Saturday, November 12, 2022

पूर्ण स्वयंपाक मुलांनी करायचा

 

1st Attempt

होस्टेलमधून घरी आल्यावर प्रत्येक सुट्टी (अगदी प्रिपरेशन लीव्ह असली तरीही) संपायच्या आत एक दिवस (निदान) एक वेळचा #पूर्णस्वयंपाकमुलांनी_करायचा असा मी फतवा काढला. "ए जा बॉ आई, तू फारच सिरियसली घेतेस प्रत्येक गोष्ट. आम्ही जनरल हो म्हणालो होतो." म्हणत त्यांनी यंदाही कुरकूर केली. "ते जनरल बिनरल मला काही माहित नाही, उद्या सकाळी पोळ्यांच्या मावशी अनायासे येणार नाहीयेत तर उद्याचा सकाळचा स्वयंपाक तुम्ही करायचा आहे. शिवाय नुसती बटाट्याची भाजी आणि वरण भात चालणार नाही. ते करून झालंय मागच्या वेळेला. "असं मी ठणकावलं."पुढच्या सुट्टीत करू नं! परवा पावभाजीला सगळं मीच तर चिरुन दिलं होतं", "आणि बिर्याणी केलीस तेव्हा मी सगळी मदत केली होती त्याचं काय! हे पूर्ण स्वयंपाक करायचं काय काढलंय" वगैरे निषेधाचे सूर सुरु झाले होते.  

मग त्यांना सांगितलं की आपण मदत करण्याविषयी बोलत नसून संपूर्ण स्वयंपाक करण्याबद्दल बोलतोय. अगदी मेनू ठरवण्यापासून ते मागचं आवरण्यापर्यंत सगळं तुम्ही करायचं आहे. "अगं पण आता यू ट्यूबवर पाहून करता येतं सगळं वेळ आली तर""ते एडिटेड असतं, बारीक बारीक गोष्टी स्वत: केल्याशिवाय कळत नाहीत, यावर आता चर्चा बंद म्हणजे बंद"

आता ही बाई ऐकतच नाही हे पाहून त्यांनी बाबा, आजी, आजोबांचा आधार घेऊन पाहिला. त्या त्रयीने माझ्याकडे अलका कुबल टाईपचा भावपूर्ण कटाक्ष टाकला पण मी दुष्ट बाई होत म्हटलं ," इतकी हृदयात कालवाकालव होण्याइतकं स्वयंपाक करायला लावण्यात काहीही गंभीर नाहीये. आज मी तिकडे पाऊलही टाकणार नाहीये, हां, फक्त कन्सल्टन्ट म्हणून त्यांना मी उपलब्ध आहे"

इलाजच नाही म्हटल्यावर मुलांनी फ्रीजमध्ये डोकावून पाहिलं असावं. 

"यात फक्त तोंडली आहेत आपल्याला करणेबल"

" मॅड त्याला दोडकं म्हणतात" वगैरे तारे आपसात तोडले गेले. अखेर ’तोंडलं व दोडकं दोन्ही नसलेल्या गिलक्याची भाजी, पोळी, बीटाची कोशिंबीर, आमटी आणि भात’ असा त्यांचा मेनू ठरला. 

मी जवळच्या खोलीत जाऊन लॅपटॉप घेऊन एकीकडे कानोसा घेत कामाला सुरुवात केली. 

जगातली आय मीन घरातली बहुतेक भांडी ओट्यावर आली. टडाम टुडूम आवाज येत होते. अस्वस्थ होऊन आजी एक चक्कर मारून गेल्या असाव्यात कारण  मुलांनी बाणेदारपणे आजीला "आज्जी इकडे येऊ नकोस बरं" म्हणून बजावल्याचं ऐकलं. एक गिलकं चिरून मला अप्रूव्हलसाठी दाखवण्यात आलं.  माणशी २ पोळ्या धरल्या तर किती कणिक लागेल याची विचारणा झाली.  प्रत्येकी ३ पोळ्या करणं कंपलसरी केलं होतं. जरा दया आल्याने "बाकीच्या मी करीन" असा मी दिलासा दिला पण त्याला स्पष्ट नकार मिळाला.

 फोडणीसाठी गॅसवर ठेवलेलं तेल तापत आलं तरी भाजीला योग्य चमचा सापडत नसावा. "तापलं  तापलं, आता त्या बटाट्याच्या भाजीच्या सीक्वेन्सनेच सगळं टाकू का, आई, लवकर सांग हे फुटतंय" -लेक ओरडला." त्याला तडतडणं म्हणतात, आधी गॅस कमी कर , मोहरी जळेल"- बाहेर येत मी.

साधारण या चालीवर भाजी झाली. यात दाण्याचं कूट, डाळी काय काय घालता येऊ शकतं, त्याने चवीत काय फरक पडतो याची, दाल फ्राय येत असल्याने त्यात आणि आमटीत काय फरक असतो याचीही चर्चा झाली.कुकर आधी लावला असता तर एकीकडे भाजी आणि दुसरीकडे आमटी टाकता आली असती , कणिक मुरली असती अशी त्यांची ट्यूब पेटली. 

पहिल्या पोळीचा खाकरा झाला, दुसर्‍या पोळीने तवा सोडायला नकार दिला, तिसरी बरी झाली. चौथी फुगली याचा आनंद उड्या मारून साजरा करण्यात आला तेव्हा बाजूला भाजी शिजतेय तिकडे अधूनमधून पाहायचे असते याची मी ओरडून आठवण केली. भांड्यांच्या ढिगात चिमटा अदृश्य झाल्याने ’आई झाकण कसं काढू , झाकण लावतातच कशाला" प्रश्न आले. कपड्याने झाकण उचलताना हातावर थोडी वाफ आली म्हणून स्वत:भोवती गिरकी घेऊन एकाचा हाई हुई करत झुंबा करून झाला. हाताला लागू न देता बीट किसण्याचे प्रात्यक्षिक झाले. कोणत्या कोशिंबिरीत काय काय घालायचं यावर चाललेल्या बडबडीचे, मध्येच एकमेकांवर डाफरण्याचे , खी खी करण्याचे, झाकण, वाट्या टणटणत खाली पडण्याचे आवाज ऐकू येत होते. कोणत्या पदार्थासाठी कुकरच्या किती शिट्ट्या आणि नंतर गॅस बारीक करायचा का, असा मी बसलेल्या खोलीत डोकावून प्रश्न विचारण्यात आला. यावरची वैज्ञानिक खडाजंगी फेसबुकवर वाचा सांगितलं तर ’बरंय इन्स्टावर असलं काही नसतं’ असं उत्तर आलं.  

"ओट्यावरचा राडा आवरला का , ओला कचरा बिनमध्ये टाकला का"-यावर काहीच उत्तर आलं नाही.  

"चला लवकर सगळे, बनलं जेवण"  मुलांनी ऐटीत घोषणा केली.

"त्याला ’स्वयंपाक झाला किंवा केला’ असं म्हणतात. मग हे पदार्थ आपण खाल्ले की त्याला ’जेवण झालं’ असं म्हणतात"

 "बरं आता ग्रामर नको बॉ आई, कसा झालाय ’स्व  यं  पा  क’ ते सांग"

व्याकरण, स्वयंपाकाशी जुळलेली कितीतरी क्रियापदं- शब्द, पदार्थांची नावं, भाज्या डाळी ओळखता येणं, किती प्रमाण घ्यायचं त्याचा अंदाज येणं, केलेलं नीट वाढता येणं हे सगळं ते कधीतरी शिकतील, न शिकतील, पण त्याचा त्यांना आनंद घेता यायला हवा. नाही घ्यावासा वाटला तरी स्वयंपाक म्हणजे खायचं काम नाही हे तरी कळावं. मध्ये मी त्यांना एक व्हिडिओ फॉरवर्ड केला . भाकरी करून द्यायला आई-बाप जवळ नाही म्हणून शाळा सोडायची वेळ आलेली उसतोडणी कामगारांची मुलं होती त्यात. त्या लहानग्यांना भाकरी शिकवतानाचा व्हिडिओ पाहून भरून आलं. प्रत्येकाला आपल्यापुरती तरी भाकरी थापता आली पाहिजे हे खरंय. 

स्वयंपाक खरंच चांगला झाला होता. बाबा आणि आजी आजोबांनी अगदी बोटं चाटत प्र चं ड आणि मी थोडंफार कौतुक केलं. "संध्याकाळी तुम्ही म्हणाल ते करीन जेवायला" अशी मी रिटर्न गिफ्ट ऑफर केली. मुलांनी जेवताना कॅलेंडरकडे पाहिलं. पुढच्या सुट्टीला किती वेळ आहे ते पाहत असावेत. तेव्हा काय मेनू सांगावा ते विचारीन इकडे  😊

Saturday, October 29, 2022

भविष्यातला सोशल मिडिया कसा असेल ! - व्हाईट स्पेस दिवाळी अंक 2022

सोशल मिडियाचा प्राण म्हणजे लाईक, कॉमेंट, शेअर हे त्रिकूट. कोणी काही म्हणो, इथे लोक जे काय पोस्ट करतात ते स्वान्तसुखाय वगैरे नाही तर लाईक मिळवण्यासाठी, एखाद्या पोस्ट वर मत देतात ते व्यक्त होण्याच्या नैसर्गिक इच्छेतून आणि शेअर करतात ते ’शहाणे करून सोडावे सकळ जन’ या भावनेतून. सोशल मिडियाचा श्वास म्हणजे फोमो (फीअर ऑफ मिसिंग आऊट). पॅट्रीक मॅगगिनीसने हार्वर्ड बिझनेसच्या नियतकालिकात पहिल्यांदा वापरलेला हा शब्द.आपल्या आजूबाजूच्या रंगीबिरंगी अनुभवसृष्टीतून आपण वगळले तर जात नाही आहोत ना, इतरांना माहित आहे आणि आपल्याला नाही असे काही घडले तर नाहीये ना, या चिंतेत आपण इतके गुंतून जातो की सोशल मिडियात सतत डोकावत राहणे ही आपली भावनिक गरज होऊन बसते. भविष्यात तंत्रज्ञानात कितीही क्रांती झाली आणि सोशल मिडिया कितीही बदलला तरी या चौकडीला मरण नाही. मग बदलणार आहे ते नेमके काय हे समजून घेण्याआधी आजचा सोशल मिडिया कुठले तंत्र वापरतो ते जाणून घेऊया.

समजा तुम्ही एखाद्या कॉलेजमधल्या मित्राशी व्हॉट्सअ‍ॅप कॉलवर बोलत आहात. त्याने त्याच्या कंपनीतल्या एका माणसाबद्दल तुम्हाला काहीतरी सांगितले. या माणसाबद्द्ल तुम्ही आज प्रथमच ऐकले आहे. नंतर तुम्ही फेसबुक उघडता तेव्हा या माणसाचे नाव तुम्हाला अचानक ’पीपल यू मे नो’ मध्ये दिसू लागते.

किंवा समजा तुम्ही गोव्याला जाणार्‍या विमान किंवा रेल्वेबद्द्ल इंटरनेवर सर्च केले तर तुम्हाला प्रत्येक सोशल मिडियावर अचानक गोव्यातील हॉटेल्स, सेवा कंपन्या  किंवा गोव्यातील दुकानांच्या जाहिराती दिसू लागतात.

इतकेच काय एखादी गर्भार स्त्री डिपार्ट्मेंटल स्टोअरमध्ये लहान मुलांना लागणार्‍या वस्तूंपाशी जास्त रेंगाळली तर तिच्या सोशल मिडियावर या वस्तूंच्या जाहिरातींचा भडिमार होऊ लागतो. तिचे हे गुपित तिच्या जवळच्यांना माहित असेल, नसेल पण सोशल मिडियाला कळलेले असते. 

या अद्भुत तंत्रज्ञानाला आर्टीफिशल इंटेलिजन्स असे म्हणतात. 

समजा तुम्ही ट्वीटरवर एखादी कॉमेंट रागीट शब्दात केली तर तुम्हाला तुमच्या फीडमध्ये त्या विषयाच्याच जास्त पोस्ट दिसू लागतात. 

तुम्ही एखाद्याच्या पब्लिक पोस्टवर जाऊन काही मत व्यक्त केले तर त्या व्यक्तीच्या पोस्ट तुम्हाला वरचेवर दिसू लागतात.

दुसर्‍या बाजूला सतत पोस्ट करणार्‍या मित्रांच्या नव्या पोस्ट्स येऊन गेल्याचे तुम्हाला कळतही नाही. मित्र सारखे असले तरी प्रत्येकाला वेगळा कंटेंट पाहावयास मिळतो, तुमचा स्वभाव आणि आवड लक्षात घेऊन तो डिझाइन केलेला असतो.  हे सगळे ज्या तंत्ररचनेमुळे घडते त्याला अल्गोरिदम म्हणतात.  

दोन वर्षांपूर्वी ‘द सोशल डिलेमा’ हा जेफ ओर्लोवस्की दिग्दर्शित केलेला माहितीपटवजा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. कथानकाशिवाय ‘फेसबुक’वरच्या लाईक बटनचे जनक जस्टीन रोसिस्टीन, सेंटर फॉर ह्युमन टेक्नोलॉजी’चे संस्थापक ट्रिस्टन हॅरीस, ‘पिंटरेस्ट’चे माजी अध्यक्ष टीम केंडल वगैरेंच्या मुलाखती त्यात आहेत. आपल्यावर म्हणजेच सोशल मिडीया वापरणार्‍या प्रत्येकावर, वर स्पष्ट केलेल्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि अल्गोरिदम या दोन गोष्टींचा इतका प्रभाव पडतो की त्यामुळे आपले सोशल मिडियावरचे वागणे, व्यक्त होणे अगदी विचार सुद्धा बदलू शकतात.  ‘दि वॉल स्ट्रीट जर्नल’ने जगातल्या अनेक राजकीय पक्षांप्रमाणेच भारतात फेसबुकचा वापर सत्ताधारी पक्षाने स्वतःच्या फायद्यासाठी केल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. याकडे लक्ष वेधणार्‍या विरोधकांनी स्वत:चेही आयटीसेल तयार केले आहेत आणि ते सक्रीय असतात. आपल्या लाईक्स, कॉमेंट्सवरून  आपला राजकीय कल ओळखून त्यानुसार आपले मन वळवणार्‍या किंवा मनावर पूर्वीचे मत बिंबवणार्‍या  जाहिराती आणि पोस्ट दिसू लागतात. याचा परिणाम थेट निवडणूक निकालावर होताना दिसून येतो इतकी ही प्रणाली प्रभावी आणि तितकीच भीतीदायक आहे. 

सोप्या भाषेत सांगायचे तर आपण सोशल मिडियाच्या हातातले प्यादे आहोत. हे व्हायला नको असेल तर ! तर आपल्याला सोशल मिडिया वापरणे बंद करावे लागेल. ते आता शक्य आहे का ! अर्थातच नाही कारण आपली मनोरंजनाची गरज, नेटवर्किंगची गरज, माहिती मिळवण्याची गरज, आपल्या विचारांना, सेवा व्यवसायाला, उत्पादनाला प्लॅटफॉर्म मिळवण्याची गरज इतकेच काय स्वत:ची प्रतिमानिर्मितीची गरज भागवायची असेल तर सोशल मिडीयाला पर्याय नाही. गंमत म्हणजे आपण इथे वापरले जात आहोत पण आपल्याला यूजर म्हटले जाते. अर्थात द सोशल डिलेमा’ मध्ये म्हटले आहे की, एखाद्या व्यक्तीला ‘यूजर’ म्हणणारे केवळ दोनच व्यवसाय या जगात आहेत आणि ते म्हणजे ‘ड्रग्स व्यवसाय’ आणि ‘सॉफ्टवेअर’. 

---------------- 

या पार्श्वभूमीवर आपले म्हणजे यूजरचे सोशल मिडियाशी नाते ’तुझे माझे जमेना तुझ्यावाचून करमेना’ असे आहे. 

हे नाते भविष्यात आपले अधिक शोषण करेल की आपल्या खासगी स्पेसचा मान ठेवेल! सोशल मिडीयाचे स्वरुप आगामी काळात नेमके कसे असेल. कोणे एके काळी प्रचलित असलेले ऑर्कुट आज गायब झाले आहे. यूजर साठी ’फेसबुक आजीवन मोफत असेल’ असा दावा करणार्‍या फेसबुकच्या स्वत:च्या जीवनाचे काय? ते दीर्घकाळ टिकून राहील का ! मोबाईलचा सर्वाधिक वापर लोक सोशल मिडीयाशी जोडलेले राहण्यासाठी करतात मग येत्या काळात यासाठी मोबाईल वापरणे आवश्यक राहील की तंत्रज्ञानात मोठे बदल होतील , वैयक्तिक, व्यावसायिक आणि सामाजिक कंटेंटकडे सोशल मिडिया कसा बघेल, सोशल मीडियाचे भविष्य कसे असेल, अशा विविध प्रश्नांची उत्तरे आपण या लेखातून शोधणार आहोत. 

तंत्रज्ञ आणि माध्यमतज्ज्ञांच्या मते आगामी काळात घडणारे मह्त्वाचे बदल कोणते ते पाहूया.

 १.. AR मोठ्या प्रमाणात वापरले जाईल. मुख्य प्रवाहात येईल - 

“एआर म्हणजे ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी आणि व्हीआर म्हणजे व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी. ए-आर चे उदाहरण म्हणजे पोकेमॉन-गो सारखे गेम्स. यात कॅमेरा वापरून वास्तव जग कॅप्चर केले जाते व त्याचे डिजिटल रुपांतरण केले जाते. याउलट व्हि-आर मध्ये एक पूर्णपणे नवे आभासी जग तयार केले जाते, हेडसेटच्या मदतीने दृश्यानुसार विशिष्ट आवाजाचा वापर करून ते खरे असल्याचा भास निर्माण केला  जातो.  उदा: हे तंत्र वापरून पायलटला विमान चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाते.  

गुगल लेन्ससारख्या माध्यमातून आपण एआर आताही अगदी दररोज वापरतो आहोत पण ह्याला ए-आर म्हणतात हे माहित नसते. समजा तुम्ही इन्स्टाग्राम वापरत असाल तर मूळ फोटो किंवा व्हिडिओ रंजक व्हावा म्हणून  काही कृत्रिम गोष्टी किंवा फिल्टर्स त्यात मिसळता म्हणजेच तुम्ही AR वापरता. परंतु सोशल मीडियावरील AR चे ऍप्लिकेशन्स फक्त यापुरतेच मर्यादित राहणार नाहीत. समजा तुम्हाला तुमच्या घरातील एखाद्या खोलीसाठी फर्निचर घ्यायचे आहे तर प्रत्यक्ष खोली कॅमेर्‍यात क्लिक करुन त्यात फर्निचरची वेगवेगळी रचना तुम्हाला दाखवली जाईल. त्यामुळे निवड करणे सोपे होईल आणि तुम्ही ही सोय असलेल्या पोर्ट्लवरून खरेदी कराल. काही अ‍ॅप्स ही सुविधा आताच देऊ लागले आहेत जी येत्या काळात सार्वत्रिक होईल. ए-आर हा आपल्या सोशल मिडियाचा अविभाज्य भाग होईल.

२. वैयक्तिक माहिती जतन करण्याला आणि खासगी निवडीला प्राधान्य मिळेल. सोशल मीडिया आपल्या जीवनातील प्रत्येक पैलूला वेढून घेईल. 

आपण सध्या थर्मोस्टॅट्स वापरतो. उदा: फिटबिट सारखी फिटनेस टूल्स आपण घड्याळासारखी वापरतो. अशी गॅजेट आपली नाडी बघतात , हृदयाचे ठोके तपासतात, आपण किती वेळ झोपलो ते सांगतात. आपण किती वेळा आणि किती वेगाने धावतो हे Nike च्या बुटांना माहीत असते. ही फक्त सुरुवात आहे. थोड्या डेटाच्या बदल्यात वैयक्तिक माहिती पुढे आपल्याला याहून सहज उपलब्ध असेल. ती ही हव्या त्या वेळी हवी तिथून म्हणजेच हव्या त्या ब्रँडकडून, घड्याळाद्वारे किंवा कॉन्टॅक्ट लेन्सवर देखील मिळू शकेल. त्यासाठी मोबाईलच जवळ हवा अशी गरज राहणार नाही. सोशल मिडीयाचे मास मिडियात रुपांतर होईल. दुसरीकडे आपण जसे एका जीमेल आयडीवरून गुगलच्या अनेक सेवा वापरु शकतो तसे आपल्या एका जागी ठेवलेल्या डाटाला वेगवेगळ्या पद्धतीने हाताळायचे अधिकार भावी सोशल मिडियावर आपल्याला अधिक मिळतील. 

३. यूजरचे मॅपिंग मोठ्या प्रमाणात होईल. 

आपण विविध वेबसाइटवर सर्फिंग करताना ते किती वेळ केले, त्यावर काय पाहिले , किती वेळा पाहिले याची आजही नोंद होते. ब्लॉग किंवा ई-मेल यूजरचे लिंग, वय हे देखील विचारात घेतले जाते. मोठे ऑनलाइन जाहिरातदार यूजरने पाठविलेले मेल स्कॅन करून त्यातील मजकुराच्या अनुषंगाने जाहिराती पाठवतात. या पाठलाग किंवा टेहळणीलाच मॅपिंग हा गोड शब्द आहे. उदा: आपण इमेल किंवा चॅटमध्ये व्हॅकेशन किंवा सुट्टी असा शब्द वापरला असेल तर आपल्याला प्रवासी कंपन्यांच्या जाहिराती दिसू लागतात. यापुढे ही प्रणाली अजूनच आक्रमक होईल. आपल्यावर सतत नजर ठेवली जाईल, प्रत्येक क्षण सतत ट्रॅक केला जाईल व आपल्याच डाटाचा स्रोत म्हणून अधिकाधिक वापर होत राहील म्हणजेच तो डाटा मोठ्या प्रमाणात बँकिंग, वित्तसेवा, इन्शुरन्स, ई-कॉमर्स, पर्यटन, मनोरंजन आदी क्षेत्रांना विकला जाईल. 

सोशल मिडीया मोफत नाही, त्याचे बिल आपण आपल्याच डाटाच्या रुपात पुढेही भरत राहणार आहोत.  विविध उद्योगात मॅपिंगचा बराच वापर होण्याची शक्यता आहे. उदा: विक्री न झालेला स्टॉक सोशल मीडिया आणि मॅपिंगच्या माध्यमातून  खुला करणे, टेस्ट ड्राइव्हसाठी निमंत्रित करणे असे प्रकार करून वाहन उद्योग स्वतःची भरभराट करून घेऊ शकतात.

४. ’थांबला तो संपला’ त्यामुळे लवचिक तंत्रज्ञान टिकून राहील-

आज फेसबुक सोशल मिडियाचा राजा आहे. जगभरात त्याचे १.७ अब्ज वापरकर्ते आहेत. ७२% इंटरनेट वापरकर्त्यांकडे फेसबुक खाते आहे. लवचिक धोरण ठेवलेले असल्याने फेसबुक आगामी काळात टिकून राहील मात्र त्याचे रुपडे अगदी वेगळे असेल. Twitter, Instagram आणि Snapchat चे आयुष्य तुलनेने मर्यादित असेल. कदाचित आजपासून दहा वर्षांनी किशोरवयीन मुले "ट्विट" शब्दाचा अर्थ काय ते शोधतील. फेसबुक काळानुसार आणि गरजेनुसार बदलत राहील. त्यात सतत नवनवीन वैशिष्ट्ये दिसत राहतील. काही नवे प्लॅटफॉर्म येऊ शकतील. ते कसे असतील हे  आताच सांगता येणे अवघड असले तरी ते होलोग्राम, वेअरेबल तंत्रज्ञान किंवा व्ही आर चष्म्यांच्या माध्यमातून वापरले जातील. होलोग्राम म्हणजे त्रिमितीय प्रतिमा, वेअरेबल म्हणजे परिधान करता येणारे तंत्रज्ञान. आपला कुर्ता किंवा त्यावरील एखादे बटन, शरीरावर बसवलेली इलेक्ट्रॉनिक चिप असे त्याचे स्वरूप असेल. विचित्र वाटते आहे ना! काही वर्षांपूर्वी आपण रस्त्याने फोनवर बोलत हवे तिथे जातो आहोत हे देखील विचित्र आणि अकल्पनीय वाटत होते. 

५. जगाचे राजकारण आणि राजकीय जग यात सोशल मिडियाच्या साहाय्याने प्रचंड उलथापालथ होत राहील. 

डिसेंबर 2010 मध्ये ट्युनिशियामध्ये लोकशाही स्वरुपाचा नागरी उठाव सुरू झाला. त्याने मध्य पूर्वेत कितीतरी घडामोडी झाल्या. या उठावामुळे ट्युनिशिया, इजिप्त आणि लिबिया सारख्या देशांतील शासकांना सत्ता सोडणे भाग पडले. ट्विटर आणि इतर सोशल मीडियाच्या मदतीने लोक दडपशाहीचा निषेध करून त्या विरोधात क्रांती करु शकले. ब्लॅक लाईव्हज मॅटर किंवा मीटू सारख्या विविध हॅशटॅग चळवळींनी ’पर्सनल इज पॉलिटीकल’ हे सिद्ध करायला मदत करत महत्वाचे सामाजिक प्रश्न ऐरणीवर आणले आहेत. यूजरच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने भविष्यात असे ट्रेंड मोठ्या प्रमाणावर सुरु होतील.

दुसर्‍या बाजूला हेच माध्यम घातपाती ठरण्याचा धोका देखील वाढेल. आज बहुतांशी दहशतवादी कारवायांचे नियोजन सोशल मिडियावरील ग्रुपच्या माध्यमातून केले जाते आणि काम होताच तो ग्रुप डिलिट केला जातो. 

आगामी काळात नव्या टूल्सच्या साहाय्याने या कारवाया वाढण्याची शक्यता आहे. फेक आयडीवर नियंत्रण मिळवता आले तरच याला वेसण घालता येईल परंतु हे सोपे नाही.  आज तब्बल १.७ अब्ज सक्रिय फेसबुक वापरकर्ते आहेत, त्यापैकी 82 टक्के यूएस आणि कॅनडाबाहेरील आहेत. ट्विटरवर 270 दशलक्ष सक्रिय वापरकर्ते आहेत, दररोज, 4 अब्ज व्हिडिओ YouTube वर पाहिले जातात आणि 6 कोटी फोटो इंस्टाग्रामवर अपलोड केले जातात. सातत्याने वाढत चाललेली ही अवाढव्य आकडेवारी पाहिली तर सोशल मिडियाची ताकद लक्षात येईल. 

येत्या ४ ते ५ वर्षात जगातील २.४४ अब्ज लोकसंख्या सोशल मिडियावर असेल. राजकीय क्षेत्रात सोशल मिडीया विश्लेषकांच्या मदतीने त्यावर आलेल्या नवनव्या टूल्सचा वारेमाप वापर केला जाईल. दहा वर्षांनी सोशल मीडियाचा वापर सर्वव्यापी होईल. 

६. सोशल मिडियामुळे अर्थजगत, व्यवसायाचे जग आमूलाग्र बदलेल -

सध्या सोशल मिडिया कंपन्या जाहिरातबाजीसाठी इन्फ्ल्युअर्सना भरपूर पैसा देतात. इन्फ्ल्युअर्स म्हणजे ग्राहकावर प्रभाव टाकू शकणार्‍या व सोशल मिडीयावर प्रचंड चाहते असणार्‍या वलयांकित व्यक्ती. कलाकार, खेळाडूंचे प्रमाण यात जास्त असते. उदा: विराट कोहलीने घातलेल्या ब्रँडचा टीशर्ट आपल्याकडे असावा किंवा प्रियांका चोप्राच्या हातात दिसली तशी पर्स आपल्याकडे असावी असे त्यांच्या चाहत्यांना वाटते. येत्या काळात मायक्रो व नॅनो इन्फ्ल्युअर्सना महत्व मिळू लागेल. यांचे फॉलोअर्स कमी असले तरी ते अधिक खोलवर विचार करणारे व त्या व्यक्तीचे निकटवर्तीय समजले जातात. मोठे इन्फ्ल्युअर्स लाखो लोकांवर प्रभाव पाडत असले तरी प्रत्यक्षात त्यातले काही शे लोक खरेदी करतात. मायक्रो इन्फ्ल्युअर्स काही हजारांवरच प्रभाव पाडत असले तरी अंतिम खरेदी करणार्‍यांची संख्या साधारण सारखीच असते. मायक्रो इन्फ्ल्युअर्सना तुलनेने कमी व नॅनो इन्फ्ल्युअर्सना त्याहून कमी पैसे द्यावे लागतात असे हे गणित असणार आहे. सोशल मिडीयावर विशिष्ट जाहिरातींवर घुटमळणार्‍या ग्राहकांना हेरून चॅटबॉटच्या मदतीने ’मदत हवी का’विचारले जाते आणि या संवादातून संभाव्य ग्राहक तयार होतात.  असे चॅटबॉटचे अजून आधुनिक आणि वेगवान पद्धतीने काम करतील. स्टोरीज, स्टेटस याचे महत्व वाढेल व त्यासाठी अनेक सुविधा देऊन त्याचे आकर्षण वाढते ठेवले जाईल. लाईव्ह व्हिडिओचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाईल. प्रत्यक्ष संवाद साधता येत असल्याने त्यात असलेला जिवंतपणा ग्राहकाला अधिक भावतो त्यामुळे हे तंत्रज्ञान अत्याधुनिक होईल. 


७. ब्रेकिंग न्यूजचे चे स्वरूप पूर्णपणे बदलेल -कंटेंट (माहिती) अगदी थोडक्यात आणि वेगात पोचवली जाईल.

कोरी बर्गमन,  या ’ब्रेकिंग न्यूज’ च्या सह-संस्थापकांच्या मते घडलेल्या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार शेकडो व्हिडिओ अपलोड करतील. ही माहिती एका व्हिडिओत समाविष्ट करून अशा प्रकारे दाखवली जाईल की जणू आपण त्या वेळी घटनास्थळी उपस्थित राहून सगळे काही प्रत्यक्ष अनुभवत आहोत. आपण त्या घटनेचाच भाग आहोत. उदा: एखादा अपघात घडला तर तो कसा घडला असेल याचे सध्या ग्राफीक्स दाखवले जातात. त्याचे अनेक व्हिडीओ अपलोड झाल्यानंतर त्यातून असा काही परिणाम साध्य होईल की बघणार्‍याला आपण तो अपघात होताना पाहत आहोत असा अनुभव येईल,. एकूणच प्रत्येक अनुभव तुम्हाला अधिकाधिक थेटपणे घेता यावा यावर भर दिला जाईल. 

टीव्ही वाहिन्यांवर ५ मिनीटात १०० बातम्यांचा पाऊस यासारखे प्रकार आधीच सुरु आहेत. येत्या काळात जेन-झी म्हणजेच टीनएज ते पंचविशी या वयोगटातली जनरेशन झेड शॉर्ट्स (कमी वेळेतले छोटे व्हिडिओ) ला प्राधान्य देईल. नामवंत ब्रँड्स ग्राहकांची काळजी थेट सोशल मिडीयावरून घेतील. जाहिरातविश्व त्यावर विसंबून राहील. तातडीची मदत हवी असल्यास ती येथेच उपलब्ध असेल. ऑडिओ तंत्रज्ञान मुख्य प्रवाहात येईल. 

८. सोशल मिडिया वापरण्याची आयुधे  वेगळी असतील कारण तंत्रज्ञानात अफाट बदल होतील

जेरेमी गोल्डमन हे “गोइंग सोशल” या फायरब्रँड ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणतात, दूरसंवाद आणि अनेक कामे प्रामुख्याने आवाजाच्या साहाय्याने सूचना देऊन होतील. आता आपण अ‍ॅलेक्सासारख्या सुविधा पाहतोय त्या बाळबोध वाटतील इतके तंत्रज्ञान प्रगत होईल आणि कीबोर्ड, लॅपटॉप, टॅब, स्मार्टफोन हळूहळू कालबाह्य होऊ लागतील. नोकियाचे सीईओ पेक्का लुन्डमार्क यांच्या मते ए-आर आणि व्हि-आर (ऑगमेंटेन्ड रिऍलिटी आणि व्हर्चुअल रिऍलिटी) यावर  आधारित प्रणाली स्मार्टफोनची जागा घेईल. माणसाच्या शरीरातच एखादी इलेक्ट्रॉनिक चिप इन्स्टॉल केली जाईल. त्यांचा हातच विशीष्ट ठिकाणी स्पर्श करून स्मार्टफोनसारखा वापरता येईल. इलेक्ट्रॉनिक टॅटू जैवतंत्रज्ञानावर संशोधन सुरु झाले आहे. ओटिस किमझे हे सिंपली मेजर्डचे संचालक भविष्यातल्या सोशल मीडियाबद्दल बोलताना म्हणतात, तो आपल्या कपड्याच्या फॅब्रिकचा भाग असेल किंवा आपण घालतो त्या चष्म्याचा किंवा आपण घातलेल्या बुटाचा सुद्धा. गॅझेट्स हे यापुढे आपल्या हातात धरण्यासाठी उपलब्ध नसतील तर आपल्या स्वतःचा भाग असतील." 

VR म्हणजे व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीचा वापर प्रचंड वाढेल. उदा: एखादे चित्र-प्रदर्शन आपण एकेक दालन पार करत प्रत्यक्ष पाहत असल्यासारखे फिरु शकू. हे काही प्रमाणात आजही घडते आहे. मनोरंजनाच्या मैफिली, क्रीडा इव्हेंट, शिक्षण, पर्यटन, प्रवास, व्यावसायिक मीटिंग, डॉक्टरांच्या भेटी आणि बरेच काही व्ही आर द्वारे नियंत्रित केले जाईल. 

या दशकाच्या अखेरीस ६जी येईल. दुसर्‍या बाजूला बायोमेट्रीक तंत्रज्ञान विकसित होते आहे त्यामुळे प्रत्यक्ष व्यक्तीऐवजी त्याचे होलोग्राम म्हणजे त्रिमितीय प्रतिमा संवादात भाग घेऊ शकतील. एलॉन मस्क यांची कंपनी न्यूरॉलिंक कॉर्पोरेशन या तंत्रज्ञानावर काम करते आहे. या न्यूरो तंत्रज्ञानात काम करणाऱ्या कंपनीच्या वतीने मानवी शरीरात इम्प्लांट होऊ शकतील असे ब्रेन मशीन इंटरफेस (BMI) विकसित केले जात आहेत. 

९. मानवी वर्तनात बदल होतील. तंत्रज्ञानातील प्रगती धोकादायक ठरू शकेल.

जगभरात हायपर-रिअलिझम हा आधीपासूनच सोशल मीडियाचा एक प्रमुख घटक आहे. सोशल मीडिया सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात अक्षरश: घुसला आहे. त्यामुळे त्याच्या वर्तनात असंख्य बदल झाले आहेत. लाईक्सचा आकडाखाली गेला तर निराश वाटणे, कोणी विरोधी कॉमेंट केली तर बेचैन होणे, कटू प्रतिक्रियेने अस्वस्थ होऊन आक्रमक उत्तर देणे, सहज उपलब्ध झालेला पॉर्न आशय स्क्रोल् करताना वारंवार दिसत राहिल्याने  त्याची चटक लागणे, स्वत:ची माध्यमातील आकर्षक प्रोफाईल आणि प्रत्यक्ष व्यक्तिमत्व यातील फरकामुळे नकारात्मक वृत्ती वाढीस लागणे वगैरे दुष्परिणाम सहज दिसून येत आहेत. येत्या काळात आपली कार्यप्रवणता आणि कार्यक्षमता अधिक कमी होत जाईल. ए-आर , व्हि-आर मुळे सगळे काही हातात येऊन आपल्यातल्या सर्जनशीलतेला फारसा वाव मिळणार नाही. 

आपल्या राज्यघटनेने १९ (१) (अ) नुसार प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. स्वातंत्र्याबरोबरच मर्यादाही राज्यघटनेत नमूद केल्या आहेत. पण, त्याची नेमकी अंमलबजावणी सोशल मिडीयावर होताना दिसत नाही. मुळात त्यावरील माहितीचाअ विचार करता सत्यता आणि अचूकपणा यासारख्या तत्त्वांचा तिथे अनेकदा अभाव असल्याचे दिसते. माहिती हे आता नवे चलन म्हणून वापरले जात असल्याने व्ह्यूज वाढण्यासाठी एकांगी, सनसनाटी निर्माण करणारा बटबटीत आशय वाढत जाणार आहे.  अशा माहितीचा इतका भडीमार अपल्यावर होतो आहे की माहिती साठवणे  हे आजच मेंदू समोरील एक आव्हान आहे. तिचे आकलन आणि विश्लेषण करणे यातच मेंदूचा बराच वेळ आणि उर्जा खर्च  होत असल्याने मेंदू शिणून पुढील प्रक्रिया थांबवतो. थोडक्यात आपण डोके वापरणे कमी करतो आणि जे दिसेल, पोस्ट होईल ते तसेच्या तसे स्वीकारू लागतो. येत्या काळात मानवाच्या  आकलन व विश्लेषण क्षमतेवर सोशल मीडिया चे  दूरगामी परिणाम होणार आहेत. मानवी भावनांमध्येही विस्कळीतपणा आणि रुक्षपणा वाढत जाणार आहे. 

सोशल मिडियाचे अर्थकारण मानवी भावनांवर चालते त्यामुळे या परिणामांशी सोशल मिडीयाला आजही देणेघेणे नाही व पुढेही नसेल, उलट भावना जितक्या तीव्र तितके सोशल मिडीयाचे अल्गोरिदम अचूक काम करतात आणि त्यावर आपली पोळी भाजून घेतात. त्या भावनांना अनुकूल अशा पोस्ट्स यूजरला दिसू लागल्या की तशी सांख्यिकीमध्ये नोंद होऊन जाहिरातदाराला पोच मिळाल्याचे समाधान सोशल मिडीया देतो. भावनिक गुंत्यात जास्त यूजर जास्त काळ सोशल मिडिया वापरत राहतात आणि सोशल मिडियाला तेच हवे आहे. 

या पुढची पायरी म्हणजे आयबीएमने  मेंदूतील स्मृतीकक्षामध्ये एका चिपमध्ये सेव्ह करता येतील अशा तंत्रज्ञानाचे पेटंट घेतले आहे. या चिपमुळे त्या व्यक्तीच्या स्मृतींमध्ये उलथापालथ होईल. कदाचित स्मृती हॅक होऊ शकतील. नव्या कल्पना स्मृतीरुपात साठवल्या जाऊ शकतील. भूतकाळातील आठवणी पुन्हा तयार केल्या जातील आणि सहजपणे पुनर्रचित केल्या जातील. रील आणि रिअल मधली रेष अदृश्य होऊ लागेल. याचे परिणाम काय होतील ते आताच सांगता येणार नाही. 

फोटोशॉप वापरून खोट्या पोस्ट, बनावट फोटो याचा वापर करून समाजात अस्थिरता निर्माण करणे, ब्लॅकमेल करून लैंगिक शोषण, मानसिक छळ, आर्थिक लुबाडणूक करणे, हे प्रकार आजही सुरु आहेत. तंत्रज्ञानाच्या पाठबळावर ते अधिक क्रूर होत जातील. डीप फेकचा वापर वाढेल. डीप फेक म्हणजे एखाद्या माणसाचा आवाज व दृश्य स्वरुपाचे अनेक सॅंपल वापरून त्याची अगदी खरीखुरी वाटेल अशी डिजिटल प्रतिमा तयार करणे. यामुळे खर्‍या खोट्यातील सीमारेषा धूसर होईल. उदा:  एखाद्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाच्या भाषणाचा व्हिडिओ आपण पाहतो आहोत. तो संदेश खरा मानून स्वीकारत आहोत पण तो माणूसच कृत्रिम /खोटा असेल तर! डिप फेक वापरले असल्यास व्हिडीओमधली व्यक्ती अगदी खरी वाटते. त्याचाआवाजही अस्सल वाटतो. त्याची शहानिशा करणे मानवी मेंदूसाठी सोपे नसते त्यामुळे डीप फेक व डार्क वेबच्या भुयारातून पेंडूराच्या बॉक्समधून निघावे तसे काहीही निष्पन्न होऊ शकेल. हे भयावह तसेच सामाजिक स्वास्थ्यासाठी अतिशय घातक असेल. जागतिक स्तरावरील नियामक संस्थाना याबाबत या दशकाच्या उत्तरार्धात कठोर पावले उचलावी लागतील. 


-----

माणसा सारखाच सोशल मीडिया उत्क्रांत होत चालला आहे. त्याने अगोदरच आपल्याभोवती विळखा घालायला सुरुवात केली आहे. भविष्यात आपण त्याच्या कह्यात गेलेलो असू.  दीर्घकालीन मानवी विकासासाठी सोशल मिडीया फारसा उपयोगी ठरणार नाही असे समाजशास्त्रज्ञांचे मत आहे. नवनवीन आशय आणि माहिती ऐकण्यात , पाहण्यात आणि वाचण्यात आपला बहुमोल वेळ जात राहिला तर नवे काही निर्माणाधीन होणे अवघड होईल.  कोणत्याही क्षेत्रात प्रगती करण्यासाठी केवळ माहिती पुरेशी नसते तर त्याला ज्ञानाचा आधार असावा लागतो. वेगवेगळी कौशल्ये शिकावी लागतात, ती विकसित करावी लागतात. सोशल मिडिया यासाठी एका मर्यादेपर्यंत मदत करेल , पण बरेचसे अंतर आपल्याला त्याचे बोट सोडून चालावे लागणार आहे. तो आपले दैनंदिन जीवन अधिक  सोपे , सुटसुटीत करेल यात शंका नाही पण ते साधे आणि  सुखकर करणे मात्र आपल्या हातात आहे. आपण काय निवडतो, कुठे क्लिक करतो यावर ते अवलंबून असणार आहे. यासाठी आतापासूनच आपला समाज माध्यमशिक्षित होणे अतिशय गरजेचे आहे. 

एक सूत्र आपण भविष्यातील सोशल मिडीयाला सामोरे जाताना कायम लक्षात ठेवायला हवे.  सोशल मिडीयाचा वापर आनंद वाटण्यासाठी आणि विकासप्रक्रियेला हातभार लावण्यासाठी व्हायला हवा आहे. ते शक्य नसेल तर निदान आपण  त्यात नकारात्मकता पेरणार नाही याची काळजी घ्यायला हवी. सोशल मिडीया हे एक सामूहिक विश्व आहे. इथली प्रत्येक व्यक्ती आपल्याइतकीच मूल्यवान आहे त्यामुळे वैयक्तिक आकांक्षेच्या पलिकडे जाऊन येथील समूहाच्या भल्याचा विचार आपल्याला करता यायला हवा. शेवटी सोशल मिडीयावर कुणीही असलो तरी आपण सगळेच प्रत्यक्ष जगाचे यूजर आहोत... नाही का!   

Published in White Space Diwali Issue 2022

Thursday, September 15, 2022

ओटीटी : ’अर्थ’पूर्ण मयसभा

 ’कंटेंट इज द किंग’ या मथळ्याचा निबंध बिल गेट्सने १९९६ साली म्हणजे तब्बल २६ वर्षांपूर्वी मायक्रोसॉफ्टच्या वेबसाईटवर लिहिला होता. "येत्या काळात इंटरनेटवर कंटेंटच्या माध्यमातून खर्‍या अर्थाने कमाई करता येईल. अर्ध्या शतकापूर्वी झालेल्या टेलिव्हिजन क्रांतीने टीव्ही सेटच्या निर्मितीसह अनेक उद्योगांना चालना दिली पण माहिती आणि मनोरंजन क्षेत्रात कंटेंटचे महत्व ज्यांनी ओळखले ते या व्यवसायात अधिक यशस्वी होणार आहेत." असं भाकीत त्यात नोंदवणा‍र्‍या बिल गेट्सने बदलत्या काळाची पावलं किती अचूक ओळखली होती त्याचा प्रत्यय आज आपण ओटीटी (उदा: अमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स इ.) च्या पार्श्वभूमीवर घेत आहोत. माहिती आणि मनोरंजन क्षेत्राने आपलं जगणं व्यापून टाकलंय आणि अर्थकारणासह या सगळ्याच्या नाड्या कंटेंट नामक राजाच्या हातात आहेत. 

पण कंटेंट म्हणजे नेमकं काय - इंटरनेट सारख्या परस्परसंवादी नेटवर्कचा विचार केला तर कंटेंटची ऐसपैस व्याख्या करता येईल. उदाहरणार्थ, संगणकातील किंवा मोबाईलमधील सॉफ्टवेअर हा सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचा कंटेंट आहे. पण याचा आपल्याशी म्हणजे ग्राहकाशी थेट संबंध येत नाही. आपल्या दृष्टीने विचार केला तर आपण जे जे इंटरनेटवर किंवा इंटरनेटद्वारे बघतो, वाचतो, ऐकतो, डाउनलोड करतो ते सारे म्हणजे कंटेंट. आपण एखादे ई- वर्तमानपत्र वाचत असू, फेसबुक पोस्ट वाचत किंवा शेअर करत असू किंवा यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असू किंवा अमेझॉन प्राईमवर एखादा सिनेमा, तर ही सगळी कंटेंटची विविध रुपं आहेत. या माहितीच्या ढिगार्‍यातलं काय निवडायचं हे आपण त्या कंटेंटच्या गुणवत्तेनुसार ठरवतो. मग हे कंटेंट प्रकरण या आधी नव्हतं का! अर्थातच होतं. आधी ते अगदी मर्यादित स्वरुपात होतं. कोणती पुस्तकं वाचायची, कोणते वर्तमानपत्र वाचायचे हे आपण त्या कंटेटचा दर्जा आणि मुख्य म्हणजे उपलब्धता पाहून ठरवत असू. म्हणजे चांगले इंग्रजी चित्रपट तेव्हा फक्त मोठ्या शहरातच झळकत असत. काही राज्यस्तरीय वर्तमानपत्रे विशिष्ट शहरांमध्येच वितरित होत. तरीही निवडीला थोडा फार वाव होता परंतु दूरदर्शन आणि आकाशवाणीला आयुर्विम्यासारखाच पर्याय नव्हता. त्यावर मिळतील त्या कंटेंटमध्ये आपण समाधान मानत असू. काही प्रमाणात गुणवत्ता नक्कीच होती, मूल्यव्यवस्थेचा पाया प्रत्येक संहितेला होता पण शासकीय चौकट आणि आर्थिक मर्यादा असल्याने काही कार्यक्रम अत्यंत एकसुरी आणि कंटाळवाणे देखील असायचे. मग मुक्त अर्थव्यवस्थेच्या हातात हात घालून आल्या सॅटेलाईट वाहिन्या. अहोरात्र उपलब्ध असणार्‍या या अमर्याद कंटेंटमधून निवड करायचे स्वातंत्र्य आपल्याला मिळाले त्यामुळे स्पर्धा, उलाढाल वाढली आणि या क्षेत्रात रोजगार/ व्यवसायाच्या अनेक संधी निर्माण झाल्या. परंतु खेळ, संगीत यांना वाहिलेल्या आणि उत्तम माहितीपट प्रदर्शित करणार्‍या काही वाहिन्यांचा अपवाद सोडला तर लवकरच बहुतेक वाहिन्यांद्वारे सुमार कार्यक्रम प्रेक्षकांच्या माथी मारले जाऊ लागले. ’सूर्यवंशम’ हा एकच सिनेमा एका वाहिनीने इतक्या वेळा दाखवला आहे की त्याची जागतिक रेकॉडमध्ये नोंद व्हावी. रिअ‍ॅलिटी शोच्या नावाखाली बालिश नाट्यमयता, इस्टेटीसाठी सालस नायिकेला छळणार्‍या बटबटीत मेकअपमधल्या खलनायिका, जग २१ व्या शतकात असताना नागिणीचा सूड वगैरे कथानकातच रमलेल्या टुकार आणि साचेबद्ध मालिका, अशा कंटेंटना वैतागलेला शहरी तरुण प्रेक्षकवर्ग कल्पनेच्या पलिकडल्या विषयांवर उत्तम ’ग्लोबल’ कंटेंट देणार्‍या ओटीटीकडे वेगाने ओढला गेला. कोरोनामुळे आलेला लॉकडाऊन शहरी वर्गासाठी सुसह्य करण्याचं बरचसं श्रेय ओटीटीवरील सिनेमा व वेब सिरीजना द्यायला हवं. चित्रपटगृहं बंद असल्याचा फटका सिनेक्षेत्राला बसला असला तरी ओटीटीमुळे अनेक चित्रपटांना ते उघडायची वाट बघत न बसता मोठा प्रेक्षकवर्ग मिळू शकला.

एकूण खर्‍या अर्थाने मनोरंजन क्षेत्रात आर्थिक क्रांती झाली ती ओटीटी प्लॅटफॉर्मच्या आगमनानंतर. ओटीटी म्हणजे ओव्हर द टॉप. आधी टीव्ही सेटला जोडलेला अँटेना जे काम करायचा ते ओटीटी तंत्रामुळे आपल्या हातातला इंटरनेटशी जोडलेला मोबाईल करु लागला. त्यामुळे मनोरंजन शब्दश: आपल्या मुठीत आले. इंटरनेटचा माध्यम म्हणून वापर करत वेबसाईट किंवा अ‍ॅपच्या मार्फत मुख्य सर्व्हरवरुन थेट आपल्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर अवतरत अनेक मनोरंजन केंद्र सुरु झाली त्यात 2008 मध्ये रिलायन्स एंटरटेनमेंटने लॉन्च केलेला बिगफ्लिक्स हा भारतातील पहिला प्लॅटफॉर्म. मग झी फाईव्ह आणि सोनी लिव्हच्या लाँचनंतर 2013 मध्ये ओटीटीची जोरदार घोडदौड सुरु झाली. डिस्ने हॉटस्टार 2015 मध्ये मैदानात उतरला. मल्टीप्लेक्सला एखादा सिनेमा बघावा तेवढ्या दरात यावरचे सिनेमा, शो किंवा वेबमालिका आपल्या सोयीने हव्या त्या डिव्हाईसवर बघता येत असल्याने ग्राहकात रुपांतरित झालेले प्रेक्षक ओटीटीला प्राधान्य देऊ लागले. ’बिंज वॉच’ करायची म्हणजे एका सपाट्यात आवडत्या वेब मालिकेच्या एका सीझनचे सगळे भाग पाहण्याची क्रेझ वाढली. 

सध्या ओटीटीवर गाजत असलेल्या काही भारतीय कार्यक्रमांकडे नजर टाकली तर त्यांचे विषय वैविध्य आणि आवाक्यामुळे आपण चकित होतो. यावरील सिनेमा किंवा वेबमालिकांचे विषय ’लोकल ते ग्लोबल’ असतात. त्यात तांत्रिक सफाई असते. त्यात माणसातल्या ग्रे शेड्स दिसतात. त्यात असामान्यांच्या कहाण्या असतात. त्यात समाजाची बधीर, गोठलेली अवस्था भंग करण्याची, व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची ताकद असते. हे कंटेंट कधी प्रेक्षकांना विचारात पाडतात तर कधी भव्य काल्पनिक पट उलगडत निखळ मनोरंजन करतात. प्राईमवरील ’पुष्पा’ आणि ’दृश्यम २’ या तुफान गाजलेल्या सिनेमाने दाक्षिणात्य चित्रसृष्टीकडे अवघ्या देशाचं लक्ष वेधून घेतलं. सबटाय़टलमुळे भाषेचे अडसर गळून पडले. ओटीटीवर प्रदर्शित होणं म्हणजे कमीपणा वाटणार्‍यांचा गैरसमज दूर झाला. मधल्या काळातल्या उत्तम पण लुप्त झालेल्या सिनेमांना नवे करार होऊन ओटीटीमुळे झळाळी आणि नवा प्रेक्षक मिळाला. विद्या बालनच्या ’शेरनी’ किंवा ’जलसा’ सारख्या सिनेमांना कमी बजेटमध्ये ओटीटीमुळे यशाची चव चाखणं सोपं गेलं.

वेब मालिका हे तर ओटीटीचं खास वैशिष्ट्य. ’सोनी लिव्ह’वरील विक्रम साराभाई व होमी भाभांच्या जीवनावरील ’रॉकेट बॉईज’ ही मालिका. एका पुरस्कार सोहळ्यानंतर अचानक गायब होणार्‍या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आयुष्यावर व त्या रहस्यावर बेतलेली माधुरी दीक्षित अभिनीत ’नेटफ्लिक्स’वरची ’द फेम गेम’ ही मालिका, सर्वसामान्य भारतीय जीवनाचे अंतरंग खुसखुशीतपणे उलगडणारी ’सोनी लिव्ह’ वरील ’गुल्लक’ मालिका. अमेझॉन प्राईमवर लोकप्रिय ठरलेली ’गिल्टी माईंड्स’ ही दोन विरुद्ध विचारप्रवाहांच्या वकिलांच्या संघर्षावर आधारित मालिका. याच वाहिनीवरची ग्रामीण राजकीय जीवनपटाचा स्लाईस दर्शवणारी ’पंचायत’ मालिका, ’लंडन फाईल्स’ ही एका खुन्याचा शोध घेणारी अर्जुन रामपाल अभिनीत व्हूटवरील मालिका. व्हीनस आणि सेरेना विल्यम्स या आपल्या गुणी मुलींची टेनिस कारकीर्द घडवणार्‍या जिद्दी वडिलांची कहाणी सांगणारी ’किंग रिचर्ड’ ही ’अहा’ वरची मालिका. किती उदाहरणं द्यावीत! लैंगिक आणि हिंसक दृश्यांचा अतिरेक व शिवराळ भाषा हा सुरुवातीला या कार्यक्रमांचा व सिनेमांचा लसावि होता. जम बसल्यावर त्याचं प्रमाण बरंच कमी झालं आहे. बहुतेक कार्यक्रमांच्या प्रोमोजमध्ये अशा दृश्यांचा अंतर्भाव आजही असला तरीही आर माधवन ची ’डिकपल्ड’, ’पंचायत’ सारख्या नितळ मालिका किंवा ’जय भीम’ सारखे सिनेमे ही इथेच आहेत. मुळात आधुनिक ओटीटीचा आणि टीव्ही, सिनेमा, नाटक वगैरे आजवरच्या मनोरंजन माध्यमांचा बाज पूर्ण वेगळा आहे. ग्राहक खेचण्याचा आकड्यांचा खेळ हा कलाकार किंवा लेखक-दिग्दर्शक कोण यापेक्षा कंटेंटवर (नंतर मार्केटिंगवर) अवलंबून आहे. 

बहुतेक ओटीटी प्लॅटफॉर्म एक दोन महिने फुकट सबस्क्रिप्शन देताना दिसतात. त्यानंतर उदा: 'नेटफ्लिक्स'साठी आवडीच्या प्लॅननुसार भारतात ३०० ते ८०० रु., 'हॉटस्टार प्रीमियम'साठी २०० रु. ते ४०० रु. महिन्याला आकारले जातात तर 'अल्ट बालाजी'चे वार्षिक सबस्क्रिप्शन्स ३०० रुपये आहे. याशिवाय कंटेंटनुसार ब्रँड प्रायोजक मिळवून नफा कमावला जातो. शहरी सुशिक्षित ग्राहकवर्गाला आकृष्ट करण्यात यशस्वी ठरलेल्या ओटीटीच्या व्यवसायाला आता भारतातली निमशहरी अवाढव्य बाजारपेठ खुणावू लागली आणि मराठी सारख्या स्थानिक भाषेतले कंटेंट देऊ करणार्‍या प्रादेशिक प्लॅटफॉर्मनी स्पर्धेत उडी घेतली. सुरुवातीला हिंदी-इंग्रजी वेबसिरिजची भ्रष्ट आणि केविलवाणी नक्कल करता करता आता ते स्वबळावर दमदार कंटेंट देऊ करत आहेत. भाडिपा’चा सारंग साठ्ये आणि पॉला मॅग्लेनने निपुण धर्माधिकारीच्या साथीने हिट व्हिडिओजपासून जोरदार सुरुवात करुन आता ’एम एक्स प्लेयर’द्वारे वेबसीरिजच्या जगात मुसंडी मारली आहे. ’प्लॅनेट मराठी’ वरची चर्चेत असलेली ’रानबाजार’ किंवा ’सोनी लिव्ह’ वरच्या धमाल ’पेट पुराण’ चे नावीन्यपूर्ण कंटेंट आणि रंजकता बघता याचा प्रत्यय येतो.

नेटफ्लिक्सवरचा ’डिसायपल’ सारखा संवेदनशील चित्रपट, प्राईमवरचा ’झिम्मा’  सारखा हलकाफुलका चित्रपट केवळ ओटीटीमुळे पार्लेठाण्यापुण्याची वेस ओलांडून लहान गावांपर्यंत सहज पोचू शकले. 

ओटीटी उद्योग इतक्या वेगाने वाढत चालला आहे की येत्या तीन वर्षात त्याची उलाढाल ४० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज अर्थतज्ज्ञांनी वर्तवला आहे. बोस्टन कन्सल्टन्सीच्या एका अहवालानुसार पुढच्या तीन वर्षांमध्ये फक्त भारतात पाच अब्ज डॉलरचा व्यवसाय होईल. भारतीय बाजारपेठेत सर्वात आधी प्रवेश केलेल्या नेटफ्लिक्सवर दररोज १.७ दशलक्षाहून अधिक भारतीय लॉग इन करतात. भारतात त्याचे एकूण ४७.४ दशलक्ष म्हणजेच युरोपमधल्या एखाद्या देशाच्या लोकसंख्येइतके ग्राहक आहेत. इतर स्पर्धक वाहिन्यांचीही घोडदौड सुरु आहे. ओटीटीवरील कार्यक्रम दोन प्रकारचे असतात. स्वनिर्मित किंवा प्रसारणाचे हक्क विकत घेतलेले कार्यक्रम. दोन्हीसाठी ओटीटीवर साधारणपणे ३ प्रकारची व्यावसायिक प्रारुपे वापरण्यात येतात.

१) AVOD : (Ad-Based Video on Demand)

यात ग्राहकाला व्हिडिओ मोफत बघता येतात. त्यावर जाहिरात दाखवण्यासाठी जाहिरातदार ओटीटी प्लॅटफॉर्मशी करार करतात. 

२) SVOD (Subscription Video on Demand)

प्लॅटफॉर्मचे सशुल्क सदस्यत्व घेऊन ग्राहकाला हवे ते कार्यक्रम हवे तेव्हा बघता येतात. 

३) TVOD (Transactional Video on Demand)

ग्राहकाला प्रत्येक व्हिडिओ/ डाऊनलोडसाठी स्वतंत्र शुल्क आकारले जाते.

यातील दुसरे म्हणजे वार्षिक सदस्यत्व घेऊन विशिष्ट प्लॅटफॉर्मवरचे हवे ते कार्यक्रम बघण्याची मुभा देणारे प्रारुप सर्वाधिक लोकप्रिय व त्यामुळे प्रचलित आहे. सदस्यत्व टिकवून ठेवले व नवे सदस्य मिळवत राहिले तरच व्यवसायवृद्धी होणार हे सरळ आहे. त्यासाठी हवे आगळेवेगळे नवेकोरे कंटेंट. उलाढालीच्या आकडेवारीवरुन लक्षात येते की आकर्षक कंटेंट निर्माण करु शकणार्‍या सर्जनशील मंडळींना करियरची अनेक दालनं आंतरराष्ट्रीय पातळी पासून प्रादेशिक स्तरापर्यंत ओटीटीमुळे सहज खुली झाली आहेत. बिगबजेट चित्रपटाला मागे टाकेल एवढी कलाकार, कर्मचारी, तांत्रिक एक्सपर्ट्सची फौज यामागे अथक काम करते आहे. कोणती आहेत ही करियर्स! 

लेखक : 

दमदार कथानक, सशक्त पटकथा, चटपटीत संवाद लिहिणे. अनुवाद करणे. प्रोमोज, दृकश्राव्य जाहिरातींची संहिता लिहिणे. सिनेमा/ शो ची मदार लेखनावर असल्याने हटके लेखकांना खूप मागणी आहे. एक साधे उदाहरण द्यायचे तर ’फ्लॉवर नही फायर है मै’ हा अल्लु अर्जुन म्हणजेच ’पुष्पा’ सिनेमातला संवाद किंवा ’कभी कभी लगता है हम खुद ही भगवान है’- हे नेटफ्लिक्सवरच्या ’सॅक्रेड गेम्स’ मालिकेमध्ये गणेश गायतोंडे म्हणजेच अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकीने अंडरप्ले पद्धतीने उच्चारलेले वाक्य. सिनेमा बघून झाला, मालिका संपली तरी प्रेक्षक ते विसरत नाहीत. सबस्क्रिप्शनही थांबवत नाहीत. ही कंटेंटची कमाल आहे. एकेका भागासाठी लेखकांना २५ ते ३०००० डॉलर्स मिळू शकतात.

सादरकर्ते : 

हे कंटेंट प्रेक्षकांना स्क्रीनवर खिळवून ठेवतील अशा स्वरुपात सादर करणे म्हणजेच दिग्दर्शन, तंत्रसाहाय्य, कलादिग्दर्शन, निर्मितीसाहाय्य, संगीतसंयोजन. कुवत व अनुभवानुसार ते १० ते २५ दशलक्ष डॉलरपर्यंत प्रति प्रकल्प कमाई करु शकतात. मुख्य कलाकारांना मिळणारे काही लाखांपासून कोट्यवधींचे मानधन हे त्यांच्या लोकप्रियतेवर, नेटवर्कवर व मागील यशस्वी कलाकृतींच्या संख्येवर अवलंबून असते. उदा: अभिषेक बच्चन हा प्रस्थापित सिनेक्षेत्रात फारसा हिट न झालेला अभिनेता ओटीटीवर भरपूर रेटिंग मिळवतो आहे.

पोस्ट-प्रॉडक्शन : 

विशेष इफेक्ट्स चा वापर, वेळेच्या चौकटीत तो तो भाग बसेल आणि रोचक वाटेल असे अचूक संकलन करणे 

शूटिंग असिस्टंट :

कलाकारांचा कपडेपट, मेकअप, नेपथ्य, शूटिंगच्या वेळा व तारखा सांभाळणे, प्रत्यक्ष शूटिंगमध्ये समन्वय ठेवणे

मिडिया मॅनेजर्स : 

सिनेमा /मालिका/ शो तयार होऊ लागताच त्याचे दिलखेचक रंजक प्रोमोज विविध माध्यमांद्वारे अपेक्षित प्रेक्षकवर्गापर्यंत पोचवण्यासाठी आवश्यक असलेले पारंपरिक आणि डिजिटल मार्केटिंग करणे. या माध्यमांद्वारे कार्यक्रमाशी संबंधित स्पर्धा आयोजित करणे, वेगवेगळ्या पद्धतीने त्याबद्दल उत्सुकता निर्माण करण्यासाठी सोशल मिडियाचा वापर करणे 

व्यावसायिक सर्जनशील अनालिस्ट्स- प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि प्रतिक्रियांवर नजर ठेवणे, कोणी किती वेळ काय बघितले ह्याची नोंद घेणे

वेब वाहिनीवरील प्रत्येक कार्यक्रम हा एक मह्त्वाचा कंटेंट आणि एक प्रकारचा डाटा असला तरी या डाटाबद्दल अधिक माहिती पुरवणारा डाटा म्हणजे मेटाडाटा. समजा एखादा सिनेमा या वाहिनीवर उपलब्ध करण्यात आला असेल तर तो प्रदर्शित कधी झाला, कोणत्या भाषेतला आहे, त्यातले कलाकार आणि पडद्यामागील तंत्रज्ञ कोण आहेत त्यांची यादी, सिनेमाचा गोषवारा, त्याचे रेटिंग, सिनेमाशी निगडित घटनांच्या नोंदी, तो कोणत्या वयोगटासाठी आहे, त्यातील आशय कशा स्वरुपाचा आहे ही सगळी माहिती म्हणजे सिनेमाचा मेटाडाटा. तो त्या सिनेमाला/ कलाकृतीला  टॅग करणे.

शो-रनर : 

ओटीटी प्लॅटफॉर्म आणि कार्यक्रमाचे निर्माते-दिग्दर्शक यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करणार्‍या शोरनर्सना कार्यक्रमाचे प्रसारण अपेक्षित वेळी कोणतीही तांत्रिक किंवा कंटेंटविषयक अडचण न येता होत आहे ना याकडे लक्ष द्यावे लागते. उदा. द्यायचे तर नेटफ्लिक्स वर गाजलेल्या ’गेम ऑफ थ्रोन्स’ या मालिकेच्या प्रत्येक भागासाठी १ ते ३ लाख डॉलर्स शोरनरला दिले जात. भारतीय वाहिन्यांमध्ये काम करणार्‍या शो-रनरला प्रत्येक भागासाठी ५ ते १० लाख रु. गुणवत्ता व अनुभवाप्रमाणे मिळू शकतात.

शो-कास्टर : 

कंटेट कितीही उत्तम असले तरी ते पोचवणारा कलाकार नव्या दमाचा, हटके अभिनय करणारा नसेल तर कार्यक्रमाची चर्चा आणि प्रसिद्धी पुरेशी होत नाही व कार्यक्रम पडतो. त्यामुळे प्रत्येक भूमिकेनुसार योग्य कलाकार निवडणे आणि तो/ती व दिग्दर्शक यांच्यात दुवा म्हणून काम करणे हे शोकास्टरचे काम. कलाकार निवडताना त्यांच्या समाज/समूह माध्यमांवरील चाहत्यांची संख्या, त्यांचे युट्यूबवरील व्हिडिओ, त्यांची वर्तमान प्रतिमा याचा साकल्याने विचार केला जातो. बॉबी देओलसारख्या मागे पडलेल्या अभिनेत्याला ’आश्रम’ सारखी मालिका मिळाली किंवा प्रतीक गांधी सारख्या थिएटर कलाकाराला ’स्कॅम ९२’ मालिका मिळाली ती याच पद्धतीने. पंकज त्रिपाठी सारखे अभिनेते यातून पुढे येऊन मुख्य धारेच्या सिनेमात पहिल्या फळीतील अभिनेते होऊ शकले ते ओटीटीवरील मालिकेतून कमावलेल्या नावामुळे.

याशिवाय 

एव्हि (दृकश्राव्य) प्रोड्यूसर, रिटन कम्युनिकेशन मॅनेजर, एच आर मॅनेजर, वेगवेगळे करार बघणारे कायदेतज्ज्ञ, अर्थव्यवस्थापन बघणारी चमू अशी अनेक करियर्स आणि व्यावसायिक संधी ओटीटीने निर्माण केल्या आहेत. 

ओटीटी म्हणजे एक प्रकारची मयसभा आहे पण ती उभी करायला शेवटी माणसेच लागतात. ओटीटी म्हणजे माणसांनी माणसांसाठी निर्मिलेली मयसभा. जपून समजून उमजून प्रेक्षक म्हणून पाऊल टाकले तर डोळे दिपवणारी नवलाई अनुभवता येईल, व्यावसायिक म्हणून करियर घडवता येईल. निव्वळ क्रेझ म्हणून घुसलेल्यांना पाय घसरण्याचा धोका आहे. मुक्त कंटेंट हा यूएसपी असलेल्या ओटीटीचे सिनेमाशी विशेषत: कलेशी नेमके कसे नाते असते! टॉलस्टॉयच्या मते कला हा माणसाच्या जीवनातला अविभाज्य घटक असायला हवा, त्याचबरोबर कलाकृतीचे आकलन सहज व्हायला हवे. तर ’पिढ्या बदलल्या तरी कला आणि साहित्यातला आत्मा हरवता कामा नये’ असा आग्रह क्रोचे या इटालियन तत्वज्ञाने धरला होता. त्याने माणसाच्या जगण्याचे न-नैतिक आणि नैतिक असे भाग पाडले आहेत. न-नैतिक कलाप्रकार (जसे पूर्वीचे तमाशा, नौटंकी) केवळ विश्रांतीच्या काळासाठी वापरले जावेत असे अपेक्षित होते. परंतु आता या कलाप्रकाराने ओटीटीवर मक्तेदारी मिळवली आहे. उदा: ’अल्ट बालाजी’ जे टीव्हीवर दाखवू शकत नाही ते ओटीटीव्दारे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. दुसर्‍या बाजूला सेन्सॉरशिप नसल्याने आपापल्या सामाजिक आणि राजकीय विचारसरणीला पूरक असा आशय सहजगत्या व्हायरल करणारे मुक्त व्यासपीठ म्हणून वेब सिरिजचा वापर होतो आहे. त्याचबरोबर ’द बिग बँग थिअरी’ सारखे अनोखे विषयही इथेच आपल्या भेटीला येत आहेत. प्रादेशिक सिनेमा आता बंगाली, मराठी किंवा तेलुगू राहिला नाही तो ’भारतीय’ सिनेमा झाला आहे, तो ही इथेच म्हणजे ओटीटीवर. 

यातून ’काय निवडायचे’ हे आपण विवेक वापरून ठरवायचे आहे. आपल्याला पैशाच्या मोबदल्यात फक्त ताजा आशय असलेले कोरे करकरीत मनोरंजन हवे आहे की गुणवत्ता व दर्जाही हवा आहे हे ठरावायचे आहे. ओटीटीमुळे अभिरुचीचे सांधे आणि आस्वादकतेचे आयाम वेगाने बदलत आहेत. सिनेमा हाच धर्म असलेल्या भारतात आर्थिक विषमतेमुळे त्याचे पडसाद तुलनेने हळूहळू उमटत असले तरी फोर-जी तंत्रप्रणाली आवाक्यात आल्यापासून पिटातला व बाल्कनीतला प्रेक्षक एका स्तरावर आला आहे. ओटीटीमुळे घडत आणि बदलत असलेला ’डिजीटल इंडिया’ हा एक अर्थपूर्ण संधी आणि त्याचबरोबर समाजशास्त्रज्ञांच्या दृष्टीने एक आव्हान बनून उभा राहिला आहे. 

काही संदर्भ : 
https://www.tribuneindia.com/
https://www.mazsystems.com/

Published in Daut_Lekhani Traimasik