Thursday, February 9, 2012

वाचीत जावे


प्रसंगी अखंडीत वाचीत जावे

जगज्जेत्या अलेक्झांडरचा पराक्रमी सरदार शत्रूची छावणी उद्ध्वस्त करून परतला व अलेक्झांडरला अभिमानाने म्हणाला, "शत्रूचे सैनिक, राजवाडे, पागा सगळे आम्ही बेचिराख केले; फक्त एक ग्रंथालय तेवढे यातून वाचले." अलेक्झांडर म्हणाला " ग्रंथ म्हणजे मानवी संस्कृतीच्या जतन संवर्धनाचे मूळ ! तेच त्या ग्रंथालयात सुरक्षित ठेवून आलात ! मग काय नष्ट केलेत तुम्ही!" ग्रंथसंगाचे महत्त्व सांगणारी ही घटना एका लेखात उद्धृत केली होती. मानवी संस्कृतीच्या उंचीचे मोजमाप होते ते वाचनसंस्कृतीने. जागतिकीकरणामध्ये जग झपाट्याने बदलतेय, त्याचे परिणाम सर्व गोष्टींवर होत आहेत. वाचनसंस्कृती त्याला अपवाद नाही. इलेक्‍ट्रॉनिक जगामध्ये तरुण पिढी वाचत नाही अशी खंत व्यक्त केली जाते. लिखाणात जसे बोरूपासून कीबोर्डपर्यंत तंत्र बदलत गेले तसे वाचनातही बदल होणारच. "केवळ पुस्तकातून वाचणे" म्हणजे वाचन असे न मानता आज इंटरनेट, मोबाईल, किंडलच्या माध्यमातून वाचन केले जात आहे. वाचायला वेळ नाही म्हणून वाचन टाळण्यापेक्षा ह्या बदलाची नोंद घेतली तर वाचनसंस्कृतीला नक्कीच उज्ज्वल भविष्य आहे.

मात्र हे पुरेसे नाही. काय वाचावे याचे भान भावी पिढीला असणे-देणे गरजेचे आहे. तरूणाईला एकूण ग्रंथप्रेमापेक्षा प्रेमग्रंथात जास्त रस आहे. एसएमएस, टाईमपास इ-मेल फॉरवर्डस वाचणे किंवा केवळ अभ्यासक्रमात असलेली पुस्तके वाचणे म्हणजे वाचन नव्हे. तुमची संगत कशी आहे, हे बघून तुम्ही कसे असाल याबद्दलचं मत लोक तयार करतात. अगदी तसंच पुस्तकांबाबत आहे. तुम्ही कुठलं पुस्तक वाचता, हे बघून तुमच्या ज्ञान आणि विचारांची किती खोली आहे, याची कल्पना येते. आज तुमच्याकडे जगात काय चाललं आहे याची सखोल माहिती असेल तर कुठलेही क्षेत्र सर करणे अवघड नाही. प्रत्येक यशस्वी व्यक्तीमागे नशीब नव्हे तर "पुस्तकं" उभी असतात. लहानपणापासून पुस्तकांबरोबरीने वर्तमानपत्र, वेगवेगळ्या विषयांवरची मासिकं वाचण्याचीही सवय असायला हवी. मग स्पर्धात्मक परीक्षांना बसताना आयत्यावेळी सामान्य ज्ञानाचं पुस्तक शोधण्याची गरज भासत नाही.

नव्या पिढीवर चांगले वाचनसंस्कार नाहीत असे म्हणताना मुळात आपण त्यांना ते दिले का याचा विचार करायला हवा. ईडिअट बॉक्स (दूरदर्शन) किंवा थाड्थाड गोळ्या घालुन शत्रुला संपवायला शिकवणारे व्हिडिओ गेम्स याच्या आभासी दुनियेत वाढ्णारी मुलं पाहून पालक धास्तावतात. यावर संस्कार हाच उपाय, उत्तम साहित्याच्या वाचनाची सवय असेल तर तो आपसूक घडतो. धर्मग्रंथ समाजमन घडवतात तर संत साहित्य पुरोगामी डोळस विचार करायला शिकवते. चरित्रं, वंचितांच्या साहित्यातून आत्मभानासह माणूस जागा होतो तर कविता जीवनाला लय देतात. विनोदी साहित्य,विडंबने खिलाडू वृत्तीने जगायला शिकवतात तर प्रवासवर्णनातून जगाकडे विहंगम दृष्टीने बघता येते. थेट किंवा अनुवादाच्या माध्यमातून पोचणारे वैश्विक साहित्य इतर संस्कृतींशी आपला परिचय करून देते,जाणीवा प्रगल्भ करते. आपल्या देशाचाच नव्हे तर जागतिक उलथापालथींचा इतिहास, वर्तमान केवळ वाचनाच्या मदतीनेच आपल्याला समजू शकतो. साहित्य ललित आहे की वैचारिक, स्त्रियांसाठी आहे की पुरूषांसाठी, आहे रे गटाचे आहे की नाही रे गटाचे असे भेद न मानता ते सकस असावे या निकषावर त्याचा मोकळेपणे स्वीकार केला तर जगणे समृद्ध होईल. क्षणभर हे सगळं बाजूला ठेवलं तरी वाचनामुळे जगण्यात एक ’गंमत येते’ आणि ती फक्त आपली -आपल्यासाठी असते, म्हणून तरी वाचून पाहायला हवं.

विचारांना दिशा देणारं शब्दभांडार मुलांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न आवर्जून व्हायला हवा. निबंध ही पाठ न करता वाचनातून भिनलेल्या विचारांची अभिव्यक्ती आहे हे जाणवले तर मुलांना लिहावेसेही वाटू लागेल. भेट म्हणून पुस्तक देणे, खास प्रसंगी पुस्तके विकत घेणे, स्वत: वाचणे, जमल्यास वाचून दाखवणे ही पालकांची जबाबदारी आहे. शक्य असल्यास तुमचा वैयक्तिक ग्रंथसंग्रह असावा, नसल्यास निदान वाचनालयाचं सभासदत्व घ्यायला हवं. पुणे शहरात पहिले ग्रंथालय झाले तेव्हा लोकहितवादींनी "ग्रंथ म्हणजे हजार जिव्हा" असे म्हटले होते. आजच्या ग्रामीण जीवनात सुधारित तांत्रिक युगाचा परिणाम दिसू लागला आहे. मोबाईल, डिश टीव्ही सगळीकडे दिसत आहेत, त्या मानाने वाचनालयांची वानवा आहे. प्रत्येक गावात एक तरी वाचनालय असणे, वृत्तपत्रं पोचणे आवश्यक आहे. त्यामुळे जगाचा अभ्यास करत असताना स्वतःची ओळख होईल. आपण कुठे आहोत, कुठे जायचे आहे याची दिशा निश्चीत होईल. विकासाला वय नसते, त्यामुळे तुम्ही प्रौढ असलात तरी वाचनाचा व्यासंग वाढवत राहिले पाहिजे. वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी ग्रंथोत्सवाची गरज आहे. ‘पुस्तक भिशी’ सारख्या योजनांची गरज आहे. समाजातील सर्व स्तरावर ज्ञानाची भूक जागृत व्हायला हवी,ती शमवायला गावोगावी पुस्तके पोहोचायला हवी. दर्जेदार प्रकाशकांनी एकत्र येऊन यासाठी यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे. चंद्रपूरला नुकतेच साहित्य संमेलन झाले. या निमित्ताने भरविण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनातून विविध लेखकांची, विविध विषयांवरची सुमारे तीन कोटी रुपयांची पुस्तक खरेदी झाल्याचे वृत्त उभारी देणारे आहे.

या वाचनाच्या धडपडीतून काय साध्य करायचे हे समर्थ रामदास स्वामींनी पूर्वीच सांगितले आहे...
"दिसा माजी काही तरी ते लिहावे | प्रसंगी अखंडीत वाचीत जावे ||
जे जे आपणासी ठावे | ते ते इतरांसी शिकवावे | शहाणे करुन सोडावे सकल जन ||"
आपण काही ’चला, आता आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करुया’ असल्या भाबड्या भावनेने वाचत नसतो. पण आपल्याही नकळत पुस्तकं आपल्याला केवळ शिकवत नाहीत, ती जोजवतात, रमवतात, शब्दलालित्याने चकित करतात, आपले बोट धरून अनोख्या विश्वाची सफर घडवून आणतात, मित्र बनतात, एकटेपणातही साथ देतात, सर्वार्थाने घडवतात, श्रीमंत करतात.

पूर्वप्रकाशित- मातृभूमि

Thursday, January 26, 2012

याचना


भारतातील कोणत्याही सार्वजनिक स्थळी जा, भिकार्‍यांचे जत्थे आढळून येतात. विमानतळ असो वा देऊळ, रेल्वेप्रवास असो किंवा एखादे पर्यटनस्थळ भिकारी असणारच. कधी करूणेपोटी, कधी वैतागाने, कधी "आपण सुदैवी असल्याच्या अपराधी भावनेतून" त्यांना भीक दिली जाते.
भीक मागायची वेळ येणं ही अगतिकतेची परिसीमा आहे. एका माणसाने आपल्यासारख्याच हाडामासाच्या दुसर्‍या माणसापुढे याचना करत हात पसरावेत या सारखे दुर्दैव नाही. पराकोटीची भूक, कधी शारिरीक हतबलता, असहाय्य वृद्धत्व किंवा उद्ध्वस्त करणारी आपत्ती माणसावर अशी वेळ आणत असेल तर याचनेला इलाज उरत नाही पण धडधाकट असून आळशी वृत्तीच्या माणसांनी खोटे व्यंग दाखवून, तान्हुल्यांचा वापर करून, देवादिकांचे फोटो दाखवून, भोंदू संस्थांचे कार्यकर्ते बनून भिकारी बनण्याचे पेव फुटलेले दिसते तेव्हा प्रत्येक संवेदनशील, राष्ट्रप्रेमी मनाला खंत वाटते. "कणव" हे हृदयातले एक सौंदर्यस्थळ आहे. दीनदुबळ्यांविषयी अनुकंपा वाटणे, आपल्या वर्तणुकीने कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेणे आणि जमेल तशी अगतिकांना मदत करणे हे सुसंकृत मनाचे लक्षण आहे. या भावनेलाच आपण माणुसकी म्हणतो. परंतु भीक आणि मदत यात फरक आहे. मदत याचकाला आयुष्यात नव्याने उभे राहता यावे म्हणून केली जाते तर भीक त्याला अधिकाधिक दुबळी, परावलंबी करते. ’असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ अशी आळशी वृत्ती त्यातून निर्माण होते.

स्वातंत्र्याला भारताएवढाच काळ लोटलेल्या बहुतेक राष्ट्रांच्या प्रगतीचा आलेख आपल्यापेक्षा चढता आहे. भारताएवढे भिकारी तेथे कधीही आढळून येत नाहीत. ती ही माणसेच आहेत. अपंगत्व, वृद्धत्व, नैसर्गिक आपत्तीतून त्यांचीही सुटका नाही पण तेथे लाचारी का आढळून येत नाही? उदा: जपानला अणुबॉंबने बेचिराख केले, जपान पुन्हा उभा राहिला. त्सुनामीने झोडपले, जपान पुन्हा उभा राहतो आहे, मुळातच कमी असलेली तेथील भिकार्‍यांची संख्या त्यामुळे वाढलेली नाही. हे खरे आहे की भारतासमोरचे प्रश्न वेगळे आहेत.परंतु शासनाने आजवर इतक्या योजना राबवल्या, नोकरशाहीतील भ्रष्टाचारामुळे त्या अतिशय परिणामकारकरित्या जनतेपर्यंत पोचल्या नसतीलही, तरीही इतक्या वर्षात परिस्थितीत फारसा बदल का होऊ नये! परोपजीवी म्हणजेच भिकारी वृत्तीचे लोक कमी का झाले नाहीत? कदाचित श्रमाचे महत्व इथे तितकेसे रूजले नाही.

भारतातील अनेक थोर व्यक्तींना गरिबीशी सामना करावा लागल्याचे इतिहास सांगतो. परंतु याचक न बनता ते स्वकर्तृत्वावर दाते बनले. संशोधनापासून कलाकृतींपर्यंत अनेक गोष्टी समाजाला देऊन त्यांनी तो समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन सामान्य जनतेमधे श्रमप्रतिष्टा, ध्येयासक्ती का रूजली नाही? एकत्र कुटंबाच्या उत्पन्नावर समान हक्क आहे, म्हणून एका भावाने राबावे आणि एकाने आयते खावे असे घडू लागले तर ते कुटुंब असो वा राष्ट्र, फार काळ आपला तोल सांभाळू शकत नाही. साम्यवादाच्या बाबतीत हेच घडले, साम्यवादाची सुरूवात झाली मानवतेच्या उदात्त भूमिकेतून..एकाच ईश्वराची आपण लेकरे मग कुणी श्रीमंत, कुणी गरीब असे का? संपत्तीवर समान हक्क असायला हवा.

वरकरणी हे योग्य वाटते पण संपत्तीच्या समान वाटपासाठी ती आधी निर्माण करावी लागते आणि त्यासाठी स्वतंत्र बुद्धीमत्ता आणि स्वयंप्रेरणा असावी लागते. ज्याने प्रयत्नपूर्वक ही संपत्ती मिळवली त्याने ती एखाद्या निष्क्रीय माणसाला समानतेच्या नावाखाली सारखी वाटायची असेल तर प्रयत्नवाद, जिद्द, ध्येयनिष्टा या शब्दांना अर्थच काय उरतो? हे वस्तुनिष्टावादाचे (ऑब्जेक्टीव्हीझम) तत्त्वज्ञान मांडणारी जगप्रसिद्ध अमेरिकन लेखिका म्हणजे अ‍ॅन रॅंड. सारे गरजेनुसार मिळणार आहे म्हटल्यावर जास्त गरजू कोण हे सिद्ध करण्याची स्पर्धा सुरू होईल, समाजाची कार्यक्षमता नष्ट होईल असे म्हणत साम्यवादाला ठणठणीतपणे विरोध करणार्‍या अ‍ॅन रॅंडने केलेलं भाकीत सोव्हीएट रशियाच्या विघटनाने खरं ठरलं. परावलंबी आणि दुसर्‍याच्या जीवावर बांडगुळा प्रमाणे जगणाऱ्या आयतोबांची कीव करणे चूक आहे हे अ‍ॅन रॅंडने परखडपणे जगा समोर मांडले. हे जग धडपड्या, कार्यक्षम लोकांनी घडवायचे आणि समानतेचा सोयीस्कर नारा देत फुकटया लोकांनी त्याची फळे खात बसायचे या वृत्तीचा अ‍ॅन रॅंडने काळाच्या पुढे जाऊन कडकडून निषेध केला होता. आजही समाजात अनेक बुद्धीजीवी ,कल्पक लोकांना त्यांच्या पेक्षा कित्येक पटींनी अकार्यक्षम, कामचलाऊ पद्धतीच्या सामाजिक वृत्तींशी झगडावे लागते आणि मग असे लोक निराश होऊन देश सोडून जातात किंवा तडजोड करून लायकी नसलेल्या लोकांच्या हाताखाली दुय्यम दर्जाचे काम करत राहतात. या तडजोडींमुळे नकळत देशाची प्रगती खुंटते. कामगार वर्ग तथाकथित बुद्धीवादी वर्चस्वाखाली भरडला जाऊ नये हे साम्यवादी तत्त्व त्या काळात काही अंशी लागू होत होते. परंतु आता केवळ औद्योगिक कामगार राहिले नसून नॉलेज कामगार आल्याचे प्रसिद्ध पाश्चात्य मॅनेजमेंट गुरु पीटर ड्रकर यांनी मागेच म्हटले होते.

परिस्थितीचे भांडवल केले की मानवतेच्या नावाखाली भीक मिळते याची सवय लागली तर स्वत:मधे लायकी निर्माण करण्याची महत्वाकांक्षा, स्वाभिमान संपुष्टात येतो आणि अशा लोकांची संख्या वाढत जाऊन राष्ट्र दुबळं बनतं. याचा अर्थ शासनाने परोपकारी योजना आणू नयेत, गरजवंतांचे अश्रू पुसले जाऊ नयेत असे नव्हे मात्र दीनपणाचे कातडे पांघरून अनुदान लाटणारी ऐतखाऊ वृत्ती वेळीच ठेचली गेली पाहिजे. अन्यथा तो देश केवळ याचकांचा समूह बनतो. It's better to teach the art of fishing than donating a fish.आपल्याला दात्यांचा देश व्हायचे असेल तर हे विंदांच्या शब्दातून समजून घ्यायला हवे
"देणार्‍याने देत जावे घेणार्‍याने घेत जावे
घेता घेता एक दिवस देणार्‍याचे हात घ्यावे"


ऑनलाईन !! जरा जपून..


भारतात "ट्राय" च्या आकडेवारीनुसार सुमारे ७५ टक्के लोक मोबाईल फोनचा वापर करतात. २०११ हे वर्ष स्मार्टफोनचे होते. स्मार्टफोनमुळे "फोन होता है सिर्फ बात करने के लिए" इतकाच त्याचा वापर मर्यादित राहिला नाही, टच अँड टाइप, वेगवान डाऊनलोड, दृकश्राव्य माध्यम हे स्मार्टफोनचे वैशिष्ट्य ठरले. आता २०१२ हे वर्ष आहे टॅब आणि थ्रीजीचे. २५०० ते ४५,००० रुपये किमती मधे टॅब्लेट उपलब्ध होणार आहे. टॅब्लेटच्या नव्या आवृतीमध्ये जीपीआरएस सुविधा देण्यात आल्याने फोन कॉलिंग देखील करता येईल. २०११ मध्ये सुरू झालेली थ्रीजी सेवा अद्याप काहीशी महाग आहे. तरीही याचा वापर हळूहळू वाढतो आहे. थ्रीजीमुळे वेगवान डेटा ट्रान्स्फर, हायस्पीड इंटरनेट, व्हिडिओ कॉलिंगसारख्या सुविधांचा फायदा घेता येणार आहे. साहजिकच या आधुनिक उपकरणांबाबत सगळ्यांना आकर्षण वाटते. कुणी व्यावसायिक गरजेसाठी, कुणी मनोरंजनासाठी तर कुणी छाप पाडण्यासाठी यांचा वापर करतात. खेडयापासून शहरापर्यंत सगळे या तंत्रप्रेमात आकंठ बुडालेले दिसतात.

एकूणच तंत्रज्ञानामुळे, ऑनलाईनमुळे सगळं सोपं झालय पण तंत्रज्ञानाच्या योग्य वापराबाबत ग्राहक आणि सेवा देणारे दोन्हीही पुरेसे सज्ञान झाले नाहीत असं दिसून येतं. रेल्वे बाबत चौकशी असो वा टेलीफोन बद्दल तक्रार,म्हणायला बटणं दाबताच उत्तर हजर. प्रत्यक्षात आधी तो नंबर कितीतरी वेळ एंगेज लागतो. मग गंतव्य स्थानाचा ,गाडीचा कोडक्रमांक ग्राहकाला माहीत नसतो. क्रेडिट अथवा डेबिट कार्डाचा वापर करतानाही कसले कसले नंबर विचारले जातात. त्यात पुन्हा १ दबाईये, ४ दबाईये करता करता चुकून मूळ मेनू परत येतो मग पुन्हा चिकाटीने ते सोपस्कार करेतो ग्राहकाला वाटू लागते नको ते ऑनलाईन. मोबाईल बँकिंग ऐकायला सोयीचे वाटते पण आपल्या बँक खात्यांचे क्रमांक म्हणजे एक अवाढव्य संख्या असते. त्यातला एखादा आकडा हमखास चुकतो आणि तसे झाले की मग पुन्हा एक दाबा, दोन दाबा सुरू. या साठी ती तंत्रप्रणाली नीट माहीत करून घ्यायला हवी. आवश्यक क्रमांकांची,पासवर्ड ची नोंद जवळच्या डायरीत असायला हवी.

अर्थात ही काळजी घेतली तरी व्हायरसची भीती आहेच. ऑनलाइन व्यवहार होत असताना, तुमचा पासवर्ड चोरून हा व्हायरस खात्यातली रक्कम परस्पर वळवतो. मोबाईल ऐवजी कॉम्प्युटर वापरायचे म्हटले तरी सायबर गुन्ह्यांचा धोका आहेच. सुशिक्षीत शहरी तरूणांना रोजगाराच्या संधी सहज उपलब्ध होत नाहीत. कमिशन व रोजगाराबाबत त्यांची दिशाभूल करून मोठ्या प्रमाणात पैसा उकळला जातो. अश्लील वेबसाइट व सोशल नेटवर्कच्या माध्यमातून तरूणींच्या शारीरिक व मानसिक छळाच्या घटना घडतात . फेसबुक सारख्या सोशल नेटवर्कच्या वाढत्या आकर्षणामुळे फोटो, खाजगी माहिती सर्रास खुली केली जाते.' टेलिफोनिक फ्रेंडशिप नामक बनेल प्रकारात टॉकटाइम किंवा बक्षिसाचे आमिष दाखवून मोबाइलधारकांकडून पैसे उकळण्यात येतात . गुन्हेगार तरूणी या माध्यमातून युवकांना जाळ्यात ओढतात. घरबसल्या हजारो रुपये कमवा ', ' मेलआयडी किंवा फोन नंबरच्या सिलेक्शनमुळे लॉटरी लागली ' असे एसएमएस किंवा इमेल इनबॉक्स मधे येतात. मुळात अशा मोहाला बळी पडता कामा नये. या जगात काहीही फुकट मिळत नाही आणि मिळत असेल तर मग तिथे संशयाला नक्कीच वाव आहे, इतका सोपा हा नियम आहे.

सरकारने अशा सायबर गुन्ह्यांसंबंधित कायदे तयार केले असले तरी ते तितकेसे परिणामकारक ठरत नाहीत .अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केलेली आर्थिक फसवणूक , मानसिक व शारीरिक शोषण म्हणजे सायबर गुन्हा, पण त्याबद्दल माहितीच नसल्याने हे गुन्हे फारसे नोंदवले जात नाहीत. ते सामान्य जनतेपर्यंत सोप्या पद्धतीने पोचायला हवेत पण मग तोवर तंत्रज्ञान वापरायचच नाही की काय! तसं असेल तर त्याचा उपयोग काय? खर म्हणजे तंत्रज्ञान योग्य प्रकारे वापरण्यासाठी जी मानसिकता आणि तंत्रमैत्री असायला हवी तीच आपल्याकडे मुळात नाहीये. तंत्रज्ञान समजून उमजून वापरणं अतिशय गरजेचं आहे. या शिवाय तंत्रज्ञानाच्या किती आहारी जायचं यावर वेळीच निर्णय घ्यायला हवा. कमी श्रमात मिळणाऱ्या पैशाचा मोह टाळायला हवा. सोशल साईटसवर वैयक्तिक माहिती सरसकट देणे टाळावे. स्पॅममेलला उत्तर देण्याचे अथवा त्या साइटसना कुतूहलापोटी भेट देण्याचे टाळावे . चौकशी केल्याशिवाय आर्थिक गुंतवणूक अजिबात करू नये. आपल्या पाल्याच्या इंटरनेट वापरावर पालकांचे लक्ष असायला हवे. या शिवाय पासवर्ड अथवा खातेक्रमांक याबद्दल गुप्तता बाळगावी .पासवर्ड बदलत राहावे. लॉग आऊट करूनच काम संपवावे. तंत्रज्ञानाचा वापर वस्तुनिष्टपणे केला तर ते नक्कीच वरदान आहे. त्यामुळे वेळ वाचतो, उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढते. तंत्रज्ञानाच्या चुकीच्या वापरातून समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी मेंदू ’‘ऑनलाईन" ठेवून एकच बटण दाबायला हवे ते म्हणजे आपल्या सद्सद्विवेकबुद्धीचे.