Thursday, December 8, 2011

मुलांचे मित्र व्हा

matrubhumi 8 Dec 2011


एका चिमुकलीच्या वाढदिवसाचा कार्यक्रम रंगात आला होता. रंगीबिरंगी फुगे, नटून थटून आलेल्या लहान मुलांची मस्ती, खेळ, त्यांची किलबिल असं मस्त वातावरण होतं. मग सीडी प्लेअर वर ’रा-वन’ मधलं "छम्मक छल्लो" गाणं वाजू लागलं आणि मुलं खेळ सोडून त्यावर थिरकायला लागली. त्यांचे आईबाप टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन देऊ लागले. मुलांनी नाही तर कोणी नाचायचं, खरं आहे, पण त्या किंवा तशा प्रकारच्या गाण्यांचे शब्द, त्यावर मुलांचे वयाला न शोभणारे हावभाव याला दाद देताना आपलं काही चुकतं आहे असं त्यांच्या पालकांना जाणवूच नये? वाढदिवसच नव्हे गणेशोत्सवात, अगदी शाळेच्या स्नेहसंमेलनात देखील फिल्मी गाण्यांवर नाचणे ही फॅशन झाली आहे. नाच आणि गाणी वाईट नसतात, सांस्कृतिक अभिव्यक्ती आणि मनोरंजनाचं ते एक सुंदर माध्यम आहे. छानसा ठेका असणारी सिनेमातील गाजलेली गाणी, लोकगीतं अगदी पाश्चात्य नृत्यप्रकार सुद्धा निवडायला हरकत नाही. अचकट विचकट हावभाव आणि ’मुन्नी बदनाम हुई’ स्वरूपाचे गाण्यांचे शब्द असतील तर ती मात्र टाळायला हवीत याचे भान शिक्षक आणि मुख्यत: पालकांना असायला हवे. माध्यमांचा विशेषत: टीव्हीचा आधीच मुलांच्या मनावर प्रचंड पगडा आहे. त्यावर काही चांगल्या वाहिन्या आणि चांगले कार्यक्रम देखील आहेत पण मुले टीव्हीवर काय पाहत आहेत, किती वेळ पाहत आहेत याचा किंवा मुलांसमोर टीव्हीवर स्वत: काय पाहावं याचा किती पालक विचार करतात? कार्टून पाहणे सगळ्याच लहान मुलांना आवडते पण सगळेच कार्टून आता मुलांच्या भावजीवनाशी जुळलेले राहिलेले नाहीत याकडे लक्ष द्यायला हवे. कार्टून मधला "शिंचन" त्याच्या वडिलांना "ओहो, तो आप उस सेल्सगर्लपर लाईन मार रहे थे" असे म्हणतो, सात वर्षाचा नोबेटा म्हणे वर्गातल्या शिजुका वर "प्रेम करतो", तेव्हा देहभान हरपून ते पाहणार्‍या मुलांना मनोरंजनाबरोबर आणखी बरेच धडे नाजूक वयात नकळत दिले जातात. मुलांना "कुठे थांबवावं" हे आधी पालकांच्या लक्षात यायला हवं.


जागतिकीकरणाच्या युगात मुलं आता कार्यक्रमात पूर्वीसारखे श्लोक किंवा बडबडगीतं म्हणणार नाहीत हे मान्य, त्यांचे छंद, आवडी, विषय काळाप्रमाणे बदलत जाणार, आधुनिक होणारच पण शेवटी ती मुले आहेत हे सत्य विसरून आणि बदलून कसं चालेल? मुलांबाबतचे हे सगळेच प्रश्न गुंतागुंतीचे आहे. त्यांच्यातली निरागसता जपायची असेल तर मुळात आपली वागणूक योग्य आहे ना याचा विचार पालकांनीही करायला हवा. वडिलांनी जर मुलाला म्हटलं ," तुझ्या वयाचा असताना जॉर्ज वॉशींग्टन शाळेत नेहमी पहिला येत असे" तर त्यावर आजच्या मुलाचं उत्तर असतं "तुमच्या वयाचे असताना ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते त्याचं काय !" यातला गमतीचा भाग सोडला तर पालकांनी स्वत:चा आदर्श मुलांपुढे असणार आहे याचा विचार नेहमीच करायला हवा. आई-वडील कसे राहतात, आपापसात कसे वागतात, इतरांबद्दल काय व कसे बोलतात या सगळ्याचा मुलांवर परिणाम होत असतो त्यामुळे पालकांनी मुलांसाठी आधी स्वत:ला घडवायला हवं. स्पर्धेचं युग आहे या नावाखाली मुलांना कितीतरी क्लासेस लावले जातात, त्याने नृत्य, खेळ, कुठल्या कुठल्या टॅलेंट परिक्षा द्यायच्या पुन्हा अभ्यासात पुढेच असायचं एवढ्या सगळ्या अपेक्षा त्या चिमुकल्याला झेपत नाहीत. पालक-पाल्यसंबंधातील तज्ञ समुपदेशक डॉ. आशिश देशपांडे म्हणतात " मूल जन्माला घातलं, म्हणजे त्यावर आपला हक्क प्रस्थापित झाला असं नाही. मुलांचे पालक व्हा ,मालक नको." मुलांवर आपली स्वप्न लादणं अयोग्य आहे. ती पूर्ण झाली नाहीत तर त्यांना रागवून उपयोग नाही. त्यापेक्षा हे ओझं कमी केलं, त्यांचा कल समजावून घेत वेळीच ठराविक शिस्त लावली, शहानिशा करून योग्य त्या गोष्टींनाच प्रोत्साहन दिलं तर प्रश्न सुटले नाहीत तरी सोपे होतील.


हल्ली घरोघरी एक, दोनच मुले असल्याने त्यांचे लाड होतात, वाटून घेणे त्यांना माहीत नसते. आई-वडील दोघेही नोकरी-व्यवसायात व्यस्त असले तर मुलांना आपण वेळ देऊ शकत नाही या न्यूनगंडातून ते मुलांना कशालाही "नाही" म्हणू शकत नाही. त्यांच्या शिकवण्या, शाळा लांब अंतरावर असल्याने पालक त्यांना मोबाईल घेऊन देतात, त्यातले फंक्शन्स पालकांपेक्षा जास्त मुलांना माहीत असतात. मुलांना मोबाईल,व्हिडीओ गेम, संगणक सहजतेनं हाताळता येणं ही ’स्मार्ट’ असल्याची पावती समजली जाते. मुलांच्या तुलनेने पालकांना हे तंत्रज्ञान दूरचं वाटतं, त्यामुळे अशा ’स्मार्ट’ मुलांचं पालकांना साहजिकच कौतुक वाटतं. त्या नादात मुलं नक्की ते कसं वापरतायत यावर पालकांचा वचक राहणे अवघड झाले आहे.

नुकत्याच एका नामवंत शाळेमधे वर्गात अश्लील एमएमएस पाहणार्‍या मुलांना पालकांसमक्ष समज देण्यात आली. तेव्हा "आमची मुलं असं करणच शक्य नाही" अशी बहुतेक पालकांनी भूमिका घेतली. पालकांनी तंत्रज्ञानाशी मैत्री करून मुलांवर लक्ष ठेवण्याच्या त्यातील युक्त्या शिकायला हव्या. असे करणे म्हणजे हेरगिरी नव्हे, नैतिक जबाबदारी आहे. शिवाय मुलांनी अशा उपकरणांचा वापर करण्याबाबत आधीपासूनच नियम आणि निकष ठेवायला हवेत. अकाली ’सुजाण’ (?) झालेली मुले लवकर वयात येत आहेत. लैंगिक शिक्षण शाळांमधून मिळावे, वैद्यकीय व्यावसायिकांकडून द्यावे की समुपदेशन करावे हे पालकांना समजेनासे होते. शिस्तीचा अतिरेक किंवा बेलगाम स्वातंत्र्य दोन्ही चूकच. लाड आणि नकार म्हटलं की वादविवाद होणारच आणि काही प्रमाणात असे वाद मुलांच्या व्यक्तिमत्त्वाची वाढीसाठी आवश्यक आहेत विशेषत: पौगंडावस्थेत संवाद हा वादातूनच होतो ,असं या विषयातील तज्ञांचं मत आहे. आपलं घर, आपले आई-वडीलांपुरतच जग असणा-या मुलांचा नवनवीन गोष्टी, व्यक्ती, वस्तूंशी संबंध येत गेला की त्यांना स्वत:ची space आवडू लागते. आपल्या आई-वडिलांनी आपल्या प्रत्येक गोष्टींमधे केलेला हस्तक्षेप त्यांना नकोसा वाटतो. यावर रामबाण उपाय नसला तरीही संवादाचा पूलच पालक आणि मुलांमधली दरी सांधू शकेल.


केवळ तांत्रिक गोष्टी वापरता आल्या म्हणजे मुलं स्मार्ट झाली असं न मानता पाहणे, हाताळणे, निरीक्षण करणे, अनुभव घेणे अशा पायर्‍यांनी त्यांचं व्यवहारज्ञान वाढवणं आवश्यक आहे. अगदी निबंध किंवा पत्रलेखन सुद्धा शिक्षक मुलांना लिहून देतात आणि मुले ते पाठ करून परीक्षेत लिहीतात. मुले टीपकागदासारखी असतात त्यामुळे मुलांना त्यांच्या भाषेत लिहू द्यायला हवे. ते कसे व्यक्त होतात, जगाकडे कसे पाहतात, कसे अनुभव मांडतात हे समजून घ्यायचे असेल तर विषयाच्या चौकटीतून त्यांना मुक्त करायला हवे. "विचार कसा करावा हे शिकवतं ते खरं शिक्षण" असं आईनस्टाईनने म्हटलं आहे. पण बहुतेक शाळांत प्रात्यक्षिके होतच नाहीत. भारतातील काही प्रसिद्ध शाळांच्या सर्वेक्षणातून असे निदर्शनास आले की नव्वदहून अधिक टक्के मिळवणार्‍या माध्यमिक वर्गातील अनेक मुलांना साध्या सामान्य प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत. मुले फक्त पुस्तकी विज्ञान शिकतात. प्रयोगांतून नव्हे. कदाचित त्यामुळे देशात संशोधकांचे प्रमाण डॉक्टर,इंजिनीअर यांच्या तुलनेने नगण्य आहे. शाळांमधील प्रकल्प असो वा हस्तकला, बहुतेक विद्यार्थ्यांचे पालकच सगळे करून देतात. मध्यंतरी परिचयातील एका मुलाने ’कडधान्याला मोड येणे’ या विषयावर लिहीलेला प्रयोग दाखवला, त्याभोवती त्याच्या आईने फुलांची वेलबुट्टी काढली होती, त्यापेक्षा तिने ’मोड कसे येतात’ हे प्रात्यक्षिक मुलाला का दाखवले नाही! या साचेबद्धतेतून शिक्षणाला मुक्त करणे पालकांच्या हातात नसले तरी मुलांचे आकलन प्रत्यक्ष निरीक्षणातून वाढविण्यासाठी ते निश्चीत प्रयत्न करू शकतात.


शिक्षणाच्या तीन पायर्‍या आहेत असं म्हटलं जातं.. माहिती (information), ज्ञान (knowledge) आणि शहाणीव (wisdom). माहिती अनेक माध्यमातून आपल्यावर आदळते आहे, केवळ माहिती जमवणं म्हणजे हुशारी नव्हे. त्याचे ज्ञानात रूपांतर करायचे कौशल्य मुलांमधे निर्माण करण्याची जबाबदारी सुज्ञ शिक्षकांची आहे, मात्र त्या ज्ञानाचा व्यावहारिक वापर, तौलनिक अभ्यास करता येण्याची शहाणीव मुलांमधे निर्माण करणे, शिस्तबद्ध संस्कार करणे ही पालकांची जबाबदारी आहे. त्यासाठी मुलांशी वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारणं, त्यांना अभ्यासाव्यतिरीक्त ज्यात रस वाटेल त्यात रमवणं, पर्यावरणाची ओळख करून देणं, चांगली पुस्तक आणणं-वाचून दाखवणं, महत्वाच्या घडामोडी ,बातम्या यावर त्यांच्याशी बोलणं आवश्यक आहे. यामुळे त्या मुलांमध्ये आत्मविश्वास येईल. मुलांबरोबर पारदर्शक, मैत्रीपूर्ण संबंध जपले तर पालक-मुलांचे हृद्य नातं नक्कीच बहरेल.

Tuesday, November 29, 2011

आमिश


" निसर्ग बघायला म्हणून निघालो तर
गाडीच्या खिडकीतून बेटी झाडंच मधे मधे येत होती..."

आपल्या तथाकथित निसर्गप्रेमाला कवी अशोक नायगावकरांनी असा मिश्कील चिमटा घेतला आहे. आपण पर्यटनाला गेलोच तर निसर्गाला बघतो ते ही कॅमेर्‍याच्या भिंगातून. तिथे दूरचित्रवाणीशी संपर्क आला नाही तर आपण जगापासून तुटू की काय अशी भिती वाटू लागते. एकदाचा मोबाईल ’रेंज’ मधे आला की आपल्या जीवात जीव येतो. माणसाला शेवटी गरज असते फक्त चार हात जमिनीची, हे तत्वत: मान्य असलं तरी प्रत्यक्ष जगताना भौतिक साधनांशिवाय- इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांशिवाय पान हालत नाही. म्हणूनच चंगळवादाचा मुकुटमणी असं ज्या अमेरिकेला म्हटलं जातं तिथे मात्र एक समूह-पंथ या सगळ्या पासून दूर निसर्गाच्या कुशीत निवांत आयुष्य जगतो आहे यावर विश्वास बसेना. आधुनिक जीवनशैलीच्या धकाधकीपासून अलिप्त असणार्‍या त्यांच्या प्रांतातून प्रत्यक्ष बग्गीतून फेरफटका मारल्यावर कुतूहल, आश्चर्य, आनंद, समाधान अशा संमिश्र भावना मनात दाटून आल्या. या समाजाचं-पंथाचं नाव आहे "आमिश"...जगण्याच्या सगळ्या आमिषांपासून मुक्त असलेल्या या आमिश मंडळींचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन विलक्षण आहे.

जेकब अमान (या नावावरूनच "आमिश" म्हटले जाऊ लागले) यांनी सुरू केलेल्या या आमिश चळवळीने युरोपात सन १६४४-१७२० च्या दरम्यान चांगलेच मूळ धरले. यातले बहुसंख्य लोक १७ व्या शतकाच्या अखेरीस अमेरिकेत स्थलांतरित झाले. पेनसिल्व्हेनिया भागात त्यांचे वास्तव्य जास्त प्रमाणात आहे. ख्रिश्चन धर्मातील वेगवेगळी तत्वे अनुसरणारे गट (प्रोटेस्टंट, अनाबाप्टीस्ट इ.) त्यांच्यात निर्माण झाले असले तरी त्यांची जीवनपद्धती साधारण सारखीच आहे. जणू ते सगळे निसर्गपुत्र आहेत. पवनचक्की आणि केरोसिन, लाकूड, कोळसा अशा नैसर्गिक संसाधनांचा वापर करून ते त्यांची वीजेची माफक गरज भागवतात. (त्यामुळे भारनियमन हा ’सहिष्णू’ शब्द त्यांच्या शब्दकोशात नाही) अमेरिकेत सर्रास आढळणारा दिव्यांचा लखलखाट त्यांना आवश्यक वाटत नाही. बहुतेक सगळे आमिश वाहतुकीसाठी प्रदूषणमुक्त टुमदार घोडागाडी वापरतात. काही कामासाठी आमिश शहरात जातात तेव्हा अद्यावत कार्सच्या बाजूला सिग्नलला थांबलेली त्यांची देखणी बग्गी (खिडकी असलेल्या पेटीसारखी दिसणारी) लक्ष वेधून घेते. प्रत्येक घरी बग्गीसाठी ऐटबाज घोडे तर शेतीसाठी खेचरं पाळली जातात. एका खोलीच्या शाळेत आठवीपर्यंत औपचारिक शिक्षण घेतल्यावर आमिश मुले शेतीचं शिक्षण घेतात. शेती व शेतीशी संबंधित उद्योग हेच त्यांच्या चरितार्थाचं साधन आहे.

समूहाच्या भौगोलिक मर्यादांमुळे असेल, बाहेरच्या जगाशी संपर्क न ठेवताही आमिश आरामात जगतायत, उलट त्यामुळे त्यांचे आपसातील संबंध (मोबाईल किंवा सोशल नेटवर्किंग साईट्स न वापरताही) अधिक दृढ झाले आहेत आणि त्यांची संख्या गेल्या अर्धशतकात तिपटीने वाढली आहे असं त्यांच्या समाजप्रमुखांचं मत आहे. आमिश चर्चपरिवारातच त्यांचे विवाहसंबंध होतात. मोठं कुटुंब ही देवाची देणगी आहे असे ते मानतात. मुलांचं उत्तम संगोपन करणं, नाती जपणं याला त्यांच्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्व आहे. प्रत्येक व्यक्तीवर त्याच्या कुटंबाचा अतिशय प्रभाव असतो. मुलांची मानसिक, शारिरीक आणि आध्यात्मिक प्रगती होते आहे ना याकडे कुटंबाचा कटाक्ष असतो. मुले वडिलांना शेती व इतर बाहेरील कामात मदत करतात तर मुली आईला गृहोद्योगात मदत करतात. कुटुंबाला हातभार लावणे हे प्रत्येक जण आपले कर्तव्य समजतो. वृद्ध माणसे शेवटपर्यंत कुटुंबाच्या आधारानेच जगतात. पाण्यापासून निर्माण होणारी उर्जा वापरून, डिझेल जनरेटरवर चालणार्‍या हत्यारांच्या सहाय्याने १००% लाकडी फर्निचर-घरे बनवण्याचे कौशल्य आमिश लोकांच्या प्रत्येक पिढीत आढळते. काही आमिश जर्मन भाषा बोलतात तर बहुसंख्य आमिश इंग्रजीचा वापर करतात. चर्चमधे जर्मन तर इतर ठिकाणी इंग्रजी गीते जुन्या पद्धतीनेच गायली जातात. फक्त खाजगी कार्यक्रमात वाद्ये वाजविली जातात, जाहीररित्या नाहीत. सण समारंभांना नातेवाईक-मित्र आवर्जून एकत्र येतात. सामाजिक एकोप्यामुळे आणि संयमी, सरळ, सोप्या जगण्यामुळे माध्यमातून रोरावत येणार्‍या "मनोरंजनाच्या" महापुरात ते वाहून जात नाहीत. माध्यमं त्यांच्या विश्वात शिरलेलीच नाहीत.


अमेरिकेतील मुक्त लैंगिक जीवन-पद्धतीच्या पार्श्वभूमीवर अमिश स्त्री-पुरूषांच्या सहजीवनातले वेगळेपण उठून दिसते. यांत्रिक जगातल्या ताणतणावांपासून, जीवघेण्या स्पर्धेपासून दूर असल्याने वैवाहिक तसेच कौटुंबिक आयुष्यात सौख्य आणि स्थैर्य आपसूक येते. रविवारी संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर तरूण-तरूणींना एकमेकांसह वेळ घालवण्याची मुभा असते. मात्र त्यांना उघड्या टपाच्या बग्गीतून फिरायला जाणे बंधनकारक असते. जोमदार पीक झाल्यावर म्हणजे नोव्हेंबर महिन्यातले मंगळवार विवाहासाठी निश्चीत केले जातात. वधू निळा पोशाख घालते. माणसांमधे असूया, तणाव निर्माण करणार्‍या गोष्टी (उदा: दागदागिने) विवाहप्रसंगी देखील निषिद्ध असतात.(असे आपल्याकडे चुकून जरी घडले तर केवळ या विषयाला वाहिलेल्या मालिका माथी मारणार्‍या तमाम दूरचित्रवाणी वाहिन्या बंद पडतील..असो.) लग्नानंतर नवदांपत्य मित्रपरिवार आणि नातेवाईकांना भेटण्यात काही दिवस घालवतात आणि मग संसाराला सुरूवात करतात. कपड्यातही बटन किंवा झिप ऐवजी हुकचा वापर केला जातो आणि ते घरी शिवले जातात. पांढरा शर्ट, काळी पँट,काळे जॅकेट-कोट व विशीष्ट प्रकारची हॅट असा साधारणपणे पुरूषांचा तर स्कार्फ, पायघोळ झगा, त्यावर ऍप्रन असा स्त्रियांचा पोशाख असतो. मुलांचे छोटेसे पोशाख सुद्धा अशाच स्वरूपाचे असतात, थंडीचा मोसम वगळता मुले चक्क अनवाणी चालताना आढळतात. स्त्रियांचे तपकिरी, सोनेरी लांब केस मागे अंबाड्यासारखे बांधलेले असतात. त्यावर बांधलेल्या "केप" वरून त्यांचे वय आणि वैवाहिक स्थिती कळते. विवाहित पुरूष चाळीशी नंतर मिशी नाही परंतु दाढी राखतात. या प्रतीकांमुळे अमेरिकन पद्धतीप्रमाणे विवाहाची अंगठी घालायची त्यांना गरज वाटत नाही. दागिने आणि कपड्याचा सोस हा मुद्दा एकूणच निकालात निघतो आणि तुलना, हेवा असे प्रश्नच निर्माण होत नाहीत.

भारतासारख्या देशात अनेक आदिवासी किंवा वनवासी थोड्याफार फरकाने याच पद्धतीने जगतात, असे वाटेल पण तसे नाही. त्यांच्या घराला जगाकडे उघडणारी खिडकीच नसल्याने आदिवासी लोक निसर्गपुत्र म्हणून नाईलाजाने जगतात, त्यांच्यावर शिक्षणाचा संस्कार होत नाही, अंधश्रद्धेचा पगडा मनावर असतो. गरीबी आणि अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांचे शोषण केले जाते. आमिश लोकांनी मात्र ही जीवनशैली स्वेच्छेने स्वीकारली आहे. ते स्वयंपूर्ण आहेत. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शिक्षणाची "मन ,बुद्धी आणि आत्मा यांचा विकास म्हणजे शिक्षण" अशी व्याख्या केली आहे. या नजरेतून पाहिले तर आमिश सर्वार्थाने सुशिक्षीत आहेत. त्यांना बाहेरच्या बेभान जगापासून अलिप्त राहायचे आहे.

आमिश जीवनाबद्दल जाणून घेतल्यावर मनात आले, एखादा छंद, लेखन, संशोधन, व्यवसाय यासाठी स्वत:ला झोकून द्यावं किंवा खूप पैसा कमवावा, त्याचा उपभोग घ्यावा, जग पाहावं, नाव कमवावं अशा आकांक्षा आमिश तरूणाईमधे निर्माण होत नसतील का? निरीक्षणातून तरी असेच उत्तर मिळते की आमिश संस्कृतीच्या स्थैर्यासाठी, हितासाठी आणि भवितव्यासाठी वैयक्तिक महत्वाकांक्षेला गौण स्थान दिलं जात असावं. काही समाजशास्त्रज्ञांना ही व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी वाटते. मात्र प्रेम आणि त्यागाच्या पायावरच, ’जगा आणि जगू द्या’ म्हणत आमिश जीवन कणखरपणे उभे आहे. काही बंडखोर आमिश तरुणांनी व्यक्तिपेक्षा समूहाला महान ठरवणार्‍या या जीवनपद्धतीला नकार देण्यासाठी त्यातून पलायन करणे, सार्वजनिक स्थळी गोळीबार करणे असे विरोध दर्शवणारे मार्ग अवलंबले आहेत. पण अशा घटनांचे प्रमाण तुरळक असल्याचे कळले.आधुनिकीकरणाच्या प्रभावामुळे आमिश मंडळींमधे कट्टर विरूद्ध बदलांचा माफक प्रमाणात स्वीकार करणारे असे गट देखील पडू लागले असले तरीही "निसर्गाकडे चला" हा मूलमंत्र आमिश लोकांनी आजही जपला आहे.

माध्यमांचा अतिरेक, निसर्गाची लूट, व्यसने, व्यभिचार, हव्यास अशा आचार, विचार आणि विहारातील सर्व प्रकारच्या प्रदूषणापासून लांब राहून मनमोकळा श्वास घेणारे आमिश आजच्या जगात वेगळे ठरतात ते यामुळेच. काही जणांना असं जगणं, वैज्ञानिक प्रगतीचा आस्वाद न घेणं हा मागासलेपणा, विचीत्रपणा वाटतो. यातलं तथ्य ज्यांना प्रश्न पडतायत त्यांनी शोधावं, आमिश आजही शांतपणे जगत या व्यवहारी जगाला केवळ कृतीनेच ठाम उत्तर देत आहेत.

Friday, November 25, 2011

देव

बर्‍याच व्यावसायिक चित्रपटांमधे हे दॄश्य हमखास असते. कोणतेतरी एक महत्वाचे पात्र मृत्युशय्येवर पहुडले आहे, डॉक्टरांनी ’अब सब कुछ उपरवाले के हाथ मे’ असल्याचं सांगून टाकलं आहे. नायक वा नायिका मंदीरात येऊन देवाला आळवत आहेत, वादळ सुरू झाले आहे, देवळात टांगलेल्या शे पाचशे(!) घंटा वेड्या-वाकड्या हलत जोरात वाजत आहेत. अचानक कुणी तरी येऊन ’वो होश मे आ गये’ असं सांगतं आणि टँग टँग सतार वाजू लागते. ’तेरा लाख लाख शुकर है भगवान’ असं ऐकत प्रेक्षकही सुटकेचा निश्वास टाकतो. या तद्दन फिल्मी ईश्वरभक्तीला छेद देत ’देव म्हणजे नक्की काय’ याचा शोध घेण्यास मराठीतील ‘देऊळ’ चित्रपट प्रवृत्त करतो. या चित्रपटाद्वारे उमेश व गिरीश कुलकर्णी या द्वयीने समाजमनातला देव शोधण्याचा धाडसी प्रयत्न नर्मविनोदी पण मार्मिक पद्धतीने केला आहे.

एका गुराख्याला (केशा) ’दत्त’ दिसल्याचा भास किंवा त्याच्या मते ’साक्षात्कार’ होतो. हा आधी चर्चेचा आणि मग राजकारणाचा विषय होतो. ठरलेल्या रूग्णालयाऐवजी दत्ताचे देऊळ बांधण्याला प्राधान्य दिले जाते. जनतेच्या धार्मिक भावनांचा फायदा घेऊन राजकारणी दत्तमंदीराच्या विस्तारीकरणाच्या नावाखाली बेकायदा कामे सुरू करतात. गावातले संतुलित विचार करणारे कुलकर्णी अण्णा जेव्हा ही फसवणूक आहे असे म्हणतात तेव्हा त्यांना उत्तर मिळते "बेकायदा कामं आणि कायदा यांच्यामधे भक्तांची मोठी रांग उभी आहे, ती भेदून आमच्यापर्यंत कुणीही पोचू शकत नाही." हे सगळे पाहून विषण्ण झालेला केशा (गुराखी) देवळातली मूर्ती घेऊन पळून जातो तेव्हा दुसरी मूर्ती बसवून देवस्थानाच्या अवतीभवती असलेली बाजारपेठ सुरू ठेवली जाते. मना-मनातल्या ’देव’ या संकल्पनेला तपासून पाहायला हवे आहे याची जाणीव निर्माण करून चित्रपट संपतो..

तुमचा भविष्यावर विश्वास आहे काय? असे विचारले की बरेच जण होय म्हणत हात पुढे करतात आणि काही जण ’अजिबात नाही- क्योंकी तकदीर तो उनकी भी होती है जिनके हाथ नही होते’ असे म्हणतात (यातले बहुतेक जण नंतर हळूच ’राशीभविष्य’ वाचतात). तुमचा देवावर विश्वास आहे काय? या प्रश्नाचे काहीसे तसेच आहे.
काहींना जगातले अन्याय, दु:ख पाहून देव या संकल्पनेबाबत मनात प्रश्नचिन्ह असते पण जग चालले आहे म्हणजे देव असलाच पाहिजे असेही वाटते. काहीना जवळच्या व्यक्तीचा अपमृत्यू पाहिला की देव असला तरी आपल्या उपयोगाचा नाही असे वाटू लागते. जगाच्या व्यापारात आपले न्यूनत्व आणि हतबलता जाणवून काही जण देव या entity ला शरण जातात, त्याचे सगुण रूप एखाद्या प्रभावी गुरु महाराजांमध्ये शोधतात. व्यक्ती बुद्धीजीवी किंवा अल्प-अशिक्षीत, ग्रामीण किंवा शहरी, विचारी किंवा भाबडी, यशस्वी किंवा अयशस्वी यापैकी जशी असेल त्यानुसार स्पष्टीकरणासह उत्तर मिळते. आस्तिक, नास्तिक आणि अज्ञेयवादी असे तीन प्रकार यातून निर्माण झाले आहेत.
विज्ञानाला अद्याप न सुटलेली काही कोडी निसर्गात आहेत आणि हाच ईश्वरी अस्तित्वाचा पुरावा आहे असे काही जण म्हणतात तर जगातली प्रत्येक घटना ही कोणत्यातरी वैज्ञानिक घटनेचीच परिणीती आहे असं काही जणांना वाटतं. खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर म्हणतात "जीवनातील घटना आपणच घेतलेल्या योग्य-अयोग्य निर्णयामुळे, काही वेळा बाह्य परिस्थिती किंवा संभाव्यशास्त्राच्या नियमाप्रमाणे घडत असतात त्यामागे कोणतीही पारलौकिक शक्ती नसते" 
तर ज्योतीर्भास्कर जयंत साळगावकर ’देव’ या संकल्पनेबाबात म्हणतात, "हजारो वर्षापूर्वीचे आपले पूर्वज रानावनात राहात असताना त्यांना कधी पशुपक्षांची, जनावरांची, वाऱ्यावादळाची, धरणीकंपाची तर कधी शत्रूंच्या टोळयांची भीती वाटत असली पाहिजे आणि त्यावेळी आपल्याला कोणत्या तरी गूढ शक्तीकडून सहकार्य मिळावे, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली असली पाहिजे. कदाचित एखादेवेळी लहान-मोठा प्रत्यय आला की यामागे सूत्र चालविणारी गूढ शक्ती असल्याची खात्री पटून तिच्याबद्दल वाटणारा आदर आणि आधार अधिक वाढला असला पाहिजे.अशा रीतीने ही संकल्पना मूर्त स्वरुप धारण करीत असताना देव या कल्पनेचा जन्म केव्हा तरी झाला असला पाहिजे".

जगातील बहुतेक धर्म देवाचे रूप अमूर्त आहे असे मानतात, देवाचा दूत असणार्‍या प्रेषिताला आदर्श मानतात, तर हिंदू धर्मात देवाला निर्गुण आणि सगुण दोन्ही रुपात पाहिले जाते. धर्म जगण्याची पद्धत ठरवतो. तो जन्माला चिकटून येतो आणि मग त्यानुसार देवाची व्याख्या स्वीकारुन माणूस जगत राहतो. वातावरण, संस्कार, विचारशक्तीनुसार प्रत्येक धर्मात कडवे, शक्य तोवर धार्मिक परंपरा पाळत राहणारे आणि नाकारणारे असे तीन गट तयार होत असतात. स्टीफन हॉकिंगने तर ब्लॅक होल थिअरी द्वारे आस्तिक्यच नव्हे तर रिचर्ड डॉकिन्स सारख्या विचारवंतांनी स्वीकारलेली ’अज्ञेयवाद’ ही कल्पना सुद्धा मोडीत काढली. 
ते म्हणतात, "बिग बँग/स्फोटाआधी काळाचाच जन्म झाला नव्हता - त्यामुळे देवाकडे विश्व बनवण्यासाठी वेळ कुठून येणार? हा प्रश्न अडाणीपणाचा आहे. पृथ्वीच्या शेवटच्या सीमेपर्यंत जाण्याचा मार्ग विचारण्या सारखा आहे.पृथ्वी गोल आहे. त्याला कडा नाहीत. सीमा नाहीत. तिथे जायचा मार्ग असेल कसा. अर्थात प्रत्येकाला आपला विश्वास आणि श्रद्धा जपायचे स्वातंत्र्य आहेच. मला मत विचाराल तर मी म्हणेन की - देव नाही . देवाने विश्व निर्माण केलेले नाही . ईश्वर मार्गदाता नाही . ईश्वर प्रेमळ काळजीवाहू नाही . ईश्वर मुक्तिदाता नाही . कारण तो अस्तित्वातच नाही. यातून सरळ निष्कर्ष असा निघतो की , स्वर्ग खोटा , नरक असत्य आणि मरणोत्तर आयुष्य आत्मा हे सारे झूट आहे. आपल्याला हे एकच भौतिक आयुष्य , हे एकच वास्तव अस्तित्व आपल्याला लाभले आहे. विश्वाच्या अथांग निरंतर रचनेचा आस्वाद घ्यायला आणि ते शिकून घ्यायला हे जे आयुष्य मला लाभले आहे त्याबद्दल त्या विश्वरचनेचा मी ऋणी आहे."
हे वाचून मनात प्रश्न येतो हे लाभलेले आयुष्य शेवटी दिले कुणी! संपवतो कोण! मग एखादा कवी विचारतो - त्या फुलांच्या गन्धकोषी सांग तू आहेस का? 
तू नाहीस हे ठामपणे म्हणणाऱ्या नास्तिक्याबरोबर येणार्‍या जबाबदार्‍या पेलण्याचे सामर्थ्य सर्वसामान्य माणसांमध्ये नसल्याने  त्यांना देवाचा टेकू लागतोच.

गाडगेबाबा आणि एकूणच साधू-संतांनी मानवसेवेत ’ईश्वर’ शोधला, तशी शिकवणही समाजाला दिली. मात्र सामान्य माणसाचे प्रयत्न संपतात तिथून नकळत त्याच्या देवावरच्या विश्वासाची सुरूवात होते, ती देखील धार्मिक स्वरूपातच. हा विश्वास श्रद्धेच्या रूपाने व्यक्त होतो तेव्हा जगण्याचे बळ वाढते. पापपुण्याचा विधीनिषेध बाळगला जातो आणि अशी श्रद्धा माणसाला अधिकाधिक समाधानी, आश्वस्त करते. परंतु श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातली सीमारेषा फार नाजूक आहे. ती वेळीच ओळखता आली नाही तर हाच विश्वास अंधश्रद्धेचे रूप घेतो. योग्य-अयोग्य हा विवेक संपतो.
देवापेक्षा बडवे मोठे होतात. ऐपतीनुसार दर्शनाच्या रांगा लागतात  अर्थकारण मोठं होतं. विधीलिखितात फेरफार करण्याची 'पॉवर' आणि खात्री देणारे तंत्रमंत्र, खडे, गंडेदोरे याचा अतिरेकी बाजार माणसामधला प्रयत्नवाद हिरावून घेतो. आपण अध्यात्माच्या दरबार दर्शन वाहिन्यांचा टी आर पी वाढताना बघतो. तेला-दुधाने चिकट झालेले अस्वच्छ गाभारे बघतो, गणेशमिरवणुकीतले बीभत्स नाच बघतो, काळा पैसा चित्रपटनिर्मितीला वापरून आणि तो चित्रपट चांगला चालावा म्हणून देवालाच कौल लावणारे महाभाग बघतो, गावात मुलभूत सोयी नसल्या तरी गावातल्या देवळाचा कळस मात्र सोन्याच्या पत्र्याने मढवण्याचा अट्टाहास बघतो, आयुष्यात होरपळले गेलेले लोक तर्कबुद्धी गहाण टाकून बुवा-बाजीला लागलेले बघतो, भक्तांच्यातच गटातटाचे राजकारण बघतो, नवसाच्या नावाखाली देवालाच लाच देऊ करणारे भाबडे भक्त बघतो, धार्मिक ग्रंथांचे संदर्भच योग्य मानून केलं जाणारं स्त्रियांचं शोषण बघतो, आणि अशा अपप्रवृत्तींना कोणत्याच धर्माचे अनुयायी अपवाद नाही हे बघतो तेव्हा तेव्हा मन व्यथित होते.
समर्थांची उक्ती आठवते , 'जनाचा लालची स्वभाव। आरंभीच म्हणती देव। म्हणिजे मला कांही देव। ऐसी वासना।।
काहीच भक्ती केली नस्तां। आणी इच्छिती प्रसन्नता। जैसें काहीच सेवा न करितां। स्वामीस मागती।।'
इथे सेवा- भक्तीचा अर्थ प्रयत्न असावा. प्रयत्नांती परमेश्वर हे लाक्षणिक अर्थाने घ्यायला हवे.

माणसाची ’देव’ ही संकल्पना त्याच्यावरील संस्कारांनुसार, सभोवतालच्या परिस्थितीनुसार, त्याच्या आयुष्यातील अनुभवांप्रमाणे, सहवासातील व्यक्तींच्या-विचारपद्धतींच्या-संस्कृतीच्या प्रभावामुळे बदलते सुद्धा. गांधीजींच्या आस्तिकतेला धार्मिकतेपेक्षा सामाजिक परिमाणे होती. कित्येक तत्त्वज्ञ, समाजधुरीण एकाच आयुष्यात या भूमिका बदलतानाही दिसतात पण त्यामागे सर्वंकष विचार, विशीष्ट अनुभूती असते. सुरूवातीला आपल्या कवितेतून
’तुझ्या महिम्याची प्रचंड पुराणे, गमती तराणे अर्थहीन’
असे ईश्वराला म्हणणारे कुसुमाग्रज कालांतराने नक्षत्रांना परमेश्वराच्या अस्तित्त्वाबद्दल प्रश्न विचारतात तेव्हा त्यांच्याच कवितेचे उत्तर असते..
’स्मित करून त्या म्हणाल्या, मला चांदण्या काही | तो नित्य प्रवासी, फिरत सदोदित राही |
उठतात तमावर त्याची पाऊलचिन्हे | त्यांनाच पुससी तू, तो आहे किंवा नाही ||’

मग एखाद्याला इतकी आश्वस्त करणारी श्रद्धा, नाकारुन काय मिळणार आहे. केवळ नास्तिकतेच्या आग्रहाने जगाचे गाडे नीट चालू शकणार आहे का? त्याचा आंतरिक ओलावा टिकून राहील का? त्यापेक्षा मानू देत देवाला. कुणाला देव आपल्या पाठीशी दिसेल, कुणाला देव आपल्याच अंत:करणात सापडेल, कुणाला तीर्थयात्रेत, नामजपात, व्रतवैकल्यात, ध्यान-धारणेत सापडेल, कुणाला एखाद्या संशोधनात, प्रकल्पात, संगीतात किंवा एखाद्या सुंदर कलाकृतीत सापडेल तर कुणाला दुसर्‍याचे अश्रू पुसण्यात परमेश्वर गवसेल. एका बोधकथेत माणूस परमेश्वराला म्हणतो "तू जर माझ्याबरोबर चालतोस तर मग या वाळवंटात उमटलेली पाऊले दोनच कशी, चार का नाहीत?" परमेश्वर उत्तरतो "ती दोन पावले माझीच आहेत कारण वाळवंट पार करताना मी तुला उचलून घेतले होते". अंधश्रद्धेची वाट वगळता  देवाचा असा शोध घेण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, असावे. त्याचा आदर व्हावा.