Friday, October 15, 2021

ते आणि आपण : US | India

 गेल्या काही लेखांमध्ये अमेरिकेतल्या फिलाडेल्फिया परिसरातली स्थळं आणि घटनांचं धावतं वर्णन होतं. आज मात्र फक्त काही तुलनात्मक नोंदींबद्दल.

दरम्यान एक सुंदर कॅथेड्रल पाहिले होते. गाभारा म्हणता येईल असा मुख्य भाग भव्य होता, छत मान दुखेल इतके उंच, सुरेख आरस्पानी कोरीव काम. तिथली प्रकाशयोजना तर खिळवून ठेवणारी होती. तळघरात Bishop धर्मगुरुंचे बाप्तीस्मा, लग्न, अंत्यविधी इ. प्रसंगानुसार वेगवेगळे पोशाख काचेच्या कपाटात टांगलेले दिसत होते. जवळच महिला प्रसाधनगृह होते. तिथे चक्क सॅनिटरी नॅपकीन्स ठेवलेले होते. कॅथेड्रलमध्ये !! मासिक धर्म व धर्म याची गल्लत न करता त्याचा इतका शांतपणे स्वीकार आपल्याकडे होईल का! गोव्याला मंगेशीच्या देवळाबाहेर ’अशा’ महिलांनी प्रवेश करु नये, असे स्पष्ट लिहिले आहे. अनेक धार्मिक ठिकाणी असे लिहिलेले असते किंवा अध्याहृत असते. जिला त्रास होतो, आराम हवा आहे ती अशा वेळी मंदिरात काय कुठेच जाणार नाही, जाऊही नये पण जी खास तिथे दर्शनाला आली आहे तिला या कारणाने दर्शन नाकारणे मग ते ’देवी’चे देऊळ असले तरी, हे सगळे अतार्किक तर आहेच पण दुर्दैवी आहे. ती सूचना वाचताना मला हे कॅथेड्रल पुन्हा आठवले होते.

मी आता सौ चिकन खाके शाकाहारी झालेली बिल्ली असल्याने रोजचे जेवण ही एक दिव्य परिक्षा असे. आपल्याकडे पाहुण्याला तो हात आडवा धरुन गयावया करेतो आग्रह केला तरच आपण चांगले यजमान असल्याचं सिद्ध होतं असं आपण मानतो, त्यात अर्थात भारतीय आतिथ्यशीलतेचा भाग असतो हे खरंय तसंच वाढत्या वयाबरोबर आपल्याकडच्या आग्रहाची भीती वाटू लागते हे ही. इकडे आम्हाला किचनमध्ये कुठे काय आहे ते होस्ट दाखवून देत. स्वागताची मेजवानी आटोपली की त्यांचे कर्तव्य संपे. गोदरेज कपाटाहून मोठ्या फ्रीजमध्ये दूध, लोणी, जॅम, चीज, भाज्या, ज्यूसेस आणि सॉसेस हे किमान असायचेच. घरात पाव आणि तांदूळ असत. त्यामुळे पोळी जरी मिळत नसली तरी आम्ही संशोधन करुन बरेच इंडोवेस्टर्न खाद्यप्रकार शोधून काढले. बाहेर गेलो की मात्र आमची विशेषत: माझी पंचाईत होई. मोठ्या क्लब मिटिंग असल्या की आपल्या अ‍ॅवॉर्ड फंक्शन सारखी गोल टेबलांची रचना असे. बोके आणि मांजरींना सुटाबुटात बसवले तर जसे दिसेल तशी मंडळी आजूबाजूला असत. ते खात असलेले पदार्थ अनोळखी असत. एकदा व्हेज प्लॅटर मागवली तर बशीत हे माँ माताजी!! उकडलेली भेंडी आणि परतलेली अळणी पानकोबी आली. बरं हॉटेलमधला मेनू पण इतक्या फॅशनेबल शब्दात लिहिलेला असे की त्यावरुन आत काय घातलंय याचा अंदाज येत नसे. धिप्पाड सहा फुटी वेटरशी एकमेकांना समजेल अशा इंग्लीशमधली चर्चा निष्फळ ठरली तर ज्यूस मदतीला येई. हॉटेलमध्ये आपल्याकडच्यासारखं पाणी आणून ठेवलेलं नसे. कोणतंही पेय इतकं काठोकाठ भरुन देत की आम्ही ’खाली ग्लास’ मागवून ते शेअर करत असू पण पानात काही टाकत नसू. त्यांना हे विचित्र वाटे कारण तिकडे सहसा आई पण मुलाचे उष्टे खात नाही. एकंदर ’टाकणे’ हा प्रकार तिकडे अगदी सर्वसामान्य आहे. टाकणं हा अन्नब्रह्माचा अपमान आहे मग बिल कुणी का देईना हे आम्ही त्यांना समजावून सांगत असू.आपल्याकडे सुद्धा अन्न टाकणे प्रकार असतोच पण अमेरिकेत दिवसभरात जितकी अन्नाची नासाडी दिसते त्यात एक विकसीनशील देश त्या दिवसापुरते पोट भरू शकेल असे वाटते. 

व्हिक्टर्स कॅफे नामक १०० वर्षांची परंपरा असलेल्या एका आगळ्यावेगळ्या उपाहारगृहात आम्ही गेलो होतो. आम्ही व फिली क्लबचे ५,६ जण मिळून. चपळ हालचाली करणारे चुणचुणीत वेटर आणि वेट्रेस अगदी तरुण विद्यार्थी असावेत असं वाटत होतं. अचानक घंटा घणघणली. दरवाज्यात उभ्या असलेल्या वेट्रेसने खड्या आवाजात एक छोटीशी कथा सांगितली. फ्रेंच राजकन्या आणि तिचं दुभंगलेलं हृदय असं काही त्यात होतं. हे सांगून होताच आम्ही दचकलो इतक्या तार स्वरात ती गाऊ लागली. आपल्या संगीतनाटकांमधल्या पदांसारखा हा ओपेरावजा गायनप्रकार होता. ती वेट्रेस त्याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेत होती असे कळले. असे अनेक होतकरु कलाकार तिथे गायक कम वेटर म्हणून काम करतात आणि आपली कला सादर करतात. हेच या कॅफेचं वैशिष्ट्य. इथला अनुभव म्हणे त्यांच्या कलाविश्वातील करियरमधला मह्त्वाचा टप्पा मानला जातो. तसंही तिथे कामाचा आणि खानदान की इज्जतचा काही संबंध नसतो. एका उच्चभ्रू जोडप्याने तर आम्हाला त्यांची मुलगी सकाळचं कॉलेज आटोपल्यावर संध्याकाळी जिथे वेट्रेस म्हणून काम करायची त्या रेस्टॉरंटला आवर्जून जेवायला नेलं होतं. (तर हे गायन प्रकरण आटोपल्यावर आमच्या ग्रुपमधल्या एकाचा वाढदिवस केक मागवून आम्ही साजरा केला आणि ’बार बार दिन ये आये’ हे आपलं युगानुयुगाचं कंपलसरी बड्डेसॉंग कोरस मध्ये म्हटलं. उपस्थितांसाठी अगम्य असणार्‍या या गाण्यात शेवटी ’हॅपी बर्थडे टू यू’ हा भाग इंग्लीशमध्ये असल्याने सर्वांना कळला आणि अख्ख्या हॉटेलमधल्या मंडळींनी टाळ्या पिटून ग्लासेस उंचावून त्याला विश केलं.) कोणत्याही कामाला कमी न लेखणे हा अमेरिकेचा मला सर्वात आवडलेला गुण.

एका ग्रामपंचायतीला (नाव टाळते आहे) भेट दिली असताना तिथल्या समुपदेशिकेला गावातल्या सोयी आणि समस्यांबद्द्ल विचारले. एक तर अशी पोस्ट तिथे असणं हे मला नवलाईचं वाटलं. आपल्याकडच्या पंचायत समिती किंवा तत्सम कचेर्‍यात गेल्यावर आपण अगदी अडाणी असल्याचं फीलिंग येतं. इकडे व्यवस्थित पाट्या, हसरी देखणी स्वागतिका. छताला झुलणारं एकही जाळं नाही, मध्ययुगीन काळातले वाटणारे निराशावादी पंखे नाहीत. फायलींवर धूळ असायला फायलीच नाहीत कारण सगळीकडे चकचकीत कपाटं. हा, तर त्या समुपदेशिकेला त्या पोस्टींगचं कारण विचारलं. ती म्हणाली, १२-१३ वर्षांच्या कुमारी माता ज्याला ते किड्स प्रेग्नंसी म्हणतात त्याचं प्रमाण खूप जास्त आहे. मोठ्या हॉस्पीटलमध्ये प्रसूतीचा खर्च प्रचंड. शाळेतल्या मुलींना लैंगिक शिक्षण देण्याऐवजी गर्भनिरोधक वाटावी लागणं, शाळेत सोबत कोणी हत्यार, बंदूक आणलेली नाही ना हे तपासण्यासाठी मेटल डिटेक्टर बसवावे लागणं ही तिथली शोकांतिका ऐकून धस्स झालं. योग्य अयोग्य याची निवड करण्याची समज वाढवण्याऐवजी ते तात्पुरती मलमपट्टी करतायत असं जाणवलं. नंतर सॅल्व्हेशन आर्मी (पुनर्वसन) केंद्र पाहिलं. तारवटलेल्या लालसर डोळ्यांचे, भकास चेहर्‍याचे गर्दुल्ले किंवा पियक्कड तिथे टीव्हीवर चमत्कारिक सिनेमा पाहत कसेही वेडेवाकडे बसले होते. कर्कश्य संगीत सुरु होतं. चित्रविचित्र कपडे, पिळापिळाच्या केशरचना, बहुतेक सगळे ब्लॅक. संसार टिकण्याचं प्रमाण कमी, पोरांचं लेंढार सांभाळत एकटं राहिलेल्या नशेच्या आहारी गेलेल्या, डिप्रेशनमधल्या जंकफूडच्या अतिसेवनाने लठ्ठ झालेल्या बायका, अशा एकल पालकांची भणंग बेकार अल्पशिक्षित मुलं. हे सुद्धा चकाकत्या अमेरिकेचं विदारक रुप आहे. आपल्याकडेही आता या समस्या खूप वाढत असल्या तरी याबाबतीत आपण त्यांच्यापेक्षा थोडे मागासलेले आहोत.

एका होस्टच्या मित्राला आम्हाला काही ठिकाणं दाखवायची जबाबदारी दिली होती. रस्त्यात मध्येच गाडी थांबवून त्याने आम्हाला एका घराशी नेलं. घर अगदी टिपिकल अमेरिकन पद्धतीचं. एका बाजूला गॅरेज, हिरवंगार लॉन, घराची पांढरी आणि राखाडी पण टवटवीत रंगयोजना. घर बंद होतं. मागच्या खिडकीत एक वेगळाच शोपीस लटकत होता. त्याने त्यावरुन हात फिरवला. ’अजूनही हा इथंच आहे’ म्हणत हसला. आम्हाला काही कळेना. मग त्याने सांगितलं की तो आणि त्याची आधीची बायको इथे ५ वर्ष राहत होते. मग आम्ही हं म्हणणार तर तो पुढे म्हणाला की हे घर त्या बायकोच्या आधीच्या नवर्‍याचं आहे. आम्ही ’जोड्या लावा’ खेळत होतो तोच तो म्हणाला की त्याच्या बायकोचा (ह्याच्या) आधीचा नवरा म्हणजे घराचा मूळ मालक आणि त्या नवर्‍याची आताची बायको सध्या तिथे राहतात पण ते नेमके कुठेतरी गेलेले दिसतायत. हे घर आतून खूप सुंदर आहे आणि वाटेवरच होतं म्हणून तुम्हाला जस्ट दाखवायला आणलं होतं. हे सगळं ऐकून आम्हाला घेरी यायची बाकी होती. या क्षेत्रात भारतीय फारसे मागे नसले तरी त्यात अद्याप तरी इतकी चक्रवाढ व्याजाची गुंतागुंत निर्माण झालेली नाही. आपलं ८ वं लग्न (चुभू देणेघेणे)  आपल्याच पहिल्या नवर्‍याशी पुन्हा करणारी एलिझाबेथ टॆलर आठवली. आम्हा सर्वांचे आधीचे आणि आत्ताचे नवरे व बायका तेच असल्याबद्दल आम्हाला एकदम हायसे वाटू लागले. :-)  

शेवटी एक नोंद राजकारणाबद्दल. गांधीजी ही तेव्हा बहुतेक मध्यमवर्गीय अमेरिकनांना माहित असणारी महत्वाची एकमेव भारतीय व्यक्ती होती. वॉशींग्टनला भारतीय वकिलातीसमोर त्यांचा पुतळा आहे. आपल्याइकडे मात्र अमेरिकेच्या राजकारणावर तावातावाने चर्चा होते. आपल्याला नुसते त्यांचे राष्ट्राध्यक्षच नव्हे तर मोनिका ल्युएन्स्कीपासून मिशेल ओबामापर्यंत, रिपब्लिक डेमोक्रॅट पक्षांबद्दल बरच काही माहित असतं. त्यांना आपली बीजेपी, कॉंग्रेस वगैरे काहीही माहित नसायचं (तेव्हा तरी) लिंबूटिंबू पक्ष तर जाऊच द्या. कारण अमेरिका हेच त्यांचं जग आहे. मार्क ट्वेनने उपरोधाने म्हटलं होतं, अमेरिकेला भूगोल कळावा म्हणून बहुतेक जगात युद्ध होत असावीत. तर तेव्हा ओबामा आणि हिलरीपैकी कुणाला तिकिट मिळेल याची चर्चा होती. माजी अध्यक्षाची बायको म्हटल्यावर ती जास्त प्रसिद्ध असेल असं मला वाटलं होतं. प्रत्यक्षात या महासत्तेची अध्यक्ष एक स्त्री कधीच होऊ शकत नाही हेच जनतेचं साधारण मत असल्याचं आमच्या लक्षात आलं. आजही कमला हॅरिस उपाध्यक्ष आहे, अध्यक्ष नाही. आपल्याकडे एका दशकाहून जास्त इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. ममता, जया, मायावती, सुषमा स्वराज यांच्यासारख्या भिन्न मतप्रवाहाच्या, विवाद्य पण पंतप्रधानपद सांभाळण्याचं पोटेन्शिअल असलेल्या आणि अत्यंत यशस्वी राजकीय कारकीर्द करणार्‍या महिला आठवून मला जरा बरं वाटू लागलं.

आज इतकंच.  ☺

Tip- The context is Year 2007

Wednesday, October 6, 2021

को जागर्ति

#

कोजागरी पौर्णिमा आपण आज साजरी करतोय. चांदण्यांच्या प्रकाशात आकाशाच्या घुमटाखाली आटीव मसाला दुधाचं प्राशन करत जागरण करत एकत्रीकरण, ही त्यामागची सुंदर संकल्पना आहे. आमच्या सोसायटीत ’कोणाला बोलवायचं, कोणाला नाही, दुधाआधी बटाटेवडे ठेवायचे की पावभाजी’ वगैरे अत्यंत महत्वाच्या विषयावर घनघोर चर्चा झडतायत. त्यातही एक मजा आहे पण यापलीकडची  लहानपणची कोजागरी आठवते. चांदणं पडलं की आई दादाचं औक्षण करी. चांदण्यांचा स्वच्छ दुधी प्रकाश आणि निरांजनाच्या ज्योतीचा सोनेरी प्रकाश मिसळून एक छानसा बिलोरी रंग पसरे. मग आई काहीतरी छोटीशी भेटवस्तू देई. साधारणपणे लहान म्हणून घरोघरी शेंडेफळाचंच कौतुक होतं. ज्येष्ठांचं ((घरातल्या ज्येष्ठ मुलाचं किंवा मुलीचं) कौतुक करणारी ही अश्विन पौर्णिमेची खास पद्धत. अश्विन आणि कार्तिक हे दोन महिने मिळून शरद ऋतू होतो. त्यामुळे ही कोजागरी पौर्णिमा म्हणजेच "शरद पौर्णिमा". कुणी याला कौमुदी पौर्णिमा सुद्धा म्हणतात तर या पौर्णिमेला माणिकेथारी (मोती तयार करणारी) असेही म्हटलं जाते.

काही भागात याला "नवान्न पौर्णिमा" असेही म्हणतात. आपल्या कृषी संस्कृतीमध्ये हा दिवस विशेष महत्वाचा आहे. शेतकरी वर्गाला निसर्गाबद्दल वाटणारी कृतज्ञता यानिमित्ताने व्यक्त केली जाते. शेतीची कामे अर्धी किंवा अधिक झालेली असता. शेतातील पिके तयार होत आलेली असतात. पावसाळा संपून काही काही पिके हाताशी आलेली असतात. घर धान्याने भरु लागते. या नव्या धान्याचे स्वागत, एकप्रकारे पूजा करण्याचा दिवस म्हणजे नवान्न पौर्णिमा. आता या वेगवेगळ्या नावांनी आणि पद्धतींनी साजर्‍या होणार्‍या पौर्णिमेचा दूध पिण्याशी नेमका काय संबंध! 

या सुमारास सूर्याचे दक्षिणायन सुरू असते. शरद ऋतूमध्ये हवामानात बदल घडत असतात. वातावरणातील उन्हाची तीव्रता हळूहळू कमी होते तरीही दिवसभर उन्हाचा ताप आणि रात्री थोडीशी थंडी असे मिश्र वातावरण असते. शरद ऋतूमध्ये वाढणाऱ्या पित्ताने शरीराला त्रास होऊ नये म्हणून दूध पिण्याचा रिवाज सुरु झाला असावा. या दिवशी सुकामेवा, चारोळी, जायफळ आणि अर्थात साखर घालून दूध सुगंध पसरेतो आटवले जाते. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडली की मग ते दूध प्राशन केले जाते. दूध आणणे, तापवणे, आटवणे, ते आस्वाद घेत पिणे हा एकत्रित अनुभव त्या दुधाची गोडी अजूनच वाढवतो. या दिवशी पांढर्‍या रंगाचे विशेष मह्त्व आहे असे म्हणतात कारण हा त्या दिवशीचा निसर्गाचाच ’कलर कोड’ असतो. पांढरी फुलेही या कौमुदी उत्सवाचाच एक भाग होतात.

कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र संपूर्ण १६ कलांमध्ये असतो. या दिवशी तो पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असतो. नेहमीपेक्षा मोठा गरगरीत दिसतो. कोजागरीचं शीतल चांदणं अनुभवलं की शांत वाटू लागतं. सर्वत्र पसरलेली चंद्रकिरणं मनाला तृप्तीची अनुभूती देतात. मनातला उन्हाळा, तगमग त्या किरणांच्या उर्जादायी स्पर्शाने निवते. तसा आताशा आपला चांदण्याशी संबंध येतोच कुठे. मिलेनियलपूर्व पिढीने गच्चीवर झोपण्याची मजा अनुभवलीय. चांदण्यांनी खच्चून भरलेलं मखमली आकाश मूकपणे बघता बघता झोपेची दुलई हलकेच पांघरली जाई. आताच्या धावपळीच्या आयुष्य़ात हा निवांत प्रकार बंदच झाला. अशा वेळी ’जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या सिनेमातला प्रसंग आठवतो. कॉर्पोरेट विश्वातल्या धावपळीत गढून गेलेल्या नायकाला निसर्गाशी आणि त्यायोगे स्वत:शी संवाद साधण्याची कधी उसंतच मिळालेली नसते. या ताणांमुळे आधुनिक घरांमधल्या आकर्षक छताकडे टक्क पाहत जागा राहण्यापेक्षा ’मध्यरात्री नभ घुमटाखाली शांत शिरी तम चवर्‍या ढाळी’ ची अनुभूती काही वेगळीच असल्याची जाणीव नायिका त्याला करुन देते. जमिनीला पाठ टेकून तो पहुडतो आणि स्वछंदपणे आकाशाकडे पाहतो. चांदण्यांनी लगडलेल्या काळ्याभोर आकाशाकडे पाहताना त्याला आपल्या जगण्यातल्या हरवलेला सूर गवसतो. असे क्षण आपल्या आयुष्यात आणण्याचा एक ’बहाना’ म्हणजे कोजागरी.

भारतीय बौद्ध धर्म संस्कृतीत या दिवसाला विशेष मान्यता आणि मह्त्व आहे तर हिंदू धारणेनुसार या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवर उतरते. मध्यरात्री म्हणजे चंद्र आपल्या सौम्य प्रकाशात पृथ्वीला न्हाऊ घालत असताना त्या प्रकाशात "अमृतकलश' घेऊन 'को जागर्ति' (म्हणजे 'कोण जागते आहे') असे म्हणत पृथ्वीतलावर संचार करीत असते. ’कोण जागे आहे’ याचा मथितार्थ आहे कोण सजग आहे, कोण ’भानावर’ आहे, कोण ज्ञानासाठी आतुर आहे. तिच्या हाकेला प्रतिसाद देण्यासाठी सगळे जागे राहतात. या जागे असलेल्या मंडळींना ती आशीर्वाद रुपाने "अमृत' म्हणजेच धनधान्य, सुखसमृद्धी देते. इथे सजग असण्याचा अर्थ ’न झोपलेला’ असा अर्थातच अभिप्रेत नाही. जो प्रयत्नवादी आहे, कष्टाळू आहे, ज्ञानार्थी आहे, जो स्वत:ला समष्टीशी म्हणजे चराचरातील समृद्धीशी जोडून घेऊ इच्छितो अशा व्यक्तीलाच यश आणि वैभव लाभतं असा येथे लाक्षणिक अर्थ आहे. 

कोजागर साजरी करणे आणि जागरण या गोष्टी अभिन्न आहेत. मनोरंजनासाठी या जागरणात खेळ, गाणी इ. साधनांचा समावेश अवश्य असावा पण संवादही असावा. आजच्या रात्री लक्ष्मी प्रसन्न व्हावी म्हणजेच आपण श्रीमंत व्हावे असे ज्याला ज्याला वाटते त्याला कायम सजगतेचे व्रत घ्यायला हवे. ही श्रीमंती फक्त आर्थिक अपेक्षित असेल तर ती अपुरी आहे. मनाची आणि बुद्धीची श्रीमंतीही जोडीला हवी. माणसाने माणसाला प्रेमाने भेटणं, माणसाने माणसांच्या आणि जगण्याच्या भाऊगर्दीत स्वत:ला शोधणं, माणसाने आपल्यापेक्षा वेगळ्या माणसांना सामावून घेत आपलं वर्तुळ विस्तारणं हेच बहुतेक प्रथांचं मुलभूत उद्दिष्ट्य आहे. ते साध्य होत असेल तर ’को जागर्ति’ या प्रश्नाला आपण दुधाच्या पेल्यांनी ’चीअर्स’ म्हणत निस्संदिग्धपणे ’मी’ असं उत्तर देऊ शकू.

#kojagari 

पूर्वप्रसिद्धी- दिव्य मराठी ऑक्टोबर २०२१