Tuesday, February 10, 2026

थोडं ’अ‍ॅनालॉग’ पण जगूया

 मुलांच्या आंतरशालेय निबंध स्पर्धेच्या अंतिम फेरीचे निबंध माझ्याकडे परीक्षणाला आले होते. गंमत म्हणजे ९ स्पर्धकांपैकी ५ जणांचे बरेचसे मुद्दे सारखे. कारण ही होती ’ए-आय’ म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्तेची कमाल. चॅट जीपीटी किंवा जेमिनाय किंवा अन्य एखाद्या जनरेटीव्ह ए-आयला विषय द्यायचा, उत्तर कॉपी पेस्ट करायचं की झालं. हाय काय नाय काय !

नुकतंच वकीलांच्या एका अनौपचारिक सभेत एक ज्येष्ठ वकील महोदय भाषण देत होते. खरं तर वाचून दाखवत होते. पहिलं वाक्य संपताच ते अनवधानाने म्हणाले ’फुलस्टॉप’ आणि त्यांनी जीभ चावली. सगळे हसू लागले. भाषण ए-आयकडून लिहून घेतलं होतं हे उघड झालं होतं. एका उच्चपदस्थ व्यक्तीची ही स्थिती मग तुम्हा विद्यार्थ्यांचं काय होत असेल ! 

अर्थात तुमच्यासारख्या काही मुलांना  ए-आय म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर कुठे करायचा हे समजलं आहे. चेन्नईच्या कार्तिकला ए-आयच्या मदतीने बुद्धिबळात आणखी पुढे जाता आलं. वेगळ्या पद्धतीने खेळाकडे पाहता आलं. कोल्हापूरची ईशा गोष्टी लिहिते. ए-आयने तिला गोष्टीची सुरूवात आणि शेवट करण्याच्या वेगवेगळ्या आयडिया दिल्या. नागपूरच्या स्मिताला गणिताची भीती वाटायची. ए-आय आधारित अ‍ॅपने तिची भीती गेली, उलट तिला गणित शिकताना मजा वाटू लागली. जळगावचा अतुल तर ए-आयच्या मदतीने जर्मनचे धडे शालेय वयापासूनच स्वत:चे स्वत:  गिरवतो आहे. 

अनेक शालेय विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ए-आय आधारित प्रकल्प सादर केले आहेत. बेंगळुरूचा अर्जुन पाण्याची बचत करणारा प्रकल्प घेऊन पुढे आला, तसंच काही विद्यार्थ्यांनी कचरा व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण आणि शेतीविषयक प्रश्नांवर ए-आय आधारित उपाय सुचवले आहेत. एका विद्यार्थिनीने मुलींच्या सुरक्षेसाठी एक अलार्म फीचर ए-आय अ‍ॅपसाठी सुचवलं. बातम्यांमध्ये हे प्रकल्प पाहून असं जाणवतं की भारतीय मुलं केवळ तंत्रज्ञान वापरत नाहीत, तर ए-आय च्या मदतीने समाजातल्या विविध समस्यांवर उपाय शोधत आहेत.

AI म्हणजे एक प्रकारचा संगणकीय मेंदू जो माणसाकडून मिळालेल्या माहितीवरून शिकतो. जसं आपण चुका करत शिकत जातो तसंच ए-आय देखील अनुभवातून अधिक अचूक होत जातो. जगभरातील  मुलं नकळत ए-आय सोबत मोठी होत आहेत. तुम्ही ज्या जगात वाढत आहात ते जग तुमच्या आई-वडिलांच्या बालपणापेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. तेव्हा माहिती मिळवण्यासाठी पुस्तकं शोधावी लागत होती; चार पुस्तकातून संदर्भ मिळवावे लागत होते. आज मात्र ए-आयला एखादा अवघड प्रश्न विचारल्यावर तो सोप्या भाषेत समजावून सांगतो. . ए-आय शेफ नामक मशीनमध्ये पदार्थ घाला, मेनू निवडा आणि स्वयंपाक तयार. ऑनलाइन शिक्षण, प्रोजेक्ट्स, त्रुटी शोधणं, गृहपाठ करणं, माहिती शोधणं, भाषा शिकणं, लेखन करणं, संवाद लिहिणं, मोठ्या ग्रंथाचा गोषवारा काढणं, ग्राफिक्स, व्हिडिओ, चित्रकला, संगीत, कोडिंग, रोबोटिक्स हे सगळं या तंत्रज्ञानामुळे सहजसाध्य झालं आहे. 

इथपर्यंत ठीक आहे पण आईबाबांना वेळ नसतो किंवा काही गोष्टी त्यांना सांगाव्याशा वाटत नाहीत तेव्हा गप्पा सुद्धा मारता येतात त्याच्याशी. 

तुम्हाला वाटतं, ए-आय किती छान आहे. तो माझी वर्गात पहिला येणार्‍या मुलाशी तुलना करत नाही, एखादे वेळी कमी मार्क मिळाले म्हणून माझ्यावर रागावत नाही. मी किती हुशार आहे, चांगला आहे याबद्द्ल उलट माझं कौतुक करतो. मग मी का करू नको त्याच्याशी मैत्री ? 

उत्तर सोपं आहे. 

त्याला भावना नाहीत. त्याला तुमचं भलं कशात आहे ते समजत नाही. आजी आजोबा, दादा ताई, आईबाबांसारखं तुमच्यावर त्याचं प्रेम नाही. वॉशींग मशीनचं काम काय असतं, कपडे धुणं. त्याच्याशी आपण गप्पा मारतो का, मैत्री करतो का? नाही, कारण ते केवळ यंत्र आहे. ए-आयला भाषेची समज असल्याने, सखोल ट्रेनिंग दिलेलं असल्याने त्याला तुमच्याशी माणसासारखं बोलता येतं पण शेवटी ते ही एक प्रकारे यंत्रच आहे. अलेक्सा ,सीरी या व्यक्ती नाहीत, ती यंत्रांची नावं आहेत. ए-आय मैत्रीचा आभास निर्माण करू शकतं, तुमच्या भावना ओळखून तुम्हाला आवडेल असा प्रतिसाद देऊ शकतं पण त्यात वैयक्तिक भावनांचा ओलावा नसतो, मायेचा स्पर्श नसतो, काळजी नसते. त्याची उत्तरं किंवा कृती म्हणजे फक्त एक तांत्रिक क्रिया असते. त्यामुळे त्याच्याशी मैत्री बित्री करण्याच्या भानगडीत अजिबात पडू नये.  

ए-आयचा फक्त वापर करावा. तो ही योग्य पद्धतीने आणि मर्यादेत. 

२०२४–२५ मध्ये अनेक राज्य सरकारांनी डिजिटल आणि ए-आय आधारित शिक्षण पद्धतींचा प्रयोग सुरू केला. काही शाळांमध्ये तो शिक्षकांना मदत करणाऱ्या साधनासारखा वापरला जाऊ लागला आहे. शिकवण्यासाठी लागणारे व्हिडिओ, आराखडे, प्रेझेंटेशन, उदाहरणं मॅजिकस्कूल सारख्या विविध ए-आय टूल्सच्या मदतीने शिक्षक तयार करू लागले आहेत. मुलांच्या अडचणी समजून घेऊ लागले आहेत. मात्र  काही पालक आणि शिक्षकांना वेगळीच चिंता सतावू लागली आहे. ए-आय तयार आणि त्वरित उत्तरं देत असल्याने मुलांची कल्पनाशक्ती, विचारशक्ती कमी होऊ लागली आहे कारण मेंदूला काम करायची सवयच राहत नाही. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रकल्पासाठी ए-आय कडून तयार केलेला मजकूर जसाच्या तसा सादर केल्याचं दिसू लागलं. 

समजा तुम्हाला एक कागद आणि पेन्सील देऊन एखादा सीन काढायला सांगितला, तर? डोळे मिटा ,विचार करा ,काढा चित्र... 

९० % मुलं काय चित्र काढतील? डोंगर, सूर्य, उडते पक्षी, खाली नदी, बाजूला झोपडी. हो नं? वेगळं काही नाही. असं का, कारण चौकटीबाहेरचा विचार करण्याची आपली क्षमता ए-आय आणि मोबाईल सारख्या गॅजेट्सच्या अती वापराने कमी होत चालली आहे. 

भारतीय भाषांमध्ये AI उपलब्ध होणं ही खूप मह्त्वाची आणि सकारात्मक बाब आहे. मराठीत, हिंदीत किंवा इतर भाषांत प्रश्न विचारता येत असल्याने तुम्हाला शिकणं सोपं झालं आहे. मात्र काही ए-आय साधनांमध्ये ती माहिती अपुरी किंवा चुकीची असते. वाक्यरचना, व्याकरण विचित्र असतं. त्यामुळे तज्ज्ञ सांगतात की ए-आय ने दिलेली माहिती तपासून पाहण्याची सवय मुलांना लावली पाहिजे. पुस्तकं, शिक्षक आणि ए-आय — या तिन्हींचा संगम असेल, तरच शिकणं परिपूर्ण ठरेल. कल्पना, भावना आणि अनुभव मुलांचे असतील, ए-आय फक्त साधन म्हणून काम करेल कारण संपूर्ण काम त्याला करायला लावलं तर सर्जनशीलतेला मर्यादा येऊ शकतात. 

ए-आय वापरायचं आहे ते आपला मदतनीस म्हणून , मालक म्हणून नव्हे, केवळ कॉपी पेस्ट साठी नव्हे,  

त्यासाठी कोणत्या वयात कोणतं तंत्रज्ञान योग्य- हे आधी समजून घेऊया. 

१०–१२ वर्षं :   शाळेतल्या अ‍ॅक्टिव्हिटीचे अ‍ॅप्स, गृहपाठासाठी जनरेटीव्ह ए-आय, शैक्षणिक व्हिडिओ, काही मजेदार गेम्स मर्यादित प्रमाणात.

१३–१५ वर्षं :  अभ्यास, कौशल्य शिकणं, भाषा शिकणं, थोडं मनोरंजन (मर्यादेत), वेळेचं भान महत्त्वाचं.

या वयापर्यंत पालकांसह, आईबाबांबरोबर बसून हे सगळं शिकणं, समजून घेणं, ते तंत्रस्नेही नसतील तर त्यांना सांगून त्यांच्यासमवेत हे करण्ं अपेक्षित आहे.  

१६–१८ वर्षं :  व्यावसायिक कौशल्य शिकणं, जबाबदारीनं वापर करण्यासाठी स्वतः नियम ठरवणं, करिअरसाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करणं अभिप्रेत आहे.

वय वाढतं तसं स्वातंत्र्य वाढतं पण त्याचबरोबर जबाबदारीही वाढते. 

हे नीट माहीत असलेली मुलं सुद्धा ए-आय आणि गॅजेट्सच्या आहारी जातात. कारण..

* FOMO ( fear of missing out) - हे वापरलं नाही तर या आधुनिक जगातल्या घडामोडी मला कळणार नाहीत. मी मागे पडेन अशी भीती वाटू लागते.

* ’बोर होतंय’ म्हणणार्‍या मुलांना फोन, टॅब हातात घ्यायला सोपा. क्षणात एक नवं ,मोहक, वेड लावणारं विश्व समोर उभं राहतं. 

* सोशल मिडियावरच्या “लाईक”, “कमेंट”, “शेअर” यामुळे आपण कुणीतरी विशेष आहोत असं भासू लागतं. 

यामुळे ए-आय फीचर वापरून तयार केलेले फोटो, पोस्ट शाळकरी मुलं, मुली सोशल मिडियावर ट्रेंडच्या नावाखाली टाकतात. सायबर गुन्हेगार त्यांना हेरतात. संवाद वाढवून विश्वास संपादन करतात आणि मग त्या फोटो, माहितीचा गैरवापर होतो. कधी सेक्सटिंगसाठी, कधी धमकी देऊन पैसे उकळण्यासाठी तर कधी भुरळ घालून लैंगिक शोषणासाठी. आपल्या सुरक्षिततेसाठी आपण खाजगी डाटा अनोळखी व्यक्तीला कधीही द्यायचा नाही, खोट्या इंप्रेशनसाठी अनोळखी मित्र विनंती स्वीकारायची नाही, फोटो पब्लिक शेअर करायचे नाहीत हे तुम्ही सुद्धा समजून घेणं ही आजची गरज आहे. 

ए-आय आधारित ऑनलाईन गेमिंगचं वेड आणि वरच्या लेव्हलवर जायचा नाद, त्यासाठी लागणारे पैसे आणि त्यातून चक्क आपल्याच घरात मुलांनी केलेल्या चोर्‍या अशा गुन्ह्यांची संख्याही वाढताना दिसते आहे. 

काही अ‍ॅप्स मुलांकडून माहिती गोळा करतात, हे लक्षात आल्यानंतर सरकार आणि तंत्रज्ञान कंपन्यांनी नियम कडक करण्यास सुरुवात केली आहे. 

ए-आयच्या अतिरेकी वापरामुळे प्रत्येक देशाचं सरकार मुलांच्या डिजिटल सेफ्टीवर गांभीर्याने विचार करू लागलं आहे. फ्रान्सने १५ वर्षांखालील सोशल मिडिया अकाउंटसाठी पालकांची परवानगी अनिवार्य केली आहे. चीनने विद्यार्थ्यांना गेमिंग अ‍ॅप्स वापरण्याला ठराविक तासच परवानगी दिली आहे. ऑस्ट्रेलियातील शासनाने विद्यार्थ्यांच्या इंटरनेट वापराविषयी कडक नियम पारित केले आहेत. सगळे युरोपियन देश स्क्रीन टाइम मर्यादा, डेटा सुरक्षाविषयी सजग झाले आहेत. कारण सगळ्यांना कळलंय — स्क्रोल करण्यात वेळ घालवला तर मुलांचं भविष्य कधीही घडणार नाही. उद्या तुम्हीच विचाराल, ही स्थिती येईतो तुम्ही काय केलंत ? 

भारतामध्येही काही महत्त्वाचे नियम आहेत—  मुलांसाठी अयोग्य अससेल्या कंटेंटवर नियंत्रण ठेवण्यासाठी IT Rules २०२१ आहेत. डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन कायदा २०२३ अद्यावत करण्यात आला आहे. मुलांनो, हे कायदे, या चर्चा तुमच्याविरुद्ध नाहीत, तुमच्यासाठी, तुमच्या संरक्षणासाठी आहेत.

ए-आय चा एक गंभीर सामाजिक दुरूपयोग म्हणजे चुकीची माहिती आणि बनावट सामग्री. ए-आय वापरून तयार केलेले खोटे व्हिडिओ आणि आवाज (डीपफेक) याचं प्रमाण वाढतं आहे. पंतप्रधान  मोदींचे गरबा खेळतानाचे, ट्रम्प बरोबर नाचतानाचे डीपफेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. ते बनावट असल्याचं ओळखायला शिकलं पाहिजे. कितीही मज्जा वाटली तरी ते शेअर करण्याचा मोह टाळला पाहिजे. इंटरनेटवर दिसणारी प्रत्येक गोष्ट खरीच असेल असं नाही हे तुम्ही समजून घेणं खूप गरजेचं आहे. जे दिसतं आहे ते अधिकृत सोर्सकडून आलं आहे का, हे अस्सल वाटत असलं तरी बनावट (डीप फेक) तर नाही नं, ही शंका कायम मनात आली पाहिजे. फॅक्ट चेक साठी अल्ट न्यूजसारख्या अनेक वेबसाईट आहेत ज्यावरून माहितीची सत्यता तपासता येईल. 

ए-आयची नकारात्मक बाजू बातम्यांमधून जास्त दिसत असल्यामुळे पालक घाबरून जातात, गॅजेटच्या अतिवापरावरून घरात वादविवाद सुरु होतात. तुम्हाला काही चुकीची माहिती तर मिळणार नाही, फसवणूक तर होणार नाही, सायबर गुन्हेगारांचं तुम्ही सावज तर ठरणार नाही याची त्यांना सतत भीती असते. त्यांना तुमचं आरोग्य महत्त्वाचं वाटतं. बाहेर खेळायला जाणं कमी झाल्याने तुमच्या वाढत्या वजनाची चिंता वाटते. वाढलेल्या स्क्रीम टाईममुळे  तुमचे थकलेले डोळे , सतत स्क्रीनवर येणार्‍या माहितीच्या महापुराने शिणलेला मेंदू ,अपुरी झोप यामुळे त्यांना तुमच्याविषयी चिंता वाटते.  

अमेरिकेतल्या जेनेल हॉफमन नावाच्या आईने यावर एक उपाय शोधला होता. आपल्या १३ वर्षाच्या मुलाला मोबाईल फोन देताना तिने त्याला काही अटी लिहिलेलं पत्र दिलं होतं. त्या अटी आजच्या ए-आय जगातल्या तुम्हा मुलांनी समजून घ्याव्यात. 

* हा फोन तुला अधिक चांगल्या पद्धतीने अभ्यास करता यावा म्हणून काही काळासाठी दिलेला आहे. तुझं वागणं अयोग्य वाटलं तर तुझ्याशी चर्चा करून आम्ही तो परत घेऊ.

* ऑनलाईन काही चुकीचं दिसलं तर तू लगेच आम्हाला सांगायला हवंस. तुझे पासवर्ड आम्हाला माहीत असलेच पाहिजेत. 

* फोन लांब ठेवून मित्रांना प्रत्यक्ष भेटणं, मैदानावर जाऊन खेळणं, ट्रेकिंगला जाणं, सहलीला जाणं, निसर्गात, पुस्तकात रमणं, आमच्याशी गप्पा मारणं, हसणं, एखादी कला शिकणं जगण्यासाठी करियर इतकंच महत्त्वाचं असतं. थोडक्यात डिजिटल जगातून वेळ काढून थोडं ’अ‍ॅनालॉग’ही जगता आलं पाहिजे. 

भारतीय संस्कृतीत ज्ञानासोबत विवेक, संयम आणि दायित्व यांना महत्त्व आहे. ए-आय वापरताना ही मूल्यं अधिकच महत्त्वाची ठरतात. तंत्रज्ञान माणसाला वेगवान करू शकतं, पण त्याला दिशा माणसालाच द्यावी लागते. तुम्ही वयाच्या अशा वळणावर आहात जिथे संधी आणि आव्हानं दोन्ही समोर आहेत. ए-आय ने करियरची नवी दालनं उघडली आहेत, पण त्याचबरोबर विचारपूर्वक वापराची जबाबदारीही तुमचीच आहे. तुमचं वय कुतूहलापोटी नको ते करून पाहण्याचं आहे. ते अगदी स्वाभाविक आहे पण इथेच तोल सावरायचा आहे. त्यासाठी काही तांत्रिक बंधनं स्वत:वर घालून घ्या किंवा तुमच्या आईबाबांना नेट नॅनी, कॅनोपी सारखे पॅरंटल कंट्रोल अ‍ॅप्स, वॉचर सारखे डिव्हाईस मॉनीटरींग अ‍ॅप वापरायला सांगा. चॅट-जीपीटी मध्ये तुमचा मेल आयडी कौटुंबिक खात्याशी जोडता येतो, तुमच्या चॅटवर यामुळे आईबाबांचे नियंत्रण राहील. फॅमिली लिंक अ‍ॅपद्वारे तुमचा जेमिनाय अ‍ॅक्सेस त्यांना मर्यादित करता येईल. यामागे तुमच्यावर पाळत ठेवण्याचा हेतू नसून ही तुमची जपणूक आहे हे लक्षात घ्या.

योग्य मार्गदर्शन, प्रश्न विचारण्याची सवय आणि मूल्यांची जाण असेल, तर ए-आय तुमच्यासाठी केवळ तंत्रज्ञान न राहता उज्ज्वल भविष्याकडे नेणारा महामार्ग ठरू शकतो.

ए-आयसह चालताना डोळे उघडे ठेवणारी, मन जिज्ञासू ठेवणारी आणि माणुसकी जपणारी पिढीच खऱ्या अर्थाने उद्याचा भारत घडवेल. पटतंय का ! 

यासाठी तुम्हाला एकच करायचं आहे. लेखाच्या सुरुवातीच्या उदाहरणातले वकील महोदय चुकून ’फुलस्टॉप’ म्हणाले होते. ए-आय वापरताना कुठे पॉज घ्यायचा आणि कुठे फुलस्टॉप लावायचा हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे आणि नवोदितांना शिकवायचं आहे.