Sunday, August 31, 2025

Excelsior

माझ्या शाळेतल्या म्हणजे ’सेंट अलॉयसिस हायस्कूल’ मधल्या आमच्या वर्गाचं भव्य रियुनियन ठरलं होतं. काही जणांशी संपर्क होता तर काही जण अनेक वर्षांनी भेटले. आमच्या वर्गातला एक बॅकबेंचर आता मोठा उद्योगपती झालेला. त्याने पुढाकार घेऊन अगदी कॉर्पोरेट पद्धतीने झकास व्यवस्था केली होती. सगळं वातावरण शाळेच्या वेळचं. स्नॅक्स स्टॉलवर शाळेबाहेर मिळणारे चिंचगोळे, रावळगाव टाईप चॉकलेट, गावातल्या प्रसिद्ध घाशीलाल बटाटेवड्यापासून पार्श्वभूमीवर वाजणार्‍या ’मैने प्यार किया’ आणि ’बोनीएम’ मधल्या गाण्यापर्यंत सगळं जुन्या आठवणी जागवणारं. आमचा सातवीतला ग्रुप फोटो मोठ्ठा करून स्टेजवर मागे लावलेला. तोच का ते पुढे सांगते. त्यातले काहीसे बावळट पण अश्राप वाटणारे आमचे अवतार पाहताना गंमत वाटत होती. आईने हनुवटी धरून भांग पाडून दिलेली मुलं आणि दोन बो किंवा रिबिन बांधून हाताची घडी घालून बसलेल्या मुली. फोटोत आमच्या मागे शाळेची भव्य इमारत. 

रेल्वेचं आशियातलं दोन नंबरचं यार्ड असल्याने ऑफीसर्स क्लब, आखीव रस्ते, ब्रिटीश पद्धतीची अलिशान क्वार्टर्स असणारा अतिशय कॉस्मोपॉलिट्न आणि खानदेशातला तालुका असल्याने शेतीमातीत रमणारा, भरीत भाकरी, वरण बट्टीवाला अहिराणी हेलातला गल्लीबोळांचा, ग्रामीण बाज असे दोन्ही प्रवाह तापी नदीबरोबर वाहते ठेवणारं आमचं गाव. त्या गावात ही कॉन्व्हेंट १८७४ साली स्थापन झालेली. गेल्या वर्षी दीडशे वर्ष पूर्तीचा सोहळा साजरा करणार्‍या या शाळेच्या दर्जाची एकही शाळा त्या सुमारास आसपासच्या जिल्ह्यातही नव्हती.  

मला वाटतं मीच नव्हे आपण प्रत्येक जण आज जे जे काही आहोत किंवा नाही आहोत, त्या व्यक्तिमत्वाच्या गाभ्यात आपली शाळा आहे, असते. तिथलं वातावरण, शिक्षक, संस्कृती, वर्गमित्र-मैत्रिणी, शाळेतल्या घटना, तिथले अनुभव ,अगदी इमारत सुद्धा, हे सगळं आपल्या आत रूजून आपण घडत जातो.  

त्यातून माझी शाळा त्या काळच्या इतर शाळांपेक्षा आणि आजच्या बाजारू कॉन्व्हेंटपेक्षा खूप वेगळी होती. विशेष कोणतीही देणगी, जास्तीचे खर्च न आकारता शाळा व्यवस्थित शासनमान्य पद्धतीने चालत असे. तिथली कडक शिस्त, नेटका ऐटबाज गणवेश, मुलामुलींना एका बाकावर बसवणे हा इतर शाळांमधल्या मुलांसाठी असूयेचा आणि औत्सुक्याचा विषय असायचा. तेव्हा चांगल्या रेल्वे वसाहती सोडल्या तर साधारण आगगाडीच्या डब्यांसारख्या एकामागेएक तीन खोल्या असलेली , बाहेरून रंग उडालेल्या भिंतींची, रात्री पिवळे बल्ब लावणारी, बाहेरच्या खोलीत लोखंडी कॉट आणि एखादी पत्र्याची खुर्ची असलेली , मागच्या अंगणात झाडाखाली बंब आणि सरपण ठेवलेली बहुतेक सगळी बुजरी बैठी घरं. शाळा एकदम चकाचक, स्वच्छ, देखणी जणू वेगळ्याच विश्वातली. 

मिशनरी शाळा असल्याने प्रवेश करताच उजवीकडे ’मदर मेरी’ चा पुतळा दिसे. डावीकडे  सायकल स्टँडजवळ साथी नावाच्या हसर्‍या नेपाळी चौकीदाराचं घर, दोन्ही हाताला तीन मजली प्रशस्त इमारती, मध्ये भव्य सभागृह आणि मागे विस्तीर्ण क्रीडांगण. प्राचार्यपदी सिस्टरची नेमणूक होई. अभ्यासक्रमात बायबलवर आधारित असलेले ’मॉरल सायन्स’ शिकावे लागे. नाताळला विशेष कार्यक्रम होत. कॅरोल्स गायली जात. येशूजन्माच्या सजावटीच्या स्पर्धा होत. जयंत सर ’जिंगल बेल’ च्या ट्यूनवर सांताक्लॉज होऊन हो हो करत नाचत येत आणि आमच्यावर खाऊची उधळण करत. हे सगळं हिंदू वा अन्यधर्मीयांच्या सणवारांच्या आड येत नसे. गणपती, शारदा बसवण्याच्या अनुभवाला मात्र आम्ही मुकलो. अर्थात कोणत्याही शिक्षणसंस्थेचे चालक, विश्वस्त ज्या धार्मिक व सांस्कृतिक पार्श्वभूमीचे असतात त्याचा प्रभाव त्या संस्थेवर असणं नैसर्गिक आहे. त्यामुळे फर्ग्युसन महाविद्यालयात पूजा केली म्हणून गदारोळ का केला जातो किंवा सरस्वती देवीला विद्येचं प्रतीक मानून कोणत्याही कार्यक्रमाआधी पूजन करणं यात तथाकथित पुरोगाम्यांनी आक्षेप घेण्यासारखं काय आहे हे मला कळत नाही. .

------------------

कॉन्व्हेंट असली तरी डावीकडच्या इमारतीत मराठी व उजवीकडे इंग्रजी माध्यमाचे वर्ग भरत. ’वर्गभेद’ तेव्हाही काही अंशी होता. इंग्रजी माध्यमाची काही मुलं मराठी माध्यमाच्या मुलांकडे इंग्रज ’नेटीव्हांकडे’ पाहत तसे पाहत. बर्‍याच घरातले भाऊ आमच्या शाळेच्या इंग्रजी माध्यमात आणि बहिणी मात्र मराठी माध्यमात शिकत असत. हा ’लिंगभेद’ ही कळू लागला होता. धर्मांतरित ख्रिश्चन मंडळींसाठी मराठी चर्च आणि मूळ ख्रिश्चन अँग्लोइंडियन मंडळींचं वेगळं चर्च असे. हा धार्मिक भेदही जाणवत असे. तरीही शाळेत सर्व धर्माची, जातीची मुलं एकत्र शिकत, खेळत. 

बहुतेकांचे वडील रेल्वेत नोकरी करत. रेल्वेचं स्वत:चं केंद्रीय विद्यालय (हल्लीचं सीबीएसई) होतं तरीही अधिकार्‍यांचं प्राधान्य आमच्या शाळेला असे. वडिलांच्या पदानुसार प्रवासासाठी कोणत्या वर्गाचा पास मिळतो हा तेव्हा ’स्टेट्स सिंबॉल’ असला तरी आर्थिक स्तर मैत्रीच्या आड येत नसे. बाबांना इथल्या शिस्तीचं कौतुक वाटे. मला ओरडा बसू नये म्हणून ते घरी असले तर माझ्या बुटांना चकचकीत पॉलीश करून ठेवत. दुसर्‍या तुकडीत कायम पहिल्या येणार्‍या मुलाचे वडिल जमिनदार आहेत म्हणून तो पहिला येतो, असं मी त्यांना एकदा सांगितल्यावर ’त्यापेक्षा तो तुझ्यापेक्षा हुशार आहे हे तू का मान्य करत नाहीस’ असं म्हणून त्यांनी मला निरूत्तर केलं होतं. 

शाळेत एखाद्याशी मैत्री जुळली तर जन्मभर टिकते कारण ती मैत्री होते तेव्हा आपण ’कुणी’च नसतो. गाईडच्या कॅम्पसाठी नववीतल्या आम्ही विद्यार्थिनी रेल्वेने वसईला गेलो होतो. सर्वांना आरक्षण मिळू शकलं नव्हतं. अन्य तुकडीतल्या एकीबरोबर मला बर्थ शेअर करावा लागला. त्या रात्री आमची जी काय गट्टी जमली ती आजतागायत तशीच आहे. शाळेने जीवाला जीव देणारे मित्रमैत्रिणी दिले, त्यातले बहुतेक आजही संपर्कात आहेत. कधी महिनामहिना बोलणं होत नाही, कधी वाढदिवस ते वाढदिवस बोलणं होतं पण एका फोनवर अर्ध्या रात्री उठून येतील असे त्यातले काही.. नवरा चेष्टेने म्हणतो, "सर्दी झाल्याचं टाक तुमच्या शाळा ग्रुपवर, एअर-अ‍ॅम्ब्युलंस घेऊन येतील..."

------------

शाळेच्या दोन्ही माध्यमातले दहाव्या वर्गातील प्रत्येकी दोन प्रतिनिधी ग्रीन, रेड, ब्लू आणि यलो हाऊसचे प्रमुख असत. प्रत्येक हाउसला दर महिन्यात एक एक कामगिरी दिली जात असते. उदा: स्वच्छतेकडे लक्ष देणे, विद्यार्थ्यांचा गणवेश पूर्ण आणि नीटनेटका आहे की नाही याची तपासणी करणे, अवांतर उपक्रम आयोजित करणे वगैरे. असेंब्ली संपवून ’कम सप्टेंबर’ सारख्या झकास संगीताच्या तालावर आपापल्या वर्गात रांगेने जाताना मूड प्रसन्न होई. एका हॉलमध्ये, सभागृहात चित्रकलेच्या बानाइतकर सरांनी अतिशय रेखीव युरोपियन पद्धतीची भव्य म्युरल्स काढली होती. ती सतत नजरेला पडून चित्रकला आवडू लागली. नीट समजावी म्हणून ड्रॉइंगच्या परीक्षा दिल्या. हस्तकलेशी मात्र पत्रिका जुळली नाही. 

शाळेत पहिली घंटा म्हणजे असेंब्लीसाठी जमायची सूचना असायची. दुसर्‍या घंटेला आपण आहोत त्या ठिकाणी पुतळा होऊन थांबावं लागे. आपोआप शाळा चिडीचूप होई. तिसर्‍या घंटेला एक शब्दही न बोलता रांगेत जाऊन आम्ही उभे राहत असू आणि शाळेचे दार बंद होत असे. त्यानंतर कुणालाही आत सोडले जात नसे किंवा अघटित घडल्याशिवाय बाहेर जाता येत नसे. इतर शाळांची मुलं केव्हाही गावभर फिरत किंवा मधल्या सुट्टीत पळून जात. शाळेच्या असेंब्लीत किंवा एरवीही कुणी गोंधळ केला तर पीटीचे सर येऊन त्याला शब्दश: बडवत असत. पीटी शिकवण्यापेक्षा ते या कामासाठीच नेमले असावेत. ’हा बॉईज, एक बात का खयाल रखो’ असं ओरडून म्हटल्याशिवाय त्यांना पुढे बोलता येत नसे. एकूण गर्ल्सना काही सांगावं लागत नसावं.

अर्थात इतक्या कडेकोट बंदोबस्तातही मुलांचा वात्रटपणा जमेल तसा सुरू असे. शाळेतल्या सर, मिस (शिक्षिका) यांना टोपणनावं ठेवणे इ. शिवाय  शाळेत मजा ती काय! प्रसाधनगृहात शाळेतल्या विशिष्ट सर आणि मिसची नावे बदाम काढून लिहिणे वगैरे नेहमीचे प्रकार होतेच. इतर रूक्ष शाळांच्या तुलनेने इथले वातावरण रंगीबिरंगी होते. शिक्षिकांना पोशाखाचे बंधन नव्हते. ऐशी-नव्वदचं दशक असूनही काही ख्रिश्चन, पारशी, पंजाबी शिक्षिका स्कर्ट मिडी सारख्या पेहरावात, लिपस्टीक लावून येत. त्यांच्या पोशाख, मेकअप, पर्फ्यूमवर चर्चा करणं हा मुलींचा आवडता उद्योग असे. (आता मात्र तिथे शिक्षिकांना साड्या व त्याही एकसारख्या नेसाव्या लागतात.) इतर शाळांत गॅदरिंगच्या नाचात मुली आयब्रो पेन्सीलने मिशी काढून आणि डोक्याला फेट्यासारखी ओढणी गुंडाळून ’सजना’,’पिया’चा रोल करत. आमच्या शाळेत तसं कधीतरी होत असलं तरी मुलगे मुली एकत्रही नाचत. गावात अनेकांना हा सांस्कृतिक धक्का असल्याने ते शाळेला नावं ठेवत. मी हायस्कूलमध्ये असताना बोनीएमच्या ’रास्पुतीन’ की ’डॅडी कूल’ वर दहावीच्या मुलामुलींनी जोडीने, शेवटी आरके स्टुडिओ पोझ घेत जे इंग्रजी नृत्य केलं ते पाहून आ वासला होता. 

मुलगा-मुलगी शेजारी बसवले की बोलणार नाहीत असा तर्क असावा मात्र एकदा भीड चेपल्यावर मुलं मुली एकमेकांशी तितकीच बडबड करत. काही मोजकी अपरिहार्य टीनएजर प्रेमप्रकरणं आणि दोन चार वाह्यात मुलांचा अपवाद वगळता एकमेकांची मित्र होत. मुलांकडे कायम पुरूष म्हणून न पाहता ’माणूस’ म्हणून नकळत पाहायला शिकवलं ते याच शाळेनं. 

नववीत माझ्याशेजारी बसणारा मुलगा अगदी अबोल, साधा. अभ्यासात त्याला मी मदत करायचे पण मला पुस्तकांचं ओझं न्यायचा कंटाळा येई. मी त्याला चतुराईने पटवलं की पहिल्या ४ तासांची पुस्तकं तू आणत जा, शेवटच्या ४ तासांची मी. शेवटच्या ४ मधले ३ तास क्राफ्ट, चित्रकला, गाईड, पीटी वगैरे असल्याने वर्षभर मला एखादंच पुस्तक न्यावं लागे. दहावीनंतर तो मुलगा कुणालाही भेटलेला नाही. कधी भेटलाच तर मला त्याला उगीचच सॉरी म्हणायचं आहे.      

---------------------------

मैत्रिणी बर्‍याच असल्या तरी आम्ही तीन जणी हटकून एकत्र डबा खात असू. त्यातली एक माझ्याबाबत विशेष पझेसिव्ह होती. वर गाईड कॅम्प निमित्ताने उल्लेख केला आहे तिच्याशी माझी वाढती मैत्री पाहून हिने मला ’अब तेरे बिन जी लेंगे हम’ टाईप लांबलचक पत्र लिहीलं होतं. तिला मी तूच माझा पहला प्यार असल्याची खात्री पटवल्यावर ती शांत झाली. ते पत्र आठवून आता तिलाही खूप हसू येतं. आम्ही तिघी आजही जवळच्या मैत्रिणी आहोत. 

तर हायस्कूलला असताना डबा ग्रुपमधली ती तिसरी गुजराथी मैत्रिण म्हणाली ’आता ९ वी पासून माझी शाळा बंद, माझं राजस्थानला लग्न करणार आहेत.’ मला धक्का बसला. तिच्या वडिलांचं उत्तम चालणारं उपाहारगृह होतं. मी तिरीमिरीत थेट त्यात शिरून त्यांना भेटले. ’हे कसं चुकीचं आहे’ असं माझ्या तेव्हाच्या कुवतीनुसार कळवळून त्यांना सांगायचा प्रयत्न केला. ’वो जाने दो बेटा, बर्फी खाओ’ म्हणत एकीकडे गल्ला मोजत त्यांनी हसून माझी बोळवण केली. विशेष म्हणजे तिलाही या निर्णयाचं दु:ख वगैरे झाल्याचं दिसलं नाही. त्यानंतर ती आजतागायत भेटलेली नाही. याउलट शिकण्याची आवड असलेली, आईविना जगणारी एक निर्धन मैत्रिण काही तरी निमित्त होऊन जळून वारली. तिचं आकस्मिक जळणं हे गूढच राहिलं. तिला रेल्वे हॉस्पीटलला भेटायला गेले तेव्हा जे काही पाहिलं त्यानंतर कितीतरी रात्री झोपच आली नाही.         

शाळेत इतक्या शिक्षकांचा सहवास लाभला, ग्रुप फोटो तर दरवर्षी त्या त्या वर्गशिक्षकांबरोबर काढण्याची शाळेची प्रथा होती पण रियुनियन मधे जो फोटो व्यासपीठावर लावण्यासाठी निवडला होता त्यामागे कारण एकच .. त्यात होत्या आमच्या सगळ्य़ांच्या लाडक्या ’जोशी मिस’.

आम्हाला त्या तीन वर्ष क्लासटीचर म्हणून लाभल्या. उंच, सशक्त बांध्याच्या, गोर्‍यापान, हसर्‍या, रूबाबदार, पांढर्‍या होत चाललेल्या पण डाय न केलेल्या कुरळ्या केसांची आखूड वेणी घालणार्‍या, कुठलाही दागिना न घालणार्‍या आणि साध्या कॉटनच्या पण सतेज रंगांच्या साड्या नेसणार्‍या जोशी मिस मला नेहमीच खूप आवडायच्या. त्या मराठी शिकवायला आल्या. त्यातला व्याकरणाचा भाग सुद्धा मला मजेदार वाटू लागला. ह्रस्व ,दीर्घाचे नियम असोत किंवा गद्य. कविता शिकवताना त्या आम्हाला थेट त्या वातावरणात घेऊन जात. कुणाचं उद्धृत वापरलं आणि नाव लिहिलं नाही तर ती चोरी असते, शब्दाचे अर्थ त्याच्या वाक्यातल्या जागेनुसार कसे बदलतात असं काय काय सांगत. त्यांच्यामुळे मला ’भाषा’ हे प्रकरण भलतंच आवडायला लागलं. मग दादाने वाचनालयातून आणलेली मॅक्झीम गॉर्कीची "आई" कादंबरी वाचली, बरीचशी कळली नाही पण त्यांना मी ती वाचल्याचं काहीतरी तीर मारल्यासारखं ऐटीत सांगितलं होतं. 

शाळेत अ‍ॅंग्लोइंडियन ख्रिश्चन मुलांच्या फाडफाड इंग्रजीमुळे आम्ही त्यांना बिचकायचो. एका सिनीयर हाऊस-प्रमुख मुलीने माझा ’बो’ लावायचा राहिला म्हणून मला असेंब्लीच्या बाहेर घालवले. मी लावला होता पण त्याचं बक्कल तुटलं म्हणून तो पडला, हे काही मला तिला इंग्रजीत सांगता आलं नाही. उशीरा वर्गात आल्यावर मिसला काय ते कळलं, त्यांनी आधी त्या मुलीला बोलावून अस्खलित इंग्रजीत तिची हजेरी घेतली. ती गेल्यावर मला जवळ बोलवून खडसावलं,"इंग्रजी बोलता येत नाही यात काय कौतुक आहे? लिहीता येते तर बोलता का येत नाही? त्यासाठी तू वेगळे काय प्रयत्न केलेस? नुसता शाळेतला नंबर पुढे काही उपयोगी नसतो" वगैरे.

दुसर्‍या दिवशी त्यांनी दोन छोटी इंग्रजी पुस्तकं मला आणून दिली, महिन्याअखेरीस परत कर म्हणून बजावलं. पुढच्या असेंब्लीत त्यांना वचन दिल्याप्रमाणे इंग्लीशमधे बातम्या सांगितल्या म्हणजे नुसत्या वाचून दाखवल्या.पहिलीत ताठ उभं राहून टिळकांवर भाषण केल्यापासून वक्तृत्वाची भीती मेली होती पण इंग्लीशमधे !! जोशी मिसमुळे त्या भाषेची भीती एकदम कमी झाली. त्यांना तो विषय आम्हाला शिकवायला मिळाला नसला तरी इंग्रजी माध्यमाच्या सिनीयर मुलांनी ’कुसुमाग्रज, बोरकर, विंदा’ इ.च्या सोप्या किंवा बालकवितांवर आणि मराठी माध्यमातल्यांनी ’वर्डस्वर्थ, बायरन, शेले’ इ.च्या सोप्या कवितांवर प्रोजेक्ट करायचा अशा अफलातून कल्पना फक्त त्यांनाच सुचायच्या.

’टिट्बिट्स’ नावाचं एक मासिक पत्रक शाळेत निघत असे. त्यात मराठी विभाग सुरू झाला तो जोशी मिसमुळेच. त्याची मी संपादक होते. त्यासाठी त्या छान विषय सुचवायच्या. त्यांची मी आवडती आहे याचा मला अभिमान वाटायचा. खेळ वगळता कोणत्याही स्पर्धेत, गॅदरिंगमधे मी भाग घेतला नाही असं कधी झालंच नाही. एके वर्षी काही कारणाने मी ऑडीशन देऊ शकले नाही. नंतर जोशी मिसजवळ रडून-पडून मी एकदाची त्यात वर्णी लावली पण मला अगदीच फुटकळ भूमिका मिळाली. काय तर म्हणे येशूच्या जन्माने आनंद झालेला निळा ढग! पुढे तो मेंढपाळाचा सीन सुरू आणि मागे (आम्ही) रंगीत ढग मंडळींनी या विंगेकडून त्या विंगेकडे नुसतं हात हलवत विहरत जायचं. एकही संवाद नाही. शिवाय ढग असल्याने तोंडाला कापूस सगळा. ते नाटक झालं, मी जोशी मिसजवळ जाऊन फुरंगटून उभी राहिले. त्या मला निदान ’चंद्र’ करू शकल्या असत्या. माझी तेवढी वट त्यांच्याकडे नक्कीच होती. मी कुरकूर केल्यावर त्या म्हणाल्या ते नेमकं नाही पण त्याचा सारांश आठवतोय.. "नेहमी आपणच मुख्य भूमिकेत असू असं नसतं. अशाही अनुभवाची एक गंमत असते.आवडीच्या प्रत्येक स्पर्धेत भाग मात्र घेत राहायचा "

माझी एक मैत्रिण छान नाचायची. तिने एकदा गॅदरिंगसाठी ठेक्याचं हवं म्हणून कुठलं तरी भप्पी लाहिरीचं गाणं निवडलं. मिसने तिला ऑडीशनमध्येच रिजेक्ट केलं. ती रागावली ,रडली. तुला त्या गाण्याचे शब्द कळतात का? ते तुझ्या वयाला शोभणारे नाहीत, असल्या गाण्यांवर बाहेरही कुठे नाचायचं नाही. शास्त्रीय नृत्य शिक, वेस्टर्नही शिक पण कॉमनसेन्स वापरून वगैरे त्यांनी दुसर्‍या दिवशी तिला जवळ बोलावून समजावलं.

एका सुट्टीनंतर आमची गणिताची पुन्हा परीक्षा घेण्यात आली, का तर ’पेपर उडून गेले’. गणिताच्या मिस म्हणे सुटीत ट्रीपला गेल्या होत्या आणि रेल्वेगाडीत खिडकीपाशी बसून पेपर तपासत होत्या, जोरदार वारा आला आणि बरेचसे पेपर भुर्र उडाले. तेव्हा सोशल मिडिया असता तर त्यांचं किती ट्रोलींग झालं असतं कल्पना करवत नाही. अर्थात प्रिन्सिपल सिस्टरची त्यांना खूप बोलणी बसली. मामाकडची सुटीची धमाल सोडून चरफडत मी (आणि सगळेच) परीक्षा द्यायला आले. जोशी मिसला म्हटलं की मला आता काही आठवत नाहीये. त्या म्हणाल्या-गणित हा विषय असा आहे की समजलं असलं की आठवावं लागत नाही. मग मात्र मी गणितं चक्क पाठ करते हे त्यांना सांगून टाकलं आणि त्या अवाक झाल्या. एका प्रख्यात सरांकडे ताबडतोब शिकवणी लावा असं त्यांनी थेट आईला भेटून सांगितलं. त्या सरांच्या अद्भुत कौशल्यामुळे मला फाडफाड गणितं येऊ लागली. दहावीत गणितात दीडशेपैकी केवळ एक मार्क गमावला, याचं श्रेय त्यांच्याइतकंच जोशी मिसचं आणि थोडं त्या पेपर उडवणार्‍या वार्‍याचंही.

या सगळ्याचा परिणाम असेल, दहावीत तालुक्यात मुलींमधून पहिली आले. यानिमित्त मला आणि वर्गात दुसरा आलेल्या माझ्या एका वर्गमित्राला त्यांनी छोटीशी पार्टी दिली. त्यांच्या घरी. आजवर आईबाबांबरोबर कुणाकडे तरी जाणार्‍या मला हे फार भारी वाटलं. त्यांच्या आतल्या गॅलरीत त्यांनी खुर्च्या मांडल्या होत्या. काचेच्या बशीत बरंच काय काय खायला ठेवलं होतं. वर्गातल्या दोन टीचभर मुलांसाठी! 

मला अप्रूप वाटलं. त्यांच्या घरातल्या काचेच्या कपाटात पुस्तकं रचलेली. स्वत: सुबक विणकाम केलेल्या कोचावरच्या उशा. घरी एकट्या असून सदासतेज, समाधानी, आनंदी. पुढे काय करणार याबद्दल त्या आणि तो मित्र बरंच काही बोलले ,एरवी सतत बडबडणारी मी मिसकडे नुसती बघत बसले होते.

--------------------------

रियुनियनला आम्ही त्यांना सन्मानाने घेऊन आलो. त्यांनी सगळ्यांशी प्रेमाने गप्पा मारल्या. त्या आता थकल्या आहेत पण त्या आहेत ही भावनाही खूप उबदार आहे. 

त्या भेटल्याच नसत्या तर... ! Excelsior हे बोधवाक्य (शब्द) कृतीत आणणार्‍या या शाळेत आईबाबांनी मला घातलं नसतं तर! निम्नमध्यमवर्गीय घराबाहेरचं आणि मध्यमवर्गीय वाड्याबाहेरचं जग कदाचित कळलं नसतं. जन्मभर पुरेल इतका आत्मविश्वास मिळाला नसता. निवडीचे अनेक प्रसंग आले, मग तो आयुष्याचा जोडीदार असो, व्यवसाय असो, गाव असो, भोवतालची माणसं असो, भूमिका घेणं असो... तेव्हा कामी येणारा ठामपणा मनात रूजला नसता. आपल्या कक्षा रूंदावण्याची आणि त्याचबरोबर मर्यादांचा स्वीकार करण्याची हिंमत झाली नसती. शब्दांवर प्रेम करण्यातली गंमत कळली नसती. एका टप्प्यावर पुढे सगळा अंधार दिसत असताना, नैराश्य या शब्दाचा वाराही न लागता, there is always a tomorrow ही उमेद मिळाली नसती. 


Monday, June 30, 2025

’मिसेस’ आणि गरम गरम फुलके

’मिसेस’ हा आरती कादव दिग्दर्शित हिंदी चित्रपट ’झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर या वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित झाला. २०२१ मध्ये ’अ‍ॅमेझॉन प्राईम’ वर प्रदर्शित झालेल्या जिओ बेबी दिग्दर्शित मल्याळी चित्रपट ’द ग्रेट इंडियन किचन’ चा ’मिसेस’ हा रिमेक आहे. मूळ सिनेमा हिंदी व काही दाक्षिणात्य भाषांमध्ये डब झाला असला तरी उत्तरेतील प्रेक्षकांपर्यंत फारसा पोचला नव्हता. ती उणीव ’मिसेस’ने भरून काढली.  

मूळ सिनेमातल्या निमिशा सजायन आणि सूरज वेंजारमुडू या मुख्य पात्रांइतकाच जिवंत अभिनय ’मिसेस’ मध्ये सान्या मल्होत्रा आणि निशांत दहियाने केला आहे. कंवलजीत सिंगने त्यांना उत्तम साथ दिली आहे. रिमेक म्हटल्यावर तुलना आलीच. दाक्षिणात्य सिनेमा्ला उत्तर भारतीय रूपडं देताना काही सांस्कृतिक संदर्भ बदलणं आलं. यात ’मिसेस’ पूर्ण यशस्वी झाला आहे पण ’द ग्रेट इंडियन किचन’ मध्ये मुलभूत प्रश्न ज्या धारदार पद्धतीने दाखवण्यात आला आहे त्याची धार ’मिसेस’ मध्ये काहीशी बोथट झाली आहे. मूळ सिनेमातला प्रश्न वैश्विक असला तरी ग्रामीण पार्श्वभूमीमुळे व प्रत्ययकारी चित्रणामुळे त्या प्रश्नाची तीव्रता अधिक जाणवते. तुलनेने शहरी स्त्रीला त्या प्रश्नावर उत्तर शोधणं किंबहुना हा प्रश्न उद्भवण्यापूर्वी त्यावर विचार करणं शक्य असूनही हिंदीतली आधुनिक नायिका मल्याळी ग्रामीण सिनेमातल्या नायिकेसारखीच वागते हे पचवणं जरा कठीण गेलं. ’हे जग आता बदललं आहे’ असं भासणार्‍या प्रत्येकाला  ’मिसेस’ भानावर आणतो. 

मुळात, काय आहे यात मांडलेला प्रश्न ! साधी सरळ आनंदी स्वभावाची नायिका लग्नानंतर एका सुखवस्तू कुटुंबात, उराशी स्वप्नं कवटाळून प्रवेश करते. सासूला बाहेरगावी जावे लागल्याने घराची जबाबदारी नायिकेवर येते. नवरा आणि सासर्‍यांना सगळं काही हातात मिळण्याची सवय आहे. मासिक धर्माच्या काळात मात्र यातून सुटका आहे. ती ही बाईला विश्रांती मिळावी या हेतूने नव्हे तर घर विटाळू नये या भावनेतून. ताटाभोवतीचं खरकटंही तसंच टाकून घरातले पुरुष दररोज निवांत जेवून उठून जातात. ’आपल्याच घरातलं काम आहे- त्यात काय इतकं’ म्हणून गृहित धरलं जातं. नवर्‍याचा संबंध शेजे आणि पेजेच्या गरजेपुरताच. नोकरीच्या इच्छेला घरच्या पुरुषांनी गोड शब्दात दिलेला नकार,माहेरच्यांची तिने सासरी जुळवून घ्यावं अशी सूचना. एका क्षणी तिच्या भावनांचा उद्रेक होतो. त्याची परिणती कशात होते, ती काय निर्णय घेते, त्याने कसा आणि किती फरक पडतो हे सिनेमात पुढे पाहता येईल. तिला ती गवसते हा सिनेमाचा उत्कर्षबिंदू महत्वाचा. 

आता या कथानकातून ध्वनीत होणार्‍या आशयाकडे वेगवेगळे लोक वेगवेगळ्या दृष्टीकोनातून पाहतात. "घरातल्या बाईने गरमागरम फुलके (किंवा दोसे) करून वाढावेत या भारतीय पुरूषांच्या अपेक्षेमुळे भारतीय स्त्रीची ’उर्जा’ त्यातच खर्च होते त्यामुळे तिची उत्पादकता व इतर क्षेत्रात काही करू पाहण्याची क्षमता कमी होत जाते”, अशा अर्थाचं विधान एका राजकीय नेत्याने मध्यंतरी केलं. ते वाचून त्यांच्या स्त्रियांच्या आकांक्षांचा विचार करण्याचं कौतुक वाटू लागणार तोच पुढे वाचलं, "त्यापेक्षा पुरूषांनी पोळ्या (रोटी) खाव्यात." पोळ्या एकदम करून ठेवता येतात आणि सतत स्वयंपाकघरात जावं लागत नाही. पण म्हणजे फुलके,पोळ्या, दोसे जे काय करायचं ते शेवटी करायचं बाईनेच आहे. किरण बेदींना एका मुलाखतीत विचारण्यात आलं , "रिकामा वेळ मिळाला तर कोणती डिश करायला तुम्हाला आवडतं?" त्या म्हणाल्या "पुरूष अधिकार्‍याला ’रिकामा वेळ मिळाला तर त्यात काय करता’ असं तुम्ही विचारलं असतं. डिश बनवणं हे इथे माझ्याबाबतीत गृहित का धरलं आहे ?"   

महानगरी गगनचुंबी इमारतींपासून पाड्यावरच्या झोपड्यांपर्यंत पसरलेल्या आपल्या महाकाय देशातल्या बहुसंख्य घरात गृहित धरलेल्या स्त्रिया सापडतील. काही लोकांचं म्हणणं. या सिनेमातला नायक पण काम करतोच आहे नं. मल्याळी सिनेमात तो शिक्षक तर हिंदी आवृत्तीत तो प्रथितयश डॉक्टर आहे. पुरूषाने बाहेर आणि स्त्रीने घरात राबावं या श्रमविभागणीत गैर काय आहे? घरची आर्थिक आघाडी सांभाळणार्‍या पुरुषांना असाच कंटाळा, थकवा येत नसेल का! नक्कीच, परंतु ते काम कधीतरी संपवून स्वत:च्या अवकाशात, आवडीनुसार वेळ घालवण्याची संधी त्यांना परंपरेने उपलब्ध करुन दिली आहे. 

हे अमान्य असलेले काही स्वघोषित संस्कृतीरक्षक सिनेमा प्रदर्शित होताच पुढे सरसावले. त्यांच्या म्हणण्यानुसार या सिनेमातले पुरूष काही दारूडे वगैरे नाहीत. बायकोला मारझोड करणारे नाहीत. सभ्य आहेत. घरात सुबत्ता आहे. बाईकडून फक्त घर नीट सांभाळण्याची अपेक्षा आहे. बाई तर गृहलक्ष्मी असते. हे असलं भलतं काहीतरी बायकांच्या डोक्यात भरवण्याची परदेशी खूळं आणि स्त्रीमुक्तीच्या फालतू कल्पनांना विरोध केलाच पाहिजे. असले सिनेमे म्हणजे आपल्या महन्मंगल संस्कृतीविरोधातली षडयंत्र आहेत.”-असा त्यांचा दावा. 

वरपांगी ’फक्त घर नीट सांभाळण्याची अपेक्षा’ योग्यच आहे पण इमोशनल अ‍ॅब्युज किंवा भावनिक छळ हा या मंडळींच्या गावीही नाही. आवडो की नावडो स्वयंपाक, घरकामात आपलं ध्येय, महत्वाकांक्षा, करियर-व्यवसायाचा विचार दाबून ठेवून आणि हे करायची ’परवानगी’ मिळालीच तर घर नीट सांभाळण्याची कसरत करताना बायका झिजून पिचून जाताना दिसतात. कित्येक उत्तम खेळाडू महिला लग्नानन्तर ’गरम फुलक्यां’च्या गडबडीत सरावाला वेळ न मिळू शकल्याने करियर सोडून देतात. काही जणी मुलांसाठी नोकरी सोडतात. वर्गातल्या मुलांना वर वर जाताना मुक्याने पाहतात. हुशार असूनही संशोधनासारख्या वेळखाऊ प्रांतात किंवा डिमांडिंग स्वरूपाच्या उच्चपदाच्या नोकर्‍या न करता जमेल तेवढंच करियर करतात. त्यातूनही परिचयातील गृहिणींच्या तुलनेत आपण घरी कमी वेळ देतो हा अपराधीभाव उरात घेऊन जगतात. 

अशा स्त्रियांची मनोव्यथा व्यक्त करण्यासाठी ,पुरुषांनी घरकाम /स्वयंपाक करण्यात विनोद आहे असं वाटणार्‍यांसाठ हा सिनेमा निर्मिलेला आहे. ’वेडिंग’ नामक भपकेबाज समारंभात आपले कपडे, दागिने, मेकअप कसा असावा याचा मुली जितका विचार करतात त्याच्या निम्मा जरी विचार त्यांनी ’मॅरेज’ म्हणजे ’सहजीवना’विषयी केला, त्याविषयी भावी जोडीदाराशी चर्चा केली तरच लग्नसंस्था सशक्त होण्याची आणि समाजाला स्त्रियांनाही ’समान संधी’ मिळायला हव्यात याचे भान येण्याची शक्यता आहे. ’मिसेस’ सिनेमा अशा सगळ्या तरूणींसाठी आणि त्यांचीही काही स्वप्न असतात हे समजू न शकणार्‍या तरूणांसाठी आहे. 

हा सिनेमा एवढंच सांगू पाहतो - आयते पानात पडणारे गरम गरम फुलके पुरूषांइतकेच बायकांनाही आवडतात. 😉


Wednesday, June 25, 2025

कथा

 प्रसिद्ध कथालेखिका नीलिमा बोरवणकर, व्यासंगी लेखक नारायण कुलकर्णी-कवठेकर यांच्याशी झालेल्या चर्चा, प्रख्यात लेखिका कविता महाजन यांची लेखनविषयक मते, वाचलेल्या काही दर्जेदार कथा आणि त्या संग्रहांच्या प्रस्तावना या सगळ्य़ातून मला जेवढे कळले त्याचे सार मी ’कथा कशी असावी’ या संदर्भात लिहिते आहे. मी यातील तज्ज्ञ वगैरे अजिबात नाही, केवळ अभ्यासक म्हणून लिहिते आहे.

१) कथा आणि गोष्ट यात फरक असतो. ’आटपाट नगर होतं. तिथे एक अमुकतमुक राहत होता... ,किंवा ’एक होता राजा, एक होती राणी, एकदा काय झालं... आणि ते सुखाने नांदू लागले’ ही झाली गोष्ट. केवळ घटनांची मालिका. कथा नव्हे. आज बहुतेक जण याच पद्धतीने पात्रांची, फार तर ते राहत असलेल्या गावाची ओळख करुन देऊन, एकामागे एक प्रसंग रचून, सुखांत किंवा दु:खांत करुन त्या पुरचुंडीला कथा समजताना दिसतात. कथेच्या आत अर्थातच गोष्ट असते पण तो केवळ कथेचा कच्चा माल असतो. 

२) कथा लेखनाचा असा एखादा साचेबद्ध आराखडा नसतो. ती कुठेही उगम पावून कुठेही लुप्त होऊ शकते. उदा: ’शेवग्याच्या शेंगा’ कथेची सुरुवात ’वडिलांच्या अस्थी आळंदीला पोचवून श्रीनिवास आताच आला होता’ अशी आहे. इथे अगोदरच काय घडले आहे ते एका वाक्यातून वाचकाला कळते.  

’देवगडच्या दुसर्‍या अंगाला माणसाचा हात न फिरलेला समुद्र अस्ताव्यस्त पसरलेला आहे’ ही कमल देसाईंच्या ’प्लॅस्टिकचे विश्व’ या कथेची सुरुवात वाचकाला थेट त्या निर्मनुष्य किनार्‍यापाशी घेऊन जाते. 

जी. एंच्या ’राधी’ या कथेची सुरुवात अशी आहे ’महादेव गल्ली ही वीतभर रुंद. घरे अमोरासमोर इतकी जवळ होती की...’ वाचकाला ती गल्ली ’दिसते’. अशी सुरुवात वाचकाला त्या पात्रापाशी , त्या जागेपाशी घेऊन जाते मग तो कथेत गुंतत जातो.

पुढे लेखकाच्या कुवत आणि शैलीनुसार कथा वेगवेगळ्य़ा पद्धतीने पुढे सरकत जाते. तिचा गाभा, आशय वाचकाला भिडतो का, हे सर्वात महत्वाचे. 

३) कथेचे साधारणपणे चार घटक असतात अ) कथाबीज - कथेचा आत्मा . जे लेखकाला सांगायचंच. एका वाक्यात. ते त्याच्या मनाशी स्पष्ट हवं. उदा: पुलंच्या ’म्हैस’ कथेला मानवी स्वभावाचे नमुने आणि प्रतिक्रियांवर कोणताही आव न आणता भाष्य करायचे आहे. पुलंच्या असामान्य शैलीमुळे ते नमुने लख्ख दिसतात. कथेला असलेली कोकणाची पार्श्वभूमी परप्रांतीयांनाही अनुभवता येते. प्रसंगवर्णनातली खोच, गंमत रुक्ष स्वभावाच्या वाचकालाही हसायला भाग पाडते.

ब) पात्रे - हे कथाबीज ज्यांच्याद्वारे उलगडणार आहे ती पात्र. त्यांचे वर्णन इतके सक्षम हवे की ती डोळ्य़ासमोर त्यांचे सगळे रंग लेवून उभी राहिली पाहिजेत. उदा: मिरासदार ’नव्याण्णवबादची सफर’ या कथेतल्या नाना घोडके या पात्राबद्दल लिहितात ’माणगावात नाना घोडके नावाचा अप्रतिम इसम राहत असे. हा अगदीच बोंबिलभिक्या असून दिसावयासही बेंगरुळ असे. वाळलेल्या चिपाडाच्या अंगात एक सदरा घातला, धितर अडकवले तर ते जसे सुरेख दिसेल, तसा हा दिसत असे. त्याच्या दोन्ही गालाची धीटपणॆ वर आलेली हाडे इतकी ठसठशीत दिसत होती की त्याच्या तोंडामध्ये एक लहानशी काठी या गालापासून त्या गालापर्यंत आडवी करुन घातली आहे, असे वाटावे.’ थोडक्यात ते पात्र वाचकाला स्वच्छ दिसले पाहिजे. शिवाय पात्रांना नावे देताना काळजी घ्यायला हवी. ते ते नाव त्या त्या पात्राच्या व्यक्तिमत्वाला, त्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक पार्श्वभूमीला साजेसे असायला हवे. तरचे ते पात्र ’दिसेल’.

क) घटना/ प्रसंग - त्या पात्रांचे वर्तन, स्वभावातील कंगोरे, विचारपद्धती दाखवणार्‍या घटना किंवा प्रसंग वाचकाला त्यात गुंतवून ठॆवायला हव्यात. दि.बा.मोकाशींच्या ’आता आमोदे सुनासि आले’ कथेत एकुलत्या मुलाच्या मृत्युचे दु:ख गिळून शिवाच्या अडलेल्या गायीला सोडवायला जाणारा रामजी, ती पावसाळी रात्र, जीवाच्य आकांताने वेणा देणारी गाय आणि रामजीचे प्रयास वाचकाला एकाच वेळी श्वास रोखून धरायला लावतात, दग्ध करतात, जगण्यामरण्याच्या सीमेवर नेऊन अंतर्मुख करतात. 

ड) संवाद - खर्‍या अर्थाने कथेचा वेग अवलंबून असतो तो संवादांवर. ’भुजंग’ या शंकर पाटील यांच्या कथेचे बलस्थान आहे ते ग्रामीण बोलीतले आर्त आणि सहज संवाद. या संवादांची भाषा पात्रांनुसार अचूक असायला हवी. केवळ आनीपानी लिहिल्याने ती बोलीभाषा होत नाही, किंवा जड शब्द वापरल्याने ती शहरी होत नाही. त्याला प्रादेशिक गंध असायला हवा. ते संवाद कथेच्या ओघात यावेत आणि कथेचा ओघ पुढे घेऊन जाणारे असावेत.

कथा जिथे घडते ते स्थळ, काळ, घटनांमधले अंतर, पात्रांच्या वयातील अंतर यात तर्कदृष्ट्या गोंधळ नसावा. एका नाटकात सिद्धहस्त लेखिकेने ज्या देशात, ज्या काळात नाट्य घडवले तिथल्या चलनाऐवजी चुकीचा उल्लेख केल्याने तिला टीकेला सामोरे जावे लागले. हाच नियम कथेलाही लागू होतो. कथा घडते त्या काळाचा अभ्यास, संदर्भ शोधून त्यावर सर्व बाजूंनी विचार करुन मगच कथा लिहायला हवी. 

कथालेखकाची स्वत:ची अनोखी शैली हा कथेचा यूएसपी/ सर्वात मह्त्वाचे वैशिष्ट्य असते. मतकरींच्या गूढकथेत दोनचार वाक्यातच ते जबरदस्त वातावरण निर्मिती करत. मंगला गोडबोले एखाद्याच मिश्कील, मार्मिक वाक्यातून संस्कार आणि आधुनिकतेच्या कात्रीत सापडलेल्या मध्यमवर्गी पात्रांच्या जगण्यातला गोंधळ अचूक मांडतात. बाबुराव बागुलांच्या ’मरण स्वस्त होत आहे’ मधल्या मोजक्या प्रसंगांमधून मुंबईचं बकालपण थेट अंगावर येतं. ठराविक असा आराखडा अपेक्षित नसला तरी गुंतागुंत-उकल, कलाटणी, स्वभावाचे कंगोरे, निसर्गचित्रण, भौगोलिक संदर्भ, प्रादेशिक रंग, जगण्य़ाचे सूक्ष्म चित्रण, त्यातले नाट्य, एखादी भावस्थिती यातलं आवश्यक ते योग्य जागी आढळलं नाही तर ती कथा अपुरी वाटते. फसते. 'वाचनीयता' हा गुण त्यात असलाच पाहिजे. अजून किती पानं आहेत असं वाचकाला वाटलं तर कथा फसली. कविता महाजन म्हणत ’फुटकळ लिहिण्याच्या धोक्यातून वेळीच सावध करणारे आणि सतत ताळ्यावर आणणारे माजगावकरांच्या सारखे प्रकाशक मला मिळाले’. प्रत्येकाला असा गुरु मिळत नाही तेव्हा लेखक म्हणून आत्मपरिक्षण करणे हाच सर्वात सोपा मार्ग होय.

उत्तम कथेचे असे काही सूत्र नसते. तो दरवेळी एक वेगळा प्रयोग असतो. पण वाचकाच्या काळजात तो प्रयोग रुतायला हवा. सिनेमा फक्त पटकथेतून, संवादातून पुढे जात नाही तर तिथे कॅमेरासुद्धा एका अर्थी बोलत असतो. त्यामुळे कथेकडे पाहण्य़ाची लेखकाची नजर सर्वात महत्वाची. सॉमरसेट मॉम बद्दल वाचनात आलेल्या आख्यायिकेनुसार एका व्याख्यानात तो म्हणाला की कथेमध्ये चार गोष्टी हव्यात. - दर्जा/ खानदानीपणा, अध्यात्म/ ईश्वरी विचार, लैंगिकता/ मानवी भाव आणि रहस्य. तेव्हा एक मुलगी उठून म्हणाली की हे चारही पैलू तिच्या कथेत आहेत. सगळ्यांना उत्सुकता वाटल्यामुळे तिने ती कथा वाचून दाखवली. ती अशी - 

एकदा एक राजकन्या (खानदानीपणा) देवाला म्हणाली, " देवा, (अध्यात्म) मी गरोदर आहे" (लैंगिकता) पण मला होणार्‍या बाळाच्या वडिलांचं नाव माहीत नाही (रहस्य) आता ही कथा आहे का! त्यामुळे उत्तम कथेचे घटक वगैरे शब्दांकडे केवळ वाचकांपर्यंत कथा प्रभावीपणे पोचवण्याचे माध्यम म्हणून पाहायला हवे. ते काही गणिती सूत्र नव्हे. 

कथेबरोबर त्या वेळचा समाज, समाजजीवन हे नाटकातल्या नेपथ्यासारखे सोबत आले पाहिजे. निव्वळ रंजकतेपलिकडे वाचकाला त्या कथेतून काही मिळाले,  ती कथा पंचेंद्रियांनी अनुभवता आली तरच कथा यशस्वी झाली. 


Tuesday, May 20, 2025

इकिगाई

 

हेक्टर गार्सिया, फ्रान्सिस मिरेलस

निरोगी, आनंदी आणि कार्यक्षम दीर्घायुष्याचं जपानी रहस्य

जपानी लोक असं मानतात की, प्रत्येक माणसाचा इकिगाई असतोच. या पुस्तकासाठी इकिगाई या संकल्पनेची माहिती गोळा करत असताना लेखकाने शतायुषी लोकांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांच्या दीर्घायुष्याचं खरं रहस्य जाणलं. ते त्यांनी या पुस्तकामधून आपल्यासमोर मांडलं आहे. या पुस्तकामुळे आपल्यालाही आपला इकिगाई सापडायला नक्कीच मदत होईल.

* शारीरिक स्वास्थ्यासाठी ८० टक्क्यांचं रहस्य.

* उत्साही शरीर, उत्साही मन.

* तणावाचा फायदा घेण्याची कला.

* स्टीव्ह जॉब्ज यांचे जपानी संस्कृतीवरील प्रेम.

* लोगोथेरेपी आणि मोरिता थेरेपी.

* तंत्रज्ञान आणि संस्कृतीचा संगम.

--------------

रोज सकाळी उठल्यावर तुम्ही स्वत:ला  ’आला बॉ अजून एक दिवस अंगावर’ असं म्हणता की ’अहा, सुरु झाला एक नवा कोरा दिवस’ असं म्हणता. तुमचं उत्तर दुसरं असेल तर तुम्हाला तुमची इकिगाई बहुतेक गवसली आहे. ती अधिक अचूक उमजावी म्हणून हे पुस्तक तुम्ही वाचायला हवं, तुमचं उत्तर जर पहिलं असेल तर मग हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे. 

जिंदगी लंबी नही बडी होनी चाहिएँ, असं आपण म्हणतो. बहुसंख्य जपानी लोकांची जिंदगी मात्र लंबी आणि बडी दोन्ही असते, जपानमध्ये समाधानी, कार्यक्षम आणि दीर्घायुषी लोकांचे प्रमाण जगाच्या तुलनेने जास्त आढळून येते. ओकिनावा भागात शतायुषी लोक मोठ्या प्रमाणात आहेत. यामागे इकिगाई म्हणजेच जगण्याची सकारात्मक प्रेरणा आहे हे लक्षात आल्यावर लेखकद्वयीने अनेक शतायुषी जपानी लोकांच्या मुलाखती घेतल्या, चर्चा केली आणि त्यातून हे पुस्तक साकार झालं. यातली इकिगाईची जादू अनेकांना भावली आणि पुस्तकाचा जगभरात अनेक भाषातून अनुवाद होत गेला.

माणसाची सगळी धडपड अमरत्वाकडे पोचण्य़ासाठी असते. ययातिची प्रातिनिधीक कथा आपल्याला माहित आहे. तंत्रज्ञान आणि वैद्यकशास्त्र वेगाने अत्याधुनिक होत चालले आहे त्यामुळे आपली जिंदगी गेल्या पिढीच्या तुलनेने ’लंबी’ होत चालली आहे. रे कर्झवेल या संशोधकाच्या मते काही दशकात आपण खरोखरच हवे तितके जगू शकू पण बहुसंख्य जीवशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की कितीही प्रगती केली तरी आपल्या नव्या पेशी तयार होण्याची प्रक्रिया १२० वर्षांनी थांबतेच त्यामुळे त्यापुढे जगणे शक्य नाही. 

मन, मेंदू आणि शरीर 

जपानबरोबरच जगात काही बेटांवरदेखील सुखी दीर्घायू माणसं आढळतात. संशोधनाअंती असा निष्कर्ष निघतो की यांच्या जिवलग मित्र-मैत्रिणींचा घट्ट ग्रुप, उत्तम कौटुंबिक नातेसंबंध ,आहारात भाज्यांचं पुरेसं प्रमाण पुरेसं, भरपूर चालणं, तणावमुक्त जीवनशैली.

शरीर- 

प्रत्येक वेळी ८०% पोट भरेल इतकाच आहार घ्या. पोटभर जेवणे, आग्रह करकरुन वाढणे हे आपल्या भारतीय संस्कृतीत फार महत्वाचे मानले जात असले तरी शरीराला हानीकारक आहे. स्क्रीनटाईम शक्य तितका कमी करा, भरपूर चाला. लवकर निजा लवकर उठा. पुरेशी झोप घ्या. आपली दिनचर्या तपासा. शरीर उत्साही असेल तरच आपलं मन टवटवीत राहील. 

मेंदू- 

मन:शांती ही शरीरस्वास्थ्याइतकीच मेंदूच्या कार्यक्षमतेवर अवलंबून आहे. चाकोरीत फिरणार्‍या मेंदूवर गंज चढतो आणि त्या व्यक्तीला हळूहळू जगण्याचा कंटाळा येऊ लागतो. मेंदू कार्यक्षम राखण्यासाठी नवीन विषयांचे वाचन, प्रशिक्षण, त्यावर चर्चा, बौद्धिक खेळ, नवनव्या लोकांना भेटणे, नवीन कौशल्ये आत्मसात करणे इ. आवश्यक आहे. मेंदूची कवाडे जगाकडे उघडणे गरजेचे आहे. त्याने जगण्यात चैतन्य येते, उत्साह येतो. 

मन- 

मोई म्हणजे जिवलगांचा कंपू. समान आवडीच्या, एकाच ध्येयासाठी काम करणार्‍या गटासह आपले जवळचे नाते आपल्याला जीवनाशीही नकळत बांधून ठेवते. मोई हा काहीसा आपल्या बीसीसारखा प्रकार आहे. मोईतले सदस्य दर भेटीत ठराविक पैसे जमा करतात आणि गरजेनुसार ते परतफेडीच्या अपेक्षेसह एखाद्या सहकार्‍याला देतात. यातून त्याला आर्थिक आणि मानसिक दिलासा मिळतो.

आपल्या मनावर वेगवेगळे ताण असतात. हे ताण नीट हाताळू न शकणारे लोक अकाली प्रौढ दिसू लागतात. त्यातले काही ताण जगताना भेडसावणार्‍या गंभीर समस्या, अभाव, अडचणी, क्लेशदायक घटना, असुरक्षिततेची भावना, नात्यातला दुरावा, वियोग, पराजय इ. मुळे उद्भवतात. तर काही ताण आपल्यातले चिंतातूर जंतू स्वत:च निर्माण करतात. उदा: सोशल मिडियावर कमी लाईक्स आले म्हणून खंतावणे, इतरांशी सतत स्पर्धा करणे इ. 

मानसशास्त्रज्ञांच्या मते ’माईंडफुलनेस’ हा यावर उपाय आहे. प्रत्येक क्षणाचा समरसून आनंद घेण्याची क्षमता आपण जितकी वाढवू शकू तितकी आपण तणावावर आधिकाधिक मात करु शकू. हातून गेलेल्या गतकालाबद्दल हळहळ आणि हातात नसलेल्या भविष्याबद्दल हुरहूर वाटत राहिल्याने आजचा, आत्ताचा क्षण निसटून तर जात नाहीये ना याबाबत आपण सजग राहिलो ताण निश्चित कमी होईल. अर्थात हे प्रयत्नपूर्वक साध्य करावे लागेल पण याची परिणीती एका निरामय आणि दीर्घायू जीवनात होईल हे नक्की. 

लोगोथेरपी ते इकिगाई

सिग्मंड फ्रॉइड एकदा म्हणाले होते ,"भिन्न स्वभावाच्या/विचारांच्या काही माणसांना उपोषणाला बसवा. भुकेच्या तीव्रतेबरोबर आतला खरा माणूस बाहेर पडू लागेल. सगळी प्रचंड भुकेली माणसं शेवटी एकाच पातळीवर येतील.’ परंतु हिटलरच्या क्रूर छळछावणीतील वेगवेगळ्या अनुभवांमुळे माणसाची एखाद्या घटनेला प्रतिसाद देण्याची पद्धत त्याच्या आत्मबलावर अवलंबून असते हे व्हिक्टर फ्रँकलने स्वत: अनुभवले, पाहिले होते त्यामुळे त्यांना हे पटले नाही. आत्मबल वाढवणारी लोगोथेरेपी त्यांनी विकसित केली. लोगो म्हणजे ग्रीकमध्ये अर्थ. लोगोथेरपी म्हणजे जीवनाचे उद्दिष्ट्य, जीवनाचा अर्थ शोधणे. या थेरपीचे तीन टप्पे सांगितले जातात. 

पहिला टप्पा- कोणत्याही परिस्थितीत कार्यमग्न राहून अर्थपूर्ण काम करत राहणे. 

दुसरा टप्पा- यशाचे परिमाण आपले आपण ठरवणे. 

तिसरा टप्पा- परिस्थिती आपल्या हातात नसली तरी तिला कसा प्रतिसाद द्यायचा हे सर्वस्वी आपल्या हातात असते हे समजून घेणे. 

इकिगाई हे लोगोथेरपीच्या मार्गावरचे अंतिम ध्येय आहे. इकिगाई मन आणि मेंदूबरोबरच शरीरस्वास्थ्याचाही विचार करते. 

सापेक्षतावाद आपल्याला माहित आहे. तापलेल्या वस्तूला एक मिनिट स्पर्श करा. ते मिनिट युगांचं वाटेल. आपल्या प्रिय व्यक्तीसोबत एक तास घालवला तर तो तास एका मिनीटातच संपल्यासारखा वाटेल. आपण कशात जास्त रमतो? आपण वेळेकडे कसे पाहतो, त्या त्या वेळेत कोणते काम निवडतो, ते किती कौशल्यपूर्ण त-हेने करतो, किती लक्षपूर्वक करतो, त्यात कसा आनंद मिळवतो याचा शोध घेतला तर आपल्याला आपली इकिगाई सापडणे सोपे होईल. एकदा एखादे कौशल्य आत्मसात झाले तर पुढचे ध्येय निश्चित करुन आपल्या ठराविक साच्यापलिकडचे एखादे कौशल्य शिकण्याचा प्रयत्न करावा. एकाच वेळी अनेक कामे करणे हे खरे तर कसब नव्हे. मुळात आपण एकावेळी अनेक कामे केल्याने आपली कार्यक्षमता उलट कमी होते. एका वेळी एकाच कामावर लक्ष केंदित करुन मन विचलित होऊ न देता ते पूर्ण केले तर अधिक चांगले परिणाम दिसून येतात. आपण इकिगाईच्या अधिक जवळ पोचतो.


Wednesday, April 16, 2025

सायबर विश्व आणि सामान्य माणूस

 ३६ फोटोंचा रोल पुरवून पुरवून वापरणारी आणि एडिट करायची सोय नसल्याने, बरेवाईट आलेले फोटो तसेच अल्बममध्ये लावून अधूनमधून पाहत स्मरणरंजन करणारी, घराला साहित्यिक नाव देणारी मध्यमवर्गी पिढी संपली. नंतर आली नव्वदच्या दशकातल्या जागतिकिकरणामुळे झालेल्या उलथापालथींनी काहीशी गडबडून गेलेली, मुलगा परदेशी, त्यातूनही अमेरिकेला जावा अशी स्वप्न बघणारी, ब्लॉकमध्ये राहणारी ’हॉटशॉट’ पिढी. आणि मग आली आजची तथाकथित ग्लोबल, डिजिटल पण फोमोने (फिअर ऑफ मिसिंग आऊट) ग्रासलेली ’सायबर’ पिढी. तरुण वयात स्टुडिओत अवघडल्या अवस्थेत बसून किंवा अटेंशन पोझमध्ये तिरकं उभं राहून फक्त ’दाखवण्यासाठी’ काढायच्या फोटोपासून, मुक्तपणे स्वत:च्या छबीतून म्हणजे सेल्फीतून स्वत:ला हवं तसं बिनधास्त व्यक्त करण्यापर्यंतचा सामान्य माणसाच्या पिढ्यांचा हा प्रवास फक्त फोटोंपुरता मर्यादित नाही. पूर्वी रात्र आणि दिवस हेच काळाचे मुख्य भाग होते. आता स्वेच्छेने या तंत्रज्ञानापासून अंतर राखून राहणारे, समूह माध्यमांना (सोशल मिडिया) आपल्या आयुष्यात लुडबूड करु न देणारे काही अपवाद वगळले तर आजच्या पिढीचं जगणं ’ऑनलाईन’ आणि ’ऑफलाईन’ या दोन पटात विभागलं गेलं आहे. 

अर्थशास्त्राच्या पिरॅमिड रचनेत श्रीमंत अग्रभागी, सामान्य माणूस मध्यभागी आणि दारिद्यरेषेखालचा वर्ग तळाला असे धरले तर हा मधला भाग देशाची प्रत ठरवतो असं म्हणता येईल. देशाची गुणवत्ता तिथल्या सामान्य माणसाच्या वर्तनावरुन ठरते. उच्चभ्रू समाज हा विश्वसंस्कृतीचे प्रतिनिधीत्व करत असतो तर तळागाळातला समाज हा मुलभूत प्रश्नांशी झगडताना मूल्य, संस्कृती वगैरे जीवनाचे चोचले पुरवू शकत नाही म्हणूनही असेल कदाचित. आज सामान्य माणसाच्या जीवनशैलीचे ढोबळमानाने ’सायबररहित’ जीवनशैली आणि ’सायबरसहित’ जीवनशैली हे दोनच प्रकार उरले आहेत असे वाटू लागले आहे. या मधल्या भागातही खरं तर त्रिस्तरीय रचना आहे. तंत्रज्ञान आणि जगणं याची गल्लत न करणारी ’सायबररहित’ जीवनशैलीचं प्रतिनिधीत्व करणारी अपवादात्मक मंडळी पहिल्या स्तरात आहे. तंत्रस्नेही असलेले, नवनवी तांत्रिक उपकरणं वेगाने हाताळू शकणारे, ’ऑनलाईन’ विश्वात लीलया वावरणारे यात दुसर्‍या स्तरावर आहेत. ही दोन्ही प्रकारची मंडळी देशाच्या महाकाय लोकसंख्येच्या तुलनेत अगदी मोजकी आहेत. कामापुरतं तंत्रज्ञान हाताळता येणारे, अपुर्‍या माहितीमुळे तांत्रिक उपकरणांबद्दल प्रचंड कुतूहल पण भीती असलेले, ऑनलाईन विश्वाशी जुळवून घेण्याच्या धडपडीत या भीतीचं सावट ऑफलाईन जगताना देखील मनावरुन दूर करु न शकणारे या उतरंडीच्या तळाशी आहेत. बहुसंख्य सामान्य माणसं या मधल्या भागाच्या तिसर्‍या स्तरात आहेत. यात निम्नमध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय आहेत आणि बर्‍याच प्रमाणात उच्चमध्यमवर्गीय देखील. निमशहरी, शहरी आणि काही प्रमाणात ग्रामीण देखील.

मधल्या भागातल्या या मध्यमवयीन सामान्य माणसाला कसेही करुन वरच्या स्तरावर जायचे आहे. पिरॅमिडच्या टोकाला पोचायचे आहे. तिथली जीवनशैली हे त्याचे स्वप्न आहे. त्यामुळे तिचे अनुकरण करताना त्याला अप्राप्य असलेला किंवा क्वचित होणारा विमान प्रवास फेसबुकवर चेक-इन करायचा असतो. आहे. बार्बेक्यू नेशनमध्ये मित्राने दिलेल्या पार्टीचा ग्रुप सेल्फी इन्स्टावर अपलोड करायचा असतो. हॉटेलचे ऑनलाईन बुकींग करायचे असते. किंडलवरुन पुस्तक चाळायचं असतं. रेल्वे प्रवासातल्या एखाद्या अडचणीबद्दल पटकन संबंधित अधिकार्‍यांना ट्वीट करायचं असतं. जीपीएसच्या मदतीने नव्या जागी अचूक पोचायचं असतं. फूडअ‍ॅप वरुन पिझ्झा मागवायचा असतो. जाहिरातीतून दिसणारे ओट्स, टोफू, ऑलिव्ह ऑईल, ब्रोकोली, किवी असले अभारतीय पदार्थ वापरणं ’इन’ असल्यामुळे ते ऑनलाईन मागवायचे असतात नाहीतर आपण बॅकवर्ड पालक ठरु अशी भीती वाटत असते. याशिवाय विवाहजुळणीच्या अ‍ॅपवरुन जोडीदार शोधायचा असतो. कामाचे अ‍ॅप्लिकेशन्स फॉर्म्स ऑनलाईन भरायचे असतात आणि आपल्याला मिळालेली लेटेस्ट माहिती व्हॉट्सअ‍ॅप वरुन इतरांना सर्वात आधी पाठवायची असते.. हे सगळं करता यावं म्हणून घेतलेला पण दोन वर्षातच आउटडेटेड झालेला मोबाईल बायबॅक करुन नवा मोबाईल, ऑफर संपायच्या, इन्स्टॉलमेंटवर अ‍ॅमेझॉनवरुन विकत घ्यायचा असतो. 

अर्थात यात लिंगभेद उरलेला नाही. २०१३ पर्यंत पुरुषांची मक्तेदारी असलेली ऑनलाईन खरेदी महिलाही करताना दिसू लागल्यात. घरातील पुरुषांचा जुना फोन वापरणार्‍या बहुतेक महिलांकडे आता स्वत:चा स्मार्ट फोन आलेला असतो. येत्या वर्षाअखेरीस ऑनलाईन खरेदी करणार्‍या महिलांची संख्या १५ कोटीपर्यंत जाईल असं इकॉनॉमिक्स टाईम्स सांगत असतो. यात निमशहरी व शहरी भागातल्या, विशेषत: १८ ते ४५ वर्षे वयोगटातील महिला ग्राहकांचा समावेश असतो. त्यांनाही पिंटरेस्टवर नव्या पर्सेसची डिझाईन शोधायची असते. यू ट्यूबवर पाहिलेले पाव घरी करुन पाहायचे असतात. मिंत्रावरुन घेतलेल्या टॉपमधला फोटो फेसबुकवर मैत्रिणींना टॅग करुन अपलोड करायचा असतो. मग त्याला आलेले लाईक्स थोड्य़ा थोड्या वेळाने तपासायचे असतात. झालंच तर त्यावरील प्रत्येक कमेंटला थँक्यू म्हणायचे असते. 

दुसर्‍या बाजूला हेच सायबर जग अनेक सामान्यांना असामान्य करत असतं. लिहितं करत असतं. त्यांना जागतिक ओळख मिळवून देतं. त्यांच्या शब्दाला, कृतीला व्हायरल करुन चळवळीचं रुप देतं. त्याच्या प्रतिक्रियांची दखल घेऊन आक्षेपार्ह जाहिराती मागे घ्यायला लावतं. राजकारण घुसळून टाकतं. सामान्य माणसाला तुच्छ लेखणार्‍या भल्याभल्यांना थेट सवाल करतं, उत्तरं द्यायला बांधील करतं. नवी उमेद, यूअर स्टॊरीसारख्या ब्लॉगवर सामान्य माणसाच्या यशोगाथा झळकवतं. स्वतः अपंग असून मन:पूर्वक रुग्णसेवा करणारा एखादा डॉक्टर इथे भेटतो. मुलींच्या नावाच्या पाट्या घराघरात लावून त्यांना मानसन्मान प्राप्त करून देणारे दादाभाऊ भेटतात. मासिक पाळीच्या काळात मुली गैरहजर राहू नयेत म्हणून त्यांच्यासाठी जिल्हा परिषद शाळेत चेंजिंग रूमची व्यवस्था करणारी एखादी शिक्षिका इथे भेटते. स्वतःचं मूल कर्णबधीर असलेले आणि इतर कर्णबधीर मुलांसाठी काम करणारे पतीपत्नी भेटतात. शाळेच्या परिसरातल्या गुटखा विक्रेत्याला विद्यार्थ्यांचं नुकसान करण्यापासून परावृत्त करून भाजीविक्रीचा व्यवसाय सुरू करून देणारा एखादा शिक्षक इथे भेटतो. आपले विचार नीट मांडू न शकणार्‍या ग्रामीण तरुणाच्या शेतीच्या नव्या प्रयोगाला इथे शब्दबद्ध केलं जातं. वेगवेगळया ग्रुप्सवर घनघोर चर्चा घडतात. अव्यक्त राहिलेल्या स्त्रियांना स्वत:चा अवकाश इथे मिळतो. त्यांच्यातल्या कलाकाराला प्रतिसाद मिळतो. ’हाऊ टू’ ने सुरू होणार्‍या अनेक प्रश्नांची उत्तरं दृक् श्राव्य स्वरुपात यू ट्यूबवर मिळतात. शिक्षणाची नवनवी दालनं खुली होतात. जगभरातली शहरं, संग्रहालयं घरबसल्या पाहता येतात, शासनाचे प्रकल्प सर्वसामान्यांपर्यंत पोचतात. त्याच्या छोटेखानी घरगुती उद्योगाला अर्थकारणाच्या नव्या संधी उपलब्ध होतात. रत्नागिरीतला आंबा थेट न्यूयॉर्कला पोचतो तर चुकतमाकत इंग्रजी बोलणार्‍या राजस्थानी महिलेच्या ऑनलाईन कुकिंग क्लासमध्ये फ्रेंच शेफ प्रवेश घेतात. हेच सायबर जग एखाद्या आपत्तीनंतर अनेक सामान्यांचे मदतीचे हात पीडितांपर्यंत पोचवतं. परदेशी आप्तांना व्हर्च्युअली शून्य भौगोलिक अंतरावर आणून नव्याने त्यांच्याशी नातं जोडून देतं. सामान्य माणसाला आपणही कुणीतरी आहोत अशी मानसिक उभारी देतं.

अर्थात या सायबर विश्वात रुळताना सुरुवातीला त्याची त्रेधा उडते. तो एटीएममधून पैसे काढताना दहादा खात्री करतो, ऑनलाईन बिलं भरण्यापेक्षा त्यासाठी हाफ डे टाकून रांगेत जाऊन उभा राहतो. पण कधी गरज, कधी क्रेझ म्हणून वापरता वापरता सामान्य माणसाला हळूहळू बर्‍याच गोष्टी करता येऊ लागतात. आजवर त्याच्यासाठी स्वप्नवत असलेलं ऑनलाईन जग त्याच्या बोटाच्या इशार्‍यावर उपलब्ध झालेलं असतानाच कोविडचा प्रादुर्भाव त्याच्या जगण्यालाच नव्हे तर अवघ्या जगाला ग्रासून टाकतो आणि आजवर गमतीचं वाटणारं ऑनलाईन जग त्याच्या ऑफलाईन जगात रोरावत शिरतं. घरात अडकलेल्या सर्वांना सतत ऑनलाईन राहणं हाच बाहेरच्या जगाशी स्वत:ला जोडण्याचा मार्ग उरतो. पर्याय म्हणून याआधी उपलब्ध असलेलं ऑनलाईन शिक्षण आता अपरिहार्य होतं. त्याला पगार कपातीच्या अडचणीतच लॅपटॉपच्या खरेदीला प्राधान्य द्यावं लागतं. कामाशिवाय उरलेल्या वेळेत हाती घेतलेल्या पुस्तकात त्याचं मन रमत नाही. तो सतत मोबाईलमध्ये डोकावतो आणि तेच करणार्‍या आपल्या मुलाला स्क्रीन टाईम वाढल्याबद्दल रागावतो. ऑनलाईन, ऑफलाईन दोन्ही जगांची सीमारेषा पुसट व्हायला लागते. सकाळी तो दूरदर्शनवर रामायण बघतो आणि रात्री फुकट प्लॅन संपायच्या आत नेटफ्लिक्ससारख्या ओटीटीवरच्या वेब सिरिजचे एकामागून एक सीझन्स. त्यातलं शिवीगाळ, हिंसाचार आणि उत्तेजक दृश्यांनी भरलेलं कथानक त्याला परकं वाटत राहतं पण वरच्या स्तरात जायचं असेल तर हे सगळं पाहाणं क्रमप्राप्त असतं. 

‘मागणी तसाच पुरवठा’ आम्ही करतोय असे म्हणून कलाकार त्यांच्या व्यावसायिक हतबलतेचे आणि माध्यमं त्यांच्या सर्जनशीलतेच्या मर्यादांचे खापर सरसकट प्रेक्षकांच्या माथी फोडत राहतात. विषमता असलेल्या या देशातील सामान्य जनतेला कोणते आणि कसे संदेश द्यायचे हा मोठा बिकट प्रश्न नक्कीच असला तरी सवंग करमणुकीखेरीज पर्याय नसावा असं कोणतंही सांस्कृतिक दारिद्र्य भारतात नसतं. पण बहुतेक माध्यमसम्राटांसाठी भारतीय सामान्य माणूस हा माणूस नसून फक्त आणि फक्त ग्राहक असतो. कोणत्याही धर्मगुरू किंवा राजाने उपभोगली नसेल एवढी सत्ता माध्यमसम्राटांच्या हातात असते. मनोरंजनाच्या बाजारात नैतिकतेचा विचार करण्याइतकी उसंत त्यांना नसते.

माहितीच्या आणि मनोरंजनाच्या महापुरामुळे कोविड आधीच लागण झालेला फोमो (फिअर ऑफ मिसिंग आऊट) नामक आजार सामान्य माणसाला ग्रासू लागतो. घरात अडकलो असू वा कामापुरतं बाहेर जात असू ,जगाबरोबर ऑनलाईन धावायच्या स्पर्धेत त्याला मागे पडायचं नसतं. सगळं काही आपल्याला सर्वात आधी कळलं पाहिजे याने तो पछाडून जातो. ते आपल्याला सर्वात आधी कळलं आहे हे इतरांना कळल्यावर ऑनलाईन जगातला रुबाब वाढत असल्याने त्याला ते घाईने फॉरवर्ड करायचं असतं. शिवाय लिहिता येणारा किंवा गुगल करुन कॉपी पेस्ट करणारा प्रत्येक जण स्वत:ला लेखक समजू लागतो. त्याला लाईक्स मोजण्याचा नार्सिसिस्ट नाद लागतो. चांगली पदवीधर व्यक्ती ’रात्री कॉसमॉस किरणे येणार असल्याचे, अमुक वेळा पाठवल्यास आपोआप बॅटरी चार्ज होण्य़ाचे’ अतर्क्य मेसेज धडाक्यात पुढे पाठवते. अगदी उच्चशिक्षित व्यक्ती सुद्धा ’अमक्याकडून आला म्हणजे खरंच असेल’ असं म्हणत एखादा अंधश्रद्धा पसरवणारा मेसेज सर्रास पुढे पाठवते. घंटानादाचा गर्भित अर्थ दुर्लक्षित करुन त्याने निर्माण झालेल्या कंपनांच्या तीव्रतेमुळे कोरोनाचे विषाणू मरुन जाणार असल्याचा भाबडा आनंद तो बुद्धी गहाण टाकून अभिमानाने शेअर करतो. एकच मेसेज स्वामी विवेकानंदांपासून, आईनस्टाईन ते विश्वास नांगरे-पाटील यांच्या नावानिशी तर कधी निनावी पुढे पाठवताना आता तो बिचकत नसतो. टिकटॉकवर बंदी घालणं अयोग्य आहे म्हणणार्‍या कुणा एका आभासी व्यक्तीशी तो आपल्या हातातल्या चिनी बनावटीच्या मोबाईलवरुन तावातावाने वाद घालतो. दिवसातले जवळपास सहा तास त्याची मुलं समाज माध्यमं वापरत असतात. तो स्वत: किमान चार तास आणि सामान्य ज्येष्ठ नागरिकही प्रचंड फावला वेळ हाताशी असल्याने जुजबी मोबदल्यात मिळणारी अमर्याद करमणूक स्क्रोल करण्यात साधारण २ ते ३ तास सहज घालवतात असं या क्षेत्रातले अभ्यासक सांगतात. मात्र माहितीच्या ढिगार्‍यात गुदमरुन अनेकदा तो आतून अस्वस्थ होतो. ’दिंड्या पताकांनी, दुमदुमली पंढरी, तरी मी श्रीहरी, कासावीस’ ही अवस्था राहतेच.

कुणाला लग्नासाठी स्थळ सुचवण्यात आलं की तो सगळ्यात आधी त्यांचं सोशल मिडीया प्रोफाईल बघतो. पती, पत्नी किंवा एकाच कुटुंबातले सदस्य एकमेकांना जितकं ओळखत नाहीत तितकं या सोशल साईट्स त्याला ’ओळखून’ असतात. त्याच्यासारख्या भाबड्या मतदारांची कलचाचपणी करायची. त्यानुसार विशिष्ट पोस्ट्स किंवा ट्वीट्सचा मारा करुन आपल्या पक्षाला अनुकूल असे जनमत तयार करायचे ही पद्धत राजकीय क्षेत्रात रुढ होत जाते. व्यापारी कंपन्याही हेच करत असतात. त्याने नुकतेच काय ’सर्च’ केले आहे ते पाहून त्याच्याशी निगडीत उत्पादनांच्या जाहिरातींचा भडिमार त्याच्यावर होऊ लागतो. ऑरवेलचे ’बिग ब्रदर इज वॉचिंग यू’ समाज माध्यमांवरही लागू होते आहे हे त्याच्या लक्षातही येत नाही. काल पहिल्यांदाच ज्याच्याशी व्हॉट्स अ‍ॅपवर चॅट केले ती व्यक्ती दुसर्‍या दिवशी फेसबुकच्या ’पीपल यू मे नो’ मध्ये लगेच दिसणं याला तो योगायोग समजतो. 

सुरुवातीला त्याला वाटत असतं की आपल्या वैयक्तिक माहिती मध्ये /डाटामध्ये लपवण्य़ासारखं काही नाही, आपल्या दोनचार एफडी, इवलीशी पुंजी. मग घाबरायचं कशाला! त्यामुळे बहुतेक वेळा आपला डाटा वापरण्य़ाची परवानगी ’आय अ‍ॅग्री’ असे क्लिक करुन तो स्वत:च देत असतो. संख्येने सर्वाधिक असलेल्या सामान्य माणसाची वैयक्तिक 'माहिती' हा सायबर व्यवसायाचा कच्चा माल  तो स्वत:च पुरवत असतो. समाज माध्यमं आणि त्यामागील अर्थकारणाचे नैतिक मूल्यमापन करताना तो हे विसरतो की ’फुकट’ या लेबलखाली आलेली सुविधा त्याचा गिनीपिग आणि ग्राहक म्हणून वापर करत असते. 

मग एके दिवशी, संगणकातले बहुतेक सॉफ्टवेअर फुकट वापरताना त्याला बरं वाटत असलं तरी पैसे उकळण्यासाठी रॅन्समवेअरचा वापर करणारे सायबर गुन्हेगार त्याच्या किंवा त्याच्या कंपनीच्या संगणकापर्यंत त्या मार्फत पोचतात. कधी त्याला त्याच्या बँकेकडून खाते अपडेट करायचे असल्याने माहिती विचारणार्‍या मेल येतात. बँकेकडून अशी माहिती ऑनलाईन विचारली जात नसते हे विसरुन ,शहानिशा न करता तो माहिती पाठवतो. त्याच्या खात्यातून कष्टाने साठवलेले काही हजार रुपये काढले गेल्याचा एसएमएस पाहून तो हबकतो. त्याच्या बायकोने कधीतरी नकारात्मक मेनोपॉजल मूडमध्ये अनोळखी व्यक्तीशी फेसबुक मेसेंजरमध्ये अभावितपणे केलेल्या भावनिक चॅटचा फायदा घेऊन कुणीतरी तिला मानसिक त्रास देऊ लागतं. ती सैरभैर होते. विद्या वॉक्सचं नवं गाणं, सुपरहिट वेब सिरिजपासून फॅशनच्या लेटेस्ट ट्रेंड्स पर्यंत सगळे अपडेट्स असलेली त्याची मुलगी फ्रेंडलिस्ट मोठी दिसावी म्हणून, चाहत्यांना नाराज कसं करायचं म्हणून इन्स्टा वर अनोळखी मित्रविनंत्या स्वीकारते. त्यातल्याच कुणीतरी तिचं फेक प्रोफाईल करुन त्यावर वाटेल तसे फोटो आणि मजकूर टाकलेला पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकते. तिचा भाऊ सायबर कॅफेत फॉर्म भरुन झाल्यावर लॉगआऊट न करताच घाईने निघतो. दुसर्‍या दिवशी त्याला त्याच्या इनबॉक्समध्ये त्याने इतक्यात कधीतरी क्लिक केलेल्या पॉर्नसाईटचे डिटेल्स जगजाहीर करु अन्यथा अमुक पैसे या खात्यात पाठवा, असा धमकीचा मेल आलेला दिसतो. 

’हे सगळं नायजेरियन लोक करतात आणि नोएडा किंवा मुंबईच्या हाय सोसायटीत घडतं ते सगळं, आपल्याला काय करायचंय,’ असं म्हणत आजवर ज्या सामान्य माणसाने सायबर जगाकडे कधी गांभीर्याने पाहिलेलं नसतं तो अशा एखाद्या घटनेने खडबडून जागा होतो. आजवर त्याच्यासाठी सायबर गुन्हेगारी म्हणजे भव्यदिव्य हॉलिवूड सिनेमातल्या कथा. बलाढ्य सरकारी यंत्रणांची गुप्त कागदपत्रं, न्युक्लिअर पॉवर प्लांटसंबंधीची गोपनीय माहिती, बँकामधले करोडो डॉलर्स वगैरे लुटण्यासाठी केलं जाणारं हॅकिंग. त्या अजब दुनियेशी त्याचा फक्त प्रेक्षक म्हणून संबंध असतो. पण आता सायबर विश्व एखाद्या चक्रीवादळासारखं त्याचं जगणं स्वत:सोबत वेगाने फरफटत घेऊन जात असतं. सायबर गुन्हेगारी त्याच्या चिमुकल्या घराचा उंबरठा ओलांडून आत आलेली असते.

जसं फक्त गाडी चालवता येणं पुरेसं नसतं. रहदारीचे नियम माहीत असणं, ब्रेकचा नीट वापर, गाडीची जुजबी दुरूस्ती करता येणं हे किमान कौशल्य अवगत असायला हवं तसंच सायबर विश्वात वावरताना देखील तारतम्य, व्यवहारज्ञान आणि किमान आवश्यक तांत्रिक ज्ञान नसेल तर अपघाताचा धोका अधिक. असतो. मग सामान्य माणसाच्या हातात काय असतं! ग्राहक म्हणून जागं राहणं. विवेकाचा वापर करणं. आयुष्यात खुट्ट झालं तरी ते समाजमाध्यमावर ओरडून सांगण्याचा मोह आवरणं, इतर लोक काय करत आहेत याबद्दल अवाजवी उत्सुकता न बाळगणं. सुरक्षेचे बेसिक सेटिंग वापरणं. व्यक्तिगत आवडीसाठी, तांत्रिक सुविधांसाठी, नेटवर्किंगसाठी, व्यवसायासाठी, सामाजिक-वैचारिक उपक्रमांसाठी, समविचारी लोकांच्या वर्तुळात राहण्य़ासाठी समजून उमजून समाज माध्यमाचा वापर करणं. असुरक्षित लिंक्सवर क्लिक नं करणं. https न वापरणार्‍या वेबसाईट्सवर आर्थिक व्यवहार टाळणं. अनावश्यक आणि क दर्जाचे अ‍ॅप्स इन्स्टॉल न करणं. दरवेळी फीडबॅक आणि रेटिंग बघणं. आभासी आणि वास्तव जगातली सीमारेषा पुन्हा एकदा ठळक करणं. त्यासाठी नुसतं डिजिटली साक्षर न होता डीजिटल व्यवहारज्ञान मिळवणं. 

सॉक्रेटिसने कोणत्याही संवादापूर्वी स्वत:ला तीन प्रश्न विचारायला सांगितले आहेत. सायबर विश्वात कोणतीही भर घालताना किंवा काही फॉरवर्ड करताना त्याने त्यात थोडे बदल करुन हे प्रश्न स्वत:ला विचारावे. ही माहिती खरी आहे का? या माहितीमुळे कुणाचे अकारण नुकसान तर होणार नाही ना? ही माहिती पाठवणं खरंच इतकं आवश्यक आहे का? यापैकी एक उत्तर जरी नकारार्थी आलं तर ’एंटर’ बटण दाबायचा मोह त्याने आवरणं. स्वत:ला कायम कृत्रिम आणि आकर्षक पद्धतीनेच सादर करण्याचं दडपण न घेता #MeriRealLife या टॅगसारखं आपलं खरंखुरं, मुखवटेविरहीत आयुष्य आनंदाने जगायला शिकणं. 

सायबर तंत्रज्ञान हे एक साधन आहे, साध्य नाही, आयुष्य व्यापून टाकेल इतकं महत्त्वाचं नाही. सामान्य माणसाने इतकी उर्जा, वेळ आणि मानवी तास त्यात अनुत्पादकपणे वाया घालवण्याइतकं तर नाहीच नाही. ते वॉशींग मशीन किंवा फूड प्रोसेसर सारखं मदतनीसाचं काम करतं तोवर ते नक्कीच उपयोगी आहे पण ते त्याच्या विळख्यात खेचून त्याला त्याचा गुलाम करत असेल तर! त्याच्या गरजा इतर कोणीतरी ठरवत असेल तर! तर त्याने हे थांबवायला हवं. त्याच्या गरजा काय आहेत हे त्याने ठरवावं. संयमाचं महत्त्व त्याची संस्कृती हजारो वर्षांपासून सांगतेय.. मग कुठे थांबायचं हे त्याला ठरवता आलं पाहिजे. ’यंत्रात’ परिवर्तीत होऊ घातलेल्या या माणसाला त्याच्या आतल्या समुद्राची गाज ऐकता यावी. त्यासाठी तंत्रज्ञानाबरोबरच हवे नको निवडण्याची समज विकसित व्हायला हवी. अन्यथा भारतीय समाजाचं शरीर आधुनिक साधनांच्या साहाय्याने जगत राहील पण त्याचा आत्मा हरवलेला असेल. ’आपली मूल्य बदलत चालली आहेत का, आपल्या वैयक्तिक आयुष्यातले ताण त्यामुळे वाढत आहेत का, आपलं सहजीवन त्यामुळे अस्थिर होतं आहे का, ’जीपीएस’च्या कक्षेबाहेरही एक विशाल जग आहे हे आपण विसरलो आहोत का, आपल्यासाठी काय जास्त महत्त्वाचं आहे, वास्तवातली आपली माणसं, आपले छंद, आपलं काम की आभासी जग!’ हा विचार त्याला करता आला पाहिजे. ऑनलाईन, ऑफलाईन जगात स्विच ऑन ,स्विच ऑफ करता आलं पाहिजे. कसं! तर ’रस्त्यावरून मिरवणूक जरी गेली ना, तरी उघडू नये दार. पण सामीलच व्हावे वाटले मिरवणुकीत तर जमावाच्या हाकेची वाटही पाहू नये’, असं ‘चर्चबेल’मधील एका लेखात ग्रेस म्हणतात तसं.

या दोन्ही जगांना जोडणारा पूल एवढीच भूमिका आणि किंमत त्याने सायबर तंत्रज्ञानाला द्यायला हवी, गुलामीच्या बेड्या तोडायला हव्यात आणि हे त्याने लवकर करायला हवं, नव्हे आत्ताच.


Saturday, March 15, 2025

सावध ऐका पुढल्या हाका

’ऑनलाईन’ शिकणार्‍या शाळकरी मुलांना सुद्धा सायबर सुरक्षेचे बेसिक नियम एव्हाना माहित झाले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या जनहितार्थ केलेल्या जाहिरातीतून अमिताभ बच्चन ते नियम आपल्याला कळकळीने सांगत असतात. १) आपले पासवर्ड परक्या व्यक्तीला कधीही कळू देऊ नका २) इंटरनेटवर जर आर्थिक व्यवहार करीत असाल तर आपला ओटीपी म्हणजे वन टाईम पासवर्ड कुणाला सांगू नका आणि ३) आपली वैयक्तिक माहिती आणि बँक डिटेल्स सोशल मीडियावर किंवा इंटरनेटवर कुणालाही देऊ नका. खरे तर आपल्याला हे इतके पक्के पाठ झाले आहे मग तरीही सायबर गुन्हे इतक्या मोठ्या प्रमाणावर का घडत असावेत! विशेषत: कोविड काळात आपल्या भारतात सायबर गुन्हेगारीत 23 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याची दोन कारणे आहेत. आपली फसवणूक होत असल्याचा क्षण अगदी व्यवहारचतुर लोकांना देखील सहजपणे ओळखता येत नाही. नजर हटी दुर्घटना घटी. दुसरे कारण आहे सायबर जगाच्या अंडरवर्ल्डबद्दल, अंधार्‍या कोपर्‍यांबद्दल, नव्या धोक्यांबद्दल जनतेची अनभिज्ञता. (लेखाच्या शेवटच्या भागात आपण याबद्दल विस्ताराने जाणून घेऊया)

सायबर गुन्हेगारांना आपली माहिती मिळते कुठून ?

जॉर्ज ऑरवेल या प्रसिद्ध लेखकाने ’१९८४’ या पुस्तकातून साम्यवादी सत्तेच्या विळख्यात स्वातंत्र्य आणि समतेची भाबडी स्वप्ने पाहणार्‍या जनतेला ‘बिग ब्रदर इज वॉचिंग यू’ ही जाणीव करुन दिली होती. आज ’बिग ब्रदर’ची जागा गुगल, अ‍ॅमेझॉन, फेसबुकसारख्या बलाढ्य अशा सायबर कंपन्यांनी घेतली आहे. आपण कुठे राहतो, काय करतो, आपल्या कुटुंबात कोण कोण आहेत, आपण काय खातो, काय पितो, कुठे जातो, कोणत्या वस्तू वापरतो, आपल्या आवडीनिवडी काय आहेत, आपण कोणाशी बोलतो, इतकेच नव्हे तर काय बोलतो, इंटरनेटवर काय सर्च करतो हे सगळे या बिग ब्रदर्सना माहित असते. अगदी नवराबायको किंवा घरातली माणसे जितकी एकमेकांना ओळखत नसतील तितक्या या सायबर कंपन्या आपल्याला ’ओळखून’ असतात असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. आपण इंटरनेटरवर जेव्हा ’फ्री’ म्हणून काही वापरत असतो तेव्हा आपण त्याचा असा मोबदला नकळत देत असतो. कोणतेही मोफत अ‍ॅप इन्स्टॉल करतेवेळी आपण ’आय अ‍ॅग्री’ यावर जेव्हा क्लिक करतो तेव्हा आपण त्या अ‍ॅपला आपले फोनबुक, गॅलरी, मोबाईलमधल्या फाईल्स वापरण्याची स्वत:च परवानगी देत असतो. बहुतेक जणांना सोशल मीडियावर व्यक्त व्हायला आवडते, सोशल मीडियाचा उद्देशच तो आहे. पण याचा अतिरेक होऊन आपल्या आयुष्यात खुट्ट जरी वाजले तरी त्यांना ते जगाला ओरडून सांगायचे असते. त्यामुळे ’हॅविंग पिझ्झा विथ अमुकतमुक’ किंवा ’ट्रॅव्हलिंग टू बंगलोर’ अशी पोस्ट टाकून सतत आपले अपडेट जगाला देण्याच्या सवयीतूनही ही माहिती सायबर जगात पोहचत असते. म्हणजे एका अर्थी या नव्या बिग ब्रदरच्या नजरकैदेत आपण स्वखुशीने उडी मारत असतो. 

ही सर्व माहिती म्हणजेच ज्याला डेटा असे म्हटले जाते, त्यात दोन गटांना स्वारस्य असते. एक म्हणजे मार्केटिंग कंपन्या, त्यांच्यासाठी आपण केवळ ग्राहक असतो आणि फक्त नफा कमावणे हा त्यांचा उद्देश असतो. दुसरा गट आहे, तो सायबर गुन्हेगारांचा, त्यांना सावज शोधण्यासाठी ह्या माहितीचा  उपयोग होतो. मग ह्यावर उपाय काय? हे सगळे वापरायचेच नाही! अर्थातच नाही.  कधीतरी अपघात होईल म्हणून जसे आपण प्रवास करणे थांबवत नाही. तसेच इंटरनेट वापरणे आपण थांबवायचे नाही. कारण इंटरनेटविना जगणे म्हणजे प्रगतीच्या वाटा स्वत:हून बंद करणे. इंटरनेटचा वापर अधिकाधिक स्मार्ट पद्धतीने करणे आणि सावधगिरी बाळगणे हाच यावर उपाय आहे. 

सायबर गुन्हेगार कोण असतात!

हे अतिशय उच्चशिक्षित असतात, त्यांना हॅकिंगचे उच्च तंत्रज्ञान अवगत असते असे बहुतेकांना वाटते परंतु बरेचदा हे गुन्हेगार जुजबी तांत्रिक ज्ञानाच्या साहाय्याने सावजाला हेरतात आणि लुबाडतात. गुन्हेगारी वृत्ती याच्या मुळाशी असते. झारखंडमधले जमताडा, राजस्थानमधले भरतपूर किंवा दिल्लीजवळचे नोएडा ही सगळी गावे सायबर गुन्हेगारीसाठी कुप्रसिद्ध आहेत. भारतात होणार्‍या एकूण सायबर गुन्हेगारीमध्ये 98% सायबर गुन्हे हे भारतीयांनीच केलेले असून 96% सायबर गुन्हे पुरुषांनी केलेले असतात. हे सायबर गुन्हेगार आपल्या अवतीभोवती सुद्धा असू शकतात. समाजविघातक वृत्तीचे लोक, व्यवसायातील स्पर्धक, काढून टाकल्यामुळे राग किंवा डूख धरलेले माजी कर्मचारी, कुतूहल किंवा गंमत म्हणून हॅंकिंग करून पाहणारे विद्यार्थी, प्रेमप्रकरणातून किंवा दुखावले गेल्याने सूड उगवण्यासाठी देखील गुन्हेगारी मनोवृत्तीचे लोक असे गुन्हे करत असतात. मुखवटे धारण करणे आभासी जगात अतिशय सोपे असल्याने गुन्हेगारांचे फावते. 

सायबर गुन्हेगारीचे आर्थिक फसवणुकीपलिकडे कोणते प्रकार असतात!

लव्हबग 2000 किंवा वॉनाक्राय 2017 असे सायबर अ‍ॅटॅकस् (रॅनसम वेअर) जगभर गाजले आहेत. मोठमोठ्या वित्तसंस्था, कॉर्पोरेट्सची गोपनीय माहिती एन्क्रिप्ट करुन/ चोरुन ती डिक्रिप्ट करण्याच्या बदल्यात बिटकॉईनसारख्या डिजिटल चलनात खंडणी वसूल करणे असे या गुन्ह्यांचे स्वरूप असते. हॉलीवूडच्या सिनेमातून आपण याची झलक पाहतो मात्र इथे आपण सर्वसामान्यांना भेडसावणार्‍या सायबर धोक्याबद्दल बोलत आहोत. असे गुन्हे मुख्यत: तीन प्रकारचे असतात. १) आर्थिक लुबाडणूक जी हॅकिंग किंवा फिशिंगद्वारे केली जाते. २) मानसिक छळ, जो ट्रोलिंग किंवा सायबर बुलिंगद्वारा केला जातो. आणि ३) लैंगिक शोषण, जे फोटो मार्फिंग किंवा वैयक्तिक माहिती चोरून ब्लॅकमेलिंग पद्धतीने केले जाते. अगदी ड्रग रॅकेटमध्ये ओढण्यात त्याचे पर्यावसान होऊ शकते. 

सायबर धोके टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यायला हवी! 

दुसर्‍याच्या मोबाईल किंवा संगणकावरून सोशल मीडिया किंवा बँक अकाउंट वापरणे टाळायला हवे आणि वापरलेच तर ताबडतोब लॉग आऊट करावे. कुणीही सहज ओळखेल असा पासवर्ड नसावा. साधारणत: बायकांना आपल्या नवर्‍याचे किंवा मुलांची नावे पासवर्ड म्हणून वापरण्याची हौस असते. पुरुष बरेचदा त्यांच्या आवडत्या स्त्रीचे नाव वापरतात. त्यांना ओळखणार्‍या व्यक्ती किंवा हॅकर्स ते गेस करू शकतात आणि तुमचे अकाउंट भलत्याच व्यक्तीच्या ताब्यात जाते. याला हॅकिंग म्हणतात. बहुतेक लोक आपल्या पोस्टचे सेटिंग कायम पब्लिक ठेवतात. गुन्हेगार त्याचा वापर करून प्रोफाईल व इतर फोटो कॉपी करून त्यासारखेच दिसणारे डुप्लिकेट अकाउंट तयार करतात. याला क्लोनिंग म्हणतात. मूळ अकाउंटवरील मित्रांची नावे पाहून त्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात. मग त्यांना ’मी अपघातात सापडलो आहे, मला मदत करा’ यास्वरुपाचे खोटे मेसेज पाठवले जातात. जेव्हा कुणी पैशाची मागणी करत असतो तेव्हा आपले कान टवकारलेच गेले पाहिजेत. अशा वेळी शहानिशा केल्याशिवाय कोणतेही व्यवहार केले जाऊ नयेत.

लैंगिक शोषण करणारे गुन्हेगार फोटो मॉर्फिंगचा वापर करतात. परंतु मुळात त्यांना हे फोटो उपलब्ध कसे होतात? बहुतेक महिला किंवा मुली आपल्या फोटोंचे प्रोफाईल सेटिंग हे पब्लिक राहू देतात. त्यामुळे ते कुणीही डाऊनलोड करू शकतो. त्याचा दुरुपयोग करू शकतो. खात्री न करता स्वीकारलेली फ्रेंड रिक्वेस्ट अनेकदा गुन्ह्याचे मूळ ठरते. 

सुशिक्षित लोक सायबर गुन्ह्यांना कसे बळी पडतात! 

सायबर गुन्हेगार सावजाच्या मानसिक स्थितीचा व्यवस्थित अभ्यास करतात. 11 ते17 वर्षे या वयोगटातल्या मुला-मुलींना इंस्टाग्राम किंवा डेटिंग अ‍ॅप्सवर, तरुण मुलींना साधारणत: विवाह नोंदणी स्थळांच्या वेबसाईटवर तर मध्यमवयीन महिला तसेच पुरुषांनासुद्धा फेसबुकच्या माध्यमातून फेक मित्र बनून जाळ्यात ओढले जाते. सोशल मिडीयावर महिलांशी संवाद साधताना त्यांच्या संवेदनशीलतेचा, मानसिक अवस्थेचा गैरफायदा घेतला जातो. हार्मोनल त्रासामुळे किंवा आयुष्यातल्या ताणतणावांमुळे कुणी आपल्याशी थोडेसे सहानुभूतीने बोलले किंवा प्रशंसा केली की नकळत त्या मोकळेपणाने बोलू लागतात. विश्‍वास संपादन केल्यावर हे संभाषण पुढे अत्यंत खाजगी स्तरावर नेले जाते. कालांतराने ही माहिती उघड करण्याची धमकी देऊन लैंगिक शोषण केले जाते तर कधी परदेशातून भेटवस्तू पाठवल्याचे सांगून ती सोडवून घेण्यासाठी महिलेला वेगवेगळ्या खात्यांमध्ये रकमा भरायला सांगितल्या जातात. विवाहविषयक वेबसाईटवर आपण उच्चशिक्षित सुस्थापित एनआरआय आहोत असे भासवून आधी लग्न ठरवणे आणि गोड बोलून पैशाची मागणी करणे असे प्रकार अनेकदा घडतात. पुरुषांनाही महिलांच्या नावाने मित्र विनंती पाठवून लुबाडले गेल्याच्या अनेक घटना घडत असतात. मध्यमवयीन लोक फारसे तंत्रस्नेही नसतात, त्यांना मुलाचा मित्र वगैरे असल्याचे सांगून गोंधळात टाकून घाईने पासवर्ड किंवा ओटीपी विचारला जातो. त्यामुळे सायबर जगात वावरताना आपला मेंदू हा सतत सजग राहिला पाहिेजे.

‘फ्री’ ह्या शब्दाबद्दल असलेले आकर्षण हे आर्थिक फसवणूक होण्यामागचे अत्यंत महत्त्वाचे कारण आहे. फ्री भेटवस्तू घ्यायला कोणत्याही लिंकवर जाणे, फ्री वायफाय वापरणे टाळायला हवे. वेबसाईटवर आर्थिक व्यवहार करताना वेबसाईटच्या नावाआधी https/लॉकची खूण बघायला हवी. आपण एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो तर मेन्यूकार्डवरचे सगळे पदार्थ आपण खात नाही. आवडेल तेवढेच निवडतो. दुर्दैवाने इंटरनेट किंवा सोशल मीडियावरती आपण अशी निवड करत नाही. केवळ क्षणिक आनंदासाठी 80 व्या वर्षी आपण कसे दिसू, किंवा मागच्या जन्मी आपण कोण होतो अशी तथ्यहीन माहिती देणारे अ‍ॅप त्याचे रेटिंग न पाहता इन्स्टॉल करून घेऊन सायबर धोक्याची पातळी आपण स्वत:च वाढवत असतो. अँटिव्हायरस सारख्या सुरक्षेच्या उपायांवर खर्च करायला बरेच जण तयार नसतात, याकडे गांभीर्याने पाहायला हवे. 

डार्क वेब आणि सायबर अंडरवर्ल्ड

हिमनगाचा जेमतेम 1/3 भाग आपल्याला पाण्याच्या वर दिसतो. तसेच आपण वापरतो, वावरतो ते सरफेस वेब हे फक्त 4% आहे. इंटरनेटचा उरलेला 96% भाग म्हणजे डीप वेब. इथपर्यंत सर्च इंजिन पोहोचू शकत नाही. या डीपवेबच्या अगदी तळाशी आहे सायबर जगाचे अंडरवर्ल्ड म्हणजेच डार्क वेब. पूर्वी जगाचे राजकारण किंवा समाजकारण हे तेलाभोवती केंद्रित असायचे. जगात जी काही युद्धे होतात ती बरेचदा ’तेल’ ह्या प्रश्‍नामुळे निर्माण झालेली असतात. आता जगाचे जे काही राजकारण, समाजकारण आहे ते डेटाभोवती गुंफलेले आहे. येत्या काळातील युद्ध ही सायबर वॉर असतील आणि ती या डार्कवेबच्या माध्यमातून होतील, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 

पुढच्या जगाचे जाऊ द्या, सायबर वापरकर्ता म्हणून विचार केला तर आपल्याला विशेष महत्त्वाची न वाटणारी आपली माहिती या वेब अंडरवर्ल्डमध्ये प्रचंड किंमतीला विकली जाते. म्हणजे आपले नाव, गाव, पत्ता, आधारकार्ड, पॅननंबर अशी माहिती 10 ते 20 रुपयाला. आपल्या डेबिट/क्रेडिट कार्डचा नंबर आणि नाव सुमारे 200 रुपयांना. कार्डची एक्स्पायरी डेटसारखी माहिती अजून जास्त किमतीला तर पासपोर्टसारखे दस्तावेज तब्बल 10000-15000 रुपये प्रति व्यक्ती विकले जातात. हे दर गरजेनुसार वाढत जातात. इंटरनॅशनल शॉपिंग वेबसाईटवरती बर्‍याचदा ओटीपी विचारला जात नाही, अशा ठिकाणी या माहितीचा गैरवापर केला जातो. सावधगिरी म्हणून इंटरनॅशनल कार्डवर स्पेंडिंग मर्यादा कमीत कमी ठेवणे, इंटरनॅशनल व्यवहाराचे सेटिंग एरवी ऑफ ठेवणे एवढे मात्र आपण नक्की करु शकतो.

‘डिपफेक’- सायबर जगातला एक नवा, भयावह धोका 

यूट्युबवर बीबीसाचा ओबामांवरील एक व्हिडिओ आहे. यात ओबामा आपल्याशी संवाद साधताना दिसतात. व्हिडिओत शेवटी सांगण्यात येते की तुम्ही ज्यांचे बोलणे ऐकले त्यांची देहबोली, त्यांची बोलण्याची लकब, त्यांचा आवाज, त्यांचा चेहरा जरी ओबामांसारखा असला तरी ते ’सिंथेटिक’ ओबामा होते. युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनच्या संशोधकांनी विविध व्हिडिओंमधून ओबामांचे चौदा तासांचे फुटेज घेऊन त्याच्यातून ओबामांची उच्चार करण्याची पद्धत, त्यांचे हावभाव, आवाज ह्याचे नमुने घेऊन व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीच्या मदतीने हे सिंथेटिक ओबामा तयार केलेत. थोडक्यात याचिं देही याचिं डोळा पाहिलेला व्हिडिओही खोटा, नकली असू शकतो. वलयांकित प्रसिद्ध व्यक्तींच्या विरोधात या तंत्राचा येत्या काळात मोठ्या प्रमाणात वापर होणार असल्याची शक्यता असल्याने संशोधकांनी त्याबाबत सावध करण्यासाठी या व्हिडिओची निर्मिती केली आहे. व्हिडिओतील व्यक्ती खरी की सिंथेटिक हे ओळखण्याचे सध्यातरी केवळ ब्लिंक आय टेक्नॉलॉजी हे एकच तंत्रज्ञान आहे आणि तेही हा फरक अद्याप शंभर टक्के अचूकतेने शोधू शकलेले नाही. फोटो मॉर्फिंगची ही पुढची पायरी आहे. फोटो मॉर्फिंगमध्ये बरेचदा एका व्यक्तीचे अर्धनग्न शरीर आणि दुसर्‍या व्यक्तीचा चेहरा मर्ज केला जातो. या बाबतीत रिव्हर्स इमेज चेकिंगचा वापर करून फोटो बनावट असल्याचे ओळखता येऊ शकते पण डिपफेक मध्ये हे मिक्सिंग अतिशय बेमालूमपणे केले जाते. 

सायबर गुन्हेगारांनी ह्या डिपफेकचा वापर कोविड काळात केल्याची नोंद आहे. काही जवळच्या व्यक्तींचे आवाज आपण अगदी झोपेतही ओळखू शकतो. न्यूयॉर्क टाईम्समधील एका बातमीनुसार सीइओच्या आवाजात कंपनीच्या एका महत्वाच्या अधिकार्‍याला फोन करण्यात आला आणि प्रचंड मोठे आर्थिक व्यवहार करायला सांगण्यात आले. बोलणार्‍या व्यक्तीचा आवाज, शैली अत्यंत परिचयाची असल्याने संशयाला जागा नव्हती, व्यवहार केले गेले आणि नंतर ’तो मी नव्हेच’ हे सीइओ ने स्पष्ट केल्यावर फसवणूक झाल्याचे संबंधितांच्या लक्षात आले. आजवर लांब कुठेतरी घडणारे हे गुन्हे आपण ग्लोबल खेड्याचा भाग असल्याने आपल्याही उंबरठ्याशी येऊन पोचले आहेत. याची नोंद आपण वेळीच घेणे निकडीचे आहे.  

सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तींमधला संघर्ष अनादि काळापासूनचा आहे. सायबर जग त्याला अपवाद नाही. इथले गुन्ह्यांचे प्रकार आणि सावज हेरण्याच्या क्लृप्त्या तंत्रज्ञानाइतक्याच वेगाने वाढत आणि बदलत जाणार आहेत. आपण स्वत:ला सुजाण आणि जबाबदार नागरिक समजत असू तर डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार व्हायला आपले सायबर साक्षर असणे पुरेसे नाही. सायबरधोक्यांबाबत सावध असणे तितकेच महत्वाचे आहे. विवेकी मन, तर्कशुद्ध विचार करणारा चाणाक्ष मेंदू आणि या दोहोंच्या ताब्यात असलेले प्रत्यक्ष क्लिक करणारे मनगट या त्रयीवरच सायबर जगातला आपला निर्धोक आणि आत्मविश्वासपूर्ण वावर अवलंबून आहे. 


Tuesday, February 25, 2025

अयोध्या

बनारस-प्रयागला जायची इच्छा होती पण अयोध्येला तर जायचं होतं. शेकडो वेळा अवमानित झालेल्या ज्या विशाल  हिंदू संस्कृतीचा आपण एक अंश आहोत त्या संस्कृतीच्या हृदयातल्या आस्थाविषयाची सन्मानपूर्वक झालेली पुनर्स्थापना डोळ्यांनी बघायची होती. रामकथा फक्त वाल्मिकींनी सांगितलेली नाही ,रामायणाची अनेक versions आहेत. त्यातलं कोणतं खरं! त्यातही किती भाग खरा, किती प्रक्षिप्त हे प्रश्न मनात येणारच. कोणतं रामायण स्वीकारायचं, त्यातलं काय स्वीकारायचं, काय नाकारायचं, मुळात रामाला दैवत म्हणून दशावतारातील एक मानायचं की  केवळ मर्यादा पुरुषोत्तम मानायचं हे कोणत्या वैचारिक दृष्टिकोनातून आपण या सगळ्याकडे पाहतो यावर अवलंबून आहे. ’लोकसाहित्यातला राम’ हे काकडे सरांचं व्याख्यान आणि सातपुड्याच्या कपारींमधल्या भटक्या जमातींच्या आयुष्याचा भाग असलेल्या रामायणावरचं त्यांचं संशोधन स्क्रीनवर बघताना एक जाणवलं की रामायणाचं या जमातींचंही एक version आहे आणि ते बारशापासून अंत्यसंस्कारापर्यंत तुकड्या तुकड्यात लोकगीतांच्या माध्यमातून त्यांच्यात सामावलेलं आहे. उत्तरेकडची रामलीला असो वा रामानंद सागरचं दूरदर्शनवरचं ’बाणाला बाण जुळून त्यातला एक खाली पडेतो विकट हसणार्‍या राक्षसांचं’ गमतीदार भाबडं रामायण.  या सगळ्यामध्ये सामाईक काय आहे तर रामायणातली आदर्श भारतीय मूल्य आणि त्याभोवती रूजून फुलत गेलेली संस्कृती. 

जम्मूच्या रघुनाथंदिरापासून रामेश्वरम् पर्यंतचे उभे आणि सोमनाथ ते वैद्यनाथ ज्योतिर्लिंगांचे आडवे असे श्रद्धेचे धागे एकत्र गुंफून भारत नावाचं महावस्त्र विणलं गेलं आहे अशा अर्थाचं एक वाक्य वाचलेलं आठवतंय. बनारस -प्रयागराज- अयोध्या प्रवासामुळे त्यातल्याच एका जरतारी धाग्याला स्पर्श करता आला. 

आवरून चेक आऊट करून आम्ही १२ आणि आमची लाडकी ९७११ अयोध्येकडे निघालो. आमचा भडकू चालक एव्हाना आम्हाला आणि आम्ही त्याला सरावलो आणि एकत्र नांदू लागलो होतो. मस्तपैकी अंताक्षरी खेळलो. (त्याच्याबरोबर नव्हे) ह आल्यावर मावशी ’हरीच्या घरी एक रंगीत काठी’ वगैरे म्हणणार आणि मी उषा उत्थुपचं ’हरी ओम हरी’ असा विजोड प्रकार होऊ नये म्हणून श्लोक बिक चालणार नाही ही अट घातली. जिथे ’ शिवतांडव स्तोत्रं’ वगैरे म्हटली तिथे बिचार्‍या मावशीला ’अखियोंसे गोली मारे लडकी कमाल रे’ वगैरे ऐकून मनात ’शिव शिव’ म्हणावं लागत असणार. जिजाजी मधूनच ठेवणीतली जुनी गाणी काढत होते. मामी, रोहिणीताई, स्वातीवहिनी तयारीत होत्या.आम्हा मर्त्य जीवांकडे दयार्द्र कटाक्ष टाकून दादा स्वप्ननगरीत गेला होता. मामा ठरलेलं अक्षर विसरून भलतीच गाणी सुचवत असला तरी पक्का खेळाडू होता. मिलींदला जगात एकच चाल येत असल्याने त्याने कोणतंही गाणं सुचवलं तर आधी ते गाणं ओळखून मग मूळ चालीत गायचं अशी सर्कस करत भेंड्या लावायला मजा आली. गाणी, गप्पा आणि खाणं यात केव्हा अयोध्येत शिरलो कळलंच नाही. 

अयोध्या गाव लहानसं वाटलं. इमारती, रस्ते, हॉटेल्स, टुमदार घरं सगळं स्वच्छ, चकाचक आणि नव्याने वसवलेलं वाटत होतं. मनुनिर्मित नगरी आता मोदीनिर्मित नगरी झाल्याचं स्पष्ट दिसत होतं. अर्थात प्रयागराजला जागोजागी झळकणारे मोदी-योगी इथे एकाही फलकावर दिसले नाहीत. 

शब्दामृतने ’पंचशील’ या हॉटेलला बुकींग केलं होतं. सवयीने हॉटेलची वेबसाईट लॅपटॉपवर पाहिली. त्यात पंचशील स्पेलिंगचा शेवटचा एल बहुतेक फॉन्ट साईज अ‍ॅडजस्ट न झाल्याने एकटाच तिसर्‍या ओळीत लटकताना पाहून हॉटेलचा एकूण आनंद असणार असं वाटलं होतं. पण हॉटेल एकदम मस्त लग्झरियस निघालं. इथलं जेवण सुद्धा उत्तम होतं अर्थात बनारसला खाण्याचा जो उत्साह होता तो सतत कचोर्‍या, छोले, पनीर, नान, सूप, ज्यूस, लस्सी पाहून कमी झाला होता आणि 'उदरभरण नोहे..' वर गाडी आली होती. इकिगाईने एका वेळेला भुकेच्या ८० % च खावं असं सांगितल्याचंही आता आठवू लागलं होतं. तर समोर वाढलं ते खानपान आटोपून शरयूतीरी निघालो. 

हंपीचा अपवाद वगळला तर फिरायला जाण्य़ापूर्वी तिथे नदी, तळं, समुद्र असा काहीतरी जलस्रोत आहे ना याची नेहमीच खात्री करते. इथे  तर गंगा-यमुना आणि आता शरयू नदी. You never touch the same river again असं म्हणतात या अर्थाने रामस्पर्श झालेली शरयू आज नसणार पण रामाचं सान्निध्य लाभलेली शरयू तर तीच आहे. ज्येष्ठ स्नेही श्रीपादजी कोठे यांच्या 'नदी' कवितेतल्या काही आवडलेल्या ओळी, रामायणातल्या उलथापालथींना साक्ष असलेल्या शरयूचीच रूपं आहेत असं वाटतं. 

किती खेळली इथे पाऊले किती नांदली इथे राऊळे 

किती पिढ्यांची किती युगांची इथे दाटली किती वादळे

कधी नर्मदा कधी गोदा तू कधी तू कृष्णा, सरस्वती तू 

भगीरथाच्या कर्तृत्वाची शिव जटेतील गंगाही तू

कृष्णसख्याची होते यमुना रामासाठी शरयू जीवन 

विठ्ठलपायी गिरकी घेता भीमा होते पतीत पावन

कुठे आरती मानसपूजा कुठे भक्तीची पवित्र धारा 

कुठे तुझ्यातच मिळून जातो काजळकाळा कृतघ्नपारा

सांजघडीची पायवाट तू चराचराचा आर्त नाद तू 

देवाघरची भाग्यशलाका पृथ्वीवरली सार्थकता तू

शरयूतीरी आम्ही पोचलो तेव्हा आरतीची तयारी सुरू होती. गंगाआरतीसारखीच यथासांग आणि नेत्रदीपक आरती झाली. रोषणाई केलेल्या कमानींखाली रेशमी पिवळ्या,केशरी पोशाखात उभ्या असलेल्या पुजार्‍यांच्या हस्ते. झगमगत्या दीपमाळा उंचावत लयबद्ध तालबद्ध. गंगाआरतीचा थाट, तशी अफाट गर्दी मात्र इथे अजिबात नव्हती आणि पात्रातून आरती अनुभवण्याची सोयही. तरीही त्या गार वार्‍यात, अंधारात चमचमणार्‍या ज्योतींनी ओवाळली जाणारी शरयूमाता बघत राहावी असं वाटलं. हे ’इव्हेंट’ पर्यटनाला चालना देण्यासाठी असले तरी फार सुंदर सादर केले जातायत. स्वच्छ काठावरच्या स्वच्छतागृहांपैकी एकावर ’for Transgenders only' अशी पाटी पाहून ’भारत बदल रहा है’ याची चुणूक दिसली. 

बाहेर पडताना रंगीत प्रकाशझोतांमध्ये न्हाऊन निघालेल्या ’रामजी की पैडी’ चं सुंदर दृश्य दिसलं. श्रीराम इथूनच शरयूस्नानासाठी जात या मान्यतेनुसार शरयूतीरावरच्या घाटांच्या रांगेला ’रामजी की पैडी’ नाव दिलेलं आहे. सगळे एकत्र जमेतो पैडीवरची वर्दळ बघत राहिले.  

इ-रिक्शांनी परत निघालो. प्रशस्त ’धर्ममार्ग’ पार करताना दुतर्फा रामायणातल्या मह्त्वाच्या घटनांवर आधारित म्युरल्स चितारलेली दिसली. आपल्याकडे भिंती, फ्लायओव्हर खाली जी बटबटीत चित्रं काढतात त्या तुलनेने ही फारच दर्जेदार आहेत. वाटेत ’भारतरत्न लता मंगेशकर’ चौकात सरस्वतीच्या वीणेची प्रतिकृती स्थापन केलेली दिसली. 

’पंचशील’ मध्ये सुग्रास जेवून (80 %) आपापल्या खोलीकडे निघणार तोच आयोजकांनी एका व्याख्यानाची घोषणा करत श्री, व सौ. आफळे यांना मंचावर आमंत्रित केलं. मऊ गादी बोलावत असल्याने क्षणभर वैताग आला, त्यात परतीच्या रेल्वेचं काही खरं दिसत नसल्याने मिलींदच्या मदतीने हवाईमार्गाचे पर्याय शोधायचे होते. पण आफळयांकडून ’राम मंदिर निर्माणाचा प्रवास’ ऐकल्यावर अयोध्या ट्रीप सार्थकी लागली असं वाटलं. मटेरियल मॅनेजमेंटचे आयआयटीयन पुण्याचे डॉ. जगदीश आफळे श्रीराम जन्मभूमी न्यासाने नियुक्त केलेले प्रमुख प्रकल्प व्यवस्थापक म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांची पत्नी माधुरी यादेखील मंदिर शिल्पकलातज्ञ आहेत. सध्या त्या मंदिराचा ’देणगी विभाग’ सांभाळतात. या आधी तीन वर्ष हे दांपत्य अमेरिकेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विस्तारक म्हणून कार्यरत होतं. आफळे यांना देश-परदेशातील मोठ्या बांधकाम प्रकल्प उभारणीचा प्रदीर्घ अनुभव आहे. 

आता हा पावणेतीन एकरात पसरलेला विशाल प्रकल्प.  ३६० फूट उंच आणि २६५ फूट रूंद श्रीराममंदिर तर साकार झालं. संकल्पित योजनेनुसार मंदिराचे ३९४ खांब, १२ दरवाजे. गूढ मंडप, रंगमंडप, नृत्य मंडप, प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप असे पाच मंडप, सीता व अन्य देवतांची मंदिरे त्यांच्या देखरेखीखाली पूर्णत्वाला जात आहेत. प्रत्येक खांबावर १२ ते १६ मूर्ती आहेत आणि एक मूर्ती घडवायला कारागिरांना १५ दिवस लागतात. हजार वर्ष टिकेल या गुणवत्तेचं व दर्जाचं मंदिर तयार करण्याचा संकल्प असल्याने  या सगळ्यासाठी किमान अडीच वर्ष अजून लागणार आहेत. मंदिर उभारणीला एल अ‍ॅंड टी सारख्या कंपन्या, सीबीआरआय, एनजीआरआय सारख्या संस्था, अनेक आयआयटीयन्सनी मोलाची मदत केल्याचं त्यांनी नम्रपणे सांगितलं. रामलल्लाच्या प्रकाशतिलकामागची lens ची वैज्ञानिक करामत उलगडली. निर्माण कार्यात आलेल्या अडचणी कशा सोडवत गेले ते ही सांगितलं. पहिल्याच पावसात मंदिर गळत असल्याच्या बिनबुडाच्या आरोपाचाही संयतपणे समाचार घेतला. ’मी’ आणि ’मोदीजी’ किंवा मी आणि ’योगीजी’ किंवा माझे कर्तृत्व असा उल्लेख त्यांनी एकदाही केला नाही. 

मातीत हात घातल्याशिवाय शेतीवर बोलू नये पण आफळे १९९२ च्या कारसेवेत स्वत: सहभागी होते. साहजिक १६ व्या शतका्त बाबराने केलेल्या रामजन्मभूमी विध्वंसापासून न्याय्य मार्गाने मंदिरनिर्मितीपर्यंतचा प्रवास त्यांनी भावुकपणे कथन केला. मुघल आक्रमकांकडून जन्मभूमी परत मिळवण्यासाठी हिंदूंनी लढलेली अनेक लहानमोठी युद्ध, संघर्ष, हिंदू धर्म टिकवण्यात शिखांनी दिलेलं योगदान याचा त्यांनी थोडक्यात आढावा घेतला. कंबोडिया, थायलंड, त्रिनिनाद ते इस्लामाबाद जवळच्या सैदपूर पर्यंत पसरलेली राममंदिरं ’रामाच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करणार्‍यांना किमान ’राम’ ही संकल्पना अस्तित्वात असल्याचा आणि प्राचीन असल्याचा पुरावा देतात. तरीही रामाचा जन्म अयोध्येतच झाला याचा आजच्या कायद्याच्या चौकटीतला पुरावा उपलब्ध नाही. परंतु धार्मिक ग्रंथातले अनेक संदर्भ व मुख्यत:  गुरुनानकजींनी रामजन्मभूमी दर्शनासाठी १५१०-११ मध्ये अयोध्या यात्रा केल्याचा उल्लेख यावरून तिथे रामजन्मभूमी मानल्या जाणार्‍या स्थळाचं अस्तित्व न्यायालयाने मान्य केलं. 

आफळे यांना ऐकताना ५०० वर्ष  देशभराने आस्थेचं प्रतीक मानलेला श्रीराम आपल्याच जन्मभूमीत कसा निर्वासितासारखा राहिला याची तीव्रता जाणवली. त्याच्या स्वगृही प्रतिष्ठापनेसाठी जीवाच्या आकांताने वर्षानुवर्षे धडपडणार्‍या कार्यकर्त्यांना-कारसेवकांना खच्ची करणार्‍यांना, ’मंदिर वही बनायेंगे’ ची टर उडवणार्‍यांना रामजन्मभूमी खटल्यात संवैधानिक मार्गाने मिळालेला न्याय ही खरी चपराक आहे.

आफळे बोलणं थांबवून ’प्रश्न विचारु शकता’ म्हणाले. अद्भुत काही अनुभवल्यानंतर एक तर बोलून तो अनुभव डहळवू नये. बोलायचंच असेल तर त्याला वर्ख लावता यावा. पण काही जणांनी ’मंदिरात जायला गेटपासून किती वेळ लागेल’ असले वर्‍हाडी भाषेत ’मॅटावानी’ प्रश्न विचारायला सुरूवात केल्यावर आफळे यांना भेटायची इच्छा असूनही आम्ही उठलो. शिवाय पहाटे उठून रामलल्लाचं दर्शन घ्यायचं होतं. मामेभाऊ कौस्तुभ तिथे मंदिर लोकार्पणापर्यंत गाभारा प्रमुख म्हणून कार्यरत होता. त्याच्याशी मामाचं बोलणं झाल्याने त्याने आम्हाला सकाळी सहा वाजेच्या शृंगार आरतीला उपस्थित राहण्याची दुर्लभ संधी सहज मिळवून दिली. 

पहाटे शुचिर्भूत होऊन आम्ही मंदिराकडे निघालो. आमच्या चालकाने आम्हाला मंदिराजवळच्या रिक्षास्थानकापाशी सोडलं. एकच रिक्षा असल्याने पुन्हा लहान होत अक्षरश: मामाच्या मांडीवर बसून मंदिरापाशी पोचले. इथले बहुसंख्य रिक्षाचालक मुस्लीम आहेत. हिंदूंबरोबरच अनेक स्थानिक मुस्लीमांच्या हाताला राममंदिरामुळे काम मिळालं आहे.

सकाळचे सव्वापाच वाजले असतील. उतरून पाहते तो साधेसे प्रवेशद्वार, सुरक्षारक्षक, कर्मचार्‍यांची गडबड. लख्ख स्वच्छता. रस्त्यावर लहान लहान पक्की दुकानं दिवे लावून विक्रीच्या तयारीत असलेली. रीतीप्रमाणे श्रीरामाचा तिलक लावून घेतला. प्रशस्त ऑफीसमध्ये मोबाईल जमा केले. मावशीसाठी व्हीलचेअर ठरवली. अडीचशेपैकी दर ५० मीटरवरच्या तंबूत आमच्या आरती पास, आधारकार्ड वगैरे कागदपत्रांची तपासणी होत होती. आमच्या आग्रहामुळे व्हीलचेअरवर (भयंकर संकोचून) बसलेली मावशी ’एवढं मी सहज चालले असते’ असं पुन्हा पुन्हा  म्हणत होती. मामा, मामी, ताई, दादा वेगळ्या मार्गाने पुढे सरकत होते. मावशीसकट व्हीलचेअर ढकलणारा व त्याच्यामुळे मी मधल्या अंतरात धावत होतो. वेगामुळे हलकं वाटत असणार आणि लवकर पोचलो तर पुढची फेरी मिळायची आशा असणार. एकीकडे मी त्याची शब्दश: धावती मुलाखत घेत होते. त्याने आय-कार्ड लावलं असूनही तुम्हारा नाम क्या है बसंती, रोज सरासरी किती दर्शनार्थी येतात, तुम्ही किती फेर्‍या करता, आधी काय करायचे वगैरे. मंदिराजवळ चपला काढल्या, हरवलो तर तिथे भेटू इ. ठरवलं होतं. स्वच्छ मार्गिका आणि चोख बंदोबस्त होता. यहा परिंदा भी पर नही मार सकता म्हणावे इतका.

आता मुख्य मंदिर दृष्टीपथात आलं. टीव्हीवर लोकार्पण सोहळ्यात पाहिलं होतं तसंच बदामी रंगाचं, रेखीव, कोरीव, सुघड आणि भव्य. रँपवरून धावत आम्ही गाभार्‍याकडे गेलो. आत अन्य दर्शनार्थी आरतीची प्रतीक्षा करत उभे होते. जातीचा उल्लेख गरजेचा नसलेले, हिंदू या एकाच नात्याने जोडलेले. भारताच्या किंवा जगाच्याही कानाकोपर्‍यातून आलेले. सगळे शांतपणे उभे होते. योग्य जागा पकडून मंदिराचे कोरीव खांब, अप्रतिम छत, प्रकाशरचना बघेतो सहा वाजले. गाभार्‍याचा रेशमी पडदा हळूहळू सरकला आणि हसर्‍या राजस सावळ्या रामचंद्राचे दर्शन होताच हात जोडून सर्वांनी एकमुखाने ’जय श्रीराम’ म्हटलं. मूर्तीच्या पायथ्याशी आजवर तंबूत ठेवलेल्या मूळ मूर्ती स्थापित आहेत. दर्शन घेताना स्वत:च्याही नकळत डोळ्यात पाणी आलं. कुणाचं कारण धार्मिक असेल, कुणाचं भावनिक, कुणाला कारसेवेची परिणती पाहून भरून आलं असेल तर कुणाच्या डोळ्यात पराभूत मानसिकतेतून बाहेर येऊन सन्मानाचं प्रतीक पाह्ण्यातला आनंद झरत असेल. मावशी ओल्या डोळ्यांनी स्तोत्र म्हणत होती.

वाद्याच्या गजरात आरती सुरु झाली. दोन पुजारी दोन्ही बाजूनी चवर्‍या ढाळत होते. षोडशोपचारे पूजा, आरती होताच तीर्थ प्रसाद वाटण्यात आला. आरती फिरवली. पुन्हा रामनामाचा गजर झाला आणि मूर्तीकडे पुन्हा पुन्हा पाहत आम्ही बाहेर पडलो. आरतीचं शूटींग दररोज दूरदर्शनवर प्रक्षेपित होत असल्याने उद्याच्या दर्शनयादीत असलेल्या आमच्या टीममधल्या अर्ध्या मंडळींना मामा मामीचा फोटो कौस्तुभकडून आधीच पोचला होता. 

बाकी सगळे वेगळ्या मार्गाने बाहेर पडणार असल्याने प्रसाद खिडकीशी जाऊन मी सगळ्यांसाठी प्रसाद मागितला तेव्हा तिथला कर्मचारी म्हणाला ,’अपने हाथोंसे ले तो ही वो प्रशाद है’ पण मग दिला त्याने. पंचशीलला उतरताना आमच्या मुस्लीम चालकाने वेळेवर मंदिरालगत पोचवल्याबद्दल त्याला धन्यवाद देताना मावशी मनापासून म्हणाली, ’अल्ला तुमको बहुत आशीर्वाद देगा’.

अयोध्या रक्षणासाठी हनुमानाचे इथे वास्तव्य होते अशी मान्यता असलेल्या हनुमानगढीला मला जाता येणार नव्हते. कनकभवन यादीत नव्हतं. राणी कैकेयीने सीतेला, रामाशी विवाह झाल्यानंतर हे भवन भेट दिलं असं मानलं जातं. बाकी मंडळी नंतर हनुमानगढीला गेली पण प्रचंड गर्दीमुळे बाहेरूनच नमस्कार करून त्यांना परतावं लागलं. आता संध्याकाळी सूर्यकुंड आणि तिथला लेझर शो पाहायचा होता पण अयोध्या-अहमदाबाद विमानाचं ऐनवेळी तिकिट मिळालं त्याची वेळ आधीची असल्याने ते शक्य झालं नाही. 

Ayodya Airport

अयोध्या विमानतळ छोटंसं टुमदार, बदामी रंगाचं. रचना बाहेरून एखाद्या मंदिरासारखीच. चेक इनच्या रांगेत दादा व माझ्यामागे एक कमंडलूवाले साधुबुवा, एक भगवं पागोटेवाले काका, त्यांच्यामागे एक मुस्लीम कुटुंब ,एक सेना अधिकारी, एक आठ्यायुक्त स्कर्टबाला. जिकडे तिकडे चिकार गर्दी. फारच घरगुती वातावरण होतं. आधुनिक एसटी स्थानकच. विमान सुटायची वेळ आली तरी लोक कुठेही हिंडत होते. तरूण चटपटीत क्रू पुकारा करून करून थकून जात होता.  

आफळे म्हणाले त्यानुसार सगळं मंदिर संकुल अडीच वर्षात पूर्ण होईल. तेव्हा मुलं आणि महेशसह पुन्हा यायचा विचार टेक ऑफ आधी बकेट लिस्टमध्ये टाकला. भारत म्हणजे बैरागी, गारूडी, हत्तींचा गचाळ देश ही प्रतिमा अस्पष्ट झाली असली तरी नष्ट नाही. या कात टाकलेल्या स्पिरिच्युअल टुरिझम मुळे मात्र ती बरीचशी पुसली जाईल. मंदिर लोकार्पणाच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतल्या अफाट आगामी प्रकल्पांबद्दल वाचलं. हॉस्पीटलपासून मनोरंजन नगरी ते विद्यापीठापर्यंत त्यात इतकं काही आहे की धार्मिक आस्था आणि अस्मितेबरोबरच किंवा त्यापलिकडे 'राममंदिर हवं कशाला' याचं उत्तर शोधलं तर सहज मिळेल. तरीही काही आपपरभाव मनात उरत असेल तर रामलल्लाचं दर्शन घ्यावं आणि त्या निर्व्याज हास्यात किंतुपरंतु विरून जाण्याची प्रचिती घ्यावी

Wednesday, January 8, 2025

तीर्थराज प्रयाग

बनारसच्या ’स्क्वेअर इन’ हॉटेलमध्ये जेवून सामान बांधून प्रयागराजला निघायचं होतं. बरेच जर्मन पर्यटक आल्याने हॉटेल गजबजलं होतं. आपापल्या पर्सेस जवळ ठेवायच्या आणि मोठ्या बॅग खोलीबाहेर काढून ठेवायच्या अशा स्पष्ट सूचना असूनही ईश्वरकाकांनी आपली महत्वाची सॅक मोठ्या बँगांवर ठेवून दिली. ती कोणत्या गाडीच्या डिकीत गेली हे शोधायला कासावीस झालेले ईश्वरकाका आणि त्यांना वैतागलेल्या शिलेदारांनी प्रयागच्या रस्त्यावर सुसाट निघालेल्या आमच्या दोन्ही गाडया थांबवून शोधमोहीम सुरु केली. 

हे कमी की काय म्हणून एका जर्मनबुवांची बॅगही हॉटेल क्रूच्या चुकीने आमच्या सामानात शिरली होती. सगळ्या बॅगांची उचकपाचक झाल्यावर जर्मन बुवांनी त्यांची बॅग व्हिडिओ कॉलवर शांतपणे ओळखली. ते विमानतळावर पोचले कि निघाले, मग तोवर ही बॅग पोचेल का आणि नाही पोचली तर त्यांचं भारताविषयी काय मत होईल याची मला चिंता पडली. इतक्यात हॉटेलचा मॅनेजर हमारे गाडी का पीछा करते हुए पोचला आणि एकदाची ती बॅग घेऊन गेला. झाले, एव्हाना प्रवासात ध्येय नसलेली काही मंडळी बॅग व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञ होऊन ग्रुपवर सल्ले लिहू लागली. मध्येच एका काकांनी ’१ जानेवारी’ कसा ’आपला’ नववर्ष दिन नाही’ अशी असंबद्ध आणि बूमर्सच्या आवडीची पोस्ट टाकली. मिलींद त्यांना "एरवी ज्या कॅलेंडरनुसार जगता ते आता का म्हणून आपले नाही, आँ!’ टाईप प्रतिप्रश्न करू लागला. हा ट्रॅक सोडून काहीजण भलत्याच पोस्ट टाकू लागले. बॅग हरवेतो सगळं फारच सुरळीत सुरु असल्याने मला कसंसंच होत होतं. आता कशी ट्रीपला रंगत आली. एरवी रस्त्यावरचं वगैरे न खाणार्‍या आणि ’मॅन ऑफ फ्यु वर्ड्स’ असणार्‍या किंवा आमच्या (आदरार्थी एकवचन) वटवटीमुळे बोलायची संधी न मिळणार्‍या विवेकदादाने पण उत्साहित होऊन चक्क रस्त्यालगतच्या धूळभरल्या टपरीत सरसोंच्या तेलात तळली जाणारी मस्तपैकी अनहायजिनीक गरमागरम भजी विकत आणली. त्यांची चव काही और होती.

प्रयागराजच्या वाटेवर जी खेडी, लहान गावं लागली ती ’लापता लेडिज’ मधल्या नायिकेसारखी. साधी ,भोळी, नीटनेटकी पण स्वत:च वैशिष्ट्यपूर्ण ग्रामीण रूपडं असलेली. यूपी म्हणजे बकाल हा समज दूर करणारी. राजकारण्यांचे फलक मात्र जागोजागी त्यामानाने ब्रँडच्या जाहिराती अगदी कमी. दक्षिणेत दिसणारी हिरवाई मात्र इकडे फारशी नाही. 

प्रयागराज म्हणजे पूर्वीचं अलाहाबाद. इथल्या क्लाइव्ह रस्त्यावर अमिताभचं जन्मस्थान आणि हरिवंशरायजींचं कर्मस्थान. दिल्लीला जाईतो ८, १० वर्ष त्यांचं प्रयागला म्हणजे तेव्हाच्या अलाहाबादला वास्तव्य होतं हे वाचलं होतं. अमिताभ काहीच्या काही आवडत असल्याने उगाचच ते घर पाहायची इच्छा होती पण ते भाड्याचं होतं, आता तिथे काही खुणा नाहीत म्हणे. नेहरू घराण्याचं आनंद/ स्वराज भवन इंदिरा गांधींनी कॉंग्रेस पक्षाला देऊन टाकलंय. त्यामुळे प्रयागबद्दल उत्सुकता होती ती फक्त त्रिवेणी संगमाविषयी. शहराची रचना बरीचशी नागपूरसारखी वाटली. पुलावरून शहरात शिरताना आगामी कुंभमेळ्यासाठी नैनी भागात वसवलेली विस्तीर्ण टेंट सिटी दिसली. साध्या तंबूंपासून आयआरसीटीसीच्या दिवसाला तब्बल वीसहजार रू. चार्ज करणार्‍या राजेशाही तंबूंपर्यंत कित्येक निवास प्रकारांचा यात समावेश असणार. नजरेत भरेल अशी स्वच्छता होती. जागोजागी कुंभमेळ्याचं महत्व सांगणार्‍या, प्रयागला येण्याचं आवाहन करणार्‍या फलकांवर योगी-मोदी जोडीनं झळकत होते. एकूण कुंभमेळ्याची जय्यत तयारी सुरु होती. 

’रामा कॉंटीनेंटल’ हॉटेलला पोचलो. विमानतळावर क्न्व्हेयर बेल्टकडे सगळे टक लावून पाहत उभे असतात तसं आम्ही पण मेरीवाली बॅगची प्रतीक्षा करत उभे होतो. आधी आपापल्या बॅग ताब्यात घेऊन चेक-इन केलं. हॉटेल बनारसपेक्षा बरंच मोठं आणि पॉश होतं. रिसेप्शनीस्ट इतकी चुणचुणीत आणि गोड होती की एखादी तक्रार करायला कुणी आलंच तर कशाला आलोय तेच विसरून जात असावं. थोडा आराम करून हाय-टी घेतला. खोडरबरासारखे लागणारे पनीरचे ठोकळे अळणी बेसनात बुडवून नुसतेच तळले होते. बाकी स्प्रेड चवदार असला तरी बनारसच्या स्क्वेअर इनचे फूड पहली पायदान वरच. 

थंडीचा जामानिमा करून ’अमर शहीद चंद्रशेखर आझाद पार्क’ मध्ये गेलो. पार्कमधून आत शिरताना उजव्या भागात महापालिकेचे ४ मोठाले पेटारे ठेवले होते. जुनी पादत्राणे, वस्तू, कपडे इ. साठी हे वेगवेगळे पेटारे होते. हल्ली बर्‍याच गावात ’माणुसकीची भिंत’ असते तसा प्रकार. समोरच मिशीला पीळ देणार्‍या देखण्या आझादांचा पूर्णाकृती पुतळा होता. त्यांचा दुसरा हात पाठीमागे आहे आणि त्यात पिस्तुल आहे. मागे एक प्रचंड मोठं झाड आहे. प्रिन्स आल्फ्रेडने या शहराला भेट दिली होती याची आठवण म्हणून १८७० मध्ये हे उद्द्यान निर्माण करण्यात आलं. १९३१ मध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीदरम्यान चंद्रशेखर आझाद ब्रिटीश पोलिसांच्या तावडीत सापडले. त्यांच्या हाती लागण्यापेक्षा त्यांनी इथे स्वत:वर गोळी झाडून आत्मबलिदानाचा मार्ग पत्करला. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ उत्तर प्रदेश सरकारने त्यांचं नाव या उद्द्यानाला दिलं आहे.
संधीप्रकाशात आझादांच्या आत्मबलिदानाची कथा त्यांच्या पुतळ्याच्या आणि त्या झाडाच्या साक्षीने पार्थकडून ऐकली. नेहरूंचं सहकार्य नसलं तरी कमला नेहरूंनी पुढाकार घेऊन आझादांचे विधीवत अंत्यसंस्कार करायला मदत केली ही पार्थकडून कळलेली माहिती विस्मयजनक वाटली. त्यांनी मुग्धा वैशंपायनसह तिथे ’वंदे मातरम्’ म्हणायचं आवाहन केलं. भारावलेल्या मनस्थितीत आझादांच्या पुतळ्याकडे पाहत एका सुरात ’वंदे मातरम्’ म्हणताना या सगळ्याच क्रांतीकारकांबद्द्ल फार फार कृतज्ञ वाटलं आणि स्वत:बद्द्ल फार खुजं देखील. 

पार्क मध्ये दिवेलागण झाली. देखाव्यासाठी केलेल्या पारदर्शक जनावरांच्या अंगातून फ्लुरोसंट लाईट सोडलेले असल्याने पार्क आकर्षक दिसत होतं. इथून आमची सगळी गाठोडी जवळच्या एका झकास हॉटेलला पोचवण्यात आली, इथे पार्थचं रामायण आणि मुग्धाचं गाणं असा कार्यक्रम होता तो ही लॉनवर, साडेसहा डिग्रीमध्ये. हीव भरल्याने ’सेहतू बाहांधा रेहे साहागरी’ असं गायची वेळ मुग्धावर येईल असं वाटलं पण ती न शहारता आरामात गात होती. 

दुसर्‍या दिवशी भल्या पहाटे, शब्दामृतच्या भाषेत शुचिर्भूत होऊन आम्ही प्रयाग संगमासाठीनिघालो. गारठलेल्या अवस्थेत संगमाकडे निघण्य़ाआधी खाली शेगडी,त्यावर अ‍ॅल्युमिनीयमची किट्ली घेऊन फिरणारा चहावाला देवदूतासारखा भेटला. किटलीसारख्या तोंडून वाफा निघत होत्या.
पाण्यात पुठ्ठा बुडवल्यासारखा बेचव चहा पण गरम असल्याने हवासा वाटत होता. पार्किंगमध्ये तुरळक गर्दी होती तरीही आमचे शिलेदार नेहमीप्रमाणे पताका घेऊन पुढे चालत होते. कपड्यांचे चार पाच थर घालून आम्ही त्यांच्या मागे.


गाडी पार्किंगलगतच्या ’लेटे हुए हनुमानजीं’चं आधी दर्शन घेतलं. लंकेवर विजय मिळवल्यानंतर हनुमानजी थकले होते आणि त्यांनी इथे विश्रांती घेतली होती अशी मान्यता आहे. हे मंदिर किमान ६००-७०० वर्षे जुनं आहे. हनुमानजींची दक्षिणाभिमुख मूर्ती २० फूट लांब आहे. संगमस्नानाला या दर्शनाविना पूर्णत्व नाही असं म्हणतात. आम्ही गेलो तेव्हा बाहेर बराचसा अंधार पण आत प्रखर दिवे होते. गर्दी नव्हती. कुंभमेळ्यात हेच दर्शन गर्दीमुळे बहुसंख्य लोकांना दुरापास्त झालं होतं. 

संगमाकडे चालत निघालो. उजव्या हाताला भक्कम बांधणीचा भलाथोरला अलाहाबाद किंवा अकबर किल्ला आहे. त्याची दुसरी बाजू थेट यमुनेच्या किनार्‍यावर आहे. या जागेचं भू-राजकीय महत्व लक्षात घेऊन मुघल सम्राट अकबराने १५८३ मध्ये इथे हा किल्ला बांधला. बांधणीचा खर्च सव्वा सहा कोटी आला असं म्हणतात. इतिहासकार विलियम फिंचच्या नोंदीनुसार किल्ला पूर्ण व्हायला ४० वर्ष लागली. तोवर अकबर मृत्यु पावला. किल्ल्याच्या परिघावरून अकबराच्या तत्कालिन अफाट सांपत्तिक आणि राजकीय ताकदीचा अंदाज येतो. सलीम ऊर्फ जहांगीर १६०५ मध्ये मुघल सम्राट होण्यापूर्वी काही वर्ष इथे किल्ल्याचा सुभेदार म्हणून राहिला होता. १७६५ मध्ये किल्ला बंगालचा नवाब शुजा-उददौलाला विकण्यात आला. १७९८ मध्ये तह झाला आणि किल्ला पुन्हा इंग्रजांच्या ताब्यात आला. स्वातंत्र्यानंतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने आता त्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून वर्गीकृत केलं आहे. 

या किल्ल्याच्या आत चांदी आणि तांब्याची नाणी पाडणारी टांकसाळ होती, जहाजबांधणी होत होती. किल्ल्यात जनानी महल, शाही हरम असे बरेच भाग होते. जतन व्हावा म्हणून आता थोडाच भाग पर्यटकांना बघायला खुला आहे. जेवढा बघता येतो त्या भिंतींना जाळी लावलेली असल्याने बदाम, बाण, I love you Sangita, जोडो के दर्द की दवा.. वगैरे मजकुर सुदैवाने नव्हता. किल्ल्याचा काही भाग भारतीय सैन्यासाठी राखीव आहे. इथे आता एक पाताळपुरी मंदिर आहे. मला ते काहीसं कृत्रिम आणि बटबटीत वाटलं. मंदिरातील काही प्राचीन मूर्ती ऑईलपेंटने रंगवल्याने कशाशाच दिसत होत्या. 

इथला ३०० वर्ष जुना, दहा मीटर घेराचा प्रसिद्ध ’अक्षय वट’ पाहिला. ह्युएनत्संगच्या प्रवास नोंदींमध्ये याचा उल्लेख आहे. पृथ्वी प्रलयात बुडाली तरी हा वृक्ष अक्षय राहतो. याच्या पानावर ईश्वर बालरूपात राहून सृष्टीचं पालन करतो अशी पौराणिक आख्यायिका तिथे लिहिलेली आहे. किल्ला परिसरात इतरत्रही बरीच  वडाची झाडं असली तरी अक्षयवटाला विशेष मह्त्व आहे. अंदमान जेलमधल्या लाईट-साऊंड शो मध्ये अशाच एका पुरातन वटवृक्षाने ’ओम पुरी’ च्या आवाजात स्वातंत्र्य-आंदोलनाची गाथा ऐकवली होती त्याची आठवण झाली. अक्षय वटाकडे सांगण्यासारखं किती असेल ! अकबराच्या काळापासून किती उलथापालथी या वृक्षाने पाहिल्या असतील! आता हे लिहीत असताना यंदाच्या महाकुंभमेळ्यात मौनी अमावस्येला झालेली दुर्घटना आठवली. असं काही पाहताना त्याला त्याच्या अक्षयत्वाचा गौरव न वाटता कदाचित ओझं वाटत असेल. 

“ग्रहाणां च यथा सूर्यो नक्षत्राणां यथा शशी। तीर्थानामुत्तमं तीर्थे प्रयागाख्यमनुत्तमम्।” असं श्रेष्ठत्व असलेल्या प्रयाग संगमाच्या किनार्‍यापाशी पोचलो. गंगा, यमुना आणि अदृश्य किंवा लुप्त झालेली सरस्वती या तीन नद्यांचा संगम असलेलं हे स्थान. धुक्यात वेढलेला रस्ता धूसर पण अगदी स्वच्छ दिसत होता. जागोजागी कचरापेट्या ठेवलेल्या होत्या. किनार्‍यावर वाळूच्या पोत्यांना एकमेकांजवळ घट्ट बांधून घाटपायरीवजा रचना केली होती. संगमापाशी घेऊन जाणारे नाविक तयारच होते. एका नावेत दहा जण असे बसलो. सकाळचे साडेपाच वाजले असतील. नदीच्या पाण्यावर चादर घालावी तसं पांढरट धुकं, लांबचे थरथरते दिवे थेंबांच्या फिसकटलेल्या रांगोळीसारखे. सोबतीला थंडगार वाऱ्याच्या झुळुकी. त्याची तमा न बाळगता वल्ही मारणारे दोघे नाविक. आकाश, पाणी सगळं एकाच राखाडी रंगाचं. गंगा-यमुनेच्या पाण्याच्या रंगांमधला फरक न उजाडलेल्या पहाटे दिसणं शक्य नव्हतं पण वेगातला फरक लक्षात आला. खळाळती गंगा आणि संथ वाहणारी यमुनामाई. मीलनरेषेवर नावांना दोर बांधून केलेल्या पाळण्यांसारख्या रचनेत बर्फासारख्या गार पाण्यात काही पुरूषाकृती डुबकी घेत पापक्षालन करवून घेताना दिसल्या. हाडं गोठवणार्‍या थंडीत खोल पाण्यातून रोज नवे प्रवासी वल्हवत आणणारे आणि संगमापाशी नाव थांबवून हे सगळं तटस्थपणे पाहणारे फक्त पोट असलेले नावाडी पाप-पुण्यापलीकडे होते.

सहा डिग्रीची कडाक्याची थंडी मी किंवा ही ही ही म्हणत असल्याने संगमाचं शांतवणारं ओंजळभर पाणी घेऊन काकडलेल्या बोटांनी फक्त डोळ्यांना लावलं. जिणं गंगौघाचं पाणी वगैरे असावं अशी मी कुणी नव्हे त्यामुळे पुण्याची मोजणी आणि पापाची टोचणी अपरिहार्य. पण हे सगळं इथे बोथट होऊन गेलं. बकेट लिस्ट मधली आणखी एक इच्छा किंवा संकल्प पूर्ण झाला याचं समाधान होतं की संगमाच्या नितळ पाण्याच्या स्पर्शाचा आनंद होता माहीत नाही पण तृप्त वाटलं. 

रेल्वे प्रवासात एखादा फेरीवाला बोगीजवळ यावा तसा एक नाविक छोटीशी बोट वल्हवत आमच्या नावेपाशी आला. त्याने ’ए चाय गर्र्म’ म्हणावं असं म्या आसक्त भौतिकवाद्याला वाटत होतं पण हे जग वेगळं होतं. इथल्या आस्था वेगळ्या होत्या. हे स्थान आणि पाणी पापक्षालनासाठी नक्कीच नाही. स्वत:चं खरं प्रतिबिंब बघण्यासाठी असावं. हा गंगाजल विक्रेता होता. ’इस जल को मट्टी नही लगी’ असं म्हणत होता. मट्टी म्हणजे मानवी शरीर, प्रेत. त्याचा स्पर्शही न झालेल्या पाण्याच्या पावित्र्याची तो खात्री देत होता.

तीर्थराज म्हटल्या गेलेल्या प्रयागराजच्या पावित्र्याचं , लाटांचं आणि वर उल्लेख केलेल्या अक्षयवटाचं वर्णन संत तुलसीदासांनी अद्भुत शब्दात केलं आहे. या शब्दांचा अर्थ हे तिन्ही स्वत: पाहिल्याने,अनुभवल्याने आता नीट कळतो आहे.

"संगमु सिंहासनु सुठि सोहा। छत्रु अखयबटु मुनि मनु मोहा।। चवँर जमुन अरु गंग तरंगा। देखि होहिं दुख दारिद भंगा।“

गंगा यमुना सरस्वतीचा संगम हे तीर्थराज (प्रयागचं ) सिंहासन आहे, अक्षयवट वृक्ष त्यावर पाखर धरणारं छत्र आहे.एका बाजूने गंगा आणि दुसरीकडून यमुनेच्या लाटा तीर्थराजाला चवर्‍या ढाळीत आहेत, ज्याला पाहताच सारं दैन्य दुःख दूर होतं. 

|| नमामि गंगे  part 1 ||     बनारस       सारनाथ


#आजोळ_स्पेशल_ट्रिप