उन्हाने भाजून निघालेल्या जमिनीवर पडणार्या अनपेक्षित सरींनी वातावरणात उधळलेला मृद्गंध. तो श्वासात खोल भरुन घेताना अर्धमिटल्या डोळ्यांना खिडकीतून दिसणार्या झाडावर पानांच्या आडोशाखाली पिवळसर गुलाबी मानेचा वेगळाच चिमुकला पक्षी! तेवढ्यात फोनची बीप.. मैत्रिणीने व्हॉट्सऍपवर पाठवलेला फोटो.. तिला रिप्लाय करेतो मनात येतं या पक्ष्याचा फोटो ’Treat to senses.. hues on this cutie's feathers with a petrichor all around' असल्या एखाद्या भारी कॅप्शनसह पोस्ट करावा का! तितक्यात एक इ-मेल पॉप-अप, कुठलासा निरर्थक मेसेज.. मग कामासंबंधी राहिलेले एक-दोन फोन. तोवर चहा निवला आणि तो पक्षी केव्हा उडून गेला ते तर कळलच नाही. फोनकडे बघत राहिले. तो माझ्यासाठी आहे की मी त्याच्यासाठी आहे?
आयुष्य सोपं आणि सुखकर व्हावं म्हणून तंत्रज्ञान हवच पण त्याने गुंता आणखी वाढत असेल तर ! सकाळी उठल्यावर एखादा महत्त्वाचा एसएमएस पाहायचा राहून तर नाही ना गेला किंवा काल रात्री केलेल्या पोस्ट्सला किती लाईक्स आलेत, किंवा त्या अमक्याला किती कमी आले ते पाहायचं राहिलं असेल तर जगबुडी होईल की काय अशा गडबडीने त्यात डोकं घातलं जातं. नाटक/सिनेमा बघताना सुद्धा मोबाईलचे स्क्रीन चमकत असतात. दवाखाने, बस स्टॉप, कुठलीही वेटिंग रूम... तरूणाईच्या माना कायम मोबाईल किंवा लॅपटॉपमधे खुपसलेल्या किंवा आय-पॉडच्या तारा कानात खुपसलेल्या. स्वत:च्या विश्वात गुंग झालेले बधीर चेहरे. शेजारी कोण बसलय पत्ता नाही. गाडीच्या खिडकीतून दिसणारा उत्फुल्ल धबधबा सोडून फेसबुकवरच्या कुणा मित्राच्या बहिणीने अपलोड केलेल्या धबधब्याच्या फोटोला ’लाईक’ करायची घाई जास्त. अमेरिकन प्रवासी आज्यांची फोटो काढण्याची धांदल बघून पुलंनी ’अपूर्वाई’ मधे गमतीने म्हटलं होतं, ही सगळी दृष्य आता प्रत्यक्ष डोळ्यांनी न पाहता, बहुतेक अमेरिकेला परतल्यावर त्या निवांतपणे त्याचे फोटो पाहत बसतील.
आपणही या जगाकडे फक्त तंत्रज्ञानाच्या चष्म्यातूनच पाहायला लागलो आहोत का! वस्तुस्थितीपेक्षा आपल्याला व्हर्च्युअल (आभासी) रिऍलिटी जास्त आवडायला लागली आहे का! हाडामासाच्या माणसाशी सरळ संवाद करण्याची आपली क्षमता आणि इच्छाशक्ती मावळत तर नाही ना चालली ! आपापली ’स्पेस’ या नावाखाली आपला प्रवास एकटेपणाकडे तर होत नाहीये ना! सोशल नेटवर्किंगमधल्या स्वत:च्या कृत्रिम प्रतिमेच्याच तर आपण प्रेमात पडत नाही आहोत ना !
मागच्या पिढीचं कुठे अडलं या सगळ्या उपकरणांवाचून पण आज त्यांना भांबावल्यासारखं होतंच ना. एटीएम मशीन मधून पैसे काढताना दहादा खात्री करतात ते, बिचकत बटणं दाबतात, ऑनलाईन बिलं भरण्यापेक्षा ’वेळ आहे भरपूर’ हे कारण सांगत रांगेत जाऊन उभे राहतात. नेटबॅंकिंग पेक्षा तिकडे स्वत: जाऊन व्यवहार करणच सोपं वाटतं त्यांना. माझ्यात आणि नव्या तंत्रज्ञानातही वयोपरत्वे ही तफावत पडणारच ना! त्यापासून दूर राहायची आहे माझी तयारी ? की त्या भीतीने मी त्याच्या आत्ताच आहारी जातेय.
तंत्रज्ञान हे एक साधन आहे, साध्य नाही, आयुष्य व्यापून टाकेल इतकं महत्त्वाचं नाही. इतकी इलेक्ट्रीसीटी, वेळ आणि मानवी तास त्यात वाया घालवण्याइतकं तर नाहीच नाही. ते वॉशींग मशीन किंवा फूड प्रोसेसर सारखं मदतनीसाचं काम करत असेल तर ठीक आहे पण ते मलाच त्याचा गुलाम करत असेल तर! तुम्ही मोबाईल वापरत नसाल, फेसबुकवर नसाल म्हणजे तुम्हाला अस्तित्वच नाही असं तंत्रज्ञान म्हणत असेल तर ! त्याचा प्रभाव इतका जोरदार आहे की ते ओढूनच नेतं तुम्हांला. नवनवी मॉडेल्स बाजारात रोरावत येतात. तुमच्या गरजा इतर कोणीतरी ठरवत असतं.
मग यावर उपाय काय? माझ्या गरजा काय आहेत? ते मी ठरवीन. त्या कशा पूर्ण करायच्या? हे ही! संयमाचं महत्त्व माझी संस्कृती हजारो वर्षांपासून सांगतेय.. मग कुठे थांबायच हे मला ठरवता आलं पाहिजे.
माझ्यासाठी काय जास्त महत्त्वाचं आहे, माझी माणसं, माझे छंद, माझं काम! मग त्यांच्याशी जोडणारा पूल एवढीच भूमिका आणि किंमत मी तंत्रज्ञानाला द्यायला हवी, गुलामीच्या बेड्या तोडायला हव्यात आणि हे मी आजच करायला हवं, नव्हे आत्ताच.
---------------------------------
(free image source- google )
No comments:
Post a Comment