Monday, December 30, 2024

आजोळ ट्रीप

आजोळचं / मामाचं घर. मधल्या जिन्याने विभागलेली खाली वर मामांची दोन दोन घरं. आम्ही सात मावसभावंडं दर उन्हाळ्याच्या सुट्टीत तिथे जमत असू. मी तर पडीकच असे. सर्व मोठी भावंडं बराचसा वेळ वरच्या कौलारू माळ्याखाली नाकाला पुस्तक लावून सतत वाचत असत. अधूनमधून सखाराम महाराज यात्रेला जाणे, कोयी चोखत आमरस खाणे, पॉट आणून आईस्क्रीम करणे, एकमेकांच्या पाठी जाऊन बर्फाचे खडे सोडणे, नदी का पहाड , अभ्र्यात पत्ते लपवून नाटेठोम (जे नॉट अ‍ॅट होम आहे हे दशकानंतर कळलं) झब्बू वगैरे खेळणे हे उद्योग चालत. मी सर्वात लहान त्यामुळे कच्चा लिंबू. मामाच्या मांडीवर बसून त्याने दिलेला पत्ता बदामसातच्या मोठ्या गोलाच्या मध्यभागी नेऊन टाकणे अशी कामं मला तेव्हा फार मह्त्वाची वाटत असत. एका सुट्टीत बसेरा का कोणत्या तरी सिनेमाला मला टाकून सगळे गेले, हे दु:ख बरेच दिवस माझ्या चिमुकल्या जीवनाला व्यापून उरलं होतं. गुणाची मोठी भावंडं सग्गळं खात असल्याने शिस्त म्हणून वांग्याची भाजी वगैरे मलाही साश्रूनयनांनी खावी लागे अशी काही उप दु:खही होती. 

आजीला दया येऊन मला कधी कधी थोडा गुळंबा वगैरे मिळे. लाडही होत. तव्यावर वाळू घालून रव्याचा केक वगैरे आजी भन्नाट करायचीच पण मामी आल्यावर तिच्या हातचे पदार्थ हे ही एक आकर्षण मामाकडे जाण्याशी जोडलं गेलं. आजीच्या गॅस पेटवायच्या पोस्ट कार्डच्या पट्ट्या, रद्दी पेपरचे चिवडा खायला कापून ठेवलेले चौकोन, लाडवाचा पितळी गोल डबा अशा वस्तूंबरोबर मागच्या लाकडी जिन्याच्या पायर्‍यांवर उन्ह खात विहीरीकडे पाहत काहीच न करता घालवलेल्या दुपार याही आठवणींच्या सांदीकोपर्‍यात कुठेतरी आहेत.  

प्रत्येकाच्या दहावी-बारावीनंतर एक एक जण गळत जाऊन सुट्टीत जमणार्‍या भावंडांची संख्या रोडावू लागली. सगळे कामाधंद्याला लागले. शिरस्त्याप्रमाणे पुण्यात राहू लागले. लग्नकार्याला जमू लागले. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर बोलू लागले पण उन्हाळी सुट्टीतलं एकत्र जमणं बंदच झालं. आपण सगळे एकत्र कुठे तरी जाऊया अशी चर्चा सुरु राहिली आणि अखेर एकदाचा तो अमृतयोग खरं तर शब्दामृतयोग आला. 

मामा, रोहिणीताई आणि जिजाजींनी अंदमान सहल शब्दामृतसह केली होती आणि त्यांचा अनुभव खूप चांगला होता. सगळ्यांच्या व्यापांमधून हो नाही करता करता चक्क शब्दामृतच्या जानेवारी २०२५ च्या ट्रीपबाबत (ज्याला मामा आधी यात्रा म्हणत असे) एकमत झालं. मामाची नातवंड लहान असल्याने अमू, अश्विनी आणि त्यांच्या जोडीदारांना आग्रह करू शकलो नाही. रोहिणीताईच्या, दादा व भाच्यांच्या आग्रहामुळे मामी तयार झाली. मामीशी तर इतक्या वाटाघाटी केल्या की तिला ’कशाचीही जबरदस्ती कोणीही करणार नाही’ असं फक्त स्टँपपेपरवर लिहून द्यायचं बाकी होतं. भाग्यश्री अचानक नाही म्हणेल अशी भीती होती. तिने एकदा ’नाही’ ठरवलं की सलमानसारखी वो अपने आप की भी नही सुनती. मग पराग किंवा ब्रह्मदेवही काही करू शकत नाहीत. खरं तर मावशी, मिलींद, राजश्रीताई आणि भाग्यश्रीची याच रूटची अर्धी सहल नुकतीच झालेली होती पण तरीही त्यांनी आमच्यासाठी ’मिशन एकत्र जाणे’ याला महत्व दिलं. 

त्यांचं नैमिषारण्य आणि अयोध्या बाकी होतं. विमान,रेल्वे सोयीच्या वेळा, भाडी इ. खल सुरु झाला. अयोध्येपासून नैमिषारण्य अडीचशे किमी अंतरावर असल्याने तिथून येऊन संध्याकाळी परतीची गाडी पकडणं दादाला अवघड वाटलं. मी कंपनीच्या कार्यालयात फोन केला तर तिथल्या अनामिकाने नैमिषारण्य २५ च किमी अंतरावर असल्याचं ठासून सांगितलं. त्याच्या आत्मविश्वासाने दिपून जाऊन फोन ठेवला. दरम्यान मिलींदने अंतर २५० किमी असल्याची खात्री केली होती. मिलींद आमच्यासाठी गुगलचाही काका. त्यामुळे पुढच्या फोनवर हे सांगताच त्या विक्रमाने आपला हट्ट न सोडता एक दीर्घ श्वास घेऊन दोन नैमिषारण्य असून, एक २५ व दुसरे २५० किमीवर असल्याचा थक्क करणारा दावा केला. ऑईंग. आपला भूगोल बरा नशीन असं वाटून गुगल केलं तर दोन नैमिषारण्य कुठे दिसेनात. आता कंपनीच्या कुवतीवर शंका येऊन मला आपण त्यांनाच नीट माहित नसलेल्या किर्र नैमिषारण्यात पेट्रोल संपून अडकून पडलो आहोत असं वाटू लागलं. पहिले दहाहजार भरल्याने परतीचे दोर कापले गेले होते. पुढे जशी जायची तारीख जवळ आली तसं हे नैमिषारण्यच सहलीतून कटाप झालं, त्याची जागा खरोखरच जवळ असलेल्या सारनाथने घेतली. ना रहा बास ना बजी बाँसुरी, पण मंगला मावशी आणि तिच्या मुलांची आता २/३ यात्रा आमच्यापायी रिपीट होणार होती याचं शल्य वाटलं. 

दरम्यान आमच्या या चर्चांनी प्रेरित होऊन ध्यानीमनी नसताना माझे दीर जाऊ, त्यांचे व्याही, माझे सासू सासरे, चुलतसासरे भुर्र्कन विमानाने जाऊन ही सेम ट्रीप चटदिशी करून आले सुद्धा. मला ज्याची स्टोरी त्यांना रंगवून सांगायची होती तो सिनेमा माझ्या आधीच्या शो ला पाहून टाकला, असं कुठे असतंय का! दादाला (दीर) जगात कुठेही एक तरी ओळखीचा माणूस सापडतो तसा बनारस की अयोध्येला सापडला आणि त्याने त्यांना वाहनाची सोय करून दिली. सासूबाई खरेदी शौकीन आणि दादाचे व्याही टेक्स्टाईल मधले दिग्गज. त्यांनी सासूबाईंना "ही एकही साडी या किमतीच्या लायक नाही, ओरिजीनल बनारसी घ्यायच्या तर लाखाच्या आहेत, घेता का त्या!" म्हणत त्यांचा मनसुबा हाणून पाडला. ’ये जीना भी कोई जीना है !’ म्हणत रिकाम्या हाती चुळबुळत परतल्याची ही सासूबाईंची एकमेव ट्रीप असेल.

आता शब्दामृतचे ग्रुप तयार झाले. त्यावर काही सिनीयर सिटीझन व्हॉट्सअ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप खेळू लागले. जे प्रवाससूचीत दिलं आहे तेच नव्याने विचारू लागले. आपलं विमान उशीरा पोचणार असल्याचं एका काकूंनी नऊ वेळा इंग्र्जीत सांगितलं. मला वैदेहीच्या शाळेतलं ’इन द वारी ऑफ लॉर्ड विठ्ठ्ला द डीव्होटीज प्ले फुगडीज अ‍ॅंड डान्स ऑन पावली कॅरींग बेसिल वृंदावना ऑन हेड्स’ ऐकताना वाटलं तसं काहीतरी फीलींग आलं. कुंभमेळ्याच्या तयारीमुळे अयोध्येहून सुटणार्‍या परतीच्या गाड्या सुलतानपूरहून सुटणार होत्या. यामुळे एक ईश्वरकाका हवालदिल झाले होते. खरं तर ती माझीही समस्या होती पण तेव्हा तरी त्यावर उपाय नव्हता. कुणी कोणता खाऊ न्यायचा ही चर्चा आमच्यासाठी अधिक मह्त्वाची होती. शेवटी तो खाऊ एकमेकांना गिफ्ट देऊन संपवावा लागला ते वेगळं. तर अखेर ३ महिने चर्चा, गप्पा, हा हा ही ही केल्यावर तो दिवस उगवला. 

सर्वात आधी रेल्वेवाली मंडळी म्हणजे ग्वाल्हेर(डबरा) वाले जिजाजी आणि ताई, बडोद्याहून दादा आणि भुसावळमार्गे मी, पोचलो. सुसाट धावणार्‍या गाड्या काशीपाशी येताच अडून बसल्या. डुगुडुगु करीत पोचल्या, तिकडे पुणेकर पण मुंबईमार्गे उडाले होते. अल्युमनी यात्रेकरू म्हणून मामाची वट असल्याने आम्हा १२ जणांना सगळीकडे जवळच्या रूम्स आणि स्वतंत्र टेम्पो ट्रॅव्हलर ९७११ मिळाली होती. त्यामुळे आम्ही हवं तेव्हा तळ्यात येऊन खाजगी ट्रीप आणि हवं तेव्हा मळ्यात जाऊन पब्लीक ट्रीपची मजा घेऊ शकत होतो.  


काशी, बनारस , कँट आणि वाराणसी जंकशन अशी वेगवेगळी रेल्वे स्टेशन्स असतात हे नवं ज्ञान आम्हाला नुकतच प्राप्त झालं असलं तरी चालकांना नसावं. आमचं होटेल इथून (दोन्ही नैमिषारण्याइतकं) लांब नसल्याने मी निर्धास्त होते पण आम्हाला घ्यायला नेमकं कुठे यायचं याबद्दल चालकांचा घोळ होता. रोहिणीताई तर बनारस स्थानकावर उतरून उभी तरी चालकाचं म्हणणं ’वो वाराणसी जंक्शनही है’. अखेर तिथल्या कँटीनवाल्याचे साक्षीपुरावे केल्यावर तो एकदाचा स्टेशन शोधत त्यांना घ्यायला गेला. ईश्वरकाकांनी मला फेसबुकवर हेरून ठेवल्याने भुसावळला बरोबर शोधून काढले आणि पुढेही ते एकटे असल्याने आमच्या ग्रुपला बर्‍यापैकी चिकटून होते. आमचा चालक आणि मी वाराणसी जंक्शनच्या बाहेर खुणेच्या मारूतीच्या देवळापाशी एकमेकांशेजारी बसूनच एकमेकांना फोन करत शोधत होतो. मग दोघांनी हॅ हॅ हॅ केलं. आमची बहुप्रतीक्षित (बनारस । सारनाथ । प्रयागराज । अयोध्या ) वजा (मायनस) - नैमिषारण्य ट्रीप अखेर सुरु झाली होती. 

Click here for   बनारस  |  तीर्थराज प्रयाग  |  सारनाथ


Wednesday, October 30, 2024

पाकिस्तानी मालिकांमध्ये असं आहे तरी काय !

भारतीय एकतर्फी गंगाजमनी तहजीब सांभाळत आले आहेत. इतक्यातलं उदाहरण म्हणजे तबलापटू झाकीर हुसैन यांना अवघ्या भारताने भावनाविवश होऊन श्रद्धांजली वाहिली. पाकिस्तानने मात्र एखाद्या गैरमुस्लीम भारतीयावर असं भरभरून प्रेम केल्याचं आठवत नाही. पाकिस्तानने भारताला कायम छळलं आहे, युद्ध लादलं आहे, कुरापती तर चालूच आहेत. कलेला जात, धर्म नसला तरी काचणारे संबंध वेळीच संपवावे लागतात हे लक्षात घेऊन भारताने आपले दरवाजे पाकिस्तानी कलाकारांसाठी बंद केले आहेत.
या पार्श्वभूमीवर हम, एआरवाय इ. पाकिस्तानी मनोरंजन वाहिन्यांवरील मालिकांच्या भारतात वाढत चाललेल्या लोकप्रियतेने
 मला बुचकळ्यात टाकलं. गल्फ आणि परदेशातल्या पाकिस्तानी डाएस्पोरा समाजात ’घरकी याद’ दिलानेवाल्या या मालिका लोकप्रिय असण्यात नवल नाही परंतु गैरमुस्लीम भारतीय जेनझी वापरकर्त्यांच्या कॉमेंट्स, व्ह्यूज, लाईक्स या गर्दीत मोठ्या प्रमाणावर दिसतात. नमुन्यादाखल काही कॉमेंट्स- ’अब एक हफ्ता वेट करना पडेगा’, ’लव्ह फ्रॉम इंडिया’, ’This pakistani drama really touched my heart’. 
अलिया भट , विद्या बालन, आर. माधवन, किरण खेरपासून अमिताभ बच्चनपर्यंत अनेक कलाकारांनी या मालिकांचं, त्यातील कलाकारांचं Exceptional, Unparalleled, Phenomenal म्हणत भरभरून कौतुक केलं आहे. 

इंडिया टूडेमध्ये या संबंधातील एका लेखात एका पाकिस्तानी कलाकाराच्या मताचा उल्लेख आहे. तो म्हणतो. "बॉलीवूड सिनेमांसारख्या आमच्या मालिका गोळीबंद आणि प्रभावी असतात. भारतीय मालिकांसारख्या त्या प्रेक्षकांच्या सहनशीलतेचा अंत पाहत नाहीत. त्यांच्यासारख्या नकली, लुटूपुटीच्या वाटत नाहीत तर जिवंत, रसरशीत असतात." 
मुळात आंतरजाल (इंटरनेट) हे विश्वस्तरावर पसरलेलं असं माध्यम आहे ज्याला दरवाजा नाही. एक खिडकी बंद झाली / केली तर दुसर्‍या खिडकीतून कॉंटेंट आपली वाट काढत जातात. ते सुमार असले तर वाटेतच मरून जातात. आयएमडीबी संकेतस्थळाने बहुतेक पाकिस्तानी मालिकांना १० पैकी किमान ८ ते ९.५ गुण दिलेले पाहून एवढं गारूड करावं, असं या मालिकांमध्ये आहे तरी काय याचं मला कुतूहल वाटलं. हे कुतूहल शमविण्यासाठी मी निवडक मालिकांचे काही भाग तुकड्यात पाहिले तर काही मालिका स्क्रोल केल्या आणि माझ्या ’ओटीटी कट्टा’ सदरासाठी यावरच लिहायचं ठरवलं.
सगळ्याच मालिका काही महान नव्हत्या. काही तर सध्याच्या भारतीय मालिकांपेक्षा टाकाऊ आणि टुकार होत्या परंतु बर्‍याच मालिका खरोखर दर्जेदार तर काही  उत्तम होत्या. या मालिका भारतीय प्रेक्षकांच्या मनात इतकी घुसखोरी करू लागल्या असतील तर त्यांना नेमकं काय हवं आहे हे समजून घेण्यासाठी या मालिकांची दखल घ्यायला हवी. 

पाक मालिकांचा प्रेक्षकवर्ग भारतात निर्माण होण्याची सुरूवात २०१४ मध्ये झी च्या ’जिंदगी’ वाहिनीवरून झाली. लखनौ, पंजाब, काश्मीरमध्ये मुस्लीमबहुल भागात त्याची क्रेझ होती. आता ते लोण सर्वत्र पसरू लागलं आहे. सर्वसामान्य पाकिस्तानी स्त्रियांची स्थिती ’रांगेतलं शेवटचं माणूस’ अशी नसून ’रांगेत उभंच नसलेलं बाईमाणूस’ या प्रज्ञा पवारांच्या कवितेतल्या ओळीसारखी आहे असं आपल्यापर्यंत पोचणार्‍या बातम्यांवरून वाटतं. त्यामुळे काही सर्वाधिक लोकप्रिय मालिका पाकिस्तानी लेखिकांनी लिहिल्या आहेत याचं कौतुक वाटलं. या लेखिका जगण्यातले बारकावे तळाशी जाऊन असे काही  टिपतात की प्रेक्षक मालिकेत पार गुंतून जावेत.
मेरे हमसफर’ मालिकेची लेखिका होती सायरा रझा. ऐ इश्क ए जुनून.. लिहिलं सादिया अख्तरने आणि ’कभी मै कभी तुम’ ची लेखिका होती फरहत इश्तिआक. तिन्ही मालिकांचे विषय भन्नाट होते. मानवी नात्यांमधली गुंतागुंत मात्र सामाईक होती. हिंसा, अश्लीलता त्यात नावालाही नव्हती.


कभी मै कभी तुम’ ही मालिका नोव्हेंबर २०२४ मध्ये संपली. ती इतकी गाजली होती की तिचा अंतिम भाग पाकिस्तानी थिएटर्समध्ये तिकीट विक्री करून प्रसारित करण्यात आला. या मालिकेने पाकिस्तानची सीमा ओलांडून युरोपातील मुस्लीमबहुल राष्ट्रात, बांग्लादेशात लोकप्रियता मिळवलीच पण भारतीय प्रेक्षकांच्या प्रतिक्रियाही या मालिकेच्या YouTube व्हिडिओंखाली ओसंडून वाहत होत्या. 
 
भारतीय सिनेमाच्या भव्यतेपुढे आणि दर्जापुढे पाकिस्तानी सिनेमाचा जीव आणि प्रेक्षकवर्ग मात्र अतिशय केविलवाणा आहे. भारतीय सिनेमाचं,  विशेषत: शाहरूख खानचं तिथल्या कलाकारांना प्रचंड आकर्षण आहे. लांबसडक केसांसाठी विख्यात असलेली व ’रूबाब’ च्या भूमिकेत गाजलेली नईमा बट कोणत्याही भूमिकेसाठी केसांना कात्री लावू देत नाही. शाहरूखसह काम करायला मिळालं तर मात्र मी भूमिकेनुसार केस सुद्धा कापायला तयार आहे, असं ती सांगते. बॉलीवूडमध्ये संधी मिळणं हे तिथल्या अनेक कलाकारांचं सुप्त स्वप्न आहे. ’तेरा चेहरा’ फेम अदनान सामीचा मुलगा म्हणतो "इंडियाने माझ्या वडिलांना खूप प्रेम दिलं असलं तरी मी देशप्रेमी असल्याने मला तिकडे (इंडियात) काम करायचं नाही’. असलं तरी ते आता शक्य नाही. फवाद खान, माहिरा खानला मध्यंतरी संधी मिळाली पण आता पाकिस्तानशी विकोपाला गेलेल्या संबंधांचे पडसाद कलाक्षेत्रावर उमटणं स्वाभाविक असल्याने ते मुश्कीलही नही नामुमकीन आहे. 
’कभी मै कभी तुम’ मधल्या ’शर्जीना’च्या भूमिकेमुळे गाजलेली हानिया आमीर दिलजित दोसांझच्या लंडन मधल्या कार्यक्रमाला गेली असताना दिलजीतने तिला सन्मानाने मंचावर बोलावलं होतं. तिथे उपस्थित तिचेही चाहते जल्लोष करु लागले. दिलजीतने आपल्या पंजाबी सिनेमात तिला मुख्य भूमिका देताच भारतीयांनी मात्र त्या सिनेमाकडे पाठ फिरवली. असं असूनही भारतीय सिनेक्षेत्रातल्या कलाकारांइतकी लोकप्रियता, टीव्ही वाहिन्यांवर काम करणार्‍या अनेक भारतीय कलाकारांना स्वप्नवत वाटणारं यश  Pak Drama मधून काम करणार्‍या पाकिस्तानी कलाकारांना का मिळतं आहे त्यामागची अन्य कारणंही यामुळे शोधावीशी वाटली. 

याचं बरंचसं श्रेय जातं ते (अपवाद वगळता) भारतीय हिंदी व प्रादेशिक मालिकांच्या सुमारपणाला. त्याचबरोबर उत्तम मांडणी असूनही (अपवाद वगळता) हिंसक आणि लैंगिक दृश्यांनी खचाखच भरलेल्या शिवराळ भाषेतल्या बहुसंख्य  वेब सीरीजना. 
’दुश्मनों से पशेमान होना पड़ा है
दोस्तों का ख़ुलूस आज़माने के बाद’ अशी आपली गत या मालिकांच्या बाबतीत झालेली आहे.
हिंदी व प्रादेशिक मालिका इतक्या संथ गतीने सुरु असतात की महिन्यातून एकच भाग पाहिला तरी त वरून ताकभात कळतो. ’क्यूँ की सास भी कभी बहू थी’ या हिंदी मालिकेचा नवा सीझन सुरू झाला आहे म्हणे. पहिल्या सीझनचे १००८ एपिसोड झाले होते. मराठीत ’चार दिवस सासूचे’ म्हणत चाराचे किती झाले हे गुगलून पाहिलं तर ३१४७. ’आई कुठे काय करते’.. पाच एक वर्ष सुरु होती. 
कितीही प्रतिभासंपन्न लेखक आणले तरी त्यांचे पेन, कीबोर्ड, मेंदू, अगदी जनरेटीव्ह ए-आय सुद्धा इतके एपिसोड पाडल्यावर (कागदावर किंवा स्क्रीनवर..) झिजणार नाही तर काय ? 
एखाद्या क्षुल्लक घटनेनंतर समजा आश्चर्य दाखवायचं असेल तर घरात जितकी पात्र त्यात आहेत ती सगळी क्रमाने "काय" म्हणतात. ’मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचंय’ असं म्हणत अनेक भाग आणि शेकडो प्रेक्षक घनघोर कंटाळा येऊन खर्ची पडतात.
याउलट पाकिस्तानी मालिका.. २०/ ३० फार तर ५० भागात खेल खतम. 
लोकांना हवीहवीशी वाटत असतानाच मालिका संपवण्याची धमक या मनोरंजन नगरीत आहे. वेगवान पटकथेची आणि दिग्दर्शनाची घट्ट बांधणी प्रेक्षकांना खिळवून ठेवते. पाकिस्तानी मालिकांना कुठे थांबायचं हे अचूक कळतं. 

अर्थात लांबी हे काही गुणवत्तेचे परिमाण किंवा एकमेव निकष नाही पण मग आणखी काय कारणं असावीत ! 
आपल्या मालिकांची साचेबद्ध बिनडोक कथानकं. अखंड सौभाग्यवती वज्रचुडेमंडित रडकी नायिका, इस्टेटीची भानगड ,बटबटीत नटलेली खलनायिका आणि पुरुष मेषपात्रं ! त्यांच्याऐवजी पुतळे उभे केले तरी चालतील. तसंही त्यांना फक्त ’हे बघ, आधी तू जरा शांत हो’ एवढाच संवाद अधूनमधून म्हणायचा असतो. 
’लग्न’ या एकाच शब्दाभोवती या मालिका महाएपिसोड करत महिना महिना फिरत असतात. एकदाचं ते झालं की नायिकेचा काटा काढण्यासाठी दुधात विष घालणं, ती गर्भवती असल्यास तिला तुम ता ना ना ना पार्श्वसंगीतासह जिन्यावरून पाडणं, नायकाच्या गाडीचे ब्रेक फेल करून ठेवणं, नायिकेला काळी म्हणून टोमणे मारणं यात शे-दोनशे भाग संपतात. नायकाच्या धक्क्याने कुंकवाचं तबक हवेत उडून कुंकू नेम धरून अविवाहीत नायिकेच्या भांगात उडी मारतं किंवा विवाहित असेल नायिका तर कुंकवाच्या दिव्य शक्तीमुळे किंवा एखाद्या देवीच्या आशीर्वादाने संकटातून बचावत राहते. 
याशिवाय नायिकेला नायकाच्या शर्ट्चं तुट्लेलं बटण शिवणं, त्या एपिसोडच्या सुमारास वटसावित्री/ करवा चौथ /मंगळागौर, होळी, गणपती, पाडवा वगैरे जे कुठले सणवार येतील ते आधीच जुजबी असलेल्या कथानकाला टाईम प्लीज करून बाजूला टांगून साजरे करणं इ. कामं करावी लागतात. 
लेखकाला यापुढे सुचेनासं झालं की ते एकता कपूरचे जुनाट प्रयोग नव्याने ट्राय करून दोन तीन मालिकातली पात्र एकत्र आणतात. लॉजिक सोडून काय वाट्टेल ते करतात.
हिंदी मालिकांमध्ये हेच सगळं आणखी झकपक स्वरूपात असतं. वरून या गुंताड्याला ’कला’ वगैरे म्हणावं अशीही संबंधितांची अपेक्षा असते. 
जग मंगळावर चाललं आहे, आपण अश्मयुगीन काळाकडे चाललो आहोत या सत्याशी या मालिकांना देणंघेणं नाही. लोकांना जे हवं तेच आम्ही दाखवतो आहोत असं निर्माता, दिग्दर्शकांचं म्हणणं असतं. हे कमी की काय म्हणून सर्वोत्तम सासू, सर्वोत्कृष्ट सून असली बक्षिसे देणारे आणि मधल्या गॅप हिंदी सिनेमातील आयटम सॉंगवर मालिकेतील दिग्गज कलाकारांनी व्यावसायिक तडजोड म्हणून केलेल्या करूण नाचाने भरून काढणारे दिव्य सोहळेही टीव्हीवर सुरु असतात. 
अन्य भाषेत रमू न शकणारे वयस्कर व निवृत्त लोक, काही भाबड्या गृहिणी यांच्या जीवावर रटाळ मालिका सवंग मनोरंजनाचा रतीब घालत राहतात. खरं तर सकस कथानकांवर आधारित निर्मिती करणं आणि लोकांच्या अभिरुचीला वळण लावणं अशक्य नाही हे दूरदर्शनच्या काळातल्या अनेक मालिकांनी सिद्ध केलं आहे आणि वर्तमानात काही पाकिस्तानी मालिकांनीही.

पाश्चात्य मनोरंजन विश्वात डार्क कॉमेडी  किंवा भव्य बिगबजेट ऐतिहासिक मालिकांचा  (उदा: द क्राउन) आवाका वैश्विक आहे. राजकारणासारख्या संवेदनशील विषयांचंही बेधडकपणे रोखठोक चित्रण करणार्‍या मालिका तिथे प्रसारित होतात. पाकिस्तानातली राजकीय स्थिती बघता हे कधीही शक्य नाही. त्यामुळे भारतीय मालिकांप्रमाणेच बहुतेक पाकिस्तानी मालिका कुटुंबकेंद्री आहेत. मात्र या मालिकांमध्ये प्राण आहे तो आणखी काही कारणांमुळे...

कथाबीजाशी प्रामाणिक असलेलं कथानक आणि दाद घेणारे संवाद 
किचन पॉलीटीक्सच्या पलीकडे एक भलंमोठं जग आहे आणि बायका शालू नेसून पालक निवडत नसतात एवढी बेसिक समज यांना असल्याने कथानक सशक्त, एखाद्या समांतर सिनेमाइतकं वास्तवाधारित असतं.  उदा: ’मेरे हमसफर’ या मालिकेत पिचलेल्या बायकोमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारा ,आवश्यक तिथे नाही म्हणायला शिकवणारा नवरा आणि त्या दोघांमधले सहजीवनावर भाष्य करणारे सुंदर प्रसंग मालिकेला उंचीवर घेऊन गेले. बहुतेक मालिकांमधला एकही संवाद अनैसर्गिक आणि अकारण वाटत नाही. इतके ते कथेशी एकरूप झालेले असतात. 
’मै मंटो नही हूँ’ मध्ये साधाभोळा अविवाहित प्राध्यापक, सह-प्राध्यापिका, यांची विद्यार्थिनी असलेली एका डॉनची मुलगी, गँगवॉर, कुटुंबांची ओढाताण, प्रेमत्रिकोण या कथानकात सगळ्या पात्रांचे संवाद काळजातून आल्यासारखे वाटावेत इतके सहज आणि दमदार आहेत. सदात हसन मंटो निडर पाकिस्तानी लेखक होते. नावाचा मंटो असलेला घाबरट प्राध्यापक वेळ येताच आपण लेखक मंटोच्याच जातकुळीतले असल्याचं दाखवून देतो. यातलं मानवी मनोव्यापाराचं विश्लेषण आणि सगळ्या पात्रांचे एखाद्या मुक्त काव्यासारखे संवाद लक्षात राहणारे आहेत. अर्थात प्राध्यापक-विद्यार्थिनीमध्ये प्रेमसंबंध दाखवण्यावरून तिकडे अनेकांच्या भावना दुखावल्या.    

तपशीलवार पात्रनिर्मिती
आपल्या मालिकांमध्ये एक सासू झाका आणि दुसरीला काढा. मेकअप थापून सोफे उबवणारं हे पात्र मुळातच तकलादू असतं. पाक मालिकांमध्ये जास्त फूटेज नसलेल्या पात्राच्या व्यक्तिमत्वाचं सुद्धा सूक्ष्म चित्रण केलं जातं. जुजबी भूमिकेमध्ये एखादा वकील दाखवला तर तो रोजाने आणलेला ’ओव्हरअ‍ॅक्टींगके पचास रुपये काट’ वाला न वाटता 'वकील' वाटतो. या कंगोर्‍यांमुळे पात्रांची ओळख निर्माण होते आणि ते कथानकाला सहजगत्या पुढे घेऊन जातात. 
आपल्याकडे खरं तर थिएटरची पार्श्वभूमी किंवा अनुभव असलेले उत्तमोत्तम कलाकार आहेत, परंतु प्रेक्षकांना बुद्ध्यांकच नाही असं मानणार्‍या मालिकांमध्ये ते बिचारे अभिनय करणार तरी केव्हा !

उच्च निर्मिती मूल्य 
या मालिका अतिशय नेत्रसुखद , ’क्लासी’ वाटतात आणि खर्‍या देखील.  उदा" ’ऐ इश्क ए जुनून’ या मालिकेतला नायक पंचतारांकित हॉटेल्सच्या साखळीचा मालक आहे. महत्वाचे प्रसंग थेट पंचतारांकित हॉटेलमध्येच चित्रीत केले आहेत. कारची निवड, क्रॉकरी, सजावटीच्या वस्तू प्रत्येक गोष्टीचा तडजोड न करता विचार केल्याचं दिसतं. ड्रोन शॉट, लॉंग शॉट असो की जवळून प्रत्येक फ्रेम श्रीमंत वाटते. आपल्याकडे ऐतिहासिक मालिकांत हे बर्‍यापैकी साध्य केलं असलं तरी एरवी श्रेयस तळपदे सारखा प्रख्यात देखणा अभिनेता उद्योगपती नायक म्हणून एंट्रीपुरता हेलीकॉप्टरने येतो. नंतरच्या भागात त्याला पुठ्ठ्याच्या विमानाच्या सेटवर बसवलेलं पाहून प्रेक्षकांनाही हसू आवरत नाही. 
३०० करोडची उलाढाल करणार्‍या राधिका मसालेची गुप्त फॅक्टरी असते तसं इथे नाही. फॅक्टरीचा उल्लेख असेल तर एखाद्या फॅक्टरीत प्रत्यक्ष शूट केलं जातं. आपल्या अवतीभोवती हे सारं घडत असल्यासारखं वाटून आपण कथेशी अधिक कनेक्ट होतो. ’कन्व्हिक्शन’चं मर्म त्यांना गवसलं आहे.

सामाजिक समस्यांची समंजस हाताळणी 
पाकिस्तानात पुराणमतवाद्यांचं आणि कट्टरपंथीयांचं वर्चस्व आहे. तरीही मालिकांमधून घरात होणारे हिंसाचार, मानसिक आरोग्य, लैंगिक असमानता यासारख्या ज्वलंत विषयांना केंद्रस्थानी ठेवताना निर्माते घाबरत नाहीत. उदा: ’केस नं ९’ मालिकेमध्ये करियरिस्ट नायिकेवर बलात्कार करणार्‍या उद्योगपती मालकाच्या विरोधात ती हिंमतीने लढा देते. अशा केसच्या कायदेशीर खाचाखोचा, गुन्हेगाराने विकत घेतलेली भ्रष्ट यंत्रणा, अशा घटनांच्या सामाजिक प्रतिक्रिया बीभत्स न  होऊ देता प्रश्नाची दाहकता जाणवत राहील अशा प्रभावीपणे चित्रित केल्या आहेत. पटकथेवर घेतलेली मेहनत स्पष्ट दिसते. आपल्याकडे कित्येक हिंदी मालिका अजूनही काली जादू, नागीन, मणी, खजाना, पुरखोंकी हवेली, डायन अशा वेडपट गोष्टींमध्ये अडकून पडल्या आहेत. 

परिचित संस्कृती व भाषा 
एके काळी आपल्याच देशाचा भाग असलेल्या प्रदेशाबद्द्ल भारतीयांना वाटणारं एक अनामिक औत्स्युक्य हे पाकिस्तानी मालिकांना/ त्यावर आधारित सोशल मिडिया रील्सना मिळणार्‍या प्रतिसादाचं कारण असावं. 
पाश्चात्य मालिकांच्या तुलनेने या मालिकांमधली ’ब्राऊन’ माणसं, परंपरा, ते जग रिलेटेबल  वाटतं असं जेन झीचं म्हणणं आहे. 

यातल्या स्त्री पात्रांचे (पुरूषांचे देखील) कपडे, पात्र अत्याधुनिक असलं तरीही अंगभर असतात. आखूड कपडे घालणं म्हणजे जीवाला धोका त्यामुळे त्या धजावतही नसाव्यात. कपडेपट उत्तम पण वास्तववादी असतो. 
ग्रामीण पद्धतीची श्रीमंती दाखवायची म्हणून भुवनेश्वरीसारखं एकाचवेळी ८, १० सोनेरी पॉलीशच्या माळा घालून नटून बसलेलं अतार्किक पात्र मला त्यांच्या ब दर्जाच्या मालिकांमध्येही दिसलं नाही. काही बायका भुवनेश्वरीच्या साड्यांसाठी मालिका बघत म्हणे. पाक मालिका उत्तर भारतीय स्त्रियांमध्ये विशेष लोकप्रिय असल्याच हे ही कारण नाकारता येत नाही कारण पिंटरेस्टवर मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी सूट्स म्हणजे सलवार कमीज सर्च केले जातात. 

हिंदी सिनेमांच्या वेडामुळे भारतीयांना फारसी, उर्दू मिश्रीत हिंदी सहज कळते. अ‍ॅक्सेंटशी झटापट करायची किंवा सबटायटल वाचत वरच्या स्क्रीनकडे पाहायची कसरत करावी लागत नाही. ’चश्मदीद गवाहोंके बयानात को मद्दे नजर रखते हुए अदालत इस नतीजे पर पहुंची है की ...’ असले भरभक्कम संवाद आपल्याला लहानपणी सुद्धा समजत. भारतात केबीसी लोकप्रिय असण्याचं श्रेय अमिताभ बच्चन यांच्या वलयाइतकंच त्यांच्या उत्तम भाषेलाही जातं. भारतीय मालिकांमधली भाषा मात्र फारच साधारण असते. 
आपल्याकडॆ बातम्यांचे निवेदक वापरत असलेल्या ’विरोधक गये बौखला’ किंवा ’निश्चितच..आज या ठिकाणी पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणावर साचलेलं आहे’ अशा किंवा मराठी मालिकांमधल्या ’काय तुला जेवण बनवता येतं?’ या भाषेच्या तुलनेने  पाक मालिकांमधली आदबशीर उत्तम भाषा ऐकायला भारदस्त आणि गोड वाटते. त्या पात्रांच्या तोंडून, ’अब दिल्ली दूर  नही’ सारखे वाक्प्रचार ऐकताना गंमत वाटते. 
मराठी मालिका चांगल्या, वाईट कशाही असल्या तरी त्यांची शीर्षकगीतं नेहमीच सुरेल असतात. पाकिस्तानी मालिकांचीही शीर्षकगीतं किंवा थीमसॉंग म्हणता येईल, श्रवणीयच नव्हे अर्थपूर्ण असतात. गंधाळला, गहिवरला, मंद, धुंद, नक्षी, पक्षी, चिंब ,बिंब ... या पलीकडे जाणारं चांगलं काव्य त्याच्या गाभ्यात असतं. त्यामुळे नुसत्या शीर्षकगीतांच्या व्हिडिओंनाही लाखो लाईक्स मिळालेले दिसतात. 

याचा अर्थ पाकिस्तानी मालिकांमध्ये उणीवा, विरोधाभास नाही असं मुळीच नाही.  
भारतातल्या केंद्रविरोधकांना ’हिजाब’ हा वैयक्तिक निर्णय असल्याचा शोध लागला आहे. पाकिस्तानी मालिकांमधल्या नायिका मात्र बुरख्यात नसतात. 
आई, आजीच्या भूमिका करणार्‍या स्त्रिया मध्यमवर्गीय दाखवलेल्या असल्या तरच बाहेर पडताना चादर/ बुरखा घालताना दिसतात. काही व्हिडिओंवरून बहुतांश पाकिस्तानी स्त्रिया किमान डोक्यावरून ओढणी, स्कार्फ घेताना दिसतात. खरं तर तिथल्या बहुसंख्य स्त्रियांना शिक्षण, आरोग्य, निर्णयस्वातंत्र्याच्या हक्कासाठी लढावं लागतं आहे, काहींना तर लढायचं असतं हे ही माहीत नाही. मालिकांमध्ये तसं क्वचित दिसतं. त्यांना नायिका हटके स्वरूपात दाखवायच्या आहेत हे लक्षात येतं.
अर्थात नायिका कितीही आधुनिक, स्वतंत्र बाण्याची असली तरी ’तलाक’ प्रकरणाची तिला भयंकर धास्ती दिसते. एकूण बहुपत्नीत्व मालिकेतल्या स्त्री-पात्रांना सपशेल अमान्य आहे. 
स्मिता पाटील एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या," सिनेमा संपल्यावर बायका रडत, डोळे पुसत बाहेर पडल्या तर तो सिनेमा हमखास यशस्वी होणार अशी सिनेमाक्षेत्रातल्यांची धारणा असते". हे मराठी, अन्य प्रादेशिक भाषेतल्या आणि हिंदी मालिकांइतकंच काही क दर्जाच्या पाकिस्तानी मालिकांनाही लागू पडतं. फरक एवढाच की मंगळसूत्र हातात धरून ’तुला याची ताकद माहीत नाही’ वगैरे इमोशनल डायलॉग पाकिस्तानी नायिका मारत नाहीत. त्या बिचार्‍याही राहत नाहीत. त्या लढा देतात, सूड घेतात किंवा प्रश्नावर पाय देऊन पुढे जातात. 

भारतीय मालिकांमध्ये बंगाली, मराठी, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय अशी वेगवेगळी पार्श्वभूमी असते. त्यानुसार प्रथा, वेशभूषा, भाषा, पदार्थ यातला फरक स्पष्टपणे दिसतो तसं पाकिस्तानी मालिकांमध्ये भौगोलिक वैविध्य अजिबात दिसत नाही. एकच बिर्याणी वेगवेगळ्या डिशमधून वाढल्यासारखं वाटतं. 
दोनच शहरं दिसतात किंवा भासतात. इस्लामाबाद आणि मुख्यत: कराची. 
बाकीचा पाकिस्तान मालिकांच्या खिजगणतीत नाही. पाकिस्तान जणू दुबई असल्यागत यातल्या पात्रांची जीवनशैली दिसते. इनडोअर सीन चकचकीत तर आउटडोअर सीनमध्ये बकालपणा दिसतो त्यामुळे आउटडोअर सीन अगदी कमी असतात. 
खेड्यातली कथानकं जवळपास नाहीतच. याचा अर्थ खेड्यातल्या वास्तवाचं चित्रण तिथल्या प्रेक्षकांना आवडत नसावं. तुलनेने हिंदी, मराठी मालिकात खेड्यांची पार्श्वभूमी बर्‍याचदा यशस्वीरित्या वापरलेली दिसते. 
या मालिकांमध्ये काही वेळा दिसणारी, जगातील बहुतेक संस्कृतींनी निषिद्ध मानलेली नाती जसं चुलतभावंडांनी एकमेकांवर प्रेम करणं, लग्न करणं वगैरे आपण तटस्थपणे पाहिली तरी आपल्याला असह्य वाटतात. अशी कथानकं भारतात व अन्य संस्कृतींमध्ये तग धरू शकणार नाहीत. 

यातली नायिका कंपलसरी पिट्ट गोरी असते. मराठी मालिकेत खोट्या काळ्या केलेल्या नायिका दाखवायची टूम आली आहे त्याच्या उलट. सर्वसामान्य पाकिस्तानी स्त्री निमगोरी असते. अशा वर्णाच्या अभिनेत्रींना कायम दुय्यम भूमिकाच कराव्या लागतात अशी खंत त्या बोलून दाखवतात. यांचा मेकअप मात्र कथानकानुरूप ,अतिशय नैसर्गिक वाटतो. 
यातली सगळी श्रीमंत पात्र महागड्या परदेशी काळ्या गाड्यांमधून फिरतात. त्यांच्या मागे पुढे कायम बंदूकधारी खाजगी सुरक्षारक्षकांच्या ओपन जीप असतात. हे दृश्य इतकं कॉमन आहे की त्यावरून तिथल्या प्रतिष्ठेच्या कल्पनांचा आणि विदारक सामाजिक स्थितीचा अंदाज येतो.  
 ’केस नं ९’ मधल्या एका जोडप्याचं नाव ’रोहित-मनीषा’ आहे. हा एकमेव अपवाद मला आढळला. कॉमेंटमध्ये अनेक मुस्लीम नावाच्या व्यक्तींनी त्यावर प्रश्न उपस्थित केलेला दिसला. 

मी या लेखासाठी जेवढ्या मालिका स्क्रोल केल्या किंवा त्यातली निवडक दृश्य पाहिली त्यात भारतीय संदर्भ मला तरी सापडले नाहीत. आपल्याकडे भारत-पाकिस्तान संबंधांवर अनेक चित्रपट येऊन गेले असले तरी दूरदर्शन काळातली ’तमस’, बुनियाद वगळता मालिकांमध्ये पाकिस्तानचा उल्लेख, संदर्भ नसतो. 
फाळणीपासून ते पहलगाम घटनेपर्यंत भारताला अत्यंत तापदायक ठरलेला पाकिस्तान, समन्वयाचे फोल ठरलेले प्रयत्न, पाकिस्तानाला ग्रासून टाकणारे लष्कराचे, जिहादींचे वर्चस्व, धर्मांधता, आर्थिक अडचणींनी अर्धमेला झालेला पाकिस्तान. यातले काही चुकूनही या वास्तववादी म्हणवणार्‍या मालिकांमधून डोकावत नाही. त्याअर्थाने या मालिकांना पलायनवादी म्हणता येईल. उलट या ताणातून ब्रेक मिळावा म्हणून पाकिस्तानी जनता या मालिकांमध्ये विरंगुळा शोधत असावी. 
मालिकांमध्ये यूकेचा/इंग्लंडचा उल्लेख हमखास असतो. एक तरी पात्र तिथे राहत असतं. भारताचा उल्लेख नसतो हे एका अर्थी बरंच म्हणता येईल कारण या माध्यमातून जर भारतविरोधी आशय भारतीय जेनझी पर्यंत या मालिकांनी पोचवायला सुरूवात केली तर भारताच्या शिरावर त्याचा बीमोड करण्याचं नवं ओझं येऊन बसेल. 

बदलत्या जगाची नोंद पाकिस्तानी मालिकांनी घेतली नाही तर आज लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या या मालिका तुम ता ना ना ना करत जिन्यावरून गडगडत सुमार हिंदी-मराठी मालिकांच्या रांगेत येऊन बसतील ही शक्यता मात्र नाकारता येत नाही.
उत्तम कलाकृतीचा उद्देश असतो माणसाची आयुष्याविषयीची समजूत वाढवणं. भारतीय मालिका जगताला हे उद्दिष्ट गाठता गाठता क्रिकेटप्रमाणे त्यांना याही क्षेत्रात नमवायचं असेल तर त्यांना कमी न लेखता आपली रेष मोठी आणि सर्जनशीलतेचं आकाश अधिक उत्तुंग करावं लागेल. गुणवत्तेशी स्पर्धा फक्त गुणवत्तेनेच करता येते. 
----------- 
#pakdrama 
 (पूर्वप्रकाशित -दौत लेखणी त्रैमासिक) 

Thursday, August 15, 2024

गाव कारागीर

 ’खेडय़ास देव निर्मि, नगरास निर्मि मनुज’ - शहर आणि गावे यांच्यातला फरक आचार्य विनोबा भावे यांनी अशा नेमक्या शब्दात सांगितला आहे.  याच्या गर्भितार्थाकडे पाहिले तर खेड्यातील एकेकाळची नैसर्गिक, परस्परावलंबी जीवनशैली आणि शहरातील कृत्रिम, यंत्राधारित जीवनशैली यातला फरक स्पष्ट होईल.  बलुतेदारी हा खेड्यातील अर्थव्यवस्थेचा व बर्‍याच अंशी स्वयंपूर्णतेचा कणा होता. कृषीसंस्कृतीच्या आसावरचे वेगवेगळे गाव-कारागीर म्हणजे खरे तर व्यावसायिक होते. दुर्दैवाने त्यातून जाती निर्माण झाल्या. समाजात भिनत गेलेला जातीभेद आणि बदलत्या काळाशी जुळवून घ्यायला आवश्यक असलेल्या सक्षमतेचा अभाव यामुळे बलुतेदारीला घरघर लागली. 

या पार्श्वभूमीवर गाव-कारागीरांची सद्यस्थिती, कामाचे स्वरुप, परंपरा, कालच्या-आजच्या पिढ्यांमधील विचारांचा फरक असे विविध कंगोरे घेऊन आकाराला आलेले मह्त्वाचे पुस्तक म्हणजे सीमा शेटे-रोठे लिखित ’गाव कारागीर’. कुंभार, चांभार, लोहार, सोनार, सूप -टोपल्या तयार करणारे बुरुड , सुतार, कातडं कमावून वाद्य तयार करणारे, रंगारी, धोबी, नाभिक, पाथरवट आणि कासार हे ते कारागीर.

लेखिकेचा लहान वयापासून ग्रामीण व कृषीसंस्कृतीशी निकटचा संबंध असल्याने या पुस्तकाला एखाद्या रुक्ष वृत्तपटाचे स्वरुप न येता आस्थेचे अस्तर लाभले आहे. गाव- कारागीरांशी नागरी व्यक्तीचा थेट संबंध फारसा येत नाही.  घरी मंगलकार्य ठरल्यास त्यासाठी लागणार्‍या सुपापासून जोडयांपर्यंत आणि ब्रँडेड दागिन्यांपासून आधुनिक फर्निचरपर्यंत सगळे काही ऑनलाईन विकत घेणार्‍यांचा तर नाहीच नाही. अशा मंडळींना अज्ञात असलेल्या एका श्रमिक जगताचा या पुस्तकाच्या माध्यमातून लेखिकेने सहजपणे वेध घेतला आहे.  प्रत्येक कारागीरीवर एक स्वतंत्र लेख असल्याने जिज्ञासू वाचकाला बरीच नवीन माहिती त्यातून मिळू शकेल. यातील काही लेखांमध्ये शेवटी केलेली टिप्पणी अंतर्मुख करते. या मिडिया वॉच’ प्रकाशित पुस्तकाला डॉ. श्रीकांत तिडके यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली आहे. गजानन घोंगडे यांचे सूचक मुखपृष्ठ वाचकाला आशयापर्यंत पोचवण्याचे लेखिकेचे काम सोपे करते. 

आकाशवाणीवर उद्घोषिका म्हणून काम केल्याचा तसेच विविध प्रकारच्या लेखनाचा अनुभव सीमा शेटे- रोठे यांच्या गाठीशी असल्याने पुस्तक संवादी व प्रभावी झाले आहे. ग्रामीण किंवा निमशहरी जीवनाबद्द्ल बर्‍याच शहरी मंडळींच्या हिरव्या- हळव्या- स्वप्नाळू कल्पना असतात. लेखिकेने रेखाटलेले कारागीरांचे शब्द- जीवन चित्र भाबडे, काव्यमय, काल्पनिक किंवा केवळ स्वत:च्या आकलनापुरते मर्यादित नाही.  ते कारागीरांच्या थेट मुलाखतीच्या स्वरुपात म्हणजे ’फ्रॉम द हॉर्सेस माऊथ’ असल्याने वास्तवतेच्या पायावर उभे आहे. हे या पुस्तकाचे बलस्थान आहे. 

’ग्रामोद्धारा’चा विचार मांडताना विनोबांनी एक वस्तुनिष्ठ प्रश्न मांडला होता. तो म्हणजे -खेड्य़ातली लक्ष्मी जाते कुठे! ते म्हणत, " त्या वाटा बंद करा म्हणजे ती खेडयात राहील. ती बाहेर जाते ते या ५ मार्गांनी - बाजार, लग्न व्यवहार, सावकार, सरकार आणि व्यसने. मीठ मसाले रॉकेल सारख्या दोन चार गोष्टी सोडल्या तर सारे काही गावात तयार करता आले पाहिजे. परस्पर व्यवहार सुरू झाला तर ’महाग’ हा शब्द ही हद्दपार होईल." या संकल्पनेची व्यवहार्यता कदाचित अर्थतज्ज्ञच सांगू शकतील परंतु या ५ कारणांचा कारागीरांच्या जीवनावर काय परिणाम झाला आहे याचे दाखले या पुस्तकातील लेखांमध्ये ठायी ठायी विखुरले आहेत. 

 ’पांढरीवर घर नाही आणि काळीवर वावर नाही’ म्हणजेच हक्काचे घर किंवा जमीन नाही, अशा शब्दातून या कारागीरांचा सल लेखिका उघड करते.  ’छिलताना हाताले लागते. बिबा लावायचा बस्स. दवाखाने आम्हाला परवडत नाही, पैसाबी नाही’ म्हणणारा बुरुड समाजाचा कारागीर यात आहे. सोनार, लोहार, सुतार, तांबट आणि शिल्पकार ही विश्वकर्म्याची पाच मुले आहेत, असा उल्लेख विश्वकर्मा ग्रंथात असल्याची मान्यता पाथरवट समाजात आहे. ’शासनाच्या योजना काही असतील तर  त्या आम्हाले माहित नाही’ ही या विश्वकर्म्त्याच्या लेकराची व्यथा आहे. त्याचे स्वत:चे लेकरु "दोन दोन किमी चालत शाळेला जाते, एकटं हायवेने जाते, ते घरी येईपर्यंत जीव धाकधुक करते" म्हणणार्‍या पाथरवट कारागीराची तगमगही या पुस्तकात व्यक्त होते.  

अशा रखरखीत परिस्थितीतही हे कारागीर आपल्या जीवावर सावली धरू शकतात ते प्रथा-परंपरा-रिवाजांच्या आधाराने.  त्यातूनच विश्वकर्मापूजन करुन कामाला लागण्याची कुंभारांची प्रथा या पुस्तकातून माहित होते. चर्मकार समाजात हुंडा दिला घेतला जात नाही, उलट नवरीला देता येईल तितकं देण्याचा प्रयत्न सासरची मंडळी करतात हे वाचून नवल वाटतं. लोहार समाजात तर म्हणे वधूला  मोरपीस देऊन ’अशा सुंदर सुंदर जागी मी तुला घेऊन जाईन’ असे वचन वर देत असतो. समाजाची खूण म्हणून जन्मानंतर २१ व्या दिवशी बाळाच्या पाठीवर लोखंडाच्या छडीचा डाग देण्याची अजब प्रथाही काही लोहार पाळतात. गावात काही कार्य असले की ’चुलीला’ म्हणजे घरातील सर्वांना आमंत्रण देण्याची जबाबदारी नाभिकाची असे हे बहुतेकांना माहित असते. पूर्वी कोकणात घरोघरच्या कर्त्या पुरुषाला ओवाळणं हा कोकणातील परीट स्त्रियांचा मान असे तर विदर्भात लग्नकार्यात कंकण बांधण्याचा. बलुतेदारीने अशी व्यवहाराच्या पलीकडे जाऊन घातलेली नातेसंबंधांची आगळीवेगळी वीण या पुस्तकातून कळते तसेच ती विसविशीत होत चालल्याची कारागीरांना वाटणारी खंतही. 

कारागीरांच्या कामाशी संबंधित असलेले पण आपल्या नेहमीच्या बोलण्यातून अस्तंगत होत चाललेले कितीतरी शब्द या पुस्तकातून नव्याने भेटतात. उदाहरण द्यायचे तर लाकडी चाकाला आतून लोखंडी वाट आवश्यक असते. अरे हो, तिला ’धाव’ म्हणतात हे लोहारांविषयी वाचताना लक्षात येते. त्यांच्याशी संबंधित भट्टी, ऐरण, भाता, जंतरपट्टी , पकड यांसारखे शब्द किंवा चर्मकाराची रापी, आरी, सस्ती यासारखी आयुधं, बुरुडकामातून तयार होणारी रोजच्या वापरातली दवडी, लक्ष्मीपूजनाला मानाचा समजला जणारा फडा अशा कितीतरी शब्दांची लेखिकेने पुनर्भेट घडवली आहे. प्रत्येक कारागीर समाजात एक आराध्यदैवत असते. मग ते सोनार समाजाचे नरहरी सोनार असतील किंवा नाभिकांचे सेना महाराज.  विहित कर्माची सांगड आध्यात्माशी घालणारा सेना महाराजांचा साधासा अभंगही या पुस्तकात अवचित भेटतो.

आपल्या वाडवडिलांकडून आलेला कलेचा, कृतीपद्धतीचा वारसा सांभाळताना  तर दुसरीकडे नवनव्या आव्हानांना सामोरे जाताना होणारी गाव-कारागीरांची परवड संवेदनशील वाचकाला या पुस्तकाच्या माध्यमातून एका वेगळ्या जगाचे दर्शन घडवते.  बलुतेदारीच्या काही अज्ञात पैलूंचे दर्शन होते.  जेवताना पानात काही टाकले तर त्यामुळे शेतकर्‍याच्या बैलापासून पाकसिद्धी करणार्‍या आईपर्यंत अनेकांची मेहनत आपण बुडवतो आहोत असा त्याचा अर्थ होतो, असे विनोबा का म्हणत त्याचा आपसूक खुलासा होतो. या दिवाळीत पणत्या, केरसुणी (फडा), सुपली इ. वस्तू रापलेल्या हातांकडून विकत घेताना हे पुस्तक आठवेल आणि  घासाघीस करावीशी वाटणार नाही हे निश्चित.