उगवत्या सूर्याचा देश- जपान
त्सुनामी आणि प्रलयकारी भूकंपाच्या धक्क्यातून जपान वेगाने सावरतो आहे. हुंदक्यांपासून हिमतीकडे जपानचा प्रवास सुरू आहे अशा तेथे परतलेल्या मूळ भारतीय नागरिकांच्या प्रतिक्रीया आहेत. पुनर्वसनासाठी अनेक स्तरावर यशस्वी प्रयत्न केल्याची ग्वाही त्यांचे पंतप्रधान नोडा यांनी दिली आहे. त्सुनामीच्या तडाख्याने जपान देश कोलमडला त्या घटनेला ११ मार्च २०१२ ला एक वर्ष पूर्ण झालं. भूकंपाच्या धक्क्यामुळे झालेले अणुभटट्यांमधील स्फोट आणि किरणोत्सर्ग यामुळे घबराट पसरली होती. १९ हजाराहून अधिक नागरिक या घटनेत मृत्यु पावले. ही नैसर्गिक आपत्ती होती पण त्याआधी देखील एका मानव-प्रणित विनाशाला जपानला तोंड द्यावं लागलं होतं. अमेरिकेने ६ ऑगस्ट १९४५ मध्ये हिरोशिमावर तर ९ ऑगस्टला नागासाकीवर अणुबॉंब टाकला. जपान बिनशर्त शरण आला. दुसरं महायुद्ध थांबलं. परंतु अणुबॉंबमुळे सुमारे सत्तर हजार माणसं मृत्युमुखी पडली तर नंतर त्याच्या दुष्परिणामांनी दोन लाखांहून अधिक माणसे दगावली. त्याचे मानसिक, आर्थिक परिणाम त्या देशाची राखरांगोळी करून गेले. मात्र जगाच्या सहानुभूतीचा फायदा घेत- अमेरिकेच्या नावाने बोटे मोडत- सूडाचे राजकारण करण्यात धन्यता न मानता त्या राखेतून जपानने फिनीक्स पक्षासारखी भरारी घेतली हा इतिहास सर्वश्रुत आहे.
आपत्तीला तोंड देऊन पुन्हा प्रगतीकडे झेप घेण्याची जपानी जिगर आपल्याला थक्क करते. भारताची स्वातंत्र्यप्राप्ती आणि जपानची महायुद्धातील पराभवानंतरची नवनिर्मिती या साधारण एकाच कालखंडातल्या घटना. मग आपलं बाळ अजून रांगतच आहे आणि त्यांच्या बाळाने सळसळत्या तारूण्यात पदार्पण केलं ते का! यामागचं गुपित जपानकडून आता तरी आपण जाणून घ्यायला हवं. संकटात माणसाचा खरा कस लागतो असे म्हणतात, अंधारातही जो चोरीचा मोह टाळतो त्यालाच प्रामाणिक म्हणायला हवे. त्सुनामी नंतर ज्या बातम्या येत होत्या त्या खरोखर विलक्षण वाटाव्या अशा आहेत. जपानी लोकांच्या सामाजिक वर्तनाचा तो हृद्य आविष्कार आहे. भूकंपाचा धक्का बसला त्यावेळी जे लोक निरनिराळ्या दुकानात खरेदी करत होते , त्यांच्या लक्षात आले की वीजपुरवठा खंडित झाला आहे. तेव्हा लोकांनी ज्या वस्तू उचलून घेतल्या होत्या त्या परत त्या त्या ठिकाणी नेऊन ठेवल्या. कोणीही कोणत्याही प्रकारची चोरी करण्याचा किंवा दुकानातून माल लुटण्याचा प्रयत्न केला नाही. लोकांना रस्त्यात अडकून पडावे लागले तरी कोणीही सिग्नल तोडण्याचा किंवा पुढे घुसण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांचे आपत्तीव्यवस्थापन कोणत्याही गोंधळाविना, चेंगराचेंगरीविना, अफवांनी भयभीत न होता तत्परतेने सुरू झाले. या साध्या उदाहरणांवरून जपानकडून आपण खूप काही शिकायला हवं आहे असं प्रकर्षाने जाणवतं.
आज आपण चिनी वस्तूंनी काबीज केलेली बाजारपेठ पाहतो पण त्या वस्तूंच्या गुणवत्तेची आपल्याला मुळीच खात्री नसते. या उलट "मेड इन जपान" या शब्दाचा दुसरा अर्थ जणू गुणवत्ता असा होतो. केवळ व्यवसायातच नव्हे तर दैनंदिन जीवनात, शाळा-महाविद्यालयात, कचेरीत, अगदी घरातदेखील जपलेली गुणवत्तापूर्ण जीवनशैली हे जपान्यांचे वैशिष्ट्य आहे. तिचं नाव ’काईझेन’. काम अधिक चांगले, सोप्या पद्धतीने, कमी श्रमात, कमी वेळेत व कमी खर्चात करता यावे म्हणून जे बदल केले जातात ते म्हणजेच काईझेन. या निरंतर सुधारणेचा ध्यास चपराशापासून अधिकार्यांपर्यंत, विद्यार्थ्यांपासून गृहिणींपर्यंत प्रत्येक जपानी व्यक्तीला आहे पण तो भावनेपुरताच मर्यादित नाही तर कृतीतून दिसतो. याउलट भारतीयांचे देशप्रेम त्यांच्या भावनांमधून ओथंबून वाहते, प्रत्यक्ष कृतीत फारसे दिसत नाही. जपानी माणसांचे देशप्रेम अंत:प्रेरणेतून निर्माण झालेले आहे. ते घोषणांमधून नव्हे तर प्रत्येक बाबतीतील "सुनियोजितता, सुव्यवस्था, स्वच्छता, सद्व्यवहार आणि स्वयंशिस्त" या पंचसूत्रीतून सहजगत्या प्रकट होते. रत्न, तलवार आणि आरसा या ३ गोष्टींना जपानमध्ये महत्व आहे. रत्न हे समृद्धीचे, तलवार हे सामर्थ्याचे तर आरसा हे आत्मपरिक्षणाचे प्रतीक आहे.
जपान हा देशच मुळी एका धाग्यात बांधला गेला आहे. उदाहरण द्यायचे तर तेथे देशभरच्या सगळ्या शाळांतून एकच धडा एकाचवेळी शिकवला जातो. त्यामुळे देशभर कोणत्याही दिवशी त्या त्या वर्गातील मुलेमुली सारखेच शिक्षण घेत असतात. जपानचे सरकार शिक्षणाचे धोरण विचारपूर्वक राबवते. त्यामुळेच आज शंभर टक्के साक्षर, नुसता साक्षर नव्हे तर सुशिक्षित असलेला जपानी समाज प्रगतीपथावर पोहोचला आहे. भारताप्रमाणेच तेथेही प्रामुख्याने स्त्रिया मुलांना वाढवतात. त्यासाठी आधी स्त्री सुशिक्षीत असणे गरजेचे आहे, नव्हे तिने शिक्षित असलेच पाहिजे असे ठरवून स्त्री-शिक्षणावर भर दिलेला आहे. इंग्रजीच्या आक्रमणाला दाद न देता जपानी भाषेने आपला समृद्ध वारसा जपला आहे. सगळे शिक्षण, अगदी उच्च तांत्रिक शिक्षणही जपानीत आणले गेले. बाहेरचे ज्ञान स्वतःच्या भाषेत आणताना शब्दांचा क्लिष्ट अनुवाद माथी मारण्याचा अट्टाहास न करता कितीतरी आधुनिक शब्द जसेच्या तसे जपानीत आणून त्यासाठी सरळ वेगळी लिपी वापरात आणली गेली आहे. जपानच्या सक्षमीकरणात भाषेच्या, शिक्षणपद्धतीच्या एकजिनसीपणाचा महत्त्वाचा वाटा आहे.
जपानमधे बराच काळ वास्तव्य केलेल्या प्रसिद्ध मराठी लेखिका सानिया यांचे जपानविषयीचे निरीक्षण नोंद घेण्यासारखे आहे. त्या निरीक्षणातच जपानच्या प्रगतीशील, विजीगिषु वृत्तीचे मर्म आढळून येते. सानिया म्हणतात "जपानी भाषेमध्ये ‘वाताशी’ या शब्दाचा अर्थ ’मी’ असा आहे. पण जपानी लोक बोलताना क्वचितच ’वाताशी’ या शब्दाचा उपयोग करतात. जिथे मी आवश्यक असतो तिथेही ‘वाताशी’ शिवायच क्रियापद वापरता येते. ’वाताशी’ कमीतकमी वापरणारी जपानी माणसे ’मी’पेक्षा सतत ’आम्ही’ असा विचार करत असतात. व्यक्तीपेक्षा कुटुंब, समूह, समाज, देश अधिक महत्त्वाचा असे त्यांनी मानले आहे. जपानमधे राहताना हे पावलोपावली दिसते." याचा अर्थ जपानमधे सगळे सत्पुरूषच राहतात असे नाही पण जगात गुन्हेगारीचे प्रमाण अतिशय कमी असलेल्या मोजक्या देशांपैकी हा एक आहे. औद्योगिकीकरणातून निर्माण होणार्या चंगळवादी जीवनशैलीच्या प्रभावामुळे जपानी जनजीवनात देखील आंतरिक अस्वस्थता काहीशी वाढू लागली आहे. अधूनमधून काही अप्रिय घटना घडतायत परंतु काय चुकते आहे, तरूणांचे प्रश्न काय आहेत, मूल्ये का बदलतायत याचा सर्वांगानी विचार केला जातो. त्यामुळे एक प्रकारची शांतता, विश्वास जनमानसात भिनलेला असतो.
परिवर्तनाची सुरूवात अंतर्मनापासून होते हे जपानी लोकांना कळले आहे, आपल्याकडे अनेक थोर पुरूषांनी हे तत्त्व आचरणात आणले आहे पण सर्वसामान्य जनतेत ते तत्त्व जपानसारखे का रूजू शकले नाही याचा विचार व्हायला हवा. अतिपूर्वेकडील स्थानामुळे जपानला उगवत्या सूर्याचा देश असे संबोधण्यात येते. कित्येक आपत्तींच्या काळोखातून उमेदीचा-प्रगतीचा झळाळता सूर्य जपानमधे पुनश्च, निरंतर उगवतो आहे या अर्थी त्या देशाला उगवत्या सूर्याचा देश म्हणणे अधिक सयुक्तिक ठरेल.