Thursday, June 19, 2014

वैश्विक नजर

'रोव्हर'च्या माध्यमातून मंगळावरून घेतलेले पृथ्वीचे प्रकाशचित्र वृत्तपत्रातून नुकतेच झळकले. अनेक आकाशगंगांपैकी एकीचा सूक्ष्मतम भाग असलेली पृथ्वी त्यात एखाद्या खसखशीच्या दाण्याएवढी दिसत होती. या पार्श्वभूमीवर माणसाचं अस्तित्व विश्वाच्या खिजगणतीतही नाही ही वस्तुस्थिती आहे. काळ धावतोय असे आपल्याला वाटते, खरं तर आपण धावत आहोत. काळ अनादि अनंत आहे. त्यामुळे आपली समज फक्त काही हजार वर्ष मागे आणि येत्या शेकडो वर्षांपर्यंत मर्यादित आहे. आपल्या आकलनापलिकडे असलेल्या अनेक गोष्टींच आपल्याला ज्ञान नाही.
माणसाने स्वत:चा 'अहं' अनाकलनीय असलेल्या ब्रह्मांडापेक्षा मोठा मानला आहे. त्या खसखशीच्या दाण्याकडे पाहतानाच नव्हे तर एखाद्या प्रपाताकडे, क्षितिजापर्यंत पसरलेल्या समुद्राकडे पाहतानाही हे विचार मनात येतात. याने खुजं वाटून घेण्यापेक्षा लीन व्हायला हवं. स्वत:त डोकावून पाहायला हवं.

सुरुवात धर्मापासून करुया. 'जगा आणि जगू द्या' हे सांगणारे धर्म खरं तर माणसानेच निर्माण केले, धर्माचा अर्थ 'जगण्याची एक सुगम पद्धत' असा मानला तर एकमेकांच्या पद्धतीवर आक्षेप घेण्याचं कारणच काय? परंतु धर्म व्यक्तीनिष्ठ होत गेले आणि व्यक्ती धर्मांध. देशाभिमान-धर्माभिमान ही मूल्यं नक्कीच महत्त्वाची, पण माझाच विचार योग्य, माझाच धर्म श्रेष्ठ, माझाच देव खरा, मी करेन तेच रास्त अशा अनेक पैलूंनी ह्या अहंकाराचे रूपांतर आचारविचारातल्या भ्रष्टाचारात होऊ लागले आहे. कूपमंडूक माणसांनी जातीपातीची झापडंच अजून काढली नाहीत, तर जगाकडे उघडणारी कवाडं त्यांना दिसणार तरी कशी ? एकीकडे माणसाने मंगळावर झेप घेतली, दुसरीकडे त्याचं खुजेपण वाढत चाललं आहे. या विरोधाभासाने विकल झालेल्या पृथ्वीची मनस्थिती कुसुमाग्रज नेमक्या शब्दात मांडतात..
’सूर्यमालेतील सारे ग्रह म्हणाले, 'वाहवा! हे धरे, तू धन्य झालीस निर्मुनीया मानवा'
ती वदे, 'हा मान मोठा-येथली पण संस्कृती(!)मंगळावर ते अमंगळ ना रिघावे केधवा..'

हे दुष्टचक्र भेदायचे तर जगाकडे विशाल वैश्विक नजरेतून पाहायला हवे. माणसांना आनंद देणारा धर्म हवाय, जगणं सोपं करणारा धर्म हवाय. मात्र धर्माचं स्वरूप गूढ आणि कर्मठ असंच राहिलं आहे. मानवाचा माणूस व्हावा हेच धर्माचे उद्दिष्ट असायला हवे. 'येक नाना प्रतिमा। दुसरा अवतार महिमा। तिसरा तो अंतरात्मा। चौथा तो निर्विकारी।' ईश्वर या संकल्पनेबद्दल समर्थांनी सांगितलेल्या आकलनाच्या या पायऱ्या चढता चढता माणसाला ही वैश्विक दृष्टी मिळू शकेल. ती मिळाली तर धर्मग्रंथातील उपदेश आणि आचरण यातली दरी कमी होऊ शकेल.
अध्यात्म जीवनोपयोगी नसेल, तर पुलं थेट म्हणतात, 'शस्त्रक्रियेच्या वेदना कमी करणारा, हुंगरी (अॅनेस्थेशिया)चा शोध हा मला कुठल्याही अध्यात्मिक सूत्रांपेक्षा श्रेष्ठ वाटतो.'

ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल, त्याला सगुण पूजावे की निर्गुण 'जाणावे', यावर वितंडवाद घालण्याऐवजी जगातील सर्वोत्तम मूल्यांचा समुच्चय म्हणजेच 'ईश्वर' असे मानले तर? 'लिव्ह धीस प्लॅनेट बेटर दॅन यू फाऊंड इट' असे एका उद्योगसमूहाचे घोषवाक्य आहे. प्रत्येकाने किमान एवढा प्रयत्न केला तरी 'विश्वस्वधर्म सूर्ये पाहो' म्हणत, समाजाची उपेक्षा पचवणाऱ्या संत ज्ञानेश्वरांनी शतकांपूर्वीच मागितलेले 'विश्वकल्याणाचे' पसायदान साकार होऊ शकेल.



(महाराष्ट्र टाईम्स मधील ’सगुण निर्गुण’ या सदरात १५ फेब्रुवारी २०१४ रोजी प्रसिद्ध झालेला लेख)


यशस्वी नात्याचे आधारस्तंभ...


नातेसंबंध म्हणजे माणसाच्या अस्तित्वाचा पाया. नात्याची अंत:प्रेरणा ही माणसाला मिळालेली अद‍्भुत भेट आहे. जगातले सगळे जीव या सूत्रात बांधले गेले आहेत. जे कृष्णमूर्ती म्हणतात, 'टु बी इज टु बी रिलेटेड अँड टु बी रिलेटेड इज टु बी इन कॉन्फ्लीक्ट.' दोन माणसं एकत्र आली की त्यांच्यात विसंवादाचं का होईना, पण एक नातं निर्माण होतंच. मात्र माणसा-माणसामधलं नातं क्वचितच निकोप आणि सहज असतं; कारण ते निरपेक्ष नसतं.
बहुतेक वेळा आपण समोरच्या व्यक्तीकडे सोयीच्या दृष्टिकोनातूनच पाहतो. नातं जुळलंच तरी ते व्यक्तीसापेक्ष, परिस्थितीसापेक्ष असतं. सगळं अनुकूल असेल तरच ते टिकून राहतं. अशा नात्याने व्यक्ती म्हणून आपण समृद्ध होऊ शकत नाही.

ज्या नात्याने आपण झळाळून उठतो, जे नातं जोडणं किंवा तोडणं आपल्या हातात नसतं ते नातं एकच; माणसाचं आणि ईश्वरी तत्त्वाचं. 'त्वमेव माता च पिता त्वमेव... त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव.'
निरीश्वरवादीदेखील चराचराशी नातं जोडतात. ईश्वर मानणारे त्याची रूपं आयुष्यात आलेल्या प्रत्येक घटकाच्या माध्यमातून अनुभवतात. हे नातं निरपेक्ष असतं. कदाचित म्हणूनच या नात्याची असोशी टिकून राहते, मैत्रभाव उधळून दिला जातो. या नात्यात ऋजुता असते, अहंकार नसतो. या नात्याला अनेक पदर असू शकतात. जगाच्या पसाऱ्यात आपण कुठेही हरवलो, तरी ज्या भूमीशी आपली नाळ जुळलेली असते तिची ओढ तशीच राहते, त्याला आपण माझं गाव, माझा देश अशी नावं देतो.
संतांना 'वृक्षवल्ली सोयरी' वाटू लागते. 'कांदा, मुळा, भाजी अवघी विठाई माझी' भासू लागते. कितीतरी माणसं निसर्गाशी नातं जोडतात. एखाद्या रोपाचं रूजणं, फुलणं, तारकांनी खच्चून भरलेलं आकाश, वाऱ्याची झुळूक, खळाळत वाहणारं पाणी, यात कित्येकजण रमतात. कुणी विज्ञानातल्या कुतूहलांची उकल करण्याच्या पाशात स्वेच्छेने अडकतात. 'नात्यास नाव अपुल्या देऊ नकोस काही... साऱ्याच चांदण्यांची जगतास जाण नाही' असा तो अनोखा, अनामिक बंध असतो. या नात्यांतलं सौंदर्य कायम राहतं; कारण यामागे अपार श्रद्धा असते. या साऱ्या नात्यांत फक्त देणं असतं, घेणं नसतं.

माणसांचं आपसातलं नातं इतकं सहजसोपं व्हायला हवं असेल, तर एकमेकांचा गुण-दोषासकट स्वीकार करता यायला हवा. मानसशास्त्रज्ञ म्हणतात, एकमेकांना दिलेला वेळ, शब्द, एकमेकांवरील विश्वास, श्रद्धा आणि आश्वासक स्पर्श हे कोणत्याही यशस्वी नात्याचे आधारस्तंभ असतात. नातेसंबंधाच्या बाबतीत हे समजून घ्यायला हवं की आपल्याला जे हवं आहे ते आपण कधी दुसऱ्याला दिलं का? हे उमजलं तर तो खरा मैत्रभाव. तो जपला तर आपसूक माणूस निर्वैर होऊ लागतो. वात्सल्य, क्षमाशीलता, करुणा, कळकळ हा त्याचा स्वभावधर्म होतो. मनातला मैत्रभाव बाह्य व्यक्तिमत्त्वात दिसतो. अवघं जगणं सुंदर होतं. आरती प्रभूंच्या शब्दात दडलेला नात्याचा खरा अर्थ गवसतो.
 'अशी पांखरून छाया, लावोनिया माया। आनंदाचे आसू लावी कोण ओघळाया.'

महाराष्ट्र टाईम्स मधील ’सगुण निर्गुण’ या सदरात ८ फेब्रुवारी २०१४ रोजी प्रसिद्ध झालेला लेख

करा साजरा ‘आजचा क्षण’!


'या अठराव्या वाढदिवसाला मला नवी कोरी बाईक हवी म्हणजे हवी', लाडावलेल्या मुलाने आपल्या श्रीमंत वडिलांकडे लकडा लावला होता. वडिलांनी अट घातली, त्यासाठी उत्तम गुणांनी उत्तीर्ण होऊन दाखव. मुलाने अट पूर्ण केली. वडील त्याला रोज एका छान पुस्तकातले उतारे वाचून दाखवत असत. वाढदिवसाच्या दिवशी वडिलांनी मुलाला आशीर्वाद दिला आणि सुंदर वेष्टन घातलेले ते पुस्तक भेट दिले. अपेक्षाभंगाने संतप्त झालेला मुलगा वडिलांचे बोलणे अजिबात ऐकून न घेता ते पुस्तक तिथेच फेकून घर सोडून निघून गेला.

कालांतराने त्याला वडिलांचे निधन झाल्याची बातमी कळली आणि कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी तो घरी परतला. जगाचे अनुभव घेऊन आता तो समंजस झाला होता. कागदपत्रे बघता बघता त्याला वडिलांनी दिलेले पुस्तक सापडले. त्याने सहज पुस्तकाचे वेष्टन उघडले आणि त्यात त्याला बाईकची किल्ली अडकवून ठेवलेली दिसली. मुलाच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू होते; पण आता उशीर झाला होता. एव्हरीवन इज गिफ्टेड, बट सम पिपल डू नॉट ओपन देअर पॅकेज, हे सांगणारी ही गोष्ट...

माणसाचं आणि नियतीचं नातं काहीसं असंच आहे. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आकांक्षांना प्रयत्नांची जोड दिली, तर ती गोष्ट आपल्याला मिळतेच. मात्र ती आपल्याला अपेक्षित असलेल्या वेष्टनात असेलच असे नाही. आपल्या वाट्याला आलेल्या कित्येक गोष्टी केवळ वेगळ्या आवरणात असल्यामुळे आपल्याला त्यांची किंमत कळत नाही. कवी अशोक नायगावकर म्हणतात, 'निसर्ग पाहायला म्हणून निघालो... गाडीच्या खिडकीतून बेटी झाडंच मधे मधे येत होती'... तशी आपली अवस्था असते.
कुणाला कलेची, कुणाला बुद्धिमत्तेची, कुणाला सर्जनशीलतेची, कुणाला रूपाची तर कुणाला असाधारण क्षमतेची, अशा वेगवेगळ्या देणग्या जन्मजात लाभलेल्या असतात. मात्र 'काय नाही' याची यादी करण्यात आपण इतके गुंतलेले असतो की त्यामुळे 'काय आहे' याकडे आपले दुर्लक्ष होते.
 'स्थिती आहे तैशापरी राहे। कौतुक तू पाहे संचिताचे॥'
म्हणणारे तुकाराम महाराज, काय गमावलंय यापेक्षा काय कमावलंय इकडे लक्ष द्या हेच सांगतात.

आनंदात चालणं व आपलं वेगळेपण शोधणं हा जगण्याच्या चकव्यातनं बाहेर पडायचा चांगला मार्ग आहे. वस्तुस्थितीचा स्वीकार द्विधा मनाला शांत करतो आणि नि:शंक मनच प्रगती करू शकतं. ओशोंनी मनाची दोलायमान स्थिती सहज शब्दात मांडली आहे,
'मन का स्वभाव ही कुछ ऐसा है, उसे जो मिल गया वह व्यर्थ हो गया!'
याचं कारण आपण उद्याच्या विचारात इतके हरवतो की 'आजचा क्षण' साजरा करायचा राहूनच जातो.तेव्हा आपल्याला मिळालेला आयुष्याचा सुंदर नजराणा स्वत: उघडून पाहायला हवा, आजच! आत्ता !

(महाराष्ट्र टाईम्स मधील ’सगुण निर्गुण’ या सदरात १ फेब्रुवारी २०१४ रोजी प्रसिद्ध झालेला लेख)