Saturday, August 15, 2026

मेड इन इंडिया - ए टायटन स्टोरी

मोझार्ट कोण होता हे माहीत नसणार्‍या भारतीयांनाही मोझार्टची सिंफनी क्र. २५ गुणगुणता येते कारण ती आहे टायटन घड्याळांच्या जाहिरातीची ट्यून. पुन्हा  ऐकायचीय?   

अर्थात तिचे भारतीयकरण केले आहे त्या काळात जाहिरात-संगीत क्षेत्रात काम करणार्‍या ए.आर.रहमाननी. ’देश का नमक’ खाल्लेल्या प्रत्येक मध्यम- उच्चमध्यमवर्गीय भारतीयाकडे एक तरी टायटन घड्याळ असते किंवा त्याला ते घ्यायचे असते. कारण एकच - ते ’टाटा’चे उत्पादन आहे. ग्राहकांना ’Count on Us’ म्हणण्याची हिंमत असलेला टाटा समूह म्हणजे विश्वास, गुणवत्ता आणि सचोटी मग तो चहा असो की स्टील, मोटार असो की हॉटेल. दागिने असो वा घड्याळ. 

मुळात घड्याळ्याच्या व्यवसायाकडे वळावे असे टाटांना का वाटले, त्यावर काय विचारमंथन केले, या मार्गात कोणत्या अडचणी आल्या, त्यावर कसे उपाय शोधले आणि अखेरीस २५ वी सिंफनी गुणगुणत हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे देशी घड्याळ भारतीयांच्या मनगटांवर कसे झळकू लागले याची चित्तरकथा म्हणजे अमेझॉन प्राईमवर गाजलेली मालिका - मेड इन इंडिया - ए टायटन स्टोरी. 

कुणीही हे वाचून म्हणेल हा तर माहितीपटाचा विषय आहे. गेल्या काही वर्षात आर्थिक घोटाळे, वैज्ञानिक यश, क्रीडा क्षेत्रातील संघर्ष किंवा राजकीय इतिहास यांवर आधारित अनेक दर्जेदार मालिका भारतीय OTT  प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या असल्या तरी एका घड्याळ कंपनीच्या स्थापनेवर आधारित मालिका कितपत रंजक ठरू शकेल, असा प्रश्न अनेकांच्या मनात होता. त्यातून यात ना शिव्यांचा मसाला ना टिपिकल खलपात्र ना समलैंगिक पात्र ना कामुक दृश्य आणि नायक तर बरचसं टक्कल असलेला  ’जेन एक्स’ मधला साधासुधा गृहस्थ. परंतु ही मालिका प्रदर्शित झाल्यानंतर ही फक्त घड्याळनिर्मितीची गोष्ट नाही याची प्रेक्षकांना खात्री पटली.

मग काय आहे, तर हे भारतीय मूल्याधारित उद्योगविश्वातले एक महत्त्वाचे पर्व आहे, ही विचारी माणसांची आणि त्यांच्या दुर्दम्य महत्वाकांक्षेची गोष्ट आहे  . 

मालिकेत त्रुटी शोधायच्या म्हटल्या तर नक्कीच सापडतील, जसे महत्त्वाच्या व्यावसायिक निर्णयांना वेळ लागतो, ते इथे चुटकीसरशी घेतल्यासारखे दाखवले आहेत. उद्योगविश्वाशी परिचित असलेल्या प्रेक्षकांना हे खटकते. अर्थात मालिकेची किमान गती राखण्यासाठी तसे करणे भाग आहे हे ही कळते.

कलात्मक स्वातंत्र्य मान्य केले तरी काही प्रसंगांमध्ये मालिका फारच आदर्शवादी वाटते. उदा: पहिल्याच प्रसंगात संपावर गेलेले कर्मचारी ,पावसात उभे राहून घोषणा देत असतात. मालिका ज्यांच्याभोवती केंद्रित आहे ते देसाई आधी छत्र्या विकत आणून त्यांना वाटतात मग वरच्या मजल्यावरच्या बोर्ड मिटिंग मध्ये उपस्थित होतात. असं घडलंच नसेल असं नाही पण  देसाईंमधलं चातुर्य, माणूसपण, व्यवस्थापकीय कौशल्य, अडचणीवर तोडगा काढण्याची क्षमता सगळं काही एकत्र दाखवून एकाच प्रसंगात त्यांची व्यक्तिरेखा उभी करण्याची लेखकांना घाई झाल्यासारखी वाटते . त्यामुळे हा आणि असे काही प्रसंग कृत्रिम वाटतात. वास्तविक व्यावसायिक जगातील गुंतागुंत, स्पर्धा आणि नफ्याची अपरिहार्यता त्यापुढे नगण्य ठरते. 

तीन लेखकांनी मिळून या रॉबी ग्रेवाल दिग्दर्शित मालिकेची पटकथा लिहिली आहे. ही मालिका काही प्रमाणात विनय कामत लिखित पुस्तकावर आधारित आहे. पुस्तक मात्र टायटन घड्याळांच्या कहाणी पुरते मर्यादित नाही. पटकथा लेखक विक्रम भागवत यांनी पुस्तकाची मालिकेशी तुलना केली आहे. त्यांच्या मते ," पुस्तकात  टायटन घड्याळे, तनिष्क दागिने, फास्टट्रॅक आणि स्कीन ह्या सर्वांचा मागोवा घेत एक औद्योगिक साम्राज्य कसे उभे राहिले याचा लेखकाने वेध घेतला आहे. मालिकेच्या तुलनेने पुस्तकात मानसिक आंदोलने, किंवा संघर्ष यांना स्थान नाही." 

या मालिकेचा काळ १९७० ते १९९० चा. मोबाईल, इंटरनेटपूर्व शांत काळ. त्या वेळचे भारताचे वास्तववादी चित्रण बघताना गंमत वाटते. दक्षिण भारतीय सिनेमात कॅमेरा इतका गरागरा फिरताना पाहण्याची आपल्याला सवय आहे की इथे तो ’पॉज’ झाला की काय असे वाटू शकते. जुन्या मुंबईचे रस्ते, कार्यालयातले निवांत वातावरण, जुने कारखाने, उत्पादन प्रक्रिया, साध्या कपड्यातली माणसं, त्या काळातील मानसिकता यातल्या कॅमेर्‍याने एकदम अस्सल उभी केलेली आहे. रेट्रो काळ नजरेला जाणवावा म्हणून असेल, मंद पिवळसर प्रकाश मालिकेत वापरला आहे त्यामुळे काही वेळा अति कलात्मक सिनेमा पाहत असल्यासारखे निरूत्साही वाटू लागते. मग एखादी चमकदार घटना घडते आणि आपली नजर बॅकलाईटऐवजी मुख्य दृश्यावर खिळते. त्या काळातल्या गाण्यांचाही घटनेच्या मूडनुसार खुबीने वापर करण्यात आला आहे. 

मालिकेची दृश्यभाषा लोभस आहे. दिग्दर्शकाने घड्याळ तयार करण्याची रूक्ष प्रक्रिया एखादी कलाकृती घडवावी तशी सादर केली आहे. त्यामुळे उत्पादन प्रक्रियेतील सूक्ष्म तपशीलही सिनेमॅटिक रूपात अवतरतात. यासाठी केलेल्या संशोधनाला दाद द्यायला हवी. 

१९७८ च्या सुमारास मुंबईच्या घड्याळांच्या बाजारपेठेत परदेशातून तस्करी केलेल्या घड्याळांचे वर्चस्व असायचे. टाटाचे कार्यकारी अधिकारी झर्क्सेस देसाई यांच्यावर डबघाईला आलेल्या टाटा प्रेसला पुनरुज्जीवित करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती , परंतु त्याऐवजी त्यांच्या डोक्यात एक प्रतिष्ठित, स्वदेशी घड्याळाचा ब्रँड निर्माण करण्याची कल्पना खरं तर किडा आला. हल्लीचे ’मोटीव्हेशनल स्पीकर्स’ उठता बसता उचकवतात तसा किडा नव्हे. बुद्धीमत्ता, नवीन मार्ग शोधण्याची क्षमता, समस्यांकडे संधी म्हणून पाहण्याची नजर, बदलत्या जगाची जाण आणि मोठे बदल घडवून आणायची हिंमत यातून निर्माण झालेली पॅशन.

जेआरडी टाटांच्या पाठिंब्याने, देसाई आणि टीमने पूर्णपणे 'मेड इन इंडिया' घड्याळ तयार करण्याचा निश्चय केला. टाटांनी तर याचा इतका ध्यास घेतला की जोपर्यंत भारतीय बनावटीचे मनगटी घड्याळ प्रत्यक्षात अवतरत नाही तोपर्यंत त्यांनी परदेशी बनावटीचे घड्याळ वापरायचे नाही असे ठरवले. मात्र हे सोपे नव्हते. कोणत्याही व्यवस्थापनाचे ( मॅनेजमेंटचे) तीन एम म्हणजे मॅन ( माणसे) , मनी (पैसा ) आणि मटेरियल. हे उभे करताना  कुशल अधिकारी  मिळवणे, कामगारांना या नव्या तंत्राचे प्रशिक्षण देणे, क्वार्ट्झ घडयाळांचे वेगळेपण ग्राहकाला पटवणे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाला पोचणे अशी अनेक आव्हाने या टीमसमोर होती. ती त्यांनी कशी पेलली हे बघताना आपण या मालिकेत गुंतून जातो.  

स्थानिक महिलांना कामगार म्हणून संधी मिळते तेव्हा आपल्यालाही आनंद होतो. 

फ्रेंच व्यावसायिकासमोर टायटन घड्याळ चुकीची वेळ दाखवते तेव्हा जेआरडींची अवस्था पाहून आपणही ओशाळतो. 

घड्याळ परिपूर्ण स्थितीत बाजारात अवतरते तेव्हा आपलाही उर भरून येतो. 

खमकी मेघा आणि बुजर्‍या गौरवचे लग्न होते की नाही याची आपल्यालाही चिंता लागून राहते. 

जेव्हा मेघाला कळते की मार्केटिंग प्रमुखपदी तिच्याऐवजी अन्य कुणी आहे तेव्हा ती दुखावली जाईल याची काळजी वाटते. 

अर्थात भिंतीवरचे घडयाळ आणि मनगटी घड्याळ दोन्हीची तुलना करून एकामुळे दुसर्‍याचे  मूल्य कमी होत नाही हे गौरव तिला सहजपणे समजावून सांगतो. आजच्या जीवघेण्या स्पर्धेच्या कॉर्पोरेट जगात असे घडते तर! 

ही ब्रँड स्टोरी" असली तरी एका अर्थी "व्हिजन स्टोरी" सुद्धा आहे. ही मालिका पाहिल्यानंतर कित्येकांनी टायटन ब्रँडकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलल्याचे मान्य केले आहे. 

यात सर्वाधिक लक्षात राहतो तो झर्क्सेस देसाई या पात्रात अक्षरश: घुसलेला अभिनेता जिम सरभ. जिमला आपण ’पद्मावत’, ’गंगूबाई काठियावाडी’ सारख्या अनेक चित्रपटातून हटके भूमिकांमध्ये पाहिलेले आहे.  त्यांनी उभे केलेले  ’देसाई’  या मालिकेचा प्राण आहे. त्यांना पल्लेदार संवाद नाहीत, परंतु जिमने देसाईंमधला आत्मविश्वास, सकारात्मकता आणि नेतृत्वक्षमता हे तीनही पैलू अत्यंत प्रभावीपणे साकारले आहेत. ह्या व्यक्तिरेखेला अनेक कंगोरे आहेत. कमालीची जिद्द आणि काहीसा वेडेपणा देसाई मध्ये आहे. त्याचवेळी इतक्या मोठ्या पदावर असूनही आयुष्यात साधे आनंद शोधणार्‍या  त्याच्या स्वभावातल्या सौम्य छटा सुद्धा आपल्याला मोहून टाकतात. मग ते त्याने नाराज सहकार्‍याला खुलवणं असो की किचनमध्ये स्वयंपाक करत असताना तो चाखून पहाणं असो.  

“नो डिस्कशन ओन्ली डेमोन्स्ट्रेशन”. हे देसाईचं तत्व. करून दाखवण्याची जिगर ही खासियत. चांगली टीम असल्याशिवाय एकट्याला हे शक्य नाही याची जाण आणि योग्य व्यक्ती पारखण्याचे कौशल्य हे त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य.  

जिमप्रमाणेच नसीरुद्दीन शाह यांची जे.आर.डी. टाटा यांच्या भूमिकेसाठी केलेली निवड अचूक आहे. ऑस्कर पुरस्कारांमध्ये आता पात्रयोजना विभागाचाही समावेश करण्यात आला आहे इतके कास्टींग मह्त्वाचे मानले जाते. आपल्या सहकाऱ्यांची उमेद वाढवणे, प्रसंगी टीका करणे, पण ती जिव्हारी लागणार नाही तर जोमाने काम करायला प्रवृत्त करेल याची काळजी घेणे असे उद्योगमहर्षी जेआरडी त्यांनी फार कन्व्हिन्सिंग पद्धतीने उभे केले आहेत. आकाश बन्सलच्या भूमिकेतील वैभव तत्त्ववादी व इतर सहकलाकारांनीही भूमिका चोख वठवल्या आहेत. स्वतंत्र व्यक्तिमत्व असूनही देसाईच्या आयुष्यात विरघळून गेलेल्या ,नमिता दुबेने साकारलेल्या त्यांच्या पत्नीचा पडद्यावरचा वावर उत्फुल्ल आहे. 

ही धीमी लोकल आहे. दर दहा मिनिटांनी धक्कादायक वळण दाखवण्याचा ताण यात नसल्याने ही मालिका प्रेक्षकाचे बोट धरून  फिरता फिरता मध्येच कट्ट्यावर बसून गप्पा माराव्यात तशी सावकाशपणे कथानक उलगडते. प्रत्येक निर्णयाआधी केलेला सखोल विचार, प्रत्येक अपयशामुळे साहवी लागलेली वेदना आणि प्रत्येक यशाआधी केलेली धडपड आपल्यासमोर ठेवते. एकूण ही कॉफी पीत निवांतपणे पाहावी अशी मालिका आहे. सुरुवातीला "हॅ ..किती संथ आहे" म्हणत अनेकांनी पहिली दहा-पंधरा मिनीटे पाहून म्हणत मालिका बंद केली मग चर्चा होऊ लागताच पुन्हा पाहायला सुरुवात केली आणि थेट बिंज वॉच केल्याचे कबूल केले. 

मोठे ब्रँड्स एका दिवसात उभे राहत नाहीत. त्यांच्या मागे दूरदृष्टी, परिश्रम असतात. धाडसी निर्णय घेण्यासाठी लागणारे मनोधैर्य असते. हे मनोधैर्य निर्माण होण्यासाठी आवश्यक असते freedom of failure. "अपयशाचा केवळ स्वीकार नव्हे ते अपयश आपल्याला यशासारखे साजरे करता आले पाहिजे म्हणजे पुन्हा प्रयत्न करायला आपण बिचकत नाही."- देसाईच्या तोंडी असलेले हे संवाद म्हणजे  मला या मालिकेचे मध्यवर्ती सूत्र वाटते. 

प्रत्येक स्टार्टअप कंपनीच्या व्यवस्थापनाने, उद्यमशील वृत्तीच्या प्रत्येकाने , खरे तर प्रत्येक देशाभिमानी भारतीयाने आवर्जून पाहावी अशी ही आपल्या आयुष्यात गुणात्मक बदल घडवणारी ’टायटन स्टोरी’. 

#TitanStory #TitanWatches #MadeinIndia

Published in Daut Lekhani - Column 'OTT katta' August 2026

No comments:

Post a Comment