Tuesday, December 31, 2024

नमामि गंगे - बनारस

काशी, बनारस , कँट आणि वाराणसी जंकशन अशी वेगवेगळी रेल्वे स्टेशन्स असतात हे नवं ज्ञान आम्हाला नुकतच प्राप्त झालं असलं तरी चालकांना नसावं. रोहिणीताई तर बनारस स्थानकावर उतरून उभी तरी चालकाचं म्हणणं ’वो वाराणसी जंक्शनही है’. माझे चालक आणि मी वाराणसी जंक्शनच्या बाहेर सस्पेन्स सिनेमातल्यासारखे खुणेच्या मारूतीच्या देवळापाशी एकमेकांशेजारी बसूनच एकमेकांना फोन करत शोधत होतो. मग दोघांनी हॅ हॅ हॅ केलं. आमची बनारस । सारनाथ । प्रयागराज । अयोध्या ट्रीप अखेर सुरु झाली होती. 

बनारसच्या कँटोन्मेंट भागातल्या  ’स्क्वेअर इन’ हॉटेलला चेक इन करून फ्रेश होऊन मी, दादा, रोहिणीताई आणि जिजाजी गप्पा मारत बसलो. मग दुपारी पुण्याहून मामा, मामी, मावशी आणि मंडळी आली आणि आमचा कोरम फुल्ल झाला. संध्याकाळी हॉटेलमध्ये पार्थ बावस्कर आणि शब्दामृत शिलेदारांनी सर्व पर्यटकांचं स्वागत केलं. आमचे शिलेदार जरा वयस्कर पण तुडतुडीत होते. आमची डझनाची गँग लक्षवेधी ठरली. पार्थने काशीविषयी थोडी माहिती दिली.....

"वारण आणि अस्सी या नद्यांच्या संगमामुळे वाराणसी नाव पडलं, बनारस हा अपभ्रंश. भारतातील किंबहुना जगातील हे सर्वात प्राचीन शहर असावं. १४ व्या शतकात भट्ट, मौनी, धर्माधिकारी आणि शेष अशी ४ मराठी मुलुखातली कुटुंब काशीत आली. भट्ट यांनी काशी विश्वेश्वराची स्थापना केली. पुढे औरंगजेबाने तोडून मशीद केली. तीच ज्ञानवापी." गागाभट्ट शिवराज्याभिषेकात मुख्य पुरोहित होते हे सर्वश्रुत आहे. पण ते या भट्टांचे नातू होते हे नवीन कळलं. पार्थची शैली रोचक आहे. नंतर त्यांनी वाल्मिकी रामायणाची प्रस्तावना केली. मुग्धा वैशंपायनने विषयानुरूप गीतरामायणातली काही गाणी सुरेख सादर केली. 

सोनलला (स्वाती या बालमैत्रिणीची बहिण) भेटायला आजची संध्याकाळच हातात होती. ती एका मेसेजवर धावत आली. जवळच्या मॉलमधल्या कॅफेत आमच्या जुन्या आठवणी आणि बनारसबद्द्ल गप्पा झाल्या. तिचा बनारसमध्येच जन्मलेला सॉफ्टवेअर इंजिनीयर नवरा त्या गावाशी आणि गंगामैयाशी एवढा एकरूप आहे की जोवर इंडस्ट्रीयल वेस्ट आणि शहराचं सांडपाणी गंगेत सोडणं आणि तिचं प्रदूषण थांबत नाही तोवर गोड खाणार नाही, अशी त्याने प्रतिज्ञा केली आहे. माणूस आपल्या भवतालाशी आतून किती जुळलेला असतो ! त्यातून काशीची महती काही वेगळीच. आता गंगा पूर्ण स्वच्छ झाली आहे या माझ्या गृहितकाला तिथे धक्का बसला. हे त्याने कुणा ’डिसिजन मेकर’ ला सांगितलं आहे का, तर नाही म्हणाली ती. गंगा स्वच्छ आहे ते हृषीकेश, हरिद्वारकडे. तरी आता कडक नियमांमुळे वाराणसीतली गंगा दिसते बरीच स्वच्छ. (मु. योगींनी तर पाणीच पिऊन दाखवलं कुंभमेळ्याच्या पूजनात) सोनलची सर्वांशी ओळख करून देऊन तिचा जेवणाचा आग्रह टाळून तिला निरोप दिला. 

पहिलवान लस्सी
सोनलने दिलेल्या लिंकमुळे दुसर्‍या दिवशी संध्याकाळी पुरूष मंडळी खाद्यभ्रमंतीला गेली असताना महिला वर्गाला खरेदीला जाता आलं. बनारस हे जणू कचोर्‍यांचं गाव आहे. सरसरीत आलूभाजीबरोबर उडदाच्या डाळीचा खमंग मसाला भरलेली बेडमी पुरी, नेहमीची खस्ता कचोरी, राजकचोरी, प्याजकचोरी वगैरे वगैरे. लिट्टीचोखासारखे प्रकारही नाश्त्यात असल्याने टमाटर चाट सोडलं तर बरंचसं चाखता आलं. शब्दामृतने एकदा पार्थ-मुग्धाला ऐकताना ’मलैय्यो’ हा फेटलेल्या क्रीमसारखा लागणारा पदार्थही खिलवला. तो कॅटरिनासारखा निघाला. दिसायला सुंदर पण बाकी आनंद. त्याची हवाच फार.
खरपूस कलाकंद घातलेली दाट पहिलवान लस्सी तेवढी खायची कम प्यायची राहिली होती ,त्याचेही कुल्हड त्यांनी वाराणसी सोडताना हातात दिले होते.



बनारसी साड्या मात्र कशा ओळखायच्या ते नाही कळलं. खरेदी म्हटलं की मला मानसी आठवते. सेल्समन आणि आपल्यामध्ये साड्यांचा डोंगर करून ती अचानक ’नाही बाई ,पण याचा रंग जाईलच’ म्हणत सेल्समनच्या ’नाही जात हो’ अशा गयावयांकडे दुर्लक्ष करून संन्यस्त चेहर्‍याने उठून जाऊ शकते. मामी, रोहिणीताई, स्वातीवहिनी मात्र निम्मा डोंगर घरी घेऊन गेल्या. त्या लखनवी कपडे पाहत होत्या तोवर दादा आणि मी बाजूच्या सोनलने सुचवलेल्या दुकानात गेलो. माझे निरिच्छ भाव पाहून सेल्समननी पण उपचार म्हणून काही बाही दाखवले. तोवर या तिघी इकडे आल्या आणि त्यांनी जी काय तुफान खरेदी केली की आता अवघे दुकान आमच्याकडे सस्मित मुद्रेने पाहू लागले, चाय तो पीनीही पडेगी म्हणू लागले. तासाने ठरवलेले रिक्शावाले बाहेर घायकुतीला आले. त्यांना आम्हाला त्यांच्या कमिशनवाल्या बुनकर गल्लीत न्यायचे होते. दरम्यान दुकानाचा मालक दरवाजा उघडून मामीला बाय करायला स्वत: बाहेर आला. अनंत पिशव्या सांभाळत आम्ही हॉटेलला परतलो. चिन्मयच्या लग्नापासून २,३ वर्ष साडी घ्यायची नाही हा पण मी एवढा बनारसला जाऊनही निभावला या मिनिमलिझमबद्दल महेश कौतुक करेल म्हणावं तर त्याने ते पण केलं नाही. जालिम दुनिया. जाताना आमच्या कॅबसदृश रिक्षावाल्याने, ’एवढ्या सुधारणा , विकास करूनही लोकसभेत मोदी इतक्या कमी मार्जिनने का निवडून आले ’यावर पानाचा मुखरस सांभाळत इत्यंभूत माहिती दिली होती. महामृत्युंजय मंदिराचे महंत मनीषजी विरोधी पक्षाच्या बाजूचे असल्याने बरीच मतं तिकडे गेली असा त्यांचा मुख्य मुद्दा होता. येताना मात्र बुनकर गल्ली प्लॅन रद्द झाल्याने ते जरा रुसले होते. 

पहिल्या दिवशी रात्री जेवून आम्ही काळभैरव उर्फ काशी का कोतवालच्या दर्शनाला गेलो. यांची परवानगी घेऊन मगच काशीविश्वेश्वराचे दर्शन घ्यायचे अशी प्रथा आहे. महादेवाच्या रूधिरापासून निर्मित काळभैरव काशीची सुरक्षा व्यवस्था पाह्तो अशी मान्यता आहे. हे मंदिर मध्यवस्तीत भरगर्दीत आहे. तुळशीबागेसारख्या चिंचोळ्या गल्लीत स्टेट बँकेत असतात तशा एस आकाराच्या लांबलचक दर्शनबारीत बराच वेळ उभं होतो. डावीकडे शेंदूर फासलेला काहीतरी आकार होता. तिथे "दर्शन लेकर अपने आपको महान समझे" असं लिहिलं होतं. काळभैरव दर्शन घेतलं. काशीचा प्रत्येक नवा प्रशासकीय अधिकारी इथे दर्शन घेऊन  मग कामकाजाला सुरुवात करतो असं ऐकलं आहे.

अगदी बारक्या बोळींमधून बाहेर पडलो. दुय्यम दर्जाच्या बनारसी साड्यांची लहानशी दुकानं खोबणीत बसवलेली होती. वाटेत पान बनारसवाला खाल्लं. प्रचंड गोड होतं. अकोल्याचा आमचा घराजवळचा पानवाला असा जबरदस्त काथ जमवतो त्यापुढे हे 'किस नागवेल की पत्ती' वाटलं. मघई पानाची अंगभूत चव एवढंच वेगळेपण, पण हे पान अमिताभने कौतुक केल्यामुळे अकल का ताला खोलण्यासाठी खाणं क्रमप्राप्त होतं. त्यात रंगीबिरंगी इतकं काय काय घातलं होतं की त्यावरूनच हा शेर असावा.. 
’ये इश्क़ भी कमबख्त बनारसी पान सा , एक ही पत्ते पर सजते है सारे जज़्बात”


३१ डिसेंबर म्हणजे वर्षाखेरीस सकाळी लवकर उठून ऐन थंडीत ४ वाजता काशीविश्वेश्वर दर्शनाला निघालो. रस्त्यावर सकाळी ११ वाजता असते तशी वर्दळ होती. फोन, चीजवस्तू शिलेदारबुवांकडे देऊन तपासण्या आटोपून आम्ही मंदिरात गेलो. चांगली गर्दी होती. आधुनिकीकरण झालेलं स्वच्छ प्रशस्त आवार पाहून बरं वाटलं. संथ स्वरातलं शिवमहिम्न स्तोत्र स्पीकरवर ऐकायला फार सुखद वाटत होतं. उत्तरेकडच्या भक्तीत जो एक कर्कशपणा आणि संगीताचा कल्लोळ जाणवतो तो इथे कुठेच नव्ह्ता. भट्ट यांनी काशी विश्वेश्वराची स्थापना केली हा उल्लेख वर आलाच आहे. परंतु ती पुनर्स्थापना आहे. ही विजीगिषु वृत्ती भारतीयत्वाचे केंद्र आहे.

ह्युएन त्सांगच्या म्हणण्यानुसार त्याच्या काळात (629 -645 CE) काशीमध्ये शंभरएक मंदिरं होती, परंतु मुस्लिम आक्रमकांनी ती पाडून मशिदी बांधल्या.  इ.स.पूर्व ११ व्या शतकात राजा हरिश्चंद्रनी बांधलेल्या किंवा नूतनीकरण केलेल्या विश्वनाथ मंदिराचा सम्राट विक्रमादित्य यांनी जीर्णोद्धार केला होता. महंमद घोरीने ११९४ मध्ये लुटून ते पाडलं. ते पुन्हा बांधलं गेलं, परंतु जौनपूरच्या सुलतान महमूद शाहने १४४७ मध्ये पुन्हा नष्ट केलं. १५८५ मध्ये राजा तोडरमलच्या मदतीने पं. नारायण भट्ट यांनी या ठिकाणी पुन्हा भव्य मंदिर बांधलं. १६३२ मध्ये शहाजहानने हे पाडण्यासाठी सैन्य पाठवलं पण हिंदूंच्या तीव्र प्रतिकारामुळे तेव्हा ते शक्य झालं नाही. मात्र काशीतली इतर ६३ मंदिरं पाडण्यात आली.

१८ एप्रिल १६६९रोजी औरंगजेबाने काशी विश्वनाथ मंदिर पाडण्याचा आदेश जारी केला.  कोलकाताच्या एशियाटिक लायब्ररीमध्ये हा हुकूम सेव्ह्ड आहे असं बातम्यांमध्ये ऐकलं आहे. त्यानुसार मंदिर तोडून ज्ञानवापी मशीद बांधण्यात आली. पेशव्यांनी पुढे दिल्ली जिंकली तेव्हा काशीमुक्तीचाही प्रयत्न केला. नानासाहेब फडणवीसांच्या काळात म्हणजे १७८० मध्ये अहिल्याबाई होळकरांनी ते मंदिर पुन्हा उभं केलं. नंदी मात्र तिथे आधीपासून होता. तो मशिदीकडे तोंड करून बसला आहे. त्यावरून तत्कालिन शिवलिंगाचं स्थान सहज लक्षात येतं. आज ते नंदीच्या पाठीमागे आहे. घुमट सोडला तर मशिदीच्या भिंती आणि खांब हिंदू पद्धतीच्या आहेत. आम्हाला तिथे सर्वेक्षणात सापडलेल्या शिवलिंगाचं दर्शन घेता आलं. बाकी न्यायालयीन वादातली मशीद अशी बंद करून ठेवली आहे की बाहेरून दिसतही नाही. मी नंतर जुने फोटो पाहिले तर त्यात मशीदीने बरीच जागा व्यापली खरं तर ढापली असून आजूबाजूची मंदिरं खेटून उभी दिसली. 

आम्ही विश्वेश्वराचे नंतर अन्नपूर्णेचे दर्शन घेऊन आलो तेव्हा पायात मोजे असून थंड चटके लागत होते. तरूण मुलींचा एक समूह बर्फासारख्या फरशीवर स्थिर बसून स्तोत्र म्हणत होता. कुठेही गलबला नव्ह्ता. भगवी कफनी ,जटा, कमंडलूधारी साधू गाभार्‍याकडे शांतपणे जा ये करत होते. ’अंगारा चाहिए’ असं मी एका सुरक्षा अधिकार्‍याला दिव्य हिंदीत म्हणताच आधी दचकून मग ’अच्छा भभूती' असा बोध होऊन त्या भल्या माणसाने मला कागदी कपभर अंगारा आणून दिला. 

श्री सत्यनारायण तुलसी मानस मंदिर
भगवान बुद्धांनी पहिला उपदेश केला तो काशीमध्ये, तीन तीर्थंकरांचा जन्म इथे, संस्कृतपीठं आणि नावाजलेली संगीत घराणी इथे, कबीरवाणीही इथूनच सगळीकडे पसरलेली.  तुलसीदासांनी रामचरितमानस रचलं ते ही इथेच. जेवून आराम करून श्री सत्यनारायण तुलसी मानस मंदिर बघायला गेलो. इथे अख्खे रामचरित मानस खालपासून वरपर्यंत दुमजली मंदिराच्या भिंतीवर लिहिलेले आहे. १९६४ मध्ये मूळ लहानशा मंदिराच्या जागी सुरेका नामक व्यापार्‍यानी हे भव्य सुंदर मंदिर बांधलं. शांत, प्रसन्न वाटलं इथे. वरच्या मजल्यावर
आकर्षण म्हणून काही हलते देखावे केले आहेत. ते फारच बाळबोध बालगणेश मंडळांच्या सजावटीसारखे वाटले. 
नंतर बर्‍यापैकी दूर चालत जाऊन संकटमोचन हनुमानाच्या दर्शनाला गेलो. संत तुलसीदासांनी १६ व्या शतकाच्या सुरुवातीला अस्सी नदीकिनारी स्थापन केलेलं हे मंदिर पावणारं मानलं जात असावं कारण सगळीकडे गच्च गर्दी. तुलसी मानस मंदिराच्या दसपट गर्दी असण्यामागे ’संकटमोचन’ हे विशेषण कारणीभूत असावं. गाभार्‍याकडे जाणारी हनुमानाच्या शेपटीसारखी लांब रांग बघून मी आणि मामीने तिथूनच नमस्कार केला. भाग्यश्रीला तिच्या पायावर आधीच आलेलं संकट मोचन करणं गरजेचं असल्याने ती आणि राजश्रीताई बाहेर थांबल्या. परतताना मिलिंदने कबीरचौरा मठाची गल्ली दाखवली. तिथे जायलाही आवडलं असतं.

अशा प्रचंड गर्दीत जेव्हा जेव्हा आम्हाला गाडी घ्यायला येई तेव्हा भर चौकात आम्हाला घेऊन सटकण्याच्या ऐन क्षणी पोलिस येऊन गाडीचा चटकन फोटो काढून जाई. चालकाचा स्वगत संताप आणि शिलेदाराशी वाद सुरु होई कारण दंड लागू होई. 

बीएचयू म्हणजे बनारस हिंदू विश्वविद्यापीठ कल्पनेपेक्षा खूप विस्तीर्ण निघालं. पं. मदन मोहन मालवीयांनी स्थापलेलं तिथलं शिवमंदिर १२ वाजता थोडा वेळ बंद होतं, हे विसरून रमतगमत पोचल्याने माझी दर्शनाची संधी गेली. विवेकदादा, वहिनी वगैरे दाराशी थांबून राहिले त्यांना मात्र छान दर्शन घडलं. 

मिलींदच्या आग्रहामुळे पुढच्या सकाळी लवकर उठून काशी कॉरीडॉर बघायला निघालो. अपेक्षेपेक्षा वाराणसी स्वच्छ आणि सुबक वाटली. प्रत्येक गावात जसा जुना आणि नवा भाग असतो तसं इथे शरीराच्या नसांसारख्या वारणसी गलियाँ आहेत आणि जरासे आधुनिक रस्ते आणि ब्रँडची दुकानंही. कँटोन्मेंट भागात उत्तम हॉटेल्स आहेत त्यापैकी एकात आम्ही उतरलो होतो. 

घाटालगतच्या रस्त्यांवर दुतर्फा फुलांची दुकानं झेंडू, शेवंती आणि गुलाबांनी ओसंडली होती. टपरीवजा हॉटेल्समध्ये रस्त्यालगत कचोर्‍या तळल्या जात होत्या. जिलब्या पाकात पडत होत्या. पॉश नसलं तरी कचरा नव्हता. केशरी, भगव्या पताका फडकत होत्या. काशीविश्वनाथाची नि:शुल्क रांग नजर जाईल तिथवर दिसत होती. हातात पूजेची परडी घेऊन भांगात ठळक केशरी सिंदूर भरलेल्या, हातभर बांगड्या घातलेल्या बर्‍याच बायका शाली गुंडाळून रांगेत उभ्या होत्या. 

बॅरीकेड्स मधून वाट काढत कॉरीडॉरकडे जाताना वाटेत ’प्रेमगली अती सांकरी ज्या मे दो न समायी’ ची आठवण व्हावी एवढ्या चिंचोळ्या गल्ल्या लागल्या. टपरीवजा दुकानातून चहाचा वास दरवळत होता. एके ठिकाणी कढईत मलैयो करणं सुरू होतं. 

यातून वाट काढत आम्ही चुकून पोचलो थेट मणिकर्णिका घाटावर. १७९१ मध्ये मणिकर्णिका घाट अहिल्याबाईंनी नव्याने बांधला आहे. समोरचं दृश्य बघून थबकले. तिथे कुणा अनामिकाची चिता पेटलेली. त्यातून बारीक ठिणग्या उडत होत्या. लाकडं जागोजागी रचलेली. अध्येमध्ये राखेचे ढीग. मध्येच एक घडीव देऊळ. पलीकडे अथांग वाहणारी गंगा. याचसाठी केला होता अट्टाहास! तसे हे घाट काशीत शिरताना रेल्वे पुलावरून पाहिले होते आणि धुक्यात वेढलेली गंगाही. अगदी नजरेआड होईतो, पण ते दर्शन गंगा अप्राप्य वाटणारं होतं. आता काही फुटांवर ती वाहत होती. संथपणे. ज्या गंगाजलाचा तांब्याचा गडू अनेक वर्ष घरी माहेरच्या देवघरात पूजला जायचा, जिच्याशी एक अनाम नातं होतं ती गंगा अशी जिवंत समोर दुथडी भरून वाहताना पाहून वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं वाटलं. 

इथे अंत्यसंस्कार केले तर मोक्ष मिळतो या मान्यतेमुळे लोक पूर्वी शब्दश: मरायला येत. गरिबांची प्रेतं केवळ चेहरा जाळून गंगेत सोडून दिली जात. निर्माल्य आणि पिंडदानाच्या कचर्‍याचे पायर्‍यांवर ढीग साठत. पूर्वी बनारस पाहिलेल्यांच्या अशाच आठवणी ऐकल्या होत्या.

आजची गंगा मात्र वेगळी आहे. घाट स्वच्छ आहेत. आजही मणिकर्णिकेवर एक तरी चिता सतत जळत असते. उत्पत्ती आहे तिथे लय असणारच. मिलींदने एलकुंचवारांचा एक लेख पाठवला होता. त्यात त्यांनी या भावस्थितीचं मनोज्ञ वर्णन केलं आहे- ’चिरनिद्रेची तहान बहुतेकांना लागते, मात्र गंगातीरी. पुरे झाले आता. व्यापताप, मानअपमान, सुखदु:ख, थकला जीव. शिणला. आता विश्रांती हवी कायमची. जखमेवरची खपली गळून पडावी तसे आयुष्य इथेच गळून पडावे आता. ह्यासाठी ह्याहून योग्य जागा दुसरी कोणती ”


कॉरीडॉरकडे निघालो तर बहुतेक आगामी कुंभमेळ्याच्या तयारीसाठी
तारा लावलेल्या. एक हात आणि एक पाय तारेपलीकडे ठेवून मी मार्जरासन स्थितीत असतानाच पोलीसकाका दंडुका घेऊन आले, ’ओ मॅडमजी, लांघने के लिए तार नही लगाएँ है’ असे ते ओरडत होते, पण आता मी द्विशंकू अवस्थेत असल्याने, बाकीचे आधीच पलिकडे गेल्याने, तिकडे दुर्लक्ष करून 
घाईने तार ओलांडली. काशी विश्वनाथ मंदीराच्या मागच्या बाजूने बाहेर पडलो. विशेष फिरता आलं नसलं तरी या गल्ल्या आणि गंगेचं दर्शन बनारसचं एक  मूक करणारं रूप दाखवून गेलं.  

 

आता उत्सुकता होती गंगाआरतीची. आम्ही वेळेत आटोपून दशाश्वमेध घाटाकडे निघालो तर अख्ख जग जणू तिकडेच निघालं होतं. लोक कशाला तडमडतात नव्या वर्षाला इथे, असं दादा म्हणत होता. जणू काही आम्ही एलियन असल्याने उडत्या तबकडीतून हे पाहत होतो. प्रचंड वाहतूक कोंडीतून रस्ता काढत पुढे साखळी करून एकदाचे नमो घाटावर पोचलो. आयटीनरीत लिहिल्याने दुमजली नावेला 'क्रूझ' म्हणत त्यात बसलो. बोचर्‍या थंडीत धुक्यात फिकुटलेला मंद सूर्यास्त पाहत गंगेत फेरी सुरू झाली. नाविक उर्फ केवट कम गाईड आम्हाला स्पष्ट वाचता येत असलेल्या घाटांची एक एक नावं जोरात वाचून दाखवत अद्भुत माहिती सांगितल्यासारखं करत होता. भोसले, पेशवे, अहिल्याबाई या सर्वांच्या नावे एक एक घाट होते. 

थंडी वाढू लागली. जर्किन, शालीचे थर वाढू लागले. अंगावर वारूळ चढलेल्या आणि फक्त डोळे उघडे असलेल्या ऋषी मुनींसारखे सगळे दिसू लागले. संधीप्रकाशात क्रूझ दशाश्वमेध घाटापाशी पोचले. आरतीआधी दहा रूपयात गंध लावायला छोटी मुलं नावेत चढून येत होती. एका काकूंनी त्यातल्या एकाला नुसतं शर्ट वर आलेलं पाहून स्वेटर घ्यायला पैसे दिले. बिचकत ते घेऊन तो खाली उतरला आणि थोडया वेळाने परत येऊन ’आहे माझ्याकडे स्वेटर’ म्हणत त्याने ते चक्क त्यांना परत केले. हे बनारसी तत्त्व होतं, त्या मुला-वडिलांपुरतं स्वाभिमानाचं कवच होतं , गंगाजलाचा गुण होता किंवा जे काय होतं, ते अद्भुत होतं.


दरम्यान एकसारखे रेशमी पोशाख घातलेले पुजारी रोषणाई केलेल्या कमानींखाली येऊन उभे राहिले. आधी स्तवन झाले. लगेच गंगा आरती सुरू झाली. सुरुवातीला हातात दिवट्या मग धूप मग पाच मजली दिव्यांची आरती. एका लयीत ओवाळत शंख आणि घंटांच्या तालासुरात गंगामैयाची आरती झाली. सगळं नेत्रसुखद होतं आणि श्रवणीयही. गार वारं, वाद्यांचा आसमंतात भरलेला निनाद आणि घाटपायर्‍यांवर, नावांमधून एकवटलेले दोन्ही हात उंचावून ’हर हर महादेव’ चा गजर करणारे आमच्यासारखे हजारो लोक. दादाने आईला व्हिडिओ कॉल केला होता त्यात तिला काही धूसर दिसलंही असेल पण हा सोहळा ती इथे येऊन बघू शकली नाही, कदाचित कधीच बघू शकणार नाही हे जाणवून डोळे भरून आले. निदान मावशी येऊ शकली या जाणीवेनं थोडं हलकं वाटलं.

गंगारतीने भारलेलं वातावरण हळूहळू निवळलं. ८४ पैकी पुढच्या आणखी काही घाटांवर चक्कर मारून नमो घाटावर पोचताना निर्विचार मौन, आत भरून राहिलेली शांतता आणि बाह्य संवेदना जाग्या ठेवणारी हुडहुडी अनुभवत होते. कुणीच काही बोलत नव्हतं. वल्ह्यांचा आवाज तेवढा येत होता. काठावरचे आणि आजूबाजूने ये जा करणार्‍या नावांमधले दिवे पाण्यावर प्रतिबिंबीत होऊन मधूनच लखलखत होते. 

Spiritual Tourism चा भाग असलेला, पर्यटकांसाठी खास कस्टमाईज्ड असला, काही तासांपुरता मर्यादित असला, आस्था, श्रद्धा, विरक्तीच्या जगाला केवळ एक प्रदक्षिणा घालणारा असला तरीही हा अनुभव विलक्षण होता तो कदाचित गंगेशी असलेल्या आपल्या सांस्कृतिक अनुबंधाने. 

या भावनेचं वर्णन एलकुंचवारांच्या शब्दांइतक्या नेमकेपणाने मी करू शकत नाही. "इथे पाप पाप राह्त नाही, पुण्य कवडीमोलाचे होते. आयुष्यातील इंद्रधनुष्य फिके पडते आणि मृत्यू बिनमहत्वाचा, तुच्छ वाटतो. नीति-अनीती, पाप-पुण्य, सुख-दु:ख, जीवन-मृत्यू-- ह्या सर्वांच्या पल्याडचे, चिरंतन, शाश्वत असे क्षमाशील वात्सल्य इथे जसे स्पष्ट जाणवते तसे इतरत्र कुठेही नाही. पार्थिव-अपार्थिवाला इतके चिकटून अशाश्वत शाश्वताला गळामिठी मारते ते इथे. ह्या अनुभवाची घनता इथे इतकी आहे की ती अगदी स्पर्शसंवेद्य होते." 

|| नमामि गंगे || २  #आजोळ_स्पेशल_ट्रिप 

नमामि गंगे        तीर्थराज प्रयाग        सारनाथ

5 comments:

  1. Dhananjay Jayant LimayeJanuary 16, 2025 at 9:00 PM

    अप्रतिम मोहिनी

    ReplyDelete
  2. अतिशय सुरेख, ओघावते, खुसखुशीत वर्णन, मज्जा आली वाचायला
    आता थोडं वाचून बाकी नंतर वाचू असा संकल्प करून हा लेख वाचाया घेतला पण पूर्ण वाचून झाल्यावरच थांबले!

    ReplyDelete
  3. अप्रतिम!🙏👍
    अमळनेर येथे माझं बालपण गेलं, साधारण 4 किंवा 5वर्षाचा होईस्तोवर. माझे वडील प्रतापशेठजींचे अगदी जवळचे.----असो, त्या ऐकलेल्या आठवणी इथं सांगणं योग्य नाही.
    संपूर्ण लेख, सर्व बाबी दृश्य होतील असा चित्रपट जणू उभा करतो आणि नकळत वाचणारा सुद्धा तुमच्या सहलीत आगंतुकासारखा बेमालुमपणे सहभागी होतो
    कॅमेऱ्याने टिपलेली दृश्ये आणि मेंदूने सेव्हडं केलेली अत्र तत्र चपळाई ची संगतवार उजळणी करणारी आहेत. खरं तर मावंद केला तर तत्पूर्वी सुश्राव्य कथाकथन असा दुहेरी लाभ आमच्यासारख्याना होईल.
    गंगेची आरती वाचताना मला हृषीकेश येथील तिहारा रस्ता व त्याजवळील गंगा घाट आठवला. दोन दिवस व दोन रात्री च्या मुक्कामात मी बराच काळ गंगेकाठी घालवला. गंगेचं पाणी भर पावसात डोक्यावर घेणं, तेथील आरतीचं पवित्र्य अनुभवणं, सगळं रोमांचकारी.तेथील काही फोटो अजुनही संग्रही आहेत. हरिद्वार ची गंगा सुद्धा त्यामुळे आठवतेय ----
    जुन्या स्मृतीना उजाळा देणारा तुमचा लेख पुलं चं वाक्य उगाळून गेला "स्मृतीन् ची पाने उलटायला लागतं डोळ्यातील पाणी, मग त्या स्मृती सुखाच्या असो वा दुःखाच्या "
    लेखनप्रवासाचा गंगोघ निरंतर सुरु राहो हीच गंगामाईच्या चरणी प्रार्थना 🙏

    ReplyDelete