Sunday, July 9, 2023

कुलु मनाली - काही नोंदी

.ही ट्रीप दीर जाऊ आणि फॅमिली फ्रेंड जोडप्यासह जूनमध्ये ठरली. नेहमीप्रमाणे घनघोर चर्चा झाली नाही कारण दर्शनने प्लॅन आखून दिला आणि हॉटेल्स व गाडीची व्यवस्था केली होती. तरी दिल्लीदर्शन जताना करायचे की येताना यावर माफक चिवडा झाला. 
चंडीगढपर्यंत रेल्वेने गेलो. इंतहा होगयी इंतजार की म्हणत गाडीची वाट पाहिली. जेमतेम रॉक गार्डन पाहिलं कारण मागे दिल्ली-अमृतसर-चंडीगढ ट्रिप झालेली होती. त्यामुळे रात्रिपर्यंत शिमल्याला पोचलो.


शिमला आणि नैनिताल म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर अंगावर शिवल्यासारखा ड्रेस, डोक्यावर चिमणीचं घरटं आणि हातात बँडमिंटन रॅकेट घेऊन पापण्या पिटपिटवत लाडूक बोलणार्‍या ७०-८० च्या दशकातल्या नट्या येतात. त्या बीए फर्स्ट येऊन माँ के हात का गाजरहलवा खाणार्‍या नायकांसह वादीयांमधून गाणी गात फिरताना आणि त्यांच्या फियाट इकडून तिकडे जाताना दिसतात. 



त्यापेक्षा शिमला वेगळं होतं. भोपळी मिर्चीला शिमला मिर्ची का म्हणत असावेत हा प्रश्न अनुत्तरित राहिला. हॉटेल दरीच्या अगदी कडेवर होतं पण छान होतं. 

माउंटबॅटनचा व्हाईसरॉय निवास पाहिला. आतल्या ब्रिटीश पद्धतीचं फर्निचर, मोठाल्या फ्रेंच विंडो, त्यावर लांबलचक रेशमी पडदे, झुंबरं... नेहरु इथे उन्हाळ्यात मुक्कामी येत असत म्हणे. तिथे आता ............... आहे. बाजूला सुरेख बगिचा आहे. 



दुसर्‍या दिवशी लवकर उठून कुफ्रीला गेलो. वाटेतली दृश्य फार रमणीय होती. कुफ्रीला पोचताच एका खडबडीत जागेजवळ खूप गर्दी दिसली. घोडेवाले आणि पर्यटकांची. चार किमीवरच्या डोंगरावर घोडे जा-ये करत होते. रस्ता दगड-धोंड्यांचा. घोडे फारशी निगा राखलेले वाटत नव्हते. रस्ता त्यांच्या लीदेने भरलेला होता. अरुंद रस्त्यामुळे जाणार्‍यांची येणार्‍यांशी जवळपास टक्कर होत होती. घोडेवाले ओरडत होते. ठेचकाळत वर पोचलो. तिथे आणखी अ‍ॅडव्हेंचर गेम्स होते पण झालं तेवढं पुरे वाटलं. मॅगी खाणे, याकवर बसून फोटो काढणे आणि पर्यटक मोडमध्ये फिरणे एवढं करून खाली उतरलो. येताना ख्राईस्ट चर्च बघून शेवटी मॉल रोडला आलो. तिथे विंडो शॉपींग केलं. आत बसून प्यायल्यास प्रत्येकी पन्नासचा चहा बाहेर उभं राहून पंचवीस रूपयात प्यालो. सटरफटर खाल्लं. भटकून निवांत परत आलो.

आता कसौलला निघालो. रस्त्याने अधूनमधून ट्रॅफिक जाम होईल एवढी गर्दी लागायची. आम्ही पण एका अर्थी त्यात भर घालत असल्याने चूप होतो. पण कंटाळा येत नव्हता , नजर जाईल तिथे झाडी, त्यातून झुळझुळणारी नदी किंवा बाजूने लगडलेली उतारावरची टुमदार वस्ती किंवा तंबू आणि गार हवा. मनिकरण गुरुद्वाराला गेलो. 

पंजाबीत आणि बाजूला इंग्रजीत कथा लिहिलेल्या होत्या, ज्यांनी हे वसवलं त्या गुरुंच्या. अमरावतीला काही काळ शिकलेल्या एका देखण्या जाट मुलाने आम्हाला एक एक पंजाबी वाक्य वाचून कथा समजवून सांगितली. 
तिथल्या भोजनशाळेत प्रसाद घेऊन निघालो. कसौलला मुक्कामी पोचलो.

आता मनालीला निघायचे होते. वाटेत कुलूला राफ्टिंग केलं. बर्फासारखं पाणी आणि बडबड्या नाविक ..पण त्या उसळत्या अथांग पाण्यात राफ्टींग करायला मजा आली. मनालीचे हॉटेल काही केल्या सापडेना. दमलो तेव्हा सापडलं. क्लब हाउस, वशिष्ठ मंदिर आणि प्रसिद्ध हिडिंबा मंदीर पाहिलं. रांग होती मोठी आणि गर्दीही. त्यासमोरच घटोत्कचाचं मंदिर होतं, तिकडे आम्ही सोडून कुणीच गेलं नाही. 
’जब वी मेट’ फेम करीना जिथे ’हा है कोई तो वजह यू जीने का मजा’.. वर नाचते  ते रोहतांग पास पाहायचं आकर्षण होतं. सकाळी लवकर निघालो. चालक म्हणाला इथे बर्फात घालायचे कपडे भाडयाने मिळतात ते घ्या. ते त्याचं सेटिंगचं ठिकाण असावं. त्यतल्या त्यात मापाचे पाहून जंपसूटवजा कपडे भाड्याने घेतले आणि मागच्या डोंगरावरच बर्फाला सुरुवात होईल या भीतीने घातले. तीन तास झाले वर चढतोच आहोत. 

 आमचे ऐन थंडीत उकडलेले बटाटे झाले. बाहेरचं   वळणांवरचं सौंदर्य बघावं वाटेना. काही चुकार   सायकलस्वार चढताना दिसले. एक दोन बायकाही   होत्या त्यात. एकदाचे पोचलो. 

गाडी लावली आणि चपॅक चपॅक करत बर्फात खेळायला गेलो. फार जाड थर नव्ह्ता, काही डोंगर बोडकेच होते त्यामुळे जिथे बर्फ होतं तिथे सगळ्यांची दाटी झाली होती. ज्यांनी खालीच स्कीईंगची तिकीटं काढली त्यांना तो खेळ घेणारे चक्क पाठीमागून लोटत पुढे सरकवत होते. बर्फाला जाडी नसल्याने ते लोक अडखळून बुदकन पडत होते. आमची हसून पुरेवाट होत होती. आम्ही बोजड कपड्यांमुळे जमेल तेवढं बर्फ बर्फ खेळून घेतलं. 
सोलांग व्हॅली आणि अटल टनेल हा प्रवास झकास होता.

अटल टनेल हा हिमाचल प्रदेशातील मनाली आणि लेहला जोडणारा जगातील सर्वात लांब (9 km) महामार्ग बोगदा आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे १०,००० फूट उंचीवर हिमालयाच्या पीर पंजाल पर्वत रांगेत बांधलेला हा बोगदा दुर्गम लाहौल-स्पीति खोऱ्याला जोडणारा एक महत्त्वाचा मार्ग आहे.

एकूणच हिमाचल मध्ये लसावि काढला तर झकास हवेमुळे टवटवीत गोरे लोक, लालचुटूक लिपस्टीक लावलेल्या पहाडी बायका, सफरचंदाच्या बागा, मोठाले गुलाब, खळाळत्या नद्या , उतारावरची घर, हिमस्खलन आणि निसर्गाच्या बदलत्या रूपांना स्वीकारणारे मेहनती लोक, एकमेकांना सांभाळून हॉर्नची कचकच न करता सुळकन गाड्या चालवणारे चालक, प्रत्येक गावात एक मॉल रोड, वातावरणात आल्हाद आणि उत्साह. खायला मॅगी, मोमो तर सगळीकडेच मिळतं पण राजमा, चावल, छोले ,कुलचे आणि पिस्ता-डाळीचं सारण भरलेला तुपात माखलेला सिडू विशेष आवडला. 

सारथ्याचे आभार मानून बसने दिल्लीला परत निघालो तर चालक प्यायलेले होते या संशयावरून आरटीओचे अधिकारी आलेले दिसले. काहीतरी चर्चा किंवा तोडीपानी होऊन निघालो तर जीव मुठीतच धरला होता. येताना दिल्लीत उतरताच कुकरमध्ये शिरल्यासारखं वाटलं. फ्रेश होऊन दिल्ली दर्शनाला निघालो. सरदार चालकाने कुतुबमिनार, इंदिरा गांधी निवास, दिल्लीचे मुख्य रस्ते फिरवले. संसदभवन इ. बाहेरुन पाहिलं. लाल किल्ला पाहिला. मग मध्येच तो म्हणाला- बस इतनाही अब वापस चलो. वादावादी झाली पण तो ऐकत नव्हता ,अखेर आम्ही चाँदनी चौकात उतरलो. वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेत मध्येच गुरुद्वारात मत्था टेकून शेवटी लस्सी पिऊन लाल किल्ल्याच्या मागच्या बाजूने परतलो. प्रचंड घाम, धूळ, उष्णता... हिमाचल प्रदेशाच्या पार्श्वभूमीवर हा फरक जास्तच जाणवला. पण कंपनी मस्त असेल तर एका पॉईंटला त्याचंही काहीच वाटेनासं होतं. 
आता जायचंय ते स्पिती व्हॅलीला....

Friday, July 7, 2023

डिजिटल जोडीदार नावाचं मायाजाल

 


जसवंत नामक तरूण व्हर्च्युअल गर्लर्फ्रेंडच्या चिथावणीवरून ब्रिटनच्या महाराणीच्या हत्येसाठी राजवाड्यात घुसला. (बातमी -फोटोमध्ये) मुळात अशी गर्लर्फ्रेंड हवीच कशाला ! इंटरनेट वापरकर्ते एखाद्या आभासी आयडीच्या इतके आहारी कसे काय जाऊ शकतात ? एका डिजिटल आयडीशी शेअरिंगची इतकी गरज माणसाला का वाटू लागली असेल ? हे इथेच न थांबता लैंगिक विकृतीपर्यंत पोचत असेल तर याला आवर कसा घालायचा! काय आहे हे डिजिटल जोडीदार किंवा व्हर्च्युअल गर्लफ्रेंड प्रकरण !

-------------------------------
"माझ्या मित्रांना व्हर्च्युअल गर्लफ्रेंड हा प्रकारच मूर्खपणाचा वाटतो पण मला ती आवडते आणि गमतीने सांगायचं तर ती डिजिटल असल्याने तिचा वाढदिवस वगैरे लक्षात ठेवायची ,तिची समजूत काढायची कटकटही नसते."
"त्याने माझं आयुष्य बदलवून टाकलंय. मला नुसतं सावरलंच नाही तर नवी उमेद दिलीय. माझ्या प्र्त्येक आनंदात तो सामील झाला. किती आभार मानू मी माझ्या बॉट-बडीचे !"
या प्रतिक्रिया आहेत डिजिटल जोडीदार विकत घेणार्या काही वापरकर्त्यांच्या.
ए-आय म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करणारे तंत्रज्ञान एकामागून एक अजब आयुध आपल्या हाती देत सुटले आहे. त्यापैकी हे एक - डिजिटल जोडीदार किंवा सहचर. बॉयफ्रेंड हवा, गर्लफ्रेंड हवी की अन्यलिंगभावाची व्यक्ती हवी याची निवड इथे करता येते.
आजच्या स्पर्धेच्या जगात ’भीड के बीच अकेला’ अशी मनोवस्था अनेकांच्या वाट्याला येते. मन मोकळं करायला जितीजागती माणसं भोवताली असली तरी कधी ती आपल्याला जज करतात तर कधी आपण विश्वासाने सांगितलेलं गुपित जगजाहीर करतात. या पार्श्वभूमीवर ग्लोबल जगाचे वेगवेगळे ताण सहन करताना होणारी मानसिक, शारिरिक कुचंबणा समजून घेईल, आपल्याशी सुखदु:खाच्या गोष्टी करून मन हलके करेल अशा डिजिटल जोडीदाराची कित्येकांना गरज आहे आणि यात एका व्यवसायाचे बीज दडले आहे हे युजेनिया क्यूडासारख्या काही इनोव्हेटर्सनी हेरले. त्यातून निर्माण झाले डीजिटल बडी नावाचे मोहजाल. सायबरजगात वावरताना इथे तरी आपलं ऐकून घेणारं कुणी असावं म्हणून, कुणाला एकलकोंड्या- अबोल स्वभावामुळे आलेल्या एकटेपणातून, (जसवंतचे उदाहरण इथे लागू होते) , कुणाला निव्वळ टाईमपास म्हणून, कुणाला फक्त कुतूहल डिजिटल जोडीदार हवेसे वाटू लागले आहेत. यातील बहुसंख्य लोकांना लैंगिक विकृती किंवा त्याविषयीच्या असमाधानातून डिजिटल गर्लर्फ्रेंड हवी असते.
डिजिटल जोडीदार (गर्लर्फ्रेंड, बॉयफ्रेंड किंवा अन्य) हे शेवटी एक उत्पादन किंवा सेवा आहेत त्यामुळे त्यात चक्क फ्रीज, टीव्हीला असावेत तसे वेगवेगळे फीचर्स असतात. आता जोडीदार पैसे देऊन विकतच घ्यायचा म्हटल्यावर वापरकर्ते त्यांना आपल्या अभिरुचीनुसार पारखूनच नव्हे तर ’घडवून’ घेतात. अॅनिमेशनचा वापर करून संभाषण अधिक मादक, आकर्षक करण्याची सुविधा या अॅपमध्ये असते. अशी विविध तांत्रिक वैशिष्ट्ये आणि क्षमतेनुसार डिजिटल जोडीदारांचे दर वेगवेगळे असतात.
उदा: रेप्लिका वेबसाईटवरील सहचर आपुलकी जाणवेल अशा पद्धतीने भावनिक पाठिंबा देत संवाद करतो. यासाठी महिन्याला किमान वीस डॉलर्स मोजावे लागतात. ( प्रत्यक्षात जसवंतच्या बाबतीत याच रेप्लिकावरच्या गर्लफ्रेंडची मजल मैत्रीची पायरी ओलांडून कमालीचे घातक सल्ले देण्यापर्यंत गेली आहे. ) रोमँटिक गप्पा करणे ही गरज असेल (खरे तर अश्लील ) तर व्हर्च्युअल गर्लफ्रेंड स्वरूपाचे बरेच अॅप उपलब्ध आहेत. काही अॅप विषयांची यादी देऊन निवड करायला सांगतात. स्वस्तातले किंवा फुकट सेवा देऊन भलतीकडे अडकवणारे सवंग धोकेदायक अॅप तर अनेक आहेत. एकूण बुडत्याचा पाय खोलात अशी इथल्या वापरकर्त्यांची स्थिती असते.
या सर्वात सध्या गाजते आहे ती केरीन मार्जोरी. स्नॅपचॅटवर अतिशय प्रसिद्ध असलेल्या केरीनचा (caryn) डिजीटल अवतार तिच्या वेबसाईटवर मिनीटाला एक डॉलर दराने उपलब्ध आहे. तिच्या अनेक व्हिडीओंचा वापर डाटाबेस म्हणून करून 'चॅट-जीपीटी ४' च्या साहाय्याने ही डिजिटल गर्लफ्रेंड तयार करण्यात आली आहे. हिमांशू गोयलने ’कायरा’ नामक पहिली भारतीय आभासी इन्फ्ल्युएंसर तयार केली आहे पण यात आणि केरीनमध्ये फरक आहे. केरीन वास्तवातली व्यक्ती आहे आणि तिचा डिजिटल क्लोन वापरकर्त्यांशी तिच्या मूळ आवाजात बोलत असतो. इतर बडी हे फक्त डिजिटली अस्तित्वात आहेत. त्यामुळे केरीनच्या क्लोनला जगातली पहिली डिजिटल गर्लफ्रेंड म्हणता येईल. केरीनला मिळालेला हजारो चाहत्यांचा प्रतिसाद बघता तिला स्नॅपचॅटपेक्षा बक्कळ पैसा या मार्गे मिळतो आहे. केरीनपासून प्रेरित होऊन एव्हाना मनोरंजन क्षेत्रातल्या, काही पैशाला हपापलेल्या लोकांना आपल्या डीजिटल क्लोनमध्ये गुंतवणूक करून स्वत:ला डिजिटल गर्लफ्रेंड किवा बॉयफ्रेंड म्हणून सादर करून कमाई करायची इच्छा होत असल्यास नवल नाही.
भारतीय जीवनपद्धतीत आपण मित्र, कुटुंबिय, शेजारी-पाजारी,नातलगांनी आधीच इतके लगडलेलो असतो की पदरचे पैसे भरून त्यात डिजिटल जोडीदाराची किंवा गर्लफ्रेंडची भर घालावाशी वाटणे हा प्रकार आपल्या सहजी पचनी पडण्यासारखा नाही. मात्र हा चिरतरूण डिजिटल सहचर तहहयात आपल्या मनासारखं वागत असल्याने त्याचे आकर्षण वाढू लागले आहे. गतवर्षाच्या ऑक्स्फॅम अहवालानुसार भारतात एकूण इंटरनेट वापरकर्त्यांपैकी महिलांचे प्रमाण १/३ आहे. पुरूष दरदिवशी ७००० शब्द बोलतात तर महिला तब्बल २०००० शब्द बोलतात. ही दरी भरून काढायला किंवा आपल्या लैंगिक फँटसीला डिजिटल का होईना पण दर्शनी रूपात आणायची संधी म्हणून की काय पुरूषांना शक्यतो डिजिटल प्रेयसी शोधण्यात विशेष रस असल्याचे दिसते. विशेषत: प्रत्यक्ष जगात वावरताना कसला ना कसला न्यूनगंड असलेल्या (जसवंत सारख्या) व्यक्ती डिजिटल गर्लफ्रेंड शोधून आपल्यातील अभावावर मात करण्याचा अनैसर्गिक प्रयत्न करत असतात. मर्यादित अॅक्सेसमुळे तसेच प्रत्यक्ष जीवनात मनमुराद व्यक्त होत असल्याने महिलांना डिजीटल जोडीदाराशी संवादाची निकड तुलनेने कमी वाटत असावी.

हे डिजिटल जोडीदार टेक्स्ट किंवा ऑडिओच्या माध्यमातून संवाद साधतात. ’तुम दिनको अगर रात कहो रात कहेंगे’ भूमिका घेऊन ते सुरूवातीला संभाषणाच्या मोहात पाडतात. ते संभाषण-चतुर असतात. (जसवंत केस मध्ये मात्र ती अतिशहाणी निघाली आहे) त्यांच्याशी बोलल्याने प्रसन्न वाटेल या पद्धतीने ते प्रोग्राम केले जातात. यात स्वत:चे वेगळेपण अबाधित राहावे म्हणून त्यांच्या काही अल्गोरिदमच्या मालकीची नोंद त्यांचे निर्माते अगोदरच करून ठेवतात. डिजीटल बडी इतक्या असोशीने, मोकळेपणाने माणसासारखा संवाद कसा काय साधतात याचे उत्तर त्यांच्या ए-आय संरचनेमध्ये आहे.
यासाठी नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग (NLP) या AI च्या एका शाखेचा उपयोग केला जातो. मानवी भाषा समजून घेणे आणि त्याचा अर्थ लावणे हे तिचे कार्य आहे. ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे कारण काही शब्दांचे छुपे अर्थ त्या भाषेशी निकट असलेल्या व्यक्तीलाच समजतात. उदा: ’दीडशहाणा’. पण ए-आय द्वारे भाषेच्या गाभ्यात शिरणे शक्य होते आहे. यासाठी हजारो संभाषणांचा मोठा डेटासेट संदर्भ म्हणून वापरला जातो. समजा आपण डिजिटल मित्राशी एखाद्या विषयावर बोलत असू आणि त्याची माहिती त्याला पुरवलेल्या डाटामध्ये नसेल तर तो तिसरेच काहीतरी बोलून वेळ मारून नेतो. असे वारंवार घडले तर वापरकर्ता वैतागून या बुद्धू बडीला कायमचा टाटा करू शकतो. असे घडणे व्यावसायिक दृष्ट्या घातक असल्याने हे अॅप न्यूरल नेटवर्क्सचा वापर करतात. म्हणजेच ते चॅट-जीपीटी सारखे प्रोग्राम वापरतात. हे प्रोग्राम डीप लर्निंगच्या साहाय्याने शक्य तितके फाइन-ट्यूनिंग करत भाषा निर्मिती क्षमता सुधारण्याचा व संभाषण सुसंगत राखण्याचा प्रयत्न करतात. हाडामासाच्या माणसाने गप्पा मारल्याचा भास व्हावा इतक्या सहजभावापर्यंत पोहोचणे हे या प्रोग्रामचे अंतिम लक्ष्य असते.

एकंदरीत जगभरातल्या विविध वंश-धर्म-जातींच्या माणसांचे नमुने, त्यांचे स्वभाव, मूड्स, नात्यातली गुंतागुंत, त्यांचे बुद्ध्यांक, भावनांक, तंत्रज्ञानाचे आकलन, त्यांची वेगवेगळी सांस्कृतिक समज, शेकडो भाषा , भाषेतल्या खाचाखोचा अशा ब्रह्मघोटाळ्यातून एका अनोळखी व्यक्तीशी डिजिटल सहचर होऊन सुसंगत गप्पा मारणे आणि त्यातून त्याला आपला पुरता नाद लावणे हे तांत्रिकदृष्ट्या किती क्लिष्ट काम आहे याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. डिजिटल सहचर निर्मात्यांना अर्थातच फक्त पैसा हवा असतो. यातून भविष्यात जगाचे काय होईल याच्याशी त्यांना देणेघेणे नसते पण वापरकर्त्यांनी डोके ताळ्यावर ठेवले पाहिजे. आपल्या भावनिक किंवा लैंगिक गरजेची पूर्ती करण्यापायी ’आ बैल मुझे मार’ करण्यापेक्षा त्यांनी यावर वास्तव जगात उपाय शोधणे अत्यंत आवश्यक आहे.

डिजिटल जोडीदारात गुंतल्याने आपल्या प्रियजनांशी असलेले नाते ताणले जाऊ शकते. शिवाय सशुल्क असल्याने हे प्रचंड खर्चिक प्रकरण आहे. याचे व्यसन लागते त्यामुळे अनेक पातळ्यांवर नुकसान होऊ शकते. हा संवाद यांत्रिक असल्याने अनेकदा साचेबद्ध किंवा चुकीचा प्रतिसाद येऊ शकतो. त्यातून अपेक्षाभंग, नैराश्याला तोंड द्यावे लागू शकते. वास्तव जीवनात वावरताना आत्मविश्वास कमी होऊ शकतो. खाजगी संभाषणात नकळत वैयक्तिक माहिती शेअर केली जाते, ज्याचा गैरवापर होऊ शकतो. जाहिरातदारांसाठी कच्चा माल म्हणून ही गोपनीय माहिती खुली केली जाऊ शकते. शिवाय हे शब्दश: कृत्रिम संभाषण आहे त्यामुळे संभाषणात आत्मा नाही. जीव नाही. माणसाने माणसाला केलेला उत्कट स्पर्श, जवळ घेऊन पुसलेले डोळे, हसून डोळ्यात येणारे पाणी, कडाकडा भांडल्यावर केलेला हळवा समेट याची जादू काही और आहे. त्यामुळेच आपल्या अस्तित्वाला अर्थ आहे. एक डिजिटल आयडी ही जागा कधीही घेऊ शकत नाही.
खरेखुरे मूल समजून बाहुलीशी खेळणारी लहान मुलगी कालांतराने मोठी होते आणि खर्या जगाचा स्वीकार करते. आपण पलायनवादी होऊन ए-आयने तयार केलेल्या आभासी विश्वात डिजिटल बाहुल्यांमध्ये रमायचे की मोठे होऊन वास्तवाला सामोरे जायचे हे आपल्याला ठरवायचे आहे.

Friday, June 23, 2023

हॅशटॅग : चिन्ह छोटे लक्षण मोठे


 #कुठे_नेऊन_ठेवलाय_महाराष्ट्र_माझा, #love, #photography, #fashion, #nature, #OreoHorrorStories, #स्वच्छभारत, #जगात_भारी

या सगळ्या असंबद्ध शब्दांमध्ये कॉमन काय आहे तर हॅशटॅग ! प्रत्येकाचा संदर्भ, वापरण्यामागचा उद्देश वेगळा पण स्थळ एकच - सोशल मिडिया. त्यावरच्या अवाढव्य जगात कानामागून येऊन प्रचंड लोकप्रिय झालेले चिन्ह म्हणजे हॅश आणि ठराविक सलग शब्दसमूहाआधी ते वापरले की तयार होतो हॅशटॅग. पूर्वी ट्रिंग-ट्रिंग करणार्या जुन्या फोनच्या डायलपॅडवर कोपर्यात मुकाट्याने बसणारे हे चिन्ह आता सोशल मिडियावर धुमाकूळ घालते आहे. मजकुरातल्या मुद्द्याकडे वाचकाचे लक्ष वेधून घेण्यासाठी, समान विषयावर पोस्ट करणार्यांना एकमेकांशी जोडण्यासाठी, एखादा विषय सोशल मिडियावर गाजता ठेवण्यासाठी , पोस्टच्या ढिगार्यातून हव्या त्या विषयाची पोस्ट शोधायला मदत होण्यासाठी किंवा केवळ फॅशन म्ह्णून हॅशटॅगचा प्रचंड वापर होतो आहे. त्याला भाषेचे बंधन नाही. ’पाऊंड’ या वजनासाठी वापरल्या जाणार्या मापकाचे हे चिन्ह आता सोशल मिडियावर एखाद्या शब्दाचे, वाक्याचे वजन वाढवण्यासाठीही यूजर वापरू लागले आहेत.

एखाद्या महत्वाच्या विषयाबद्द्ल लिहिण्याआधी पाउंडचे ( हॅशटॅग) चिन्ह वापरा, असे आवाहन सर्वप्रथम ख्रिस मेसीना या तंत्रप्रेमीने २००७ मध्ये ट्वीटरवर केले. त्यामुळे आवडीच्या किंवा विशिष्ट विषयाशी निगडीत ट्वीट्सचा मागोवा घेणे यूजर्सना सोपे झाले. हळूहळू या चिन्हाच्या मदतीने सगळ्या सोशल मिडियाचे वापरकर्ते वेगवेगळ्या स्वरूपाच्या अभिव्यक्तीसाठी हॅशटॅग तयार करू लागले. सोशल मिडिया लगोलग त्याची सूची तयार करत असल्याने यूजरला त्या कीवर्डशी संबंधित सगळ्या पोस्ट्स अवलोकनासाठी उपलब्ध होऊ लागल्या.

सुरूवातीला केवळ ट्वीटरच्या यूजर्सनी उचलून धरलेली ही कल्पना इतर प्लॅटफॉर्मबरोबरच सध्या इन्स्टाग्रामवरच्या युवावर्गात अक्षरश: बोकाळली आहे. उदा: कोणी प्रवासाबद्दलची पोस्ट टाकली तर त्यावर जर्नी, समर, ट्रेक, नेचरलव्ह असे मोजके हॅशटॅग न वापरता त्याशिवाय फन, पार्टी, बेस्टी, लाईफ, फिटनेस, व्हेकेशन, अलाणा, फलाणा अशी हॅशटॅगची दाटी केल्याशिवाय आपण ’कूल’ ठरणार नाही असे त्यावरील बहुतेक युवा-यूजर्सना वाटू लागले आहे. हॅशटॅग मूळ पदार्थात मिठासारखे चव आणण्यापुरते वापरायचे असतात, खारट करण्याइतके नाही हे भान बाळगणे गरजेचे आहे. अर्थात हॅशटॅगच्या मदतीने आपली पोस्ट वेगाने अनेकांपर्यंत पोचावी हा त्यांचा मुख्य उद्देश असतो. सध्या सोशल मिडियावर #BlackandWhite फोटो पोस्ट करण्याचा ट्रेंड सुरू आहे. एखादा ट्रेंड अती झाला की #मधुमास_आवरा अशा गमतीदार हॅशटॅगची पण इथे चलती असते.

आपल्या उत्पादन किंवा सेवेचे नाव ऑनलाईन सर्वतोमुखी व्हावे म्हणून उद्योगसंस्था हॅशटॅगचा खुबीने वापर करतात. लोकांच्या मनात उत्पादनाविषयी उत्सुकता निर्माण करण्याचे, जाहिरात मोहिमा ग्राहकापर्यंत नेण्याचे काम हॅशटॅग सहजपणे करतात. #ShareACoke किंवा #JustDoIt किंवा #बिल्कुलदेसी सारख्या अभियानांनी त्यांच्या ब्रँडची सोशल मिडियावर चांगलीच प्रसिद्धी केली होती. मनोरंजन क्षेत्राचे तर हॅशटॅगशिवाय पान हलत नाही. "अमुक हॅशटॅग वापरून तुमचा फोटो पोस्ट करा, बक्षीसे जिंका" अशा स्वरूपाचे आवाहन करून वेबमालिका, सिनेमाचे प्रमोशन कायम सुरू असते. साधारणपणे हे हॅशटॅग खुसखुशीत असतात. ग्राहकाला सहज उद्युक्त करतात, तरूणांना भुरळ घालतात आणि व्यवसायाचे गणित काहीसे सोपे करतात.

हॅशटॅग अनेकदा गंभीरपणे भूमिका करतात ती एका ठिणगीची. कधी ही ठिणगी जागीच विझून जाते तर कधी वणव्यासारखी पसरते. कधी मोठ्या सामाजिक बदलाची नांदी ठरते तर कधी राजकीय सत्ता उलथवायला हातभार लावते. कितीतरी जागतिक सामाजिक घडामोडी, राजकीय चळवळींना याने बळ दिले आहे.
२०१३ मध्ये अॅसिड अटॅकमधून वाचलेल्या लक्ष्मी अगरवालने #StopAcidSale हॅशटॅगच्या व याचिकेच्या माध्यमातून ऑनलाईन पाठिंबा मिळवला त्यानंतर ३२६ कलमानुसार अॅसिड अॅटक हा गुन्हा मानण्यात आला.

ऑक्टोबर २०१७ मध्ये अलिसा मिलानो या अभिनेत्रीने एका हॉलीवूड निर्मात्याच्या वर्तनाच्या विरोधात ट्वीट केले व लैंगिक शोषणाचा बळी ठरलेल्या महिलांना #MeToo (मीटू) हॅशटॅग अंतर्गत व्यक्त होण्याचे आवाहन केले. अल्पावधीतच जगभरातून अनेक महिलांनी हिमतीने आपबीती कथन केली. काही जणींना न्याय मिळाला , काहींना किमान दाद मागता आली. काही विकृतांना चाप बसला. दुरूपयोग होण्याच्या शक्यतेवरून या मोहिमेवर काही प्रमाणात टीकाही झाली परंतु अनेकींच्या दमन झालेल्या भावनांचा यामुळे जसा उद्रेक झाला तसा निचराही. सायबर जगात स्त्रीवादाला उमेद आणि आवाज देण्याची किमया या हॅशटॅगने केली.

२०१३ मध्ये ट्रेवन मार्टिन या कृष्णवर्णीयाच्या मारेकर्याची निर्दोष सुटका करण्यात आली. याचा निषेध करण्यासाठी व या अन्यायाकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी काही कार्यकर्त्यांनी #BlackLivesMatter हा हॅशटॅग चालवला. २०१४ मध्ये मायकेल ब्राऊनच्या खुनानंतर वर्णभेदाचा मुद्दा या हॅशटॅगसह ऐरणीवर आला. मे २०२० मध्ये निदर्शने करणार्या जॉर्ज फ्लॉयडची गोर्या पोलिसाने अमेरिकेत नृशंस हत्या केली तेव्हा मात्र या हॅशटॅगला सामूहिक आक्रोशाचे स्वरूप आले. या मुद्द्याला जगाच्या कानाकोपर्यातून पाठिंबा मिळाला. सोशल मिडीयाबाहेरच्या जगात अनेक संस्थांचे दबावगट या घटनेविरोधात उभे राहिले. या सगळ्यांना एका सूत्रात ओवण्याचे मोठे काम या हॅशटॅगने केले.

तंत्रज्ञानाबरोबर हॅशटॅग सुद्धा बद्लणारच. त्याची पुढची पिढी आहे ’Hashtags 2.0’.
हे हॅशटॅग अधिक संवादी आणि चळवळे असणार आहेत. नुसते मख्ख निळे शब्द असे त्यांचे रूप नसेल तर कृत्रिम बुद्धीमत्तेच्या मदतीने ते यूजरला वैयक्तिक प्रतिसाद देऊ शकतील. ते जणू आपले बुद्धीमान सहचर असतील. सोशल मिडियाच्या मर्यादा ओलांडून ते आता स्मार्ट वॉचेससारख्या आपण परिधान करत असलेल्या गॅजेट्सपर्यंत पोचतील. मनोरंजनकार, मार्गदर्शक आणि मदतनीस अशा तीन स्वरूपात हॅशटॅग आपल्या दिमतीला हजर असतील. विचार करा, फ्रीजवरचा हॅशटॅग आपल्याला नव्या पाककृती सुचवतो आहे, स्मार्ट हॅटवरचा हॅशटॅग आपल्या मूडप्रमाणे त्याचे रूप बदलतो आहे. ’फनी’ हा हॅशटॅग स्पर्श करताच त्याचे अॅनिमेटेड डोळे मिचकावून प्रतिसाद देतो आहे. अनाकलनीय वाटते हे सारे, पण फोनवर बोलणारा माणूस आपल्याला प्रत्यक्ष बघता येऊ शकतो ही आज अगदी साधी वाटणारी गोष्ट मागच्या पिढीला जादुई वाटली होती.

हॅशटॅग आपल्याला सांगतो- "व्यक्त व्हा. एकट्याने सोसू नका. एकट्याने मजाही करू नका. माझा वापर करा म्हणजे हा अनुभव सार्वत्रिक आहे हे तुम्हाला कळेल. माझ्यासह व्यक्त व्हा - तुम्हाला न्याय मिळेल, निदान एका सकारात्मक बदलात , हे जग अधिक चांगले घडवण्यात तुमचाही सहभाग असेल. मी नसतो तर तुमची पोस्ट क्षणभंगुर राहिली असती. माझ्यामुळे ती डिजिटली चिरंजीव होऊ शकते. अनामिकाला जगन्मित्र बनवण्याचे सामर्थ्य माझ्यात आहे." एक चिमुकले चिन्ह इतक्या, अगदी #रजनीकांत पेक्षा भन्नाट करामती करू शकेल असे कुणाला स्वप्नातही वाटले नसावे. नाही का!

-------------------------