Friday, November 25, 2011

देव


बर्‍याच व्यावसायिक चित्रपटांमधे हे दॄश्य हमखास असते. कोणतेतरी एक महत्वाचे पात्र मृत्युशय्येवर पहुडले आहे, डॉक्टरांनी ’अब सब कुछ उपरवाले के हाथ मे’ असल्याचं सांगून टाकलं आहे. नायक वा नायिका मंदीरात येऊन देवाला आळवत आहेत, वादळ सुरू झाले आहे, देवळात टांगलेल्या शे पाचशे(!) घंटा वेड्या-वाकड्या हलत जोरात वाजत आहेत. अचानक कुणी तरी येऊन ’वो होश मे आ गये’ असं सांगतं आणि टँग टँग सतार वाजू लागते. ’तेरा लाख लाख शुकर है भगवान’ असं ऐकत प्रेक्षकही सुटकेचा निश्वास टाकतो. या तद्दन फिल्मी ईश्वरभक्तीला छेद देत ’देव म्हणजे नक्की काय’ याचा शोध घेण्यास मराठीतील ‘देऊळ’ चित्रपट प्रवृत्त करतो. या चित्रपटाद्वारे उमेश व गिरीश कुलकर्णी या द्वयीने समाजमनातला देव शोधण्याचा धाडसी प्रयत्न नर्मविनोदी पण मार्मिक पद्धतीने केला आहे.

एका गुराख्याला (केशा) ’दत्त’ दिसल्याचा भास किंवा त्याच्या मते ’साक्षात्कार’ होतो. हा आधी चर्चेचा आणि मग राजकारणाचा विषय होतो. ठरलेल्या रूग्णालयाऐवजी दत्ताचे देऊळ बांधण्याला प्राधान्य दिले जाते. जनतेच्या धार्मिक भावनांचा फायदा घेऊन राजकारणी दत्तमंदीराच्या विस्तारीकरणाच्या नावाखाली बेकायदा कामे सुरू करतात. गावातले संतुलित विचार करणारे कुलकर्णी अण्णा जेव्हा ही फसवणूक आहे असे म्हणतात तेव्हा त्यांना उत्तर मिळते "बेकायदा कामं आणि कायदा यांच्यामधे भक्तांची मोठी रांग उभी आहे, ती भेदून आमच्यापर्यंत कुणीही पोचू शकत नाही." हे सगळे पाहून विषण्ण झालेला केशा (गुराखी) देवळातली मूर्ती घेऊन पळून जातो तेव्हा दुसरी मूर्ती बसवून देवस्थानाच्या अवतीभवती असलेली बाजारपेठ सुरू ठेवली जाते. मना-मनातल्या ’देव’ या संकल्पनेला तपासून पाहायला हवे आहे याची जाणीव निर्माण करून चित्रपट संपतो..

तुमचा भविष्यावर विश्वास आहे काय? असे विचारले की बरेच जण होय म्हणत हात पुढे करतात आणि काही जण ’अजिबात नाही- क्योंकी तकदीर तो उनकी भी होती है जिनके हाथ नही होते’ असे म्हणतात (यातले बहुतेक जण नंतर हळूच ’राशीभविष्य’ वाचतात). तुमचा देवावर विश्वास आहे काय? या प्रश्नाचे काहीसे तसेच आहे. ठाम हो किंवा नाही असे उत्तर साधारणपणे मिळत नाही. ती व्यक्ती बुद्धीजीवी किंवा अल्प-अशिक्षीत, ग्रामीण किंवा शहरी, विचारी किंवा भाबडी, यशस्वी किंवा अयशस्वी यापैकी जशी असेल त्यानुसार स्पष्टीकरणासह उत्तर मिळते. विज्ञानाला अद्याप न सुटलेली काही कोडी निसर्गात आहेत आणि हाच ईश्वरी अस्तित्वाचा पुरावा आहे असे काही जण म्हणतात तर जगातली प्रत्येक घटना ही कोणत्यातरी वैज्ञानिक घटनेचीच परिणीती आहे असं काही जणांना वाटतं. खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर म्हणतात "जीवनातील घटना आपणच घेतलेल्या योग्य-अयोग्य निर्णयामुळे, काही वेळा बाह्य परिस्थिती किंवा संभाव्यशास्त्राच्या नियमाप्रमाणे घडत असतात त्यामागे कोणतीही पारलौकिक शक्ती नसते" तर ज्योतीर्भास्कर जयंत साळगावकर ’देव’ या संकल्पनेबाबात म्हणतात, "हजारो वर्षापूर्वीचे आपले पूर्वज रानावनात राहात असताना त्यांना कधी पशुपक्षांची, जनावरांची, वाऱ्यावादळाची, धरणीकंपाची तर कधी शत्रूंच्या टोळयांची भीती वाटत असली पाहिजे आणि त्यावेळी आपल्याला कोणत्या तरी गूढ शक्तीकडून सहकार्य मिळावे, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली असली पाहिजे. कदाचित एखादेवेळी लहान-मोठा प्रत्यय आला की यामागे सूत्र चालविणारी गूढ शक्ती असल्याची खात्री पटून तिच्याबद्दल वाटणारा आदर आणि आधार अधिक वाढला असला पाहिजे.अशा रीतीने ही संकल्पना मूर्त स्वरुप धारण करीत असताना देव या कल्पनेचा जन्म केव्हा तरी झाला असला पाहिजे".

जगातील बहुतेक धर्म देवाचे रूप अमूर्त आहे असे मानतात, देवाचा दूत असणार्‍या प्रेषिताला आदर्श मानतात, तर हिंदू धर्मात देवाला निर्गुण आणि सगुण दोन्ही रुपात पाहिले जाते. धर्म जगण्याची पद्धत ठरवतो. तो जन्माला चिकटून येतो आणि मग त्यानुसार देवाची व्याख्या स्वीकारुन माणूस जगत राहतो. वातावरण, संस्कार, विचारशक्तीनुसार प्रत्येक धर्मात कडवे, शक्य तोवर धार्मिक परंपरा पाळत राहणारे आणि नाकारणारे असे तीन गट तयार होत असतात. देवाचे अस्तित्व मानायचे वा नाही या संवेदनशील प्रश्नाबाबत मतभेद आहेत. स्टीफन हॉकिंगने तर ब्लॅक होल थिअरी द्वारे आस्तिक्यच नव्हे तर रिचर्ड डॉकिन्स सारख्या विचारवंतांनी स्वीकारलेली ’अज्ञेयवाद’ ही कल्पना सुद्धा मोडीत काढली. ते म्हणतात, "बिग बँग/स्फोटाआधी काळाचाच जन्म झाला नव्हता - त्यामुळे देवाकडे विश्व बनवण्यासाठी वेळ कुठून येणार? हा प्रश्न अडाणीपणाचा आहे. पृथ्वीच्या शेवटच्या सीमेपर्यंत जाण्याचा मार्ग विचारण्या सारखा आहे.पृथ्वी गोल आहे. त्याला कडा नाहीत. सीमा नाहीत. तिथे जायचा मार्ग विचारणे हा प्रश्न अडाणीपणाचा आहे. अर्थात प्रत्येकाला आपला विश्वास आणि श्रद्धा जपायचे स्वातंत्र्य आहेच - मला मत विचाराल तर मी म्हणेन की - देव नाही . देवाने विश्व निर्माण केलेले नाही . ईश्वर मार्गदाता नाही . ईश्वर प्रेमळ काळजीवाहू नाही . ईश्वर मुक्तिदाता नाही . कारण तो अस्तित्वातच नाही. यातून सरळ निष्कर्ष असा निघतो की , स्वर्ग खोटा , नरक असत्य आणि मरणोत्तर आयुष्य आत्मा हे सारे झूट आहे. आपल्याला हे एकच भौतिक आयुष्य , हे एकच वास्तव अस्तित्व आपल्याला लाभले आहे. विश्वाच्या अथांग निरंतर रचनेचा आस्वाद घ्यायला आणि ते शिकून घ्यायला हे जे आयुष्य मला लाभले आहे त्याबद्दल त्या विश्वरचनेचा मी ऋणी आहे."

परंतु नास्तिक्याबरोबर येणार्‍या जबाबदार्‍या पेलण्याचे सामर्थ्य सर्वसामान्य माणसांमध्ये नसते आणि त्यामुळे जगायला त्यांना देवाचा टेकू लागतोच.

गाडगेबाबा आणि एकूणच साधू-संतांनी मानवसेवेत ’ईश्वर’ शोधला, तशी शिकवणही समाजाला दिली. मात्र सामान्य माणसाचे प्रयत्न संपतात तिथून नकळत त्याच्या देवावरच्या विश्वासाची सुरूवात होते, ती देखील धार्मिक स्वरूपातच. हा विश्वास श्रद्धेच्या रूपाने व्यक्त होतो तेव्हा जगण्याचे बळ वाढते. पापपुण्याचा विधीनिषेध बाळगला जातो आणि अशी श्रद्धा माणसाला अधिकाधिक समाधानी, आश्वस्त करते. परंतु श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातली सीमारेषा फार नाजूक आहे. ती वेळीच ओळखता आली नाही तर हाच विश्वास अंधश्रद्धेचे रूप घेतो. योग्य-अयोग्य हा विवेक संपतो.
 "परमेश्वराची पूजा करा पण बेकायदा प्रार्थनास्थळे बांधू नका " अशी ताकीद नुकतीच उच्च न्यायालयाने सोसायटयांना दिली आहे. बुवाबाजी, गंडेदोरे याचा अतिरेक माणसामधला प्रयत्नवाद हिरावून घेतो, दैवावर सगळी भिस्त ठेवली जाते, देवाच्या नावाने बाजारीकरण केले जाते. भोळ्याभाबड्या जनतेच्या या विश्वासाचाही व्यापार केला जातो. आज आपण अनेक धार्मिक संस्थानांमधून देणगीच्या नावावर मिळालेल्या जनतेच्या पैशाची लूट बघतो, अध्यात्माच्या खास दूरचित्रवाणीवाहिन्यांवर यंत्र-ग्रहखड्यांच्या जाहिरातींचा मारा बघतो, देवळांमधून देवापेक्षा स्वत:चे स्तोम माजवणारे भोवतालचे बडवे बघतो, अनेक ठिकाणी तेला-दुधाने चिकट झालेले अस्वच्छ गाभारे बघतो, गणेशमिरवणुकीतले बीभत्स नाच बघतो, दर्शनासाठी देखील वेगवेगळ्या किमतीच्या रांगा बघतो, काळा पैसा चित्रपटनिर्मितीला वापरून आणि तो चित्रपट चांगला चालावा म्हणून देवालाच कौल लावणारे महाभाग बघतो, गावात मुलभूत सोयी नसल्या तरी गावातल्या देवळाचा कळस मात्र सोन्याच्या पत्र्याने मढवण्याचा अट्टाहास बघतो, आयुष्यात होरपळले गेलेले लोक तर्कबुद्धी गहाण टाकून बुवा-बाजीला लागलेले बघतो, भक्तांच्यातच गटातटाचे राजकारण बघतो, नवसाच्या नावाखाली देवालाच लाच देऊ करणारे भाबडे भक्त बघतो, धार्मिक ग्रंथांचे संदर्भच योग्य मानून केलं जाणारं स्त्रियांचं शोषण बघतो, आणि अशा अपप्रवृत्तींना कोणत्याच धर्माचे अनुयायी अपवाद नाही हे बघतो तेव्हा तेव्हा मन व्यथित होते.
समर्थांची उक्ती आठवते , 'जनाचा लालची स्वभाव। आरंभीच म्हणती देव। म्हणिजे मला कांही देव। ऐसी वासना।।
काहीच भक्ती केली नस्तां। आणी इच्छिती प्रसन्नता। जैसें काहीच सेवा न करितां। स्वामीस मागती।।'
इथे सेवा- भक्तीचा अर्थ प्रयत्न असावा. प्रयत्नांती परमेश्वर हे लाक्षणिक अर्थाने घ्यायला हवे.

माणसाची ’देव’ ही संकल्पना त्याच्यावरील संस्कारांनुसार, सभोवतालच्या परिस्थितीनुसार, त्याच्या आयुष्यातील अनुभवांप्रमाणे, सहवासातील व्यक्तींच्या-विचारपद्धतींच्या-संस्कृतीच्या प्रभावामुळे बदलत जाऊ शकते. गांधीजींच्या आस्तिकतेला धार्मिकतेपेक्षा सामाजिक परिमाणे होती. कित्येक तत्त्वज्ञ, समाजधुरीण एकाच आयुष्यात या भूमिका बदलतानाही दिसतात पण त्यामागे सर्वंकष विचार, विशीष्ट अनुभूती असते. सुरूवातीला आपल्या कवितेतून
’तुझ्या महिम्याची प्रचंड पुराणे, गमती तराणे अर्थहीन’
असे ईश्वराला म्हणणारे कुसुमाग्रज कालांतराने नक्षत्रांना परमेश्वराच्या अस्तित्त्वाबद्दल प्रश्न विचारतात तेव्हा त्यांच्याच कवितेचे उत्तर असते..
’स्मित करून त्या म्हणाल्या, मला चांदण्या काही | तो नित्य प्रवासी, फिरत सदोदित राही |
उठतात तमावर त्याची पाऊलचिन्हे | त्यांनाच पुससी तू, तो आहे किंवा नाही ||’

मग वाटतं एखाद्याला इतकी आश्वस्त करणारी श्रद्धा, नाकारुन काय मिळणार आहे. केवळ नास्तिकतेच्या आग्रहाने जगाचे गाडे नीट चालू शकणार आहे का? त्याचा आंतरिक ओलावा टिकून राहील का? त्यापेक्षा मानू देत देवाला. कुणाला देव आपल्या पाठीशी दिसेल, कुणाला देव आपल्याच अंत:करणात सापडेल, कुणाला तीर्थयात्रेत, नामजपात, व्रतवैकल्यात, ध्यान-धारणेत सापडेल, कुणाला एखाद्या संशोधनात, प्रकल्पात, संगीतात किंवा एखाद्या सुंदर कलाकृतीत सापडेल तर कुणाला दुसर्‍याचे अश्रू पुसण्यात परमेश्वर गवसेल. एका बोधकथेत माणूस परमेश्वराला म्हणतो "तू जर माझ्याबरोबर चालतोस तर मग या वाळवंटात उमटलेली पाऊले दोनच कशी, चार का नाहीत?" परमेश्वर उत्तरतो "ती दोन पावले माझीच आहेत कारण वाळवंट पार करताना मी तुला उचलून घेतले होते". अंधश्रद्धेची वाट वगळता  देवाचा असा शोध घेण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, असावे. त्याचा आदर व्हावा.  

Friday, November 11, 2011

स्त्रिया, पोशाख आणि समाज

परवा चित्रपटगृहात समोरच्या रांगेत एक तरूण फौज येऊन बसली. बहुतेकांनी चेहरा रूमालाने झाकला होता जणू तो त्यांच्या पोशाखाचाच एक भाग होता. चित्रपट सुरू होताच त्यांनी रूमाल बाजूला केले.. तेव्हा त्या कॉलेजकन्यका असल्याचा उलगडा झाला. आजूबाजूला काही ’जोड्याही’ येऊन बसल्या होत्या,त्यांचे रूमाल मात्र त्यांच्या चेहर्‍यावर तसेच होते. त्वचेचे संरक्षण हा साहजिकच त्या ’पडद्या’मागचा हेतू नव्हता. जगातील काही देश बुरखाबंदीसाठी चर्चा, वादविवाद करत असताना या मंडळींनी स्वेच्छेने हा ’बुरखा’ स्वीकारला आहे. धार्मिक कारणासाठी किंवा ऊन-वार्‍यापासून संरक्षण हा हेतू असेल तर अजिबात हरकत नाही पण काही मुलींना टवाळखोर मुलांपासून बचाव करण्यासाठी चेहरा झाकावा लागतो तर काही जण जगापासून आपले कृत्य दडवण्यासाठी रूमालाचा आडोसा वापरतात... ही मात्र समाजासाठी चिंतेची बाब आहे.

खरं तर पोशाख आपले व्यक्तिमत्व खुलवण्यासाठी निर्माण केले गेले आहेत. आपण एखादया व्यक्तीला भेटल्यावर आपले त्या व्यक्तीबद्दल जे मत तयार होत असते ते त्या व्यक्तीचा पोशाख /पेहराव हयावरूनच. मुलाखतीला जाताना, विशीष्ट प्रसंग, समारंभ यात काय परिधान करायला हवे याची जाण व्यक्तीला यशस्वी बनवू शकते. कुणी काय पेहराव करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी मुलींनी/स्त्रियांनी काय घालावे हे मात्र समाज ठरवत असतो. परदेशी स्त्रियांनी भारतात प्रवास करताना कोणती खबरदारी घ्यावी या संदर्भातील वेबसाईटवर स्पष्ट सूचना आहेत "Women travellers in India should pay attention to local dress code for two reasons: to avoid sexual harassment and to avoid looking disrespectful" एका हिंदी सिनेमातील एक प्रसंग आठवतोय. तोकड्या कपड्यातली झीनत अमान एका सडकछाप मजनूला पकडून पोलीस अधिकारी असलेल्या अमिताभ बच्चनकडे घेऊन येते आणि तिला बघून त्या मजनूने शीटी वाजवली अशी तक्रार करते. यावर अमिताभ तिला सुनावतो "तुला अशा पोशाखात बघून लोक शीटी नाही तर काय देवळातली घंटा वाजवतील काय!" प्रेक्षक यावर मनापासून हसतात. म्हणजे असा पोशाख घातलेल्या मुलीला असाच प्रतिसाद मिळणार यात काही वावगं वाटत नाही. विद्यार्थिनींचे आखूड स्कर्ट हा सध्या ब्रिटनमधील शाळांसमोरचा एक मोठा प्रश्न आहे. शाळांनी मिनी स्कर्ट्सवर बंदी आणून ट्राउझर्स घालणे सक्तीचे केले आहे. ही समस्या एकट्या ब्रिटनमधील नाही . अमेरिका आणि युरोपीय देशांतही हा प्रश्न गंभीर बनला आहे . पण ' मिनी स्कर्ट्सवर बंदी ' हे त्याचे नेमके उत्तर नव्हे . शाळांच्या व्यवस्थापनांचा तसा दावाही नाही . एका गुंतागुंतीच्या प्रश्नावर शोधलेल्या उपायांपैकी हा एक छोटासा प्रयत्न आहे , असे त्यांचे म्हणणे आहे . आपल्या देशातही अनेक शिक्षणसंस्थांमध्ये ड्रेसकोड हा वादाचा विषय झाला आहे . तो लागू झाल्यानंतर शिक्षणसंस्थांची डोकेदुखी थोडी तरी कमी झाली असावी असे वाटते.

विद्यार्थी विश्वासाठी हे रास्त आहे कारण शरीराबद्दलचे त्यांचे कुतूहल त्यांना अस्वस्थ करत असते. परंतु कॅनडातील एका पोलीस अधिकार्‍याने मध्यंतरी ’आपल्यावरील अत्याचार टाळायचे असतील तर स्त्रियांनी सभ्य कपडे घालावेत’ असे विधान केले. या मानसिकतेला उत्तर म्हणून आणि ’शारिरीक बळाचा वापर करून एखाद्या पुरूषाने स्त्रीवर अत्याचार करणे हे चूकच ,त्याचा तिच्या कपडयांशी संबंध नाही’ या भूमिकेतून जगभरातील अनेक देशात स्लट वॉकचे (भारतात दिल्लीत देखील) आयोजन करण्यात आले. ज्यांना त्यामागचा उद्देश कळला नाही अशा मूर्ख स्त्रियांनी त्या मोर्चात मुद्दाम वाह्यात कपडे घालून त्या भूमिकेचा विपर्यास केला, साहजिक त्या मोर्चाने समाजाला योग्य तो बोध न मिळता ’बेशरम मोर्चा’ म्हणून त्याची संभावना झाली. सामाजिक संकेतांपेक्षा वेगळा पोशाख करणे याचा अर्थ आमंत्रण देणे असा होतो हे नाईलाजाने स्वीकारुन त्यामुळे स्त्रीवरील अत्याचारांची शक्यता वाढू शकते हा वस्तुनिष्ठ विचार प्रत्येक सुजाण स्त्री करते पण मुळात हे प्रकरण ’संस्कृती सापेक्ष’ आहे. एकेकाळी पुण्य़ात सकच्छ की विकच्छ (पाचवारी साडी/ नऊवारी साडी) हा वाद रंगला होता. केरळ राज्यात तर काही वर्षांपूर्वी स्त्रियांनी उत्तरीय वापरणे असभ्यपणाचे मानले जाई. यासाठी लढा देत कालांतराने उत्तरीय न वापरणॆ म्हणजे असभ्यपणा इथे आपण येऊन पोचलो आहोत, तर हा विचार अद्याप ज्या सामाजिक स्तरापर्यंत झिरपला नाही त्या आदिवासी समाजातील काही गटांमध्ये उत्तरीय आजही वापरले जात नाही. मग याला श्लील अश्लील परिमाण लावणारे आपण कोण? काळाच्या एका तुकड्यावर उभे राहून आपण हे कसं ठरवणार? आणि तो अधिकार आपल्याला दिला कुणी?

शिवाय स्त्रियांबाबत दुर्दैवी घटना केवळ त्या त्या काळानुसार किंवा सामाजिक चौकटीनुसार अनुचित मानल्या गेलेल्या पोशाखामुळे घडतात असे नाही कारण विकृतीला वय, नाते, रूप, रंग कळत नाही. तरूणीच नव्हे बालिका, नात्यातील गरजू परित्यक्त वृद्ध स्त्रिया, अगदी रस्त्यावरील बेवारस, मतीमंद स्त्रियांवर देखील अत्याचार होतात. पण मुलींच्या विनयभंगाचे किंवा बलात्काराचे प्रकार जेव्हा समाजात घडतात तेव्हा सर्वात आधी मुलींच्या कपड्यांविषयी , त्यांच्या वर्तनाविषयी प्रश्न उपस्थित केले जातात .म्हणजे मुलांवर समाजस्वास्थ्याची काहीच जबाबदारी नसते का! त्यांनी ’सिक्स पॅक्स’ दाखवत फिरणे अयोग्य मानले जात नाही, त्यांच्या ड्रेसकोड बद्दल कुणाला आक्षेप नाही पण स्त्रियांच्या पेहरावाकडे मात्र समाजातील स्वयंघोषित पोलिस डोळ्यात तेल घालून पाहणार, असे का!

आपण चांगले दिसावे, आकर्षणाचे केंद्र असावे असे बहुतेक प्रत्येक मनुष्यप्राण्याला वाटते. स्त्रियांमधे ही भावना निसर्गत: अधिक प्रमाणात असते. पुरूषप्रधान समाजात या साध्या गोष्टीचा बाऊ केला जातो. उदा: एखाद्या पुरूषाची बायको निवर्तली तर त्याच्या राहणीत, पेहरावात फारसा फरक पडत नाही पण जोडीदार गमावलेल्या स्त्रीने चांगला पोशाख केला, दागिने घातले तर ती टीकेचा विषय ठरते आणि टीका करण्यात दुर्दैवाने इतर स्त्रियादेखील पुढे असतात. हे कितपत योग्य आहे!

पोशाख सभ्य असावा यात वादच नाही पण तो काय असावा हा मात्र वादाचा मुद्दा आहे. उदा: साडी हा भारतीय सभ्य पोशाख मानला जातो पण बर्‍याच चित्रपटांमधे साडीमधली ओलेती नायिका जे काय अंगविक्षेप करते किंवा सिनेमाचं जाऊ द्या ,काही स्त्रिया ज्या दिव्य तर्‍हेने साडी नेसतात ते पाहून साडीला सभ्य पोशाख म्हणायला जीभ रेटत नाही. त्यापेक्षा काही वेळा जीन्स वर व्यवस्थित टॉप हा देखील योग्य पोशाख असू शकतो. पोशाख कोणता आहे यापेक्षा तो आपल्याला शोभतो का, त्यात अवघडल्यासारखे तर वाटत नाही ना, ज्या ठिकाणी आपण जात आहोत तिथे तो घालणे सोयीचे आहे ना, ज्या समाजात आपण वावरतो तिथे तशा पोशाखाने काही औचित्यभंग तर होणार नाही ना एवढा विचार करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. योग्य ते लैंगिक शिक्षण दिले गेले आणि मुळात स्त्रीकडे ’मादी’ म्हणून न पाहता ’माणूस’ म्हणून पाहण्याचा संस्कार रूजला तरच स्त्रियांची सामाजिक सुरक्षितता मजबूत होईल. शरीर हाच खरं तर आत्म्याचा पोषाख आहे असं आपल्याच संस्कृतीत म्हटलं जातं. हे आपल्याला उमगलं, आंतरिक सौंदर्याकडे बघण्याचा दृष्टीकोन विकसित झाला आणि व्यक्तीस्वातंत्र्य व स्वैराचार यामधली सीमारेषा आपल्याला नीट कळली तर अशा लेखाचे प्रयोजनच उरणार नाही..नाही का !

published in matrubhumi 10-11-11

Friday, October 21, 2011

शाश्वत निधी

Published in Matrubhumi Thursday 20oct 2011

पांगळयाच्या सोबतीला येऊ द्या बलदंड बाहू

देवळात गेल्यावर दानपेटीत एक तरी नाणं टाकल्याशिवाय आपल्याला देवदर्शनाचं समाधान मिळत नाही. एखादा धार्मिक उत्सव, सप्ताह असेल, देवळाचा जीर्णोद्धार असेल तर आपण फूल ना फुलाची पाकळी देऊन आपले धार्मिक कर्तव्य पार पाडतो. कधी कधी सोन्या, चांदी,हिर्‍याने आपल्या दैवताला मढवतो देखील .. शेवटी ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. त्याचवेळी समाजातील दुर्लक्षितांना आर्थिक मदत करताना मात्र आपण हात आखडता का घेतो! असं नसतं तर आनंदवनासारख्या ’माणुसकीच्या तीर्थक्षेत्राला’ आर्थिक विवंचनेनं कधीच ग्रासलं नसतं. निसर्गाने अन्याय केलेल्या व समाजाने बहिष्कृत केलेल्या कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात आशेची नवी पहाट फुलविणारे, त्यांच्यात आत्मसन्मानाचा हुंकार जागवून जगण्याचे बळ देणारे बाबा आमटे यांचे आनंदवन आज आर्थिक संकटात आहे.

मदर तेरेसांच प्रसिद्ध वचन आहे, "समोर दिसणार्‍या जिवंत माणसावर जर आपण प्रेम करू शकत नसू तर अदृष्य परमेश्वरावर भक्तीरूपी प्रेम आपण कसे करणार!’
बाबा-साधनाताईंनी समाजातील अपंगांवर, व्याधीग्रस्तांवर फक्त प्रेमच केलं नाही तर त्यांच्या पुनर्वसनाचा वसा घेतला. कुष्ठरोगाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन आजही दूषित आहे. अगदी आधार कार्डाच्या नोंदणीचा देखील हक्क या बांधवांना झगडून मिळवावा लागतो यावरून त्यांचे एकूण आयुष्य सामान्य भारतीय नागरिकापेक्षा किती जिकीरीचे आहे याची कल्पना येते. बाबांचा लढा केवळ कुष्ठरोगाविरुद्ध नव्हता. जीवनात सगळी कुरूपता नष्ट व्हावी यासाठीच त्यांनी युद्ध आरंभिले होते. त्यांच्या वाटचालीत लक्षावधी उपेक्षितांच्या चेहर्‍यावर त्यांनी हास्य फुलवले. बाबा-साधनाताईंनी त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी कितीतरी प्रकल्प सुरू केले. डॉ. विकास आणि भारती तसेच डॉ.प्रकाश आणि डॉ.मंदा आमटे यांनी ती धुरा समर्थपणे वाहिली.. आनंदवनातील कुष्ठरोगी व अपंगांसाठी डॉ.विकास यांनी सव्वाशेहून अधिक कुटिरोद्योगांची सुरूवात केली. कोलकात्यातून माशांची पिले आणून मत्स्यशेती सुरू केली, चाराशेतीसाठी झाशीतील संस्थेकडून उच्च प्रथिनयुक्त गवतांच्या जातींची लागवड करवून घेतली. 'युवाग्राम' प्रशिक्षण केंद्राद्वारे युवकांना रोजगार प्रशिक्षण मिळू लागले. यवतमाळ जिल्ह्याच्या झरी-जामणी तालुक्यात मुळगव्हाण गावी डॉ.विकास यांच्या पर्यावरण संवर्धन केंद्रामुळे त्या परिसरातील ४००हून अधिक शेतकरी कुटुंबांनी शेतीत लक्षणीय प्रगती केली. याशिवाय आनंदवनात कृत्रिम अवयव निर्मिती केंद्र, माहिती तंत्रज्ञान प्रशिक्षण केंद्र, अंध-अपंग, कुष्ठरुग्ण यांच्या कलेचं ’स्वरानंदनवन' हे सादरीकरण यशस्वीरित्या काम करत आहेत.
बाबांची तिसरी पिढी- त्यांची तरूण नातवंडे उच्चशिक्षीत आहेत, शहरातील लखलखती दुनिया आणि लठ्ठ पगाराच्या नोकरीला न भुलता आमटे परिवाराचं स्वप्न मोठं करीत आहेत. दु:खाचा अंधार आजही आजूबाजूला सांडतच असतो, अशाच दु:खी आत्म्यांचा जत्था करून त्यांच्यावर सावली धरणारे बाबा आमटे आणि आता त्यांचा परिवार सूर्यप्रकाशाकडे तोंड करून आयुष्यभर उभे आहेत. सोमनाथपासून सगळे प्रकल्प मिळून पाच हजारांवर कुटुंबांचं पालकत्व पेलताना अनेक अडचणी समोर आहेत पण जिद्द अफाट आहे. ही केवळ पुनर्वसन केंद्रे नाहीत. अपंगांना समर्थ बनविण्याची आव्हाने यात आहेत. दु:ख आणि दैन्य यांच्याशी लढे देण्याच्या त्या प्रार्थना आहेत.

कोणत्याही आश्रयार्थी व्याधीग्रस्ताला कधीही नाही म्हणायचे नाही हे आनंदवनाचे व्रत आहे त्यामुळे आनंदवनावर अवलंबून असणाऱ्या गरजूंची संख्या सतत वाढते आहे. प्रत्येक कुष्ठरुग्णामागे दर माणशी-दर दिवशी केवळ १५.५० रुपये एवढेच सरकारी अनुदान १२०० कुष्ठरुग्णांना मिळते. आजच्या गगनाला भिडणार्‍या महागाईत चौकोनी कुटुंबाचा उदरनिर्वाह कठीण झाला आहे, तिथे या विशाल परिवाराने तग कसा धरायचा. जगणे म्हणजे केवळ दोन वेळच्या अन्नाची, छप्पराची व कपडयाची सोय नाही तर निरंतर शिक्षण, मनुष्यत्वाचे सक्षमीकरण असायला हवे. पुनर्वसित इतर कुष्ठरुग्ण, अपंग, मूकबधिर, अंध अशा सर्वांचा विचार केल्यास आनंदवनाची लोकसंख्या अडीच हजारावर जाते. या सर्वांच्या किमान गरजा भागवणे जिकीरीचे होत आहे.

आजच्या स्वार्थी जगात समाजासाठी अत्यंत तळमळीने काम करणार्‍या, रचनात्मक कार्यातून परिवर्तन घडवून आणणार्‍या संस्थांची संख्या नाममात्र आहे. आर्थिक संकटामुळे आनंदवनाचे कार्य झाकोळून गेले तर स्वत:ला या समाजाचा संवेदनशील घटक मानणार्‍या प्रत्येकाच्या माणूसपणाची ती हार असेल. अशा संस्थांचे कार्य थांबले तर त्याबरोबर समाजातल्या चांगुलपणावरची आपली श्रद्धा संपून जाईल. आपल्यातील अनेकांना सेवाभावी कार्य करावेसे वाटते पण त्यासाठी आयुष्य उधळून देण्याची आमटे परिवारासारखी जिगर आपल्याकडे नसते. त्यांचे हात बळकट करणे मात्र आपल्याला अशक्य नाही. वंचितांबद्दल मनात केवळ करूणा असून उपयोगाचे नाही ,त्यांचे दु:ख हलके करण्यासाठी करुणेस कृतीची जोड द्यायला हवी, असे बाबा नेहमी म्हणायचे. या प्रामाणिक प्रयत्नांना हातभार लावताना देणगीचा विनीयोग योग्य प्रकारेच केला जाईल याची दात्याला खात्री असते. "माणूस एक वेळ बोटांशिवाय जगू शकेल पण स्वाभिमानाशिवाय जगू शकणार नाही" असं बाबा आमटयांनी म्हटलं आहे. स्वाभिमान निर्माण होतो स्वावलंबनातून.. आजवर लाखो दुर्लक्षित बांधव संस्थेच्या उपक्रमांमुळे स्वबळावर उभे राहू शकले.
अशा प्रकल्पांचा पाया असणारा आर्थिक डोलारा सांभाळण्यातच सगळी उर्जा खर्च होण्यापेक्षा एक कायमस्वरूपी निधी जमा व्हावा व त्यातून अधिक जोमदारपणे काम करता यावं ,नवी आव्हाने पेलता यावी असा आनंदवनाचा मानस आहे. त्यातून दरवर्षी होणाऱ्या मोतीबिंदू शस्त्रक्रियांची संख्या १५०० वरून ९०००पर्यंत वाढवणे , अल्पभूधारक शेतकरी कुटुंबाच्या जमिनींवरील जल व मृद संधारणाचे कार्य वर्षाला १०० वरून १२०० कुटुंबांपर्यंत विस्तारणे, युवाग्राम प्रकल्पात बेरोजगारांना मिळणाऱ्या व्यवसाय प्रशिक्षणाचा लाभ १०० हून पाचपटीने वाढविणे, स्थानिक पातळीवर होणाऱ्या वाषिर्क श्रमसंस्कांर छावणीस राज्यव्यापी छावण्यांचे स्वरूप देणे असे अनेक उपक्रम पूर्णत्वाला नेण्याचे आनंदवनाचे स्वप्न आहे. यासाठी ५५ कोटी रूपयांचा शाश्वत ’समाज प्रगती सहयोग निधी’ उभारणे आवश्यक आहे. यापैकी २७.५ कोटी एवढ्या निधीस दिल्या जाणाऱ्या योगदानाला इन्कम टॅक्स विभागाकडून कलम ३५ एसी/ ८० जीजीए(२)(बी)(बी) अंतर्गत १०० टक्के सूट देण्यात आली आहे. परंतु ३१ मार्च २०१२ पर्यंतच ही करसवलत लागू राहणार आहे. मदतीचे चेक महारोगी सेवा समिती, वरोरा या नावाने अपेक्षित आहेत. चेकच्या मागे आपले संपूर्ण नाव, पत्ता, फोन नंबर, ई मेल आयडी आणि पॅन चा उल्लेख आवश्यक आहे. आपण चेक या पत्त्यावर पाठवू शकता :
सचिव, महारोगी सेवा समिती, वरोरा, मु. पो. आनंदवन, ता. वरोरा जि. चंदपूर, महाराष्ट्र. पिन: ४४२९०७
याशिवाय ऑनलाईन बॅंकींग द्वारे अर्थसहाय्य करता येईल. अधिक माहितीसाठी संपर्क (०७१७६) २८२०३४ आणि ९०११०९४६२३
इ-मेल : vikasamte@anandwan.in

"पांगळयाच्या सोबतीला येऊ द्या बलदंड बाहू
निर्मितीच्या मुक्तगंगा द्या इथे मातीत वाहू"
अशी साद घालणार्‍या आनंदवनाच्या अस्तित्वासाठी आणि संवर्धनासाठी केवळ हा निधी आवश्यक नाही, या निमित्त्याने सहृदयतेचा..माणुसकीचा.. वारसा जपल्याचे समाधान आपण मिळवू शकू.