सायबर गुन्हेगारांना आपली माहिती मिळते कुठून ?
जॉर्ज ऑरवेल या प्रसिद्ध लेखकाने ’१९८४’ या पुस्तकातून साम्यवादी सत्तेच्या विळख्यात स्वातंत्र्य आणि समतेची भाबडी स्वप्ने पाहणार्या जनतेला ‘बिग ब्रदर इज वॉचिंग यू’ ही जाणीव करुन दिली होती. आज ’बिग ब्रदर’ची जागा गुगल, अॅमेझॉन, फेसबुकसारख्या बलाढ्य अशा सायबर कंपन्यांनी घेतली आहे. आपण कुठे राहतो, काय करतो, आपल्या कुटुंबात कोण कोण आहेत, आपण काय खातो, काय पितो, कुठे जातो, कोणत्या वस्तू वापरतो, आपल्या आवडीनिवडी काय आहेत, आपण कोणाशी बोलतो, इतकेच नव्हे तर काय बोलतो, इंटरनेटवर काय सर्च करतो हे सगळे या बिग ब्रदर्सना माहित असते. अगदी नवराबायको किंवा घरातली माणसे जितकी एकमेकांना ओळखत नसतील तितक्या या सायबर कंपन्या आपल्याला ’ओळखून’ असतात असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. आपण इंटरनेटरवर जेव्हा ’फ्री’ म्हणून काही वापरत असतो तेव्हा आपण त्याचा असा मोबदला नकळत देत असतो. कोणतेही मोफत अॅप इन्स्टॉल करतेवेळी आपण ’आय अॅग्री’ यावर जेव्हा क्लिक करतो तेव्हा आपण त्या अॅपला आपले फोनबुक, गॅलरी, मोबाईलमधल्या फाईल्स वापरण्याची स्वत:च परवानगी देत असतो. बहुतेक जणांना सोशल मीडियावर व्यक्त व्हायला आवडते, सोशल मीडियाचा उद्देशच तो आहे. पण याचा अतिरेक होऊन आपल्या आयुष्यात खुट्ट जरी वाजले तरी त्यांना ते जगाला ओरडून सांगायचे असते. त्यामुळे ’हॅविंग पिझ्झा विथ अमुकतमुक’ किंवा ’ट्रॅव्हलिंग टू बंगलोर’ अशी पोस्ट टाकून सतत आपले अपडेट जगाला देण्याच्या सवयीतूनही ही माहिती सायबर जगात पोहचत असते. म्हणजे एका अर्थी या नव्या बिग ब्रदरच्या नजरकैदेत आपण स्वखुशीने उडी मारत असतो.
ही सर्व माहिती म्हणजेच ज्याला डेटा असे म्हटले जाते, त्यात दोन गटांना स्वारस्य असते. एक म्हणजे मार्केटिंग कंपन्या, त्यांच्यासाठी आपण केवळ ग्राहक असतो आणि फक्त नफा कमावणे हा त्यांचा उद्देश असतो. दुसरा गट आहे, तो सायबर गुन्हेगारांचा, त्यांना सावज शोधण्यासाठी ह्या माहितीचा उपयोग होतो. मग ह्यावर उपाय काय? हे सगळे वापरायचेच नाही! अर्थातच नाही. कधीतरी अपघात होईल म्हणून जसे आपण प्रवास करणे थांबवत नाही. तसेच इंटरनेट वापरणे आपण थांबवायचे नाही. कारण इंटरनेटविना जगणे म्हणजे प्रगतीच्या वाटा स्वत:हून बंद करणे. इंटरनेटचा वापर अधिकाधिक स्मार्ट पद्धतीने करणे आणि सावधगिरी बाळगणे हाच यावर उपाय आहे.
सायबर गुन्हेगार कोण असतात!
हे अतिशय उच्चशिक्षित असतात, त्यांना हॅकिंगचे उच्च तंत्रज्ञान अवगत असते असे बहुतेकांना वाटते परंतु बरेचदा हे गुन्हेगार जुजबी तांत्रिक ज्ञानाच्या साहाय्याने सावजाला हेरतात आणि लुबाडतात. गुन्हेगारी वृत्ती याच्या मुळाशी असते. झारखंडमधले जमताडा, राजस्थानमधले भरतपूर किंवा दिल्लीजवळचे नोएडा ही सगळी गावे सायबर गुन्हेगारीसाठी कुप्रसिद्ध आहेत. भारतात होणार्या एकूण सायबर गुन्हेगारीमध्ये 98% सायबर गुन्हे हे भारतीयांनीच केलेले असून 96% सायबर गुन्हे पुरुषांनी केलेले असतात. हे सायबर गुन्हेगार आपल्या अवतीभोवती सुद्धा असू शकतात. समाजविघातक वृत्तीचे लोक, व्यवसायातील स्पर्धक, काढून टाकल्यामुळे राग किंवा डूख धरलेले माजी कर्मचारी, कुतूहल किंवा गंमत म्हणून हॅंकिंग करून पाहणारे विद्यार्थी, प्रेमप्रकरणातून किंवा दुखावले गेल्याने सूड उगवण्यासाठी देखील गुन्हेगारी मनोवृत्तीचे लोक असे गुन्हे करत असतात. मुखवटे धारण करणे आभासी जगात अतिशय सोपे असल्याने गुन्हेगारांचे फावते.
सायबर गुन्हेगारीचे आर्थिक फसवणुकीपलिकडे कोणते प्रकार असतात!
लव्हबग 2000 किंवा वॉनाक्राय 2017 असे सायबर अॅटॅकस् (रॅनसम वेअर) जगभर गाजले आहेत. मोठमोठ्या वित्तसंस्था, कॉर्पोरेट्सची गोपनीय माहिती एन्क्रिप्ट करुन/ चोरुन ती डिक्रिप्ट करण्याच्या बदल्यात बिटकॉईनसारख्या डिजिटल चलनात खंडणी वसूल करणे असे या गुन्ह्यांचे स्वरूप असते. हॉलीवूडच्या सिनेमातून आपण याची झलक पाहतो मात्र इथे आपण सर्वसामान्यांना भेडसावणार्या सायबर धोक्याबद्दल बोलत आहोत. असे गुन्हे मुख्यत: तीन प्रकारचे असतात. १) आर्थिक लुबाडणूक जी हॅकिंग किंवा फिशिंगद्वारे केली जाते. २) मानसिक छळ, जो ट्रोलिंग किंवा सायबर बुलिंगद्वारा केला जातो. आणि ३) लैंगिक शोषण, जे फोटो मार्फिंग किंवा वैयक्तिक माहिती चोरून ब्लॅकमेलिंग पद्धतीने केले जाते. अगदी ड्रग रॅकेटमध्ये ओढण्यात त्याचे पर्यावसान होऊ शकते.
सायबर धोके टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यायला हवी!
दुसर्याच्या मोबाईल किंवा संगणकावरून सोशल मीडिया किंवा बँक अकाउंट वापरणे टाळायला हवे आणि वापरलेच तर ताबडतोब लॉग आऊट करावे. कुणीही सहज ओळखेल असा पासवर्ड नसावा. साधारणत: बायकांना आपल्या नवर्याचे किंवा मुलांची नावे पासवर्ड म्हणून वापरण्याची हौस असते. पुरुष बरेचदा त्यांच्या आवडत्या स्त्रीचे नाव वापरतात. त्यांना ओळखणार्या व्यक्ती किंवा हॅकर्स ते गेस करू शकतात आणि तुमचे अकाउंट भलत्याच व्यक्तीच्या ताब्यात जाते. याला हॅकिंग म्हणतात. बहुतेक लोक आपल्या पोस्टचे सेटिंग कायम पब्लिक ठेवतात. गुन्हेगार त्याचा वापर करून प्रोफाईल व इतर फोटो कॉपी करून त्यासारखेच दिसणारे डुप्लिकेट अकाउंट तयार करतात. याला क्लोनिंग म्हणतात. मूळ अकाउंटवरील मित्रांची नावे पाहून त्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात. मग त्यांना ’मी अपघातात सापडलो आहे, मला मदत करा’ यास्वरुपाचे खोटे मेसेज पाठवले जातात. जेव्हा कुणी पैशाची मागणी करत असतो तेव्हा आपले कान टवकारलेच गेले पाहिजेत. अशा वेळी शहानिशा केल्याशिवाय कोणतेही व्यवहार केले जाऊ नयेत.
लैंगिक शोषण करणारे गुन्हेगार फोटो मॉर्फिंगचा वापर करतात. परंतु मुळात त्यांना हे फोटो उपलब्ध कसे होतात? बहुतेक महिला किंवा मुली आपल्या फोटोंचे प्रोफाईल सेटिंग हे पब्लिक राहू देतात. त्यामुळे ते कुणीही डाऊनलोड करू शकतो. त्याचा दुरुपयोग करू शकतो. खात्री न करता स्वीकारलेली फ्रेंड रिक्वेस्ट अनेकदा गुन्ह्याचे मूळ ठरते.
सुशिक्षित लोक सायबर गुन्ह्यांना कसे बळी पडतात!
सायबर गुन्हेगार सावजाच्या मानसिक स्थितीचा व्यवस्थित अभ्यास करतात. 11 ते17 वर्षे या वयोगटातल्या मुला-मुलींना इंस्टाग्राम किंवा डेटिंग अॅप्सवर, तरुण मुलींना साधारणत: विवाह नोंदणी स्थळांच्या वेबसाईटवर तर मध्यमवयीन महिला तसेच पुरुषांनासुद्धा फेसबुकच्या माध्यमातून फेक मित्र बनून जाळ्यात ओढले जाते. सोशल मिडीयावर महिलांशी संवाद साधताना त्यांच्या संवेदनशीलतेचा, मानसिक अवस्थेचा गैरफायदा घेतला जातो. हार्मोनल त्रासामुळे किंवा आयुष्यातल्या ताणतणावांमुळे कुणी आपल्याशी थोडेसे सहानुभूतीने बोलले किंवा प्रशंसा केली की नकळत त्या मोकळेपणाने बोलू लागतात. विश्वास संपादन केल्यावर हे संभाषण पुढे अत्यंत खाजगी स्तरावर नेले जाते. कालांतराने ही माहिती उघड करण्याची धमकी देऊन लैंगिक शोषण केले जाते तर कधी परदेशातून भेटवस्तू पाठवल्याचे सांगून ती सोडवून घेण्यासाठी महिलेला वेगवेगळ्या खात्यांमध्ये रकमा भरायला सांगितल्या जातात. विवाहविषयक वेबसाईटवर आपण उच्चशिक्षित सुस्थापित एनआरआय आहोत असे भासवून आधी लग्न ठरवणे आणि गोड बोलून पैशाची मागणी करणे असे प्रकार अनेकदा घडतात. पुरुषांनाही महिलांच्या नावाने मित्र विनंती पाठवून लुबाडले गेल्याच्या अनेक घटना घडत असतात. मध्यमवयीन लोक फारसे तंत्रस्नेही नसतात, त्यांना मुलाचा मित्र वगैरे असल्याचे सांगून गोंधळात टाकून घाईने पासवर्ड किंवा ओटीपी विचारला जातो. त्यामुळे सायबर जगात वावरताना आपला मेंदू हा सतत सजग राहिला पाहिेजे.
‘फ्री’ ह्या शब्दाबद्दल असलेले आकर्षण हे आर्थिक फसवणूक होण्यामागचे अत्यंत महत्त्वाचे कारण आहे. फ्री भेटवस्तू घ्यायला कोणत्याही लिंकवर जाणे, फ्री वायफाय वापरणे टाळायला हवे. वेबसाईटवर आर्थिक व्यवहार करताना वेबसाईटच्या नावाआधी https/लॉकची खूण बघायला हवी. आपण एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो तर मेन्यूकार्डवरचे सगळे पदार्थ आपण खात नाही. आवडेल तेवढेच निवडतो. दुर्दैवाने इंटरनेट किंवा सोशल मीडियावरती आपण अशी निवड करत नाही. केवळ क्षणिक आनंदासाठी 80 व्या वर्षी आपण कसे दिसू, किंवा मागच्या जन्मी आपण कोण होतो अशी तथ्यहीन माहिती देणारे अॅप त्याचे रेटिंग न पाहता इन्स्टॉल करून घेऊन सायबर धोक्याची पातळी आपण स्वत:च वाढवत असतो. अँटिव्हायरस सारख्या सुरक्षेच्या उपायांवर खर्च करायला बरेच जण तयार नसतात, याकडे गांभीर्याने पाहायला हवे.
डार्क वेब आणि सायबर अंडरवर्ल्ड
हिमनगाचा जेमतेम 1/3 भाग आपल्याला पाण्याच्या वर दिसतो. तसेच आपण वापरतो, वावरतो ते सरफेस वेब हे फक्त 4% आहे. इंटरनेटचा उरलेला 96% भाग म्हणजे डीप वेब. इथपर्यंत सर्च इंजिन पोहोचू शकत नाही. या डीपवेबच्या अगदी तळाशी आहे सायबर जगाचे अंडरवर्ल्ड म्हणजेच डार्क वेब. पूर्वी जगाचे राजकारण किंवा समाजकारण हे तेलाभोवती केंद्रित असायचे. जगात जी काही युद्धे होतात ती बरेचदा ’तेल’ ह्या प्रश्नामुळे निर्माण झालेली असतात. आता जगाचे जे काही राजकारण, समाजकारण आहे ते डेटाभोवती गुंफलेले आहे. येत्या काळातील युद्ध ही सायबर वॉर असतील आणि ती या डार्कवेबच्या माध्यमातून होतील, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
पुढच्या जगाचे जाऊ द्या, सायबर वापरकर्ता म्हणून विचार केला तर आपल्याला विशेष महत्त्वाची न वाटणारी आपली माहिती या वेब अंडरवर्ल्डमध्ये प्रचंड किंमतीला विकली जाते. म्हणजे आपले नाव, गाव, पत्ता, आधारकार्ड, पॅननंबर अशी माहिती 10 ते 20 रुपयाला. आपल्या डेबिट/क्रेडिट कार्डचा नंबर आणि नाव सुमारे 200 रुपयांना. कार्डची एक्स्पायरी डेटसारखी माहिती अजून जास्त किमतीला तर पासपोर्टसारखे दस्तावेज तब्बल 10000-15000 रुपये प्रति व्यक्ती विकले जातात. हे दर गरजेनुसार वाढत जातात. इंटरनॅशनल शॉपिंग वेबसाईटवरती बर्याचदा ओटीपी विचारला जात नाही, अशा ठिकाणी या माहितीचा गैरवापर केला जातो. सावधगिरी म्हणून इंटरनॅशनल कार्डवर स्पेंडिंग मर्यादा कमीत कमी ठेवणे, इंटरनॅशनल व्यवहाराचे सेटिंग एरवी ऑफ ठेवणे एवढे मात्र आपण नक्की करु शकतो.
‘डिपफेक’- सायबर जगातला एक नवा, भयावह धोका
यूट्युबवर बीबीसाचा ओबामांवरील एक व्हिडिओ आहे. यात ओबामा आपल्याशी संवाद साधताना दिसतात. व्हिडिओत शेवटी सांगण्यात येते की तुम्ही ज्यांचे बोलणे ऐकले त्यांची देहबोली, त्यांची बोलण्याची लकब, त्यांचा आवाज, त्यांचा चेहरा जरी ओबामांसारखा असला तरी ते ’सिंथेटिक’ ओबामा होते. युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनच्या संशोधकांनी विविध व्हिडिओंमधून ओबामांचे चौदा तासांचे फुटेज घेऊन त्याच्यातून ओबामांची उच्चार करण्याची पद्धत, त्यांचे हावभाव, आवाज ह्याचे नमुने घेऊन व्हर्च्युअल रिअॅलिटीच्या मदतीने हे सिंथेटिक ओबामा तयार केलेत. थोडक्यात याचिं देही याचिं डोळा पाहिलेला व्हिडिओही खोटा, नकली असू शकतो. वलयांकित प्रसिद्ध व्यक्तींच्या विरोधात या तंत्राचा येत्या काळात मोठ्या प्रमाणात वापर होणार असल्याची शक्यता असल्याने संशोधकांनी त्याबाबत सावध करण्यासाठी या व्हिडिओची निर्मिती केली आहे. व्हिडिओतील व्यक्ती खरी की सिंथेटिक हे ओळखण्याचे सध्यातरी केवळ ब्लिंक आय टेक्नॉलॉजी हे एकच तंत्रज्ञान आहे आणि तेही हा फरक अद्याप शंभर टक्के अचूकतेने शोधू शकलेले नाही. फोटो मॉर्फिंगची ही पुढची पायरी आहे. फोटो मॉर्फिंगमध्ये बरेचदा एका व्यक्तीचे अर्धनग्न शरीर आणि दुसर्या व्यक्तीचा चेहरा मर्ज केला जातो. या बाबतीत रिव्हर्स इमेज चेकिंगचा वापर करून फोटो बनावट असल्याचे ओळखता येऊ शकते पण डिपफेक मध्ये हे मिक्सिंग अतिशय बेमालूमपणे केले जाते.
सायबर गुन्हेगारांनी ह्या डिपफेकचा वापर कोविड काळात केल्याची नोंद आहे. काही जवळच्या व्यक्तींचे आवाज आपण अगदी झोपेतही ओळखू शकतो. न्यूयॉर्क टाईम्समधील एका बातमीनुसार सीइओच्या आवाजात कंपनीच्या एका महत्वाच्या अधिकार्याला फोन करण्यात आला आणि प्रचंड मोठे आर्थिक व्यवहार करायला सांगण्यात आले. बोलणार्या व्यक्तीचा आवाज, शैली अत्यंत परिचयाची असल्याने संशयाला जागा नव्हती, व्यवहार केले गेले आणि नंतर ’तो मी नव्हेच’ हे सीइओ ने स्पष्ट केल्यावर फसवणूक झाल्याचे संबंधितांच्या लक्षात आले. आजवर लांब कुठेतरी घडणारे हे गुन्हे आपण ग्लोबल खेड्याचा भाग असल्याने आपल्याही उंबरठ्याशी येऊन पोचले आहेत. याची नोंद आपण वेळीच घेणे निकडीचे आहे.
सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तींमधला संघर्ष अनादि काळापासूनचा आहे. सायबर जग त्याला अपवाद नाही. इथले गुन्ह्यांचे प्रकार आणि सावज हेरण्याच्या क्लृप्त्या तंत्रज्ञानाइतक्याच वेगाने वाढत आणि बदलत जाणार आहेत. आपण स्वत:ला सुजाण आणि जबाबदार नागरिक समजत असू तर डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार व्हायला आपले सायबर साक्षर असणे पुरेसे नाही. सायबरधोक्यांबाबत सावध असणे तितकेच महत्वाचे आहे. विवेकी मन, तर्कशुद्ध विचार करणारा चाणाक्ष मेंदू आणि या दोहोंच्या ताब्यात असलेले प्रत्यक्ष क्लिक करणारे मनगट या त्रयीवरच सायबर जगातला आपला निर्धोक आणि आत्मविश्वासपूर्ण वावर अवलंबून आहे.


