भारतीय एकतर्फी गंगाजमनी तहजीब सांभाळत आले आहेत. इतक्यातलं उदाहरण म्हणजे तबलापटू झाकीर हुसैन यांना अवघ्या भारताने भावनाविवश होऊन श्रद्धांजली वाहिली. पाकिस्तानने मात्र एखाद्या गैरमुस्लीम भारतीयावर असं भरभरून प्रेम केल्याचं आठवत नाही. पाकिस्तानने भारताला कायम छळलं आहे, युद्ध लादलं आहे, कुरापती तर चालूच आहेत. कलेला जात, धर्म नसला तरी काचणारे संबंध वेळीच संपवावे लागतात हे लक्षात घेऊन भारताने आपले दरवाजे पाकिस्तानी कलाकारांसाठी बंद केले आहेत.Wednesday, October 30, 2024
पाकिस्तानी मालिकांमध्ये असं आहे तरी काय !
भारतीय एकतर्फी गंगाजमनी तहजीब सांभाळत आले आहेत. इतक्यातलं उदाहरण म्हणजे तबलापटू झाकीर हुसैन यांना अवघ्या भारताने भावनाविवश होऊन श्रद्धांजली वाहिली. पाकिस्तानने मात्र एखाद्या गैरमुस्लीम भारतीयावर असं भरभरून प्रेम केल्याचं आठवत नाही. पाकिस्तानने भारताला कायम छळलं आहे, युद्ध लादलं आहे, कुरापती तर चालूच आहेत. कलेला जात, धर्म नसला तरी काचणारे संबंध वेळीच संपवावे लागतात हे लक्षात घेऊन भारताने आपले दरवाजे पाकिस्तानी कलाकारांसाठी बंद केले आहेत.Thursday, August 15, 2024
गाव कारागीर
’खेडय़ास देव निर्मि, नगरास निर्मि मनुज’ - शहर आणि गावे यांच्यातला फरक आचार्य विनोबा भावे यांनी अशा नेमक्या शब्दात सांगितला आहे. याच्या गर्भितार्थाकडे पाहिले तर खेड्यातील एकेकाळची नैसर्गिक, परस्परावलंबी जीवनशैली आणि शहरातील कृत्रिम, यंत्राधारित जीवनशैली यातला फरक स्पष्ट होईल. बलुतेदारी हा खेड्यातील अर्थव्यवस्थेचा व बर्याच अंशी स्वयंपूर्णतेचा कणा होता. कृषीसंस्कृतीच्या आसावरचे वेगवेगळे गाव-कारागीर म्हणजे खरे तर व्यावसायिक होते. दुर्दैवाने त्यातून जाती निर्माण झाल्या. समाजात भिनत गेलेला जातीभेद आणि बदलत्या काळाशी जुळवून घ्यायला आवश्यक असलेल्या सक्षमतेचा अभाव यामुळे बलुतेदारीला घरघर लागली.
या पार्श्वभूमीवर गाव-कारागीरांची सद्यस्थिती, कामाचे स्वरुप, परंपरा, कालच्या-आजच्या पिढ्यांमधील विचारांचा फरक असे विविध कंगोरे घेऊन आकाराला आलेले मह्त्वाचे पुस्तक म्हणजे सीमा शेटे-रोठे लिखित ’गाव कारागीर’. कुंभार, चांभार, लोहार, सोनार, सूप -टोपल्या तयार करणारे बुरुड , सुतार, कातडं कमावून वाद्य तयार करणारे, रंगारी, धोबी, नाभिक, पाथरवट आणि कासार हे ते कारागीर.
लेखिकेचा लहान वयापासून ग्रामीण व कृषीसंस्कृतीशी निकटचा संबंध असल्याने या पुस्तकाला एखाद्या रुक्ष वृत्तपटाचे स्वरुप न येता आस्थेचे अस्तर लाभले आहे. गाव- कारागीरांशी नागरी व्यक्तीचा थेट संबंध फारसा येत नाही. घरी मंगलकार्य ठरल्यास त्यासाठी लागणार्या सुपापासून जोडयांपर्यंत आणि ब्रँडेड दागिन्यांपासून आधुनिक फर्निचरपर्यंत सगळे काही ऑनलाईन विकत घेणार्यांचा तर नाहीच नाही. अशा मंडळींना अज्ञात असलेल्या एका श्रमिक जगताचा या पुस्तकाच्या माध्यमातून लेखिकेने सहजपणे वेध घेतला आहे. प्रत्येक कारागीरीवर एक स्वतंत्र लेख असल्याने जिज्ञासू वाचकाला बरीच नवीन माहिती त्यातून मिळू शकेल. यातील काही लेखांमध्ये शेवटी केलेली टिप्पणी अंतर्मुख करते. या मिडिया वॉच’ प्रकाशित पुस्तकाला डॉ. श्रीकांत तिडके यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली आहे. गजानन घोंगडे यांचे सूचक मुखपृष्ठ वाचकाला आशयापर्यंत पोचवण्याचे लेखिकेचे काम सोपे करते.
आकाशवाणीवर उद्घोषिका म्हणून काम केल्याचा तसेच विविध प्रकारच्या लेखनाचा अनुभव सीमा शेटे- रोठे यांच्या गाठीशी असल्याने पुस्तक संवादी व प्रभावी झाले आहे. ग्रामीण किंवा निमशहरी जीवनाबद्द्ल बर्याच शहरी मंडळींच्या हिरव्या- हळव्या- स्वप्नाळू कल्पना असतात. लेखिकेने रेखाटलेले कारागीरांचे शब्द- जीवन चित्र भाबडे, काव्यमय, काल्पनिक किंवा केवळ स्वत:च्या आकलनापुरते मर्यादित नाही. ते कारागीरांच्या थेट मुलाखतीच्या स्वरुपात म्हणजे ’फ्रॉम द हॉर्सेस माऊथ’ असल्याने वास्तवतेच्या पायावर उभे आहे. हे या पुस्तकाचे बलस्थान आहे.
’ग्रामोद्धारा’चा विचार मांडताना विनोबांनी एक वस्तुनिष्ठ प्रश्न मांडला होता. तो म्हणजे -खेड्य़ातली लक्ष्मी जाते कुठे! ते म्हणत, " त्या वाटा बंद करा म्हणजे ती खेडयात राहील. ती बाहेर जाते ते या ५ मार्गांनी - बाजार, लग्न व्यवहार, सावकार, सरकार आणि व्यसने. मीठ मसाले रॉकेल सारख्या दोन चार गोष्टी सोडल्या तर सारे काही गावात तयार करता आले पाहिजे. परस्पर व्यवहार सुरू झाला तर ’महाग’ हा शब्द ही हद्दपार होईल." या संकल्पनेची व्यवहार्यता कदाचित अर्थतज्ज्ञच सांगू शकतील परंतु या ५ कारणांचा कारागीरांच्या जीवनावर काय परिणाम झाला आहे याचे दाखले या पुस्तकातील लेखांमध्ये ठायी ठायी विखुरले आहेत.
’पांढरीवर घर नाही आणि काळीवर वावर नाही’ म्हणजेच हक्काचे घर किंवा जमीन नाही, अशा शब्दातून या कारागीरांचा सल लेखिका उघड करते. ’छिलताना हाताले लागते. बिबा लावायचा बस्स. दवाखाने आम्हाला परवडत नाही, पैसाबी नाही’ म्हणणारा बुरुड समाजाचा कारागीर यात आहे. सोनार, लोहार, सुतार, तांबट आणि शिल्पकार ही विश्वकर्म्याची पाच मुले आहेत, असा उल्लेख विश्वकर्मा ग्रंथात असल्याची मान्यता पाथरवट समाजात आहे. ’शासनाच्या योजना काही असतील तर त्या आम्हाले माहित नाही’ ही या विश्वकर्म्त्याच्या लेकराची व्यथा आहे. त्याचे स्वत:चे लेकरु "दोन दोन किमी चालत शाळेला जाते, एकटं हायवेने जाते, ते घरी येईपर्यंत जीव धाकधुक करते" म्हणणार्या पाथरवट कारागीराची तगमगही या पुस्तकात व्यक्त होते.
अशा रखरखीत परिस्थितीतही हे कारागीर आपल्या जीवावर सावली धरू शकतात ते प्रथा-परंपरा-रिवाजांच्या आधाराने. त्यातूनच विश्वकर्मापूजन करुन कामाला लागण्याची कुंभारांची प्रथा या पुस्तकातून माहित होते. चर्मकार समाजात हुंडा दिला घेतला जात नाही, उलट नवरीला देता येईल तितकं देण्याचा प्रयत्न सासरची मंडळी करतात हे वाचून नवल वाटतं. लोहार समाजात तर म्हणे वधूला मोरपीस देऊन ’अशा सुंदर सुंदर जागी मी तुला घेऊन जाईन’ असे वचन वर देत असतो. समाजाची खूण म्हणून जन्मानंतर २१ व्या दिवशी बाळाच्या पाठीवर लोखंडाच्या छडीचा डाग देण्याची अजब प्रथाही काही लोहार पाळतात. गावात काही कार्य असले की ’चुलीला’ म्हणजे घरातील सर्वांना आमंत्रण देण्याची जबाबदारी नाभिकाची असे हे बहुतेकांना माहित असते. पूर्वी कोकणात घरोघरच्या कर्त्या पुरुषाला ओवाळणं हा कोकणातील परीट स्त्रियांचा मान असे तर विदर्भात लग्नकार्यात कंकण बांधण्याचा. बलुतेदारीने अशी व्यवहाराच्या पलीकडे जाऊन घातलेली नातेसंबंधांची आगळीवेगळी वीण या पुस्तकातून कळते तसेच ती विसविशीत होत चालल्याची कारागीरांना वाटणारी खंतही.
कारागीरांच्या कामाशी संबंधित असलेले पण आपल्या नेहमीच्या बोलण्यातून अस्तंगत होत चाललेले कितीतरी शब्द या पुस्तकातून नव्याने भेटतात. उदाहरण द्यायचे तर लाकडी चाकाला आतून लोखंडी वाट आवश्यक असते. अरे हो, तिला ’धाव’ म्हणतात हे लोहारांविषयी वाचताना लक्षात येते. त्यांच्याशी संबंधित भट्टी, ऐरण, भाता, जंतरपट्टी , पकड यांसारखे शब्द किंवा चर्मकाराची रापी, आरी, सस्ती यासारखी आयुधं, बुरुडकामातून तयार होणारी रोजच्या वापरातली दवडी, लक्ष्मीपूजनाला मानाचा समजला जणारा फडा अशा कितीतरी शब्दांची लेखिकेने पुनर्भेट घडवली आहे. प्रत्येक कारागीर समाजात एक आराध्यदैवत असते. मग ते सोनार समाजाचे नरहरी सोनार असतील किंवा नाभिकांचे सेना महाराज. विहित कर्माची सांगड आध्यात्माशी घालणारा सेना महाराजांचा साधासा अभंगही या पुस्तकात अवचित भेटतो.
आपल्या वाडवडिलांकडून आलेला कलेचा, कृतीपद्धतीचा वारसा सांभाळताना तर दुसरीकडे नवनव्या आव्हानांना सामोरे जाताना होणारी गाव-कारागीरांची परवड संवेदनशील वाचकाला या पुस्तकाच्या माध्यमातून एका वेगळ्या जगाचे दर्शन घडवते. बलुतेदारीच्या काही अज्ञात पैलूंचे दर्शन होते. जेवताना पानात काही टाकले तर त्यामुळे शेतकर्याच्या बैलापासून पाकसिद्धी करणार्या आईपर्यंत अनेकांची मेहनत आपण बुडवतो आहोत असा त्याचा अर्थ होतो, असे विनोबा का म्हणत त्याचा आपसूक खुलासा होतो. या दिवाळीत पणत्या, केरसुणी (फडा), सुपली इ. वस्तू रापलेल्या हातांकडून विकत घेताना हे पुस्तक आठवेल आणि घासाघीस करावीशी वाटणार नाही हे निश्चित.
Friday, August 9, 2024
वाचन -आनंदसोहळा
चला, जरा आपल्या व्यक्तिमत्वाचा किनई विकास करूया, असं म्हणून कुणी वाचत नसतं. अपवाद म्हणून सुद्धा तशा उद्देशाने कुणी वाचत असेल तर तो सफल होणे नाही. तरीही तुमच्या आयुष्य़ातला टर्निंग पॉईंट कोणता असं कुणी विचारलं तर मी म्हणेन ’पुस्तक’ माझ्या अयुष्य़ात आलं तो. चांगली पुस्तक तुम्हाला सुखासुखी लाभत नाहीत, पण लाभली तर आपलं आयुष्य बदलू शकतं. म्हणजे अगदी काही भव्यदिव्य घडलं नाही तरी ते मस्त होतं.
मी पहिलं मोठठं पुस्तक वाचलं ते मॅक्झीम गॉर्कीच ’आई’, तेव्हा सहावी सातवीत असेन, बरचसं कळलं नाही पण एका वेगळ्याच रशियन पार्श्वभूमीच्या जगाची ओळख झाली आणि पुस्तकांशी मैत्र जुळलं ते कायमचं. मग नवे शब्द मनात रूंजी घालायला लागले. कवी लेखकांच्या प्रतिभेने थक्क व्हायला लागले. त्या वयात मला अतिशय अद्भुत वाटलेलं एक वाक्य आजही आठवतं, बहुधा ह.ना.आपट्यांच असावं. "चंद्र सूर्य यांच्या झांजा वाजवत काळ वेगाने पुढे सरकत होता" किती सुंदर प्रतिमा, चंद्र सूर्याच्या गोलाकाराला झांजेची उपमा, झांजेच्या दोन पाखी एकमेकाला चाटून जातात निनाद करतात, तसा दिवस आणि रात्रीचा सुरेल संबंध, जगाचं पुढे जाणं ..हे सगळं फक्त एका वाक्यात किती कौशल्याने गुंफता येतं. त्या वाक्यावर खिळून राहिल्याचं आठवतं. असं वाचता वाचता "हा मुग्ध सोहळा हिरवा, मौनाला अंकुर फुटले...." अशी आपली गत होते. कवयित्री अरूणा ढेरे या सृजनशीलतेची अचूक व्याख्या करतात. कवी किंवा लेखक आपल्या संजीवक प्रतिभेतून शब्दांवर अर्थाचं पाणी शिंपडून त्याला जिवंत करतात, हेच खरं सृजन. आपलं मन मोकळं करण्यासाठी आपल्याला नेमक्या शब्दांची आणि आंतरिक उर्मीची खूप गरज असते! या दोन्ही गोष्टी वाचनाने साध्य होतात. वाचन आणि रसग्रहण याचा अनुभव "अणूहुनिया तोकडा, तुका आकाशाएवढा ॥" असा असतो.
जिव्होर्दानो ब्रुनो या विचारवंतांनी असं म्हटलंय की सुरुवातीचे वाचन हे बुशकोटाच्या पहिल्या बटणासारखे आहे. ते लावायला चुकले तर सगळा बुशकोटच वेडावाकडा दिसू लागतो. सुरुवातीला चुकीच्या सवयी लागल्या तर पुढचे सगळे वाचन आणि ज्ञानार्जन वेडेवाकडे होते. इथे पुलंचा अविस्मरणीय सखाराम गटणे आठवतो. जगणं आणि वाचणं याचा सुतराम संबंध नसेल तर गटणे सारखं भाबडं वाचन म्हणजे पुलंच्या भाषेत जीवनाच्या प्रवाहात अडकलेला साहित्याचा बोळा. आपली वाचनाची दिशा योग्य आहे की नाही हे एकदा समजून घेतलं तर आपली स्वयंनिर्णयाची शक्ती वाढून नवनव्या आशयाच्या आणि अभिव्यक्तीच्या वाङ्मयीन प्रयोगाला (बापरे!) आपण सामोरे जाऊ शकतो. पण मग उत्तम साहित्याची निवड करायची तरी कशी? याचं उत्तर नाटककार विजय तेंडुलकर देतात. आयुष्याबदलची आपली समजूत जे वाढवतं ते उत्तम साहित्य अशी नेमकी व्याख्या ते करतात. साहित्य एनरिचिंग असायला हवं. पहिल्या दोन-चार पानात ते जोखता येतं.
बर्याच यशस्वी व्यक्तींमागे एखादं पुस्तक असतं. धीरूभाई अंबानी म्हणतात मी पुस्तके वाचली म्हणून माझे क्षितीज विस्तारले, मी मोठी स्वप्ने पाहू लागलो, मोठा विचार करू लागलो आणि म्हणून मी मोठा झालो. मायक्रोसोऑफ्टचे बिल गेट्स शाळेतून मधेच बाहेर पडलेले पण वाचन सोडले नाही, त्यांचे ’द रोड अहेड’ हे पुस्तक त्यांच्या प्रवासाची साक्ष देतं. विप्रोचे अझीम प्रेमजी म्हणतात नेतृत्व गुण वाढत राहण्यासाठी आणि आत्मचिंतनासाठी मी प्रवासात कायम वाचन करतो. अमिताभ बच्चनच्या अतिशय प्रभावी व्यक्तिमत्वाला उत्तम वाचनाचा भक्कम पाया आहे. हे तर सगळे सेलेब्रिटीज आहेत. अनेक चळवळीतील कार्यकर्ते मग ते समाजवादी असोत, संघाचे असोत, अंनिस चे असोत, कोणत्याही विचारधारेचे असोत पण त्यांच्यात एक समान धागा असतो, बहुतेक कार्यकर्ते म्हणतात वाचन माझा सोबती आहे. ते नसतं तर अशा काही वेळा होत्या, जेव्हा आम्ही जगावं की नाही, कशासाठी जगावं या द्वंद्वात होतो तेव्हा आमच्या जगण्याच्या अंधारवाटा या वाचनानं प्रकाशमान केल्यात. त्या सर्व ग्रंथांबद्दल, पुस्तकांबद्दल आम्ही कृतज्ञच रहायला पाहिजे. बहुसंख्य यशस्वी व्यक्तींच्या आयुष्यात पुस्तकांची भूमिका मह्त्त्वाची असली तरी वाचन हे जीवनात यशस्वी होण्याचा हेतू समोर ठेवून करायची गरज नसते. यश हे दर्जेदार वाचनाचं बायप्रॉडक्ट आहे.
प्रेरणादायी पुस्तकं काय करू शकतात याचं एक उदाहरण म्हणजे लक्ष्मण गोळे. वयाच्या १६व्या वर्षी याने भांडणातून एकावर वस्त-याने वार केला, केस झाली, तो तुरुंगात गेला, घरच्यांनी त्याच्याबरोबरचे संबंध तोडले. इतर लहान सहान गुन्हे नावावर होतेच. नाशिकमधील तुरुंगात असताना 'माझे सत्याचे प्रयोग' हे महात्मा गांधींचं आत्मचरित्र त्याच्या वाचनात आलं. गांधींजींनीदेखील आयुष्यात चुका केल्या होत्या, मात्र त्यांनी त्या मोकळेपणी कबूल केल्या, हे त्याला त्यातून जाणवलं आणि त्यानेदेखील न्यायाधीशांना पत्र लिहून आपले गुन्हे कबूल केले. चांगल्या वर्तणूकीमुळे त्याला शिक्षेत सूट देण्यात आली. जेलमधून सुटल्यानंतर त्याने पूर्वी ज्या ज्या लोकांना त्रास दिला होता, त्या सर्वांची पत्र लिहून माफी मागितली. लहानमोठ्या नोकर्या केल्यावर आज तो मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून काम करतोय. त्याने लग्न केलं. मुलगी झाली. ही बातमी मटामअध्ये वाचल्याचं मला स्मरतंय. एकूण व्यक्तीला आमूलाग्र बदलवण्याचं सामर्थ्य पुस्तकांमधे आहे.
माझे नेटवर्किंगचे विद्यार्थी म्हणत की आम्ही आपल्या क्षेत्रातलं वाचलं की पुरे ना, हे अवांतर बिवांतर वाचन हवंच कशाला? परंतु उत्तम करियर साठी तुमच्याकडे वैश्विक नजर व्हावी. शाम मनोहर या उत्सुकतेने झोपणार्या लेखकाचं लेखन फारसं झेपलं नसलं तरी त्यांचा ’वर्ल्ड व्ह्यू’ हा शब्द मला फार आवडतो. ही नजर पुस्तकच आपल्याला देतात. ज्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांमधे करियर करायचं आहे त्यांनी तर वेगवेगळ्या भाषांमधलं ,इंग्रजीतलं वाचन देखील वाढवायला हवं. पुस्तकांच्या साथीने चढलेल्या पायर्या मानसिक समृद्धीबरोबरच आर्थिक समृद्धीलाही जाऊन भिडतात. परंतु आजच्या मार्क्सवादी पिढीला हे पटवणं सोपं नाहीये. जागतिकीकरणाच्या लाटेनं आजच्या पिढीला या संतसाहित्यापासून दूर नेलं आहे. आपण कसे दिसतो त्याचा म्हणजे बहिरंगाचा विचार ही पिढी जास्त करते. सेलेब्रिटींचा आपल्यावर इतका प्रभाव आहे की स्वतःकडे पाहायचं ते इतरांच्याच डोळ्यांनी! त्यांना आपण कसे दिसतो ते महत्त्वाचं. आपण कधी आपल्या आत डोकावून पाहायचंच नाही. इथेच पुस्तकं मदतीला येतात. पुस्तकं आपल्याला जमिनीवर ठेवतात. हा दिखाऊपणा, उथळपणा आपण मुलांच्या माथी तर मारत नाही आहोत हे समजून घेण्यासाठी आधी आपण आतून विकसित व्हायला हवं. त्यासाठी वेगवेगळ्या विचारधारांबद्दल आपलं वाचन उत्तम असायला हवं. ललित साहित्य आयुष्याला पंख देतं तर वैचारिक साहित्य त्याला वास्तवाच्या जमिनीवर परत आणतं. ललित वाचक पटकन दुसर्याची बाजू समजून घेऊ शकतो. कारण वाचताना त्याला प्रत्येक पात्राची बाजू समजून घ्यायची सवय लागलेली असते. त्याला सहवेदना पटकन जाणवतात. एखादी कलाकृती वाचता-वाचता तो आतून बदलून गेलेला असतो. वैचारिक वाचनाच्या बाबतीत मी असं म्हणेन त्यातून व्यक्तिमत्वात ठामपणा येतो, प्रगल्भता येते.
होरे ल्रुई बोऱ्हेसची एक कथा आहे. ‘बुक ऑफ सॅण्ड’ नावाच्या या कथेत लेखकाला दुर्मीळ बायबल मिळतं. त्या पुस्तकाला अनेक पानं असतात. त्याचं शेवटचं पान कधीच येत नाही. म्हणजे त्यातला ज्ञानाचा झरा कधीच आटत नाही. माझी मावशी अवांतर वाचन करतेच पण धार्मिक ग्रंथांचं पारायण करत असते.. मी तिला म्हणायचे की तेच ते वाचण्यापेक्षा त्या वेळात तू इतर काही उत्पादक काम का करत नाहीस, दुसरं काही का वाचत का नाहीस. तीच ज्ञानेश्वरी, दासबोध, रामायण, गीता तू कितीवेळा वाचशील आता. तिच्याशी बोललयानंतर नीटच कळलं की प्रत्येक वाचनात आकलनाचं नवं दार उघडलं जाण्याच्या शक्यता असतात. त्यातल्या नवनव्या मार्मिक ठिकाणांचा शोध लागतो. ठरावीक विचारांचं केंद्र बदललं की प्रश्न पडतात. उत्तरं मिळवण्याच्या प्रयत्नात नवं, स्वत:चं ‘चिंतन’ सुरू होतं आणि शेवटचं पान कधी येतच नाही.
मी जरी तंत्रशाखेकडे वळले तरी वाचनाची साथ सुटली नाही. सुरूवातीला मला वाटायचं की जगातलं सार शहाणपण आहे ते फक्त पुस्तकात. हे वाचू की ते वाचू . मात्र बहिणाबाई वाचताना जाणवतं की आपल्या अवतीभवती असणारे अनेक साधे सरळ लोक आपल्यापेक्षा शहाणे आहेत, कारण हे ‘शहाणपण’ त्यांच्या जगण्यामधून आलेलं असतं. जगण्याला भिडण्यासाठी साहित्यासारख्या मध्यस्थाची त्यांना गरज नसते. ते थेटपणे, निधड्या छातीने जगण्याला भिडतात आणि धडपडत नव्याने घडतात . किशोर शांताबाई काळ्यांचं कोल्हाट्याचं पोर, अशोक पवार सारख्या भटक्या माणसाचं जग, बलुतं, गोलपीठा, बालकांड सारखी आत्मचरित्र आपल्या काळजाला भिडतात याचं कारण ते लेखक जे ‘जगतात’ तेच लिहितात. अभिनेता भूमिका संपली की नामानिराळा होऊ शकतो पण लेखक/कवी आणि त्याचे साहित्यातून उमटणारे विचार हे कायम एकच असायला हवे ना. नाहीतर एखाद्या पर्यावरणवाद्याने स्वत:च पाण्याचा अपव्यय करावा तसं मला हे विसंगत वाटतं.
समजा एखादा उत्तम वाचक ऑफीसमधली स्टेशनरी सर्रास घरी आणत असेल किंवा भाजीवालीने चुकून पाच रूपये कमी घेतले म्हणून खूश होत असेल तर माझ्या मते त्याचं वाचन हा निव्वळ टाईमपास आहे. चांगला वाचक नकळतपणे एक चांगला माणूस व्हायला हवा. जगण्याबद्द्लचा एकूणच विधीनिषेध वाचनातून आपल्या मनात रूजायलाच हवा .‘चांगला माणूस’ होण्यासाठी साहित्य आणि इतर सर्व कलांची काही एक ओळख, त्याचं भान असणं खूप गरजेचं आहे. सामाजिक विषयांवरची पुस्तकं यासाठी मदत करतात. मग ते राजेंद्र्सिंह यांच जोहड असो, अनील अवचटांची पुस्तकं असो, कोसला असो किंवा व्हिक्टर ह्यूगोचं ’ला मिझरेबल्स’.
वाचनाची देणगी माणसाला लाभली नसती तर! दळवी, माडगूळकर, पाध्ये असे लेखक सांगतात की वाचनानं त्यांचं जगणं समूहलक्ष्यी बनवलं. जेवढं आत खळबळत असतं ते अभिव्यक्तीच्या पातळीवर उतरवायचं असेल तर त्याला लागणारा शब्दसाठा केवळ वाचनातून उपसता येतो. आपण जगताना वेगवेगळ्या पातळ्यांवर जगात असतो. हे उद्धृत कुठे वाचलं आठवत नाही पण त्याचं सार असं -भोवतीचं जगड्ब्याळ विश्व, असंख्य आकाशगंगा, सूर्य, चंद्र, तारे, डोंगर, नद्यानाले, झाडं, फुलं, फळं, पशुपक्षी, अफाट पसरलेला निसर्ग- आपल्याआधी अब्जावधी वर्षांपासून... आपल्यानंतरही असणारा, आपल्या आसपास वावरणारी, नात्यानी-बिननात्यांनी, रक्तानं-बिनारक्तानं, इच्छेनं-अनिच्छेनं, प्रसंग-घटनांनी, भावना-संवेदनांनी, व्यवहारांनी, सहेतुक-अहेतुक, जोडलेली-तोडलेली असंख्य माणसं.आणि आपल्या आत - स्वतःच्या आतलं एक अतिशय गूढ, अनाकलनीय, गुंतागुंतीचं असं आंतरिक विश्व ...या सगळ्यातलं अवाढव्यपण, विराटपण, विशालपण, औदार्य आणि संकुचितपण, अथांगता आणि उथळपण, सौंदर्य आणि कुरुपपण, भव्यदिव्यता आणि क्षूद्रपण, रौद्रभीषणता आणि नाजूकपण, क्रूरता आणि प्रसन्नपण, शांतता आणि कल्लोळ, नियमबद्धता आणि गोंधळ, सुसंगती आणि विसंगती, अर्थपूर्णता आणि निरर्थकत्व या सगळ्याशी आपण एकाचवेळी जोडले आणि जखडले जात असतो. हे जोडलेपण आपल्याला हवं असतं आणि नसतंही. या जखडण्यातून तर आपली सुटकाच नसते. या सगळ्या जोडण्या-जखडण्याच्या ताणतणावातून, संघर्षातून, अस्वस्थतेतून या सगळ्याचा अर्थ शोधण्याचा ध्यास आपल्याला लागतो. अच्युत गोडबोले म्हणतात तसं हे सारं आपल्याला कळलं पाहिजे असं वाटायला लागतं. वाचन नसले तर आपले अडत नाही पण ते नसले तर आपण सहजपणे घडतही नाही. जगण्याबद्दलच प्रचंड कुतूहल आपल्याला वाचनातून शमवता येतं. स्वान्त सुखाय वाचता येतं, समूहलक्ष्यी होण्यासाठी वाचता येतं, आणि जगणं सुंदर करण्यासाठी वाचता येत.
त्यामुळे आमचा मुलगा वाचतच नाही हो, अशी तक्रार करणार्या पालकांनी स्वत:ला विचारावं ,आधी ते किती वाचतात? गांधीजींच्या आश्रमात एकदा एक बाई आपल्या अतिशय लठ्ठ मुलाला घेऊन गेली आणि त्यांना म्हणाली ’याला वजन कमी करण्यासाठी काहीतरी उपाय सांगा, तो तुमचं तरी नक्की ऐकेल’. गांधीजींनी तिला एक महिन्याने यायला सांगितले. ती १ महिन्याने पुन्हा गेली. गांधीजींनी त्या मुलाला ’बाळा, तू गोड खाणे बंद कर’ असे सांगितले. ती आई काहीशी वैतागून म्हणाली की मग हे तुम्ही महिन्याभरापूर्वीच का नाही सांगितले. त्यावर गांधीजी म्हणाले की ’मी स्वत: आधी गेला महिनाभर साखर सोडली, त्या मुलाला तसं कर म्हणून सांगण्याचा नैतिक हक्क मिळवला आणि आज मी त्याला हे ठामपणे सांगतो आहे’. आता हे खरंच घलं आहे का, मला माहीत नाही. ह्याचा मथितार्थ इतकाच की मुलांकडून काही अपेक्षा करण्यापूर्वी आपण स्वत: काय वाचतो आणि किती वाचतो ते तपासून पाहूया. आपलं वाचन whatsapp च्या मेसेज पुरतं मर्यादित आहे? पेपरमधल्या मुख्य बातम्यांपर्यंत मर्यादित आहे की ग्रंथालयापर्यंत पोचलय!
माझ्या लहान भाचीला कुणी बसून आकडे म्हण असं शिकवलेलं नाही. मग लक्षात आलं की ‘एक दोन तीन चार - राने झाली हिरवीगार’ असं आकड्यांशी यमक जुळवलेलं एक गाणं तिची आजी तिला म्हणून दाखवते. शब्दांशी खेळायला जर आपण मुलांना शिकवलं तर मुलांची आस्वादक्षमता वाढते, त्यांना कविता आवडायला लागतात. आपल्याकडे बालकवींपासून आजच्या संदीप खरेंपर्यंत उतामोत्तम कविता उपलब्ध आहेत. कमीत कमी शब्दात मोठा आशय सांगणार्या कविता त्यांच्यापर्यंत आपण पोचवायला हव्यात. हे कुतूहल वाढत गेलं तर मुलांना पर्यावरणासह आजूबाजूचं जग, वेगवेगळे देश जाणून घ्यावेसे वाटतात. काळ बदलला तरी देशोदेशीची माणसं आतून तशीच असतात हे सांगणारी पुलंची अपूर्वाई आणि पूर्वरंग त्यांच्या मदतीला येतील. संदर्भांच्या विपुलतेसह देशोदेशीचं पर्यटन घडवून आणणारी मीना प्रभूंची पुस्तकं इथे मदतीला येतील.
मुलं वाचतच नसतील तर या वेळात आपण त्यांना महत्वाच्या घडामोडी सांगू शकतो, पुस्तकाचा गोषवारा गोष्टीच्या रूपात सांगू शकतो. आपण त्यांना वेळ दिला नाही तर त्याची भरपाई करायला माध्यमं २४ तास उपलब्ध आहेत. मग उद्या मुलं आपल्याला म्हणतील, this मिडीया ie टीव्ही or कॉम्प्युटर, it has spent more time raising us than you have तेव्हा उशीर झालेला असेल.
अशी वेळ निघून जाते आणि पालकांवर काय वेळ येते पाहा, "काल घरातली वीज गेली होती. कॉम्प्युटर ,टीव्ही सगळं बंद त्यामुळे मी माझ्या घरातल्या लोकांशी जरा गप्पा मारल्या आणि मला कळलं ...अरे वा...मस्त आहेत की ही माणसं !!! " एका टीनएजर मुलाची, आजच्या परिस्थितीवर नेमकं भाष्य करणारी ही प्रतिक्रिया बोचरा विनोद म्हणून सोशल नेटवर्किंग साईट्स वर फिरत असते. त्यामुळे पुस्तकांचा आजच्या घडीचा सर्वात मोठा शत्रू कोण असेल तर तंत्रज्ञान असं समाज म्हणतो ! आजच्या प्रत्येक पालकाची एक तक्रार आहे की मुलं सारखी मोबाईल, कॉम्प्युटर मधे मान खुपसून बसलेली बसतात मग ती वाचणार केव्हा. एक स्नेही म्हणाले, जे ’श्यामची आई’ वाचून मी घळाघळा रडलो, ते मुलाला वाचायला दिलं. चार पाच पानं वाचून होताच मुलगा म्हणाला ," यात काय इंटरेस्टींग आहे? यातलं लाईफ किती स्लो आहे." तेव्हा मला धक्का बसला आणि जाणवलं की आमच्या आस्वादक्षमतेत केवढी दरी निर्माण झालीय. यात चूक कुणाचीच नाही. बदललेला सभोवताल याला कारणीभूत आहे. त्या पुस्तकातल्या काळाशी, वातावरणाशी, भावनांशी हा मुलगा आपली नाळ जुळवून घेऊन शकत नाहीये. हाच श्याम त्याला ऍनिमेशन रूपात भेटला तर तो त्याला कदाचित आवडेलही. त्यामुळे मुलं जर छापील पुस्तकं वाचत नसतील तर त्यांना ई-बुक्स बद्दल सांगायला हवं. तेवढही वाचण शक्य नसेल तर आता ऑडीओ बुक्स चा पर्यार सुद्धा उपलब्ध आहे. इंटरनेटवर कुमारवयातील मुलांना वाचनाला गोडी लावणार्या कितीतरी साईट्स उपलब्ध आहेत. http://www.awesomelibrary.org/Classroom/English/Literature/Elementary_Li... ह्या साईटवर रुडयार्ड किपलींगच्या 'जंगल बुक' पासून ते चार्ल डिकन्सच्या 'ए क्रिस्मस कॅरल' पर्यंत ऑनलाईन पुस्तके वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. http://www.pitara.com, पाच वर्षांपूर्वी अरविंद गुप्तांनी arvindguptatoys.com हे संकेतस्थळ चालू करून त्यावर डिजिटाईज केलेली पुस्तके ठेवायला सुरुवात केली. आणि आजमितीला एक हजारच्यावर दर्जेदार पुस्तके ह्या संकेतस्थळावर निःशुल्क उपलब्ध आहेत. शिक्षणशास्त्र, जागतिक शांतता, पर्यावरण, विज्ञान-गणितातले प्रयोग, उत्तम बालसाहित्य अशा अनेक विषयांवरची पुस्तके इथे आहेत.
http://www.arvindguptatoys.com या साईट वर हिंदी, मराठी आणि इंग्रजी पुस्तकांचा खजिना आहे. ब्रिटीश काउंन्सीलच्या साईटवरचा बालविभाग http://www.britishcouncil.org/kids अत्यंत वाचनिय आणि माहितीपूर्ण आहे. थोडक्यात वाचनाची आवड निर्माण करणं आणि जोआपसणं हे कॉम्प्युटरच्या मदतीने सहज शक्य आहे. काळाबरोबर मनोरंजनाची माध्यमं बदलणार हे आपण स्वीकारतो मग वाचनाची माध्यमं पारंपरिकच हवी हा अट्टाहास का!
अर्थात हे खरय की हातात पुस्तक घेऊन वाचणं आणि डिजीटल वाचन यात खूप फरक आहे. कॉम्प्युटर वर टाईप करण्यापेक्षा हातात लेखणी धरून लिहीणं हा एक उत्कट मानसशास्त्रीय अनुभव असतो. हेही खरं आहे की पुस्तकातले शब्द वाचून, त्याचं आकलन होऊन त्यातून ते चित्र, त्यातली पात्र आपल्या मनावर उमटून मग डोळ्यासमोर उभी राहणं, ती आपण अनुभवणं आणि वाचत जाताना स्वत:मधे वेगळ्या विचाराचं बीज रूजताना पाहाणं.. यातला आनंद, थरार आजची न वाचणारी किंवा जेमतेम वाचणारी पिढी समजू शकत नाही, आजच्या ’इन्स्टंट’ ज्ञान आणि मनोरंजनाच्या धबधब्याखाली यातलं काही अनुभवता येत नाही. नाही म्हणायला आता परीकथा, पौराणिक कथा, देशी-विदेशी लोककथा मल्टीमिडीया सीडीज, कार्टून नेटवर्क वर देखण्या रूपात मुलांसमोर अवतरतात. कदाचित त्या त्यांना अधिक छान समजतात. कमी वेळात खूप मोठा पट मुलांसमोर उलगडतो. पण त्यात दोन धोके आहेत, सगळं दृश्य समोर असल्याने मुलांच्या कल्पनाशक्तीला पुस्तकातून मिळतो तसा वाव न मिळणं आणि मुलांचं माध्यमांच्या आहारी जाणं.
कवी गुलजार म्हणतात..
"जुबान पर जायका आता था जो सफहे पलटने का
अब उंगली क्लिक करने से बस इक झपकी गुजरती है
वो इल्म (ज्ञान) तो मिलता रहेगा आईंदा भी, लेकिन .....
किताबों से जो जाती राब्ता था ,कट गया है "
हे कटू सत्य स्वीकारतानाच वाचनाचं माध्यम बदलतं आहे याची आपण आता सकारात्मक नोंद घ्यायला हवी.
भाषाविकास, मानसिक- वैचारिक विकास व्हावा, निरीक्षणशक्ती, आकलन आणि जगाबद्दलची-जीवनाबद्दलची समज वाढावी हा वाचनाचा हेतू तत्वत: असायला हवा पण निखळ आनंद मिळवणं हाच त्यामागचा खरा हेतू. मग ते छापील पुस्तक असो किंवा किंडल, इ बुक, ऑडीओ बुक,व्ह्लॉग सारखं डिजीटल माध्यम, छापील वर्तमानपत्र असो किंवा त्याची इंटरनेट आवृती, त्याच्या बाह्यस्वरूपापेक्षा महत्वाचा आहे त्यातला आशय. तो वाचकांपर्यंत पोचला म्हणजे झालं. वाचन हा स्वतःशीच साजरा केला जाणारा आनंदसोहळा आहे. त्या तरी कोणाशीही स्पर्धा संभवत नाही. स्वतःच्या साथीने गायला पाहिजे असा हा राग आहे.