Sunday, August 8, 2021

जेता

 कुठून येते ही उर्जा?


ज्या लक्ष्यपूर्तीसाठी कित्येक वर्षे तहान भूक हरपून मेहनत करायची, तो सुवर्णक्षण पुढ्यात असताना प्रतिक्रियांची पर्वा न करता अत्युच्च त्याग करायचा, ही जोखीम मोठीच. खेळाडूंमध्ये कुठून येत असेल हा अदम्य विश्वास? या कृतीमागे आंतरिक कौल असतो, की समयोचित तत्परता? देशातील कोट्यवधी चाहत्यांच्या अपेक्षांचा डोंगर डोक्यावर सांभाळत अशी कृती करणे ही सोपी गोष्ट नाही. तरीही असतात असे काही जीव, जे जीवापाड परिश्रमांसमोरही मनाच्या प्रामाणिकतेशी सलगी करतात. एखादा सामना हरताना त्यांनी क्षणार्धात जगाला जिंकून घेतलेले असते. त्यागमूर्तींची यादी संपत नाही. आत्मबळ पेरणारी अशी व्यक्तिमत्वे देशाचाच गौरव वाढवितात. निवडक दाखल्यांचा उजाळा माणुसकीच्या उद्घोषाला प्रेरक ठरेल.

१९८८ चे सेउल ऑलिंपिक. कॅनडाचा लॉरेन्स लेमिक्स अटीतटीच्या नौकानयन स्पर्धेत सहभागी झालेला होता. स्पर्धा सुरु असताना दुसर्‍या एका शर्यतीतली नाव उलटलेली पाहून तो चक्क आपली शर्यत सोडून नौकेसह त्यांच्या मदतीला धावला. या गोंधळामुळे स्पर्धा संपली तेव्हा तो २२ व्या स्थानावर होता पण त्याला विशेष पदक देऊन गौरवण्यात आले. 

१९९८ चे हिवाळी ऑलिंपिक. नॉर्वेचा बिजॉर्न डेहेल पुरुषांची क्रॉस कंट्री स्कीइंग स्पर्धा जिंकला. केनियाने या स्पर्धेत प्रथमच भाग घेतला होता. केनियाच्या फिलिप बॉईटसाठी जिंकणे तर दूरच, १० किमी अंतर पार करणे हेच मुळात मोठे आव्हान होते. बिजॉर्नने आपला पदकग्रहण सोहळा फिलिप्स अंतिम रेषा ओलांडेतो थांबवला. त्याचे स्वागत केले आणि मगच पदक स्वीकारले.

२०१६ चे रिओ ऑलिंपिक. न्युझीलंडची निकि हॅम्ब्लेन आणि अमेरिकेची अ‍ॅबे अगोस्तीनो महिलांच्या ५००० किमी रॅलीच्या पात्रता फेरीतच एकमेकींना अडकून पडल्या. अ‍ॅबेला चांगलीच दुखापत झाली होती पण दोघींनी एकमेकींना आधार, प्रोत्साहन देत कसेबसे पण पूर्ण अंतर पार केले. शेवटी पोचूनही त्यांची निवड करण्यात आली. 

२०२१ चे टोकोयो ऑलिंपिक. उंच उडीच्या अंतिम स्पर्धेत इटलीचा जिअनमार्को तंबेरी आणि कतारचा मुताझ इसा बरशीम यांच्यात सुवर्णपदकासाठी स्पर्धा सुरु होती. दोघांनीही सारखीच उंची गाठली त्यामुळे टायब्रेक झाला. पुढच्या ३ संधींबाबत असेच घडले. मग एक शेवटची संधी देण्याचा निर्णय झाला पण इटलीच्या खेळाडुचा पाय दुखावला गेल्यानं त्यानं ही संधी न घेता माघार घेतल्याचं जाहिर केलं. कतारचे सुवर्णपदक निश्चित होते तरीही त्याने सुवर्णपदक जिअनमार्कोशसह वाटून घेतले.  

’जो जीता वोही सिकंदर’ हेच जगाचे खेळाकडे पाहण्याचे साधारण सूत्र आहे. या पार्श्वभूमीवर ही सगळी उदाहरणे वेगळेच काही सांगत आहेत. बॉर्डर-गावस्कर मालिकेत विजय मिळवून कर्णधार अजिंक्य राहणे त्यांच्या घरी पोचला. अतिउत्साही क्रिकेट चाहते हे यश साजरे करण्यासाठी ’कांगारु’चे प्रतीक असलेला केक घेऊन गेले. कांगारू ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी आहे तेव्हा हा केक कापून मी त्यांचा अनादर करणार नाही असे अजिंक्यने नम्रपणे स्पष्ट केले. खेळाच्या गाभ्याशी इतक्या निखळ, सच्च्या प्रेरणा असू शकतात हे अविश्वसनीय वाटावे अशी आज परिस्थिती आहे. 

खेळात अधिकाधिक अर्थकारण गुंतल्यापासून बहुतेक खेळाडूंना जिंकायचे आहे ते आर्थिक लाभासाठी. विशेषत: लीग स्वरुपाच्या खेळात तर खेळाडूंवर बोली लावली जाते त्यामुळे कसे जिंकावे यासाठी वेगवेगळे डावपेच आखले जातात. उत्तेजक द्रव्यांची मदत घेतली जाते. मॅच फिक्सींगपासून अनेक नियमबाह्य प्रकार सर्रास केले जातात. ऑनलाइन स्टॉक ब्रोकरेज फर्म झिरोधाचा सह-संस्थापक निखिल कामत याने मध्यंतरी एका ऑनलाइन चॅरिटी सामन्यादरम्यान बुद्धीबळातील माजी विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदचा पराभव केला होता. नंतर कामतला आपण संगणकाच्या मदतीने फसवणूक केल्याची कबुली द्यावी लागली. खेळात कायम जिंकावे असे वाटण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्यातून मिळणारी प्रचंड प्रसिद्धी हे यावरून लक्षात येईल. 

जिंकायलाच हवे असे वाटण्यामागचे तिसरे आणि सर्वाधिक भावनाप्रधान कारण आहे राष्ट्रप्रेम. क्रिकेट जणू धर्म असलेल्या आपल्या देशात क्रिकेटखेळाडूंना जवळपास देव मानून मनात त्यांची प्रतिष्ठापना करणारे चाहते सामना हरल्यावर त्याच खेळाडूंचे पुतळे करून जाळायला मागेपुढे पाहात नाही. भारत-पाकिस्तान दरम्यानच्या सामन्यांना तर जणू मैदानावरचे युद्ध मानले जाते. तिथली हार-जीत ही संघाची नव्हे तर देशाची हार-जीत मानली जाते. देशाची अब्रू खेळाच्या मैदानावर जणू पणाला लागते. ऑलिंपिकमधल्या एकेका पदकाच्या प्राप्तीकडे तर अवघा देश डोळे लावून बसलेला असतो. खेळाडू तिथे देशाचे प्रतिनिधी म्हणूनच जात असतात. मीराबाई चानूने कास्यपदक मिळवले तरी ते फक्त तिचे पदक नसते. देशाच्या आकांक्षांच्या पूर्ततेचे ते प्रतीक असते. खेळात प्रतिस्पर्ध्यावर मात करण्याची ईर्षा असणे, विजिगीषु वृत्ती असणे हे अगदी स्वाभाविक आहे परंतु पदक मिळवायच्या, जिंकायच्या दडपणामुळे जिंकण्याच्या मार्गापेक्षा आणि खेळापेक्षा मह्त्व मिळते ते फक्त ’जिंकण्याला’. कोणताही देश याला अपवाद नाही. उदा: खोर्‍याने पदके मिळवणार्‍या चीनमध्ये यशस्वी खेळाडू ’निर्माण’ करणार्‍या राष्ट्रीय क्रीडासंस्थांमध्ये परतीचा मार्ग बंद झालेली अनेक बालपणं भरडली जातात कारण ’जिंकण्याला’ पर्याय नसतो.

या सगळ्या चौकटीला छेद देणारे काही असे काही प्रसंग घडतात जिथे कुणीच हरत नाही फक्त ’खेळ’ जिंकतो. केनियाचा जगप्रसिद्ध धावपटु अबेल मुताई 2012 मधील स्पेन क्रॉस कन्ट्री स्पर्धेच्या शेवटच्या राउंड मधे धावतांना अंतिम रेषेच्या जवळ आला होता. त्याने सुवर्ण पदक जिंकल्यातच जमा होते. अचानक अंतिम रेषा समजून तो एक मीटर आधीच थांबला. त्याच्या मागुन येणाऱ्या स्पेनच्या इव्हान फर्नांडीसच्या हे लक्षात येताच त्याने आधी ओरडून नंतर सरळ ढकलुन त्याला अंतिम रेषेपर्यंत पोचविले. पहिला येण्याची संधी ’घालवली’ असे इव्हानला वाटले नाही कारण अबेल पहिला आलेलाच होता. त्याच्या गोंधळाचा फायदा घेऊन सुवर्णपदक पटकावणे इव्हानला शक्य होते पण त्याने तसे न करता आपली हार स्वीकारली. इथे खरे तर तो माणूस म्हणून जिंकला. अशा खेळाडूंमुळे ते ज्या देशाचे प्रतिनीधीत्व करतात तो देश पदकतालिकेवर कोणत्याही क्रमांकावर असला तरी जेताच असतो. पूर्ण प्रयत्नांती खेळाडू जिंकला की हरला याइतकेच त्याच्यातला ’माणूस’ जिंकला हे आपण महत्वाचे मानायला हवे. या ऑलिंपिकमधील बॅडमिंटनच्या सामन्यात सिंधूच्या हातून रजतपदक गेल्यानंतर लगेच ’तिने आता निवृत्त व्हावे’ अशी टीका काही जणांनी सुरु केली. याच सिंधूने मागील ऑलिंपिकमध्ये कॅरोलिना मरिनकडून पराभव झाल्यानंतर तिने आनंदाच्या भरात फेकलेली रॅकेट विचलीत न होता शांतपणे उचलून तिच्या हतात दिली होती. सगळे क्रीडाजगत तिच्या या समंजस कृतीकडे कौतुकाने पाहत होते. अथक मेहनतीनंतरही केवळ तिने मिळवलेल्या पदकाचा रंग बदलला म्हणून तिच्या या उमदेपणाचा आपल्याला विसर पडू नये. खेळाडूंच्या मनाची मशागत इतक्या नेमकेपणाने  झाली असेल तर प्रत्यक्ष वेळ येते तेव्हा त्यांच्या अंतरात्म्याचा आवाज जिंकतो आणि पर्यायाने राष्ट्र जिंकते. राष्ट्र ही सामूहिक संकल्पना आहे पण राष्ट्रप्रेम ज्यातून सिद्ध होते ती कृती मात्र वैयक्तिक असते. जिंकण्याची ही आगळीवेगळी व्याख्या आणि खिलाडूवृत्ती अशा मोजक्या खेळाडूंपर्यंतच मर्यादित न राहता नागरिकांपर्यंत झिरपायला हवी. 

क्रीडामानसोपचारतज्ज्ञ भीष्मराज बाम खेळाडूंची मानसिकता ओळखून त्यानुसार कोणते बदल उपकारक ठरतील याचा सतत अभ्यास करत असत. शारिरिक प्रशिक्षणाइतकेच महत्व ते मानसिक प्रशिक्षणाला देत असत. इतरांचं अगदी विरुद्ध पक्षाचं सुद्धा जे चांगलं असेल ते स्वीकारणं आणि त्यांचा अनुभव, मत, ज्ञान यांचा आदर करणं आपण शिकलो तरच वैयक्तिक आणि गटाचा विकास शक्य आहे, यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता. ते म्हणत ,"चुरशीची स्‍पर्धा असतांना मैत्र आणि नाती ही प्रेमाने आणि संघभावनेने मजबूत करायची असतात. द्वेष, मत्‍सर, शत्रूत्‍व या उपटसुंभ भावनांना मूठमाती द्यायची असते. म्‍हणजे मग आयुष्‍य ख-या अर्थाने संपन्‍न होत असते. हे सारेच स्‍पर्धात्‍मक खेळांतून शिकता येते. ते पालक, शिक्षक व प्रशिक्षक यांनीही शिकून घेऊन आपल्‍या वागण्‍याने पुढच्‍या पिढीवर संस्‍कार करायचे असतात." 

हे शिकता आले, आचरणात आले, तर 'सहनाववतु' म्हणजेच आमचा कुटुंब म्हणून, समाज म्हणून, देश म्हणून आणि अंतिमतः विश्व म्हणून एकत्रित विकास होवो, या प्रार्थनेला अर्थ लाभेल. आपण 'हे विश्वची माझे घर' असे मनाच्या तळाशी स्वीकारलेले असते; परंतु ही भावना तिथेच राहते. ती व्यवहारात येत नाही. तसे असते, तर प्रत्येक देशाला विकासकामांपेक्षा जास्त खर्च संरक्षण व्यवस्थेवर करावा लागला नसता. परंतु खेळ इथे दुवा म्हणून काम करु शकेल. ज्यातून संवादाची संधी निर्माण होऊ शकेल. वैश्विक शांतता निर्माण व्हावी आणि देशांमध्ये परस्पर सामंजस्य वाढावे, हेच प्रत्येक आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्दिष्ट्य असते. खेळात जिंकण्याची मौज काही वेगळीच; पण माणूसपणाची सरशी तितकीच महत्त्वाची आहे. ते भान रुजवणे, हेच खेळाचे साध्य आहे. यासाठी अगदी सोपा नियम मार्क ट्वेन त्यांच्या मार्मिक शैलीत सांगून गेले आहेत. "It's good sportsmanship to not pick up lost golf balls while they are still rolling". कतारच्या बरशीमने सुवर्ण पदकात इटलीच्या तंबेरीला वाटा देत घेतलेली उंच उडी, स्टेडियम पार करून कित्येकांच्या मनापर्यंत पोचली. अशी अद्भूत उर्जेची उदाहरणे पाहता 'नहीं जिता वो भी सिकंदर' म्हणायला हवे कारण तो जगातील मानसिक परिपक्वतेचा, विवेकाचा विजय ठरतो. 

published in महाराष्ट्र टाईम्स- संवाद पुरवणी -8 Aug 2021

Thursday, July 22, 2021

बाकीबाब


एखाद्या कवीची एखादी कविता आवडते. एखाद्या कवीच्या कवितेतला एखादा चमकदार शब्द आवडतो पण एखादा कवी अख्खाच्या अख्खा आवडतो. त्या कवीची प्रत्येक कविता आणि त्यातला प्रत्येक शब्द झपाटून टाकतो, असं तुमचं कुणाच्या बाबतीत होतं का? माझं असं #बाकीबाब म्हणजे बा.भ.बोरकरांच्या बाबतीत होतं. त्यांच्या कविता आरपार शिरतात. अर्थाचे कंगोरे वगैरे शोधत बसायचं दडपण नसल्याने, कवीला नेमकं काय म्हणायचंय बॉ! असले प्रश्न पडत नसल्याने, त्यांची कविता शब्दश: भेटते. ती वाचायची चीज नसून जगायची, भोगायची, अनुभवायची चीज आहे हे लख्ख कळतं. 

’माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे..  

कड्या कपारीमधूनी घट फुटती दुधाचे’ 

वाचलं तेव्हा गोव्याला जाण्याआधीच मी गोवा ’पाहिला होता. त्यामुळे प्रत्यक्ष गेले तेव्हा बहुतेक अनुभव म्हणजे ’देजावू’ मोमेंट होते. आधीच कुठेतरी ’पाहिलेले’.

’कुठे तुटल्या लाल कड्यावर चपळ धीट बकरीची पोरे.. 

एक त्यातले लुचे आईला सटीक कांती गोरे गोरे’ 

असं काही चित्रवाही ते कवितेतून रेखाटतात तेव्हा त्या कड्यावर चढून बकरीच्या शुभ्र गोजिरवाण्या पिलाच्या मऊशार अंगाला आपण केव्हाच स्पर्श केलेला असतो.  

इकडे कुणाला कोसळत्या, खळाळत्या पावसाचा अनुभव नाही, पण 

’लक्ष आचळांनी दुभे निळी आकाशाची गाय

थिजल्या तृप्तीवरी दाटे संतोषाची साय’ 

असा निळाईत रंगलेला पाऊस त्यांच्या नुसत्या शब्दांमधून चिंब करतो.

सौंदर्यपूजक, प्रकाशपूजक बोरकर तमाचे स्त्रोत्र लिहितानाही सृजनाशी नातं जोडतात.  

’घटका घटका काळोखातच बसून असतो असा

उरातला गोंजारत नवख्या शब्दांचा कवडसा’ 

त्यांच्या या ओळी वाचाव्यात आणि स्वत:सह स्तब्ध बसून राहावं.

’मध्यरात्री नभघुमटाखाली शांतीशिरी तम चवर्‍या ढाळी

त्यक्त बहिष्कृत मी ज्या काळी, एकांती डोळे भरती..’ 

असं काही वाचल्यावर यावर काही लिहू नये, त्याने मनावर पाण्यावरच्या तरंगासारखा उमटलेला अलवार भाव डहुळेल, त्यावर ओरखडे पडतील असं वाटतं.

स्त्री-सौंदर्याची आसक्ती जेव्हा त्यांच्या शब्दातून ओसंडून वाहते तेव्हा आपण त्यातल्या प्रियकराचे डोळे झालेलो असतो. इतका हळूवार रोमँटिक, चितारी मराठीत दुसरा नसावा.

’पाठमोरी मूर्ती तुझी पाहिली मी कौतुके.. 

वाटले त्वत्कुंतली गे गुंतली सारी सुखे’ 

किंवा

’नको घुसळू पाण्यात खडीसाखरेचे पाय 

नको गोठवू ओठात दाट अमृताची साय’ 

किंवा 

’तव नयनांचे दल हलले गं

 पानावरच्या जलबिंदूंपरी 

त्रिभुवन हे डळमळले गं’ (थेट त्रिभुवन, अधलं-मधलं काहीच नाही !!) 

किंवा

’केशी तुझिया फुले उगवतील.. तुला कशाला वेणी’ किंवा... पुरे.

बोरकरांचे अर्थगर्भी शब्द नुसते वाचावे, रिचवावे, समीक्षा वगैरे करुन चावून चोथा करु नये. मग मिटल्या डोळयांना ’ती’ दिसते.

अनुरक्तीतल्या सौंदर्यात आणि विरक्तीतल्या देखणेपणात नेमका काय फरक असतो हे सुद्धा हा कवी काय ताकदीने दाखवतो!

’ओळखतील जे मला आणि मज दावितील मम यथार्थ ओळख, 

कणकण माझ्या देतील किंवा अवघ्या ब्रह्मांडाची पारख’ 

किंवा

’देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती 

वाळवंटातूनही जी स्वस्तिपद्मे रेखती’ 

असं अंतर्बाह्य देखणेपण जगाला लाभेल तेव्हा लाभो पण आपल्याला निदान ती नजर तरी लाभेल का! 

 

बोरकरांची कविता वैयक्तिक अनुभवापासून वैश्विक अनुभूतीपर्यंत कमाल वेगाने झेपावते. मूक करते.  

’या नदीच्या पार वेड्या यौवनाचे झाड आहे, 

अमृताचा चंद्र त्याच्या पालवीच्या आड आहे...

तेथ जाया वेग-वेडी पारजाची वाट आहे, 

शांतवाया ताप अंती गोकुळीचा माठ आहे.’ 

निर्व्याज भावनांच्या पखाली वाहणार्‍या या शब्दप्रभूला ’नाही पुण्य़ाची मोजणी नाही पापाची टोचणी’ म्हणत स्थितप्रज्ञ होणं सहजसाध्य असलं तरी ’अनंता तुला कोण पाहू शके’ अशी अमूर्ताची ओढ आहेच. 

जगण्यातले सगळे विभ्रम त्यांच्या उत्कट शब्दांच्या रुपातून असे आपल्या आत, बाहेर सगळीकडे विखुरलेले असताना, त्यांच्या कवितांचा ’दिडदा दिडदा’ नाद मनात सतत निनादत असताना त्यांच्या वेगळ्या स्मृती जागवायच्या तरी कशा!



Friday, July 9, 2021

आनंदाचा शोध -The pursuit of Happyness

 

धावतपळत आल्याने घामेजलेला चेहरा, घरगुती कपडे, त्यावर कसंबसं अडकवलेलं जॅकेट, त्यावर रंगाचे शिंतोडे, अशा काहीशाe विचित्र अवतारातला एक तरुण. मुलाखतीसाठी त्याला कॅबीनमध्ये बोलावलं जातं. मनातली अस्वस्थता लपवत तो हसतमुखाने सर्वांना अभिवादन करतो. त्याच्याकडे पाहून कुणी काही विचारायच्या आत तो स्वत:च स्पष्ट सांगतो. "माझ्या या अवतारामागचं कारण तुम्हाला पटावं अशी कोणती कथा रचून सांगावी याचा मी बाहेर बसून विचार करत होतो पण त्यापेक्षा खरं तेच सांगतो. पार्किंगच्या चुकीचा दंड भरला नाही म्हणून मी रात्रभर तुरुंगात होतो. तिथून सुटका होताच धावत मी थेट इथे आलो आहे." अधिकारी क्षणभर अवाक् होतात. नंतर ते त्याची शैक्षणिक प्रगती, कामातली हुशारी, जिद्द याबद्दल प्रश्न विचारतात. अखेर प्रश्नांच्या फैरीला थांबवत तो म्हणतो, "एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर वेळ मारुन नेण्यापेक्षा ’मला माहित नाही’ असं मी मोकळेपणे सांगेन पण त्याचवेळी ते उत्तर कसं, कुठे सापडू शकेल याचा विचार माझ्या डोक्यात सुरु झालेला असतो आणि मग मी ते शोधल्याशिवाय राहत नाही." एव्हाना पॅनेल त्याच्या बोलण्याने प्रभावित झालेलं असतं. एक अधिकारी आता शेवटचा प्रश्न विचारतात," अंगावर धड formal शर्टही न घालता मुलाखतीला आलेल्या माणसाची मी नेमणूक केली तर त्यावर तू काय म्हणशील?" हा तरुण उत्तरतो, "त्याची पँट नक्कीच झकास असेल." इतक्या चमत्कारिक परिस्थितीतही त्याने दिलेल्या या खेळकर आणि मार्मिक उत्तरावर सगळे अधिकारी खळखळून हसतात. प्रचंड धडपडीनंतर अखेर इंटर्न म्हणून नामांकित ब्रोकर फर्ममध्ये त्याचा प्रवेश झालेला असतो. 

हे यश फार भव्यदिव्य आहे का! नसेलही, पण ते आपसूक ओंजळीत पडलेलं नाही. त्याच्या निरलस परिश्रमाचं ते सार्थक आहे त्यामुळे त्याचं मोल होऊ शकत नाही. प्रेक्षकांना हसू आणि आसू अशा संमिश्र मनोवस्थेत घेऊन जाणार्‍या The pursuit of Happyness या चित्रपटातले असे अनेक प्रसंग अभिनेता विल स्मिथने अक्षरश: जिवंत केले आहेत. प्रसिद्ध अमेरिकन व्यावसायिक ख्रिस गार्डनर यांच्या आयुष्यातल्या सुरुवातीच्या संघर्षकाळावर बेतलेला हा नितांतसुंदर चित्रपट. 

या कष्टाळू, हरहुन्नरी, प्रांजळ माणसाचं यशाच्या अथक पाठलागातही तग धरुन राहिलेलं पारदर्शी, उमदं व्यक्तिमत्व अक्षरश: काळजाला भिडतं. चित्रपटाच्या नावाचा संबंध, ’सुखाकांक्षेच्या पूर्तीचा अधिकार प्रत्येक माणसाला आहे, त्याने तो वापरावा’ हे सांगणार्‍या अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याशी आहे. ख्रिसच्या मुलाच्या पाळणाघराबाहेर चितारलेल्या म्युरलमधल्या स्पेलिंगमधली गडबड तशीच ठेवून चित्रपटाच्या नावात Happiness (स्थिती) ऐवजी Happyness चा (वृत्ती या अर्थाने) जाणीवपूर्वक वापर करण्यात आला आहे.

सेल्समन म्हणून काम करताना सातत्याने आलेलं अपयश, परिस्थितीशी झगडताना कंटाळून बायकोने हात सोडलेला, त्यातच चिमुकल्या मुलाची स्वेच्छेने घेतलेली जबाबदारी. पण हताश न होता मुलाच्या निष्पाप, बोलक्या डोळ्यात लुकलुकणार्‍या चांदण्यांच्या प्रकाशात जिद्दीने पुढे जात राहणार्‍या प्रयत्नवादी आणि स्वाभिमानी तरुणाची ही कहाणी. ख्रिस गार्डनर यांच्या पुढील यशस्वी व्यावसायिक जीवनात याहून अधिक रोमहर्षक घटना नक्कीच घडल्या असतील तरीही ह्याच भागाची निवड चित्रपटासाठी करावी असं गॅब्रिएल म्युकिनो ह्या इटालीयन दिग्दर्शकाला का वाटलं असावं! ’माझ्या आजच्या स्थानावरुन माझी योग्यता ठरवू नका, मी इथवर कसा आणि कुठून पोचलो यावरुन ठरवा’ हेच कदाचित दिग्दर्शकाला ख्रिसच्या वतीने सांगायचं असावं. कथानक पुढे सरकत जातं तसा हा चित्रपट आपल्या डोक्यात एका वैश्विक प्रश्नाचा भुंगा सोडून देतो, ’माणूस जगतो कशासाठी!’ आणि तो संपतो तेव्हा आपल्याला जे उत्तर सापडतं ते म्हणजे- ’आनंदाचा शोध घेण्यासाठी.’ 

अर्थात यातला ख्रिस स्वप्नाळूपणे सुखी होण्याकडे डोळे लावून बसत नाही तर आपल्या बछड्याला कवटाळून विजिगिषु मानसिकतेने आयुष्याशी दोन हात करत राहतो. पडतो. पुन्हा उभा राहतो. आपणही केव्हाच त्या बेघर बापलेकांच्या मायेच्या धाग्याने गुंफलेल्या भावविश्वाचा भाग होऊन गेलेलो असतो. मिळेल त्या निवार्‍यात त्यांनी वेचलेले आनंदाचे इवले, गोड क्षण बघताना आपल्या मनातल्या आनंदाच्या व्याख्या आपण नकळत तपासून पाहतो. 
आनंद म्हणजे स्थैर्य, समृद्धी, प्रतिष्ठा, साफल्य!! की आनंद म्हणजे स्वप्नपूर्ती, सन्मानपूर्वक जगणं, जीवलगांच्या सान्निध्यात असणं की आनंद म्हणजे काही वेगळंच!! सुजाण ख्रिस आणि त्याच्या अजाण मुलाच्या आनंदाच्या व्याख्या काही जगावेगळ्या नाहीत किंबहुना त्या अमेरिकन धाटणीच्याच आहेत पण ते दोघं मात्र जगावेगळे आहेत. कुणीही मनाने कोलमडून जाईल अशा स्थितीत देखील हा बाप ठाम उभा असतो. बापमाणूस हा शब्द आपण जितक्या अर्थच्छटांनी वापरतो त्या सगळ्य़ा लागू व्हाव्यात असा यातला बाप ’विल स्मिथ’ जगला आहे. 'The wound is the place where the light enters you' हे रुमीचं वाक्य त्याला बघताना आठवत राहतं. हट्ट करण्याच्या वयातलं त्याचं समजूतदार लेकरु आपले कोवळे हात बापाच्या मानेभोवती गुंफून तो त्याच्यासाठी या जगातला सगळ्यात खास माणूस असल्याची ग्वाही देत राहतं. विल स्मिथचा रिअल मुलगा जेडन हाच रील मध्ये आहे, कदाचित त्यामुळे त्यांच्यातला बंध अजूनच अस्सल वाटतो. त्या दोघांमधले हलकेफुलके पण डोळे पाणावणारे संवाद हे या चित्रपटाचं बलस्थान आहे. ममता हा शब्दच नव्हे, कृतीही ’स्त्री’शी जोडली गेलेली आहे. या चित्रपटात दिसणारी स्त्रीपात्रं मात्र कोरडी, व्यवहारी आहेत. ती तशी का आहेत याची कारणमीमांसा कथेत आली आहे. इथे ममतेचं दुसरं नाव बाप आहे.ख्रिस आहे. 

चित्रपट २००६ सालचा आहे. माणसाचा आनंदाचा शोध , आनंद मिळवण्याची धडपड संपलेली नाही. कधी संपणारही नाही त्यामुळे हा चित्रपट कालातीत आहे. आनंद कुठेतरी पोचण्यात नसतो, तो त्या शोधाच्या प्रवासातच दडलेला असतो हे सांगणारा हा चित्रपट म्हणजे एक समृद्ध अनुभव आहे. त्यात उमेदीच्या प्रत्येक क्षणाला पियानोचे सूर ऐकू येतात. आनंदाला स्वर असता तर तो असाच असता असं वाटणारे सूर. बापाचं बोट धरुन रोज नव्या उत्साहाने, आशेने त्याच्याबरोबर बागडत, चिवचिवत जाणारा निरागस लेक चित्रपटातल्या अनेक दृश्यांमध्ये दिसतो. ते खरं तर माणसाने धरून ठेवलेलं, मधूनच सुटून जाणारं, पुन्हा मुठीत येणारं आनंदाचं बोट असावं. 


- मोहिनी मोडक

-------------------------------------

प्रसिद्ध अमेरिकन व्यावसायिक ख्रिस गार्डनर यांच्या आयुष्यातल्या सुरुवातीच्या संघर्षकाळावर बेतलेला नितांतसुंदर चित्रपट म्हणजे The pursuit of Happyness. होय, Happiness नव्हे Happyness. प्रेक्षकांना हसू आणि आसू अशा संमिश्र मनोवस्थेत घेऊन जाणार्‍या या चित्रपटातल्या बापमाणसाची भूमिका अभिनेता ’विल स्मिथ’ अक्षरश: जगला आहे. कुणीही मनाने कोलमडून जाईल अशा स्थितीत देखील हा ठाम उभा असलेला बाप आणि आपले कोवळे हात त्याच्या मानेभोवती गुंफून तो त्याच्यासाठी जगातला सगळ्यात खास माणूस असल्याची ग्वाही देत राहणारं त्याचं समजूतदार लेकरु यांचं भावविश्व प्रत्यक्ष अनुभवायला हवं. या बापलेकांच्या सुखाच्या शोधाची कहाणी सांगणारा  ब्लॉग मी Swayam साठी गेस्ट ब्लॉगर म्हणून लिहिला आहे. 

https://swayamtalks.org/blog-the-pursuit-of-happyness/