Friday, December 8, 2017

ब्लॉग ’ती’ चा - वेटलॉस तमाशा


पांढर्‍याशुभ्र लुसलुशीत वाफाळत्या उकडीच्या मोदकावर किंवा गरम खरपूस पुरणपोळीवर ताज्या कढवलेल्या साजूक तुपाची धार धरली आणि डोळे मिटून त्याचा घास घेतला की जे काही वाटतं त्याला ब्रह्मानंदी टाळी लागणं म्हणतात. ’ऋणं कृत्वा घृतं पिबेत्.. यावत् जिवेत सुखम् जिवेत’ असं चार्वाकाचं वचन आहेच. कर्ज काढा पण तूप खा, थोडक्यात जीओ जी भरके. हं, मात्र दुसर्‍याच घासाला कोलेस्ट्रॉल, सॅच्युरेटेड फॅट्स सारखे भयंकर शब्द, जिमची भरलेली फी वगैरे आठवू लागतं. परंतु ’साजूक तूप अवश्य खावं’ असं चक्क भारतातली एक प्रसिद्ध आहारतज्ज्ञ सांगत असेल तर! 
’५-१० वर्षांनी पाश्चात्य देशांनी साजूक तुपाचं महत्व मान्य केलं की मगच तुम्हाला हे पटणार आहे का? पचनशक्ती चांगली राखण्य़ासाठी, शरीराचं वंगण म्हणून, तुकतुकीत कांतीसाठी, कित्येक विकारांवर गुणकारी असलेलं साजूक तूप दररोज खायला हवं.’ ४ लाखांहून अधिक चाहते असणारी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर #RujutaDiwekar सोशल माध्यमांवर आणि तिच्या http://rujutadiwekar.blogspot.in
 (Rutuja's gyan) या ब्लॉगवर हे आवर्जून सांगते. विमेन अॅण्ड वेटलॉस तमाशा, डोंट लूज योर माइंड लूज युवर वेट यासारखी आहारशास्त्रावरची विक्रमी खपाची पुस्तकं तिच्या नावावर आहेत.

ऋजुता अनेक उच्चपदस्थ व्यक्तींची आहारविषयक सल्लागार, वेलनेस प्रशिक्षक असली तरी ती चर्चेचा विषय झाली ते करिना कपूरच्या ’साईझ झीरो’ #SizeZero प्रकरणापासून. परंतु या ब्लॉगवर ऋजुता लिहिते, "करिना साईझ झीरो झाली नव्हतीच, माझा आहारविषयक सल्ला मनापासून अमलात आणल्यामुळे आधीपेक्षा खुटखुटीत, चपळ झाली इतकच. शिवाय त्या चित्रपटाची, तिची, ती व्यावसायिक गरज होती. अमेरिकन व्याख्येनुसार साईझ झीरो म्हणजे 5’4” हून कमी उंचीची 32-24-32 मापातली स्त्री. शरीरसौष्ठवाच्या परकीय कल्पना भारतीय स्त्रीच्या शरीरयष्टीला मानवणार्‍या नाहीत तरीही त्यापायी प्रसंगी उपासमार सोसून साईझ झीरोच्या मागे लागणार्‍या मुलींना म्हणावे तरी काय!" ’वजन कमी करणं आणि ते आटोक्यात ठेवणं ही माझ्या आयुष्यात सर्वात महत्वाची गोष्ट आहे’ असं एखादी तरुण, उच्चशिक्षित, सक्षम स्त्री सांगते तेव्हा ऋजुताला अतिशय वाईट वाटतं. सगळं जगणं व्यापून टाकण्य़ाइतकं हे महत्वाचं आहे का! वजन नियंत्रणात असायलाच हवं पण ते आरोग्यासाठी, चांगल्या दर्जाचं आयुष्य जगता यावं म्हणून परंतु बहुतेक मुलींना वजन कमी करायचं असतं ते केवळ सुंदर दिसण्यासाठी.

ऋजुता सोशल मिडीयावर/ ब्लॉगवरच्या लेखातून तिच्या मनातली ही खंत मांडते," एकीकडे या मूर्ख मुली तर दुसरीकडे स्त्रियांना दुय्यम लेखण्याच्या मानसिकतेच्या बळी ठरलेल्या दुर्दैवी स्त्रिया. मुला-मुलींना घरी जशी वागणूक दिली जाते त्यानुसार त्यांची मानसिक घडण होते. मुलांमधली स्वामित्वाची आणि मुलींमधली दुय्यमत्वाची भावना प्रबळ होत जाते. याची परिणती ’मी नवर्‍याचं जेवण झाल्याशिवाय कशी जेवू’ या वरवर प्रेमळ भासणार्‍या विचारापासून ’रात्रीबेरात्री प्रवास करणारी मुलगी स्वत:हून अत्याचाराला निमंत्रण देते, त्यात मुलांचा काय दोष’ अशा विकृत टोकापर्यंत होऊ शकते. या मानसिकतेचा संबंध शारीरिक पोषणाशी आणि सुदृढ जीवनशैलीशी आहे. मुलींना ती नाकारली गेली आहे. खरं तर आपल्याला त्यांच्या ’साईझ झीरो’ची काळजी करायला हवी आहे. त्यांच्या निकोप वाढीसाठी शिक्षणाबरोबरच मुलभूत सुविधा द्यायला हव्यात. कोवळ्या वयात होणारी लग्नं आणि पाठोपाठ येणारं गरोदरपण रोखायला हवं. मन:शक्ती वाढवण्याबरोबरच त्यांना पुरेसं आणि सकस अन्न वेळेवर मिळतय का याकडे लक्ष द्यायला हवं."

आहारनियमनाच्या खुळचट कल्पनांबद्दल एका लेखात ऋजुता लिहिते," सूप सलाड खाऊन जीवाच्या आकांताने वजन कमी करणारे कायम जगावर वैतागलेले असतात त्यापेक्षा जे आवडतं तेच पण योग्य प्रमाणात खा. ’तांदुळाच्या नियमित सेवनामुळे तामिळनाडूत मधुमेही रुग्णांच्या प्रमाणात वाढ ?’ अशी काहीतरी बातमी वाचनात येते. ती पूर्ण न वाचताच, मधुमेहींनी किंबहुना सर्वांनीच भात खाणे अयोग्य हे गणित आपण डोक्यात पक्के करतो. खरं तर वरण/सार/आमटी/दही-भात, खिचडी हा अस्सल देशी पदार्थ आहे. आपल्या खाद्यजीवनातलं हे पहिलं प्रेम असतं. चार दिवस परदेशी फिरुन या, कधी एकदा तूप घालून लिंबू पिळून घरचा मस्त गरमागरम वरण-भात खातोय असं होतं पण आपण हा साधा सोपा रुचकर आणि पौष्टिक पदार्थ डाएटिंगच्या फॅड मुळे अकारण नाकारतो आणि सुखाचा जीव दु:खात घालतो." (खिचडी हा आपला राष्ट्रीय पदार्थ म्हणून घोषित झाल्याची मध्यंतरी चर्चा होती, असो वा नसो, खाद्यदिनाला खिचडी पकलीच. ऋजुता म्हणते म्हणून तरी तो खायला सरकारविरोधकांची हरकत नसावी )

मध्यंतरी एका गाजलेल्या टीव्ही मालिकेत पंजाबी ’प्राठा’प्रेमी लठ्ठ नायकाची काळजी घेणारी सालस बायको त्याचं वजन नियंत्रणात राहावं म्हणून त्याला पालकाचं सूप, फळांच्या फोडी असा डबा पाठवायला सुरूवात करते. यावर ऋजुता ’टीव्ही डाएट’ या लेखात तिला विचारते," फळं-भाज्यांचा सरफेस एरिया वाढला (फळ कापणं किंवा रस काढणं) की त्यातली पोषणमूल्य हरवतात हे तू शाळेत कधी शिकली नाहीस काय गो!" गोठवलेले हवाबंद डब्यातले पदार्थ, कॉर्नफ्लेक्स खाणं हे उच्च दर्जाच्या जीवनशैलीचं उदाहरण म्हणून जाहिरातींमधून भाबड्य़ा प्रेक्षकांच्या मनावर बिंबवलं जातं. बहुतेक व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यामध्ये तर एकाच वेळी तत्त्वचिंतक, इतिहासतज्ज्ञ आणि एक आहारतज्ज्ञ दडलेला असतो. जे या तज्ज्ञांमध्ये मोडत नाहीत त्यांची भलतीच पंचाईत होते. आहाराचा रोजच्या जगण्याशी संबंध असल्याने त्याविषयी परस्परविरोधी पोस्ट्स वाचून ते बिचारे गोंधळून जातात. उदा: ’पोळी नको भाकरी खा’, ही पोस्ट वाचून होत नाही तोच ’अंकुरित गव्हाचे फायदे’ नावाची पोस्ट येऊन पडते. गंमत म्हणजे बरेचदा ’सुख दु:खे समे कृत्वा..’ वृत्तीची एकच व्यक्ती या दोन्ही पोस्ट्स पाठवते. हे वाचल्यावर आणि जाहिरातीतून दिसणारे ओट्स, टोफू, ऑलिव्ह ऑईल, ब्रोकोली, किवी असले पदार्थ, भाज्या जर त्यांना सहज उपलब्ध होत नसतील तर आपण पालक म्हणून भलतेच बॅकवर्ड आहोत काय, आपल्या मुलांना चांगला आहार देत नाही की काय, या गंडाने ते पछाडले जातात....

अशा वेळी काय करावं! ऋजुताचा ब्लॉग किंवा सोशल लिंक्स उघडाव्या. त्यावरच्या या टिप्स मनातल्या बहुतेक प्रश्नांची नेमकी उत्तरं देतात. "ओट्स सारखे पदार्थ आपल्या मातीतले नाहीत, शिवाय ते बेचव आहेत. भारतीय हवामानाला ते पूरक नाहीत. केवळ फॅशन म्हणून खाद्यसंस्कृती का बदलायची? बदल म्हणून एखादेवेळी ठीक आहे एरवी पोळी, भाजी, भात, आमटी, कोशिंबीर हा भारतीय चौरस आहार सर्वात उत्तम. शुगरफ्री पेक्षा प्रमाणात साखर खाणे योग्य. सणासुदीला थोडेफार जिभेचे चोचले पुरवायला काहीच हरकत नाही. डाएट करणे म्हणजे दुधी- कारल्याचा रस पिणे, काहीतरी नीरस, बेचव खाणे हा विचार डोकयातून काढा. दर दोन तासांनी थोडं थोडं खा. कमी खाण्यापेक्षा योग्य आहार घेणं महत्वाचं. राजासारखी न्याहारी, राणीसारखं भोजन आणि चाकरासारखं रात्रीचं जेवण म्हणजेच आदर्श आहारपद्धत असं नाही. आहार ज्याच्यात्याच्या शरीर प्रकृतीनुसार असावा. ऋतुमानानुसार तो बदला. सलग एका जागी ३० मि. हून अधिक बसणं टाळा. आठवड्यातून किमान १५० मिनिट व्यायाम करा."

असं म्हणतात आपण जे खातो, तेच आपल्या चेहऱ्यावर दिसतं. काय खावं काय टाळावं याचा संबंध जितका आहारशास्त्राशी आहे तितकाच ’कॉमन सेन्स’ शी आहे. ऋजुता म्हणते तसं, वजनाचा काटा विकत घेण्यापेक्षा स्वत:च्या आहार-विहाराबद्दल स्वत:ला प्रामाणिकपणे प्रश्न विचारा. वाढत्या ताणाचा वजनावर परिणाम होतो. फर्गेट, फर्गिव्ह आणि फॉरवर्ड (पोस्ट्स नव्हे ) ही त्रिसूत्री वापरली तर बरेचसे ताण कमी होतील. सर्वात महत्वाचं म्हणजे स्वत:च्या शरीरासकट स्वत:चा मनापासून स्वीकार करा... (आणि हे सारं हलक्याफुलक्या शैलीत सांगणार्‍या ऋजुताचा इंग्लीश-हिंग्लीश ब्लॉग/पोस्ट्स खिचडीवर थोडी लसणीची चरचरीत फोडणी घालून (लसणाने चरबी कमी होते), कुरकुरीत पापडासह खात खात अवश्य वाचत राहा)

Saturday, December 2, 2017

ब्लॉग 'ती' चा - परिमाचा ब्लॉग ..नव्हे व्ही-लॉग



पावसाळा आला की नवकवींची संख्या वाढते तसेच सुट्यांच्या काळात आणि जानेवारी महिन्यात (संकल्पबिंकल्प करण्याचा झटका आल्याने) ब्लॉग लिहिणार्‍यांची संख्या वाढते. अनेक ब्लॉगर्स दोनचार पोस्टस नंतर ढेपाळतात. फार थोडे सातत्याने आणि त्यातलेही फार थोडे उत्तम लेखन करत राहतात. एकूणच ब्लॉगकडे छंद, ऊत किंवा खाज म्हणून पाहिलं जाऊ शकतं. परिमा शर्मा ही तरुणी मात्र व्यावसायिक ब्लॉगर, खरं तर व्ही-लॉगर आहे. भटकंती आणि खवैय्येगिरीच्या छंदाचंच तिने व्यवसायात रूपांतर केलंय. http://parimasharma.com/ वर ती फक्त ब्लॉगच नाही तर व्ही-लॉग (प्रामुख्याने व्हिडीओंचा समावेश असलेले ब्लॉग) पोस्ट करते. मनोरंजन वाहिन्या कार्यक्रम दाखवतात, टीआरपी वाढला की जाहिरातीतून कमाई करतात तसेच या व्ही-लॉग चे स्वरूप आहे.
परिमाने लेबर लॉ मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलय. दिल्लीला तिची प्लेसमेंट कंपनी आहे. एक यशस्वी उद्योजक असूनही ती स्वत:ला escapist म्हणते ते पलायनवादी या अर्थाने नाही, तर तिला कायम जगण्याची चाकोरी सोडून डोंगर-दर्‍या, समुद्रकिनारे, किल्ले, जंगलं असं कुठेतरी पळून जावंसं वाटतं. वेगवेगळ्य़ा प्रांतातले, दिल्लीतल्या नवनवीन रेस्तरॉंमधले विविध खाद्यप्रकार चोखंदळपणे निवडून-शोधून चाखून पाहावेसे वाटतात. नर्मविनोदी इंग्लीश भाषा, वाचकाच्या मनात सहज येणार्‍या प्रश्नांची लेखात आवर्जून दिलेली उत्तरं आणि सोबत खास टिप्स हे तिचे वैशिष्ट्य.
हल्लीच्या पिढीला लांबलचक पोस्ट्स वाचायला वेळ नाही किंवा त्यात रस नाही त्यामुळे पॉडकास्टला (ऑडीओ ब्लॉग) सुरुवात झाली. ब्लॉग ’ऐकण्याची’ सोय झाली. कमला भट्ट ही पहिली भारतीय पॉडकास्टर. एखाद्या वाहनचालकापासून सिनेतार्‍यांपर्यंत आणि शेफ पासून उद्योगपतींपर्यंत अनेकांच्या मुलाखती तिने ’कमला भट्ट शो’ यावर पॉडकास्टच्या माध्यमातून प्रसारित केल्या. त्यानंतर आरुषी तलवार खून खटल्याचे क्रमश: पॉडकास्ट सादर करणारी पत्रकार निशिता झा किंवा हिंदी सिनेतारे-तारकांच्या मुलाखती पॉडकास्टच्या माध्यमातून सादर करता करता आज missmalini.com मुळे गाजणारी मालिनी अग्रवाल अशा कित्येक जणींनी या माध्यमाचा चपखल वापर केला.
आता ऐकण्यापेक्षा’ ’पाहण्याला’ प्राधान्य दिलं जाऊ लागलय हे ओळखून या पॉडकास्टर्स ’व्ही-लॉग’ कडे वळल्या आहेत. त्यासाठी दर्जेदार स्क्रिप्ट लिहिणं, ती उत्तमरित्या सादर करणं, नयनरम्य व्हिडिओचित्रण करणं आणि ते एडिट करुन पोस्ट करण्याचं तांत्रिक कसब हवं. हे व्यावसायिक ब्लॉगर प्रेक्षक-वाचकांची नस ओळखून विषयांची निवड करतात. प्रवास आणि खाणे हे तर तरुणाईचे वीकपॉइंट्स. फूड पॉर्नचं आकर्षण वाढतय. तयार अन्नपदार्थांची आकर्षक सजावट करुन त्याचं किंवा एखाद्या रेस्तराँ मधल्या खास डिशचं सचित्र वर्णन किंवा व्हिडीओ पोस्ट केला जातो. हे अशा कौशल्याने केलं जात की पाहताच तोंडाला पाणी सुटलं पाहिजे. हे सगळं प्रकरण म्हणजेच फूड पॉर्न. साहजिक इतर कोणत्याही विषयापेक्षा यांना पटकन लाईक्स आणि चाहते मिळतात.
परिमा फूड-क्रिटिक म्हणून ही क्लृप्ती वापरतेच शिवाय त्या जागेचं वर्णन, तिथलं वातावरण, सेवेचा आणि पदार्थाचा दर्जा तसच पदार्थांचे दर, इतकच नव्हे पदार्थांचा रंग, गंध, स्पर्श याबद्दल ती लिहिते, त्याला व्हिडिओ किंवा फोटोची जोड असल्याने ती सांगते ते चाखता येत नसलं तरी अनुभवता येतं. त्यात भारतीय-प्रांतीय, तिबेटियन, कॉंन्टिनेंटल त-हत-हेच्या पदार्थांचा समावेश असतो, त्यामुळे दिल्लीतलं नवीन रेस्तरॉं ’ट्राय’ करण्यापूर्वी किंवा चांगले रेस्तरॉं माहीत करुन घेण्य़ासाठी परिमाचा ब्लॉग वाचायला हवा. दिल्लीकडे ’रामलीला’ या प्रकाराला प्रचंड सांस्कृतिक महत्व आहे. परिमा सारखे कित्येक जण तिथे जातात ते मात्र समोर लागलेल्या गाड्यांवरच्या खाद्यपदार्थ्यांचा आस्वाद घेण्यासाठी, तेही हायजिन बियजिन खुंटीवर टांगून. परिमाच्या ब्लॉगवरुन आपणही रामलीला मैदानावर तिच्यासह फेरफटका मारून येतो. तिथे मिळणारे दाल-चिल्ले, फ्रूट चाट सारखे नाना प्रकारचे पदार्थ चाखत, सचित्र पाहत अखेर बाबू राम गुप्ताच्या कुल्फीने या खादययात्रेची सांगता होते.

परिमाच्या बहुतेक ब्लॉग्जच्या केंद्रस्थानी दिल्ली आहे मग विषय कोणताही असो. त्यामुळे तिच्या ब्लॉगच्या चाहत्यांमध्ये दिल्लीकर मोठ्या संख्येने असणारच पण त्यातले प्रवासाचे अनुभव हे सगळ्य़ा भारतीय ’भटक्यां’ना आपले वाटतील असेच आहेत. उदा: तिचा ’गुच्चू पानी’ या देहरादून नजीकच्या पर्यटनस्थळाचा व्हि-लॉग. देहरा म्हणजे निवास, डेरा आणि दून म्हणजे द्रोण किंवा दरी. यात परिमा मसुरी ते देहरादून प्रवासाचा साद्यंत वृत्तांत सांगते. त्यात आजूबाजूचा निसर्ग, गाडी चालवायला लागणारा साधारण वेळ, अंतर, वाटेतले टप्पे ही माहिती ओघाने येते. वाटेतलं प्रकाशेश्वराचं मंदीर देणग्या स्वीकारत नाही हे ती आवर्जून नमूद करते. तिथल्या स्वच्छ शिवलिंगावर वाहिलेलं दूध वाया न घालवता चहासाठी वापरतात हे तिला कसं भारी वाटलं हे सांगते. गुच्चू पानीला तिला तिच्या मैत्रिणीने सांगितलेला पाणसापांचा अनुभव आठवल्याने साध्या वाळक्या पानाच्या स्पर्शानेही ती दचकते. जगण्याच्या कोलाहलापासून दूर जावसं वाटत असेल तर इथली नीरव शांतता अनुभवा असं म्हणणारी परिमा फक्त आपल्याशीच गप्पा मारते आहे असं वाटावं अशी सहजता तिच्या बोलण्य़ात आणि लिहिण्यात आहे.
मसूरीजवळच्या केंप्टी धबधब्याचं वर्णन करताना ती उत्तराखंड पर्य़टन विभागाने त्याखाली तयार केलेल्या कृत्रिम तलावाबद्दल नाराजी व्यक्त करते. तिथल्या उसळत्या गारेगार पाण्य़ाचं शिरशिरी आणणारं वर्णन करते, त्यात सूर मारल्याशिवाय तिला राहवत नाही. हे सारं वाचताना तो धबधबा डोळ्यासमोर उभं करण्य़ाची गरजच नाही कारण पाठोपाठ परिमा आपल्याशी व्हिडिओतून बोलू लागते. दिल्ली ते गोवा स्वत: गाडी चालवत केलेली चार दिवसांची ४४१३ कि.मी ची ट्रीप, गाडी चालवताना वाटेत अनेकदा थबकून मनसोक्त अनुभवलेलं निसर्गसौंदर्य, मग गोव्यातल्या प्रत्येक दिवशी काय काय पाहिलं, काय केलं, या सगळ्य़ाबरोबरच तिची जिप्सी वृत्ती गोवा- डायरीतून आपल्या समोर उलगडत जाते. तिचं भारतीय स्त्री असणं यात कुठेही आड आल्याचा उल्लेख येत नाही.
आज तब्बल १८ कोटी भारतीय यू-ट्यूब वापरतायत त्यामुळे येत्या काळात बहुतेक ब्लॉगर्स आपल्या लेखनाला व्हिडिओ ब्लॉगची जोड देतील यात शंका नाही. व्ही-लॉग मध्ये मनोरंजन होते, माहिती मिळते पण वाचकाची कल्पनाशक्ती पंख मिटून मुकाट बसून राहते. व्ही-लॉग चे व्यावसायिक गणित नीट उमगलेल्या परिमाचा एक प्रवास व्हिडिओ मध्ये बघताना जाणवले लेखकाच्या शब्दसामर्थ्याने त्याचा प्रवास, ती जागा नजरेसमोर उभा राहण्यातला आनंद एक वाचक म्हणून आपण गमावत आहोत का!
पुलंनी एका लेखात इटलीतल्या ’ब्लू ग्रोटो’ म्हणजेच नीलकुहरबद्दल लिहिलय," निळाईची ही परमसुंदर गर्भकुडी होती. गाभाऱ्यात धूप कोंदावा तसा तिथे निळा प्रकाश कोंदला होता. समाधिसुख भोगणाऱयांना शेवटी मिटल्या डोळ्यांपुढे प्रकाश दिसतो असे म्हणतात , त्या प्रकाशाची कोवळी झळाळी मला याचि देहीं याची डोळां अनुभवायला मिळाली. आता माथ्यावरच्या निळ्या आकाशाला मी मोठ्या अभिमानाने सांगतो की, तुझ्या निळाईचा अर्थ सांगणाऱ्या त्या नीलकुहरातल्या पाण्याला मी भेटून आलो आहे !"
हे वाचताना ’निळाईत माझी भिजे पापणी’ ची जी अनुभूती येते ती व्ही-लॉग मधून थेट दिसणारं ब्लू ग्रोटो पाहून येईल का !

Friday, November 24, 2017

’ब्लॉग ’ती’ चा - यूथ करी

हा ब्लॉग आणि पुढे तिचं एकूणच लेखन तरूणाई डोक्यावर घेईल असं तिला अजिबात वाटलं नव्हतं. ’ब्लॉग सुरू केलाय- कसा वाटला ते सांगा’, असं तिने फक्त दोन जिवलग मैत्रिणींना सांगितलं होतं. अर्थात ’मी जे काही करते ते अगदी प्राणपणाने’ असं ती म्हणते. ’ती’ म्हणजे ’स्टे हंगरी स्टे फूलीश’ #StayHungryStayFoolish या ३ लाखांहून अधिक प्रतींचा खप असलेल्या, ८ भारतीय भाषांमधून अनुवाद झालेल्या प्रसिद्ध पुस्तकाची लेखिका रश्मी बंसल. IIM अहमदाबाद मधून एमबीए झालेल्या २५ जणांनी गलेलठ्ठ पगाराच्या नोकर्‍या सोडून देऊन उद्योजक होण्याचा ध्यास घेतला. त्यांचा खाचखळग्यांनी भरलेला पण अद्भुत प्रवास मांडणारं हे पुस्तक. यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्यातली ज्ञानपिपासा कायम प्रज्वलित असायला हवी, हा या पुस्तकातला मूलमंत्र. तरुणांच्या गळ्यातला ताईत असलेली रश्मी स्वत: देखील IIM ची एमबीए आहे. सोशल मिडीया आणि http://youthcurry.blogspot.in/
या ब्लॉगच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी जुळलेली आहे. युवाविश्वाला आपली वाटेल अशी उत्फुल्ल आणि चुरचुरीत हिंग्लीश भाषा, चपखल केस स्टडीज आणि उद्योग जगताची खोलवर जाण या त्रिसूत्रीवर तिचं लेखन बहरतय. ब्लॉगलेखन हा आता केवळ तिचा छंद राहिलेला नाही. जुन्या वाचकांना गुंतवून ठेवण्याची आणि वाचक नसलेल्यांना तिच्या लेखनाकडे आकर्षित करण्य़ाची ती एक डिजिटल मार्केटिंगची #DigitalMarketing क्लृप्ती आहे.


आपण आवडीचं काम करताना, स्वैपाक करताना किंवा स्नान करताना गुणगुणतो ते काही कुणी आपला म्युझिक अल्बम काढणारेय म्हणून नाही. तुम्ही जे काही करता ते इतकं मनापासून असेल, त्यातला आनंद तुम्हाला गवसला असेल तर पुढचं सगळं आपोआप घडतं. ’द इंडिपेंडंट’ आणि टाईम्स मध्ये पत्रकारिता केलेल्या रश्मीने लेखन हीच आपली पॅशन असल्याचं ओळखलं. ’गॉड्स ओन किचन’ या ताज्या पुस्तकासह तिच्या इतर ६ पुस्तकांचा खप देखील तडाखेबंद आहे. JAM – #JustAnotherMagazine या प्रसिद्ध नियतकालिकाची ती प्रणेती आहे. या सार्‍यात ब्लॉगवरील ताज्या लेखांची संख्या रोडावत चालली असली तरी एकूण ब्लॉग्जची संख्या आणि गुणवत्ता जबरदस्त आहे.

एका उद्योजक स्त्रीच्या वाटेत येणारे काचेरी अडसर केव्हाच भेदून पलीकडे गेलेल्या रश्मीची ब्लॉगवरच्या विषयांची निवड तिचा प्रचंड आवाका दाखवणारी आणि अवाक करणारी आहे. उद्योगक्षेत्रातल्या चालू घडामोडींवर दृष्टीक्षेप आहे. करियरबद्दल टिप्स आहेत. पालकत्व आणि सामाजिक प्रश्नांवर भाष्य़ आहे. प्रवासवर्णनं आहेत. लोकप्रिय परदेशी आणि देशी टीव्ही शो, नामांकित हिंदी-इंग्लीश चित्रपट, गाजलेली पुस्तकं या सार्‍यांचं परिक्षण यात आहे. बहुतेक लेख आटोपशीर, मोबाईलच्या एका स्क्रीनवर मावणारे कारण रश्मीचं कॉर्पोरेट गणित अगदी पक्कं आहे.
इंजिनीयर झालेल्या वा होऊ घातलेल्या तमाम मुलींनी ’बन्नो तेरा बी-टेक लागे सेक्सी’ हा रश्मीचा लेख अवश्य वाचावा. एनआरआय मुलगा पटकवायला सोपं जावं म्हणून, समाजात पत वाढविण्यासाठी, केवळ करियर करण्य़ासाठी की इतर पदवीधरांपेक्षा वेगळी तांत्रिक समज आणि उंची गाठावी म्हणून! नक्की कशासाठी आपण ही पदवी घेत आहोत याचं आत्मपरिक्षण केलं तरच करिअरच्या गगनाला गवसणी घालता येते हे रश्मी या लेखात सडेतोड पण खुसखुशीत शब्दात सांगते.

बर्‍याच लेखातून तिचे बी-स्कूल चे अनुभव समोर येतात. केबीसी शो मागचं अर्थकारण ती मांडते. पदव्या खिरापतीसारख्या वाटणार्‍या शिक्षण पद्धतीवर ताशेरे ओढताना ती पदवीपलीकडच्या जीवनशिक्षणावर भर देत लिहिते, "कायम पहिलं येणं म्हणजेच यश नव्हे. दुसरं येणं ही त्याआधीची महत्वाची पायरी आहे हे समजून घेऊन पुढच्या संधीसाठी तुम्ही स्वत:ला अधिक सक्षम करणार की नाही!". मास्टरशेफ या मूळ ऑस्ट्रेलियन टीव्ही कार्यक्रमाचं उदाहरण या संदर्भात देत ती लिहिते," सामान्यांना त्यांच्यातलं असामान्यत्व शोधायला उद्युक्त करणं हे या शो चं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य. मर्यादित साधनांमध्ये, ठराविक वेळेत ध्येय गाठण्यासाठी ज्या विजीगिषु पद्धतीने स्पर्धक आव्हान स्वीकारतात, चुकतात, थकतात, पुन्हा प्रयत्न करतात, धडपडतात आणि अंतिमत: खोलवर लपलेला आत्मविश्वास खेचून बाहेर काढतात तो आत्मशोधाचा क्षण म्हणजेच परिपूर्ती नाही का! मग तुम्ही ती स्पर्धा जिंकता की नाही हे तितकसं महत्वाचं नाही. तुम्ही जिंकलेलेच असता. यशस्वी व्हायचं तर पदव्या आणि प्रमाणपत्राच्या पलीकडे जाऊन आयुष्यात काय काय करायला लागतं त्याची ही एक सुरेख झलक आहे."

फ्लिपकार्ट #Flipkart आणि मैंत्रा या कंपन्या मर्ज झाल्या. दोन्ही कंपन्यांचे मालक बंसलच. या पार्श्वभूमीवर आऊटलुकसाठी लिहिलेला ’बी फॉर बफे, बी फॉर बंसल’ हा तिचा लेख धमाल आहे. विशेषत: नवलेखकांनी तिच्या पुस्तकांच्या जन्मकथा वाचायलाच हव्यात. तिची पुस्तक परिक्षणे म्हणजे ’व्यामिश्र अनुभूती’ टाईप शब्दातली समीक्षा नसून गप्पाटप्पा आहेत. ती ओड टू इंडिया हे विडंबन काव्य लिहिते. नेमक्या शब्दात प्रवासाबद्दल लिहिते. उदा: केरळ काय चीज आहे हे तिच्या या ४ ओळीतून कळतं. "इतकं सुंदर आणि स्वच्छ बॅकवॉटर, मग स्थानिक लोक त्यांचा कचरा कुठे बरं टाकत असावेत. आपण उर्वरित प्लास्टिकबॅग प्रेमी भारतीय चार बर्‍या गोष्टी केरळकडून आजवर का शिकलो नाही?, केळं वाफवून, काचर्‍या तळून किंवा परतून कसंही खा. उत्तम लागतं, केरळ म्हणजे सोनं, सोनं, आणखी सोनं, केरळमधल्या बसेसना काचेच्या खिडक्या नाहीत! सदानकदा आंदोलन करणार्‍यांनी त्या शिल्लक ठेवल्या नसाव्यात."
एनसीपीए ला पाहिलेल्या वुडहाऊसच्या पात्रांवरचं नाटक, लिलेट दुबे, नसीरुद्दीन शाह सारख्यांची चर्चेतली नाटकं याबरोबरच स्पॉटलाईट, लिंकन, शेफ असे बरेच हॉलिवूड सिनेमे किंवा दंगल, भाग मिल्खा भाग या सारखे भारतीय मातीतले चित्रपट, अशा कितीतरी कलाकृतींवर इथे झकास लेख आहेत. रश्मी म्हणते, "भारतीय प्रेक्षकांना स्वयंप्रकाशी काजव्यासारख्या सत्यापेक्षा त्याचं भव्यदिव्य सादरीकरण जास्त भावतं. ’कहानी मे ट्विस्ट’ तर असलाच पाहिजे. मग मुळात अंतिम शर्यतीत कधीही मागे वळून बिळून न पाहिलेल्या मिल्खा सिंगला त्याची हार सुद्धा ’हटके’ वाटावी म्हणून पडद्यावर तसं करावं लागतं. मेरी कोमच्या बॉक्सींग विश्वस्पर्धेच्या वेळी प्रत्यक्षात घराच्या अंगणात मजेत बागडणार्‍या तिच्या मुलाला, पडद्यावर मात्र त्याची आई जगज्जेतेपदासाठी झुंज देत असताना कंपल्सरी गंभीर आजारी पडून प्राणांशी झुंज द्यावी लागते. काय सांगता यापेक्षा कसं सांगता हेच मह्त्वाचे." पुढे रश्मी मिस्कीलपणे लिहिते," मलाही कधी कधी माझ्या पुस्तकातल्या लहान मोठ्य़ा उद्योजकांना थेट सुपरमॅन बनवून टाकावसं वाटतं. पण मंडळी कल्पनाराज्यातला विहार अल्पजीवी असतो. स्वत:ची जमीन निर्माण करून त्यावर स्वत:ची मोहोर उमटवण्यातलं थ्रील उमगणं हे खरं जगणं."

रश्मी मोकळेपणाने सांगते," मी मध्यमवर्गातून आले आहे. मध्यमवर्ग म्हणजे मूल्य जपणं, चौकटीत जगणं आणि जपून खर्च. आज माझी राहणी तितकीशी साधी नाही. जीवनमान बदललय. मला भरपूर पैसा हवा आहे पण तो योग्य तिथेच खर्च व्हावा याचं भान मला आहे कारण मूल्यबैठक तीच आहे. मी आता एका नव्या मध्यमवर्गाची प्रतिनीधी आहे याचा मला अभिमान वाटतो."
रश्मी यशस्वी लोकांची उदाहरणं खूप देते पण उद्योगविश्वातल्या, आस्थापनेपासून उत्पादन निर्मितीपर्यंत आणि दर्जा तपासणीपासून विपणनापर्यंतच्या प्रवासात येणार्‍या दैनंदिन समस्या कशा पद्धतीने सोडवायला हव्यात याबद्दल रश्मीच्या लेखनातून फार काही हाती लागत नाही असा आक्षेप तिचे टीकाकार घेतात. रश्मी त्यावर म्हणते, "हे अडथळे स्थळ-काळ-व्यक्तीपरत्वे बदलतात. तेव्हा दृष्टीकोन बदला. सकारात्मक व्हा. फक्त उद्याच्या वर्तमानपत्रातल्या मुख्य बातमीत नाव झळकावं म्हणून धडपडण्यापेक्षा असं काही तरी करा की इतिहासातलं एक तरी पान तुमच्या नावे लिहिलं जाईल."