Tuesday, February 15, 2022

भारुन टाकणारं ह्म्पी The city of victory. A city of ruins -1

 

Unicorn type sculpture in Vijay Vitthal Mandir
मित्रमंडळींनी शेअर केलेले नजरबंदी करणारे फोटो, थोडाफार ह्म्पी सिनेमाचा प्रभाव (ह्म्पी त्यातील एक पात्रच आहे, असं परिक्षणात म्हणायची हल्ली पद्धत आहे) आणि काही व्हिडिओ पाहून मिळालेली माहिती यांच्या कोलाजमधून ह्म्पीबद्द्ल एक गूढ, अनामिक ओढ निर्माण झाली होती. आधी ’बदामी’ आणि तिथून ह्म्पीच्या वाटेवरचे ’पट्टदकल-ऐहोळे’ पाहिल्यावर तर ’आगाज़ ये है तो अंजाम क्या होगा’ याची उत्सुकता वाढली होती. आमच्या अपेक्षेपेक्षा ह्म्पीने कितीतरी जास्त, भरभरुन दिलं. भारुन टाकलं. चकित केलं. अंतर्मुख केलं. 

१४, १५ व्या शतकात आणि १६ व्या शतकाच्या मध्यापर्यंत म्हणजे किमान २०० वर्षे कर्नाटकातलं ’ह्म्पी’ समृद्ध स्थापत्यकलेचा ’आयकॉन’ होतं. याचे पुरावे देखण्या अवशेषांच्या स्वरुपात आम्हाला जागोजागी बघता आले. इथे आम्हाला श्रीनिवास म्हणून कुशल गाईड भेटला तरीही काही दुवे सुटल्यासारखे वाटत होते, काही प्रश्न अनुत्तरित राहिले होते. John Fritz आणि George Michell या दोन पुरातत्वतज्ञांनी ह्म्पी किमान वीस वेळा पालथं घातलं आहे. त्यांच्या आंतरराष्ट्रीय चमूने इथे उत्खनन, संशोधन, अवशेषांचं परिक्षण आणि दस्तावेजीकरणाचं अत्यंत महत्वाचं काम केलंय. या दोघांनी लिहिलेलं ’ह्म्पी’ हे पुस्तक वाचल्यावर सुटलेले अनेक दुवे जुळले. तत्कालिन कॉस्मोपॉलिटन ’ह्म्पी’ अधिक वस्तुनिष्ठपणे समजून घेता आलं. 


Hampi Entrance

दक्षिण भारतातील या सर्वात श्रीमंत राजधानीविषयी या पुस्तकात समाविष्ट असलेल्या तत्कालीन विदेशी प्रवाशांनी लिहिलेल्या नोंदी बघितल्या तर तेव्हाच्या समाजव्यवस्थेची, जीवनशैलीची कल्पना येते. 

१५०१ मध्ये पहिल्या पोर्तुगीज आरमाराबरोबर भारतात आलेला बार्बोसा हा गोवामार्गे विजयनगरात दाखल झाला. त्याने या शहराचा उल्लेख Bisnagua असा केला आहे. इथे कुणालाही येण्याजाण्याची व आपापल्या समूहानुसार प्रेम करण्याची मुभा आहे मग तुम्ही ख्रिस्ती, ज्यू, मूर (मुस्लीम) किंवा हेदन (हिंदू) कुणीही असा, असे तो नोंदवतो. व्यापारी आणि श्रीमंत माणसांनी गजबजलेल्या या शहरातल्या बाजारपेठेचे वर्णन करताना बार्बोसा लिहितो. "इथे हिर्‍याच्या खाणी आहेत. पेगू(बर्मा), सीलम (सिलोन) इथून येथे विक्रीसाठी रत्न येतात. चीनमधून आलेले दुय्यम प्रतीचे ब्रोकेड, (Chinese material is known for it's inferior quality since then , it seems) धातू, विशेषत: तांबे, चांदी, याशिवाय केशर, गुलाबजल, चंदन, सुगंधी द्रव्ये आणि केरळमधून गाढवांवर लादून विक्रिला आलेले मिर्‍यांसारखे मसाले यांचा इथे मोठा व्यापार होतो. व्यवहारात वापरल्या जाणार्‍या सुवर्णमुद्रा विशिष्ट ठिकाणी तयार होतात, एकीतही खोट आढळत नाही." 

तत्कालिन जीवनशैलीबद्दल बार्बोसाच्या नोंदी रंजक आहेत. "राजाचे(राय) वास्तव्य बहुतांशी या शहरातच असते. इथले नागरिक हेदन (हिंदू) आहेत. पुरुष उंच आहेत. त्यांचे केस लांब आणि काळे आहेत. स्त्रिया देखण्या आणि धीट आहेत. त्या तलम, सुती किंवा गडद रंगाचे रेशमी कपडे वापरतात. कमरेभोवती (निर्‍या) व छातीवर (पदर) हे वस्त्र त्या अशा पद्धतीने गुंडाळतात ज्यात त्यांचा एक हात आणि तो खांदा उघडा राहील. डोक्यावर आच्छादन नसते. त्या केसांचा अंबाडा घालतात. त्यावर गजरे माळतात. त्यांच्या नाकात रत्न किंवा मोत्याची सुंकली असते. तसेच गळ्यात, कानात, हातात सोन्याचांदीचे दागिने असतात. चामड्याची सुशोभित पादत्राणॆ त्या वापरतात. (बार्बोसाने केलेले पुरुषांच्या पोशाखाचे वर्णन धोतराशी जुळणारे आहे.) डोक्यावर पगडी, टोपीसारखे प्रकार पुरुष वापरतात. विशेष प्रसंगी ते खांद्यापासून पायघोळ कपड्यात दिसतात. ते देखील रत्न, मोत्यांच्या दागिन्यांचा आणि सुगंधी द्रव्यांचा मुबलक वापर करतात. 

Krishnadevaraya Coronation mandap in the left

इथल्या स्त्रियांना नृत्य, गायन, वादन इ. कला लहानपणापासून शिकवल्या जातात. श्रीमंत पुरुष अनेक स्त्रियांशी विवाह करतात. राजालाही अनेक राण्या व दासी आहेत. राजा कामकाजासाठी नियमित दरबार भरवतो. अपराध्यास कठोर शासन तसेच आर्थिक दंड केला जातो. राजाजवळ सुमारे ९०० हत्ती आणि २०००० घोडे आहेत. सरदार, मनसबदारांनाही हुद्द्यानुसार घोडे दिले जातात. इथले स्थानिक घोडे फार जगत नसल्याने चांगल्या प्रतीचे उमदे घोडे आयात केले जातात. हत्तीघोड्यांबरोबरच राजा सैन्याची आणि पाच ते सहा हजार स्त्रियांचीही (zenana) देखभाल करतो. या कलाकुशल स्त्रिया त्याच्या मिरवणुकीत सहभागी होतात. सैनिकांना युद्धावर जाताना त्यांच्या रंजनासाठी यातील निवडक स्त्रिया सोबत दिल्या जातात."

लुडोविको द वर्थेमा हा १५०९ च्या सुमारास येथे आलेला इटालीयन प्रवासी तर या शहराचे ’मी पाहिलेला स्वर्ग’ अशा शब्दात वर्णन करतो. राजाकडची अलोट संपत्ती, हजारोंचे घोडदळ, रत्नखचित पोषाख ,दागिने याचे कौतुक करताना इतका श्रीमंत राजा मी जगात पाहिला नाही, असेही लिहितो.

---------


आजचे ’हम्पी’ तुंगभद्रा नदीमुळे दोन भागात विभागले गेले आहे. एका बाजूला मंदिरे, आणि पूर्वीच्या विजयनगर शहराचे अवशेष आहेत तर दुसऱ्या बाजूला लहान हट्स व कॅफे आहेत. हा भाग हिप्पी लँड म्हणून ओळखला जातो परंतु कोरोनाकाळात काही दुरुस्ती काम सुरु केल्याने आम्हाला तो बघता आला नाही. 

Geological Background 


हम्पीतली प्रमुख स्थळं ज्यात बहुतांशी मंदिरच आहेत, त्यांच्या बांधकामात ग्रॅनाइट आणि मऊ शिस्ट रॉकचा वापर केला गेला आहे. एकेकाळी जमिनीच्या पोटात असलेले हे पहाड भूकंपासारखी उलथापालथ होऊन वर आले आणि सुमारे ३ अब्ज वर्ष उन्ह, वारा, पावसाचे तडाखे सोसून दगडांच्या विविध आकारांच्या राशीत रुपांतरित झाले. हे दगड अलंकारिक बारीक कोरीव कामासाठी उपयुक्त असतात. यांचा वापर करून रामायण आणि महाभारत या दोन महाकाव्यांपासून प्रेरित असलेल्या गाथा हम्पीमधल्या मंदिरांमध्ये सभामंडप, खांब, छत आणि भिंतींवर अशा सर्वत्र कोरलेल्या आढळून येतात. 

Mythological Background

रामायणात वर्णिलेल्या किष्किंधा नगरीचा परिसर तो हाच. लोकप्रिय रामायणानुसार सीतेच्या शोधात असलेले राम आणि लक्ष्मण इथे पोचले. इथेच त्यांची भक्त हनुमानाशी प्रथम भेट झाली. हनुमानाने त्यांची सुग्रीवाशी भेट घडवली. वाली-सुग्रीवांच्यातील संघर्षाबद्दल सांगितले. सीतेला आकाशमार्गे रावण पळवून नेत असताना  सुग्रीवाने पाहिले होते. राम व सुग्रीवाने एकमेकांना मदत करायचे ठरवले. रामाने वालीचा वध करुन सुग्रीवाला पुन्हा गादीवर बसवले तर सीतेला अशोकवनातून सोडवण्यासाठी सुग्रीवाने आपली वानरसेना रामाच्या मदतीला दिली. (आजही या परिसरात खूप माकडं आहेत.)

Historical Background

ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहायची झाली तर दिल्ली सुलतानाच्या आक्रमणापासून बचावलेल्या या भागात सुरुवातीला स्थानिक हुक्का (हरीहर १३३६-५६) आणि बुक्का(१३५६-७७) यांचे अधिपत्य होते. हा भूभाग त्यांना बहामनींच्या दहशतीमुळे फारसा वाढवता आला नाही. नंतर गादीवर आलेल्या संगम घराण्याच्या देवराय पहिला (१४०६-२२) दुसरा (१४२४-४६) यांनी मात्र आपले राज्य पार अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारले. पुढे कृष्णदेवराय (१५०९-२९) आणि अच्युतराय (१५२९-४२) यांनी यावर कळस चढवून राज्य अत्यंत भरभराटीला नेले. यानंतर सदाशिव व रामराय कारभार पाहू लागले.

 पुढच्या घटनांचे चटका लावणारे वर्णन सीझर फ्रेड्रिक या इटालियन प्रवाशाने (इ.स. १५६७) केले आहे. " १५६५ मध्ये तलिकोटा ची लढाई हरल्याची बातमी पोचताच रामराय व त्याच्या बंधूंच्या कुटुंबियांनी जीव मुठीत धरून शहरातून पलायन केले. पाठोपाठ बेरार, विजापूर, गोवळकोंडा व अहमदनगरच्या सुलतानांनी बेझेनगर (विजयनगर) काबीज केले. पुढील सहा महिने त्यांनी घराघरात शिरून लूट केली. आपल्या मूळ प्रदेशापासून दूर असलेले हे शहर सांभाळणे शक्य न झाल्याने ते आपापल्या प्रांतात निघून गेले. ते जाताच अड्यार घराण्यातील तिरुमला व वारसदारांनी ते शहर पुन्हा वसवून गतवैभव प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पण शहरातला बराच भाग भग्न, उद्ध्वस्त झाला होता. घरे ओस पडली होती. त्यात चक्क जंगली श्वापदे वसतीला आली होती. अखेर हे साम्राज्य हळूहळू लयाला गेले"

पुढे १७-१८ व्या शतकात हैद्राबादचा निजाम, हैदर अली, टिपू सुलतान आणि मराठ्यांनीही विजयनगरावर स्वामित्वाचा दावा केला. १७९९ च्या अ‍ॅंग्लो-म्हैसूर युद्धानंतर हा भाग ब्रिटीशांच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात गेला. आज कर्नाटक सरकार आणि पुरातत्त्वविभागाच्या प्रयासाने गतकालीन वैभवाची साक्ष देणारं ह्म्पी शक्य तितकं रिस्टोअर करून जागतिक वारसा स्थळ म्हणून जतन करण्यात आलंय. 

Vijay Vitthal mandir

इथे सर्वप्रथम आम्ही गेलो ते विजय विठ्ठल मंदिर संकुलात. पार्किंगपासून आतपर्यंत जायला बॅटरीकार होत्या. स्थानिक प्रशिक्षित महिलाच या कार चालवतात. देवराय द्वितीयच्या कारकीर्दीत (१४२२-१४४६) निर्मिलेल्या या मंदिरातील विष्णूचे कानडा ओ विठ्ठ्लू रुप तो मूळचा कर्नाटकूच असल्याची साक्ष देते. पौराणिक कथांनुसार, हे त्याचे विश्रांतीस्थान होते. गोपुरातून आत शिरताच मंदिराच्या सौंदर्याने स्तिमित व्हायला होतं. 

The Garuda (shrine) chariot in in Vijay Vitthal Mandir

विठ्ठ्लासमोर गरुडदेवाचा अप्रतिम कोरीवकला दर्शवणारा रथ आहे. आपल्या ५० रु.च्या नोटेवर याची प्रतिकृती आहे. मुळात रथाला घोडे जोडले होते. नूतनीकरणानंतर आता तिथे हत्ती दिसतात. इथले ५६ संगीतस्तंभ हे तर एक आश्चर्यच आहे. चंदनाच्या काठीने एकेकावर ह्लका प्रहार करताच वेगवेगळा सूर ऐकता येतो. या स्तंभाच्या आत धातू असल्याशिवाय संगीतमय ध्वनी निर्माण होणार नाही असे इंग्रजांना वाटले. त्यामुळे त्यांनी दोन स्तंभ पाडले. परंतु स्तंभाच्या आत असे काही आढळले नाही. पर्यटकांनीही हे खांब बडवून पाहिल्याने आता आत प्रवेश करायला मनाई आहे. 

Kalnyanam Mandap Roof

बाजूला कल्याणम् (लग्न) मंडप आहे. इथे विवाह होत असत. मला इथे ’आमच्यात विवाहाला वाट्टोळम् म्हणतात’ हा भाऊ कदमचा इनोद आठवला. हा विनोद बरा पण इथे शूट केलेले राउडी राठोडमधले गाणे भयंकर. एक कडवे इथे तर दुसरे थेट जर्मनीत शूट केलेल्या या टुकार आचरट गाण्याला ह्म्पीच्या पार्श्वभूमीमुळे कोणता असा फायदा झाला विठ्ठ्लच जाणे. गर्दी फारशी नव्हती. एक परदेशी गोरा बाबा, देशी सावळी आई आणि बाबांचं बोट धरून दुडदुडणारं त्यांचं धोती घातलेलं कुरळ्या केसांचं गोड टोपलं मात्र आम्हाला सारखं क्रॉस होत होतं.  




Lotus Mahal in the Zenana enclosue

तिथून पोचलो -जनाना उर्फ राणीमहल, कमल महल आणि भव्य हत्तीशाळा - हे एकाच प्रांगणात आहे त्या अर्थी हा राणीमहालच नसून सरदार निवास असावा. या महालाचा आकार कमळासारखा आहे. हा महाल दोन मजली असून त्याचे बांधकाम दगडांऐवजी चुना आणि वीट वापरून केलेले आहे. 

Zenana Enclosure Entrance

या महालाच्या बांधकामाची शैली हि इंडो- अरेबिक आहे बहामनींच्या मुस्लिम स्थापत्यकलेचा प्रभाव या तीनही स्थळांच्या रचनेवर असावा. विशेषत: कमानी आणि घुमट. कमलमहल मध्ये नृत्य केले जाई, राण्या विश्राम करत असं गाईड म्हणाला पण पुस्तकानुसार इथे महत्वाच्या राजकीय बैठका होत. 


Elephant stable near Lotus mahal

भव्य हत्तीशाळा पाहून हत्तींची किती काळजी घेतली जाई हे लक्षात येतं. यानंतर गेलो ते होते राणी बाथ म्हणजे एक आकर्षक दगडी चौकोनी पायर्‍यांचा तलाव, नैसर्गिक उतार वापरून यात दगडी कालव्यांमधून आणलेलं पाणी सोडलं जाई. हे सुद्धा सरदार, मनसबदारांच्या बायकांच्या स्नान, विश्रामासाठी बांधलं होतं. 
Queen's bathe showing balconies and pool

शाही स्त्रियांची विशेष काळजी घेतली जाई हा उल्लेख वर आला आहेच. पहिला देव’राय’ गादीवर बसला त्याच सुमारास हम्पीला पोचलेला इटालियन प्रवासी निकोलो कोन्टी. तो लिहितो ,"राजाच्या मिरवणुकीत हजारो स्त्रिया त्याच्या विजयरथासह चालत जात असत. (त्या सगळ्या राण्या किंवा राणीवशातील स्त्रिया असत) धार्मिक समारंभात रथ ओढले जात त्यापुढे नागरिक स्वत:ला झोकून देत असत." ही त्यांची आपल्या दैवताबद्द्ल श्रद्धा आणि आदर व्यक्त करण्याची काहीशी चमत्कारिक पद्धत असावी. 



Mahanavmi Platform

यानंतर बघितला महानवमी (डिब्बा) मंच- कृष्णदेवरायनी उदयगिरी ( ओरिसा ) जिंकल्यावर विजयाचं प्रतीक म्हणून हा आयताकृती विशाल मंच बांधला. रामाने रावणाशी होऊ घातलेल्या युद्धात विजय मिळावा म्हणून दुर्गेची पूजा केली. याच तत्त्वाने पावसाळा संपल्यावर म्हणजे पीक पाणी आटोपले की सैन्याच्या मोहिमा सुरु होण्याआधी या मंचासमोर दरवर्षी दुर्गापूजा आणि महानवमी उत्सव साजरा होऊ लागला. ’बाहुबली’ सिनेमातील एका प्रसंगामध्ये अशा प्रकरचा डिब्बा (मंच) वापरला आहे. महानवमी उत्सवाला व्यापारी संबंध असलेल्या देशातील पाहुणे व कलाकार येत. तुर्की नृत्यकलाकारांच्या प्रतिमा मंचाच्या बाजूने कोरलेल्या दिसतात. १४४३ मध्ये म्हणजे देवराय द्वितीयच्या कार्यकाळात राजकीय दौर्‍यावर आलेला पर्शियन सरदार अब्दुल रझाक. या उत्सवाचे वर्णन करताना तो लिहितो, "मी जगात कुठेही इतकं अद्भुत शहर पाहिलेलं नाही. अर्धे जमिनीत गाडलेले पुरुषभर उंचीचे चिरे एकमेकांना आणि एकमेकांवर जोडल्याने इथल्या किल्ल्यांची तटबंदी इतकी अभेद्य झाली आहे की ती पार करणे सैनिकालाच काय एखाद्या दमदार घोड्यालाही अशक्य आहे." 

Royal hunters carved on Mahanavmi platform walls

मेघडंबरी, छत्रचामरे व सर्व लवाजमा घेऊन महानवमी उत्सवात आगमन केलेला राजा मंचावरील अधिकारी व पाहुण्यांसमोर आपल्या वैभवाचे व सैन्याचे शक्तीप्रदर्शन करत असे. सरदार, मनसबदारांसह हजारो हत्ती त्याला सलामी देत. राजा रत्नखचित सुवर्णसिंहासनावर बसत असे. मंचासमोर कुशल कलाकार आपल्या कलेचे सादरीकरण करत असत. मल्ल कुस्ती खेळत. तलवारबाजी होई." परदेशी पाहुण्यांमार्फत जगभरात या शक्तीप्रदर्शनातून योग्य तो ’संदेश’ पोचत असावा. हे सगळे वाचताना मला आपली २६ जानेवारीची परदेशी पाहुण्यांसमोर सादर केली जाणारी परेड आठवली. 

आम्ही मंचाच्या शेवटच्या प्रतलावर जाऊन सभोवतालचे ह्म्पी डोळे भरुन पाहिले. तिथे एकटे फिरणारे एक चिपकू टूरिस्ट आजोबा आमच्याशी उगाचच कारणं काढून बोलत होते. त्यांना कटवून आम्ही मागच्या बाजूने खाली उतरलो. मंचाच्या भिंतीवरची कारागिरी पाहत प्रदक्षिणा घातली.

Stepped tank in the Royal centre- Pushkarani

महानवमी मंचालगत एक आकर्षक पायर्‍या पायर्‍यांची पुष्करणी होती. पार जमिनीखाली गेलेली ही पुष्करणी 1980  च्या दशकात पुरातत्त्वविभागाला सापडली मग पूर्ण खोदकाम करून रिस्टोअर करण्यात आली. तुंगभद्रा नदीचेच पाणी यात खेळवले जात असे. नदीपासून काढलेला चिरेबंदी कालवा लगतच होता. 

सैनिकांच्या भोजनासाठी, खळगे केलेल्या भल्यामोठ्या दगडी थाळ्यांची रांग त्याला लागून होती. पुढे पायर्‍यांच्या विहीरीसारखे काही होते. आत पाहिले तर खाली एका भुयाराचे बंद दार दिसत होते. ते भुयार कुठे उघडते हे राजघराण्यातील निवडक व्यक्तिंनाच माहित असायचे असे श्रीनिवास सांगत होता. मी तरी अशी खोल लांब भुयारं फक्त सिनेमा आणि magnificient century type वेबसिरीजमध्येच पाहिली होती. आत्यंतिक समृद्धी असल्याने सतत आक्रमणाच्या भीतीच्या छायेखाली वावरत असलेल्या राज्यात सुरक्षिततेसाठी अशा गुप्त जागांची आवश्यकता असणारच. 

१५२० च्या सुमारास म्हणजे कृष्णदेवरायाच्या काळात विजयनगरात आलेला पोर्तुगीज घोडेव्यापारी दोमिंगो पेसने तत्कालिन स्थितीचे सर्वात प्रदीर्घ वर्णन केले आहे. "पर्वतांनी आणि दगडांच्या राशींनी वेढलेल्या या शहरात प्रवेश करताना उतारापासून आतपर्यंत भातशेती आणि अनेक भाज्या, फळांची लागवड केलेली आहे. मी आत आलो ते भक्कम तटबंदी असलेल्या गोव्याच्या बाजूकडील प्रवेशद्वारातून. सिंचनासाठी तयार केलेल्या एक भव्य तळ्याचा बांध काही ना काही कारणाने फुटून जाई म्हणून पुरोहितांच्या सल्ल्यानुसार राजाने काही पशुंसह नरबळी दिले होते. जवळच राजाने लाडकी राणी तिरुमलादेवीसाठी नगर वसवले (आजचे होस्पेट) या मार्गावर राजाने अनेक झाडे लावून घेतली व मंदिरांची निर्मितीही केली. राजा पहाटे उठून तूप प्राशन करत असे आणि अंगालाही तुपाचे मर्दन करून ते जिरेपर्यंत युद्धकलेचा सराव करत असे. नंतर सुस्नात होऊन राजा दरबारी कामकाजासाठी (लिस्बनच्या राजवाड्यापेक्षाही भव्य) प्रासादात जात असे. बैलांवर माल लादलेल्या बाजारपेठात व्यापार्‍यांची गर्दी असे. इथे धान्य, भाजीपाल्याबरोबर पशु-पक्ष्यांचीही भरपूर विक्री होत असे. शहराला लागून सुंदर आणि विशाल देवस्थाने होती. (विरुपाक्ष मंदिर, विठ्ठ्ल मंदिर इ.चे यात सविस्तर वर्णन आहे) नदीपल्याड अनागोंदी गाव होते जी यापुर्वीची राजधानी होती असे लोक म्हणत. एका वेळी १५-२० माणसे तर कधी घोडे किंवा बैल घेऊन देखील बांबूच्या टोपलीसारख्या नावांमधून (कोरॅकल) तिकडे जाता येई."

Tungabhadra

आम्ही देखील या कोरॅकल राईडचा भन्नाट अनुभव घेतला. विविध आकाराच्या निश्चल शिळांनी वेढलेल्या, तुंगभद्रेच्या चिंचोळ्या पण खोल पात्रातून आमची ही तबकडी पुढे जात होती. मावळतीचा केशरट उजेड पसरला होता. आकाशाचा आणि पाण्याचा रंग सारखाच दिसत होता. वाटेवर खडकालगत एक छोटेसे दगडी मंदिर होते. नाव पार्क करुन त्यात शिरलेले एक नवविवाहीत जोडपे इन्स्टा लाईव्ह करत असावे. थोडे थ्रिल म्हणून किनारा आणि एका मोठ्या खडकाच्या मधल्या फटीतून नावाड्याने आमची नाव आत घातली. मध्यावर आल्यावर एकदा वेगाने गोल गोल फिरवली. लाईफ जॅकेट होते पण भीती वाटू नये म्हणून डोळे मिटले तरी भोवतालचा अद्भुत निसर्ग ते उघडायला भाग पाडत होता. परतलो तेव्हा अस्ताला चाललेल्या सूर्याची किरणं पाण्यावर पसरली होती. बाजूच्या खडकांवर मुकाट बसून राहिलेला माकडांचा जथ्था होता. आम्ही नि:शब्द झालो होतो.

Coracle ride 
इथून मग प्रसिद्ध आणि प्राचीन विरुपाक्ष मंदिर बघायला निघालो. त्याच्या पार्किंगमध्ये मी टोपी विकत घ्यायला एका मैत्रिणीबरोबर जरा मागे थांबले. सगळीकडे विक्रेत्यांच्या लहानमोठ्या टपर्‍या होत्या. दोन आडदांड बैल एकमेकांना ढुशा मारत होते. अचानक ते बैल इतके पेटले की डुरकावत एकमेकांच्या अंगावर चढू लागले. वाटेत आलेल्या कार आणि टपर्‍यांना त्यांच्या जोरदार धडका बसून त्या उलट्यापालट्या होऊ लागल्या. विक्रेते आरडा ओरडा करत लाठ्या काठ्यांनी त्यांना हुसकावू लागले. बिथरलेल्या बैलांचा आवेग आणि बेधुंदी पाहता ते कोणत्याही क्षणी आम्ही उभे असलेल्या टपरीवर आदळले असते. त्यांच्या धडकेने टॉमसारखे चपटे होण्याच्या किंवा शिंगावरुन भिरकावले जाण्याच्या भीतीने मी तिथलेच एक स्टूल समोर ढालीसारखे धरले, मैत्रिणीला पाठीशी घेतले. जीव मुठीत धरून शक्यतो बैलांच्या विरुद्ध बाजूला टपरीच्या मागेपुढे स्टुलासकट लपाछपी खेळत राहिलो. एकदाचे थरारनाट्य संपून ते बैल जरा नरमले आणि आम्ही तिथून मंदिराच्या दिशेने धूम ठोकली. आवारात अजीजीने वस्तू विशेषत: केळी विकणार्‍यांनी घेरले होते. 

Entrance gopura at Virupaksha Mandir

लांबून दिसणारे मंदिराचे मनोहर १०५ फुटी गोपूर केरळच्या पद्मनाभम् मंदिराच्या गोपुराची आठवण करून देत होते. जैन आणि हिंदू अशी संमिश्र स्थापत्यकला झळकवणा‍र्‍या या मंदिराच्या प्रांगणात 12 व्या शतकातली लहान मंदिरेही आहेत. कर्नाटकातल्या अनेक पट्टदकल (म्हणजे जिथे राज्याभिषेक सोहळे घडत) मंदिरांपैकी हे एक पण विशेष विख्यात. हे मंदिर तुंगभद्रा नदीच्या काठावर 7 व्या शतकात दक्षिण भारतीय शैलीच्या वास्तुकलेनुसार बदामीच्या चालुक्यांनी बांधले. मंदिराच्या भिंतींवर कोरीवकामातून शिव आणि विष्णूसंबंधी गाथा साकारलेल्या आहेत. प्रवेशद्वाराशी विष्णूचा वराहअवतार कोरलेला आहे. मुस्लिमांमध्ये डुक्कर हराम असल्याने आक्रमणकर्ते इथून परत फिरले म्हणून विरुपाक्ष मंदिर टिकून राहिले असे म्हणतात. ह्म्पी हे पूर्वी पंपाक्षेत्र म्हणून ओळखले जाई. पुराणानुसार पंपा ही ब्रह्मदेवाची मानसकन्या. शंकर प्रसन्न व्हावा म्हणून तिने हेमकुटावर तपश्चर्या केली आणि त्याला प्राप्त केले. विरुपाक्ष म्हणजे या पंपापती शिवाचे मंदिर. त्याचा तिसरा डॊळा म्हणून विरुप-अक्ष. इथे दरवर्षी डिसेंबर महिन्यात विरुपाक्ष आणि पम्पा यांचा लग्नाचा समारंभ आयोजित केला जातो तसेच विरुपाक्ष देवाचा वार्षिक रथोत्सव फेब्रुवारी महिन्यात असतो.




मंदिराचे गोपुर आणि आतली लहानशी मंदिरं दिवेलागणीमुळे उजळून निघाली होती. आतमध्ये दहा रुपयाची नोट दिली तरच सोंडेने आशीर्वाद देणार्‍या हत्तीभोवती पर्यट्क, दर्शनाला आलेली जोडपी आणि इतर भक्तांची गर्दी होती. मुख्य सभामंडपाच्या छतावरची नैसर्गिक रंगाचा वापर करून केलेली कलाकारी शब्दश: मान मोडून पाहत राहिलो. बाजूच्या पंपादेवी आणि भुवनेश्वरीचे दर्शन घेतले. दक्षिणेच्या अपेक्षेने असेल आतले पुजारी कुणी दर्शनाला आले की मोठ्याने श्लोक म्हणून गजर करु लागत. 

Virupaksha Mandir Mandap and Yadnyavedi

अंधारु लागल्याने बाहेर निघायला हवं होतं. मुख्य सभामंडपात लाल काठांची शुभ्र कांजीवरम नेसलेली, दागिन्यांनी मढलेली आणि खूप मेकअप केलेली एक स्थूल गोरटेली बाई दुय्यम ब्रोकेडच्या चकचकीत साड्यांधल्या सावळ्या बायकांसह पोझ देऊन उभी होती. लाईट- कॅमेरे पाहून आम्हाला आधी ते सिनेमाचे शुटींग वाटले. ती बाई आम्हाला बघताच धावत मंडपाच्या कडेशी आली आणि इंग्लीशमधून आम्ही कोण कुठल्या विचारु लागली. मोदीजींवर पंजाबमध्ये हल्ल्याचा प्रयत्न झाल्याच्या निषेधार्थ आम्ही इथे जमलो असून तुम्ही पण २ मि. आमच्यासह बाईट द्यायला या, असा आग्रह करु लागली. स्थानिक राजकीय पक्षाची ती महिला आघाडी प्रमुख वगैरे असावी पण तिचा सगळा कृत्रिम अवतार पाहून आम्ही नकार दिला आणि मंदिरासमोरच्या ह्म्पी मार्केटकडे मोर्चा वळवला. 

ओमायक्रॉनच्या भीतीने आठवड्याच्या शेवटी लॉकडाऊन सुरु झाले होते. विमान प्रवास सोयीचा नव्हता. साहजिक आता किती काळ पर्यटन ओसरणार हे कळत सल्याने एरवी परदेशी पर्यटकांनी ओसंडून वाहणार्‍या या बाजाराची रया गेली होती. सहज विक्रेत्यांशी गप्पा मारल्या. कोरोनामुळे काम ठप्प झालेल्या दिवसात कुणी गावी जाऊन शेती करत होते, कुणी काही. इथले दुकानाचे भाडे मोक्याची जागा हातून जाऊ नये म्हणून द्यावेच लागत होते आणि तेवढीही कमाई सध्या होत नसल्याने ते चिंतेत होते. ऐकून खूप हळहळ वाटली. हतबल देखील. आवश्यक नसलेली काही व थोडी आपापल्या मुलांसाठी खरेदी करून आम्ही त्यांचे आणि स्वत:च्या मनाचे जरा समाधान करुन घेतले. 

Dinner at Mango Tree Restaurant
आता जेवायला तिथल्या युट्यूब-फेम ’मँगो ट्री’ ला जायचे होते. बाजाराच्या चिंचोळ्या गल्लीतून तिथे पोचलो तर नुसते साधेसे हॉटेल. पाटीला हार घातलेला आणि दारात सुबक रांगोळी. बाहेर एका बाजूला बेसिन व चप्पलस्टँड. आतून एक गोरेपान, उंच (बहुधा) जर्मन जोडपे बाहेर पडले आणि एका पायाची लंगडी घालत आपले बूट चढवू लागले. आत पत्र्याला ग्रीन नेट लावून भिंती तयार केल्या होत्या. जपानी पद्धतीच्या बैठ्या आणि नेहमीच्या टेबलांची रचना होती. आम्ही बैठ्या टेबलाशी तक्क्याला टेकून निवांत बसलो. वरून आकर्षक दिवे टेबलच्या मधोमध सोडलेले होते. दक्षिण भारतीय थालीपासून लेबॉनीज पदार्थापर्यंत बरेच पदार्थ मेनूकार्डावर होते. त्यातलेच चित्रविचित्र पदार्थ मागवून आम्ही मजेत जेवलो. सोबतीला गाण्याचे सूर आणि केळीच्या पानावर वाढप करणारे अतीतत्पर वेटर. बाजूला एक गोरा एकटाच बसला होता. ह्म्पीत गुहा-जंगलं शोधायला, संशोधन करायला, नुसतं भटकायला जे परदेशी प्रवासी महिनामहिना येऊन राहतात त्यापैकी तो वाटला. 


चिकार दमून मल्लिगी हॉटेलला पोचलो. अंजूचा दुसर्‍या दिवशी वाढदिवस. तिला सर्प्राईज द्यायचे होते म्हणून रात्री १२ पर्यंत एका रुममध्ये जमून पत्ते खेळलो. १२ वाजता दुसर्‍या रुममध्ये तयार ठेवलेली पेस्ट्री, तिच्यासाठी आधीच घेतलेले गिफ्ट्स आणि जल्लोष करत वाढदिवस साजरा झाला. early to bed वाल्या तांबारलेल्या डोळ्यांनी झोपायला धावल्या. 
-----------

Wednesday, February 9, 2022

WIne is NOTfine


 किराणा दुकानात जाणे हा विनोदाचा विषय होईल असं कधी वाटलं होतं का! पण झालाय. हजार स्क्वे. फुटाहून मोठ्या किराणा दुकानात आता वाईन मिळणार म्हटल्यावर समाजात तीन गट पडले आहेत. पहिला गट विरोधकांचा, दुसरा विवि म्हणजे विरोधकांच्या विरोधकांचा (कारण दारुचं समर्थन कसं करणार!) आणि तिसरा बिनबुडाचा म्हणजे निर्णय कोणत्या सरकारने घेतला यावरून पहिल्या किंवा दुसर्या गटाची री ओढणार्यांचा. त्यामुळे तिसर्या गटाला बाजूला ठेवून आपण या प्रकरणाकडे पाहूया. विवि म्हणतात- "वाईन ही दारु नव्हे, ती पिऊन कुणी झिंगून पडत नाही. ते महागडं उच्चभ्रूंचं पेय आहे, सर्वसामान्यांना त्याने ढिम्म फरक पडत नाही. दारुशिवाय इतर प्रश्न जास्त महत्वाचे आहेत, ते आधी सोडवा" वगैरे वगैरे..

बरं! पण महत्वाच्या आणि मुलभूत गरजांपेक्षा वर्षाला साधारण ५०० कोटी रू. दारूवर खर्च करणारा महाराष्ट्र पाहिला, खेड्यापासून महानगरांपर्यंत भरभरुन वाहणारे गुत्ते आणि बार पाहिले, ’संध्याकाळी बसूया’ हेच जीवितकार्य समजणारे कित्येक निरुद्द्योगी तरुण पाहिले आणि व्यसनमुक्ती आणि दारुबंदीसाठी वर्षानुवर्षे लढणार्या कार्यकर्त्यांशी बोललं, तर हा किती महत्वाचा प्रश्न आहे ते सहज लक्षात येईल. अपघात, अत्याचार, गुन्हेगारीच्या बहुसंख्य घटनांमागे दारूने सटकलेलं डोकं कारणीभूत असतं हे कुणाला अमान्य नसावं.
मात्र विविंच्या मते "मुदलात वाईन दारू नाहीच. वाईन म्हणजे फळांचा रस किंवा ’तुमचं’ द्राक्षासव" मग सरळ तुलनेने स्वस्त आणि पोषक ज्यूस प्यायचा सोडून लोक उगाचच महागड्या वाईन का बरं पीत असतील! कारण फळांच्या रसापलीकडचं काहीतरी म्हणजेच अल्कोहोल नामक चटक लावणारं प्रकरण त्यात आहे. पण यांच्या मते- "दारु म्हणजे व्हिस्की किंवा रम सारखं हार्ड ड्रींक, ज्यात ४०-५० टक्के अल्कोहोल असतं. वाईन मध्ये फक्त ५ ते १५ टक्के अल्कोहोल असल्यावर त्यामुळे नशा कशी येईल!"
यांना इतकंच सांगावसं वाटतं की बीयर, वाईन ही दारुच्या व्यसनाकडे नेणारी पहिली पायरी आहे. तिथेच थांबणारे आस्वादक संयमवीर किंवा वीरांगना मोजक्याच. आपली सुरुवात अशाच पेयांनी आणि गंमत, कुतूहल, पीअर प्रेशर, स्टाईल, क्रेझ वगैरे कारणांनी झाल्याचे बहुसंख्य हार्ड ड्रिंक घेणार्यांना मान्य असते. एरवी एकदा का त्यातलं अल्कोहोल खेचू लागलं की त्याची ठराविक पातळी राखल्याविना त्या माणसाची तगमग होऊ लागते. बिचारी वाईन त्या पातळीपर्यंत न्यायला पुरी पडत नाही, पडली तर परवडत नाही त्यामुळे एकच प्याला ऐवजी हार्ड ड्रिंकचा दुसरा, तिसरा प्याला रिचवला जातो. कालांतराने प्याले मोजायच्या अवस्थेत ती व्यक्ती राहत नाही. यानंतर मद्यपीसह संबंधित व्यक्तींना जे आर्थिक, शारीरिक, मानसिक परिणाम भोगावे लागतात त्यापेक्षा समाजातले इतर प्रश्न कसे मह्त्वाचे आहेत वगैरे पळवाटा काढून काही साध्य होणार नाही. त्याने दारू घातक असते हे सत्य बदलणार नाही.
अनेक विदेशी संस्कृतींमध्ये विशेषत: थंड हवेच्या प्रदेशात मेहमानोंका स्वागत वाईनने करण्याचा रिवाज आहे. वर्षातले १०-११ महिने उन्हाने त्रासलेल्या आपल्या विकसनशील देशात असा रिवाज नाही. मूठभर ग्लोबल मंडळींची ती वैयक्तिक आवड असली तरी आपली (एक दोन राज्य वगळता) भौगोलिक किंवा (बहुराष्ट्रीय कंपनी, आतिथ्य-पर्यटन व्यवसायासारखे) अपवाद वगळता सामाजिक निकडही नाही. आपल्याकडे मेहमानोंका स्वागत गुटख्याने करायला बंदी असताना वाईनला स्वागताची तोरणं लावली जातायत हा विरोधाभास का ! गुटखा खाण्याचे प्रमाण शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाढायला लागल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. याचा अर्थ एखाद्या हानीकारक उत्पादनाच्या सहज उपलब्धतेमुळे त्याचे व्यसन लागण्याची शक्यता वाढते हे शासनाला मान्य आहे. मग वाईनची उपलब्धता वाढवताना हे भान कुठे गडप झालं असावं?
अरे हो, हे सगळं शेतकर्यांच्या फायद्यासाठी चाललंय, नाही का! कसं ते मात्र गुलदस्त्यात आहे. त्यांचा फायदा करायचा असेल, तर फळं, द्राक्षाला हमी भाव जाहीर करावा. आवश्यकतेनुसार पाणी, वीज उपलब्ध करून द्यावी. प्रत्यक्षात सरकार कोणतंही असो, बहुतेक वेळा लॉबींगमुळे उत्पादकाऐवजी प्रक्रिया व विक्री करणार्यांच्या हितालाच प्राधान्य दिलं गेलं आहे. हे कमी की काय म्हणून आयात केलेल्या स्कॉच व्हिस्कीवरचं उत्पादन शुल्क 300 टक्क्यांवरून 150 टक्के करण्यात आलं आहे. मद्य स्वस्त म्हणजे विक्री जास्त. प्या लेको, करा चैन!
विंदा म्हणतात तसं
'औचित्याच्या फोल विवेका! जा निघ त्या दुरवस्थेने
अम्हा घेरिले म्हणुनी घेतो झिंगुनिया या पानाने'
ही जनतेची अवस्था होईनाका, सरकारला 100 कोटी ऐवजी दुप्पट महसूल मिळणार. कोरोनामुळे तिजोरीवर आलेला ताण कमी करण्याचे हे खरंच किती नामी उपाय आहेत. गाडगेबाबांच्या दशसूत्रीचा हवाला देत सत्तेवर येणारं सरकारच ते अंमलात आणणार असेल तर दारुमुळे उद्ध्वस्त होणार्या कुटुंबांनी दाद कुठे मागायची!
याचा अर्थ दारू पिणारे सगळे लोक दुर्जन वगैरे असतात असा नव्हे, सगळेच ’दारुडे’ सुद्धा नसतात. आपल्या आनंदासाठी मर्यादित प्रमाणात वाईनसह विविध प्रकारच्या दारूचा नियमित किंवा प्रासंगिक आस्वाद घेणारे मोजके चोखंदळ रसिक समाजात आहेत. अर्थात नियमित पिण्याने होणारी आरोग्यहानी ती व्यक्ती टाळू शकत नाहीच पण त्यांना काही सांगायला जावं तर ते ’हाय कंबख्त तूने पी ही नही !’ म्हणणार.
दुसर्या बाजूला अत्यंत विकल मनोवस्थेमुळे कुणी दारू पीत असेल किंवा ज्या कामाची पांढरपेशा समाज कल्पनाही करू शकत नाही असे काम करावे लागण्याच्या अपरिहार्यतेमुळे किंवा असह्य शारीरिक दमणुकीमुळे एखादा मजूर दारु पीत असेल तेव्हा त्याला नैतिकतेचे डोस पाजायचा आपल्याला निश्चितच अधिकार नाही. परंतु कोणत्याही प्रकारच्या अपेयपानाला कुणी सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्याचा हेतूपुरस्सर प्रयत्न करत असेल तर त्यांना जाब विचारायचा अधिकार नक्कीच आहे.
वाईन /दारू या आधी मिळत नव्हती का, होती. आहेत की त्यासाठी मुबलक खास दुकानं. पण ’त्या’ दुकानात जाऊन डॉक्टर ब्रँडी घेतानाही लाजणारा एक वर्ग आहे. त्यांची भीड चेपावी आणि नवे ग्राहक निर्माण व्हावे अशी आता सरकारची अपेक्षा असल्याने तिकडे अडकून पडलेल्या वाईनला मुक्त द्वार देण्यात आलं असावं. जोवर एखाद्याच्या पिण्यामुळे संबंधितांना, समाजाला काही त्रास होत नाही तोवर ते त्याचे व्यक्तिस्वातंत्र्य आहे. परंतु ती व्यक्ती देखील आपल्या घरातल्या लहान मुलांना पेला ’ऑफर’ करणार नाही. अगदी (दारूच नसलेल्या!) वाईनचा सुद्धा! याचाच अर्थ समज येईपर्यंत अशा पेयांपासून मुलांनी दूर राहावे अशी गरीब-श्रीमंत, अजाण-सुजाण, पिणार्या- न पिणार्या सगळ्याच पालकांची धडपड असते.
तरीही किराणा दुकानात एखाद्या सरबताच्या बाटलीसारखी वाईन सहज उपलब्ध करणे हा तिला सहज- स्वीकृती मिळावी म्हणून आधी राजमान्यता आणि पाठोपाठ समाजमान्यता मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. यातून कोवळ्या पिढीला नकळत दिला जाणारा ’इट्स ओके टू ड्रिंक’ हा संदेश गंभीर आहे. हे न्यू नॉर्मल एक प्रकारचं स्लो पॉयझनींग आहे. आधीच बदलत्या काळाने पालकांसमोर अनेक आव्हानं उभी केली आहेत. त्यात आता पालकांबरोबर मॉलमध्ये खरेदीला आलेल्या लहान मुलांनी या रंगीत बाटली कडे बोट दाखवून कुतूहल व्यक्त केले तर पालकांनी नेमकं काय उत्तर देणं अपेक्षित आहे याविषयीही सरकारने पालकांचं प्रबोधन करावं.
समाज म्हणजे सिनेमा नव्हे जिथे बारीक अक्षरात ’दारु पिणे हानीकारक आहे’ अशी तळटीप देऊन टाकली की ’चार बोतल व्होडका काम मेरा रोजका’ किंवा ’अभी तो पार्टी शुरु हुई है’ म्हणत पडद्यावर हवा तो धिंगाणा घालायची मोकळीक मिळते. तेव्हा याविरोधात विवेकी कृती करुया. कितीही अहितकारक निर्णय लादले गेले तरी पालक म्हणून मुलांना त्याच्या परिणामांचे भान देत राहूया. वाईन उपलब्ध असलेल्या किराणा दुकानात खरेदी करणे टाळूया. या काळ्य़ा ढगाला रुपेरी किनार म्हणजे काही व्यापारी संघटनांनी आपल्या सभासदांना स्वत:च्या प्रतिष्ठानात वाईन विक्री न करण्याचे आवाहन केले आहे. कोवळ्या मुलांसह अवघ्या समाजाला आकर्षित करू पाहणार्या आणि चोरपावलांनी व्यसनाच्या वाटेवर नेऊ पाहणाऱ्या या न्यू नॉर्मलच्या निषेधाचा स्वर इतका तीव्र करूया की त्यापुढे ’चीअर्स’चे आवाज क्षीण व्हावे.

Published in Divya Marathi Madhurima 9Feb

Thursday, January 20, 2022

बदामी-ह्म्पी वाटेवरचे पट्टदकल आणि ऐहोळे


source : panaroma pic from google
’चांदोबा’त वाचलेली नावे-गावे इथे कानावर पडू लागली. बदामीहून मलप्रभा नदीच्या किनारी वसलेले पट्टदकल पाहायला आम्ही अगदी वेळेत आवरुन निघालो. गुगल मॅपमुळे वाटेत काय लागेल, किती वेळ लागेल हा अंदाज होताच. 

काल आम्हाला बदामी स्टेशनवर जी गाडी घ्यायला येणार होती तिच्या चालकाने काहीतरी घोळ केला, शेवटी आम्हाला हुबळीहून दुसरी गाडी पाठवण्यात आली. या गडबडीमुळे आमचा पारा काल जरा चढलेला होता पण हा नवा चालक गेल्या जन्मी संत वगैरे असावा. उंच, सावळा, चप्प बसवलेले कुरळे केस, टोकाशी यू आकारात वळवलेल्या मिशा, अंगार्‍याची चिरी लावलेला निर्विकार चेहरा म्हणजे हे बसवराज बुवा. गाडीत आम्ही काही प्रश्न विचारला किंवा मागून पास होत लाडू, शंकरपाळ्यासारखा ऐवज त्यांच्यापर्यंत पोचला तरच ते तोंड उघडत. 
जिलब्यांनी लिहिलेल्या पाट्या, ’पुष्पा’ सिनेमाचे आणि पुनीत राजकुमारचे पोस्टर सोडले तर गावातले चौरस्ते भारतातल्या कोणत्याही गावातल्या चौरस्त्यासारखेच होते. तशाच पुडक्यांच्या माळा लटकलेल्या चहाच्या टपर्‍या, अर्धा माल बाहेर मांडलेली किराणा दुकानं, रस्त्यावर काळे तेलकट ओहोळ आलेली ऑटोमोबाईलची दुकानं, धूळभरल्या रिक्षा आणि दुचाक्या, हॉर्नचे कचकच आवाज..सगळं तसंच. 
पण गाव संपत आलं की स्वच्छ रस्ते, हिरवीगार भातशेतं, कडेने नारळी-पोफळी, तुरळक बैठी टुमदार घरं आणि या सगळ्याच्या पाठीमागे आशीर्वादासारख्या उभ्या असलेल्या बदामी रंगाच्या अवाढव्य आकाराच्या दगड-शिळांच्या अथांग भक्कम रांगा. 

Jain Temple @ Pattadakal

पट्टदकल गावही साधारण तसंच. गाडी तिथल्या देऊळ संकुलापाशी थांबली. दही, शहाळं, छोट्या वस्तू, टोप्या, स्थलदर्शन पुस्तक वगैरे विकणार्‍यांनी आम्हाला गराडा घातला. ओमायक्रॉन कृपेने आम्हा पर्यटकांची बहुतेक या सीझनची ही शेवटची बॅच. त्यामुळे विक्रेत्यांच्या चेहर्‍यावरच्या काकुळतीकडे दुर्लक्ष करताना फार अपराधी वाटलं. दाराशी गाईड मंडळींचा ग्रुप उभा होता. कोर्टाबाहेर छत्र्या लावून काही वकील पार्टी हेरून ’या’ ’या’ करुन बोलावतात तसं ते करु लागले. घासाघीस



करुन, भाषेची खात्री करुन एकाची निवड केली. कानडी हेल काढून इंग्रजी बोलणार्‍या या गाईडने माहिती मात्र अगदी मनापासून दिली. सगळ्या ओरिजिनल गोष्टींना तो चक्क ’व्हर्जिनल’ संबोधे. 

तर, बागलकोट जिल्ह्यातल्या पूर्वी रक्तपुरम् म्हणून ओळखल्या जाणार्‍या या शहरातले हे संकुल आता युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे.  बदामीच्या चालुक्य राजघराण्याने ७ व्या आणि ८ व्या शतकात बांधलेल्या (नऊ हिंदू आणि एक जैन मंदिर मिळून) १० मंदिरांचा समावेश या संकुलात होतो. इथल्या ऐसपैस सभामंडपांमध्ये राज्याभिषेकासारखे मह्त्वाचे सोहळे होत असत. पट्ट म्हणजे अभिषिक्त. त्यावरुन पट्टराणी या शब्दाचा अर्थ अधिकृत राणी असा असावा. 

One of the sample in Temple Monument

काडसिद्धेश्वर (गाईडचे उच्चार काहाडसिद्देस्वरा...काआसी विस्वेस्वरा) काशी विश्वेश्वर, संगमेश्वर, चंद्रशेखर, जंबुलिंगा, पापनाथ मंदिर, जैन मंदिर व लगतची लहान मंदिरे सुरेख आहेतच पण विशेष भावले ते त्रैलोक्य महादेवीने बांधलेले (शंकराचे) मल्लिकार्जुन मंदिर. यावर कोरलेली दुर्गादेवी आणि रामायण-महाभारतातल्या घटना कमालीच्या सुबक आहेत. दगडी मूर्तीच्या चेहर्‍यावरचे जिवंत भाव. लोकमहादेवी राणीने बांधलेले विरुपाक्ष मंदिर याहून सरस. त्याच्या रेखीव कोरीव कामावर नजर ठरत नाही. या सगळ्या मंदिराच्या गाभार्‍यात, खांबांवरच नव्हे तर छतावर सुद्धा अनेक पौराणिक कथानकं चित्रमालिकेच्या स्वरुपात कोरलेली आहेत. याच्यासमोर अत्यंत रेखीव असा महाकाय ग्रॅनाईटचा नंदी आहे. ग्रॅनाईटचे मोठाले पहाड या संकुलामागच्या परिसरात दिसतात. 

शैव-वैष्णव पंथातील तणाव, तो निवळावा म्हणून ’हरिहर’ सारख्या प्रतीकांच्या माध्यमातून झालेले प्रयत्न, उत्तरेकडील, द्राविडी व मिश्र पद्धतीच्या कळसांच्या आरेखनातील फरक अशी बरीच माहिती गाईडने ओघवत्या पद्धतीने दिली. एका मंदिरात देवदासीने देणगी दिल्याचा शिलालेख जुन्या कानडी भाषेत कोरलेला आहे. त्यातले इतर खांब लोकवर्गणीतून बांधल्याचाही निर्देश आहे. परंतु त्या मंदिराच्या बांधकाम व कोरीव कामाची गुणवत्ता ही या दोन मंदिरांच्या तुलनेत अतिशय उणी. 


आपल्या हयातीत घडवून आणलेली सर्वोत्तम रचना हा त्या राण्यांच्या कलाविषयक आस्थेचा विषय असावा, धार्मिक आणि राजकीय कर्तव्य असावे, स्व-रंजनाचे निमित्त असावे की अंत:पुरातल्या सत्तेतील वर्चस्व सिद्ध करण्याचे उपकरण याचे मला कोडे पडले. कारण काही असो, त्यातून निष्पन्न झालेल्या कलाकृती नि:संशय नेत्रसुखद आणि कलेचा इतका उत्तुंग अविष्कार असलेल्या भूमीशी एक भारतीय म्हणून आपली नाळ जोडलेली असल्याचा विलक्षण आनंद देणार्‍या आहेत. 
कलेबाबत आपली, परकी असा दुजाभाव नसावा पण शतकानुशतकं रुजत आलेल्या परंपरांशी जोडलेले आपण नेमके कोण, कुठले याची अस्फुट उत्तरं मिळाल्याने असेल, इथे जे आंतरिक समाधान जाणवत होतं ते कदाचित इतक्याच जुन्या रोमन, चिनी, ग्रीक किंवा इजिप्शीयन कलाकृती पाहताना मिळणार नाही.

Suryamandir

या परिसरात एक मुंबईकर ज्येष्ठ नागरिकांचा ग्रुप हिंडत होता. आमचे मराठी संवाद ऐकून त्यांना आमच्याबद्द्ल कुतूहल वाटलं असावं. त्यातल्या एक बाईंनी न राहवून आमची चौकशी केली आणि ’अय्या माझं माहेर पण अकोल्याचंच’ म्हणत त्या बोलतच सुटल्या. काही अकोल्यातच बालपण गेलेल्या (व्हर्जिनल अकोल्याच्या) मैत्रिणींमध्येही मग उत्साह संचारला. तमक्या शाळेतल्या अमक्या सरांची मुलगी, अय्या ती ढमकी हिची बहिण का वगैरे, पृथ्वी गोलच नव्हे तर अत्यंत चिमुकली असल्याचे सिद्ध करणार्‍या गप्पा सुरु झाल्या.
अकोल्याच्या ८ बायका अशा परप्रांतात बिनदिक्कत एकट्या फिरतायत याचे आणि आमच्या अवतारावरून) आम्ही ’अकोल्याच्या’ अजिबात वाटत नसल्याचे (!!) नवल त्या ग्रुपमधील अनेकांनी व्यक्त केले. इंटरनेटच्या जगात आता असले फरक राहिले नाहीत हो, असे त्यांना ऐकवले शेवटी. मराठी सिरियलमधल्या आचरट पात्रांमुळे व्हर्जिनल मुंबई-पुण्याच्या लोकांच्या त्याबाहेरील विश्वाबद्दल काहीतरी अचाट कल्पना तयार झाल्या आहेत एकंदरीत. 

At the bank of Malprabha

 दमून थोडावेळ संकुलालगतच्या वडाच्या पारावर मलप्रभेच्या किनार्‍यालगत जाऊन बसलो. प्रवाहाच्या विरुद्ध प्रवाहित राहणारी मलप्रभा. ही नदी दक्षिणेकडून उत्तरेकडे म्हणजे उलट दिशेने वाहते त्यामुळे तिला विशेष धार्मिक मह्त्व आहे. तिचा वार्षिकोत्सव साजरा होत असतो.


ऐहोळेला जाण्यासाठी संकुलाबाहेर पडलो तर कानडी लुगड्यातली दहीवाली बाई आशेने आमच्यासाठी ताटकळत बसलेली. तिच्याकडचं मडक्यातलं दही खरोखर रुचकर होतं आणि सिंहगडापेक्षा कितीतरी स्वस्त. ’च्यांगलं दही’ हा एकच मराठी शब्द येणारी कष्टाळू हसरी दहीवाली तिची कहाणी सांगत होती आणि एक पुस्तकविक्रेता ती अनुवादित करुन आम्हाला सांगत होता. पर्यटकांच्या जीवावर गुजराण करणारी ही माणसं कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनंतर आता कुठे उभी राहतायत तर पुन्हा तिसरी लाट! मंजिरीला आत्ता दही न खाता मडके घेऊन जायचे होते. त्याचे वेगळे पैसे देते हे ती बाईला सांगत होती पण मोजकी मडकी असल्याने बाई तयार नव्हती. अर्थात त्यांचा हा संवाद डंब शेराड्स खेळत हातवारे करत सुरु होता. 

घाई करत 'ऐहोळे'ला निघालो. तिथेही पुन्हा आमची अशीच विक्रेत्यांनी घेरलेली एंट्री. संकुल-स्वरुपाची रचना, गाईडशी घासाघीस. दशावतारापैकी परशुरामाने पित्याच्या मृत्युचा सूड घेऊन परत येताना आपली रक्ताने माखलेली कु-हाड व हात मलप्रभा नदीत धुतले. त्यामुळे तिचे लाल झालेले पाणी पाहून स्थानिक बायका ’अय्यो ...होळे (नदी- अशी कशी) असे ओरडू लागल्या म्हणून या गावाचे नाव ऐहोळे पडले. ही चित्तचक्षुचमत्कारिक कथा गाईडने आम्हाला तारक मेहतामधली दया कानावर हात ठेवून ’हे माँ माताजी’ ओरडते तशी साभिनय सांगितली. 

Aihole  Temple Models

 इ.स ६३४ मध्ये पुलकेशीनच्या स्तुतीपर जैन कवी रवीकिर्तीने रचलेल्या काव्याचा इथला शिलालेख प्रसिद्ध आहे. गाईडच्या म्हणण्यानुसार शिल्पकला, मंदिररचना आणि स्थापत्यशास्त्राची ऐहोळे प्राथमिक शाळा. काल पाहिलेलं बदामी म्हणजे माध्यमिक शाळा, उद्या बघणार आहात ते हम्पी म्हणजे महाविद्यालय आणि बेलूर हे तर विद्यापीठ. त्याच्या म्हणण्य़ाची प्रचिती लगेच आली. ऐहोळेतील देवळांच्या परिसरातल्या रहिवाशांचीच नावं ब्रिटीश काळात नोंदणी करताना त्या त्या देवळाला देण्यात आली आहेत. त्यामुळे इथली

 
Ladkhan Temple details

काही देवळं ’लाडखान देऊळ’, ’हुचिमल्ली त्रिमूर्ती देऊळ’, ’मेगुटी देऊळ’ अशा विचित्र नावांनी प्रसिद्ध आहेत. सर्वात आकर्षक वाटले ते दुर्ग व सूर्यनारायण मंदिर. याच्या प्रदक्षिणा मार्गावरील कारागिरी अद्भुत आहे. इथल्या युगुलांच्या शिल्पांना गाईड ’हैप्पी कप्पल’ म्हणे. त्यातील स्त्रियांच्या पेहराव व केशरचनेवरुन मिनी स्कर्ट आणि साधनाकट हे आपल्याकडे फार पूर्वीपासून असल्याचेही त्याने छातीठोकपणे सांगितले. ऐहोळेचे म्युझियम आम्ही फार झटपट पाहिले कारण बरीचशी बदामीच्या म्युझीयमची पुनरावृत्ती होती. ह्म्पीचेही वेध लागले होते.



Tungabhadra Dam

वाटेत  तुंगभद्रा धरण बघायला गेलो. चांदण्यात चमकणार्‍या विस्तीर्ण गडद निळ्य़ा पाण्यावर धरणाच्या दिव्यांचं प्रतिबिंब सुंदर दिसत होतं. या भव्य धरणाच्या प्रकल्पावर १९४५ पासून प्रमुख म्हणून काम केलेल्या अय्यंगार या अभियंत्याचा पुतळा तिथे उभारलेला आहे. एखाद्या शासकीय अधिकार्‍याच्या वाट्याला असा सन्मान येणं दुर्मिळ आहे. तिथून म्युझिकल कारंजं पाहायला म्हणून गेलो. रस्ता संपेचना. चढतोय, उतरतोय. एकदाचे कारंजापाशी पोचलो. ठरल्या वेळेला कर्नाटक गीत वाजू लागले. मग ’डोन्ट वरी मुस्तफा’ लागले. कारंज्याचा आणि संगीताचा काही ताळमेळ नव्हता त्यामुळे कंटाळून पळालो. गुगलबाईचे न ऐकल्याने जरा चुकत माकत अखेरीस बसवराजदादांनी आम्हाला हम्पी रोडवरील तारांकित मल्लिगी हॉटेलला आणून पोचवले तेव्हा वेबसाईटवर पाहिले चक्क तस्सेच ते निघाल्याचा आणि हम्पीत पोचल्याचा आनंद मनात मावत नव्हता
Hotel Malligi




#Hampi #Badami #Pattadakal #Aihole #UNESCO_world_heritage