Friday, November 11, 2011

स्त्रिया, पोशाख आणि समाज

परवा चित्रपटगृहात समोरच्या रांगेत एक तरूण फौज येऊन बसली. बहुतेकांनी चेहरा रूमालाने झाकला होता जणू तो त्यांच्या पोशाखाचाच एक भाग होता. चित्रपट सुरू होताच त्यांनी रूमाल बाजूला केले.. तेव्हा त्या कॉलेजकन्यका असल्याचा उलगडा झाला. आजूबाजूला काही ’जोड्याही’ येऊन बसल्या होत्या,त्यांचे रूमाल मात्र त्यांच्या चेहर्‍यावर तसेच होते. त्वचेचे संरक्षण हा साहजिकच त्या ’पडद्या’मागचा हेतू नव्हता. जगातील काही देश बुरखाबंदीसाठी चर्चा, वादविवाद करत असताना या मंडळींनी स्वेच्छेने हा ’बुरखा’ स्वीकारला आहे. धार्मिक कारणासाठी किंवा ऊन-वार्‍यापासून संरक्षण हा हेतू असेल तर अजिबात हरकत नाही पण काही मुलींना टवाळखोर मुलांपासून बचाव करण्यासाठी चेहरा झाकावा लागतो तर काही जण जगापासून आपले कृत्य दडवण्यासाठी रूमालाचा आडोसा वापरतात... ही मात्र समाजासाठी चिंतेची बाब आहे.

खरं तर पोशाख आपले व्यक्तिमत्व खुलवण्यासाठी निर्माण केले गेले आहेत. आपण एखादया व्यक्तीला भेटल्यावर आपले त्या व्यक्तीबद्दल जे मत तयार होत असते ते त्या व्यक्तीचा पोशाख /पेहराव हयावरूनच. मुलाखतीला जाताना, विशीष्ट प्रसंग, समारंभ यात काय परिधान करायला हवे याची जाण व्यक्तीला यशस्वी बनवू शकते. कुणी काय पेहराव करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी मुलींनी/स्त्रियांनी काय घालावे हे मात्र समाज ठरवत असतो. परदेशी स्त्रियांनी भारतात प्रवास करताना कोणती खबरदारी घ्यावी या संदर्भातील वेबसाईटवर स्पष्ट सूचना आहेत "Women travellers in India should pay attention to local dress code for two reasons: to avoid sexual harassment and to avoid looking disrespectful" एका हिंदी सिनेमातील एक प्रसंग आठवतोय. तोकड्या कपड्यातली झीनत अमान एका सडकछाप मजनूला पकडून पोलीस अधिकारी असलेल्या अमिताभ बच्चनकडे घेऊन येते आणि तिला बघून त्या मजनूने शीटी वाजवली अशी तक्रार करते. यावर अमिताभ तिला सुनावतो "तुला अशा पोशाखात बघून लोक शीटी नाही तर काय देवळातली घंटा वाजवतील काय!" प्रेक्षक यावर मनापासून हसतात. म्हणजे असा पोशाख घातलेल्या मुलीला असाच प्रतिसाद मिळणार यात काही वावगं वाटत नाही. विद्यार्थिनींचे आखूड स्कर्ट हा सध्या ब्रिटनमधील शाळांसमोरचा एक मोठा प्रश्न आहे. शाळांनी मिनी स्कर्ट्सवर बंदी आणून ट्राउझर्स घालणे सक्तीचे केले आहे. ही समस्या एकट्या ब्रिटनमधील नाही . अमेरिका आणि युरोपीय देशांतही हा प्रश्न गंभीर बनला आहे . पण ' मिनी स्कर्ट्सवर बंदी ' हे त्याचे नेमके उत्तर नव्हे . शाळांच्या व्यवस्थापनांचा तसा दावाही नाही . एका गुंतागुंतीच्या प्रश्नावर शोधलेल्या उपायांपैकी हा एक छोटासा प्रयत्न आहे , असे त्यांचे म्हणणे आहे . आपल्या देशातही अनेक शिक्षणसंस्थांमध्ये ड्रेसकोड हा वादाचा विषय झाला आहे . तो लागू झाल्यानंतर शिक्षणसंस्थांची डोकेदुखी थोडी तरी कमी झाली असावी असे वाटते.

विद्यार्थी विश्वासाठी हे रास्त आहे कारण शरीराबद्दलचे त्यांचे कुतूहल त्यांना अस्वस्थ करत असते. परंतु कॅनडातील एका पोलीस अधिकार्‍याने मध्यंतरी ’आपल्यावरील अत्याचार टाळायचे असतील तर स्त्रियांनी सभ्य कपडे घालावेत’ असे विधान केले. या मानसिकतेला उत्तर म्हणून आणि ’शारिरीक बळाचा वापर करून एखाद्या पुरूषाने स्त्रीवर अत्याचार करणे हे चूकच ,त्याचा तिच्या कपडयांशी संबंध नाही’ या भूमिकेतून जगभरातील अनेक देशात स्लट वॉकचे (भारतात दिल्लीत देखील) आयोजन करण्यात आले. ज्यांना त्यामागचा उद्देश कळला नाही अशा मूर्ख स्त्रियांनी त्या मोर्चात मुद्दाम वाह्यात कपडे घालून त्या भूमिकेचा विपर्यास केला, साहजिक त्या मोर्चाने समाजाला योग्य तो बोध न मिळता ’बेशरम मोर्चा’ म्हणून त्याची संभावना झाली. सामाजिक संकेतांपेक्षा वेगळा पोशाख करणे याचा अर्थ आमंत्रण देणे असा होतो हे नाईलाजाने स्वीकारुन त्यामुळे स्त्रीवरील अत्याचारांची शक्यता वाढू शकते हा वस्तुनिष्ठ विचार प्रत्येक सुजाण स्त्री करते पण मुळात हे प्रकरण ’संस्कृती सापेक्ष’ आहे. एकेकाळी पुण्य़ात सकच्छ की विकच्छ (पाचवारी साडी/ नऊवारी साडी) हा वाद रंगला होता. केरळ राज्यात तर काही वर्षांपूर्वी स्त्रियांनी उत्तरीय वापरणे असभ्यपणाचे मानले जाई. यासाठी लढा देत कालांतराने उत्तरीय न वापरणॆ म्हणजे असभ्यपणा इथे आपण येऊन पोचलो आहोत, तर हा विचार अद्याप ज्या सामाजिक स्तरापर्यंत झिरपला नाही त्या आदिवासी समाजातील काही गटांमध्ये उत्तरीय आजही वापरले जात नाही. मग याला श्लील अश्लील परिमाण लावणारे आपण कोण? काळाच्या एका तुकड्यावर उभे राहून आपण हे कसं ठरवणार? आणि तो अधिकार आपल्याला दिला कुणी?

शिवाय स्त्रियांबाबत दुर्दैवी घटना केवळ त्या त्या काळानुसार किंवा सामाजिक चौकटीनुसार अनुचित मानल्या गेलेल्या पोशाखामुळे घडतात असे नाही कारण विकृतीला वय, नाते, रूप, रंग कळत नाही. तरूणीच नव्हे बालिका, नात्यातील गरजू परित्यक्त वृद्ध स्त्रिया, अगदी रस्त्यावरील बेवारस, मतीमंद स्त्रियांवर देखील अत्याचार होतात. पण मुलींच्या विनयभंगाचे किंवा बलात्काराचे प्रकार जेव्हा समाजात घडतात तेव्हा सर्वात आधी मुलींच्या कपड्यांविषयी , त्यांच्या वर्तनाविषयी प्रश्न उपस्थित केले जातात .म्हणजे मुलांवर समाजस्वास्थ्याची काहीच जबाबदारी नसते का! त्यांनी ’सिक्स पॅक्स’ दाखवत फिरणे अयोग्य मानले जात नाही, त्यांच्या ड्रेसकोड बद्दल कुणाला आक्षेप नाही पण स्त्रियांच्या पेहरावाकडे मात्र समाजातील स्वयंघोषित पोलिस डोळ्यात तेल घालून पाहणार, असे का!

आपण चांगले दिसावे, आकर्षणाचे केंद्र असावे असे बहुतेक प्रत्येक मनुष्यप्राण्याला वाटते. स्त्रियांमधे ही भावना निसर्गत: अधिक प्रमाणात असते. पुरूषप्रधान समाजात या साध्या गोष्टीचा बाऊ केला जातो. उदा: एखाद्या पुरूषाची बायको निवर्तली तर त्याच्या राहणीत, पेहरावात फारसा फरक पडत नाही पण जोडीदार गमावलेल्या स्त्रीने चांगला पोशाख केला, दागिने घातले तर ती टीकेचा विषय ठरते आणि टीका करण्यात दुर्दैवाने इतर स्त्रियादेखील पुढे असतात. हे कितपत योग्य आहे!

पोशाख सभ्य असावा यात वादच नाही पण तो काय असावा हा मात्र वादाचा मुद्दा आहे. उदा: साडी हा भारतीय सभ्य पोशाख मानला जातो पण बर्‍याच चित्रपटांमधे साडीमधली ओलेती नायिका जे काय अंगविक्षेप करते किंवा सिनेमाचं जाऊ द्या ,काही स्त्रिया ज्या दिव्य तर्‍हेने साडी नेसतात ते पाहून साडीला सभ्य पोशाख म्हणायला जीभ रेटत नाही. त्यापेक्षा काही वेळा जीन्स वर व्यवस्थित टॉप हा देखील योग्य पोशाख असू शकतो. पोशाख कोणता आहे यापेक्षा तो आपल्याला शोभतो का, त्यात अवघडल्यासारखे तर वाटत नाही ना, ज्या ठिकाणी आपण जात आहोत तिथे तो घालणे सोयीचे आहे ना, ज्या समाजात आपण वावरतो तिथे तशा पोशाखाने काही औचित्यभंग तर होणार नाही ना एवढा विचार करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. योग्य ते लैंगिक शिक्षण दिले गेले आणि मुळात स्त्रीकडे ’मादी’ म्हणून न पाहता ’माणूस’ म्हणून पाहण्याचा संस्कार रूजला तरच स्त्रियांची सामाजिक सुरक्षितता मजबूत होईल. शरीर हाच खरं तर आत्म्याचा पोषाख आहे असं आपल्याच संस्कृतीत म्हटलं जातं. हे आपल्याला उमगलं, आंतरिक सौंदर्याकडे बघण्याचा दृष्टीकोन विकसित झाला आणि व्यक्तीस्वातंत्र्य व स्वैराचार यामधली सीमारेषा आपल्याला नीट कळली तर अशा लेखाचे प्रयोजनच उरणार नाही..नाही का !

published in matrubhumi 10-11-11

Friday, October 21, 2011

शाश्वत निधी

Published in Matrubhumi Thursday 20oct 2011

पांगळयाच्या सोबतीला येऊ द्या बलदंड बाहू

देवळात गेल्यावर दानपेटीत एक तरी नाणं टाकल्याशिवाय आपल्याला देवदर्शनाचं समाधान मिळत नाही. एखादा धार्मिक उत्सव, सप्ताह असेल, देवळाचा जीर्णोद्धार असेल तर आपण फूल ना फुलाची पाकळी देऊन आपले धार्मिक कर्तव्य पार पाडतो. कधी कधी सोन्या, चांदी,हिर्‍याने आपल्या दैवताला मढवतो देखील .. शेवटी ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. त्याचवेळी समाजातील दुर्लक्षितांना आर्थिक मदत करताना मात्र आपण हात आखडता का घेतो! असं नसतं तर आनंदवनासारख्या ’माणुसकीच्या तीर्थक्षेत्राला’ आर्थिक विवंचनेनं कधीच ग्रासलं नसतं. निसर्गाने अन्याय केलेल्या व समाजाने बहिष्कृत केलेल्या कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात आशेची नवी पहाट फुलविणारे, त्यांच्यात आत्मसन्मानाचा हुंकार जागवून जगण्याचे बळ देणारे बाबा आमटे यांचे आनंदवन आज आर्थिक संकटात आहे.

मदर तेरेसांच प्रसिद्ध वचन आहे, "समोर दिसणार्‍या जिवंत माणसावर जर आपण प्रेम करू शकत नसू तर अदृष्य परमेश्वरावर भक्तीरूपी प्रेम आपण कसे करणार!’
बाबा-साधनाताईंनी समाजातील अपंगांवर, व्याधीग्रस्तांवर फक्त प्रेमच केलं नाही तर त्यांच्या पुनर्वसनाचा वसा घेतला. कुष्ठरोगाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन आजही दूषित आहे. अगदी आधार कार्डाच्या नोंदणीचा देखील हक्क या बांधवांना झगडून मिळवावा लागतो यावरून त्यांचे एकूण आयुष्य सामान्य भारतीय नागरिकापेक्षा किती जिकीरीचे आहे याची कल्पना येते. बाबांचा लढा केवळ कुष्ठरोगाविरुद्ध नव्हता. जीवनात सगळी कुरूपता नष्ट व्हावी यासाठीच त्यांनी युद्ध आरंभिले होते. त्यांच्या वाटचालीत लक्षावधी उपेक्षितांच्या चेहर्‍यावर त्यांनी हास्य फुलवले. बाबा-साधनाताईंनी त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी कितीतरी प्रकल्प सुरू केले. डॉ. विकास आणि भारती तसेच डॉ.प्रकाश आणि डॉ.मंदा आमटे यांनी ती धुरा समर्थपणे वाहिली.. आनंदवनातील कुष्ठरोगी व अपंगांसाठी डॉ.विकास यांनी सव्वाशेहून अधिक कुटिरोद्योगांची सुरूवात केली. कोलकात्यातून माशांची पिले आणून मत्स्यशेती सुरू केली, चाराशेतीसाठी झाशीतील संस्थेकडून उच्च प्रथिनयुक्त गवतांच्या जातींची लागवड करवून घेतली. 'युवाग्राम' प्रशिक्षण केंद्राद्वारे युवकांना रोजगार प्रशिक्षण मिळू लागले. यवतमाळ जिल्ह्याच्या झरी-जामणी तालुक्यात मुळगव्हाण गावी डॉ.विकास यांच्या पर्यावरण संवर्धन केंद्रामुळे त्या परिसरातील ४००हून अधिक शेतकरी कुटुंबांनी शेतीत लक्षणीय प्रगती केली. याशिवाय आनंदवनात कृत्रिम अवयव निर्मिती केंद्र, माहिती तंत्रज्ञान प्रशिक्षण केंद्र, अंध-अपंग, कुष्ठरुग्ण यांच्या कलेचं ’स्वरानंदनवन' हे सादरीकरण यशस्वीरित्या काम करत आहेत.
बाबांची तिसरी पिढी- त्यांची तरूण नातवंडे उच्चशिक्षीत आहेत, शहरातील लखलखती दुनिया आणि लठ्ठ पगाराच्या नोकरीला न भुलता आमटे परिवाराचं स्वप्न मोठं करीत आहेत. दु:खाचा अंधार आजही आजूबाजूला सांडतच असतो, अशाच दु:खी आत्म्यांचा जत्था करून त्यांच्यावर सावली धरणारे बाबा आमटे आणि आता त्यांचा परिवार सूर्यप्रकाशाकडे तोंड करून आयुष्यभर उभे आहेत. सोमनाथपासून सगळे प्रकल्प मिळून पाच हजारांवर कुटुंबांचं पालकत्व पेलताना अनेक अडचणी समोर आहेत पण जिद्द अफाट आहे. ही केवळ पुनर्वसन केंद्रे नाहीत. अपंगांना समर्थ बनविण्याची आव्हाने यात आहेत. दु:ख आणि दैन्य यांच्याशी लढे देण्याच्या त्या प्रार्थना आहेत.

कोणत्याही आश्रयार्थी व्याधीग्रस्ताला कधीही नाही म्हणायचे नाही हे आनंदवनाचे व्रत आहे त्यामुळे आनंदवनावर अवलंबून असणाऱ्या गरजूंची संख्या सतत वाढते आहे. प्रत्येक कुष्ठरुग्णामागे दर माणशी-दर दिवशी केवळ १५.५० रुपये एवढेच सरकारी अनुदान १२०० कुष्ठरुग्णांना मिळते. आजच्या गगनाला भिडणार्‍या महागाईत चौकोनी कुटुंबाचा उदरनिर्वाह कठीण झाला आहे, तिथे या विशाल परिवाराने तग कसा धरायचा. जगणे म्हणजे केवळ दोन वेळच्या अन्नाची, छप्पराची व कपडयाची सोय नाही तर निरंतर शिक्षण, मनुष्यत्वाचे सक्षमीकरण असायला हवे. पुनर्वसित इतर कुष्ठरुग्ण, अपंग, मूकबधिर, अंध अशा सर्वांचा विचार केल्यास आनंदवनाची लोकसंख्या अडीच हजारावर जाते. या सर्वांच्या किमान गरजा भागवणे जिकीरीचे होत आहे.

आजच्या स्वार्थी जगात समाजासाठी अत्यंत तळमळीने काम करणार्‍या, रचनात्मक कार्यातून परिवर्तन घडवून आणणार्‍या संस्थांची संख्या नाममात्र आहे. आर्थिक संकटामुळे आनंदवनाचे कार्य झाकोळून गेले तर स्वत:ला या समाजाचा संवेदनशील घटक मानणार्‍या प्रत्येकाच्या माणूसपणाची ती हार असेल. अशा संस्थांचे कार्य थांबले तर त्याबरोबर समाजातल्या चांगुलपणावरची आपली श्रद्धा संपून जाईल. आपल्यातील अनेकांना सेवाभावी कार्य करावेसे वाटते पण त्यासाठी आयुष्य उधळून देण्याची आमटे परिवारासारखी जिगर आपल्याकडे नसते. त्यांचे हात बळकट करणे मात्र आपल्याला अशक्य नाही. वंचितांबद्दल मनात केवळ करूणा असून उपयोगाचे नाही ,त्यांचे दु:ख हलके करण्यासाठी करुणेस कृतीची जोड द्यायला हवी, असे बाबा नेहमी म्हणायचे. या प्रामाणिक प्रयत्नांना हातभार लावताना देणगीचा विनीयोग योग्य प्रकारेच केला जाईल याची दात्याला खात्री असते. "माणूस एक वेळ बोटांशिवाय जगू शकेल पण स्वाभिमानाशिवाय जगू शकणार नाही" असं बाबा आमटयांनी म्हटलं आहे. स्वाभिमान निर्माण होतो स्वावलंबनातून.. आजवर लाखो दुर्लक्षित बांधव संस्थेच्या उपक्रमांमुळे स्वबळावर उभे राहू शकले.
अशा प्रकल्पांचा पाया असणारा आर्थिक डोलारा सांभाळण्यातच सगळी उर्जा खर्च होण्यापेक्षा एक कायमस्वरूपी निधी जमा व्हावा व त्यातून अधिक जोमदारपणे काम करता यावं ,नवी आव्हाने पेलता यावी असा आनंदवनाचा मानस आहे. त्यातून दरवर्षी होणाऱ्या मोतीबिंदू शस्त्रक्रियांची संख्या १५०० वरून ९०००पर्यंत वाढवणे , अल्पभूधारक शेतकरी कुटुंबाच्या जमिनींवरील जल व मृद संधारणाचे कार्य वर्षाला १०० वरून १२०० कुटुंबांपर्यंत विस्तारणे, युवाग्राम प्रकल्पात बेरोजगारांना मिळणाऱ्या व्यवसाय प्रशिक्षणाचा लाभ १०० हून पाचपटीने वाढविणे, स्थानिक पातळीवर होणाऱ्या वाषिर्क श्रमसंस्कांर छावणीस राज्यव्यापी छावण्यांचे स्वरूप देणे असे अनेक उपक्रम पूर्णत्वाला नेण्याचे आनंदवनाचे स्वप्न आहे. यासाठी ५५ कोटी रूपयांचा शाश्वत ’समाज प्रगती सहयोग निधी’ उभारणे आवश्यक आहे. यापैकी २७.५ कोटी एवढ्या निधीस दिल्या जाणाऱ्या योगदानाला इन्कम टॅक्स विभागाकडून कलम ३५ एसी/ ८० जीजीए(२)(बी)(बी) अंतर्गत १०० टक्के सूट देण्यात आली आहे. परंतु ३१ मार्च २०१२ पर्यंतच ही करसवलत लागू राहणार आहे. मदतीचे चेक महारोगी सेवा समिती, वरोरा या नावाने अपेक्षित आहेत. चेकच्या मागे आपले संपूर्ण नाव, पत्ता, फोन नंबर, ई मेल आयडी आणि पॅन चा उल्लेख आवश्यक आहे. आपण चेक या पत्त्यावर पाठवू शकता :
सचिव, महारोगी सेवा समिती, वरोरा, मु. पो. आनंदवन, ता. वरोरा जि. चंदपूर, महाराष्ट्र. पिन: ४४२९०७
याशिवाय ऑनलाईन बॅंकींग द्वारे अर्थसहाय्य करता येईल. अधिक माहितीसाठी संपर्क (०७१७६) २८२०३४ आणि ९०११०९४६२३
इ-मेल : vikasamte@anandwan.in

"पांगळयाच्या सोबतीला येऊ द्या बलदंड बाहू
निर्मितीच्या मुक्तगंगा द्या इथे मातीत वाहू"
अशी साद घालणार्‍या आनंदवनाच्या अस्तित्वासाठी आणि संवर्धनासाठी केवळ हा निधी आवश्यक नाही, या निमित्त्याने सहृदयतेचा..माणुसकीचा.. वारसा जपल्याचे समाधान आपण मिळवू शकू.

Monday, October 10, 2011

अॅपल



आपण जग बदलू शकतो- स्टीव्ह

'वेळ थोडा आहे. तुमचं मन सांगतं त्या रस्त्याने जा. मी ही तेच केलं' अस सांगणारा स्टीव्ह जॉब्ज अर्ध्या वाटेवरून निघून गेला. ३५० अब्ज डॉलर्सची उलाढाल असलेली 'अॅपल’ कंपनी स्वकर्तृत्वावर उभी करणारा स्टीव्ह हा संगणक क्षेत्रातील असंख्य तरुणांचा आदर्श होता. या सार्‍यांच्या मनात चेतनेचा एक झरा हरविल्याची भावना स्टीव्हच्या निधनामुळे निर्माण झाली आहे. अमेरिकेतील श्रीमंतांच्या यादीत स्टीव्ह ४२ व्या क्रमांकावर होता, पण त्याचं मोठेपण या यादीच्या पलीकडचं आहे. प्रत्येक माणूस स्वप्नाळू असतो, पण ती स्वप्नं आपोआप पूर्ण होत नाहीत. ’नापास’ चा शिक्का लागल्याने शिक्षण अर्धवट सोडणार्‍या स्टीव्हनं स्वप्नं बघणं सोडलं नाही. जिद्दीच्या जोरावर ती स्वप्नं त्याने पूर्णही केली. त्याच्या प्रत्येक प्रयोगाकडे कौतुकाने बघणार्‍या जगाला स्वप्नपूर्तीची आणि नवनिर्मितीची प्रेरणा स्टीव्हने दिली. यकृताचा गंभीर आजार झाल्याचे कळले तेव्हा न खचता त्याने या आजाराशी मैत्री केली, उलट तो नव्या उर्जेने कामाला लागला. उरलेले आयुष्य अधिक क्रियाशील, अधिक सुंदर करून कुटंबाच्या सान्निध्यात शांतपणे त्याने या जगाचा निरोप घेतला.

अरब वडील व अमेरिकन आईच्या पोटी २४ फेब्रुवारी १९५५ रोजी सॅनफ्रॅन्सिस्को येथे स्टीव्हचा जन्म झाला. अविवाहित असल्याने त्याच्या आईवडिलांनी क्लॅरा आणि पॉल जॉब्स या मध्यमवर्गीय अमेरिकन जोडप्याला स्टीव्हला दत्तक दिले. १९७२ मध्ये पदवीधर झाल्यानंतर स्टीव्हने पोर्टलँडमधील रीड कॉलेजमध्ये ' ऑडिटिंग ' अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. पहिल्याच परीक्षेत नापास झाल्याने त्याला कॉलेजमधून काढण्यात आले. आर्थिक अडचणीमुळे स्टीव्हवर त्या भागातील हरेकृष्ण मंदिरातील अन्नछत्रात जेवायची वेळ आली. आत्मिक शांततेच्या शोधात विशीतला स्टीव्ह मित्रासह भारतात देखील भटकला पण त्याला हवा मानवली नाही ,शिवाय लुबाडण्याचाही प्रयत्न झाला. जगभरातल्या बड्या कंपन्या भारताकडे मोठी बाजारपेठ म्हणून पाहतात, कदाचित पूर्वानुभवामुळे स्टीव्हनी पुढेही भारतीय बाजारपेठेत रस घेतला नाही.

१९७६ मध्ये स्टीव्हने मित्राच्या सोबतीने ' अॅपल ' या जगप्रसिद्ध संगणक कंपनीची निमिर्ती केली. १९८४ मधे मॅकिन्टॉश हा स्वस्त आणि जलदगतीने काम करणारा तसेच डेस्कटॉप पब्लिशिंग (डीटीपी) सुविधा उपलब्ध करून देणारा कॉम्प्युटर बाजारात आणला. मात्र अंतर्गत वर्चस्वाच्या स्पर्धेमुळे चक्क संस्थापकाला म्हणजे स्टीव्हलाच, कंपनीतून काढून टाकण्यात आले. या अवहेलनेमुळे निराश न होता स्टीव्हने १९८९ मधे 'नेक्स्ट कॉम्प्युटर' ची निमिर्ती केली पण बाजारात हे उत्पादन यशस्वी ठरले नाही. हार न मानता स्टीव्हने ' अॅनिमेशन क्षेत्रात ’पिक्सार' ची सुरूवात केली आणि ’टॉय स्टोरी’ सारख्या अॅनिमेशन पटांतून निर्विवाद यश मिळवले. आर्थिक संकटात सापडलेल्या ’अॅपल’ ने स्टीव्हला सल्लागार म्हणून सन्मानाने परत बोलावले. स्टीव्ह जिंकला पण त्या आनंदात गुरफटून न राहता त्याने ’अॅपल’ सह नव्याने झेप घेतली.

२००१ साली पहिला पोर्टेबल म्युझिक प्लेयर स्टीव्हने बनवला. २००३ साली आलेल्या आयट्युन्स, आयपॅडच्या माध्यमातून त्याने संगीत व्यवसायाला नवी दालनं उघडून दिली. एका आवडत्या गाण्यासाठी संपूर्ण अल्बमची सीडी घ्यावी लागणारा ग्राहक एका आयपॅडमध्ये आपल्या आवडीची हजारो गाणी सेव्ह करू लागला. आज आयपॅड शिवाय तरूणाईचे पान हलत नाही. अशा उत्पादनांमुळे स्टीव्ह घराघरात पोचला. २००७ साली मोबाइलच्या दुनियेतील अग्रणी स्मार्टफोन म्हणजेच आय-फोन स्टीव्हने जगाला दिला. अॅपल स्टोअरच्या माध्यमातून त्याने सॉफ्टवेअर वितरण अगदी सोपे केले. दोन वर्षांपूर्वी त्याने 'टॅबलेट पीसी 'ला जन्म दिला. शाळेतल्या पाटीच्या आकाराचे हे टॅबलेट आज तरुणांना आकर्षित करत आहेत.

अॅपलचे नवे सीईओ टीम कूक स्टीव्हला प्रेरणादायी मार्गदर्शक मानतात. बराक ओबामांना स्टीव्हचा ’आपण जग बदलू शकू’ हा आत्मविश्वास भावतो. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान ज्युलिया गिलार्ड त्याच्या कल्पकतेचं कौतुक करतात तर उद्योजक रतन टाटा त्याला आधुनिक युगातील एक प्रवर्तक मानतात. सामान्य माणसाला तंत्रज्ञान सोपं करून देण्याचं कौशल्य स्टीव्हकडे होतं, ट्विटर चे सीइओ लॅरी पेग म्हणतात "स्टीव्हमधे ग्राहकांचा अनुभव लक्षात घेऊन त्यानुसार बदल करण्याची वृत्ती होती". दूरदर्शी स्टीव्हनी ग्राहकांच्या उद्याच्या गरजा आजच ओळखल्या. उत्पादनांमधलं नावीन्य आणि सौंदर्यही जपलं. कोणत्याही व्यावसायिकासाठी स्टीव्ह म्हणजे एक विद्यापीठ होतं. आगामी काळात अद्यावत ’अॅपल’ टीव्ही बाजारात येईल, त्यानंतर प्रोजेक्टरची सोय असलेले आयपॅड, आयफोन आणि इ-पेपर शी संबंधित तंत्र येतील. ही सगळी डिझाईन्स स्टीव्हने अगोदरच तयार केली आहेत. शब्दश: तो काळाच्या चार पावले पुढे होता. त्यामुळे यानंतरही स्टीव्ह आपल्या सोबतच असेल मात्र तंत्रज्ञानाच्या रूपात !

(Image courtesy - Google -for noncommercial use)