’खेडय़ास देव निर्मि, नगरास निर्मि मनुज’ - शहर आणि गावे यांच्यातला फरक आचार्य विनोबा भावे यांनी अशा नेमक्या शब्दात सांगितला आहे. याच्या गर्भितार्थाकडे पाहिले तर खेड्यातील एकेकाळची नैसर्गिक, परस्परावलंबी जीवनशैली आणि शहरातील कृत्रिम, यंत्राधारित जीवनशैली यातला फरक स्पष्ट होईल. बलुतेदारी हा खेड्यातील अर्थव्यवस्थेचा व बर्याच अंशी स्वयंपूर्णतेचा कणा होता. कृषीसंस्कृतीच्या आसावरचे वेगवेगळे गाव-कारागीर म्हणजे खरे तर व्यावसायिक होते. दुर्दैवाने त्यातून जाती निर्माण झाल्या. समाजात भिनत गेलेला जातीभेद आणि बदलत्या काळाशी जुळवून घ्यायला आवश्यक असलेल्या सक्षमतेचा अभाव यामुळे बलुतेदारीला घरघर लागली.
या पार्श्वभूमीवर गाव-कारागीरांची सद्यस्थिती, कामाचे स्वरुप, परंपरा, कालच्या-आजच्या पिढ्यांमधील विचारांचा फरक असे विविध कंगोरे घेऊन आकाराला आलेले मह्त्वाचे पुस्तक म्हणजे सीमा शेटे-रोठे लिखित ’गाव कारागीर’. कुंभार, चांभार, लोहार, सोनार, सूप -टोपल्या तयार करणारे बुरुड , सुतार, कातडं कमावून वाद्य तयार करणारे, रंगारी, धोबी, नाभिक, पाथरवट आणि कासार हे ते कारागीर.
लेखिकेचा लहान वयापासून ग्रामीण व कृषीसंस्कृतीशी निकटचा संबंध असल्याने या पुस्तकाला एखाद्या रुक्ष वृत्तपटाचे स्वरुप न येता आस्थेचे अस्तर लाभले आहे. गाव- कारागीरांशी नागरी व्यक्तीचा थेट संबंध फारसा येत नाही. घरी मंगलकार्य ठरल्यास त्यासाठी लागणार्या सुपापासून जोडयांपर्यंत आणि ब्रँडेड दागिन्यांपासून आधुनिक फर्निचरपर्यंत सगळे काही ऑनलाईन विकत घेणार्यांचा तर नाहीच नाही. अशा मंडळींना अज्ञात असलेल्या एका श्रमिक जगताचा या पुस्तकाच्या माध्यमातून लेखिकेने सहजपणे वेध घेतला आहे. प्रत्येक कारागीरीवर एक स्वतंत्र लेख असल्याने जिज्ञासू वाचकाला बरीच नवीन माहिती त्यातून मिळू शकेल. यातील काही लेखांमध्ये शेवटी केलेली टिप्पणी अंतर्मुख करते. या मिडिया वॉच’ प्रकाशित पुस्तकाला डॉ. श्रीकांत तिडके यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली आहे. गजानन घोंगडे यांचे सूचक मुखपृष्ठ वाचकाला आशयापर्यंत पोचवण्याचे लेखिकेचे काम सोपे करते.
आकाशवाणीवर उद्घोषिका म्हणून काम केल्याचा तसेच विविध प्रकारच्या लेखनाचा अनुभव सीमा शेटे- रोठे यांच्या गाठीशी असल्याने पुस्तक संवादी व प्रभावी झाले आहे. ग्रामीण किंवा निमशहरी जीवनाबद्द्ल बर्याच शहरी मंडळींच्या हिरव्या- हळव्या- स्वप्नाळू कल्पना असतात. लेखिकेने रेखाटलेले कारागीरांचे शब्द- जीवन चित्र भाबडे, काव्यमय, काल्पनिक किंवा केवळ स्वत:च्या आकलनापुरते मर्यादित नाही. ते कारागीरांच्या थेट मुलाखतीच्या स्वरुपात म्हणजे ’फ्रॉम द हॉर्सेस माऊथ’ असल्याने वास्तवतेच्या पायावर उभे आहे. हे या पुस्तकाचे बलस्थान आहे.
’ग्रामोद्धारा’चा विचार मांडताना विनोबांनी एक वस्तुनिष्ठ प्रश्न मांडला होता. तो म्हणजे -खेड्य़ातली लक्ष्मी जाते कुठे! ते म्हणत, " त्या वाटा बंद करा म्हणजे ती खेडयात राहील. ती बाहेर जाते ते या ५ मार्गांनी - बाजार, लग्न व्यवहार, सावकार, सरकार आणि व्यसने. मीठ मसाले रॉकेल सारख्या दोन चार गोष्टी सोडल्या तर सारे काही गावात तयार करता आले पाहिजे. परस्पर व्यवहार सुरू झाला तर ’महाग’ हा शब्द ही हद्दपार होईल." या संकल्पनेची व्यवहार्यता कदाचित अर्थतज्ज्ञच सांगू शकतील परंतु या ५ कारणांचा कारागीरांच्या जीवनावर काय परिणाम झाला आहे याचे दाखले या पुस्तकातील लेखांमध्ये ठायी ठायी विखुरले आहेत.
’पांढरीवर घर नाही आणि काळीवर वावर नाही’ म्हणजेच हक्काचे घर किंवा जमीन नाही, अशा शब्दातून या कारागीरांचा सल लेखिका उघड करते. ’छिलताना हाताले लागते. बिबा लावायचा बस्स. दवाखाने आम्हाला परवडत नाही, पैसाबी नाही’ म्हणणारा बुरुड समाजाचा कारागीर यात आहे. सोनार, लोहार, सुतार, तांबट आणि शिल्पकार ही विश्वकर्म्याची पाच मुले आहेत, असा उल्लेख विश्वकर्मा ग्रंथात असल्याची मान्यता पाथरवट समाजात आहे. ’शासनाच्या योजना काही असतील तर त्या आम्हाले माहित नाही’ ही या विश्वकर्म्त्याच्या लेकराची व्यथा आहे. त्याचे स्वत:चे लेकरु "दोन दोन किमी चालत शाळेला जाते, एकटं हायवेने जाते, ते घरी येईपर्यंत जीव धाकधुक करते" म्हणणार्या पाथरवट कारागीराची तगमगही या पुस्तकात व्यक्त होते.
अशा रखरखीत परिस्थितीतही हे कारागीर आपल्या जीवावर सावली धरू शकतात ते प्रथा-परंपरा-रिवाजांच्या आधाराने. त्यातूनच विश्वकर्मापूजन करुन कामाला लागण्याची कुंभारांची प्रथा या पुस्तकातून माहित होते. चर्मकार समाजात हुंडा दिला घेतला जात नाही, उलट नवरीला देता येईल तितकं देण्याचा प्रयत्न सासरची मंडळी करतात हे वाचून नवल वाटतं. लोहार समाजात तर म्हणे वधूला मोरपीस देऊन ’अशा सुंदर सुंदर जागी मी तुला घेऊन जाईन’ असे वचन वर देत असतो. समाजाची खूण म्हणून जन्मानंतर २१ व्या दिवशी बाळाच्या पाठीवर लोखंडाच्या छडीचा डाग देण्याची अजब प्रथाही काही लोहार पाळतात. गावात काही कार्य असले की ’चुलीला’ म्हणजे घरातील सर्वांना आमंत्रण देण्याची जबाबदारी नाभिकाची असे हे बहुतेकांना माहित असते. पूर्वी कोकणात घरोघरच्या कर्त्या पुरुषाला ओवाळणं हा कोकणातील परीट स्त्रियांचा मान असे तर विदर्भात लग्नकार्यात कंकण बांधण्याचा. बलुतेदारीने अशी व्यवहाराच्या पलीकडे जाऊन घातलेली नातेसंबंधांची आगळीवेगळी वीण या पुस्तकातून कळते तसेच ती विसविशीत होत चालल्याची कारागीरांना वाटणारी खंतही.
कारागीरांच्या कामाशी संबंधित असलेले पण आपल्या नेहमीच्या बोलण्यातून अस्तंगत होत चाललेले कितीतरी शब्द या पुस्तकातून नव्याने भेटतात. उदाहरण द्यायचे तर लाकडी चाकाला आतून लोखंडी वाट आवश्यक असते. अरे हो, तिला ’धाव’ म्हणतात हे लोहारांविषयी वाचताना लक्षात येते. त्यांच्याशी संबंधित भट्टी, ऐरण, भाता, जंतरपट्टी , पकड यांसारखे शब्द किंवा चर्मकाराची रापी, आरी, सस्ती यासारखी आयुधं, बुरुडकामातून तयार होणारी रोजच्या वापरातली दवडी, लक्ष्मीपूजनाला मानाचा समजला जणारा फडा अशा कितीतरी शब्दांची लेखिकेने पुनर्भेट घडवली आहे. प्रत्येक कारागीर समाजात एक आराध्यदैवत असते. मग ते सोनार समाजाचे नरहरी सोनार असतील किंवा नाभिकांचे सेना महाराज. विहित कर्माची सांगड आध्यात्माशी घालणारा सेना महाराजांचा साधासा अभंगही या पुस्तकात अवचित भेटतो.
आपल्या वाडवडिलांकडून आलेला कलेचा, कृतीपद्धतीचा वारसा सांभाळताना तर दुसरीकडे नवनव्या आव्हानांना सामोरे जाताना होणारी गाव-कारागीरांची परवड संवेदनशील वाचकाला या पुस्तकाच्या माध्यमातून एका वेगळ्या जगाचे दर्शन घडवते. बलुतेदारीच्या काही अज्ञात पैलूंचे दर्शन होते. जेवताना पानात काही टाकले तर त्यामुळे शेतकर्याच्या बैलापासून पाकसिद्धी करणार्या आईपर्यंत अनेकांची मेहनत आपण बुडवतो आहोत असा त्याचा अर्थ होतो, असे विनोबा का म्हणत त्याचा आपसूक खुलासा होतो. या दिवाळीत पणत्या, केरसुणी (फडा), सुपली इ. वस्तू रापलेल्या हातांकडून विकत घेताना हे पुस्तक आठवेल आणि घासाघीस करावीशी वाटणार नाही हे निश्चित.
No comments:
Post a Comment