Wednesday, June 29, 2022

आयआयटी_बीआयटी : Book Review


 #पुस्तक_परिचय आयआयटी_बीआयटी #महाराष्ट्र_टाइम्स

IIT मधून इंजिनियर होणं काय असतं , मुळात इंजिनियर होणं म्हणजे काय याविषयीच्या संकल्पना स्पष्ट करणारं, IIT बॉम्बे (पवई) ची सहल घडवत तिथल्या अतरंगी प्रेरणादायी घडामोडींच वर्णन करणारं
सुकन्या पाटील या टॉपर IITean ने लिहिलेलं रंजक पुस्तक.

नंदन नीलकेणी, रोहिणी गोडबोले, सुधींद्र कुळकर्णी, अच्युत गोडबोले, ओला कॅब्जचे भाविश अग्रवाल तसेच दिवंगत नेते मनोहर पर्रीकर ही नावे आपल्या अगदी ओळखीची आहेत. आपापल्या कार्यक्षेत्रात या सगळ्यांनी उत्तुंग झेप घेतलेली आहे. या सगळ्यांमध्ये एक समान धागा आहे, तो म्हणजे ही व्यक्तिमत्वे घडली आहेत आयआयटी बॉम्बे (पवई) मधून. तांत्रिक शिक्षणासाठी आयआयटी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) राष्ट्रीय स्तरावरच नव्हे, जगभरात नावाजली गेलेली महत्त्वाची संस्था आहे हे विदित आहे. पण केवळ कुशल अभियंत्यांची फौज तयार करणे इतकेच या संस्थेचे संकुचित ध्येय नाही.
मग ’आयआयटी बॉम्बे’ हे प्रकरण नेमके आहे तरी काय !
तिथून बाहेर पडताना जग बदलून टाकण्याच्या आकांक्षेने झपाटलेल्या अभियंत्यांना अशी कोणती उर्जा ही संस्था देते, याचे उत्तर ’आयआयटी बीआयटी’ या पुस्तकात मिळते.
याच संस्थेच्या मुशीतून घडलेली, दोन सुवर्ण आणि एका रजतपदकासह आयआयटी बॉम्बेतील (पवई) सर्वोच्च मानाचे समजले जाणारे ’इन्स्टिट्यूट गोल्ड मेडल’ पटकावणारी जळगावची सुकन्या पाटील या पुस्तकाची लेखिका आहे.
सध्या ’मायक्रोसॉफ्ट’मध्ये उच्चपदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत असलेली सुकन्या ही ग्रामीण भागातून पुढे आलेली, मराठी माध्यमातून शिकलेली, बुद्धीमान, विचारी, निसर्गप्रेमी आणि मिनिमलिस्टीक तरुणी. साहजिकच ती पुस्तक लिहिते तेव्हा ते फक्त ’आयआयटी मध्ये प्रवेश कसा मिळवावा’ किंवा ’जेईईची तयारी कशी करावी’ हे सांगणारे गाईड नसते. आयआयटी म्हणजे ’ग्लोबल संधी’, आयआयटी म्हणजे गलेलठ्ठ पॅकेज, आयआयटी म्हणजे ’लाईफ बन गयी’ अशी प्रतिमा असल्याने तिथे प्रवेश मिळवणे ही अनेक भारतीय विद्यार्थ्यांची महत्वाकांक्षा असते. या ध्येयाने पछाडलेल्यांवर ’कोटा फॅक्टरी’ सारख्या वेबमालिका देखील तयार केल्या गेल्या आहेत.
प्रचंड प्रयत्न करूनही थोडक्यात संधी हुकली तर निराशेच्या गर्तेत जाणार्यांची संख्याही कमी नाही. मुळात प्रवेश परिक्षा देणार्यांपैकी किती मुले ’इंजिनीअर होणे’ म्हणजे काय हे आधी समजून घेतात!
सकारात्मक विचार करणारा माणूस म्हणतो - पेला अर्धा भरला आहे.
नकारात्मक विचार करणारा माणूस म्हणतो - पेला अर्धा सरला आहे.
हाडाचा इंजिनीयर म्हणतो - एकंदरीत पेला गरजेपेक्षा दुप्पट आकाराचा आहे.
लॅटिनमध्ये इंजिनिअम म्हणजे नैसर्गिक क्षमता, गुणवत्ता. नैसर्गिक संसाधनांचा आणि वैज्ञानिक संकल्पनांचा कल्पक वापर करून अवघड समस्या सोडवणे, अस्तित्वात नसलेल्या गोष्टी साकार करणे म्हणजे इंजिनीअरींग. अशी वस्तुनिष्ठ ’व्हिजन’ ठेवून ’इंजिनीअर’ होणे, त्यातूनही ’आयआयटी’ तून इंजिनीअर होणे याचे वेगळेपण सहजतेने सांगत होतकरुंना या क्षेत्राविषयी स्वच्छ नजर देणार्या वाटाड्याचे काम सुकन्याचे ’आयआयटी बीआयटी’ हे पुस्तक करते.
’थ्री इडिय़ट’ सारख्या चित्रपटातून नव्या पिढीच्या ’पॅशन’चे महत्व पालकांना समजावण्यात आले आहे. ’तुमची स्वप्ने मुलांवर लादू नका, त्यांना त्यांची स्वप्ने पाहू द्या’ वगैरे त्यांना हल्ली सतत सांगितले जाते आहे. प्रत्यक्षात पॅशनला स्मरणशक्ती, तर्कशक्ती, कल्पकता, सामान्य ज्ञान आणि विवेक यांची जोड असेल तरच ती परिपूर्ण बुद्धीमत्ता. अन्यथा नुसत्या स्वप्नांना अर्थ नसतो. इथे आयआयटी बॉम्बे सारखी संस्था मह्त्वाची ठरते कारण तिथे या सगळ्या पैलूंची मशागत होते. यासाठी आयआयटी उत्प्रेरकाचे काम कसे करते, तिथे शिक्षण घेण्य़ाकडे किती वेगवेगळ्या पद्धतींनी पाहिले जाते याची खुमासदार उदाहरणेही या पुस्तकात लेखिका देते.
’मला तिथे माझे स्वत्व गवसले’ असे लेखिका म्हणत असली तरी हे तिचे आत्मचरित्र वगैरे नाही. ती या पुस्तकातून ’आयआयटी बॉम्बे’ची सहल घडवून आणते. तिथला निसर्गरम्य परिसर, वैविध्यपूर्ण होस्टेल लाईफ, तिथल्या कला, क्रीडा, तांत्रिक, उद्योजकीय, सांस्कृतिक घडामोडी इ. विषयी सांगते. आत्मविश्वास वाढवणारा इंग्लीश लर्निंग प्रोग्राम, उद्यमशीलतेचे धडे देणारा ऑन्त्रप्रेन्युअर सेल, तंत्रक्षेत्राची क्षितीजे रुंदावणारा टेकफेस्ट, व्यवस्थापन कौशल्याची कार्यशाळा म्हणावा असा प्रसिद्ध ’मूड इंडिगो’ यांसारख्या भन्नाट उपक्रमांची माहिती देते. लॉजिकल रिझनिंग, स्ट्रक्चर्ड थिंकिंग ही कौशल्य इथे कशी विकसित होतात याविषयीही ती रंजक पद्धतीने सांगते.
एका बाजूला इंजिनिअर होण्याची आणि दुसर्या बाजूला माणूस म्हणून घडण्याची सर्वसमावेशक प्रक्रिया हे अंगभूत वैशिष्ट्य असलेल्या ’आयआयटी बॉम्बे’च्या पार्श्वभूमीवर लिहिलेले हे पुस्तक. ते विद्यार्थ्यांची जाण तर वाढवतेच पण आपल्या पाल्याच्या इंजिनियरिंगच्या पदवीच्या कागदाकडे डोळे लावून बसलेल्या पालकांना नवे भान देते.
मराठीत या स्वरुपाचे आणि अशा विषयावरचे हे बहुधा एकमेव पुस्तक आहे.
पूर्वप्रकाशित : #मटा नागपूर edition 29 जून

Friday, June 10, 2022

दोन माणसांचा गुळांबा


म्हणजे काय! दोन माणसांपुरता? एवढाच करायचा तर इतका कुटाणा कशाला, असं तुम्हाला वाटत असेल. तर ते तसं नाही.

ही #गुळांबा कसा करावा याची रेसिपी नसून न-रेसिपी आहे. 🫢
ये उन दिनोंकी बात है जेव्हा उन्हाळी वाळवणं किंवा विशेष पदार्थ अजूनही सासूबाईच करत असत.
एका उन्हाळ्यात त्या परगावी गेल्यानं यंदाच्या गुळांब्याचं काय करायचं हा प्रश्न समोर उभा राहिला.
आपण अत्यंत हुशार असून ’त्यात काय मोठंसं’ असं मी स्वत:ला सांगितलं आणि सासूबाईंना सर्प्राईज द्यायचं ठरवलं.
सुरुवातीच्या दिवसात असले झटके बहुतेक सगळ्याच नवविवाहितांना येत असतात 😁 तर ते असो.
तेव्हा फेसबुक वगैरे नसल्याने एका रविवारी मी घरातलं मंगला बर्वेंचं ’अन्नपूर्णा’ पुस्तक बाहेर काढून त्याबरहुकूम सगळी तयारी केली.
सगळे त्यात दिल्याप्रमाणे केले.
पितळी पातेल्यात रटरटणार्या त्या सोनेरी तांबूस गुळांब्याकडे बघताना कैरी किसताना हाताला थोडंस लागल्याचं दु:ख विरून गेलं.
दरम्यान सासूबाईंचा फोन (अर्थात ट्रिंग ट्रिंग वाला) आला.
हा विषय वगळून मी त्यांच्याशी बोलत बसले.
मध्येच पळत येऊन डावाने ढवळून गुळांब्याची कन्सीस्टन्सी तपासून गेले.
अजून तरी तो सैल वाटत होता.
फोन सुरुच राहिला, गुळांबा सैल वाटत राहिला.
फोन संपला तरी गुळांबा सैल वाटत राहिला. 🤔
चांगला दाट झाल्यासारखे वाटल्यावर केव्हातरी अंदाजाने मी गॅस बंद केला.
माझा पहिलावहिला गुळांबा गार झाल्यावर खूष होऊन मी बरणीत भरायला घेतला पण त्यात घातलेला डाव पातेले सोडेचना. 🙄
मग मी खाली बसून बरणी घट्ट धरून ठेवली आणि कुठल्यातरी गडबडीत असलेल्या नवर्याला थांबवून त्यांच्या मदतीने पातेल्यातलं मिश्रण त्यात शक्तीनिशी लोटलं.
उरलेलं चाटून पाहिलं तर ते अप्रतिम खमंग लागत होतं.
थोड्या वेळाने नॉर्मल होईल याची उगाचच खात्री होती.
मग ताजं लोणी कढवलं. गरम पोळी पानात घेतली.
आता गुळांबा घेऊन त्यावर साजूक तूप घालून लहानपणापासून प्रिय असलेली चव अनुभवायची होती.
बरणीत चमचा घातला तर तो बिचारा वाकडा झाला पण आतला ऐवज घेऊन बाहेर यायचं नाव घेईना. 🤨
मग मात्र जाड डाव आत खुपसला.
पुन्हा नवर्याला बोलावून बरणी मागच्या बाजूने घट्ट धरून ठेवायला लावली आणि डावभर गुळांबा दोन्ही हातांनी ओढून बाहेर काढला.
चिक्कीकडे झुकलेलं ते प्रकरण लागत बाकी भारी होतं.
दरम्यान एकदा अचानक जेवायला ओळखीच्या एक काकू आल्या.
शेवटी काहीतरी गोड हवं म्हणून ’वाढ गं जरासा गुळांबा वगैरे काहीतरी’ म्हणाल्या. मी भीत भीत वाढला.
त्यांना कवळी असल्याने ती आत बहुतेक गुळांब्यासह खडखडू लागली असावी. गुळांब्याचा नीट आनंद न घेता आल्याने वैतागून
किंवा तो बरणीतून काढण्याची आम्हा ’दोघांची’ सर्कस पाहून
त्यांनी त्याचं नामकरण ’दोन माणसांचा गुळांबा’ असं केलं. 😬
त्या नन्तर एका लग्नात त्या भेटल्या तेव्हा म्हणाल्याच, "झाला की नाही यंदाचा ’दोन माणसांचा गुळांबा’ करून !".
तर दोन नव्हे पण चमच्याने सहज निघणारा ’एका माणसाचा गुळांबा’ करुन झालेला आहे.
फोटोत किंचित सरसरीत वाटत असला तरी निवल्यावर तो अगदी व्यवस्थित झालाय बरं का! 😃
तुमचा झाला का तयार? एका माणसाचा गुळांबा !!

Monday, May 30, 2022

एका पुस्तक प्रकाशनाची गोष्ट

 मी कार्यक्रमाच्या हॉलमध्ये प्रवेश केला तेव्हा जिच्या हस्ते पुस्तक प्रकाशन होतं ती माझी आवडती लेखिका-कवयित्री मैत्रिण बोलायला नुकतीच उभी राहिली होती. चला, म्हणजे आधीचे सोपस्कार झाले असावेत. ज्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन होते त्या नवलेखकाच्या नातलगांनी आमचे मनापासून स्वागत केले. माझ्यासोबत माझी आणखी एक मैत्रिण होती. अशा कार्यक्रमात धीर द्यायला सोबत कुणी असलेले बरे असे आम्हा दोघींचेही मत होते. आम्ही तिथे (ठरवून) उशीरा टपकल्याने कसनुसं हसत चटकन मागच्या ओळीतली कोपर्यातली खुर्ची धरली. एव्हाना स्टेजवरच्या लेखिका मैत्रिणीने माझ्या अपेक्षेला न्याय देत छान छान मुद्दे मांडायला सुरुवात केली होती. सृजन म्हणजे काय, लिहिण्याची उर्मी हा काय नेमका प्रकार असतो, अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय, सद्यस्थितीत लेखकाने स्वत:ला कसं घडवावं वगैरे. लेखकाच्या पुस्तकातल्या मर्यादा आणि बलस्थानंही तिने ओघवत्या शैलीत सांगितली. बारकाईने ऐकल्यावर जे लक्षात आले ते असे - पुस्तक यथातथा किंवा बंडल आहे. इकडे लेखिका मैत्रिण आता भाषणात रंगली आणि पुढचा गिअर टाकून अनुभव, अनुभूती आणि त्याची परिष्कृती असं लईच उच्च उच्च बोलू लागली. लेखकाचं समाजाशी नातं, समष्टीशी नातं वगैरे. तिच्याच बोलण्यातून अंदाज आला होता की ’उतारवयातल्या पुरुषाला कोवळया वयात आवडलेली सुबक ठेंगणी वयाच्या या टप्प्यावर पुन्हा भेटते’ या एकमेव थीमभोवती कथा(!) रचलेल्या होत्या. कसलं सृजन, कसला समाज अन कसली समष्टी. पण ती बिचारी प्रमुख पाहुणी असल्याने स्तुती न करुन करते काय! तरी प्रसंगाचे औचित्य चतुराईने सांभाळून तिने नवलेखकांना पुढील लेखनासाठी शुभेच्छांसह काही रोखठोक सूचना दिल्या आणि बोलणे संपवले.

उपस्थितांमधल्या बहुतेक बायका, लेखकाच्या नात्यातल्या असाव्यात. त्या दिवशी काहीतरी सणवार असल्याने इकडून परस्पर हळदीकुंकवाला जाऊया, या हिशेबाने खच्चून नटून आल्या होत्या. त्या चुळबूळ करु लागल्या. बहुतेक पुरुष हे लेखकाचे मित्र, रविवारची दुपार जरा बरी गेल्याने तेवढाच एक दिवस कटला, या आनंदात ते ऐकण्यात रमले होते. दरम्यान नातलगांची लहान मुलं त्या छोटेखानी हॉलच्या एका कोपर्यात शिवाशिवी खेळू लागली. भरपूर मेकअप केलेली एक युवती त्यांना दटावू लागली. युवतीने एक लांबलचक बट केशरचनेच्या बाहेर काढून सेट केली होती, ती सेट आहे ना हे चाचपण्यात तिचं सगळं लक्षं लागलं होतं. निवेदकाने माईक ताब्यात घेऊन लेखिका-मैत्रिणीला धन्यवाद दिले व
’रंजक भाषण आपुले, कान अमुचे तृप्त जाहले..’
तत्सम काहीतरी यमक जुळवले. ’अतृप्तीच्या वाटेवर’ छाप नावांचे एक दोन कवितासंग्रह प्रकाशित झालेली मंडळी दिसतात तसे ते होते. त्यांनी आता मंचावरच्या मान्यवर डॉ. ना पाचारण केले.
’मला फक्त पेशंटशी बोलता येतं बुवा पण तरी मी आपले चिमखडे (!) बोल (हा, ते बालरोगतज्ज्ञ असल्यामुळे) सादर करतो’,
असे सांगून डॉ. नी आयक्यू आणि इक्यू यातला फरक सांगितला. ते पुढे म्हणाले,
’लेखक व्हायचं तर एकवेळ आयक्यू नसला तरी चालेल (बापरे!) पण तुमचा इक्यू चांगला हवा’.
मग निवेदकाने त्यांना, म्हणजे निवेदकाला फक्त आयक्यू असूनही (उत्सवमूर्ती लेखकांनी) नोकरीसाठी मदत केल्याबाबत आभार मानले व मंचावरील पोलिस अधिकारी म्याडमना बोलण्यासाठी पाचारण केलं.
म्याडम चांगल्या सणसणीत व्यक्तिमत्वाच्या होत्या. कुर्त्याच्या बाह्या दुमडत माईकपाशी येत एक कडक लुक देत त्या म्हणाल्या,
" मघाशी प्रकाशक म्हटले, आम्ही प्रोत्साह्न देतो नवीन लेखकांना तर आता मला पण माझे पोलिस विभागातले भन्नाट अनुभव लिहावेसे वाटून राहिले आहेत."
जर यांचं पुस्तक निघतं तर माझं तर निघूच शकतं, असा त्यांचा सूर होता. पुढे त्या म्हणाल्या ’यांचे (लेखक) गुण किती सांगावे (त्यांना आठवेना) तितके कमीच.’ लेखकाशी असलेल्या घरोब्याच्या संबंधांमुळे नाईलाजाने म्याडम या ठिकाणी उपस्थित झाल्या असाव्यात.
डॉक्टर, पोलिस या दोन असंबद्ध व्यक्तींनंतर आता सुसंबद्ध व्यक्तीला आमंत्रित करण्यात आलं. लेखकाच्या संस्थेतल्या साहित्याची आवड असलेल्या एक म्याडम. त्या स्टेजवर जायच्या कल्पनेने गांगरलेल्या दिसत होत्या. चुरगाळलेला कागद आणि रुमाल घेऊन माईकजवळ गेल्या, त्या घाबरलेल्या असल्यामुळे दोन्ही खाली पडलं, त्या भीतीवर मात करत कागद उचलून सरळ करत म्याडमनी एकदम तारस्वरात बोलायला सुरुवात केली. लेखकाच्या लेखन कारकीर्दी(!)ला शुभेच्छा देताना अधूनमधून त्यांनी स्वरचित कवितेच्या २-२ ओळी पेरल्या होत्या.
’व्हावे लेखन इतुके की आभाळाने यावे खाली.. (!)
नंतर काही तरी ’ही तर कथुली झाली’
असे यमक होते. शेवटची लाईन दोनदा म्हटली की ती कविता असते म्हणून आम्ही पण इतर श्रोत्यांबरोबर इमानेइतबारे टाळ्या वाजवल्या.
लेखिका मैत्रिण तिच्या मंचावरच्या स्थानाला साजेसा गंभीर चेहरा ठेवून बसली असली तरी माझ्याकडे लक्ष जाताच अवसान गळून तिला खुदकन हसू फुटे. या बिकट स्थितीवर उपाय म्हणून तिने हॉलमधील झुंबरावर नजर केंद्रित केली. ती बहुतेक त्याचे लोलक मोजत असणार.
आता संस्थाध्यक्ष उठले, त्यांना बोलावणं तर कंपलसरीच असणार. लेखकानी आपल्या कथांचे तुकडे स्फुरले तसतसे यांना ऐकवले असावे, त्याचा पुरेपूर सूड अध्यक्षांनी आपल्या भाषणात घेतला. आम्हाला कोण कोणास काय म्हणाले काहीही कळलं नाही.
निवेदकाने म्हटले, "यांच्या भाषणावरुन ते संस्थेत किती जबरदस्त इंटरव्ह्यू घेत असतील याची कल्पना तुम्हाला आलीच असेल." हे कौतुक होते की टोमणा या गोंधळात अध्यक्ष आणि श्रोते असतानाच त्यांनी ’आणखी कोणाला मनोगत व्यक्त करायचे असल्यास यावे’, असे म्हटले.
तोवर मागच्या काउंटर्सवर आगमन झालेल्या पावभाजीचा खमंग सुवास दरवळू लागल्याने आणि शिवाशिवी खेळणार्या मुलांचा सूर टीपेला पोचल्याने आता कुणीही बोलायला उठलं नाही.
लेखकांचे कुणी नातलग आभारप्रदर्शनाला उभे राहिले. कार्य चांगलं पार पडल्याचे कृतकृत्य भाव चेहर्यावर लेऊन ते उभे राहताच मी
’आभाराचा भार कशाला अन् शब्दांचे हार कशाला’
या आभारवाल्यांच्या अत्यंत आवडत्या ओळी मनात म्हणत त्याच पुन्हा ऐकायला कान टवकारले आणि माझा अजिबात अपेक्षाभंग न करता त्यांनी त्या ओळी म्हटल्याच.
या ओळी न म्हणणारा आभारवाला दाखवा अन हजार रुपये मिळवा. मग आभारयादीला संस्थाध्यक्षांपासून सुरुवात करुन लाईटिंगवाला आटोपेतो बहुतेक लोक पावभाजीच्या तर काही मोजके लोक बुके धरले अवघडलेले हात मोकळे करायला लेखकाच्या दिशेने धावले. आम्ही मैत्रिणीच्या दिशेने धावलो. हौशी लेखक आता आयेस्बीएनवाले ऑफिशीयल लेखकराव किंवा निवेदकाच्या भाषेत (डायरेक्ट) ’साहित्तिक’ झाले. प्रकाशन सोहळा समाप्त झाला.
---------
आता एवढ्या खर्चिक प्रकरणापेक्षा फ्री एफबी लाईव्ह येणं आणि तीन तास ते प्रकाशन प्रकरण अटेंड करण्यापेक्षा लाईव्ह कवितेला लाईक ठोकून पुढे स्क्रोल करणं यातलं दुसरं कित्तीतरी सोपं आहे. शिवाय सध्याच्या लॉकडाऊन क्र. य आणि भविष्यातील कोरोनोत्तर काळात प्रकाशनापासून बहुतेक सगळंच ऑनलाईन होण्याची शक्यता आहे. कवितावाले निदान ५-१० मिनीटात तुम्हाला मोकळं करतात. गद्यवाले एकदा आले की तास-तासभर सोडणार नाहीत (वि.सू :हाय, नमस्कार, वॉचींग असं लिहून नंतर पळून जाणार्यांना ते ओळखून असतात) त्यामुळे गद्य मंडळींची बाजू घेण्यात तसा काहीही अर्थ नाही. (हे वाचणारे तुम्ही बावनकशी कॅटेगरीवाले आहात, ’ते’ वेगळे आहेत तेव्हा मला उगाच अनफ्रेंड करु नये 🙂 ) तुम्ही पूर्ण पोस्ट वाचावी म्हणून हे कन्क्लुजन शेवटी लिहिलं. बाकी कै नै.