Monday, July 6, 2026

मराठी साहित्यातील विडंबनकाव्य : झेंडूची फुले ते तेंदूची पाने


अनुकरण किंवा नक्कल करणे ही माणसाची जन्मजात प्रवृत्ती आहे. मुलाला थोडेफार कळू लागताच त्याच्या ठायी या प्रवृत्तीची लक्षणे दिसायला लागतात. मूल बऱ्याच गोटी अनुकरणानेच शिकत असते. कधी मोठ्या मंडळींनी शिकविल्यामुळे तर कधी स्वयंस्फूर्तीनेही त्याची अनुकरणप्रवृत्ती वाढीस लागत असते. पक्षी आवाज कसे करतात, हम्मा कशी हंबरते, आजोबा कसे चालतात, बाबा कसे ओरडतात इ. मुले 3 ऱ्या 4 थ्या वर्षापासून हुबेहूब करून दाखवतात

विडंबनाचे मूळ या जन्मजात मानवी प्रवृत्तीत शोधता येण्यासारखे आहे.

वेडावण्यामुळे एकीकडे जशी गंमत वाटते, तसेच आणखीही महत्त्वाचे कार्य साधते. वेडावणे ही सक्रिय टीका असते. ती दोषदिग्दर्शनही बिनतोडपणे करते. बेडावण्यामुळे मूळ व्यक्तीला आपल्यातील अतिरेकाची जाणीव होते. 


वाङ्मयीन क्षेत्रालाही हाच न्याय लागू होतो.  विडंबन हे वांग्मयीन वेडावणेच म्हणाना. तिथेही अती झाले की हसू येते नि नक्कल करण्याची उबळ येते .

अनुकरण विनोदाच्या पातळीवर व बुद्धिनिष्ठ असत. चोखंदळ वाचकालाच ते आस्वाद्य होत. ज्याच विडंबन केल तो साहित्यिक खेळाडू वृत्तीचा असेल तर त्यालाही गंमत वाटते व तो आपले दोष सुधारतो अस रंजन करता करता डोळ्यात अंजन घालण्याची किमया विडंबन कलेत असते


विडंबन करणे सोपे नाही. त्याचा कान तयार असायला हवा नि साहित्यदृष्टी चांगलीच चोखंदळ हवी. आविष्कारपद्धतीचा थेट अनुकार करणे भाषाप्रभुत्वावाचून साधत नाही व आशयाचा नेमका वेध घेऊन त्याचा मर्मभेद करणे हे मूळ कर्त्याच्या समग्र व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास असल्यावाचून जमत नाही. काही नेहमीचे दाखले घेऊन हे अधिक स्पष्ट करता येईल. नाटकातली वेड्याची भूमिका कोणी वेडा वठवू शकणार नाही, तिथे वेडेपणाचा प्रतिभास (Illusion) निर्माण करणारा शहाणाच हवा. विडंबनकार मूळ कृतीचा प्रतिभासच उभा करीत असतो. वरवर पाहिल तर सर्कशीतला विदूषक वेड्यावाकड्या उड्या मारून हसवतो आहे अस वाटत; पण ती आपली विदूषकी वठविण्यासाठी तो चांगलाच कसरतपटू असावा लांगतो. इंग्रजीत Set a thief to catch a thief, असा वाक्प्रचार आहे. कारण चोरीच्या वाटा चोराला माहीत असतात. तद्वतच मूळ कर्त्याच्या वाटा विडंबनकाराला नेमक्या माहीत असाव्या लागतात.


ज्याला विडंबन काव्य म्हणतात अशी 20 तरी उदाहरणे एकनाथांच्या काव्यात मिळतील तरीसुद्धा हास्ययुक्त दोष दर्शन हा विडंबनाचा ठळक हेतू तेथे नाही. भारुड इ. लेखनाचे पर्यावसान विनोदात होत नसून वेदांत मांडण्यात म्हणजे गांभीर्यात होते त्यामुळे विडंबनाचा मागवा घेताना साधारणतः १९०० च्या पुढच्या काळाचा विचार करता येईल .त्यात कुलकर्णी लीलामृत हे एक ठळक विडंबन काव्य 1913 मध्ये आले पांडवप्रतापच्या धरतीवर शेटजी प्रताप म्हणून विडंबनात्मक ओवी ग्रंथ आलेला आहे .पण तो फारसा प्रसिद्ध झाला नाही मोरोपंती आर्यावर्तीचा थाट सही सही , गंगना मोगरे यांनी उपवास काव्यात आणलेला आहे. खाडीलकरांच्या विद्या हरण व मानापमान या नाटकातील पदे लोकप्रिय झाल्यानंतर त्यातील शब्दरचनेचा अप्रयोजकपणा व तानाबाजीचा अतिरेक माधवराव जोशी यांना खुपला. त्यांच्या थट्टेखोरपणाला जाग आली आणि त्यांनी विनोद या नाटकात खाडिलकारी पदांची विडंबनेच पदे म्हणून घातली. उदाहरणार्थ- ’माता दिसली समरी विहरत’ या सुप्रसिद्ध पदाचे”माता बसली स्वगृही रखडत,  घाशीत ताट तव्यासी पळशी’ हे त्यांचे विडंबन उत्कृष्ट उतरले आहे पण यात सर्वात खळबळ उडवून देणारी झेंडूची फुले उमलली आणि मग महाराष्ट्रात विडंबन गीतांचे पीकच आले अर्थात त्यातही दाण्यापेक्षा तणच उदंड होते.  

त्याच अस झाल : १९२० सालाच्या सुमारास काव्याकाशातले गोविंदाग्रज- बालकवींसारखे तेजस्वी तारे निखळून पडले. काही काळ अंधारल्यागत झाले, त्त्यातून काही रवि-किरण एकमेका साह्य करीत काव्याचा सुपंथ धरून पुढे सरसावले, मग काव्यक्षेत्रात सामुदायिक शेतीसारखा प्रयोग सुरू झाला. मराठीत खंडकाव्ये नाहीत ? लिहा खंडकाव्ये. गझला नाहीत ? लिहा गझला. सुनीते नाहीत ? खरडा सुनीते. बिलापिका नाहीत ? काढा गळे ! पुन्हा यांच्यातलेच टीकाकार या प्रयोगाची प्रशंसा करून पत-पुरवठा करीत होते. असा मोठा विचित्र फड सजला ! पण हे खुद्द आ० अत्र्यांनींच नेटके लिहून ठेवले आहे, ते त्यांच्याच शब्दांत देणे बरेः

"... काव्यांत क्रांति घडवून आणण्यासाठी महाराष्ट्रांत परस्पर-प्रशंसा-संघ स्थापन झाले. तेव्हां त्यांचे ते नियम, तीं ध्येयें, त्या मंडळाच्या साप्ताहिक बैठका, तो नावि- न्याचा व वैशिष्ट्टयाचा पुरस्कार…

एकीकडे संस्कृतप्रचुर जडजंबाल शब्दालंकार घेऊन सोवळी मंडळी सिद्धः तर दुसरीकडे फारसी जडजवाहीर घेऊन ओवळी मंडळी सज ! 

काव्यदेवतेची ही विचित्र कुचंबणा पाहून अच्यांची जन्मजात विनोदबुद्धी जागृत झाली आणि आपल्या काव्यदैवतांच्या अवमूल्यनाच्या चिडीतून त्यांची टीकाबुद्धी उफाळून आली. या दोहोंचा जोड जमून जी अजोड साहित्यकृती पैदा झाली, तीच 'झेंडूची फुले'!

एक उदाहरणपाहूया , काळ लक्षात घ्या १३ एप्रिल १९५२ ची ही कविता आहे. श्री. राजगोपालाचारियर मद्रासचे मुख्यप्रधान म्हणजे आताचे मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रतिक्रियेदाखल लिहिलेली ही कविता

म्हातारा इतुका न- अवघे पाऊणशे वयमान


म्हातारा इतुका न, परि हा बनला फिरुनि जवान,  दिल्ली सोडुनि गल्लीचा हा झाला पंतप्रधान !

चष्मा काळा शोभे डोळां डोइस टक्कल छान , हातीं सोटा पंडित मोठा बृहस्पतीवर ताण !

संन्यासाचें सत्रा वेळां आणी हा अवसान , वैराग्याची वस्त्रे हातीं, संसारावर ध्यान !

सीतेसाठीं जसा धांवला लंकेला हनुमान,  मद्रासेला तसा करी हा दिल्लीहुन उड्डाण !

गांधीजींचा व्याही होता जीनांचा मेहमान , सुपीक मेंदूतून निघालें ह्याच्या पाकिस्तान !

सत्य-अहिंसा-मंत्राने हा करितो कारस्थान ,ह्या चाणक्यापासुन राखीं भारतास भगवान्

विडंबनाचे शब्द कानी पडताच मूळ कृतीची स्मृती ताबडतोब मनात जागी होणे ही त्याच्या यशस्वितेची प्राथमिक कसोटी. अर्थात त्यासाठी मूळ कृतीही सर्वप्रसिद्ध असावी लागते. मूळ कविता आणि

तिची अनुकृती यांतल्या ओळी समांतर रीतीने समोरासमोर उभ्या राहतात व

तुलनेतून त्यांच्या आशयातली विसंगती जाणवून हसू येते. विडंबनाचे रोपटे असे परोपजीवी आहे. दुसऱ्या कोणत्या तरी कवितेवर कलम केल्यावाचून ते जीव धरीत नाही.

शां. शं. रेग्यांचा 'एक विडी आहे माझ्या खोल खिशात दडून' हा चरण ऐकला की 'एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून' हा मंगेश पाडगावकरांचा चरण जरूर आठवतो. 

केशवकुमारांची 'परिटा, येशिल कधी परतून ?' ही ओळ ऐकली की, रे. टिळकांची 'पांखरा, येशिल का परतून !' ही ओळ आठवते.  ऐकूया पाखरा कवितेचं विडंबन - 

परिटास-

परिटा येशिल कधी परतून ? 

कोट रेशमी लग्नामधला मानेवर उसवून ! उरल्या सुरल्या गुंड्यांचीही वासलात लावून !

बारिकसारिक हातरुमाला हातोहात उडवून ! सदऱ्यांची या इस्तरिनें तव चाळण पार करून !

खमिसांचीं हीं धिरडीं खरपुस भट्टिमधे परतून ! तिच्या भरजरी पैठणिची या मच्छरदाणि करून !

गांत्रांतिल कपड्यांची सगळ्या गल्लत छान करून ! रुमाल जरिचे आणि उपरणीं महिनाभर नेसून ! 

सणासुदीला मात्र वाढणें घेइ तुझें चोपून ! परिटा येशिल कधी परतून 

कवी थोडे, कवडे फार' हा प्रकार कोठल्याही काळी खराच असतो. त्यामुळे बांडगूळवजा निरर्थक संकेतांची भरमसाट वाढ होऊन मूळचा काव्यवृक्ष वthण्यासारखी परिस्थिती निर्माण होते. अशा रीतीने संकेता- तिरेक झाला की विडंबनकाराला खाद्य मिळते. साहित्यक्षेत्रातील प्रथितयश लेखक फाजील आत्मविश्वासामुळे किंवा दुर्लक्ष, घाई वा निष्काळजीपणा यांमुळे दोषास्पद बनतात, तर नवशिके अतिउत्साहीपणे नव्याचे भाट बनतात. या प्रतिगामी आणि पुरोगामी प्रवृत्तींना योग्यगामी वास्तवाची जाण विडंबनकार आणतो. 

केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले यांने लिहिलेली  ‘आम्ही कोण?’ ही कविता विख्यात आहे. यात त्यांनी स्वत:विषयी किंवा एकूणच कवीविषयीचा दृष्टिकोन केवढ्याआत्मविश्वासाने प्रकट केलाय पाहा. 


आम्ही कोण म्हणूनि काय पुससी? आम्ही असू लाडके ।

देवाचे, दिधले असे जग तये आम्हांस खेळावया ॥

विश्वी या प्रतिभाबले विचरतो चोहीकडे लीलया ।

दिक्कालातूनि आरपार अमुची दृष्टी पहाया शके

आम्ही कोण म्हणूनि काय पुससी? आम्ही असू लाडके ।

आता याचं तितक्याच ताकदीने अत्र्यांनी केलेंलं विडंबन पाहू. क-हेचे पाणी या आत्मचरित्रात अत्रे म्हणतात, “आयुष्यात मी काय वाटेल ते केले असेल, पण ढोंग कधी केले नाही. समाजाच्या सर्व अंतरंगांमधून मी वावरलो आहे. मजुरापासून तो महाराजापर्यंत आणि कंगालापासून तो कुबेरापर्यंत मी अनिरुद्ध संचार केलेला आहे. आज जीवनाच्या सर्व क्षेत्रात दंभाचा आणि ढोंगाचा जो बुजबुजाट झालेला आहे त्याचे कारण सत्य काय आहे हे जाणण्याचे आणि सांगण्याचे फार थोड्या लोकांत धैर्य आहे. ते धैर्य दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे.” त्यातूनच झेंडूच्या फुलांची निर्मिती झाली आहे. 

आम्ही कोण  - या कवितेत केशवसुत प्रतिभावंत कवीबद्दल बोलतायत तर अत्रे  यमक्या कवीबद्दल बोलतायत. आजच्या फेसबुकवरच्या काही कुडमुड्या कवींनाही हे लागू होईल. 

आम्ही कोण? म्हणून काय पुसतां दांताड वेंगाडुनी? ।

फोटो, मासिक पुस्तकांत न तुम्ही का आमुचा पाहिला? ॥

किंवा गुच्छ तरंग अंजली कसा अद्यापि ना वाचिला? ।

चाले ज्यावरती अखंड स्तुतिचा वर्षाव पत्रांतुनी? ॥ १ ॥


ते आम्ही – परवाङ्मयातिल करूं चोरून भाषांतरे, ।

ते आम्ही – न कुणास देऊ अगदी याचा सुगावा परी! ॥

डोळ्यांदेखत घालुनी दरवडा आम्ही कुबेराघरी! ।

त्याचे वाग्धन वापरून लपवूं ही आमुची लक्तरे! ॥ २ ॥

---------------

केशवकुमारांनी म्हणजेच अत्र्यांनी 'रसिकांना चेतवणी' देताना, माझ्या फुलांचे काहीही करा; रागाने चुरगळलीत तरी हरकत नाही, पण 'तळींचे खोबरे' खायला मात्र विसरू नको, असे म्हटले आहे. 'हे तळीचे खोबरे' म्हणजे जन्मजात विनोदबुद्धीचा विलास. विनोदबुद्धीच्या विलासामुळेच 'झेंडूची फुलें' एकमेवा- द्वितीय ठरलेली आहेत. विडंबनाची निमित्ते कालांतराने विसरली जातात, ती आस्वाद्य राहात नाहीत; पण हे 'तळीचे खोबरे' म्हणजेच विनोदबुद्धी त्याला स्वतंत्र मूल्य प्राप्त करून देते. असं झेंडूची फुलेंच्या 

४ ऑगस्ट १९७२ मध्ये लिहिलेल्या प्र्स्तावनेत स. गं. मालशे म्हणतात. अत्र्यांचे मन:पूत कौतुक केल्यावर ते हे ही म्हणतात की

--------------------------

नवलेखकांना दहशत वाटावी असा दरारा केशवकुमार म्हणजे अत्र्यानंतर कोणी निर्माण केला असेल तर पुलंनी-  आणखी एक रस, अंगु स्थान विद्यापीठ यासारख्या त्यांच्या लेखनात गद्यशैलीची अचूक अनुकरणे असून समीक्षेचा पडीकपणा आणि एकूण साहित्य क्षेत्रातील सांकेतिकतेत याचा मार्मिक उपहार केलेले आहे. पुलं हे कवी नव्हते याचं एकमेव कारण म्हणजे त्यांनी कविता लिहिली नाही पण विडंबन पाहता त्यांच्यातल्या काव्यप्रतिभेची चुणूक सहजपणे दिसते.

एक भन्नाट उदाहरण म्हणजे कवी मंगेश पाडगांवकरांच्या एका कवितेचं त्यांनी केलेलं विडंबन. पाडगावकर बरीच वर्षं 'लिज्जत पापड' कंपनीच्या जाहिरातींसाठी कविता लिहीत असत. कवितांचा पापडांशी किंवा त्या कंपनीशी काही संबंध नसे, मात्र कवितेच्या निमित्तानी लोक जाहिरातही वाचतील, या अपेक्षेनी कंपनीनी हे धोरण राबवलं होतं.. तर, १९७८ सालच्या 'ललित' नियतकालिकाच्या जून महिन्याच्या अंकात "आनंदाचा घनू" ही त्यांची कविता छापून आली :

आनंदाचा घनू...

बरसला अंगावरी आज आनंदाचा घनू...


आज मन गगनात

आणि गगन मनात

माझे प्राण इंद्रधनू...


रंग श्रवणासि आले

सूर सुवासिक झाले

झाली बासरीच तनू...


नभ झाले मनभोर

मनभर निळे मोर

आणि आतुरल्या धेनू...

कोसळला प्राणभर

सावळा हा अनावर जैसा देवकीनंदनू...

याचं पु.ल.देशपांडेंनी विडंबन केलं, ते 'ललित'च्याच जुलैच्या अंकात, ललितने मूळ कविता पान २८वर, अन् विडंबन पान २९वर छापलं..

"पाऊसू पापडू आणि एकू गीतू"

{कविवर्य श्री मंगेश पाडगावकर यांना त्याच्या 'लिज्जत' पुरस्कृत "आनंदाचा घनू" या वर्षा(सन) गीताला 'सलाम' करून}

भूमिका : चुलीवर भाजत टाकलेला पापड आणि वहीवर जुळवत टाकलेली कविता ह्या, महिला गृहउद्योग व काव्योपासना अशा द्वंद्वात सापडलेल्या स्त्रीच्या पापडाची आणि कवितेची अवस्था काय झाली, ते टिपण्याचा एक नम्र प्रयत्न.


येता आषाढू आषाढू लागे पावसाची झडू

आले माझिया मनात आपणही गीत पाडू !

साला बादचा शिरस्ता पाळतात कविजनू

येता पाऊस पिंजती छान कवितेचा धनू !

शब्द कापूस कापूस कसे काढती पिंजूनू...

- घनू, इंद्रधनू, प्राणू, मोरू, देवकीनंदनू,

मनू, गगनू, श्रवणू आणि बासरीची तनू

शब्द टप्पोरे टप्पोरे बोंडे कापसाची जणू !

पडो अथवा न पडो दारी पाण्याचा टिप्पूसू,

स्वस्थ बसवेल कसे येता आषाढाचा मासू?

घनू गरजो, बरसो, भरो विहिरी गटारू

दिसो घनघोर घटा, गळो छप्परू टप्परू !

हाती धरिताचि पेनू गळे शाईतुनी गीतू...

- गीतातल्या पावसाशी माझी जडलीसे प्रीतू !

झरे कवितेची ओळू, होते गीताचीच शाई !

- सॉरी, शाईचेच गीत - किंवा कशाचे काहीही !

हंबरत्या धेनूबिनू, पंख पिसारून मोरू

मेघूबिघू यथासांग, रांग धरूनिया तरू...

- आणि अचानक कैसा धूर कोंदला खोलीतू !

राही अधुरे अयाई माझे पावसाचे गीतू...

आली जाग एकाएकी नाकी शिरताचि घाणू -

करपली चुलीवरी तिथे पापडाची तनू !

कसा वाटोळा वाटोळा स्वर्णवर्णाचा लिज्जतू...

झाला कोळपून काळा, गेली इज्जतू इज्जतू !

- झड पावसाची आली, इथे गीतही भिज्जतू,

आता कुणासंगे घालू उगा हुज्जतू हुज्जतू ?


कवयित्री - सौ.तरंगिणी ठिपके


प्रिय संपादक महाराज,

अलीकडेच क-हाड - पुणे एष्टीत आम्हाला ही कविता लिहिलेला कागद सापडला. कवयित्रींच्या क-हाड कवयित्री संमेलनात पावसामुळे भिजलेल्या -आणि काव्यगायनाचा चान्स न मिळाल्यामुळे भाजलेल्याही- भावना ध्यानात घेऊन ही कविता आपल्या लोकप्रिय मासिकात छापावी अशी विनंती आहे. 

...आणखीही अश्या ब-याच कवितांचे कागद त्याच एष्टीत सापडले आहेत; पाठवू का ?

आपला नम्र

पु. ल. देशपांडे

-------------------------------------------

पण मंगेश पाडगावकरांनी स्वत:सुद्धा विडंबनं केली आहेत. 

१७ व्या शतकातले संत समर्थ रामदास यांचा दासबोध आपल्याला माहित आहेच. मंगेश पाडगावकरींनी त्या धर्तीवर म्हणजेच विडंबनरुपात लिहिलेल्या 'उदास'बोधात पाडगावकर काय म्हणतात पाहा.

आज हयात असते रामदास । तर भोवती बघुन हरामदास ।

अन्तरी जाले असते उदास । लागोन चिन्ता ॥ १ ॥

समर्थाचिया सेवका वक्र पाहे । ऐसा गल्लीगल्लीत गुन्ड आहे ।

त्यांचेवरी संरक्षण छत्र आहे । पोलीस पुढाऱ्यांचे ॥ २ ॥

या सत्याचा लागता शोध । कुठुन सुचता असता दासबोध ?

लिहिला असता उदासबोध । श्रीसमर्थांनी ॥ ३ ॥

-------------

वात्रटिका हा ही या जातकुळीचा काव्य प्रकार ,हे एखाद्या प्रसिद्ध कवितेचं विडंबन नसून एखाद्या घटनेवरचं उपरोधिक किंवा मार्मिक भाष्य़ असतं. तुम्हाला नक्कीच रामदास फुटाणे यांचं नाव आठवलं असेल. राजकीय उपहासपर असलेलं एकूणच काव्यलेखन फार सजगतेनं समजून घ्यावं लागतं. फ. मु. शिंदे त्यंच्याविषयी म्हणतात- आडात नुस्तं वाकून पाहिल्यानं फार तर पारवे उडतील; तळाचा ठाव लागणार नाही. तळात नेऊन सोडणं हे फुटाणे यांच्या विडंबनलेखनाचं ध्येय आहे. लोकजीवन रसातळाला नेणारं राजकारण 'पदोपदी' खेळलं जात आहे. तो 'खेळ' आणि त्यानं होणारा खेळखंडोबा दाखवण्यासाठी गारुड्याच्या भूमिकेनं डमरू वाजवावं लागतं. 

म्हणूनच फुटाणे यांची रचना प्रासंगिक अथवा तात्कालिक नसून ती वर्तमानाच्या विरूपाची लोकरचना आहे. वर्तमान सांगणं ही प्रेरणा मानली तर वर्तमानातलं सांगणं ही प्रतिज्ञा असते. फुटाणे यांची, त्या प्रतिज्ञेची लोकरचना आहे ! 

रामदास फुटाणे यांच्या लोकरचना विडंबनाच्या, विनोदाच्या, व्यंगाच्या अंगानं येणं स्वाभाविक आहे. कृतिविडंबन, रूपविडंबन तसंच शैलीविडंबन अशा त्रिधारा इथं एकाच प्रवाहानं खळाळताना दिसतील. 

महानोर यांच्या गीताच्या अंगानं त्यांनी एका घटनेचं फार चांगलं विडंबन साधलं आहे. शंकरराव चव्हाण हे मुख्यमंत्री असताना ट्रान्सपोर्टचा संप घडला. जकात रद्द करून संप संपवला. कधी रद्द केल्यानं तर कधी परस्पर फस्त केल्यानं ज'कात' नेहमीच गुप्त गळून पडत आलेली आहे.

शंकर बनात सचिवालयात प्रत्येकाची मान हलली 

म्युनिसिपालिटीची ही नार, डोळे मोडीत चालली 

"मी रात टाकली मी कात टाकली, मी लक्ष लक्ष रुपयांची जकात टाकली"

मूल्यांची पडझड तशी चालूच असते. तथापि 'चालू' गोष्ट मूल्यवान करण्याचं राजकारण घडू लागलं की विनोद आणि विचार एक होऊन, एकवटून दंभस्फोट घडवून आणतात. मर्मभेदाचं भाष्य त्यातून व्यक्त होत जातं. याचं उदाहरण आपल्याला 'वर्षा ' या  कवितेत दिसतं. 

एकमेकांना ढकलण्याची मनामनात ईर्षा आहे 

वर्षावर्षाला बदलतो म्हणून बंगला सुद्धा 'वर्षा' आहे !


रामदास फुटाणे यांच्या लोकप्रियतेचं रहस्य त्यांच्या साध्या आणि सुगम भाषेत आहे. फुटाणे यांची व्यंगभावाची कविता ही भाष्यकविता आहे. रयतेच्या अंगानं ते भाष्य कवी मांडत असतो म्हणून तो जनहितदक्ष असतो. प्रत्येक सरकारची काही तरी 'स्कीम' येते आणि जनताच 'स्लीम' होत जाते. गल्ल्यावरचे मात्र गल्लेलठ्ठ होतात हे भाकरीच्या पापडालाही कळतं !

झुणका म्हणाला भाकरीला- "अॅरोबीक करतेस ? फारच स्लीम दिसतेस."

भाकरी म्हणाली- "महागाईचा तवा रोजच माझ्या उशाला, टी.बी. च्या पेशंटला अॅरोबीक कशाला ?"

समाज आणि राजकारण, राजकारण आणि सत्ता, सत्ता आणि नीती, नीती आणि विवेक, विवेक आणि विचार, विचार आणि व्यवहार, व्यवहार आणि व्यतिरेक, व्यतिरेक आणि अन्वय, यांची रूपं रामायणातल्या ठिपक्याच्या सोनेरी हरिणासारखी इतकी झपाट्यानं पालटताना दिसतात की मती मूढ व्हावी.  ती रूपं बघा कवितेत कशी येतात

मतपेटी

येता निवडणूक जवळ । नेता दिसे शुभ्र धवल । हवे बहुजन बळ। जिंकण्यासाठी ॥ 

हा ह्या जातीचा नेता। तो त्या जातीचा नेता। सर्वांना हाती घेता। यश दारी ॥ 

हा तळातील बीसी। तो गाळातील ओबीसी । खेळती लेझीम ते दारासी। आनंदाने ।। 

मंत्रिमंडळात मात्र। बी. सी. ओबीसी. अपात्र। तेथे पन्नास टक्के पात्र। असू नये ॥ 

राखीव जागा ज्यांना दिल्या। त्यांना होती हो गुदगुल्या। मिळतील त्यांच्या फुल्या। मतपेटीत ॥ 

ज्यांचा गुंता नाही सुटत। जे जे प्रश्न असती बिकट । ते ते ठेवावे भिजत। कुजविण्या ।।

रुपातल्या विरूपाचे बारकावे टिपणं तरलतेनंच घडू शकतं. त्या तरलतेचा प्रत्यय देणं हे फुटाणे यांच्या व्यंगदृष्टीचं वैशिष्ट्य आहे असं फ. मु. शिंदे ’भारत कधी कधी माझा देश आहे’ या नावापासूनच अतरंगी वाटणार्‍या फुटाणॆ यांच्या काव्यसंग्रहाच्या प्र्स्तावनेत आवर्जून सांगतात. 

'वरवर हलक्याफुलक्या वाटणाऱ्या या कवितेचं पाणी खोल आहे' अ पु. ल. देशपांडे म्हणतात तेव्हा त्यंनी भाष्याच्या सखोलतेवर बोट ठेवलेलं असतं.  खोलात शिरायचं असेल तर किनारे सोडले पाह्यजे; तरच विरूपाच्या लोकरचने तळ गाठता येतो. याचा दाखला त्यांची सुप्रसिद्ध कविता देते - भारत कधी कधी माझा देश आहे. 

भेदाभेदांनी पोखरलेल्या देशाचं अंतिमतः काय होत असतं हे इतिहासानं कित्येकदा दाखवून दिलेलं आहे. तरीही वेदनामय वर्तमान बदलत नाही. स्वातंत्र्य, समता, बंधुता, एकात्मता, राष्ट्रप्रेम ही मूल्यं दांभिकतेत दग्ध होतात तेव्हा, त्या सर्व प्रवृत्तींचा दंभस्फोट करणारा नवा उपहास शब्दांकित होतो. त्या उपहासाचे अनेक पदर इथं सापडतात. उपरोधाचा तीव्र स्वर त्यातूनच उमटत राहातो. देशाशी काहीच देणंघेणं नसलेल्यांच्या राष्ट्रभक्तीतला खोटेपणा हेरणं ही प्रस्तुत व्यंगभावातली अर्थपूर्णता आहे.

भारत कधी कधी माझा देश आहे 

आम्ही सारे भारतीय अलग अलग आहोत 

माझं आयुष्य हा काही राष्ट्रीय एकात्मतेचा प्रबंध नाही 

त्यामुळे अन्य जाती-धर्माशी माझा काडीचाही संबंध नाही 

माझ्या जातीचा माणूस माझ्या धर्माचा माणूस हाच माझा भाऊ आहे 

माझा देश माझा खाऊ आहे खाऊन खाऊन तो संपणार आहे प्रांताप्रांताची जुंपणार आहे 

जुंपल्यानंतर फाटतील एकमेकांना लुटतील 

पुन्हा नवे परकीय साम्राज्यवादी येतील 

पुन्हा नव्या स्वातंत्र्यसंग्रामासाठी नवे टिळक नवे गांधी होतील

त्यांचेही पुतळे उभे राहतील पुतळ्यावर कावळे बसतील खुर्चीवर बगळे बसतील 

पुन्हा आम्ही एक होऊ स्वातंत्र्याचे गाणे गाऊ

'हम सब एक है हिंदु-मुस्लिम भाई भाई हिंदु-सीख भाई भाई हिंदु-इसाई भाई भाई

मराठीचं माहेरघर असलेली ही नगरी. मराठीच्या वैभवाची अनेक सांस्कृतिक प्रतीकं अभिमानानं जतन करून ठेवणारी पुण्यनगरी. तिचा वर्तमान दंगलग्रस्त, तिची संस्कृती जमीनदोस्त, ही खंत इथं आहे. इथली ज्ञानाची परंपरा भाटगिरीत भव्यता मानू लागल्यानं, सत्तेचं राजकारण वरचढ होऊन बसलं. उत्सव आणि दंगल सत्तेला सारखेच प्रिय असतात, हा केवढा विरोधाभास !

म्हणूनच पुणे या कवितेत फुटाणे लिहितात 

ज्ञानी सत्तेचे भाट झाले ,पहिलवान बारमध्ये शिरले 

लक्ष्मीच्या आक्रमणापुढे, सरस्वतीचे दास हरले ।।

एकावर एक फ्लॅट उभे, वाडे पायाखाली पुरले 

उत्सव किंवा दंगलीसाठी, गणपतीपुरतेच पुणे उरले ।।

---------------------------------------------------------

विडंनबकाव्याचा प्रवास नव्या विडंबनकारांनी सुरु ठेवला पण मूळ कवितेच्या, कवीच्या शैलीच्या विडंबनाऐवजी आपल्या मनातल्या भावना मूळ कवितेतल्या मुख्य शब्दांच्या आजूबाजूला पेरून विडंबन कविता करण्याचं पेव फुटलं. दिवस तुझे हे फुलायचे ...च्या जागी दिवस तुझे हे फुगायचे हे विकसनशील महिला वर्गाला म्हणण्यात आलं. किंवा मराठी भाषेची वंचना कुसुमाग्रजांच्या कणा या कवितेचा आधार घेऊन मांडण्यात आली. त्याचंच मायबोली.कॉमवर विशाखा कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेलं एक उदाहरण पाहूया.

ओळखतंय का कुणी मला ? विचारतीय मायबोली 

दीन झालीय वाणी तिची मान होती खाली ॥

थोडं ऐका सांगते काही कंठ आला दाटून 

हरवलंय ते वैभव कोणी देता का रे शोधून ॥

शब्द, अक्षरे, गमभन साधी बोली ही विसरले 

दूध वाघिणीचे मात्र, सारे घटाघटा प्यायले ॥

दिवस सरले, वर्षे गेली  'ती'ची जादू टिकली 

सहज मग जाईल कशी ओठी प्रत्येकाच्या रुळली ॥

चार मायेच्या माणसांमुळे अजून आहे टिकून 

अस्तित्वाच्या लढाईसाठी ‌द्यायचे आता झोकून ॥

खचले नाही हरले कधी वाटते एकच खंत

माझ्याकरिता थोडं कधी व्हाल का हो व्यक्त ॥

अंतर आपले वाढले तरी, जागवा मराठी बाणा

 हात हाती घेऊन फक्त 'मायबोलीसाठी' लढ म्हणा ॥

-------------------

यात आशय उत्तम आहे. मूळ कवितेच्या गण व मात्रांच्या नियमांशी , वृत्ताशी , नादाशी आणि खटक्याशी  प्रतारणा होऊ नये याचा प्रयत्न आहे पण झेंडूच्या फुलांच्या दर्जाच्या जवळपास जाणार्‍या या कविता नाहीत.  

ब्लॉगर प्रसाद शिरगावकरांनी मात्र त्यांच्या साधंसोपं.कॉम वर प्रकाशित केलेल्या ’नाच रे चोरा’ या ऑनलाईन विडंबन संग्रहात काही प्रस्थापित लोकप्रिय गाण्यांची चपखल बसणारी विडंबनं सादर करतात. बहुतांशी विडंबनं ही 2002 ते 2004 या काळातली आहेत. विडंबित गीतातही व्यक्तिगत चिखलफेक टाळावी असं ते म्हणतात. हा प्रमाद अत्र्यांकडून माधव ज्यूलियन यांच्याबाबत घडला होता. त्यनंतर त्यंनाच अपराधी वाटले व त्यांनी आपल्या एका कार्यक्रमात माधव ज्यूलियन यांना सन्मानाने बोलावले.  मात्र राखून ठेवलेल्या सीटवर नेमका एका स्न्हेह्यांचा मुलगा येउन बसल्याने आपल्याला जागा नाही हे पाहून ते अधिकच रागावून निघून गेले आणित्यंच्यातली विडंबनकाव्यामुळे निर्माण झालेली दरी तशीच राहिली. 

शिरगावकर म्हणतात, काव्याचा हेतु जर नवनिर्मिती आणि व्यक्तिगत अनुभवाची अभिव्यक्ती हा आहे, तर तोच हेतु विडंबनाचाही असावा. या हेतूने त्यांनी लिहिलेल्या विडंबनगीतांपैकी हे एक . मध्यमवर्गीय दांपत्याच्या संसारातली भातुकली कधीच संपत नाही हे सांगणारं गाणं.

डोंबिवलीच्या चाळीमधली राजा आणिक राणी

डोक्यावरती पंखा नाही नळास नाही पाणी

त्या राणीचा चढतो पारा रोज डबा भरताना

त्या राजाचा उडतो गोंधळ कामाला जाताना

रोज रोजची सुरूच आहे त्यांची अशी कहाणी

डोक्यावरती पंखा नाही नळास नाही पाणी

त्या राजाला कळते आता आपली धडगत नाही

कर्जत लोकल चुकली आता दुसरी लवकर नाही

स्टेशन वरती उरून जाते एक उदास विराणी

डोंबिवलीच्या चाळीमधली राजा आणिक राणी

डोक्यावरती पंखा नाही नळास नाही पाणी

-----------------------

 सखी बैल आला मारका

आता तरी पळशील का? पळशील का? अशा स्वरूपाच्या त्यांच्या गमतीदार रचना आहेत पण प्रतिभेने स्तब्ध व्हावं असा सध्याचा एकमेव विडंबनकार म्हणजे तंबी दुराई या नावाने म.टा मध्ये दीड दमडी हे मिश्कील सदर लिहिणारे श्रीकांत बोजेवार. आपल्या विदर्भात दिग्रस इथे जन्मलेल्या आता मुंबईकर असणार्‍या बोजेवार यांनी संत एकनाथ महाराजांच्या ‘नवरा नको गं बाई, मला दादला नको गं बाई’ या भारुडाला आजच्या राजकीय गोंधळाची दिलेली स्वैर फोडणी ऐकूया.

आरा आरा आरा! 

काय झालं रं मतदारा?

हा कॅन्डिडेट नको गं बाई

मला हा उमेदवार नको गं बाई...

काल फलाणीकडं आज बिस्तानीकडं

परवा काशीबाईकडं, तेरवा मस्तानीकडं

मागचं झाकलं का, पुढचं पडतंय उघडं

या हेकडीच्याचं सगळंच वाकडं तिकडं

याला कुठं धरावा, या  ... ला टोकंच नाही

हा कॅन्डिडेट नको गं बाई

मला हा उमेदवार नको गं बाई... 

काल म्हणं कुणाचं तरी घड्याळ फुटलं

एका काट्यानं दुसऱ्या काट्याला लुटलं

तिसऱ्यानं चवथ्याला शब्दानं पार कुटलं

याच्या घरी झोपलं आन् त्याच्या घरी उठलं

याला कुठं टांगावा, सदऱ्याला भोकंच नाही

हा कॅन्डिडेट नको गं बाई

मला हा उमेदवार नको गं बाई...

कोण कुणाचा कुणाकडे गेला पत्ता नाही

सगळेच बिगरीतले एकालाही यत्ता नाही

जनमनाच्या खुर्चीवर काडीची सत्ता नाही

अन् लोकसेवेची कवडीची माल मत्ता नाही

एका जनार्दनी सांगतो, कुणाला लाजच नाही

हा कॅन्डिडेट नको गं बाई

मला हा उमेदवार नको गं बाई... 

असे विडंबनकार सध्या दुर्मिळ झाले आहेत. मुळात चांगले कवीच दुर्मिळ झाले आहेत. 

स्त्री म्हटली की आक्रोश, वेदना, पाऊस म्हटला की नक्षी पक्षी अशा ठराविक प्रतिमा , त्यांना मिळणारे लाईक्स , या नार्सिसिझममध्ये गुतंतल्याने अभ्यासोनि प्रकटावे हेअपवाद वगळता आता दिसत नाही. 

सोशल मिडियामुळेसाहित्यक्षेत्रातली सुमारांची सद्दी वाढली आहे. आपण ही वाचक म्हणून परिघापलिकडे जाऊन वाचतो का हे स्वत:ला विचारायला हवं आहे. या पार्श्वभूमीवर विडंबन कशाला म्हणू नये हे ही आपल्याला कळावं यासाठी ’एका अनामिकाने ’खोडसाळ’ या नावाने झेंडूच्या फुलांऐवजी ’तेंदूची पाने’ नाव घेऊन मनोगत या वेबसाईटवर एक जबरदस्त उदाहरण दिले आहे. या उदाहरणानेच ’झेंडूच्या फुलांपासून  सुरू केलेला विडंबनकाव्याचा प्रवास तेंदूच्या पानावर आणून आम्ही आतापुरता थांबवणार आहोत.

स्वयंवर झाले सीतेचे या गदिमांच्या रामायणातील गीताची इथे फक्त  चाल वापरली आहे. ते त्याचे विडंबन नाही हे लक्षात घ्या. तर या गीतात खोडसाळ म्हणतात. 

साहित्याशी जडले नाते बोरूघाशाचे

विडंबन झाले कवितेचे॥धृ॥

कविराजांनी धनू उचलिले गझल-रुबायांचे

पूर्ण जाहले विडंबकाच्या हेतू अंतरीचे

उडू लागले शब्दकावळे छचोर काव्याचे ॥१॥

विडंबन झाले कवितेचे॥धृ॥

वक्र टाळकी कसून वाचती काव्य अर्थवाही

नयनांमाजी एकवटुनिया काकदृष्टी पाही

फुलू लागले फूल हळू हळू निजल्या मज्जेचे ॥२॥

विडंबन झाले कवितेचे॥धृ॥

सोकावुनिया जरी विडंबन पाडत तो राही

तडिताघातापरी भयंकर वाद तोंच होई

कविराजांच्या तक्रारीचे, बोल कोपल्याचे ॥३॥

विडंबन झाले कवितेचे॥धृ॥

देवाज्ञेने स्फुरे अम्हाला रोज शब्दक्रीडा

अधिर लेखणी, अधिर तीहुनी डोक्यातिल कीडा

अर्थहीन हे चरण लावती लेबल पद्याचे ॥६॥

विडंबन झाले कवितेचे॥धृ॥

खोडसाळ सांगाल अम्हाला का कविता लिहिता?

कविराजांचे सूर हरवले विडंबने बघता

साहित्याशी कसले नाते तुमचे डोंबलाचे? ॥९॥

विडंबन झाले कवितेचे॥धृ॥