बर्याच व्यावसायिक चित्रपटांमधे हे दॄश्य हमखास असते. कोणतेतरी एक महत्वाचे पात्र मृत्युशय्येवर पहुडले आहे, डॉक्टरांनी ’अब सब कुछ उपरवाले के हाथ मे’ असल्याचं सांगून टाकलं आहे. नायक वा नायिका मंदीरात येऊन देवाला आळवत आहेत, वादळ सुरू झाले आहे, देवळात टांगलेल्या शे पाचशे(!) घंटा वेड्या-वाकड्या हलत जोरात वाजत आहेत. अचानक कुणी तरी येऊन ’वो होश मे आ गये’ असं सांगतं आणि टँग टँग सतार वाजू लागते. ’तेरा लाख लाख शुकर है भगवान’ असं ऐकत प्रेक्षकही सुटकेचा निश्वास टाकतो. या तद्दन फिल्मी ईश्वरभक्तीला छेद देत ’देव म्हणजे नक्की काय’ याचा शोध घेण्यास मराठीतील ‘देऊळ’ चित्रपट प्रवृत्त करतो. या चित्रपटाद्वारे उमेश व गिरीश कुलकर्णी या द्वयीने समाजमनातला देव शोधण्याचा धाडसी प्रयत्न नर्मविनोदी पण मार्मिक पद्धतीने केला आहे.
एका गुराख्याला (केशा) ’दत्त’ दिसल्याचा भास किंवा त्याच्या मते ’साक्षात्कार’ होतो. हा आधी चर्चेचा आणि मग राजकारणाचा विषय होतो. ठरलेल्या रूग्णालयाऐवजी दत्ताचे देऊळ बांधण्याला प्राधान्य दिले जाते. जनतेच्या धार्मिक भावनांचा फायदा घेऊन राजकारणी दत्तमंदीराच्या विस्तारीकरणाच्या नावाखाली बेकायदा कामे सुरू करतात. गावातले संतुलित विचार करणारे कुलकर्णी अण्णा जेव्हा ही फसवणूक आहे असे म्हणतात तेव्हा त्यांना उत्तर मिळते "बेकायदा कामं आणि कायदा यांच्यामधे भक्तांची मोठी रांग उभी आहे, ती भेदून आमच्यापर्यंत कुणीही पोचू शकत नाही." हे सगळे पाहून विषण्ण झालेला केशा (गुराखी) देवळातली मूर्ती घेऊन पळून जातो तेव्हा दुसरी मूर्ती बसवून देवस्थानाच्या अवतीभवती असलेली बाजारपेठ सुरू ठेवली जाते. मना-मनातल्या ’देव’ या संकल्पनेला तपासून पाहायला हवे आहे याची जाणीव निर्माण करून चित्रपट संपतो..
तुमचा भविष्यावर विश्वास आहे काय? असे विचारले की बरेच जण होय म्हणत हात पुढे करतात आणि काही जण ’अजिबात नाही- क्योंकी तकदीर तो उनकी भी होती है जिनके हाथ नही होते’ असे म्हणतात (यातले बहुतेक जण नंतर हळूच ’राशीभविष्य’ वाचतात). तुमचा देवावर विश्वास आहे काय? या प्रश्नाचे काहीसे तसेच आहे. ठाम हो किंवा नाही असे उत्तर साधारणपणे मिळत नाही. ती व्यक्ती बुद्धीजीवी किंवा अल्प-अशिक्षीत, ग्रामीण किंवा शहरी, विचारी किंवा भाबडी, यशस्वी किंवा अयशस्वी यापैकी जशी असेल त्यानुसार स्पष्टीकरणासह उत्तर मिळते. विज्ञानाला अद्याप न सुटलेली काही कोडी निसर्गात आहेत आणि हाच ईश्वरी अस्तित्वाचा पुरावा आहे असे काही जण म्हणतात तर जगातली प्रत्येक घटना ही कोणत्यातरी वैज्ञानिक घटनेचीच परिणीती आहे असं काही जणांना वाटतं. खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर म्हणतात "जीवनातील घटना आपणच घेतलेल्या योग्य-अयोग्य निर्णयामुळे, काही वेळा बाह्य परिस्थिती किंवा संभाव्यशास्त्राच्या नियमाप्रमाणे घडत असतात त्यामागे कोणतीही पारलौकिक शक्ती नसते" तर ज्योतीर्भास्कर जयंत साळगावकर ’देव’ या संकल्पनेबाबात म्हणतात, "हजारो वर्षापूर्वीचे आपले पूर्वज रानावनात राहात असताना त्यांना कधी पशुपक्षांची, जनावरांची, वाऱ्यावादळाची, धरणीकंपाची तर कधी शत्रूंच्या टोळयांची भीती वाटत असली पाहिजे आणि त्यावेळी आपल्याला कोणत्या तरी गूढ शक्तीकडून सहकार्य मिळावे, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली असली पाहिजे. कदाचित एखादेवेळी लहान-मोठा प्रत्यय आला की यामागे सूत्र चालविणारी गूढ शक्ती असल्याची खात्री पटून तिच्याबद्दल वाटणारा आदर आणि आधार अधिक वाढला असला पाहिजे.अशा रीतीने ही संकल्पना मूर्त स्वरुप धारण करीत असताना देव या कल्पनेचा जन्म केव्हा तरी झाला असला पाहिजे".
जगातील बहुतेक धर्म देवाचे रूप अमूर्त आहे असे मानतात, देवाचा दूत असणार्या प्रेषिताला आदर्श मानतात, तर हिंदू धर्मात देवाला निर्गुण आणि सगुण दोन्ही रुपात पाहिले जाते. धर्म जगण्याची पद्धत ठरवतो. तो जन्माला चिकटून येतो आणि मग त्यानुसार देवाची व्याख्या स्वीकारुन माणूस जगत राहतो. वातावरण, संस्कार, विचारशक्तीनुसार प्रत्येक धर्मात कडवे, शक्य तोवर धार्मिक परंपरा पाळत राहणारे आणि नाकारणारे असे तीन गट तयार होत असतात. देवाचे अस्तित्व मानायचे वा नाही या संवेदनशील प्रश्नाबाबत मतभेद आहेत. स्टीफन हॉकिंगने तर ब्लॅक होल थिअरी द्वारे आस्तिक्यच नव्हे तर रिचर्ड डॉकिन्स सारख्या विचारवंतांनी स्वीकारलेली ’अज्ञेयवाद’ ही कल्पना सुद्धा मोडीत काढली. ते म्हणतात, "बिग बँग/स्फोटाआधी काळाचाच जन्म झाला नव्हता - त्यामुळे देवाकडे विश्व बनवण्यासाठी वेळ कुठून येणार? हा प्रश्न अडाणीपणाचा आहे. पृथ्वीच्या शेवटच्या सीमेपर्यंत जाण्याचा मार्ग विचारण्या सारखा आहे.पृथ्वी गोल आहे. त्याला कडा नाहीत. सीमा नाहीत. तिथे जायचा मार्ग विचारणे हा प्रश्न अडाणीपणाचा आहे. अर्थात प्रत्येकाला आपला विश्वास आणि श्रद्धा जपायचे स्वातंत्र्य आहेच - मला मत विचाराल तर मी म्हणेन की - देव नाही . देवाने विश्व निर्माण केलेले नाही . ईश्वर मार्गदाता नाही . ईश्वर प्रेमळ काळजीवाहू नाही . ईश्वर मुक्तिदाता नाही . कारण तो अस्तित्वातच नाही. यातून सरळ निष्कर्ष असा निघतो की , स्वर्ग खोटा , नरक असत्य आणि मरणोत्तर आयुष्य आत्मा हे सारे झूट आहे. आपल्याला हे एकच भौतिक आयुष्य , हे एकच वास्तव अस्तित्व आपल्याला लाभले आहे. विश्वाच्या अथांग निरंतर रचनेचा आस्वाद घ्यायला आणि ते शिकून घ्यायला हे जे आयुष्य मला लाभले आहे त्याबद्दल त्या विश्वरचनेचा मी ऋणी आहे."
परंतु नास्तिक्याबरोबर येणार्या जबाबदार्या पेलण्याचे सामर्थ्य सर्वसामान्य माणसांमध्ये नसते आणि त्यामुळे जगायला त्यांना देवाचा टेकू लागतोच.
गाडगेबाबा आणि एकूणच साधू-संतांनी मानवसेवेत ’ईश्वर’ शोधला, तशी शिकवणही समाजाला दिली. मात्र सामान्य माणसाचे प्रयत्न संपतात तिथून नकळत त्याच्या देवावरच्या विश्वासाची सुरूवात होते, ती देखील धार्मिक स्वरूपातच. हा विश्वास श्रद्धेच्या रूपाने व्यक्त होतो तेव्हा जगण्याचे बळ वाढते. पापपुण्याचा विधीनिषेध बाळगला जातो आणि अशी श्रद्धा माणसाला अधिकाधिक समाधानी, आश्वस्त करते. परंतु श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातली सीमारेषा फार नाजूक आहे. ती वेळीच ओळखता आली नाही तर हाच विश्वास अंधश्रद्धेचे रूप घेतो. योग्य-अयोग्य हा विवेक संपतो.
"परमेश्वराची पूजा करा पण बेकायदा प्रार्थनास्थळे बांधू नका " अशी ताकीद नुकतीच उच्च न्यायालयाने सोसायटयांना दिली आहे. बुवाबाजी, गंडेदोरे याचा अतिरेक माणसामधला प्रयत्नवाद हिरावून घेतो, दैवावर सगळी भिस्त ठेवली जाते, देवाच्या नावाने बाजारीकरण केले जाते. भोळ्याभाबड्या जनतेच्या या विश्वासाचाही व्यापार केला जातो. आज आपण अनेक धार्मिक संस्थानांमधून देणगीच्या नावावर मिळालेल्या जनतेच्या पैशाची लूट बघतो, अध्यात्माच्या खास दूरचित्रवाणीवाहिन्यांवर यंत्र-ग्रहखड्यांच्या जाहिरातींचा मारा बघतो, देवळांमधून देवापेक्षा स्वत:चे स्तोम माजवणारे भोवतालचे बडवे बघतो, अनेक ठिकाणी तेला-दुधाने चिकट झालेले अस्वच्छ गाभारे बघतो, गणेशमिरवणुकीतले बीभत्स नाच बघतो, दर्शनासाठी देखील वेगवेगळ्या किमतीच्या रांगा बघतो, काळा पैसा चित्रपटनिर्मितीला वापरून आणि तो चित्रपट चांगला चालावा म्हणून देवालाच कौल लावणारे महाभाग बघतो, गावात मुलभूत सोयी नसल्या तरी गावातल्या देवळाचा कळस मात्र सोन्याच्या पत्र्याने मढवण्याचा अट्टाहास बघतो, आयुष्यात होरपळले गेलेले लोक तर्कबुद्धी गहाण टाकून बुवा-बाजीला लागलेले बघतो, भक्तांच्यातच गटातटाचे राजकारण बघतो, नवसाच्या नावाखाली देवालाच लाच देऊ करणारे भाबडे भक्त बघतो, धार्मिक ग्रंथांचे संदर्भच योग्य मानून केलं जाणारं स्त्रियांचं शोषण बघतो, आणि अशा अपप्रवृत्तींना कोणत्याच धर्माचे अनुयायी अपवाद नाही हे बघतो तेव्हा तेव्हा मन व्यथित होते.
समर्थांची उक्ती आठवते , 'जनाचा लालची स्वभाव। आरंभीच म्हणती देव। म्हणिजे मला कांही देव। ऐसी वासना।।
काहीच भक्ती केली नस्तां। आणी इच्छिती प्रसन्नता। जैसें काहीच सेवा न करितां। स्वामीस मागती।।'
इथे सेवा- भक्तीचा अर्थ प्रयत्न असावा. प्रयत्नांती परमेश्वर हे लाक्षणिक अर्थाने घ्यायला हवे.
माणसाची ’देव’ ही संकल्पना त्याच्यावरील संस्कारांनुसार, सभोवतालच्या परिस्थितीनुसार, त्याच्या आयुष्यातील अनुभवांप्रमाणे, सहवासातील व्यक्तींच्या-विचारपद्धतींच्या-संस्कृतीच्या प्रभावामुळे बदलत जाऊ शकते. गांधीजींच्या आस्तिकतेला धार्मिकतेपेक्षा सामाजिक परिमाणे होती. कित्येक तत्त्वज्ञ, समाजधुरीण एकाच आयुष्यात या भूमिका बदलतानाही दिसतात पण त्यामागे सर्वंकष विचार, विशीष्ट अनुभूती असते. सुरूवातीला आपल्या कवितेतून
’तुझ्या महिम्याची प्रचंड पुराणे, गमती तराणे अर्थहीन’
असे ईश्वराला म्हणणारे कुसुमाग्रज कालांतराने नक्षत्रांना परमेश्वराच्या अस्तित्त्वाबद्दल प्रश्न विचारतात तेव्हा त्यांच्याच कवितेचे उत्तर असते..
’स्मित करून त्या म्हणाल्या, मला चांदण्या काही | तो नित्य प्रवासी, फिरत सदोदित राही |
उठतात तमावर त्याची पाऊलचिन्हे | त्यांनाच पुससी तू, तो आहे किंवा नाही ||’
मग वाटतं एखाद्याला इतकी आश्वस्त करणारी श्रद्धा, नाकारुन काय मिळणार आहे. केवळ नास्तिकतेच्या आग्रहाने जगाचे गाडे नीट चालू शकणार आहे का? त्याचा आंतरिक ओलावा टिकून राहील का? त्यापेक्षा मानू देत देवाला. कुणाला देव आपल्या पाठीशी दिसेल, कुणाला देव आपल्याच अंत:करणात सापडेल, कुणाला तीर्थयात्रेत, नामजपात, व्रतवैकल्यात, ध्यान-धारणेत सापडेल, कुणाला एखाद्या संशोधनात, प्रकल्पात, संगीतात किंवा एखाद्या सुंदर कलाकृतीत सापडेल तर कुणाला दुसर्याचे अश्रू पुसण्यात परमेश्वर गवसेल. एका बोधकथेत माणूस परमेश्वराला म्हणतो "तू जर माझ्याबरोबर चालतोस तर मग या वाळवंटात उमटलेली पाऊले दोनच कशी, चार का नाहीत?" परमेश्वर उत्तरतो "ती दोन पावले माझीच आहेत कारण वाळवंट पार करताना मी तुला उचलून घेतले होते". अंधश्रद्धेची वाट वगळता देवाचा असा शोध घेण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, असावे. त्याचा आदर व्हावा.