३६ फोटोंचा रोल पुरवून पुरवून वापरणारी आणि एडिट करायची सोय नसल्याने, बरेवाईट आलेले फोटो तसेच अल्बममध्ये लावून अधूनमधून पाहत स्मरणरंजन करणारी, घराला साहित्यिक नाव देणारी मध्यमवर्गी पिढी संपली. नंतर आली नव्वदच्या दशकातल्या जागतिकिकरणामुळे झालेल्या उलथापालथींनी काहीशी गडबडून गेलेली, मुलगा परदेशी, त्यातूनही अमेरिकेला जावा अशी स्वप्न बघणारी, ब्लॉकमध्ये राहणारी ’हॉटशॉट’ पिढी. आणि मग आली आजची तथाकथित ग्लोबल, डिजिटल पण फोमोने (फिअर ऑफ मिसिंग आऊट) ग्रासलेली ’सायबर’ पिढी. तरुण वयात स्टुडिओत अवघडल्या अवस्थेत बसून किंवा अटेंशन पोझमध्ये तिरकं उभं राहून फक्त ’दाखवण्यासाठी’ काढायच्या फोटोपासून, मुक्तपणे स्वत:च्या छबीतून म्हणजे सेल्फीतून स्वत:ला हवं तसं बिनधास्त व्यक्त करण्यापर्यंतचा सामान्य माणसाच्या पिढ्यांचा हा प्रवास फक्त फोटोंपुरता मर्यादित नाही. पूर्वी रात्र आणि दिवस हेच काळाचे मुख्य भाग होते. आता स्वेच्छेने या तंत्रज्ञानापासून अंतर राखून राहणारे, समूह माध्यमांना (सोशल मिडिया) आपल्या आयुष्यात लुडबूड करु न देणारे काही अपवाद वगळले तर आजच्या पिढीचं जगणं ’ऑनलाईन’ आणि ’ऑफलाईन’ या दोन पटात विभागलं गेलं आहे.
अर्थशास्त्राच्या पिरॅमिड रचनेत श्रीमंत अग्रभागी, सामान्य माणूस मध्यभागी आणि दारिद्यरेषेखालचा वर्ग तळाला असे धरले तर हा मधला भाग देशाची प्रत ठरवतो असं म्हणता येईल. देशाची गुणवत्ता तिथल्या सामान्य माणसाच्या वर्तनावरुन ठरते. उच्चभ्रू समाज हा विश्वसंस्कृतीचे प्रतिनिधीत्व करत असतो तर तळागाळातला समाज हा मुलभूत प्रश्नांशी झगडताना मूल्य, संस्कृती वगैरे जीवनाचे चोचले पुरवू शकत नाही म्हणूनही असेल कदाचित. आज सामान्य माणसाच्या जीवनशैलीचे ढोबळमानाने ’सायबररहित’ जीवनशैली आणि ’सायबरसहित’ जीवनशैली हे दोनच प्रकार उरले आहेत असे वाटू लागले आहे. या मधल्या भागातही खरं तर त्रिस्तरीय रचना आहे. तंत्रज्ञान आणि जगणं याची गल्लत न करणारी ’सायबररहित’ जीवनशैलीचं प्रतिनिधीत्व करणारी अपवादात्मक मंडळी पहिल्या स्तरात आहे. तंत्रस्नेही असलेले, नवनवी तांत्रिक उपकरणं वेगाने हाताळू शकणारे, ’ऑनलाईन’ विश्वात लीलया वावरणारे यात दुसर्या स्तरावर आहेत. ही दोन्ही प्रकारची मंडळी देशाच्या महाकाय लोकसंख्येच्या तुलनेत अगदी मोजकी आहेत. कामापुरतं तंत्रज्ञान हाताळता येणारे, अपुर्या माहितीमुळे तांत्रिक उपकरणांबद्दल प्रचंड कुतूहल पण भीती असलेले, ऑनलाईन विश्वाशी जुळवून घेण्याच्या धडपडीत या भीतीचं सावट ऑफलाईन जगताना देखील मनावरुन दूर करु न शकणारे या उतरंडीच्या तळाशी आहेत. बहुसंख्य सामान्य माणसं या मधल्या भागाच्या तिसर्या स्तरात आहेत. यात निम्नमध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय आहेत आणि बर्याच प्रमाणात उच्चमध्यमवर्गीय देखील. निमशहरी, शहरी आणि काही प्रमाणात ग्रामीण देखील.
मधल्या भागातल्या या मध्यमवयीन सामान्य माणसाला कसेही करुन वरच्या स्तरावर जायचे आहे. पिरॅमिडच्या टोकाला पोचायचे आहे. तिथली जीवनशैली हे त्याचे स्वप्न आहे. त्यामुळे तिचे अनुकरण करताना त्याला अप्राप्य असलेला किंवा क्वचित होणारा विमान प्रवास फेसबुकवर चेक-इन करायचा असतो. आहे. बार्बेक्यू नेशनमध्ये मित्राने दिलेल्या पार्टीचा ग्रुप सेल्फी इन्स्टावर अपलोड करायचा असतो. हॉटेलचे ऑनलाईन बुकींग करायचे असते. किंडलवरुन पुस्तक चाळायचं असतं. रेल्वे प्रवासातल्या एखाद्या अडचणीबद्दल पटकन संबंधित अधिकार्यांना ट्वीट करायचं असतं. जीपीएसच्या मदतीने नव्या जागी अचूक पोचायचं असतं. फूडअॅप वरुन पिझ्झा मागवायचा असतो. जाहिरातीतून दिसणारे ओट्स, टोफू, ऑलिव्ह ऑईल, ब्रोकोली, किवी असले अभारतीय पदार्थ वापरणं ’इन’ असल्यामुळे ते ऑनलाईन मागवायचे असतात नाहीतर आपण बॅकवर्ड पालक ठरु अशी भीती वाटत असते. याशिवाय विवाहजुळणीच्या अॅपवरुन जोडीदार शोधायचा असतो. कामाचे अॅप्लिकेशन्स फॉर्म्स ऑनलाईन भरायचे असतात आणि आपल्याला मिळालेली लेटेस्ट माहिती व्हॉट्सअॅप वरुन इतरांना सर्वात आधी पाठवायची असते.. हे सगळं करता यावं म्हणून घेतलेला पण दोन वर्षातच आउटडेटेड झालेला मोबाईल बायबॅक करुन नवा मोबाईल, ऑफर संपायच्या, इन्स्टॉलमेंटवर अॅमेझॉनवरुन विकत घ्यायचा असतो.
अर्थात यात लिंगभेद उरलेला नाही. २०१३ पर्यंत पुरुषांची मक्तेदारी असलेली ऑनलाईन खरेदी महिलाही करताना दिसू लागल्यात. घरातील पुरुषांचा जुना फोन वापरणार्या बहुतेक महिलांकडे आता स्वत:चा स्मार्ट फोन आलेला असतो. येत्या वर्षाअखेरीस ऑनलाईन खरेदी करणार्या महिलांची संख्या १५ कोटीपर्यंत जाईल असं इकॉनॉमिक्स टाईम्स सांगत असतो. यात निमशहरी व शहरी भागातल्या, विशेषत: १८ ते ४५ वर्षे वयोगटातील महिला ग्राहकांचा समावेश असतो. त्यांनाही पिंटरेस्टवर नव्या पर्सेसची डिझाईन शोधायची असते. यू ट्यूबवर पाहिलेले पाव घरी करुन पाहायचे असतात. मिंत्रावरुन घेतलेल्या टॉपमधला फोटो फेसबुकवर मैत्रिणींना टॅग करुन अपलोड करायचा असतो. मग त्याला आलेले लाईक्स थोड्य़ा थोड्या वेळाने तपासायचे असतात. झालंच तर त्यावरील प्रत्येक कमेंटला थँक्यू म्हणायचे असते.
दुसर्या बाजूला हेच सायबर जग अनेक सामान्यांना असामान्य करत असतं. लिहितं करत असतं. त्यांना जागतिक ओळख मिळवून देतं. त्यांच्या शब्दाला, कृतीला व्हायरल करुन चळवळीचं रुप देतं. त्याच्या प्रतिक्रियांची दखल घेऊन आक्षेपार्ह जाहिराती मागे घ्यायला लावतं. राजकारण घुसळून टाकतं. सामान्य माणसाला तुच्छ लेखणार्या भल्याभल्यांना थेट सवाल करतं, उत्तरं द्यायला बांधील करतं. नवी उमेद, यूअर स्टॊरीसारख्या ब्लॉगवर सामान्य माणसाच्या यशोगाथा झळकवतं. स्वतः अपंग असून मन:पूर्वक रुग्णसेवा करणारा एखादा डॉक्टर इथे भेटतो. मुलींच्या नावाच्या पाट्या घराघरात लावून त्यांना मानसन्मान प्राप्त करून देणारे दादाभाऊ भेटतात. मासिक पाळीच्या काळात मुली गैरहजर राहू नयेत म्हणून त्यांच्यासाठी जिल्हा परिषद शाळेत चेंजिंग रूमची व्यवस्था करणारी एखादी शिक्षिका इथे भेटते. स्वतःचं मूल कर्णबधीर असलेले आणि इतर कर्णबधीर मुलांसाठी काम करणारे पतीपत्नी भेटतात. शाळेच्या परिसरातल्या गुटखा विक्रेत्याला विद्यार्थ्यांचं नुकसान करण्यापासून परावृत्त करून भाजीविक्रीचा व्यवसाय सुरू करून देणारा एखादा शिक्षक इथे भेटतो. आपले विचार नीट मांडू न शकणार्या ग्रामीण तरुणाच्या शेतीच्या नव्या प्रयोगाला इथे शब्दबद्ध केलं जातं. वेगवेगळया ग्रुप्सवर घनघोर चर्चा घडतात. अव्यक्त राहिलेल्या स्त्रियांना स्वत:चा अवकाश इथे मिळतो. त्यांच्यातल्या कलाकाराला प्रतिसाद मिळतो. ’हाऊ टू’ ने सुरू होणार्या अनेक प्रश्नांची उत्तरं दृक् श्राव्य स्वरुपात यू ट्यूबवर मिळतात. शिक्षणाची नवनवी दालनं खुली होतात. जगभरातली शहरं, संग्रहालयं घरबसल्या पाहता येतात, शासनाचे प्रकल्प सर्वसामान्यांपर्यंत पोचतात. त्याच्या छोटेखानी घरगुती उद्योगाला अर्थकारणाच्या नव्या संधी उपलब्ध होतात. रत्नागिरीतला आंबा थेट न्यूयॉर्कला पोचतो तर चुकतमाकत इंग्रजी बोलणार्या राजस्थानी महिलेच्या ऑनलाईन कुकिंग क्लासमध्ये फ्रेंच शेफ प्रवेश घेतात. हेच सायबर जग एखाद्या आपत्तीनंतर अनेक सामान्यांचे मदतीचे हात पीडितांपर्यंत पोचवतं. परदेशी आप्तांना व्हर्च्युअली शून्य भौगोलिक अंतरावर आणून नव्याने त्यांच्याशी नातं जोडून देतं. सामान्य माणसाला आपणही कुणीतरी आहोत अशी मानसिक उभारी देतं.
अर्थात या सायबर विश्वात रुळताना सुरुवातीला त्याची त्रेधा उडते. तो एटीएममधून पैसे काढताना दहादा खात्री करतो, ऑनलाईन बिलं भरण्यापेक्षा त्यासाठी हाफ डे टाकून रांगेत जाऊन उभा राहतो. पण कधी गरज, कधी क्रेझ म्हणून वापरता वापरता सामान्य माणसाला हळूहळू बर्याच गोष्टी करता येऊ लागतात. आजवर त्याच्यासाठी स्वप्नवत असलेलं ऑनलाईन जग त्याच्या बोटाच्या इशार्यावर उपलब्ध झालेलं असतानाच कोविडचा प्रादुर्भाव त्याच्या जगण्यालाच नव्हे तर अवघ्या जगाला ग्रासून टाकतो आणि आजवर गमतीचं वाटणारं ऑनलाईन जग त्याच्या ऑफलाईन जगात रोरावत शिरतं. घरात अडकलेल्या सर्वांना सतत ऑनलाईन राहणं हाच बाहेरच्या जगाशी स्वत:ला जोडण्याचा मार्ग उरतो. पर्याय म्हणून याआधी उपलब्ध असलेलं ऑनलाईन शिक्षण आता अपरिहार्य होतं. त्याला पगार कपातीच्या अडचणीतच लॅपटॉपच्या खरेदीला प्राधान्य द्यावं लागतं. कामाशिवाय उरलेल्या वेळेत हाती घेतलेल्या पुस्तकात त्याचं मन रमत नाही. तो सतत मोबाईलमध्ये डोकावतो आणि तेच करणार्या आपल्या मुलाला स्क्रीन टाईम वाढल्याबद्दल रागावतो. ऑनलाईन, ऑफलाईन दोन्ही जगांची सीमारेषा पुसट व्हायला लागते. सकाळी तो दूरदर्शनवर रामायण बघतो आणि रात्री फुकट प्लॅन संपायच्या आत नेटफ्लिक्ससारख्या ओटीटीवरच्या वेब सिरिजचे एकामागून एक सीझन्स. त्यातलं शिवीगाळ, हिंसाचार आणि उत्तेजक दृश्यांनी भरलेलं कथानक त्याला परकं वाटत राहतं पण वरच्या स्तरात जायचं असेल तर हे सगळं पाहाणं क्रमप्राप्त असतं.
‘मागणी तसाच पुरवठा’ आम्ही करतोय असे म्हणून कलाकार त्यांच्या व्यावसायिक हतबलतेचे आणि माध्यमं त्यांच्या सर्जनशीलतेच्या मर्यादांचे खापर सरसकट प्रेक्षकांच्या माथी फोडत राहतात. विषमता असलेल्या या देशातील सामान्य जनतेला कोणते आणि कसे संदेश द्यायचे हा मोठा बिकट प्रश्न नक्कीच असला तरी सवंग करमणुकीखेरीज पर्याय नसावा असं कोणतंही सांस्कृतिक दारिद्र्य भारतात नसतं. पण बहुतेक माध्यमसम्राटांसाठी भारतीय सामान्य माणूस हा माणूस नसून फक्त आणि फक्त ग्राहक असतो. कोणत्याही धर्मगुरू किंवा राजाने उपभोगली नसेल एवढी सत्ता माध्यमसम्राटांच्या हातात असते. मनोरंजनाच्या बाजारात नैतिकतेचा विचार करण्याइतकी उसंत त्यांना नसते.
माहितीच्या आणि मनोरंजनाच्या महापुरामुळे कोविड आधीच लागण झालेला फोमो (फिअर ऑफ मिसिंग आऊट) नामक आजार सामान्य माणसाला ग्रासू लागतो. घरात अडकलो असू वा कामापुरतं बाहेर जात असू ,जगाबरोबर ऑनलाईन धावायच्या स्पर्धेत त्याला मागे पडायचं नसतं. सगळं काही आपल्याला सर्वात आधी कळलं पाहिजे याने तो पछाडून जातो. ते आपल्याला सर्वात आधी कळलं आहे हे इतरांना कळल्यावर ऑनलाईन जगातला रुबाब वाढत असल्याने त्याला ते घाईने फॉरवर्ड करायचं असतं. शिवाय लिहिता येणारा किंवा गुगल करुन कॉपी पेस्ट करणारा प्रत्येक जण स्वत:ला लेखक समजू लागतो. त्याला लाईक्स मोजण्याचा नार्सिसिस्ट नाद लागतो. चांगली पदवीधर व्यक्ती ’रात्री कॉसमॉस किरणे येणार असल्याचे, अमुक वेळा पाठवल्यास आपोआप बॅटरी चार्ज होण्य़ाचे’ अतर्क्य मेसेज धडाक्यात पुढे पाठवते. अगदी उच्चशिक्षित व्यक्ती सुद्धा ’अमक्याकडून आला म्हणजे खरंच असेल’ असं म्हणत एखादा अंधश्रद्धा पसरवणारा मेसेज सर्रास पुढे पाठवते. घंटानादाचा गर्भित अर्थ दुर्लक्षित करुन त्याने निर्माण झालेल्या कंपनांच्या तीव्रतेमुळे कोरोनाचे विषाणू मरुन जाणार असल्याचा भाबडा आनंद तो बुद्धी गहाण टाकून अभिमानाने शेअर करतो. एकच मेसेज स्वामी विवेकानंदांपासून, आईनस्टाईन ते विश्वास नांगरे-पाटील यांच्या नावानिशी तर कधी निनावी पुढे पाठवताना आता तो बिचकत नसतो. टिकटॉकवर बंदी घालणं अयोग्य आहे म्हणणार्या कुणा एका आभासी व्यक्तीशी तो आपल्या हातातल्या चिनी बनावटीच्या मोबाईलवरुन तावातावाने वाद घालतो. दिवसातले जवळपास सहा तास त्याची मुलं समाज माध्यमं वापरत असतात. तो स्वत: किमान चार तास आणि सामान्य ज्येष्ठ नागरिकही प्रचंड फावला वेळ हाताशी असल्याने जुजबी मोबदल्यात मिळणारी अमर्याद करमणूक स्क्रोल करण्यात साधारण २ ते ३ तास सहज घालवतात असं या क्षेत्रातले अभ्यासक सांगतात. मात्र माहितीच्या ढिगार्यात गुदमरुन अनेकदा तो आतून अस्वस्थ होतो. ’दिंड्या पताकांनी, दुमदुमली पंढरी, तरी मी श्रीहरी, कासावीस’ ही अवस्था राहतेच.
कुणाला लग्नासाठी स्थळ सुचवण्यात आलं की तो सगळ्यात आधी त्यांचं सोशल मिडीया प्रोफाईल बघतो. पती, पत्नी किंवा एकाच कुटुंबातले सदस्य एकमेकांना जितकं ओळखत नाहीत तितकं या सोशल साईट्स त्याला ’ओळखून’ असतात. त्याच्यासारख्या भाबड्या मतदारांची कलचाचपणी करायची. त्यानुसार विशिष्ट पोस्ट्स किंवा ट्वीट्सचा मारा करुन आपल्या पक्षाला अनुकूल असे जनमत तयार करायचे ही पद्धत राजकीय क्षेत्रात रुढ होत जाते. व्यापारी कंपन्याही हेच करत असतात. त्याने नुकतेच काय ’सर्च’ केले आहे ते पाहून त्याच्याशी निगडीत उत्पादनांच्या जाहिरातींचा भडिमार त्याच्यावर होऊ लागतो. ऑरवेलचे ’बिग ब्रदर इज वॉचिंग यू’ समाज माध्यमांवरही लागू होते आहे हे त्याच्या लक्षातही येत नाही. काल पहिल्यांदाच ज्याच्याशी व्हॉट्स अॅपवर चॅट केले ती व्यक्ती दुसर्या दिवशी फेसबुकच्या ’पीपल यू मे नो’ मध्ये लगेच दिसणं याला तो योगायोग समजतो.
सुरुवातीला त्याला वाटत असतं की आपल्या वैयक्तिक माहिती मध्ये /डाटामध्ये लपवण्य़ासारखं काही नाही, आपल्या दोनचार एफडी, इवलीशी पुंजी. मग घाबरायचं कशाला! त्यामुळे बहुतेक वेळा आपला डाटा वापरण्य़ाची परवानगी ’आय अॅग्री’ असे क्लिक करुन तो स्वत:च देत असतो. संख्येने सर्वाधिक असलेल्या सामान्य माणसाची वैयक्तिक 'माहिती' हा सायबर व्यवसायाचा कच्चा माल तो स्वत:च पुरवत असतो. समाज माध्यमं आणि त्यामागील अर्थकारणाचे नैतिक मूल्यमापन करताना तो हे विसरतो की ’फुकट’ या लेबलखाली आलेली सुविधा त्याचा गिनीपिग आणि ग्राहक म्हणून वापर करत असते.
मग एके दिवशी, संगणकातले बहुतेक सॉफ्टवेअर फुकट वापरताना त्याला बरं वाटत असलं तरी पैसे उकळण्यासाठी रॅन्समवेअरचा वापर करणारे सायबर गुन्हेगार त्याच्या किंवा त्याच्या कंपनीच्या संगणकापर्यंत त्या मार्फत पोचतात. कधी त्याला त्याच्या बँकेकडून खाते अपडेट करायचे असल्याने माहिती विचारणार्या मेल येतात. बँकेकडून अशी माहिती ऑनलाईन विचारली जात नसते हे विसरुन ,शहानिशा न करता तो माहिती पाठवतो. त्याच्या खात्यातून कष्टाने साठवलेले काही हजार रुपये काढले गेल्याचा एसएमएस पाहून तो हबकतो. त्याच्या बायकोने कधीतरी नकारात्मक मेनोपॉजल मूडमध्ये अनोळखी व्यक्तीशी फेसबुक मेसेंजरमध्ये अभावितपणे केलेल्या भावनिक चॅटचा फायदा घेऊन कुणीतरी तिला मानसिक त्रास देऊ लागतं. ती सैरभैर होते. विद्या वॉक्सचं नवं गाणं, सुपरहिट वेब सिरिजपासून फॅशनच्या लेटेस्ट ट्रेंड्स पर्यंत सगळे अपडेट्स असलेली त्याची मुलगी फ्रेंडलिस्ट मोठी दिसावी म्हणून, चाहत्यांना नाराज कसं करायचं म्हणून इन्स्टा वर अनोळखी मित्रविनंत्या स्वीकारते. त्यातल्याच कुणीतरी तिचं फेक प्रोफाईल करुन त्यावर वाटेल तसे फोटो आणि मजकूर टाकलेला पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकते. तिचा भाऊ सायबर कॅफेत फॉर्म भरुन झाल्यावर लॉगआऊट न करताच घाईने निघतो. दुसर्या दिवशी त्याला त्याच्या इनबॉक्समध्ये त्याने इतक्यात कधीतरी क्लिक केलेल्या पॉर्नसाईटचे डिटेल्स जगजाहीर करु अन्यथा अमुक पैसे या खात्यात पाठवा, असा धमकीचा मेल आलेला दिसतो.
’हे सगळं नायजेरियन लोक करतात आणि नोएडा किंवा मुंबईच्या हाय सोसायटीत घडतं ते सगळं, आपल्याला काय करायचंय,’ असं म्हणत आजवर ज्या सामान्य माणसाने सायबर जगाकडे कधी गांभीर्याने पाहिलेलं नसतं तो अशा एखाद्या घटनेने खडबडून जागा होतो. आजवर त्याच्यासाठी सायबर गुन्हेगारी म्हणजे भव्यदिव्य हॉलिवूड सिनेमातल्या कथा. बलाढ्य सरकारी यंत्रणांची गुप्त कागदपत्रं, न्युक्लिअर पॉवर प्लांटसंबंधीची गोपनीय माहिती, बँकामधले करोडो डॉलर्स वगैरे लुटण्यासाठी केलं जाणारं हॅकिंग. त्या अजब दुनियेशी त्याचा फक्त प्रेक्षक म्हणून संबंध असतो. पण आता सायबर विश्व एखाद्या चक्रीवादळासारखं त्याचं जगणं स्वत:सोबत वेगाने फरफटत घेऊन जात असतं. सायबर गुन्हेगारी त्याच्या चिमुकल्या घराचा उंबरठा ओलांडून आत आलेली असते.
जसं फक्त गाडी चालवता येणं पुरेसं नसतं. रहदारीचे नियम माहीत असणं, ब्रेकचा नीट वापर, गाडीची जुजबी दुरूस्ती करता येणं हे किमान कौशल्य अवगत असायला हवं तसंच सायबर विश्वात वावरताना देखील तारतम्य, व्यवहारज्ञान आणि किमान आवश्यक तांत्रिक ज्ञान नसेल तर अपघाताचा धोका अधिक. असतो. मग सामान्य माणसाच्या हातात काय असतं! ग्राहक म्हणून जागं राहणं. विवेकाचा वापर करणं. आयुष्यात खुट्ट झालं तरी ते समाजमाध्यमावर ओरडून सांगण्याचा मोह आवरणं, इतर लोक काय करत आहेत याबद्दल अवाजवी उत्सुकता न बाळगणं. सुरक्षेचे बेसिक सेटिंग वापरणं. व्यक्तिगत आवडीसाठी, तांत्रिक सुविधांसाठी, नेटवर्किंगसाठी, व्यवसायासाठी, सामाजिक-वैचारिक उपक्रमांसाठी, समविचारी लोकांच्या वर्तुळात राहण्य़ासाठी समजून उमजून समाज माध्यमाचा वापर करणं. असुरक्षित लिंक्सवर क्लिक नं करणं. https न वापरणार्या वेबसाईट्सवर आर्थिक व्यवहार टाळणं. अनावश्यक आणि क दर्जाचे अॅप्स इन्स्टॉल न करणं. दरवेळी फीडबॅक आणि रेटिंग बघणं. आभासी आणि वास्तव जगातली सीमारेषा पुन्हा एकदा ठळक करणं. त्यासाठी नुसतं डिजिटली साक्षर न होता डीजिटल व्यवहारज्ञान मिळवणं.
सॉक्रेटिसने कोणत्याही संवादापूर्वी स्वत:ला तीन प्रश्न विचारायला सांगितले आहेत. सायबर विश्वात कोणतीही भर घालताना किंवा काही फॉरवर्ड करताना त्याने त्यात थोडे बदल करुन हे प्रश्न स्वत:ला विचारावे. ही माहिती खरी आहे का? या माहितीमुळे कुणाचे अकारण नुकसान तर होणार नाही ना? ही माहिती पाठवणं खरंच इतकं आवश्यक आहे का? यापैकी एक उत्तर जरी नकारार्थी आलं तर ’एंटर’ बटण दाबायचा मोह त्याने आवरणं. स्वत:ला कायम कृत्रिम आणि आकर्षक पद्धतीनेच सादर करण्याचं दडपण न घेता #MeriRealLife या टॅगसारखं आपलं खरंखुरं, मुखवटेविरहीत आयुष्य आनंदाने जगायला शिकणं.
सायबर तंत्रज्ञान हे एक साधन आहे, साध्य नाही, आयुष्य व्यापून टाकेल इतकं महत्त्वाचं नाही. सामान्य माणसाने इतकी उर्जा, वेळ आणि मानवी तास त्यात अनुत्पादकपणे वाया घालवण्याइतकं तर नाहीच नाही. ते वॉशींग मशीन किंवा फूड प्रोसेसर सारखं मदतनीसाचं काम करतं तोवर ते नक्कीच उपयोगी आहे पण ते त्याच्या विळख्यात खेचून त्याला त्याचा गुलाम करत असेल तर! त्याच्या गरजा इतर कोणीतरी ठरवत असेल तर! तर त्याने हे थांबवायला हवं. त्याच्या गरजा काय आहेत हे त्याने ठरवावं. संयमाचं महत्त्व त्याची संस्कृती हजारो वर्षांपासून सांगतेय.. मग कुठे थांबायचं हे त्याला ठरवता आलं पाहिजे. ’यंत्रात’ परिवर्तीत होऊ घातलेल्या या माणसाला त्याच्या आतल्या समुद्राची गाज ऐकता यावी. त्यासाठी तंत्रज्ञानाबरोबरच हवे नको निवडण्याची समज विकसित व्हायला हवी. अन्यथा भारतीय समाजाचं शरीर आधुनिक साधनांच्या साहाय्याने जगत राहील पण त्याचा आत्मा हरवलेला असेल. ’आपली मूल्य बदलत चालली आहेत का, आपल्या वैयक्तिक आयुष्यातले ताण त्यामुळे वाढत आहेत का, आपलं सहजीवन त्यामुळे अस्थिर होतं आहे का, ’जीपीएस’च्या कक्षेबाहेरही एक विशाल जग आहे हे आपण विसरलो आहोत का, आपल्यासाठी काय जास्त महत्त्वाचं आहे, वास्तवातली आपली माणसं, आपले छंद, आपलं काम की आभासी जग!’ हा विचार त्याला करता आला पाहिजे. ऑनलाईन, ऑफलाईन जगात स्विच ऑन ,स्विच ऑफ करता आलं पाहिजे. कसं! तर ’रस्त्यावरून मिरवणूक जरी गेली ना, तरी उघडू नये दार. पण सामीलच व्हावे वाटले मिरवणुकीत तर जमावाच्या हाकेची वाटही पाहू नये’, असं ‘चर्चबेल’मधील एका लेखात ग्रेस म्हणतात तसं.
या दोन्ही जगांना जोडणारा पूल एवढीच भूमिका आणि किंमत त्याने सायबर तंत्रज्ञानाला द्यायला हवी, गुलामीच्या बेड्या तोडायला हव्यात आणि हे त्याने लवकर करायला हवं, नव्हे आत्ताच.