Friday, February 13, 2015

जनरेशन गॅप - प्रेम म्हणजे


" किताबोसे जो जाती राबता था..आज टूट गया है.. लेकिन ..किताबे गिरने उठाने.. के बहाने जो रिश्ते बनते थे .. उनका क्या होगा.." कवी गुलजार सहज शब्दात एक वस्तुस्थिती सांगून जातात. आजच्या इंटरनेट युगात पुस्तकं आपल्याला दुरावलीत, साहजिक त्यांच्यामुळे जुळणारी नाजूक नातीही संपली. अर्थात ती नाती सोशल नेटवर्किंग, कॉलेजमधलं गॅदरिंग अशा वेगवेगळ्या माध्यमातून जुळत असतात पण पुस्तकांनी दिलेला भक्कम वैचारिक पाया या नात्याला कुठून मिळणार! कालच्या पिढीतल्या कित्येकांचं समंजस प्रेम नैतिक दडपणामुळे अव्यक्त राहिलेलं तर कित्येकांचं आर्थिक, सामाजिक तफावतींमुळे वडीलधार्‍यांनी अस्वीकृत केलेलं.

आजची पिढी या बाबतीत बिनधास्त आहे. बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड ,ब्रेकअप हे शब्द सर्रास वापरणारी. मात्र आजच्या पिढीला खरच ’प्रेम’ या शब्दाची उंची, खोली आणि व्याप्ती धड कळते तरी आहे का! प्रेमातला गोडवा, त्यातली हुरहूर, त्यातली असोशी आणि त्याचं गांभीर्य....यातलं किती झिरपतय आजच्या पिढीपर्यंत! ’प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमच आमचं सेम असतं’ असं कवी पाडगावकर म्हणतात. प्रत्येक पिढीची ’प्रेम’ ही भावना, गाभ्यामधे ’सेम’ असेलही पण प्रेमाकडे पाहण्याची पिढीनुसार बदलणारी मानसिकता समजून घ्यायची असेल तर चित्रपटगीतं ऐकावीत. ’छोड दो आचल, जमाना क्या कहेगा’ अशी तेव्हा धीट पण आता मर्यादशील वाटणारी प्रेमगीतं केव्हाच कालबाह्य झाली. ’बाहोमे आ सोणीये बस एक रात के लिये..तू मेरा हीरो’ अशी आजची गाणी आहेत. ’जनम जनम का साथ ’ वरून ’बस एक रात’ म्हणजेच ’चले तो चांद तक..नही तो शाम तक’ इथपर्यंत प्रेम या संकल्पनेची व्याख्या ठिसूळ होत जाताना दिसतेय. बॉयफ्रेंडने फेसबुक वरील त्याचे ’कमिटेड’ हे स्टेटस बदलून ’सिंगल’ असे केले. हा ’धक्का’(!) सहन न होऊन अभियांत्रिकीच्या एका विद्यार्थिनीने मध्यंतरी आत्महत्या केली. आपण अपलोड केलेल्या फोटोला मिळणारे लाईक्स आणि ’कमेंट’ हा आता मुलांसाठी जणू जीवनमरणा इतका महत्त्वाचा प्रश्न झाला आहे. एकतर्फी प्रेमातून घडणार्‍या हल्ल्यांच्या, मैत्रिणीच्या नकळत तिचा व्हिडीओ रेकॉर्ड करून तिला अंकित करायचे एक शस्त्र म्हणून तो वापरल्या जाण्याच्या घटना वाढत आहेत.

या सगळ्यामागे कारण एकच.. प्रेम, मैत्री आणि शारिरीक आकर्षण या शब्दांमधल्या सीमारेषा अपरिपक्व वयातील मुलांना स्पष्ट समजलेल्या नाहीत. ते नातं तुटलं की त्याचे परिणाम अभ्यास, करियर, घर यावर तर होतातच पण त्या व्यक्तीला आयुष्यभर भोगावे लागतात. आजच्या पिढीला सांगायला हवंय की ’प्रेमात पडणं’ ही आयुष्यातली अत्यंत सुंदर आणि महत्वाची घडामोड असली तरी प्रेम म्हणजेच आयुष्य नव्हे. कवी संदीप खरे दोन ओळीत  प्रेमाचे सार सांगून जातात..
’प्रेमात म्हणे आरंभ गोड अन अंतापास विराणी
जो बुडालेला तो तरलेला, तरला तो बुडला, राणी’
प्रेमाची पहिली पायरी त्यागाची असते. आयुष्यातल्या प्राथमिकता ओळखून मनाला जीवनाशी जोडण्याचे जे नैसर्गिक नियम असतात ते पाळले गेले तर ते खरे प्रेम. जिथे नकारात्मकता असते, प्रेम दूर जाण्याची सतत भिती असते, स्वत:मधल्या त्रुटी स्वीकारून नकार पचवण्याची ताकद नसते, ते प्रेम नाहीच असे अभ्यासक म्हणतात. मुलांनी स्वत:लाच प्रश्न विचारावा, हे फक्त आकर्षण तर नाही? यात आपला स्वार्थ आणि अहंकार तर दडलेला नाही ना? प्रतिसादाचा अट्टाहास तर नाही? कुठल्याही परिस्थितीत आपण एकमेकांना साथ देऊ शकू का? नसाल तर पुढचं पाऊल टाकू नका कारण तुम्हाला प्रेम म्हणजे काय हे अजून समजलेलं नाही.

 दोष फक्त तरूणाईचा नाही. प्रेम या कल्पनेभोवती माध्यमातील जाहिरातींच अर्थकारण केंद्रित झालं आहे. प्रेमाच्या वेष्टनात गुंडाळून जर एखादं उत्पादन बाजारात आलं तर ते हातोहात खपतं. साहजिकच आजच्या पिढीला आपल्या आजूबाजूला फक्त प्रेमाचं फास्टफूडसारखं ’इन्स्टंट’ स्वरूप दिसतय. पालकांनी मुद्दाम वेळ काढून माध्यमांवरून कोसळणार्‍या माहितीतून नेमके काय घ्यायचे, कुठे थांबायचे हे मुलांना सांगायला हवे. पौगंडावस्थेतील मुलांशी लैंगिक शिक्षणाबाबत बोलायला संकोच वाटत असेल तर kidshealth.org सारख्या अनेक संकेतस्थळांची, वैद्यकीय तज्ञांची, समुपदेशकांची मदत घ्यायला हवी. बाहेरून चुकीची माहिती मिळण्यापेक्षा योग्य ती माहिती मुलांना योग्य पद्धतीने दिली तर ’धोक्याची वळणं’ नीट पार करता येतील. मुलांमधे या वयात साठून राहिलेली प्रचंड उर्जा एखाद्या चांगल्या उद्देशाकडे, छानशा छंदाकडे वळवता आली तर बसता उठता प्रेमात पडण्यापेक्षा अधिक उदात्त ध्येय त्यांच्या आयुष्याला लाभेल. त्यातूनही प्रेमात पडलीच तर निदान ही मुलं या भावनेला पुरेशा गांभीर्याने समजू शकतील, कारण प्रेम नावाचं वादळ आयुष्यात काही परवानगी घेऊन येत नाही. मात्र त्यांना हे कळेल..की फक्त whatsapp वर एकमेकांना गुलाब पाठवण्याइतकं प्रेम सोपं नाही, उठसूट ’लव्ह यू, हेट यू’ म्हणण्याइतकं बालीश नक्कीच नाही.

प्रेम म्हणजे अनावर ओढ हे तर खरच पण तेवढच नाही, प्रेम एकमेकांचा आदर, प्रेम म्हणजे सन्मान, प्रेम म्हणजे काळजी, प्रेम म्हणजे एकमेकांच्या साथीने रूजणं आणि वाढणं, प्रेम म्हणजे विश्वास, प्रेम म्हणजे तपस्या.. आयुष्यातल्या एकेका अनुभवाबरोबर ही व्याख्या प्रगल्भ होत, बदलत जाते, त्याची अंतिम व्याख्या होऊ शकत नाही कारण ही भावनाच मुळी शब्दांच्या पलीकडली आहे.

Friday, January 30, 2015

जनरेशन गॅप - माध्यमं


सणाच्या दिवशी घरात आणलेला श्रीखंडाचा डबा उघडून त्याचा आस्वाद घेणार तोच त्या छोट्या मुलाला आई दटावते," तुला कितीदा सांगितलय, आधी फोटो काढायचा, अपलोड करायचा मग खायचं". हा बोचरा विनोद बहुतेकांनी ऐकला असेल. बुडत असलेल्या माणसाला वाचवायचं सोडून त्याचा व्हिडीओ काढणा‍र्‍या किंवा त्या पार्श्वभूमीवर ’सेल्फी’ काढणार्‍या महाभागाच व्यंगचित्र देखील पाहण्य़ात आलं असेल. ही काहीशी टोकाची परिस्थिती मानली तरी हे मात्र खरं की गेल्या पिढीत मिडीया अर्थात माध्यमांचं आयुष्यातलं स्थान हे जेवणातल्या चटणी कोशिंबीरीएवढं होतं.

आताच्या पिढीचं तर आयुष्यच माध्यमकेंद्री झालेलं आहे. माध्यमांच्या या विस्फोटामुळे माणूस माणसापासून दुरावला, वाचनसंस्कृती लोप पावली, सायबर गुन्हेगारी वाढली असे आरोप आजच्या पिढीवर होत आहेत. त्यात काही अंशी तथ्य असले तरी खरं तर ही दोन पिढ्यातील वैचारिक आणि सांस्कृतिक तफावत ज्याला आपण जनरेशन गॅप म्हणतो, त्याची निष्पत्ती आहे. (उदाहरणार्थ एके काळी रेडिओ ऐकणारा तरुण ‘वाया गेलेला’ मानला जात असे हे आज हास्यास्पद वाटते.) तंत्रज्ञानाला नेमकं कसं सामोरं जावं, कसं हाताळावं, त्याचे भलेबुरे परिणाम काय हो ऊ शकतात हे कळायच्या आत ते वेगाने माध्यमांमार्फत आपल्यावर येऊन आदळलं हे या अपरिपक्वतेमागचं मूळ कारण लक्षात घ्यायला हवं.

१४५० साली गटेनबर्गने छपाईयंत्र बनवले. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात दूरसंदेश(telegraph) दूरध्वनी (telephone) व छायाचित्र (photography) असे तीन महत्वाचे शोध लागले. ल्युमिए बंधूंनी बनवलेला कॅमेरा,जॉन लोगी बेअर्डने केलेले दूरचित्रवाणीचे प्रात्यक्षिक ह्या महत्वाच्या घडामोडींमुळे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात नभोवाणी आणि दूरचित्रवाणी प्रस्थापित झाली. या सुमारास आपला देश स्वातंत्र्यलढ्य़ात गुंतलेला होता. साहजिक भारतात कोणतेही तंत्रज्ञान पोचायला बराच कालावधी जावा लागला त्यामुळे विकसित राष्ट्रे जशी तंत्रज्ञानाच्या बरोबरीने भौतिक प्रगती करत गेली तसे आपले झाले नाही. तंत्रज्ञान तयार मुलासारखे हातात दिल्याने त्याच्याशी आपली नाळ जुळलेली नाही, त्याच्याशी नाते जुळायला आणखी वेळ लागणार तोवर थोडॆफार सामाजिक आणि सांस्कॄतिक धक्के बसणार. माध्यमं आणि आजची पिढी एकमेकांसह जगायला अद्याप शिकत आहेत. खरा संवाद फक्त भेटल्यावरच होतो, असं आजची पिढी आता मानत नाही. कॉलेज, क्लासेस, नोकरी, व्यवसाय सांभाळण्य़ाच्या धावपळीत घर, नातेवाईक, मित्रपरिवार यांनाही जपायचं हा तोल सोपा नाही. मग व्हॉटसअॅप किंवा सोशल मिडीया हा आधारच नाही का. कधी गप्पा, कधी मस्करी, कधी चर्चा, इमोजी हे ’व्यक्त होणंच’ आहे. सोशल मिडियाच्या व्यासपीठानं सर्वसामान्य व्यक्तीला व्यासपीठ मिळवून दिलं. याचा सकारात्मक वापर करून जगात आणि देशात नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी अनेक आंदोलने यशस्वी केली. पिकासा, फोटोबकेट सारख्या फोटो शेअरिंग साइट्सवरुन जगभरात छायाचित्रांची देवाणघेवाण सुरू असते. वेगवेगळ्य़ा विषयांवर ब्लॉग लेखन करण, लेखावर प्रतिक्रियेच्या द्वारे चर्चा करणं यातून उलट आजची पिढी अधिक संवादी हो ऊ लागली आहे.

 मागची पिढी अधिक वाचन करायची पण ती पिढी ’काय’ वाचायची हे ही पाहायला हवे. वाचन फक्त आजच्या पिढीने करावं अशी अपेक्षा करणारी मागची पिढी, टीव्हीला खिळल्याने आपलं वाचन कमी झाल्याची कबुली देत नाही. वाचनाच्या स्वरूपापेक्षा पुस्तकांशी संपर्क येणं हे जास्त महत्त्वाचं नाही का! मौखिक परंपरेपासून छापील पुस्तकांपर्यंत आणि आता ई बुक, ऑडीओ बुक, वर्तमानपत्रांचे अ‍ॅप्स किंवा किंडल पर्यंत माध्यम बदलत वाचन पुढे जातेच आहे. थोड्क्यात आज वाचनसंस्कॄती लोप पावत नसून बदलते आहे इतकेच. ई-साहित्य संमेलनांसारखे सुखद बदल होत आहेत. मात्र आजची पिढी ही सादरीकरणाकडे जितके लक्ष देते तितके आशयाला देत नाही. कार्यक्रमाची बौद्धिक पातळी कमी ठेवली की प्रेक्षकसंख्याही वाढते. बाईटस (त्वरित प्रतिक्रिया) देण्य़ाच्या नादात अविचारीपणे, अभ्यास न करता मते मांडण्य़ाचे खूळ लागते. यामुळे माध्यमे ‘पोकळ’ होऊ लागली आहेत. शिवाय त्यांच्यावर अभारतीय भांडवलशहांची मालकी असल्याने ’काय दाखवावे’ याची सूत्रे त्यांच्या हातात आहेत. त्यांच्या (अ)नैतिकतेच्या व्याख्या भारतीयांवर सतत लादल्या जात आहेत. भारत हा ’देश’ म्हणून एकसंध राहण्य़ाऐवजी बाजारपेठ कसा बनून राहील यातच त्यांना जास्त रस आहे. या सगळ्य़ात आजच्या पिढीचा वैचारिक गोंधळ होतो आहे. त्याची परिणीती माध्यमांचा उपयोग अफवा, अंधश्रद्धा, अश्लीलता पसरवण्यासाठी किंवा अगदीच बाळबोध पणॆ करणार्‍यांची संख्या वाढण्यात होते आहे.

 ही समज खर तर ज्यांनी वाढवायची ती मागची पिढी आत्ता कुठे तंत्रज्ञान वापराचे धडे आजच्या पिढीकडून बिचकत बिचकत घेते आहे. त्यांचा यात दोष नाही पण मग तंत्रज्ञानाबरोबरच हवे नको निवडण्याची समज विकसित करणार कोण? त्यासाठी शालेय स्तरापासून प्रशिक्षण द्यायला हवे आहे. योग्य सायबर वापरासह, कायद्यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोचवायला हवी आहे. पारंपारिक माध्यमे आजही जगण्याला आशय आणि प्रेरणा देत आहेत, त्यांचे जतन होणे अतिशय महत्वाचे आहे. माध्यमांच्या झंझावातात मूल्ये उन्मळून पडायला लागली असतील तर ती जपण्याची आणि स्वानुभवावरून शहाणं होऊन भावी पिढीला माध्यमांसह जगण्याचा विवेक शिकवण्य़ाची जबाबदारी आता आजच्या पिढीची आहे. तरच या भरकटलेपणातून आपण हळूहळू सावरू शकू. मग माध्यमांनी हिरावून घेतलेले आपल्या आयुष्याचे सुकाणू पुन्हा आपल्या हातात येऊ शकेल.
 ------------------------------------------------------------------------------------------------------

Friday, January 16, 2015

जनरेशन गॅप - करियर


जनरेशन गॅप अर्थात पिढ्यांमधील दरी यावर आधारित हा स्तंभ लिहीता लिहीता जाणवले, एकाच व्यक्तीच्या मनात देखील स्वत:च्या जीवनातल्या ट्प्प्यांबाबत अशी दरी असते. वयपरत्वे अनुभवांती आपल्या सवयी, आवडीनिवडी , आचार-विचार अगदी मूल्य आणि श्रद्धा देखील बदलत जाताना दिसतात. मग जर स्वत:तले बदल आपण सहजतेने स्वीकारत पुढे जातो तर पिढ्यांमधील अंतराकडे आपण सहज वृत्तीने का पाहू शकत नाही. पालक होतेवेळेस आपली जी काय वैचारिक- मानसिक घडण झालेली असते ,त्याच मुशीत आपण मुलांना बसवू पाहतो. खर तर कालांतराने आपण पुन्हा बदलतो आणि मागे वळून पाहताना ’तेव्हा आपलं जरा चुकलच’ असं वाटू लागतं, तोवर उशीर झालेला असतो.

 मुलांचं करियर हा आजच्या पालकांच्या दृष्टीने सर्वात संवेदनशील मुद्दा. स्वातंत्र्योत्तर पिढीला विनासायास नोकर्‍या मिळाल्या. पुलं च्या भाषेत सांगायचे तर, लोक एकदा का बँकेतल्या किंवा पोस्टातल्या नोकरीला चिकटले की तिथेच जन्म काढून मुलाला ’ग्रॅज्युएट’ करून आणि मुलीला ’उजवून’ घराला ’श्रमसाफल्य’ वगैरे नाव देणॆ हीच आयुष्य़ाची इतिकर्तव्यता मानत असत. मधल्या पिढीला त्यामानाने थोडा संघर्ष करावा लागला परंतु तोवर करियर हा शब्द अपवादानेच वापरला जायचा. आता मात्र तो परवलीचा शब्द झाला आहे. करियरची खरी व्याख्या, ’आवडीच्या क्षेत्रात झोकून देऊन कार्य करणॆ’ अशी आहे. व्यवहारात मात्र ’लठ्ठ पगाराची नोकरी किंवा भरपूर नफा देणारा व्यवसाय’ म्हणजे करियर असे गृहीत धरले जाते. "पैसा कमावणे हे ध्येय असू नये असे नाही, उलट ते अतिशय महत्वाचे आहे पण ते एकमेव ध्येय नसावे. आयुष्यात नाती, छंद, कला, वाचन, सामाजिक भान, पर्यटन एकूणच जीवनानुभवांना मह्त्व नसले तर माणसात आणि यंत्रमानवात फरक तो काय" असे सांगणार्‍या पोस्ट्स पालक वाचतात, फक्त फॉरवर्ड करतात. जावई निवडताना मात्र तो शक्यतो ’आयटी’ तला असावा याची ते काळजी घेतात आणि मुलगा भलत्याच क्षेत्रात जाऊ नये याचीही. त्यासाठी ते खूप कष्ट घेतात. त्या बदल्यात, दहावीपर्यंत मुलाने अबॅकस पासून स्केटींग पर्यंत सर्व क्लासेस करावे, शिवाय भरपूर मार्क्स मिळवून चांगल्या कॉलेज मधे प्रवेश मिळवावा, मग एकामागून दुसर्‍या ट्य़ूशन ला धावावे शिवाय आय आय टी किंवा तत्सम परिक्षांची तयारी करावी, बारावीला त्याहून चांगले गुण मिळवून इंजिनीयर वा डॉक्टर व्हावे (आणि स्कॉलरशीप वर परदेशी जाता आले तर मग गंगेत घोडॆ न्हाले.) अशा त्यांच्या ’सामान्य’ अपेक्षा असतात. पालकांच्या दृष्टीने यात चूक काय! चूक एकच, मुलाची कुवत समजून न घेणे. या अपेक्षा पूर्ण न करू शकलेली एक खंतावलेल्या मनाची पिढीच्या पिढी त्यातून घडते आहे. इतर अनेक कला कौशल्ये या मुलांमधे असू शकतात पण साचेबद्ध अपेक्षांच्या चक्रात प्रवाहाविरूद्ध काही करण्य़ाचे त्यांना भय वाटू लागते. अशी ’हरलेल्या मनाची’ मुले मूठभर जिंकलेल्या(!) मुलांकडॆ असूयेने पाहत जमेल ते काम करत आयुष्य रेटत राहतात.

हे बदलायचे तर करियरच्या वेगवेगळ्य़ा पर्यायांचा पालकांनी मनमोकळा स्वीकार केला पाहिजे. आंतरिक सुख आणि भौतिक गरजा यांचा सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न मुलांच्या हातात हात घालून केला पाहिजे. प्रख्यात विचारवंत जे. कृष्णमूर्ती पालकत्वाकडे अतिशय उंचावरून पाहतात. ते विचारतात की, आपल्याला मुले कशासाठी हवीत हा प्रश्न आई-वडील स्वत:ला कधी विचारतात का. आपले नाव पुढे चालावे, आपल्या इस्टेटीस वारस लाभावा एवढ्यासाठीच बहुतेकांना मुले हवी असतात. आपल्या समाधानाचे, आपली भावनात्मक गरज भागवण्याचे एक साधन अशीच मुलाकडे बघण्याची आपली दृष्टी असते. आपण मुलाकडे आपल्या स्वप्नपूर्तीचं अवजार म्हणून पाहाणं आधी बंद करू या. मुलाला समजावून घ्यायचे तर त्यात धिक्काराचा भाग त्यात येता कामा नये. त्या नात्यातही सन्मानच असायला हवा. कृष्णमूर्ती म्हणतात, पालक ज्याला प्रेम म्हणतात ते मालकी हक्काचेच दुसरे नाव आहे. आपल्या मुलावर प्रेम करणे म्हणजे त्यांचे मन समजावून घेणे, ज्यायोगे त्यांची मने संवेदनशील होतील असे शिक्षण त्यांना देणे, त्यांच्या व्यक्तित्वात सुसंवाद होईल अशी जीवनदृष्टी त्यांना देणे. त्या आधी ती पालक म्हणून स्वत:त निर्माण करणे. त्यांचे विचार वाचल्यावर लक्षात येते की, आपल्या संस्कार, प्रेमाच्या कक्षा किती सीमित आहेत.

अब्राहम लिंकन यांनी गुरूजींना लिहीलेल्या पत्रात फक्त क्रमिक नव्हे तर जीवन शिक्षण देण्याचं आवाहन केलं आहे. या पातळीवर आपण आपल्या मुलातील परिवर्तन कधी बघतच नाही. जगात प्रेम, सद्भाव निर्माण करण्याची त्याचीही जबाबदारी आहे, समाजाप्रती त्याला उत्तम बांधीलकी जपता यायला हवी, साहित्य कलेतही त्यानं रमावं, भरभरून जगावं इतका उदात्त विचार आपण ’पॅकेज’ या शब्दात अडकल्यामुळे करूच शकत नाही. आपण केवळ आजच्या समाजमान्य प्रतिष्ठित पदांवरच मुलांनी जावे यासाठी धडपडत असतो. तुम्ही म्हणाल हे तत्त्वज्ञान मान्य असलं तरी शेवटी समाज ,’तुमचा मुलगा काय करतो’ हेच विचारणार ,’तुमचा मुलगा कसा आहे’ हे नव्हे, त्याचं काय? खरय, अशा वेळी पालक म्हणून आपण करायचं याचं उत्तर खलिल जिब्रानने त्यांच्या एका कवितेतून दिलं आहे...
 "तुम्ही सांभाळा मुलांचं शारीर अस्तित्व पण अधिराज्य नका गाजवू त्यांच्या आत्म्यावर
तुम्ही आहात केवळ एक धनुष्य ज्यातून सुटतील हे चैतन्याचे तीर
उद्याच्या दिशेनं
तो धनुर्धारी दोरी ताणेल तेव्हा वाका आनंदानं ! बस इतकच !"