Tuesday, March 13, 2012

जपान


उगवत्या सूर्याचा देश- जपान
त्सुनामी आणि प्रलयकारी भूकंपाच्या धक्क्यातून जपान वेगाने सावरतो आहे. हुंदक्यांपासून हिमतीकडे जपानचा प्रवास सुरू आहे अशा तेथे परतलेल्या मूळ भारतीय नागरिकांच्या प्रतिक्रीया आहेत. पुनर्वसनासाठी अनेक स्तरावर यशस्वी प्रयत्न केल्याची ग्वाही त्यांचे पंतप्रधान नोडा यांनी दिली आहे. त्सुनामीच्या तडाख्याने जपान देश कोलमडला त्या घटनेला ११ मार्च २०१२ ला एक वर्ष पूर्ण झालं. भूकंपाच्या धक्क्यामुळे झालेले अणुभटट्यांमधील स्फोट आणि किरणोत्सर्ग यामुळे घबराट पसरली होती. १९ हजाराहून अधिक नागरिक या घटनेत मृत्यु पावले. ही नैसर्गिक आपत्ती होती पण त्याआधी देखील एका मानव-प्रणित विनाशाला जपानला तोंड द्यावं लागलं होतं. अमेरिकेने ६ ऑगस्ट १९४५ मध्ये हिरोशिमावर तर ९ ऑगस्टला नागासाकीवर अणुबॉंब टाकला. जपान बिनशर्त शरण आला. दुसरं महायुद्ध थांबलं. परंतु अणुबॉंबमुळे सुमारे सत्तर हजार माणसं मृत्युमुखी पडली तर नंतर त्याच्या दुष्परिणामांनी दोन लाखांहून अधिक माणसे दगावली. त्याचे मानसिक, आर्थिक परिणाम त्या देशाची राखरांगोळी करून गेले. मात्र जगाच्या सहानुभूतीचा फायदा घेत- अमेरिकेच्या नावाने बोटे मोडत- सूडाचे राजकारण करण्यात धन्यता न मानता त्या राखेतून जपानने फिनीक्स पक्षासारखी भरारी घेतली हा इतिहास सर्वश्रुत आहे.

आपत्तीला तोंड देऊन पुन्हा प्रगतीकडे झेप घेण्याची जपानी जिगर आपल्याला थक्क करते. भारताची स्वातंत्र्यप्राप्ती आणि जपानची महायुद्धातील पराभवानंतरची नवनिर्मिती या साधारण एकाच कालखंडातल्या घटना. मग आपलं बाळ अजून रांगतच आहे आणि त्यांच्या बाळाने सळसळत्या तारूण्यात पदार्पण केलं ते का! यामागचं गुपित जपानकडून आता तरी आपण जाणून घ्यायला हवं. संकटात माणसाचा खरा कस लागतो असे म्हणतात, अंधारातही जो चोरीचा मोह टाळतो त्यालाच प्रामाणिक म्हणायला हवे. त्सुनामी नंतर ज्या बातम्या येत होत्या त्या खरोखर विलक्षण वाटाव्या अशा आहेत. जपानी लोकांच्या सामाजिक वर्तनाचा तो हृद्य आविष्कार आहे. भूकंपाचा धक्का बसला त्यावेळी जे लोक निरनिराळ्या दुकानात खरेदी करत होते , त्यांच्या लक्षात आले की वीजपुरवठा खंडित झाला आहे. तेव्हा लोकांनी ज्या वस्तू उचलून घेतल्या होत्या त्या परत त्या त्या ठिकाणी नेऊन ठेवल्या. कोणीही कोणत्याही प्रकारची चोरी करण्याचा किंवा दुकानातून माल लुटण्याचा प्रयत्न केला नाही. लोकांना रस्त्यात अडकून पडावे लागले तरी कोणीही सिग्नल तोडण्याचा किंवा पुढे घुसण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांचे आपत्तीव्यवस्थापन कोणत्याही गोंधळाविना, चेंगराचेंगरीविना, अफवांनी भयभीत न होता तत्परतेने सुरू झाले. या साध्या उदाहरणांवरून जपानकडून आपण खूप काही शिकायला हवं आहे असं प्रकर्षाने जाणवतं.

आज आपण चिनी वस्तूंनी काबीज केलेली बाजारपेठ पाहतो पण त्या वस्तूंच्या गुणवत्तेची आपल्याला मुळीच खात्री नसते. या उलट "मेड इन जपान" या शब्दाचा दुसरा अर्थ जणू गुणवत्ता असा होतो. केवळ व्यवसायातच नव्हे तर दैनंदिन जीवनात, शाळा-महाविद्यालयात, कचेरीत, अगदी घरातदेखील जपलेली गुणवत्तापूर्ण जीवनशैली हे जपान्यांचे वैशिष्ट्य आहे. तिचं नाव ’काईझेन’. काम अधिक चांगले, सोप्या पद्धतीने, कमी श्रमात, कमी वेळेत व कमी खर्चात करता यावे म्हणून जे बदल केले जातात ते म्हणजेच काईझेन. या निरंतर सुधारणेचा ध्यास चपराशापासून अधिकार्‍यांपर्यंत, विद्यार्थ्यांपासून गृहिणींपर्यंत प्रत्येक जपानी व्यक्तीला आहे पण तो भावनेपुरताच मर्यादित नाही तर कृतीतून दिसतो. याउलट भारतीयांचे देशप्रेम त्यांच्या भावनांमधून ओथंबून वाहते, प्रत्यक्ष कृतीत फारसे दिसत नाही. जपानी माणसांचे देशप्रेम अंत:प्रेरणेतून निर्माण झालेले आहे. ते घोषणांमधून नव्हे तर प्रत्येक बाबतीतील "सुनियोजितता, सुव्यवस्था, स्वच्छता, सद्व्यवहार आणि स्वयंशिस्त" या पंचसूत्रीतून सहजगत्या प्रकट होते. रत्न, तलवार आणि आरसा या ३ गोष्टींना जपानमध्ये महत्व आहे. रत्न हे समृद्धीचे, तलवार हे सामर्थ्याचे तर आरसा हे आत्मपरिक्षणाचे प्रतीक आहे.

जपान हा देशच मुळी एका धाग्यात बांधला गेला आहे. उदाहरण द्यायचे तर तेथे देशभरच्या सगळ्या शाळांतून एकच धडा एकाचवेळी शिकवला जातो. त्यामुळे देशभर कोणत्याही दिवशी त्या त्या वर्गातील मुलेमुली सारखेच शिक्षण घेत असतात. जपानचे सरकार शिक्षणाचे धोरण विचारपूर्वक राबवते. त्यामुळेच आज शंभर टक्के साक्षर, नुसता साक्षर नव्हे तर सुशिक्षित असलेला जपानी समाज प्रगतीपथावर पोहोचला आहे. भारताप्रमाणेच तेथेही प्रामुख्याने स्त्रिया मुलांना वाढवतात. त्यासाठी आधी स्त्री सुशिक्षीत असणे गरजेचे आहे, नव्हे तिने शिक्षित असलेच पाहिजे असे ठरवून स्त्री-शिक्षणावर भर दिलेला आहे. इंग्रजीच्या आक्रमणाला दाद न देता जपानी भाषेने आपला समृद्ध वारसा जपला आहे. सगळे शिक्षण, अगदी उच्च तांत्रिक शिक्षणही जपानीत आणले गेले. बाहेरचे ज्ञान स्वतःच्या भाषेत आणताना शब्दांचा क्लिष्ट अनुवाद माथी मारण्याचा अट्टाहास न करता कितीतरी आधुनिक शब्द जसेच्या तसे जपानीत आणून त्यासाठी सरळ वेगळी लिपी वापरात आणली गेली आहे. जपानच्या सक्षमीकरणात भाषेच्या, शिक्षणपद्धतीच्या एकजिनसीपणाचा महत्त्वाचा वाटा आहे.

जपानमधे बराच काळ वास्तव्य केलेल्या प्रसिद्ध मराठी लेखिका सानिया यांचे जपानविषयीचे निरीक्षण नोंद घेण्यासारखे आहे. त्या निरीक्षणातच जपानच्या प्रगतीशील, विजीगिषु वृत्तीचे मर्म आढळून येते. सानिया म्हणतात "जपानी भाषेमध्ये ‘वाताशी’ या शब्दाचा अर्थ ’मी’ असा आहे. पण जपानी लोक बोलताना क्वचितच ’वाताशी’ या शब्दाचा उपयोग करतात. जिथे मी आवश्यक असतो तिथेही ‘वाताशी’ शिवायच क्रियापद वापरता येते. ’वाताशी’ कमीतकमी वापरणारी जपानी माणसे ’मी’पेक्षा सतत ’आम्ही’ असा विचार करत असतात. व्यक्तीपेक्षा कुटुंब, समूह, समाज, देश अधिक महत्त्वाचा असे त्यांनी मानले आहे. जपानमधे राहताना हे पावलोपावली दिसते." याचा अर्थ जपानमधे सगळे सत्पुरूषच राहतात असे नाही पण जगात गुन्हेगारीचे प्रमाण अतिशय कमी असलेल्या मोजक्या देशांपैकी हा एक आहे. औद्योगिकीकरणातून निर्माण होणार्‍या चंगळवादी जीवनशैलीच्या प्रभावामुळे जपानी जनजीवनात देखील आंतरिक अस्वस्थता काहीशी वाढू लागली आहे. अधूनमधून काही अप्रिय घटना घडतायत परंतु काय चुकते आहे, तरूणांचे प्रश्न काय आहेत, मूल्ये का बदलतायत याचा सर्वांगानी विचार केला जातो. त्यामुळे एक प्रकारची शांतता, विश्वास जनमानसात भिनलेला असतो.

परिवर्तनाची सुरूवात अंतर्मनापासून होते हे जपानी लोकांना कळले आहे, आपल्याकडे अनेक थोर पुरूषांनी हे तत्त्व आचरणात आणले आहे पण सर्वसामान्य जनतेत ते तत्त्व जपानसारखे का रूजू शकले नाही याचा विचार व्हायला हवा. अतिपूर्वेकडील स्थानामुळे जपानला उगवत्या सूर्याचा देश असे संबोधण्यात येते. कित्येक आपत्तींच्या काळोखातून उमेदीचा-प्रगतीचा झळाळता सूर्य जपानमधे पुनश्च, निरंतर उगवतो आहे या अर्थी त्या देशाला उगवत्या सूर्याचा देश म्हणणे अधिक सयुक्तिक ठरेल.

Saturday, March 3, 2012

स्वच्छतेचा संस्कार


मध्यप्रदेशातील बैतुल मधल्या एका खेड्यातील अनीता नावाच्या महिलेला सुलभ इंटरनॅशनल या संस्थेने तब्बल दोन लाख रू.चा पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित केले. घरात स्वच्छतागृह बांधल्याशिवाय मी नांदायला येणार नाही असे नवर्‍याला बजावून अनीता घर सोडून गेली आणि त्याने ग्रामपंचायतीच्या मदतीने स्वच्छतागृह बांधल्यावरच ती परतली. तिच्या या ठाम भूमिकेमुळे आपापल्या घरी देखील स्वच्छतागृह असायला हवे याची जाणीव गावातील इतर महिलांना झाली आणि गावात एक महत्वाचा आरोग्यविषयक बदल घडून आला. २१ व्या शतकात असे पुरस्कार द्यावे लागणं ही आपल्या देशासाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट नाही.

स्वच्छतेचा संस्कार आपल्या देशात रूजलेला नाही ही वस्तुस्थिती आहे. त्याचा लोकांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक दर्जाशी काही संबंध नाही. परवाच रेल्वेप्रवासात पाहिले.. एक आधुनिक तरूण जोडपे आणि त्यांची दोन लहान मुलं, ती मुलं गाडीत इकडे तिकडे हात लावत असल्याने "अरे ते सगळं "डर्टी’ आहे" म्हणत त्यांची आई सारखी "हँड सॅनिटायझर लोशन" चे थेंब त्यांच्या हातावर टाकत होती. त्यांच्या बाबांनी एका स्थानकावर चहा पिऊन प्लास्टीकचा कप आणि मुलांनी वेफर्सची रिकामी पाकीटं तिथेच खाली टाकली. जेवणाआधी बाबांनी मुलांना कटाक्षाने हात धुवून यायला सांगितले पण जेवणे झाल्यावर बर्थ स्वच्छ पुसून त्या आईबाबांनी सगळा कचरा गाडीतून बाहेर फेकून दिला. स्वच्छतेची व्याख्या फक्त स्वत:पुरतीच मर्यादित का? रेल्वेप्रवासच नव्हे कार्यालये, कचेर्‍या, बगीचे, इस्पितळे, बसस्थानक अगदी विमानतळावरसुद्धा लोक असे वागताना दिसतात. म्हणूनच अशा जागरूक अनीतांना पुरस्कार देण्याची गरज निर्माण झालेली आहे.

सकाळी रेल्वेरूळांच्या कडेला बसलेले लोक पाहून, स्वातंत्र्य मिळून आपल्याला नक्की किती वर्ष झालीत याचा विचार पडावा की विषाद वाटावा अशी मनस्थिती होते. कानाला मोबाइल, छपरावर डिश(टीव्ही) पण घरात स्वच्छतागृह नाही ! केवळ ग्रामीण भागातच नव्हे तर मुंबईसारख्या शहरांमधल्या कित्येक वसाहतींमधे देखील हेच चित्र आहे. ते बदलायचे कुणी? शासनाने? काही वर्षांपूर्वी गरीब कुटुंबांना शौचालये बांधण्यासाठी शासकीय अनुदान मिळत होते. लोकांनी बांधकाम केले देखील पण अनुदानाची रक्कम हातात पडताच ती कडबा ठेवायची खोली झाली. शासनाच्या ‘गुड मॉर्निंग पथकां’नाही लोकांनी जुमानले नाही.(त्या पथकातील काही सदस्यांच्या घरीही स्वच्छतागृहे नव्हती).खुद्द शासकीय कचेर्‍यांचीच अवस्था काय वर्णावी! कित्येक सरकारी कचेर्‍यात फाईलींचा रंग ओळखू येणार नाही एवढी धूळ साठलेली असते, जळमटे तशीच असतात. काही अपवाद वगळता "पर्मनंट" झालेले सफाई कर्मचारी चहा प्यायला गेलेले असतात.

हे चित्र कायद्याने बदलायचे? देशातल्या प्रत्येक शाळेत गेल्या वर्षाच्या अखेरपर्यंत पक्के स्वच्छतागृह बांधा, असा स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. प्रत्यक्षात कित्येक राज्यांमध्ये हे झालेच नाही. महाराष्ट्रात १३ टक्के शाळांत मुलींसाठी स्वच्छतागृह नाही. केवळ शाळेत स्वच्छतागृह नाही, म्हणून कित्येक पालक मुलींना शाळेत पाठवत नाहीत. स्वच्छतागृह तर सोडाच शाळांचे वर्ग, परिसर महिनोन महिने झाडलेले नसतात. एकीकडे विद्यार्थ्यांसाठी "हात धुवा" अभियान राबवले जाते. त्यासाठी मंत्री येतात, आयोजनात जेवढा खर्च होतो त्यात काही शाळांमधे स्वच्छतागृहे बांधून होतील. मग हे चित्र पोलीसांनी बदलायचे? पोलीस वसाहतींनाच कचराकुंड्यांची, सांडपाण्याची सुविधा नसते. लोकांना पकडून समज द्यायची म्हटली तर बर्‍याच पोलीसदादांना आधी स्वमुखातली पानाची पिंक कुठे टाकावी असा प्रश्न पडेल आणि दंड करायचा म्हटला तर भ्रष्टाचाराची एक नवी पद्धत सुरू होण्याची भीती नाकारता येत नाही. मग काय हे चित्र निवडणूक आयोगाने बदलायचे? निदान निवडणूक लढवणार्‍यांनी तरी शौचालये बांधावीत, या हेतूने निवडणूक, ग्रामविकास खात्याने उमेदवारांना शौचालय प्रमाणपत्र आणण्याची अट घातली होती पण मध्येच ही अट रद्द झाली. निर्मल ग्राम सारखे पुरस्कार दिले गेले पण पुस्काराचे कौतुक ओसरेतो काही गावे पुन्हा पूर्वपदाला पोहोचली.

आपल्या देशात मोबाइल फोनची संख्या एकूण लोकसंख्येच्या 50 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे आणि देशातील स्वच्छतागृहांची संख्या जेमतेम ३६ टक्के असावी ही विसंगती लाजिरवाणी आहे. चकचकीत परदेशांचे कौतुक करताना आपण आपल्या देशात असे का वागत नाही हा प्रश्न स्वत:ला विचारायला हवा आहे. गाडगेबाबांचं नाव हे फक्त योजनेला तोरण म्हणून शोभावं? घर अगदी स्वच्छं हवं मग बाहेर कचरा का चालतो? कळत नाही म्हणून? चुकून? काही कायदा, दंड नाही म्हणून? जाणीवच नाही की दुसऱ्याचा विचार नाही म्हणून? अनीता सारख्यांकडून प्रेरणा घेऊन अस्वच्छतेचं चित्र बदलण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. कोणत्याही स्वच्छता अभियानामध्ये शासकीय सहभागाबरोबर लोकचळवळीचा सहभाग असणे अत्यंत गरजेचे आहे. संपूर्ण स्वच्छता अभियान हे केवळ स्वच्छतागृहांपुरते मर्यादीत नसून परिसर स्वच्छ ठेवणे, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छ पाणी या ही गोष्टी त्यात येतात. सुरूवातीची पायरी म्हणजे लोकांचे मतपरिवर्तन... त्यातल्या त्यात शाळेत शिक्षकांकडून मिळालेले स्वच्छतेचे धडे मुले सहजतेने अंगीकारतील आणि ते सहजच पालकांपर्यंत जाऊन पोहचतील. त्यामुळे एकूणच समाजाच्या मानसिकतेत बदल होऊन स्वच्छतेचा आग्रह धरला जाईल. हे अवघड असले तरी अशक्य नाही.

वैयक्तिक पातळीवर आपण ३ आर (3 R) चा शक्य तेवढा स्वीकार करायला हवा. रिड्यूस (कमी वापर), रीयूज (पुनर्वापर) आणि रिसायकल (पुनर्चक्रीकरण) तरच आपल्याला स्वच्छ भारतात राहायला मिळण्याची शक्यता आहे. पुलंनी एका लेखात म्हटले आहे," देशाची खरी ओळख म्हणजे तिथली सार्वजनिक स्वछतागृहे". देशप्रेम ही काही प्रजासत्ताक दिन किंवा स्वातंत्र्यदिनाची वाट पाहून प्रदर्शित करण्याची गोष्ट नाही. स्वच्छ लखलखीत परिसरात देशप्रेमाचे प्रतिबिंब आपोआप उमटते.

(पूर्वप्रसिद्धी- मातृभूमि)

Thursday, February 16, 2012

मरण


आपुले मरण पाहिले म्या डोळां

माणूस सर्वात जास्त कशाला घाबरत असेल तर मरणाला!
"मरण दाराशी आल्यावर मी म्हटलं, तुला शंभर वर्षे आयुष्य आहे
मरण ही चाट पडलं, म्हणालं, काय हा मनुष्य आहे ?"
या ओळी चारोळीकार गोखल्यांच्या असाव्यात. असे मृत्युंजयी क्वचितच पाहायला मिळतात. उद्या तुम्हाला कुणी सांगितलं की तुम्ही या दिवशी मरणार आहात तर!!! काय प्रतिक्रीया असेल तुमची? ही कवीकल्पना नाहीये, प्रथितयश वृत्तपत्रात मध्यंतरी प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार आता तरूणपणीच तुमची मरणवेळ तुम्हाला कळू शकेल. माणूस आयुष्यभर मृत्यूचा विचार करत असतो. कधी ज्योतिषाचा आधार घेऊन तो आयुष्यरेषेवर नजर ठेवून असतो, तर कधी विज्ञानाच्या साथीने, तरीही ते गूढ कायम राहिले आहे. ब्रिटनच्या ग्लास्गो युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी मात्र माणसाच्या शरीरातील डीएनएद्वारे त्याचे आयुर्मान तरुणपणीच समजू शकेल असा दावा केला आहे. मानवी शरीरात असलेल्या 'टेलोमेरेस'च्या लांबीवरून माणसाची 'मरणवेळ ' सांगता येऊ शकेल. सध्या हा प्रयोग केवळ पक्ष्यांवर करण्यात आला असल्याने मानवावर प्रयोग केल्यानंतरच त्याची सत्यता पडताळता येईल.

आधीच मरणवेळ कळणं म्हणजे जणू क्रिकेटमधलं मॅच फिक्सींग ! खेळणार्‍यांनी लुटूपुटीचा खेळ खेळायचा, बघणार्‍याने मात्र समरसून बघायचा. मरणाची वेळ, तारीख समजली तर अवघं जगणच लुटूपुटीचं होऊन जाईल."जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय" हे कवी तांब्यांनी सांगितलेलं सत्य माहीत असूनही माणसाच्या आयुष्यातील आनंद आणि दु:ख एकाच गोष्टीशी निगडीत असतं, ती म्हणजे 'मृत्यू'. बहिणाबाई सांगून गेल्यात, 'जनम- मरण एका श्वासाचे अंतर.' तरीही माणूस नात्याच्या पाशात, मालमत्तेत, संशोधनात, व्यासंगात, कलेच्या रसात, प्रपंचात जीव गुंतवतो. मृत्यु समोर दिसला की मात्र भल्याभल्यांचे मुखवटे गळून पडतात हे माकडिणीच्या गोष्टीतून कळतं. बिरबल एका माकडिणीला तिच्या पिल्लासह हौदात ठेवून तो हौद पाण्याने भरू लागतो. हौद भरू लागताच ती पिल्लाला डोक्यावर उचलून घेते. पण तिच्या नाकातोंडात पाणी जाऊ लागताच ती पिल्लाला पायाखाली ठेवून त्यावर उभे राहून आपला जीव वाचवू पाहते. येथे ती माकडीण हे जीवनाच्या आसक्तीचे प्रतीक आहे. माणसाला जगात सर्वात प्रिय गोष्ट म्हणजे त्याचा जीव, हेच या कथेचे सार आहे.

परंतु हाच परमप्रिय जीव तुम्ही अमुक दिवशी गमावणार आहात असे कळले तर काय होईल! आयुष्य म्हणजे कथा, कादंबरी किंवा दूरदर्शनवरची मालिका नव्हे. त्यात प्रेक्षकांच्या आग्रहाच्या नावाखाली मेलेली पात्रं परत जिवंत करण्याचे चमत्कार घडत असतात. केवळ मालिकांमधले ’काशी’ किंवा ’मिहीर’च नव्हे, कादंबरीतला हॅरी पॉटर मरणार काय या भीतीने जगभरातली बच्चेकंपनी हादरली. ‘शेरलॉक होम्स’च्या बाबतीत त्याच्या फॅन्सची अवस्था तीच होती. ‘हिज लास्ट बो’ या कादंबरीत तो मरतो असं दाखवलं होतं. शेवटी ‘रिटर्न ऑफ शेरलॉक होम्स’ लिहून त्याला जिवंत करावं लागलं. खर्‍या आयुष्यात अशी "संजीवनी बुटी" मिळत नसली तरीही आपण जगाला हवे आहोत या भ्रमात माणूस त्यात रंग भरत राहतो. मरणवेळ कळली तर या सार्‍याचा बेरंग होईल. समजा स्वत:ची मरणवेळ दूर असली पण अतिशय जवळच्या व्यक्तीची मरणवेळ जवळ असली तरी माणूस कोसळून पडेल.

आज मानवाची वयोमर्यादा सरासरी ६५ ते ७० आहे. अथक वैद्यकिय व वैज्ञानिक प्रयोगानंतर मानवाने हे यश मिळवले आहे. अमरत्वाच्या आगीत अश्वत्थाम्यासारखं होरपळावसं वाटत नसलं, तरी शतायुषी होण्याची आस त्याच्या मनातून सहजी जात नाही. मात्र दुर्धर रोगाने पीडीत, कोमात गेलेल्या किंवा समाजानी उपेक्षिलेल्या कित्येकांना इच्छा मरण हवं आहे. अशांची मरणवेळ दूर असेल तर आत्महत्यांचे प्रमाण वाढेल. अर्थात मृत्युच्या भयावर मात केलेल्या, जीवनाची क्षणभंगुरता उमगलेल्या संतमहात्म्यांना, समाजासाठी जीवन उधळून टाकणार्‍या सुहृदांना, देशासाठी प्राणांची बाजी लावणार्‍या शूरवीरांना कदाचित मरणवेळ कळल्याने फरक पडणार नाही. त्यांनी एका ध्येयासाठी "तुजसाठी मरण ते जनन" म्हणत जीव ओवाळून टाकलेला असतो. जन्माला येणार्‍या प्रत्येकाचं जगणं शाश्वत नसलं तरी मरण शाश्वत असतं, पण ते कधी हे कळलं तर, सामान्य माणसाच्या जगण्यातली मात्र सगळी गंमतच निघून जाईल. आहे ते आयुष्य सकारात्मक जगून कारणी लावावं हे भान असणं सोपं नसतं. त्यामुळे आयुष्य केवळ "उपभोगण्या" साठी आहे अशी त्याची धारणा होईल.

जगबुडीची नुसती अफवा उठली तरी त्याचा कित्येकांवर मानसिक परिणाम झाल्याच्या बातम्या आपण वाचतो, २१ डिसेंबर २०१२ हा विश्वाचा अंतिम दिवस असल्याच्या खुळचट चर्चा माध्यमातून झडल्या, तरीही त्यात आपण सगळेच संपणार आहोत असं काहीसं विचीत्र समाधान असतं. परंतु मरणवेळ प्रत्येकाची वेगळी असेल, मी गेलो तरी जगरहाटी सुरूच राहणार आहे हे स्वीकारणं अधिक अवघड होईल. ती जवळ असेल ते "ओरबाडून" जगू लागतील, स्वप्न पाहाण्यातली मौज हरवून बसतील, "आपुले मरण पाहिले म्या डोळां" अशी त्याची अवस्था होईल. ज्यांची मरणवेळ दूर असेल ते बेदरकार, बेपर्वा बनतील. मरणवेळ कळली तर आशीर्वाद पोकळ होतील, "जपून राहा" या गोड शब्दांना अर्थ उरणार नाही.
मृत्युच्या गूढपणातच जीवनाचे सौंदर्य दडले आहे. विज्ञानाच्या अतिरेकी प्रेमापायी माणसाने ते गूढ उलगडले तर बाकी उरेल फक्त जीवनाचे कुरूप वास्तव... मग त्यापेक्षा एका शायराने म्हटल्याप्रमाणे मृत्युच का सुंदर वाटू नये!

" दो कदम चलने को तैयार ना था कोई, आज काफिला बनकर साथ चले जा रहे थे
आज पता चला "मौत" इतनी हसीन होती है यारों , कमबख्त हम तो युही "जिए" जा रहे थे "