Friday, December 29, 2017

ब्लॉग -’ती’ चं हक्काचं व्यासपीठ

हा स्तंभ सरत्या वर्षाबरोबर तुमचा निरोप घेतो आहे, असं वाक्य स्तंभाच्या शेवटच्या लेखात सुरुवातीला वापरण्याचा प्रघात आहे. या स्तंभातून तुम्हाला भेटलेल्या महिला-ब्लॉगर्सनी मात्र ’ती’ने काय-कशाबद्दल लिहावं याचे प्रघात सहजपणे मोडले आहेत. स्वत: निवडलेल्या विषयांवर ब्लॉगवर व्यक्त होत त्या त्यांचं म्हणणं जगाशी बिनधास्त शेअर करतायत. ’ती’ च्या जगण्यातली आव्हानं, समस्या संपलेल्या नाहीत, काळाबरोबर बदलल्या असतील इतकच पण या त्यात कण्हत, कुथत, गुंतून पडलेल्या नाहीत. प्रसंगी त्याबद्दल त्या स्पष्ट भूमिका घेतात पण त्याला आयुष्याचं केंद्र मानत नाहीत. उलट त्या अडचणींवर ठाम उभं राहून आपली उंची वाढवण्याची धमक त्यांच्यामध्ये आहे.


ब्लॉगींग या क्षेत्रात ’ती’ सध्या काय करते, याचा धांडोळा घेणं हे या स्तंभाचं उद्दिष्ट्यं होतं. जगभरात आज लाखो महिला ब्लॉगर्स आहेत. आपल्या देशातच वैविध्यपूर्ण विषयांवर सकस लेखन करणार्‍या अनेक जणी आहेत. स्तंभासाठी निवड करताना आलेल्या भाषेच्या आणि माझ्या आकलनाच्या मर्यादांची मला जाणीव आहे. मराठी, हिंदी आणि इंग्लीश ब्लॉगर्स व्यतिरिक्त इतर भारतीय भाषांमधून दर्जेदार लिहिणार्‍या महिला ब्लॉगर्स पर्यंत मला पोचता आलं नाही. ब्लॉग लिहिण्यासाठी निवडलेल्या विषयाची खोलवर जाण, लेखनकौशल्य याबरोबरच इंटरनेट तंत्रज्ञानाची मुलभूत माहिती आणि इंटरनेटची उपलब्धता आवश्यक असते. साहजिक या माध्यमावर सुशिक्षित, शहरी स्त्रियांचे प्रमाण सर्वाधिक आहे. शेतकरी, कामकरी स्त्रियांचं जगणं, संस्कृतीच्या चौकटीबाहेर स्वेच्छेने जगणार्‍या किंवा जगावं लागणार्‍या स्त्रियांच्या भावना इथे उमटल्याच नाहीत असं नाही, पण ते ’इंडियन वुमन’ सारख्या ब्लॉग्स वर कुणाकडून तरी शब्दांकित होऊन, त्याला अस्सलतेचा गंध नाही. ही या माध्यमाची एक मर्यादा आहे.

अर्थात आपल्या जगण्याकडे आरपार बघता बघता केलेलं प्रामाणिक कथन एक अंगभूत ताकद घेऊन येतं मग ते अनुभव कोणत्याही सामाजिक वर्गाचे असोत. ती ताकद ज्यांनी ओळखली त्यांचे ब्लॉग वाचकांना भिडतात. हे अनुभव पूर्वी डायरीत, स्वांतसुखाय लिहिले जात. आज वेब-लॉग म्हणजेच ब्लॉगच्या माध्यमातून ते इंटरनेट या जागतिक चावडीवर आले आहेत. जगाच्या कोणत्याही कोपर्‍यातून, कोणत्याही वेळी ते वाचता, ऐकता, पाहता येत आहेत. वर्डप्रेस किंवा ब्लॉगर.कॉम सारख्या साईटच्या मदतीने कुणालाही विनामूल्य ब्लॉग तयार करता येतात. परंतु गुणवत्ता, आवाका, शब्दांवर हुकूमत आणि सातत्य नसेल तर वाचक फार काळ त्या ब्लॉगशी जोडलेले राहत नाहीत. ज्या ब्लॉग्स मध्ये हे चारही पैलू ठळकपणे दिसून आले त्यांचा समावेश या स्तंभात आवर्जून केला. तरीही अनेक उत्तम महिला ब्लॉगर्सना स्तंभ संपवत असल्याने त्यात सामावून घेता आलेलं नाही.

भारतीय महिला ब्लॉगर्सच्या विषयांचे वैविध्य थक्क करणारे आहे. फावल्या वेळात पाककृती लिहिण्यापलीकडे एक फूड ब्लॉगर काय कमाल करू शकते हे ’लाईटबाईट’च्या फूड फोटोग्राफर संजीताच्या ब्लॉगवरुन कळतं. ’चित्रपट परिक्षण’ हया महिलांची फारशी वर्दळ नसलेल्या प्रांतात, हिंदी-इंग्लीश चित्रपटांचं अभ्यासपूर्ण परिक्षण धमाल नर्मविनोदी शैलीतही लिहिता येतं हे मनीषा लाखे यांचा ब्लॉग दाखवून देतो. आता त्यांचं परिक्षण वाचून मगच चित्रपट पाहायचा की नाही याचा निर्णय़ घेतो असं काही वाचकांनी कळवलं.
जलविश्वात विहरणार्‍या परीणीता दांडेकरची ललितलेखन आणि वास्तवाची सांगड घालणारी अफलातून शैली तिच्या ब्लॉगवाचकांना भुरळ घालून जाते. जिप्सी वृतीच्या सुलक्षणा व-हाडकर यांचा ब्लॉग आजच्या भारतीय पण ग्लोबल नागरिकाच्या भावविश्वात डोकावण्य़ाची संधी देतो.
वेशसंकल्पन या विषयावर प्रभुत्व असणार्‍या नीरजा पटवर्धन यांच्या ब्लॉगमुळे ’ते म्हणजेच फॅशन डिझाईनींग’ हा गैरसमज दूर होतो, त्यातल्या खाचाखोचा कळतात.
मेघना भुस्कुटेच्या ब्लॉगमुळे जगण्य़ात खोलवर डोकावून पाहणं म्हणजे काय हे कळतं.
पत्रकारितेतले फिक्सर सारखे अनोखे अनुभव मांडणार्‍या मृण्मयी रानडे, रोखठोक लिहिणारी मुक्ता चैतन्य, सामाजिक आणि राजकीय विषयांवर घणाघाती लिहिणार्‍या शेफाली वैद्य यांचे ब्लॉग वाचकांना प्रेरित करुन जातात.
’स्पृहाच्या कानगोष्टी’ एका संवेदनशील अभिनेत्रीमधल्या लेखनकौशल्याची चुणूक दाखवून जातात तर ट्वींकल खन्नाचा ’मिसेस फनीबोन्स’ हा मिश्कील ब्लॉग स्त्रियांच्या विनोदबुद्धीवरचं प्रश्नचिन्ह स्माईलीमध्ये बदलवून जातो. ’साडी आणि बरच काही’ फेम सायली राजाध्यक्ष यांचा ब्लॉग वाचून, ’मी साडी या वस्त्रप्रकारावर चक्क प्रेम करायला लागले’ असं काही मैत्रिणींनी कळवलं.
 ’मिनिमलिझम’ ही संकल्पना नेमकेपणाने पोचवणार्‍या शर्मिला फडके यांच्या ब्लॉगने भारावून जाऊन ते शक्य तितकं कृतीत आणायचा प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया बर्‍याच जणांनी नोंदवली.
आजच्या तरुणाईची स्पंदनं टिपणारी दिशा महाजन आणि ताकदीने ब्लॉग हे माध्यम हाताळणार्‍या प्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांच्या एबीपी माझा वर गाजणार्‍या ब्लॉग्सच्या ची नोंद घेतल्याविना तर हा स्तंभ अपुरा वाटला असता.

ग्रुप ब्लॉग ही देखील एक सुंदर संकल्पना आहे. ’अलोन आय कॅन स्माईल टूगेदर वी कॅन लाफ’ याचा प्रत्यय यातून येतो. सामाजिक भान जागवणारा मेधाताई कुलकर्णी प्रणित  ’नवी उमेद’, समविचारी सख्यांचा ’इंद्रधनु’, स्त्रियांची तगमग खणखणीतपणे मांडणारा, रोकडे सवाल करणारा ’चोखेर बाली’ ही या स्तंभात समावेश झालेल्या ग्रुप ब्लॉगची काही उदाहरणं. ’पर्सनल इज पॉलिटिकल’ याचा अनुभव इथे देता-घेता येतो.

मुळात ब्लॉग कशाला लिहायचा, याचं उत्तर हौस, उर्मी किंवा सामाजिक कामाला बळ मिळावं हे असू शकतं तसच त्या मागे स्वच्छ व्यावसायिक हेतू देखील असू शकतो. या स्तंभात समावेश झालेल्या, करियर म्हणून ब्लॉगींग कडे पाहणार्‍या व्ही-लॉगर परिमा शर्मा, आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर, विश्वभ्रमंती करणारी शिव्व्या नाथ, युअर स्टोरी या करियर विषयक समूहब्लॉगची प्रणेती श्वेता शर्मा या खर्‍या अर्थाने यूथ आयकॉन आहेत.
लग्नानंतर किंवा प्रापंचिक अडचणींमुळे नोकरीतून ब्रेक घेतलेल्या दक्षिण भारतातल्या अनेक उच्चशिक्षित मुलींचा ’तंत्रज्ञान विषयक ब्लॉगिंग’ हा व्यवसाय आहे. थोडक्यात त्या दिग्दर्शक-लेखक कुंडलकर म्हणतात त्यापैकी ’दुपारच्या वेळी फेसबुक वर काहीतरी खरडणार्‍या रिकामटेकड्या गृहिणी’ नसून व्यवसायाच्या बदलत्या ट्रेंड्सचं भान असेलल्या, आधुनिक प्रकारचा ’गृहोद्योग’ करणार्‍या स्वयंपूर्ण स्त्रिया आहेत.
ब्लॉगचे चाहते वाढवून जाहिरातींद्वारे कमाई व्हावी म्हणून किंवा अ‍ॅफिलिएट मार्केटर बनून किंवा वेबसाईट गुगल शोधयादीत शिरोभागी यावी म्हणून या ब्लॉगर्स काम करतात. ’कॉंटेंट इज द किंग’ हे सूत्र समजलेल्या किती तरी जणी आपल्या नव्या उपक्रमांना निधी, उत्पादनांना-उपहारगृहांना ग्राहक, पुस्तकांना वाचक किंवा कलाकृतीला प्रेक्षक मिळवण्यासाठीही ब्लॉगचा वापर  करतात. अशा हेतूने ब्लॉगकडे पाहणार्‍यांमध्ये मराठी महिला ब्लॉगर्सचे प्रमाण तुलनेने अतिशय कमी आहे.

सोशल मिडीया आज प्रचंड लोकप्रिय आहे. तिथेही लेखन करता येतं, लहान आकारातील लेखांमुळे त्याला मायक्रोब्लॉगींग म्हटलं जातं. उदा: फेसबुक, मग आता ब्लॉगची गरज काय? असा प्रश्न काही वाचकांनी विचारला. माझ्या मते फेसबुक किंवा एकूणच समाजमाध्यमांवर वाचक कमी आणि ’स्क्रोलप्रेमी’ जास्त असतात, त्यामुळे चांगल्या वाचकांसाठी तिथे लेखाचा अंश लिहून उर्वरित भाग ब्लॉगवर जाऊन वाचण्यासाठी लिंक देणं हा सोपा मार्ग. त्यामुळे ब्लॉगची पोचही आपोआप वाढते. सोशल मिडीयावरची दुसरी अडचण म्हणजे पोस्ट्सच्या ढिगात तुमचा लेख हरवून जातो. ब्लॉगवर तुमचं लेखन एका जागी तारीखवार लावून ठेवलं जातं. सहज शोधता, वाचता येतं. अनेक महिला पत्रकार, विशेषत: इंग्लीश माध्यमातल्या, आज ब्लॉगर आहेत. वृत्तपत्रीय धोरणाची बंधनं, संपादकीय कात्री, ब्लॉगवर आड येत नाही. अनेक ब्लॉग्स पुस्तकरुपात प्रकाशित झाले आहेत. ’ज्युली अँड ज्युलिया’ हा हॉलीवूड चित्रपट तर पूर्णपणे ज्युली पॉवेलच्या ब्लॉगवर आधारित आहे. आपल्याकडे ’तुम्हारी अमृता’ सारखे वाचनाचे प्रयोग किंवा पुस्तकांच्या अभिवाचनाचे प्रयोग होतात. त्यास्वरुपाच्या सादरीकरणासाठी येत्या काळात ब्लॉगचा विचार व्हायला हरकत नाही.

व्यावसायिक दृष्टिकोन असो वा व्यक्त होण्य़ाची गरज, एखादा विषय पोटतिडकीने जगासमोर आणण्याची आस असो वा स्वत:च्या मनाचे कंगोरे निरखण्य़ातलं मुग्ध समाधान, हेतू काहीही असो, आजच्या तंत्रज्ञानाच्या झंझावातात ब्लॉगचं भक्कम व्यासपीठ ’ती’ च्या सह प्रत्येकाला उपलब्ध आहे. तरीही यापलीकडे जाऊन ’ब्लॉग का लिहावा’ किंवा ’ब्लॉग का वाचावा’ या दोन्हीचं उत्तर मला पद्मा गोळे या कवयित्रीच्या ’मुठभर हृदया’ कवितेतल्या या शब्दात सापडतं...
’वादळे यासाठीच वापरायची असतात..
आपण काय आहोत
हे तपासण्यासाठी नव्हे,
आपण काय होऊ शकतो,
हे आजमावण्यासाठी.... ’

3 comments:

  1. The lady blogger is mist wel read and aware both in english and marathi good explaination in literary wording about proweses of blogging !Please write about finanance ,real eastate, science technology subjects too i am sure lady will do very well there too in these areas girls have done thair presence felt already expecting beond just literary ,cookary,fashion blogs!I am sure lady bloggers will do excellantly there too

    ReplyDelete