Saturday, March 11, 2023

ठरवून केलेला उपमर्द !

कर्नाटकातील बेंगळुरू येथील आयपीएस अधिकारी डी. रूपा आणि आयएएस अधिकारी रोहिणी सिंधुरी यांच्यात सेवा आचार नियमांचे उल्लंघन करण्यावरून सुरु झालेला वाद विकोपाला गेला होता. प्रकरण न्यायालयात पोचले. दोघींना आधीच्या पदावरून काढण्यात आलं. बदली करण्यात आली. तत्कालिन मुख्यमंत्री बोम्मई यांनी त्याला ’बायकांमधली भांडणं’ म्हटलं. बहुतेक माध्यमांनी या भांडणाचा ’कॅटफाईट’ असा उल्लेख केला. ’बायकांनी नळावर एकमेकींच्या झिंज्या उपटत  केलेले भांडण’ या अर्थी. पुरुष अधिकार्‍यांमध्ये असे काही घडले असते तर मुख्यमंत्री आणि माध्यमांच्या दृष्टीने तो फक्त दोन अधिकार्‍यांमधला वाद ठरला असता की दोन ’पुरुष’ अधिकार्‍यांमधला ?

’कॅटफाईट’ या माध्यमांच्या आवडत्या शब्दासारखेच आपल्याकडील राजकारण्यांचे आवडते वाक्य म्हणजे ’आम्ही काही बांगड्या भरल्या नाहीत’. खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षण आंदोलनाची दिशा जाहीर करताना विरोधकांचा समाचार घेताना हे वाक्य वापरले होते. डान्सबारबंदी आणणार्या आर.आर.पाटील यांचे पुत्र रोहित यांनी "आबांच्या कार्यकर्त्याला जर हात लागणार असेल तर आम्ही काही बांगड्या भरल्या नाहीत" असे भाषणात सुनावले होते. मशिदीवरील भोंगे प्रकरणात अबू आझमींनी प्रत्युत्तरात हेच वाक्य वापरले. किती उदाहरणे सांगावी !
स्त्री सन्मान करणार्या शाहू-फुले-आंबेडकर-कर्वे यांची नावे घेतल्याशिवाय ज्यांचे भाषण पूर्ण होत नाही त्यांच्या हे गावीही नसावे की आपले वक्तव्य अयोग्य आहे. बांगडी हा भारतीय स्त्रीचा दागिना आहे. आज शहरी स्त्रीसाठी तो घालणे न घालणे हा वैयक्तिक आवडीचा भाग असला तरी ’बांगडी’ हा शब्द बायकांशी थेट निगडीत आहे.
या देशातआत्मभान जागे असलेल्या अनेक कर्तृत्ववान महिला आहेत. तरीही ’बांगड्या भरणे’ म्हणजे कर्तृत्वशून्यता, पळपुटेपणा असे का मानले जावे !
दुर्दैव म्हणावे की विनोद, पुरुषसत्ताक मानसिकता समाजात इतकी भिनली आहे की बहुतेक राजकीय पक्ष्यांची महिला आघाडीच विरोधी नेत्याला ’बांगड्यांचा आहेर’ पाठवण्यात आघाडीवर असते. विरोधकाची अवहेलना करण्याच्या नादात आपण आपलाच अपमान करत आहोत हे ही त्यांच्या लक्षात येऊ नये!
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर संताप व्यक्त करताना ‘सुप्रिया सुळे यांनी घरी जाऊन स्वयंपाक करावा’ असे वक्तव्य चंद्रकांतदादा पाटील यांनी मध्यंतरी केले होते. यावर टीका होऊ लागताच "सुळे यांच्यासह अन्य महिलांविषयीही माझ्या मनात कायम आदराचीच भावना आहे" असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी निदान दिलगिरी व्यक्त केली किंवा त्यांना करावी लागली पण आपल्या बोलण्यातले संदर्भ कालबाह्य व चुकीचे आहेत याचा अनेक नेत्यांना पत्ताच नसतो. नारायण राणे यांना वांद्रे पूर्व विधानसभा पोट निवडणुकीत तृप्ती सावंत यांनी पराभूत केले होते. राणे यांच्यावर टीका करताना अजितदादा पवार म्हणाले, "मुंबईत त्यांना चक्क महिलेने हरविले".पुरुषाने पुरूषाचा केलेला पराभव ही हार आहे पण महिलेने केलेला पुरूषाचा पराभव म्हणजे नामुष्कीच, नाही का!
काही दिवसांपूर्वी गाजलेल्या ’हनुमान चालीसा’ प्रकरणात "मर्द असाल तर मला अडवून दाखवा" असे आव्हान नारायण राणे यांनी दिले होते. "मर्द असाल तर समोर या" असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला दिले होते. ’मर्द असाल तर’ हे या काही वर्षातले राजकारण्यांचे सर्वात आवडते सलामीचे वाक्य आहे. पुढच्याच वाक्यात तमाम माताभगिनींना अभिवादन करणार्य़ांना आपल्या या शब्दप्रयोगात काहीच खटकू नये !
आपल्या प्रखर भावना व्यक्त करायला ’हिंमत असेल तर’ असा लिंगभावापलीकडचा शब्द त्यांना किंवा त्यांच्या बॅकऑफीसला सुचू नये !
(मध्यंतरी विरोधी पक्षाच्या एक ज्येष्ठ नेत्याने पंतप्रधान मोदींनी साडी नेसली आहे असे दर्शवणारे मॉर्फ केलेले फोटो समाजमाध्यमावर शेअर केले. प्रत्युत्तर म्हणून सत्तारूढ पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या नेत्याला पकडून साडी नेसवली आणि तो व्हिडिओ शेअर केला.
आता मोदींना साडीमध्ये दाखवण्यामागे काय हेतू होता? सरळ आहे. साडी कोण नेसतं? बायका. मग एखाद्या पुरूषाचा अपमान करायचा असेल तर सर्वात सोपी पद्धत - त्याला साडी नेसवणं, बांगड्या भर म्हणणं, स्त्रीवाचक शिव्या देणं म्हणजेच त्याला कृतीतून बायल्या म्हणणं. कारण मुळात विचार तेच... बाईची जात दुय्यम, बावळट, नेभळट, नाकर्ती)
अशा शब्दांचा,कृतीचा गर्भितार्थ समजून घेऊन त्याचा वापर निदान महिलांनी टाळायला हवा तर तसेही नाही. तिथे नेमकी समानता आहे. "मर्द असाल तर कोर्टात माझ्याविरोधात लढा" असे अंजली दमानिया एकनाथ खडसेंना म्हणतात. "मर्द असाल तर देवेंद्रजींना टार्गेट करा, मला मध्ये आणू नका" असे अमृता फडणवीस म्हणतात. "मर्द असाल तर कामातून उत्तर द्या, नामर्दासारखं बाईला पुढे करु नका " असे ऋता आव्हाड म्हणतात.
पदाला अपेक्षित असलेली कामगिरी हिरीरीने पार पडत असताना, स्त्रीत्वाचा कोणताही उपमर्द झालेला नसताना ’बाई’ असल्याचे कवच अकारण ओढून घेण्याची आवश्यकता यांना का वाटत असावी !
याचे कारण समाजाच्या नेणीवेत आजही रूतून बसलेला लिंगभेद. स्त्री किंवा पुरूष म्हणून जन्माला येण्यावर व्यक्तीचे लहानमोठेपण अवलंबून नसते. हे जग फक्त पौरूषावर तरणार नसून स्त्री-पुरूषांच्या परस्परपूरकतेवर त्याचे अस्तित्व आणि सौंदर्य अवलंबून आहे. हे समजून घेऊन समाजाला ज्यांनी दिशा द्यायची त्याच नेत्यांनी आणि माध्यमांनी अभावितपणे किंवा हेतूपुरस्सर अशी जुनाट प्रतीके, शब्दयोजना वापरल्याने लिंगभेदाला उलट प्रोत्साहन मिळते. त्याहून गंभीर बाब म्हणजे सर्वसामान्यांना ते ’नॉर्मल’ वाटू लागते.
माध्यमांच्या मांडणीचा व राजकीय व्यक्तींच्या बोलण्याचा समाजावर थेट प्रभाव पडत असतो. त्यांचे अनुयायी नकळत तीच भाषा बोलू लागतात, तेव्हा आपल्या जबाबदारीचे भान त्यांनी राखायलाच हवे. लिंगभाव समानतेचे धोरण कागदावरून कृतीत येईल तेव्हा येवो ,आधी ते किमान शब्दात तरी यायला हवे. तसे घडले तर कोणत्याही व्यक्तीला माणूसपणाच्या पातळीवर समानतेने आणि आदराने वागवणे इतके अवघड होणार नाही. अन्यथा महिला दिन नुसते येतील, जातील आणि ’पुरुषांनी घरी भांडी घासण्यावरून’ केलेले केविलवाणे विनोद आजच्या युगातही ह्या ह्या च्या इमोजींसह फॉरवर्ड होत राहतील.

Published in महाराष्ट्र टाईम्स ’मैफल’ शनिवार ११ मार्च २०२३

No comments:

Post a Comment