Poseidon म्हणजे ग्रीक पुराणातला समुद्रदेव.
आम्हाला चिकचिक मुंबईत फार थांबायचं नसल्याने ट्रेनमधून उतरून टॅक्सीने आम्ही थेट गेट वे ऑफ इंडियाला पोचलो. गेट वे ऑफ इंडियापासून फेरी बोटीने मांडवा आणि तिथून पळत बस पकडून इथे केव्हा पोचलो कळलंही नाही. फेरी बोटीच्या भोवतीने उडणारे समुद्र पक्षी सफर रंजक करत होते. मांडवा फक्त अग्नीपथमध्ये ऐकलेलं. पण अगदी किनारपट्टीवरचं कोणतही गाव असावं तसंच आहे. बर्याच सेलेब्रिटींचे अलिबागला बंगले असल्याने आणि एकूणच मुंबईकर प्रवाशांमुळे M2M क्रूझ वगैरे, जेट्टी ज्यात गाड्यांच्या मॉडेल आणि साईझनुसार भाडं आकारलं जातं याचीही वर्दळ होती. शेजारी बसलेल्या पारशीबाईने मांडवा उतरके दौडनेका नही तो अलिबाग जानेवाली बस फुल हो जायेगी , अशी मह्त्वाची टीप दिली होती.
Resort च्या आवारातच श्रुतीचं घर असल्यामुळे आम्हाला शब्दश: घरच्यासारखं वाटत होतं. या दोघांइतक्याच राजे काकूही जातीने काळजी घेत होत्या. Group साठी प्रशस्त dormitory, खास श्रुती टच असलेलं कोकणी सुग्रास भोजन, आवारातच स्वीमिंग पूल, पायाखाली हिरवळ आणि राखणीला काळे तुकतुकीत चपळ जिंजर, गार्लिक (कुत्री बरं का ) अजून काय हवं!
त्यात पल्लवीच्या लेकाचं लग्न ठरल्याने तिला श्रुतीच्या मदतीने आम्ही .......... केळवणही केलं. तुपाची धार धरलेला गरमागरम मऊसूत शुभ्र उकडीचा मोदक आणि तिने एक मेथीची कसली तरी भन्नाट भाजी केली होती. आयतं जेवण ही अजूनही बायकांसाठी सुखाची परमावधी असते. मेनू वगैरे नंतर.
संध्याकाळी जवळच्या वर्सोली बीचला गेलो. भटकलो. खिदळलो. गुडघ्यातला क्रॅम्प विसरून सायकली चालवल्या. घोडागाडीत बसलो. डोळे भरून निवांत सूर्यास्त पाहिला.दुसर्या दिवशी मुरूड-जंजिरा सफर केली. रायगड जिल्ह्यातील अरबी समुद्रात वसलेला हा एक अभेद्य जलदुर्ग आहे. मुरूड किनाऱ्यापासून सुमारे २ किलोमीटर अंतरावर. तिथे जायला बोटी आहेत. या किल्ल्याची उभारणी पंधराव्या शतकात झाली. पुढे सिद्दी शासकांनी त्याचा विस्तार करून तिथेआपल्या सत्तेचं केंद्र तयार केलं. शिवाजी महाराज तसेच इतर अनेक सत्ताधीशांनी हा किल्ला जिंकण्याचे प्रयत्न केले, परंतु त्याच्या मजबूत तटबंदीमुळे आणि सागरी संरक्षणामुळे ते शक्य झालं नाही. किल्ल्याभोवती उंच तटबंदी, १९ बुरुज, मोठं प्रवेशद्वार, राजवाड्यांचे अवशेष, मशिदी आणि गोड्या पाण्याची तळी पाहायला मिळतात. समुद्राच्या खाऱ्या पाण्याच्या मध्यभागी असूनही इथे गोड्या पाण्याचे साठे आढळणं हे या किल्ल्याचं वैशिष्ट्य आहे.
तरीही पडझड प्रचंड झाल्याने भग्नावस्थेतला हा किल्ला पाहताना कससं वाटलं. फार न भटकता बुरुजाशी बसून निरीक्षण केलं. तळ्यालगतच्या पायर्यांवर बसून राहिलो. बोटीच्या वेळेनुसार संध्याकाळच्या आत परत निघावं लागतं. मुलं लहान असतान अलिबागला आलो होतो पण बोटीची वेळ संपल्याने जाता आलं नव्हतं. येताना वाटेत काशिद बीचवर जेवलो. उष्मा वाढत चालल्याने समुद्रस्नानाचा मोह टाळला. तिथल्या हॅवॉक मध्ये पहुडल्यावर समुद्राची गाज ऐकत डोळे मिटले तेवढ्यानेही मस्त वाटलं. परत निघालो. उन्हं उतरल्याने नागाव बीचवर तरी जायचंच असं ठरवलं.
तर ही गर्दी. सगळी मुंबई जणू तिथे लोटली होती. आत शिरल्यावर गाडी उलट वळवताही येईना मग कंपलसरी बीचवर गेलो. गर्दीतून सुटका करून घेऊन परत निघालो ते थेट रिसॉर्टवरच्या स्विमिंग पूलमध्ये शिरलो. गप्पा, मस्ती, पत्ते, शब्दक्रीडा खेळ आणि तेव्हा थंडी असल्याने या जोडीबरोबर त्या देखण्या निसर्गरम्य resort वरचं कॅम्प फायर. झकास ब्रेक झाला.
मुंबईहून परतीची ट्रेन होती. मध्ये ४ ता हातात होते म्हणून टॅक्सि ठरवून साऊथ मुंबई दर्शन केलं. पिरामल हाऊस ते अंबानींच अॅटिलिया, मरीन ड्राईव्ह, नरिमन पॉईंट, सेलेब्रितींची घरं , मुख्यमंत्री निवासस्थान असं करत शेवटी नया व्यापारमधला म्हातारीचा बूट वगैरे बघून कमला नेहरु उद्यानात#अलिबाग से आयेले लोग हॅपी मूडमें बैठे रहे. दुसर्या दिवशी घरी पोचू तेव्हा एका मैत्रिणीच्या आयुष्यात काही अघटित घडणार आहे याची तेव्हा आम्हाला सुतराम कल्पना नव्हती.