Saturday, January 21, 2023

जो हुकुम मेरे आका - चॅटजीपीटी #chatGPT

आपल्याला सध्या गुगल वापरायची इतकी सवय झाली आहे की आपण गुगलवर काहीच शोधले नाही असा आपला एक दिवस देखील जात नाही. आपण एखादा शब्द किंवा वाक्य टाईप करायचा अवकाश की गुगल (किंवा इतर सर्च इंजिन) त्याच्याशी जोडलेलेल्या लाखो वेबसाईट्समधल्या माहितीचा ढिगारा भराभर उपसू लागतो. त्यातून आपण दिलेल्या शब्दाशी संबंधित माहिती असलेल्या लिंक्सची भलीमोठी यादी आपल्यासमोर आणून टाकतो आणि हे सारे क्षणार्धात.

पण याला एखादा निबंध , लेख, सारांश किंवा एखादे पत्र लिही म्हटले तर ?
अर्थातच ते शक्य नाही. गुगल फार तर पत्रांचे नमुने दाखवेल, निबंधातले मुद्दे शीर्षकावरून शोधून देईल, पण ही विखुरलेली माहिती गोळा करून , त्यावर विचार करून त्यातून एखादा लेख, पत्र, निबंध, सारांश लिहिण्यासाठी किंवा कोणताही मजकूर तयार करण्यासाठी आवश्यक असते ती मानवी बुद्धीमत्ता. त्यामुळे ही गुगलची फार मोठी मर्यादा ठरते.
अर्थात अशी माहिती गोळा करून एस-ई-ओ पुरते जुजबी लेख तयार करून देणारी काही सुमार चर्नर सॉफ्टवेअर्स बाजारात आहेत पण त्यात अनेक त्रुटी आहेत.
आता मात्र एक बलाढ्यअसा जिन आपल्या हाती आला आहे ज्याला हुकूम केला की तो हे सगळे लेखनप्रकार सहज हाताळू शकतो. नागरी समस्येविषयी थेट महापालिका आयुक्तांना पत्र लिहायचे असो किंवा रजेचा अर्ज असो. तो चक्क प्रेमपत्रही लिहू शकतो. पेस्ट करण्यापूर्वी नाव तेवढे योग्य व्यक्तीचे घाला अन्यथा गोंधळ होऊ शकतो. तसे झाल्यास तो तितक्याच निर्विकारपणे क्षमापत्र व ते ही निरुपयोगी ठरल्यास ब्रेक-अपचा मेसेज सुद्धा लिहून देऊ शकतो.
तो गृहपाठ करून देऊ शकतो हा विद्यार्थ्यांसाठी नवलाईचा आणि पालक-शिक्षकांसाठी डोकेदुखीचा विषय ठरणार आहे.
तो कोणत्याही विषयावर गप्पा मारू शकतो.
म्हणाल त्या विषयावर म्हणाल तितक्या शब्दांमध्ये किंवा ओळींमध्ये मुद्देसूद निबंध, लेख किंवा शोधनिबंध लिहू शकतो.
उत्तर आवडले नाही तर नव्याने लिहून देऊ शकतो.
’रशिया-युक्रेन समस्ये’ पासून ’शक्तीपीठांपर्यंत’ ’कचर्यापासून खतनिर्मिती’ पासून रोबोटीक्स पर्यंत, दिक्षित-दिवेकर डाएट पासून पाककृतींपर्यंत, लोककलांपासून विटी-दांडू सारख्या खेळापर्यंत, चीनमधील कोरोनाच्या परिणामांपासून काफ्काच्या साहित्यापर्यंत कोणताही देशी-विदेशी विषय त्याला वर्ज्य नाही.
या अद्भुत जिनचे नाव आहे ’चॅट-जीपीटी’. ChatGPT (Generative Pre-trained Transformer)
आपण त्याला चुकीचा प्रश्न विचारला तर तो प्रश्न दुरुस्त करतो. आपण दिलेले विषय, आपले संभाषण लक्षात ठेवतो. आता मुद्दाम त्याला आपण ’माझा आवडता नेता’ यासारखा विषय दिला तर तो मनकवडा नसल्याने स्पष्ट सांगतो ’हे पाहा, मी एक कॉम्प्युटर प्रोग्राम आहे, तुम्ही नाव सांगितले तर मी माहिती देऊ शकेन.’ एकूण आपण त्याला आगाऊ, तर्कहीन प्रश्न विचारले तर तो नम्रपणे नकार देतो. पण योग्य आज्ञा देताच त्याचे काम झरझर सुरु.
भयचकित होऊन पाहत राहणे एवढेच आपल्या हाती उरते.
म्हणूनच या तंत्रज्ञानाचे वर्णन एलोन मस्क यांनी ’भयंकर सुंदर’ असे केले आहे.
हा चॅट-जीपीटी नामक कॉम्प्युटर प्रोग्राम किंवाअत्याधुनिक चॅटबॉट ओपन-एआय (OpenAI) या अमेरिकेतील स्टार्ट अप ने नोव्हेंबर २०२२ मध्ये तयार केला आहे. अॅलेक रॅडफ़ोर्ड आणि चमू यावर काम करते आहे.
संगणक राज्याच्या पहिल्या पायदानवर याच्या मदतीने पोचून पुन्हा एकदा सरताज होण्यासाठी मायक्रोसॉफ्ट यात अफाट गुंतवणूक करतो आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेचा तसेच मशिन लर्निंग या तंत्रज्ञानाचा वापर करून मजकूर तयार करणे हे चॅट-जीपीटीचे मुख्य काम आहे. हा मजकूर वाचनीय, दिलेल्या संदर्भाशी सुसंगत आणि व्याकरणदृष्ट्या अचूक असतो हे त्याचे वैशिष्ट्य.
चॅट-जीपीटी openai.com वर सध्या नि:शुल्क उपलब्ध असून चाचणी स्वरूपात काम करतो आहे.
त्याचा वापर करण्यासाठी आपण मेल अकाऊंट उघडतो तसे येथे अकाउंट तयार करावे लागते.
मजकूर तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजेच डाटा (विदा). सुमारे ५७० जीबी डाटा त्याने इंटरनेटवरील विविध माध्यमातून गोळा केला आहे. हा प्रचंड डाटा जसे त्याचे बलस्थान आहे तशीच त्याची मर्यादा देखील.
माहिती अपुरी असेल तर येणारे उत्तर ही अपुरे असू शकेल. माहिती चुकीची असेल तर त्या आधारे लिहिलेल्या लेखातही चुका होणारच. अर्थात चुकीचे उत्तर दिल्यास आपण त्याला दुरुस्ती सुचवू शकतो. तो त्याची नोंद करून घेतो.
सध्या त्याच्याकडे २०२१ पर्यंतचाच विदा उपलब्ध आहे त्यामुळे तो अमिताभचा नवा सिनेमा ’झुंड’ आहे असे सांगेल, ’उँचाई’ नाही.
स्पॅनिश, फ्रेंच, जर्मन सह अनेक भाषात तो काम करतो, मराठीत देखील. मात्र सध्या इंग्रजी व्यतिरिक्त अन्य भाषा त्यावर वापरता येत नाहीत. मराठीत प्रयोग करून पाहिल्यास सध्या तरी ’भयंकर सुंदर’ मधले भयंकर रूपच अस्तित्वात आहे.
तरीही अधिकाधिक संसाधनांचा वापर करून या समस्यांवर उपाय शोधणे सुरु आहे. परिपूर्णतेसाठी तो व्ही-आर , ए-आर तंत्रज्ञानाचीही मदत घेणार आहे.
यामुळे येत्या काळात एखाद्या वेबसाईटवर गेल्यावर ’आपल्याला काय मदत हवी आहे’ असे विचारणारे स्वयंचलित बॉट अजून चतुर होतील. ग्राहक सेवेची गुणवत्ता वाढेल. शिक्षण, वित्त, डीजिटल मार्केटिंग, आरोग्यसेवा तसेच मनोरंजन क्षेत्रात याचा प्रचंड वापर केला जाईल.
भविष्यात ’जो हुकूम मेरे आका’ म्हणत कदाचित हे प्रकरण गुगलला गिळून टाकेल.
गुगल आपल्याला आपण सांगू त्या विषयाचा शिधा गोळा करून देत होता. त्यातून काय ते निवडून रांधायचे काम आपल्याला करावे लागत होते. चॅट-जीपीटी आपल्याला नुसता स्वैपाक करून नव्हे तर घास सुद्धा भरवून देतो आहे. आपल्याला बसल्याजागी ’आ’ करायचा आहे. घास घेताना उद्या त्याने आपल्यासाठी उखाणा घ्यावा असे वाटले तर लवकरच तो ती ही इच्छा पूर्ण करेल. आत्ताही करतो आहे पण सध्या तो ’समोरच्या कोनाड्यात उभी हिंदमाता..’ प्रकारचा उखाणा घेतो. तेव्हा थोडी वाट पाहूया.
पण मग सगळे काही तोच करणार असेल तर आपल्या डोकं नामक अवयवाचा उपयोग आपण करायचा तरी कुठे, तर तो या जिन उर्फ आचार्याला बिनचूक ’ऑर्डर’ देण्याचे कौशल्य मिळवण्यात. हे शिकवणार्या प्रशिक्षकांना आता मागणी असणार आहे.
एक वेळ इतिहास, भूगोल, विज्ञान वगैरे विषय ठीक आहेत पण एकांकिका, नाटक, पटकथा लिहिता येईल का त्याला, शेवटी ते काम माणसाचेच. तर लोकहो, त्याला नाटक वगैरे सारे काही लिहिता येते. आपण फक्त विषय द्यायचा, त्यानुसार तो पात्रनिर्मिती करतो. संवाद आणि प्रसंग लिहितो. हवा तसा सांगाडा तयार करून देतो.
पण कविता करता येतात का त्याला? त्याला वेगळी प्रतिभा हवी. येतात, त्याला उत्तम कविता करता येतात. म्हणाल तर बडबडगीत स्वरूपाच्या म्हणाल तर अव्वल साहित्यिक दर्जाच्या. अगदी कीट्स किंवा वर्ड्सवर्थ किंवा आपल्याला आवडेल त्या शैलीत सुद्धा. त्याला काय कमाल प्रशिक्षित केले गेले आहे याची यावरून कल्पना येईल.
उदा:
With books in hand and a smile so bright, A school girl walks with all her might.
With dreams in her eyes and hope in her heart, She sets out to learn, a brand new start
ही त्याने शाळकरी मुलीवर केलेली कविता आहे तर
Buy or sell, hold or trade, The market's mood is never staid,
A gamble, a risk, a thrill, A dance with the market still.
ही शेअर मार्केटवरची. लवकरच हे सगळ्या भाषांमध्ये घडेल.
केशवसुत के किशोर कदम ... आपण सांगू त्या कवीच्या शैलीत दिलेल्या विषयावर बुंदीसारख्या पटापट कविता ’पाडून’ तो तुमच्या स्क्रीनवर आणून देईल. ’साडी के फॉल सा मॅच किया रे, छोड दिया दिल कभी कॅच किया रे’ असल्या धन्य गाण्यांपेक्षा कितीतरी बरी गाणी लिहून देऊ शकेल.
ट ला ट जोडून लाईक्स लुटणार्या कुडमुड्या कवींची आणि कॉपी पेस्ट लेखकांची आता खैर नाही. आज हा स्तंभ मी लिहिते आहे. येत्या काळात वर्तमानपत्राला माझ्यासारख्या स्तंभलेखकांची सुद्धा गरज राहणार नाही. बहुधा पत्रकार, वकील, ब्लॉगर, शिक्षक, सल्लागार, विश्लेषकांचीही. चॅट-जीपीटी करेल ना ही सगळी कामे.
मग आपले भविष्य काय ! चॅट-जीपीटी हा सर्जनशीलतेच्या प्रांतातला उद्याचा भस्मासूर तर ठरणार नाही ना !
नाही. या जिनला भाषेतले बारकावे आणि गर्भितार्थ समजत नाही. आपल्याला कॉमन सेन्स नाही असे तो मान्य करतो. या अनुषंगाने अमुक लेख माणसाने लिहिला आहे की चॅट-जीपीटीने, हे सांगू शकणारे GPTZero अॅप प्रिन्स्टन विद्यापीठातील एडवर्ड टिआन या २२ वर्षीय विद्यार्थ्याने नुकतेच विकसित केले आहे.
चॅट-जीपीटीला मन नाही त्यामुळे भावना नाहीत. अस्सल सर्जनशीलतेसाठी तल्लख मेंदूचे संवेदनशील मनाशी घट्ट नाते असणे आवश्यक असते हे समजून घेऊन त्या बळावर आपल्याला त्याच्या दोन पावले पुढे राहावे लागेल.
असे जिन किंवा साबू हाताळायचे तर आपल्याला सुद्धा चाचा चौधरी व्हावे लागेल, जिनका दिमाग कम्प्युटरसे या चॅट-जीपीटी से भी तेज चलता है ।

Published in पुण्यनगरी- माध्यमतंत्र सदर
http://epunyanagari.com/articlepage.php?articleid=PNAGARI_PU_20230120_04_3&width=371px&edition=Pune&curpage=4&fbclid=IwAR2NmrXX8hNk-g5cFHgVv7Fs246DCER75V3q0MJTwBchbrOHzHqcW0VrFrU

Monday, January 16, 2023

डीपी छान आहे


माणसाच्या आयुष्यातले सर्वाधिक आवडते तीन जादुई शब्द कोणते ते आपल्याला माहित आहेतच. त्यातून ते जर हव्या त्या व्यक्तीने उच्चारले तर माणसाला स्वर्ग दोन बोटे उरतो. व्यवहारचतुर माणसांच्या आयुष्यातले ते तीन शब्द ’बिल मी देतो/देते’ असे असू शकतात. एखाद्या गृहिणीसाठी मुलांच्या तोंडून आलेले ’अमुक मस्त झालंय’ हे ते तीन शब्द असू शकतात पण हल्ली यच्चयावत माणसांना आवडणारे तीन शब्द म्हणजे - ’डीपी छान आहे’.

समाजाच्या विचारात, माणसाच्या स्वभावात होणारे बदल फार संथ गतीने होत असले तरी त्याचा डीपी (डिस्प्ले किंवा प्रोफाईल पिक्चर) सतत बदलत असतो ( अपवादांनी स्वत:ला वगळून घ्यावे) लिंक्ड-इन सारख्या समाजमाध्यमावर ती व्यक्ती व्यावसायिक जीवनात फारच यशस्वी आहे असे भासवणारा औपचारिक रुपातला डीपी वापरला जातो. टिंडर सारख्या डेटिंग स्थळी तर स्वाईप उजवीकडे करायचे की डावीकडे हे डीपीवरून ठरत असल्याने डीपी फारच आकर्षक वाटेल याची विशेष काळजी घेतली जाते. आपली महत्वाची ओळख म्हणजे चेहरा म्हणून यूजरने डीपी वापरण्याचा संकेत आता बहुतेक सर्व मोठ्या वेबसाईटवर असला तरी यूजर तिथला डीपी काहीसा निष्काळजीपणे निवडतो. डीपी डीपी खेळण्याची खरी मजा लोकांना व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या माध्यमांवर लुटता येते. हा दर्शनी बदल असला तरी त्यातून काय दाखवायचे हा हेतू मात्र तिथे अढळ असतो.
AIM ने 1997 मध्ये AOL द्वारा एक इन्स्टंट मेसेजिंग अॅप सादर केले होते तिथून या डीपी प्रकरणाला सुरुवात झाली. आधार कार्डवर खरा आणि पॅन कार्डवर बरा दिसणारा माणूस डीपीच्या कृपेने समाजमाध्यमावर देखणा दिसू लागला. साहजिकच डीपीमुळे व तो हवा तेव्हा बदलायची सुविधा असल्याने समाजमाध्यमाचे आकर्षण वाढत गेले. इतके की उद्या डीपीची सुविधा बंद झाली तर कित्येक लोक कदाचित समाजमाध्यम वापरणे सोडून देतील.
याबाबत पाश्चात्य समाजमाध्यम अभ्यासकांनी काही निष्कर्ष काढले आहेत. उदा: आशियाई लोकांना आपला डीपी प्रेक्षणीय स्थळाच्या पार्श्वभूमीवर असणे आवडते तर अमेरिकन लोकांना डीपीतून आपली छबी दाखवायला आवडते. पेन्सिल्वानिया विद्यापीठाने मध्यंतरी साठ हजार प्रोफाईल्सची पाहणी केली. यूजरच्या म्हणजेच माध्यम वापरणार्या माणसाच्या स्वभावाचे व विचारपद्धतीचे प्रतिबिंब त्याच्या डीपीमध्ये आढळून येते असा त्या पाहणीचा निष्कर्ष सहज पटण्यासारखा आहे. यूजरचे सामान्यत: ५ प्रकार असतात. ते काय पोस्ट करतात किंवा काय लाईक करतात यावरून हे प्रकार कुणालाही ओळखू येतील.
साधेसरळ किंवा स्वकोषातले, नकारात्मक विचार करणारे, सकारात्मक विचार करणारे, सावध भूमिका घेणारे आणि बिनधास्त हे ते ५ प्रकार.
सकारात्मक मंडळींना रंगीबिरंगी फोटो, आपण केंद्रस्थानी असलेले ग्रुप फोटो डीपी म्हणून आवडतात.
नकारात्मक मंडळी डीपीमध्ये शक्यतो आपला चेहरा दाखवत नाहीत. मॉडर्न आर्ट सारखे काहीतरी अतर्क्य, अंधुक फोटो किंवा अगम्य तत्त्वज्ञानाचे संदेश ते डीपी म्हणून निवडतात.
स्वत:च्या प्रतिमेबद्दल दक्ष असलेल्या लोकांचा डीपी नेहमी नीटनेटका, क्रॉप केलेला असतो. या सावध लोकांचा मनात काय चालले आहे याचा त्यातून अजिबात पत्ता लागत नाही.
साधे किंवा स्वकोषातले लोक स्वत:ऐवजी मुला-नातवंडांचे किंवा त्यांच्यासह, आईवडिलांचे, देवादिकांचे किंवा फुलांचे फोटो डीपी म्हणून वापरतात.
ही मंडळी नकळतपणे तर बिनधास्त लोक ठरवून त्यांच्या त्या त्या वेळच्या भावस्थितीनुसार डीपी बदलत असतात. बिनधास्त लोक सकाळी पाहावे तर भारतभूषण सारखे , संध्याकाळी पाहावे तर रणवीर सिंग सारखे असू शकतात. त्यांचे त्यांनाही काही सांगता येत नाही.
या शिवाय स्वप्रेमात बुडालेले म्हणजेच नार्सिसिस्ट लोक नाटकी वाटावेत असे खास काढून घेतलेले डीपी वापरतात. त्याकडे लोकांचे लक्ष जात नसल्यास ते बैचैन होऊन डीपी बदलत राहतात. तरी पाहिला नाही तर ते तो स्टोरी किंवा स्टेटसला टाकतात.
या पलिकडे जाऊन एखाद्या मह्त्वाच्या सामाजिक घटनेशी आपले नाते दर्शवण्यासाठी काही जण डीपीचा वापर करतात. उदा: स्वातंत्र्यदिनाला डीपी म्हणून आपला राष्ट्रध्वज लावणे, आवडत्या नेत्याचा फोटो लावणे, सामना जिंकल्यास त्या खेळाडूचा फोटो लावणे अनेकांना आवडते. एखाद्या गंभीर घटनेची प्रतिक्रिया म्हणून काळा रंग दर्शवणारा डीपी ठेवणे किंवा ’मी कर भरला’,’मी लस घेतली’ किंवा ’बेटी बचाओ’ यांसारख्या बॅनरचा वापर प्रो-पिक सह करणे हा आपली सामाजिक संवेदनशीलता घरबसल्या प्रदर्शित करण्याचा सोपा मार्ग मानला जातो.
आपल्या भारतीय नजरेतून डीपीकडे बघितले तर आणखी काही वेगळे आणि गमतीदार निष्कर्ष काढता येतात.
बहुसंख्य भारतीय पुरुषांना विशेषत: तरुणांना डीपी मधून आपले सामाजिक स्थान दाखवायला म्हणजेच आपण कुणीतरी खास असल्याचे दाखवायला आवडते. बहुतेक भारतीय स्त्रियांना आपल्याइतके खूष जगात कोणी नाही असे दाखवायला आवडते. पुरुषांना हसणे थोडे कमीपणाचे वाटते. प्रसिद्ध ब्रँडच्या मॉडेलच्या चेहर्यावर असतात तसे निर्विकार, सुतकी भाव त्यांच्या चेहर्यावर असतात. त्यांनी लावलेल्या गॉगल किंवा भारी घड्याळाकडे, ते टेकून उभे असलेल्या कारकडे लोकांनी नीट पाहावे अशी त्यांची आंतरिक इच्छा असते. ते डीपीत झाडी, डोंगार, सूर्याकडे किंवा इमारतीकडे एकंदरीत भलतीकडेच पाहताना दिसतात.
याउलट बहुतेक स्त्रिया कॅमेर्याकडे थेट, रोखून बघतात. डीपी हसरा आहे ना, निदान आपण मजेत, चांगल्या आणि शक्य तितक्या बारीक दिसत आहोत ना याची त्यांनी खात्री केलेली असते. मध्यमवर्गीय तरुणींना सुरक्षिततेची भीती किंवा फेसबुकवरच्या आत्या- मामा- काकूंची आपल्यावर एक गुप्त नजर असल्याचे जाणवत असते, त्यामुळे त्या डीपीतून संस्कारी दिसण्याचा प्रयत्न करतात.
हा ताण नकोसा वाटला तर तरुण मंडळी इन्स्टाग्रामवर पळते. तिकडे जाऊन नेमके काय करायचे हे अद्याप फेसबुकी आत्या, मामा, काकूंना फारसे माहित नसल्याने त्या तिकडे फिरकत नाहीत. त्यामुळे तिकडे कॉलेजमधल्या ’ऑफ’ तासाला असते तसे मुक्त वातावरण असते. तिकडे डीपी वर एक तरी ओळ लिहावी लागते. त्या ओळीचा आणि फोटोचा संबंध नसतो. उदा: एकाच्या फोटोवर लिहिले होते ’मै नही तो कौन बे’ (हे सध्याचे प्रसिद्ध रॅप गाणे आहे) दुसरीच्या फोटोवर लिहिले होते ’लव्ह द लाईफ यू लिव्ह, लिव्ह द लाईफ यू लव्ह. ’ म्हणजे नेमके काय असले निरर्थक प्र्श्न तिकडे विचारायचे नसतात. वाक्यासह ढीगभर हॅशटॅग वापरावे लागतात. त्यात #पार्टी, फ्रेंड्स, धमाल, न्यू इयर, बेस्टी वगैरे लिहायचे असते. मुले मात्र एकमेकांना बेस्टू बिस्टू म्हणत नाहीत. इंस्टाग्रामवर मैत्रिणीला बेस्टी न म्हणणे हा दंडनीय अपराध असतो. असे सगळे केल्याने आपण ’कूल’ असल्याचे सिद्ध होते. म्हणजे काय ते विचारु नये.
पुरुष एकमेकांच्या डीपीकडे पाहतात त्यापेक्षा कितीतरी बारकाईने स्त्रिया एकमेकींच्या डीपीचे निरिक्षण करतात. एकमेकींना बदाम देऊन वाऊ, सुंदर वगैरे म्हणतात. त्या डीपी बदलतात तेव्हा हे प्रतिसाद परत आहेरात आले नाहीत तर पुढच्या वेळी फक्त ’नाईस पिक’ अशी कोमट आणि बोथट प्रतिक्रिया देतात. जवळच्या मैत्रिणी एकमेकींना ’परवाच्या डीपीमधलं कानातलं कुठून घेतलं गं’ असे प्रश्न विचारू शकतात. जिला विचारणा झाली तिचे तो डीपी लावण्याचे सार्थक झालेले असते. निरिक्षणात विशेष प्रावीण्य मिळवलेल्या थोर स्त्रिया तर ’तुझ्या कालच्या डीपीमध्ये मागे उभ्या असलेल्या तुझ्या मैत्रिणीच्या ब्लाउजचे डिझाईन छान होते, कुठे शिवलं तिने’ असेही बिनदिक्कत विचारू शकतात. असे केल्यास आपण रिकामटेकडे ठरू की काय या शंकेने पुरुष डीपी सारख्या क्षुल्लक गोष्टीकडे लक्ष नसल्याचे दाखवतात. प्रतिक्रिया दिलीच तर ते मैत्रिणीला ’सुंदर- ऑसम’ सारख्या गोड, कमी ओळख असल्यास ’छान- प्रसन्न’ सारख्या सावध आणि मित्राला ’कुठे फिरतोय बे रिकाम्या’ या सारख्या खडूस शब्दात देतात. मित्राच्या डीपीमधल्या कारच्या मॉडेलची नोंद मात्र त्यांच्या मनात झालेली असते.
एकूण काय ,जगाने आपल्याकडे ज्या नजरेने पाहावे असे आपल्याला वाटते तसा डीपी आपण सगळे वापरतो. त्यासाठी कुणी पाठीशी आयफेल टॉवर किंवा ताजमहाल घेतात, कुणी सोबतीला प्रसिद्ध व्यक्ती घेतात तर काही जण फोटो फिल्टर वापरतात, पण त्यातले ’आपण’ किती खरे असतो!
तेव्हा डीपीला एखाद्या पाकीटावर चिकटवलेल्या तिकिटापेक्षा जास्त महत्व देऊ नये. त्या तिकिटाचा/ त्यावरील छापाचा आणि पाकीटात जे काय असते त्याचा एकमेकाशी जितका संबंध असतो तितकाच डीपीतून दिसणारी व्यक्ती आणि मुदलातली खरी व्यक्ती यांचा आपसात संबंध असतो. लोक डीपीच्या आहारी जातील म्हणूनच कदाचित संत चोखोबांनी "का रे भुललासी वरलिया रंगा" म्हणून ठेवले असावे.
तरीही जर एखाद्या व्यक्तीशी खूप दिवसात संपर्क नसल्याने काय बोलावे प्रश्न पडला असेल, एखादा मित्र/मैत्रिण/ जोडीदार नाराज असेल तर हे तीन शब्द त्यांना पाठवा आणि जादू बघा -ते शब्द म्हणजे अर्थातच ’डीपी छान आहे’.

Monday, November 21, 2022

ज्यूस

 

’ज्यूस’ हा २०१७ मध्ये यूट्यूबवर प्रदर्शित झालेला फिल्मफेअर विजेता लघुपट तुम्ही पाहिला आहे का! 

एका मध्यमवर्गीय स्त्रीची तेरा मिनीटात सांगितलेली ही अंतर्मुख करणारी कथा आहे. एका संध्याकाळी एका घरी मित्रपरिवार सहकुटुंब जमलेला आहे. सगळे पुरुष मित्र बाहेरच्या खोलीत कुलर लावून ड्रिंक्स घेत, स्टार्टर्स खात, गप्पा मारत ऐसपैस बसले आहेत. मुलं बेडरुममध्ये खेळत आहेत.आहेत. मित्रांच्या बायका मंजू (शेफाली छाया) म्हणजेच यजमानीण बाईला हातभार लावायला म्हणून तिच्या काहीशा कोंदट स्वयंपाकघरात जमल्या आहेत. कामाच्या धांदलीमुळे, गॅसवर सतत पदार्थ शिजत असल्यामुळे आणि ४,५ बायकांची गर्दी झाल्याने आत प्रचंड उकडते आहे.

काम सुसह्य व्हावे म्हणून मंजूने माळ्यावरून काढलेला टेबलफॅन जेमतेम सुरु होऊन बंद पडला आहे. बायका हवालदिल झाल्या आहेत. मंजू बाहेर येऊन "पंखा सुरू होत नाहीये, जरा बघता का" असं नवर्‍याला हलक्या आवाजात सांगते. तो ’हो’ म्हणून पुन्हा गप्पांमध्ये दंग होतो. यांच्या गप्पांचे विषय म्हणजे ऑफीसमधल्या सह्कारी महिलेबद्द्ल गॉसीप, पाचकळ विनोद, आंतरराष्ट्रीय राजकारणाची आपल्याला खूप समज असल्याचे भासवणार्‍या चर्चा तर आत बायकांचे गप्पांचे विषय म्हणजे घर, स्वयंपाक, मूल झाल्यावर नोकरी सोडणे योग्य आहे की नाही वगैरे. विषयांमधला फरक नोंद घेण्यासारखा आहे.

इकडे आतला उकाडा वाढत चालला आहे. स्वैपाक होत आल्यावर यातली एक बाई बेडरूममध्ये डोकावून आपल्या लहान मुलीला "आता खेळ पुरे, आधी तुझ्या भावांना वाढ" असं जरबेच्या आवाजात सांगते. हे ऐकून मंजूच्या डोक्यात तिडिक गेलेली आहे. बाहेरून नवर्‍याच्या "मंजू, आता जेवायचं बघ जरा" अशा हाका सुरु आहेत. आतल्या बायकांपैकी एक तरुण बाई गर्भवती आहे. तिने नोकरी सोडली नाही तर तिच्या बाळाकडे कोण बघणार हा विषय सुरु आहे. आपण नाही का मुलांसाठी नोकरी सोडली, असं एक बाई म्हणताच मंजू उद्वेगाने विचारते, "जे आपण केलं ते हिनेही केलंच पाहिजे का?" मंजू पुढे उपहासाने म्हणते " अर्थात डायपर तर आईनेच बदलला पाहिजे, वडील हातातला रिमोट सोडून ते काम कसे करतील!" 


हा तिचा तिसरा आणि शेवटचा संवाद आहे. बाकी सगळं तिची नजर बोलते. आधी थंड, मग असहाय्य, मग क्रुद्ध. आता तिला हे सगळं असह्य झालेलं आहे. ही एक घटना नव्हे, पुरुषसत्ताक पद्धतीत घुसमटलेलं अवघं जगणंच. मंजू खाटकन गॅस बंद करते. फ्रीजमधला ज्यूसचा जार घेऊन बाहेर येते. कुलरच्या झोतात एका खुर्चीवर पुरुषांमध्ये येऊन बसते. तिच्या अचानक येण्याने ते अस्वस्थ झाले आहेत. नवरा आश्चर्याने व काहीशा रागाने तिच्याकडे बघतो आहे. ग्लासमध्ये ज्यूस ओतून भरल्या डोळ्यांनी एक तीव्र आणि अर्थपूर्ण कटाक्ष ती नवर्‍याकडे टाकते आणि डोळे मिटून जगाची पर्वा न करता शांतपणे थंडगार ज्यूसचा एक एक घोट घेऊ लागते. इथे लघुपट संपतो. मंजू भांडत नाही, ओरडत नाही, कुणाला काहीही ऐकवत नाही. तिला काय म्हणायचं आहे हे तिच्या नजरेवरुन नवर्‍याला कळतंच पण आपल्यालाही त्या मूक स्फोटामागची धग, तडफड आतपर्यंत जाणवते. 

हा लघुपट फक्त स्क्रीनवर नाही तर थोड्या फार फरकाने बहुसंख्य मध्यमवर्गीय घरात घडत असतो. आर्थिक स्थितीनुसार जागा, सोयी कमी जास्त असतात पण आत बायका राबतायत आणि पुरुष एकत्रीकरणाचा आनंद घेत आहेत हे चित्र सर्वत्र दिसते. अर्थात याला अपवाद असू शकतात आणि यावर आक्षेपही. 

शहरी सुशिक्षित घरातल्या  लहान कुटुंबात हल्ली पुरुष मदत करताना दिसतात, काही पुरुष भाजी, किराणा, खाद्यपदार्थ किंवा आवश्यक वस्तू आणून देणे किंवा ऑनलाईन मागवणे या स्वरुपाची मदत करताना दिसतात. क्वचित एखादा विशेष पदार्थ करतात. बायकोला यापेक्षा जास्त मदत केली तर लोक नावं ठेवतीला अशी भीती काही पुरुषांना वाटते. न पेक्षा या सकारात्मक बदलाचं निश्चितच स्वागत करायला हवं परंतु माझा नवरा, भाऊ किंवा वडील मदत करतात म्हणजे आता सगळंच बदललं आहे असा निष्कर्ष काढणं बालीशपणाचं ठरेल. 

मुळात ’मदत’ या शब्दातच गोम आहे. आपण एखाद्याला मदत करतो म्हणजे ते काम ज्याचे आहे त्याचा भार हलका करतो. इथे आपली भूमिका संपते. परंतु त्या कामाची जबाबदारी त्या व्यक्तीवरच असते. जोवर जबाबदारीचा निम्मा वाटा उचलला जात नाही तोवर त्याला न्याय्य श्रमविभागणी म्हणता येणार नाही. 

मुख्य आक्षेप हा असतो की पुरुषांनाही बाहेर राबावंच लागतं न! त्यांना पण त्यांचं काम करताना कंटाळा, थकवा येत नसेल का! नक्कीच, परंतु ते काम कधीतरी संपवून ’ज्यूस’ मध्ये दाखवलंय तसं स्वत:च्या अवकाशात, आवडीनुसार वेळ घालवण्याची संधी त्यांना परंपरेने उपलब्ध करुन दिली आहे. निम्न व मध्यमवर्गीय स्त्रियांना मात्र अव्याहत चालणार्‍या कामातून उसंत मिळत नाही. त्यांच्या कामाला सुट्टी अशी नाहीच. सगळी कामे इतरांवर ढकलून स्वत: काहीही न करणार्‍या आयतोबा स्त्रियाही असतात. पण त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. मध्यमवर्गात मुलींचं शिक्षण घेण्याचं प्रमाण वाढल्याने त्यांना त्याचा उपयोग कमावण्यासाठी, स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी करावासा वाटतो. त्यासाठी सासरचे ’परवानगी’ तर देतात पण तळाशी बारीक अक्षरात ’अटी लागू’ लिहिलेलं असतं. "तू ’घर सांभाळून’ हवं ते कर, तुला सगळं स्वातंत्र्य ’दिलं’ आहे" असं अजब औंदार्य त्यात असतं. या दडपणामुळे सवड काढून त्या कुठे गेल्याच तर राहिलेली कामं त्यांच्या डोळयासमोर नाचू लागतात. थोडक्यात हे तुझंच काम म्हणून लादलं जातं, ते करण्यावाचून पर्याय नसतो, त्यात एकसुरीपणा येतो तेव्हा घर व नोकरी/व्यवसाय अशी दुहेरी कसरत करणार्‍या बायकांबरोबर गृहिणींनाही त्याचा प्रचंड वैताग येऊ शकतो. 

याउलट घरकाम, स्वैपाक हे बाईचंच काम असल्याचं पुरुषांबरोबरच कित्येक बायकांच्याही मनात इतकं खोलवर रुजलेलं आहे की त्यांनी ’राबणं’ हे आपलं प्राक्तन म्हणून स्वीकारलेलं असतं. खेड्यात नवर्‍याच्या बरोबरीने शेतात काम करून दमून आलेली स्त्री घरी परतल्यावर लगबगीने भाकरी थापायला घेते. ऑफीसमधून येताना भाजी ,वस्तू घेत थकून आलेली मध्यमवर्गीय स्त्री  कुकर लावायला घेते एवढाच काय तो फरक. तिच्या दिमतीला मिक्सर, मायक्रोवेव्ह सारख्या सुविधा आल्याने ’तिला असतंच काय काम! ’ असा अनेकांचा ग्रह असतो. गृहिणी असेल तर मग तिच्याकडे काय, वेळच वेळ असतो असा सार्वत्रिक समज असतो. प्रत्यक्ष कामाच्या श्रमापेक्षाही अशा पद्धतीने गृहित धरण्याचा तिला अधिक त्रास होतो. कधीतरी तिचा ’मंजू’चा झाला तसा उद्रेक होतो. त्याचे दूरगामी परिणाम मुलांवर, घरावर, नातेसंबंधांवर आणि अखेर समाजावर होताना दिसू लागले आहेत. 

नुकतेच गौरी-गणपती पार पडले. एक मध्यमवयीन मैत्रिण म्हणाली ,"माझ्याच्याने आता ही दगदग सहन होत नाही पण घरी इतक्या वर्षांची प्रथा आहे ती मोडणं मनाला बरं वाटत नाही. इतर नातलग बायका ’मदत’  करतात, तरीही सगळी तयारी करणं, इतक्या जणांची सोय करणं, नैवेद्यासह सगळं यथासांग पार पांडणं याने मी इतकी थकून जाते की मला वैद्यकीय उपचार घ्यायची वेळ येते. त्यामुळे सणवार जवळ आले की माझ्या पोटात खड्डाच पडतो." काही सुपरवुमन व्हायच्या आकांक्षेने पछाडलेल्या स्त्रियांचा अपवाद वगळला तर हे प्रातिनिधीक चित्र म्हणता येईल. सुजाण स्त्रिया यावर जमतील तसे उपाय शोधतात. अनावश्यक कर्मकांडाला परिस्थितीनुसार फाटा देतात, काही गोष्टी विकत आणण्यात कमीपणा मानत नाहीत. एखादी गोष्ट राहिली, पर्फेक्ट झाली नाही तरी त्रास करून घेत नाहीत, आपल्यावाचून घराचं अडत नाही याची खंत न करता मुलांना स्वावलंबी बनवतात. पण अशा स्त्रियांचे प्रमाण समाजात अद्याप कमी आहे. शिवाय त्यांना बेजबाबदार, आळशी वगैरे विशेषणं स्वीकारण्याची तयारी ठेवावी लागते. 

बहुतेक पुरुष मात्र यावर उपाय शोधण्याऐवजी ’तू दुर्गा तू अन्नपूर्णा, तू अमुक ..... तुला वंदन’ असे मढवलेले मेसेज सोशल मिडीयावर पाठवले की आपण स्त्रियांना आणि त्यांच्या कष्टांना पुरेसा आदर दर्शवला आहे असे मानून निश्चिंत होतात. (काही भाबड्या बायका पण खूष होतात आणि आणखी चार डबे घासायला काढतात.) 

हे कमी की काय म्हणून परवा एक मेसेजमध्ये वाचलं ’जाहिरातीत दागिने ल्यालेल्या, हसर्‍या, सुंदर स्त्रिया दाखवतात पण घरात दिवाळीची साफसफाई, फराळाची तयारी करताना घामेजलेली, केस विस्कटलेली स्त्री कुणीच दाखवत नाही’. इथपर्यंत तो मेसेज स्त्रियांच्या श्रमाकडे लक्ष वेधतोय असं वाटलं. पुढे लिहिलं होतं "नकोय त्यांना तुमची मदत, फक्त त्या जे करतात त्याची जाणीव ठेवा. एखादं ग्रिटींग, चॉकलेट त्यांच्यासाठी राखून ठेवा मग बघा दिवाळी कशी झक्कास जाते ते". 

धन्य आहे! तुम्ही कोण ठरवणारे की यांना मदत नकोय. नुसत्या शाब्दिक जाणीवेचं काय लोणचं घालणार! या ग्रिटींग, चॉकलेटच्या कौतुकाने बाईचा थकवा गायब होणार आहे का! आवडीनुसार काही वेगळं करायला तिला सवड मिळणार आहे का! निम्मी जबाबदारी घ्यायला हवी खरं तर तुम्ही. घरी केलेलेच लाडू आवडतात तर एकदा स्वत: अर्धा तास गॅसपाशी उभं राहून तूप सुटेस्तो पीठ भाजून पाहा. कामं ,फराळ करून दमलेल्या बायकांना त्या रात्रीचा स्वैपाक करून गरम, आयतं जेवायला वाढा. एका खोलीची पूर्ण सफाई करा. ती असेल खरी जाणीव. सुरुवात तर करा. (जे करतात त्या मूठभर मंडळींनी यातून स्वत:ला वगळावं) 

घरोघरच्या मंजूंना व्हॉट्सअ‍ॅपवरचे हारतुरे, कौतुकाचे भारे नको आहेत. प्रत्यक्ष साथ हवी आहे. कृतीतून सन्मान हवा आहे. घर सगळ्यांचं असेल तर कामंही सगळ्यांची असायला हवी इतका हा सोपा नियम आहे. आपली आवड, कौशल्य, वेळ, गरज याचा समन्वय साधून कामं वाटून घेतली तर घराघरातल्या मंजूलाही बाहेरच्या खोलीतल्या जगाकडे उघडणार्‍या खिडकीत बसून गप्पा मारता येतील. सर्वांबरोबर बसून 'ज्यूस' किंवा फराळाचा आस्वाद घेता येईल. अशी समाधानी मंजू जाहिरातीतल्या स्त्रीपेक्षा सुंदर दिसेल. 

published in Madhurima Divya Marathi November 2022