Friday, March 31, 2023

इन्फ्ल्युएंसर्सचे इंद्रजाल

 


सचिन तेंडुलकर इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करतो. "या उन्हाळयातला पहिला आंबा माझ्यासाठी अतिशय खास असलेल्या व्यक्तीला म्हणजे आईला" असे तो यात हिंदीत म्हणतो. आई फोडी खात आंबा गोड असल्याची पावती मराठीत देते. बस. या चिमुकल्या व्हिडिओला जेमतेम २५ मिनिटात १ लाख १७ हजार लाईक येतात. ८५० कॉमेंटस येतात. इन्स्टाग्रामकडून सचिनला अशा एका पोस्टसाठी लाखो रूपये मिळतात. विराट कोहलीची प्रति पोस्ट कमाई तब्बल ८ कोटी किंवा प्रियांका चोप्राची ३ कोटींपर्यंतही जाते. हे सगळे जगप्रसिद्ध आयकॉन आहेत म्हणून एवढे पैसे मिळत असतील. असे वाटू शकते.

मुक्ता नार्वेकर ही एक साधी, स्वच्छंदी तरूणी. आपल्या भटकंतीचे सहज सुंदर मराठी व्हिडिओ पोस्ट करणार्या या यूट्यूबरची नेट वर्थ आहे सुमारे साडेचार लाख रु.
किल पॉल आणि नीमा पॉल हे टांझानियातले भाऊ-बहिण व्हिडिओ पोस्ट करतात. सध्या गाजत असलेल्या ऑस्करविजेत्या ’नाटू नाटू’ गाण्यावर लिप सिंक करून ते त्यांच्या लहानशा मातीच्या घरासमोर नृत्य करत असतात. अभारतीय असूनही त्यांना अपरिचित असलेल्या भाषेतल्या गाण्यावर नृत्य करताना पाहून त्यांचे भारतीय चाहते त्यांना दिवसभरात पावणेदोन लाख लाईक्स देतात. दिडहजार कॉमेंट्स करतात. इन्स्टाग्रामकडून किलला पोस्टमागे हजारो रुपये मिळतात. त्याची नेटवर्थ ४ कोटी रु.ना पोचते. इतकेच नव्हे ’मन की बात’ मध्ये खुद्द पंतप्रधान त्याचा उल्लेख करतात.
मराठी अभिनेत्री सायली संजीव झी-पुरस्कार सोहळ्याला निघताना काढलेले फोटो शेअर करते. त्याला लाखभर लाईक्स मिळतात. तिला इन्स्टाग्रामकडून पैसे मिळतातच पण या फोटोत ज्या ब्रँडचे दागिने, कपडे तिने परिधान केले त्यांच्याकडूनही तिला ’प्रमोशन’ केल्याबद्दल काही रक्कम मिळते.
आपल्या एखाद्या क्षेत्रातील कौशल्याने सगळ्या प्रख्यात सोशल मिडियावर स्वत:ची क्रेझ आणि चाहते निर्माण करू शकणार्या अशा मंडळींना ’प्रभावी व्यक्तिमत्व’ किंवा तांत्रिक भाषेत ’इन्फ्ल्युएंसर’ असे म्हटले जाते.
त्यांचा सगळा खेळ त्यांना मिळणार्या चाहत्यांच्या ’लाईक्स’च्या संख्येवर अवलंबून आहे. काही नवोदितांची एखादी पोस्ट एका रात्रीत प्रचंड व्हायरल होते. पण केवळ तेवढ्यावरून त्यांना ’इन्फ्ल्युएंसर’ म्हणता येत नाही. ’खाली कुकरमे चने’ फेम यशराज मुखतेसारखे अपवाद म्हणता येतील पण त्यासाठी लाईक्स मध्ये सातत्य हवे. ती संख्या टिकूनच नव्हे तर वाढत राहावी म्हणून सतत काही तरी नावीन्यपूर्ण कंटेंट तयार करून पोस्ट करणे हे प्रत्येक इन्फ्ल्युएंसरपुढचे आव्हान असते. गायक, वादक, नर्तक, तंत्रज्ञान मार्गदर्शक, विनोदवीर, वक्ते, मुलाखतकार. लेखक, कवी, शेफ, फॅशन-गृहसजावट-बागकाम- व्यायाम- गुंतवणूक- मेकअप इ. विषयी उपयोगी टिप्स देणारे असे कितीतरी इन्फ्ल्युएंसर्स आपल्या अंगभूत वैशिष्ट्यांचा वापर करून छोटे व्हिडिओ (रील्स), लाईव्ह येऊन संवाद, व्हिडिओ-ब्लॉग इ. स्वत: तयार करून किंवा व्यावसायिक टीमकडून करवून घेऊन पोस्ट करत राहातात. सिनेमातून अगोदरच प्रसिद्ध असलेले कलाकार किंवा क्रिकेट ,टेनिस खेळाडू यांच्यासाठी हे नवे माध्यम दुहेरी कमाईचे साधन ठरले आहे. अमिताभसारख्या दिग्गज अभिनेत्याला सुद्धा याचे बाजारमूल्य कळल्याने त्यांनी त्याचा वापर जोरात सुरू ठेवला आहे. नव्या पिढीशी इतका ’कनेक्ट’ असल्यामुळे आजही या अभिनेत्याला चित्रपट आणि जाहिरातींमध्ये सर्वाधिक मागणी आहे.
सोशल मिडिया कंपन्यांचा सगळा व्यापार अवलंबून आहे तो जाहिरातींवर. जाहिरातींचे दर अवलंबून आहेत ते वापरकर्त्यांच्या (यूजर्स) संख्येवर. उदा: क्रिकेट विश्वकप स्पर्धेच्या सामन्याच्या प्रक्षेपणाला सर्वाधिक टीआरपी असतो. त्या दरम्यान दाखवल्या जाणार्या दहा सेकंदांच्या जाहिरातीसाठी उत्पादक कंपन्या लाखो रुपये मोजतात. तसेच जास्तीत जास्त सक्रीय यूजर्स असलेल्या सोशल मिडिया कंपनीला जाहिरातदार भरपूर पैसे देतात. आकर्षक कंटेंट आणि यूजर्सना आवडणार्या व्यक्ती सोशल मिडिया जिवंतच नव्हे तर दणाणत ठेवतात. चाहत्या यूजर्सना स्वत:कडे खेचून आणतात. त्यामुळे सोशल मिडिया कंपनी इन्फ्ल्युएंसर्सना प्र्ति पोस्ट पैसे देऊन नव्या पोस्ट करण्यासाठी उद्युक्त करत राहते. दुसर्या बाजूला उत्पादनांचे निर्माते आपल्याला परवडेल असा लहान मोठा इन्फ्ल्युएंसर हेरत असतात जो आकर्षक मोबदल्याच्या बदल्यात आपल्या पोस्टमधून त्यांच्या उत्पादन किंवा सेवेचे प्रभावी प्रमोशन करून ग्राहकांना आकर्षित करेल. याचा अर्थ असा नव्हे की कोणीही बिनदिक्कत कशाचेही प्रमोशन करावे. सेंट्रल कंझ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटी (CCPA) ने आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे की, कोणत्याही ब्रँडचा प्रचार करताना जनतेची दिशाभूल होता कामा नये. तसे झाल्यास त्या ब्रँडला दंड भरावा लागू शकतो तसेच त्यांच्या जाहिरातीवर ६ महिन्यांची बंदी घातली जाऊ शकते.
इन्फ्ल्युएंसर्सचा प्रभाव फक्त त्यांच्या व्यक्तिमत्वातील वैशिष्ट्यांपुरता नसतो. त्याच्या फ्रेममध्ये आलेल्या प्रत्येक गोष्टीबद्द्ल वापरकर्त्यांना/ प्रेक्षकांना कुतूहल असते. उदा. ’रणवीर ब्रार’ने तयार केलेल्या पदार्थाइतकाच त्याने कोणता शर्ट घातला आहे, कोणती आधुनिक भांडी वापरली आहेत, कोणत्या ब्रँडची सुरी वापरली आहे यातही त्यांना रस असतो. मिथिला पालकरच्या कप सॉंगइतकेच ती कुरळया केसांची निगा राखण्यासाठी कोणते क्रीम, तेल वापरते याचेही औत्स्युक्य असते. त्यामुळे विविध कंपन्या अशा इन्फ्ल्युएंसर्सशी जाहिरातीचे करार करत जातात. २०२५ पर्यंत हा जाहिरात बाजार २८०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल असा माध्यमतज्ञांचा कयास आहे.
इन्फ्ल्युएंसर निवडताना त्याच्या पोस्ट्स चाहत्यांना किती गुंतवून ठेवू शकतात तसेच पोस्टला सरासरी व्ह्यूज किती मिळतात असे निकष महत्वाचे असतात. दशलक्षाहून अधिक चाहते असणारे मेगा इन्फ्ल्युएंसर्स सुद्धा काही वेळेस परिणामकारक ठरत नाहीत. त्यांच्या आणि चाहत्यांच्या राहणीमानातली तफावतीमुळे तो ’आपला’ वाटत नाही हे यामागचे कारण असू शकते. त्यामुळे किती लाईक्स आहेत या पेक्षा कोणाचे लाईक्स आहेत, चाहतावर्ग कोणत्या वयोगटाचा, कोणत्या आर्थिक स्तरातला आहे हा मुद्दा काही इन्फ्ल्युएंसर्सच्या बाबतीत महत्वाचा ठरतो. अशा वेळी मॅक्रो (चाहत्यांची संख्या ५ ते १० लाख), मिड-टीयर (५० हजार ते ५ लाख), मायक्रो ( १० ते ५० हजार ) किंवा नॅनो ( १ ते १० हजार ) इन्फ्ल्युएंसरची निवड केली जाते. त्याच्या स्तरानुसार त्याची कमाई ठरते. विशेषत: महिलांना एखाद्या उत्पादनाबद्दल मैत्रिणीच्या अनुभवापेक्षा त्यांची इन्फ्ल्युएंसर काय सांगते ते जास्त मह्त्वाचे वाटते. सौंदर्य-फॅशन, खाद्यव्यवसाय, प्रवास, आरोग्य इ. क्षेत्रात इन्फ्ल्युएंसर्सची संख्या व मागणी प्रचंड आहे. त्यांचा चाहतावर्ग स्थानिक किंवा प्रांतीय पण भरवशाचा असतो. उदा: मध्यमवर्गीय मराठी महिलांना प्रियांका चोप्राने एखाद्या व्हिडिओमध्ये घातलेला स्वारोव्स्की नेकलेस नुसता पाहायला आवडेल. खरेदी करताना मात्र त्या, कदाचित प्राजक्ता माळीच्या फोटोतल्या त्यांच्या बजेटमध्ये असलेल्या ठुशीला प्राधान्य देतील.
मात्र ही स्पर्धा आणि हे अर्थकारण अंतहीन आहे. दुसरीकडे ’पापा कहते है बडा नाम करेगा’ डोक्यात ठसल्याने अनेकांना किमान नॅनो इन्फ्ल्युएंसर व ते ही झटपट व्हायचे असते. हटके रील्स तयार केले की लाईक्स मिळतात म्हणून ते कोणत्याही थराला जातात. मुळात इन्फ्ल्युएंसर होणे ,त्यामागचे सायास सोपे नाहीत शिवाय त्यांना क्रिएटर बर्नआऊट, आणि प्रतिसादाचे दडपण सहन करावे लागते. लाईक्स आणि व्ह्यूजनुसार त्यांचे अस्तित्व आणि मागणी हेलकावे खात राहते. स्वातंत्र्यपूर्व काळात लक्स साबणाच्या जाहिरातीत पहिल्या भारतीय मॉडेल लीला चिटणीस होत्या, कालची मॉडेल दीपिका होती, आजची अलिया भट आहे, उद्या वेगळी कुणी असेल. काळ बदलत राहील. इन्फ्ल्युएंसर्स बदलत राहतील. यूजर्सच्या अपेक्षा, आवडी, जीवनशैली आणि सोशल मिडीयाचे स्वरूप देखील बदलत जाईल. ’लाईक’भोवती गुंफलेला बाजार तसाच राहील. छोट्याशा ’लाईक’ बटणातून उद्भवलेल्या बाजारशरण जगाला कंटाळून त्याचा प्रणेता जस्टिन रोझेनस्टीन याने पूर्वीच सोशल मिडियाला राम राम ठोकला आहे.
इन्फ्ल्युएंसर्सना ’लाईक’ मिळवल्याशिवाय गत्यंतर नाही पण आपल्याला लाईक्सचे गाठोडे घेऊन कुठे जायचे आहे. मागच्या लेखात स्वत:च्याच पोस्टला किती लाईक मिळाले यावरून यूजर ज्या ताणाला आणि चक्रव्यूहाला सामोरा जातो त्याबद्दल लिहिले होते. त्यातून बाहेर पडायचे तर काही उपाययोजना कराव्या लागतील. बहुतेकांना आपल्याला कमी लाईक्स मिळाले तर आपले हसे होईल याचा किंवा जास्त मिळाले तर टिकवण्याचा ताण येतो. सोशल मिडियावर सेटिंगमध्ये जाऊन लाईक्सची संख्या इतरांना दिसणार नाही अशी व्यवस्था करता येते. झाकले लाईक्स सव्वा लाखाचे म्हणूया हवे तर. ते नक्की किती हे फक्त पोस्टकर्त्याला कळते.
शिवाय आपली पोस्ट नसल्यास नोटिफिकेशनही बंद करावे म्हणजे अनावश्यक सूचनांपासून आपली सुटका होईल.
दिसेल त्या प्रत्येक पोस्टला लाईक करत सुटणे बंद केले की तशा पोस्ट वारंवार दिसणे कमी होते.
मोजक्याच गुणी लोकांना फॉलो करावे. एखाद्याच्या पोस्टमुळे संताप आवरत नसेल तर त्याला आपल्या मन:शांतीसाठी अनफॉलो, ब्लॉक करावे. केवळ औस्त्युक्यापायी नकारात्मक, नैराश्यजनक पोस्टवर फिरकू नये.
प्रत्येक उपलब्ध सोशल मिडिया प्लॅटफॉर्मचा वापर गरजेचा नाही. छंद म्हणून सगळीकडे लाईक करत वेळेचा अपव्यय करत भटकू नये.
’लाईक’च्या आत्यंतिक वेडामुळे निर्माण झालेला भस्मासूर ताब्यात ठेवायचा असेल तर ’निवड करण्याची क्षमता आणि समज’ हे एकमेव मोहिनीअस्त्र लागू पडणारे आहे. ’लाईक्स’च्या पलीकडे जाऊन आपले काम शांतपणे करणारे मोजके कर्तृत्ववान इन्फ्ल्युएंसर्स आपल्या आजूबाजूला असतात. त्यांना देखील आपल्याला शोधता आले पाहिजे.

पुण्यनगरी : सदर माध्यमतंत्र
published on Friday 31 March

No comments:

Post a Comment