Wednesday, June 27, 2012

अन्नब्रह्माचा अपमान

खवैयेगिरी की अन्नब्रह्माचा अपमान?
"एक और लड्डू ?" असे घाबरलेल्या चेहर्‍याने म्हणणार्‍या जावईबुवांची "इनो" ची जाहिरात आठवतेय? त्या जाहिरातीत "इनो" घेतल्यावर तेच जावईबुवा उत्फुल्ल चेहर्‍याने "हो ज्जाये लड्डू" म्हणत बाह्या सरसावतात. इनो घेऊ पण खाऊ म्हणणार्‍या आपल्या देशात खिलवण्यालाही खूप महत्व आहे. चांगलेचुंगले खाऊ घालूनच प्रेम व्यक्त करायची आपल्याला सवय झाली आहे. आग्रह खूप केला तरच पाहुणचार चांगला केला असे आपल्याकडे मानले जाते.
प्रख्यात साहित्यिक पु.लं.देशपांडे यांचा "माझे खाद्यजीवन" म्हणून एक सुंदर लेख आहे. खाण्याच्या त्या षोकामागे रसिकता आहे. पदार्थाबरोबरच त्याच्या रंग-रूप-रस-गंधाला दिलेली दाद आहे. सीमेवर रक्षण करत असताना अतिशय गारठून आत्महत्येचे विचार मनात येत असताना एका सैनिकाच्या हाती हा लेख पडला. असा खाद्यानुभव घेण्यासाठी तरी मला जगलेच पाहिजे या विचाराने त्याने सारे नैराश्य झटकून टाकले असे म्हणतात. विवीध प्रांतांचे खाद्यवैशिष्ट्य अनुभवण्याची कित्येकांना आवड असते. तर्‍हतर्‍हेचा स्वैपाक करून कुटुंबाला खाऊ घालण्यात गृहिणींना कृतार्थता वाटते. जागतिकीकरणाबरोबर लोकांच्या रूचीमधे बदल होऊ लागला आहे. २४ तास चालणारी फूड चॅनेल्स आवडीने पाहिली जाऊ लागली आहेत. खाद्यपदार्थांबरोबरच पाचकांच्या जाहिरातींनी बाजारात धुमाकूळ घातला आहे. "माणूस जगण्यासाठी खातो की खाण्यासाठी जगतो" याचे उत्तर आज तरी माणूस खाण्यासाठी जगतो, हेच आहे.

हीच खवैयेगिरी आता रसिकतेची मर्यादा ओलांडू लागल्याचे दिसते आहे. इंदौरजवळच्या एका ’ढाणी’ मधे आम्ही जेवायला गेलो असताना वीस एक पदार्थांनी गच्च भरलेले ताट त्यांनी (तिकीट सारखेच असल्याने) लहान मुलांसमोरही ठेवले. जेवण सुरू करण्यापूर्वीच आम्ही त्यातले पदार्थ कमी करण्याची विनंती केली. ते चकित झाले पण त्यांनी केले काहीच नाही. मोठया माणसांनाही एवढे पदार्थ खाणे शक्य नव्हते. न राहवून आम्हीच ते काढून ठेवले आणि मॅनेजरकडे याबाबत तक्रार केली. त्यावर ते म्हणाले की आमच्याकडे (उत्तर भारतात) विचारून वाढणे हा पाहुण्यांचा अपमान समजला जातो(!) देशभरात कित्येक उपहारगृहांमधे रोज असे कितीतरी अन्न वाया जात असणार!
आपल्याकडे एकूणच (उत्तर भारतातच नव्हे) आग्रहाचा आणि मानपानाचा अजब संबंध लावला गेला आहे. "घर म्हणून" थोडंसं अन्न उरवण्यासाठी जास्त रांधण्याची देखील काही घरी पद्धत असते. उरलेल्या अन्नापासून थालीपीठासारखे पौष्टिक पदार्थ करून ते अन्न संपवले जाते, निदान गरीबांना दिले जाते, की सरळ टाकून दिले जाते? "आमच्याकडे सकाळची भाजी संध्याकाळी चालत नाही", "आम्ही मोजून स्वयंपाक करत नाही" असं कौतुकाने सांगितलं जातं. यात काही गैर नाही पण उरलेल्या अन्नाचे काय केले जाते? एखादेवेळेस गमतीखातर पैज लावून खवय्यांची स्पर्धा ठेवली जाते. तेवढे अन्न जिरवण्याची ताकद असलेल्या मंडळींनी ते खायला हरकत नाही. काही जण संकोची स्वभावाचे असतात तेव्हा थोडा आग्रह करण्यात वेगळीच आपुलकी आणि आनंद असतो पण बर्‍याचदा त्याचा अतिरेक होतो. अखेर ते अन्न पानात टाकून दिले जाते.


पंगतीत फार आग्रह होतो त्यापेक्षा "स्वरूची भोजन" ही नामी कल्पना आहे असे आधी वाटायचे पण ही बुफेची पद्धत मोजक्या लोकांसाठी ठीक आहे. समारंभात आपल्याकडे शेकडो लोक जेवायला बोलावले जातात. पुन्हा पुन्हा रांगेत जाण्यापेक्षा आत्ताच सगळे ताट खच्चून भरून घ्यावे असे लोकांना वाटते. खाण्याचे किती प्रकारचे स्टॉल्स समारंभात होते हा प्रतिष्ठेचा प्रश्न झाला आहे. त्यामुळे ताटात पंजाबी भाज्या, मराठी झुणका-भाकर, बंगाली मिठाई खर्‍या अर्थाने "समरस" झालेले असतात. हे कमी की काय म्हणून चायनीज पदार्थ, चाट, आईस्क्रीम.. यादी संपत नाही आणि ताटातले पदार्थ देखील! साहजिक ते तसेच टाकून दिले जातात. उत्तम दर्जाचे पण मोजके पदार्थ करण्याचा पायंडा पाडणे आणि खाऊ शकू एवढेच पानात वाढून घेणे खरच इतके कठीण आहे?

आपल्या देशात कित्येक लोक अर्धपोटी झोपत असतात, गरिबी-कुपोषणामुळे बालमृत्युचे प्रमाण वाढत चालले आहे. (एकात्मिक बालविकास योजना अपुरी पडते आहे) कुपोषणामुळे भारतातील जवळपास 42 टक्के मुले आरोग्यपूर्ण नाहीत, ही वस्तुस्थिती चिंतेत टाकणारी आहे, असे पंतप्रधानांचे या वर्षारंभीचे (१०-१-१२) वक्तव्य आहे. असे असताना अन्न टाकून देण्याचा नैतिक अधिकार आपल्याला आहे काय? कुणी काय आणि किती खावे हा वैयक्तिक प्रश्न आहे, पण अन्नाची नासाडी हा नक्कीच सामाजिक प्रश्न आहे. शेगाव संस्थानच्या भक्तनिवासातील भोजनालयात भोजन सुरू असताना एक जण एक पाटी घेऊन थोडा थोडा वेळ प्रत्येक टेबलजवळ थांबतो. "हा प्रसाद आहे, उष्टे टाकून त्याचा अपमान करू नये" अशा आशयाचा मजकूर त्यावर असतो. आमटे परिवाराच्या हेमलकसा येथील लोकबिरादरीतील भोजनालयाबाहेर, अन्न वाटप केंद्राकडे खुरडत जाणार्‍या कुपोषित बालकाचा फोटो लावला आहे. (या फोटोस पुलित्झर पारितोषिक मिळाले असून बालकाची अन्नान्न दशा पाहून व्यथित झालेल्या त्या फोटोग्राफरने अखेर आत्महत्या केली असेही तेथे लिहीले आहे) तो फोटो पाहिल्यानंतर कुणी अन्न वाया घालवण्याची शक्यता नाही. परंतु अशा फोटोतून संदेश द्यावा लागावा यातच सारं आलं.

गांधीजी पाणी पिताना तहान भागेल एवढेच पाणी पेल्यात घेत असत. अन्नाच्याही बाबतीत हा संस्कार होणे अत्यावश्यक आहे. "उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म" इतका अलिप्त विचार श्लोकांमधून आपल्याकडे रूजवला गेला. गोळवलकर गुरूजींसारख्या संवेदनशील व्यक्ती देशातील उपाशी जनतेच्या विचाराने विकल होऊन एकभुक्त राहत असत. "मुखी घास घेता करावा विचार कशासाठी हे अन्न मी सेवणार, घडो माझिया हातूनी देशसेवा, म्हणोनि मिळावी मला शक्ती देवा" असा असामान्य विचार करणारे लोकही आपल्याच देशातले. "कशासाठी- पोटासाठी" म्हणणारा चाकरमानी एवढा उदात्त विचार करू शकत नसला तरी त्याला अन्नाची आणि त्यासाठी कराव्या लागणार्‍या कष्टांची किंमत आहे. मात्र प्रतिष्टेच्या नावावर अन्न उधळून देणारे काही धनदांडगे एकीकडे आणि अन्नाला मोताद समाज दुसरीकडे हे चित्र देखील आपल्याच देशातले आहे. स्वत:च्या भुकेबरोबरच इतरांच्या भुकेची जाणीव ठेवून वेळप्रसंगी घासातला घास दुसर्‍याला देणे ही आपली संस्कृती आहे. आपला प्रवास प्रकृतीकडून संस्कृतीकडे होण्याएवजी विकृतीकडे तर होत नाहीये ना!

पूर्वप्रसिद्धी- मातृभूमि

No comments:

Post a Comment