प्रसंगी अखंडीत वाचीत जावे
जगज्जेत्या अलेक्झांडरचा पराक्रमी सरदार शत्रूची छावणी उद्ध्वस्त करून परतला व अलेक्झांडरला अभिमानाने म्हणाला, "शत्रूचे सैनिक, राजवाडे, पागा सगळे आम्ही बेचिराख केले; फक्त एक ग्रंथालय तेवढे यातून वाचले." अलेक्झांडर म्हणाला " ग्रंथ म्हणजे मानवी संस्कृतीच्या जतन संवर्धनाचे मूळ ! तेच त्या ग्रंथालयात सुरक्षित ठेवून आलात ! मग काय नष्ट केलेत तुम्ही!" ग्रंथसंगाचे महत्त्व सांगणारी ही घटना एका लेखात उद्धृत केली होती. मानवी संस्कृतीच्या उंचीचे मोजमाप होते ते वाचनसंस्कृतीने. जागतिकीकरणामध्ये जग झपाट्याने बदलतेय, त्याचे परिणाम सर्व गोष्टींवर होत आहेत. वाचनसंस्कृती त्याला अपवाद नाही. इलेक्ट्रॉनिक जगामध्ये तरुण पिढी वाचत नाही अशी खंत व्यक्त केली जाते. लिखाणात जसे बोरूपासून कीबोर्डपर्यंत तंत्र बदलत गेले तसे वाचनातही बदल होणारच. "केवळ पुस्तकातून वाचणे" म्हणजे वाचन असे न मानता आज इंटरनेट, मोबाईल, किंडलच्या माध्यमातून वाचन केले जात आहे. वाचायला वेळ नाही म्हणून वाचन टाळण्यापेक्षा ह्या बदलाची नोंद घेतली तर वाचनसंस्कृतीला नक्कीच उज्ज्वल भविष्य आहे.
मात्र हे पुरेसे नाही. काय वाचावे याचे भान भावी पिढीला असणे-देणे गरजेचे आहे. तरूणाईला एकूण ग्रंथप्रेमापेक्षा प्रेमग्रंथात जास्त रस आहे. एसएमएस, टाईमपास इ-मेल फॉरवर्डस वाचणे किंवा केवळ अभ्यासक्रमात असलेली पुस्तके वाचणे म्हणजे वाचन नव्हे. तुमची संगत कशी आहे, हे बघून तुम्ही कसे असाल याबद्दलचं मत लोक तयार करतात. अगदी तसंच पुस्तकांबाबत आहे. तुम्ही कुठलं पुस्तक वाचता, हे बघून तुमच्या ज्ञान आणि विचारांची किती खोली आहे, याची कल्पना येते. आज तुमच्याकडे जगात काय चाललं आहे याची सखोल माहिती असेल तर कुठलेही क्षेत्र सर करणे अवघड नाही. प्रत्येक यशस्वी व्यक्तीमागे नशीब नव्हे तर "पुस्तकं" उभी असतात. लहानपणापासून पुस्तकांबरोबरीने वर्तमानपत्र, वेगवेगळ्या विषयांवरची मासिकं वाचण्याचीही सवय असायला हवी. मग स्पर्धात्मक परीक्षांना बसताना आयत्यावेळी सामान्य ज्ञानाचं पुस्तक शोधण्याची गरज भासत नाही.
नव्या पिढीवर चांगले वाचनसंस्कार नाहीत असे म्हणताना मुळात आपण त्यांना ते दिले का याचा विचार करायला हवा. ईडिअट बॉक्स (दूरदर्शन) किंवा थाड्थाड गोळ्या घालुन शत्रुला संपवायला शिकवणारे व्हिडिओ गेम्स याच्या आभासी दुनियेत वाढ्णारी मुलं पाहून पालक धास्तावतात. यावर संस्कार हाच उपाय, उत्तम साहित्याच्या वाचनाची सवय असेल तर तो आपसूक घडतो. धर्मग्रंथ समाजमन घडवतात तर संत साहित्य पुरोगामी डोळस विचार करायला शिकवते. चरित्रं, वंचितांच्या साहित्यातून आत्मभानासह माणूस जागा होतो तर कविता जीवनाला लय देतात. विनोदी साहित्य,विडंबने खिलाडू वृत्तीने जगायला शिकवतात तर प्रवासवर्णनातून जगाकडे विहंगम दृष्टीने बघता येते. थेट किंवा अनुवादाच्या माध्यमातून पोचणारे वैश्विक साहित्य इतर संस्कृतींशी आपला परिचय करून देते,जाणीवा प्रगल्भ करते. आपल्या देशाचाच नव्हे तर जागतिक उलथापालथींचा इतिहास, वर्तमान केवळ वाचनाच्या मदतीनेच आपल्याला समजू शकतो. साहित्य ललित आहे की वैचारिक, स्त्रियांसाठी आहे की पुरूषांसाठी, आहे रे गटाचे आहे की नाही रे गटाचे असे भेद न मानता ते सकस असावे या निकषावर त्याचा मोकळेपणे स्वीकार केला तर जगणे समृद्ध होईल. क्षणभर हे सगळं बाजूला ठेवलं तरी वाचनामुळे जगण्यात एक ’गंमत येते’ आणि ती फक्त आपली -आपल्यासाठी असते, म्हणून तरी वाचून पाहायला हवं.
विचारांना दिशा देणारं शब्दभांडार मुलांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न आवर्जून व्हायला हवा. निबंध ही पाठ न करता वाचनातून भिनलेल्या विचारांची अभिव्यक्ती आहे हे जाणवले तर मुलांना लिहावेसेही वाटू लागेल. भेट म्हणून पुस्तक देणे, खास प्रसंगी पुस्तके विकत घेणे, स्वत: वाचणे, जमल्यास वाचून दाखवणे ही पालकांची जबाबदारी आहे. शक्य असल्यास तुमचा वैयक्तिक ग्रंथसंग्रह असावा, नसल्यास निदान वाचनालयाचं सभासदत्व घ्यायला हवं. पुणे शहरात पहिले ग्रंथालय झाले तेव्हा लोकहितवादींनी "ग्रंथ म्हणजे हजार जिव्हा" असे म्हटले होते. आजच्या ग्रामीण जीवनात सुधारित तांत्रिक युगाचा परिणाम दिसू लागला आहे. मोबाईल, डिश टीव्ही सगळीकडे दिसत आहेत, त्या मानाने वाचनालयांची वानवा आहे. प्रत्येक गावात एक तरी वाचनालय असणे, वृत्तपत्रं पोचणे आवश्यक आहे. त्यामुळे जगाचा अभ्यास करत असताना स्वतःची ओळख होईल. आपण कुठे आहोत, कुठे जायचे आहे याची दिशा निश्चीत होईल. विकासाला वय नसते, त्यामुळे तुम्ही प्रौढ असलात तरी वाचनाचा व्यासंग वाढवत राहिले पाहिजे. वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी ग्रंथोत्सवाची गरज आहे. ‘पुस्तक भिशी’ सारख्या योजनांची गरज आहे. समाजातील सर्व स्तरावर ज्ञानाची भूक जागृत व्हायला हवी,ती शमवायला गावोगावी पुस्तके पोहोचायला हवी. दर्जेदार प्रकाशकांनी एकत्र येऊन यासाठी यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे. चंद्रपूरला नुकतेच साहित्य संमेलन झाले. या निमित्ताने भरविण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनातून विविध लेखकांची, विविध विषयांवरची सुमारे तीन कोटी रुपयांची पुस्तक खरेदी झाल्याचे वृत्त उभारी देणारे आहे.
या वाचनाच्या धडपडीतून काय साध्य करायचे हे समर्थ रामदास स्वामींनी पूर्वीच सांगितले आहे...
"दिसा माजी काही तरी ते लिहावे | प्रसंगी अखंडीत वाचीत जावे ||
जे जे आपणासी ठावे | ते ते इतरांसी शिकवावे | शहाणे करुन सोडावे सकल जन ||"
आपण काही ’चला, आता आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करुया’ असल्या भाबड्या भावनेने वाचत नसतो. पण आपल्याही नकळत पुस्तकं आपल्याला केवळ शिकवत नाहीत, ती जोजवतात, रमवतात, शब्दलालित्याने चकित करतात, आपले बोट धरून अनोख्या विश्वाची सफर घडवून आणतात, मित्र बनतात, एकटेपणातही साथ देतात, सर्वार्थाने घडवतात, श्रीमंत करतात.
पूर्वप्रकाशित- मातृभूमि
No comments:
Post a Comment