Thursday, November 5, 2020

अमेरिका डायरी - दुसरा आठवडा - जनजीवनातून फेरफटका १


लिनकडे इतकं प्रेम, आपुलकी मिळाली, आता पुढचे होस्ट कसे असतील याची उत्सुकता होती आणि धाकधूकही. कल्पना कर, एका पूर्ण अनोळखी कुटुंबात ८ दिवस राहायचं ते ही अमेरिकन. एका मॉटेलपाशी खुणेच्या जागी मला चार्लीने उतरवलं. चार पदरी प्रशस्त रस्त्यांवरुन टीमच्या इतर सदस्यांना घेऊन त्यांच्या होस्टच्या गाड्या पाठोपाठ पोचल्या. "हा बस चौकातच आहे, पोचले का तुम्ही" वगैरे काहीही फोनाफोनी न होता सगळे वेळेत पोचले. वक्तशीरपणा हा तिथल्या रोजच्या जगण्याचा भाग आहे. तो सामूहिक गुण असावा लागतो. एकट्याने पाळला की लग्नाचा मुहूर्त टळून गेला तरी ’आवाज वाढव डीजे’वर थिरकणार्‍या व-हाड्यांकडे पाहत राहण्याखेरीज आपल्या हाती काही उरत नाही. तर आता आमची टीम नव्या होस्ट्सकडे सुपूर्द करण्यात आली. लिंडा मेसर्स- गोरी, सोनेरी केसांची, चेहर्‍यावर टिपिकल वांग असलेली मध्यमवयीन लिंडा वळणावळणाच्या रस्त्याने, वाटेतल्या महत्वाच्या जागांची माहिती देत मला घेऊन तिच्या घरी निघाली.

तिचं तिमजली घर प्रशस्त आवारात एकटंच उभं होतं. आवारात पडलेली वाळकी पानं इकडे तिकडे उडत होती. तिकडे घरं एकमेकांपासून अंतरावर असल्याने शेजार्‍यांकडच्या सुरस हकीकती त्यांना कळत नसणार. आत ’दिल का भँवर करे पुकार’ गाण्यातल्यासारखे निमुळते जिने एकावर एक होते. मला दिलेली खोली छान होती पण बघावं तिकडे मांजरीचे केस. त्या घरात माणसांपेक्षा जास्त असलेल्या मांजरी शेपटी उगारुन सारख्या खालीवर फिरत फिस्कारत होत्या. 

फ्रेश होऊन आम्ही लगेच औपचारिक वेलकम पार्टीसाठी तयार झालो. काही स्थानिक क्लबचे सदस्य आमच्या स्वागताला आपल्या तिरंग्याच्या छटांचा केक घेऊन आले होते. लिंडाचा छोटा मुलगा बारटेंडर झाला होता. काळा कोट, बो अशा वेषात तो लगबगीने वडिलांबरोबर पाहुण्यांना ड्रिंक्स देत होता. तिच्या २ षोडशा मुली किलबिलत होत्या. लिंडाने स्वत: खपून मटन बॉलसदृश पदार्थ केला होता. त्यानंतर मात्र मला ती एकदाही किचनमध्ये काही शिजवताना दिसली नाही. 

दुसर्‍या दिवशीपासून आमचे झंझावाती कार्यक्रम सुरु झाले. पहिली भेट थेट अ‍ॅस्ट्न गावच्या पॉश पोलिसस्टेशनला. अधिकारी आणि पोलीस हसरे, मनमोकळे, फिट आणि देखणे होते. पासपोर्टवर सही घ्यायला मी आपल्या पोलीसस्टेशनला गेले तेव्हा भेटलेले पोट सुटलेले, कंटाळलेल्या चेहर्‍याचे हवालदार आठवले. अर्थात आपले एकच नांगरेपाटील त्यांच्या शंभरांना देखणेपणात पुरुन उरतील हा भाग वेगळा. तर त्यांनी त्यांच्या आपण हॉलीवूड सिनेमात सुसाट धावताना पाहतो तशा गाडीतून छोटी चक्कर मारली. 

आतली यंत्रणा दाखवली. स्टेशनमधली अजब शस्त्र दाखवली. एक गन अशी होती की फायर केली की छर्रा पायाला लागून चोर अडखळून पडे. आतली कच्ची कैद दाखवली, बाहेर कैद्याचे कपडे घालून एक स्मार्ट पुतळा बसवला होता, त्याचे प्रयोजन कळले नाही.

तिकडून आम्ही गेलो अग्नीशमन दलाच्या कचेरीत. तिथले बंब (गाड्या) अतिशय अवाढव्य होते. फायरसेफ्टी आणि त्यांची यंत्रणा यावर तिथे एकाने आम्हाला छान माहिती दिली. भारतीय आया तिकडे मुलांकडे गेल्या की पूजेत धूपदीप लावतात मग फायर अलार्म वाजतो आणि पोलीस आणि या गाड्या पॅ पॅ सायरन वाजवत धडाधड पोचल्या की नुसता गोंधळ उडतो वगैरे किस्से आपण ऐकलेलेच असतील. इथल्याच कँटीनला थोडं खाऊन तिथल्या भल्यामोठ्या नगर वाचनालयात गेलो. बाहेर खायचे म्हटले की आमचा अर्धा वेळ आम्हाला चालेल असा मेनू शोधणे -त्यात पोर्क बीफ नाही नं हे वेटरला समजेल अशा इंग्लीशमध्ये विचारणे यातच जायचा. ज्यूस तर इतका द्यायचे की आम्ही त्यांच्या चमत्कारिक चेहर्‍यांकडे दुर्लक्ष करुन ’खाली’ ग्लास मागवून शेअर करत असू. 

ते जणू स्वप्नातले वाचनालय होते. पुस्तकाचे नाव सांगितले की ते कॉम्प्युटरच्या मदतीने अचूक आणून देत होते. पिवळ्या फायलीत नंबर शोधणे मग हवे ते पुस्तक त्या विभागातल्या बाईंड केलेल्या २३४ पुस्तकातून शोधेतो त्यातला रस संपणे, असं काही व्हायचा चान्सच नाही. काही जण पेय पीत वाचत बसले होते. पुस्तकातील संदर्भ हवे असले तर कॉपी करायला तर तिथेच प्रिंटर, स्कॅनर वगैरे सोय होती. अशी आमची आई असती तर आम्हीही देखणे झालो असतोच्या चालीवर अशी आमची लायब्ररी असती तर आम्ही बालवयातच पीएचडी झालो असतो असे वाटले. अशी लायब्ररी मी नुकतीच अंजूच्या पुण्यातील घराजवळ पाहिली अर्थात ती याच्या तुलनेने फार चिमुकली होती. 

वाचनालयानंतर कोर्टाची भेट होती. प्रशस्त दगडी इमारतीतल्या एका दालनात आम्हाला एकदम आत नेल्यावर कळलं की चक्क एक सुनावणी सुरु आहे. हसर्‍या चेहर्‍याची जज बाई उंचावर एका आसनावर बसली होती. आपल्याकडे पिंचू कपूरटाईप लोकच जजच्या इंग्रजाळलेल्या डगल्यात पाहायची सवय. चश्मदीद गवाह एक दोन असावे. तसंही आत मोजकेच लोक होते. गुन्हा बहुतेक ड्र्ग्जशी संबंधित असावा. एक चिनी तोंडवळ्याचा पण एकूण मेक्सिकन वाटणारा माणूस म्हणजे मुजरिम असावा. त्याच्या मागे राकट पोलीस उभा होता. त्या मुजरिमच्या चेहर्‍याकडे बघायलाही भीती वाटत होती. आमच्या टीममध्ये एकही वकील नसल्याने चालू सुनावणीमधले ओ की ठो कळेना. तेवढ्यात अदालत बरखास्त करुन जजबाई उठून आमच्याकडे आल्या. परिचय- शेकहँड वगैरे झाले. मुजरिमला पोलीस घेऊन गेले. 

शब्दश: गाव भटकून आल्याने घरी आल्याने फार दमलो होतो. डिनरच्या तयारीचे काही चिन्ह दिसेना. या प्रोजेकटच्या आधी आमचे तिथे कसे वागावे याचे ग्रूमींग सेशन झाले होते तसेच या होस्टची कार्यशाळा पण इकडे झाली होती. कोण, कोणत्या देशातले लोक येणार, त्यांच्या रितीभाती कशा असतात, ते साधारण काय खातात, काय नाही, संवाद कसा असावा, काय माहिती द्यावी, कुठली स्थळे दाखवावी इ. पण लिंडाला बहुतेक यापैकी खाण्याचे काय करावे कळेना. तिने फ्रीज भाज्या,चीज, फळांनी भरुन ठेवला होता. त्यात अनेक तयार पदार्थांचे टिनही होते. काय हवं ते करुन खा म्हणून ती वर निघून गेली. ऑ! आता काय बा करावे. मी खुडबूड करुन त्यातून भात आणि भाज्या एकत्र शिजवून, त्यात दिसतील ते इंटरनॅशनल मसाले घालुन, कुकिंग रेंजशी खटाटोप करत काहीतरी पुलाववजा पदार्थ केला. चव येईना मग त्यात एक दोन सॉस घालून ते प्रकरण मांजरींना चुकवत शांतपणे खाल्ले. पुढे आठवडाभर डिनरला असेच प्रयोग केल्याने मी बर्‍याच नव्या पदार्थांचे शोध लावले असावे. 

क्रिकेटशी एकनिष्ठ असलेल्या माझ्या भारतीय मनाला बेसबॉलचा सामना पाहण्यात फार रस नव्हता पण लिंडाचा नवरा जॉन (हा गे होता असा लिंडाचा समज होता ,तो कसा दूर झाला याची कहाणी तिने पुढे एका रात्री ऐकवली) यांनी तसा कार्यक्रम आधीच आखला होता. दुसर्‍या दिवशी स्टेडियमवर पोचलो तर तिथे उत्सवी वातावरण होतं. कुटुंबच्या कुटुंब तिथे सहलीला यावं तशी येऊन बसली होती. कोक वगैरे न पिता अमेरिकन माणसं मुकाट्याने बसूच शकत नाहीत. प्रचंड थंडी, त्यात हातातलं बर्फाचे खडे घातलेलं कोक, मला तर हुडहुडी भरली. जॉन हातवारे करुन आम्हाला खेळाचे नियम समजावून सांगत होता. समजा मैदानाच्या आकाराचा एक मोठा चौकोन काढला, त्याच्या चार पैकी

एका बिंदूवर हातात स्टंपसारखा दांडू घेऊन फलंदाज उभा केला. आता गोलंदाजाने टाकलेला चेंडू टोलवून इतर खेळाडू तो पकडेतो चौकोनाच्या बॉर्डरवरुन धावत जाऊन त्याला मूळ जागी परत यायचं आहे. असा काहीसा तो खेळ आहे. चौकोनी धाव पूर्ण झाली की स्कोअरबोर्ड वरचे आकडे बदलत आणि लोक जल्लोष करु लागत. पंक्तीप्रपंच नको म्हणून आम्ही पण बेगानी शादीमधल्या दीवान्या अब्दुलासारख्या एक दोनदा टाळ्या वाजवल्या. मध्येच एक मिकी माऊससारखा मोठा मॅस्कट उभा राही, इकडे तिकडे बागडे, लहान मुलं खदाखदा हसत. खेळ आहे की जत्रा असं मला वाटायला लागलं. आता आयपीएल क्रिकेट, त्यातल्या चीअरगर्ल्स, जाहिरातींचा धडाका हे बघता त्या दिवशीची जत्रा फारच बाल्यावस्थेतली वाटू लागली आहे. प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करण्याची त्यांची संस्कृती एव्हाना आपण चांगलीच अंगीकारलीय. 

अपरात्री कारच्या ब्रेकच्या जोरात आवाज आला म्हणून खिडकीतून खाली पाहिलं तर लिंडाची मोठी मुलगी उतरुन आत येताना दिसली. दुसर्‍या दिवशी तिमजली मॅन्शनची मालकीण लिंडा म्हणाली की मुलगी आठवड्यातून ३ संध्याकाळ बेबी सिटींग करायला जाते. त्यातून ती तिच्या फीचा खर्च करते. मला एकाच वेळेला कौतुक आणि विषाद वाटला. असो.

पुढच्या भागात आपल्याला पेनसिल्वानियातील या चिमुकल्या गावाजवळचं वाईडनर विद्यापीठ, हॅरीसबर्ग शहरातल्या आकर्षक विधानभवनापासून स्वप्ननगरीतली वाटावी अशा चॉकलेट फॅक्टरीच्या भेटीपर्यंत बरंच काही अनुभवायचंय. 

https://mohinimodak.blogspot.com/2020/10/blog-post.html

अमेरिका डायरी- प्रयाण

https://mohinimodak.blogspot.com/2011/03/blog-post.html

भाग २ : लिनकडच्या वास्तव्याबद्दलचा लेख वरच्या लिंकवर :-)

https://mohinimodak.blogspot.com/2021/06/chester-2.html


अमेरिका डायरी - chester जनजीवन 2

Thursday, October 15, 2020

अमेरिका डायरी- प्रयाण

 


ग्रुप स्टडी एक्स्चेंज (सांस्कृतिक आणि व्यावसायिक आदानप्रदान)च्या मुलाखतीसाठी मी नाशिकला गंजमाळ हॉलमध्ये पोचले. हायफाय माहौल दिसत होता. सूटबूट आणि सिल्क साड्या इकडून तिकडे झोकात वावरत होत्या. काही जण बुद्धासारखे आढयाकडे टक लावून पाहत होते. मोबाईल प्रकरण तेव्हा दुर्लभ असल्याने काही पुस्तकात डोकं खुपसून बसले होते. मग माईकवरुन घोषणा झाली की हा प्रकल्प अमेरिकेसाठी असल्याने, निवड झालेल्यांना अमेरिकन कुटुंबांसोबत एकट्याने राहायचं असल्याने आणि तिकडच्या १०,१२ क्लब्जमध्ये सादरीकरण करायचं असल्याने उत्स्फूर्त वक्तृत्व फेरी, मुलाखत आणि पुढचे सगळे सोपस्कार पूर्णपणे इंग्लीशमधून होतील. मध्येच हिंदी, मराठीचा टेकू घेतला तर तुम्ही बाद. सगळ्यांच्या घशाला आता थोडी कोरड पडली. ४,५ सूट आणि साड्या तर ताडकन उठून चालत्या झाल्या. वक्तृत्व फेरीत काही जण हातात आलेली विषयाची चिठ्ठी वाचून दीर्घ श्वास घेऊन एकदम एक्झिट घेते झाले. चला, तेवढीच स्पर्धा कमी. तरी ७० जण उरले. मला ’करप्शन’ विषय आला होता. मनात ’हर हर महादेव’ म्हणून मी काय ते बोलून आले. बहुतेक जण चांगले बोलले. शेवटी ९ जणांच्या पॅनेलने प्रत्यक्ष मुलाखत घेतली. भारताचा आणि अमेरिकेचा इतिहास, करंट अफेअर्स, तुम्ही आयुष्याकडे कसे बघता, तुमचे आदर्श कोण, तेच का?, अवांतर कौशल्ये कोणती, काही लॉजिकल आणि वैयक्तिक प्रश्न असे स्वरुप होते. ४-४ च्या दोन टीम आणि प्रत्येकी २ स्टँड बाय असे फक्त बारा जण निवडले जाणार होते. 

निकाल आला. डॉ. किबे सर आणि याच प्रकल्पासाठी कॅनडाला जाऊन आलेले प्रा. नावलेकर यांच्या मार्गदर्शनानुसार केलेली तयारी आणि मुलाखत मनासारखी झाली असे वाटल्याने निदान स्टँड बाय साठी तरी निवड होईल अशी मला खात्री होती. पण चक्क पहिलेच नाव माझे घोषित झाले तेव्हा क्षणभर अवाक झाले. मग अभिनंदन वगैरे आटोपले. घरी, आईला, सरांना कळवले. आमच्या टीममध्ये डॉ. श्रीया, आर्किटेक्ट वैशाली, हॉर्टीकल्चरीस्ट हेमराज आणि मी असणार आणि आम्ही ईस्ट कोस्टला फिलाडेल्फियाला जाणार असे कळले. दुसरी टीम शिकागोला. आता व्हिसाच्या अर्जासाठी पासपोर्ट जमा करायचा होता. माझा सहज म्हणून काढलेला पासपोर्ट तयार असून मी नागपूरला जाऊन तो घेऊन यायचे बाकी होते. व्हिसा अर्जाच्या आत म्हणजे परवा सकाळपर्यंत तो जमा केला नाही तर नाईलाजाने माझी संधी स्टँड बायला द्यावी लागणार होती. ते होते अमरावतीचे. आपण त्यांना भयंकर बडबडे म्हणून ब म्हणू. मला पासपोर्ट न मिळण्यावर त्यांची अमेरिकावारी अवलंबून असल्याने आमचे एक चमत्कारिक नाते तयार झाले होते. निकालाचा आनंद आणि पासपोर्ट न जमा केल्यास हातातून संधी निसटते की काय याचा ताण अशा द्विधा मनस्थितीत मी निघाले. तिकिट नेमके कन्फर्म झाले नाही पण ’ब’ने मला त्यांच्या बर्थवर बसू दिले. known devil is better than unknown angel या न्यायाने मी बसले पण अकोला येईपर्यंत त्यांनी कर्कश्य आवाजात माझे कान गळून पडतील इतकी बडबड केली. 

घरी सगळे सांगून मुलांना भेटून मी तडक नागपूरला गेले. सुदैवाने पासपोर्ट लगेच मिळाला आणि महेशच्या सांगण्यानुसार मिळेल त्या गाडीने थेट नाशिकला जाऊन मी तो एकदाचा जमा केला. हुश्श. आता आमच्यापैकी कुणाचा व्हिसा रिजेक्ट झाला तर ब ला पुन्हा संधी होती. त्यांच्याबरोबर अमेरिकेला जायच्या कल्पनेने मला आधीच हिव भरले पण आमची कागदपत्रं व्यवस्थित असल्याने आणि फिलाडेल्फिया विभागाच्या गव्हर्नरच्या आमंत्रणपत्रामुळे आम्हाला सगळ्यांना लगेच व्हिसा मिळाला, तो ही १० वर्षांसाठी. बाहेर आलो तर त्या मुंबईच्या कार्यालयासमोर अजूनही मारुतीच्या शेपटासारखी रांग होती. व्हिसा न मिळालेल्या, चुडे ल्यालेल्या काही पंजाबी नव्या नवर्‍या बाजूला अक्षरश: गळा काढून रडत होत्या. अमेरिका-कॅनडामध्ये बरेच पंजाबी आहेत. काही जण भारतात येऊन लग्न करतात आणि एकटेच आधी परत जातात. मागून व्हिसा मिळेल तेव्हा बायका येतात. अनेक देश तिकडे पोचल्यावरही व्हिसा देतात पण हा व्हिसा मिळालेल्यांच्या उड्या, मिठ्या, चुंबनं पाहून आपल्याला काहीतरी अद्भुत मिळालेले दिसतेय याची आम्हाला जाणीव झाली. शिरीष कणॆकरांनी " अमेरिकेचा व्हिसा मिळाल्याचा आनंद हा सात मुलींच्या पाठीवर ज्याला मुलगा होतो त्याच्या आनंदाच्या जवळपास जाणारा असतो" असे याचे खासच वर्णन केले आहे. मला इतकाबितका नाही पण आनंद झाला, त्याच वेळी चाळीस दिवस आपल्या साडेचार वर्षांच्या इवलुश्या जुळ्यांना ठेवून जायचेय या कल्पनेने पोटात खड्डा पण पडला होता. 

माझा न्यूजर्सीचा मामेभाऊ विक्रम, आता लॉस एंजेलिसला राहणारा (त्याला एलए म्हणायचं म्हणे) कंपनीतला माजी बॉस आणि मित्र श्रीराम आणि ऑर्कुटवर (तेव्हा फेसबुक, व्हॉट्सअप नव्ह्तंच) ओळख झालेले न्यूयॉर्कचे अनिल नेने या तिघांना विचारून जमेल तशी तयारी सुरु केली. अकोल्यात तेव्हा काहीच मिळायचे नाही. दरम्यान रोटरीकडून नागपूरला झालेले ग्रूमिंग सेशन्स खूपच मोलाचे होते. अगदी वेस्टर्न टॉयलेट एटिकेट्सपासून, देहबोली कशी असावी, वेळव्यवस्थापन ते प्रेझेंटेशन स्किल्सपर्यंत. भारतीयांची प्रतिमानिर्मिती तुमच्या हातात आहे हे सतत बजावून सांगितले गेले. अशा भेटींमुळॆ आमच्या टीमची एव्हाना आपसात चांगली मैत्री झाली होती. आता आमचे अमेरिकेतील कार्यक्रमांचे सिस्टमॅटिक वेळापत्रक मेलवर आले. जायचा दिवस आला. विमानतळावर टीमपाशी वेळेत पोचलो. चेक इन पाशी महेशकडे एकदा शेवटचे वळून पाहिले, म्हटलं ’विमान वाटेत धडपडलं तर काय घ्या’. श्रीया, वैशाली व आमच्या टीमलीडर सरांनी भारतात बरेचदा विमानप्रवास केला होता. हेमराज आणि मी मात्र पहिल्यांदाच विमानात बसून एकदम बुईंग अमेरिकेलाच निघालो होतो पण ’हर हर महादेव’ म्हटले की सारे जमते. :-)


गाडी, आपलं, विमान फ्रँकफुर्टला (फ्रँकफर्ट म्हणायचं) म्हणजे जर्मनीत पोचले. ४ तास हॉल्ट होता. अगदी पॉश पण अवाढव्य एसटी स्टँड असावे तसे लोक बाकावर, खाली कुठेही बसले होते. काळे, करडे, निळे, तपकिरी एवढेच कपड्यांचे रंग. तिथे कॉफी विचारली. किंमत ऐकून मनात गुणाकार केला, डोळे पांढरे केले आणि काचेतून दिसणारे देखणे लखलखते शहर पाहत गप्प बसलो. नाहीतर काय नुसतं काळं गरम पाणीच असतंय अशी मनाची समजूत घातली. इथे पुढच्या फ्लाईटचे चेक-इन धिप्पाड अमेरिकन अधिकारी करत होते. नियमबाह्य गोष्टी भल्यामोठ्या डस्टबीनमध्ये अक्षरश: फेकून देत होते. लोक कुई-कुई करुन काही सांगू लागले की मानगूट धरुन बाजूला करत. वैशाली आणि सरांचे जास्त वजनाचे बरेच  महागडे कॉस्मेटिक्स त्यात फेकले गेले. अमेरिकेने ट्वीन टॉवर हल्ल्यापासून ब्रोकन विंडो सिक्युरिटी ठेवलीय. म्हणजे काचेवरचा साधा तडा सुद्धा ते बॉबस्फोटाइतका गंभीर मानतात त्यामुळे देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत ते तडजोड करत नाहीत. अगदी शाहरुख खानला सुद्धा त्यांनी संशयावरुन तपासणीसाठी बाजूला बसवून ठेवल्याच्या बातम्या आपण वाचल्या आहेत. अखेर हे दिव्य आटोपून एकदाचे विमान सुटले आणि आमचे वर्‍हाड फिलाडेल्फियाला सुखरुप पोचले. (19 April 2007)

https://mohinimodak.blogspot.com/2011/03/blog-post.html
भाग २ : लिनकडच्या वास्तव्याबद्दलचा लेख वरच्या लिंकवर :-)
https://mohinimodak.blogspot.com/2020/05/blog-post.html

अमेरिका डायरी - दुसरा आठवडा - जनजीवन१

https://mohinimodak.blogspot.com/2021/06/chester-2.html

अमेरिका डायरी - chester जनजीवन 2