणि व्यवहार, व्यवहार आणि व्यतिरेक, व्यतिरेक आणि अन्वय, यांची रूपं रामायणातल्या ठिपक्याच्या सोनेरी हरिणासारखी इतकी झपाट्यानं पालटताना दिसतात की मती मूढ व्हावी.  ती रूपं बघा कवितेत कशी येतात

मतपेटी

येता निवडणूक जवळ । नेता दिसे शुभ्र धवल । हवे बहुजन बळ। जिंकण्यासाठी ॥ 

हा ह्या जातीचा नेता। तो त्या जातीचा नेता। सर्वांना हाती घेता। यश दारी ॥ 

हा तळातील बीसी। तो गाळातील ओबीसी । खेळती लेझीम ते दारासी। आनंदाने ।। 

मंत्रिमंडळात मात्र। बी. सी. ओबीसी. अपात्र। तेथे पन्नास टक्के पात्र। असू नये ॥ 

राखीव जागा ज्यांना दिल्या। त्यांना होती हो गुदगुल्या। मिळतील त्यांच्या फुल्या। मतपेटीत ॥ 

ज्यांचा गुंता नाही सुटत। जे जे प्रश्न असती बिकट । ते ते ठेवावे भिजत। कुजविण्या ।।

रुपातल्या विरूपाचे बारकावे टिपणं तरलतेनंच घडू शकतं. त्या तरलतेचा प्रत्यय देणं हे फुटाणे यांच्या व्यंगदृष्टीचं वैशिष्ट्य आहे असं फ. मु. शिंदे ’भारत कधी कधी माझा देश आहे’ या नावापासूनच अतरंगी वाटणार्‍या फुटाणॆ यांच्या काव्यसंग्रहाच्या प्र्स्तावनेत आवर्जून सांगतात. 

'वरवर हलक्याफुलक्या वाटणाऱ्या या कवितेचं पाणी खोल आहे' अस पु. ल. देशपांडे म्हणतात तेव्हा त्यंनी भाष्याच्या सखोलतेवर बोट ठेवलेलं असतं.  खोलात शिरायचं असेल तर किनारे सोडले पाह्यजे; तरच विरूपाच्या लोकरचनेचा तळ गाठता येतो. याचा दाखला त्यांची सुप्रसिद्ध कविता देते - भारत कधी कधी माझा देश आहे. 

भेदाभेदांनी पोखरलेल्या देशाचं अंतिमतः काय होत असतं हे इतिहासानं कित्येकदा दाखवून दिलेलं आहे. तरीही वेदनामय वर्तमान बदलत नाही. स्वातंत्र्य, समता, बंधुता, एकात्मता, राष्ट्रप्रेम ही मूल्यं दांभिकतेत दग्ध होतात तेव्हा, त्या सर्व प्रवृत्तींचा दंभस्फोट करणारा नवा उपहास शब्दांकित होतो. त्या उपहासाचे अनेक पदर इथं सापडतात. उपरोधाचा तीव्र स्वर त्यातूनच उमटत राहातो. देशाशी काहीच देणंघेणं नसलेल्यांच्या राष्ट्रभक्तीतला खोटेपणा हेरणं ही प्रस्तुत व्यंगभावातली अर्थपूर्णता आहे.

भारत कधी कधी माझा देश आहे 

आम्ही सारे भारतीय अलग अलग आहोत 

माझं आयुष्य हा काही राष्ट्रीय एकात्मतेचा प्रबंध नाही 

त्यामुळे अन्य जाती-धर्माशी माझा काडीचाही संबंध नाही 

माझ्या जातीचा माणूस माझ्या धर्माचा माणूस हाच माझा भाऊ आहे 

माझा देश माझा खाऊ आहे खाऊन खाऊन तो संपणार आहे प्रांताप्रांताची जुंपणार आहे 

जुंपल्यानंतर फाटतील एकमेकांना लुटतील 

पुन्हा नवे परकीय साम्राज्यवादी येतील 

पुन्हा नव्या स्वातंत्र्यसंग्रामासाठी नवे टिळक नवे गांधी होतील

त्यांचेही पुतळे उभे राहतील पुतळ्यावर कावळे बसतील खुर्चीवर बगळे बसतील 

पुन्हा आम्ही एक होऊ स्वातंत्र्याचे गाणे गाऊ

'हम सब एक है हिंदु-मुस्लिम भाई भाई हिंदु-सीख भाई भाई हिंदु-इसाई भाई भाई

मराठीचं माहेरघर असलेली ही नगरी. मराठीच्या वैभवाची अनेक सांस्कृतिक प्रतीकं अभिमानानं जतन करून ठेवणारी पुण्यनगरी. तिचा वर्तमान दंगलग्रस्त, तिची संस्कृती जमीनदोस्त, ही खंत इथं आहे. इथली ज्ञानाची परंपरा भाटगिरीत भव्यता मानू लागल्यानं, सत्तेचं राजकारण वरचढ होऊन बसलं. उत्सव आणि दंगल सत्तेला सारखेच प्रिय असतात, हा केवढा विरोधाभास !

म्हणूनच पुणे या कवितेत फुटाणे लिहितात 

ज्ञानी सत्तेचे भाट झाले ,पहिलवान बारमध्ये शिरले 

लक्ष्मीच्या आक्रमणापुढे, सरस्वतीचे दास हरले ।।

एकावर एक फ्लॅट उभे, वाडे पायाखाली पुरले 

उत्सव किंवा दंगलीसाठी, गणपतीपुरतेच पुणे उरले ।।

---------------------------------------------------------

विडंनबकाव्याचा प्रवास नव्या विडंबनकारांनी सुरु ठेवला पण मूळ कवितेच्या, कवीच्या शैलीच्या विडंबनाऐवजी आपल्या मनातल्या भावना मूळ कवितेतल्या मुख्य शब्दांच्या आजूबाजूला पेरून विडंबन कविता करण्याचं पेव फुटलं. दिवस तुझे हे फुलायचे ...च्या जागी दिवस तुझे हे फुगायचे हे विकसनशील महिला वर्गाला म्हणण्यात आलं. किंवा मराठी भाषेची वंचना कुसुमाग्रजांच्या कणा या कवितेचा आधार घेऊन मांडण्यात आली. त्याचंच मायबोली.कॉमवर विशाखा कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेलं एक उदाहरण पाहूया.

ओळखतंय का कुणी मला ? विचारतीय मायबोली 

दीन झालीय वाणी तिची मान होती खाली ॥

थोडं ऐका सांगते काही कंठ आला दाटून 

हरवलंय ते वैभव कोणी देता का रे शोधून ॥

शब्द, अक्षरे, गमभन साधी बोली ही विसरले 

दूध वाघिणीचे मात्र, सारे घटाघटा प्यायले ॥

दिवस सरले, वर्षे गेली  'ती'ची जादू टिकली 

सहज मग जाईल कशी ओठी प्रत्येकाच्या रुळली ॥

चार मायेच्या माणसांमुळे अजून आहे टिकून 

अस्तित्वाच्या लढाईसाठी ‌द्यायचे आता झोकून ॥

खचले नाही हरले कधी वाटते एकच खंत

माझ्याकरिता थोडं कधी व्हाल का हो व्यक्त ॥

अंतर आपले वाढले तरी, जागवा मराठी बाणा

 हात हाती घेऊन फक्त 'मायबोलीसाठी' लढ म्हणा ॥

-------------------

यात आशय उत्तम आहे. मूळ कवितेच्या गण व मात्रांच्या नियमांशी , वृत्ताशी , नादाशी आणि खटक्याशी  प्रतारणा होऊ नये याचा प्रयत्न आहे पण झेंडूच्या फुलांच्या दर्जाच्या जवळपास जाणार्‍या या कविता नाहीत.  

ब्लॉगर प्रसाद शिरगावकरांनी मात्र त्यांच्या साधंसोपं.कॉम वर प्रकाशित केलेल्या ’नाच रे चोरा’ या ऑनलाईन विडंबन संग्रहात काही प्रस्थापित लोकप्रिय गाण्यांची चपखल बसणारी विडंबनं सादर करतात. बहुतांशी विडंबनं ही 2002 ते 2004 या काळातली आहेत. विडंबित गीतातही व्यक्तिगत चिखलफेक टाळावी असं ते म्हणतात. हा प्रमाद अत्र्यांकडून माधव ज्यूलियन यांच्याबाबत घडला होता. त्यनंतर त्यंनाच अपराधी वाटले व त्यांनी आपल्या एका कार्यक्रमात माधव ज्यूलियन यांना सन्मानाने बोलावले.  मात्र राखून ठेवलेल्या सीटवर नेमका एका स्न्हेह्यांचा मुलगा येउन बसल्याने आपल्याला जागा नाही हे पाहून ते अधिकच रागावून निघून गेले आणि विडंबनकाव्यामुळे निर्माण झालेली दरी तशीच राहिली. 

शिरगावकर म्हणतात, काव्याचा हेतु जर नवनिर्मिती आणि व्यक्तिगत अनुभवाची अभिव्यक्ती हा आहे, तर तोच हेतु विडंबनाचाही असावा. या हेतूने त्यांनी लिहिलेल्या विडंबनगीतांपैकी हे एक . मध्यमवर्गीय दांपत्याच्या संसारातली भातुकली कधीच संपत नाही हे सांगणारं गाणं.

डोंबिवलीच्या चाळीमधली राजा आणिक राणी

डोक्यावरती पंखा नाही नळास नाही पाणी

त्या राणीचा चढतो पारा रोज डबा भरताना

त्या राजाचा उडतो गोंधळ कामाला जाताना

रोज रोजची सुरूच आहे त्यांची अशी कहाणी

डोक्यावरती पंखा नाही नळास नाही पाणी

त्या राजाला कळते आता आपली धडगत नाही

कर्जत लोकल चुकली आता दुसरी लवकर नाही

स्टेशन वरती उरून जाते एक उदास विराणी

डोंबिवलीच्या चाळीमधली राजा आणिक राणी

डोक्यावरती पंखा नाही नळास नाही पाणी

-----------------------

 सखी बैल आला मारका

आता तरी पळशील का? पळशील का? अशा स्वरूपाच्या त्यांच्या गमतीदार रचना आहेत पण प्रतिभेने स्तब्ध व्हावं असा सध्याचा एकमेव विडंबनकार म्हणजे तंबी दुराई या नावाने म.टा मध्ये दीड दमडी हे मिश्कील सदर लिहिणारे श्रीकांत बोजेवार. विदर्भात दिग्रस इथे जन्मलेल्या आता मुंबईकर असणार्‍या बोजेवार यांनी संत एकनाथ महाराजांच्या ‘नवरा नको गं बाई, मला दादला नको गं बाई’ या भारुडाला आजच्या राजकीय गोंधळाची दिलेली स्वैर फोडणी ऐकूया.

आरा आरा आरा! 

काय झालं रं मतदारा?

हा कॅन्डिडेट नको गं बाई

मला हा उमेदवार नको गं बाई...

काल फलाणीकडं आज बिस्तानीकडं

परवा काशीबाईकडं, तेरवा मस्तानीकडं

मागचं झाकलं का, पुढचं पडतंय उघडं

या हेकडीच्याचं सगळंच वाकडं तिकडं

याला कुठं धरावा, या  ... ला टोकंच नाही

हा कॅन्डिडेट नको गं बाई

मला हा उमेदवार नको गं बाई... 

काल म्हणं कुणाचं तरी घड्याळ फुटलं

एका काट्यानं दुसऱ्या काट्याला लुटलं

तिसऱ्यानं चवथ्याला शब्दानं पार कुटलं

याच्या घरी झोपलं आन् त्याच्या घरी उठलं

याला कुठं टांगावा, सदऱ्याला भोकंच नाही

हा कॅन्डिडेट नको गं बाई

मला हा उमेदवार नको गं बाई...

कोण कुणाचा कुणाकडे गेला पत्ता नाही

सगळेच बिगरीतले एकालाही यत्ता नाही

जनमनाच्या खुर्चीवर काडीची सत्ता नाही

अन् लोकसेवेची कवडीची माल मत्ता नाही

एका जनार्दनी सांगतो, कुणाला लाजच नाही

हा कॅन्डिडेट नको गं बाई

मला हा उमेदवार नको गं बाई... 

असे विडंबनकार सध्या दुर्मिळ झाले आहेत. मुळात चांगले कवीच दुर्मिळ झाले आहेत. 

स्त्री म्हटली की आक्रोश, वेदना, पाऊस म्हटला की नक्षी पक्षी अशा ठराविक प्रतिमा , त्यांना मिळणारे लाईक्स , या नार्सिसिझममध्ये गुतंतल्याने अभ्यासोनि प्रकटावे हेअपवाद वगळता आता दिसत नाही. 

सोशल मिडियामुळेसाहित्यक्षेत्रातली सुमारांची सद्दी वाढली आहे. आपण ही वाचक म्हणून परिघापलिकडे जाऊन वाचतो का हे स्वत:ला विचारायला हवं आहे. या पार्श्वभूमीवर विडंबन कशाला म्हणू नये हे ही आपल्याला कळावं यासाठी ’एका अनामिकाने ’खोडसाळ’ या नावाने झेंडूच्या फुलांऐवजी ’तेंदूची पाने’ नाव घेऊन मनोगत या वेबसाईटवर एक जबरदस्त उदाहरण दिले आहे. या उदाहरणानेच ’झेंडूच्या फुलांपासून  सुरू केलेला विडंबनकाव्याचा प्रवास तेंदूच्या पानावर पोचला आहे.

'स्वयंवर झाले सीतेचे' या गदिमांच्या रामायणातील गीताची इथे फक्त  चाल वापरली आहे. ते त्याचे विडंबन नाही हे लक्षात घ्या. तर या गीतात खोडसाळ म्हणतात. 

साहित्याशी जडले नाते बोरूघाशाचे

विडंबन झाले कवितेचे॥धृ॥

कविराजांनी धनू उचलिले गझल-रुबायांचे

पूर्ण जाहले विडंबकाच्या हेतू अंतरीचे

उडू लागले शब्दकावळे छचोर काव्याचे ॥१॥

विडंबन झाले कवितेचे॥धृ॥

वक्र टाळकी कसून वाचती काव्य अर्थवाही

नयनांमाजी एकवटुनिया काकदृष्टी पाही

फुलू लागले फूल हळू हळू निजल्या मज्जेचे ॥२॥

विडंबन झाले कवितेचे॥धृ॥

सोकावुनिया जरी विडंबन पाडत तो राही

तडिताघातापरी भयंकर वाद तोंच होई

कविराजांच्या तक्रारीचे, बोल कोपल्याचे ॥३॥

विडंबन झाले कवितेचे॥धृ॥

देवाज्ञेने स्फुरे अम्हाला रोज शब्दक्रीडा

अधिर लेखणी, अधिर तीहुनी डोक्यातिल कीडा

अर्थहीन हे चरण लावती लेबल पद्याचे ॥६॥

विडंबन झाले कवितेचे॥धृ॥

खोडसाळ सांगाल अम्हाला का कविता लिहिता?

कविराजांचे सूर हरवले विडंबने बघता

साहित्याशी कसले नाते तुमचे डोंबलाचे? ॥९॥

विडंबन झाले कवितेचे॥धृ॥

---------

आता इतकी चर्चा विडंबनावर केल्यावर मलाही स्फुरण चढले होते त्यात आषाढी एकादशी आली आणि सुमार अभंगांना उत आला. टाळ चिपळया खेळ मेळ तीच प्रतीके घातलेले साचेबद्ध अभंग. लोहा लोहे को काटता है या न्यायाने या दरवर्षीच्या वैतागाला मी दिलेले हे अभंगोत्तर 

आज सारे कवी अभंगात दंग  | बघे पांडुरंग वैतागुनि

शब्द पंढरीत तुकडे शोधिती  | यमक साधिती एकदाचे

विठ्ठलाचा टिळा गुगलाचा मॅप | लोणकढी थाप  मारुनिया 

देऊळ राऊळ तन मन धन | रचती मोजून शब्दविटा

शब्दांच्या राशीत सापडेना भाव  | तरी त्याला नाव अभंगाचे

तरीही येईना अभंगाला गोडी | वरई, खिचडी  खाई कवी

सजविण्या रूप  घाली कॅलिग्राफी  | एआय फोटोग्राफी  फेसबुकी

लाईक ऐवजी   हा हा हा चुकुनी | केल्याने मोहिनी   ब्लॉक झाली


Monday, January 16, 2023

डीपी छान आहे


माणसाच्या आयुष्यातले सर्वाधिक आवडते तीन जादुई शब्द कोणते ते आपल्याला माहित आहेतच. त्यातून ते जर हव्या त्या व्यक्तीने उच्चारले तर माणसाला स्वर्ग दोन बोटे उरतो. व्यवहारचतुर माणसांच्या आयुष्यातले ते तीन शब्द ’बिल मी देतो/देते’ असे असू शकतात. एखाद्या गृहिणीसाठी मुलांच्या तोंडून आलेले ’अमुक मस्त झालंय’ हे ते तीन शब्द असू शकतात पण हल्ली यच्चयावत माणसांना आवडणारे तीन शब्द म्हणजे - ’डीपी छान आहे’.

समाजाच्या विचारात, माणसाच्या स्वभावात होणारे बदल फार संथ गतीने होत असले तरी त्याचा डीपी (डिस्प्ले किंवा प्रोफाईल पिक्चर) सतत बदलत असतो ( अपवादांनी स्वत:ला वगळून घ्यावे) लिंक्ड-इन सारख्या समाजमाध्यमावर ती व्यक्ती व्यावसायिक जीवनात फारच यशस्वी आहे असे भासवणारा औपचारिक रुपातला डीपी वापरला जातो. टिंडर सारख्या डेटिंग स्थळी तर स्वाईप उजवीकडे करायचे की डावीकडे हे डीपीवरून ठरत असल्याने डीपी फारच आकर्षक वाटेल याची विशेष काळजी घेतली जाते. आपली महत्वाची ओळख म्हणजे चेहरा म्हणून यूजरने डीपी वापरण्याचा संकेत आता बहुतेक सर्व मोठ्या वेबसाईटवर असला तरी यूजर तिथला डीपी काहीसा निष्काळजीपणे निवडतो. डीपी डीपी खेळण्याची खरी मजा लोकांना व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या माध्यमांवर लुटता येते. हा दर्शनी बदल असला तरी त्यातून काय दाखवायचे हा हेतू मात्र तिथे अढळ असतो.
AIM ने 1997 मध्ये AOL द्वारा एक इन्स्टंट मेसेजिंग अॅप सादर केले होते तिथून या डीपी प्रकरणाला सुरुवात झाली. आधार कार्डवर खरा आणि पॅन कार्डवर बरा दिसणारा माणूस डीपीच्या कृपेने समाजमाध्यमावर देखणा दिसू लागला. साहजिकच डीपीमुळे व तो हवा तेव्हा बदलायची सुविधा असल्याने समाजमाध्यमाचे आकर्षण वाढत गेले. इतके की उद्या डीपीची सुविधा बंद झाली तर कित्येक लोक कदाचित समाजमाध्यम वापरणे सोडून देतील.
याबाबत पाश्चात्य समाजमाध्यम अभ्यासकांनी काही निष्कर्ष काढले आहेत. उदा: आशियाई लोकांना आपला डीपी प्रेक्षणीय स्थळाच्या पार्श्वभूमीवर असणे आवडते तर अमेरिकन लोकांना डीपीतून आपली छबी दाखवायला आवडते. पेन्सिल्वानिया विद्यापीठाने मध्यंतरी साठ हजार प्रोफाईल्सची पाहणी केली. यूजरच्या म्हणजेच माध्यम वापरणार्या माणसाच्या स्वभावाचे व विचारपद्धतीचे प्रतिबिंब त्याच्या डीपीमध्ये आढळून येते असा त्या पाहणीचा निष्कर्ष सहज पटण्यासारखा आहे. यूजरचे सामान्यत: ५ प्रकार असतात. ते काय पोस्ट करतात किंवा काय लाईक करतात यावरून हे प्रकार कुणालाही ओळखू येतील.
साधेसरळ किंवा स्वकोषातले, नकारात्मक विचार करणारे, सकारात्मक विचार करणारे, सावध भूमिका घेणारे आणि बिनधास्त हे ते ५ प्रकार.
सकारात्मक मंडळींना रंगीबिरंगी फोटो, आपण केंद्रस्थानी असलेले ग्रुप फोटो डीपी म्हणून आवडतात.
नकारात्मक मंडळी डीपीमध्ये शक्यतो आपला चेहरा दाखवत नाहीत. मॉडर्न आर्ट सारखे काहीतरी अतर्क्य, अंधुक फोटो किंवा अगम्य तत्त्वज्ञानाचे संदेश ते डीपी म्हणून निवडतात.
स्वत:च्या प्रतिमेबद्दल दक्ष असलेल्या लोकांचा डीपी नेहमी नीटनेटका, क्रॉप केलेला असतो. या सावध लोकांचा मनात काय चालले आहे याचा त्यातून अजिबात पत्ता लागत नाही.
साधे किंवा स्वकोषातले लोक स्वत:ऐवजी मुला-नातवंडांचे किंवा त्यांच्यासह, आईवडिलांचे, देवादिकांचे किंवा फुलांचे फोटो डीपी म्हणून वापरतात.
ही मंडळी नकळतपणे तर बिनधास्त लोक ठरवून त्यांच्या त्या त्या वेळच्या भावस्थितीनुसार डीपी बदलत असतात. बिनधास्त लोक सकाळी पाहावे तर भारतभूषण सारखे , संध्याकाळी पाहावे तर रणवीर सिंग सारखे असू शकतात. त्यांचे त्यांनाही काही सांगता येत नाही.
या शिवाय स्वप्रेमात बुडालेले म्हणजेच नार्सिसिस्ट लोक नाटकी वाटावेत असे खास काढून घेतलेले डीपी वापरतात. त्याकडे लोकांचे लक्ष जात नसल्यास ते बैचैन होऊन डीपी बदलत राहतात. तरी पाहिला नाही तर ते तो स्टोरी किंवा स्टेटसला टाकतात.
या पलिकडे जाऊन एखाद्या मह्त्वाच्या सामाजिक घटनेशी आपले नाते दर्शवण्यासाठी काही जण डीपीचा वापर करतात. उदा: स्वातंत्र्यदिनाला डीपी म्हणून आपला राष्ट्रध्वज लावणे, आवडत्या नेत्याचा फोटो लावणे, सामना जिंकल्यास त्या खेळाडूचा फोटो लावणे अनेकांना आवडते. एखाद्या गंभीर घटनेची प्रतिक्रिया म्हणून काळा रंग दर्शवणारा डीपी ठेवणे किंवा ’मी कर भरला’,’मी लस घेतली’ किंवा ’बेटी बचाओ’ यांसारख्या बॅनरचा वापर प्रो-पिक सह करणे हा आपली सामाजिक संवेदनशीलता घरबसल्या प्रदर्शित करण्याचा सोपा मार्ग मानला जातो.
आपल्या भारतीय नजरेतून डीपीकडे बघितले तर आणखी काही वेगळे आणि गमतीदार निष्कर्ष काढता येतात.
बहुसंख्य भारतीय पुरुषांना विशेषत: तरुणांना डीपी मधून आपले सामाजिक स्थान दाखवायला म्हणजेच आपण कुणीतरी खास असल्याचे दाखवायला आवडते. बहुतेक भारतीय स्त्रियांना आपल्याइतके खूष जगात कोणी नाही असे दाखवायला आवडते. पुरुषांना हसणे थोडे कमीपणाचे वाटते. प्रसिद्ध ब्रँडच्या मॉडेलच्या चेहर्यावर असतात तसे निर्विकार, सुतकी भाव त्यांच्या चेहर्यावर असतात. त्यांनी लावलेल्या गॉगल किंवा भारी घड्याळाकडे, ते टेकून उभे असलेल्या कारकडे लोकांनी नीट पाहावे अशी त्यांची आंतरिक इच्छा असते. ते डीपीत झाडी, डोंगार, सूर्याकडे किंवा इमारतीकडे एकंदरीत भलतीकडेच पाहताना दिसतात.
याउलट बहुतेक स्त्रिया कॅमेर्याकडे थेट, रोखून बघतात. डीपी हसरा आहे ना, निदान आपण मजेत, चांगल्या आणि शक्य तितक्या बारीक दिसत आहोत ना याची त्यांनी खात्री केलेली असते. मध्यमवर्गीय तरुणींना सुरक्षिततेची भीती किंवा फेसबुकवरच्या आत्या- मामा- काकूंची आपल्यावर एक गुप्त नजर असल्याचे जाणवत असते, त्यामुळे त्या डीपीतून संस्कारी दिसण्याचा प्रयत्न करतात.
हा ताण नकोसा वाटला तर तरुण मंडळी इन्स्टाग्रामवर पळते. तिकडे जाऊन नेमके काय करायचे हे अद्याप फेसबुकी आत्या, मामा, काकूंना फारसे माहित नसल्याने त्या तिकडे फिरकत नाहीत. त्यामुळे तिकडे कॉलेजमधल्या ’ऑफ’ तासाला असते तसे मुक्त वातावरण असते. तिकडे डीपी वर एक तरी ओळ लिहावी लागते. त्या ओळीचा आणि फोटोचा संबंध नसतो. उदा: एकाच्या फोटोवर लिहिले होते ’मै नही तो कौन बे’ (हे सध्याचे प्रसिद्ध रॅप गाणे आहे) दुसरीच्या फोटोवर लिहिले होते ’लव्ह द लाईफ यू लिव्ह, लिव्ह द लाईफ यू लव्ह. ’ म्हणजे नेमके काय असले निरर्थक प्र्श्न तिकडे विचारायचे नसतात. वाक्यासह ढीगभर हॅशटॅग वापरावे लागतात. त्यात #पार्टी, फ्रेंड्स, धमाल, न्यू इयर, बेस्टी वगैरे लिहायचे असते. मुले मात्र एकमेकांना बेस्टू बिस्टू म्हणत नाहीत. इंस्टाग्रामवर मैत्रिणीला बेस्टी न म्हणणे हा दंडनीय अपराध असतो. असे सगळे केल्याने आपण ’कूल’ असल्याचे सिद्ध होते. म्हणजे काय ते विचारु नये.
पुरुष एकमेकांच्या डीपीकडे पाहतात त्यापेक्षा कितीतरी बारकाईने स्त्रिया एकमेकींच्या डीपीचे निरिक्षण करतात. एकमेकींना बदाम देऊन वाऊ, सुंदर वगैरे म्हणतात. त्या डीपी बदलतात तेव्हा हे प्रतिसाद परत आहेरात आले नाहीत तर पुढच्या वेळी फक्त ’नाईस पिक’ अशी कोमट आणि बोथट प्रतिक्रिया देतात. जवळच्या मैत्रिणी एकमेकींना ’परवाच्या डीपीमधलं कानातलं कुठून घेतलं गं’ असे प्रश्न विचारू शकतात. जिला विचारणा झाली तिचे तो डीपी लावण्याचे सार्थक झालेले असते. निरिक्षणात विशेष प्रावीण्य मिळवलेल्या थोर स्त्रिया तर ’तुझ्या कालच्या डीपीमध्ये मागे उभ्या असलेल्या तुझ्या मैत्रिणीच्या ब्लाउजचे डिझाईन छान होते, कुठे शिवलं तिने’ असेही बिनदिक्कत विचारू शकतात. असे केल्यास आपण रिकामटेकडे ठरू की काय या शंकेने पुरुष डीपी सारख्या क्षुल्लक गोष्टीकडे लक्ष नसल्याचे दाखवतात. प्रतिक्रिया दिलीच तर ते मैत्रिणीला ’सुंदर- ऑसम’ सारख्या गोड, कमी ओळख असल्यास ’छान- प्रसन्न’ सारख्या सावध आणि मित्राला ’कुठे फिरतोय बे रिकाम्या’ या सारख्या खडूस शब्दात देतात. मित्राच्या डीपीमधल्या कारच्या मॉडेलची नोंद मात्र त्यांच्या मनात झालेली असते.
एकूण काय ,जगाने आपल्याकडे ज्या नजरेने पाहावे असे आपल्याला वाटते तसा डीपी आपण सगळे वापरतो. त्यासाठी कुणी पाठीशी आयफेल टॉवर किंवा ताजमहाल घेतात, कुणी सोबतीला प्रसिद्ध व्यक्ती घेतात तर काही जण फोटो फिल्टर वापरतात, पण त्यातले ’आपण’ किती खरे असतो!
तेव्हा डीपीला एखाद्या पाकीटावर चिकटवलेल्या तिकिटापेक्षा जास्त महत्व देऊ नये. त्या तिकिटाचा/ त्यावरील छापाचा आणि पाकीटात जे काय असते त्याचा एकमेकाशी जितका संबंध असतो तितकाच डीपीतून दिसणारी व्यक्ती आणि मुदलातली खरी व्यक्ती यांचा आपसात संबंध असतो. लोक डीपीच्या आहारी जातील म्हणूनच कदाचित संत चोखोबांनी "का रे भुललासी वरलिया रंगा" म्हणून ठेवले असावे.
तरीही जर एखाद्या व्यक्तीशी खूप दिवसात संपर्क नसल्याने काय बोलावे प्रश्न पडला असेल, एखादा मित्र/मैत्रिण/ जोडीदार नाराज असेल तर हे तीन शब्द त्यांना पाठवा आणि जादू बघा -ते शब्द म्हणजे अर्थातच ’डीपी छान आहे’.

Saturday, November 12, 2022

पूर्ण स्वयंपाक मुलांनी करायचा

 

1st Attempt

होस्टेलमधून घरी आल्यावर प्रत्येक सुट्टी (अगदी प्रिपरेशन लीव्ह असली तरीही) संपायच्या आत एक दिवस (निदान) एक वेळचा #पूर्णस्वयंपाकमुलांनी_करायचा असा मी फतवा काढला. "ए जा बॉ आई, तू फारच सिरियसली घेतेस प्रत्येक गोष्ट. आम्ही जनरल हो म्हणालो होतो." म्हणत त्यांनी यंदाही कुरकूर केली. "ते जनरल बिनरल मला काही माहित नाही, उद्या सकाळी पोळ्यांच्या मावशी अनायासे येणार नाहीयेत तर उद्याचा सकाळचा स्वयंपाक तुम्ही करायचा आहे. शिवाय नुसती बटाट्याची भाजी आणि वरण भात चालणार नाही. ते करून झालंय मागच्या वेळेला. "असं मी ठणकावलं."पुढच्या सुट्टीत करू नं! परवा पावभाजीला सगळं मीच तर चिरुन दिलं होतं", "आणि बिर्याणी केलीस तेव्हा मी सगळी मदत केली होती त्याचं काय! हे पूर्ण स्वयंपाक करायचं काय काढलंय" वगैरे निषेधाचे सूर सुरु झाले होते.  

मग त्यांना सांगितलं की आपण मदत करण्याविषयी बोलत नसून संपूर्ण स्वयंपाक करण्याबद्दल बोलतोय. अगदी मेनू ठरवण्यापासून ते मागचं आवरण्यापर्यंत सगळं तुम्ही करायचं आहे. "अगं पण आता यू ट्यूबवर पाहून करता येतं सगळं वेळ आली तर""ते एडिटेड असतं, बारीक बारीक गोष्टी स्वत: केल्याशिवाय कळत नाहीत, यावर आता चर्चा बंद म्हणजे बंद"

आता ही बाई ऐकतच नाही हे पाहून त्यांनी बाबा, आजी, आजोबांचा आधार घेऊन पाहिला. त्या त्रयीने माझ्याकडे अलका कुबल टाईपचा भावपूर्ण कटाक्ष टाकला पण मी दुष्ट बाई होत म्हटलं ," इतकी हृदयात कालवाकालव होण्याइतकं स्वयंपाक करायला लावण्यात काहीही गंभीर नाहीये. आज मी तिकडे पाऊलही टाकणार नाहीये, हां, फक्त कन्सल्टन्ट म्हणून त्यांना मी उपलब्ध आहे"

इलाजच नाही म्हटल्यावर मुलांनी फ्रीजमध्ये डोकावून पाहिलं असावं. 

"यात फक्त तोंडली आहेत आपल्याला करणेबल"

" मॅड त्याला दोडकं म्हणतात" वगैरे तारे आपसात तोडले गेले. अखेर ’तोंडलं व दोडकं दोन्ही नसलेल्या गिलक्याची भाजी, पोळी, बीटाची कोशिंबीर, आमटी आणि भात’ असा त्यांचा मेनू ठरला. 

मी जवळच्या खोलीत जाऊन लॅपटॉप घेऊन एकीकडे कानोसा घेत कामाला सुरुवात केली. 

जगातली आय मीन घरातली बहुतेक भांडी ओट्यावर आली. टडाम टुडूम आवाज येत होते. अस्वस्थ होऊन आजी एक चक्कर मारून गेल्या असाव्यात कारण  मुलांनी बाणेदारपणे आजीला "आज्जी इकडे येऊ नकोस बरं" म्हणून बजावल्याचं ऐकलं. एक गिलकं चिरून मला अप्रूव्हलसाठी दाखवण्यात आलं.  माणशी २ पोळ्या धरल्या तर किती कणिक लागेल याची विचारणा झाली.  प्रत्येकी ३ पोळ्या करणं कंपलसरी केलं होतं. जरा दया आल्याने "बाकीच्या मी करीन" असा मी दिलासा दिला पण त्याला स्पष्ट नकार मिळाला.

 फोडणीसाठी गॅसवर ठेवलेलं तेल तापत आलं तरी भाजीला योग्य चमचा सापडत नसावा. "तापलं  तापलं, आता त्या बटाट्याच्या भाजीच्या सीक्वेन्सनेच सगळं टाकू का, आई, लवकर सांग हे फुटतंय" -लेक ओरडला." त्याला तडतडणं म्हणतात, आधी गॅस कमी कर , मोहरी जळेल"- बाहेर येत मी.

साधारण या चालीवर भाजी झाली. यात दाण्याचं कूट, डाळी काय काय घालता येऊ शकतं, त्याने चवीत काय फरक पडतो याची, दाल फ्राय येत असल्याने त्यात आणि आमटीत काय फरक असतो याचीही चर्चा झाली.कुकर आधी लावला असता तर एकीकडे भाजी आणि दुसरीकडे आमटी टाकता आली असती , कणिक मुरली असती अशी त्यांची ट्यूब पेटली. 

पहिल्या पोळीचा खाकरा झाला, दुसर्‍या पोळीने तवा सोडायला नकार दिला, तिसरी बरी झाली. चौथी फुगली याचा आनंद उड्या मारून साजरा करण्यात आला तेव्हा बाजूला भाजी शिजतेय तिकडे अधूनमधून पाहायचे असते याची मी ओरडून आठवण केली. भांड्यांच्या ढिगात चिमटा अदृश्य झाल्याने ’आई झाकण कसं काढू , झाकण लावतातच कशाला" प्रश्न आले. कपड्याने झाकण उचलताना हातावर थोडी वाफ आली म्हणून स्वत:भोवती गिरकी घेऊन एकाचा हाई हुई करत झुंबा करून झाला. हाताला लागू न देता बीट किसण्याचे प्रात्यक्षिक झाले. कोणत्या कोशिंबिरीत काय काय घालायचं यावर चाललेल्या बडबडीचे, मध्येच एकमेकांवर डाफरण्याचे , खी खी करण्याचे, झाकण, वाट्या टणटणत खाली पडण्याचे आवाज ऐकू येत होते. कोणत्या पदार्थासाठी कुकरच्या किती शिट्ट्या आणि नंतर गॅस बारीक करायचा का, असा मी बसलेल्या खोलीत डोकावून प्रश्न विचारण्यात आला. यावरची वैज्ञानिक खडाजंगी फेसबुकवर वाचा सांगितलं तर ’बरंय इन्स्टावर असलं काही नसतं’ असं उत्तर आलं.  

"ओट्यावरचा राडा आवरला का , ओला कचरा बिनमध्ये टाकला का"-यावर काहीच उत्तर आलं नाही.  

"चला लवकर सगळे, बनलं जेवण"  मुलांनी ऐटीत घोषणा केली.

"त्याला ’स्वयंपाक झाला किंवा केला’ असं म्हणतात. मग हे पदार्थ आपण खाल्ले की त्याला ’जेवण झालं’ असं म्हणतात"

 "बरं आता ग्रामर नको बॉ आई, कसा झालाय ’स्व  यं  पा  क’ ते सांग"

व्याकरण, स्वयंपाकाशी जुळलेली कितीतरी क्रियापदं- शब्द, पदार्थांची नावं, भाज्या डाळी ओळखता येणं, किती प्रमाण घ्यायचं त्याचा अंदाज येणं, केलेलं नीट वाढता येणं हे सगळं ते कधीतरी शिकतील, न शिकतील, पण त्याचा त्यांना आनंद घेता यायला हवा. नाही घ्यावासा वाटला तरी स्वयंपाक म्हणजे खायचं काम नाही हे तरी कळावं. मध्ये मी त्यांना एक व्हिडिओ फॉरवर्ड केला . भाकरी करून द्यायला आई-बाप जवळ नाही म्हणून शाळा सोडायची वेळ आलेली उसतोडणी कामगारांची मुलं होती त्यात. त्या लहानग्यांना भाकरी शिकवतानाचा व्हिडिओ पाहून भरून आलं. प्रत्येकाला आपल्यापुरती तरी भाकरी थापता आली पाहिजे हे खरंय. 

स्वयंपाक खरंच चांगला झाला होता. बाबा आणि आजी आजोबांनी अगदी बोटं चाटत प्र चं ड आणि मी थोडंफार कौतुक केलं. "संध्याकाळी तुम्ही म्हणाल ते करीन जेवायला" अशी मी रिटर्न गिफ्ट ऑफर केली. मुलांनी जेवताना कॅलेंडरकडे पाहिलं. पुढच्या सुट्टीला किती वेळ आहे ते पाहत असावेत. तेव्हा काय मेनू सांगावा ते विचारीन इकडे  😊

Friday, June 10, 2022

दोन माणसांचा गुळांबा


म्हणजे काय! दोन माणसांपुरता? एवढाच करायचा तर इतका कुटाणा कशाला, असं तुम्हाला वाटत असेल. तर ते तसं नाही.

ही #गुळांबा कसा करावा याची रेसिपी नसून न-रेसिपी आहे. 🫢
ये उन दिनोंकी बात है जेव्हा उन्हाळी वाळवणं किंवा विशेष पदार्थ अजूनही सासूबाईच करत असत.
एका उन्हाळ्यात त्या परगावी गेल्यानं यंदाच्या गुळांब्याचं काय करायचं हा प्रश्न समोर उभा राहिला.
आपण अत्यंत हुशार असून ’त्यात काय मोठंसं’ असं मी स्वत:ला सांगितलं आणि सासूबाईंना सर्प्राईज द्यायचं ठरवलं.
सुरुवातीच्या दिवसात असले झटके बहुतेक सगळ्याच नवविवाहितांना येत असतात 😁 तर ते असो.
तेव्हा फेसबुक वगैरे नसल्याने एका रविवारी मी घरातलं मंगला बर्वेंचं ’अन्नपूर्णा’ पुस्तक बाहेर काढून त्याबरहुकूम सगळी तयारी केली.
सगळे त्यात दिल्याप्रमाणे केले.
पितळी पातेल्यात रटरटणार्या त्या सोनेरी तांबूस गुळांब्याकडे बघताना कैरी किसताना हाताला थोडंस लागल्याचं दु:ख विरून गेलं.
दरम्यान सासूबाईंचा फोन (अर्थात ट्रिंग ट्रिंग वाला) आला.
हा विषय वगळून मी त्यांच्याशी बोलत बसले.
मध्येच पळत येऊन डावाने ढवळून गुळांब्याची कन्सीस्टन्सी तपासून गेले.
अजून तरी तो सैल वाटत होता.
फोन सुरुच राहिला, गुळांबा सैल वाटत राहिला.
फोन संपला तरी गुळांबा सैल वाटत राहिला. 🤔
चांगला दाट झाल्यासारखे वाटल्यावर केव्हातरी अंदाजाने मी गॅस बंद केला.
माझा पहिलावहिला गुळांबा गार झाल्यावर खूष होऊन मी बरणीत भरायला घेतला पण त्यात घातलेला डाव पातेले सोडेचना. 🙄
मग मी खाली बसून बरणी घट्ट धरून ठेवली आणि कुठल्यातरी गडबडीत असलेल्या नवर्याला थांबवून त्यांच्या मदतीने पातेल्यातलं मिश्रण त्यात शक्तीनिशी लोटलं.
उरलेलं चाटून पाहिलं तर ते अप्रतिम खमंग लागत होतं.
थोड्या वेळाने नॉर्मल होईल याची उगाचच खात्री होती.
मग ताजं लोणी कढवलं. गरम पोळी पानात घेतली.
आता गुळांबा घेऊन त्यावर साजूक तूप घालून लहानपणापासून प्रिय असलेली चव अनुभवायची होती.
बरणीत चमचा घातला तर तो बिचारा वाकडा झाला पण आतला ऐवज घेऊन बाहेर यायचं नाव घेईना. 🤨
मग मात्र जाड डाव आत खुपसला.
पुन्हा नवर्याला बोलावून बरणी मागच्या बाजूने घट्ट धरून ठेवायला लावली आणि डावभर गुळांबा दोन्ही हातांनी ओढून बाहेर काढला.
चिक्कीकडे झुकलेलं ते प्रकरण लागत बाकी भारी होतं.
दरम्यान एकदा अचानक जेवायला ओळखीच्या एक काकू आल्या.
शेवटी काहीतरी गोड हवं म्हणून ’वाढ गं जरासा गुळांबा वगैरे काहीतरी’ म्हणाल्या. मी भीत भीत वाढला.
त्यांना कवळी असल्याने ती आत बहुतेक गुळांब्यासह खडखडू लागली असावी. गुळांब्याचा नीट आनंद न घेता आल्याने वैतागून
किंवा तो बरणीतून काढण्याची आम्हा ’दोघांची’ सर्कस पाहून
त्यांनी त्याचं नामकरण ’दोन माणसांचा गुळांबा’ असं केलं. 😬
त्या नन्तर एका लग्नात त्या भेटल्या तेव्हा म्हणाल्याच, "झाला की नाही यंदाचा ’दोन माणसांचा गुळांबा’ करून !".
तर दोन नव्हे पण चमच्याने सहज निघणारा ’एका माणसाचा गुळांबा’ करुन झालेला आहे.
फोटोत किंचित सरसरीत वाटत असला तरी निवल्यावर तो अगदी व्यवस्थित झालाय बरं का! 😃
तुमचा झाला का तयार? एका माणसाचा गुळांबा !!

Monday, May 30, 2022

एका पुस्तक प्रकाशनाची गोष्ट

 मी कार्यक्रमाच्या हॉलमध्ये प्रवेश केला तेव्हा जिच्या हस्ते पुस्तक प्रकाशन होतं ती माझी आवडती लेखिका-कवयित्री मैत्रिण बोलायला नुकतीच उभी राहिली होती. चला, म्हणजे आधीचे सोपस्कार झाले असावेत. ज्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन होते त्या नवलेखकाच्या नातलगांनी आमचे मनापासून स्वागत केले. माझ्यासोबत माझी आणखी एक मैत्रिण होती. अशा कार्यक्रमात धीर द्यायला सोबत कुणी असलेले बरे असे आम्हा दोघींचेही मत होते. आम्ही तिथे (ठरवून) उशीरा टपकल्याने कसनुसं हसत चटकन मागच्या ओळीतली कोपर्यातली खुर्ची धरली. एव्हाना स्टेजवरच्या लेखिका मैत्रिणीने माझ्या अपेक्षेला न्याय देत छान छान मुद्दे मांडायला सुरुवात केली होती. सृजन म्हणजे काय, लिहिण्याची उर्मी हा काय नेमका प्रकार असतो, अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय, सद्यस्थितीत लेखकाने स्वत:ला कसं घडवावं वगैरे. लेखकाच्या पुस्तकातल्या मर्यादा आणि बलस्थानंही तिने ओघवत्या शैलीत सांगितली. बारकाईने ऐकल्यावर जे लक्षात आले ते असे - पुस्तक यथातथा किंवा बंडल आहे. इकडे लेखिका मैत्रिण आता भाषणात रंगली आणि पुढचा गिअर टाकून अनुभव, अनुभूती आणि त्याची परिष्कृती असं लईच उच्च उच्च बोलू लागली. लेखकाचं समाजाशी नातं, समष्टीशी नातं वगैरे. तिच्याच बोलण्यातून अंदाज आला होता की ’उतारवयातल्या पुरुषाला कोवळया वयात आवडलेली सुबक ठेंगणी वयाच्या या टप्प्यावर पुन्हा भेटते’ या एकमेव थीमभोवती कथा(!) रचलेल्या होत्या. कसलं सृजन, कसला समाज अन कसली समष्टी. पण ती बिचारी प्रमुख पाहुणी असल्याने स्तुती न करुन करते काय! तरी प्रसंगाचे औचित्य चतुराईने सांभाळून तिने नवलेखकांना पुढील लेखनासाठी शुभेच्छांसह काही रोखठोक सूचना दिल्या आणि बोलणे संपवले.

उपस्थितांमधल्या बहुतेक बायका, लेखकाच्या नात्यातल्या असाव्यात. त्या दिवशी काहीतरी सणवार असल्याने इकडून परस्पर हळदीकुंकवाला जाऊया, या हिशेबाने खच्चून नटून आल्या होत्या. त्या चुळबूळ करु लागल्या. बहुतेक पुरुष हे लेखकाचे मित्र, रविवारची दुपार जरा बरी गेल्याने तेवढाच एक दिवस कटला, या आनंदात ते ऐकण्यात रमले होते. दरम्यान नातलगांची लहान मुलं त्या छोटेखानी हॉलच्या एका कोपर्यात शिवाशिवी खेळू लागली. भरपूर मेकअप केलेली एक युवती त्यांना दटावू लागली. युवतीने एक लांबलचक बट केशरचनेच्या बाहेर काढून सेट केली होती, ती सेट आहे ना हे चाचपण्यात तिचं सगळं लक्षं लागलं होतं. निवेदकाने माईक ताब्यात घेऊन लेखिका-मैत्रिणीला धन्यवाद दिले व
’रंजक भाषण आपुले, कान अमुचे तृप्त जाहले..’
तत्सम काहीतरी यमक जुळवले. ’अतृप्तीच्या वाटेवर’ छाप नावांचे एक दोन कवितासंग्रह प्रकाशित झालेली मंडळी दिसतात तसे ते होते. त्यांनी आता मंचावरच्या मान्यवर डॉ. ना पाचारण केले.
’मला फक्त पेशंटशी बोलता येतं बुवा पण तरी मी आपले चिमखडे (!) बोल (हा, ते बालरोगतज्ज्ञ असल्यामुळे) सादर करतो’,
असे सांगून डॉ. नी आयक्यू आणि इक्यू यातला फरक सांगितला. ते पुढे म्हणाले,
’लेखक व्हायचं तर एकवेळ आयक्यू नसला तरी चालेल (बापरे!) पण तुमचा इक्यू चांगला हवा’.
मग निवेदकाने त्यांना, म्हणजे निवेदकाला फक्त आयक्यू असूनही (उत्सवमूर्ती लेखकांनी) नोकरीसाठी मदत केल्याबाबत आभार मानले व मंचावरील पोलिस अधिकारी म्याडमना बोलण्यासाठी पाचारण केलं.
म्याडम चांगल्या सणसणीत व्यक्तिमत्वाच्या होत्या. कुर्त्याच्या बाह्या दुमडत माईकपाशी येत एक कडक लुक देत त्या म्हणाल्या,
" मघाशी प्रकाशक म्हटले, आम्ही प्रोत्साह्न देतो नवीन लेखकांना तर आता मला पण माझे पोलिस विभागातले भन्नाट अनुभव लिहावेसे वाटून राहिले आहेत."
जर यांचं पुस्तक निघतं तर माझं तर निघूच शकतं, असा त्यांचा सूर होता. पुढे त्या म्हणाल्या ’यांचे (लेखक) गुण किती सांगावे (त्यांना आठवेना) तितके कमीच.’ लेखकाशी असलेल्या घरोब्याच्या संबंधांमुळे नाईलाजाने म्याडम या ठिकाणी उपस्थित झाल्या असाव्यात.
डॉक्टर, पोलिस या दोन असंबद्ध व्यक्तींनंतर आता सुसंबद्ध व्यक्तीला आमंत्रित करण्यात आलं. लेखकाच्या संस्थेतल्या साहित्याची आवड असलेल्या एक म्याडम. त्या स्टेजवर जायच्या कल्पनेने गांगरलेल्या दिसत होत्या. चुरगाळलेला कागद आणि रुमाल घेऊन माईकजवळ गेल्या, त्या घाबरलेल्या असल्यामुळे दोन्ही खाली पडलं, त्या भीतीवर मात करत कागद उचलून सरळ करत म्याडमनी एकदम तारस्वरात बोलायला सुरुवात केली. लेखकाच्या लेखन कारकीर्दी(!)ला शुभेच्छा देताना अधूनमधून त्यांनी स्वरचित कवितेच्या २-२ ओळी पेरल्या होत्या.
’व्हावे लेखन इतुके की आभाळाने यावे खाली.. (!)
नंतर काही तरी ’ही तर कथुली झाली’
असे यमक होते. शेवटची लाईन दोनदा म्हटली की ती कविता असते म्हणून आम्ही पण इतर श्रोत्यांबरोबर इमानेइतबारे टाळ्या वाजवल्या.
लेखिका मैत्रिण तिच्या मंचावरच्या स्थानाला साजेसा गंभीर चेहरा ठेवून बसली असली तरी माझ्याकडे लक्ष जाताच अवसान गळून तिला खुदकन हसू फुटे. या बिकट स्थितीवर उपाय म्हणून तिने हॉलमधील झुंबरावर नजर केंद्रित केली. ती बहुतेक त्याचे लोलक मोजत असणार.
आता संस्थाध्यक्ष उठले, त्यांना बोलावणं तर कंपलसरीच असणार. लेखकानी आपल्या कथांचे तुकडे स्फुरले तसतसे यांना ऐकवले असावे, त्याचा पुरेपूर सूड अध्यक्षांनी आपल्या भाषणात घेतला. आम्हाला कोण कोणास काय म्हणाले काहीही कळलं नाही.
निवेदकाने म्हटले, "यांच्या भाषणावरुन ते संस्थेत किती जबरदस्त इंटरव्ह्यू घेत असतील याची कल्पना तुम्हाला आलीच असेल." हे कौतुक होते की टोमणा या गोंधळात अध्यक्ष आणि श्रोते असतानाच त्यांनी ’आणखी कोणाला मनोगत व्यक्त करायचे असल्यास यावे’, असे म्हटले.
तोवर मागच्या काउंटर्सवर आगमन झालेल्या पावभाजीचा खमंग सुवास दरवळू लागल्याने आणि शिवाशिवी खेळणार्या मुलांचा सूर टीपेला पोचल्याने आता कुणीही बोलायला उठलं नाही.
लेखकांचे कुणी नातलग आभारप्रदर्शनाला उभे राहिले. कार्य चांगलं पार पडल्याचे कृतकृत्य भाव चेहर्यावर लेऊन ते उभे राहताच मी
’आभाराचा भार कशाला अन् शब्दांचे हार कशाला’
या आभारवाल्यांच्या अत्यंत आवडत्या ओळी मनात म्हणत त्याच पुन्हा ऐकायला कान टवकारले आणि माझा अजिबात अपेक्षाभंग न करता त्यांनी त्या ओळी म्हटल्याच.
या ओळी न म्हणणारा आभारवाला दाखवा अन हजार रुपये मिळवा. मग आभारयादीला संस्थाध्यक्षांपासून सुरुवात करुन लाईटिंगवाला आटोपेतो बहुतेक लोक पावभाजीच्या तर काही मोजके लोक बुके धरले अवघडलेले हात मोकळे करायला लेखकाच्या दिशेने धावले. आम्ही मैत्रिणीच्या दिशेने धावलो. हौशी लेखक आता आयेस्बीएनवाले ऑफिशीयल लेखकराव किंवा निवेदकाच्या भाषेत (डायरेक्ट) ’साहित्तिक’ झाले. प्रकाशन सोहळा समाप्त झाला.
---------
आता एवढ्या खर्चिक प्रकरणापेक्षा फ्री एफबी लाईव्ह येणं आणि तीन तास ते प्रकाशन प्रकरण अटेंड करण्यापेक्षा लाईव्ह कवितेला लाईक ठोकून पुढे स्क्रोल करणं यातलं दुसरं कित्तीतरी सोपं आहे. शिवाय सध्याच्या लॉकडाऊन क्र. य आणि भविष्यातील कोरोनोत्तर काळात प्रकाशनापासून बहुतेक सगळंच ऑनलाईन होण्याची शक्यता आहे. कवितावाले निदान ५-१० मिनीटात तुम्हाला मोकळं करतात. गद्यवाले एकदा आले की तास-तासभर सोडणार नाहीत (वि.सू :हाय, नमस्कार, वॉचींग असं लिहून नंतर पळून जाणार्यांना ते ओळखून असतात) त्यामुळे गद्य मंडळींची बाजू घेण्यात तसा काहीही अर्थ नाही. (हे वाचणारे तुम्ही बावनकशी कॅटेगरीवाले आहात, ’ते’ वेगळे आहेत तेव्हा मला उगाच अनफ्रेंड करु नये 🙂 ) तुम्ही पूर्ण पोस्ट वाचावी म्हणून हे कन्क्लुजन शेवटी लिहिलं. बाकी कै नै.

Monday, April 20, 2020

पिंकीपॉलिसी


सध्या लॉकडाऊनमुळे सगळेच आपापल्या घरातल्या मदतनीसांना ’मिस’ करतायत. आम्हाला मात्र आमच्याकडे कामाला असलेल्या पिंकीची आठवण येते ती वेगळ्या कारणासाठी. तिने आम्हाला एक असा मंत्र दिलाय की जगणं एकदम सोपं झालंय. आम्ही त्याला #पिंकीपॉलिसी म्हणतो. :-)
------------------------------------ 

’काय गं तू, दोन दिवस आली नाहीस. आधी कळवलं पण नाहीस तू.’
’हो नं, मला दोन दिवस जमलंच नाही यायला आणि मी कळवलं पण नाही.’
’पण मागच्या वेळेला म्हटलं होतं नं मी, निदान फोन करुन कळवत जा म्हणून..’
’हो नं, मागच्या वेळेला म्हटलं होतं तुम्ही’
’मग तरीही केलाच नाहीस तू फोन’
’हो नं, केलाच नाही मी फोन’

एव्हाना माझा संयम संपून मी माझ्या कामाला तरातरा निघून जाते आणि पिंकी शांतपणे कुंचा हातात घेऊन झाडू लागते. पिंकी आमच्याकडे घरकामाला येते. म्हणजे आपण तिला पिंकी म्हणूया. तिशी-पस्तीशीची, बेताच्या उंचीची, काहीशा गबदुल शरीराची, पाण्यात काम करावं लागतं म्हणून घोट्याच्या बरीच वर साडी गुंडाळणारी, ठीकठाक नाकीडोळी असलेली सावळी पिंकी. साधारणत: दुपारी दुबुक दुबुक चालत येते, तिला वाटेल तेव्हा आणि नाही येत नको वाटेल तेव्हा. दहावी झाली म्हणते. सहसा शुद्ध भाषेत बोलते. काम करत असताना टीव्हीवर जाहिरात दिसली तर खांद्यावर कुंचा किंवा हातात बादली घेऊन संपेपर्यंत टक लावून बघते. तिच्या घरी डिश टीव्ही आहे. ती रात्री रोज हिंदी 'सिरेल' आठवणीने बघते. बाकी जगाशी तिला घेणंदेणं नाही. राहत्या गावाइतपतच तिचा भूगोल मर्यादित आहे. तिच्या वॉर्डाच्या नगरसेवकाचं नाव तेवढं तिला माहित आहे. तिचं जीके इथेच संपतं.

तर तिच्या हातात कुंचा पाहून माझी वेलकम सिनेमातली ’कंट्रोल ..मोहिनी ..कंट्रॊल’ अवस्था होते. मी तिला २९५ व्या वेळेस म्हणते
’अगं आधी कपडे भिजव, मग झाडपूस कर, मग भांडी घास, तोवर कपडे मुरतात, तुझंच काम सोपं होतं. किती वेळा सांगू.’
’हो नं, तुम्ही नेहमी सांगता’
’बरं, मी कपडे भिजवून ठॆवावे तर तू केव्हा येणार, येणार की नाही खात्री नसते’
’हो नं, माझी खात्री नसते’
मी पुन्हा कामाला मनात आकडे मोजत तिथून जाते. इकडे पिंकीने कपडे भिजवले असतील याची खात्री नसतेच.
पण पिंकीच्या अशा स्टँडमुळे तिच्यासमोर दुर्वास मुनी देखील शांत झाले असते. तुम्ही लाख भांडायचं ठरवा पिंकीशी, ती ’स्थितप्रज्ञ दर्शन’ किंवा ’स्थितप्रज्ञाची लक्षणं’ असलं काही न वाचताच कोळून प्याली आहे. ती उर्मट नाही, ती मूर्खही नाही. ती न्यूट्रल गिअर मध्ये जगते. तिला मी अखेर शरण जाते याचा नवरोबांना फार आनंद होतो. मग ते अधूनमधून चहा केला आणि ती काम करत असेल तर तिचाही करतात. असं इतर घरात होत नसावं. तिला तेव्हा स्पेशल वाटतं. ती ओच्याला हात पुसून आत येते ,पंखा मोठा करते आणि त्याखाली निवांत फतकल मारुन त्यांना बशी मागते आणि फुर्र करुन चहा पिते. साहेबांची कपबशी विसळून टाकते. मी तिला चहा देते तेव्हा ती फक्त आपली कपबशी विसळून कामाकडे वळते. चहा करणे हे बाईमाणसाचे कामच आहे, असे भाव तिच्या चेहर्‍यावर असतात. सणावारी जेवताना आमटीचा घोट घेऊन ती माझ्याकडे एक सूचक (म्हणजे कायच्या काय गुळचट लागतंय हे) कटाक्ष टाकते. तिला त्यात ठेचा हवा आहे हे मला कळते.
’इतकं तिखट खाऊ नये पिंकी’ या माझ्या अनावश्यक वाक्यावर ती
’हो नं इतकं तिखट खाऊ नाई’
म्हणत शांतपणे आमटीत ठेचा मिसळते. ती तिच्या नादात जगते .तिचं एरवी अन्नाकडे लक्ष नसतं. पैशाकडे नसतं. कपडे धुताना चुकून खिशात किंवा घरात कुठे सापडले तर ५ रू असो की ५००, ती आणून हातात देते.

दारुड्या नवर्‍याच्या मारहाणीला विटून लहान मुलासह ती माहेरी परत आली आहे. तिची आई समजूतदार असल्याने तिला पुन्हा त्याच्या तोंडी न देता घरी राहू दिले गेले आहे. आई इतर घरी कामाला जाते. वडिलांना सुदैवाने व्यसन नाही. भाऊ कोणत्याच कामावर टिकत नाही, मग गावभर उंडारतो. त्याने घरी राहू दिल्याच्या बदल्यात पिंकी त्याची आणि घरची बहुतेक कामं करते. दमून आजारी पडते. सारखं पाण्यात काम म्हणून सर्दी होते. मग ती दांड्या मारते. मला हे बघवलं नाही की मी तिला, भावाला तरी आपली कामं स्वत: करायला लाव, असं सांगते. पिंकी ’हो, सांगते’ म्हणते. तिला त्याशिवाय पर्याय नाही हे आम्हा दोघींना माहित असते. तिचा मुलगा कधी तिच्याबरोबर आला आणि खाऊ घेऊन टीव्ही समोर बसला की ’आमच्या टीव्ही वर मामा फक्त ’गाने अन् पिच्चर’ लावतो’ असं सांगतो. मी तिला आमच्या घरातला पेपर तरी वाचत जा म्हणते पण चळवळी आणि राजकारण समजलं तरी तिच्या जगण्य़ात फरक पडणार आहे का या विचाराने अस्वस्थ होते. त्यापेक्षा आपण तिच्याशी कसं वागतो यावर तिची आणि कदाचित तिच्या मुलाची नजर तयार होणार आहे, फरक पडलाच तर त्याने पडणार आहे या विचाराशी मी येऊन थांबते. नकारात्मक बातम्यांनी आपलं डोकं खराब झालेलं असताना तिचा कोरा चेहरा पाहून she doesn't know that she doesn't know हेच बरं आहे असं मला वाटू लागतं.
मग वाटतं आपल्याला तरी सगळं जग कळलं आहे का? कळू शकणार आहे का?
जगात कुणाच्या तरी दृष्टीने आपलाही आयक्यू आणि भूगोल पिंकीएवढाच असू शकेल. जाऊदे.
तिला बचत करायला मात्र शिकवली आहे. मुलाच्या शिक्षणासाठी आरडीत पैसे जमा करायला हवे एवढे तिला कळते. पगाराचे बहुतेक पैसे, बोनसचे पैसे ती जमा करते.

मी घरी नसते तेव्हा बाहेरुन आल्यावर घर व्यवस्थित पुसलेले नाही आणि कोपरे नीट झाडलेले नाहीत हे मला दिसते. तेव्हा तिचा कपडे धुण्य़ाचा म्हणजे दोनदा पाण्य़ातून कपडे बुचकळून काढून थोडा झटका देऊन गळत्या धारेसह दोरीवर भिरकावण्याचा प्रकार सुरू असतो. मी तिला आत बोलावून ३४३ व्यांदा सांगते.
’हे बघ, स्वत:भोवती गिरकी घेऊन जितकं झाडलं जाईल तितकच तू झाडलयंस, कोपर्‍यात केर तसाच आहे.’
’हो नं तसाच आहे’
’आणि नीट पुसण्याचा तर प्रश्नच नाही’
’हो नं, आज मी नीट पुसलंच नाही’
’मग झाड नीट’
’हो झाडते’
’आता ओल्या फरशीवर कसं झाडशील?’
’हो नं ओल्या फरशीवर कसं झाडणार!’
’जाऊदे, मी घेईन नंतर कोपरे झाडून. उद्यापासून झाडत जा आता नीट’
’हो, घ्या झाडून, उद्यापासून झाडत जाईन नीट’

या पिंकी पॉलीसीने आमचं लाईफ सोप्प करुन टाकलंय. डेल कार्नेगी किंवा रॉबीन शर्मा वाचून किंवा शिवानीदीदीचे व्हिडिओ पाहून मला जे जमलं नाही ते सगळं या पिंकी पॉलीसीमुळे जमू लागलं. यामुळे प्रश्न सुटतोच असं नाही तरी वाद नाही की ताण नाही.
उदा: मुलाने वैतागून म्हटलं," अर्र भेंडीच का आज, किती बोर भाज्या करतेस ग तू"
तर पूर्वीची मी- "मी तरी रोज काय वेगवेगळ्य़ा भाज्या करणार, सगळ्या भाज्या खायला हव्या, उद्या होस्टेलला गेल्यावर काय करशील, ज्यात त्यात पनीर मी बिलकुल घालणार नाही. मुळात ही भेंडी पण तुला पंजाबी मसाला आवडतो म्हणून तो घालून केलीय तरी काय कुरकूर आहे. स्वत: करत जा म्हणजे कळेल, पानात पहिलं वाढलं तेवढं मुकाट्याने खायचं ...ब्ला ब्ला ब्ला...."
आताची मी - ’हो नं, आज भेंडीच केली मी’

नवरोबांशी वाजणं बंद झालं नसलं (नाहीतर मज्जा काय) तरी वादंग संपले.
उदा: पाडव्याला गुढी उभारणे
पूर्वीची मी- ११ वाजायला आले, लोकांनी गुढ्या उभारुन दोन तास झाले तरी आपली गुढी अजून उभारलेली नाहीये. आता जेवणं झाल्यावर दुपारी उभारणार का! ५ मि. च्या कामासाठी किती वेळा आठवण करुन द्यायची. मुळात दर वेळी का आठवण करायची मी. स्वत:हून कधी एक गोष्ट करायची नाही. मी आज गोड करायला विसरले तर चालेल का? मग मी म्हणू का आठवण का नाही केली. ब्ला ब्ला ब्ला....
पूर्वीचे नवरोबा- नवर्‍यानेच गुढी उभारली पाहिजे असं ब्रह्मवाक्य कुठे लिहिलं आहे का? एवढी टाईम्स स्क्वेअरला एकटी फिरणारी तू (हे ध्रुवपद म्हणजे एक वेगळी स्टोरी असते) तुला साधी गुढी उभारायला माझ्यावर अवलंबून कशाला असायला पाहिजे! समजा ११ नंतर उभारली गुढी, तर पाडवा होत नाही की काय साजरा..ब्ला ब्ला ब्ला...
आताची मी- गुढी उभारायची राहिलीय, ११ वाजायला आले.
आताचे नवरोबा- हो नं, ११ वाजायला आले. उभारतो.
विषय समाप्त. 

लॉकडाऊनमुळे घरातले वादविवाद वाढले असतील, असतील काय असणारच. मग ही पिंकी पॉलीसी वापरुन पाहा. :-)

Wednesday, February 5, 2020

लेखकराव alias ’साहित्तिक’

मी अगदी योग्य वेळेला हॉलमध्ये प्रवेश केला. जिच्या हस्ते पुस्तक प्रकाशन होतं ती माझी नागपूरची  लेखिका-कवयित्री मैत्रिण बोलायला नुकतीच उभी राहिली होती. चला, म्हणजे आधीचे सोपस्कार झाले असावेत. सुटले! इकडे वधूपित्याने म्हणजे पुस्तक लिहिणार्‍या नवलेखककाकांच्याच्या मुलाने आमचे मनापासून स्वागत केले. माझ्यासोबत माझी आणखी एक मैत्रिण होती. अशा कार्यक्रमात धीर द्यायला सोबत कुणी असलेले बरे असे आम्हा दोघींचेही मत होते. आम्ही तिथे (ठरवून) उशीरा टपकल्याने कसनुसं हसत चटकन मागच्या ओळीतली कोपर्‍यातली खुर्ची धरली. स्टेजवरच्या लेखिका मैत्रिणीने माझ्या अपेक्षेला न्याय देत छान मुद्दे मांडले. सृजन म्हणजे काय, लिहिण्याची उर्मी हा काय प्रकार असतो, अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय, सद्यस्थितीत लेखकाने स्वत:ला कसं घडवावं वगैरे. लेखकाच्या पुस्तकातल्या मर्यादा आणि बलस्थानंही तिने सांगितली. 

बारकाईने ऐकल्यावर जे लक्षात आले ते असे - पुस्तक एकदम बंडल असून लेखक अद्याप साहित्याच्या बालवाडीत आहे. रिटायर झाल्यानंतर त्यांना कशात तरी गुंतवून ठेवण्यासाठी त्यांच्या कथांचं पुस्तकबिस्तक काढून खूश करायची आयडिया पोराला सुचली असावी. इकडे लेखिका मैत्रिण आता भाषणात रंगली आणि अनुभव, अनुभूती आणि त्याची परिष्कृती कशी असावी असं लईच उच्च उच्च बोलू लागली. लेखकाचं समाजाशी नातं, समष्टीशी नातं वगैरे. तिच्याच बोलण्यातून अंदाज आला होता की ’उतारवयातल्या पुरुषाला कोवळया वयात आवडलेली सुबक ठेंगणी वयाच्या या टप्प्यावर पुन्हा भेटते’ या एकमेव थीमभोवती कथा(!) रचलेल्या होत्या. कसलं डोंबलाचं सृजन, कसला समाज अन कसली समष्टी. पण ती बिचारी प्रमुख पाहुणी असल्याने न बोलून करते काय! तरी प्रसंगाचे औचित्य चतुराईने सांभाळून तिने नवलेखक-काकांना पुढील लेखनासाठी शुभेच्छांसह काही स्पष्ट सूचना दिल्या आणि बोलणे संपवले.


उपस्थितांमधल्या बहुतेक बायका, काकांच्या नात्यातल्या असाव्यात. संक्रांतीचे दिवस असल्याने इकडून परस्पर हळदीकुंकवाला जाऊ या, या हिशेबाने त्या खच्चून नटून आल्या होत्या. त्या चुळबूळ करु लागल्या. बहुतेक पुरुष हे लेखककाकांचे रिटायर मित्र दिसत होते. रविवारची दुपार जरा बरी गेल्याने - तेवढाच एक दिवस कटला न बा, या आनंदात ते ऐकण्यात रमले होते. नातलगांची लहान मुलं त्या छोटेखानी हॉलच्या एका कोपर्‍यात शिवाशिवी खेळू लागली. भरपूर मेकअप केलेली एक युवती त्यांना दटावू लागली. युवतीने एक लांबलचक बट केशरचनेच्या बाहेर काढून सेट केली होती, ती तशीच राखण्याकडे तिचं सगळं लक्षं लागलं होतं. निवेदकाने माईक ताब्यात घेऊन लेखिका-मैत्रिणीला धन्यवाद दिले व ’रंजक भाषण आपुले, कान अमुचे तृप्त जाहले..’ तत्सम काहीतरी यमक जुळवले. ह्यांचे नक्कीच ’अतृप्तीच्या वाटेवर’ छाप नावांचे एक दोन कवितासंग्रह प्रकाशित झाले असणार.

त्यांनी आता मंचावरच्या मान्यवर डॉ. ना पाचारण केले. ’मला फक्त पेशंटशी बोलता येतं बुवा पण तरी मी आपले चिमखडे (!) बोल (हा, ते बालरोगतज्ज्ञ आहेत) सादर करतो’, असे सांगून डॉ. नी आयक्यू आणि इक्यू यातला फरक सांगितला.’भावनेविना लेखन शक्य नसते. त्यामुळे लेखक व्हायचं तर एकवेळ आयक्यू नसला तरी चालेल (बापरे!) पण तुमचा इक्यू चांगला हवा’ अशी मांडणी केली. 
मग निवेदकाने त्यांना, म्हणजे निवेदकाला फक्त आयक्यू असूनही (किती तो आत्मविश्वास!)) काकांनी (उत्सवमूर्ती लेखक- काका) नोकरीसाठी मदत केल्याबाबत त्यांचे आभार मानले व मंचावरील पोलिस अधिकारी म्याडमना बोलण्यासाठी पाचारण केलं. म्याडम चांगल्या सणसणीत व्यक्तिमत्वाच्या होत्या. कुर्त्याच्या बाह्या दुमडत दमदार पावलं टाकत माईकपाशी येत एक कडक लुक देत त्या म्हणाल्या," मघाशी प्रकाशक म्हटले, आम्ही प्रोत्साह्न देतो नवीन लेखकांना तर आता मला पण माझे पोलिस विभागातले भन्नाट अनुभव लिहावेसे वाटून राहिले आहेत." 
जर या काकांचं पुस्तक निघतं तर माझं तर निघूच शकतं असा त्यांचा सूर होता. पुढे त्या म्हणाल्या ’काकांचे गुण किती सांगावे (त्यांना एकही आठवेना) तितके कमीच.’ काकांनी बालपणी खेळवलं असणार. त्या घरोब्याच्या संबंधांमुळे नाईलाजाने म्याडम या ठिकाणी उपस्थित झाल्या असाव्यात. 

डॉ, पोलिस या दोन असंबद्ध व्यक्तींनंतर आता सुसंबंद्ध व्यक्तिला आमंत्रित करण्यात आलं. काका ज्या संस्थेतून रिटायर झाले तिथल्या मराठीच्या म्याडम. माझ्या व शेजारी बसलेल्या मैत्रिणीच्या पोटात गोळा आला. म्याडम चुरगाळलेला कागद आणि रुमाल घेऊन माईकजवळ गेल्या, त्या घाबरलेल्या असल्यामुळे दोन्ही खाली पडलं, त्या भीतीवर मात करत कागद उचलून सरळ करुन ओठांवरून जीभ फिरवून म्याडमनी एकदम तारस्वरात बोलायला सुरुवात केली. काकांच्या लेखन कारकीर्दी(!)ला शुभेच्छा देताना अधूनमधून त्यांनी स्वरचित कवितेच्या २-२ ओळी पेरल्या होत्या. ’व्हावे लेखन इतुके की आभाळाने यावे खाली.. (ऑ!) नंतर काही तरी ’ही तर कथुली झाली’ असे यमक होते. शेवटची लाईन दोनदा म्हटली की ती कविता असते असा इशारा कळून आम्ही श्रोते इमानेइतबारे टाळ्या वाजवत होतो.

प्रमुख पाहुणी लेखिका मैत्रिण तिच्या मंचावरच्या स्थानाला साजेसा गंभीर चेहरा ठेवून बसली असली तरी माझ्याकडे लक्ष जाताच अवसान गळून तिला खुदकन हसू फुटे. या बिकट स्थितीवर उपाय म्हणून तिने हॉलमधील झुंबरावर नजर केंद्रित केली. त्यामुळे ती उर्ध्व लागल्यासारखी दिसू लागली. आता संस्थाध्यक्ष उठले, त्यांना बोलावणं तर कंपलसरीच असणार काकांना. काकांनी आपल्या कथांचे तुकडे स्फुरले तसतसे यांना ऐकवले असावे, त्याचा पुरेपूर सूड अध्यक्षांनी आपल्या भाषणात घेतला. मला तर कोण कोणास काय म्हणाले काहीही कळलं नाही. निवेदकाने म्हटले, "यांच्या भाषणावरुन ते संस्थेत किती जबरदस्त इंटरव्ह्यू घेत असतील याची कल्पना तुम्हाला आलीच असेल." हे कौतुक होते की टोमणा या गोंधळात अध्यक्ष आणि श्रोते असतानाच त्यांनी ’आणखी कोणाला मनोगत व्यक्त करायचे असल्यास यावे’, असे म्हटले. दरम्यान मागच्या काउंटर्सवर आगमन झालेल्या पावभाजीचा खमंग सुवास दरवळू लागल्याने आणि शिवाशिवी खेळणार्‍या मुलांचा सूर टीपेला पोचल्याने आता कुणीही बोलायला उठलं नाही.

काकांचा मुलगा आभारप्रदर्शनाला उभा राहिला. कार्य चांगलं पार पडल्याचे कृतकृत्य भाव चेहर्‍यावर लेऊन तो उभा राहताच मी ’आभाराचा भार कशाला अन शब्दांचे हार कशाला’ या आभारवाल्यांच्या अत्यंत आवडत्या ओळी ऐकायला कान टवकारले आणि माझा अजिबात अपेक्षाभंग न करता त्याने त्या ओळी म्हटल्याच. या ओळी न म्हणणारा आभारवाला आमच्या विदर्भात दाखवा अन हजार रुपये मिळवा. मग आभारयादीला संस्थाध्यक्षांपासून सुरुवात करुन लाईटिंगवाला आटोपेतो वेळात वेळ काढून आलेले बहुतेक लोक पावभाजीच्या तर काही मोजके लोक बुके धरले अवघडलेले हात मोकळे करायला काकांच्या दिशेने धावले. आम्ही लेखिका- मैत्रिणीच्या दिशेने धावलो. 
काका आता आयेस्बीएनवाले ऑफिशीयल लेखकराव किंवा निवेदकाच्या भाषेत डायरेक्ट ’साहित्तिक’ झाले. 

Sunday, December 15, 2019

नसतोस घरी तू जेव्हा..

सोमवारची धावपळीची सकाळ. रोजच्यासारखी पीकेव्ही मधून फिरुन आले. तिथे आज मस्त दाट धुकं होतं, परत येईतो त्यात उगवत्या सूर्याचा केशरट प्रकाश मिसळला होता, मुख्य चौकात दोन मैत्रिणी अचानक भेटल्या, एक मोर अगदी जवळून दिसला आणि तिथल्या पुलावरच्या भाजीवालीकडे ताजी कोथिंबीर फारच स्वस्त मिळाली, चला आता कोथिंबीर समोसे करता येतील, त्यामुळे दिल एकदम गार्डन गार्डन हो गया था. छान मूडमध्ये घरात शिरताना वळून फाटक बंद करायला गेले. समोर कुणीतरी नवीन भाडेकरु बाई राहायला आली आहे. तिने ’आली मोठी स्टाईलमारु, माझ्याकडे नसतो फिराबिरायला रिकामा वेळ पण घर पाहा माझं, चकाचक असतं’ असा मला लुक कम कॉम्प्लेक्स देऊन गॅलरीवर हातातल्या कापडाचे फटके मारणं सुरू ठेवलं. सायन्स के बोझ का मारा लेक एका क्लासहून आला होता आणि दुसर्‍या क्लासला जायच्या गडबडीत होता. आधी घाईने त्याला नाश्ता करुन दिला. तेवढ्या गोंधळात जोकरच्या जागी कोणता नवा कलाकार घेतलाय याचा व्हिडिओ त्याच्या फोनवर त्याच्या आग्रहास्तव हातातल्या चिमट्यात पातेलं तसंच पकडून पाहिला. त्याला बाय करून वाचायच्या राहिलेल्या कालच्या पुरवण्या जमा करुन ठेवल्या. आजच्या हेडलाईन्स पाहिल्या. समोरच्या बाईचा फटक्यांचा म्हणजे साफसफाईचा आवाज ऐकून अचानक आपले अंगण पाचोळ्याने भरल्याचे आठवले आणि तरातरा झाडायला गेले. अंगण चकाचक झाल्यावर तिच्या गॅलरीकडे हळूच एक कटाक्ष टाकला पण ते पाहायला ती एरवी गॅलरीतच पडीक असलेली बयाबाई नेमकी गॅलरीत थांबली नव्हती, जाऊदे. मग आजची कामं क्रमाने आठवत मस्तपैकी कॉफी करून घेतली आणि ’त्याची’ कडकडून आठवण आली....  म्हणजे मोबाईलची.

चार्जिंगला लावलेला नव्हता. उशीखाली राहिला का! नाही. लेकाच्या टेबलवर नव्हता. किचनमध्ये.. नाही. पेपरच्या ढिगाखाली! नाही. मी अंगण झाडलं तिथे कुठे.. कचर्‍याच्या डब्यात नाही ना टाकला पाचोळ्याबरोबर! ते पण उपसून पाहिलं.. नाही. हे पाहा, मी फिरुन येताना अशी गाडी आत आणली मग शूज काढले मग .. ज्या क्रमाने जे केलं तसा अ‍ॅक्शन रिप्ले केला. पण नाही. . ट्रॅक पँटच्या खिशात! नाही. वाटेत खिशातून नाही ना पडला. की फिरताना पीकेव्ही मध्ये कुठे पडला. पण पडला तरी आवाज न यायला तो काय रुमाल आहे का! कुणीतरी आवाज देऊन सांगितलं असतं की. आणि आज चालताना मी गाणी ऐकली नाहीत म्हणजे नेला होता की नाही मुळात?

तेवढ्यात सासूबाई गडबडीने माझ्याजवळ येत म्हणाल्या, ’आज मोबाईल डोक्याशी ठेवून झोपू नकोस, नासाने सांगितलंय, कॉसमॉस किरणं मध्यरात्री पृथ्वीवर येणार आहेत, (तुझ्या आधीच सरकलेल्या) मेंदूला चांगलं नाही म्हणे. हे बघ मला व्हॉट्सअ‍ॅपवर आलं आहे’. मी त्यांना २३५ व्यांदा शांतपणे सांगितलं की हे काही खरं नसतं.
’अगं पण नासाने का सांगितलं मग.’
’नासाबिसाने काही सांगितलेलं नसतं ओ, लोक नासा, नाना पाटेकर असली नावं टाकून काय वाटेल ते लिहितात.’
’पण लोक उगाच कशाला असं करतील!’
माझे म्हणणे फारसे न पटून त्या पुन्हा नासा किंवा नाना पाटेकरांनी आणखी काय काय म्हटलंय ते वाचण्यात गढून गेल्या. मी त्यांना थांबवून त्यांच्या फोनवरुन स्वत:ला फोन लावला आणि गुप्तहेरासारखी दबकी पावलं टाकत टवकारलेल्या कानांनी घरभर हिंडले. घरात कुठेही रिंग ऐकू येईना, वरुन हे ऐकू आलं ’इस समय आपको कोई उत्तर नही दे रहा है, कृपया थोडी देर बाद पुन: प्रयास करे’

चोर कशाला देणार म्हणा उत्तर. म्हणजे, अरे देवा! चोरीला गेला असेल की काय माझा मोबाईल! त्यातून नवा कोरा. जुना अगदीच हँग व्हायला लागला, इतका की लोक दयार्द्र नजरेने पाहू लागले म्हणून नुकताच घेतलेला. लेटेस्ट. चांगला ४८ एमपी कॅमेरा असलेला. नवर्‍याला ’भला इसकी रॅम मेरे रॅम से जादा कैसे’ असा हेवा वाटायला लावणारा.
काय काय महत्वाचं होतं त्यात, ते कुणाच्या हाती लागेल का! महत्वाचे आयडी पासवर्ड कोड भाषेत लिहुन स्वत:लाच मेल करुन ठेवलेत. पण इतके कोड भाषेत की मलाच आपण हे काय लिहिलंय ते काही वेळेला कळत नाही तर इतरांना काय कपाळ कळणार! (परवा नेटबँकिंगच्या पासवर्डचं असंच झालं, आठवेचना. सुरक्षिततेतची खबरदारी म्हणून पासवर्ड सेव्ह्ड ठेवला नव्हता. कोड भाषा कळेचना मग स्वत:शी क्वीझ खेळत बसण्यापेक्षा ’फर्गेट पासवर्ड?’ला शरण गेले. त्यात त्याने जो गुप्त प्रश्न विचारला त्याचंही उत्तर आठवेना, मेमरी आहे का खोकं असं झालं अगदी, शेवटी ओटीपी बीटीपी, दादा, पुता करून एकदाचा तो पासवर्ड नवा केला. आता पुन्हा तो लक्षात ठेवा. पासवर्ड कसा असावा यावर लेक्चर देणं सोपं, तो लक्षात ठेवणं महाकठीण.चला, निदान कॉंटँक्ट्सचं बॅकअप आहे. पण केव्हाचं तर १९४२ सालचं म्हणजे नंतर अ‍ॅड केलेलेल कॉंटँक्ट्स गेले की!! अ‍ॅप्स पण पुन्हा इन्स्टॉल करावे लागतील. करु काय ते पण आजच्या कामांचं कसं करायचं! आणि मेल ऑटोलॉगइन आहे. बापरे, असा कसा मॅडसारखा ऑटो मोड ठेवला मी, लोकांना सायबर सिक्युरिटीचं ब्रह्मज्ञान देता देता. पण ओके, त्याचा आधी पासवर्ड बदलते लॅपटॉपवरुन. चोर भी क्या याद करेगा! काही हाती नाही लागू देणार त्याच्या. अर्र पण इतर काही फ्री अ‍ॅप्सचे अ‍ॅक्सेस मिळतीलच आणि गॅलरीला पण लॉक नाही. फोटोचा गैरवापर केला तर! त्याला शिकवीन चांगलाच धडा. फिंगर लॉक आहे की, फिकर नॉट. बरं आत्ता फोन ब्लॉक करावा का! पोलीस कम्प्लेंट करावी तर काही तर आठवायला हवं नं! IMEI ट्रॅकर साठी तो पण आठवत नाहीये. डायरीत लिहिलाय वाटतं. नाही दिसतंय! अ‍ॅमॅझॉनच्या ऑर्डर इनव्हॉइस मध्ये मिळेल की. अरे वा अपना दिमाग भी चाचा चौधरी की तरह कंम्प्यूटरसे तेज चलता है. शंभर प्रश्न डोक्यात फिरु लागले.

मग आठवलं, नवरोबांचा फोन दसर्‍याच्या झेंडू खरेदीच्या गडबडीत कुणीतरी मारला तेव्हा त्यांनी पोलिस कम्प्लेंट केली होती. दुसर्‍या दिवशी ते अपेक्षेने पोलीस स्टॆशनला गेले तर डंग डंग आवाज करत फिरणार्‍या पंख्याखाली धूळभरल्या खुर्चीत बसलेल्या एका पोलिसाने त्यांनाच उलट विचारलं, लागला का काही तपास फोनचा. एकूण पोलिस फार काही करतील अशी आशा ठेवणं वेडेपणाचं होतं. चला पुन्हा रिंग करुन पाहू, न जाणो पीकेव्हीतल्या कुणी तरी स्वत:जवळ उचलून ठेवला असेल. जगात चांगले लोक नक्कीच जास्त आहेत. रिंग जात राहिली आणि चक्क... नवरोबांचं अगदी गोड, हळू आवाजात ’हॅलो’ ऐकू आलं. युरेका ! म्हणजे फोन या बुवाकडे आहे तर, चला. मी सुटकेचा निश्वास सोडला. पण अ‍ॅ, हं किंवा ’काय आणायचंय’ च्या ऐवजी हॅलो ! आणि इतका गोड आवाज!

’माझा फोन तुझ्याकडे कसा आणि मी इतक्या रिंग दिल्या तेव्हा का नाही उचललास?’
’कामात होतो, आत्ता व्हायब्रेट झाला तेव्हा लक्ष गेलं. ते मी सकाळी, हे ते .. तू आधीच उठलीस अलार्मच्या, तर अलार्म बंद करुन जाता जाता तुला आणून द्यायला फोन खिशात ठेवला आणि चुकून तो माझ्याबरोबर आला.’
’तो चुकून आला!’
’नाही म्हणजे मी चुकून आणला.’
’मग असं कर्तरी प्रयोगात बोल ना!’
पुन्हा गोड स्माईल (स्वत:ची चूक असल्यामुळे अतिदुर्मिळ योग)
एकूण माझा मोबाईल आता पन्नास किमी लांब गेलेला होता आणि दुपारी दोन शिवाय परत मिळणार नव्हता.
माझ्या बाजूने इतकी शांतता पाहून त्यांनी विचारलं, ’खूप महत्वाचं काम राहून जाईल का तुझं? तुझा दहा हजार करोडचा टर्नओव्हर एकद्म खालीबिली येईल का! तसं असेल तर मी करतो काहीतरी व्यवस्था अर्जंट पाठवायची’. मी बीपी न वाढू देता म्हटलं, ’मी करीन लॅपटॉपवरुन काम. जाऊ दे.’

मी कामाला लागले. नेहमीपेक्षा दुप्पट वेगात काम झालं कारण उगाच इकडे तिकडे मोबाईलमध्ये डोकावण्याचा वेळ वाचला. कामाव्यतिरिक्त थोडं लेखन झालं. घरातलं काम आटोपलं. कालचं राहिलेलं एक काम सुद्धा पूर्ण झालं. कालच्या बाकी राहिलेल्या पुरवण्यातले काही लेख वाचून झाले. वेळच होत नाही हे जे आपण म्हणतो ते केवळ या कर्णपिशाच्चामुळे हे अगदी पटलं. खूप महत्वाचं काम असेल तर मी ’रीड ओन्ली’ मोड वर असते पण आपण उत्तर दिलं नाही तरी कामाशिवाय नासा आणि नाना पाटेकर छाप निरर्थक पोस्ट स्क्रोल करण्यात वेळ जातोच नकळत. त्यात ’थंड केलेल्या लिंबाचे परिणाम’ छाप मंद पोस्ट किंवा ’बायकांनी बुरखा घालावा म्हणजे त्या सुरक्षित राहतील’ छापाच्या मूर्ख पोस्ट वाचून टाळकं सरकतं ते वेगळच. नेट ऑफ करणं किंवा सोशल मिडिया उपास बिपास असले उपाय माझ्या अजिबात कामाचे नाहीत कारण माझं काम ऑनलाईनच करावं लागतं, रोजचे टास्क पण व्हॉट्सअ‍ॅप वरच असतात आणि चेक करुन तिथेच पुढचं लिहिलं जातं. पण या निमित्ताने बॅकअपच्या बाबतीत आपण अजून काही गोष्टी (इतरांना नेह्मी मारे सांगतो त्याच) लक्षात घ्यायला हव्या आहेत हे जाणवलं. गुगल ड्राईव्हवर प्रत्येक मह्त्वाच्या गोष्टीची कॉपी ठेवलीय की नाही हे चेक करायला हवं आहे हे नीटच कळलं. (ठेवली आहे, पण अपडेट केलीय का!) मोबाईल मला कंट्रोल करायला लागलाय हे ही लक्षात आलं. मोबाईल स्वेच्छेने काही वेळ बाजूला ठेवणं वेगळं, ते मला बर्‍यापैकी जमायला लागलं असलं तरी ’मोबाईल नाहीच आहे’ अशा परिस्थितीतही काही वेळ जगता येणं मुश्कील है लेकिन नामुमकीन नही याची पण खात्री पटली. हे चुकून झालेलं मॉक ड्रील बरीच अक्कल शिकवून गेलं.

२ वाजले. मोबाईलसह त्याला ’चुकून घेऊन जाणारा बुवा’ घरी पोचला. आज दुधी भोपळ्याची भाजी असूनही त्याच्या चेहर्‍यावरचे स्मित हास्य लोप पावले नाही.
’काय मग कसा गेला अर्धा दिवस! तुझ्याशी संपर्क न झाल्याने शहा आणि मोदींचे काही निर्णय पेंडिंग तर नाही ना राहिले!’
मी ते काही मनावर न घेता.. ’छान गेला, भरपूर कामं झाली माझी. एकदोन कामं अडून राहिली खरी पण त्यामुळे काही प्रलय नाही आला. ती आता करता येतील.’
’अरेच्चा, मला वाटलं की तू आता तुझी किती अडचण झाली याचा नॉनस्टॉप पाढा वाचणार. इतकी कूल राहिलीस म्हणजे नवलच आहे.’
आता त्यांना कशाला सांगा की एक तर या मोबाईलविना जगण्याच्या शॉर्ट ट्रेलरबद्दल मला त्यांचे खरं तर आभारच मानायला हवेयत आणि दुसरं ,सर्वात महत्वाचं ,पुढे माझ्याकडून ’चुकून’ असं काही झालं तर तेव्हा वापरायला हे ’कार्ड’ राखून ठेवलेलं बरं ना! :-)