Thursday, January 26, 2012

ऑनलाईन !! जरा जपून..


भारतात "ट्राय" च्या आकडेवारीनुसार सुमारे ७५ टक्के लोक मोबाईल फोनचा वापर करतात. २०११ हे वर्ष स्मार्टफोनचे होते. स्मार्टफोनमुळे "फोन होता है सिर्फ बात करने के लिए" इतकाच त्याचा वापर मर्यादित राहिला नाही, टच अँड टाइप, वेगवान डाऊनलोड, दृकश्राव्य माध्यम हे स्मार्टफोनचे वैशिष्ट्य ठरले. आता २०१२ हे वर्ष आहे टॅब आणि थ्रीजीचे. २५०० ते ४५,००० रुपये किमती मधे टॅब्लेट उपलब्ध होणार आहे. टॅब्लेटच्या नव्या आवृतीमध्ये जीपीआरएस सुविधा देण्यात आल्याने फोन कॉलिंग देखील करता येईल. २०११ मध्ये सुरू झालेली थ्रीजी सेवा अद्याप काहीशी महाग आहे. तरीही याचा वापर हळूहळू वाढतो आहे. थ्रीजीमुळे वेगवान डेटा ट्रान्स्फर, हायस्पीड इंटरनेट, व्हिडिओ कॉलिंगसारख्या सुविधांचा फायदा घेता येणार आहे. साहजिकच या आधुनिक उपकरणांबाबत सगळ्यांना आकर्षण वाटते. कुणी व्यावसायिक गरजेसाठी, कुणी मनोरंजनासाठी तर कुणी छाप पाडण्यासाठी यांचा वापर करतात. खेडयापासून शहरापर्यंत सगळे या तंत्रप्रेमात आकंठ बुडालेले दिसतात.

एकूणच तंत्रज्ञानामुळे, ऑनलाईनमुळे सगळं सोपं झालय पण तंत्रज्ञानाच्या योग्य वापराबाबत ग्राहक आणि सेवा देणारे दोन्हीही पुरेसे सज्ञान झाले नाहीत असं दिसून येतं. रेल्वे बाबत चौकशी असो वा टेलीफोन बद्दल तक्रार,म्हणायला बटणं दाबताच उत्तर हजर. प्रत्यक्षात आधी तो नंबर कितीतरी वेळ एंगेज लागतो. मग गंतव्य स्थानाचा ,गाडीचा कोडक्रमांक ग्राहकाला माहीत नसतो. क्रेडिट अथवा डेबिट कार्डाचा वापर करतानाही कसले कसले नंबर विचारले जातात. त्यात पुन्हा १ दबाईये, ४ दबाईये करता करता चुकून मूळ मेनू परत येतो मग पुन्हा चिकाटीने ते सोपस्कार करेतो ग्राहकाला वाटू लागते नको ते ऑनलाईन. मोबाईल बँकिंग ऐकायला सोयीचे वाटते पण आपल्या बँक खात्यांचे क्रमांक म्हणजे एक अवाढव्य संख्या असते. त्यातला एखादा आकडा हमखास चुकतो आणि तसे झाले की मग पुन्हा एक दाबा, दोन दाबा सुरू. या साठी ती तंत्रप्रणाली नीट माहीत करून घ्यायला हवी. आवश्यक क्रमांकांची,पासवर्ड ची नोंद जवळच्या डायरीत असायला हवी.

अर्थात ही काळजी घेतली तरी व्हायरसची भीती आहेच. ऑनलाइन व्यवहार होत असताना, तुमचा पासवर्ड चोरून हा व्हायरस खात्यातली रक्कम परस्पर वळवतो. मोबाईल ऐवजी कॉम्प्युटर वापरायचे म्हटले तरी सायबर गुन्ह्यांचा धोका आहेच. सुशिक्षीत शहरी तरूणांना रोजगाराच्या संधी सहज उपलब्ध होत नाहीत. कमिशन व रोजगाराबाबत त्यांची दिशाभूल करून मोठ्या प्रमाणात पैसा उकळला जातो. अश्लील वेबसाइट व सोशल नेटवर्कच्या माध्यमातून तरूणींच्या शारीरिक व मानसिक छळाच्या घटना घडतात . फेसबुक सारख्या सोशल नेटवर्कच्या वाढत्या आकर्षणामुळे फोटो, खाजगी माहिती सर्रास खुली केली जाते.' टेलिफोनिक फ्रेंडशिप नामक बनेल प्रकारात टॉकटाइम किंवा बक्षिसाचे आमिष दाखवून मोबाइलधारकांकडून पैसे उकळण्यात येतात . गुन्हेगार तरूणी या माध्यमातून युवकांना जाळ्यात ओढतात. घरबसल्या हजारो रुपये कमवा ', ' मेलआयडी किंवा फोन नंबरच्या सिलेक्शनमुळे लॉटरी लागली ' असे एसएमएस किंवा इमेल इनबॉक्स मधे येतात. मुळात अशा मोहाला बळी पडता कामा नये. या जगात काहीही फुकट मिळत नाही आणि मिळत असेल तर मग तिथे संशयाला नक्कीच वाव आहे, इतका सोपा हा नियम आहे.

सरकारने अशा सायबर गुन्ह्यांसंबंधित कायदे तयार केले असले तरी ते तितकेसे परिणामकारक ठरत नाहीत .अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केलेली आर्थिक फसवणूक , मानसिक व शारीरिक शोषण म्हणजे सायबर गुन्हा, पण त्याबद्दल माहितीच नसल्याने हे गुन्हे फारसे नोंदवले जात नाहीत. ते सामान्य जनतेपर्यंत सोप्या पद्धतीने पोचायला हवेत पण मग तोवर तंत्रज्ञान वापरायचच नाही की काय! तसं असेल तर त्याचा उपयोग काय? खर म्हणजे तंत्रज्ञान योग्य प्रकारे वापरण्यासाठी जी मानसिकता आणि तंत्रमैत्री असायला हवी तीच आपल्याकडे मुळात नाहीये. तंत्रज्ञान समजून उमजून वापरणं अतिशय गरजेचं आहे. या शिवाय तंत्रज्ञानाच्या किती आहारी जायचं यावर वेळीच निर्णय घ्यायला हवा. कमी श्रमात मिळणाऱ्या पैशाचा मोह टाळायला हवा. सोशल साईटसवर वैयक्तिक माहिती सरसकट देणे टाळावे. स्पॅममेलला उत्तर देण्याचे अथवा त्या साइटसना कुतूहलापोटी भेट देण्याचे टाळावे . चौकशी केल्याशिवाय आर्थिक गुंतवणूक अजिबात करू नये. आपल्या पाल्याच्या इंटरनेट वापरावर पालकांचे लक्ष असायला हवे. या शिवाय पासवर्ड अथवा खातेक्रमांक याबद्दल गुप्तता बाळगावी .पासवर्ड बदलत राहावे. लॉग आऊट करूनच काम संपवावे. तंत्रज्ञानाचा वापर वस्तुनिष्टपणे केला तर ते नक्कीच वरदान आहे. त्यामुळे वेळ वाचतो, उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढते. तंत्रज्ञानाच्या चुकीच्या वापरातून समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी मेंदू ’‘ऑनलाईन" ठेवून एकच बटण दाबायला हवे ते म्हणजे आपल्या सद्सद्विवेकबुद्धीचे.

Tuesday, January 3, 2012

पत्र

नमस्कार,

२४ वर्षांपूर्वी फ्रँक या जर्मन मुलाने " हे पत्र जर तुम्हाला मिळालं तर मला उत्तर द्या, मी पुन्हा पत्र लिहीन" असं लिहीलेलं पत्र बाटलीत बंद करून प्रवास करताना बाल्टिक समुदात टाकलं. त्या पत्रावर १९८७ मधली तारिख, पत्ता लिहून ठेवला होता. ती बाटली दलिन नामक मुलाला सापडली. त्याने फ्रँकला उत्तर पाठवल्याची बातमी एप्रिल २०११ मधे प्रसिद्ध झाली होती.

आता पोस्टऑफीस आधुनिक झाली पण त्यातून भावनांचा नव्हे फक्त आर्थिक व्यवहार होतो. या पत्रांबरोबर नातेसंबंध, आपुलकी हे सगळं इतिहासजमा होत चाललय असं जुन्या पिढीला अकारण वाटतं.

संवादाची साधनं बदलली म्हणजे माणूस बदलतो का? भावना बदलतात का? नक्कीच नाही. त्यांची अभिव्यक्ती तेवढी बदलते.

आता पोस्टमनच नव्हे तर पोस्टवुमन सुद्धा येते. कंटाळवाण्या गद्य कागदपत्रांची पाकीटं देऊन निघून जाते. मात्र माणसांच्या इरसाल नमुन्यांनी भरलेलं कळकट पोस्ट, त्यातून जा ये करणारी राग, प्रेम, उद्वेग, हुरहूर, उपेक्षा, आशा, निराशा, आनंद, उत्साह अशा भावभावनांनी ओथंबलेली पत्र, ते घेऊन येणार्‍या पोस्टमन ची उत्सुकतेने वाट पाहणं हे सारं आता जवळपास कालबाह्य झालं. तेव्हा पत्र आलं की सगळ्या घरात त्याचं सामूहिक वाचन (आणि विश्लेषण) होत असे. कधी कधी पत्र कार्य झाल्यावर पोचत असे, याचा फायदा घेऊन मुद्दाम उशीरा पत्र पाठवून ते पोस्टाच्या नावावर ढकलण्यातही काही मंडळी तरबेज असायची. "आम्ही येत आहोत" असे पाहुण्यांचे पत्र हमखास मिळत नसे. रजिष्टर पत्र असलं की चेहर्‍यावरची ऐट आणि मनीऑर्डर असली की चेहर्‍यावरचा आनंद लपत नसे.


पत्रांच्या आधी संकेतचिन्हे वापरली जात. चीनमधे तर आजही चित्रलिपी वापरली जाते. मानवाचा विकास झाला त्याबरोबर लेखनकला विकसीत झाली. आता प्रश्न होता लिहीलेला संदेश दूरवर पाठवायचा कसा! "कबूतर जा जा जा" पद्धत इतिहासात प्रचलित होती. या साठी कबूतरांना खास प्रशिक्षण दिले जाई. खलिते घेऊन जाणार्‍या दूतांना अंतर कापण्यासाठी कित्येक दिवस लागत. ब्रिटीशकालात पोस्टऑफीस सुरू झाल्यानंतर काही दिवस ’रनर’च्या ,घोड्यांच्या मदतीने पत्र पोचवली जात. वाहनउद्योग विकसीत झाल्यावर, पुढे रेल्वे आणि विमानसेवेमुळे पत्रे आणखी लवकर मिळू लागली. १८३६-३७ च्या सुमारास मोर्स यांनी तार पाठवण्याचे तंत्र विकसीत केले तर १८७६ मधे अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी टेलीफोनचे. भारतात हे तंत्र पोचायला बराच वेळ लागला मात्र पत्रांची जागा या तंत्रज्ञानाला घेता आली नाही. तारेला शब्दमर्यादा तर फोनला "अर्थ"मर्यादा. पत्रांना असल्या काही अडचणी नव्हत्या.

जुनी पत्रे काढून स्मरणरंजन करण्यासारखा आनंद नाही. तेव्हाचे वातावरण, विचारपद्धती वाचताना विस्मय वाटतो. काही पत्रव्यवहार ऐतिहासिक दस्तावेज म्हणून ,काही तत्कालिन संस्कृतीचा, साहित्याचा नमुना म्हणून गाजले. लिंकन यांचे गुरूजींना लिहीलेले पत्रं, नेहरूंनी इंदिरा गांधींना लिहीलेली पत्रे किंवा अगदी सुनीता देशपांडे-जी.ए.कुलकर्णींनी एकमेकांना लिहीलेली पत्रे असोत, अशी पत्र जेव्हा व्यापक सामाजिक आशय कवेत घेतात तेव्हा त्यांना सांस्कृतिक संचिताचे स्वरूप लाभते.

आज पत्रांची जागा इ-मेल, एस-एम-एस किंवा चॅटींगने घेतली आहे. पोस्टकार्ड आजही फक्त पन्नास पैशाला मिळते. तरीही माहिती आणि जनसंपर्क मंत्री सचिन पायलट यांनी संसदेत नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार गेल्या १० वर्षांत पोस्टाने पाठवलेल्या पत्रांच्या संख्येत ७२ टक्क्यांनी घट झाली आहे. भारतातले सुमारे १० कोटी लोक इंटरनेट वापरतात तर 'ट्राय'च्या आकडेवारीनुसार देशातली ७५ टक्के जनता मोबाइल फोन वापरते. नुसतं बटण दाबून जगाच्या कानाकोपर्‍यात संपर्क साधणं इतकं सोपं आणि स्वस्त झाल्यामुळे साहजिकच या शर्यतीत पत्रं मागे पडली. माणसांचे नमुने मात्र तस्सेच आहेत. सोशल नेटवर्कींग साईटवर रीक्वेस्ट टाळून उपेक्षा करता येते, नको असलेले फोन टाळता येतात, अगदी घ्यावाच लागला तर "हॅलो हॅलो नेटवर्क डाऊन आहे वाटतं" म्हणत बंद करता येतो."मी चौकातच आहे" असे घरबसल्या मोबाईलवर खुशाल ठोकून देता येते. पूर्वी "संतोषी मातेच्या चमत्काराचे पत्र अमुक जणांना पाठवा नाहीतर तुमच्यावर संकट येईल" या प्रकाराची विनोदी पत्र येत,आता तशा स्वरूपाच्या इ-मेल्स येतात एवढाच फरक. वृत्ती तीच. इ-मेल किंवा एस-एम-एस द्वारे स्मायली किंवा इमोटीकॉन्स वापरून वेगवेगळ्या भावना व्यक्त करता येतात.

पूर्वी जग इतके जवळ आले नव्हते पण नाती घट्ट होती, आता संकोच झालेल्या जगात खाजगीपणाच्या नव्या संकेतांमुळे नात्याची वीण सैल झाली पण जीवनाकडे पहाण्याची दृष्टी आणि विषय देखील विस्तारले. उलट आता पूर्वीपेक्षा अधिक वेगाने आणि थेटपणे भावना व्यक्त केल्या जातात. पूर्वी भाषा काहीशी औपचारिक असायची, पत्र लिहीण्यास कारण की, अमुकला नमस्कार, तमुकला आशीर्वाद वगैरे. आता इ-मेल किंवा एसएमएस मधे हे सगळे एका Hi मधे आटोपते, आता 3G नंतर संवाद अधिक घाईने साधला जाईल. संवादाचं माध्यम असच बदलत राहणार पण माणूस तोच आहे, खास व्यक्तीकडून आलेला मेसेज उघडून पाहण्याची असोशी तशीच आहे. आजही कुठल्याही स्वरूपात का होईना, "चिठ्ठी आई है " मधली मौज तशीच आहे. म्हणूनच वर्ष बदलली तरी आपल्यातले ’माणूसपण’ बदलू नये यासाठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
कळावे, लोभ आहेच तो वृद्धींगत व्हावा.

Sunday, December 18, 2011

आती क्या खंडाला

चेहर्‍यावरून स्कार्फ बांधलेली एक मुलगी बसस्टॉपवर उभी असते. बाईकवरून जाणारा एक पुरूष तिथे येऊन तिला म्हणतो " आती क्या खंडाला ?" त्यावर ती मुलगी उत्तरते " अहो पप्पा, मी आहे." हा बोचरा विनोद (!) सध्या प्रचलित आहे, पण त्याला एका कटू सामाजिक वास्तवाची धार आहे.
बहुतेक प्रत्येक महिलेला मग ती समाजातील अगदी उच्चभ्रू वर्गातील असो वा अगदी तळागाळातील असो ,छेडछाड करणार्‍या पुरूषांच्या अश्लिल प्रवृत्तीचा , शरम वाटावी अशा शेर्‍यांचा ,विखारी नजरांचा, हावभावांचा, विकृत स्पर्शाचा त्रास सहन करावा लागतो. हा ईव्ह टिझिंग किंवा महिलांची छेड काढण्याचा प्रकार समाजात सर्रास घडतो.एखाद्या बसमध्ये, ट्रेन मध्ये , बाजारात, बस स्टॉपवर, अगदी शाळा, कॉलेज किंवा ऑफीस मधे देखील गर्दीचा वा एकांताचा फायदा घेऊन स्त्रीचा विनयभंग केला जातो. अशा लैंगिक गैरवर्तनामुळे स्त्रीच्या शरीराला जितक्या वेदना होत असतील त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त वेदना तिच्या मनाला होतात. मुलगी जेव्हा तारूण्यात पदार्पण करू लागते तेव्हा अशा घटनांमुळे तिच्या मनाची कुचंबणा होते. स्वत: बद्दल अपराधी भावना निर्माण होते . कमकुवत मनाच्या मुली मनातल्या मनात कुढत बसतात. अशा नकारात्मक अनुभवांमुळे स्त्रियांवर आत्मविश्वास गमावणे, सरसकट सगळ्याच पुरूषांकडे संशयी नजरेने पाहणे, कामातील लक्ष कमी होणे, सदैव मन अस्वस्थ असणे ,पुढील शिक्षण घेण्याची, करिअर करण्याची हिंमत खचणे असे खोलवर मानसिक परिणाम होऊ शकतात. भीती वा लाजेमुळे, अपमानित आणि विमनस्क मनस्थितीमुळे काही महिला आयुष्य संपवायच्या टोकाला देखील जातात.

सुदैवाने समाजात अजूनही चांगल्या पुरूषांचे प्रमाण जास्त आहे परंतु छेडछाडीतून विकृत आनंद मिळवणार्‍या पुरूषांचे प्रमाण वाढत चालले आहे. असे पुरूष समाजातल्या सगळ्या स्तरांमधले असतात. काही जण मूल्यशिक्षण, संस्कारांचा अभाव असलेल्या कुटुंबातून येतात, काही व्यसनाधीनतेतून नकळत अशा प्रकारांकडे वळतात. काही मानसिक वा लैंगिक विकृतीचे बळी असतात, कुणाला एखाद्या स्त्रीकडून वाईट अनुभव आला तर त्याचा बदला समस्त स्त्री जातीकडून घेण्याचा हा प्रयत्न असतो. लैंगिक गुन्हे घडण्यामागे माध्यमांचा परिणाम देखील कारणीभूत आहे. आयटम सॉंग म्हणून गाजलेली तथाकथित गाणी, द्वयर्थी जाहिराती आणि बाजारू चित्रपटांमधून "उपभोग्य वस्तू" अशी स्त्रीची प्रतिमा निर्माण होते. (यात सवंग प्रसिद्धीसाठी काहीही करायला असणार्‍या स्त्रियांचाही दोष आहे) अश्लील साहित्य, इंटरनेटवरील पॉर्न साईटस आणि लैंगिक शिक्षणाचा अभाव यामुळे मनातली लैंगिक अस्वस्थता महिलांना त्रास देऊन व्यक्त केली जाते. चांगल्या घरांतील काही उच्चशिक्षीत पुरूष देखील कधी कधी मजा म्हणून किंवा सहज,कुणी बघत नाही म्हणून महिलांची छेड काढतात. महिलेने खाली मान घातली, ती घाबरली की अशा पुरूषांचा अहंकार सुखावतो. काहींना त्यातून मिळणारा विकृत आत्मविश्वास हवा असतो. काही तरूणांना मित्रांनी आपल्याला बावळट समजू नये म्हणून महिलांना छेडणे हा पुरूषार्थ सिद्ध करण्याचा एक सोपा मार्ग वाटतो. सिनेमामधील नायक ज्या नायिकेशी छेडछाड करतो पुढे तीच नायिका त्याच्या प्रेमात पडते या मसाला कथानकातून पौगंडावस्थेतील मुले काही वेगळाच धडा घेतात. आपल्याही आई, बहिणीवर अशी वेळ येऊ शकते याचा त्यांना विसर पडतो. अनेक सुसंस्कृत तरूणांना आपल्या महाविद्यालयात घडणा‍र्‍या अशा घटनांची खंत वाटते पण ते एकट्याने विरोध करू शकत नाहीत. पुरुषप्रधान व्यवस्थेत अपवाद वगळता महिलांना बहुतांशी दुय्यमच वागणूक मिळते. तिच्यावर वचक ठेवण्याचे सर्वात सोपे हत्यार म्हणजे तिचे शील पण याचा अर्थ समाजाचा एक मोठा भाग आत्मसन्मान हरवलेल्या अवस्थेत जगतो आणि ही गंभीर गोष्ट आहे.

या गुन्ह्याविरूद्ध आवाज उठवणे हा गुन्हा करण्याइतके सोपे नाही. भारतीय दंड विधान ३५४ नुसार विनयभंग म्हणजे महिलेला लज्जा उत्पन्न होईल ह्या हेतुने केलेला अत्याचार व बळाचा बेकायदा वापर. असे करताना कुणी पकडले गेलेच तर त्या महिलेनेच प्रोत्साहन दिले, असा खुशाल कांगावा केला जातो. मुंबईतील आंबोली भागात आपल्या मैत्रिणींच्या छेडछाडीला विरोध करणाऱ्या किनन सॅण्टोस आणि रुबेन फर्नांडिस या दोन तरुणांचा गुंडाच्या टोळक्याने भररस्त्यावर खून केला तेव्हा प्रचंड खळबळ माजली होती.बहुतेक केसेसमधे पोलीस यंत्रणेवर पुरेसा विश्वास नसल्याने अशा गुन्ह्याचा साक्षीदार मिळणं अवघड असतं. बलात्काराच्या केसमधे "डी.एन.ए" चाचणीद्वारे गुन्हा सिद्ध करता येतो. विनयभंग सिद्ध करणं पुराव्याअभावी अवघड होतं.

एखाद्या स्त्रीने अशी घटना घरी सांगितली तर रस्ता बदल, दुर्लक्ष कर असेच साधारण सुचविले जाते. ऍड.जाई वैद्य या तज्ञ असे निरीक्षण नोंदवतात "एखादीने मनाचा हिय्या करून पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदविली तर फौजदारी कायद्यानुसार तिला जे प्रश्न विचारले जातात त्याची लाजीरवाणी उत्तरे देता देता तिचा धीर खचतो. छेड काढली म्हणजे नक्की काय केले हे सांगण्याइतकी हिंमत तक्रारदार महिलेजवळ असतेच असे नाही. यातून गुन्हा नोंदवला गेलाच तर संथ न्यायप्रक्रियेमुळे तिचे उरलेसुरले अवसान संपते. त्यापेक्षा अन्याय मुक पणाने सहन केलेला बरा असे तिला वाटते. मग असे गुन्हे एक तर नोंदले जात नाहीत, गेलेच तर दबावामुळे मधूनच केस मागे घेतली जाते. शिक्षेचे प्रमाण नगण्य असते." अर्थात याची दुसरी बाजु अशीही विचारात घेतली पाहिजे की वैयक्तिक आकसापोटी एखादी स्त्री खोटा आरोप तर करत नाही ना! सगळ्याच स्त्रिया सभ्य, सुशील, सुसंस्कृत असतात असे नाही. अशा आरोपांमुळे एखाद्या सच्छील पुरूषाच्या प्रतिष्टेचा बळी जाऊ शकतो कारण समाजाची सहानुभूती साहजिकच त्या स्त्रीला मिळते. प्रेमप्रकरण अंगाशी येते आहे असे पाहून स्वत:ला वाचवण्यासाठी जोडीदारावरच लैंगिक गैरवर्तनाचा आरोप करणार्‍या मुली देखील आढळतात. तरीही केवळ स्वार्थापोटी किंवा सूडाच्या भावनेपोटी स्वत:चे नाव नाहक चर्चेत आणणार्‍या अशा स्त्रियांचे प्रमाण समाजात अजून तरी कमी आहे.

पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी १०० हा दूरध्वनी क्रमांक आहे. महिलांसाठी १०३ ही हेल्पलाइन आहे. महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे हाताळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात महिला दक्षता समिती असते. तरीही छेडछाड करणाऱ्यांना जरब बसावी या दृष्टीने कायद्यात सुधारणा व्हायला हवी. केवळ कायद्याचा अंकुश या गुन्ह्याला पूर्ण आळा घालू शकत नाही त्यासाठी समाजाची मानसिकता बदलायला हवी. इतिहासात देखील स्त्रियांच्या वेदनांना महात्मा फुले, महर्षी कर्वे प्रभृतींनी वाचा फोडली. त्यांचा वारसा जपणारा पुरूषवर्ग आजही समाजात आहे. अशा प्रश्नांवर उपाय शोधताना त्यांची मदत होऊ शकते. मुलींच्या मनात आत्मगौरवाची भावना जागवणे आणि मुलींनी अशा घटनांना विरोध करण्याचे धाडस दाखवले तर त्यांना पाठिंबा देणे हे सुजाण नागरिकांचे कर्तव्य आहे. छेडछाडीच्या बहुतेक घटना या तरुण मुलांकडून घडताना दिसतात त्यासाठी घराघरातून मुलांवर समानतेचे आणि स्त्रियांचा माणूस म्हणून आदर करण्याचे संस्कार केले गेले पाहिजेत.

मुलींनी देखील आपले वर्तन, पेहराव, देहबोली अनुचित नाही ना याचा विचार केला पाहिजे. एकटयाने विरोध करणं शक्य नसेल तिथे संघटनेचं बळ कामी येऊ शकेल. जवळपास प्रत्येक राजकीय पक्षांच्या युवा संघटना असतात. मुलींच्या पाठीशी अशा संघटना उभ्या राहिल्या तर छेडछाडीचे प्रकार कितीतरी पटीने कमी होतील. 'मेन अगेन्स्ट व्हायोलन्स अँड अॅब्युज' ही संस्था मुंबईत वेगवेगळ्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा घेते. त्यात लिंगभेद, छेडछाड, स्त्री भ्रूण हत्या इ. विषयांवर त्यांचं प्रबोधन केलं जातं. "आती क्या खंडाला? " विचारणार्‍या तरूणांच्या मनावर "स्त्रियाही तुमच्यासारख्या माणूस आहेत आणि समाजात सुरक्षितपणे वावरण्याचा त्यांनाही अधिकार आहे. तो त्यांना मिळायलाच हवा" हे ठसवणं हा यामागचा उद्देश आहे. आता गरज आहे ती समाजाने, विशेषत: तरूणांनी या प्रश्नाकडे संवेदनशीलतेने पाहण्याची !