Saturday, January 15, 2022

बदामी

 

’बदामी’च्या इटुकल्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर येऊन गाडीसाठी थांबलो तेव्हा फार काही वेगळं दिसत नव्हतं. ये कहाँ आ गये हम! असं वाटेतो तिथून रिसॉर्टकडे जाणारा रस्ता लागला तेव्हा मात्र दुतर्फा हिरवीकंचं भातशेतं आणि त्यामागे महाकाय बदामी लालसर तपकिरी रंगाच्या दगड- शिळा- पहाडांच्या रांगा दिसायला लागल्या.

 पुढे पट्टदकल - ऐहोळे मार्गे हम्पीपर्यंत या बदामी दगड- शिळा- पहाडांच्या राशींनी आणि त्यातूनच साकार झालेल्या अद्भुत लेण्या, गूढ गुहा, देवादिकांच्या रेखीव मूर्ती, नजर पोचेल तिथवर विलक्षण कोरीव नक्षीदार कारागिरीने मढलेली गोपुरं, वेगवेगळ्या शिल्पशैलीत घडवलेल्या देवळा-मंदिरांनी सगळा परिसर कवेत घेतला आहे. लोककथा आणि पुराणकथांमध्ये उल्लेख असलेल्या काळाचे पडसाद इथल्या कलाकृतींवर उमटलेले दिसतात. इतिहासाचे दाखले दिसतात. हा परिसर वैभवशाली हिंदू साम्राज्याच्या गौरवास्पद खुणा मिरवतो त्याचबरोबर आक्रमकांनी केलेल्या विध्वंसाच्या क्लेशदायी जखमा देखील. 


इतिहास, पुरातत्त्वशास्त्र, स्थापत्यशास्त्र, वास्तुरचना तसेच वेगवेगळ्या कलांमध्ये रस असणार्‍य़ांनी, स्वत:मध्ये रमायला आवडणार्‍यांनी इथे आवर्जून यावं. टूर म्हणजे डान्स, मस्ती, कल्लाच हवा अशी अपेक्षा असणारी, ’तुटक्या कळसात- दगड धोंड्यात काय पाहायचं’ किंवा ’बापरे अजून किती चालायचंय?’ म्हणणारी मंडळी, ये आपके लिए नही है। मैत्रिणींसह केलेली मागची गोवा ट्रीप म्हणजे आतून बाहेरचा प्रवास होता. ह्म्पी-बदामी हा बाहेरुन आतला प्रवास आहे. गोव्याहून आल्यावर काही दिवस आम्ही मनातल्या मनात नुसते नाचत होतो. हम्पीहून आल्यावर मूक झालो आहोत. अर्थात निघताना आमचा ’लेट्स एक्स्प्लोर’ एवढाच साधा सोपा उद्देश होता. बाकी मिळालं ते सगळं बोनस.

Staircases between caves

राहण्यासाठी ’होम स्टे’चा पर्याय निवडला तर स्थानिक संस्कृतीशी, भूभागाशी आपण जास्त चांगले कनेक्ट होऊ शकतो पण त्यासाठी निवांत मुक्काम हवा. इथे खायला जगभरातले पदार्थ उपलब्ध असले तरी तिथल्या लुसलुशीत ’आप्पे’ आणि खरपूस ’अक्की रोटी’ ची चव काही वेगळीच. बिसीबेळी भात खायचा तेवढा राहिला. तिथल्या उपाहारगृहात विशेष आवडलेली गोष्ट म्हणजे जपानी चहापानात वापरतात तशी बुटकी लांब टेबल्स. बाजूला मस्तपैकी मांडी घालून बसायचं. ताटलीत हिरवंगार तुकतुकीत केळीचं पान ठेवून ते वाढणार. दुपारच्या जेवणात आम्ही शक्यतो स्थानिक पदार्थांना प्राधान्य द्यायचो. कर्नाटकमधली स्वच्छता आणि शासनाच्या पर्यटन विभागाची कामगिरी आजही चोख आहे. प्रत्येक महत्वाच्या स्पॉटसाठी व्यवस्थित पार्किंग आणि प्रसाधनगृहाची सोय. माहितीचे आवश्यकतेनुसार फलक. आधीच्या कूर्ग-उटी-म्हैसूर ट्रीपमध्येही ही वैशिष्ट्य जाणवली होतीच. 

Astonishing carving in the caves
 बदामी, पूर्वी वातापी म्हणून ओळखले जाई. कर्नाटक राज्यातल्या बागलकोट जिल्ह्यातलं बदामी इ.स. 540 ते 757 पर्यंत चालुक्य राजवटीचं राजधानीचं शहर होतं. चालुक्य वंशातील पुलकेशीन (पहिला) याने ही राजधानी स्थापन केली. त्याचा मुलगा कीर्तिवर्मन (पहिला) याने पुढे तिथे गुहा, मंदिरं निर्मिली. पल्लवांनी इ.स 642 मध्ये बदामी काबीज केले परंतु पुढे इ.स 654 ला पुलकेशिन (द्वितीय)चा मुलगा विक्रमादित्य याने त्यांचा पराभव केला. कंटाळू नका. सोळाव्या लुईइतकं लांबलचक प्रकरण नाही हे. त्यानंतर बदामीवर राष्ट्रकूटांनी राज्य केलं व नंतर त्याचा विजयनगर साम्राज्यात समावेश झाला. पुढे मुघल आक्रमणापासून इंग्रजी अंमलापर्यंत शहराची बरीचशी वाताहत झाली. एके काळच्या राजधानीच्या राजस खुणा मात्र बदामीत जागोजागी आहेत. 

बदामीत विशेष काय बघायचं - एकदा तिथल्या बदामी केव्हज जवळ गाडी पार्क केली की म्युझीयम, अगस्त्य लेक, भूतनाथ मंदिर आणि बदामी किल्ला सगळं जवळपास आहे आणि पायी चालत पाहायचं आहे. बदामीत माकडांचा सुळसुळाट आहे. केव्ह समोरच्या परिसरात गाई, बकर्‍या, क्वचित डुकरं आणि चपळ माकडं पर्यटकांसह गुण्यागोविंदाने नांदत असतात. अनघाची पर्स एका माकडाने ओढली, दुसर्‍याने पाडली, तोवर आम्ही त्यांच्या वरताण कलकलाट करुन ती ताब्यात घेतली. बदामीतली बाकी सर्व स्थळं मग आम्ही आपापल्या पर्सला मिठी मारुन दुसरा डोळा माकडांवर ठेवूनच पाहिली. हा माकडांचाच प्रदेश आहे पण प्रत्येक ठिकाणच्या माकडांचं वागणं मात्र वेगळं आहे. आपण पुणेरी असे, नागपुरचे तसे म्हणतो तसंच काहीसं. 

Badami Caves

तर- बदामी केव्हज ! अवाढव्य बदामी दगडात कोरलेली ही ४ लेणी आहेत. पहिली आणि दुसरी लेणी उत्तर दख्खन शैलीत कोरली आहे तर तिसरी लेणी नागरा आणि द्रविड शैलीत. पहिली तीन लेणी हिंदू प्रतीकं दर्शवतात तर चौथी लेणी जैनांची आहे. पायवाटेवरचे दगड राखाडी आहेत. इथलं कोरीव काम अत्यंत रेखीव आहे आणि विशेष म्हणजे प्रमुख शिल्पकारांचा- कारागिरांच्या नावाचाही तिथे उल्लेख आहे. अभंगातल्या तुका म्हणे, नामा म्हणे सारखी शिल्पकारांची ’सिग्नेचर’ तिथे पाहून फार बरं वाटलं. पहिली केव्ह काहीशी अनाकर्षक किंवा साधारण वाटली. मग वर वर एक एक केव्ह पाहत जाऊ लागलो तसतसं त्यातली विलक्षण कलाकारी, त्या दगडाचा थंडगार स्पर्श, तिथून अद्भुत दिसणारा अगस्त्य लेक हे सगळं फारच विलोभनीय वाटू लागलं. केव्ह उतरल्यावर समोरच एक दगडी लालसर कोरीव खांबांवर राखाडी पांढरा घुमट असलेली मशीद दिसली. अशा चमत्कारिक रचनेवरुन तो घुमट देवळाचा कळस उद्ध्वस्त करून बांधला असावा हे उघडच आहे. अशा विचित्र विसंगत वास्तू पाहून वाईट वाटलं. मशिदीजवळून पुढे लहान गल्ल्या आणि बारक्या बकर्‍यांमधून वाट काढत आम्ही म्युझियमपाशी पोचलो.

 वाटेत एक सुघड, तीन कळसांचं सुरेख मंदिर उन्हात चमकत होतं. त्याच्या अगदी समोरच्या घरातली बाई तिकडे पाठ करुन लाल मिरच्या सुकवायला पसरत होती. अभिषेक ऐश्वर्याच्या सौंदर्याचं रोज रोज काय कौतुक करणार म्हणा ! तसंही कलाबिला या सगळ्या भरल्या पोटी आणि फावल्या वेळात करायच्या गोष्टी असतात.


म्युझियम अगदी आखीव नेटकं आहे. भटक्या आदिमानवापासून उत्क्रांत होत गेलेल्या आजच्या माणसाचा परामर्श उत्खननातून सापडलेल्या त्याच्या प्रगती आणि अधोगतीच्या खुणांची मांडणी करून घेण्यात आला आहे. तत्कालिन नाणी, हत्यारं, वस्तू अंदाजे त्या त्या कालखंडाचा उल्लेख करुन व्यवस्थित काचेआड ठेवलेल्या आहेत. त्यासह अनेक सुस्थितीतील मूर्ती, काही खंडलेल्या मूर्ती ,स्थापत्यशैलींचे विविध नमुने तिथे ठेवलेले आहेत. तीर्थंकरांच्या एका सुबक मूर्तीपाशी दोनच साध्या ओळी लिहिल्या होत्या. हे जग-भवसागर म्हणजे तीर्थ, यातून पार होऊन किनार्‍यावर (मोक्षाप्रत) नेतो तो तीर्थंकर. 

Badami fort Entrance

म्युझीयमच्या समोरच दुपारच्या उन्हात चमकणारा अगस्त्य लेक आणि उजवीकडे बदामी किल्ल्याचं प्रवेशद्वार. दारातल्या उंच दगडी पायर्‍यांवर ’वेडा राघू’ बघत विसावलो. मग किल्ला चढून एक एक कातळ ओलांडत पार वरच्या देवळापर्यंत गेलो. तिथून आता मघाशी पाहिलेल्या केव्हज समोर दिसत होत्या साधारण किल्ल्याइतक्याच उंचीवर. खाली प्रवेशापाशी बसलेले २ चौकीदार सोडले तर किल्ल्यावर फक्त आम्हीच होतो. ओमायक्रॉनमुळे असेल किंवा नाताळच्या सुट्ट्या संपल्यामुळे असेल पर्यटकांची संख्या रोडावली होती. पुलकेशीनने बांधलेल्या या किल्ल्यावर मध्ये आणि अगदी वर असे दोन भव्य आणि आता काहीसे भग्न शिवालय आहेत. त्याला तिकीट विक्रेता आप्पर एन लोव्वर पॉइंट म्हणत होता.
Straightening huge rocks at Badami fort

आम्हाला लव्हर पॉईंट ऐकू आले. आम्ही तिथे असताना अचानक लालतोंड्या मोठाल्या माकडांच्या आपसात हाणामार्‍या सुरु झाल्या. मी कड्यावरच्या पट्टीवर उभी असताना त्यापैकी एकाने जवळ धपकन उडी मारली. आम्ही दोघेही एकमेकांना घाबरुन त्या पट्टीवर खो खो खेळू लागलो, शेवटी मी कशीबशी खाली उडी मारली. दरीत नव्हे. त्यांचे कर्कश्य चीत्कार ऐकून आमची इतकी सटारली की आम्ही आप्पर पाईंटकडे जायचा विचार रद्द करून वेगात खाली उतरलो. 

Bhutnath Temple with Agastya Lake

समोरच्या अगस्त्य लेकला वळसा घालून भूतनाथ मंदिराकडे गेलो. तळ्याकाठी स्तब्ध उभं असलेलं हे निर्जन शांत सुघड मंदिर बदामीमधलं सर्वात देखणं दृश्य वाटलं मला. 
इ.स. ७००-७२५ च्या सुमारास हे बांधण्यात आलं. आत दगडी घडीव शिवलिंग आणि अश्राप चेहर्‍याचा सावळा काटकुळा पुजारी. या मंदिराच्या सभामंडपातून दिसणारी लगतची लहानशी मंदिरं, डावीकडे केव्ह, उजवीकडे किल्ला आणि समोर संथ तळ. हे तळं निसर्गनिर्मित आहे. अगस्ती ऋषींच्या नावावरुन त्याचं हे नाव पडलंय. इथे विष्णूपत्नी भूदेवी व लक्ष्मीचा वास असल्याच्या आणि इथल्या पवित्र पाण्याच्या प्राशनाने आजार बरे होत असल्याच्या कथा सांगितल्या जातात. सभामंडपात आम्ही बराच वेळ शांतता पीत स्तब्ध बसून राहिलो. पोटातले कावळे फारच ओरडू लागल्यावर नाईलाजाने निघालो. पुन्हा त्या बकर्‍या, गल्ल्या ओलांडत पार्किंगपाशी पोचलो. 

Local Irkal Saree shop

रिसॉर्टच्या मॅनेजरने त्याच्या (किंवा कमिशन असलेल्या) इरकली साड्य़ांच्या दुकानाचे कार्ड सकाळीच देऊन ठेवले होते. संध्याकाळी तयार होऊन आम्ही आधी बाणशंकरी देवीला गेलो. टिपिकल दक्षिण भारतीय देवस्थान. सकाळी कदाचित इथे खूप प्रसन्न वाटत असावं. आता मात्र बाहेरची दुकानं धूळभरली शटर ओढलेली. एक नवं जोडपं दर्शनाला आलेलं. बाईच्या सावळ्या चेहर्‍यावर कसलेही भाव नाहीत. केसात तिथल्या पद्धतीनुसार भरगच्च गजरे. पुरुष हातात नारळ धरून मख्ख उभा. मग अजून काही नातलग त्यांना चिकटून भराभर फोटो काढू लागले. बाकी शांतता. आत भगभगीत तरीही मलूल वाटणारे पिवळे दिवे. थंडगार फरशी. आडव्या बारच्या सहाय्याने तयार केलेली दर्शनबारी वगैरे. दगडी प्रवेशद्वाराला दिलेले कृत्रिम भडक रंग पाहून आमचा उत्साह बराचसा मावळला. शहाळं प्यायल्याने आणि इरकल खरेदीच्या आठवणीने तो पुन्हा उफाळून आला. 

परतीच्या रस्त्यावरच्या साडीच्या त्या दुकानात एकदम ८ बायका शिरलेल्या पाहून विक्रेती हरखली. तिने इरकल साड्यांची रास लावली पण तेच ते हिरवे, जांभळे रंग पाहून आम्ही बॅकसीटवर आलो. दुकानभर पसरलेल्या शेकडो साड्यांच्या ढिगामध्ये मुंडकं घालून मनासारख्या २ साड्या खरेदी करुन अखेर मीनल आणि मंजिरीने आमची लाज राखली. 
परतलो आणि रिसॉर्टच्या लॉनवर हुडहुडत्या थंडीत अखंड गप्पांमध्ये वेळ मिळेल तेवढं जेवलो. 8 पैकी चार जणी सासूग्रस्त व 4 नॉर्मल असल्याने सर्वांनी वक्ता श्रोता जोड्या लावून घेतल्या. श्रोत्यांना 'खरंय' किंवा 'हो का गं! 'एवढंच संभाषण allowed होतं.

बदामीतला मुक्काम सकाळी न्याहारीनंतर संपणार होता. दुसर्‍या दिवशी पट्टदकल आणि ऐहोळे ही दोन गावं बघायची होती. हम्पीबद्दलची उत्सुकता तर आता खूपच वाढली होती. 





#Hampi #Badami #Pattadakal #Aihole #UNESCO_world_heritage 


Friday, October 15, 2021

ते आणि आपण : US | India

 गेल्या काही लेखांमध्ये अमेरिकेतल्या फिलाडेल्फिया परिसरातली स्थळं आणि घटनांचं धावतं वर्णन होतं. आज मात्र फक्त काही तुलनात्मक नोंदींबद्दल.

दरम्यान एक सुंदर कॅथेड्रल पाहिले होते. गाभारा म्हणता येईल असा मुख्य भाग भव्य होता, छत मान दुखेल इतके उंच, सुरेख आरस्पानी कोरीव काम. तिथली प्रकाशयोजना तर खिळवून ठेवणारी होती. तळघरात Bishop धर्मगुरुंचे बाप्तीस्मा, लग्न, अंत्यविधी इ. प्रसंगानुसार वेगवेगळे पोशाख काचेच्या कपाटात टांगलेले दिसत होते. जवळच महिला प्रसाधनगृह होते. तिथे चक्क सॅनिटरी नॅपकीन्स ठेवलेले होते. कॅथेड्रलमध्ये !! मासिक धर्म व धर्म याची गल्लत न करता त्याचा इतका शांतपणे स्वीकार आपल्याकडे होईल का! गोव्याला मंगेशीच्या देवळाबाहेर ’अशा’ महिलांनी प्रवेश करु नये, असे स्पष्ट लिहिले आहे. अनेक धार्मिक ठिकाणी असे लिहिलेले असते किंवा अध्याहृत असते. जिला त्रास होतो, आराम हवा आहे ती अशा वेळी मंदिरात काय कुठेच जाणार नाही, जाऊही नये पण जी खास तिथे दर्शनाला आली आहे तिला या कारणाने दर्शन नाकारणे मग ते ’देवी’चे देऊळ असले तरी, हे सगळे अतार्किक तर आहेच पण दुर्दैवी आहे. ती सूचना वाचताना मला हे कॅथेड्रल पुन्हा आठवले होते.

मी आता सौ चिकन खाके शाकाहारी झालेली बिल्ली असल्याने रोजचे जेवण ही एक दिव्य परिक्षा असे. आपल्याकडे पाहुण्याला तो हात आडवा धरुन गयावया करेतो आग्रह केला तरच आपण चांगले यजमान असल्याचं सिद्ध होतं असं आपण मानतो, त्यात अर्थात भारतीय आतिथ्यशीलतेचा भाग असतो हे खरंय तसंच वाढत्या वयाबरोबर आपल्याकडच्या आग्रहाची भीती वाटू लागते हे ही. इकडे आम्हाला किचनमध्ये कुठे काय आहे ते होस्ट दाखवून देत. स्वागताची मेजवानी आटोपली की त्यांचे कर्तव्य संपे. गोदरेज कपाटाहून मोठ्या फ्रीजमध्ये दूध, लोणी, जॅम, चीज, भाज्या, ज्यूसेस आणि सॉसेस हे किमान असायचेच. घरात पाव आणि तांदूळ असत. त्यामुळे पोळी जरी मिळत नसली तरी आम्ही संशोधन करुन बरेच इंडोवेस्टर्न खाद्यप्रकार शोधून काढले. बाहेर गेलो की मात्र आमची विशेषत: माझी पंचाईत होई. मोठ्या क्लब मिटिंग असल्या की आपल्या अ‍ॅवॉर्ड फंक्शन सारखी गोल टेबलांची रचना असे. बोके आणि मांजरींना सुटाबुटात बसवले तर जसे दिसेल तशी मंडळी आजूबाजूला असत. ते खात असलेले पदार्थ अनोळखी असत. एकदा व्हेज प्लॅटर मागवली तर बशीत हे माँ माताजी!! उकडलेली भेंडी आणि परतलेली अळणी पानकोबी आली. बरं हॉटेलमधला मेनू पण इतक्या फॅशनेबल शब्दात लिहिलेला असे की त्यावरुन आत काय घातलंय याचा अंदाज येत नसे. धिप्पाड सहा फुटी वेटरशी एकमेकांना समजेल अशा इंग्लीशमधली चर्चा निष्फळ ठरली तर ज्यूस मदतीला येई. हॉटेलमध्ये आपल्याकडच्यासारखं पाणी आणून ठेवलेलं नसे. कोणतंही पेय इतकं काठोकाठ भरुन देत की आम्ही ’खाली ग्लास’ मागवून ते शेअर करत असू पण पानात काही टाकत नसू. त्यांना हे विचित्र वाटे कारण तिकडे सहसा आई पण मुलाचे उष्टे खात नाही. एकंदर ’टाकणे’ हा प्रकार तिकडे अगदी सर्वसामान्य आहे. टाकणं हा अन्नब्रह्माचा अपमान आहे मग बिल कुणी का देईना हे आम्ही त्यांना समजावून सांगत असू.आपल्याकडे सुद्धा अन्न टाकणे प्रकार असतोच पण अमेरिकेत दिवसभरात जितकी अन्नाची नासाडी दिसते त्यात एक विकसीनशील देश त्या दिवसापुरते पोट भरू शकेल असे वाटते. 

व्हिक्टर्स कॅफे नामक १०० वर्षांची परंपरा असलेल्या एका आगळ्यावेगळ्या उपाहारगृहात आम्ही गेलो होतो. आम्ही व फिली क्लबचे ५,६ जण मिळून. चपळ हालचाली करणारे चुणचुणीत वेटर आणि वेट्रेस अगदी तरुण विद्यार्थी असावेत असं वाटत होतं. अचानक घंटा घणघणली. दरवाज्यात उभ्या असलेल्या वेट्रेसने खड्या आवाजात एक छोटीशी कथा सांगितली. फ्रेंच राजकन्या आणि तिचं दुभंगलेलं हृदय असं काही त्यात होतं. हे सांगून होताच आम्ही दचकलो इतक्या तार स्वरात ती गाऊ लागली. आपल्या संगीतनाटकांमधल्या पदांसारखा हा ओपेरावजा गायनप्रकार होता. ती वेट्रेस त्याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेत होती असे कळले. असे अनेक होतकरु कलाकार तिथे गायक कम वेटर म्हणून काम करतात आणि आपली कला सादर करतात. हेच या कॅफेचं वैशिष्ट्य. इथला अनुभव म्हणे त्यांच्या कलाविश्वातील करियरमधला मह्त्वाचा टप्पा मानला जातो. तसंही तिथे कामाचा आणि खानदान की इज्जतचा काही संबंध नसतो. एका उच्चभ्रू जोडप्याने तर आम्हाला त्यांची मुलगी सकाळचं कॉलेज आटोपल्यावर संध्याकाळी जिथे वेट्रेस म्हणून काम करायची त्या रेस्टॉरंटला आवर्जून जेवायला नेलं होतं. (तर हे गायन प्रकरण आटोपल्यावर आमच्या ग्रुपमधल्या एकाचा वाढदिवस केक मागवून आम्ही साजरा केला आणि ’बार बार दिन ये आये’ हे आपलं युगानुयुगाचं कंपलसरी बड्डेसॉंग कोरस मध्ये म्हटलं. उपस्थितांसाठी अगम्य असणार्‍या या गाण्यात शेवटी ’हॅपी बर्थडे टू यू’ हा भाग इंग्लीशमध्ये असल्याने सर्वांना कळला आणि अख्ख्या हॉटेलमधल्या मंडळींनी टाळ्या पिटून ग्लासेस उंचावून त्याला विश केलं.) कोणत्याही कामाला कमी न लेखणे हा अमेरिकेचा मला सर्वात आवडलेला गुण.

एका ग्रामपंचायतीला (नाव टाळते आहे) भेट दिली असताना तिथल्या समुपदेशिकेला गावातल्या सोयी आणि समस्यांबद्द्ल विचारले. एक तर अशी पोस्ट तिथे असणं हे मला नवलाईचं वाटलं. आपल्याकडच्या पंचायत समिती किंवा तत्सम कचेर्‍यात गेल्यावर आपण अगदी अडाणी असल्याचं फीलिंग येतं. इकडे व्यवस्थित पाट्या, हसरी देखणी स्वागतिका. छताला झुलणारं एकही जाळं नाही, मध्ययुगीन काळातले वाटणारे निराशावादी पंखे नाहीत. फायलींवर धूळ असायला फायलीच नाहीत कारण सगळीकडे चकचकीत कपाटं. हा, तर त्या समुपदेशिकेला त्या पोस्टींगचं कारण विचारलं. ती म्हणाली, १२-१३ वर्षांच्या कुमारी माता ज्याला ते किड्स प्रेग्नंसी म्हणतात त्याचं प्रमाण खूप जास्त आहे. मोठ्या हॉस्पीटलमध्ये प्रसूतीचा खर्च प्रचंड. शाळेतल्या मुलींना लैंगिक शिक्षण देण्याऐवजी गर्भनिरोधक वाटावी लागणं, शाळेत सोबत कोणी हत्यार, बंदूक आणलेली नाही ना हे तपासण्यासाठी मेटल डिटेक्टर बसवावे लागणं ही तिथली शोकांतिका ऐकून धस्स झालं. योग्य अयोग्य याची निवड करण्याची समज वाढवण्याऐवजी ते तात्पुरती मलमपट्टी करतायत असं जाणवलं. नंतर सॅल्व्हेशन आर्मी (पुनर्वसन) केंद्र पाहिलं. तारवटलेल्या लालसर डोळ्यांचे, भकास चेहर्‍याचे गर्दुल्ले किंवा पियक्कड तिथे टीव्हीवर चमत्कारिक सिनेमा पाहत कसेही वेडेवाकडे बसले होते. कर्कश्य संगीत सुरु होतं. चित्रविचित्र कपडे, पिळापिळाच्या केशरचना, बहुतेक सगळे ब्लॅक. संसार टिकण्याचं प्रमाण कमी, पोरांचं लेंढार सांभाळत एकटं राहिलेल्या नशेच्या आहारी गेलेल्या, डिप्रेशनमधल्या जंकफूडच्या अतिसेवनाने लठ्ठ झालेल्या बायका, अशा एकल पालकांची भणंग बेकार अल्पशिक्षित मुलं. हे सुद्धा चकाकत्या अमेरिकेचं विदारक रुप आहे. आपल्याकडेही आता या समस्या खूप वाढत असल्या तरी याबाबतीत आपण त्यांच्यापेक्षा थोडे मागासलेले आहोत.

एका होस्टच्या मित्राला आम्हाला काही ठिकाणं दाखवायची जबाबदारी दिली होती. रस्त्यात मध्येच गाडी थांबवून त्याने आम्हाला एका घराशी नेलं. घर अगदी टिपिकल अमेरिकन पद्धतीचं. एका बाजूला गॅरेज, हिरवंगार लॉन, घराची पांढरी आणि राखाडी पण टवटवीत रंगयोजना. घर बंद होतं. मागच्या खिडकीत एक वेगळाच शोपीस लटकत होता. त्याने त्यावरुन हात फिरवला. ’अजूनही हा इथंच आहे’ म्हणत हसला. आम्हाला काही कळेना. मग त्याने सांगितलं की तो आणि त्याची आधीची बायको इथे ५ वर्ष राहत होते. मग आम्ही हं म्हणणार तर तो पुढे म्हणाला की हे घर त्या बायकोच्या आधीच्या नवर्‍याचं आहे. आम्ही ’जोड्या लावा’ खेळत होतो तोच तो म्हणाला की त्याच्या बायकोचा (ह्याच्या) आधीचा नवरा म्हणजे घराचा मूळ मालक आणि त्या नवर्‍याची आताची बायको सध्या तिथे राहतात पण ते नेमके कुठेतरी गेलेले दिसतायत. हे घर आतून खूप सुंदर आहे आणि वाटेवरच होतं म्हणून तुम्हाला जस्ट दाखवायला आणलं होतं. हे सगळं ऐकून आम्हाला घेरी यायची बाकी होती. या क्षेत्रात भारतीय फारसे मागे नसले तरी त्यात अद्याप तरी इतकी चक्रवाढ व्याजाची गुंतागुंत निर्माण झालेली नाही. आपलं ८ वं लग्न (चुभू देणेघेणे)  आपल्याच पहिल्या नवर्‍याशी पुन्हा करणारी एलिझाबेथ टॆलर आठवली. आम्हा सर्वांचे आधीचे आणि आत्ताचे नवरे व बायका तेच असल्याबद्दल आम्हाला एकदम हायसे वाटू लागले. :-)  

शेवटी एक नोंद राजकारणाबद्दल. गांधीजी ही तेव्हा बहुतेक मध्यमवर्गीय अमेरिकनांना माहित असणारी महत्वाची एकमेव भारतीय व्यक्ती होती. वॉशींग्टनला भारतीय वकिलातीसमोर त्यांचा पुतळा आहे. आपल्याइकडे मात्र अमेरिकेच्या राजकारणावर तावातावाने चर्चा होते. आपल्याला नुसते त्यांचे राष्ट्राध्यक्षच नव्हे तर मोनिका ल्युएन्स्कीपासून मिशेल ओबामापर्यंत, रिपब्लिक डेमोक्रॅट पक्षांबद्दल बरच काही माहित असतं. त्यांना आपली बीजेपी, कॉंग्रेस वगैरे काहीही माहित नसायचं (तेव्हा तरी) लिंबूटिंबू पक्ष तर जाऊच द्या. कारण अमेरिका हेच त्यांचं जग आहे. मार्क ट्वेनने उपरोधाने म्हटलं होतं, अमेरिकेला भूगोल कळावा म्हणून बहुतेक जगात युद्ध होत असावीत. तर तेव्हा ओबामा आणि हिलरीपैकी कुणाला तिकिट मिळेल याची चर्चा होती. माजी अध्यक्षाची बायको म्हटल्यावर ती जास्त प्रसिद्ध असेल असं मला वाटलं होतं. प्रत्यक्षात या महासत्तेची अध्यक्ष एक स्त्री कधीच होऊ शकत नाही हेच जनतेचं साधारण मत असल्याचं आमच्या लक्षात आलं. आजही कमला हॅरिस उपाध्यक्ष आहे, अध्यक्ष नाही. आपल्याकडे एका दशकाहून जास्त इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. ममता, जया, मायावती, सुषमा स्वराज यांच्यासारख्या भिन्न मतप्रवाहाच्या, विवाद्य पण पंतप्रधानपद सांभाळण्याचं पोटेन्शिअल असलेल्या आणि अत्यंत यशस्वी राजकीय कारकीर्द करणार्‍या महिला आठवून मला जरा बरं वाटू लागलं.

आज इतकंच.  ☺

Tip- The context is Year 2007

Wednesday, October 6, 2021

को जागर्ति

#

कोजागरी पौर्णिमा आपण आज साजरी करतोय. चांदण्यांच्या प्रकाशात आकाशाच्या घुमटाखाली आटीव मसाला दुधाचं प्राशन करत जागरण करत एकत्रीकरण, ही त्यामागची सुंदर संकल्पना आहे. आमच्या सोसायटीत ’कोणाला बोलवायचं, कोणाला नाही, दुधाआधी बटाटेवडे ठेवायचे की पावभाजी’ वगैरे अत्यंत महत्वाच्या विषयावर घनघोर चर्चा झडतायत. त्यातही एक मजा आहे पण यापलीकडची  लहानपणची कोजागरी आठवते. चांदणं पडलं की आई दादाचं औक्षण करी. चांदण्यांचा स्वच्छ दुधी प्रकाश आणि निरांजनाच्या ज्योतीचा सोनेरी प्रकाश मिसळून एक छानसा बिलोरी रंग पसरे. मग आई काहीतरी छोटीशी भेटवस्तू देई. साधारणपणे लहान म्हणून घरोघरी शेंडेफळाचंच कौतुक होतं. ज्येष्ठांचं ((घरातल्या ज्येष्ठ मुलाचं किंवा मुलीचं) कौतुक करणारी ही अश्विन पौर्णिमेची खास पद्धत. अश्विन आणि कार्तिक हे दोन महिने मिळून शरद ऋतू होतो. त्यामुळे ही कोजागरी पौर्णिमा म्हणजेच "शरद पौर्णिमा". कुणी याला कौमुदी पौर्णिमा सुद्धा म्हणतात तर या पौर्णिमेला माणिकेथारी (मोती तयार करणारी) असेही म्हटलं जाते.

काही भागात याला "नवान्न पौर्णिमा" असेही म्हणतात. आपल्या कृषी संस्कृतीमध्ये हा दिवस विशेष महत्वाचा आहे. शेतकरी वर्गाला निसर्गाबद्दल वाटणारी कृतज्ञता यानिमित्ताने व्यक्त केली जाते. शेतीची कामे अर्धी किंवा अधिक झालेली असता. शेतातील पिके तयार होत आलेली असतात. पावसाळा संपून काही काही पिके हाताशी आलेली असतात. घर धान्याने भरु लागते. या नव्या धान्याचे स्वागत, एकप्रकारे पूजा करण्याचा दिवस म्हणजे नवान्न पौर्णिमा. आता या वेगवेगळ्या नावांनी आणि पद्धतींनी साजर्‍या होणार्‍या पौर्णिमेचा दूध पिण्याशी नेमका काय संबंध! 

या सुमारास सूर्याचे दक्षिणायन सुरू असते. शरद ऋतूमध्ये हवामानात बदल घडत असतात. वातावरणातील उन्हाची तीव्रता हळूहळू कमी होते तरीही दिवसभर उन्हाचा ताप आणि रात्री थोडीशी थंडी असे मिश्र वातावरण असते. शरद ऋतूमध्ये वाढणाऱ्या पित्ताने शरीराला त्रास होऊ नये म्हणून दूध पिण्याचा रिवाज सुरु झाला असावा. या दिवशी सुकामेवा, चारोळी, जायफळ आणि अर्थात साखर घालून दूध सुगंध पसरेतो आटवले जाते. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडली की मग ते दूध प्राशन केले जाते. दूध आणणे, तापवणे, आटवणे, ते आस्वाद घेत पिणे हा एकत्रित अनुभव त्या दुधाची गोडी अजूनच वाढवतो. या दिवशी पांढर्‍या रंगाचे विशेष मह्त्व आहे असे म्हणतात कारण हा त्या दिवशीचा निसर्गाचाच ’कलर कोड’ असतो. पांढरी फुलेही या कौमुदी उत्सवाचाच एक भाग होतात.

कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र संपूर्ण १६ कलांमध्ये असतो. या दिवशी तो पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असतो. नेहमीपेक्षा मोठा गरगरीत दिसतो. कोजागरीचं शीतल चांदणं अनुभवलं की शांत वाटू लागतं. सर्वत्र पसरलेली चंद्रकिरणं मनाला तृप्तीची अनुभूती देतात. मनातला उन्हाळा, तगमग त्या किरणांच्या उर्जादायी स्पर्शाने निवते. तसा आताशा आपला चांदण्याशी संबंध येतोच कुठे. मिलेनियलपूर्व पिढीने गच्चीवर झोपण्याची मजा अनुभवलीय. चांदण्यांनी खच्चून भरलेलं मखमली आकाश मूकपणे बघता बघता झोपेची दुलई हलकेच पांघरली जाई. आताच्या धावपळीच्या आयुष्य़ात हा निवांत प्रकार बंदच झाला. अशा वेळी ’जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या सिनेमातला प्रसंग आठवतो. कॉर्पोरेट विश्वातल्या धावपळीत गढून गेलेल्या नायकाला निसर्गाशी आणि त्यायोगे स्वत:शी संवाद साधण्याची कधी उसंतच मिळालेली नसते. या ताणांमुळे आधुनिक घरांमधल्या आकर्षक छताकडे टक्क पाहत जागा राहण्यापेक्षा ’मध्यरात्री नभ घुमटाखाली शांत शिरी तम चवर्‍या ढाळी’ ची अनुभूती काही वेगळीच असल्याची जाणीव नायिका त्याला करुन देते. जमिनीला पाठ टेकून तो पहुडतो आणि स्वछंदपणे आकाशाकडे पाहतो. चांदण्यांनी लगडलेल्या काळ्याभोर आकाशाकडे पाहताना त्याला आपल्या जगण्यातल्या हरवलेला सूर गवसतो. असे क्षण आपल्या आयुष्यात आणण्याचा एक ’बहाना’ म्हणजे कोजागरी.

भारतीय बौद्ध धर्म संस्कृतीत या दिवसाला विशेष मान्यता आणि मह्त्व आहे तर हिंदू धारणेनुसार या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवर उतरते. मध्यरात्री म्हणजे चंद्र आपल्या सौम्य प्रकाशात पृथ्वीला न्हाऊ घालत असताना त्या प्रकाशात "अमृतकलश' घेऊन 'को जागर्ति' (म्हणजे 'कोण जागते आहे') असे म्हणत पृथ्वीतलावर संचार करीत असते. ’कोण जागे आहे’ याचा मथितार्थ आहे कोण सजग आहे, कोण ’भानावर’ आहे, कोण ज्ञानासाठी आतुर आहे. तिच्या हाकेला प्रतिसाद देण्यासाठी सगळे जागे राहतात. या जागे असलेल्या मंडळींना ती आशीर्वाद रुपाने "अमृत' म्हणजेच धनधान्य, सुखसमृद्धी देते. इथे सजग असण्याचा अर्थ ’न झोपलेला’ असा अर्थातच अभिप्रेत नाही. जो प्रयत्नवादी आहे, कष्टाळू आहे, ज्ञानार्थी आहे, जो स्वत:ला समष्टीशी म्हणजे चराचरातील समृद्धीशी जोडून घेऊ इच्छितो अशा व्यक्तीलाच यश आणि वैभव लाभतं असा येथे लाक्षणिक अर्थ आहे. 

कोजागर साजरी करणे आणि जागरण या गोष्टी अभिन्न आहेत. मनोरंजनासाठी या जागरणात खेळ, गाणी इ. साधनांचा समावेश अवश्य असावा पण संवादही असावा. आजच्या रात्री लक्ष्मी प्रसन्न व्हावी म्हणजेच आपण श्रीमंत व्हावे असे ज्याला ज्याला वाटते त्याला कायम सजगतेचे व्रत घ्यायला हवे. ही श्रीमंती फक्त आर्थिक अपेक्षित असेल तर ती अपुरी आहे. मनाची आणि बुद्धीची श्रीमंतीही जोडीला हवी. माणसाने माणसाला प्रेमाने भेटणं, माणसाने माणसांच्या आणि जगण्याच्या भाऊगर्दीत स्वत:ला शोधणं, माणसाने आपल्यापेक्षा वेगळ्या माणसांना सामावून घेत आपलं वर्तुळ विस्तारणं हेच बहुतेक प्रथांचं मुलभूत उद्दिष्ट्य आहे. ते साध्य होत असेल तर ’को जागर्ति’ या प्रश्नाला आपण दुधाच्या पेल्यांनी ’चीअर्स’ म्हणत निस्संदिग्धपणे ’मी’ असं उत्तर देऊ शकू.

#kojagari 

पूर्वप्रसिद्धी- दिव्य मराठी ऑक्टोबर २०२१