Showing posts with label तंत्र-माध्यम. Show all posts
Showing posts with label तंत्र-माध्यम. Show all posts

Tuesday, February 10, 2026

थोडं ’अ‍ॅनालॉग’ पण जगूया

 मुलांच्या आंतरशालेय निबंध स्पर्धेच्या अंतिम फेरीचे निबंध माझ्याकडे परीक्षणाला आले होते. गंमत म्हणजे ९ स्पर्धकांपैकी ५ जणांचे बरेचसे मुद्दे सारखे. कारण ही होती ’ए-आय’ म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्तेची कमाल. चॅट जीपीटी किंवा जेमिनाय किंवा अन्य एखाद्या जनरेटीव्ह ए-आयला विषय द्यायचा, उत्तर कॉपी पेस्ट करायचं की झालं. हाय काय नाय काय !

नुकतंच वकीलांच्या एका अनौपचारिक सभेत एक ज्येष्ठ वकील महोदय भाषण देत होते. खरं तर वाचून दाखवत होते. पहिलं वाक्य संपताच ते अनवधानाने म्हणाले ’फुलस्टॉप’ आणि त्यांनी जीभ चावली. सगळे हसू लागले. भाषण ए-आयकडून लिहून घेतलं होतं हे उघड झालं होतं. एका उच्चपदस्थ व्यक्तीची ही स्थिती मग तुम्हा विद्यार्थ्यांचं काय होत असेल ! 

अर्थात तुमच्यासारख्या काही मुलांना  ए-आय म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर कुठे करायचा हे समजलं आहे. चेन्नईच्या कार्तिकला ए-आयच्या मदतीने बुद्धिबळात आणखी पुढे जाता आलं. वेगळ्या पद्धतीने खेळाकडे पाहता आलं. कोल्हापूरची ईशा गोष्टी लिहिते. ए-आयने तिला गोष्टीची सुरूवात आणि शेवट करण्याच्या वेगवेगळ्या आयडिया दिल्या. नागपूरच्या स्मिताला गणिताची भीती वाटायची. ए-आय आधारित अ‍ॅपने तिची भीती गेली, उलट तिला गणित शिकताना मजा वाटू लागली. जळगावचा अतुल तर ए-आयच्या मदतीने जर्मनचे धडे शालेय वयापासूनच स्वत:चे स्वत:  गिरवतो आहे. 

अनेक शालेय विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ए-आय आधारित प्रकल्प सादर केले आहेत. बेंगळुरूचा अर्जुन पाण्याची बचत करणारा प्रकल्प घेऊन पुढे आला, तसंच काही विद्यार्थ्यांनी कचरा व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण आणि शेतीविषयक प्रश्नांवर ए-आय आधारित उपाय सुचवले आहेत. एका विद्यार्थिनीने मुलींच्या सुरक्षेसाठी एक अलार्म फीचर ए-आय अ‍ॅपसाठी सुचवलं. बातम्यांमध्ये हे प्रकल्प पाहून असं जाणवतं की भारतीय मुलं केवळ तंत्रज्ञान वापरत नाहीत, तर ए-आय च्या मदतीने समाजातल्या विविध समस्यांवर उपाय शोधत आहेत.

AI म्हणजे एक प्रकारचा संगणकीय मेंदू जो माणसाकडून मिळालेल्या माहितीवरून शिकतो. जसं आपण चुका करत शिकत जातो तसंच ए-आय देखील अनुभवातून शिकत अधिक अचूक होत जातो. जगभरातील  मुलं नकळत ए-आय सोबत मोठी होत आहेत. तुम्ही ज्या जगात वाढत आहात ते जग तुमच्या आई-वडिलांच्या बालपणापेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. तेव्हा माहिती मिळवण्यासाठी पुस्तकं शोधावी लागत होती; चार पुस्तकातून संदर्भ मिळवावे लागत होते. आज मात्र ए-आयला एखादा अवघड प्रश्न विचारल्यावर तो सोप्या भाषेत समजावून सांगतो. . ए-आय शेफ नामक मशीनमध्ये पदार्थ घाला, मेनू निवडा आणि स्वयंपाक तयार. ऑनलाइन शिक्षण, प्रोजेक्ट्स, त्रुटी शोधणं, गृहपाठ करणं, माहिती शोधणं, भाषा शिकणं, लेखन करणं, संवाद लिहिणं, मोठ्या ग्रंथाचा गोषवारा काढणं, ग्राफिक्स, व्हिडिओ, चित्रकला, संगीत, कोडिंग, रोबोटिक्स हे सगळं या तंत्रज्ञानामुळे सहजसाध्य झालं आहे. 

इथपर्यंत ठीक आहे पण आईबाबांना वेळ नसतो किंवा काही गोष्टी त्यांना सांगाव्याशा वाटत नाहीत तेव्हा गप्पा सुद्धा मारता येतात त्याच्याशी.  तुम्हाला वाटतं, ए-आय किती छान आहे. तो माझी वर्गात पहिला येणार्‍या मुलाशी तुलना करत नाही, एखादे वेळी कमी मार्क मिळाले म्हणून माझ्यावर रागावत नाही. मी किती हुशार आहे, चांगला आहे याबद्द्ल उलट माझं कौतुक करतो. मग मी का करू नको त्याच्याशी मैत्री ? 

उत्तर सोपं आहे. 

त्याला भावना नाहीत. त्याला तुमचं भलं कशात आहे ते समजत नाही. आजी आजोबा, दादा ताई, आईबाबांसारखं तुमच्यावर त्याचं प्रेम नाही. वॉशींग मशीनचं काम काय असतं, कपडे धुणं. त्याच्याशी आपण गप्पा मारतो का, मैत्री करतो का? नाही, कारण ते केवळ यंत्र आहे. ए-आयला भाषेची समज असल्याने, सखोल ट्रेनिंग दिलेलं असल्याने त्याला तुमच्याशी माणसासारखं बोलता येतं पण शेवटी ते ही एक प्रकारे यंत्रच आहे. अलेक्सा ,सीरी या व्यक्ती नाहीत, ती यंत्रांची नावं आहेत. ए-आय मैत्रीचा आभास निर्माण करू शकतं, तुमच्या भावना ओळखून तुम्हाला आवडेल असा प्रतिसाद देऊ शकतं पण त्यात वैयक्तिक भावनांचा ओलावा नसतो, मायेचा स्पर्श नसतो, काळजी नसते. त्याची उत्तरं किंवा कृती म्हणजे फक्त एक तांत्रिक क्रिया असते. त्यामुळे त्याच्याशी मैत्री बित्री करण्याच्या भानगडीत अजिबात पडू नये.  

ए-आयचा फक्त वापर करावा. तो ही योग्य पद्धतीने आणि मर्यादेत. 

२०२४–२५ मध्ये अनेक राज्य सरकारांनी डिजिटल आणि ए-आय आधारित शिक्षण पद्धतींचा प्रयोग सुरू केला. काही शाळांमध्ये तो शिक्षकांना मदत करणाऱ्या साधनासारखा वापरला जाऊ लागला आहे. शिकवण्यासाठी लागणारे व्हिडिओ, आराखडे, प्रेझेंटेशन, उदाहरणं मॅजिकस्कूल सारख्या विविध ए-आय टूल्सच्या मदतीने शिक्षक तयार करू लागले आहेत. मुलांच्या अडचणी समजून घेऊ लागले आहेत. मात्र  काही पालक आणि शिक्षकांना वेगळीच चिंता सतावू लागली आहे. ए-आय तयार आणि त्वरित उत्तरं देत असल्याने मुलांची कल्पनाशक्ती, विचारशक्ती कमी होऊ लागली आहे कारण मेंदूला काम करायची सवयच राहत नाही. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रकल्पासाठी ए-आय कडून तयार केलेला मजकूर जसाच्या तसा सादर केल्याचं दिसू लागलं. 

समजा तुम्हाला एक कागद आणि पेन्सील देऊन एखादा सीन काढायला सांगितला, तर? डोळे मिटा ,विचार करा ,काढा चित्र... 

९० % मुलं काय चित्र काढतील? डोंगर, सूर्य, उडते पक्षी, खाली नदी, बाजूला झोपडी. हो नं? वेगळं काही नाही. असं का, कारण चौकटीबाहेरचा विचार करण्याची आपली क्षमता ए-आय आणि मोबाईल सारख्या गॅजेट्सच्या अती वापराने कमी होत चालली आहे. 

भारतीय भाषांमध्ये AI उपलब्ध होणं ही खूप मह्त्वाची आणि सकारात्मक बाब आहे. मराठीत, हिंदीत किंवा इतर भाषांत प्रश्न विचारता येत असल्याने तुम्हाला शिकणं सोपं झालं आहे. मात्र काही ए-आय साधनांमध्ये ती माहिती अपुरी किंवा चुकीची असते. वाक्यरचना, व्याकरण विचित्र असतं. त्यामुळे तज्ज्ञ सांगतात की ए-आय ने दिलेली माहिती तपासून पाहण्याची सवय मुलांना लावली पाहिजे. पुस्तकं, शिक्षक आणि ए-आय — या तिन्हींचा संगम असेल, तरच शिकणं परिपूर्ण ठरेल. कल्पना, भावना आणि अनुभव मुलांचे असतील, ए-आय फक्त साधन म्हणून काम करेल कारण संपूर्ण काम त्याला करायला लावलं तर सर्जनशीलतेला मर्यादा येऊ शकतात. 

ए-आय वापरायचं आहे ते आपला मदतनीस म्हणून , मालक म्हणून नव्हे, केवळ कॉपी पेस्ट साठी नव्हे,  

त्यासाठी कोणत्या वयात कोणतं तंत्रज्ञान योग्य- हे आधी समजून घेऊया. 

१०–१२ वर्षं :   शाळेतल्या अ‍ॅक्टिव्हिटीचे अ‍ॅप्स, गृहपाठासाठी जनरेटीव्ह ए-आय, शैक्षणिक व्हिडिओ, काही मजेदार गेम्स मर्यादित प्रमाणात.

१३–१५ वर्षं :  अभ्यास, कौशल्य शिकणं, भाषा शिकणं, थोडं मनोरंजन (मर्यादेत), वेळेचं भान महत्त्वाचं.

या वयापर्यंत पालकांसह, आईबाबांबरोबर बसून हे सगळं शिकणं, समजून घेणं, ते तंत्रस्नेही नसतील तर त्यांना सांगून त्यांच्यासमवेत हे करण्ं अपेक्षित आहे.  

१६–१८ वर्षं :  व्यावसायिक कौशल्य शिकणं, जबाबदारीनं वापर करण्यासाठी स्वतः नियम ठरवणं, करिअरसाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करणं अभिप्रेत आहे.

वय वाढतं तसं स्वातंत्र्य वाढतं पण त्याचबरोबर जबाबदारीही वाढते. 

हे नीट माहीत असलेली मुलं सुद्धा ए-आय आणि गॅजेट्सच्या आहारी जातात. कारण..

* FOMO ( fear of missing out) - हे वापरलं नाही तर या आधुनिक जगातल्या घडामोडी मला कळणार नाहीत. मी मागे पडेन अशी भीती वाटू लागते.

* ’बोर होतंय’ म्हणणार्‍या मुलांना फोन, टॅब हातात घ्यायला सोपा. क्षणात एक नवं ,मोहक, वेड लावणारं विश्व समोर उभं राहतं. 

* सोशल मिडियावरच्या “लाईक”, “कमेंट”, “शेअर” यामुळे आपण कुणीतरी विशेष आहोत असं भासू लागतं. 

यामुळे ए-आय फीचर वापरून तयार केलेले फोटो, पोस्ट शाळकरी मुलं, मुली सोशल मिडियावर ट्रेंडच्या नावाखाली टाकतात. सायबर गुन्हेगार त्यांना हेरतात. संवाद वाढवून विश्वास संपादन करतात आणि मग त्या फोटो, माहितीचा गैरवापर होतो. कधी सेक्सटिंगसाठी, कधी धमकी देऊन पैसे उकळण्यासाठी तर कधी भुरळ घालून लैंगिक शोषणासाठी. आपल्या सुरक्षिततेसाठी आपण खाजगी डाटा अनोळखी व्यक्तीला कधीही द्यायचा नाही, खोट्या इंप्रेशनसाठी अनोळखी मित्र विनंती स्वीकारायची नाही, फोटो पब्लिक शेअर करायचे नाहीत हे तुम्ही सुद्धा समजून घेणं ही आजची गरज आहे. 

ए-आय आधारित ऑनलाईन गेमिंगचं वेड आणि वरच्या लेव्हलवर जायचा नाद, त्यासाठी लागणारे पैसे आणि त्यातून चक्क आपल्याच घरात मुलांनी केलेल्या चोर्‍या अशा गुन्ह्यांची संख्याही वाढताना दिसते आहे. 

काही अ‍ॅप्स मुलांकडून माहिती गोळा करतात, हे लक्षात आल्यानंतर सरकार आणि तंत्रज्ञान कंपन्यांनी नियम कडक करण्यास सुरुवात केली आहे. 

ए-आयच्या अतिरेकी वापरामुळे प्रत्येक देशाचं सरकार मुलांच्या डिजिटल सेफ्टीवर गांभीर्याने विचार करू लागलं आहे. फ्रान्सने १५ वर्षांखालील सोशल मिडिया अकाउंटसाठी पालकांची परवानगी अनिवार्य केली आहे. चीनने विद्यार्थ्यांना गेमिंग अ‍ॅप्स वापरण्याला ठराविक तासच परवानगी दिली आहे. ऑस्ट्रेलियातील शासनाने विद्यार्थ्यांच्या इंटरनेट वापराविषयी कडक नियम पारित केले आहेत. सगळे युरोपियन देश स्क्रीन टाइम मर्यादा, डेटा सुरक्षाविषयी सजग झाले आहेत. कारण सगळ्यांना कळलंय — स्क्रोल करण्यात वेळ घालवला तर मुलांचं भविष्य कधीही घडणार नाही. उद्या तुम्हीच विचाराल, ही स्थिती येईतो तुम्ही काय केलंत ? 

भारतामध्येही काही महत्त्वाचे नियम आहेत—  मुलांसाठी अयोग्य अससेल्या कंटेंटवर नियंत्रण ठेवण्यासाठी IT Rules २०२१ आहेत. डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन कायदा २०२३ अद्यावत करण्यात आला आहे. मुलांनो, हे कायदे, या चर्चा तुमच्याविरुद्ध नाहीत, तुमच्यासाठी, तुमच्या संरक्षणासाठी आहेत.

ए-आय चा एक गंभीर सामाजिक दुरूपयोग म्हणजे चुकीची माहिती आणि बनावट सामग्री. ए-आय वापरून तयार केलेले खोटे व्हिडिओ आणि आवाज (डीपफेक) याचं प्रमाण वाढतं आहे. पंतप्रधान  मोदींचे गरबा खेळतानाचे, ट्रम्प बरोबर नाचतानाचे डीपफेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. ते बनावट असल्याचं ओळखायला शिकलं पाहिजे. कितीही मज्जा वाटली तरी ते शेअर करण्याचा मोह टाळला पाहिजे. इंटरनेटवर दिसणारी प्रत्येक गोष्ट खरीच असेल असं नाही हे तुम्ही समजून घेणं खूप गरजेचं आहे. जे दिसतं आहे ते अधिकृत सोर्सकडून आलं आहे का, हे अस्सल वाटत असलं तरी बनावट (डीप फेक) तर नाही नं, ही शंका कायम मनात आली पाहिजे. फॅक्ट चेक साठी अल्ट न्यूजसारख्या अनेक वेबसाईट आहेत ज्यावरून माहितीची सत्यता तपासता येईल. 

ए-आयची नकारात्मक बाजू बातम्यांमधून जास्त दिसत असल्यामुळे पालक घाबरून जातात, गॅजेटच्या अतिवापरावरून घरात वादविवाद सुरु होतात. तुम्हाला काही चुकीची माहिती तर मिळणार नाही, फसवणूक तर होणार नाही, सायबर गुन्हेगारांचं तुम्ही सावज तर ठरणार नाही याची त्यांना सतत भीती असते. त्यांना तुमचं आरोग्य महत्त्वाचं वाटतं. बाहेर खेळायला जाणं कमी झाल्याने तुमच्या वाढत्या वजनाची चिंता वाटते. वाढलेल्या स्क्रीन टाईममुळे  तुमचे थकलेले डोळे , सतत स्क्रीनवर येणार्‍या माहितीच्या महापुराने शिणलेला मेंदू ,अपुरी झोप यामुळे त्यांना तुमच्याविषयी चिंता वाटते.  

अमेरिकेतल्या जेनेल हॉफमन नावाच्या आईने यावर एक उपाय शोधला होता. आपल्या १३ वर्षाच्या मुलाला मोबाईल फोन देताना तिने त्याला काही अटी लिहिलेलं पत्र दिलं होतं. त्या अटी आजच्या ए-आय जगातल्या तुम्हा मुलांनी समजून घ्याव्यात. 

* हा फोन तुला अधिक चांगल्या पद्धतीने अभ्यास करता यावा म्हणून काही काळासाठी दिलेला आहे. तुझं वागणं अयोग्य वाटलं तर तुझ्याशी चर्चा करून आम्ही तो परत घेऊ.

* ऑनलाईन काही चुकीचं दिसलं तर तू लगेच आम्हाला सांगायला हवंस. तुझे पासवर्ड आम्हाला माहीत असलेच पाहिजेत. 

* फोन लांब ठेवून मित्रांना प्रत्यक्ष भेटणं, मैदानावर जाऊन खेळणं, ट्रेकिंगला जाणं, सहलीला जाणं, निसर्गात, पुस्तकात रमणं, आमच्याशी गप्पा मारणं, हसणं, एखादी कला शिकणं जगण्यासाठी करियर इतकंच महत्त्वाचं असतं. थोडक्यात डिजिटल जगातून वेळ काढून थोडं ’अ‍ॅनालॉग’ही जगता आलं पाहिजे. 

भारतीय संस्कृतीत ज्ञानासोबत विवेक, संयम आणि दायित्व यांना महत्त्व आहे. ए-आय वापरताना ही मूल्यं अधिकच महत्त्वाची ठरतात. तंत्रज्ञान माणसाला वेगवान करू शकतं, पण त्याला दिशा माणसालाच द्यावी लागते. तुम्ही वयाच्या अशा वळणावर आहात जिथे संधी आणि आव्हानं दोन्ही समोर आहेत. ए-आय ने करियरची नवी दालनं उघडली आहेत, पण त्याचबरोबर विचारपूर्वक वापराची जबाबदारीही तुमचीच आहे. तुमचं वय कुतूहलापोटी नको ते करून पाहण्याचं आहे. ते अगदी स्वाभाविक आहे पण इथेच तोल सावरायचा आहे. 

त्यासाठी काही तांत्रिक बंधनं स्वत:वर घालून घ्या किंवा तुमच्या आईबाबांना नेट नॅनी, कॅनोपी सारखे पॅरंटल कंट्रोल अ‍ॅप्स, वॉचर सारखे डिव्हाईस मॉनीटरींग अ‍ॅप वापरायला सांगा. चॅट-जीपीटी मध्ये तुमचा मेल आयडी कौटुंबिक खात्याशी जोडता येतो, तुमच्या चॅटवर यामुळे आईबाबांचे नियंत्रण राहील. फॅमिली लिंक अ‍ॅपद्वारे तुमचा जेमिनाय अ‍ॅक्सेस त्यांना मर्यादित करता येईल. यामागे तुमच्यावर पाळत ठेवण्याचा हेतू नसून ही तुमची जपणूक आहे हे लक्षात घ्या.

योग्य मार्गदर्शन, प्रश्न विचारण्याची सवय आणि मूल्यांची जाण असेल, तर ए-आय तुमच्यासाठी केवळ तंत्रज्ञान न राहता उज्ज्वल भविष्याकडे नेणारा महामार्ग ठरू शकतो.

ए-आयसह चालताना डोळे उघडे ठेवणारी, मन जिज्ञासू ठेवणारी आणि माणुसकी जपणारी पिढीच खऱ्या अर्थाने उद्याचा भारत घडवेल. पटतंय का ! 

यासाठी तुम्हाला एकच करायचं आहे. लेखाच्या सुरुवातीच्या उदाहरणातले वकील महोदय चुकून ’फुलस्टॉप’ म्हणाले होते. ए-आय वापरताना कुठे पॉज घ्यायचा आणि कुठे फुलस्टॉप लावायचा हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे आणि नवोदितांना शिकवायचं आहे.     

#AIEthics #ResponibleNetizen

- Published in February 2026 in #Mulanche_Masik

Wednesday, April 16, 2025

सायबर विश्व आणि सामान्य माणूस

 ३६ फोटोंचा रोल पुरवून पुरवून वापरणारी आणि एडिट करायची सोय नसल्याने, बरेवाईट आलेले फोटो तसेच अल्बममध्ये लावून अधूनमधून पाहत स्मरणरंजन करणारी, घराला साहित्यिक नाव देणारी मध्यमवर्गी पिढी संपली. नंतर आली नव्वदच्या दशकातल्या जागतिकिकरणामुळे झालेल्या उलथापालथींनी काहीशी गडबडून गेलेली, मुलगा परदेशी, त्यातूनही अमेरिकेला जावा अशी स्वप्न बघणारी, ब्लॉकमध्ये राहणारी ’हॉटशॉट’ पिढी. आणि मग आली आजची तथाकथित ग्लोबल, डिजिटल पण फोमोने (फिअर ऑफ मिसिंग आऊट) ग्रासलेली ’सायबर’ पिढी. तरुण वयात स्टुडिओत अवघडल्या अवस्थेत बसून किंवा अटेंशन पोझमध्ये तिरकं उभं राहून फक्त ’दाखवण्यासाठी’ काढायच्या फोटोपासून, मुक्तपणे स्वत:च्या छबीतून म्हणजे सेल्फीतून स्वत:ला हवं तसं बिनधास्त व्यक्त करण्यापर्यंतचा सामान्य माणसाच्या पिढ्यांचा हा प्रवास फक्त फोटोंपुरता मर्यादित नाही. पूर्वी रात्र आणि दिवस हेच काळाचे मुख्य भाग होते. आता स्वेच्छेने या तंत्रज्ञानापासून अंतर राखून राहणारे, समूह माध्यमांना (सोशल मिडिया) आपल्या आयुष्यात लुडबूड करु न देणारे काही अपवाद वगळले तर आजच्या पिढीचं जगणं ’ऑनलाईन’ आणि ’ऑफलाईन’ या दोन पटात विभागलं गेलं आहे. 

अर्थशास्त्राच्या पिरॅमिड रचनेत श्रीमंत अग्रभागी, सामान्य माणूस मध्यभागी आणि दारिद्यरेषेखालचा वर्ग तळाला असे धरले तर हा मधला भाग देशाची प्रत ठरवतो असं म्हणता येईल. देशाची गुणवत्ता तिथल्या सामान्य माणसाच्या वर्तनावरुन ठरते. उच्चभ्रू समाज हा विश्वसंस्कृतीचे प्रतिनिधीत्व करत असतो तर तळागाळातला समाज हा मुलभूत प्रश्नांशी झगडताना मूल्य, संस्कृती वगैरे जीवनाचे चोचले पुरवू शकत नाही म्हणूनही असेल कदाचित. आज सामान्य माणसाच्या जीवनशैलीचे ढोबळमानाने ’सायबररहित’ जीवनशैली आणि ’सायबरसहित’ जीवनशैली हे दोनच प्रकार उरले आहेत असे वाटू लागले आहे. या मधल्या भागातही खरं तर त्रिस्तरीय रचना आहे. तंत्रज्ञान आणि जगणं याची गल्लत न करणारी ’सायबररहित’ जीवनशैलीचं प्रतिनिधीत्व करणारी अपवादात्मक मंडळी पहिल्या स्तरात आहे. तंत्रस्नेही असलेले, नवनवी तांत्रिक उपकरणं वेगाने हाताळू शकणारे, ’ऑनलाईन’ विश्वात लीलया वावरणारे यात दुसर्‍या स्तरावर आहेत. ही दोन्ही प्रकारची मंडळी देशाच्या महाकाय लोकसंख्येच्या तुलनेत अगदी मोजकी आहेत. कामापुरतं तंत्रज्ञान हाताळता येणारे, अपुर्‍या माहितीमुळे तांत्रिक उपकरणांबद्दल प्रचंड कुतूहल पण भीती असलेले, ऑनलाईन विश्वाशी जुळवून घेण्याच्या धडपडीत या भीतीचं सावट ऑफलाईन जगताना देखील मनावरुन दूर करु न शकणारे या उतरंडीच्या तळाशी आहेत. बहुसंख्य सामान्य माणसं या मधल्या भागाच्या तिसर्‍या स्तरात आहेत. यात निम्नमध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय आहेत आणि बर्‍याच प्रमाणात उच्चमध्यमवर्गीय देखील. निमशहरी, शहरी आणि काही प्रमाणात ग्रामीण देखील.

मधल्या भागातल्या या मध्यमवयीन सामान्य माणसाला कसेही करुन वरच्या स्तरावर जायचे आहे. पिरॅमिडच्या टोकाला पोचायचे आहे. तिथली जीवनशैली हे त्याचे स्वप्न आहे. त्यामुळे तिचे अनुकरण करताना त्याला अप्राप्य असलेला किंवा क्वचित होणारा विमान प्रवास फेसबुकवर चेक-इन करायचा असतो. आहे. बार्बेक्यू नेशनमध्ये मित्राने दिलेल्या पार्टीचा ग्रुप सेल्फी इन्स्टावर अपलोड करायचा असतो. हॉटेलचे ऑनलाईन बुकींग करायचे असते. किंडलवरुन पुस्तक चाळायचं असतं. रेल्वे प्रवासातल्या एखाद्या अडचणीबद्दल पटकन संबंधित अधिकार्‍यांना ट्वीट करायचं असतं. जीपीएसच्या मदतीने नव्या जागी अचूक पोचायचं असतं. फूडअ‍ॅप वरुन पिझ्झा मागवायचा असतो. जाहिरातीतून दिसणारे ओट्स, टोफू, ऑलिव्ह ऑईल, ब्रोकोली, किवी असले अभारतीय पदार्थ वापरणं ’इन’ असल्यामुळे ते ऑनलाईन मागवायचे असतात नाहीतर आपण बॅकवर्ड पालक ठरु अशी भीती वाटत असते. याशिवाय विवाहजुळणीच्या अ‍ॅपवरुन जोडीदार शोधायचा असतो. कामाचे अ‍ॅप्लिकेशन्स फॉर्म्स ऑनलाईन भरायचे असतात आणि आपल्याला मिळालेली लेटेस्ट माहिती व्हॉट्सअ‍ॅप वरुन इतरांना सर्वात आधी पाठवायची असते.. हे सगळं करता यावं म्हणून घेतलेला पण दोन वर्षातच आउटडेटेड झालेला मोबाईल बायबॅक करुन नवा मोबाईल, ऑफर संपायच्या, इन्स्टॉलमेंटवर अ‍ॅमेझॉनवरुन विकत घ्यायचा असतो. 

अर्थात यात लिंगभेद उरलेला नाही. २०१३ पर्यंत पुरुषांची मक्तेदारी असलेली ऑनलाईन खरेदी महिलाही करताना दिसू लागल्यात. घरातील पुरुषांचा जुना फोन वापरणार्‍या बहुतेक महिलांकडे आता स्वत:चा स्मार्ट फोन आलेला असतो. येत्या वर्षाअखेरीस ऑनलाईन खरेदी करणार्‍या महिलांची संख्या १५ कोटीपर्यंत जाईल असं इकॉनॉमिक्स टाईम्स सांगत असतो. यात निमशहरी व शहरी भागातल्या, विशेषत: १८ ते ४५ वर्षे वयोगटातील महिला ग्राहकांचा समावेश असतो. त्यांनाही पिंटरेस्टवर नव्या पर्सेसची डिझाईन शोधायची असते. यू ट्यूबवर पाहिलेले पाव घरी करुन पाहायचे असतात. मिंत्रावरुन घेतलेल्या टॉपमधला फोटो फेसबुकवर मैत्रिणींना टॅग करुन अपलोड करायचा असतो. मग त्याला आलेले लाईक्स थोड्य़ा थोड्या वेळाने तपासायचे असतात. झालंच तर त्यावरील प्रत्येक कमेंटला थँक्यू म्हणायचे असते. 

दुसर्‍या बाजूला हेच सायबर जग अनेक सामान्यांना असामान्य करत असतं. लिहितं करत असतं. त्यांना जागतिक ओळख मिळवून देतं. त्यांच्या शब्दाला, कृतीला व्हायरल करुन चळवळीचं रुप देतं. त्याच्या प्रतिक्रियांची दखल घेऊन आक्षेपार्ह जाहिराती मागे घ्यायला लावतं. राजकारण घुसळून टाकतं. सामान्य माणसाला तुच्छ लेखणार्‍या भल्याभल्यांना थेट सवाल करतं, उत्तरं द्यायला बांधील करतं. नवी उमेद, यूअर स्टॊरीसारख्या ब्लॉगवर सामान्य माणसाच्या यशोगाथा झळकवतं. स्वतः अपंग असून मन:पूर्वक रुग्णसेवा करणारा एखादा डॉक्टर इथे भेटतो. मुलींच्या नावाच्या पाट्या घराघरात लावून त्यांना मानसन्मान प्राप्त करून देणारे दादाभाऊ भेटतात. मासिक पाळीच्या काळात मुली गैरहजर राहू नयेत म्हणून त्यांच्यासाठी जिल्हा परिषद शाळेत चेंजिंग रूमची व्यवस्था करणारी एखादी शिक्षिका इथे भेटते. स्वतःचं मूल कर्णबधीर असलेले आणि इतर कर्णबधीर मुलांसाठी काम करणारे पतीपत्नी भेटतात. शाळेच्या परिसरातल्या गुटखा विक्रेत्याला विद्यार्थ्यांचं नुकसान करण्यापासून परावृत्त करून भाजीविक्रीचा व्यवसाय सुरू करून देणारा एखादा शिक्षक इथे भेटतो. आपले विचार नीट मांडू न शकणार्‍या ग्रामीण तरुणाच्या शेतीच्या नव्या प्रयोगाला इथे शब्दबद्ध केलं जातं. वेगवेगळया ग्रुप्सवर घनघोर चर्चा घडतात. अव्यक्त राहिलेल्या स्त्रियांना स्वत:चा अवकाश इथे मिळतो. त्यांच्यातल्या कलाकाराला प्रतिसाद मिळतो. ’हाऊ टू’ ने सुरू होणार्‍या अनेक प्रश्नांची उत्तरं दृक् श्राव्य स्वरुपात यू ट्यूबवर मिळतात. शिक्षणाची नवनवी दालनं खुली होतात. जगभरातली शहरं, संग्रहालयं घरबसल्या पाहता येतात, शासनाचे प्रकल्प सर्वसामान्यांपर्यंत पोचतात. त्याच्या छोटेखानी घरगुती उद्योगाला अर्थकारणाच्या नव्या संधी उपलब्ध होतात. रत्नागिरीतला आंबा थेट न्यूयॉर्कला पोचतो तर चुकतमाकत इंग्रजी बोलणार्‍या राजस्थानी महिलेच्या ऑनलाईन कुकिंग क्लासमध्ये फ्रेंच शेफ प्रवेश घेतात. हेच सायबर जग एखाद्या आपत्तीनंतर अनेक सामान्यांचे मदतीचे हात पीडितांपर्यंत पोचवतं. परदेशी आप्तांना व्हर्च्युअली शून्य भौगोलिक अंतरावर आणून नव्याने त्यांच्याशी नातं जोडून देतं. सामान्य माणसाला आपणही कुणीतरी आहोत अशी मानसिक उभारी देतं.

अर्थात या सायबर विश्वात रुळताना सुरुवातीला त्याची त्रेधा उडते. तो एटीएममधून पैसे काढताना दहादा खात्री करतो, ऑनलाईन बिलं भरण्यापेक्षा त्यासाठी हाफ डे टाकून रांगेत जाऊन उभा राहतो. पण कधी गरज, कधी क्रेझ म्हणून वापरता वापरता सामान्य माणसाला हळूहळू बर्‍याच गोष्टी करता येऊ लागतात. आजवर त्याच्यासाठी स्वप्नवत असलेलं ऑनलाईन जग त्याच्या बोटाच्या इशार्‍यावर उपलब्ध झालेलं असतानाच कोविडचा प्रादुर्भाव त्याच्या जगण्यालाच नव्हे तर अवघ्या जगाला ग्रासून टाकतो आणि आजवर गमतीचं वाटणारं ऑनलाईन जग त्याच्या ऑफलाईन जगात रोरावत शिरतं. घरात अडकलेल्या सर्वांना सतत ऑनलाईन राहणं हाच बाहेरच्या जगाशी स्वत:ला जोडण्याचा मार्ग उरतो. पर्याय म्हणून याआधी उपलब्ध असलेलं ऑनलाईन शिक्षण आता अपरिहार्य होतं. त्याला पगार कपातीच्या अडचणीतच लॅपटॉपच्या खरेदीला प्राधान्य द्यावं लागतं. कामाशिवाय उरलेल्या वेळेत हाती घेतलेल्या पुस्तकात त्याचं मन रमत नाही. तो सतत मोबाईलमध्ये डोकावतो आणि तेच करणार्‍या आपल्या मुलाला स्क्रीन टाईम वाढल्याबद्दल रागावतो. ऑनलाईन, ऑफलाईन दोन्ही जगांची सीमारेषा पुसट व्हायला लागते. सकाळी तो दूरदर्शनवर रामायण बघतो आणि रात्री फुकट प्लॅन संपायच्या आत नेटफ्लिक्ससारख्या ओटीटीवरच्या वेब सिरिजचे एकामागून एक सीझन्स. त्यातलं शिवीगाळ, हिंसाचार आणि उत्तेजक दृश्यांनी भरलेलं कथानक त्याला परकं वाटत राहतं पण वरच्या स्तरात जायचं असेल तर हे सगळं पाहाणं क्रमप्राप्त असतं. 

‘मागणी तसाच पुरवठा’ आम्ही करतोय असे म्हणून कलाकार त्यांच्या व्यावसायिक हतबलतेचे आणि माध्यमं त्यांच्या सर्जनशीलतेच्या मर्यादांचे खापर सरसकट प्रेक्षकांच्या माथी फोडत राहतात. विषमता असलेल्या या देशातील सामान्य जनतेला कोणते आणि कसे संदेश द्यायचे हा मोठा बिकट प्रश्न नक्कीच असला तरी सवंग करमणुकीखेरीज पर्याय नसावा असं कोणतंही सांस्कृतिक दारिद्र्य भारतात नसतं. पण बहुतेक माध्यमसम्राटांसाठी भारतीय सामान्य माणूस हा माणूस नसून फक्त आणि फक्त ग्राहक असतो. कोणत्याही धर्मगुरू किंवा राजाने उपभोगली नसेल एवढी सत्ता माध्यमसम्राटांच्या हातात असते. मनोरंजनाच्या बाजारात नैतिकतेचा विचार करण्याइतकी उसंत त्यांना नसते.

माहितीच्या आणि मनोरंजनाच्या महापुरामुळे कोविड आधीच लागण झालेला फोमो (फिअर ऑफ मिसिंग आऊट) नामक आजार सामान्य माणसाला ग्रासू लागतो. घरात अडकलो असू वा कामापुरतं बाहेर जात असू ,जगाबरोबर ऑनलाईन धावायच्या स्पर्धेत त्याला मागे पडायचं नसतं. सगळं काही आपल्याला सर्वात आधी कळलं पाहिजे याने तो पछाडून जातो. ते आपल्याला सर्वात आधी कळलं आहे हे इतरांना कळल्यावर ऑनलाईन जगातला रुबाब वाढत असल्याने त्याला ते घाईने फॉरवर्ड करायचं असतं. शिवाय लिहिता येणारा किंवा गुगल करुन कॉपी पेस्ट करणारा प्रत्येक जण स्वत:ला लेखक समजू लागतो. त्याला लाईक्स मोजण्याचा नार्सिसिस्ट नाद लागतो. चांगली पदवीधर व्यक्ती ’रात्री कॉसमॉस किरणे येणार असल्याचे, अमुक वेळा पाठवल्यास आपोआप बॅटरी चार्ज होण्य़ाचे’ अतर्क्य मेसेज धडाक्यात पुढे पाठवते. अगदी उच्चशिक्षित व्यक्ती सुद्धा ’अमक्याकडून आला म्हणजे खरंच असेल’ असं म्हणत एखादा अंधश्रद्धा पसरवणारा मेसेज सर्रास पुढे पाठवते. घंटानादाचा गर्भित अर्थ दुर्लक्षित करुन त्याने निर्माण झालेल्या कंपनांच्या तीव्रतेमुळे कोरोनाचे विषाणू मरुन जाणार असल्याचा भाबडा आनंद तो बुद्धी गहाण टाकून अभिमानाने शेअर करतो. एकच मेसेज स्वामी विवेकानंदांपासून, आईनस्टाईन ते विश्वास नांगरे-पाटील यांच्या नावानिशी तर कधी निनावी पुढे पाठवताना आता तो बिचकत नसतो. टिकटॉकवर बंदी घालणं अयोग्य आहे म्हणणार्‍या कुणा एका आभासी व्यक्तीशी तो आपल्या हातातल्या चिनी बनावटीच्या मोबाईलवरुन तावातावाने वाद घालतो. दिवसातले जवळपास सहा तास त्याची मुलं समाज माध्यमं वापरत असतात. तो स्वत: किमान चार तास आणि सामान्य ज्येष्ठ नागरिकही प्रचंड फावला वेळ हाताशी असल्याने जुजबी मोबदल्यात मिळणारी अमर्याद करमणूक स्क्रोल करण्यात साधारण २ ते ३ तास सहज घालवतात असं या क्षेत्रातले अभ्यासक सांगतात. मात्र माहितीच्या ढिगार्‍यात गुदमरुन अनेकदा तो आतून अस्वस्थ होतो. ’दिंड्या पताकांनी, दुमदुमली पंढरी, तरी मी श्रीहरी, कासावीस’ ही अवस्था राहतेच.

कुणाला लग्नासाठी स्थळ सुचवण्यात आलं की तो सगळ्यात आधी त्यांचं सोशल मिडीया प्रोफाईल बघतो. पती, पत्नी किंवा एकाच कुटुंबातले सदस्य एकमेकांना जितकं ओळखत नाहीत तितकं या सोशल साईट्स त्याला ’ओळखून’ असतात. त्याच्यासारख्या भाबड्या मतदारांची कलचाचपणी करायची. त्यानुसार विशिष्ट पोस्ट्स किंवा ट्वीट्सचा मारा करुन आपल्या पक्षाला अनुकूल असे जनमत तयार करायचे ही पद्धत राजकीय क्षेत्रात रुढ होत जाते. व्यापारी कंपन्याही हेच करत असतात. त्याने नुकतेच काय ’सर्च’ केले आहे ते पाहून त्याच्याशी निगडीत उत्पादनांच्या जाहिरातींचा भडिमार त्याच्यावर होऊ लागतो. ऑरवेलचे ’बिग ब्रदर इज वॉचिंग यू’ समाज माध्यमांवरही लागू होते आहे हे त्याच्या लक्षातही येत नाही. काल पहिल्यांदाच ज्याच्याशी व्हॉट्स अ‍ॅपवर चॅट केले ती व्यक्ती दुसर्‍या दिवशी फेसबुकच्या ’पीपल यू मे नो’ मध्ये लगेच दिसणं याला तो योगायोग समजतो. 

सुरुवातीला त्याला वाटत असतं की आपल्या वैयक्तिक माहिती मध्ये /डाटामध्ये लपवण्य़ासारखं काही नाही, आपल्या दोनचार एफडी, इवलीशी पुंजी. मग घाबरायचं कशाला! त्यामुळे बहुतेक वेळा आपला डाटा वापरण्य़ाची परवानगी ’आय अ‍ॅग्री’ असे क्लिक करुन तो स्वत:च देत असतो. संख्येने सर्वाधिक असलेल्या सामान्य माणसाची वैयक्तिक 'माहिती' हा सायबर व्यवसायाचा कच्चा माल  तो स्वत:च पुरवत असतो. समाज माध्यमं आणि त्यामागील अर्थकारणाचे नैतिक मूल्यमापन करताना तो हे विसरतो की ’फुकट’ या लेबलखाली आलेली सुविधा त्याचा गिनीपिग आणि ग्राहक म्हणून वापर करत असते. 

मग एके दिवशी, संगणकातले बहुतेक सॉफ्टवेअर फुकट वापरताना त्याला बरं वाटत असलं तरी पैसे उकळण्यासाठी रॅन्समवेअरचा वापर करणारे सायबर गुन्हेगार त्याच्या किंवा त्याच्या कंपनीच्या संगणकापर्यंत त्या मार्फत पोचतात. कधी त्याला त्याच्या बँकेकडून खाते अपडेट करायचे असल्याने माहिती विचारणार्‍या मेल येतात. बँकेकडून अशी माहिती ऑनलाईन विचारली जात नसते हे विसरुन ,शहानिशा न करता तो माहिती पाठवतो. त्याच्या खात्यातून कष्टाने साठवलेले काही हजार रुपये काढले गेल्याचा एसएमएस पाहून तो हबकतो. त्याच्या बायकोने कधीतरी नकारात्मक मेनोपॉजल मूडमध्ये अनोळखी व्यक्तीशी फेसबुक मेसेंजरमध्ये अभावितपणे केलेल्या भावनिक चॅटचा फायदा घेऊन कुणीतरी तिला मानसिक त्रास देऊ लागतं. ती सैरभैर होते. विद्या वॉक्सचं नवं गाणं, सुपरहिट वेब सिरिजपासून फॅशनच्या लेटेस्ट ट्रेंड्स पर्यंत सगळे अपडेट्स असलेली त्याची मुलगी फ्रेंडलिस्ट मोठी दिसावी म्हणून, चाहत्यांना नाराज कसं करायचं म्हणून इन्स्टा वर अनोळखी मित्रविनंत्या स्वीकारते. त्यातल्याच कुणीतरी तिचं फेक प्रोफाईल करुन त्यावर वाटेल तसे फोटो आणि मजकूर टाकलेला पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकते. तिचा भाऊ सायबर कॅफेत फॉर्म भरुन झाल्यावर लॉगआऊट न करताच घाईने निघतो. दुसर्‍या दिवशी त्याला त्याच्या इनबॉक्समध्ये त्याने इतक्यात कधीतरी क्लिक केलेल्या पॉर्नसाईटचे डिटेल्स जगजाहीर करु अन्यथा अमुक पैसे या खात्यात पाठवा, असा धमकीचा मेल आलेला दिसतो. 

’हे सगळं नायजेरियन लोक करतात आणि नोएडा किंवा मुंबईच्या हाय सोसायटीत घडतं ते सगळं, आपल्याला काय करायचंय,’ असं म्हणत आजवर ज्या सामान्य माणसाने सायबर जगाकडे कधी गांभीर्याने पाहिलेलं नसतं तो अशा एखाद्या घटनेने खडबडून जागा होतो. आजवर त्याच्यासाठी सायबर गुन्हेगारी म्हणजे भव्यदिव्य हॉलिवूड सिनेमातल्या कथा. बलाढ्य सरकारी यंत्रणांची गुप्त कागदपत्रं, न्युक्लिअर पॉवर प्लांटसंबंधीची गोपनीय माहिती, बँकामधले करोडो डॉलर्स वगैरे लुटण्यासाठी केलं जाणारं हॅकिंग. त्या अजब दुनियेशी त्याचा फक्त प्रेक्षक म्हणून संबंध असतो. पण आता सायबर विश्व एखाद्या चक्रीवादळासारखं त्याचं जगणं स्वत:सोबत वेगाने फरफटत घेऊन जात असतं. सायबर गुन्हेगारी त्याच्या चिमुकल्या घराचा उंबरठा ओलांडून आत आलेली असते.

जसं फक्त गाडी चालवता येणं पुरेसं नसतं. रहदारीचे नियम माहीत असणं, ब्रेकचा नीट वापर, गाडीची जुजबी दुरूस्ती करता येणं हे किमान कौशल्य अवगत असायला हवं तसंच सायबर विश्वात वावरताना देखील तारतम्य, व्यवहारज्ञान आणि किमान आवश्यक तांत्रिक ज्ञान नसेल तर अपघाताचा धोका अधिक. असतो. मग सामान्य माणसाच्या हातात काय असतं! ग्राहक म्हणून जागं राहणं. विवेकाचा वापर करणं. आयुष्यात खुट्ट झालं तरी ते समाजमाध्यमावर ओरडून सांगण्याचा मोह आवरणं, इतर लोक काय करत आहेत याबद्दल अवाजवी उत्सुकता न बाळगणं. सुरक्षेचे बेसिक सेटिंग वापरणं. व्यक्तिगत आवडीसाठी, तांत्रिक सुविधांसाठी, नेटवर्किंगसाठी, व्यवसायासाठी, सामाजिक-वैचारिक उपक्रमांसाठी, समविचारी लोकांच्या वर्तुळात राहण्य़ासाठी समजून उमजून समाज माध्यमाचा वापर करणं. असुरक्षित लिंक्सवर क्लिक नं करणं. https न वापरणार्‍या वेबसाईट्सवर आर्थिक व्यवहार टाळणं. अनावश्यक आणि क दर्जाचे अ‍ॅप्स इन्स्टॉल न करणं. दरवेळी फीडबॅक आणि रेटिंग बघणं. आभासी आणि वास्तव जगातली सीमारेषा पुन्हा एकदा ठळक करणं. त्यासाठी नुसतं डिजिटली साक्षर न होता डीजिटल व्यवहारज्ञान मिळवणं. 

सॉक्रेटिसने कोणत्याही संवादापूर्वी स्वत:ला तीन प्रश्न विचारायला सांगितले आहेत. सायबर विश्वात कोणतीही भर घालताना किंवा काही फॉरवर्ड करताना त्याने त्यात थोडे बदल करुन हे प्रश्न स्वत:ला विचारावे. ही माहिती खरी आहे का? या माहितीमुळे कुणाचे अकारण नुकसान तर होणार नाही ना? ही माहिती पाठवणं खरंच इतकं आवश्यक आहे का? यापैकी एक उत्तर जरी नकारार्थी आलं तर ’एंटर’ बटण दाबायचा मोह त्याने आवरणं. स्वत:ला कायम कृत्रिम आणि आकर्षक पद्धतीनेच सादर करण्याचं दडपण न घेता #MeriRealLife या टॅगसारखं आपलं खरंखुरं, मुखवटेविरहीत आयुष्य आनंदाने जगायला शिकणं. 

सायबर तंत्रज्ञान हे एक साधन आहे, साध्य नाही, आयुष्य व्यापून टाकेल इतकं महत्त्वाचं नाही. सामान्य माणसाने इतकी उर्जा, वेळ आणि मानवी तास त्यात अनुत्पादकपणे वाया घालवण्याइतकं तर नाहीच नाही. ते वॉशींग मशीन किंवा फूड प्रोसेसर सारखं मदतनीसाचं काम करतं तोवर ते नक्कीच उपयोगी आहे पण ते त्याच्या विळख्यात खेचून त्याला त्याचा गुलाम करत असेल तर! त्याच्या गरजा इतर कोणीतरी ठरवत असेल तर! तर त्याने हे थांबवायला हवं. त्याच्या गरजा काय आहेत हे त्याने ठरवावं. संयमाचं महत्त्व त्याची संस्कृती हजारो वर्षांपासून सांगतेय.. मग कुठे थांबायचं हे त्याला ठरवता आलं पाहिजे. ’यंत्रात’ परिवर्तीत होऊ घातलेल्या या माणसाला त्याच्या आतल्या समुद्राची गाज ऐकता यावी. त्यासाठी तंत्रज्ञानाबरोबरच हवे नको निवडण्याची समज विकसित व्हायला हवी. अन्यथा भारतीय समाजाचं शरीर आधुनिक साधनांच्या साहाय्याने जगत राहील पण त्याचा आत्मा हरवलेला असेल. ’आपली मूल्य बदलत चालली आहेत का, आपल्या वैयक्तिक आयुष्यातले ताण त्यामुळे वाढत आहेत का, आपलं सहजीवन त्यामुळे अस्थिर होतं आहे का, ’जीपीएस’च्या कक्षेबाहेरही एक विशाल जग आहे हे आपण विसरलो आहोत का, आपल्यासाठी काय जास्त महत्त्वाचं आहे, वास्तवातली आपली माणसं, आपले छंद, आपलं काम की आभासी जग!’ हा विचार त्याला करता आला पाहिजे. ऑनलाईन, ऑफलाईन जगात स्विच ऑन ,स्विच ऑफ करता आलं पाहिजे. कसं! तर ’रस्त्यावरून मिरवणूक जरी गेली ना, तरी उघडू नये दार. पण सामीलच व्हावे वाटले मिरवणुकीत तर जमावाच्या हाकेची वाटही पाहू नये’, असं ‘चर्चबेल’मधील एका लेखात ग्रेस म्हणतात तसं.

या दोन्ही जगांना जोडणारा पूल एवढीच भूमिका आणि किंमत त्याने सायबर तंत्रज्ञानाला द्यायला हवी, गुलामीच्या बेड्या तोडायला हव्यात आणि हे त्याने लवकर करायला हवं, नव्हे आत्ताच.


Saturday, March 15, 2025

सावध ऐका पुढल्या हाका

’ऑनलाईन’ शिकणार्‍या शाळकरी मुलांना सुद्धा सायबर सुरक्षेचे बेसिक नियम एव्हाना माहित झाले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या जनहितार्थ केलेल्या जाहिरातीतून अमिताभ बच्चन ते नियम आपल्याला कळकळीने सांगत असतात. १) आपले पासवर्ड परक्या व्यक्तीला कधीही कळू देऊ नका २) इंटरनेटवर जर आर्थिक व्यवहार करीत असाल तर आपला ओटीपी म्हणजे वन टाईम पासवर्ड कुणाला सांगू नका आणि ३) आपली वैयक्तिक माहिती आणि बँक डिटेल्स सोशल मीडियावर किंवा इंटरनेटवर कुणालाही देऊ नका. खरे तर आपल्याला हे इतके पक्के पाठ झाले आहे मग तरीही सायबर गुन्हे इतक्या मोठ्या प्रमाणावर का घडत असावेत! विशेषत: कोविड काळात आपल्या भारतात सायबर गुन्हेगारीत 23 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याची दोन कारणे आहेत. आपली फसवणूक होत असल्याचा क्षण अगदी व्यवहारचतुर लोकांना देखील सहजपणे ओळखता येत नाही. नजर हटी दुर्घटना घटी. दुसरे कारण आहे सायबर जगाच्या अंडरवर्ल्डबद्दल, अंधार्‍या कोपर्‍यांबद्दल, नव्या धोक्यांबद्दल जनतेची अनभिज्ञता. (लेखाच्या शेवटच्या भागात आपण याबद्दल विस्ताराने जाणून घेऊया)

सायबर गुन्हेगारांना आपली माहिती मिळते कुठून ?

जॉर्ज ऑरवेल या प्रसिद्ध लेखकाने ’१९८४’ या पुस्तकातून साम्यवादी सत्तेच्या विळख्यात स्वातंत्र्य आणि समतेची भाबडी स्वप्ने पाहणार्‍या जनतेला ‘बिग ब्रदर इज वॉचिंग यू’ ही जाणीव करुन दिली होती. आज ’बिग ब्रदर’ची जागा गुगल, अ‍ॅमेझॉन, फेसबुकसारख्या बलाढ्य अशा सायबर कंपन्यांनी घेतली आहे. आपण कुठे राहतो, काय करतो, आपल्या कुटुंबात कोण कोण आहेत, आपण काय खातो, काय पितो, कुठे जातो, कोणत्या वस्तू वापरतो, आपल्या आवडीनिवडी काय आहेत, आपण कोणाशी बोलतो, इतकेच नव्हे तर काय बोलतो, इंटरनेटवर काय सर्च करतो हे सगळे या बिग ब्रदर्सना माहित असते. अगदी नवराबायको किंवा घरातली माणसे जितकी एकमेकांना ओळखत नसतील तितक्या या सायबर कंपन्या आपल्याला ’ओळखून’ असतात असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. आपण इंटरनेटरवर जेव्हा ’फ्री’ म्हणून काही वापरत असतो तेव्हा आपण त्याचा असा मोबदला नकळत देत असतो. कोणतेही मोफत अ‍ॅप इन्स्टॉल करतेवेळी आपण ’आय अ‍ॅग्री’ यावर जेव्हा क्लिक करतो तेव्हा आपण त्या अ‍ॅपला आपले फोनबुक, गॅलरी, मोबाईलमधल्या फाईल्स वापरण्याची स्वत:च परवानगी देत असतो. बहुतेक जणांना सोशल मीडियावर व्यक्त व्हायला आवडते, सोशल मीडियाचा उद्देशच तो आहे. पण याचा अतिरेक होऊन आपल्या आयुष्यात खुट्ट जरी वाजले तरी त्यांना ते जगाला ओरडून सांगायचे असते. त्यामुळे ’हॅविंग पिझ्झा विथ अमुकतमुक’ किंवा ’ट्रॅव्हलिंग टू बंगलोर’ अशी पोस्ट टाकून सतत आपले अपडेट जगाला देण्याच्या सवयीतूनही ही माहिती सायबर जगात पोहचत असते. म्हणजे एका अर्थी या नव्या बिग ब्रदरच्या नजरकैदेत आपण स्वखुशीने उडी मारत असतो. 

ही सर्व माहिती म्हणजेच ज्याला डेटा असे म्हटले जाते, त्यात दोन गटांना स्वारस्य असते. एक म्हणजे मार्केटिंग कंपन्या, त्यांच्यासाठी आपण केवळ ग्राहक असतो आणि फक्त नफा कमावणे हा त्यांचा उद्देश असतो. दुसरा गट आहे, तो सायबर गुन्हेगारांचा, त्यांना सावज शोधण्यासाठी ह्या माहितीचा  उपयोग होतो. मग ह्यावर उपाय काय? हे सगळे वापरायचेच नाही! अर्थातच नाही.  कधीतरी अपघात होईल म्हणून जसे आपण प्रवास करणे थांबवत नाही. तसेच इंटरनेट वापरणे आपण थांबवायचे नाही. कारण इंटरनेटविना जगणे म्हणजे प्रगतीच्या वाटा स्वत:हून बंद करणे. इंटरनेटचा वापर अधिकाधिक स्मार्ट पद्धतीने करणे आणि सावधगिरी बाळगणे हाच यावर उपाय आहे. 

सायबर गुन्हेगार कोण असतात!

हे अतिशय उच्चशिक्षित असतात, त्यांना हॅकिंगचे उच्च तंत्रज्ञान अवगत असते असे बहुतेकांना वाटते परंतु बरेचदा हे गुन्हेगार जुजबी तांत्रिक ज्ञानाच्या साहाय्याने सावजाला हेरतात आणि लुबाडतात. गुन्हेगारी वृत्ती याच्या मुळाशी असते. झारखंडमधले जमताडा, राजस्थानमधले भरतपूर किंवा दिल्लीजवळचे नोएडा ही सगळी गावे सायबर गुन्हेगारीसाठी कुप्रसिद्ध आहेत. भारतात होणार्‍या एकूण सायबर गुन्हेगारीमध्ये 98% सायबर गुन्हे हे भारतीयांनीच केलेले असून 96% सायबर गुन्हे पुरुषांनी केलेले असतात. हे सायबर गुन्हेगार आपल्या अवतीभोवती सुद्धा असू शकतात. समाजविघातक वृत्तीचे लोक, व्यवसायातील स्पर्धक, काढून टाकल्यामुळे राग किंवा डूख धरलेले माजी कर्मचारी, कुतूहल किंवा गंमत म्हणून हॅंकिंग करून पाहणारे विद्यार्थी, प्रेमप्रकरणातून किंवा दुखावले गेल्याने सूड उगवण्यासाठी देखील गुन्हेगारी मनोवृत्तीचे लोक असे गुन्हे करत असतात. मुखवटे धारण करणे आभासी जगात अतिशय सोपे असल्याने गुन्हेगारांचे फावते. 

सायबर गुन्हेगारीचे आर्थिक फसवणुकीपलिकडे कोणते प्रकार असतात!

लव्हबग 2000 किंवा वॉनाक्राय 2017 असे सायबर अ‍ॅटॅकस् (रॅनसम वेअर) जगभर गाजले आहेत. मोठमोठ्या वित्तसंस्था, कॉर्पोरेट्सची गोपनीय माहिती एन्क्रिप्ट करुन/ चोरुन ती डिक्रिप्ट करण्याच्या बदल्यात बिटकॉईनसारख्या डिजिटल चलनात खंडणी वसूल करणे असे या गुन्ह्यांचे स्वरूप असते. हॉलीवूडच्या सिनेमातून आपण याची झलक पाहतो मात्र इथे आपण सर्वसामान्यांना भेडसावणार्‍या सायबर धोक्याबद्दल बोलत आहोत. असे गुन्हे मुख्यत: तीन प्रकारचे असतात. १) आर्थिक लुबाडणूक जी हॅकिंग किंवा फिशिंगद्वारे केली जाते. २) मानसिक छळ, जो ट्रोलिंग किंवा सायबर बुलिंगद्वारा केला जातो. आणि ३) लैंगिक शोषण, जे फोटो मार्फिंग किंवा वैयक्तिक माहिती चोरून ब्लॅकमेलिंग पद्धतीने केले जाते. अगदी ड्रग रॅकेटमध्ये ओढण्यात त्याचे पर्यावसान होऊ शकते. 

सायबर धोके टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यायला हवी! 

दुसर्‍याच्या मोबाईल किंवा संगणकावरून सोशल मीडिया किंवा बँक अकाउंट वापरणे टाळायला हवे आणि वापरलेच तर ताबडतोब लॉग आऊट करावे. कुणीही सहज ओळखेल असा पासवर्ड नसावा. साधारणत: बायकांना आपल्या नवर्‍याचे किंवा मुलांची नावे पासवर्ड म्हणून वापरण्याची हौस असते. पुरुष बरेचदा त्यांच्या आवडत्या स्त्रीचे नाव वापरतात. त्यांना ओळखणार्‍या व्यक्ती किंवा हॅकर्स ते गेस करू शकतात आणि तुमचे अकाउंट भलत्याच व्यक्तीच्या ताब्यात जाते. याला हॅकिंग म्हणतात. बहुतेक लोक आपल्या पोस्टचे सेटिंग कायम पब्लिक ठेवतात. गुन्हेगार त्याचा वापर करून प्रोफाईल व इतर फोटो कॉपी करून त्यासारखेच दिसणारे डुप्लिकेट अकाउंट तयार करतात. याला क्लोनिंग म्हणतात. मूळ अकाउंटवरील मित्रांची नावे पाहून त्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात. मग त्यांना ’मी अपघातात सापडलो आहे, मला मदत करा’ यास्वरुपाचे खोटे मेसेज पाठवले जातात. जेव्हा कुणी पैशाची मागणी करत असतो तेव्हा आपले कान टवकारलेच गेले पाहिजेत. अशा वेळी शहानिशा केल्याशिवाय कोणतेही व्यवहार केले जाऊ नयेत.

लैंगिक शोषण करणारे गुन्हेगार फोटो मॉर्फिंगचा वापर करतात. परंतु मुळात त्यांना हे फोटो उपलब्ध कसे होतात? बहुतेक महिला किंवा मुली आपल्या फोटोंचे प्रोफाईल सेटिंग हे पब्लिक राहू देतात. त्यामुळे ते कुणीही डाऊनलोड करू शकतो. त्याचा दुरुपयोग करू शकतो. खात्री न करता स्वीकारलेली फ्रेंड रिक्वेस्ट अनेकदा गुन्ह्याचे मूळ ठरते. 

सुशिक्षित लोक सायबर गुन्ह्यांना कसे बळी पडतात! 

सायबर गुन्हेगार सावजाच्या मानसिक स्थितीचा व्यवस्थित अभ्यास करतात. 11 ते17 वर्षे या वयोगटातल्या मुला-मुलींना इंस्टाग्राम किंवा डेटिंग अ‍ॅप्सवर, तरुण मुलींना साधारणत: विवाह नोंदणी स्थळांच्या वेबसाईटवर तर मध्यमवयीन महिला तसेच पुरुषांनासुद्धा फेसबुकच्या माध्यमातून फेक मित्र बनून जाळ्यात ओढले जाते. सोशल मिडीयावर महिलांशी संवाद साधताना त्यांच्या संवेदनशीलतेचा, मानसिक अवस्थेचा गैरफायदा घेतला जातो. हार्मोनल त्रासामुळे किंवा आयुष्यातल्या ताणतणावांमुळे कुणी आपल्याशी थोडेसे सहानुभूतीने बोलले किंवा प्रशंसा केली की नकळत त्या मोकळेपणाने बोलू लागतात. विश्‍वास संपादन केल्यावर हे संभाषण पुढे अत्यंत खाजगी स्तरावर नेले जाते. कालांतराने ही माहिती उघड करण्याची धमकी देऊन लैंगिक शोषण केले जाते तर कधी परदेशातून भेटवस्तू पाठवल्याचे सांगून ती सोडवून घेण्यासाठी महिलेला वेगवेगळ्या खात्यांमध्ये रकमा भरायला सांगितल्या जातात. विवाहविषयक वेबसाईटवर आपण उच्चशिक्षित सुस्थापित एनआरआय आहोत असे भासवून आधी लग्न ठरवणे आणि गोड बोलून पैशाची मागणी करणे असे प्रकार अनेकदा घडतात. पुरुषांनाही महिलांच्या नावाने मित्र विनंती पाठवून लुबाडले गेल्याच्या अनेक घटना घडत असतात. मध्यमवयीन लोक फारसे तंत्रस्नेही नसतात, त्यांना मुलाचा मित्र वगैरे असल्याचे सांगून गोंधळात टाकून घाईने पासवर्ड किंवा ओटीपी विचारला जातो. त्यामुळे सायबर जगात वावरताना आपला मेंदू हा सतत सजग राहिला पाहिेजे.

‘फ्री’ ह्या शब्दाबद्दल असलेले आकर्षण हे आर्थिक फसवणूक होण्यामागचे अत्यंत महत्त्वाचे कारण आहे. फ्री भेटवस्तू घ्यायला कोणत्याही लिंकवर जाणे, फ्री वायफाय वापरणे टाळायला हवे. वेबसाईटवर आर्थिक व्यवहार करताना वेबसाईटच्या नावाआधी https/लॉकची खूण बघायला हवी. आपण एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो तर मेन्यूकार्डवरचे सगळे पदार्थ आपण खात नाही. आवडेल तेवढेच निवडतो. दुर्दैवाने इंटरनेट किंवा सोशल मीडियावरती आपण अशी निवड करत नाही. केवळ क्षणिक आनंदासाठी 80 व्या वर्षी आपण कसे दिसू, किंवा मागच्या जन्मी आपण कोण होतो अशी तथ्यहीन माहिती देणारे अ‍ॅप त्याचे रेटिंग न पाहता इन्स्टॉल करून घेऊन सायबर धोक्याची पातळी आपण स्वत:च वाढवत असतो. अँटिव्हायरस सारख्या सुरक्षेच्या उपायांवर खर्च करायला बरेच जण तयार नसतात, याकडे गांभीर्याने पाहायला हवे. 

डार्क वेब आणि सायबर अंडरवर्ल्ड

हिमनगाचा जेमतेम 1/3 भाग आपल्याला पाण्याच्या वर दिसतो. तसेच आपण वापरतो, वावरतो ते सरफेस वेब हे फक्त 4% आहे. इंटरनेटचा उरलेला 96% भाग म्हणजे डीप वेब. इथपर्यंत सर्च इंजिन पोहोचू शकत नाही. या डीपवेबच्या अगदी तळाशी आहे सायबर जगाचे अंडरवर्ल्ड म्हणजेच डार्क वेब. पूर्वी जगाचे राजकारण किंवा समाजकारण हे तेलाभोवती केंद्रित असायचे. जगात जी काही युद्धे होतात ती बरेचदा ’तेल’ ह्या प्रश्‍नामुळे निर्माण झालेली असतात. आता जगाचे जे काही राजकारण, समाजकारण आहे ते डेटाभोवती गुंफलेले आहे. येत्या काळातील युद्ध ही सायबर वॉर असतील आणि ती या डार्कवेबच्या माध्यमातून होतील, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 

पुढच्या जगाचे जाऊ द्या, सायबर वापरकर्ता म्हणून विचार केला तर आपल्याला विशेष महत्त्वाची न वाटणारी आपली माहिती या वेब अंडरवर्ल्डमध्ये प्रचंड किंमतीला विकली जाते. म्हणजे आपले नाव, गाव, पत्ता, आधारकार्ड, पॅननंबर अशी माहिती 10 ते 20 रुपयाला. आपल्या डेबिट/क्रेडिट कार्डचा नंबर आणि नाव सुमारे 200 रुपयांना. कार्डची एक्स्पायरी डेटसारखी माहिती अजून जास्त किमतीला तर पासपोर्टसारखे दस्तावेज तब्बल 10000-15000 रुपये प्रति व्यक्ती विकले जातात. हे दर गरजेनुसार वाढत जातात. इंटरनॅशनल शॉपिंग वेबसाईटवरती बर्‍याचदा ओटीपी विचारला जात नाही, अशा ठिकाणी या माहितीचा गैरवापर केला जातो. सावधगिरी म्हणून इंटरनॅशनल कार्डवर स्पेंडिंग मर्यादा कमीत कमी ठेवणे, इंटरनॅशनल व्यवहाराचे सेटिंग एरवी ऑफ ठेवणे एवढे मात्र आपण नक्की करु शकतो.

‘डिपफेक’- सायबर जगातला एक नवा, भयावह धोका 

यूट्युबवर बीबीसाचा ओबामांवरील एक व्हिडिओ आहे. यात ओबामा आपल्याशी संवाद साधताना दिसतात. व्हिडिओत शेवटी सांगण्यात येते की तुम्ही ज्यांचे बोलणे ऐकले त्यांची देहबोली, त्यांची बोलण्याची लकब, त्यांचा आवाज, त्यांचा चेहरा जरी ओबामांसारखा असला तरी ते ’सिंथेटिक’ ओबामा होते. युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनच्या संशोधकांनी विविध व्हिडिओंमधून ओबामांचे चौदा तासांचे फुटेज घेऊन त्याच्यातून ओबामांची उच्चार करण्याची पद्धत, त्यांचे हावभाव, आवाज ह्याचे नमुने घेऊन व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीच्या मदतीने हे सिंथेटिक ओबामा तयार केलेत. थोडक्यात याचिं देही याचिं डोळा पाहिलेला व्हिडिओही खोटा, नकली असू शकतो. वलयांकित प्रसिद्ध व्यक्तींच्या विरोधात या तंत्राचा येत्या काळात मोठ्या प्रमाणात वापर होणार असल्याची शक्यता असल्याने संशोधकांनी त्याबाबत सावध करण्यासाठी या व्हिडिओची निर्मिती केली आहे. व्हिडिओतील व्यक्ती खरी की सिंथेटिक हे ओळखण्याचे सध्यातरी केवळ ब्लिंक आय टेक्नॉलॉजी हे एकच तंत्रज्ञान आहे आणि तेही हा फरक अद्याप शंभर टक्के अचूकतेने शोधू शकलेले नाही. फोटो मॉर्फिंगची ही पुढची पायरी आहे. फोटो मॉर्फिंगमध्ये बरेचदा एका व्यक्तीचे अर्धनग्न शरीर आणि दुसर्‍या व्यक्तीचा चेहरा मर्ज केला जातो. या बाबतीत रिव्हर्स इमेज चेकिंगचा वापर करून फोटो बनावट असल्याचे ओळखता येऊ शकते पण डिपफेक मध्ये हे मिक्सिंग अतिशय बेमालूमपणे केले जाते. 

सायबर गुन्हेगारांनी ह्या डिपफेकचा वापर कोविड काळात केल्याची नोंद आहे. काही जवळच्या व्यक्तींचे आवाज आपण अगदी झोपेतही ओळखू शकतो. न्यूयॉर्क टाईम्समधील एका बातमीनुसार सीइओच्या आवाजात कंपनीच्या एका महत्वाच्या अधिकार्‍याला फोन करण्यात आला आणि प्रचंड मोठे आर्थिक व्यवहार करायला सांगण्यात आले. बोलणार्‍या व्यक्तीचा आवाज, शैली अत्यंत परिचयाची असल्याने संशयाला जागा नव्हती, व्यवहार केले गेले आणि नंतर ’तो मी नव्हेच’ हे सीइओ ने स्पष्ट केल्यावर फसवणूक झाल्याचे संबंधितांच्या लक्षात आले. आजवर लांब कुठेतरी घडणारे हे गुन्हे आपण ग्लोबल खेड्याचा भाग असल्याने आपल्याही उंबरठ्याशी येऊन पोचले आहेत. याची नोंद आपण वेळीच घेणे निकडीचे आहे.  

सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तींमधला संघर्ष अनादि काळापासूनचा आहे. सायबर जग त्याला अपवाद नाही. इथले गुन्ह्यांचे प्रकार आणि सावज हेरण्याच्या क्लृप्त्या तंत्रज्ञानाइतक्याच वेगाने वाढत आणि बदलत जाणार आहेत. आपण स्वत:ला सुजाण आणि जबाबदार नागरिक समजत असू तर डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार व्हायला आपले सायबर साक्षर असणे पुरेसे नाही. सायबरधोक्यांबाबत सावध असणे तितकेच महत्वाचे आहे. विवेकी मन, तर्कशुद्ध विचार करणारा चाणाक्ष मेंदू आणि या दोहोंच्या ताब्यात असलेले प्रत्यक्ष क्लिक करणारे मनगट या त्रयीवरच सायबर जगातला आपला निर्धोक आणि आत्मविश्वासपूर्ण वावर अवलंबून आहे. 


Wednesday, October 30, 2024

पाकिस्तानी मालिकांमध्ये असं आहे तरी काय !

भारतीय एकतर्फी गंगाजमनी तहजीब सांभाळत आले आहेत. इतक्यातलं उदाहरण म्हणजे तबलापटू झाकीर हुसैन यांना अवघ्या भारताने भावनाविवश होऊन श्रद्धांजली वाहिली. पाकिस्तानने मात्र एखाद्या गैरमुस्लीम भारतीयावर असं भरभरून प्रेम केल्याचं आठवत नाही. पाकिस्तानने भारताला कायम छळलं आहे, युद्ध लादलं आहे, कुरापती तर चालूच आहेत. कलेला जात, धर्म नसला तरी काचणारे संबंध वेळीच संपवावे लागतात हे लक्षात घेऊन भारताने आपले दरवाजे पाकिस्तानी कलाकारांसाठी बंद केले आहेत.
या पार्श्वभूमीवर हम, एआरवाय इ. पाकिस्तानी मनोरंजन वाहिन्यांवरील मालिकांच्या भारतात वाढत चाललेल्या लोकप्रियतेने
 मला बुचकळ्यात टाकलं. गल्फ आणि परदेशातल्या पाकिस्तानी डाएस्पोरा समाजात ’घरकी याद’ दिलानेवाल्या या मालिका लोकप्रिय असण्यात नवल नाही परंतु गैरमुस्लीम भारतीय जेनझी वापरकर्त्यांच्या कॉमेंट्स, व्ह्यूज, लाईक्स या गर्दीत मोठ्या प्रमाणावर दिसतात. नमुन्यादाखल काही कॉमेंट्स- ’अब एक हफ्ता वेट करना पडेगा’, ’लव्ह फ्रॉम इंडिया’, ’This pakistani drama really touched my heart’. 
अलिया भट , विद्या बालन, आर. माधवन, किरण खेरपासून अमिताभ बच्चनपर्यंत अनेक कलाकारांनी या मालिकांचं, त्यातील कलाकारांचं Exceptional, Unparalleled, Phenomenal म्हणत भरभरून कौतुक केलं आहे. 

इंडिया टूडेमध्ये या संबंधातील एका लेखात एका पाकिस्तानी कलाकाराच्या मताचा उल्लेख आहे. तो म्हणतो. "बॉलीवूड सिनेमांसारख्या आमच्या मालिका गोळीबंद आणि प्रभावी असतात. भारतीय मालिकांसारख्या त्या प्रेक्षकांच्या सहनशीलतेचा अंत पाहत नाहीत. त्यांच्यासारख्या नकली, लुटूपुटीच्या वाटत नाहीत तर जिवंत, रसरशीत असतात." 
मुळात आंतरजाल (इंटरनेट) हे विश्वस्तरावर पसरलेलं असं माध्यम आहे ज्याला दरवाजा नाही. एक खिडकी बंद झाली / केली तर दुसर्‍या खिडकीतून कॉंटेंट आपली वाट काढत जातात. ते सुमार असले तर वाटेतच मरून जातात. आयएमडीबी संकेतस्थळाने बहुतेक पाकिस्तानी मालिकांना १० पैकी किमान ८ ते ९.५ गुण दिलेले पाहून एवढं गारूड करावं, असं या मालिकांमध्ये आहे तरी काय याचं मला कुतूहल वाटलं. हे कुतूहल शमविण्यासाठी मी निवडक मालिकांचे काही भाग तुकड्यात पाहिले तर काही मालिका स्क्रोल केल्या आणि माझ्या ’ओटीटी कट्टा’ सदरासाठी यावरच लिहायचं ठरवलं.
सगळ्याच मालिका काही महान नव्हत्या. काही तर सध्याच्या भारतीय मालिकांपेक्षा टाकाऊ आणि टुकार होत्या परंतु बर्‍याच मालिका खरोखर दर्जेदार तर काही  उत्तम होत्या. या मालिका भारतीय प्रेक्षकांच्या मनात इतकी घुसखोरी करू लागल्या असतील तर त्यांना नेमकं काय हवं आहे हे समजून घेण्यासाठी या मालिकांची दखल घ्यायला हवी. 

पाक मालिकांचा प्रेक्षकवर्ग भारतात निर्माण होण्याची सुरूवात २०१४ मध्ये झी च्या ’जिंदगी’ वाहिनीवरून झाली. लखनौ, पंजाब, काश्मीरमध्ये मुस्लीमबहुल भागात त्याची क्रेझ होती. आता ते लोण सर्वत्र पसरू लागलं आहे. सर्वसामान्य पाकिस्तानी स्त्रियांची स्थिती ’रांगेतलं शेवटचं माणूस’ अशी नसून ’रांगेत उभंच नसलेलं बाईमाणूस’ या प्रज्ञा पवारांच्या कवितेतल्या ओळीसारखी आहे असं आपल्यापर्यंत पोचणार्‍या बातम्यांवरून वाटतं. त्यामुळे काही सर्वाधिक लोकप्रिय मालिका पाकिस्तानी लेखिकांनी लिहिल्या आहेत याचं कौतुक वाटलं. या लेखिका जगण्यातले बारकावे तळाशी जाऊन असे काही  टिपतात की प्रेक्षक मालिकेत पार गुंतून जावेत.
मेरे हमसफर’ मालिकेची लेखिका होती सायरा रझा. ऐ इश्क ए जुनून.. लिहिलं सादिया अख्तरने आणि ’कभी मै कभी तुम’ ची लेखिका होती फरहत इश्तिआक. तिन्ही मालिकांचे विषय भन्नाट होते. मानवी नात्यांमधली गुंतागुंत मात्र सामाईक होती. हिंसा, अश्लीलता त्यात नावालाही नव्हती.


कभी मै कभी तुम’ ही मालिका नोव्हेंबर २०२४ मध्ये संपली. ती इतकी गाजली होती की तिचा अंतिम भाग पाकिस्तानी थिएटर्समध्ये तिकीट विक्री करून प्रसारित करण्यात आला. या मालिकेने पाकिस्तानची सीमा ओलांडून युरोपातील मुस्लीमबहुल राष्ट्रात, बांग्लादेशात लोकप्रियता मिळवलीच पण भारतीय प्रेक्षकांच्या प्रतिक्रियाही या मालिकेच्या YouTube व्हिडिओंखाली ओसंडून वाहत होत्या. 
 
भारतीय सिनेमाच्या भव्यतेपुढे आणि दर्जापुढे पाकिस्तानी सिनेमाचा जीव आणि प्रेक्षकवर्ग मात्र अतिशय केविलवाणा आहे. भारतीय सिनेमाचं,  विशेषत: शाहरूख खानचं तिथल्या कलाकारांना प्रचंड आकर्षण आहे. लांबसडक केसांसाठी विख्यात असलेली व ’रूबाब’ च्या भूमिकेत गाजलेली नईमा बट कोणत्याही भूमिकेसाठी केसांना कात्री लावू देत नाही. शाहरूखसह काम करायला मिळालं तर मात्र मी भूमिकेनुसार केस सुद्धा कापायला तयार आहे, असं ती सांगते. बॉलीवूडमध्ये संधी मिळणं हे तिथल्या अनेक कलाकारांचं सुप्त स्वप्न आहे. ’तेरा चेहरा’ फेम अदनान सामीचा मुलगा म्हणतो "इंडियाने माझ्या वडिलांना खूप प्रेम दिलं असलं तरी मी देशप्रेमी असल्याने मला तिकडे (इंडियात) काम करायचं नाही’. असलं तरी ते आता शक्य नाही. फवाद खान, माहिरा खानला मध्यंतरी संधी मिळाली पण आता पाकिस्तानशी विकोपाला गेलेल्या संबंधांचे पडसाद कलाक्षेत्रावर उमटणं स्वाभाविक असल्याने ते मुश्कीलही नही नामुमकीन आहे. 
’कभी मै कभी तुम’ मधल्या ’शर्जीना’च्या भूमिकेमुळे गाजलेली हानिया आमीर दिलजित दोसांझच्या लंडन मधल्या कार्यक्रमाला गेली असताना दिलजीतने तिला सन्मानाने मंचावर बोलावलं होतं. तिथे उपस्थित तिचेही चाहते जल्लोष करु लागले. दिलजीतने आपल्या पंजाबी सिनेमात तिला मुख्य भूमिका देताच भारतीयांनी मात्र त्या सिनेमाकडे पाठ फिरवली. असं असूनही भारतीय सिनेक्षेत्रातल्या कलाकारांइतकी लोकप्रियता, टीव्ही वाहिन्यांवर काम करणार्‍या अनेक भारतीय कलाकारांना स्वप्नवत वाटणारं यश  Pak Drama मधून काम करणार्‍या पाकिस्तानी कलाकारांना का मिळतं आहे त्यामागची अन्य कारणंही यामुळे शोधावीशी वाटली. 

याचं बरंचसं श्रेय जातं ते (अपवाद वगळता) भारतीय हिंदी व प्रादेशिक मालिकांच्या सुमारपणाला. त्याचबरोबर उत्तम मांडणी असूनही (अपवाद वगळता) हिंसक आणि लैंगिक दृश्यांनी खचाखच भरलेल्या शिवराळ भाषेतल्या बहुसंख्य  वेब सीरीजना. 
’दुश्मनों से पशेमान होना पड़ा है
दोस्तों का ख़ुलूस आज़माने के बाद’ अशी आपली गत या मालिकांच्या बाबतीत झालेली आहे.
हिंदी व प्रादेशिक मालिका इतक्या संथ गतीने सुरु असतात की महिन्यातून एकच भाग पाहिला तरी त वरून ताकभात कळतो. ’क्यूँ की सास भी कभी बहू थी’ या हिंदी मालिकेचा नवा सीझन सुरू झाला आहे म्हणे. पहिल्या सीझनचे १००८ एपिसोड झाले होते. मराठीत ’चार दिवस सासूचे’ म्हणत चाराचे किती झाले हे गुगलून पाहिलं तर ३१४७. ’आई कुठे काय करते’.. पाच एक वर्ष सुरु होती. 
कितीही प्रतिभासंपन्न लेखक आणले तरी त्यांचे पेन, कीबोर्ड, मेंदू, अगदी जनरेटीव्ह ए-आय सुद्धा इतके एपिसोड पाडल्यावर (कागदावर किंवा स्क्रीनवर..) झिजणार नाही तर काय ? 
एखाद्या क्षुल्लक घटनेनंतर समजा आश्चर्य दाखवायचं असेल तर घरात जितकी पात्र त्यात आहेत ती सगळी क्रमाने "काय" म्हणतात. ’मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचंय’ असं म्हणत अनेक भाग आणि शेकडो प्रेक्षक घनघोर कंटाळा येऊन खर्ची पडतात.
याउलट पाकिस्तानी मालिका.. २०/ ३० फार तर ५० भागात खेल खतम. 
लोकांना हवीहवीशी वाटत असतानाच मालिका संपवण्याची धमक या मनोरंजन नगरीत आहे. वेगवान पटकथेची आणि दिग्दर्शनाची घट्ट बांधणी प्रेक्षकांना खिळवून ठेवते. पाकिस्तानी मालिकांना कुठे थांबायचं हे अचूक कळतं. 

अर्थात लांबी हे काही गुणवत्तेचे परिमाण किंवा एकमेव निकष नाही पण मग आणखी काय कारणं असावीत ! 
आपल्या मालिकांची साचेबद्ध बिनडोक कथानकं. अखंड सौभाग्यवती वज्रचुडेमंडित रडकी नायिका, इस्टेटीची भानगड ,बटबटीत नटलेली खलनायिका आणि पुरुष मेषपात्रं ! त्यांच्याऐवजी पुतळे उभे केले तरी चालतील. तसंही त्यांना फक्त ’हे बघ, आधी तू जरा शांत हो’ एवढाच संवाद अधूनमधून म्हणायचा असतो. 
’लग्न’ या एकाच शब्दाभोवती या मालिका महाएपिसोड करत महिना महिना फिरत असतात. एकदाचं ते झालं की नायिकेचा काटा काढण्यासाठी दुधात विष घालणं, ती गर्भवती असल्यास तिला तुम ता ना ना ना पार्श्वसंगीतासह जिन्यावरून पाडणं, नायकाच्या गाडीचे ब्रेक फेल करून ठेवणं, नायिकेला काळी म्हणून टोमणे मारणं यात शे-दोनशे भाग संपतात. नायकाच्या धक्क्याने कुंकवाचं तबक हवेत उडून कुंकू नेम धरून अविवाहीत नायिकेच्या भांगात उडी मारतं किंवा विवाहित असेल नायिका तर कुंकवाच्या दिव्य शक्तीमुळे किंवा एखाद्या देवीच्या आशीर्वादाने संकटातून बचावत राहते. 
याशिवाय नायिकेला नायकाच्या शर्ट्चं तुट्लेलं बटण शिवणं, त्या एपिसोडच्या सुमारास वटसावित्री/ करवा चौथ /मंगळागौर, होळी, गणपती, पाडवा वगैरे जे कुठले सणवार येतील ते आधीच जुजबी असलेल्या कथानकाला टाईम प्लीज करून बाजूला टांगून साजरे करणं इ. कामं करावी लागतात. 
लेखकाला यापुढे सुचेनासं झालं की ते एकता कपूरचे जुनाट प्रयोग नव्याने ट्राय करून दोन तीन मालिकातली पात्र एकत्र आणतात. लॉजिक सोडून काय वाट्टेल ते करतात.
हिंदी मालिकांमध्ये हेच सगळं आणखी झकपक स्वरूपात असतं. वरून या गुंताड्याला ’कला’ वगैरे म्हणावं अशीही संबंधितांची अपेक्षा असते. 
जग मंगळावर चाललं आहे, आपण अश्मयुगीन काळाकडे चाललो आहोत या सत्याशी या मालिकांना देणंघेणं नाही. लोकांना जे हवं तेच आम्ही दाखवतो आहोत असं निर्माता, दिग्दर्शकांचं म्हणणं असतं. हे कमी की काय म्हणून सर्वोत्तम सासू, सर्वोत्कृष्ट सून असली बक्षिसे देणारे आणि मधल्या गॅप हिंदी सिनेमातील आयटम सॉंगवर मालिकेतील दिग्गज कलाकारांनी व्यावसायिक तडजोड म्हणून केलेल्या करूण नाचाने भरून काढणारे दिव्य सोहळेही टीव्हीवर सुरु असतात. 
अन्य भाषेत रमू न शकणारे वयस्कर व निवृत्त लोक, काही भाबड्या गृहिणी यांच्या जीवावर रटाळ मालिका सवंग मनोरंजनाचा रतीब घालत राहतात. खरं तर सकस कथानकांवर आधारित निर्मिती करणं आणि लोकांच्या अभिरुचीला वळण लावणं अशक्य नाही हे दूरदर्शनच्या काळातल्या अनेक मालिकांनी सिद्ध केलं आहे आणि वर्तमानात काही पाकिस्तानी मालिकांनीही.

पाश्चात्य मनोरंजन विश्वात डार्क कॉमेडी  किंवा भव्य बिगबजेट ऐतिहासिक मालिकांचा  (उदा: द क्राउन) आवाका वैश्विक आहे. राजकारणासारख्या संवेदनशील विषयांचंही बेधडकपणे रोखठोक चित्रण करणार्‍या मालिका तिथे प्रसारित होतात. पाकिस्तानातली राजकीय स्थिती बघता हे कधीही शक्य नाही. त्यामुळे भारतीय मालिकांप्रमाणेच बहुतेक पाकिस्तानी मालिका कुटुंबकेंद्री आहेत. मात्र या मालिकांमध्ये प्राण आहे तो आणखी काही कारणांमुळे...

कथाबीजाशी प्रामाणिक असलेलं कथानक आणि दाद घेणारे संवाद 
किचन पॉलीटीक्सच्या पलीकडे एक भलंमोठं जग आहे आणि बायका शालू नेसून पालक निवडत नसतात एवढी बेसिक समज यांना असल्याने कथानक सशक्त, एखाद्या समांतर सिनेमाइतकं वास्तवाधारित असतं.  उदा: ’मेरे हमसफर’ या मालिकेत पिचलेल्या बायकोमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारा ,आवश्यक तिथे नाही म्हणायला शिकवणारा नवरा आणि त्या दोघांमधले सहजीवनावर भाष्य करणारे सुंदर प्रसंग मालिकेला उंचीवर घेऊन गेले. बहुतेक मालिकांमधला एकही संवाद अनैसर्गिक आणि अकारण वाटत नाही. इतके ते कथेशी एकरूप झालेले असतात. 
’मै मंटो नही हूँ’ मध्ये साधाभोळा अविवाहित प्राध्यापक, सह-प्राध्यापिका, यांची विद्यार्थिनी असलेली एका डॉनची मुलगी, गँगवॉर, कुटुंबांची ओढाताण, प्रेमत्रिकोण या कथानकात सगळ्या पात्रांचे संवाद काळजातून आल्यासारखे वाटावेत इतके सहज आणि दमदार आहेत. सदात हसन मंटो निडर पाकिस्तानी लेखक होते. नावाचा मंटो असलेला घाबरट प्राध्यापक वेळ येताच आपण लेखक मंटोच्याच जातकुळीतले असल्याचं दाखवून देतो. यातलं मानवी मनोव्यापाराचं विश्लेषण आणि सगळ्या पात्रांचे एखाद्या मुक्त काव्यासारखे संवाद लक्षात राहणारे आहेत. अर्थात प्राध्यापक-विद्यार्थिनीमध्ये प्रेमसंबंध दाखवण्यावरून तिकडे अनेकांच्या भावना दुखावल्या.    

तपशीलवार पात्रनिर्मिती
आपल्या मालिकांमध्ये एक सासू झाका आणि दुसरीला काढा. मेकअप थापून सोफे उबवणारं हे पात्र मुळातच तकलादू असतं. पाक मालिकांमध्ये जास्त फूटेज नसलेल्या पात्राच्या व्यक्तिमत्वाचं सुद्धा सूक्ष्म चित्रण केलं जातं. जुजबी भूमिकेमध्ये एखादा वकील दाखवला तर तो रोजाने आणलेला ’ओव्हरअ‍ॅक्टींगके पचास रुपये काट’ वाला न वाटता 'वकील' वाटतो. या कंगोर्‍यांमुळे पात्रांची ओळख निर्माण होते आणि ते कथानकाला सहजगत्या पुढे घेऊन जातात. 
आपल्याकडे खरं तर थिएटरची पार्श्वभूमी किंवा अनुभव असलेले उत्तमोत्तम कलाकार आहेत, परंतु प्रेक्षकांना बुद्ध्यांकच नाही असं मानणार्‍या मालिकांमध्ये ते बिचारे अभिनय करणार तरी केव्हा !

उच्च निर्मिती मूल्य 
या मालिका अतिशय नेत्रसुखद , ’क्लासी’ वाटतात आणि खर्‍या देखील.  उदा" ’ऐ इश्क ए जुनून’ या मालिकेतला नायक पंचतारांकित हॉटेल्सच्या साखळीचा मालक आहे. महत्वाचे प्रसंग थेट पंचतारांकित हॉटेलमध्येच चित्रीत केले आहेत. कारची निवड, क्रॉकरी, सजावटीच्या वस्तू प्रत्येक गोष्टीचा तडजोड न करता विचार केल्याचं दिसतं. ड्रोन शॉट, लॉंग शॉट असो की जवळून प्रत्येक फ्रेम श्रीमंत वाटते. आपल्याकडे ऐतिहासिक मालिकांत हे बर्‍यापैकी साध्य केलं असलं तरी एरवी श्रेयस तळपदे सारखा प्रख्यात देखणा अभिनेता उद्योगपती नायक म्हणून एंट्रीपुरता हेलीकॉप्टरने येतो. नंतरच्या भागात त्याला पुठ्ठ्याच्या विमानाच्या सेटवर बसवलेलं पाहून प्रेक्षकांनाही हसू आवरत नाही. 
३०० करोडची उलाढाल करणार्‍या राधिका मसालेची गुप्त फॅक्टरी असते तसं इथे नाही. फॅक्टरीचा उल्लेख असेल तर एखाद्या फॅक्टरीत प्रत्यक्ष शूट केलं जातं. आपल्या अवतीभोवती हे सारं घडत असल्यासारखं वाटून आपण कथेशी अधिक कनेक्ट होतो. ’कन्व्हिक्शन’चं मर्म त्यांना गवसलं आहे.

सामाजिक समस्यांची समंजस हाताळणी 
पाकिस्तानात पुराणमतवाद्यांचं आणि कट्टरपंथीयांचं वर्चस्व आहे. तरीही मालिकांमधून घरात होणारे हिंसाचार, मानसिक आरोग्य, लैंगिक असमानता यासारख्या ज्वलंत विषयांना केंद्रस्थानी ठेवताना निर्माते घाबरत नाहीत. उदा: ’केस नं ९’ मालिकेमध्ये करियरिस्ट नायिकेवर बलात्कार करणार्‍या उद्योगपती मालकाच्या विरोधात ती हिंमतीने लढा देते. अशा केसच्या कायदेशीर खाचाखोचा, गुन्हेगाराने विकत घेतलेली भ्रष्ट यंत्रणा, अशा घटनांच्या सामाजिक प्रतिक्रिया बीभत्स न  होऊ देता प्रश्नाची दाहकता जाणवत राहील अशा प्रभावीपणे चित्रित केल्या आहेत. पटकथेवर घेतलेली मेहनत स्पष्ट दिसते. आपल्याकडे कित्येक हिंदी मालिका अजूनही काली जादू, नागीन, मणी, खजाना, पुरखोंकी हवेली, डायन अशा वेडपट गोष्टींमध्ये अडकून पडल्या आहेत. 

परिचित संस्कृती व भाषा 
एके काळी आपल्याच देशाचा भाग असलेल्या प्रदेशाबद्द्ल भारतीयांना वाटणारं एक अनामिक औत्स्युक्य हे पाकिस्तानी मालिकांना/ त्यावर आधारित सोशल मिडिया रील्सना मिळणार्‍या प्रतिसादाचं कारण असावं. 
पाश्चात्य मालिकांच्या तुलनेने या मालिकांमधली ’ब्राऊन’ माणसं, परंपरा, ते जग रिलेटेबल  वाटतं असं जेन झीचं म्हणणं आहे. 

यातल्या स्त्री पात्रांचे (पुरूषांचे देखील) कपडे, पात्र अत्याधुनिक असलं तरीही अंगभर असतात. आखूड कपडे घालणं म्हणजे जीवाला धोका त्यामुळे त्या धजावतही नसाव्यात. कपडेपट उत्तम पण वास्तववादी असतो. 
ग्रामीण पद्धतीची श्रीमंती दाखवायची म्हणून भुवनेश्वरीसारखं एकाचवेळी ८, १० सोनेरी पॉलीशच्या माळा घालून नटून बसलेलं अतार्किक पात्र मला त्यांच्या ब दर्जाच्या मालिकांमध्येही दिसलं नाही. काही बायका भुवनेश्वरीच्या साड्यांसाठी मालिका बघत म्हणे. पाक मालिका उत्तर भारतीय स्त्रियांमध्ये विशेष लोकप्रिय असल्याच हे ही कारण नाकारता येत नाही कारण पिंटरेस्टवर मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी सूट्स म्हणजे सलवार कमीज सर्च केले जातात. 

हिंदी सिनेमांच्या वेडामुळे भारतीयांना फारसी, उर्दू मिश्रीत हिंदी सहज कळते. अ‍ॅक्सेंटशी झटापट करायची किंवा सबटायटल वाचत वरच्या स्क्रीनकडे पाहायची कसरत करावी लागत नाही. ’चश्मदीद गवाहोंके बयानात को मद्दे नजर रखते हुए अदालत इस नतीजे पर पहुंची है की ...’ असले भरभक्कम संवाद आपल्याला लहानपणी सुद्धा समजत. भारतात केबीसी लोकप्रिय असण्याचं श्रेय अमिताभ बच्चन यांच्या वलयाइतकंच त्यांच्या उत्तम भाषेलाही जातं. भारतीय मालिकांमधली भाषा मात्र फारच साधारण असते. 
आपल्याकडॆ बातम्यांचे निवेदक वापरत असलेल्या ’विरोधक गये बौखला’ किंवा ’निश्चितच..आज या ठिकाणी पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणावर साचलेलं आहे’ अशा किंवा मराठी मालिकांमधल्या ’काय तुला जेवण बनवता येतं?’ या भाषेच्या तुलनेने  पाक मालिकांमधली आदबशीर उत्तम भाषा ऐकायला भारदस्त आणि गोड वाटते. त्या पात्रांच्या तोंडून, ’अब दिल्ली दूर  नही’ सारखे वाक्प्रचार ऐकताना गंमत वाटते. 
मराठी मालिका चांगल्या, वाईट कशाही असल्या तरी त्यांची शीर्षकगीतं नेहमीच सुरेल असतात. पाकिस्तानी मालिकांचीही शीर्षकगीतं किंवा थीमसॉंग म्हणता येईल, श्रवणीयच नव्हे अर्थपूर्ण असतात. गंधाळला, गहिवरला, मंद, धुंद, नक्षी, पक्षी, चिंब ,बिंब ... या पलीकडे जाणारं चांगलं काव्य त्याच्या गाभ्यात असतं. त्यामुळे नुसत्या शीर्षकगीतांच्या व्हिडिओंनाही लाखो लाईक्स मिळालेले दिसतात. 

याचा अर्थ पाकिस्तानी मालिकांमध्ये उणीवा, विरोधाभास नाही असं मुळीच नाही.  
भारतातल्या केंद्रविरोधकांना ’हिजाब’ हा वैयक्तिक निर्णय असल्याचा शोध लागला आहे. पाकिस्तानी मालिकांमधल्या नायिका मात्र बुरख्यात नसतात. 
आई, आजीच्या भूमिका करणार्‍या स्त्रिया मध्यमवर्गीय दाखवलेल्या असल्या तरच बाहेर पडताना चादर/ बुरखा घालताना दिसतात. काही व्हिडिओंवरून बहुतांश पाकिस्तानी स्त्रिया किमान डोक्यावरून ओढणी, स्कार्फ घेताना दिसतात. खरं तर तिथल्या बहुसंख्य स्त्रियांना शिक्षण, आरोग्य, निर्णयस्वातंत्र्याच्या हक्कासाठी लढावं लागतं आहे, काहींना तर लढायचं असतं हे ही माहीत नाही. मालिकांमध्ये तसं क्वचित दिसतं. त्यांना नायिका हटके स्वरूपात दाखवायच्या आहेत हे लक्षात येतं.
अर्थात नायिका कितीही आधुनिक, स्वतंत्र बाण्याची असली तरी ’तलाक’ प्रकरणाची तिला भयंकर धास्ती दिसते. एकूण बहुपत्नीत्व मालिकेतल्या स्त्री-पात्रांना सपशेल अमान्य आहे. 
स्मिता पाटील एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या," सिनेमा संपल्यावर बायका रडत, डोळे पुसत बाहेर पडल्या तर तो सिनेमा हमखास यशस्वी होणार अशी सिनेमाक्षेत्रातल्यांची धारणा असते". हे मराठी, अन्य प्रादेशिक भाषेतल्या आणि हिंदी मालिकांइतकंच काही क दर्जाच्या पाकिस्तानी मालिकांनाही लागू पडतं. फरक एवढाच की मंगळसूत्र हातात धरून ’तुला याची ताकद माहीत नाही’ वगैरे इमोशनल डायलॉग पाकिस्तानी नायिका मारत नाहीत. त्या बिचार्‍याही राहत नाहीत. त्या लढा देतात, सूड घेतात किंवा प्रश्नावर पाय देऊन पुढे जातात. 

भारतीय मालिकांमध्ये बंगाली, मराठी, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय अशी वेगवेगळी पार्श्वभूमी असते. त्यानुसार प्रथा, वेशभूषा, भाषा, पदार्थ यातला फरक स्पष्टपणे दिसतो तसं पाकिस्तानी मालिकांमध्ये भौगोलिक वैविध्य अजिबात दिसत नाही. एकच बिर्याणी वेगवेगळ्या डिशमधून वाढल्यासारखं वाटतं. 
दोनच शहरं दिसतात किंवा भासतात. इस्लामाबाद आणि मुख्यत: कराची. 
बाकीचा पाकिस्तान मालिकांच्या खिजगणतीत नाही. पाकिस्तान जणू दुबई असल्यागत यातल्या पात्रांची जीवनशैली दिसते. इनडोअर सीन चकचकीत तर आउटडोअर सीनमध्ये बकालपणा दिसतो त्यामुळे आउटडोअर सीन अगदी कमी असतात. 
खेड्यातली कथानकं जवळपास नाहीतच. याचा अर्थ खेड्यातल्या वास्तवाचं चित्रण तिथल्या प्रेक्षकांना आवडत नसावं. तुलनेने हिंदी, मराठी मालिकात खेड्यांची पार्श्वभूमी बर्‍याचदा यशस्वीरित्या वापरलेली दिसते. 
या मालिकांमध्ये काही वेळा दिसणारी, जगातील बहुतेक संस्कृतींनी निषिद्ध मानलेली नाती जसं चुलतभावंडांनी एकमेकांवर प्रेम करणं, लग्न करणं वगैरे आपण तटस्थपणे पाहिली तरी आपल्याला असह्य वाटतात. अशी कथानकं भारतात व अन्य संस्कृतींमध्ये तग धरू शकणार नाहीत. 

यातली नायिका कंपलसरी पिट्ट गोरी असते. मराठी मालिकेत खोट्या काळ्या केलेल्या नायिका दाखवायची टूम आली आहे त्याच्या उलट. सर्वसामान्य पाकिस्तानी स्त्री निमगोरी असते. अशा वर्णाच्या अभिनेत्रींना कायम दुय्यम भूमिकाच कराव्या लागतात अशी खंत त्या बोलून दाखवतात. यांचा मेकअप मात्र कथानकानुरूप ,अतिशय नैसर्गिक वाटतो. 
यातली सगळी श्रीमंत पात्र महागड्या परदेशी काळ्या गाड्यांमधून फिरतात. त्यांच्या मागे पुढे कायम बंदूकधारी खाजगी सुरक्षारक्षकांच्या ओपन जीप असतात. हे दृश्य इतकं कॉमन आहे की त्यावरून तिथल्या प्रतिष्ठेच्या कल्पनांचा आणि विदारक सामाजिक स्थितीचा अंदाज येतो.  
 ’केस नं ९’ मधल्या एका जोडप्याचं नाव ’रोहित-मनीषा’ आहे. हा एकमेव अपवाद मला आढळला. कॉमेंटमध्ये अनेक मुस्लीम नावाच्या व्यक्तींनी त्यावर प्रश्न उपस्थित केलेला दिसला. 

मी या लेखासाठी जेवढ्या मालिका स्क्रोल केल्या किंवा त्यातली निवडक दृश्य पाहिली त्यात भारतीय संदर्भ मला तरी सापडले नाहीत. आपल्याकडे भारत-पाकिस्तान संबंधांवर अनेक चित्रपट येऊन गेले असले तरी दूरदर्शन काळातली ’तमस’, बुनियाद वगळता मालिकांमध्ये पाकिस्तानचा उल्लेख, संदर्भ नसतो. 
फाळणीपासून ते पहलगाम घटनेपर्यंत भारताला अत्यंत तापदायक ठरलेला पाकिस्तान, समन्वयाचे फोल ठरलेले प्रयत्न, पाकिस्तानाला ग्रासून टाकणारे लष्कराचे, जिहादींचे वर्चस्व, धर्मांधता, आर्थिक अडचणींनी अर्धमेला झालेला पाकिस्तान. यातले काही चुकूनही या वास्तववादी म्हणवणार्‍या मालिकांमधून डोकावत नाही. त्याअर्थाने या मालिकांना पलायनवादी म्हणता येईल. उलट या ताणातून ब्रेक मिळावा म्हणून पाकिस्तानी जनता या मालिकांमध्ये विरंगुळा शोधत असावी. 
मालिकांमध्ये यूकेचा/इंग्लंडचा उल्लेख हमखास असतो. एक तरी पात्र तिथे राहत असतं. भारताचा उल्लेख नसतो हे एका अर्थी बरंच म्हणता येईल कारण या माध्यमातून जर भारतविरोधी आशय भारतीय जेनझी पर्यंत या मालिकांनी पोचवायला सुरूवात केली तर भारताच्या शिरावर त्याचा बीमोड करण्याचं नवं ओझं येऊन बसेल. 

बदलत्या जगाची नोंद पाकिस्तानी मालिकांनी घेतली नाही तर आज लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या या मालिका तुम ता ना ना ना करत जिन्यावरून गडगडत सुमार हिंदी-मराठी मालिकांच्या रांगेत येऊन बसतील ही शक्यता मात्र नाकारता येत नाही.
उत्तम कलाकृतीचा उद्देश असतो माणसाची आयुष्याविषयीची समजूत वाढवणं. भारतीय मालिका जगताला हे उद्दिष्ट गाठता गाठता क्रिकेटप्रमाणे त्यांना याही क्षेत्रात नमवायचं असेल तर त्यांना कमी न लेखता आपली रेष मोठी आणि सर्जनशीलतेचं आकाश अधिक उत्तुंग करावं लागेल. गुणवत्तेशी स्पर्धा फक्त गुणवत्तेनेच करता येते. 
----------- 
#pakdrama 
 (पूर्वप्रकाशित -दौत लेखणी त्रैमासिक) 

Tuesday, July 16, 2024

रोबोच्या ’अंतर्मना’त


महाराष्ट्र टाईम्स मध्ये संपादकीय पानावरील लेख -रोबोच्या ’अंतर्मना’त !#Artificial_Intelligence_Appreciation_Day #July16
दक्षिण कोरियातील सायबोर्ग नावाच्या रोबोने ९ तास ड्युटीच्या बहुधा अतिश्रमाला वैतागून ’आत्महत्या’ (!) केल्याच्या बातम्या देशविदेशातील वर्तमानपत्रातून झळकल्या. दक्षिण कोरियाच्या गुमी सिटी कौन्सिलने दिलेल्या माहितीनुसार, २६ जून रोजी या रोबोचा ’मृत्यू’ झाला. त्याने पायऱ्यांवरून साडेसहा फूट खाली उडी मारून आत्महत्या (!) केल्याचे सांगितले जात आहे. मृत रोबोची ऑगस्ट २०२३ मध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. नागरिकांना आवश्यक ती कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचे काम रोबोकडे पहिल्यंदाच सोपवण्यात आले होते. त्याला लिफ्टचा वापर करता येई. कॅलिफोर्नियाच्या बीअर रोबोटीक्स या कंपनीने हा रोबो विकसित केला होता. रोबोंचा प्रभावीपणे वापर करणार्या देशांच्या यादीत दक्षिण कोरिया बराच वर आहे. International Federation of Robotics नुसार दर १० कर्मचार्यांमागे तिथे एक रोबो काम करतो.
आत्महत्येच्या (!) घटनेच्या वेळी काही साक्षीदारांच्या मते त्यांनी सायबोर्गला जागीच गरगरताना आणि मग स्वत:ला झोकून देताना पाहिले. रोबो खाली कोसळताना त्याचे तुकडे झाले. या तुकड्यांचे कंपनीद्वारे यथावकाश विश्लेषण केले जाईल. एखादे यंत्र कायमचे नादुरूस्त होते किंवा बंद पडते तेव्हा आपण ते यंत्र ’कामातून गेले’ म्हणतो. इंग्रजीत ’डेड’ म्हणत असल्याने ’मृत’ शब्द वापरला गेला हे आपण समजू शकतो पण ही ’आत्महत्या’ असल्याचा उल्लेख बातम्यांमध्ये आहे.
मुळात रोबो ’आत्महत्या’ करू शकेल का!
’तेरी बातोंने ऐसा उलझा दिया’ या चित्रपटातली नायिका सिफ्रा (क्रिती सनॉन) एक आधुनिक गृहकृत्यदक्ष युवती रोबो असते. तिला पहिल्यांदा साडी नेसलेली पाहून तिच्या सौंदर्याची स्तुती करताना नायकाची आत्या म्हणते,"आज तो तुम पुरे शहर में आग लगा दोगी". सिफ्रा विचारते, "क्या आप चाहती है मै पूरे शहर में आग लगा दूँ ?" नायक घाईघाईने तिला सांगतो, "अरे,ये मजाक कर रही है!" यावर ’ओह ! जोक!" असे म्हणत सिफ्रा यांत्रिक (अमानवी) पद्धतीने ही ही ही करते. सिनेमातल्या या गमतीदार प्रसंगात कथा फुलविण्यासाठी थोडे स्वातंत्र्य घेतले गेले असले तरी असे रोबो केवळ ’प्रतिसाद’ देऊ शकतात व ते ही त्यांना जसे ’प्रोग्राम’ किंवा डिझाईन केले आहे त्यानुसार, हे या दृश्यावरून स्पष्ट होईल.

मदतनीस किंवा सेवा देणारे रोबो माणसासारखा संवाद कसा काय साधतात याचे उत्तर त्यांच्या ए-आय संरचनेमध्ये आहे.
यासाठी नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग (NLP) या ए-आयच्या एका शाखेचा उपयोग केला जातो. मानवी भाषा समजून घेणे आणि त्याचा अर्थ लावणे हे तिचे कार्य आहे. हे प्रोग्राम डीप लर्निंगच्या साहाय्याने शक्य तितके फाइन-ट्यूनिंग करत भाषा निर्मिती क्षमता सुधारण्याचा व संभाषण सुसंगत राखण्याचा प्रयत्न करतात. हाडामासाच्या माणसाने गप्पा मारल्याचा भास व्हावा इतक्या सहजभावापर्यंत पोहोचणे हे या प्रोग्रामचे अंतिम लक्ष्य असते. पण माणूस आपल्या दहा टक्के भावना शब्दातून व्यक्त करतो आणि बाकी त्याच्या हावभाव आणि शरीरभाषेतून. म्हणजे मानवी भाषाच नव्हे तर मानवी चर्येवरचे भाव आणि देहबोली सुद्धा या मदतनीस रोबोंना समजायला हवी. तरच ते अचूक संवाद साधू शकतील.
यावरही संशोधन झाले आहे.
चीनमधील शांघाय येथे नुकत्याच पार पडलेल्या जागतिक कृत्रिम बुद्धीमत्ता परिषद २०२४ मध्ये फुदन विद्यापीठाने ’ग्युआनघुआ क्र. १’ या नावाचा भावनाशील ह्युमनॉईड सादर केला. याला चेहर्यावर राग, खिन्नता, दु:ख, आनंद व उल्हास यासारखे भाव प्रतिसाद स्वरूपात दर्शवता येतात. १६५ सेंमी उंची व ६२ किलोग्रॅम वजन असलेल्या या ह्युमनॉईडमध्ये ४५ कृत्रिम बुद्धीमत्ता आधारित सांधे बसवले आहेत. यामुळे तो ’कठपुतळी’ सारख्या कडक हालचाली न करता माणसासारख्या सहजतेने हालचाली करू शकतो व माणसासारखी उठबस करू शकतो. चीनमधल्या वृद्धांना मदत व्हावी या हेतूने या ह्युमनॉईडची निर्मिती करण्यात आली आहे. आवश्यक ते वैद्यकीय प्रशिक्षण देण्यात आले आहे. वृद्धांकडे वैयक्तिक लक्ष देऊन प्रेमाने त्यांची काळजी घेऊ शकेल अशी त्याची ’इमोशनली इंटेलिजंट’ रचना आहे. तरीही माणसाचे रूप त्याला कसे येणार !

लवकरच येणार. जपानमध्ये मानवी त्वचेसारख्या प्रतीचे रासायनिक आवरणाचे रोपण रोबोवर करण्याचे प्रयोग सुरु आहेत. जसे हसताना माणसाची जबड्याची त्वचा ताणली जाते, वैतागल्यावर कपाळावर आठ्या पडतात तसे या कृत्रिम त्वचेचा वापर करून रोबोच्या चेहर्यावर घडताना दिसले तर त्याच्या आणि माणसाच्या दिसण्यातले आणि वागण्यातले अंतर हळूहळू नाहीसे होत जाईल.
आता त्याच्यात आणि माणसात फरक राहीला तो समानुभूतीचा आणि त्यायोगे होणार्या भावनानिर्मितीचा. समानुभूती म्हणजे दुसऱ्या व्यक्तीशी तादात्म्य पावून तिला समजून घेणे, तिचे विचार, भावना, वृत्ती जाणून घेणे.
सादरीकरण प्रभावी असेल तर नाटक / सिनेमातल्या पात्रांना दु:ख झालेलं बघून आपल्यालाही वाईट वाटते. त्यांना आनंद झालेला पाहून आनंद होतो. समोर जे दिसते आहे ते वास्तव नाही याची कल्पना असूनही हे घडते. जित्याजागत्या माणसांबाबत तर आपण अधिकच संवेदनशील असतो. द्वेष, मत्सर, राग, प्रेम, आकर्षण या सगळ्या भावना आतून निर्माण होतात.

तंत्रहृदयी ए-आय किंवा कृत्रिम बुद्धीमत्तेला संवेदना नाहीत त्यामुळे तिला सहानुभूती कळत नाही आणि समानुभूती घेता येत नाही. अनुभूती राहो, कसलाही ’अनुभव’ घेता येत नाही. त्यांच्या डिझाइननुसार ते वस्तुनिष्ठ चिन्हांच्या आधारे समोरच्या माणसाच्या भावना ओळखून शब्दातून किंवा स्पर्शातून सहानुभूती व समानुभूती जाणवल्याचा भास निर्माण करू शकतात. मानवी वर्तनाचे अनुकरण करून त्यासाठी आवश्यक त्या हालचाली ,कृती, संवाद करू शकतात. परंतु भावनिक दृष्ट्या समरस न झाल्याने त्यायोगे कोणतेही भाव त्यांच्यात आपसूक निर्माण होत नाहीत.
मुन्नाभाई एमबीबीएस- या चित्रपटात एका बधीरावस्थेतल्या पेशंटला मॉडेलसारखे वापरून एक डॉक्टर प्रशिक्षण देताना दिसतात. ते त्या पेशंटचा उल्लेख सतत 'ऑब्जेक्ट' असा करत असतात. मुन्नाभाई त्यावर चिडून म्हणतो, ये ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट क्या लगा रखा है , इनका कोई नाम तो होगा". हा मानवी भाव रोबोमध्ये येऊ शकणार नाही कारण त्यांच्यासाठी सारे मानव हे फक्त 'ऑब्जेक्ट' आहेत.

इसापनीतीत प्राण्यांचे मानवीकरण केले आहे तसे माणसाने रोबोचे मानवीकरण केल्याने त्याची कार्य करण्याची क्षमता संपणे या द. कोरियातील घटनेला माणसाने ’आत्महत्या’ नाव दिले आहे. मुळात आत्महत्येआधी मानवी मनात जी प्रचंड उलथापालथ व मेंदूत ज्या घडामोडी होत असतील त्या रोबोमध्ये होणे शक्य नाही कारण त्याला ’मन’ नाही. आत्महत्या करण्याइतक्या नैराश्याच्या टोकाला जाण्यासाठी आधी ’स्व’ची जाणीव हवी. अद्याप जगातल्या कोणत्याही तंत्रज्ञानाकडे ’स्व’ विकसित करण्याची प्रणाली उपलब्ध नाही. म्हणजेच हा रोबो एक यंत्र म्हणून ’मृत’ झाला आहे
तरीही अशा मदतनीस रोबोंची गरज माणसाला भावनिक पातळीवर का वाटते ! तंत्रज्ञ आणि आर्टिस्ट सॅन मार्कोस (कॅलिफोर्निया) हे रियल बॉटिक्स कंपनी चालवतात. त्याद्वारे डिजिटल बाहुल्यांची (रोबो) निर्मिती करताना २०१७ मध्ये त्यांनी एक प्रयोग केला होता. रोबो मदतनीसांबाबत माणसाच्या प्रतिक्रिया त्यांना आजमावून पाहायच्या होत्या. त्यांनी काही रूग्णांना प्रत्यक्ष डॉक्टरांशी बोलायला सांगितले आणि काही रूग्णांना डॉक्टरांच्या डिजिटल ’अवतारा’शी बोलायला सांगितले. पेशंटच्या मते ते डिजिटल अवताराशी जास्त सहजपणे बोलू शकले कारण तो आपल्याला ’जज’ करत नाही.
सॅन यांच्या मते यातून अशीही शक्यता आहे की भावनाप्रधान माणसे या निरपेक्ष पण निर्विकार म्हणजेच यंत्रहृदयी बाहुल्यांच्या (रोबोंच्या) प्रेमातही पडतील. काही त्यांच्या इतके आहारी जातील की त्यांच्यावाचून माणसाचे जगणे अवघड होईल. यातून मानसिक आरोग्याचे नवे प्रश्न उपस्थित होतील. म्हणूनच सॅन म्हणतात, "सजीव आणि रोबो सखी किंवा माणूस आणि रोबो मदतनीस यांची बलस्थाने व मर्यादा ओळखता यायला हव्यात. अन्यथा आपण बाहुलीच्या हातचे बाहुले होऊ. "
आज म्हणजेच १६ जुलै हा दिवस जागतिक स्तरावर ए-आयचे म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्तेच्या भल्याबुर्या परिणामांचे विश्लेषण करण्याचा आणि त्याविषयी नव्या घडामोडी जाणून घेण्याचा दिवस. IRCAI आणि UNESCO चा हा संयुक्त उपक्रम आहे. ए-आयने दिलेल्या अगणित सुविधांबद्द्ल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि ए-आय मुळेच उभ्या राहिलेल्या आव्हानांकडे गांभीर्याने पाहण्याचा हा दिवस आहे.

कार्यक्षमता व उत्पादकता वाढावी या हेतूने माणसाऐवजी रोबो अधिकार्यांवर प्रचंड काम सोपवल्याने होणार्या परिणामांचा विचार करण्याची वेळ द.कोरियावरच नव्हे तर जगावर आली आहे. मुळात अतिताणामुळे मृत पावण्याइतपत म्हणजेच दुरूस्त होऊ शकणार नाही इतके बिघडण्याइतपत काम यंत्र असले तरी त्यावर लादणे योग्य किंवा नैतिक आहे का यास्वरूपाच्या चर्चा या घटनेनंतर सुरू झाल्या आहेत.
रोबोने माणसाचे काम हलके करणे अपेक्षित आहे की माणसाऐवजी काम करणे अपेक्षित आहे ! आवश्यक तिथे मजूर, परिचारक म्हणून किंवा माणसासाठी धोकेदायक अशा ठिकाणी रोबोचा वापर होतो तेवढे पुरेसे नाही का!
या संदर्भात एक मार्मिक व्यंगचित्र बघण्यात आले. त्यात एक आधुनिक महिला म्हणते आहे," ए-आय ने माझी सर्जनशील कामे करावी म्हणजे मला घरकामाला पुरेसा वेळ मिळेल हे मला नकोय. उलट ए-आय ने मला घरकामात मदत करावी म्हणजे मला माझ्या आवडीची सर्जनशील कामे करायला पुरेसा वेळ मिळेल."

तूर्त गुमी सिटी कौन्सीलने मृत सायबोर्गच्या जागी दुसरा रोबो नियुक्त करायचा विचार सध्या स्थगित केला आहे.
लक्षावधी वाहनचालकांना बेरोजगार करणार्या स्वयंचलित गाड्यांना मी भारतात प्रवेश करू देण्याच्या विरोधात आहे, अशी भूमिका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतली आहे. ए-आय मुळे करियरच्या अनेक संधी निर्माण होत असल्या आणि जगणे सुकर होत असले तरीही त्या त्या देशातील धुरीणांनी नव्या तंत्रज्ञानाच्या अतिवापराचा व त्याच्या संभाव्य परिणामांचा विचार करून ठाम भूमिका घेणे आता आवश्यक आहे.

माणूस दिवसेंदिवस यांत्रिक आणि रोबो ह्युमनॉईड होत चाललेला असताना या दोघांच्या मधली पुसट होत चाललेली सीमारेषा वेळीच ठळक करायला हवी आहे.
#robotics #AI

Friday, December 15, 2023

कसे असेल उद्याचे तंत्रज्ञान !

FutureTechnology 

आज चाळीशी ओलांडलेल्या पिढीने कॅसेट ते म्युझिक अॅप्स असा भारतीय संगीताचा प्रवास पाहिला आहे. डायल करावे लागणारे फोन ते व्हिडिओ कॉल, दूरदर्शन ते ओटीटी, टाईपरायटर ते व्हॉईस टायपिंग. आगगाडी ते मेट्रो रेल्वे असे बदल अनुभवले आहेत. काळाबरोबर सतत बदलणारी गोष्ट म्हणजे तंत्रज्ञान. १० कोटी लोकांपर्यंत पोचायला फेसबुकला ९ वर्ष लागली पण चॅटजीपीटीला फक्त २ महिने. हे बघता बदलाचा वेग किती वाढला आहे हे लक्षात येईल. या पार्श्वभूमीवर २०२३ हे वर्ष संपत आलेले असताना उद्याचे म्हणजे येत्या दोन दशकातले तंत्रज्ञान कसे असू शकेल याबाबत तंत्रज्ञ, माध्यमतज्ञ व अभ्यासक काय म्हणतात ते पाहूया.

पुढील दोन दशकात एआर आणि व्हीआर मुख्य प्रवाहात येईल. एआर म्हणजे ऑगमेंटेड रिअॅलिटी. एआर चे उदाहरण म्हणजे पोकेमॉन-गो सारखे गेम्स. यात कॅमेरा वापरून वास्तव जग कॅप्चर केले जाते व त्याचे डिजिटल रुपांतरण केले जाते. यामुळे गुगल मॅप सारखी सुविधा जणू आपले बोट धरून प्रत्यक्ष वाटचाल करेल. व्हीआर म्हणजे व्हर्च्युअल रिअॅलिटी. खरे असल्याचा भास. सध्या हे तंत्र वापरून पायलटला विमान चालविण्याचे प्रशिक्षण आभासी आकाशात दिले जाते. भविष्यात व्हीआरच्या मदतीने दुसर्या गावातील किंवा देशातील प्रदर्शन आपण एकेक दालन पार करत प्रत्यक्ष पाहत असल्यासारखे फिरु शकू. हे काही प्रमाणात आजही घडते आहे. मनोरंजनाच्या मैफिली, क्रीडा सामने, शिक्षण, पर्यटन, मीटिंग, डॉक्टरांच्या भेटी इ. बरेच काही व्हीआर द्वारे नियंत्रित केले जाईल.
जेरेमी गोल्डमन हे “गोइंग सोशल” या फायरब्रँड ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणतात, अनेक कामे केवळ आवाजाच्या साहाय्याने सूचना देऊन होतील. आता आपण सिरी, अॅलेक्सासारख्या ज्या सुविधा पाहतोय त्या फारच साधारण वाटतील इतके तंत्रज्ञान प्रगत होईल.
ब्रेकिंग न्यूजचे चे स्वरूप पूर्णपणे बदलेल. कोरी बर्गमन, या ’ब्रेकिंग न्यूज’ च्या सह-संस्थापकांच्या मते घडलेल्या घटनेचे शेकडो व्हिडिओ साक्षीदार अपलोड करतील. ही माहिती एका व्हिडिओत समाविष्ट करून अशा प्रकारे दाखवली जाईल की जणू आपण त्या घटनेचाच भाग आहोत. उदा: एखादा अपघात घडला तर बातमी बघणार्याला आपण तो अपघात होताना तिथे हजर आहोत असा अनुभव येईल,.
मोबाईल फोन वापरून आपण सध्या जी कामे करतो त्यातली बहुतेक कामे स्मार्ट घड्याळे करतील. वेअरेबल म्हणजे परिधान करता येणार्या तंत्रज्ञानाचा वापर सुरु होईल. ओटिस किमझे हे ’सिंपली मेजर्ड’चे संचालक भविष्यातल्या सोशल मीडियाबद्दल बोलताना म्हणतात, तो आपल्या कपड्याचा भाग असेल किंवा आपल्या चष्म्याचा किंवा बुटाचा सुद्धा. तेव्हाची गॅझेट्स आतासारखी हातात धरायची गरज राहणार नाही कारण ती आपल्या अंगाखांद्यावर कुठेतरी असतील. आपला हात किंवा तळवा विशिष्ट ठिकाणी स्पर्श करून स्मार्टफोनसारखा वापरता येईल.
अशक्य वाटते आहे ना ! काही वर्षांपूर्वी आज नॉर्मल वाटणारा व्हिडिओ कॉल सुद्धा अशक्य वाटत असे.
बायोमेट्रीक तंत्रज्ञान सध्या विकसित होते आहे. येत्या काळात प्रत्यक्ष व्यक्तीऐवजी त्याचा होलोग्राम म्हणजे त्रिमितीय (थ्रीडी) प्रतिमा त्या व्यक्तीच्या वतीने मिटींगला उपस्थित राहू शकेल. एलॉन मस्क यांची न्यूरॉलिंक कॉर्पोरेशन ही कंपनी या न्यूरो तंत्रज्ञानावर काम करते आहे. मानवी शरीरात रोपण करता येईल असे ब्रेन मशीन इंटरफेस (BMI) ही कंपनी विकसित करते आहे.
लवचिक तंत्रज्ञान टिकून राहील. आज फेसबुक सोशल मिडियाचा राजा आहे. जगभरात त्याचे सुमारे ३ अब्ज वापरकर्ते आहेत. ते टिकून राहील मात्र त्याचे रुप वेगळे असेल. अन्य प्लॅटफॉर्मचे आयुष्य तुलनेने मर्यादित असेल. कदाचित दहा वर्षांनी किशोरवयीन मुले "ट्विट" शब्दाचा अर्थ शोधतील. पॉडकास्ट ,शॉर्ट व्हिडिओ व लाईव्ह व्हिडिओची चलती असेल. स्टोरीज, स्टेटस याचे महत्व वाढेल. त्यात अत्याकर्षक फीचर्स येतील.
जागतिक राजकारणात सोशल मिडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर भल्याबुर्या घडामोडी होत राहतील.
डिसेंबर २०१० मध्ये ट्युनिशियामध्ये लोकशाही स्वरुपाचा नागरी उठाव सुरू झाला. या उठावामुळे ट्युनिशिया, इजिप्त आणि लिबिया सारख्या देशांतील शासकांना सत्ता सोडणे भाग पडले. ट्विटर आणि इतर सोशल मीडियाच्या मदतीने दडपशाहीचा निषेध करून त्या विरोधात लोक क्रांती करु शकले. ’ब्लॅक लाईव्हज मॅटर’ किंवा ’मी टू’ सारख्या हॅशटॅग चळवळींनी ’पर्सनल इज पॉलिटीकल’ हे सिद्ध करायला मदत करत महत्वाचे सामाजिक प्रश्न ऐरणीवर आणले आहेत. भविष्यात असे ट्रेंड जास्त मोठ्या प्रमाणावर सुरु होतील.
दुसर्या बाजूला हेच माध्यम घातपाती ठरण्याचा धोका देखील वाढेल. आज बहुतांशी दहशतवादी कारवायांचे नियोजन सोशल मिडियावरील ग्रुपच्या माध्यमातून केले जाते आणि काम होताच ग्रुप डिलिट केला जातो. आगामी काळात ए-आय व नव्या टूल्सच्या साहाय्याने या कारवाया वाढण्याची शक्यता आहे. बनावट खात्यांवर नियंत्रण मिळवता आले तरच याला वेसण घालता येईल परंतु हे सोपे नाही.
जगभरात हायपर-रिअलिझम हा आधीपासूनच सोशल मीडियाचा एक घातक परिणाम आहे. लाईक्स कमी आले की निराश वाटणे, कोणी विरोधी कॉमेंट केली तर बेचैन होणे, ट्रोल करणे, सहज उपलब्ध झालेल्या पॉर्न आशयाची चटक लागणे इ. दुष्परिणाम सहज दिसून येत आहेत. हे प्रचंड वाढतील.
आपण विविध वेबसाइटवर फिरत असताना त्यावर कोणी, काय व किती वेळ पाहिले याची नोंद होते. त्यावरू आपली आवड लक्षात येते. आपल्या आवडीशी जुळणार्या जाहिराती आपल्याला सोशल मिडिया फीडमध्ये दिसू लागतात. या पाठलाग किंवा टेहळणीलाच मॅपिंग हा राजरोस शब्द आहे. उदा: आपण इमेल किंवा चॅटमध्ये किंवा फोनवर बोलताना ’व्हॅकेशन’ किंवा ’सुट्टी’ असा शब्द वापरला असेल तर आपल्याला प्रवासी कंपन्यांच्या जाहिराती दिसू लागतात. यापुढे ही प्रणाली अजूनच आक्रमक होईल. आपल्यावर सतत नजर ठेवली जाईल. तो डाटा अधिक मोठ्या प्रमाणात बँकिंग, वित्तसेवा, इन्शुरन्स, ई-कॉमर्स, पर्यटन, मनोरंजन आदी क्षेत्रांना विकला जाईल. खासगीपण फारसे उरणार नाही.
खोट्या बातम्या, बनावट फोटो याचा वापर करून समाजात अस्थिरता निर्माण करणे, ब्लॅकमेल करून लैंगिक शोषण, मानसिक छळ, आर्थिक लुबाडणूक करणे, हे प्रकार आजही सुरु आहेत. तंत्रज्ञानाच्या पाठबळामुळे ते अधिक क्रूर होत जातील. ए-आयबरोबर डीप फेकचा वापर वाढेल. त्याची शहानिशा करणे मानवी मेंदूसाठी सोपे नसते त्यामुळे डीप फेक व डार्क वेबच्या भुयारातून पेंडूराच्या बॉक्समधून निघावे तसे काहीही निष्पन्न होऊ शकेल. जागतिक स्तरावरील नियामक संस्थांनी याबाबत वेळीच कठोर पावले उचलली नाही तर हे सामाजिक स्वास्थ्यासाठी धोकेदायक असेल.
ए-आय (कृत्रिम बुद्धीमत्ते) मुळे सर्जनशीलतेला आव्हान निर्माण होईल. माणसाच्या आकलन व विश्लेषण क्षमतेवर सोशल मीडियामुळे नकारात्मक परिणाम होतील. मानवी भावनांमध्येही विस्कळीतपणा आणि रुक्षपणा वाढत जाईल.
या पुढची पायरी म्हणजे आयबीएमने मेंदूतील स्मृतीकक्षामध्ये एका चिपमध्ये सेव्ह करता येतील अशा तंत्रज्ञानाचे पेटंट घेतले आहे. या चिपमुळे नव्या कल्पना स्मृतीरुपात साठवल्या जाऊ शकतील. भूतकाळातील आठवणी पुन्हा तयार केल्या जातील आणि सहजपणे पुनर्रचित केल्या जातील. विस्मृती किंवा त्यासारख्या आजारांसाठी हे उपकारक ठरेल. पण कदाचित स्मृती हॅक होऊ शकेल. याचे परिणाम काय होतील ते आताच सांगता येणार नाही.
कोणत्याही क्षेत्रात प्रगती करण्यासाठी केवळ माहिती पुरेशी नसते तर त्याला ज्ञानाचा आधार असावा लागतो. वेगवेगळी कौशल्ये शिकावी लागतात, ती विकसित करावी लागतात. दुर्दैवाने ती न शिकताच बेधडकपणे तंत्रज्ञान वापरले जाऊ लागले आहे. सोशल मिडिया व ए-आय वापरताना कुठे थांबायचे हे आतापासूनच प्रत्येकाने ठरवायला हवे. (उदा: रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भारताने नवतंत्रज्ञानाचा स्वीकार केला असला तरी चालकांचे काम हिरावून घेणारी ए-आय आधारित स्वयंचलित वाहने भारतात धावणार नाहीत याची ग्वाही दिली आहे.)
तांत्रिक सुविधा आणि गॅझेट्सच्या ढिगार्यातून आपण किती व काय निवडतो, त्यावर किती विसंबून राहतो आणि काय फॉरवर्ड करतो यावर आपल्या मनाचे, कुटुंबाचे आणि समाजाचे स्थैर्य अवलंबून असणार आहे.

#futuretechnology #punyanagari

Friday, December 1, 2023

खाण्यासाठी जन्म आपुला !

 


एखाद्याच्या हृदयात शिरण्याचा मार्ग त्याच्या पोटातून जातो असं म्हटलं जाई. आजच्या सोशल मिडियाच्या काळात तो मार्ग आधी पदार्थाच्या फोटोतून जातो. सोशल मिडियावर दर २,४ पोस्टमागे एक पोस्ट भूक चाळवणार्या देखण्या खाद्यपदार्थांची असते. कधी तो खास पदार्थ अनुरूप पात्रात नजाकतीने सजवलेला असतो तर कधी चॉकलेट, सॉसेस किंवा चीजच्या ढिगार्याखाली चेंगरल्याने दिसतही नसतो. कधी त्यासह एखादी खमंग कथा, अनुभव सांगणारा ब्लॉग तर कधी पाककृतीचा रंजक व्हिडिओ असतो.

खाद्यपदार्थांच्या अशा चित्ताकर्षक सादरीकरणाला इंटरनेटवर म्हणतात ’फूड-पॉर्न’.
मायकेल जेक्ब्सनने एका विज्ञानविषयक प्रसिद्धीपत्रकात १९७९ साली हा शब्द वापरला. त्यानंतर रोझलिंड कोवार्ड या स्त्रीवादी लेखिकेने हा शब्द वापरला तो १९८४ साली प्रकाशित झालेल्या तिच्या एका पुस्तकामध्ये. ’जिव्हालालसा वाढवणारं पदार्थाचं मादक रूप’ या अर्थी. ’आपण खात किंवा करत असलेल्या पदार्थाविषयी सोशल मिडियावर फुशारकी मारण्याची भोगवादी मानसिकता’ या अर्थानेही तो उपहासाने वापरला जातो. परंतु फूडपॉर्न हा हॅशटॅग इतका प्रचलित झाला की आता तो बिनधास्त कौतुकाने वापरला जाऊ लागला आहे. या हॅशटॅगसह फेसबुकवर ७ कोटींहून अधिक पोस्ट्स आहेत. इन्स्टाग्रामवर ३० कोटींहून अधिक तर यूट्यूबवर ७ लाखांहून अधिक व्हिडिओ आहेत. याशिवाय खाद्यपदार्थांच्या अन्य पोस्ट्स, पेजेस, ग्रुप्स, चॅनेल्स तर अगणित आहेत.
ठेल्यावरचे चटकदार पदार्थ म्हणजे स्ट्रीट फूड ते पंचतारांकित उपहारगृहातले स्टायलिश पदार्थ, चूल ते मॉड्युलर किचन, चहाची टपरी ते हाय-फाय कॅफे, कोकण ते कॅलिफोर्निया व्हाया कोरिया अशी फूड-पॉर्नची अफाट रेंज आहे. हौशी खुडबुडे ते सुगरण, लग्नावळीतले आचारी ते आंतरराष्ट्रीय शेफ, ’हॅवींग लजान्या विथ बेस्टीज’ अशा पोस्ट टाकणार्या पोरी ते जगभरातले खाद्यप्रेमी. सगळे मिळून फूड-पॉर्नच्या समुद्रात संततधार ओतत असतात.
घरात विशेष पदार्थ केला की नैवेद्य दाखवणं किंवा घरातल्या लहान मुलांना खायला देणं किंवा स्वत:च त्याचा गरमागरम आस्वाद घेणं हे हल्ली दुर्मिळ होत चाललं आहे. स्मार्ट फोन कॅमेरा वापरून पसंत पडेतो पदार्थाचे विविध कोनातून फोटो किंवा व्हिडिओ काढण्यात येतात. त्यातला सर्वोत्तम शेअर करण्यात येतो. आपण जेवायला बाहेर गेल्यावर आपली ऑर्डर येईपर्यंत शेजारच्या टेबलवर आलेल्या सिझलरकडे न बघितल्याचा अभिनय करतो तसं घरची मंडळी तोवर या पदार्थाबाबत करतात. चांगल्या लाईक्स आल्या तर आनंदाने आणि फारशा नाही आल्या तर हिरमुसून मग तो पदार्थ सर्वांना वाढण्यात येतो.
कुणी पदार्थाविषयी एखादा रम्य आठवण लिहीतो. ( फूड+नॉस्टेल्जिया = foodalgia) कुणी खसखसा, कचाकचा अशी क्रियाविशेषणं वापरून भयकृती लिहिते. कुणी इंदौरच्या सराफ्यात तर कुणी परदेशात खवैयेगिरी करतानाचे लाईव्ह व्हिडिओ पोस्ट करतो. सर्वसामान्य व्यक्तींसाठी अशा पोस्ट्स हा घटकाभराचा आनंद असतो. पाकनिपुण लोकांसाठी कलेला मिळालेला मंच, नवशिक्यांसाठी पाक-शाळेचा वर्ग, खाद्यसंस्कृती अभ्यासकांसाठी नमुने, आहारतज्ञ व फूड-ब्लॉगर्स/ व्हि-लॉगर्ससाठी करियरचा भाग.
याशिवाय खाद्यरसिक अन्नविषयक ग्रुप्सवर चर्चा करतात. खाद्यमहोत्सव साजरे करतात. जगभरातील पाककृतींची देवाण-घेवाण करतात. ’मास्टरशेफ’ बघतात. फूड चॅनेल लावतात. प्रसिद्ध शेफचे फॅन क्लब तयार करतात. ’तरला दलाल’च्या जीवनावर चित्रपट निघतो. मधुरा, शिल्पी, कबिता, निशा मधुलिका, संजीव कपूर, संज्योत कीर, हेबर सारख्या फूड इन्फ़्ल्युएन्सरच्या नव्या व्हिडिओवर लाईक्सचा पाऊस पडतो. जाहिराती व प्र्मोशनल कामं मिळत राहवीत म्हणून तो पडत राहाणं आवश्यक असतं. त्यासाठी ते ही नवनवे प्रयोग करत राहतात. जसे फास्ट फूड प्रेमी आहेत तशी स्लो फूड चळवळही रूजते आहे.
एका सर्चवर देशी विदेशी पाककृतींच्या व्हिडिओंची रांग स्क्रीनवर हात जोडून उभी राहते. विशिष्ट प्रांताच्या, ठराविक समाजाच्या परिघात किंवा प्रभावात अडकून पडलेले पदार्थ पाहणं, करून पाहता येणं, मागवणं, खाणं या सोयीमुळे शक्य झालं आहे. त्यामुळे ’फूडपॉर्न’ हे काहींना खाद्यसंस्कृतीच्या लोकशाहीकरणासाठी उपकारक वाटतं.
एकूण या सगळ्या घडामोडींमुळे सोशल मिडियाचं रूपांतर एका जागतिक खाद्यजत्रेत झालं आहे. ही जत्रा खाद्यसंस्कृतीला प्रवाही ठेवण्याचं आणि समृद्ध करण्याचं महत्वाचं काम करते आहे.
आता जत्रा म्हटल्यावर त्यात बागडायला उरलेली मंडळी पुढे सरसावतात. काहींच्या संवादाची सुरूवातच ’जेवण झालं का’ या कूटप्रश्नाने होते. काही "तूप जळलं आता काय क्रू?" छापाचे सल्ले विचारतात. जगातले जणू सर्व मह्त्वाचे विषय संपले असे समजून ’उकडीचे मोदक विरूद्ध तळलेले मोदक’ किंवा ’आर्टिसन ब्रेड विरूद्ध बेकरी पाव ’असे गट पाडतात. ’शाकाहारी विरूद्ध मांसाहारी, नॉनस्टीक विरूद्ध बीडाची भांडी, ’मी बाई सगळं घरीच करते’ विरूद्ध विकत आणणारे, दीक्षित विरूद्ध दिवेकर’ असे गट तर भारत पाक क्रिकेट सामन्यासारख्या अटीतटीने चर्चा करतात. वेगन , किटो डाएट किंवा इंटरमिटेंट उपवासवाली मंडळी सहसा स्वतंत्र राज्यं स्थापन करतात. तिसर्या प्रकारची मंडळी त्या पोस्टखालच्या कॉमेंटमध्ये आपल्या घरगुती केटरिंगची, तयार फराळ उपलब्ध असल्याची किंवा पदार्थांच्या यूट्यूब चॅनेलची पटकन जाहिरात करून टाकतात.
उपहारगृहांना आता सोशल मिडीयावर रिव्ह्यू मिळवल्याशिवाय जणू अस्तित्वच नाही. आपलं उपहारगृह व तिथल्या डिशेस ’इन्स्टाग्राम-फ्रेंडली’ दिसायला हव्यात यासाठी विशेष गुंतवणूक केली जाते. ग्राहकाला कौतुकाने चेक-इन करून जगाला दाखवावसं वाटेल असं वातावरण तिथे निर्माण केलं जातं. तरूणाईला आवडणारं संगीत, प्रकाशयोजना, फर्निचर आणि पदार्थांचं फ्युजन या सगळ्याचा विचार हल्ली निमशहरी ठिकाणीही केला जातो. ग्राहकांच्या रेटींगमुळे एखादं रेस्टॉरंट रातोरात स्टार ठरू शकतं, एखादं स्पर्धेत कोलमडून बंद पडू शकतं.
’ऑनलाईन पदार्थ मागवणं ही सोय आहेच पण क्रेझ अधिक. पदार्थ कोणता आणि कुठून मागवायचा हे ठरवताना तीन निकष असतात. त्याचं रूप, दर आणि फीडबॅक आणि हो, स्पर्धाही असते. प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत आपल्या पदार्थावर पहिल्या नजरेत प्रेम जडायला हवं असेल तर त्याचा थम्बनेल फोटो अतिशय आकर्षक हवा हे पुरवठादार ओळखून आहेत. यासाठी #foodphotoraphy, #foodstyling आवश्यक असतं. या सगळ्यांना सामावून घेत फूड-पॉर्न नावाचं अर्थचक्र वेगाने फिरत राहतं. सगळ्या सक्रीय सदस्यांमुळे जत्रा यशस्वी होते.
कोणी कंटाळू नये म्हणून ’टॉप फॅन’ सारखे बिल्ले वाटून सोशल मिडीया लोकांचा उत्साह पेटता ठेवतो. त्यांना कटलरी-क्रोकरी, स्वयंपाकाची आधुनिक प्रकारची भांडी, रेस्टॉरंट्स, डायनिंग हॉल्स, मोठ्या ब्रँडचे नवे खाद्यपदार्थ यांच्या जाहिराती पुन्हा पुन्हा दाखवल्या जातात. सतत खाद्यविषयक पोस्ट्स पाहून पाहून खवैये आणि खादाड यातली सीमारेषा वितळू लागते. बकासुरी खाण्याच्या स्पर्धा, बाहुबली थाली इ. च्या रीलमागून रील स्क्रीनवर वाहू लागतात. लोक ’आ’ वासून तासंतास ते बघत राहतात. मोहक दृश्यांमुळे पदार्थ करून पाह्ण्याची, खाण्याची इच्छा बळावते. मग वजन वाढतं. मग दिसू लागतात ’जॉगींगच्या बुटांच्या, व्यायामाच्या अॅप्सच्या, त्यासाठीचे कपडे आणि वस्तूंच्या, एनर्जी देणार्या पेयांच्या, औषधांच्या, योगवर्गांच्या जाहिरातीच जाहिराती. साहजिकच फूड-पॉर्न कृपेने सोशल मिडिया कंपन्यांची अवस्था ’सारी उंगलिया घी मे और सर कढाईमे’ अशी आहे.
’मस्त खा आणि स्वस्थ राहा’ असं खवय्यांना ’मराठी’ टीव्ही शो चे सूत्रसंचालक सांगत असतात. स्वस्थ म्हणजे निरोगी, निकोप पण ते हिंदीत. मराठीत ’स्वस्थ’ म्हणजे मुकाट निष्क्रीयपणे बसून राहाणे. आपली भाषा आणि आपली खाद्यसंस्कृती या दोघींचंही बर्याचदा असं कडबोळं होताना दिसतं आहे. पर्यटनाला वेगळ्या देशात कित्येक भारतीय तिथल्या वैशिष्ट्यांचा थोडा तरी आस्वाद घ्यायचं सोडून एकदाचं भारतीय जेवण मिळालं की हुश्श करतात. दुसर्या बाजूला मॉडर्न दिसावं म्हणून काही जण अनेक चित्रविचित्र पदार्थ आपल्या रोजच्या आहारात समाविष्ट करू लागले आहेत. भारतीय हवामान /ऋतुचक्र आणि शरीरप्रकृतीचा विचार न करता ऑलिव्ह ऑईल, सॉसेस, वेगवेगळे चीज, किवी, ब्रोकोली सारखी फळं, भाज्या असे बदल म्हणून छान असलेले पदार्थ सतत वापरू लागले आहेत.
शहरी खाद्यसंस्कृती फूडपॉर्नमुळे इतकी प्रभावित झाली आहे की जगभरातले बहुसंख्य शहरी-निमशहरी तरूण एकसारखे पदार्थ खाऊ लागले आहेत पिझ्झा, बर्गर, पास्ता, गार्लिक ब्रेड, सँडविचेस, कॉफीचे टब मागवणं ट्रेंडिंग झाल्याने खाद्यजीवनाचं काही प्रमाणात सपाटीकरण होतं आहे. आपापले साधे, सोपे, पौष्टिक, देशी, पारंपरिक पदार्थ खाणं कमी प्रतीचं वाटू लागलं आहे. यामुळे बहुसंख्य पाश्चात्य व मोजक्या स्वदेशी साखळी उपहारगृहांना बरकत आली असली तरी प्रांतीय पदार्थ मागे पडत जाऊन विस्मृतीत जाण्याचा धोकाही वाढतो आहे.
खमंग' पुस्तकाच्या प्रस्तावनेत दुर्गाबाई भागवत म्हणतात, "रुचीभिन्नता या देशाचं वैभव आहे. (या बाबतीत) जातीयता ही मारक नसून सुगरणपणाला तारक ठरणारी आहे." अन्नाशी आपला रोजचा आणि निकटचा संबंध असतो. आपलं व्यक्तिमत्व त्यातूनच घडत असतं. आपण जे खातो त्या प्रत्येक पदार्थाचं आपला इतिहास, आपली संस्कृती, आपले पूर्वज, आपला प्रांत, आपली जात- धर्म, आपल्या आकांक्षा, आपला मित्रपरिवार यातल्या कशाशी ना कशाशी नातं असतं. ते नातं, आवड म्हणून फूडब्लॉगींग करणारे अलवारपणे उलगडत जातात.
कोरोनाकाळात स्वेच्छेने, नाइलाजाने, तणावमुक्तीचं साधन किंवा प्रयोग म्हणून लिंगभाव विसरून तमाम मध्यमवर्गीय जनता स्वयंपाकघरात शिरली होती. लादीपाव, मावा केक, डाल्गोना कॉफी वगैरे प्रकार करून न पाहिल्यास लस मिळणार नाही असं वाटावं इतक्या हिरीरीने पाक-प्रयोग सुरु झाले होते. ते सोशल मिडीयावर शेअर होऊ लागले. फूडपॉर्नला तेव्हा आलेला बहर कोरोनाकाळ संपला तरी वाढत राहिला. यातून व्यावसायिक #foodblogging हे एक चांगलं करियर वृद्धींगत झालं. भारतीय फूडब्लॉगर्समुळे भारतीय मसाले, करी, सामोसे, बिर्याणी व अनेक भारतीय मिष्टांन्नांना जागतिक ओळख मिळू लागली.
फूडब्लॉगींग हे चलनी नाणं असल्याचं लक्षात येताच सर्वात जास्त फोफावले ते कुडमुडे ब्लॉगर्स वा यूट्युबर्स. खाद्यसंस्कृतीचं फारसं आकलन नसताना हे दिसेल त्या ठेलेवाल्याची मुलाखत घेत त्या पदार्थाचे थातुरमातुर व्हिडिओ पोस्ट करू लागले. कृत्रिम रंग , रसायनांचा व अनेक मसाल्यांचा भडिमार करणे, तेलात किंवा बटरमध्ये पदार्थाला लोळवून काढणे आणि यालाच ’टेस्टी’ म्हणणे असे प्रकार त्यांच्या रील्समध्ये वाढू लागले. या गोंधळात जो खरा नायक पदार्थ असतो त्याच्या ’दिसण्याला’ अनन्यसाधारण महत्व आल्याने साधेपणा, आरोग्य, पोषणमूल्य, चव ,पोत या गोष्टी दुय्यम ठरू लागल्या. पदार्थ उठावदार दिसावा म्हणून कॅमेरा तंत्र, फिल्टर्स वापरले जाऊ लागले. गॉर्ड्न रॅमसे सारख्या प्रख्यात विदेशी किंवा ’आपने बताया नही’ फेम रणवीर ब्रार सारख्या नामवंत देशी शेफचा यावर आक्षेप आहे. हे बाजारीकरण पाककलेला मारक आहे असं ते म्हणतात. फूडपॉर्नमुळे खाद्यसंस्कृतीची गुणवत्ता ढासळते आहे , पदार्थाची स्वत:ची अस्सल चव लोप पावते आहे याची त्यांना खंत वाटते.
प्रेमाची, पाहुणचाराची, समारंभाची आपली व्याख्या खाऊ घालण्याशी व आग्रहाशी जोडलेली असते. उपवास म्हटला तरी ’दुप्पट खाशी’ अवस्था असते. चार जण उभ्या उभ्या भेटले तरी त्यात एकदा तरी ’खाणे’ हा विषय आलाच पाहिजे. दिवसातला आपला बराचसा वेळ अन्नाविषयी विचार करण्यात ,बोलण्यात, स्वयंपाक करण्यात, करवून घेण्यात किंवा खाण्यात जात असतो. त्यामुळे रसनेआधी नजरेला तृप्त करणारं फूडपॉर्न आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे हे स्वीकारावं लागेल. मात्र ते #FoodLove मध्ये रूपांतरित व्हावं. तो खाद्यसंस्कृतीचा सोहळा व्हावा. बडेजाव नव्हे. उद्रेक नव्हे.
दोनवेळा जेवू न शकणार्यांविषयीची संवेदनशीलता तळाशी असली तर फूडपॉर्नचं रूपांतर ’अक्षयपात्रात’ होऊ शकतं याचं भान रूजावं. अन्न हे फक्त खाण्यासाठी नसून रांधण्याच्या आणि माणसांना सांधण्याच्या आनंदासाठी असायला हवं. हे आधीच लक्षात आल्याने हल्ली काही उपहारगृहं फोन बाजूला ठेवून (no-flash policy) निवांत खातपीत एकमेकांशी बोलणार्या जित्याजागत्या मंडळींसाठी विशेष सवलत योजना जाहीर करू लागली आहेत. त्यामुळे कदाचित ’फूडपॉर्न’पलिकडे जाऊन ’अन्न हे पूर्णब्रह्म’ असल्याची जाणीव वाढू शकेल.

#foodporn (पुण्यनगरी: माध्यमतंत्र)