हेक्टर गार्सिया, फ्रान्सिस मिरेलस
निरोगी, आनंदी आणि कार्यक्षम दीर्घायुष्याचं जपानी रहस्य
जपानी लोक असं मानतात की, प्रत्येक माणसाचा इकिगाई असतोच. या पुस्तकासाठी इकिगाई या संकल्पनेची माहिती गोळा करत असताना लेखकाने शतायुषी लोकांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांच्या दीर्घायुष्याचं खरं रहस्य जाणलं. ते त्यांनी या पुस्तकामधून आपल्यासमोर मांडलं आहे. या पुस्तकामुळे आपल्यालाही आपला इकिगाई सापडायला नक्कीच मदत होईल.
* शारीरिक स्वास्थ्यासाठी ८० टक्क्यांचं रहस्य.
* उत्साही शरीर, उत्साही मन.
* तणावाचा फायदा घेण्याची कला.
* स्टीव्ह जॉब्ज यांचे जपानी संस्कृतीवरील प्रेम.
* लोगोथेरेपी आणि मोरिता थेरेपी.
* तंत्रज्ञान आणि संस्कृतीचा संगम.
--------------
रोज सकाळी उठल्यावर तुम्ही स्वत:ला ’आला बॉ अजून एक दिवस अंगावर’ असं म्हणता की ’अहा, सुरु झाला एक नवा कोरा दिवस’ असं म्हणता. तुमचं उत्तर दुसरं असेल तर तुम्हाला तुमची इकिगाई बहुतेक गवसली आहे. ती अधिक अचूक उमजावी म्हणून हे पुस्तक तुम्ही वाचायला हवं, तुमचं उत्तर जर पहिलं असेल तर मग हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे.
जिंदगी लंबी नही बडी होनी चाहिएँ, असं आपण म्हणतो. बहुसंख्य जपानी लोकांची जिंदगी मात्र लंबी आणि बडी दोन्ही असते, जपानमध्ये समाधानी, कार्यक्षम आणि दीर्घायुषी लोकांचे प्रमाण जगाच्या तुलनेने जास्त आढळून येते. ओकिनावा भागात शतायुषी लोक मोठ्या प्रमाणात आहेत. यामागे इकिगाई म्हणजेच जगण्याची सकारात्मक प्रेरणा आहे हे लक्षात आल्यावर लेखकद्वयीने अनेक शतायुषी जपानी लोकांच्या मुलाखती घेतल्या, चर्चा केली आणि त्यातून हे पुस्तक साकार झालं. यातली इकिगाईची जादू अनेकांना भावली आणि पुस्तकाचा जगभरात अनेक भाषातून अनुवाद होत गेला.
माणसाची सगळी धडपड अमरत्वाकडे पोचण्य़ासाठी असते. ययातिची प्रातिनिधीक कथा आपल्याला माहित आहे. तंत्रज्ञान आणि वैद्यकशास्त्र वेगाने अत्याधुनिक होत चालले आहे त्यामुळे आपली जिंदगी गेल्या पिढीच्या तुलनेने ’लंबी’ होत चालली आहे. रे कर्झवेल या संशोधकाच्या मते काही दशकात आपण खरोखरच हवे तितके जगू शकू पण बहुसंख्य जीवशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की कितीही प्रगती केली तरी आपल्या नव्या पेशी तयार होण्याची प्रक्रिया १२० वर्षांनी थांबतेच त्यामुळे त्यापुढे जगणे शक्य नाही.
मन, मेंदू आणि शरीर
जपानबरोबरच जगात काही बेटांवरदेखील सुखी दीर्घायू माणसं आढळतात. संशोधनाअंती असा निष्कर्ष निघतो की यांच्या जिवलग मित्र-मैत्रिणींचा घट्ट ग्रुप, उत्तम कौटुंबिक नातेसंबंध ,आहारात भाज्यांचं पुरेसं प्रमाण पुरेसं, भरपूर चालणं, तणावमुक्त जीवनशैली.
शरीर-
प्रत्येक वेळी ८०% पोट भरेल इतकाच आहार घ्या. पोटभर जेवणे, आग्रह करकरुन वाढणे हे आपल्या भारतीय संस्कृतीत फार महत्वाचे मानले जात असले तरी शरीराला हानीकारक आहे. स्क्रीनटाईम शक्य तितका कमी करा, भरपूर चाला. लवकर निजा लवकर उठा. पुरेशी झोप घ्या. आपली दिनचर्या तपासा. शरीर उत्साही असेल तरच आपलं मन टवटवीत राहील.
मेंदू-
मन:शांती ही शरीरस्वास्थ्याइतकीच मेंदूच्या कार्यक्षमतेवर अवलंबून आहे. चाकोरीत फिरणार्या मेंदूवर गंज चढतो आणि त्या व्यक्तीला हळूहळू जगण्याचा कंटाळा येऊ लागतो. मेंदू कार्यक्षम राखण्यासाठी नवीन विषयांचे वाचन, प्रशिक्षण, त्यावर चर्चा, बौद्धिक खेळ, नवनव्या लोकांना भेटणे, नवीन कौशल्ये आत्मसात करणे इ. आवश्यक आहे. मेंदूची कवाडे जगाकडे उघडणे गरजेचे आहे. त्याने जगण्यात चैतन्य येते, उत्साह येतो.
मन-
मोई म्हणजे जिवलगांचा कंपू. समान आवडीच्या, एकाच ध्येयासाठी काम करणार्या गटासह आपले जवळचे नाते आपल्याला जीवनाशीही नकळत बांधून ठेवते. मोई हा काहीसा आपल्या बीसीसारखा प्रकार आहे. मोईतले सदस्य दर भेटीत ठराविक पैसे जमा करतात आणि गरजेनुसार ते परतफेडीच्या अपेक्षेसह एखाद्या सहकार्याला देतात. यातून त्याला आर्थिक आणि मानसिक दिलासा मिळतो.
आपल्या मनावर वेगवेगळे ताण असतात. हे ताण नीट हाताळू न शकणारे लोक अकाली प्रौढ दिसू लागतात. त्यातले काही ताण जगताना भेडसावणार्या गंभीर समस्या, अभाव, अडचणी, क्लेशदायक घटना, असुरक्षिततेची भावना, नात्यातला दुरावा, वियोग, पराजय इ. मुळे उद्भवतात. तर काही ताण आपल्यातले चिंतातूर जंतू स्वत:च निर्माण करतात. उदा: सोशल मिडियावर कमी लाईक्स आले म्हणून खंतावणे, इतरांशी सतत स्पर्धा करणे इ.
मानसशास्त्रज्ञांच्या मते ’माईंडफुलनेस’ हा यावर उपाय आहे. प्रत्येक क्षणाचा समरसून आनंद घेण्याची क्षमता आपण जितकी वाढवू शकू तितकी आपण तणावावर आधिकाधिक मात करु शकू. हातून गेलेल्या गतकालाबद्दल हळहळ आणि हातात नसलेल्या भविष्याबद्दल हुरहूर वाटत राहिल्याने आजचा, आत्ताचा क्षण निसटून तर जात नाहीये ना याबाबत आपण सजग राहिलो ताण निश्चित कमी होईल. अर्थात हे प्रयत्नपूर्वक साध्य करावे लागेल पण याची परिणीती एका निरामय आणि दीर्घायू जीवनात होईल हे नक्की.
लोगोथेरपी ते इकिगाई
सिग्मंड फ्रॉइड एकदा म्हणाले होते ,"भिन्न स्वभावाच्या/विचारांच्या काही माणसांना उपोषणाला बसवा. भुकेच्या तीव्रतेबरोबर आतला खरा माणूस बाहेर पडू लागेल. सगळी प्रचंड भुकेली माणसं शेवटी एकाच पातळीवर येतील.’ परंतु हिटलरच्या क्रूर छळछावणीतील वेगवेगळ्या अनुभवांमुळे माणसाची एखाद्या घटनेला प्रतिसाद देण्याची पद्धत त्याच्या आत्मबलावर अवलंबून असते हे व्हिक्टर फ्रँकलने स्वत: अनुभवले, पाहिले होते त्यामुळे त्यांना हे पटले नाही. आत्मबल वाढवणारी लोगोथेरेपी त्यांनी विकसित केली. लोगो म्हणजे ग्रीकमध्ये अर्थ. लोगोथेरपी म्हणजे जीवनाचे उद्दिष्ट्य, जीवनाचा अर्थ शोधणे. या थेरपीचे तीन टप्पे सांगितले जातात.
पहिला टप्पा- कोणत्याही परिस्थितीत कार्यमग्न राहून अर्थपूर्ण काम करत राहणे.
दुसरा टप्पा- यशाचे परिमाण आपले आपण ठरवणे.
तिसरा टप्पा- परिस्थिती आपल्या हातात नसली तरी तिला कसा प्रतिसाद द्यायचा हे सर्वस्वी आपल्या हातात असते हे समजून घेणे.
इकिगाई हे लोगोथेरपीच्या मार्गावरचे अंतिम ध्येय आहे. इकिगाई मन आणि मेंदूबरोबरच शरीरस्वास्थ्याचाही विचार करते.
सापेक्षतावाद आपल्याला माहित आहे. तापलेल्या वस्तूला एक मिनिट स्पर्श करा. ते मिनिट युगांचं वाटेल. आपल्या प्रिय व्यक्तीसोबत एक तास घालवला तर तो तास एका मिनीटातच संपल्यासारखा वाटेल. आपण कशात जास्त रमतो? आपण वेळेकडे कसे पाहतो, त्या त्या वेळेत कोणते काम निवडतो, ते किती कौशल्यपूर्ण त-हेने करतो, किती लक्षपूर्वक करतो, त्यात कसा आनंद मिळवतो याचा शोध घेतला तर आपल्याला आपली इकिगाई सापडणे सोपे होईल. एकदा एखादे कौशल्य आत्मसात झाले तर पुढचे ध्येय निश्चित करुन आपल्या ठराविक साच्यापलिकडचे एखादे कौशल्य शिकण्याचा प्रयत्न करावा. एकाच वेळी अनेक कामे करणे हे खरे तर कसब नव्हे. मुळात आपण एकावेळी अनेक कामे केल्याने आपली कार्यक्षमता उलट कमी होते. एका वेळी एकाच कामावर लक्ष केंदित करुन मन विचलित होऊ न देता ते पूर्ण केले तर अधिक चांगले परिणाम दिसून येतात. आपण इकिगाईच्या अधिक जवळ पोचतो.
