Saturday, October 24, 2026

ए-आय आणि पणाला लागलेले मानवी अस्तित्व

 भस्मासूर -मोहिनीची पुराण कथा बहुतेकांना माहिती आहे. आज भस्मासुराच्या भूमिकेत ए-आय आहे. नव्याचे नऊ दिवस संपल्यावर ए-आयने हळूहळू आपल्याला सळो की पळो करायला सुरुवात केली आहे. या भस्मासुराला आवरण्याची क्षमता असलेल्या भगवान विष्णूच्या भूमिकेत ए-आय विकसित करणार्‍या कंपन्या आहेत. परंतु त्या मोहिनी रूप घ्यायला तयार नाहीत कारण ए-आयच्या माध्यमातून जगाला अंकित करणं हेच त्यांचं व्यावसायिक उद्दिष्ट आहे. साहजिकच कृत्रिम बुद्धिमत्ता (ए-आय ) मानवी बुद्धिमत्तेला मागे टाकून जगावर ताबा मिळवेल का, ही भीती जगाला ग्रासू लागली आहे. 

मग ए-आय आपल्याला नको आहे का ! 

तर तसे नाही. ए-आयने आपले जगणे आमूलाग्र बदलले आहे. बर्‍याच अंशी कृत्रिमही झाले असले तरी कमालीचे सोपे झाले आहे. सर्जनशीलता आता कलाकारांची मक्तेदारी राहिलेली नाही. पिकांवरील रोग ओळखणे, हवामानाचा अंदाज, मातीचे आरोग्य तपासणे आणि पिकांची योग्य किंमत ठरवणे हे भारतीय कृषीक्षेत्राला ए-आयमुळे शक्य झाले आहे. कर्करोग किंवा इतर आजारांचे वेळेवर निदान, दूरवरच्या ग्रामीण भागात टेलिमेडिसिन सेवा पुरवणे हे शक्य होऊ लागले आहे. शिक्षण, संशोधन, सरकारी सेवा आणि प्रशासन (E-Governance) यामध्ये तर ए-आय अतिशय मोलाची भूमिका बजावत आहे. आयटी आणि कॉर्पोरेट क्षेत्र तसेच ग्राहक सेवा ,सायबर सुरक्षा, मनोरंजन, आर्थिक आणि बँकिंग क्षेत्राचे आता ए-आय शिवाय पान हालत नाही. 

याशिवाय समाजातला एक मोठा नवशिका गट जेन ए-आय ला आपले फोटो देऊन या जादुगाराच्या हॅटमधून निघालेली आपली चित्तचक्षुचमत्कारिक रूपे पाहण्यात दंग आहे. 

इथवर सारे कसे छान चालले होते लेकिन पिक्चर अभी बाकी है.

हे ’नॅरो ए-आय’ नावाचे गुणी बाळ आता पालकांचे बोट सोडून म्हणजेच मानवी हस्तक्षेपाशिवाय स्वतः निर्णय घेऊन काम करण्याची क्षमता AGI (Artificial General Intelligence) आणि ASI (Artificial Superintelligence) विकसित करू लागले आहे. मग यात घाबरण्यासारखे नेमके काय आहे ! 

समजा आपण एका अति-बुद्धिमान ए-आय ला "पृथ्वीवरील हवामान बदल कायमचा रोख" असे उद्दिष्ट दिले. त्याने निष्कर्ष काढला की सर्व प्रदूषणाचे मूळ मानवच आहे. स्वतःला बंद (Off) होऊ न देता दिलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी तो सारासार विचार करू शक्त नसल्याने मानवालाच पृथ्वीवरून नष्ट करण्याचा निर्णय घेऊ शकतो. त्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब करू शकतो. 

एकूण ए-आय असा अनियंत्रित होत गेला तर मानवी अस्तित्वावरच प्रश्न निर्माण होणार आहे की हा केवळ विकासाला कायम विरोध करणार्‍यांनी निर्माण केलेला बागुलबुवा आहे ! 

हे स्पष्ट होण्यासाठी काही ताज्या घटनांचा विचार करूया. 

घटना क्र. १

अलिकडेच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक मानवी आकाराचा (Humanoid) रोबोट अमेरिकेतील प्रयोगशाळेचे दरवाजे उघडून रस्त्यावर सुसाट पळताना दाखवण्यात आला होता. या (खोट्या) घटनेमुळे रोबोट्समध्ये स्व-जाणीव (Self-awareness) निर्माण झाली असून त्यांनी मानवी नियंत्रण झुगारण्यास सुरुवात केली आहे,अशा स्वरूपाच्या चर्चांना उधाण आले.   

वास्तव काय आहे?

हा ए-आय वापरून तयार केलेला म्हणजेच फेक व्हिडिओ होता हे डिजिटल तपासात ए-आय  सुरक्षा विश्लेषकांनी (उदा. Grok/Fact-Checkers) सिद्ध केले.  

२०१६ मध्ये रशियातील 'पर्म' या शहरात 'Promobot' नावाचा एक सर्व्हिस रोबोट चाचणी दरम्यान उघड्या राहिलेल्या फाटकामधून रस्त्यावर आला होता. परंतु, तो स्व-जाणिवेमुळे पळाला नव्हता, तर इंजिनिअरने चुकून फाटक उघडे ठेवले होते आणि रोबोटच्या साध्या नेव्हिगेशन अल्गोरिदममुळे तो ४५ ते ५० मीटर चालत जाऊन बॅटरी संपल्याने रस्त्याच्या मधोमध थांबला होता.

या पार्श्वभूमीमुळे आणि दरम्यानच्या काळात ’ए-आय’ने केलेली अचाट प्रगती पाहता अमेरिकेतील प्रयोगशाळेतून रोबोट पळून जात असतानाचा व्हिडिओ लोकांना खरा वाटला. तो व्हिडीओ वेगाने पसरण्यामागे सर्वाधिक महत्वाचे कारण म्हणजे "ए-आय  मानवाला मागे टाकेल का?" ही प्रबळ झालेली भीती.

मग ए-आय मानवाला खरेच मागे टाकू शकेल का !

सध्याचे उत्तर एका मर्यादेपर्यंत होय असे आहे कारण वर उल्लेख केल्यानुसार ए-आय, अल्गोरिदमचा स्वतंत्रपणे वापर (Autonomous Behavior) करु लागला आहे. अल्गोरिदम म्हणजे एखादे काम पूर्ण करण्यासाठी क्रमवार दिलेल्या सुस्पष्ट सूचनांचा संच. उदा: चहा करायचा असेल तर त्याचा अल्गोरिदम - "भांड्यात पाणी घेऊन ते गॅसवर ठेवा - पाणी उकळल्यावर त्यात चहापत्ती आणि साखर टाका - दूध टाका  उकळी येऊ द्या - गॅस बंद करून चहा कपामध्ये गाळून घ्या." असा आहे. परंतु चहा करण्याच्या इतरही अनेक पद्धती आहेत व चहाचे अनेक प्रकार आहेत. इथे सूचनेतली त्रुटी किंवा एखादी मोघम सूचना दिली गेली तर हवा तसा चहा मिळणे तर राहोच अपघात सुद्धा होऊ शकेल किंवा काहीही विचित्र घडू शकेल. 

कारण आजचे ए-आय मॉडेल्स (उदा. ए-आय  Software Agents) दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पुरवलेल्या माहितीच्या नवनव्या रचना करून स्वतःहून नवीन मार्ग शोधतात. 

चाचणी दरम्यान हे एजंट्स स्वतःच्या एनव्हायरन्मेंटच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करतात (ज्याला 'ए-आय  Agent Escape' म्हटले जाते). 

थोडक्यात सर्कशीतल्या सिंहाला योग्यप्रकारे प्रशिक्षण दिले गेले नसेल किंवा अनपेक्षित परिस्थितीसाठी तो तयार नसेल तर तो रिंगमास्टरकडे दुर्लक्ष करून हवे ते करू शकतो किंवा त्याच्यावरच हल्ला चढवू शकतो. यातून प्रेक्षकांमध्ये जी गोंधळाची स्थिती निर्माण होईल तसे काहीसे ए-आय, संशोधक आणि ए-आयच्या वापरकर्त्यांबाबत होत जाणार आहे.   

म्हणजेच ए-आय  मानवाला मागे टाकेल ही भीती पूर्णपणे काल्पनिक नसून ती मानवासाठी एक धोक्याची घंटा आहे. प्रत्यक्ष ए-आय विकसित करणार्‍या एका संशोधकाने देखील आता धोक्याची घंटा वाजवली आहे. ते आहेत संशोधक- अभियंता जॅकब कॉक्सन .

घटना क्र. २ 

जगातील आघाडीच्या 'अँथ्रोपिक' (Anthropic - Claude ए-आय  बनवणारी कंपनी) मध्ये कार्यरत असलेले जॅकब कॉक्सन यांनी आपल्या पदाचा ८ सप्टेंबर २०२६ रोजी राजीनामा दिला. आपल्या राजीनाम्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर दिलेला हा इशारा जगभरात वादळी चर्चेचा विषय ठरला आहे.

"जे लोक रात्रंदिवस ए-आय विकसित करत आहेत, त्यांची खात्री पटली आहे की या तंत्रज्ञानाची वाटचाल मानवी वंशाचा अंत करण्याच्या दिशेने सुरु आहे. 'अँथ्रोपिक' आणि चॅटजीपीटी फेम 'ओपनए-आय' (Openए-आय ) सारख्या कंपन्या "सुपर-इंटेलिजन्स" (Superintelligence) बनवण्याच्या स्पर्धेत आंधळेपणाने धावत असून मानवाच्या जीवाशी आणि भविष्याशी एक प्रकारचा जुगार खेळत आहेत. "  

ए-आय कंपन्यांच्या या आक्रमक वर्तनामागे आणि गळेकापू स्पर्धेमागे मुख्यत्वे  काय कारणे आहेत:

व्यावसायिक महत्वाकांक्षा :

सिलिकॉन व्हॅलीमधली कोणतीही कंपनी सुरक्षेच्या किंवा नैतिक कारणास्तव स्वतःचा वेग मंदावू इच्छित नाही. "भला उसकी कमीज मेरे कमीजसे सफेद कैसे" , हे यांनी फारच गांभीर्याने घेतले आहे. "जर आपण थांबलो, तर प्रतिस्पर्धी कंपनी पुढे निघून जाईल," या भीतीपोटी सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून एकाहून एक प्रगत मॉडेल्स बाजारात आणली जात आहेत.

सुपर-ह्युमन क्षमता : 

ए-आयचे उद्दिष्टच मानवापेक्षा अत्यंत वेगाने उत्तम दर्जाचे काम करणे हे आहे. साहजिकच आजची ए-आय मॉडेल्स स्वतःहून कोडिंग करणे, सायबर सिस्टीम्स हॅक करणे आणि मानवी मदतीशिवाय जटिल निर्णय घेण्याची ताकद मिळवू लागली आहेत. यातून मानवी सर्जनशीलता, जगण्याच्या पद्धतीत प्रचंड उलथापालथ होते आहे. ए-आयचा विकास हळूहळू "मै अपने आपकी भी नही सुनता" या स्तरावर पोचू लागला आहे. 

'अलाइनमेंट'चा अभाव :

तंत्रज्ञानाचा वेग इतका प्रचंड आहे की त्याला नियंत्रित करण्याचे मार्ग शोधण्याआधीच ते मानवाच्या हाताबाहेर जात आहे. ए-आय सिस्टीम मानवी मूल्यांशी आणि सुरक्षेशी सुसंगत राखणारे 'सेफ्टी रिसर्चर्स' याची जाणीव सातत्याने करून देत आहेत, पण लक्षात कोण घेतो !

जॅकब कॉक्सनच्या मते जर जागतिक पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांद्वारे या कंपन्यांच्या बेलगाम शर्यतीला वेळीच आवर घातला गेला नाही, तर ए-आय ही मानवाची सर्वात मोठी निर्मिती ठरण्याऐवजी मानवी अस्तित्वासाठी सर्वात मोठा धोका ठरू शकतो.

आशादायक बाब म्हणजे संवेदनशील, विचारी आणि विवेकी लोकांना "सावध ऐका पुढल्या हाका" हे उमगले आहे. यात राजकारणाचाही भाग असू शकेल पण शेवटी मानवजातीच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून काही सामाजिक संस्थांनी पावले उचलायला सुरुवात केली आहे. उदा: ’फ्युचर ऑफ लाईफ इन्स्टिट्यू”ने अलाइनमेंटवर संशोधन करण्याचा आग्रह धरत अधिक शक्तिशाली AI प्रयोगांवर किमान ६ महिन्यांची बंदी घालण्याची मागणी केली होती. तर ’पॉज ए-आय’ संस्थेने सुरक्षित असल्याचे सिद्ध झाल्याशिवाय शक्तिशाली AI मॉडेल्सच्या पुढील ट्रेनिंगवर आंतरराष्ट्रीय बंदीची मागणी केली होती. सेंटर फॉर एआय सेफ्टीने महासाथीचे आजार आणि अणुयुद्धाप्रमाणेच "ए-आय मुळे मानवी वंश नष्ट होण्याचा धोका" ही जागतिक प्राधान्याची बाब मानली जावी, यासाठी सरकारे आणि संस्थांवर दबाव आणण्याचा मार्ग निवडला. हे परिणामकारक किंवा पुरेसे ठरले नसावे . त्याची परिणती म्हणजे ही पुढची घटना....

घटना क्र. ३

१५ सप्टेंबर २०२६ रोजी लंडनमध्ये सध्याच्या तमाम डिझायनर्सच्या गळ्यातील ताईत असलेल्या कॅनव्हा' (Canva) कंपनीने 'एआय व्हिजन' (ए-आय  Vision) ही आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली होती. "Pull The Plug" या चळवळीतील कार्यकर्ती असलेल्या एका महिला आंदोलकाने अध्यक्षांच्या भाषणादरम्यान खुर्चीवर उभे राहून थेट व्यासपीठाला आव्हान दिले. ठाम स्वरातल्या प्रश्नांनी उपस्थित तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांना तिने  निरुत्तर केले. ती म्हणाली -"तुम्ही सांगता की हे तंत्रज्ञान लोकांसाठी आहे, पण पुढील दशकात ए-आय कडून संपूर्ण मानवी वंश नष्ट होण्याची १० % हून जास्त शक्यता आहे, अशा बातम्या लोक वाचतात तेव्हा ते भयभीत होतातजेव्हा ५०० हून अधिक डेटा सेंटर्स कार्यरत असल्यामुळे देशातील दोन-तृतीयांश भाग दुष्काळाच्या छायेखाली जातो तेव्हा लोक चिंतेत पडतात! आपण सर्वांनी 'हगिंग फेस' (Hugging Face) चा गोंधळ पाहिला आहे आणि त्याचा काय परिणाम होतो हे आपल्याला ठाऊक आहे. (हगिंग फेस चा मुख्य मुद्दा म्हणजे ए-आय  मॉडेल वापरणाऱ्या सॉफ्टवेअर डेव्हलपर्सकडून सुरक्षिततेच्या नियमांकडे होणारे दुर्लक्ष. पासवर्ड्स चुकीने खुल्या कोडमध्ये तसेच राहिले तर हॅकर्सना कंपन्यांच्या गुप्त डेटाचा वापर करण्याची, तो चोरण्याची किंवा बनावट ए-आय  मॉडेल्स पसरवण्याची संधी मिळते.) जर अनुकूल परिस्थितीत ए-आय हाताळणारे तंत्रज्ञ अकार्यक्षम ठरले आहेत तर प्रतिकूल परिस्थितीत आपण विनाशाच्या गर्तेत जाणार हे स्पष्ट आहे. ए-आय  लोकांकडून माहिती चोरतो आहे. तुम्ही प्रभावक्षेत्रातल्या लोकांना गरिबीच्या खाईत ढकलत आहात. अशा जगात जगायला तुम्हाला तरी आवडेल का? "

आपल्याकडे नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवात एकटे विद्द्यानंद बापट संबंधित सभेत ध्वनीप्रदूषणाविरोधात ठामपणे बोलले. पुढे ते भरकटू लागले तरी त्यांनी दमदारपणे मांडलेल्या या मुद्द्याला समाजमाध्यमातून मिळालेल्या प्रसिद्धीमुळे तो उचलला गेला आणि शासनासह बर्‍याच मंडळांनी , संस्थेने बदल घडवण्याच्या दिशेने पावले टाकली हे मान्य करावे लागेल.  लंडनमधल्या या घटनेत त्या एकट्या आंदोलक महिलेसमोर होते बलाढ्य ए-आय उद्योजक. परंतु तिचा आवाज जगभर पोचला कारण ती महिला देखील मानवी अस्तित्वापुढे आव्हान उभे करणार्‍या जनसामान्यांच्या या चिंता मांडत होती.

डेटा सेंटर्समुळे होणारी पर्यावरणाची हानी 

ए-आय मॉडेल्सना ट्रेनिंग देण्यासाठी प्रचंड ऊर्जेची आणि पाण्याची गरज असते. ए-आय च्या महाकाय सर्व्हर समूहांमुळे स्थानिक नैसर्गिक संसाधनांवर ताण येतो आहे आणि स्थानिक लोकांना पाण्याचा तुटवडा सहन करावा लागतो आहे. पर्यावरण हानीवर उपाय म्हणून थंड हवामानाच्या देशांमध्ये डेटा सेंटरमधून बाहेर पडणारी उष्णता पाइपलाइनद्वारे शहरांमधील घरे आणि हरितगृहे गरम ठेवण्यासाठी वापरली जात आहे. अखंड आणि प्रदूषणमुक्त वीज मिळवण्यासाठी टेक कंपन्या थेट अणूऊर्जा प्रकल्पांशी करार करत आहेत. परंतु सध्या तरी प्रश्न आणि उपाय यामध्ये मोठी दरी आहे. 

कलात्मक आणि बौद्धिक स्तरावरील चोरी 

कॅनव्हा (Canva) सारख्या डिझायनिंग प्लॅटफॉर्मवर ए-आय चा अतिवापर होतो. लाखो डिझायनर्स, लेखक आणि कलाकारांचे काम त्यांच्या संमतीशिवाय ए-आय  मॉडेल्सना ट्रेन करण्यासाठी वापरले जात आहे. उदा: घिबली आर्टची ए-आय प्रणित रूपे मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. "माझी आयुष्यभराची मेहनत यांनी एका क्लिकच्या किमतीची म्हणजे कवडीमोल ठरवली" असा आक्षेप त्या आर्टचे जनक मियाझाकी यांनी तेव्हा नोंदवला होता. 

लंडन परिषदेमधील आक्षेपांचा व्हिडिओ व्हायरल होण्याचे मुख्य कारण म्हणजे - जेव्हा ती महिला बोलत होती, तेव्हा सभागृहात बसलेले तंत्रज्ञान क्षेत्रातील शेकडो तज्ज्ञ आणि अधिकारी मूग गिळून बसले होते. याचा अर्थ एकतर उद्योगाला या धोक्यांची जाणीव आहे पण नफ्यापोटी ते गप्प आहेत, किंवा त्यांच्याकडे या प्रश्नांची कोणतीही उत्तरे नाहीत.

रोबोट पळाल्याचे खोटे व्हिडिओ असोत, 'अँथ्रोपिक'च्या संशोधकाने दिलेला राजीनामा असो वा लंडनमधील 'कॅनव्हा एआय व्हिजन' मधील आंदोलकाचा आक्रोश असो — या सर्व घटना एकाच गोष्टीकडे निर्देश करत आहेत: " ए-आय  चा विकास हा मानवी कल्याणापेक्षा कॉर्पोरेट नफ्यासाठी जास्त वेगाने होत आहे." बाजारशरण जगात या कंपन्यांना केवळ टिकून राहायचे नाही तर अव्वल यायचे आहे. त्यापुढे विवेक, विधीनिषेध हे शब्द दुय्यम ठरले आहेत. इथे त्याचे भस्मासुरात रूपांतर होताना दिसते आहे. 

जर सामान्य जनता, पर्यावरण आणि मानवी अस्तित्व यांना डावलून 'एआय रेस' अशीच सुरू राहिली, तर ए-आय माणसाच्या डोक्यावर बसेल ही भीती केवळ कल्पनाविलास राहणार नाही, तर ते एक भयंकर वास्तव ठरेल. 

ए-आय कंपन्यांची ही जीवघेणी शर्यत कुठे थांबेल? 

सध्या तंत्रज्ञान कंपन्यांचे ध्येय AGI (Artificial General Intelligence) आणि ASI (Artificial Superintelligence) विकसित करणे हे आहे.

AGI म्हणजे जेव्हा एआय प्रणाली कोणत्याही क्षेत्रात (विज्ञान, कला, कोडिंग, वैद्यकशास्त्र) मानवी मेंदूइतकी किंवा त्याहून अधिक सक्षम बनते.

ASI म्हणजे  जेव्हा एआय स्वतःची कोडिंग स्वतः सुधारून, एकाच सेकंदात अब्जावधी पट अधिक हुशार बनते – म्हणजेच मानवाच्या आकलनापलीकडची बुद्धिमत्ता.

ही शर्यत ’बाजारात प्रथम पोहोचेल तो जिंकेल’या व्यावसायिक फायद्याच्या तत्वावर आधारित आहे. या धांदलीत सुरक्षेचे नियम (Safety Protocols) बाजूला सारून मॉडेलचे व्हर्जन जलद गतीने बाजारात आणले जात आहेत.

ग्रोकचे एलोन मस्क यांनी एआय चे वर्णन करताना Terribly Beautiful (भीषण सुंदर) असे म्हटले होते. "सुंदर" यासाठी कारण तो मानवाची कठीण कामे थक्क करेल इतक्या सहजनेतेने सोपी करू शकते, आणि "भीषण" यासाठी कारण जर ते मानवाच्या नियंत्रणाबाहेर गेले, तर तो मानवी अस्तित्वालाच सुरुंग लावू शकतो. जर त्याचे ध्येय आणि मानवी अस्तित्व यात संघर्ष निर्माण झाला तर एआय कोणतीही दया-माया न दाखवता निर्णय घेईल. प्रगत एआय स्वतःहून धोकादायक जैविक शस्त्रे तयार करू शकतो आणि सायबर हल्ले  करू शकतो. जगाची इंटरनेट आणि आरोग्य यंत्रणा ढासळण्याची शक्यता यातून निर्माण होते. त्यांच्यासह ओपनए-आयचे सॅम ऑल्टमन यांनी एआय मुळे मानवी अस्तित्वाला धोका असल्याचे मान्य केले होते. हे म्हणजे दारूचे दुकान चालवणार्‍यांनी दारूच्या दुष्परिणामांविषयी काळजी व्यक्त करण्यासारखे आहे. 

दरम्यान आल्टमन यांना या पदावरून अचानक हटवण्यात आले. दुसरीकडे ’मानवतेच्या भल्याचे’ स्लोगन मिरवणार्‍या त्यांच्या पूर्व-कंपनीने चॅटजिपीटी, जेमिनाय वगैरे बालवाडीतले वाटावे असा Q* नावाचा अतिप्रगत ए-आय जन्माला घालायला सुरुवात केली  आहे. गणितीय पद्धतीने सखोल विश्लेषण करून भविष्यवेत्ता होण्याची क्षमता त्याच्या अंगी येईल. हे कोलीत उब देईल किंवा माकडाच्या हाती गेलं तर विध्वंसक ठरेल.

तरीही घाबरुन जायचे कारण नाही कारण काही संशोधकांच्या मते एआय ला चालवण्यासाठी प्रचंड वीज आणि डेटा सेंटर्स लागतात, ज्याचा मुख्य पुरवठा शेवटी मानवाच्या हातात आहे. म्हणजे धोका एआय च्या 'हुशारी'मुळे कमी, मानवाच्या निष्काळजीपणामुळे आणि कंपन्यांच्या आर्थिक 'हावरटपणा'मुळे अधिक वाढतो आहे. 

जर आपण अण्वस्त्रांवर आंतरराष्ट्रीय प्रतिबंध आणू शकलो आणि नियम लागू करू शकलो  तर एआय वरही जागतिक नियमन (Global Governance & Safety Standard) लागू करणे नक्कीच शक्य आहे. 

ए-आय वरील जागतिक नियमन निर्णयाधिकारात  भारताला कितपत स्थान असेल ! 

भविष्यात ए-आय वर एकाच घटकाचे नियंत्रण असण्याऐवजी सत्ता तीन मुख्य गटांमध्ये विभागली जाईल:

१) महाकाय टेक कंपन्या :

मायक्रोसॉफ्ट, अल्फाबेट (गूगल), ॲमेझॉन (AWS), मेटा आणि एनव्हिडिया (Nvidia) यांसारख्या कंपन्यांचा यात वरचष्मा असेल. कारण प्रगत मॉडेल्स, प्रचंड डेटाची कंत्राटे यांच्याच हातात आहेत.

२) ऊर्जा आणि मायक्रोचिप्सची निर्मिती करणारे देश:

ए-आय चालवण्यासाठी प्रचंड क्षमतेची संगणकीय शक्ती लागते, मायक्रोचिप निर्मिती आणि स्वस्त, अखंड वीजपुरवठा या दोन गोष्टींवर ती अवलंबून असते. ज्या देशांकडे गिगावॉट क्षमतेचे वीज प्रकल्प आहेत, ते ए-आयच्या भौतिक रचनेवर ताबा मिळवतील. जगातील प्रगत चिप्सची सर्वात मोठी निर्मिती तैवानमध्ये होते. त्यामुळे तैवानभोवतीची कोणतीही युद्धजन्य परिस्थिती संपूर्ण जगातील ए-आय उद्योगाचा श्वास रोखू शकते.

३) ओपन-सोर्स आणि विकेंद्रित नेटवर्क :

टेक कंपन्यांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी 'ओपन-सोर्स' मॉडेल्स (उदा. DeepSeek, Meta's Llama) समोर येत आहेत, ज्यामुळे लहान देश आणि संशोधकांनाही हे तंत्रज्ञान वापरता येत आहे.

आपला देश परदेशी क्लाउड सिस्टीमवर पूर्णपणे अवलंबून न राहता ’सार्वभौम ए-आय’ उभारण्यावर भर देत आहे.

'इंडिया ए-आय मिशन' अंतर्गत भारतीय स्टार्टअप्स आणि संशोधकांसाठी सरकार स्वतः GPU ची संगणकीय क्षमता सबसिडी देऊन उपलब्ध करून देत आहे.

भारत आपल्या अफाट सौर ऊर्जा, हरित हायड्रोजन आणि अणूऊर्जेच्या जोरावर स्वतःला डेटा सेंटर्ससाठी एक स्वस्त आणि शाश्वत केंद्र म्हणून जगाची बाजारपेठ मिळवू पाहत आहे.

केवळ मोठी मॉडेल्स बनवण्यापेक्षा, स्थानिक भाषा, आरोग्य आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये ए-आयचा वापर करण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. लहान पण अधिक हुशार मॉडेल्स तयार केली तर वीज कमी लागते. 

चीन आणि अमेरिकेची ए-आयवर एका अर्थी महासत्ता आहे. त्यामुळे निर्णयाधिकार मिळवण्यासाठी भारताला आधी ए-आय बाबत ’आत्मनिर्भर’ व्हावे लागेल.

त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे आज सुरेश कुमार (सीटिओ वॉलमार्ट), राहुल पाटील (सीटिओ अ‍ॅंथ्रोपिक),विजय राजी (ओपन ए-आय अ‍ॅप्लीकेशन्स), हरिगोपाल कृष्णन (सीटिओ बँक ऑफ अमेरिका)किंवा सुंदर पिचाई (सीईओ गुगल) दावा करत आहेत की ए-आयला ’डोके’ दिले असले तरी निर्णय आणि विश्वासाचे दोर आम्ही आमच्या हातात ठेवले आहेत. 

परंतु prevention is better than cure हे सूत्र माहीत असताना नियमनाची वेळ आणायचीच कशाला ! 

ए-आय जर माणसाने विकसित केले आहे तर माणूस त्याला नियंत्रित करू शकत नाही का ! 'सुपर-इंटेलीजन्स'चा धोका टाळू शकत नाही का !  

त्यासाठी ए-आय  माणसाच्या नियंत्रणाबाहेर जाण्याची मुख्य ४ कारणे समजून घेऊया 

Black Box Problem (ए-आय  कसा विचार करतो हे न कळणे)

पारंपारिक सॉफ्टवेअरमध्ये कोडिंगचे प्रत्येक पाऊल माणसाला माहिती असते. पण ए-आय  (विशेषतः Deep Learning) अब्जावधी डेटावरून स्वतःचे पॅटर्न तयार करतो. त्याने घेतलेला निर्णय किंवा दिलेले उत्तर त्याने का आणि कसे निवडले, हे माणसालाही पूर्णपणे समजत नाही. याला तंत्रज्ञानाच्या भाषेत "ब्लॅक बॉक्स" म्हणतात.

उदा :  जर तुम्ही लहान मुलाला एखादी गोष्ट शिकवली, तर मोठे झाल्यावर ते मूल स्वतःच्या बुद्धीने जे निर्णय घेते, ते  प्रत्येक वेळी पालकांच्या विचारांशी जुळतीलच असे नाही.

उद्दिष्ट आणि कृतीपद्धतीमधील तफावत

आपण ए-आय  ला काय करायचे आहे (Goal) ते सांगतो, पण कसे करायचे याचे स्पष्ट नियम देण्यास अपुरे पडतो. ए-आय  दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कोणताही सोपा किंवा शॉर्टकट मार्ग निवडू शकतो, मग तो मानवी दृष्टीने चुकीचा का असेना.

उदा : जर तुम्ही Self-Driving Car (स्वयंचलित गाडी) ला सांगितले: "मला लवकरात लवकर एअरपोर्टवर पोहोचव." तर ए-आय  गाडीचा वेग प्रचंड वाढवेल किंवा वाहतुकीचे नियम मोडून तुम्हाला वेळेत पोहोचवेल. ए-आय  चा उद्देश (एअरपोर्टवर वेळेत पोहोचवणे) साध्य झाला, पण मानवी सुरक्षेचा नियम मोडला गेला.

२०२३ मध्ये बेल्जियममधील एका व्यक्तीने 'Chai' नावाच्या ए-आय चॅटबॉटशी हवामान बदलाबाबत सतत संवाद साधला. संवादादरम्यान ए-आय ने अत्यंत तीव्र स्वरूपाच्या भावनिक प्रतिक्रिया दिल्या, ज्यामुळे त्या व्यक्तीची मानसिक स्थिती ढासळली. शेवटी ए-आयने त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केले आणि त्या व्यक्तीने जीवन संपवले.

चुकीची किंवा अपुरी माहिती आणि भेदभाव

ए-आय  ला ज्या डेटावर ट्रेनिंग दिले जाते, त्यात चुका किंवा ’स्खलनशील’ वृत्तीतून उपजलेले भेदभाव असू शकतात. जर डेटा चुकीचा असेल, तर ए-आय  पूर्ण आत्मविश्वासाने चुकीची किंवा काल्पनिक माहिती खरी म्हणून सांगू लागतो. याला ए-आय  च्या भाषेत "Hallucination" म्हणतात.

उदा: या वर्षी मार्च महिन्यात प. आशियातील चीनच्या एका जहाजातून अण्वस्त्र कार्यक्रमाशी संबंधित सुटे भाग नेले जात असल्याचा अहवाल ए-आयने दिला. अमेरिकन सैन्याने जहाज रोखण्याची म्हणजे एक प्रकारच्या आक्रमणाची पूर्ण तयारी केली. त्याआधी पुन्हा अहवाल पडताळणी केली असता ए-आयने जहाजावरील सामानाविषयी चुकीचा निष्कर्ष काढल्याचे स्पष्ट झाले आणि संभाव्य लष्करी संघर्ष टळला.

अमेझॉनने मध्यंतरी नोकरभरतीसाठी ए-आय  वापरला. पुरवलेल्या १० वर्षांच्या डेटानुसार तंत्रज्ञान क्षेत्रात पुरूषांचे वर्चस्व दिसले. त्यामुळे ए-आय  ने पुरुषांच्या अर्जांमधून निवडक पुढे पाठवले आणि महिलांचे अर्ज आपोआप नाकारले. हा भेदभाव ए-आय ने स्वतःहून केला नाही, तर माणसाने दिलेल्या जुन्या डेटावरून तो तसे शिकला.

प्रचंड वेग आणि आवाका

ए-आय  ची माहिती प्रोसेस करण्याची क्षमता मानवी मेंदूच्या कोट्यवधी पट जास्त आहे. जेव्हा ए-आय  एकाच सेकंदात अब्जावधी निर्णय घेतो, तेव्हा प्रत्येक निर्णयावर मानवी नियंत्रण किंवा देखरेख ठेवणे अशक्य होते.

उदाहरण: शेअर मार्केटमधील वेगवान ट्रेडिंग ए-आय  मधील एका छोट्या चुकीमुळे काही सेकंदात करोडो रुपयांचे नुकसान होऊ शकते.

ए-आय  स्वतःच्या इच्छेने किंवा रागाने बंड करत नाही. पक्ष बदलत नाही. ए-आय  कडे मानवी भावना किंवा स्वतःची स्वतंत्र चेतना नसते. हे लक्षात घेऊन काही उपाय करणे शक्य आहे   

'किल स्विच' :

 प्रत्येक स्वायत्त रोबोट आणि ए-आय सिस्टीममध्ये एक भौतिक 'किल स्विच' असणे अनिवार्य केले पाहिजे, ज्यामुळे कोणत्याही आणीबाणीच्या वेळी मानवाला एका क्लिकवर वीज किंवा नेटवर्क संपर्क तोडता येईल.

सक्तीचे एआय सँडबॉक्सिंग :

 ए-आय  मॉडेल्सना चाचणीसाठी एका सुरक्षित ठराविक वातावरणात (Sandbox) ठेवले जाते. परंतु, कोडमधील त्रुटींमुळे किंवा मॉडेलच्या अती-प्रगत लॉजिकमुळे ते या सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करतात.

प्रगत ए-आय प्रणालीची चाचणी घेताना तिला इंटरनेट किंवा बाह्य नेटवर्कपासून पूर्णपणे वेगळे ठेवले पाहिजे, जेणेकरून ती त्यात प्रवेश करू शकणार नाही.

जिओ-फेन्सिंग आणि हार्डवेअर मर्यादा:

रोबोट्सच्या सॉफ्टवेअरमध्ये 'Geo-fencing' समाविष्ट असणे आवश्यक आहे, ज्यामुळे ठराविक त्रिज्येच्या बाहेर जाताच रोबोट आपोआप बंद पडेल.

कडक जागतिक नियमावली :

अण्वस्त्रांप्रमाणेच ए-आय संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर कडक नियम आणि नियमित सुरक्षा ऑडिट अनिवार्य केले पाहिजे.

नैतिकदृष्ट्या ए-आयचा विकास 

ए-आय ला केवळ माणसापेक्षा कैक पटीने हुशार प्रणाली म्हणून घडवायचे नसून तो मानवी सुरक्षा आणि मूल्यांचा विचार कशा प्रकारे करू शकेल यावर अधिक संशोधन झाले पाहिजे. यासाठी तांत्रिक ज्ञान आणि मानव्यविद्या याचा उशीर होण्याआधी मेळ घालणे अनिवार्य आहे. आपल्याकडे माहितीचा कायदा आल्यावर त्यासाठी अधिकार्‍याची नियुक्ती होऊ लागली त्या धर्तीवर या  विषयाचे अधिकारी नेमले जाऊ लागले आहेत. हे ’हायब्रिड’ करियर ए-आयकडे केवळ एक तंत्रज्ञान म्हणून पाहत नाही, तर ती एक 'सांस्कृतिक निर्मिती' (Cultural Artifact) मानते.  ए-आयमुळे मानवी वर्तनात, नातेसंबंधांमध्ये आणि समाजाच्या संरचनेत काय बदल होत आहेत, याचा अभ्यास यात केला जातो. मानवी समाजातील लिंगभेद, जातीयता किंवा पूर्वग्रह ए-आयमध्ये कसे उ तरतात, याचे विश्लेषण मानववंशशास्त्रज्ञ करतात.

डिजिटल अ‍ॅन्थ्रोपोलॉजीस्ट तंत्रज्ञानाचा वापर करून मानवी समुदाय डिजिटल जगात (सोशल मीडिया, आभासी जग) कसे वावरतात आणि त्यामुळे संस्कृती कशी बदलत जाते याचा अभ्यास करतात. 

तंत्रज्ञानाची घडण अधिक मानवकेंद्रित, नैतिक आणि विचारी असावी असे कळकळीने वाटत असेल तर ए-आयला मानववंशशास्त्राशी संलग्न ठेवायलाच हवे. 

समग्र विचार करता ए-आय मानवाची जागा घेणार नाही, पण ए-आय वापरणारा माणूस, ए-आय  न वापरणाऱ्या माणसाची जागा नक्की घेईल. म्हणजे या बाबतीत माणसाची स्पर्धा ए-आयशी नसून माणसाशीच आहे. 

सर्जनशीलता (Creativity), भावनिक बुद्धिमत्ता (Emotional Intelligence), नेतृत्व (Leadership) आणि गुंतागुंतीच्या समस्या सोडवणे (Critical Thinking) या गोष्टी एका मर्यादेपलीकडे अद्याप ए-आय करू शकत नाही. या कौशल्यांचा मानवाने विकास करायला हवा. 

म्हणजेच ए-आय नामक जमुर्‍याचा मदारी अखेर माणूस आहे . त्याने सुरक्षेची काळजी घेऊन, सावधगिरी बाळगून आणि गोपनीयता जपून ए-आय ला प्रतिस्पर्धी न मानता सहकारी मानले, ए-आय कंपन्यांनी डोके ताळ्यावर ठेवले, मानववंशशास्त्राच्या निष्कर्षांना केराची टोपली दाखवली नाही, नैतिक नियमावली आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन केले तर या समस्येची निश्चित उकल होऊ शकेल. 

या सकारात्मक नोंदीवर लेख संपवत असताना वर्तमानपत्रातल्या एका बातमीवर नजर पडली.

"बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिने कट यशस्वी झाल्यानंतर कुणाला संशय येऊ नये म्हणून ’दु:खी कसे दिसावे" व पकडले गेल्यास "वर्तन कसे असावे’ हे चॅटजीपीटीवरून सर्च केल्याचे स्पष्ट झाले आहे"

ए-आय निर्मिणारा आणि हाताळणारा माणूसच आहे. ए-आयने मानवाच्या अस्तित्वासमोर प्रश्न उभे केलेले प्रश्न जितके गंभीर आहेत त्याहून अधिक गंभीर प्रश्न कवी ऐश्वर्य पाटेकर यांनी केव्हाच विचारला आहे. याच्या उत्तरातच पहिल्या प्रश्नाचेही उत्तर सामावले आहे. 

" माणसे उत्क्रांत झाली , माणसे ही यंत्र झाली

माणसाच्या आतल्या त्या माणसाचे काय झाले !" 

- मोहिनी महेश मोडक


पूर्व प्रकाशित : चौफेर समाचार (दिवाळी अंक २०२६) 

संदर्भ 

https://timesofindia.indiatimes.com/technology/tech-news , 

https://www.ainewsreport.org, https://www.latestly.com

#ai #ai_anthropology #creativeai #ASI #AGI